शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

अराजक

मी काही आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता, समर्थक, हितचिंतक व मतदार नाही. मुळात आम आदमी पार्टीची स्थापना चुकीची, अयोग्य, अनावश्यक आहे. आपल्या देशाला अधिक राजकीय पक्षांची गरज नाही. असलेली बजबजपुरीच कमी व्हायला हवी. त्यामुळेच आम आदमी पार्टी लोकसभेत जावी असे काही मला वाटत नाही. तरीही...

तरीही काही प्रश्न मनात येतात-

१) त्या विदेशी मुलींनी तक्रार करताच गुन्हा नोंदवून fir दाखल करण्यात आला. आणि चौकशीआधीच त्या निरपराध आहेत हे गृहीत धरून सगळ्यांनी गदारोळ सुरु केला. परंतु तेथील रहिवासी १०-२० वेळा पोलिस ठाण्यात गेले, त्यांनी तक्रार केली. मात्र त्याची दखलही घेण्यात आली नाही. का? स्थानिक लोक म्हणतात त्याप्रमाणे त्या विदेशी मुली खरेच अवैध कामे करीत असतील तर ते चूक नाही का? त्यातही तेथे जर अमली पदार्थांचा व्यापार वा अमली पदार्थांचे व्यवहार चालू असतील तर ते; मंत्री काय म्हणाले यापेक्षाही अधिक समाज व देश विरोधी आणि अधिक गंभीर स्वरूपाचे नाही का?

२) पोलिस कर्तव्यात कुचराई करतात हे देशव्यापी सत्य नाही का? आपल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही अशा तक्रारी केलेल्या नाहीत का? विरोधी पक्षांचा अनुभव वेगळा आहे का? पोलिस आपले काम व्यवस्थित करीत नसतील तर त्यांची तक्रार करावी, त्यांच्या व्यवस्थेत बदल घडवून आणावा वगैरे युक्तिवाद, तर्क आणि सल्ला बालिश नाही का? सध्याची इंग्रजांनी दिलेली पोलिस व्यवस्था कुचकामी असून केराच्या टोपलीत टाकून द्यावी आणि नवीन पोलिस रचना निर्माण करावी अशी चर्चा अनेक स्तरांवर किती दिवसांपासून सुरु आहे? काय झाले त्याने? चर्चा, नियम, तक्रारी वगैरेचा आपला अनुभव खरेच त्याची तरफदारी करावी असा आहे का? आपण किती बालिश आणि बावळट असावे?

याचा अर्थ अराजक असावे असा नाही. पण आम आदमी पार्टीच्या विरोधासाठी कायदा आणि मानवतेच्या नावाखाली दुसरे अराजक माजवावे हेही योग्य नाही ना?

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

भारतीय पुनरूत्थानाचे विवेकानंद संदर्भ

स्वामी विवेकानंद यांनी या जगाचा निरोप घेतल्यावर लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर लिहिलेल्या श्रद्धांजलीपर लेखात, स्वामीजींची आद्य शंकराचार्य यांच्याशी तुलना केली होती. अद्वैत तत्वज्ञानाची ध्वजा उंच उभारणे आणि अखिल भारतीय दृष्टी तसेच संपूर्ण भारताला एक करण्याचे प्रयत्न; या दोन्ही संदर्भात टिळकांनी केलेली ही तुलना अतिशय सार्थ अशीच आहे. किंबहुना स्वामी विवेकानंद त्याहूनही खूप पुढे निघून गेलेले पाहायला मिळतात. स्वामीजींची तीन वैशिष्ट्ये सांगता येतील. १) अखिल भारतीय दृष्टी, २) पूर्व आणि पश्चिम यांच्यातील सेतू आणि ३) हिंदू विचार आत्मसात करून अहिंदू पाश्चात्य लोकांना भारताच्या सेवेसाठी कामाला लावणे.

अखिल भारतीय दृष्टी असलेले महापुरुष स्वामीजींच्या आधीही आपल्या देशात होऊन गेले. पण त्यांची भौगोलिक, सामाजिक आणि वैचारिक व्याप्ती कमी होती. कोणाच्या दृष्टीपुढे पूर्ण भारत असला तरी त्यांच्या कामाची व्याप्ती कमी होती. स्वामीजींच्या नजरेपुढे आजच्या पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसह संपूर्ण भारत होता. या भारतातील सगळ्या जातीपाती होत्या, सगळे आर्थिक- सामाजिक- शैक्षणिक- गट होते, राजे महाराजांपासून दरिद्री भिकार्यांपर्यंत सगळे आबालवृद्ध स्त्री-पुरुष होते. यातील प्रत्येकासाठी त्यांनी विचार दिलेला आहे. यातील प्रत्येकाच्या कर्तव्यांची आणि अधिकारांची चर्चा त्यांनी केली आहे. भारत म्हणजे त्यांच्यापुढे भारताचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य असे सारे होते. कुठलाही विषय, कुठलाही घटक, कुठलेही क्षेत्र त्यांच्या नजरेतून आणि स्पर्शातून सुटले नाही. जो भारत त्यांच्या नजरेपुढे होता तो त्यांनी पूर्ण फिरून पालथा घातला होता. ते जंगलात राहिले, खेडोपाडी झोपड्यातून राहिले आणि राजे महाराजांच्या महालातूनही राहिले. प्रत्यक्ष स्वामीजींच्या काळातही अनेक थोर पुरुष होते. पण त्यातील प्रत्येकाच्या काही मर्यादा होत्या. कोणी एखाद्या जातीसाठी काम करीत होते, तर कोणी एखाद्या समस्येसाठी, तर आणखी कोणी एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी. कोणी फक्त स्त्रियांसाठी तर कोणी मुलांसाठी. स्वामीजींची दृष्टी अनेक अर्थांनी व्यापक आणि सर्वसमावेशक होती. त्याला प्रत्यक्ष कार्याचीही जोड होती. भारताच्या ज्ञात इतिहासातील अशा प्रकारचे स्वामीजींचे पहिले व्यक्तीमत्व होय. भारतावरील प्रेमाचा इतका खणखणीत, स्पष्ट आणि ठाम उच्चार त्यांच्या पूर्वी झाला असेल का ही शंकाच आहे. इंग्रजांविरुद्ध लढल्या गेलेल्या यशस्वी स्वातंत्र्यलढ्याला मिळालेल्या यशात, स्वामी विवेकानंद यांनी केलेले जागरण आणि प्रबोधन यांनी केलेल्या पूर्वतयारीचा मोठा व मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, योगी अरविंद यांनीच नव्हे तर जगदीशचंद्र बोस आणि जे.आर.डी. टाटा यांच्यापर्यंत सगळ्यांनी त्यांचे ऋण मान्य करून त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

