गुरुवार, १६ मार्च, २०१७

सप्तशती, ग्रेस आणि महिला दिन- ४


स्त्री असो अथवा पुरुष, माणूस म्हणून विचार केला पाहिजे या युक्तीवादातच एक अपूर्णता आहे. माणूस म्हणून विचार केला पाहिजे असे म्हणताना आपल्या मनात- क्रौर्य विरहीत करुणा, दुर्भावना व्यतिरिक्त चांगुलपणा या गोष्टी असतात. हे मुळातच wishful thinking आहे. आमची ती अपेक्षा असू शकते पण ते अशक्य आहे. या विश्वाचं, माणूसपणाचं ते स्वरूप नाही. विश्वाचं, माणसाचं स्वरूपच मिश्र आहे. त्यात चांगले आणि वाईट, सद्गुण व दुर्गुण यांचे मिश्रणच असते. एक सोडून दुसरे जोपासणे शक्य नसते. एवढेच नाही तर दोन चांगल्या व्यक्तींचा, विचारांचा, तत्वांचासुद्धा विसंवाद आणि संघर्ष निर्माण होतो. त्यातील एकही वाईट नसतो, तरीही. हे जग असंच आहे. कितीही डोकेफोड करा, कितीही आदळआपट करा ते बदलत नाही; बदललेलं नाही. त्यासाठी दोषारोपण, उपाययोजना, चर्वितचर्वण खूप करता येईल. पण चर्वितचर्वण म्हणजे उपाय नाही. आपल्याला क्रौर्य विरहीत करुणा, दुर्भावना व्यतिरिक्त चांगुलपणा हवा असेल तर माणसाला बुद्धत्वाकडे, ख्रिस्तत्वाकडे, ईशत्वाकडे, ब्रम्ह्त्वाकडे वाटचाल करावी लागेल. हेच आत्मत्व. सप्तशती याकडेच निर्देश करते. `यादेवि सर्वभूतेषु ...' अशी त्यातील नमनाची सुरुवात आहे. `सर्वभूतेषु' फार महत्वाचा शब्द आहे. सर्व भूतांच्या ठायी. मग तो पुरुष असो, स्त्री असो, पशु असो, पक्षी असो कोणीही. या सर्व भूतांच्या ठायी असलेल्या तत्वांना नमन आहे. प्रश्न येतो सर्व भूतांच्या ठायी असलेलं मातृत्व म्हणजे काय? पुरुषांच्या ठायी मातृत्व कसं? अन याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे `यादेवि सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता' म्हणजे काय? मातृरुपात अवस्थित असलेली देवी असे म्हटले आहे. माताच जर देवी असेल तर मातृरूपाने अवस्थित असे का म्हटले? अन मातृरुपाशिवाय अन्य अनेक रूपांनी अवस्थित असलेली देवी वेगळी आहे काय? यासाठी थोडा सूक्ष्म विचार करावा लागेल.
देवी, शक्ती, माया हे शब्द भाषेच्या दृष्टीने स्त्रीवाचक आहेत, पण देवी, दुर्गा, आदिशक्ती, आदिमाया हे तत्व मात्र स्त्रीवाचक नाही. का नाही? या ठिकाणी दोन मूळ प्रश्नांचा विचार करावा लागतो. ते मूळ प्रश्न आहेत एकच मूळ तत्व दोन अथवा अनेक रुपात कसं व्यक्त होतं आणि दुसरा प्रश्न जडाचं चैतन्यात अन चैतन्याचं जडात रूपांतरण कसं होतं? या दोन्ही बाबी निसर्गात, मानवी जीवनात हरघडी पाहायला, अनुभवायला मिळतात. एक स्त्री एक पुरुष एकत्र येतात अन त्यातून स्त्री अथवा पुरुष नसलेला एक गर्भ आकाराला येतो. म्हणजेच दोनाचे एक होण्याची प्रक्रिया होते. या लिंगहीन गर्भाला लिंगप्राप्ती होते म्हणजेच पुन्हा एकाचे दोन होण्याची प्रक्रिया होते. चेतनाहीन मांसाच्या गोळ्याला चेतना प्राप्त होते आणि चेतनायुक्त देह चेतनाहीन होऊन जाण्याची प्रक्रियाही होते. मनुष्य मरण पावतो. या सगळ्यातच म्हणजे दोनाचे एक होणे, एकाचे दोन होणे, जडाला चैतन्य प्राप्त होणे, चैतन्याला जडत्व प्राप्त होणे ही जी काही प्रक्रिया आहे, हे घडण्याचं जे काही तत्व