सोमवार, ३१ मे, २०२१

एकात्म मानववाद (३)

 

मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक स्वरुपाचे जे प्रतिपादन भारतीय चिंतनाने जगापुढे मांडले तोच एकात्म मानवदर्शनाचा आधार आहे. हे स्पष्ट करताना त्यांच्या प्रसिद्ध भाषणात दीनदयाळ उपाध्याय म्हणतात- `संपूर्ण समाज या सृष्टि का ही नहीं, व्यक्ति का भी हमने एकात्म एवं संकलित विचार किया है. मनुष्य शरीर, मन, बुद्धि, आत्मा का समुच्चय है. हम उसको टुकड़ों में बांट कर के विचार नहीं करते. आज पश्चिम में जो कष्ट पैदा हुए है उनका कारण यह है कि उन्होंने मनुष्य के एक एक भाग का विचार किया. प्रजातंत्र का आंदोलन चला तो उन्होंने मनुष्य को कहा- मनुष्य एक राजनीतिक जीव है और इसलिए इसके राजनीतिक आकांक्षा की तृप्ति होनी चाहिए. एक राजा बनकर के बैठे और शेष लोग राजा न हो, ऐसा क्यों? राजा सबको बनना चाहिए. इसलिए राजा बनने की आकांक्षा की पूर्ति के लिए उन्होंने सबको वोट देने का अधिकार दिया. प्रजातंत्र में यह अधिकार तो मिल गया, पर अन्य अधिकार कम हो गए. उन्होंने कहा कि वोट देने का अधिकार सबको है, पेट भरे या ना भरे. परंतु यदि खाने को नहीं मिला तो? जब लोगों से कहा गया कि तुम चिंता क्यों करते हो? मतदान का अधिकार तो तुमको ही है. तुम तो राजा हो. राजा बनकर बैठे रहो. राज तुम्हारा ही है. तो लोगों ने कहा- `इस राज से हमे क्या करना है यदि खाने को नहीं मिल रहा? पेट को रोटी नहीं मिली तो हमे यह राज नहीं चाहिए. हमें पहले रोटी चाहिए.' तब कार्ल मार्क्स आए और उन्होंने कहा- `हां रोटी सबसे प्रथम वस्तु है. राज्य तो केवल रोटीवालों का समर्थक होता है. अत: रोटी के लिए लड़ो.' उन्होंने मनुष्य को रोटीमय बना दिया. पर जो लोग कार्ल मार्क्स के मार्ग पर चले उन्हें अनुभव हुआ की, राज तो हाथ से गया ही, रोटी भी नहीं मिली. दूसरी और अमरिका है. वहां रोटी भी है, राज भी है. इस पर भी सुख और शांति नहीं. जितनी आत्महत्याएं अमरिका में होती है और जितने लोग वहां मानसिक रोगों के शिकार रहते है, जितने लोग वहां पर निद्रौषध खा कर सोने का प्रयत्न करते है, उतना विश्व में और कहीं नहीं होता. लोग कहते है- यह क्या समस्या खड़ी हो गयी? रोटी मिल गयी, राज मिल गया, पर नींद उड़ गयी. अब कहते है- `नींद लाओ. किसी प्रकार से नींद लाओ.' अब नींद बड़ी वस्तु बन गयी है और नींद भी आ गयी तो तृष्णा पीड़ित करती है.' (पंडित दीनदयाल उपाध्याय,एकात्म मानववाद - २३ एप्रिल १९६५)
हाच आशय अधिक स्पष्ट करताना ते म्हणतात, `विचारकों को लग रहा है कि उनकी जीवन पद्धति में कहीं ना कहीं कोई मौलिक त्रुटी अवश्य है जिसमे समृद्धि के बाद भी वे सुखी नहीं. कारण यह है कि वे मनुष्य का पूर्ण विचार नहीं कर पाए. हमने वह किया; इसलिए हमने कहा कि मानव की प्रगति का अर्थ शरीर, मन, बुद्धि, आत्मा इन चारों की प्रगति है. बहुत बार लोग समझते है और इस बात का प्रचार भी किया गया है कि भारतीय संस्कृति तो केवल आत्मा का विचार करती है. शेष के बारे में यह विचार नहीं करती. यह असत्य है. आत्मा का विचार अवश्य करते है; किन्तु यह सत्य नहीं कि हम शरीर, मन, बुद्धि का विचार नहीं करते. अन्य लोगों ने केवल शरीर का विचार किया. इसलिए आत्मा का विचार हमारी विशेषता हो गयी. कालांतर में इस विशेषता ने लोगों में एकांतिकता का भ्रम पैदा कर दिया. हम आत्मा की चिंता करते हुए शरीर को नहीं भूलते. दुसरे लोगों से हमारा अंतर यह है कि उन्होंने शरीर को साध्य माना है और हमने उसे साधन समझा है. भौतिक आवश्यकताओं की पूर्ति का हमने स्वीकार किया है, परंतु उन्हें सर्वस्व नहीं माना. मनुष्य की विभिन्न कामनाओं, इच्छाओं तथा एषणाओं की संतुष्टि और उसकी सर्वांगीण विकास की दृष्टी से चतुर्विध पुरुषार्थ की कल्पना रखी गयी है. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ये चार पुरुषार्थ है. यद्यपि मोक्ष को परम पुरुषार्थ माना है, तो भी अकेले उसके लिए प्रयत्न करने से मनुष्य का कल्याण नहीं हो सकता. वास्तव में अन्य पुरुषार्थों की अवहेलना करनेवाला कभी मोक्ष का अधिकारी नहीं हो सकता. इसके विपरीत शेष पुरुषार्थों को लोकसंग्रह के विचार से, निष्काम भाव से करनेवाला व्यक्ति कर्मबंधन से छूटकर मोक्ष का अधिकारी होगा. अर्थ के अंतर्गत आज की परिभाषा के अनुसार राजनीती और अर्थनीति का समावेश होता है. पुरानी परिभाषा में दंडनीति और वार्ता अर्थ के अंतर्गत आती है. काम का संबंध विभिन्न कामनाओं की पूर्ति से है. धर्म में उन सभी नियमों, व्यवस्थाओं, आचरण संहिताओं तथा मूलभूत सिद्धांतों का अंतर्भाव होता है जिनसे अर्थ, काम और मोक्ष की सिद्धि हो.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, एकात्म मानववाद- २३ एप्रिल १९६५)
व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधातही त्यांचे चिंतन स्पष्ट आहे. ते म्हणतात- `सामान्य अवस्था यही है कि हम अपनी चिंता करते हुए समाज की चिंता करे. हमारे हित और समाज के हित में विरोध नहीं, संघर्ष नहीं. इसलिए जब कोई लोग हमसे पूछते है कि आप व्यक्तिवादी है अथवा समाजवादी? तो हमे कहना पड़ता है कि भाई- हम व्यक्तिवादी भी है और समाजवादी भी है. भारतीय चिंतन के अनुसार; हम व्यक्ति की उपेक्षा नहीं करते और समाज के हितो की चिंता बराबर करते रहते है. समाज के हितो की चिंता करते है इसलिए समाजवादी है और व्यक्ति की उपेक्षा नहीं करते इसलिए व्यक्तिवादी भी. व्यक्ति को ही सर्वेसर्वा नहीं मानते इसलिए कहते है की व्यक्तिवादी नहीं है. हम समाज को भी ऐसा नहीं मानते कि वह व्यक्ति की समस्त स्वतंत्रताओं और विभिन्नताओं का अपहरण कर ले. मनुष्य को किसी शिकंजे में कस कर मशीन का पुर्जा बना कर इस्तेमाल करे, इसलिए हम समाजवादी नहीं है. हमारी मान्यता है कि बिना व्यष्टि के किसी समष्टि की कल्पना ही नहीं की जा सकती और बिना समष्टि के व्यष्टि का क्या मूल्य? इसलिए हम दोनों के बीच समन्वय करना चाहते है. व्यक्ति का विकास और समाज की पूर्णता का यही समन्वित विचार भारतीय चिंतन की विश्व को देन है.’ (पंडित दीनदयाल उपाध्याय, व्यक्ति और समाज का संबंध : राष्ट्रजीवन की दिशा)
मानवी सुखाच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या भारतीय चिंतनातून आणि अनुभवातून मानवाच्या चतुर्विध स्वरूपाचा विकास झाला. माणूस हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चार अवस्थांमध्ये जगतो, राहतो, स्थित असतो. त्याला याची जाणीव असली तरीही किंवा नसली तरीही. त्याची सतत असमाधानी वृत्ती, त्याची कुतूहल वृत्ती, त्याची अशांतता याचाच परिणाम आहेत. या चार अवस्था म्हणजे चार वेगवेगळ्या वस्तू मात्र नाहीत. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा अशा चार वस्तू घेतल्या; त्यांचे ठरलेल्या प्रमाणात मिश्रण केले आणि माणूस तयार झाला; असे नसते. माणूस नावाचा जो बोध प्रत्येक व्यक्तीला होतो, त्याच्याच या अवस्था आहेत. एखादी व्यक्ती पूर्णत: शरीराच्याच पातळीवर असू शकेल, एखादी व्यक्ती पूर्णत: आत्मबोधाच्या पातळीवर असू शकेल. मात्र बहुसंख्य माणसे या चारही अवस्थांच्या कमीअधिक मिश्रणाच्या जाणीवेतच जगत असतात. यातूनच `व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशी स्थिती पाहायला मिळते. साधूसंत, डाकू, चोर, नाकासमोर पाहून चालणारे लोक, समाजसेवक, कलाकार, शास्त्रज्ञ, पंडित, कष्टाळू, आळशी; असे एक ना अनेक. माणसांची ही अशी विविधता का? या प्रश्नाचे उत्तरच आहे- ते शरीर, मन, बुद्धी आणि आत्मतत्त्वाच्या भिन्नभिन्न बोधातून जगत असतात. प्रत्येकाची आपापली स्वतंत्र वाटचाल असते. शरीर, मन, बुद्धीच्या स्तरावर जगताना मानवाला संभ्रमित, अपूर्ण, असमाधानी जीवन अनुभवास येते; तर आत्मतत्त्वाकडे वाटचाल करीत जगणाऱ्या व्यक्तीची अस्वस्थता, असमाधान, अपूर्णता, संभ्रमावस्था कमी होत जाते आणि अंती या साऱ्या गोष्टी लय पावून एक परिपूर्णता, समाधान, शांती, स्वस्थता, भ्रमशून्यता अनुभवास येते. भारताने अशी उदाहरणे अनुभवली आहेत. तीही विपुल प्रमाणात. त्यामुळेच भारतीय चिंतनाने ही आत्मबोधाची अवस्था ही मानवी जीवनाची सर्वोच्च विकासाची अवस्था असल्याचे मान्य केले. भारतीय चिंतनाचा हा सिद्धांत नाही. त्याने हे ठरवलेले नाही. तर अनुभवाच्या आधारावर भारतीय चिंतनाने त्याचा स्वीकार केला आहे आणि हे सत्य लक्षात आल्यानंतर त्या आत्मबोधाच्या खालील अन्य तीन अवस्थांच्या विभिन्न मिश्रणांच्या जगण्याला आत्मबोधाकडे जाण्यास प्रवृत्त केले, प्रेरणा दिली. `व्यक्ती तितक्या प्रकृती’ अशा या जगात `जिसकी लाठी उसकी भैस’ असे होऊ नये, प्रत्येकाला आपापल्या मार्गाने, आपापल्या अवस्थेनुसार, आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या स्थितीगतीने कमीत कमी संघर्ष करीत आत्मबोधाच्या सर्वोच्च अवस्थेपर्यंत वाटचाल करता यावी; यासाठी चिंतन केले. त्यातून समाज, त्याच्या निरनिराळ्या व्यवस्था, त्यांचे व्यवस्थापन विकास पावले. व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि नियंत्रण यांचा विचार करून द्विविध पद्धतीचा विकास केला. त्यातून बाह्य नियंत्रण आणि स्वनियंत्रण यांचा ताळमेळ बसवला. बाह्य नियंत्रणासाठी व्यवस्था आणि स्वनियंत्रणासाठी संस्कार- प्रबोधन- प्रेरणा- चिंतन- आवाहन- विचार- वातावरण- यांचा आधार घेतला. अशा प्रकारे माणसाची hard power आणि soft power यांचा मेळ घालण्याचा सायास केला. या चतुर्विध माणसाची मानवेतर सृष्टीशी सांगड घालण्याचे कष्ट घेतले. शरीर, मन, बुद्धी, आत्मा हे मानवाचे चतुर्विध स्वरूप; त्यासोबत संपूर्ण मानवजात; या संपूर्ण मानवजातीचे मानवेतर सृष्टीशी असलेले संबंध आणि त्याचे व्यवस्थापन; हे भारताचे चिंतन म्हणजे `एकात्म मानव’. यातील एकाही घटकाला सोडून देणे. एकाही घटकाची उपेक्षा; म्हणजे अभाव, विनाश, अतृप्ती. कारण एक व्यक्ती, त्याचे अंतर्बाह्य व्यक्तित्व, त्याच्यासारख्या असंख्य व्यक्तींची मानवजात आणि मानवेतर सृष्टी; यातून एकच धागा अखंड स्वरुपात गोवलेला आहे. तो धागा खंडित झाला की सगळे मोती विखुरतात. तो धागा खंडित झाला की, शतभंग माणूस जन्म घेतो. असे न होता अभंग माणूस हवा असेल तर एकात्म मानवाचा विचार करावा लागेल. माणसाच्या भारताने केलेल्या या एकात्म चिंतनाला आधार करूनच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी `एकात्म मानववाद’ हा विचार पुढे ठेवला. मानवी कल्याणाच्या या भावनेनेच त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्थांच्या मूलतत्त्वांचे आणि राष्ट्र, राज्य, धर्म यासारख्या संकल्पनांचे विश्लेषण केले.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'एकात्म मानव' या प्रकरणातील एक अंश.)

रविवार, ३० मे, २०२१

एकात्म मानववाद (२)

 

एकात्म मानववाद हे सनातन धर्माच्या, सुदीर्घ भारतीय चिंतन परंपरेच्या वृक्षावर फुललेले सुंदर फूल आहे. हे जर जीवनदर्शन आहे, सनातन भारतीय चिंतन परंपरेचाच जर हा आविष्कार आहे तर त्याला `वाद’ का म्हटले असेल? हा विचार एखाद्या वादापुरता सीमित आहे का? तसा तो सीमित होऊ शकेल का? या मुद्यावर स्व. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात- `एकात्म मानववाद’ का नाम `वाद’ या `इज्म’ क्यों रखा गया? वैसे पंडितजी स्वयं `वाद’ के पक्षपाती कभी भी नहीं थे. उनका मत था की जो सत्य और सनातन है, न तो वह वाद के चौखटे में ठीक बैठेगा और न बदलती हुई परिस्थितियों का मुकाबला कोई वाद कर सकेगा. दुसरे शब्दों में वाद या इज्म कभी भी सभी देशों के लिए और समस्त कालों के लिए उपयोगी नहीं हो सकता. यही उनकी भावना थी. यही उनकी दृष्टी थी. किंतु आज कुछ लोगों की आकलनशक्ति की भी एक सुनिश्चित पद्धति बन गयी है और यह पद्धति वाद या इज्म की है. अत: सर्वसाधारण की सुविधा के लिए वाद अथवा इज्म शब्द का प्रयोग पंडितजी ने किया.’ (श्री. दत्तोपंत ठेंगडी - एकात्म मानववाद : एक अध्ययन, फेब्रुवारी १९७०, कानपूर) यामुळेच १९८० च्या दशकापासून रा. स्व. संघ आणि (भारतीय जनता पार्टी वगळता) संघप्रेरित अन्य संघटना, विशेषतः वैचारिक क्षेत्रात काम करणारे लोक, `एकात्म मानववाद’ याऐवजी `एकात्म मानवदर्शन’ असा शब्दप्रयोग करू लागले आहेत.
आपण ज्या मार्गाने आजवर चालत आलो त्याने लोक, समाज, राज्य, यंत्र या सगळ्यात एक संघर्ष उत्पन्न केल्याचे रोज पाहायला मिळते. यातील प्रत्येक घटकाची ओढाताण, प्रत्येक घटकाला कमी वा अधिक महत्व- स्थान- प्राधान्य- प्रमाण- यामुळे जन्माला येणारे दु:ख, अस्वस्थता, उद्रेक, असमाधान, अशांती; आज नवीन राहिलेले नाही. या पार्श्वभूमीवर `एकात्म मानववाद' लक्षणीय ठरतो. हा सार्वत्रिक संघर्ष आणि असमाधान दूर करण्यासाठी; प्रत्येक घटकाचे महत्व, स्थान, प्राधान्य, प्रमाण; कमी वा अधिक होऊ नये हे आवश्यक आहे. परंतु हे कमी आहे की अधिक आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निर्णय कसा करायचा? त्यासाठी हवी दृष्टी. ही दृष्टी विकसित होण्यासाठी हवा ठोस विचार. असा विचार आकारास येण्यासाठी हवे तत्वज्ञान आणि असे तत्वज्ञान सिद्ध होण्यासाठी हवे जीवनाचे दर्शन. असे जीवनाचे दर्शनच या सगळ्या धावपळीला दिशा देऊ शकते. `एकात्म मानववाद' हे असे दिशा देणारे दर्शन आहे.
काय सांगते हे दर्शन?
१) आत्यंतिक व्यक्तिवाद नको.
२) आत्यंतिक समूहवाद नको.
३) पैशाचा अभाव नको तसेच पैशाचा प्रभावही नको.
४) संघर्षाऐवजी समन्वयाची कास धरावी.
५) राजकीय सत्ता सर्वोपरी आणि सर्वेसर्वा नाही.
६) माणूस हा आर्थिक, राजकीय वा सामाजिक प्राणी नाही.
७) माणूस हा शारीरिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यासोबतच मानसिक, बौद्धिक व आत्मिक गरजा, जाणीवा, प्रेरणा यांनी संचालित होत असतो.
८) माणूस हा ठोकळा वा यंत्र नाही. (यंत्रवाद म्हणताना दीनदयाळजींना यंत्रांचा अतिरेक नसावा हे जसे अभिप्रेत होते तसेच माणूस हा यंत्र नाही; किंबहुना हे विश्व म्हणजे चार भाग जोडून बनवलेले यंत्र नाही हेही अभिप्रेत होते. विचार आणि दृष्टीतील यांत्रिकता हा यंत्रवाद याचा आशय.)
९) मानव हा या विश्वापासून वेगळा isolated नाही. माणूस, समाज, निसर्ग, ब्रम्हांड, अन या सगळ्याचे मूळ जे काही असेल ते; या सगळ्यांचा समन्वय सुखासाठी आवश्यक. सगळ्यापासून फटकून अथवा सगळ्यावर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीतून सुखी होता येणार नाही.
१०) उच्च प्रेरणांच्या अभावी मानवी जाणिवांचा आणि प्रेरणांचा विकास अशक्य. अन या विकासाअभावी सुखशांतीपूर्ण सहअस्तित्वाकरीता माणूस सहकार्यही करणार नाही.
११) विचार आणि चेतनेचा विकास झालेला माणूस. नराचा नारायण होण्याचा ध्यास घेतलेला माणूस. त्याच्या आधारे मर्यादांची जाण असणाऱ्या व्यवस्था. सामूहिक पुरुषार्थाच्या आधारे या व्यवस्थांच्या द्वारे सगळ्यांचे संपूर्ण सुख.
१२) यासाठी अनुकूल जीवनशैली.
एकात्म मानववादाचे हे काही ठळक पैलू. यांच्यावर एक नजर टाकली तरीही एक गोष्ट लगेचच स्पष्ट होते की, राजकीय पक्ष, राजकीय सत्ता यांची यातील भूमिका मर्यादित आहे. ती मुलभूत आहे असेही नाही. हा समाजाने समाजासाठी करावयाचा विचार आहे. ही समाजाने स्वत:साठी स्वीकारावयाची दिशा आहे. राजकीय सत्तेला वेठीला धरून व्यक्ती वा समाजाच्या इच्छांची आवर्तने पूर्ण करण्याचा खटाटोप किंवा व्यक्ती व समाजाच्या इच्छांच्या आवर्तनांचा उपयोग करून घेत सत्ता बळकट करण्याचा उपद्व्याप; असे `एकात्म मानववादाचे' स्वरूप नाही. एकात्म मानववाद हजारो वर्षांच्या मानवी संचितातून निघालेले नवनीत काय आहे याचा मार्ग आणि दिशा स्पष्ट करतो. त्यासाठी सत्ता, पक्षोपपक्ष यांच्यासोबतच समाजाकडूनही विशिष्ट गुणांची, कर्तव्यांची, जबाबदाऱ्यांची, समजूतदारीची अपेक्षा करतो. readymade tailored सुखाचा दावा एकात्म मानववाद करीत नाही. खोट्या आणि फसव्या कल्पना आणि दावे तो मोडीत काढतो. तो ना आशावादी आहे ना निराशावादी. एकात्म मानववाद यथार्थवादी आहे. तो डावा किंवा उजवा नाही, तर सरळमार्गी आहे. तसेच तो केवळ भारतासाठी नाही तर समस्त मानवतेसाठी आहे.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'एकात्म मानववाद काय आहे?' या प्रकरणातील एक अंश.)

