मंगळवार, ३१ मे, २०२२

ओवैसीच्या युक्तिवादाच्या निमित्ताने

गोहत्या बंदीला विरोध करताना खा. असदुद्दिन ओवैसी अनेक मुद्दे मांडत होते. त्यातला एक मुद्दा होता- आमच्या खाण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आम्ही का बदलाव्यात? वरवर बिनतोड वाटणारा हा बुद्धिवादी युक्तिवाद तद्दन तकलादू आहे. खाण्यापिण्याच्याच नव्हे तर अनेक सवयी, आवडीनिवडी जगभरातील मनुष्यप्राणी सतत बदलत आला आहे. गायीचेच कशाला नरमांसभक्षण करणारेही अनेक जण पूर्वी होते. आजही थोडेच का होईना आहेत. ती सवय माणसाने बदललीच ना? पूर्वीचा मानव मृगयाजीवी होता. आज अनेक देशांमध्ये अनेक गोष्टींच्या शिकारीवर बंदी आहे. मृगयाजीवीतून उत्क्रांत होत आजचा मानव आकाराला आला आहे. चोरी हाच पिढीजात व्यवसाय असलेले लोक होते. म्हणून चोरीचे समर्थन करून ती अधिकृत व्यवसायाच्या यादीत टाकायची का? पूर्वी माणूस कपडे घालत नव्हता, आताही तसेच करावे का? खाणे, पिणे, राहणे, वागणे, बोलणे, चालणे, अशा अनेक सवयी आणि आवडीनिवडी सतत बदलत असतात. गरजा, उपलब्धता, संवेदनशीलता, आदर, प्रेम, सहअस्तित्वाची गरज, जाणिवांचा स्तर उंचावणे अशा अनेक कारणांनी हे होत असते. असे बदल करण्यास हट्टाने नकार देणे हीच कट्टरवादाची सुरुवात असते. आज संपूर्ण जगात मुसलमानांची किंवा इस्लाम मानणाऱ्या लोकांची जी प्रतिमा तयार झाली आहे, त्यामागे इष्ट बदल न करण्याची त्यांची वृत्तीच कारणीभूत आहे. खा. ओवैसी त्यांचेच प्रतिनिधित्व करतात असे म्हणावे लागेल. अन प्रसार माध्यमे अशा वृत्तीला जाणीवपूर्वक किंवा अजाणता खतपाणी घालत असतात असाही निष्कर्ष काढावा लागेल. अन्यथा, शेकडो गायींच्या गोशाळा चालवणाऱ्या मुसलमानांच्या मुलाखती प्रसार माध्यमांनी दाखवल्या नसत्या का? मुलाखती जाऊ द्या, त्यांच्या कामाची माहिती एक बातमी म्हणून तरी कधी या प्रसार माध्यमांनी दाखवली आहे का? गोंधळ माजवून बुद्धिभ्रम उत्पन्न करण्याच्या सध्याच्या शर्यतीत तारतम्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी सामान्य माणसाचीच अधिक आहे.

- श्रीपाद कोठे

१ जून २०१५

मोदी संघ वाद

पंतप्रधान मोदी यांनी रा. स्व. संघाला तंबी दिली अशा बातम्या सुरु आहेत. आज त्यांनी यु.एन.आय. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवरून. हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार मला वाटतो. समजा तसे असेल तरीही त्यातून मार्ग काढायला भाजप आणि संघ समर्थ आहेत.

पण एकदा चर्चा सुरु झाली की ती कशीही वळणे घेते. त्यामुळे प्रसार माध्यमे जे म्हणत आहेत तसे काही नसावे हे गृहीत धरून सुद्धा काही प्रश्न विचारार्थ समोर ठेवावेसे वाटतात.

१) सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक विश्लेषणे करायचीत की नाही?

२) जिवंत समाजाला मृत समाज बनवायचे का?