आहे, हे घडवणारी जी काही शक्ती आहे- ती आद्याशक्ती, आदिमाया, दुर्गा, ब्रम्ह इत्यादी. तेच आत्मस्वरूप. तेच `मी'. हे तत्व, ही शक्ती, ही प्रक्रिया अगम्य आहे. धर्म असो की विज्ञान; ते फक्त या विश्वाची वर्णने करतात. या विश्वाच्या आदितत्वाला मात्र त्यातील कोणीही स्पर्श करू शकत नाही. परंतु या अस्तित्वातील प्रत्येक जीवाचीच नव्हे तर जडाची; अन खरे तर प्रत्येक कणाची धाव, ओढ त्या आदितत्वाकडे आहे. ती कळो अथवा न कळो, आमच्या प्रत्येक स्पंदनाची धाव त्याकडेच आहे. कोणत्याही गोष्टीने, कोणत्याही उपलब्धीने, कोणत्याही कर्तृत्वाने, कोणत्याही संघर्षाने, कोणत्याही विजयाने, कोणत्याही यश वा अपयशाने आपली तृप्ती का होत नाही? याचे कारण ती आमची स्थानके नाहीतच. आम्ही ठरवले तरीही त्या त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. अतृप्ती, धाव ही आत्मतत्वाला स्पर्श करीपर्यंत चालूच राहणार. कोणतेही धर्मशास्त्र सांगते, कोणताही महापुरुष सांगतो म्हणून ही धाव आहे असे नाही. तर ही आत्मतत्वाकडील धाव आहे म्हणून शास्त्र वा महापुरुष ते सांगतात. ते त्यांनी ठरवलेले नाही. ते तसे आहे एवढेच फक्त ते कथन करतात. ही पटण्या न पटण्याची बाब नाही, ही सिद्धांताची वा सिद्ध करण्याची गोष्ट नाही. मान्य करणे अथवा न करणे आपल्यावर आहे. मान्य केल्याने फरक पडत नाही अन न केल्याने फरक पडत नाही. शांती अन तृप्ती मिळते का? ही प्रत्येकाने आपापला विचार करण्याची बाब आहे. स्त्री असो वा पुरुष वा तृतीयपंथी; सगळ्यांच्या सगळ्या धडपडींचा हा मथितार्थ आहे.
हे सगळे नीट कळले, मान्य झाले, पटले. पुढे काय? काय होणार त्याने? त्याचा काही उपयोग आहे? की नुसताच काथ्याकूट. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. हे खरे आहे की आपल्या या धडपडीचा अर्थ जाणून घेतल्याने व्यवहारात फारसा फरक पडणार नाही. त्याने एक मात्र होईल- आक्रस्ताळेपणा, अभिनिवेश, आग्रह, आडमुठेपणा, आक्रोश, आकांत, आक्रमकता कमी होतील. या विश्वातले संघर्ष आणि विसंवाद यांचे टोकदारपण कमी होईल. विचारीपण, समजूतदारपणा, विवेक या गोष्टींना भक्कम आधार प्राप्त होईल. ज्या आदितत्वाकडे हे सगळं अस्तित्व जीवाच्या आकांताने धावतं आहे त्या तत्वाचं, पर्यायाने स्वत:चं आत्मरूप समजून घेण्याला, जाणून घेण्याला अवकाश मिळेल. आमच्या या अनादि प्रवासाचा राजमार्ग जरा सुसह्य होईल. ऐहिक आणि आत्मिक शांती आणि तृप्तीचा थांबा गाठता येईल. सक्रियता कायम राहूनही धावपळ थांबेल. महिला, पुरुष, तृतीयपंथी, पशु, पक्षी, जड, चेतन सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या दृश्य स्वरूपाच्या पलीकडील हे आत्मतत्व हृदयंगम होणं हे व्यावहारिक जीवनासाठीही आवश्यक आहे. हीच बुद्ध, ख्रिस्त, ईश्वर, ब्रम्ह होण्याची प्रेरणा आहे. स्त्रीत्व, पुरुषत्व, जातीत्व किंवा अन्य कुठलं तत्व यांनी संघर्ष आणि विसंवादाचं स्वरूप फक्त बदलत राहील. आत्मत्वाच्या प्रेरणेनेच संघर्षाचं समन्वयात आणि विसंवादाचं संवादात रूपांतरण होऊ शकेल. अर्थात ते तसं व्हावं का? होईल का? कधी होईल? हेदेखील त्या आदिमायेलाच ठाऊक.