या पृथ्वीच्या पाठीवर विविध मानववंश वेगवेगळ्या ठिकाणी उदयाला आले. त्यांनी आपापली वाटचाल केली. प्रत्येकाचा विकास आपापल्या पद्धतीने आपापल्या शक्तीनुसार झाला. त्यात भारताचा विकास वैशिष्ट्यपूर्ण होता. लौकिक बहिर्मुख जीवनाला अलौकिक अंतर्मुख आध्यात्मिकतेची दिलेली जोड हे भारताचे वैशिष्ट्य. अन्य जग, विशेषत: पाश्चात्य समाज लौकिक बहिर्मुखतेतच अडकून पडले. या दोहोंना जोडण्याचे कार्य स्वामीजींनी यशस्वीपणे केले. जणूकाही त्यासाठीच त्यांचा जन्म होता. आधुनिक वैज्ञानिक प्रगती सुरु झाल्यावर पाश्चात्यांच्या धर्मश्रद्धा आणि त्यांचा पाया धडाधड कोसळू लागला होता. अशा वेळी निर्माण झालेली रिक्तता भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. नेमके हेच कार्य स्वामीजींनी केले. भगिनी निवेदिता म्हणतात त्याप्रमाणे, `जिला सत्याचे भय नाही अशा धर्मश्रद्धेची पश्चिमेला गरज होती. स्वामीजींनी ती गरज पूर्ण केली.’ अशा प्रकारे जगभरातील विभिन्न मानव समुदायांना, हिंदू चिंतनाने प्रतिपादित केलेल्या जीवनलक्ष्याच्या दिशेने वळवण्याचे अतिप्रचंड महत्कार्य स्वामीजींनी पार पाडले आणि पूर्व आणि पश्चिमेचा संगम आणि समन्वय घडवून आणला. पूर्व आणि पश्चिम याआधी कधीच एकत्र आली नव्हती वा एकमेकांना अपरिचित होती असा याचा अर्थ नाही. स्वामीजींच्या पूर्वी झालेले पूर्व- पश्चिमेचे एकीकरण राजकीय आणि आर्थिक वर्चस्व गाजवण्याचा भाग होता. मात्र कोणीही कोणावर सत्ता गाजवणे, एकाने दुसर्याला मिटवून टाकणे यासारख्या क्षुद्र गोष्टी पूर्णपणे दूर सारून; विश्वकल्याणाच्या प्रबल ऊर्मीने कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी ती वाट दाखवून; त्यासाठी मान्यता मिळवण्याचे भगिरथ कार्य हे स्वामीजींचे दुसरे वैशिष्ट्य होय.

अहिंदू पाश्चात्य लोकांना हिंदू विचार आत्मसात करून भारताच्या सेवेत लावणारेही स्वामीजी पहिले महापुरुष होत. भगिनी निवेदिता तर सुपरिचित आहेतच. त्यांच्याशिवायही अनेक जण भारताच्या सेवेत लागून स्वत:ला धन्य समजत होते. अल्मोड्याला अद्वैत आश्रम प्रारंभ करणारे सेव्हियर दांपत्य, स्वामीजींच्या भाषणाची टिपणे घेणारे गुडविन, मठ आणि अन्य सेवाकार्यांसाठी पैसा देणारे विदेशी लोक, विदेशात त्या त्या ठिकाणी आश्रम स्थापन करण्यासाठी वेगवेगळी मदत करणारे लोक, स्वामीजी आणि त्यांच्या गुरुबंधूंना सुरुवातीच्या दिवसात निवारा देणारे लोक; अशा अनेकांचा उल्लेख करता येईल. भारतात महिलांना जाळून टाकण्यात येतं का? लहान मुलांना मगरीच्या तोंडात फेकून देण्यात येतं का? जगन्नाथाच्या रथाखाली ढकलून देऊन लोकांना चिरडून टाकण्यात येतं का? भारत हा भूताखेतांचा देश आहे का? असे नाना प्रश्न युरोप-अमेरिकेत स्वामीजींना विचारण्यात आले होते. भारताबद्दल लोकांच्या काय कल्पना होत्या हे यावरून लक्षात यावे. लोकांच्या मनातील अशा सार्या चित्रविचित्र कल्पना दूर करून त्यांना आपल्या देशाची माहिती करून देणे, भारताविषयी योग्य प्रतिमा निर्माण करणे, येथील विचारांशी-चिंतनाशी त्यांचा परिचय करून देणे, या विचारांची श्रेष्ठता पटवून देणे, वर्तमान युगातील त्याची उपयुक्तता आणि महत्व विशद करणे आणि अंती त्यानुसार व्यवहार करण्यासाठी लोकांना प्रेरित करणे; एवढे सारे स्वामीजींनी केले. हे करताना मोठा संघर्षही त्यांना करावा लागला. निंदानालस्ती, अपप्रचार, गैरसमज असे सारे त्यांनी लीलया पेलून धरले. जगात त्यावेळी नव्यानेच प्रसारित होत असलेल्या इंग्रजी भाषेत हजारो वर्षांपूर्वीचे उपनिषदांचे तत्वज्ञान समजावून सांगणे किती जिकीरीचे काम आहे हे स्वत: स्वामीजींनीच नमूद करून ठेवले आहे. कधी ऐकलेसुद्धा नाहीत असे अनेक शब्द, परिभाषा, कल्पना पूर्णत: नवीन संस्कृतीतील आणि नवीन वातावरणातील लोकांना समजावणे किती कठीण काम असेल ! जगाच्या विचारविश्वात नवीन भाव संक्रमित करण्याचे शिवधनुष्य पेलण्यासाठीच ईश्वराने त्यांना पाठवले असावे.

झोपलेल्या भारताला जागे करणे आणि जगाची उपेक्षा संपवून टाकून जगाच्या नकाशावर त्याला सन्मानाने प्रतिष्ठित करणे यामागे स्वामीजींची काय दृष्टी होती? काय हेतू होता? काय साधायचे होते त्यांना? पाश्चात्य दिग्विजय आटोपून भारतात परतल्यावर रामनद संस्थानातील ज्या पांबन येथे स्वामीजींनी पहिले पाऊल ठेवले तेथील अभिनंदनपत्रास उत्तर देताना स्वामीजींनी स्पष्ट शब्दात हा उद्देश कथन केला. ते म्हणाले, `विधीच्या संकेतानेच आपण हिंदू एका मोठ्या आणिबाणीच्या आणि जबाबदारीच्या अवस्थेत सापडलो आहोत. समस्त पाश्चिमात्य जाती आमच्याकडे आध्यात्मिक साहाय्यासाठी येत आहेत. भारतमातेच्या सर्व सुपुत्रांचे आता कर्तव्य आहे – समस्त जगाला मानवजीवनाच्या कोड्याचे सर्वोत्कृष्ट, समाधानकारक उत्तर देण्यासाठी स्वत:ला सर्वतोपरी पात्र करणे. सर्व जगाला धर्म शिकवणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे.’