शनिवार, २९ मे, २०२१

एकात्म मानववाद (१)

 

भारताच्या केंद्रस्थानी आज भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. देशभरात अनेक राज्यांमध्येही भारतीय जनता पार्टी सत्तारूढ आहे. आपल्या पक्षाचा वैचारिक आधार म्हणून भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' स्वीकारला आहे. त्यामुळे अनेकांच्या कानावर `एकात्म मानववाद' हे शब्द पडले आहेत. सत्तारूढ पक्षाचे वैचारिक दर्शन असल्याने प्रसार माध्यमात तो विषय येतो. लोकसभा टीव्हीसारख्या सरकारी प्रसिद्धी माध्यमात त्यावर कार्यक्रम प्रसारित होतात. हे स्वाभाविकच आहे. परंतु `एकात्म मानववाद' म्हणजे नेमके काय? काय आहे हा `एकात्म मानववाद'? हे मात्र फारसे चर्चेचे विषय नसतात. एकूण `एकात्म मानववाद' याचं आकलन फारसं नाही हे वास्तव आहे. भारतीय जनता पार्टीने `एकात्म मानववाद' म्हणजे `अंत्योदय' असं सोपं, सुटसुटीत समीकरण केलं आहे. ते योग्य तर नाहीच, पण घातकही आहे. फारशी साधकबाधक चर्चा आजवर झाली नसल्याने स्वाभाविकच `एकात्म मानववाद' याबद्दल गैरसमज आहेत आणि आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावून त्यावर टीकाटिप्पणीही होत असते. एकात्म मानववादाचा अंत्योदयाला विरोध नाही. पण एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय असे म्हणणे, हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विशाल विचारांना मर्यादित करण्यासारखे होईल. एवढेच नव्हे तर त्यातून संभ्रम उत्पन्न होईल. विशेषत: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या संदर्भात ते योग्य ठरणार नाही. शब्दांच्या बाबतीत तसाही नेमकेपणा असला पाहिजे. पंडितजी तर याबाबतीत आग्रहीच होते. `सही शब्द, सही अर्थ' या शीर्षकाचा त्यांचा एक लेखच आहे. उदाहरणादाखल त्यांनी धर्म, राष्ट्र, संस्कृती इत्यादी शब्दांची त्यात चर्चा केली आहे. योग्य शब्द न वापरल्याने प्रथम वैचारिक स्तरावर आणि त्याच्या परिणामी सामाजिक स्तरावर गोंधळ निर्माण होऊन त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात. एकात्म मानववादालाही हे सूत्र लागू होते. त्यामुळेच एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय असे समीकरण चुकीचे, अयोग्य आणि संभ्रम उत्पन्न करणारे ठरते. त्यामुळेच त्याचा त्याग करायला हवा. एक तर `अंत्योदय' हा शब्द दीनदयाळजींनी वापरलेला नाही. हा शब्द प्रथम वापरला महात्मा गांधींनी. पण तो त्यांचाही मूळ शब्द नाही. रस्किनच्या unto this last या कल्पनेचे त्यांनी केलेले ते भाषांतर आहे. शब्द म्हणून त्याचा हा इतिहास आहे, अन भावना म्हणून अंत्योदय मानवासोबतच जन्माला आला आहे. जगभरातील सगळ्या साधूसंतांनी, अवतारांनी, महापुरुषांनी, चिंतकांनी, विचारवंतांनी, समाज सुधारकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, कलाकारांनी, साहित्यिकांनी अंत्योदय सांगितलाच आहे. नव्हे तीच साऱ्यांची प्रेरणा राहिली आहे. अगदी समाजवाद, साम्यवाद, सर्वोदय यांनीच नव्हे तर भांडवलशाहीने सुद्धा अंत्योदय मानला आहेच. भांडवलशाहीला तो मनापासून मान्य नसला तरीही विचारांची मांडणी करताना trickle down theory हा एक प्रकारचा अंत्योदय विचार म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अंत्योदय ही काही नवीन अन विलक्षण गोष्ट नाही. अंत्योदय हा मानवी सद्भावांचा हुंकार आहे. त्या अर्थाने अन्य महापुरुषांप्रमाणे दीनदयाळजींनाही अंत्योदय मान्य होता. परंतु त्यांनी त्यासाठी एकात्म मानववाद समाजापुढे ठेवला नाही. अंत्योदय हा एकात्म मानववादाचा एक लहान पैलू आहे. लहान याचा अर्थ कमी महत्वाचा असा नाही. अन एक पैलू म्हणजे संपूर्णताही नाही.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनता पार्टीचे मूळ रूप असलेल्या भारतीय जनसंघाचे नेते होते. इ.स. १९५१ साली भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे ते संस्थापक महामंत्री होते. इ.स. १९६७ च्या डिसेंबर महिन्यात कालिकत येथे झालेल्या भारतीय जनसंघाच्या अखिल भारतीय अधिवेशनात ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले गेले. दुर्दैवाने दोनच महिन्यात म्हणजे इ.स. १९६८ च्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची रेल्वे प्रवासात निर्घृण हत्या झाली. ते जनसंघाचे महामंत्री असतानाच; १९६५ च्या एप्रिल महिन्यात २२, २३, २४ आणि २५ तारखांना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची मुंबईत चार भाषणे झालीत. ती भाषणेच एकात्म मानववाद म्हणून ओळखली जातात. त्यातील पहिले भाषण होते- `राष्ट्रवाद की सही कल्पना', दुसरे भाषण होते- `एकात्म मानववाद', तिसरे भाषण होते- `व्यष्टी, समष्टी मे समरसता' आणि चौथे भाषण होते- `राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना'. ही चार भाषणे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे एक भाषण आणि थोर विचारवंत- भारतीय मजदूर संघ आणि अन्य अनेक अखिल भारतीय संस्थांचे संस्थापक व मार्गदर्शक राहिलेले- भारतीय जीवनदर्शन आणि भारतीय विचारदर्शनाचे भाष्यकार स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे एक भाषण यांचे एक पुस्तक, `एकात्म दर्शन’ या नावाने दिल्लीच्या दीनदयाळ शोध संस्थेने प्रकाशित केले. तो एकात्म मानववादाचा मूळ दस्तावेज. दीनदयाळ उपाध्याय यांच्या हत्येनंतरच्या भारतातील राजकीय घडामोडींनी राजकारण, राजकीय पक्ष एवढेच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजजीवनाचे चित्रच पालटून टाकले. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लादली. ती १९७७ साली उठवण्यात आली आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. स्व. इंदिरा गांधी यांना निर्णायक मात देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष एकत्र आले. या पक्षांनी आपापले स्वतंत्र अस्तित्व विसर्जित करून जनता पार्टीची स्थापना केली. या पक्षांमध्ये भारतीय जनसंघही होता. स्वाभाविकच भारतीय जनसंघ त्याच्या एकात्म मानववादासहित संपुष्टात आला. त्याचे अस्तित्व उरले नाही. ती त्यावेळची गरज होती. परंतु राजकीय महत्वाकांक्षा उफाळून आल्या आणि पूर्वीच्या जनसंघाच्या लोकांना जनता पार्टीतून बाहेर पडावे लागले. या लोकांनी मग ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टी नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला. भारतीय जनता पार्टीने आपला वैचारिक आधार म्हणून `गांधीवादी समाजवाद’ हे तत्वज्ञान स्वीकारले. आपला पक्ष सर्वसमावेशक व्हावा, त्याच्यावर बसलेला `हिंदुत्ववादी पक्ष’ किंवा `संघनिष्ठ पक्ष’ हा शिक्का पुसून टाकणे ही त्यामागील भूमिका होती. मात्र यावरून एक वैचारिक वादळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संघटना यांच्यात निर्माण झाले. भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ भूमिकेपासून, मूळ विचारापासून दूर गेल्याची मोठी चर्चा झाली. यावर सखोल विचारमंथन झाले आणि भारतीय जनता पार्टीने एकात्म मानववादाला पुन्हा एकदा पक्षाचा वैचारिक आधार म्हणून मान्यता दिली. या सगळ्या घडामोडींचा परिणाम असा झाला की, एकात्म मानववाद हा राजकीय पक्षाचा कार्यक्रम किंवा धोरण असल्याचा समज निर्माण झाला. हा समज संघ आणि भाजपा यांच्या बाहेरील लोकांचा तर झालाच, पण खुद्द संघाचे लोक आणि भाजपचे कार्यकर्ते, समर्थक यांचाही झाला. हा गैरसमज दूर करण्याचे काम सर्वप्रथम `पंडित दीनदयाळ उपाध्याय विचारदर्शन’ या द्विखंडात्मक ग्रंथाने केले. मूळ मराठीतील हा ग्रंथ इ.स. १९८६ च्या महाशिवरात्रीला पुण्याच्या भारतीय विचार साधनेने प्रकाशित केला. यात पाच विचारवंतांनी वेगवेगळ्या अंगाने एकात्म मानववादाचा मागोवा घेतला आहे. शिवाय स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे एक प्रकरणही आहे. या ग्रंथाला स्व. दत्तोपंत ठेंगडी यांची प्रदीर्घ सुमारे १५० पानांची प्रस्तावना आहे. `एकात्म मानववाद’ स्पष्ट करण्यास हा ग्रंथ मोलाचा आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनाला आता तीन दशकांहून अधिक काळ झाला आहे. या काळात सुद्धा एकात्म मानववाद यावर म्हणावे तसे आणि पुरेशा प्रमाणात मंथन झाले नाही. स्व. दीनदयाळ उपाध्याय यांनी नेतृत्व केलेल्या पक्षाचे अपत्य, आज राजकीय जीवनात मध्यवर्ती स्थानावर आहे. त्यांनी प्रतिपादन केलेला विचार मात्र मध्यवर्ती विचार होण्याचे दूर; विचारांच्या क्षेत्रातही अद्याप अपरिचित आहे. नाही म्हणायला स्व. उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने २०१६-२०१७ साली त्याची थोडीबहुत चर्चा झाली. मात्र ती औपचारिक म्हणावी अशीच. समाजावर त्याचा काही ठसा उमटू शकला नाही.
सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे- एकात्म मानववाद आहे काय? `एकात्म मानववाद' हे एक वैचारिक दर्शन आहे. दर्शन ते असते जे दृष्टी आणि दिशा देते. म्हणूनच `एकात्म मानववाद' सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्था आणि मानवी जीवन यांना दिशा देणारा विचार आहे. तो राजकीय किंवा आर्थिक कार्यक्रम नाही. तो राजकीय, आर्थिक नियोजनाचा आराखडा नाही. निवडणुका, राजकीय पक्ष, निरनिराळ्या नियुक्त्या, कार्यक्षेत्रे, कामाचे वाटप, निधीचे वाटप, आर्थिक रचना, उद्योगांचे स्वरूप इत्यादी गोष्टी त्यात नाहीत. तशी अपेक्षा ठेवून `एकात्म मानववाद' पाहिल्यास निराशाच पदरी पडेल. आपलं conditioning इतकं झालं आहे की, स्वयंपाक किंवा बालसंगोपन सुद्धा नेमक्या सूचनांशिवाय आपण करू शकत नाही. आपल्याला सगळे साचे तयार हवेत. त्यात कच्चा माल ओतून मूर्ती घडवणे एवढेच आपल्याला जमते. दृष्टी, कल्पना आणि हात वापरून मूर्ती तयार करणे आम्ही विसरलो आहोत. पण ही समस्या आपली आहे. त्यामुळे `एकात्म मानववाद' अपुरा वा चुकीचा वा निरर्थक ठरत नाही. आपल्या मर्यादांमुळे आम्हाला त्याचं आकलन होत नाही. `एकात्म मानववाद' सर्व प्रकारच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक रचना, व्यवस्था, त्यातील परिवर्तने यांची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे एक विचारदर्शन आहे, एखादा नियोजन आराखडा नाही हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. इ.स. १९६५ ची मुंबईतील जी चार भाषणे `एकात्म मानववाद’ म्हणून ओळखली जातात त्या भाषणांमध्ये धोरण, नीती, आकडेवारी इत्यादी नाही. सरकारी वा गैरसरकारी धोरणांची चिरफाड नाही. वर्तमान वा भूतकालीन संदर्भ हे विषयाच्या स्पष्टीकरणासाठी अन विवेचनासाठी आहेत. मग या भाषणांमध्ये एवढे काय आहे? त्यात मानवी जगण्याच्या अन त्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या व्यवस्थांच्या संदर्भात मुलभूत तात्विक चिंतन आहे. राष्ट्र म्हणजे काय? आधुनिक राष्ट्रकल्पना काय आहे अन ती कशी विकसित झाली? भारतीय राष्ट्रकल्पना काय आहे? दोन्हीतील मूलभूत फरक काय? सुख म्हणजे काय? जीवनाची दृष्टी कशी असावी? राज्य म्हणजे काय? समाज म्हणजे काय? पैशाकडे कसे पहावे? आदर्श काय असावेत? व्यक्ती आणि समाज कसा विचार करतात? अनेक राष्ट्रे संपून का गेलीत? धर्म म्हणजे काय? सत्ता आणि संपत्ती यांची बलस्थाने आणि दुर्बलस्थाने कोणती? त्यांच्या मर्यादा काय? चतुर्विध पुरुषार्थ, मानवाचे स्वरूप; इत्यादी गोष्टींची या भाषणांमध्ये चर्चा आहे.
('एकात्म मानववाद : अर्थ, यथार्थ' या येऊ घातलेल्या पुस्तकातील 'एकात्म मानववाद काय आहे?' या प्रकरणातील एक अंश.)