यावर्षीच्या महिला दिनी मला प्रतीत झालेला सप्तशती, मातृत्व, स्त्रीशक्ती यांचा हा आशय आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १६ मार्च २०१७

सप्तशती, ग्रेस आणि महिला दिन- ३


महिमामंडन आणि महिमाभंजन या दोन प्रवृत्ती माणसात प्रबळ असतात. त्यातूनच स्त्री ही दुर्गा आहे इत्यादी भावना आणि तिला देवी वगैरे न करता माणूस म्हणून राहू द्या हा युक्तिवाद आकारास येतात. महिलांच्या स्त्रीत्व आणि माणूसपण यावर भर देण्याच्या आजच्या युगात या भूमिकांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. महिला माणूस आहेत. पुरुषही माणूस आहे. त्यामुळे जे जे पुरुष करतो ते ते महिलाही करू शकतात. त्यांनी ते करायला हवे, असा आजचा विचारप्रवाह आहे. यात खूप काही वावगे नसले तरीही काही बाबींचा निर्देश आवश्यक ठरतो. १) पुरुष जे जे करतो ते ते श्रेष्ठ. त्यामुळे महिलांनी ते केल्याशिवाय त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होणार नाही. २) योग्य अयोग्य हा विवेक न करता पुरुष काही करीत असेल तर तसे करण्याचा आम्हालाही हक्क आहे. या दोन्ही धारणा चुकीच्या आहेत हे वेगळे पटवून देण्याची गरज नाहीच. शिवाय यातून ज्या अनेक बालिश भावना, धारणा, कल्पना जन्माला येतात त्या वेगळ्याच. पुष्कळदा तर्क ऐकायला येतो- मुलगा झाल्यावर पेढे आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटतात असे का? हे योग्य नाही. खरं तर दोघांनाही बहाल केलेलं त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अशा स्वरुपात देखील याकडे पाहता येईल. एक गंमत म्हणूनही त्याकडे पाहता येईल. मात्र `स्त्रीविमर्श' अथवा `स्त्रीवाद' हा किती पुरुषकेंद्रित आहे हेच यातून दिसून येते. बर्फी वाटून तिचे स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित होऊ शकते हा विचार स्त्रीवादी करूच शकत नाहीत. कारण त्यांचे सारे लक्ष पुरुष काय करतात याकडेच असते. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींना असलेली स्त्रीवाचक नावे हाही वादविषय. वास्तविक तिचा एकाधिकार निमूटपणे मान्य करण्यात आलेला आहे असाही अर्थ लावता येऊ शकेल. तो श्रेष्ठत्वाचा निकष म्हणता येईल, पण श्रेष्ठत्वाचा निकष पुरुष हा असल्याने तसा अर्थ लावता येत नाही. मान्यही करता येत नाही. तेच वस्त्रप्रावरणे, वागणे- बोलणे- भाषा- छंद- आवडी- अशा सगळ्या बाबीत पाहायला मिळते. महिलांमधील व्यसनाधीनता, शिवराळ भाषा, मर्यादा तोडण्याचा अट्टाहास स्त्रीवादाची पुरुषकेंद्री मानसिकता अधोरेखित करतो. आपली उक्ती कृती, विचार उच्चार यांचे निकष आणि मापदंड पुरुष काय करतो हे नसावेत याची स्त्रीवादाची जाणीव व्यापक होण्याची नितांत गरज आहे. व्यक्ती म्हणून सर्वांगीण विकास आणि समाजधारणेतील योगदान यासाठीची महिलांची वाटचाल ही योग्य आणि अभिनंदनीय आहेच. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात असलेला त्यांचा वावर योग्यच आहे. मात्र या बाबतीतही दोन बाबींचा निर्देश आवश्यक ठरतो. १) अशा प्रकारे विकास आणि योगदान करताना मानसिकता कशी आहे ते महत्वाचे ठरते. म्हणजे आपण जुन्या पद्धतीने वाढलो त्यामुळे स्वाभाविकपणे येणाऱ्या मर्यादा, पुढच्या पिढीने वागवण्याची गरज नाही असाही दृष्टीकोन पाहायला मिळतो. योग्य अयोग्यतेचे निकष पुढच्या पिढीसाठी असण्याची गरज नाही. विवेक वगैरे जरा बाजूला ठेवले तरी हरकत नाही अशीही एक समजूत पाहायला, अनुभवायला मिळते. २) पुरुषांनी जगात आजवर जे जे काही केले त्याने त्यांचे वा जगाचे खूप काही भले झाले. जगाचे नंदनवन झाले, सुख- शांती- समाधान सर्वत्र नांदू लागले असे झाले आहे का? या दोन बाबींचा विचारही महत्वाचा ठरतो.