शिकागोच्या सर्वधर्म परिषदेनंतर भारतातून अनेक अभिनंदनपत्रे स्वामीजींना पाठवण्यात आली. त्यातील मद्रासच्या अभिनंदनपत्राला त्यांनी पाठवलेले उत्तर `हिंदुधर्माचे पुनरुत्थान’ या शीर्षकाने प्रसिद्ध आहे. या प्रदीर्घ उत्तरात स्वामीजींनी त्यांच्या कार्याचा आणि भारताच्या जीवनहेतूचा एक विशाल पट रेखाटला आहे. भारताचा इतिहास, परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्ये, वर्तमान निराशाजनक स्थिती यांचा आढावा घेतल्यावर स्वामीजी लिहितात, `भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचे, नीतीमत्तेचे, आध्यात्मिकतेचे प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल काय? देवतुल्य साधुसंतांचे अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्याखेड्यातून, जंगलाजंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे. दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करीत असतात. फलावरून वृक्षाची पारख होते असे म्हणतात. अगदी खरे. भारतातील प्रत्येक आम्रवृक्षाखाली जा. झाडावरून खाली गळून पडलेल्या सडक्याकिडक्या, विजळलेल्या, अर्ध्याकच्च्या आंब्यांच्या टोपल्यावर टोपल्या भरून घ्या आणि त्यातील प्रत्येकावर खूप संशोधनात्मक पांडित्याने भरलेली पुस्तकांमागून पुस्तके खरडून टाका, तरीसुद्धा तुम्ही एकाही आम्रवृक्षाचे बरोबर वर्णन केल्यासारखे होणार नाही. आता परत जाऊन, जास्त नाही, फक्त एकच पूर्णपक्व, सरस, मधुर आम्रफल तोडून आणा. बस त्या एकाच फळाचे वर्णन कराल तरी त्या आम्रवृक्षाचे खरे गुण माहीत झाले असून त्याचे अगदी बरोबर वर्णन तुम्ही केले असे म्हणता येईल.’

`तद्वत या देवतुल्य महापुरुषांच्या जीवनातच आपल्याला खर्या हिंदुधर्माचे दर्शन घडत असते. जो हिंदूजातीचा वृक्ष शतकानुशतके पुष्ट होऊन वाढत आला आहे; हजारो वर्षे प्रचंड झंझावातांचे आघात सहन करूनही जो अक्षय यौवनाच्या अखंड ओजाने आजही गौरवाने उभा आहे, त्या जातिवृक्षाच्या खर्या रुपाची, बळकटीची व अंतर्गत जोमाची अटकळ या देवोपम व्यक्तींच्या जीवनावरून सहज करता येते. या भारताचा काय नाश होईल? तसे झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता लयास जाईल. नीतीचे सर्व महान आदर्श लयास जातील. धर्माविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल. आदर्शनिष्ठा पार निमावल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासितादेवी यांच्या जोडमूर्तीची. पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगिरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली ! छे छे, असे होणे कदापि शक्य नाही. सहनशक्ती कार्यशक्तीहून अनंतपट श्रेष्ठ आहे. प्रेमशक्ती घृणाशक्तीहून अनंतपट अधिक शक्तिमान आहे. हिंदुधर्माचे सांप्रतचे पुनरुत्थान केवळ देशभक्तीच्याच प्रवृत्तीचाच आविष्कार आहे असे ज्यांना वाटत असेल, त्यांच्या त्या भ्रामक समजुतींची कीवच करणे योग्य. येथे आपण या अपूर्व घटनेचे, हिंदुधर्माच्या या पुनरूत्थानाचे स्वरूप समजून घेण्याचा यत्न करू या.’

यानंतर अन्य पुष्कळ गोष्टींची चर्चा करून पत्राचा समारोप करताना स्वामीजी लिहितात, ``भविष्याच्या गर्भात काय दडून आहे हे मला दिसायला येत नाही आणि दिसावे असा माझा आग्रहही नाही. परंतु एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे. ते हे की, आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधातलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा.’

भारतीय पुनरुत्थानाच्या संदर्भात स्वामीजींच्या या विश्लेषणानंतर ११३ हून अधिक वर्षांचा काळ लोटून गेला आहे. हिंदू समाज, भारत, जग, विज्ञान-तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टी बदलल्या आहेत, पुढे सरकल्या आहेत. त्यांच्या चांगल्या वाईट बाजूंची आणि परिणामांची चर्चाही होत असते. मात्र ते करत असताना जीवन व्यवहारातील मानवीयता आणि मूल्यभान या मुद्यांवर येऊन सारेजण थबकतात. भारताने जगाला हेच द्यावयाचे आहे, तोच त्याचा जीवनहेतू आहे, त्यासाठीच त्याचे पुनरुत्थान आहे; याची स्पष्ट जाणीव स्वामीजींनी दिली होती. श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या, हार-जीतीच्या खेळात सहभागी होऊन आपला झेंडा ऊंच फडकावणे एवढाच भारतीय पुनरुत्थानाचा आशय नाही. त्यांनी एका ठिकाणी तर इतक्या स्पष्टपणे म्हटले आहे की, आध्यात्म हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा सुद्धा भाग व्हायला हवा. विश्वकल्याणात भारताची विशिष्ट भूमिका आहे, ती भारताने पार पाडायला हवी; त्यासाठीच सशक्त आणि स्वाभिमानी व्हायला हवे. ताठ, ऊंच मानेने उभे राहायला हवे. भारतीय पुनरुत्थानाचा स्वामीजींना अभिप्रेत आशय हा होता.

- श्रीपाद कोठे
नागपूर 

बुधवार, १ जानेवारी, २०१४

बुद्धिवादाचा पंचनामा

(`विमर्श' दिवाळी अंक २०१३ मध्ये प्रकाशित)