गुरुवार, २७ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१५)

 

दुसरा एक अनुभव मात्र आध्यात्मिक विकासाला दिशा देणारा, मदत करणारा सांगतो. कुळ, कुळाचार, कुळधर्म इत्यादींचं महत्व फार काही राहिलं नसलं तरीही; मी जे काही करतो वा करत नाही त्यावर; कुटुंबात चालणाऱ्या उपासना परंपरेचं मत काय असू शकतं; या परंपरेचा आशीर्वाद असेल की नसेल; असे काही प्रश्नही मनात होते. आशीर्वाद मिळावा अशी सुप्त इच्छाही होती. अशातच सांगली जवळच्या नरसोबावाडीला राहण्याचा योग आला होता. भगवान दत्तात्रेयांचं हे स्थान. विदर्भातील कारंजा येथे जन्म घेतलेले दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांचे स्थान. मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. गच्च थंडी पडली होती. धुकं दाटलं होतं. एकूणच गूढरम्य पहाट होती. नदीवर गेलो. तुरळक एक दोन माणसे होती घाटावर. कृष्णा नदीच्या घाटाच्या पायऱ्या उतरून खाली नदीपात्रात खालच्या पायरीवर उभा राहिलो. कृष्णेचं तीर्थ सुखावत होतं. समोर घाटावर श्री नृसिंह सरस्वती स्वामींचं पादुका मंदिर होतं. मनात एक अशब्द संवाद सुरू होताच. त्याच तंद्रीत, ईश्वराला नेहमी विचारतो तसं त्यांना विचारलं - 'महाराज, मी तर काहीच करत नाही. पूजाअर्चा, जपजाप्य, पोथीपारायण, कर्मकांड; काहीही नाही. अगदी मौंजीच्या वेळी घातलेलं यज्ञोपवित सुद्धा सारदा माँ यांच्यापुढे अर्पण केलेलं आहे. या सगळ्यात गोडीही वाटत नाही अन या साऱ्याशी संबंधही जाणवत नाही. माझं लौकिक आणि आध्यात्मिक जीवन काय अडचणीत येईल? मला काही भविष्य नाही? माझं वाटोळं होईल?' अन त्याच तंद्रीत असताना, कृष्णेच्या पात्रातून महाराज समोर आले अन म्हणाले - 'मी म्हटलं आहे का तुला, का हे सगळं करत नाही ते? तू तुला आतून वाटेल तसं करत जा.' अन घाटाच्या पायऱ्या चढून महाराज अदृश्य झाले. असं वाटलं की; आपलं संचित, प्रारब्ध, क्रियमाण सगळं कृष्णेच्या प्रवाहात वाहून चाललं आहे.
*** *** *** *** ***
जीवनाला पुरेल असं ईश्वराने मला काही दिलं नाही. जे काही दिलं ते काढून घेतलं. समाजानेही काही दिलं नाही. माझे कर्तृत्व, बुद्धिमत्ता, शक्ती, कष्ट समाजाला बहुतेक नको होते. कधी तरी या साऱ्याबद्दल काही वाटलं असेल, पण आता कशाचीच गरजही वाटत नाही. उरलेलं आयुष्य कसं जाईल ठाऊक नाही. जाणूनही घ्यायचं नाही. सध्या तरी वाटतं आहे की, लिहीत राहीन. मात्र तसं काहीही ठरवलेलं नाही, ठरवायचंही नाही. आता कोणतेही पिंजरे नकोत. ना सोन्याचे ना लोखंडाचे. का लिहितो आहे हेही माहिती नाही. उद्देश काहीच नाही. जे प्रवाहित होईल ते होऊ द्यायचं. बस्स. सत्याचं दर्शन घडवायलाच ईश्वराने सारं असत्य काढून घेतलं असावं. ही निराशा अजिबात नाही. मग काय आहे? माहिती नाही.
मी फारच दुबळा आहे. लोक केवढाला संघर्ष करतात. मी पळपुटा आहे. माझ्यापेक्षा खराब स्थितीतही लोक राहतात. असे सारे आक्षेप घेतले जाऊ शकतील. गंमत ही की; नाव, पैसा, प्रसिद्धी, यश म्हणजेच जीवन असं गृहीत धरून; असा सिद्धांत मांडून हे आक्षेप घेता येतील. परंतु या जगातील रस राहावा की न राहावा याचं काही गणित असतं का? एक प्रसिद्ध पुस्तक आहे 'The monk who sold his Ferrari'. फेरारी बाळगणाऱ्या यशस्वी माणसाला या जगाचा उबग येऊ शकतो. राजा असलेल्या शुद्धोधनाला या जगाचा विट येऊ शकतो. तसाच तो कोणालाही केव्हाही येऊ शकतो. यश वा अपयश, या जगातील अनुकूलता वा प्रतिकूलता, सुख वा संघर्ष; या कशाचाही विरक्तीशी संबंध नाही. ती येते किंवा येत नाही.
माझ्या इच्छा इत्यादी संपल्या आहेत का? माहिती नाही पण एक गोष्ट निश्चित की, मनात फारशा इच्छाच निर्माण होत नाहीत. अन झालीच एखादी इच्छा तरी ती विरून जाते. तिची आठवण सुद्धा नंतर येत नाही, राहत नाही. त्या इच्छेने अस्वस्थ वगैरे तर होतच नाही. आता होत नसतील इच्छा पण राहून गेलेल्या इच्छांचे काय? शास्त्रे त्याबद्दल काही मते मांडतात. अपूर्ण इच्छा पूर्ण केल्याशिवाय गती नसते. अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. इत्यादी. माझ्या मनात, माझ्या डोक्यात मात्र यातलं काहीही येत नाही.
कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकात एक वाक्य आहे - 'कोणीही कोणाचं नसतं.' खलील जिब्रानच्या प्रॉफेटच्या तोंडीही अशाच आशयाचं एक वाक्य आहे - 'तुमची मुलं तुमची नाहीत. तुमच्यातून आलेली आहेत.' आदि शंकराचार्य त्यांच्या निर्वाण षटकम स्तोत्रात हाच भाव व्यक्त करतात. परंतु तिघांच्याही प्रतिपादनात खूप मूलभूत फरक आहे. कुसुमाग्रज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं असलं पाहिजे. मानवी भावनांना अनुसरून व्यक्त केली गेलेली नटसम्राटाची निराशा ही अपेक्षा सुचवते. खलील जिब्रानचा प्रॉफेट जीवनाचं नागडं सत्य तत्वचिंतकाच्या अधिकाराने मानवाला समजावून सांगतो. आदि शंकराचार्य मानवी भावांच्या वर उठून, तत्वचिंतनाच्या सोपानावरून 'मी शिव आहे' हे अंतिम सत्य सांगतात. 'कोणीही कोणाचं नसतं' ही एकच गोष्ट कशी विविध रुपात असू शकते, तिचे अर्थ कसे वेगळाले असू शकतात हे यावरून समजून घेता येतं. माझं प्रतिपादन शंकराचार्यांच्या प्रतिपादनाच्या अंगाने पाहावं लागेल.
लादलेल्या अस्वस्थ एकांताने मी अध्यात्माचा विचार करू लागलो आणि आध्यात्माने मला स्वेच्छेचा सुखमय एकांत दिला. इथून पुढे काय ते काळाच्या उदरात आहे.

बुधवार, २६ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१४)

 

आणखीन एका विषयाचा या अनुषंगाने विचार करायला हवा. मानवी जीवनाचे बाह्य आणि आंतरिक वैविध्य, त्यातील भेद, त्यातील क्षमतांचे कमीअधिक प्रमाण, त्यांची श्रेष्ठ कनिष्ठता; यांची कारणे आणि स्पष्टीकरण अध्यात्मच देऊ शकतं. विज्ञान फार तर DNA इत्यादी सांगेल, पण ते का हे मात्र विज्ञान स्पष्ट करू शकत नाही. भारतीय अध्यात्म परंपरांनी स्वीकारलेली पुनर्जन्माची कल्पना या निसर्गदत्त भिन्नतेचे स्पष्टीकरण देते. आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्या कर्माचा परिणाम असतो. आपल्या वाट्याला येणारे जीवनाचे रंग आपल्या कर्मातून निर्माण होतात, असे कर्मसिद्धांत सांगतो. याचा सरळ अर्थ हा होतो की, कोणाच्या वाट्याला आलेले दुर्दैव, दु:ख, वेदना, अभाव, वंचना, गरिबी, अपमान, कुरुपता, अवगुण; तसेच कोणाच्या वाट्याला आलेले सुदैव, सुख, समाधान, संपन्नता, प्रेम, श्रीमंती, सन्मान, रूप, गुण; हे त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम असतो. प्रत्येकाला लाभणारे आईवडील, पती वा पत्नी, शेजारी, नातेवाईक, मित्र, शत्रू; हे देखील त्याच्या कर्मचाच परिणाम. या कर्मसिद्धांतावर आक्षेप हा असतो की, याने माणूस दैववादी बनतो. हा आक्षेप संपूर्ण निर्मूल आहे. कर्मसिद्धांत नीट लक्षात न घेतल्याने, त्या सिद्धांताचा पूर्ण विचार न केल्याने असा आक्षेप घेतला जातो. काही गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे, आपले वर्तमान जीवन आपल्या आधीच्या कर्मांचा परिणाम असेल तर आपले भावी जीवन आपल्या वर्तमान कर्मांचा परिणाम असेल. आपण वर्तमान जीवनात संतुष्ट नसू आणि भावी जीवन चांगले हवे असेल तर, आपल्याला वर्तमानात त्यासाठी आवश्यक योग्य असे कर्म करावे लागेल. आपल्याला लाभलेले वर्तमान जीवन हा जीवनाचा पूर्णविराम नाही हे समजून भावी जीवनासाठी कर्म करावे लागेल. दैववादाच्या आक्षेपाचे हे पहिले व्यावहारिक स्पष्टीकरण. दुसरा मुद्दा नीतीच्या संदर्भात आहे. प्रत्येकाचे जीवन हा त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम असेल तर एखाद्याने दुसऱ्याचा विचार का करायचा? दुसऱ्याबद्दल सहानुभूती, प्रेम, करुणा, सेवा; या भावना का बाळगाव्यात? प्रश्न युक्तिपूर्ण असला तरीही निरर्थक आहे. प्रत्येकाचे जीवन त्याच्या त्याच्या कर्माचा परिणाम आहे हे खरेच आहे. त्याचवेळी दुसऱ्यांच्या विचार करणे वा न करणे किंवा दुसऱ्याबद्दल सहानुभूती, प्रेम, करुणा, सेवा इत्यादी भावना बाळगणे वा न बाळगणे; हे आपले कर्म असते. त्यानुसार आपण वागतो तेही आपले कर्म असते. अन त्या कर्मावर आपले भावी जीवन अवलंबून असते. ज्यांना भावी जीवन चांगले असावे असे वाटत नाही, त्यांनी दुसऱ्यांचा विचार न केला तरीही हरकत नाही. कर्मसिद्धांताचे कारण सांगून कोणी बाकीच्यांचा विचार करणार नाही तर त्याच्या त्या अलिप्ततेच्या, दुर्लक्ष करण्याच्या, स्वार्थाच्या, संवेदनशून्यतेच्या कर्माचे फळ त्याला भविष्यात मिळेलच. त्यामुळे व्यक्तिशः किंवा दुसऱ्यांचा विचार करतानाही, कर्मसिद्धांत माणसाला योग्य मार्गावर चालण्याची आणि योग्य दिशेच्या प्रयत्नवादाचीच प्रेरणा देतो. ख्रिश्चन व इस्लाम मात्र हे जीवन जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूशी संपते असे मानतात. अन त्यानंतर ईश्वरी निर्णयाच्या दिवसापर्यंत वाट पाहायला सांगतात. उलट भारतातील कर्मसिद्धांत आत्यंतिक व्यक्तिवादी असून सगळ्या बऱ्यावाईट जीवनाची जबाबदारी त्या त्या व्यक्तीवर टाकून त्याला प्रयत्नवादी बनवतो. कर्माची ही साखळी म्हणजेच जगणे. अन कर्म थांबवणे म्हणजे अध्यात्म. जगणं आणि अध्यात्म मिळून समग्र जीवन. जगणे कुठून, कधी सुरू होते वा सुरू झाले हे सांगता येत नाही. पण ते थांबवता येते आणि तरीही जीवन मात्र कायम राहते. अध्यात्माचे मानवाला हे आश्वासन आहे. मानवाला संपूर्ण भयशून्य करण्याची शक्ती केवळ यातच आहे. देवादी सारे काही बाजूला सारून होणारे हे आत्मदर्शन, आत्मतत्वाची परिपूर्ण अनुभूती; हीच अध्यात्माची देणगी.
अध्यात्माची समज वाढण्यासाठी आणखी एका विषयाचा विचार क्रमप्राप्त ठरतो. तो म्हणजे मृत्यू. मृत्यू शब्द उच्चारताच माणूस घाबरतो. तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याला अमंगल ठरवतो. तो न बोलण्याचा विषय आहे असे माणसाचे सर्वसाधारण मत असते. याचेही कारण म्हणजे; ऐहिक, इंद्रियगम्य जग म्हणजेच जीवन असा माणसाचा समज. मृत्यू म्हणजे या ऐहिक, इंद्रियगम्य जगाची समाप्ती. मी म्हणून आपण ज्याला समजतो त्या देहाची समाप्ती अन या देहाला आणि मन, बुद्धीला समजू शकणाऱ्या भवतालाची समाप्ती. आपली समाप्ती मात्र नाही. हे जे आपल्याला समजू शकणारं, जाणवणारं जग आहे तेवढंच जीवन नाही, हे कळल्याशिवाय माणूस आध्यात्मिक होऊ शकत नाही. मानवाला ही जाणीव करून देण्यासाठीच नियतीने मृत्यूची योजना केली असावी. आपल्याला आवडो वा न आवडो, मृत्यू अपरिहार्य आहे. त्याचा विचार केल्याशिवाय जीवनाचा विचार अपूर्ण आहे. मृत्यू सोडून केला जाणारा जीवनाचा विचार म्हणजे जगण्याचा विचार. जगणं आणि मरणं दोन्ही मिळून केला जातो तो जीवनाचा विचार. कारण तेव्हाच आपण; हे जीवन कुठून येतं, हे जीवन कुठे जातं, हे जीवन येतं का, हे जीवन जातं का, हे जीवन येतं म्हणजे काय, हे जीवन जातं म्हणजे काय, जीवनाचं स्वरूप काय, माझा आणि जीवनाचा संबंध काय; अशा विविध प्रश्नांचा विचार करू लागतो. हे प्रश्न आम्हाला जीवनाच्या व्यापकतेची, सखोलतेची, सुक्ष्मतेची जाणीव करून देत; आध्यात्मिक करत जातात. मृत्यूचा विचार म्हणजे मरणाचा विचार नाही. मृत्यूच्या स्वरूपाचा विचार. हा इतका मूलभूत आणि महत्वाचा विचार असल्यानेच उपनिषदांनी, भगवद्गीतेने, दासबोधाने त्याची सांगोपांग चर्चा केली आहे. कठोपनिषदातील नचिकेताचे आख्यान तर विश्वसाहित्यातील नितांत सुंदर मृत्यूचिंतन आहे. मृत्यूचा विचार केल्याशिवाय, मृत्यूचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय; जीवनाचा प्रवाह, जीवनाचे सातत्य, जीवनाचे अमरत्व, जीवनाचा आशय; आकलन होऊ शकत नाही. त्याशिवाय नचिकेतासारखी आत्मश्रद्धा जागी होऊ शकत नाही. अन आत्मश्रद्धा नसेल तर आत्मअध्ययन, अध्यात्म कुठले?
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

मंगळवार, २५ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१३)

अर्थात सगळी माणसे सारखी नसतात. सारखी असूही नयेत. सगळी माणसं सारखी झालीत तर सृष्टी ठप्पच होऊन जाईल. सृष्टीचा विकास, मानवाची बाह्य आणि आंतरिक प्रगती ज्या संघर्ष आणि समन्वयातून होते, तो संघर्ष आणि समन्वय राहणारच नाही. त्यावेळी हे विश्व तरी राहील का? कल्पनेपलीकडील प्रश्न म्हणावा लागेल. शिवाय सगळ्यांना सारखं करणं हे काही कोणाच्या हातात नाही. बाह्य लक्षणांवरून माणूस सारखा वाटत असला तरीही त्यांच्यातील विविधता, भिन्नता देवदत्त आहे. म्हणूनच कोणी आध्यात्मिक, कोणी ऐहिक, कोणी दोन्हीचे थोडे थोडे मिश्रण, कोणी ऐहिक असून अध्यात्माकडे झुकलेले, कोणी आध्यात्मिक असून ऐहिकाकडे झुकलेले; असे सगळे प्रकार राहणारच. त्यामुळे कोणी आध्यात्मिक नाही म्हणून वाईट आहे किंवा कोणी ऐहिक नाही म्हणून निरर्थक आहे, असे समजण्याचे कारण नाही. मुळात ऐहिक आणि आध्यात्मिक या जीवनाच्या नाण्याच्या फक्त दोन बाजू आहेत. त्या वेगळ्या करता येत नाहीत. एक बाहेरील बाजू आणि दुसरी आतील बाजू. नाण्याच्या दोन्ही बाजू स्पष्ट दिसतात तशा जीवनाच्या या दोन बाजू स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे माणूस बुचकळ्यात पडतो. मात्र या दोन बाजू आहेत हे समजून घेणे गरजेचे असते. ते समजले की जीवनाचे, मनाचे, बुद्धीचे, भावनांचे, विचारांचे संतुलन होऊ शकते. तसेही नाण्याची एक बाजू गुळगुळीत झालेली असेल, म्हणजेच नाण्याला फक्त एकच बाजू असेल तर ते नाणे चालत नाही. दोन्ही बाजू हव्यात. तशाच जीवनाच्या ऐहिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही बाजू हव्यात. परंतु नाणे म्हणजे पैसा नाही, जोवर त्याला सत्तेची मान्यता नाही. सत्तेने मान्यता काढून घेतली की नाणे निरर्थक होते. नोटबंदीच्या वेळी आपण हे अनुभवले होते. तशीच जीवनाच्या नाण्याला त्याच्या पलीकडील सत्तेची मान्यता महत्वाची असते. ती सत्ता म्हणजेच ईश्वर. कोणालाही निश्चित माहिती नसलेली, विविध स्वरूपात अभिव्यक्त होणारी ही सत्ता. मानवी आकलनाच्या मर्यादांमुळे त्याबद्दल संभ्रम आणि मतभिन्नता भरपूर पाहायला मिळते. ईश्वर म्हणा, निसर्ग म्हणा, नियती म्हणा, माहिती नाही म्हणा; अर्थ आणि आशय एकच. ही जी विविध प्रकारे वर्णन केली जाणारी सत्ता आहे तीच वास्तविक जीवनाच्या नाण्याला मान्यता देत असते. कोणी जीवन म्हणजे जन्म ते मृत्यू या काळातील दृश्य, आकलनकक्षेत येणाऱ्या गोष्टी, असे म्हणतील आणि मानतील. तर अन्य कोणी जीवन म्हणजे जन्ममृत्यूच्या साखळीहून अधिक काही गोष्टी म्हणतील आणि मानतील. परंतु ही दोन्ही मते येतात कुठून? त्या मतांचा प्रवर्तक कोण? कोणाला असे वा कोणाला तसे का वाटते? माणूस या वा अशा मतांवर आपला हक्क सांगतो पण तो हक्क सिद्ध करू शकत नाही. याच सगळ्या भवती न भवतीतून माणसाला जीवनाच्या नाण्यावर जी सत्ता अंकुश ठेवते तिची ओढ लागते. तुम्ही ऐहिक असा की आध्यात्मिक असा, या जीवनावरील सत्तेचा विचार कधी ना कधी मनात डोकावल्याशिवाय राहत नाही.
कोणी या प्रश्नाचाच ध्यास घेतात तर कोणी त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बहुसंख्य माणसे त्या सत्तेचा ध्यासही घेत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्षही करीत नाहीत. ते प्रत्ययाला येणारी पहिली गोष्ट असणारे हे ऐहिक जीवन धरून ठेवतात आणि जमेल तसा जीवनावरील त्या सत्तेचा अदमास घेतात. बहुसंख्य माणसांचा हा व्यवहार म्हणजेच धर्म. दृश्य, अनुभवगम्य, प्रत्ययाला येणारे जीवन आणि अदृश्य, अनुभवाला न येणारी, प्रत्ययाला न येणारी त्यावरील सत्ता; यांना जोडण्याचा प्रयत्न म्हणजे धर्म. आपापले विचार, वृत्ती, समज, आवाका, अनुभव, जाणिवा, प्रेरणा; यानुसार माणसे जगतात आणि त्यातूनच विविध धर्म, धार्मिक आचार, धार्मिक विचार आकाराला येतात. मूळ धर्म मात्र समान राहतो. तो म्हणजे - प्रत्ययगम्य जीवन आणि प्रत्ययशून्य त्यावरील सत्ता यांचा मेळ घालणे. जगभरात मानवाने यासाठी केलेल्या प्रयत्नांना आजवर यश मिळालेले नाही. ती प्रत्ययशून्य सत्ता प्रत्ययगम्य जीवनातून जाणवते पण हाती लागत नाही. त्या सर्वोच्च सत्तेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी हे प्रत्ययगम्य जीवन सुटावे लागते. यासाठीचा जो प्रयत्न असतो त्याला अध्यात्म अशी संज्ञा आहे. त्या प्रयत्नांना साधना म्हटले जाते. ही साधना फलद्रुप झालेले लोक त्या सर्वोच्च सत्तेचे वेगवेगळे वर्णन करतात. त्याचे संपूर्ण वर्णन म्हणजे अद्वैत सिद्धांत. जो सिद्धांत हे सांगतो की, आंतरिक विश्व आणि बाह्य विश्व, आध्यात्मिक जीवन आणि ऐहिक जीवन; हे सगळे एकच आहे; एकाच तत्वाचे आविष्कार आहेत. बाह्य विश्व, ऐहिक जीवन तात्पुरते, क्षणजीवी आहे आणि आंतरिक विश्व, आध्यात्मिक जीवन शाश्वत आहे. हा सिद्धांत जाणून घेतल्याशिवाय सांगणे शक्य नाही. अन कोणाचा तरी म्हणून जेव्हा तो सांगितला जातो तेव्हा तो फक्त शब्दरुपात असतो. त्यात शक्ती नसते, जिवंतपणा नसतो आणि त्याची परिणामशक्ती नसल्याच्या बरोबर असते.
काही लोकांनी अध्यात्माचा ध्यास घेण्याची ईश्वरी योजना ही याचसाठी असते. कारण जोवर कोणीतरी त्या सत्तेचा अनुभव घेत नाही, तिचे दर्शन घेत नाही; तोवर बाकीच्यांना त्या सत्तेची जाणीव होऊ शकत नाही. धर्म हे कार्य करू शकत नाही. धर्मापलीकडे जाणाऱ्यांची त्यासाठी गरज असते. हे धर्मातीत लोकच प्रत्ययगम्य जीवन आणि त्यावरील सत्ता यांची समग्रता जाणू शकतात. अन जीवनाचे हे संपूर्णत्व जाणल्याशिवाय जीवन सार्थक आणि सुसह्य होऊ शकत नाही; तसेच समाधानीही होऊ शकत नाही. ऐहिकतेची अपूर्णता, धार्मिकतेच्या मर्यादा आणि आध्यात्मिकतेची अपरिहार्यता; या तिन्ही बाबी अभिनिवेशशून्य जगण्यासाठी समजून घ्याव्या लागतात.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