महिलांचा माणूस म्हणून विचार व्हायला हवा ही अतिशय रास्त भूमिका आहे. परंतु माणूस म्हणजे काय याचाही विचार हवा की नाही? अनेकदा जो गोंधळ होतो त्याची नेमकी मेख इथे आहे. माणूस म्हणजे शरीर, मन- मनातील इच्छा आकांक्षा यांचे एक गाठोडे, बुद्धी अन त्याच्या आधारावरील जोडतोडी, त्याच्या आधारावरील व्यवस्थापन एवढेच का? प्रचलित विचारपद्धतीत माणसाचे एवढेच स्वरूप विचारात घेतले जाते. नव्हे ते एवढेच आहे अशी एक दृढ श्रद्धा अनादी काळापासून जोपासल्या गेलेली दिसते. अन हेच खरेही आहे. असे म्हटले जाते की- हिंदू अथवा भारतीय विचार यापुढे जाऊन आत्म्याचा विचार मांडतो. हे खरेही आहे अन खोटेही. खरे यासाठी की, त्या दिशेने भारतातील लाखो करोडो लोकांनी आजवर चिंतन, प्रयोग आदी करून काही निश्चित बाबी निष्कर्षरुपात समोर ठेवल्या आहेत. अन खोटे एवढ्यासाठी की, ते पूर्णत: व्यवहारात कधीच नव्हते. त्या आधारावर उभा असलेला समाज पूर्णत: अस्तित्वात नव्हता. त्यामुळे तो आत्मविचार हा वारसा अथवा ठेव म्हणता येणार नाही. दुसऱ्याही एका कारणासाठी हे खोटे आहे. ते म्हणजे- आत्मविचार हा `माणूस' विचाराच्या पलीकडचा विचार आहे. माणूस ही मर्यादितच गोष्ट आहे. तात्पुरती बाब आहे. (खोटी नाही.) माणूस हे `मी'च्या प्रवासातील केवळ एक स्थानक आहे. अनेकदा भारतीय विचारात हा घोळ पाहायला मिळतो. आत्मा ही शरीर, मन, बुद्धी यासारखी एक वस्तू आहे असेच समजले जाते. जसे भाजीत वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण असते तसे मानवी जीवनात आत्म्याचे प्रमाण आहे असा काहीसा प्रकट वा सुप्त भाव पाहायला मिळतो. तसे नसून हे संपूर्ण अस्तित्व हीच आत्मतत्वाची अभिव्यक्ती असून यातील `माणूस' या बाबीसह सगळ्याच गोष्टी सीमित, तात्पुरत्या आहेत. अशी एक वेळ असेल जेव्हा आपण माणूस नसून भलतेच काही तरी असू आणि अशी एक वेळ राहील जेव्हा आम्ही माणूस न राहता वेगळेच काही असू. म्हणूनच `माणूस' म्हणून केला गेलेला विचार भारतीय अथवा भारताबाहेरील हा मर्यादित म्हणावा लागतो. हां, एक गोष्ट खरी की- भारताबाहेर त्याच्या या मर्यादेचा विचार झालेलाच नाही. पण भारतात मात्र तो झालेला आहे. भारतीय विचार अथवा हिंदू विचार हा त्यामुळे वैचारिक क्षेत्रात काही पावले तरी पुढचा म्हणावा लागेल. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १५ मार्च २०१७

सप्तशती, ग्रेस आणि महिला दिन- २


`मातृभक्ती' हा शब्द उच्चारल्यावर, किमान महाराष्ट्रात तरी साने गुरुजींचं नाव नजरेपुढे आल्याशिवाय राहत नाही. `श्यामची आई' तर कित्येक दशके करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. परंतु साने गुरुजी देखील आपल्या आईबद्दल म्हणतात- `मी तिच्याबद्दल भरपूर आणि प्रेमाने बोलतो याचा अर्थ तिच्यात काहीच त्रुटी, कमतरता नव्हत्या असे नाही. सगळ्यांप्रमाणेच तिच्यातही न्यूनता होत्या. पण तिने मला जे दिले ते खूप आणि असाधारण आहे. माझे तिच्यावर प्रेम आहे अन ती माझी आई आहे. म्हणून