बुद्धिवादाचा पंचनामा

कोणत्याही माणसाची कोणतीही कृती ही बुद्धीनुसारच होत असते, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. तरीही एखादी व्यक्ती बुद्धी वापरीत नाही, एखादी व्यक्ती चक्क निर्बुद्ध आहे; अशी भाषा अनेकदा ऐकायला मिळते. शिवाय बुद्धिमान लोक, बुद्धिवादी लोक असे शब्दप्रयोगही ऐकू येतात. प्रत्येक माणूस जर बुद्धीनुसारच काम करतो तर मग असा फरक समाज का करतो? की हा बुद्धिभ्रम म्हणायचा? हे सारे नीट समजून घ्यायला हवे. हे भेद किंवा वेगळेपण निर्माण होण्याचे कारण आहे विषमता. प्रत्येक व्यक्ती बुद्धीने काम करते हे अक्षरश: खरे असले तरी, ती व्यक्ती तिला लाभलेल्या बौद्धिक कुवतीनुसार तिची कृती करते हे महत्वाचे. आपण अनेकदा अनेकांना कामे सांगत असतो. कधी घरातल्या माणसांना, कधी हाताखालच्यांना, कधी गड्यांना, कधी कामवाल्या बायांना, कधी गाडी- दूरदर्शन संच- अन्य यंत्र वा सामान दुरुस्ती करणारे; अशा अनेकांना कामे सांगण्याचा प्रसंग येतो. काम झाल्यानंतर मात्र आपण नाराज होतो. कारण आपण सांगितलेले काम आपल्याला हवे तसे झालेले नसते. आपल्या बुद्धीला ते काम वेगळ्या प्रकारे अभिप्रेत असते आणि ते प्रत्यक्ष करणारी व्यक्ती ते वेगळ्याच पद्धतीने करते. बुद्धी दोघेही वापरत असतात, पण त्यात मेळ असतोच असे नाही. अनेकदा भेद असतो. यात पुष्कळदा चांगले वा वाईट असे ठरवणे अवघड असते, शक्य नसते, योग्यही नसते. कधी कधी यामुळे नुकसानही होऊ शकते. कधी कधी आपल्या अपेक्षेपेक्षा चांगले व किफायतशीर कामही होऊन जाते. अनेकदा आपण आपल्या बुद्धीनुसार काही समजावून देण्याचा प्रयत्न करतो पण समोरच्याला मात्र ते पटतेच असे नाही. तो त्याच्याच पद्धतीने ते करतो आणि आपण म्हणतो, `तो त्याच्याच मनाने करतो. कुणाचे ऐकत नाही.’ अगदी लहान मुलांचा सुद्धा असा अनुभव घरोघरी येतो. तो लहान मुलांचा म्हणून कौतुकाचाही ठरतो. `आई तुला नाही समजत’ किंवा `बाबा तुम्हाला नाही समजत’ अशी मुलांची वाक्ये लाडाची म्हणून पाहिली जातात. वय आणि नात्यानी समान असणारे सहज बोलून जातात, `तुला एवढे साधे समजत नाही का?’ वास्तविक प्रत्येक जण आपापली बुद्धी वापरूनच काम करीत असतो. पण दोघा व्यक्तींची बुद्धी एकाच पद्धतीने विचार व व्यवहार करते असे मात्र प्रत्येक वेळी पाहायला मिळत नाही. निसर्गानेच हा भेद केल्याचे दिसून येते.

सारे काही कळते पण वळत नाही असेही पाहायला मिळते. समजून उमजूनही विपरीत वागत असलेले लोकही पाहायला मिळतात. दारू पिऊ नये, धुम्रपान करू नये, पान वा तंबाखू खाऊन वाट्टेल तेथे थुंकू नये, जुगार खेळू नये, व्यसने करू नयेत; हे सारे माहित असून, कळत असूनही माणसे ते करतात. सिगारेटच्या पाकिटावर तर लिहिलेले असते- `आरोग्यास घातक’. लोक तो इशारा वाचतही नाहीत आणि भरपूर धुम्रपान करतात. रस्त्यावरील चौकातील सिग्नल पाळणे आवश्यक आहे, सगळ्यांच्या सोयीसाठीच ती व्यवस्था आहे हे काय माहित नसते की बुद्धीला समजत नाही? वाहनांमध्ये किती लोक बसवावे ही बाब काही बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरची नाही. त्यासाठी खूप प्रशिक्षण वा प्रबोधन यांची गरज नसते. गाड्या आडव्यातिडव्या किंवा दारापुढे लावू नयेत यात बुद्धीला न पटण्यासारखे काहीच नाही. तरीही व्यवहारात विपरीत गोष्टी पाहायला मिळतातच. आजकाल स्टंटबाजी हा प्रकार बोकाळू लागला आहे. अतिशय महागड्या गाड्या वापरून तरुण पोरे स्टंट करू लागली आहेत. एवढ्या महागड्या गाड्या घेऊन देणारे आईबाप चांगले शिकले सवरलेले असतात. मुलेही शिकत असतात. स्टंटचे परिणाम त्यांना ठाऊक नसतात असे नाही. नुकताच मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या तरुणाला या स्टंटपायी जीव गमवावा लागला होता. हे सारे पाहून, त्यावर चर्चा करूनदेखील या गोष्टी बंद होतात असे नाही. कचरा कुठेही टाकू नये, स्वच्छता महत्वाची आहे, स्वच्छतागृहे नीट वापरली गेली पाहिजेत, त्यांची देखभाल नीट झाली पाहिजे या साऱ्या बुद्धीला शंभर टक्के पटणाऱ्या गोष्टी आहेत. व्यवहार मात्र त्यानुसार होतोच असे नाही.

अनेक छोटे वा मोठे गुन्हे चूक आहेत हे अगदी माहितच नसते असे नाही. अभावितपणे गुन्हे होत असले तरीही; सारे काही ठाऊक असून, परिणामांची कल्पना असूनही गुन्हेगार गुन्हे करतातच. अनेकदा तर कायदे वगैरेची गुन्हेगारांनाच चांगली जाण असते. अतिरेकी कारवाया करून देशचे देश वेठीला धरणारे दहशतवादी, शेअर बाजारात कोट्यावधींचे घोटाळे करणारे लोक, अब्जावधींचे भ्रष्टाचार करणारे, नियोजनबद्ध खून करणारे, कॉपी करणारे विद्यार्थी; अशी एक ना अनेक उदाहरणे आजुबाजूला पाहायला मिळतात, ज्यात बुद्धीचा भरपूर आणि निष्णात वापर गुन्हेगारांनी केलेला असतो.

प्रत्येकाच्या जीवनातील प्रेम, स्नेह, ओढ, काळजी, कळकळ, यांनाही सयुक्तिक बुद्धिवादी उत्तर नसते. आपण वेळ पाळू शकलो नाही वा न आवडणारी गोष्ट केली आणि जोडीदाराची खपा मर्जी झाली तर माणूस समजावून देण्यापेक्षा समजूत घालण्याचाच प्रयत्न करतो. आपल्या मुलांचे कौतुक करण्यासाठीही बुद्धी उपयोगात येत नाही. ते काम मनाचेच. आप्त सोडून गेल्यावर होणारे दु:ख बुद्धीच्या आवाक्यापलीकडील असते. प्रखर बुद्धिवादी म्हणवणारी व्यक्तीही समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न का करते याचे बुद्धिवादी उत्तर देता येणार नाही. काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. गेली अनेक वर्षे ते समाजातून अंधश्रद्धा दूर व्हाव्या म्हणून प्रयत्न करत होते. अनेकदा मंत्र्यांच्या भेटीसाठी ते मंत्रालयात ताटकळत बसून राहत असत. या सगळ्यामागे समाजाबद्दल कळकळ आणि आपल्या विचारांबद्दल आग्रही बांधिलकी हेच कारण असू शकते. त्याशिवाय एखादी व्यक्ती इतक्या सातत्याने काम करू शकणार नाही. पण ही कळकळ आणि आग्रही बांधिलकी यांचे बुद्धिवादी उत्तर देऊन समाधान नाही करता येणार. बुद्धीच्या पलीकडचे काहीतरी असे असते जे तुमच्या बुद्धीला प्रेरित करीत असते. जीवनातील अशा कित्येक गोष्टी सांगता येतील जेथे बुद्धीची सर्वोच्चता आढळून येत नाही किंवा बाधित होते. मात्र जेथे केवळ बुद्धीचेच कार्य चालते तेथेही बुद्धीच्या मर्यादा पाहायला मिळतात.

राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, विज्ञान, तत्वज्ञान, अशा बुद्धिप्रधान क्षेत्रातही बुद्धीच्या मर्यादा सहज स्पष्ट होतात. राजकारणावर रोज चर्चा होतात, असंख्य सूचना केल्या जातात, पण आपल्या भूमिका बदलायला वा दुसऱ्याची भूमिका समजून घ्यायला कोणीही तयार नसतात. आपले म्हणणे कसे योग्य आहे हे प्रत्येक बाजूची व्यक्ती अगदी पोटतिडकीने समजावून सांगत असते. दुसऱ्या बाजूच्या लोकांना मात्र ते पटत नाही. एक जण दुसऱ्याच्या मन-बुद्धीत परिवर्तन घडवून आणू शकत नाही. कधीकधी; विशेषत: निवडणुकीच्या तोंडावर एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करते आणि तसे करताना आपल्याला त्या पक्षाची तत्वे पटली असे जाहीर करते. पण त्याबद्दल दोन-चार प्रश्न विचारले तर मात्र त्या व्यक्तीला उत्तरे देता येत नाहीत. कधी तर काही दिवसांनी ती व्यक्ती पुन्हा पहिल्या वा तिसऱ्याच पक्षात परतलेली पाहायला मिळते. या सगळ्याशी बुद्धीचा खरंच काही संबंध असतो का? महागाई हा सध्या जगापुढील सगळ्यात मोठा प्रश्न बनलेला आहे. किती चर्चा त्यावर होत असतात. वृत्तपत्रात, दूरचित्रवाहिन्यांवर, संसदेत, आंतरराष्ट्रीय मंचांवर, सामान्य माणसांमध्ये, अभ्यासक आणि विद्वानांमध्ये; सर्वत्र चर्चा होते. त्यातून समस्या सुटणे ही तर दूरची गोष्ट, पण सहमती सुद्धा होत नाही. प्रत्येक जण आपापल्या म्हणण्यावर ठाम असतो. प्रत्येक अर्थतज्ञ आपल्या बुद्धीनुसार विश्लेषण करून विषयाची मांडणी करीत असतो, दुसऱ्या तज्ञाला मात्र ती पटत नाही. प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती दिलेली आहे तरीही ही तफावत आणि दरी का पाहायला मिळते?

आपल्या सगळ्या जीवन व्यवहारावर नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस केवळ बुद्धीवर अवलंबून राहून किंवा बुद्धीनुसार जगत नाही. प्रेम, स्नेह, अनुराग, राग, संताप, चीड, भीती, मैत्री, हौस, आवड, संवेदना, करुणा; असे अनेक मनोभाव, तसेच गरजा, परिस्थिती, संस्कार इत्यादी गोष्टी आपल्या व्यक्तिगत वा सामूहिक व्यवहारांचे नियमन आणि नियंत्रण करीत असतात. कधी हे बुद्धीशी सुसंगत असते तर कधी विसंगत. कधीकधी बुद्धीला अगम्य असेही. याचा अर्थ आपण बुद्धी वापरीत नाही असा नाही. अगदी आदिमानव देखील आधुनिक मानवाप्रमाणेच बुद्धी वापरीत होताच. त्याने ती वापरली नसती तर मानव समाजाची येथवर वाटचाल झालीच नसती. बुद्धीचा उपयोग माणूस करतोच आणि करायलाच हवा. संपूर्ण मानवी सभ्यतेच्या विकासात आणि वाटचालीत बुद्धीचे असलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाही. परंतु मानवाला लाभलेले बुद्धीचे हे वरदान जेव्हा `बुद्धिवाद’ या संज्ञेखाली राबवले जाते तेव्हा घोळ होतो. खरे तर कोणतीही गोष्ट जेव्हा `वाद’ होते तेव्हाच तिची उपयोगिता ऱ्हास पावू लागते आणि शेवटी ती गोष्ट त्रासदायक आणि विनाशी ठरते. कारण ज्यावेळी आपण `वाद’ म्हणून एखाद्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळी ती गोष्ट ही अंतिम सत्य म्हणून मानली जाते. सगळे काही त्या गोष्टीच्या संदर्भात पाहिले आणि तपासले जाते. कोणताही विचार किंवा कृती यांची योग्य-अयोग्यता, स्वीकार्यता यांचा अंतिम बिंदू ती एक गोष्ट बनून जाते. त्याच्याशी मेळ न खाणारी गोष्ट सपशेल नाकारली जाते. सगळे काही एकाच चौकटीतून पाहिले जाते. त्याच चौकटीतून समजून घेतले जाते. जी गोष्ट संदर्भबिंदू म्हणून स्वीकारली जाते तिला काही मर्यादा असू शकतात, त्या गोष्टीचे पतन होऊ शकते, ती कालबाह्य होऊ शकते किंवा त्यात काळानुरूप बदल करण्याची गरज पडू शकते हे; `वाद’ म्हटले की मान्य केले जात नाही. उदाहरणार्थ- `स्त्रीवादी’ लोक स्त्री चुकू शकते, स्त्री अन्याय करू शकते हे मान्यच करीत नाहीत. कोणतीही गोष्ट अंतिम नाही, हा विज्ञानाचा सिद्धांत आहे; `विज्ञानवादी’ मात्र उपलब्ध वैज्ञानिक माहिती हेच अंतिम सत्य आहे यावर ठाम असतात. `मार्क्सवादी’ मार्क्सपेक्षा वेगळे सत्य असू शकते हे मानतच नाहीत. आज आपण `बुद्धिवादा’च्या अशाच सापळ्यात सापडलो आहोत.