सोमवार, २४ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१२)

 

योगमार्ग ज्याला अष्टांग योग किंवा राजयोग म्हटले जाते त्यातही पुष्कळ अडचणी असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी इत्यादी गोष्टींचा हा मार्ग असतो. ज्या मानवी शरीराच्या द्वारे मोक्षप्राप्ती करून घ्यायची ते शरीर या मार्गात अतिशय महत्वाचे असते. श्वास किंवा शारीरिक क्रिया नियंत्रित करणे; त्याद्वारे शरीर मन स्वतःच्या ताब्यात आणणे याकडे कल असतो. परंतु या सगळ्या गोष्टींचा हेतू मनातून निसटला की या बाह्य क्रियांनाच अति महत्व प्राप्त होते. वेगवेगळ्या अचाट शारीरिक क्रिया करणे, शरीर हवे तसे वाकवणे वा वळवणे; या क्रियांनी लोकांना आकर्षित करणे आणि आपण आध्यात्मिक आहोत असा भास निर्माण करणे होऊ शकते. आसनादींनी शरीर तंदुरुस्त करणे आणि त्या शरीराद्वारे खूप धावपळ, या धावपळीतून खूप अर्थार्जन, अर्थार्जन करून जीवनाचा आकंठ उपभोग; एवढाच योगाचा अर्थ उरतो. आज हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. शिवाय या साधनेत सिद्धी प्राप्त होतात असे म्हणतात. अनेक संत, सत्पुरुषांच्या जीवनकथांमध्ये या सिद्धी ऐकायला, वाचायला मिळतात. त्यांनाच चमत्कार असेही म्हणतात. हे चमत्कार म्हणजे भाकडकथा होत अशी त्यांची संभावना करणे योग्य नाही. असे चमत्कार सहज पाहायला मिळत नाहीत. आजकाल तर चमत्कार ही गोष्ट जवळपास नाहीच. मात्र याचा अर्थ सिद्धी नसतातच असेही नाही. श्री रामकृष्ण परमहंस यांनी त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांना साधनेच्या काळात विचारलेच होते, सिद्धी हव्यात का म्हणून. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या गुरूला त्यावर प्रश्न केला होता की, या सिद्धींनी ईश्वराचे दर्शन होईल का? त्यावर गुरूने उत्तर दिले होते, 'नाही.' अन पुढे उपदेश करताना ते म्हणाले होते, अशा सिद्धी साधनेतून दूर घेऊन जाण्यासाठीच असतात. त्यांच्या नादी लागू नये. आपण स्वतः सिद्धीप्राप्त पुरुष पाहिले आहेत असे स्वतः स्वामी विवेकानंद यांनी नमूद केले आहे. पण त्याच विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या चमत्काराच्या कथा सांगण्यात वेळ घालवू नका असेही आपले गुरुबंधू आणि शिष्यांना सांगितले होते. स्वतः विवेकानंदांच्या जीवनात कमी वेळात पुस्तकेच्या पुस्तके वाचणे, वाचलेले तपशीलवार लक्षात ठेवणे, दुसऱ्यांच्या मनातील विचार जाणणे अशा चमत्कारी गोष्टी पाहायला मिळतात. परंतु बहुतेक सगळ्याच आध्यात्मिक व्यक्तींनी सिद्धी हे अध्यात्म साधनेतील अडथळे असल्याचेच मार्गदर्शन केले आहे. साध्या तर्काने सुद्धा हे लक्षात येते की, चमत्कार हे साधारण अनुभवाच्या पातळीवर अनुभवता येत नसले तरीही, त्यांचा विषय आणि आशय ऐहिक गोष्टी हाच असतो. शिवाय ईश्वर म्हणजे काही जादूगार नाही. अन जादूच्या प्रयोगांनी या सृष्टीचे, या अस्तित्वाचे, अन आपले स्वतःचे कोडे सुटणे शक्यही नाही.
ज्ञानमार्गातही अडचणी असतातच. या अडचणी नावापासूनच सुरू होतात. सर्वसामान्यपणे ज्ञान हा शब्द ढोबळ अर्थाने वापरला जातो. या जगातील असंख्य विषयांचे ज्ञान हेदेखील ज्ञानच. या विविध विषयांच्या ज्ञानाचे अर्जन म्हणजे ज्ञानयोग अशीही समजूत असतेच. परंतु आध्यात्मिक साधना या अर्थाने जेव्हा ज्ञानयोग हा शब्द उपयोगात येतो तेव्हा विविध लौकिक विषयांचे ज्ञान ग्रहण करणे असा त्याचा अर्थ नसतो. आत्मज्ञानासाठी केलेले सायास ज्ञानयोग या शब्दात अभिप्रेत असतात. खूप पुस्तकांचे वाचन, खूप विषयांच्या पदव्या, एकाहून अधिक आचार्य पदव्या, डी. लिट. उपाधी, मोठा ग्रंथसंग्रह, भरपूर लेखन; याला ज्ञानयोग म्हटले तरी त्याला आध्यात्मिक म्हणता येणार नाही. आत्मज्ञानाचा उद्योग असेल तेव्हाच त्याला आध्यात्मिक ज्ञानयोग म्हणता येईल. आत्मज्ञानाचा उद्योग करायचा म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथ जमवणे, वाचणे, सांगणे वा त्यावर लिहिणे नाही. मानवी जीवनाशी संबंधित अन्य विषयांचे अध्ययन सुद्धा त्यात येऊ शकते. फक्त अन्य विषयांचे अध्ययन आत्मज्ञानाच्या दिशेने घेऊन जाणारे असावे. आत्मशोधाच्या प्रवासाला विविध विषयांच्या अध्ययनाने मदत करावी. ते अध्ययन आत्मशोधाला पूरक व्हावे. तरच त्याला आध्यात्मिक म्हणता येईल. विज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अन्यही विषय विश्वाच्या मर्यादांची जाणीव करून देत, अनित्यतेची जाणीव करून देत, अपूर्णतेची जाणीव करून देत; आत्मशोधाकडे घेऊन जाऊ शकतात. नव्हे शुद्ध आध्यात्मिक ग्रंथांपेक्षा या विषयांच्या अध्ययनाचा काकणभर अधिकच उपयोग होऊ शकतो. मात्र केवळ बुद्धीची भूक भागवणे, विद्वत्तेची हौस भागवणे, पंडिती सन्मान प्राप्त करणे, लोकांना दिपवून टाकणे, बौद्धिक कसरती; यांनी आध्यात्मिक पोषण होऊ शकत नाही. यातून आत्मनिष्ठेऐवजी आत्मप्रौढी निर्माण होते.
धार्मिक ग्रंथांचे अध्ययन, परिशीलन; पुराणांचा व्यासंग; तत्वज्ञानाचा अभ्यास; धार्मिक कथा करणे; धार्मिक विषयांवर प्रवचने; हीदेखील आध्यात्मिक म्हणता येणार नाही. जसे अन्य विषयांचे ज्ञान असते तसेच धार्मिक आध्यात्मिक विषयांचे ज्ञान असणे, माहिती असणे, खंडन मंडन करणे, चर्चा आणि वादातील विजय; यांचा संबंध आध्यात्माशी जोडता येत नाही. आध्यात्म हा आत्मप्राप्तीचा प्रवास आहे. खूप साऱ्या माहितीचे तेथे प्रयोजन नाही. माहिती असणे वाईट नाही. पण माहिती आहे म्हणजे आत्मप्राप्ती झाली असे नसते. ऐहिक विषयांच्या ज्ञानाप्रमाणेच धार्मिक विषयांच्या ज्ञानानेही; बुद्धीची भूक भागवणे, विद्वत्तेची हौस भागवणे, पंडिती सन्मान प्राप्त करणे, लोकांना दिपवून टाकणे, बौद्धिक कसरती; हे केले जाऊ शकते. अन अन्य ज्ञानाप्रमाणेच त्याने आध्यात्मिक पोषण होऊ शकत नाही. यातूनही आत्मनिष्ठेऐवजी आत्मप्रौढी निर्माण होते. पोटापाण्यासाठी अर्थार्जन करण्यासाठीही लौकिक वा धार्मिक विषयांच्या अध्ययनाचा उपयोग होतो. तेव्हा तो उद्योग निश्चितच आध्यात्मिक नसतो.
खूप आणि छान कथा वा माहिती सांगणे; खूप स्तोत्रे आणि मंत्र पाठ असणे; म्हणजे आध्यात्मिक असणे नाही. सत काय आणि असत काय याचा स्वतःशी विवेक करत; आत्मजाणीव दृढ करीत जाणे; अन या आत्मजाणिवेत सदा स्थित राहण्याचा प्रयत्न करणे; परिणामी लौकिकातील लिप्तता कमी कमी होणे; याला आध्यात्मिक ज्ञानयोग म्हणता येईल. शास्त्र अथवा सिद्ध पुरुषांचे दाखले वा संदर्भ न देता आत्म प्रचितीचे बोलणे म्हणजे आध्यात्मिक प्रवासाची सिद्धी म्हणता येईल.
निरनिराळ्या संप्रदायाच्या परीक्षा, वेदोपनिषदांच्या परीक्षा, संत साहित्य वा धार्मिक साहित्याचा अभ्यासक्रम; हे सारे माहिती आणि तोंडओळख म्हणून योग्यच असते. मात्र हे नेहमी ध्यानात असले पाहिजे की, ईश्वराची माहिती म्हणजे ईश्वराची प्राप्ती नाही. आत्मतत्वाची चर्चा म्हणजे आत्मतत्वाचे ज्ञान नाही. माहिती, चर्चा, अध्ययन या गोष्टी उपयुक्त होऊ शकतात. मात्र साधना स्वतःची स्वतःला करावी लागते.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

रविवार, २३ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (११)

जसा भक्तिमार्ग आध्यात्मिक विकास रोखून ठेवू शकतो अन कधीकधी आध्यात्मिक अधोगतीला नेऊ शकतो; तसेच कर्म, योग, ज्ञान हे मार्ग देखील आध्यात्मिक विकास रोखू शकतात आणि आध्यात्मिक अधोगतीला नेऊ शकतात. राजस वृत्ती असल्यास कर्माला प्राधान्य आणि महत्व दिले जाते. खूप काम, स्वार्थाला तिलांजली आणि परहितासाठी झटणे; या तीन गोष्टी कर्मयोगाची प्रमुख अंगे म्हणता येतील. अशा कर्मयोगी व्यक्तींचे अध्यात्माचे अवधान सुटले की, ते workoholic होण्याची शक्यता असते; स्वार्थशून्यता अभिमान होऊन जाते; अन परहितासाठी झटताना साधनशुचिता इत्यादी सुटून जाऊ शकते. जणू काही आपण काही काम केले नाही तर हे जग थांबून जाईल की काय असा त्यांचा पवित्रा असतो. हे जग चालवण्याची जबाबदारी आपल्याला दिलेली नसून ती अचिंत्य शक्ती आपल्या माध्यमातून काम करते आहे, याचा विसर पडतो. अशा व्यक्तीत कर्तेपणाचा भाव वाढीस लागतो. काम करण्यासाठी त्यांची तगमग होते. शारीरिक स्थिती, परिस्थिती, साधने यांच्या मर्यादांनी ते अस्वस्थ होतात. इतकेच नाही तर आपण हाती घेतलेल्या कामाचा एकांगी विचार करून अन्य कामांविषयी मनात अन्यथा भाव बाळगतात. आपण काम केले नाही, कार्य केले नाही तर कसे होईल अशी चिंता त्यांना सतावते. ही चिंता अनाठायी आहे असे त्यांना सांगितल्यास रागही येतो. आपण एखादे कार्य करून दाखवले, त्या कार्याने अमक्या लोकांचे असे असे भले केले; याचाही आनंद आणि अभिमान निर्माण होतो. अशा कामांना, कार्यांना आध्यात्मिक म्हणता येणार नाही. आपण आपले काम करत राहावे, देवाला एक नमस्कार पुरेसा असतो; अशी अतिशय उथळ भाषा प्रसंगी वापरली जाते. वास्तविक देवाला एका नमस्काराचीही गरज नसते. परंतु एक नमस्कार पुरेसा असतो म्हणताना आपण आणि आपले काम याबद्दल जी श्रेष्ठत्वाची भावना मनात असते ती आध्यात्मिक नसते. Work is worship, कार्य हीच उपासना; असं तोंडाने म्हणताना; मनात मात्र work is almighty, कार्य हाच ईश्वर; असा भाव असतो. ईश्वराचे कार्य या आध्यात्मिक भावाऐवजी कार्य हाच ईश्वर असा भाव येतो. अन कार्य करणारे आपण असल्याने नकळत आपण ईश्वराहून मोठे होतो. हळूहळू हे मोठेपण अशा व्यक्तीला व्यापून टाकते. विशेषतः त्याच्या कार्यात त्याला यश मिळत असेल वा मिळाले असेल तेव्हा.

आपल्या कार्याबद्दलच्या अतिरेकी कल्पना, आपल्या कार्याबद्दलचे ममत्व हाही मोठा अडथळा असतो. कोणत्याही परिस्थितीत, कशाही पद्धतीने कार्य पूर्ण व्हायलाच हवे; असा आग्रह धरला जातो आणि मग योग्य अयोग्य विवेक न करता; युक्त्याप्रयुक्त्या आणि तडजोडी केल्या जातात. पैसा, सत्ता, कायदे, नीती, नियम, तत्त्व; हे सगळे आपल्या सोयीने ठरवले जाते. नकळत का होईना व्यक्तीचा नसला तरी संस्थेचा, संघटनेचा स्वार्थ वरचढ होतो. अनेक प्रकारच्या खटपटी, लटपटी केल्या जातात. कामाचे दृश्य स्वरूप, कामाचे यश, कामाचे मोजमाप; या गोष्टींना प्राधान्य मिळते. अन याच बाबी संदर्भ आणि मूल्यांकन यासाठी लक्षात घेतल्या जातात. व्यक्तिगत सांसारिक बाबींपासून मोठाल्या सामाजिक वा सेवाकार्यांपर्यंत सगळ्याच कामांना, कार्यांना हे लागू होऊ शकते. साधा सांसारिक कर्ममार्गी किंवा सामाजिक कर्ममार्गी दोघांतही ही लक्षणे आणि दोष दिसू शकतात, असू शकतात. असा कर्मयोग आध्यात्मिक असण्यापासून खूप दूर असतो.