मी तिच्याबद्दल भक्तीभावाने बोलतो.' `आई' आणि `बाई' यांचा हा तोल सांभाळणे महत्वाचे. `मातृत्व' आणि व्यवहारातील त्याचं `आई' हे रूप उदात्त, मंगल, शुभ आहेच. त्याला किंचीतही कमी करण्याचं वा तसा मनोभाव बाळगण्याचं कारण नाही. परंतु ते सर्वव्यापी नाही, त्यालाही मर्यादा आहे याची जाणीव असणं आवश्यक ठरतं. मातृत्व म्हटल्यावर वात्सल्य, सहनशीलता, प्रेम, समर्पण, भावबंधन या गोष्टी मनात येतात. त्या सत्यच आहेत. मात्र या साऱ्या गुणांचा गैरवापर केला जात नाही का? किंवा या गुणांचा गैरफायदा घेतला जात नाही का? पदोपदी अशा प्रकारचा गैरवापर आणि गैरफायदा पाहायला मिळतो. मुलांवर अनेक गोष्टी लादणे, मुलांकडून अनेक अवास्तव अपेक्षा करणे, स्नेहापोटी चुकीच्या गोष्टी चालवून घेणे, मायेपोटी अयोग्य बाबी करायला लावणे, अयोग्य सवयी लावणे; अशा असंख्य बाबी पाहायला मिळतात. हा मातृत्वाचा गैरवापर ठरतो. दुसरीकडे, आई असल्याने ती घरातील कामे करणारच, दुखले खुपले तरीही त्याकडे दुर्लक्ष, तिच्या गरजा, भावना, अपेक्षा या सगळ्याविषयी गृहित धरण्याची वृत्ती हेही पाहायला मिळते. हे मातृत्वाचा गैरफायदा घेणे झाले. याचे आणखीही कंगोरे आहेत.
एखादी स्त्री माता होते त्यावेळी तिची अन्य नाती, अन्य भूमिका तशाच राहतात. पत्नी, सून, मुलगी, काकू, मामी, आत्या, मावशी, नोकरी, व्यवसाय, छंद, आवडी, स्वभाव, इच्छा, वृत्ती हे सगळे तसेच राहते. ती आई म्हणून विकसित होते तेव्हा या अन्य गोष्टीही नव्याने आकार घेत असतात. हे तिच्यासाठी स्वाभाविक असले तरीही बाकीच्यांसाठी तसे नसते. बाकीच्यांसाठी ते स्वाभाविक असण्याचे कारणही नसते. कारण ते आई झालेले नसतात. यातून निर्माण होणाऱ्या विसंवाद वा संघर्षाला केवळ मातृत्व उत्तर देऊ शकत नाही. सासू- सून- नणंद- विहिणी इत्यादी विसंवाद, पती वा मुलावरील हक्क आणि अधिकार, पतीशी कोणत्याही कारणाने होणाऱ्या विसंवादातून घटस्फोटाची वेळ येते तेव्हा मुलाचा वा मुलीचा ताबा मिळविणे या अथवा अशा अन्य अनेक संदर्भात मातृत्व समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. अगदी आई आणि तिच्या पोटचा गोळा यांच्यात अनेकदा जे विविध प्रकारचे ताणतणाव, विसंवाद, संघर्ष, गैरसमज पाहायला मिळतात त्यांनाही उत्तर देण्यात मातृत्व सक्षम असतेच असे नाही. वय हा घटक देखील महत्वाचा ठरतो. वाढत्या वयानुसार मातृत्वाबद्दलचं वलय कमी होत जातं. कधी कधी तर त्याबद्दल विपरीत ग्रह झालेले पाहायला मिळतात. अशा वेळी साधा आदर, गोड शब्द वा समजूतदार वागणं बोलणं यांच्याही समस्या निर्माण होतात. त्यावेळीही मातृत्व कमी पडतं. शिवाय भ्रष्टाचार, हिंसक वृत्ती, स्वार्थ, बेजबाबदारपणा आदी बाबी मातृत्वामुळे निकालात निघत नाहीत. आजच्या तर्कनिष्ठ, व्यवहारी, व्यक्तीप्रधान काळात तर या साऱ्या बाबी फारच महत्वाच्या ठरतात. यातील समस्या आणि संघर्षांना स्वत: ती स्त्री आणि अन्य अशा दोन्ही बाजू असतात. दोन्हीकडे गुणदोष असू शकतात, दोन्हीकडे चूक बरोबर असू शकते.