घटना, नियम, कायदे, विज्ञान, एवढेच नव्हे तर अगदी धर्म हे सुद्धा या बुद्धीवादाचेच आविष्कार आहेत. त्यामुळेच त्यात प्रचंड विविधता दिसून येते. अगदी तत्वज्ञानाची चर्चा करणारी भारतीय षड्दर्शनेसुद्धा प्रकांड बुद्धीचेच दर्शन घडवतात. एकाच विषयाची किती मतमतांतरे !! प्रत्येक विचार आपण कसे बरोबर हे पटवण्याच्या प्रयत्नात. भक्तीसुद्धा ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे हे समजावण्याच्या प्रयत्नात असते, तर ज्ञान भक्तीवर मात करण्याचा प्रयत्न करते. कर्मवादी या दोन्हीवर आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न करतात. विज्ञान भौतिक जगाचे श्रेष्ठत्व आणि सर्वंकषता सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. पण त्याच वेळी या लौकिक, दृश्यमान जगाच्या पलीकडे अधिक काहीतरी आहे आणि त्याशिवाय या दृश्य जगाला पूर्णता नाही असे आग्रहाने सांगणारे वैज्ञानिकही आहेत. अणुऊर्जा प्रकल्प व्हावेत की नाहीत, या मुद्यावर शास्त्रज्ञांचेच दोन गट पाहायला मिळतात. विज्ञान दोन शास्त्रज्ञांमध्येही; तेही शास्त्रीय बाबीवर; सहमती घडवू शकतेच असे नाही. विज्ञानाने बुद्धीच्या साहाय्याने केलेली प्रगती, सुखाची साधने, सोयीसुविधा यांनी सुखकर केलेले माणसाचे जीवन अहमहमिकेने रंगवित असतानाच, त्याने मानवी जीवनात निर्माण केलेली अशांतता, असुरक्षितता आणि पोकळी लपून न राहता; मानवी बुद्धीसमोर मोठ्ठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मानवी समाज एकसंध राहावा, त्याने शांततेने जीवन जगावे यासाठी माणसाने शेकडो संस्थांची उभारणी केली. अनेकानेक राजकीय, सामाजिक, आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यवस्था आणि संस्था निर्माण केल्या. परंतु आज मात्र या सगळ्या व्यवस्था आणि संस्था पराभूत झाल्या की काय अशी शंका येते. या साऱ्यांपुढे उभी असलेली प्रश्नचिन्हे विकराल आहेत. एक प्रश्न सोडवला तर दुसरा उभा राहतो. एका समस्येतून पाय बाहेर काढण्यात यश आले की तो दुसरीकडे फसतो. म्हणूनच आज संसद आणि न्यायपालिका यांच्यात संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळतो. एवढेच नव्हे तर, न्यायालयातून निवाडा होतो, निर्णय मिळतो; पण न्याय मिळतो का असाही प्रश्न अलीकडे उपस्थित होऊ लागला आहे. यांची बुद्धिवादी सुसंगती लावता येत नाही. तसेच बुद्धीचे तर्क लढवून आणि बुद्धीच्या करामती करून या समस्या सोडवताही येत नाहीत. फक्त भारतात ही स्थिती आहे असे नाही, तर जगात सगळीकडे हेच दृश्य आहे. कार्ल मार्क्सने दिलेले तत्वज्ञान त्याच्या अनुयायांनीच टाकून दिले. त्यानंतर भांडवलशाहीचा बोलबाला आणि उदोउदो सुरु झाला. पण २००८ साली त्याचा बुडबुडा फुटला. त्याला पाच वर्षे होऊन गेली तरीही अजून भांडवलशाहीला धड उभेही राहता येत नाही. बौद्धिक काथ्याकुट सुरूच आहे. माणसाची ओढाताणही सुरूच आहे.

युरोपात झालेल्या विज्ञानाच्या प्रयोगांनी आणि त्यातील प्रगतीने बुद्धीचे सामर्थ्य प्रकर्षाने पुढे आले. या विज्ञानाने केलेल्या काही मुलभूत संशोधनांनी आणि त्याच्या साहाय्याने माणसाने विकसित केलेल्या सुखसाधनांनी बुद्धीचे श्रेष्ठत्व स्थापित करीत असतानाच `ईश्वरा’ची गरजही संपवली. दुसरीकडे युरोपातील पुनर्जागरण, संघटीत क्रांत्या यांनी व्यक्तीवादाला जन्म दिला. यामुळे व्यक्तीचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात आले. माणूस हा निसर्गाहून श्रेष्ठ, व्यक्ती ही समाजाहून महत्वाची आणि व्यक्तीचा विचार फक्त बुद्धीच्या आधारे करायला हवा कारण बुद्धी ही श्रेष्ठ; अशा प्रकारचे विचार आणि मूल्ये रुजली आणि विकसित झाली. परंतु बुद्धीबुद्धीतील फरक, तसेच मानवी क्रियाकलापांचे विश्लेषण करण्यातील बुद्धीची मर्यादा यांचे उत्तर मात्र अजून शोधून काढता आलेले नाही.

`ईश्वर’ असेल तर तो आम्हाला दिसलाच पाहिजे. तो दिसत नसेल तर त्याला अस्तित्वच नाही, असे प्रतिपादन बुद्धिवादी आग्रहाने करतात. सगळ्याच धर्मांनी, ईश्वर मानणाऱ्यांनी तो अप्राप्य असल्याचे म्हटले आहे. हिंदू चिंतनाने तर ईश्वर अगम्य, अगोचर, तर्कातीत, मानवी संवेदनांच्या अतीत, अनंत, अखंड असा असल्याचे आणि तो पाहण्याची, स्पर्शण्याची, समजण्याची बाब नसून; आकलनाची, आस्वादण्याची, अनुभूतीची बाब असल्याचे म्हटले आहे. वास्तविक अगदी व्यवहारातही अशा गोष्टी असतात. सुगंध, आनंद, दु:ख या आणि अशा अनेक गोष्टी आम्हाला दिसत नाहीत, त्यांना स्पर्श करता येत नाही, त्या कानांना जाणवत नाहीत; तरीही त्यांना अस्तित्व आहे. या गोष्टींची प्रत्येकाची जाण निरनिराळी असते. काही लोकांना त्या तीव्रतेने जाणवतात, तर काही जणांना कमी प्रमाणात, तर आणखी काही जणांना त्या जाणवतच नाहीत. म्हणजेच, ज्याची त्याची त्या गोष्टीच्या अनुभूतीची शक्ती ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात त्यांची अनुभूती होते. `ईश्वर’ जाणून घेण्याची ज्याची जशी आणि जेवढी शक्ती असेल तसा तो त्याला आकलन होतो. बुद्धीच्या स्तरावर हे सारे स्पष्ट असूनही, `ईश्वर’ दिसला पाहिजे हा आग्रह मात्र संपत नाही. बुद्धीचा हा पगडा आपल्यावर इतका आहे की, `हिग्स बोसॉन’ नावाचा कण सापडल्याबरोबर `ईश्वर’ सापडला असा कल्लोळ सुरु झाला. `पाहा, आम्ही म्हणत होतो ना ईश्वर आहे म्हणून !! लक्षात घ्या, आता विज्ञानानेही त्याचे असणे सिद्ध केले आहे’, असे आग्रही प्रतिपादन करण्यात ईश्वर मानणारेही आघाडीवर होते. मानवाचे सर्वश्रेष्ठत्व हा एकांगी विचार आहे असे प्रतिपादन करणारेही आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी बुद्धी राबवताना पाहायला मिळतात. प्रत्येक बाब बुद्धिगम्य नाही हे समजून घेणे माणसाला कठीण जाते. याचे एकमेव कारण आहे त्याचा अहंकार. मला समजत नाही वा समजू शकत नाही, असे काहीच नाही. मला जमू शकत नाही वा मी करू शकत नाही असे काहीही नाही. ज्ञान, कर्म वा संवेदना या प्रांतातील सारेच काही माझ्याच आवाक्यातील आहे. त्यामुळे त्याचे विश्लेषण वा त्यातील समस्यांची सोडवणूक मी करू शकतो, अशा प्रकारचा दर्प मानवाला बुद्धीशरण बनवतो. मग जो तो आपापली बुद्धी वापरू लागतो आणि छोट्या वा मोठ्या, लौकिक वा अलौकिक अशी सर्वत्र बुद्धीची घोडदौड सुरु होते. परंतु निसर्गदत्त विविधता आणि विषमता यामुळे गोंधळाशिवाय फार काही हाती लागत नाही.