आपले कार्य, कार्याची प्रेरणा, कार्याचे परिणाम, कार्याचे कौशल्य, कार्याची साधने, कार्याचे यश वा अपयश, अन कार्य करणारे आपण स्वतः; हे सारेच ईश्वरीय प्रसाद असून; ईश्वरार्पण भावाने केले पाहिजे; असा विचार ओतप्रोत भरून राहतो आणि तो वागण्याबोलण्यातून प्रत्ययाला येतो; तेव्हा तो कर्मयोग आध्यात्मिक म्हणता येईल. अन्यथा या जगातील अनेक प्रकारच्या चढाओढीचाच तो एक भाग होऊन जाईल.

कर्मयोग आचरताना आणखीन एक शक्यता असते. आपले स्थान घट्ट धरून ठेवण्याची वृत्ती. आपल्या स्थानाला गोचिडीसारखे चिकटून बसण्याचा हट्ट. घरात वा संस्थेत वा सामाजिक कार्यात लोक आपली जागा, आपले पद, आपले स्थान, आपला हुद्दा सोडायला तयार नसतात. समाजाचीही मानसिकता अशीच असते की; अगदी शेवटल्या श्वासापर्यंत माणसाने काम करत राहावे, पदावर राहावे. स्वतःहून किंवा परिस्थितीनुसार, वयानुसार कोणी बाजूला झाला तर वेगवेगळ्या चर्चा होतात. एखाद्या व्यक्तीचे असे बाजूला होणे समाजाला रुचत नाही. अनेकदा तर अशा गोचिड वृत्तीच्या व्यक्ती अडचणीच्या होऊन बसतात. श्री रामकृष्ण परमहंस त्यांच्या विशिष्ट शैलीत म्हणत असत - 'कोणती भाजी करायची यातून सुद्धा मन निघत नाही अन म्हणे देव पाहिजे.' कर्मयोग आचरताना महत्वाचे असलेले detachment जोवर येत नाही तोवर त्या कर्माला आणि त्याचे आचरण करणाऱ्याला आध्यात्मिक कसे म्हणायचे? व्यावहारिक जगात काही मर्यादा निश्चितच येतात. जसे भाषेच्या मर्यादा. माणसाला 'मी' 'तू' या भाषेतच बोलावे, वागावे लागते. कार्य करताना कोणी दुखावला जाऊ शकतो, सगळ्यांचे समाधान शक्य होत नाही, नीती अनीती यावर एका मर्यादेपलीकडे नियंत्रण शक्य नसते. या सगळ्याचा दोष कर्म करणाऱ्याला लागणे स्वाभाविक असते. त्यासाठीच मर्यादित कार्य आणि ईश्वरार्पण बुद्धीने कार्य हा उपाय सांगितला जातो. कमळाचे पान जसे पाण्यापासून, चिखलापासून अलिप्त राहते तसे; कार्य करीत असूनही त्यापासून अलिप्त राहणे; ही कर्मयोगी माणसाची कसोटी असते. ('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

शनिवार, २२ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (१०)

 

अशा प्रकारचा विकास होण्यासाठी, आध्यात्मिक गुणसंपदा अंगी येण्यासाठी स्वीकार महत्वाचा ठरतो. इच्छा, प्रयत्न, ऐहिक जीवन हे सगळं असतंच. परंतु हे सगळे आपल्याला हवे तसेच असेल याची शाश्वती नसते. त्यामुळे जे वाट्याला येते त्याचा स्वीकार करावा लागतो. स्वीकार म्हणजे मजबुरी नाही. खचलेल्या मनाने, नाईलाज म्हणून रखडत राहणे नाही. स्वीकार म्हणजे सोडून देणे, विसरून जाणे नाही. स्वीकार म्हणजे आपल्या भोगांबद्दल मौन बाळगणे नाही. स्वीकार म्हणजे जे काही वाट्याला आले त्याकडे साक्षी भावाने पाहणे. आपले त्रास, अभाव, आपल्यावरील अन्याय, आपल्याशी झालेली प्रतारणा, आपले कटू अनुभव, आपले सुख, आपली संपन्नता, आपले सकारात्मक वा नकारात्मक जीवन; या साऱ्याकडे साक्षी भावाने पाहणे. त्याचे तरंग मनावर न उठता, ओशाळलेपण किंवा न्यूनगंड किंवा श्रेठत्वगंड न येता जीवनाकडे पाहणे.
स्वीकारातून बळ मिळतं, मिळायला हवं. हे बळच जीवनाला सामोरे जाण्यासाठी आणि जीवनाचे सार्थक होण्यासाठी उपयोगी ठरते. आपल्या चांगल्या वा वाईट परिस्थितीला सामोरे जाणे आणि बाकीच्यांना समजून घेणे हे दोन्ही त्यात येतात. मग एकच देव किंवा साधू किंवा संत किंवा अवतार किंवा महापुरुष; एखाद्याची इच्छा पूर्ण करतात आणि एखाद्याची पूर्ण करत नाहीत; हे वास्तव स्वीकारता येते. एखाद्यासाठी आशीर्वाद फळतात आणि एखाद्यासाठी फळत नाहीत हे कळते. कोणाचा नवस पूर्ण होतो आणि कोणाचा होत नाही हे समजून घेता येते. अन हे वास्तव स्वीकारतानाही अभाव आणि नकार ज्यांच्या वाट्याला आले, त्यांच्याविषयी कमीपणाची भावना राहत नाही. अशा लोकांची श्रद्धा कमी पडली वा त्यांची भक्ती कमअस्सल आहे इत्यादी भावना मनात येत नाहीत. आपण श्रेष्ठ भक्त आहोत असा गंड जोपासला जात नाही.
भक्ताचा विकास या दिशेने नसेल तर व्यवहारात सुद्धा त्याचे प्रतिबिंब दिसते. अमुकच फुलांचा दुराग्रह, अमुकच प्रसादाचा दुराग्रह, अमुक पद्धतीनेच पूजा करण्याचा हट्ट ही सारी भक्तीच्या अपरिपक्वतेची लक्षणे. आपल्या पूजेचे, पूजा साहित्याचे प्रदर्शन; आपण सोन्याचांदीची भांडी पूजेला वापरतो याचा गर्व; मंदिरात केलेल्या दानाची जाहिरात; तिकीट खरेदी करून मंदिरात दर्शन घेतल्याचा vip feel; हे सारे भक्ती या शब्दाला न शोभणारे. आपण अमुक इतका जप केला, आपण इतकी पारायणे केली, आपण इतके धर्मग्रंथ वाचले, आपण अशी व्रते केली; याबद्दल विशेष काही वाटणे हे भक्तीशी विसंगत म्हणावे लागेल. भक्तीने नम्रता आणि ईश्वरी भाव निर्माण व्हायला हवा.
ईश्वर हा काही आपण नेमलेला मुनीम नाही की त्याने आपले आदेश मानावे, आपली इच्छा पूर्ण करावी, आपल्या अर्ध्या शब्दात राहावं. भक्त आणि अभक्त दोघांनीही हे जाणलं पाहिजे. ईश्वराने आपल्याला हवं ते नाही केलं किंवा आहे ते हिरावून घेतलं तर भक्त नाराज होतात. अन अभक्त त्यावरून टीका करतात. ईश्वर जर सगळं करतो तर इतकं दु:ख का? इतका अन्याय का? इतकी विषमता का? इतकी अस्वस्थता का? इतकी हिंसा का? इतकी वखवख का? वरवर हे प्रश्न बरोबर वाटतात. नव्हे एका पातळीवर ते बरोबरच असतात. शिवाय अन्याय, अभाव, नकार हे आपल्या बाबतीत असतील त्यावेळी तर हे सारे प्रश्न योग्य आणि स्वाभाविक ठरतात. पण आध्यात्मिक जीवनात पुढे पुढे जाताना हे लक्षात येतं की, ईश्वर हा काही आपला बांधील नाही. या समग्र अस्तित्वाच्या संदर्भात आपण केवढे? या अस्तित्वातील आपलं स्थान काय? जे काही आपल्या वाट्याला येतं ते स्वीकारण्यावाचून आपल्याला गत्यंतर नसतं. प्रयत्न इत्यादी ठीक असतात. प्रत्येकाने आपल्या शक्ती बुद्धिप्रमाणे, आपल्या प्रेरणेला आणि स्फूर्तीला अनुसरून प्रयत्न करावेतच. मात्र आपण प्रयत्न केले म्हणजे त्याचं फळ मिळणं हा आपला हक्क आहे असं समजू नये. याचा आध्यात्मिक वगैरे काय फायदा तोटा असेल तो असो, पण व्यवहारात मनाचं संतुलन राखायला याची नक्कीच मदत होते.
ईश्वर प्रतिमेच्या भजन पूजनाचा विकास आंतरिक ईश्वरी भावात होत नाही तोवर भक्ती आध्यात्मिक झाली असे म्हणता येणार नाही. असा आंतरिक विकास होतो आहे की नाही, याचा आढावा प्रत्येकाने आपापला घ्यावा लागतो. त्या संबंधात दुसऱ्या कोणी न्यायाधीश होऊन चालत नाही. आपणच आपले न्यायाधीश व्हावे लागते. स्वतःची स्वतःच उलटतपासणी करावी लागते. त्यासाठी धैर्य गोळा करावे लागते. एकटे असताना आपण कसे असतो ही त्याची मोठी कसोटी असते. स्वतः अभ्यासक्रम निश्चित करायचा, स्वतः परीक्षा द्यायची, स्वतः तपासायचं आणि स्वतःच निकाल द्यायचा. हे खरं असलं तरीही एखादी व्यक्ती आध्यात्मिक आहे का? किती प्रगती झाली आहे, याचा कस मात्र बाहेरच्या जगातच लागतो. त्यासाठी बाहेरच्या जगाच्या प्रमाणपत्राची गरज नसते. बाहेरचं जग अकारण, सकारण असं प्रमाणपत्र देते. पण ते निरर्थक असते. बाहेरच्या जगाने दिलेलं गौरवपत्रही निरर्थक आणि शिव्यांची लाखोळीही निरर्थक. बाह्य जगाचे पडसाद पुन्हा आपणच आपले तपासायचे. कस आपला आपणच घासून पाहायचा. फसवलं तरीही आपलीच फसवणूक आणि घडवलं तरी आपलीच घडवणूक. स्वतः स्वतःशी प्रामाणिक असणं जमायला हवं.
मी भक्तीचा विरोधक नाही. भक्तीला माझा मुळीच आक्षेप नाही. आध्यात्मिक विकासातील भक्तीचे स्थान महत्वाचे असते हेही खरे. पुष्कळांना त्याची गरज असते. त्यात आध्यात्मिकता नसते त्यामुळे ती त्याज्य ठरवायला हवी, सोडून द्यायला हवी. सगळ्यांनी तर्ककठोर होऊन आध्यात्मिक व्हावे, इत्यादी मी म्हणत नाही. वास्तविक माणूस कितीही तर्ककठोर झाला तरीही भक्ती त्याच्या पिंडाचा भाग असते हेही मला मान्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी एका जागी याचा उल्लेख करताना त्यांनी अनुभवलेला एक प्रसंग सांगितला आहे. अमेरिकेत त्यांना भेटायला एकदा दोघे जण आले. आपण तुमची भाषणे ऐकून प्रभावित झाल्याचे त्या अभ्यागतांनी त्यांना सांगितले. थोडीशी चर्चा झाली आणि नंतर विज्ञानाचे उच्च शिक्षण घेतलेल्या त्या दोघांनी विवेकानंदांना विचारले, 'तुमची पद्धत, आचार, कर्मकांड, पूजा इत्यादी काय असतात, कसे असतात?' विवेकानंद हा प्रसंग सांगून म्हणतात, 'त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवले की, शुद्ध वेदांत, अद्वैत तत्वज्ञान हा जगाचा धर्म होण्यात बऱ्याच अडचणी आहेत. किमान त्याला बराच काळ लागेल.'
ही मानवी जीवनाची, मानवी मनाची, मानवी वृत्तीची स्वाभाविकता आहे. त्याला मोठाली तत्वे सुद्धा कशाच्या तरी आधारानेच समजून घेता येतात. म्हणूनच केवळ भारतातच नाही तर जगभरात भक्तीचा प्रवाह पाहायला मिळतो. इस्लाम किंवा ख्रिश्चन पंथातही भक्तीच आढळते. ईश्वरभक्ती, ईश्वराकडे काही तरी मागणे, ईश्वराचे भय, प्रतिके, शास्त्र, आराधनेची पद्धत; हे सगळे त्यातही आहेच. या दोन पंथांच्या आधी जगभरात जे जे पंथ होते, उपासनेच्या पद्धती होत्या त्यांच्यातही हे सगळे आढळते. इतकेच नाही तर ईश्वर नाकारणाऱ्या भारतातील बौद्ध आणि जैन पंथातही पूजा, उपासना, उपासनेची विशिष्ट पद्धत, प्रतिके, शास्त्र; हे आहेतच. या साऱ्याला हरकत असण्याचे किंवा ते टाकून देण्याचे किंवा त्यावर टीकेची झोड उठवण्याचे काहीही कारण नाही. मात्र; ही प्रतिके, या उपासना, ही शास्त्रे, या पूजापद्धती; या गोष्टी अंतिम आहेत असं समजलं आणि तिथेच थांबलं की पंचाईत होते. ही सगळी ईश्वरी भावाच्या परिपूर्ण धारणेची साधने आणि उपकरणे तेवढी आहेत. साधनांनाच साध्य समजणे प्राथमिक अवस्थेत ठीक असते. मनाचा भटकाव, विक्षेप, गोंधळ हे टाळण्यासाठी साधनांचा आग्रह ठीक असतो. परंतु साधने ती साधनेच. त्यांना साध्य समजून घट्ट धरून ठेवण्याने प्रगतीऐवजी अधोगती होऊ शकते. हा धोका अनेक महान व्यक्तींनी सांगितला आहे. त्याचा विवेक सुटायला नको. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत - 'पायात काटा गेला असेल तर दुसऱ्या काट्याने तो काढायचा असतो आणि मग दोन्ही टाकून द्यायचे असतात. ठेवून घ्यायचे नसतात.' उपासना, सद्वृत्ती यांना आरशाची उपमाही दिली जाते. आपलं प्रतिबिंब, आत्मबिंब स्पष्ट दिसावं यासाठी आरसा स्वच्छ हवा. उपासना आदींची तीच भूमिका असते. पण दोन बाबी स्पष्ट असायला हव्यात - एक म्हणजे प्रतिबिंब म्हणजे मूळ वस्तू नाही. आत्मबिंब म्हणजे आत्मा नाही. ती केवळ प्रतिकृती. तो केवळ भास. दुसरे म्हणजे भासात, प्रतिकृतीत किंचित काळ रमायचं असतं. कायमचं नाही.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

शुक्रवार, २१ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (९)

 

एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो की, आध्यात्मिक म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे काय? शास्त्रीय चर्चा खूप होऊ शकेल. त्या चर्चेने सगळ्यांचे समाधान होईलच असेही नाही. शिवाय शास्त्रीय चर्चा करण्यासाठी आवश्यक अध्ययन देखील हवे. तो पंडितांचा आणि विद्वानांचा विषय. त्यामुळे मी काही शास्त्रीय चर्चा करणार नाही. अध्यात्म म्हणजे, आध्यात्मिकता म्हणजे काय; याबद्दल मला काय वाटते ते मी मांडणार. मुळातच अध्यात्म हा शास्त्रीय चर्चेचा विषय नाही. तो अनुभूतीचा विषय आहे. त्यात विचारांची, अनुभवांची, दृष्टिकोनाची देवाणघेवाण होऊ शकते. पण काटेकोर चौकटीत त्याचे भौतिक, रासायनिक गुणधर्म ठरवता येत नाहीत. कारण हा विषय मोठ्या प्रमाणावर वस्तुनिष्ठ आहे.