या विषयाचा आणखीन एका अंगाने विचार करावा लागेल. मातृत्व यात जननीत्व अध्यावृत आहे. जी जननी नाही ती माता नाही. किमान ती जननी नसली तरीही स्त्री तरी असायलाच हवी. मूल जन्माला घालणे, जननीत्व आणि मातृत्व यांचा व्यावहारिक आणि भावनिक अंगाने विचार बहुश: एकांगी असतो. त्यातील पुरुषाची भूमिका गौण ठरते, ठरवली जाते. नऊ महिने गर्भ धारण करणे हा महत्वाचा अन जिव्हाळ्याचा भाग असला तरीही ती एकटीच्या भरवशावर माता होऊ शकत नाही. शिवाय गर्भ धारण करण्याची जबाबदारी तिने स्वत:हून स्वीकारली वा मागून घेतली असेही नाही. ती जबाबदारी आपातत: निसर्गाने तिच्यावर सोपवली आहे. त्यामुळे त्यासाठी अतिरिक्त credit मिळवण्याचा विचार फारच सामान्य ठरेल. मुळातच स्त्री असो वा पुरुष, मूल जन्माला घालण्यासंदर्भात दोघांचीही जबाबदारी आणि श्रेय प्राथमिक स्वरुपाचेच आहे. कारण स्त्रीबीज फलित होऊन गर्भ तयार होणे यात दोघांचेही कर्तृत्व नाही. ती एक random process आहे. विज्ञान ज्याला random process म्हणतं त्याला देवभोळा माणूस देवाचं देणं म्हणतो. दोन्हीचा अर्थ एकच- ते अगम्य आहे, आमच्या प्रयत्नांच्या बाहेरचं आहे. प्रत्यक्ष गर्भ तयार होणे यात दोघांचीही भूमिकाच नाही. शिवाय सुरुवातीला तो केवळ मांसाचा एक गोळाच असतो. त्या जड गोळ्यात चेतना येते ती कुठून? तो गोळा पुढे चालून स्त्री होईल की पुरुष हे कोण निश्चित करतं? थोडा विचार केला तर लक्षात येईल की, या सगळ्या प्रक्रियेत माणसाची भूमिका प्राथमिक आणि मर्यादित स्वरुपाची तर आहेच, शिवाय ती भूमिका सुद्धा त्याने ठरवलेली वा मागून घेतलेली नाही. निसर्ग वा अन्य काहीही नाव द्या- ते जे काही असेल त्याने ती ती भूमिका देऊन माणसाला, स्त्रीला आणि पुरुषाला जन्माला घातले आणि त्यांच्या माध्यमातून तो आपले कार्य करीत असतो. श्रेय, हक्क इत्यादींचे आमचे झगडे किंवा त्याबद्दलच्या आमच्या धारणा तपासून पाहायला हव्यात. स्त्रीबीजाच्या फलनासाठी स्त्रीची गरज नाही हे तर test tube baby च्या माध्यमातून विज्ञानाने केव्हाच सिद्ध केले. आता तर गर्भधारणेसाठी सुद्धा स्त्रीची गरज विज्ञानाने मोडीत काढली आहे. मानवी गर्भ डुकरीणीच्या गर्भाशयात वाढवण्याचा प्रयोग विज्ञानाने यशस्वी केला आहे. तो गर्भ नंतर निकालात काढण्यात आला हा भाग वेगळा. पण प्रायोगिक स्तरावर विज्ञानाने त्यात यश मिळवले आहे. याहीपुढे जाऊन माणूस जन्माला घालण्यासाठी माणसाची केवळ एक पेशी पुरेशी होईल का, या दिशेने विज्ञानाचे प्रयोग सुरु आहेत. evolution चा प्रवाह थांबला असून आता कुठलेच बदल होणार नाहीत असंही समजण्याचं कारण नाही. मानवी शरीररचना, जनन पद्धती आदी बदलूही शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्त्री, तिचं मातृत्व आणि त्यावर आधारित तिचं श्रेष्ठत्व इत्यादी मोठ्या प्रमाणावर प्रश्नांकित होतं.