या स्थितीत निर्माण होणारा अपरिहार्य संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी अशांतता यावर मात करण्यासाठी नीतीचे प्रपिपादन केले जाते. परंतु नीतीसाठी सर्वसंमत आधार नसल्याने तेथेही गोंधळाचीच स्थिती निर्माण होते. शिवाय नीतीचे निर्धारणही बुद्धीच्याच कसोटीवर केल्याने प्रत्येकाची नीती वेगळी होऊ लागते. दुसऱ्याची नीती मी का स्वीकारायची असा स्वाभाविक प्रश्न त्यातून उत्पन्न होतो. शिवाय मी दुसऱ्याचा विचार का करायचा? मी स्वत:ला मुरड का घालायची? मी माघार का घ्यायची? मी तडजोड का करायची? मी कोणाचे शोषण का करायचे नाही? मी कोणाला लुबाडायचे का नाही? मी स्वार्थी का व्हायचे नाही? मी दुसऱ्याचा गळा का घोटायचा नाही? दुसऱ्याचा विचार करणे हा सद्गुण की दुर्गुण? सद्गुण किंवा दुर्गुण असं काही असतं का? असेल तर ते ठरवायचं कसं आणि कोणी? असे अनेक आनुषंगिक प्रश्नही पुढे येतात. यांना व्यक्तीसापेक्ष उत्तरे दिली जातात. म्हणजेच नीतीची व्याख्या व्यक्तिगणिक बदलते. पण जी व्यक्तिगणिक बदलते तिला व्याख्या तरी कसे म्हणायचे. एखाद्या गोष्टीचे सर्वसामान्य सत्य सूत्ररूपाने सांगणे म्हणजे व्याख्या. पण सत्यच जर सदा बदलत असेल तर? म्हणूनच प्रत्येकाची नीती म्हणजे प्रत्येकाचे मत. आज हा मतामतांचा गलबला पाहायला मिळतो. मतांच्या या गदारोळात विचार मात्र हरवतो. चिंतन तर लपूनच बसते. विचार व चिंतन ही एक गुंतागुंतीची व्यामिश्र प्रक्रिया आहे. याकडे दुर्लक्ष केल्याने छोट्या पडद्यावरील तू-तू मी-मी म्हणजेच वैचारिक मंथन असे समीकरण आता तयार झाले आहे. सगळा समाजच त्यावर पोसला जाऊ लागला आहे. सगळ्याच बाबतीत अनंत मते पाहायला, ऐकायला, वाचायला मिळतात. १) अर्थव्यवस्था कशी सुधारायची? २) मुस्लिम समाजाचे कोणते विश्लेषण योग्य? ३) सामाजिक सुधारणा कशा घडवायच्या? ४) मुलींनी कसे कपडे घालावेत? ५) निवडणूक सुधारणा हव्या की नको? ६) प्रसिद्धी माध्यमे समाजाला उपकारक की उपद्रवकारक? ७) धर्म हवा की नको? ८) एकाने दुसऱ्याला काही सांगावे की नाही? ९) शिक्षण कसे असावे? १०) सामाजिक नियम हवेत की पूर्ण स्वातंत्र्य? असे अनेक मुद्दे उदाहरणादाखल घेता येतील.

समाजाचा विशिष्ट स्तर आणि वृत्ती घडवण्यासाठी नैतिक शिक्षण सुरु करण्यात आले. परंतु त्याचे परिणाम आणि अनुभवही समाधानकारक म्हणावा असा नाही. त्याचेही कारण एकच की, आम्ही त्याचा विचार केवळ बुद्धीने केला. नीतीचे पाठ शिकवून प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवता येतील. गुणही मिळवता येतील. मात्र नीती आचरणात आणणे त्याने कसे साधावे? नैतिक शिक्षण देणारे शिक्षक स्वत: धूम्रपान, मद्यपान करीत असतील, असत्य बोलत असतील, गैरमार्गाने पैसा कमवीत असतील, काम- क्रोध- लोभ- मोह- मद- मत्सर- या शत्रूंचा त्यांच्यावर पगडा असेल तर ते जे काही सांगतील त्याचा सकारात्मक परिणाम होणार नाही. फ्रीजचा रंग कोणता घ्यायचा किंवा फिरायला कुठे जायचे किंवा विजेचे बिल कुणी भरायचे यासारख्या मुद्यांवरूनही संयम गमावणारे आई-वडील समोर दिसत असताना मुले संयमी होतील का? शिवाय आपल्या मनात जे येईल ते मिळालेच पाहिजे वा मिळवलेच पाहिजे; अशी कर्तृत्वाची शिकवणी कानीकपाळी राहिली तर त्यातून कोणती मूल्ये रुजणार? विचार- वाणी- वृत्ती- कृती- यात संयम असावा, कोणाचा द्वेष करू नये, खरे बोलावे, दुसऱ्याचा आदर करावा वगैरे माहिती असून उपयोग नसतो. तसा व्यवहार सतत डोळ्यापुढे असावा लागतो. अडचण आली, कठीण परिस्थिती आली तरीही नीतीनुसार वागणारी माणसे आजुबाजूला दिसतात तेव्हा त्यातून वृत्ती आणि पिंड घडतो. शिवाय `बोले तैसा चाले’ त्याच्याच बोलण्याचा सकारात्मक परिणाम होतो. त्यातून बदल घडतो.