अध्यात्म म्हणजे आत डोकावणे. आध्यात्मिकता म्हणजे आत डोकावण्याची वृत्ती. आत्म्याचं अध्ययन म्हणजे अध्यात्म. आत्मा हा शब्ददेखील आत्म शब्दापासून आला असावा. आत्म म्हणजे माझं स्वतःचं. आत्मीय म्हणजे माझे लोक. आत्मनिष्ठ म्हणजे स्वतःवर निष्ठा असलेला. म्हणूनच आत्म्याचं अध्ययन याचा अर्थ आपलं स्वतःचं अध्ययन. स्वतःचं अध्ययन दोन प्रकारे होऊ शकेल. खाणं, पिणं, चालणं, फिरणं, बोलणं, ऐकणं, सांगणं, समजणं, समजावणं, पाहणं, दाखवणं, झोपणं, उठणं; अशा सगळ्या बाह्य क्रियांचं अध्ययन. आपलं शरीर, शरीराचे अवयव, इंद्रिये; यांच्या कृतीचं अध्ययन. कौटुंबिक आणि सामाजिक संबंध, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जगण्याचे नाना विषय; हा सगळा आपल्या बाह्य अध्ययनाचा विषय. हे बाह्य जीवन जगताना; या जगाचा - शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध - या माध्यमातून आस्वाद घेताना बहुतेकांना कधीतरी काही ना काही प्रश्न पडतात. अडचणी, अपयश, अभाव, अक्षमता यांचा सामना करावा लागला की, 'असं का?' असा प्रश्न माणूस विचारतो. कधी दुसऱ्या कोणाला विचारतो, कधी स्वतःला विचारतो.
या प्रश्नाची उत्तरे शोधतो. त्यातून निरनिराळी कौशल्ये, तंत्र इत्यादी विकसित होतात. परंतु ही कौशल्ये, तंत्र हेदेखील यशाची हमी देऊ शकत नाहीत. कधीतरी, कोणाचा तरी मार्ग बंद होतो. ज्याचा मार्ग बंद होतो तो पुन्हा प्रश्नांच्या जाळ्यात अडकतो. हे वारंवार उपस्थित होणारे प्रश्न माणसाला विचार करायला शिकवतात. अशाच रीतीने आयुष्य पुढे पुढे जात असते. या प्रवासातच हे हळूहळू कळत जाते की, बाह्य जगण्यासोबत आपली मन नावाची काही गोष्ट आहे. या मनाचा प्रभाव आपल्या जगण्यावर होत असतो. शिवाय या मनाचं म्हणून काही स्वतःचं जगणं असतं. हे मन आपल्याला हुलकावणी देतं, फसवतं. अन कधीतरी हेही लक्षात येतं की; इंद्रियग्राह्य बाह्य जीवन आणि मन या दोन्ही गोष्टींनी समाधान लाभत नाही. शांतता लाभत नाही. या दोन्ही गोष्टी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची, आपल्याला पडणाऱ्या कोड्यांची उत्तरे देऊ शकत नाही. तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. असं अंतर्मुख होणं ही अध्यात्माची सुरुवात म्हणता येईल.
आपलं जगणं, आपल्या इच्छा, आपले छंद, आपली धडपड, आपल्या भावना, आपले विचार; या सगळ्याची कारणे, या सगळ्याचे परिणाम, या सगळ्याचे घडणे वा बिघडणे; यासाठी बाहेरच्या वस्तू, व्यक्ती, घटना यावर अवलंबून राहणे कमी होत जाते. या सगळ्या जीवन व्यापाराचा अर्थ माणूस शोधू लागतो. तोही स्वतःच्या आत. स्वतःच प्रश्न निर्माण करतो, स्वतःच उत्तरे देतो, दिलेली उत्तरे स्वतःच टाकून देतो, या प्रश्नोत्तरांचे अर्थ लावतो. असे करत करत आपलं आतील अवकाश शोधू लागतो. जगण्याचा अर्थ शोधू लागतो. प्रत्येकच यश किंवा अपयश काही वेळच टिकतं. पुन्हा एक अनामिक असमाधान डोकं वर काढतं. जीवाची पुन्हा चुळबूळ सुरू होते. मनाला समाधान वाटेपर्यंत धडपड केली जाते. समाधान मिळतं. माणूस शांत होतो आणि पुन्हा आपोआप काही तरी अभाव, कमी, रिक्तता जाणवते. कदाचित सांगता येत नाही, पण अस्वस्थता वाढते. अन पुन्हा एकदा तेच चक्र. मग कधीतरी हे चक्र भेदून जाण्याची इच्छा होते. अंतर्मुखतेची एक पायरी आणखीन चढली जाते. असे करता करताच माणूस पूर्ण अंतर्मुख होत जातो. बाह्य गोष्टी यंत्रवत होतात. हा अध्यात्माचा प्रवास असतो.
प्रत्येक गोष्टीतील अपूर्णत्व लक्षात येऊ लागतं. आरोग्य, पैसा, सौंदर्य, सत्ता, सोबत, औषधे, संसार, वस्तू, साधने, भाषा, भोजन, भावना, विचार, विज्ञान, व्यवस्था... एकेक गोष्ट पुढे येते अन काही काळ लोटला, काही अनुभव आले, काही निरीक्षणे गाठीशी जमा झाली की; मन आपल्याला सांगू लागतं - हे सगळं ठीक आहे पण पुरेसं नाही. त्यानंतर मनाचा पूर्णतेचा शोध सुरू होतो. वास्तविक शोध सुरू होतो असं म्हणणंही चुकीचंच. कारण हा शोध काही ठरवून होत नाही. आपल्या अंतरातली स्वभावगत अस्वस्थता आपल्याला पूर्णत्वाचा शोध घेण्यासाठी धडपड करायला लावते. प्रत्येक व्यक्ती असा शोध करते. फक्त प्रत्येकाची वेळ, गती वेगवेगळी असते. ज्याला त्याला आतून जे काही वाटतं त्यानुसार हा प्रवास होतो. त्याचे घाऊक आराखडे नसतात. अमक्याला पूर्णतेची ओढ लागली म्हणजे तमक्याला लागलीच पाहिजे असे म्हणता येत नाही. अमुक कोणी पूर्णत्वासाठी प्रयत्नशील आहे म्हणजे मीही त्याच दिशेने प्रयत्नशील झालं पाहिजे असंही नसतं. अनेकदा तर पूर्णत्वाचे प्रवासी दिसत असून, भेटत असूनही; त्यांची मस्करी, टवाळी करण्याची वृत्तीही असते. मात्र याचा अर्थ टवाळी करणारा अध्यात्माची वाट चालणारच नाही असे नाही. व्यक्तीच्या आत जे काही होत असतं, ज्या उलथापालथी होतात त्या त्याच्या आध्यात्मिकतेला पुढे घेऊन जातात, आकार देतात. ही आतली उलथापालथ अन्य कोणाला दिसेल वा जाणवेल असे नाही. कदाचित काही प्रसंग, काही बोलणं, काही व्यवहार यातून ही उलथापालथ कधी दृश्य होऊ शकते. तरीही तिचा थांग लागणे कठीण. बाकीच्यांचे जाऊ द्या, स्वतःचे स्वतःला कळणे देखील सहज नसते. आपण आपल्याला तरी कळतो का हा प्रश्नही कधीतरी डोकावून जातोच.
एकदा एकाने विचारले - 'तू सारखा अध्यात्म अध्यात्म करतो काय होणार आहे? हे जग सगळं भौतिक सुविधांच्या, सुखांच्या मागे धावतं आहे. कोणीही तुझ्या अध्यात्माकडे लक्ष देणार नाही. अध्यात्म म्हणून म्हणतात तेथेही मोठ्या प्रमाणावर धोके असतात. या सगळ्या वातावरणामध्ये, या सगळ्या प्रवाहामध्ये, या सगळ्या आजच्या युगामध्ये; अध्यात्माचं भवितव्य काय? अध्यात्माला काय भविष्य आहे?' मलाही क्षणभर प्रश्न पडला आणि नंतर हसायला आलं. कारण या दोन गोष्टी नाहीत. अध्यात्म आणि ऐहिकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू फारतर म्हणता येतील. अस्तित्वाची ही दोन रुपे आहेत. एकमेकांना लगडलेली चिकटलेली. नाण्याच्या दोन बाजू जशा विलग करता येत नाहीत, वेगळ्या करता येत नाहीत; तसं अध्यात्म आणि ऐहिकता हे वेगळे करता येत नाहीत. आज सगळा प्रवाह ऐहिकतेच्या दिशेने चालला आहे. खरं आहे. आज कोणालाही स्वतःकडे, आपल्या आंतरिक अवकाशाकडे, स्वतःच्या आत्म्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही. सांगितलं तरीही वाटत नाही. क्षणभर लक्ष दिलं तरीही पुन्हा मन बाहेर जातं. बाहेरच्या सगळ्या व्यवधानांकडे आपण धावत असतो. त्यात गुंततो. त्यात सहभागी होण्याची आपल्याला आवड असते, रुची असते. बाहेरच्या गोष्टींमध्ये आपण रमतो आहे. पण निश्चितपणे या सगळ्याचा कधीतरी saturation point येईल आणि त्यावेळी वाटेल आत वळलं पाहिजे. त्या बिंदूला मानवता कड फेरेल. त्यावेळेला तिचे मुख, तिचं मन, तिचा चेहरा, तिची दृष्टी; हे आपोआप आत्म्याकडे जाईल, आतमध्ये जाईल. मानवजात अंतर्मुख होईल आणि आध्यात्मिकतेकडे वळेल. जगातील सगळी मंदिरे, जगातील सगळी चर्चेस, जगातील सगळ्या मशिदी, जगातील वेगवेगळे पंथ संप्रदाय यांची प्रार्थनास्थळे, त्यांची प्रतीके, त्यांची नावं, त्यांचे प्रचारसाहित्य; एवढेच नव्हे तर त्यांचं तत्वज्ञानाचं साहित्य हेसुद्धा संपूर्ण संपून गेलं, संपवून टाकलं; तरी सुद्धा मानवजात स्वभावतः, नैसर्गिकरित्या अध्यात्माकडे, आपल्या आतल्या आवाजाकडे, आपल्या आत्म्याकडे, आपल्या आंतरिक अवकाशाकडे वळेल आणि आपल्या आंतरिक अवकाशाचा विकास करून घेईल. कारण मुळात आतलं आणि बाहेरचं हे वेगवेगळं नाही. त्या केवळ एकाच अस्तित्वाच्या दोन बाजू आहेत.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'अध्यात्म म्हणजे काय' या प्रकरणातील काही अंश.)

गुरुवार, २० मे, २०२१

मी आणि अध्यात्म (८)

 

वृक्ष जन्माला येतो तेव्हा बीज नष्ट होतं. त्याकडे दोन प्रकारे पाहता येतं. बीजाचा विकास म्हणून आणि बीजाचा विनाश म्हणून. विकास म्हणून पाहिलं तर सार्थकता आणि परिपूर्णता अनुभवास येते. विनाश म्हणून पाहिलं तर निरर्थकता आणि शून्यता अनुभवास येते. `बीज' म्हणून बीजाचा विनाश होतो खरा पण जीवमान चैतन्य म्हणून ते झाडाच्या रुपात कायम असतं. झाड लयाला जाऊन बीज उरतं तेव्हाही असंच घडतं.

गर्भाचं गर्भत्व नष्ट होतं आणि मूल जन्मास येतं. मुलाचं मूलपण नष्ट होऊन युवक जन्म घेतो. युवकाचं युवापण लयास जाऊन प्रौढत्व जन्म घेतं. `काल' नष्ट होऊन आज जन्माला येतो. दृश्य अशा आकाराप्रमाणेच मनही नवीन आकार धारण करतं. कालचं मन आज असणार नाही, आजचं उद्या नसेल. दृश्य वा अदृश्य, आकार वा निराकार, सतत परिवर्तन म्हणजेच जीवन. या परिवर्तनाकडे विनाश म्हणून पाहिलं तर विफलता हाती येते. अन विकास म्हणून पाहिलं तर पूर्णता. फक्त एकच आहे- विकास म्हणून पाहण्यासाठी; लयास न जाणाऱ्या; बीजात आणि वृक्षातही कायम असलेल्या; गर्भावस्थेपासून प्रौढत्वापर्यंत न बदललेल्या; आणि त्यानंतरही कायम राहणाऱ्या; जीवमान चैतन्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.
आध्यात्मिकता हे असं पुन्हा नव्याने जन्माला येणं असतं. न दिसणारा हा पुनर्जन्म इतरेजनांना बेताबेतानेच समजून घ्यावा लागतो. ते स्वाभाविकही असते. जोवर आपल्या अमरत्वाचा अनुभव येत नाही, आपल्या अमरत्वाची प्राणोप्राण खात्री होत नाही, जोवर त्या अमृताचा थेंब मुखी पडत नाही; तोवर आपलं असणं या दृश्यमान, गम्य जगाशी जोडलेलं असणं अगदीच नैसर्गिक आहे. यालाच तर माया म्हणतात. मायेचं हे कवच भेदल्याशिवाय; या दृश्यमान, गम्य जगाशिवाय सुद्धा आपण असतो; हे कसं कळणार?
या जगाची ओढ संपलेली व्यक्ती दोन जगात वावरत असते. दोन प्रतलांवर जगत असते. कधी या नित्य बदलणाऱ्या जगात असते तर, कधी न बदलणाऱ्या जगात. कधीकधी या दोहोंच्या मधल्या मार्गावर. गंमत अशी की, या विश्वजाणिवेत असतानाही त्या अमृताची जाणीव जागी असते. त्यामुळे त्याचे व्यवहार, त्या व्यवहारांचे अर्थ इत्यादी वेगळेही असू शकतात. त्यांची गती आणि पद्धती बदलते. यालाच लहरीपणा असं नाव आहे. माझ्या वागण्यात असा लहरीपणा आहे का? असूही शकेल. त्याचं उत्तर बाकीच्यांनी द्यायचं आहे. मी ते देऊ शकत नाही. कारण माझ्यासाठी ते योग्यच असणार. याचा अर्थ मी वेडा आहे, बेजबाबदार आहे असा नाही. कधीकधी एखादा मित्र किंवा अन्य कोणी सहज विचारतात, 'अंघोळ वगैरे करतो की नाही? जेवतो की नाही?' तर हे सगळं करतो. अंघोळ करतो, दात घासतो, स्वयंपाक करतो, जेवतो, झोपतो, कपडे घालतो, सुसंगत बोलतो... सगळं करतो. पण हे सगळं यांत्रिक पद्धतीने सुरू असतं. एकीकडे दैनंदिन व्यवहार सुरू असतात अन दुसरीकडे मन, प्राण, चित्त, बुद्धी, जाणीव; अन्यत्र कुठेतरी असू शकते. किंवा एक प्रकारची शून्यता असू शकते. वास्तविक शून्यता हा शब्द चुकीचा आहे. त्यात नकारात्मक भाव आहे. त्यात रिक्तता आहे. अशी रिक्तता नसते. नकारात्मकता नसते. मात्र, सांगता येण्यासारखं असं नसलेलं एक भरलेपण, भारलेपण आणि अतिशय शांत अवस्था असते. बारीकसा सुद्धा तरंग नसतो. त्यात जेव्हा बाहेरून काही तरी पडते, उडी घेते, टाकले जाते, फेकले जाते; तेव्हा तरंग उठतात. पण बाह्य गोष्टींपासून विलग झालेलो असल्याने या तरंगांना प्रतिसाद देणे कठीण जाते. म्हणूनच एखाद्या गोष्टीत सामील होण्यासाठी मनाची बरीच पूर्वतयारी करावी लागते. अन मुळात बाह्य गोष्टींची ओढ उरली नसल्याने शक्यतो त्या टाळण्याचा, त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. एकांत आणि शांतता ही माणुसघाणेपणातून आलेली नसून, ती गरज आहे. माणसे, भवतालचे जग, यातील व्यवहार, यातील भावभावना यांचा द्वेष नाही, तिरस्कार नाही, पण माझ्यासाठी त्याची फारशी उपयुक्तता नाही. माझ्यासाठी दैवाने सत्याचा मार्ग आखलेला आहे. सुखाचा नाही. दोन रस्ते वेगळे आहेत एवढाच याचा अर्थ.
तसेही विवक्षित क्षणी जन्म आणि विवक्षित क्षणी मृत्यू; यांच्यामधील जे जीवन आहे, जगणं आहे; तोच आणि तेवढाच आहे का आपल्या अस्तित्वाचा अर्थ? आपल्याला मान्य असो की नसो, आपल्याला आवडो की नावडो, आपल्याला कळो की न कळो; तेवढाच आपल्या अस्तित्वाचा अर्थ नाही. प्रत्येक व्यक्ती, एवढेच नाही तर प्रत्येक कण, प्रत्येक अणू परमाणू; विकासाच्या विविध अवस्थातून पूर्णतेच्या, अमृतत्त्वाच्या त्या अवस्थेला पोहोचणारच आहे. हा प्रवास कोणीही ठरवलेला नाही अन कोणीही हा प्रवास थांबवू शकत नाही. हे कोणाचं ध्येय नाही, हा कोणाचा हेतू नाही, हे कोणाचे उद्दिष्ट नाही. तीच या अस्तित्वाची स्वाभाविक स्थिती आहे. सगळ्या धडपडी, सगळ्या अस्वस्थता, प्रत्येक अवस्थेचा येणारा उबग आणि ती टाकून नवीन काही तरी प्राप्त करण्याची धडपड; हे सगळे नकळत त्याच अमृतावस्थेकडे घेऊन जात असते. हे विश्व आणि त्यातील प्रवास, त्यातील सोबत, त्यातील धडपडी, त्यातील उसळणे आणि कोसळणे; हे सगळेच त्या एकाच दिशेने जाणारे असते. फक्त एवढेच की, प्रत्येक जीवाचा हा प्रवास वेगवेगळा, स्वतंत्र असतो. एकत्र, एकाच वेळी, एकाच गतीने, एकाच पद्धतीने, घाऊकपणे होणारा नसतो. या अस्तित्वसागरावर कोण कोणाला कधी कसा कुठे भेटेल आणि कधी कुठे कसा बाजूला होईल हे कोणीही सांगू शकत नाही. हे जसं माणसांच्या बाबतीत खरं आहे तसंच जीवनाच्या सगळ्याच गोष्टींबाबत खरं आहे. म्हणूनच हे जग आणि जगणं हीच अंतिम गोष्ट आहे हा समज टाकता आला की बऱ्याच गोष्टी सोप्या आणि सहज होत जातात.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

मी आणि अध्यात्म (७)

 

माझ्या आयुष्यालाही हे लागू होईलच ना? मग एकेका गोष्टीचा विचार सुरू झाला. अगदी तटस्थपणे. स्वतःला अजिबात सवलत न देता किंवा स्वतःचे अजिबात लाड न करता. अगदी कर्कश विश्लेषण सुरू झालं. बेमुर्वतपणे चिरफाड सुरू केली. प्रत्येक वेळी उत्तर मात्र एकच येत गेलं - 'आपल्या हाती काहीही नसतं.' प्रयत्न, बुद्धी, संबंध हे सुद्धा तोकडेच असतात. सगळ्यांच्या बाबतीत हे खरं नसेलही पण काहींच्या बाबतीत खरंही असतं, हे नाकारण्यात हशील नाही. देवाच्या देवळात रांग लावून त्याच्याकडे काही मागणाऱ्यांमधील काही जणांना त्यांचे मागणे मिळत असेल अन काही लोकांना निराश व्हावे लागत असेल. कशी लावणार संगती? डॉक्टरकडे काही लोकांना गुण येतो, काही लोकांना नाही येत गुण, तर काहींना जीवही गमवावा लागतो. कशी लावणार संगती? शिक्षक सगळ्यांना सारखंच शिकवतात. कोणाला अधिक गुण, कोणी अनुत्तीर्ण. कशी लावायची संगती? पूजा अर्चा करणारे काही लोक सज्जन, काही लोक दुर्जन. कशी लावायची संगती?