(क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १० मार्च २०१७

बुधवार, ८ मार्च, २०१७

सप्तशती, ग्रेस आणि महिला दिन- १

सप्तशती ऐकताना आज एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं. आजपर्यंत त्याकडे लक्ष गेलं नव्हतं. सगळ्या भूतांच्या ठायी वसणाऱ्या आदिमायेच्या विविध रूपांना वंदन करताना सुरुवात होते- बुद्धिरूपेण संस्थिता. स्वाभाविकच आहे. अगदी वेड्यातला वेडासुद्धा, त्याची बुद्धी त्याला सांगेल तसाच वागतो बोलतो. कोणी त्याला काही समजावलं तरीही ते तो स्वत:च्या बुद्धीनुसारच ग्रहण करतो. या वंदनमालिकेत, `मातृरूपेण संस्थिता' याचा क्रमांक शेवटून दुसरा आहे. शेवटला नाही. मातृत्वाला सर्वोच्च स्थान दिले असूनही त्याचा क्रमांक शेवटला नाही, तर शेवटून दुसरा. अन त्यानंतरचा, अखेरचा क्रमांक आहे `भ्रांतिरूपेण संस्थिता'. मातृरूपाचा क्रमांक शेवटून दुसरा आणि अखेरीस `भ्रांतिरूपेण' या दोन गोष्टींनी आज मनाला वेढून टाकले. त्याबाबत अधिकृतपणे तर रचनाकारच सांगू शकेल, पण मनात जे विचार आलेत ते मांडण्याचा हा प्रयत्न.
योगायोगाने आज जागतिक महिला दिन आहे. मनातल्या विचारांना त्याचीही जोड मिळाली अन त्यात हळूच कवी ग्रेसांनीही प्रवेश केला. ग्रेसांच्या एका कवितेतील एक ओळ आहे- `ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मीही रडलो'. याबाबत एका मुलाखतीत ते बोलले आहेत. ते म्हणतात- एखादी स्त्री आई होते. वात्सल्यभावाने ती आपल्या पोटच्या गोळ्याला पाजते. मात्र त्यावेळीही आपली लज्जा, आपला शृंगार, आपले केस याकडे तिचं लक्ष असतंच. ती एकाच वेळी महन्मंगल माता, वात्सल्यमूर्ती अन स्त्री देखील असते. तिचं खरं किंवा अंतिम रूप कोणतं? ती आई आहे कारण ती स्त्री आहे, अन आई झाल्यावरही ती स्त्री आहे. तिचं हे `स्त्री'पण, `मादी'पण आणि मातृत्वविषयक भावना यांचा हा संघर्ष आहे. तो एक प्रकारे अस्तित्वाच्या गाभ्याशी भिडणारा आध्यात्मिक संघर्ष आहे. सप्तशतीत तोच संघर्ष आहे. या विश्वातील अन्य सगळ्याच गोष्टींप्रमाणे तिचं मातृत्वसुद्धा `भ्रांति' आहे. या चराचर विश्वाचं अंतिम रूप `भ्रांति' हेच आहे.
स्त्रीचं मादीपण हे जर अखेरचं रूप असेल तर ती एकदमच सीमित होते. अन्य सगळ्याच गोष्टींना जसा अन्य असंख्य गोष्टींचा विळखा असतो तसाच तिलाही `मादी'व्यतिरिक्त असंख्य गोष्टींचा विळखा असलाच पाहिजे. एक छोटं अस्तित्व अन्य असंख्य छोट्या वा मोठ्या अस्तित्वांनी घेरलं जाणं, झाकोळलं जाणं स्वाभाविक आहे. त्यातून निर्माण होणारे विकार, विलास, विचार हेही ओघानेच येणार. म्हणूनच ती कोणी विशिष्ट उरत नाही. आजच्या वातावरणात, परिस्थितीत यावर विचार केला तर ही बाब अधिक ठळक होते. तीन प्रकार पाहायला मिळतात. १) बरोबरीचा दर्जा, संधींची समानता, कर्तृत्वाचे झेंडे; असं असूनही असलेला संघर्ष आणि उपेक्षा. २) सामान्य माणूस म्हणून जगण्यासाठीही जीवाचा संघर्ष करावा लागणारी स्त्री. ३) पुरुषांच्या, स्त्रियांच्या, समाजाच्या अन स्वत:च्याही असंख्य अपेक्षांच्या भोवऱ्यात सापडलेली स्त्री.