आमच्या देशात तर हिंदुविरोध, धर्म- संस्कृती- परंपरा- इतिहास यांना विरोध, भाषा- भूषा- उत्सव- सणवार- यांना विरोध वा यांची टवाळी, हजारो वर्षांची नीती- मूल्ये यांची हेटाळणी; असेच रूप बुद्धिवादाला आलेले आहे. १५० वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीमुळे, त्यांनी केलेल्या कट कारस्थानांमुळे आणि त्यांच्यासह आलेल्या सुखसाधनांनी डोळे दिपल्यामुळे त्यांचे सारे काही चांगले, योग्य अशी भावना बळावली. आमच्या कृती, आमचे विचार, कल्पना, रीतीभाती आदींचा अर्थ समजून घेणे राहिले दूरच, त्यात काही अर्थ आहे हे देखील नाकारण्याची वृत्ती निर्माण झाली. त्यांचे शब्द प्रमाण झाले. त्या शब्दांचे अर्थ, आशय स्पष्ट करण्याची, विषद करण्याचीही गरज राहिली नाही. याचे अतिशय चपखल उदाहरण म्हणजे secularism. Secularism म्हणजे नेमके काय? त्यावर चर्चा करताना नेमके काय अभिप्रेत असायला हवे? याबद्दल कोणीही काही बोलत नाही. त्यावर जणू बोलायचेच नसते. कोणीतरी ठरवले अमुक गटाला सांप्रदायिक, जातीय, धर्मोन्मादी म्हणायचे. त्यावर तसे का, हा प्रश्नच मग गैरलागू. व्यापकतेची दिशा नसल्याने आम्ही स्वातंत्र्याला स्वैराचाराचे रूप दिले, समानतेला बाजारू स्पर्धेत बदलून टाकले, संपन्नतेला स्वार्थाची बटीक बनवले, सहकाराचा स्वाहाकार केला. मोठेपणाची आकांक्षा जागवली, पण व्यापकतेच्या प्रेरणा जागवू शकलो नाही. जगण्याचं प्रयोजन वित्तेषणा, लोकेषणा, पुत्रेषणा एवढे सीमित ठेवून; निस्वार्थता, संयम, त्याग, अप्रतिकार, या अमूर्त आध्यात्मिक मूल्यांची आम्ही अपेक्षा करतो. बुद्धिवादाची ही मर्यादा लक्षात आल्यानेच आज बुद्ध्यांकासोबतच, भावनांक आणि आध्यात्मांकदेखील पाहिला जाऊ लागला आहे. पण आध्यात्मिक वृत्तीचे बुद्धिवादी विश्लेषण करून आध्यात्मांक निश्चित करणे योग्य आणि पुरेसे ठरणार नाही. आध्यात्म हा सार्थक जगण्याचा विकसित होत जाणारा मार्ग आहे. त्याची विशिष्ट चौकट हानीकारक ठरू शकते. लक्षणांचा विचार आणि सतत विश्लेषक आढावा घेणे त्यासाठी आवश्यक असते. व्यक्तिगत वा समूह जीवनात बुद्धिवादाने असा गोंधळ निर्माण केला असताना त्यातून मार्ग कसा काढायचा असाही प्रश्न उत्पन्न होतो.

भारताने मात्र फार पूर्वीच याचा विचारही केला आणि त्याची सुयोग्य मांडणीही केली. भगवद्गीतेने हजारो वर्षांपूर्वीच बुद्धीचे स्थान, गरज, महत्व आणि मर्यादा अधोरेखित केलेली आहे. गीतेनुसार-
आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु
बुद्धिं तु सारथीं विद्धि, मन: प्रग्रहमेवच
शरीर हा एक रथ आहे, बुद्धी या रथाचा सारथी आहे, मन हे रथाचे घोडे आहेत आणि या रथात बसलेला आत्मा दिशा दाखवतो आहे. शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांचा समन्वित, परिपूर्ण विचार त्यात मांडलेला आहे. त्याने शरीर, मन वा बुद्धी नाकारलेले नाही; किंवा त्यावर एकांगी भरही दिलेला नाही. प्रत्येक गोष्टीला अस्तित्व आहे. त्याचं महत्वही आहे आणि त्याची मर्यादाही आहे. किंबहुना जन्माला येण्यापासून मरेपर्यंत एवढाच जीवनाचा प्रवास नसून ती एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे अंतिम गंतव्य स्थान आत्म्याची मुक्ती हे आहे. ही मुक्ती याचा अर्थ संपूर्ण अस्तित्वाशी एकरूप होणे. ही व्यापकता सहजसाध्य नाही, कष्टसाध्य आहे. पण जीवनाची दिशा ही या व्यापकतेकडे जाणे हीच आहे. आत्मा- परमात्मा वगैरे कल्पना आहेत. या खोट्या आणि भ्रामक गोष्टी असून त्यांचा आधार घेऊन माणसाला काबूत ठेवण्याचा, त्याला नीतिमान बनवण्याचा हा प्रयत्न आहे, असे नाही. तर ते अनुभूत सत्य आहे. त्या सत्याचे चालते बोलते स्वरूप म्हणावे असे शेकडो महापुरुष, साधुसंत, ऋषीमुनी आपल्या देशात सतत विद्यमान राहिले आहेत. भूतकाळात, वर्तमानात आणि भविष्यातही. हिंदू चिंतनाने मानवापुढे ठेवलेले जीवनाचे हे ध्येय अतिभव्य आहे. ते प्रत्येकाच्या आवाक्यात येईल असे नाही. अनेकांना ते अवाजवी, अव्यवहार्य वाटू शकते. त्यामुळेच आपण आहोत तेथूनच वाटचाल करायला हवी, फक्त त्याची दिशा व्यापकतेची आहे की नाही हे पाहिले म्हणजे पुरे. `मी’ ओलांडण्यापासून ही व्यापकता सुरु होते. हा `मी’ कुटुंब, शेजार, वस्ती, गाव, प्रांत, समाज, देश, राष्ट्र, विश्व, निसर्ग असा अधिकाधिक व्यापक होत जावा. एखाद्याच्या शारीरिक, आर्थिक व्यापकतेला, साधनांच्या संदर्भातील व्यापकतेला स्वाभाविक मर्यादा राहतील; पण भावना, संवेदना, विचार यांची व्यापकता मात्र अधिकाधिक वाढू शकते. या व्यापक होण्याच्या प्रक्रियेत मग आपले `मी’ पण पिकलेल्या फळासारखे गळू लागते. मग मी माघार का घ्यायची, मी शोषण का करायचे नाही, मी फक्त दैहिक विचार का करायचा नाही; हे प्रश्न सहज विरघळू लागतात. याशिवाय आपले मनोभाव आणि विचार यांचे आग्रहदेखील पातळ होतात, त्यांच्याबद्दलची आपली subjectivity कमी होऊ लागते. पूर्णत: विरोधी असलेल्या विचार वा व्यक्तीलाही सामावून घेण्याची आणि त्याबद्दल समान आदर बाळगण्याची वृत्ती विकसित होते. हा विकास ज्याचा-त्याचा स्वतंत्र असतो. हा आतील विकास असतो. तो घडून यायला व्यापकतेची आस आणि ध्यास लागायला हवा. व्यापकतेकडे जाणे हेच जीवनाचे ध्येय असायला हवे. प्रथम या ध्येयाविषयी सार्वत्रिक आस्था निर्माण व्हायला हवी. त्यासाठी पोषक वातावरण तयार व्हायला हवे. त्यासाठी आग्रही असणारे लोक ठायीठायी दिसायला हवेत. विपरीत परिस्थितीतही मी का ध्येयवादाचा आग्रह ठेवू असा प्रश्नच मग निर्माण होणार नाही. केवळ बुद्धीच्या आधारे हे साधता येणे शक्य नाही. बुद्धी, मन, भावना, मनाला उन्नत करणारी आध्यात्मिकता यांचा संकलित एकात्म विचार या गोंधळातून, संभ्रमातून आणि अराजकातून बाहेर काढू शकेल. केवळ बुद्धीचे हे काम नाही हे निश्चित.

- श्रीपाद कोठे
नागपूर