या सगळ्या मंथनातून एक गोष्ट स्पष्ट होऊ लागली की, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे. त्याच्या ठायी उत्पन्न होणारे विचार आणि विकार वेगवेगळे आहेत. त्याच्या वाट्याला येणारे सुख दु:ख केवळ त्याच्या हाती नाही. अन आपल्या आयुष्याला कोणतेही समर्पक विश्लेषण नाही. कोणताही कार्यकारण भाव नाही. तर्काचे काही धागे हाती लागले तरीही लवकरच रस्ते बंद होतात. आयुष्याचा वा घटनांचा कार्यकारण भाव शोधणे हाच एक खुळेपणा आहे. हे जसजसे लक्षात येऊ लागले, तसतशी काही जाणून वगैरे घेण्याची गरज संपू लागली. काही जाणून घेण्याची इच्छा कमी होऊ लागली. जसे माझे आयुष्य माझ्या हाती नाही तसे, माझे आयुष्य आणखी कोणाच्याही हाती नाही. हे जाणवल्यावर कोणाबद्दल आकस बाळगणे हळूहळू संपले. कोणाला दोष देणे संपले. कोणालाही दोष द्यायचा नाही अन स्वतःलाही नाही.
Godfather इत्यादी कोणाला लाभतात, कोणाला नाही लाभत. मला नाही लाभले कोणी Godfather. पण त्याचे काय? कोणाला लाभतो विशिष्ट स्वभाव. गोड बोलण्याचा, लाळघोटेपणाचा, आपल्या लाभावर डोळा ठेवून संबंध आणि व्यवहार हाताळण्याचा. कोणाला नाही लाभत. या साऱ्याचे शास्त्रही बनवले जाते आणि त्याचे शिक्षण दिले, घेतले जाते. पण त्याचे काय? कोणी धावतात त्यापाठी. बाकीच्यांना हे मिळालं, ते मिळालं; आपल्यालाही मिळेल या आशेने. एखाद्याला तेही वाटत नाही. धावणारे तरी सगळे शर्यत जिंकतात का? मग त्याचेही तत्वज्ञान होते - 'धावणे महत्वाचे, जिंकणे हारणे नाही.' अनेकदा ही मनातली निराशा झाकणे असते तर अनेकदा निरर्थकता. मुळात यश, कीर्ती, पैसा, नाव, लौकिक, साधने, घरे, जमिनी, अधिकार; हे सगळं मिळवण्याची धून म्हणजे जगणं हे तरी कोणी ठरवायचं? कोणी ठरवलं? कोणीही ठरवलं तरी ते सगळ्यांनी मान्य का करावं? या सगळ्याची परिणती तर एकच आहे. माझ्याकडे काही असलं काय वा नसलं काय परिणती सारखीच.
हे सगळंच मग खूप गमतीचं वाटू लागलं. आपल्याला काही मिळालं वा मिळालं नाही याकडे तटस्थपणे पाहता यायला लागलं. जे काही मिळालं असेल, जे काही गाठीला असेल त्याचं कौतुक वा त्याची फुशारकी अनावश्यक वाटू लागली. जे नसेल वा नाही त्याची मातब्बरीही संपली. त्याने दु:खी वगैरे होणं थांबलं. माणसाने निर्माण केलेले मापदंड तोकडे आहेत हे मनोमन पटलं, समजलं आणि ते मापदंड भिरकावून देण्याचं बळही लाभलं. मी तुम्हा माणसांचे जगण्याचे मापदंड मानत नाही हे सांगण्याची गरजही संपली. कोण काय म्हणतं, कोण काय म्हणेल; याचं दडपण राहिलं नाही. का राहील दडपण? मला जर कुठली अपेक्षाच नाही तर दडपण कसले? मला जर काही मिळवायचंच नाही तर ताण कसला? ही निरपेक्षता, ही निस्पृहता जीवनसत्याच्या दर्शनातून आली.
आपल्या चुकांची बोच अन आपल्या कर्तृत्वाचा अभिमान दोन्ही लोपले. शुभ अशुभ वगैरे काहीच उरले नाही. वाईट वगैरे ज्याला म्हटले जाते ते तसे वाटेनासे झाले. ते वाईट, त्याज्य वगैरे सुद्धा मूळ स्वरूपात 'मी'च आहे, माझ्यातूनच आलेले आहे. चांगले, घेण्यासारखे सुद्धा मूळ स्वरूपात 'मी'च आहे, माझ्यातूनच आलेले आहे. हे सत्य आता तत्वज्ञानाच्या ग्रंथातला सिद्धांत राहिला नाही. ती प्राणांची अनुभूत खात्री झाली. वेगळं काही वाटेनासं झालं. त्यामुळे अभिनिवेश संपत गेला. व्यक्तींचा, विचारांचा, संघटनांचा, चांगल्या वा वाईटाचा; अभिनिवेश सरत गेला. तिरस्कार, घृणा, दुजाभाव उणावत गेले. असामान्य अथवा सामान्य यात मूलतः भेद नाही हे समजले. प्रतिभा, प्रज्ञा, कौशल्य या फारच मोठ्या गोष्टी वाटणे उरले नाही. सगळ्याच गोष्टींच्या मर्यादा असतात हे तर दिसू लागलेच पण त्या मर्यादा स्वीकारताना होणारी मानवी मनाची अस्वस्थता, कुचंबणा विरत गेली.
स्वाभाविकच माणसांच्या अन मानवी संबंधांच्या मर्यादाही ध्यानात येऊ लागल्या. पैसा, ज्ञान, कर्तृत्व हे जसे सोबत घेऊन जाता येत नाही; तसेच माणसेही सोबत घेऊन जाता येत नाहीत. एवढेच नाही तर पैसा, ज्ञान, कर्तृत्व आणि माणसेही जीवनाला पुरत नाहीत. हे वास्तव स्वीकारण्याचा निर्भयपणा आला. भावना स्वीकारूनही त्यात वाहून जाणे नकोसे वाटू लागले. कोरडेपणा आणि ओल हे दोन्ही नसलेली साम्यावस्था येऊ लागली.
आपली जाणीव, आपली समज याहून वरच्या पातळीवर असणारे असतातच आणि आपल्या पातळीच्या खाली असणारेही असतातच. पण म्हणून मी लहान नाही अन मोठाही नाही. मीही कधीतरी खालच्या पातळीवर होतो, कधीतरी वरच्या पातळीवर असेन. कधी या विश्वसागरावरील लहानसा तरंग असेन तर कधी महाकाय सुनामीची लाट असेन. तरंग असणे आणि लाट असणे हे दोन्ही माझे नाही. त्या येणाऱ्या, जाणाऱ्या अवस्था आहेत. जाणाऱ्या गोष्टींची हुरहूर नको तर येणाऱ्या गोष्टींचे अप्रूपही नको. मी माझ्यात स्थित असले पाहिजे ही समज येत गेली. ही समज हा सुद्धा तत्वज्ञानाचा सिद्धांत न राहता, स्वभाव होत गेला.
याच क्रमाने हक्क सांगणं आणि सांगू देणं संपलं. एखादी वस्तू, व्यक्ती, विचार, कृती आपल्या मालकीची नाही, त्यावर आपला हक्क वगैरे नाही; अन त्या गोष्टींचाही आपल्यावर हक्क नाही. हक्क कोणी अन कोणावर सांगायचा? कोणी कशावर सांगायचा? हे सगळं अस्तित्वच एक आहे, एकाचं आहे, एकातून प्रगटलेलं आहे; अन पुन्हा एक होणार आहे, एकात विरून जाणार आहे, एकात सामावलं जाणार आहे; कोणाचा कोणावर अन कशावर हक्क? अगदी आपलं मन, बुद्धी, शरीर यावर सुद्धा आपला हक्क नाही. आपला नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचा आहे असंही नाही. मुळातच या सगळ्यांकडे बघण्याची दृष्टीच वेगळी झाली. त्या 'एका'चे सतत अनुसंधान राहू लागले, स्मरण राहू लागले. त्याच जाणीवेतून सगळ्या गोष्टी दिसू लागल्या.
जसे हक्क संपले तसेच बांधून घेण्याची अन बांधण्याची गरजही उरली नाही. पूर्ण मुक्त आणि कायमच मुक्त असलेली गोष्ट बांधली कशी जाणार? बांधून कशी घेणार? सगळ्या प्रकारची बांधाबांध गमतीशीर वाटू लागली. अशक्य गोष्ट शक्य करण्याचा आटापिटा व्यर्थ वाटू लागला. बांधणे, बांधिलकी हे काच वाटू लागले. कोणीतरी वा काहीतरी आपल्याला बंधनात टाकत असतं आणि आपणही बांधून घेत असतो, बंधन खुशीने स्वीकारत असतो हे कळू लागले. अन सगळ्याच प्रकारचे बांधणे वा बांधून घेणे हे या दृश्यमान जगाशी बांधून घेणे किंवा बांधले जाणे असते हेही कळू लागले. मात्र या जगाशी कितीही घट्ट बांधून घेतले तरीही ते टिकणारे नाही. सर्व बंधने छिन्नविच्छिन्न होऊन अंती बंधनरहित एक होऊन जाणे हेच प्रत्येक तरंगाचे, प्रत्येक स्पंदनाचे, प्रत्येक कणाचे, प्रत्येक संघाताचे, प्रत्येक व्यक्तीचे प्राक्तन आहे. तीच एकमेव नियती आहे. अगणित भूतकाळापासून या जगाशी बांधण्याचा, बांधून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अन त्यातला प्रत्येक प्रयत्न वाया जात आहे. त्या बंधनशून्य एकाचा अनुभव मिळत नाही तोवर हा बांधण्याचा खेळ मनापासून सुरू असतो. आता त्या खेळातील रस आटून गेला आहे.
हक्क आणि बंधने यासोबतच सिद्ध करण्याची गरज उरली नाही. काहीतरी सिद्ध करणे, आपले म्हणणे सिद्ध करणे, स्वतःला सिद्ध करणे; यांची गरज वाटेनाशी झाली. त्यातला फोलपणा जाणवू लागला. त्यातल्या मर्यादा स्वच्छ दिसू लागल्या. अन सिद्ध करणे अनावश्यक असल्याचेही पटू लागले. मी कर्तृत्ववान आहे, मी कष्टीक आहे, मी साधा आहे, मी ज्ञानी आहे, मी संपन्न आहे, मी हुशार आहे, मी सन्मानित आहे; हे आणि असे किंवा याच्या विपरीत भाव सिद्ध करून काय प्राप्त होईल? समजा मी या गोष्टी सिद्ध केल्या तरीही अन्य लोक ते मान्य करतील का? त्यांना मनापासून पटेल का? त्याहीपेक्षा त्यांनी मान्य का करायचे? त्यांच्या वा माझ्या विकासात त्याचा काय उपयोग?
विचार वा भूमिका सिद्ध करणे हे तर फारच गमतीचे वाटते. ज्याच्या गळी विचार वा भूमिका उतरवायची त्याची क्षमता, त्याच्या भूमिका, त्याच्या गरजा, त्याची जीवनदृष्टी, त्याची गृहीतके, त्याची माहिती, त्याचे विश्वास, या सगळ्याची कारणमीमांसा; अशा असंख्य गोष्टी असतात. या प्रक्रियेतून शक्तीक्षयच अधिक होतो. त्यापेक्षा आपल्याला वाटते ते योग्य प्रकारे सांगावे, लिहावे आणि थांबावे. त्याच एकमेव तत्त्वाने मला व बाकीच्यांना घडवले आहे. मला प्राणोप्राण उमजलेली एखादी गोष्ट अन्य कोणाला तशीच, त्याच वेळी वाटणे अथवा न वाटणे; हे आकलनाच्या पलीकडचे आहे. कदाचित समोरच्याला ती तशी न वाटणे हेच योग्य असू शकेल. मुख्य म्हणजे प्रत्येकाला प्रतीत होणारे सत्य वेगवेगळे असू शकते. एकच गोष्ट एकाच प्रकारे समजेल, आकलन होईल असे असूही शकते वा नसूही शकते. जसजसे त्या तत्वाचे नवनवे उन्मेष पाहू लागलो तसे सिद्ध करण्याची खटपट थांबत गेली.
अपेक्षा ओसरल्याने हक्काची भाषा थांबली, बंधने मावळल्याने आपपर भेद लोपले आणि सगळ्या गोष्टींची सारखी चिकित्सा करणे शक्य झाले, अन सिद्ध करण्याची गरज वाटेनाशी झाल्याने आवेश, आग्रह, आक्रमकता उरले नाहीत.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

मंगळवार, १८ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (६)

 

सारं काही कालप्रवाहात विरून जातं, पण हा कालप्रवाहसुद्धा ज्यात लय पावतो असं ते एकमेवाद्वितीय तत्त्व आहे. मग थोडं थोडं लक्षात येऊ लागलं 'ईशावास्यमिदं सर्वम' म्हणजे काय. हळूहळू चिंतन सुरू झालं. मनात आलं, देव कधी अस्तित्वात आले असतील? आजच्या देवता कधी अस्तित्वात आल्या हे प्राचीन काळाचे अभ्यासक सांगत असतात. वेदकालीन देवता आणि आजच्या देवता वेगळ्या आहेत. मंदिरे इत्यादीदेखील त्या मानाने अलीकडची. त्या वेदकाळाच्या आधी काय होते? काही तर असणारच. किमान वेदांच्या आधी माणूस होता. त्यानेच वेद जन्माला घातले. मग ती माणसे, त्यांच्या आजूबाजूचा निसर्ग, या विश्वातील दृश्य आणि अदृश्य गोष्टी, सूर्य चंद्र तारे; हे कुठून आले असतील? हे सारेच त्या एका तत्त्वातून आकारास आले. मग ध्यानी आले की, ते एक तत्त्व आकलन होणे ही जर अध्यात्माची सर्वोच्च अवस्था असेल तर त्याचा लौकिकातील देव आदी गोष्टींशी संबंध नाही. लौकिकातील देव, धर्म, कर्म इत्यादी हे त्याच प्रवासातील थांबे असतात. कोणी थांब्यावर थांबत असतील, विश्रांती घेत असतील; कोणी घेत नसतील. मुळात हा प्रवास इत्यादी सुद्धा समजून घेण्याचा माणूस प्रयत्न करतो आणि जसं समजेल तसं सांगतो. पण ते तसंच असतं का? किंवा सगळ्यांचा प्रवास तसाच असतो का? असेल का? या प्रश्नांना काहीही उत्तर नाही.

मग ज्याला आपण आयुष्य म्हणतो, जीवन म्हणतो; ते तरी कळतं का आपल्याला? जीवनाच्या या संघर्षाचा काय अर्थ आहे? विचार या दिशेने जाऊ लागले. अमुक दिवशी मी जन्माला आलो. खेळलो, बागडलो, जेवलो, झोपलो, शिकलो, नोकरी केली, व्यवसाय केला, उपक्रम केले, हसलो, रडलो, सामाजिक संस्थांमध्ये काम केलं, पुरस्कार मिळाले, धावपळ केली, आराम केला, धडपडलो, आजारी पडलो; काय अर्थ आहे या सगळ्याचा? कधीतरी हे जग सोडून निघून जाईल. कशासाठी हे सगळं? लोक या जीवनात रमत असतात. मी नाही रमत. काय कारण असावं? प्रत्येक टप्प्यावर माझी गाडी अडवली गेली म्हणून माझी रुची संपली का? मुळात आयुष्याची गाडी अडवलीच का गेली? बाकीच्यांना कुठे ना कुठे वाट मिळाली. त्यांना ती त्यांची वाट वाटली. ती वाट चालणे हा त्यांच्या जगण्याचा अर्थ झाला. माझ्या जगण्याचा अर्थ काय? मला माझी वाट का सापडली नाही? जगाची वहिवाट मला आपली का वाटत नाही?
विवेकानंदांचा ज्ञानयोग वाचताना आलेल्या अनुभवानंतर, हे सारे प्रश्न तर होतेच, पण त्यांची बोच कमी झाली होती. कारण या प्रश्नांची उत्तरे मिळाली काय वा न मिळाली काय, माझे आदी आणि अंत समजले होते. त्या आदी आणि अंताच्या मधला प्रवास कसा आहे, जसा आहे तो का; याची उत्तरे माझ्याकडे नाहीत. परंतु त्यांची उत्तरे माहिती होऊनही काय साधणार? ती उत्तरे मिळाल्याने काही बदल होणार आहे का? मुळात या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे असू शकतात का? या अस्तित्वाच्या समुद्रावर उठणाऱ्या असंख्य लाटांपैकी मी एक लाट. खरं तर लाटही नाही. तरंग फक्त. हे तरंग का उठतात, माझा तरंग का उठला, पहिला तरंग कधी कुठे का उठला असेल? काय सांगणार? कुठल्या तरंगाने कोणत्या तरंगाला जन्माला घातले? कोणत्या तरंगाने कोणत्या तरंगाला गिळून टाकले? कसं समजणार? कसं शोधणार? कसं सापडणार? अमुक तरंग आधीचा की तमुक तरंग आधीचा? बी आधी की वृक्ष? कोंबडी आधी की अंडं?
या तात्त्विक प्रश्नांच्या सोबतीने व्यवहाराचं निरीक्षण सुरू झालं. असंख्य व्यावहारिक प्रश्न असतात की ज्यांना काहीही उत्तर नसते. अमुक व्यक्ती आपल्याशी वाईट का वागली किंवा वागते, याला काय उत्तर असू शकते? त्या व्यक्तीचा स्वभाव हे काही उत्तर होऊ शकत नाही. त्याचा तो स्वभाव का? याचे काय उत्तर देणार? बरे; त्या व्यक्तीची परिस्थिती, त्याला आयुष्यात आलेले अनुभव, अन्य काही त्रास वा समस्या; हे उत्तर दिले तरीही, ते का? याला काय उत्तर असू शकेल? त्या व्यक्तीचा स्वभाव याऐवजी, तो दुष्ट आहे असं उत्तर दिलं तरीही, का? हा प्रश्न उरतोच. एखादे वेळी एखाद्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तरी, त्या विषयाची दुसरी बाजूही असू शकते हेही लक्षात येऊ लागले. हळूहळू लक्षात येऊ लागले की, पुष्कळदा आपल्या हाती काही नसते. अन त्यापुढे हेही लक्षात येऊ लागले की, आपल्या हाती काहीही नसते. मला आयुष्यात जे काही मिळालं असेल ते किंवा जगात ज्या लोकांना यश, कीर्ती, पैसा, प्रेम इत्यादी गोष्टी प्राप्त झाल्या असतील त्यांनाही; केवळ स्वतःच्या भरवशावर सारे काही मिळत नसते. त्याला मिळणारी परिस्थिती, त्याला मिळणारे सहकार्य इत्यादी त्याच्या हाती नसते. एखादी व्यक्ती काही निर्णय घेते किंवा घेत नाही, ते तरी त्या व्यक्तीच्या हाती असते का? 'निर्णय चुकला' किंवा 'निर्णय बरोबर होता' हे त्या निर्णयाचे परिणाम आल्यावर ठरत असतं. मुद्दाम चुकीचे निर्णय तर कोणीच घेणार नाही ना?
तीच गोष्ट लक्षात येणे, समजणे अशा बाबींचीही. कधी एखाद्याला एखादी गोष्ट लक्षात येऊ शकते, कोणाला नाही. कोणाला एखादी गोष्ट जमू शकते, कोणाला नाही. एकीकडे असे सगळे विचार मनात सुरू होते आणि दुसरीकडे निरीक्षण वाढत होते अन सूक्ष्म होत होते. यात रोजच्या घटनांपासून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक, गुन्हेविषयक; देशी व विदेशी; स्त्रिया व पुरुष; असे सगळे पैलू होते. अन लक्षात येत गेले की, माणूस समजतो तितका स्वतंत्र वगैरे नाही. नियतीच्या हातातील बाहुलंच आहे. त्याच्या हाती काही असेल तरी ते फार थोडं असेल.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