यातील पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारातील समस्या, संघर्ष, कोंडी यावर नजर टाकल्यास लक्षात येईल की, ते सारे universal आहे. म्हणजेच त्याला भौगोलिक सीमा तर नाहीतच, पण लिंगविषयक सीमाही नाहीत. या समस्या, संघर्ष, कोंडी स्त्रियांना आहे तसेच पुरुषांनाही आहे. बालकांनाही आहेत, अन तृतीय पंथियांनादेखील आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, अहंकार या भूतमात्रांच्या मूळ प्रेरणांमध्ये त्याची बीजं आहेत. वास्तविक दुसऱ्या प्रकारातील स्त्रीचं दु:ख, वेदना आणि संघर्ष हे देखील या मूळ प्रेरणांमधूनच उगम पावतं. एवढंच की त्याचं मूळ त्यांच्याशिवाय अन्य लोकांच्या त्या विकारांमध्ये लपलेलं असतं. संपत्ती, स्नेह, सन्मान या लौकिक बाबी सुद्धा स्वत:च्या वा बाकीच्यांच्या मूळ प्रेरणांमधूनच प्रकट होतात. म्हणूनच स्त्री असो वा पुरुष, अथवा तृतीयपंथी; या भावनांच्या वर उठून; भावनांचं, विचारांचं उन्नयन करूनच स्वत:चं अन दुसऱ्यांचं, पुरुषांचं, स्त्रियांचं अन तृतीय पंथीयांचं लौकिक आणि आध्यात्मिक जीवन सुखद आणि परिपूर्ण होऊ शकेल.
पुरुषांचं पुरुष म्हणून अस्तित्व जसं एकांगी, तसंच स्त्रीचं स्त्री म्हणून अस्तित्व एकांगी. नव्हे केवळ परस्परपूरकता हे उत्तरसुद्धा अपूर्णच. आज केवळ रावण अथवा शूर्पणखा, कंस अथवा पूतना, किंवा शकुनी- दुर्योधन- कैकयी- मंथरा- आनंदीबाई- एवढेच आजूबाजूला पाहायला मिळतात असे नाही. त्यांची सरमिसळ होऊन त्यातील स्त्री पात्रे अन पुरुष पात्रे एकत्र येऊन हैदोस घालतानाही पाहायला मिळतात. मी श्रेष्ठ, मी शक्तिमान, मी सत्ताधारी, मी निर्णय घेणार, माझे चालले पाहिजे; ही वृत्ती बदलणे वा नियंत्रित करणे ही मूळ बाब आहे. पुरुषी वर्चस्व वाईट आणि अन्याय्य आणि स्त्री वर्चस्व चांगले आणि योग्य असे तर नाही होऊ शकत. किंवा स्त्री आणि पुरुष दोघांनी एकत्र येऊन हडेलहप्पी करणे हेही उचित होऊ शकत नाही. परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणा किंवा काळाची गरज म्हणा, पण असा वर्चस्वाचा भाव प्रत्यक्ष किंवा सूचक, कोणत्याही पद्धतीने समर्थनीय नाही ठरू शकत. संसाररथाची दोन चाके म्हणताना; जसं स्त्री चाक मागे राहून चालणार नाही तसंच स्त्री चाक पुढे जाऊनही चालणार नाही. अन कोणत्याही चाकाने दुसऱ्या चाकाच्या पुढे जाणे किंवा दुसऱ्या चाकावर कुरघोडी करणे हे नको असेल तर त्या त्या चाकाच्या मनातील विचारांचं, विकारांचं, वासनांचं विलसित समजून घेऊन त्याच्या उन्नतीकरणाची गरज आहे. जोवर मनबुद्धीचं हे उन्नयन होत नाही, तोवर `स्त्रीत्व' असो वा `मातृत्व', त्याने फरक पडणार नाही. `स्त्रीत्व' दैहिकतेच्या अंगाने एकांगी होईल, जे आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि `मातृत्व' भावनिकतेच्या अंगाने एकांगी होईल, जे याआधीच्या काळात अनुभवास आलं आहे. स्त्री असो वा पुरुष, इह स्वरूपाकडून ईश स्वरूपाकडे जाण्याच्या प्रेरणा जाग्या होत नाहीत तोवर चालणाऱ्या साऱ्याच गोष्टी ही फक्त `खटपटांची लटपट' एवढीच राहील.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ८ मार्च २०१७