सोमवार, १७ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (५)

 

आपण का जन्माला आलो? जन्मभर काय करायचं आहे? काहीच भूमिका नसेल, काहीही करायचं नसेल तर ईश्वराने मुळात जन्मालाच का घातलं? नोकरी करायची, जेवायचं, झोपायचं, समाजासाठी काहीतरी केल्यासारखं दाखवायचं; बस एवढंच जीवन? प्रत्येकाला त्याचं त्याचं छोटं मोठं जीवन आहे. माझं जीवन? कशातच राम वाटत नाही तर सोडून द्यावं सगळं. हाच विचार मग बळावू लागला. काय धरून ठेवायचं अन कशासाठी? धरून ठेवून काहीच उपयोग नाही, स्वस्थता नाही; तर आता सोडून देऊ अन पाहू काय होते ते. आता असं काय आहे की जे गमावल्याने काही फरक पडेल? काहीच नाही नं? मग भीती कसली? उधळून टाकू सारं. हा विचार वाढत गेला आणि दिलं सगळं सोडून. नोकरी, पत्रकारिता, संघटना, कामं; सगळं दिलं सोडून. कुठे जाणं येणं बंद केलं. घरी धावपळ करू शकणारा मीच असल्याने थोडीफार ती जबाबदारी उचलत असे तेवढेच. भाजी आणणे, किराणा सामान आणणे, गॅसचा नंबर लावणे, बिलं भरणे; अशी कामे करत असे. बाकी सगळे बंद. रात्र रात्र झोप लागत नसे. अशा कितीतरी रात्री जागून काढल्या. सगळीकडे अंधार गुडूप. डोळे टक्क उघडे. मन शून्य. कधी तासंतास रडत राही तर कधी गच्चीत येऊन रस्त्यावरच्या दिव्याकडे, आकाशाकडे पाहत बसे. सतत एकच विचार - आयुष्य कशासाठी? काय करायचं आहे? अनेकदा आपण म्हणतो की, मन रमवलं पाहिजे. पण या काळात साक्षात्कार झाला की, स्वाभाविकपणे रमत असेल तरच मन रमवता येतं. मन रमत नसेल तर रमवता येत नाही. उलट रमवायला गेलं तर उद्वेग वाढतो, मनस्ताप वाढतो, चिडचिड होते. त्यापेक्षा रिकामं बसून राहणं चांगलं. शांती तरी भंग होत नाही. नियतीनेही परीक्षा पहायचे ठरवले असेल कदाचित. किती दिवस असं चालणार होतं? मनाला कशाचीही ओढ राहिली नव्हती. काहीही त्याला बांधून ठेवत नव्हतं. मग एका क्षणी जीवन संपवण्याचा प्रयत्नही केला. सगळ्याच प्रयत्नांना नकार देणाऱ्या दैवाने इथेही पाठ फिरवली. मृत्यूही आपल्या हाती नसतो हे प्रत्ययाला आलं.

सकाळी उठणे, काही आवश्यक काम असेल तर तेवढे करणे, आंघोळ, जेवण, पाहिला तर टीव्ही, नाही तर वाचन, अन्यथा लोळत पडलं राहणे. एवढाच दिनक्रम. असाच एकदा दुपारच्या जेवणानंतर गच्चीत झाडाच्या सावलीत वाचत बसलो होतो. हातात विवेकानंद होते अन डोळ्यासमोर त्यांचे ज्ञानयोगाचे विवरण. विषय अद्वैत. अन वाचता वाचता अचानक एका क्षणी मनात आलं - अद्वैत म्हणजे द्वैत नाही असं. म्हणजे फक्त एक. दोन नाही. मग हे कळणार कसं? कळणार कोणाला? जे कळायचं ते कळून घेणारा कोण? कळून घेणाराच कोणी नसेल तर कळणार तरी काय? अन याच विचारांनी मन घेरून टाकले. पुस्तकात बोट ठेवून पुस्तक बंद केले. डोळे आपोआप मिटले गेले. अन त्या 'एक'चा विचार सुरू झाला. दोन नाहीच. पण इथे तर हजारो, लाखो, करोडो आहेत. माणसे, प्राणी, पक्षी, वनस्पती, निसर्ग, भावना, विचार, नाती, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ, सुख, दु:ख, संघर्ष, समन्वय, रंग, रूप, आकार, प्रकार, गंध... किती आणि काय मोजायचं?
मग सुरू झाला एक खेळ. जे जे मनात येई ते ते त्या 'एक'मध्ये टाकणे, शिरवणे, विसर्जित करणे. आईवडील, आप्त, स्नेही, कुटुंब, परिवार, कुळ, कुळाचार, सणवार, उत्सव, वस्तू, इमारती, निसर्ग, प्रकाश, अंधार, विश्वब्रह्मांड, ज्ञान, भावना, विचार, तिन्ही काळ, सुख, दु:ख, संघर्ष, समन्वय, कोमलता, क्रूरता, भूत प्रेत, राक्षस, अगदी देव सुद्धा. जे जे मनात उत्पन्न होईल, जे जे मनात येईल; ते सारं त्या एकात विसर्जित करणे. जे जे विसर्जित केलं ते ते त्यात मिसळून जाऊ लागलं. त्या एकाशी एकरूप होऊ लागलं. जे जे शिरवलं त्याचं वेगळं अस्तित्व संपून गेलं. ते त्या एकाचाच भाग होत गेलं. सगळं संपलं. तरी दोन उरले होते. एक ते सगळ्यांना उदरात घेणारं जे काही होतं ते आणि दुसरा मी. मग मी मलाही त्या एकात विसर्जित केलं. माझं शरीर, माझं रंगरूप, आकार, स्मृती, भावभावना, विचार, जाणिवा... सगळं सगळं लय पावत गेलं त्या एकात. काहीही उरलं नाही पण एक गोष्ट जाणवत होती 'मी आहे'. 'मी नाही' असं क्षणभर देखील वाटलं नाही. सतत जाणीव होती 'मी'ची. माझे भौतिक, रासायनिक गुणधर्म काहीही उरले नव्हते. जे काही होतं त्याचं वर्णन करता येत नव्हतं. त्याला रंगरूप, आकार, गंध, व्याप्ती काहीही नव्हतं. ते पाहता येत नव्हतं, मोजता येत नव्हतं, त्याचं वर्णन शक्य नव्हतं. पण ते होतं. अन जे होतं ते 'मी' होतं. नंतर सगळं शांत. ती जाणीव सुद्धा विरली. किती वेळ गेला ठाऊक नाही. हळूहळू पुन्हा भानावर आलो. क्षणभर काही कळलं नाही. मग लक्षात आलं, आपण गच्चीवर आहोत. अंधार पडला होता. आजूबाजूला दिवे लागले होते. म्हणजे काही तास लोटले होते.
काय अनुभवलं होतं मी? मी स्वतःशी विचार करू लागलो. काहीच सांगता येत नव्हतं. सगळं काही विरून कसं गेलं? अन विरून गेलेलं पुन्हा कसं आलं? असा काही वेळ नक्की होता जेव्हा काहीच अस्तित्वात नव्हतं. हे विविधरूपी अस्तित्व आणि अस्तित्वशून्यता हा दोन्ही बाजूंचा प्रवास करून आपण आलो. पण हे कसं झालं माहिती नाही. हे एकाचे अनेक होणं आणि अनेकांचं एक होणं, यांच्या सीमेवर जे काही होतं, जे काही असेल; ते म्हणजे ईश्वर. पण त्याला अस्तित्व नाही. जाताना किंवा येताना कोणीही वा काहीही दिसलं वा जाणवलं नाही. एकच असलेला मीच करोडो झालो. अन हे करोडो असलेलं सारं एकच मी झालो होतो. हे सगळं माझ्यातूनच आलं अन हे सारं माझ्यातच विलीन झालं. ते जे काही अनुभवलं होतं, तो नुसता अनुभव नव्हता. ती अनुभूती होती. म्हणूनच अनुभवासारखं ते धूसर होत गेलं नाही. उलट अधिक सघन, अधिक आशयपूर्ण होत गेलं.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)

रविवार, १६ मे, २०२१

मी आणि अध्यात्म (४)

 

सगळ्या गोष्टींवरचा विश्वास उडत होता. कोणाच्या कसल्याही बोलण्याला प्रश्न, उपप्रश्न तयार असत. रुक्षपणा येत गेला. कडवटपणाही राहत असे. इतकं होऊन वाममार्गाला कसा लागलो नाही याचं आश्चर्य वाटतं. ना उधळपट्टी करून कर्जबाजारी झालो, ना जबाबदाऱ्या टाळल्या. परिवार, आप्त यांनी सहन मात्र भरपूर केलं. अर्थात मानसिक दृष्टीने. कारण प्रत्यक्षात मी कोणालाही काही त्रास देत नसे. ना कधी मारहाण केली, ना लुबाडले, ना बाकी काही नुकसान केले. फक्त वागण्या बोलण्यात जरा फटकळ झालो होतो आणि माझं अस्वस्थ असणं, उद्ध्वस्त होणं; माझ्यावरच्या मायेपोटी त्यांना अस्वस्थ करत होतं. याच काळात भरपूर समज, गैरसमज पसरवण्यात आले. बदनामी करण्यात आली. चारित्र्यहनन करण्यात आले. संशय पसरवण्यात आले. अन हे सारे एखादी मोहीम चालवावे असे. मी संपूर्ण एकाकी झालो होतो. जवळचेही दूर झाले होते. तटस्थ झाले होते. कोणीही मला ना समजून घेत होते, ना माझ्या वेदनेवर फुंकर घालत होते. एक तर तोवरचा माझा जीवनप्रवास इतका समजूतदार, इतका हिमतीचा आणि शक्तीशाली होता; की याला काही मदत लागू शकते, आधार लागू शकतो; अशी कल्पनाही मनात न येणारेही होते. बरं प्रत्येकाला काय आपली परिस्थिती जाहिरात करून सांगणार का? ते ना शक्य असते, ना योग्य, ना आवश्यक. हे सगळं आतल्या आत जिरत होतं. कधीतरी एखादे वेळेस ज्वालामुखी फुटत असे. पुन्हा सगळे शांत.

दिवस जात होते एवढंच. मी लोकसत्ता दैनिकात काम करायचो. आम्हाला नव्यानेच ltc (देशात कुठेही कुटुंबासोबत फिरून येण्यासाठी सुटी आणि विशिष्ट रक्कम) सुरू झाली होती. मला कुटुंब म्हणजे आईवडील. विचार केला कुठे जावे? काय करावे? की सवलत सोडून द्यावी? सवलत सोडणे वेडेपणा झाला असता. फिरण्याची हौस होतीच. सोबत आईवडिलांना घेऊन कुठे जावे? मनात आले - वडिलांनी रामकृष्ण मिशनची मंत्रदीक्षा घेतली होती. बेलूरला मात्र कधी गेले नव्हते. मग तोच बेत पक्का केला. वास्तविक मी देव धर्मापासून दूर गेलेला. याच विषयावरून घरी एक प्रकारचा तणाव. मात्र बेलूरला जाण्याचा निर्णय करताना काहीही त्रास झाला नाही. मनाची चलबिचल झाली नाही. आता याचा विचार करताना मनात येते, काय कारण असेल यापाठी? एक तर कोणाबद्दल वा कशाबद्दल आकस किंवा दुष्टता नसणे. जे काही होते, ते फक्त सत्यशोधन आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे एवढेच. अन हे केवळ सांगण्यापुरते नाही तर अगदी आतून. त्यामुळे हा निर्णय घेताना चलबिचल झाली नसावी. अर्थात हा माझा कयास. दावा नाही. मग बेलूरला जाण्याच्या कार्यक्रमात श्रीरामकृष्णांचे जन्मस्थान कामारपुकुर आणि सारदा मां यांचे जन्मस्थान जयरामवाटी; तसेच गंगासागर आणि कामाख्या; यांचाही समावेश झाला. ठरल्याप्रमाणे सगळा प्रवास छान पूर्ण करून आलो.
या प्रवासात एक मोठी रोमांचक आणि अतिशय महत्त्वाची घटना घडली. कदाचित त्यासाठीच हे सारे जुळून आले असावे. जयरामवाटी आणि कामारपुकुर आटोपून आम्ही ठरल्यानुसार बेलूरला आलो. तिथे काही दिवस मुक्काम होता. एक दिवस कोलकात्यातील रामकृष्ण मिशनशी संबंधित स्थळे पाहण्यासाठी गेलो. त्या स्थळांमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जन्मगृहाचाही समावेश होता. आम्ही तिथे पोहोचलो. माझी त्या घरी जाण्याची ती तिसरी वेळ होती. पहिल्यांदा गेलो तेव्हा ते बंद होते. बाहेरून 'हेच ते घर' असे म्हणून परत आलो होतो. दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा एक चौकीदार होता. कोणी येईल तेव्हा घर उघडून दाखवणे हे त्याचे काम. मलाही त्याने पूर्ण घर दाखवले होते. जुने जीर्ण घर, हलणारा जिना, झुडुपे; असे असूनही समाधान लाभले होते. ही तिसरी वेळ होती. यावेळी ते घर रामकृष्ण मिशनने ताब्यात घेतले होते. हे घर स्वामीजींच्या वेळी होते तसे पुन्हा उभारण्याची योजना तयार झाली होती. त्यानुसार कामही सुरू झाले होते. घराचा काही भाग पाडून झाला होता. काही उरला होता. तेथे असलेल्या मिशनच्या स्वामींनी त्याबद्दल माहिती सांगितली. आम्ही परतलो.
परंतु का कोणास ठाऊक; राहून राहून वाटत होते की, आपण पूर्वी पाहिलेले घर आणि आज पाहिलेले घर आणि आकारास येणाऱ्या घराची योजना यांचा काही ताळमेळ बसत नाहीय. कारण काहीच नव्हते. शिवाय मी काही तज्ञ नव्हतो त्या विषयातला. आजूबाजूचा परिसर बदललेला असू शकतो. त्यामुळेही वेगळं काहीतरी वाटत असेल. किंवा आपण पूर्वी पाहिले ते पूर्ण नसेल वा ते बरोबर नसेल. किंवा आणखीन काही. पण मनातलं जुनं चित्र आणि नवीन चित्र जुळत मात्र नव्हते. तो दिवस आणि रात्र तसेच गेले. मधूनच स्वामीजींचे घर मनात उसळी मारत असे. आमचा मुक्काम बेलूर मठाच्या निवास व्यवस्थेतच होता. दुसऱ्या दिवशी श्रीरामकृष्णांच्या मंदिरात गेलो. सभामंडपात बसलो. येणारे जाणारे चालूच होते. पुन्हा कालचाच विषय मनात सुरू झाला. अन कोणास ठाऊक कशी तंद्री लागली. आजूबाजूचं भान विसरून गेलो. अचानक पाठीवर थपकी बसल्यासारखं वाटलं. मान वळवून पाहतो तर काय? प्रत्यक्ष खांद्यावर धोतराचा सोगा टाकलेले हसतमुख श्रीरामकृष्ण. माझं लक्ष गेल्याबरोबर म्हणाले, 'अरे कसला विचार करतो आहेस? एका घराचा? इमारतीचा? हे सगळं काळाच्या ओघात बदलणारं, वाहून जाणारं आहे. तू हे जे मंदिर मंदिर करतो आहेस, ठाकूर ठाकूर करतो आहेस, आरती न प्रसाद करतो आहेस, ही बाजूने वाहणारी गंगा पाहतो आहेस; ते सगळंच काळाच्या उदरात गडप होणार आहे कधी ना कधी. हे सगळं जाणारं आहे. त्याचा कसला विचार करतोस? सत्य त्याच्या पलीकडे आहे. त्यावर लक्ष दे. ते धरून ठेव.' अन हसत हसत ते गर्भगृहात निघून गेले. पुन्हा सगळं जसं होतं तसं. लोक येत होते, जात होते. मी सभामंडपात बसलो होतो. काय होतं हे सारं? काय पाहिलं होतं मी? काय अनुभवलं होतं? कोणी म्हणतील साक्षात्कार, कोणी म्हणतील भ्रम, कोणी म्हणतील मनोरुग्ण. मी काहीच म्हणत नाही. तेव्हांही म्हटलं नाही, नंतरही म्हटलं नाही, अन आताही म्हणत नाही. मात्र एक नक्की की, त्यानंतर विचार करण्याची दिशा आणि पद्धतच सगळी बदलत गेली. ठाकुरांचे शब्द आठवत राहतात - 'सत्य त्यापलीकडे आहे. त्यावर लक्ष दे.' त्या सत्य वा कल्पनेतल्या अनुभवानंतर जुना मी जणू शेजारच्या जान्हवीत वाहून गेला. सगळ्या गोष्टींकडे पाहताना, तो अनुभव हा संदर्भबिंदू झाला. स्वामीजींचे घर पाहून आल्यानंतरची चलबिचल पूर्ण थांबून गेली. पण म्हणजे सगळे झाले असे नव्हते. त्या क्षणी जरी मन शांत झाले, तरी या विश्वव्यापाराच्या पल्याड असलेल्या सत्याने मनाला पछाडले. आपल्याला ते कळलं पाहिजे असा ध्यास मनाने घेतला. अर्थात लौकिक जीवनही सुरू होतंच. नोकरी, संघटना, दौरे, लेखन, घर हे सगळं सुरू होतंच. लौकिक आयुष्य, त्यातील अस्वस्थता आणि अपूर्णता, अन दुसरीकडे सत्याचा ध्यास; असे दोन प्रवाह वाहू लागले.
('माझा अध्यात्मप्रवास : देवभक्तीकडून सत्यशोधाकडे' या आगामी पुस्तकाच्या 'महासंघर्ष' या प्रकरणातील काही अंश.)