३) हिंदूंच्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करायची, हिंदूंनी ती सहन पण करायची आणि बाकीच्यांनी अल्पसंख्यकत्वाच्या नावाने अयोग्य संरक्षण मिळवायचे का?

४) अल्पसंख्य, बहुसंख्य या कल्पना योग्य आहेत का?

५) देशात अल्पसंख्य आयोगाऐवजी मानवाधिकार आयोगच फक्त असावा अशी मागणी संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनीच केली होती, याचे स्मरण किती जणांना आहे?

६) सुरळीत सत्ता या नावाखाली सत्याचा गळा घोटला जावा का?

- श्रीपाद कोठे

१ जून २०१५

उपद्व्याप

परम आदरणीय कुमार केतकर यांचा एक व्हिडीओ पाहण्यात आला. `स्वत:चं लग्न लपवणारा खोटारडा पंतप्रधान आपल्याला हवा का?' असा रोकडा सवाल त्यांचा आहे. अहो महाशय, लग्न लपवलं असतं तर, उमेदवारी अर्जात उल्लेख केला असता का? बोलता येतं म्हणून काहीही बोलायचं का? विवाह हा अतिशय खाजगी मुद्दा आहे. दोन व्यक्तींचं परस्पर understanding हाच महत्वाचा भाग. लिव्ह इन (लग्न न करता एकत्र राहणे) हाही विवाहाचा एक प्रकार. तसंच लिव्ह आउट (लग्न करूनही वेगळे राहणे). त्या बिचाऱ्या यशोदा बेन काही म्हणत नाहीत अन तुम्हाला का हो उठाठेव?

एक जुना प्रसंग आठवला.

सज्जनगडावर मुक्कामाला होतो. शेजारच्या खोलीत चार पाच तरुण मुलं मुक्कामी होती. सकाळी आंघोळ वगैरे उरकून प्रसन्न वातावरणात खोलीसमोर उभा होतो. शेजारच्या खोलीतला एक मुलगा आला. कोण, कुठले गप्पा झाल्या. हळूच त्याने विचारले - तुम्हाला blanket दिलं होतं का रात्री? मला काही कळलंच नाही. म्हटलं- `नाही बुवा का? त्यांनी दिलं नाही पण मला गरजही नव्हती. जे पांघरूण होतं तेच जास्त होतं. तेवढंही लागलं नाही.' त्याने विषय पुढे रेटला. म्हणाला- तो दक्षिणी लोकांचा जो गट रात्री मुक्कामाला आला ना त्यांना या लोकांनी blanket दिले पुष्कळ. मी म्हणालो- `बरं. त्यांनी मागितले असतील. यांनी दिले असतील. त्याचं काय?' तो अस्वस्थ होत होता. म्हणाला- `तसं नाही. हे व्यवस्थापक लोक बदमाश असतात. त्या लोकांनी पैसे दिले असतील. अन तसंही कोणाकडे लक्ष द्यायचं अन कोणाकडे दुर्लक्ष करायचं हे यांचं ठरलेलं असतं.' मी म्हणालो- `अरे बाबा. असेलही तसं कदाचित. पण त्याचा माझ्याशी किंवा तुझ्याशी काय संबंध? का त्रागा करतोय? अन माझी प्रसन्न सकाळ का बिघडवतोय?' त्यावर तो मोकळा झाला- `हेच चुकतं तुम्हा लोकांचं. हा अन्याय आहे. सगळ्यांना समान न्याय हवा ना? त्यांना blanket दिले तर तुम्हालाही द्यायला हवे होते. तुम्ही लोक काही बोलत नाही. भांडत नाही. दुर्लक्ष करता म्हणूनच फावतं यांचं.' मी म्हटलं- `अरे काय बोलतो तू? मला गरजच नव्हती. मी एका शब्दाने त्यांना काही मागितले नाही. त्यांनी नकार देण्याचा किंवा पक्षपात करण्याचा प्रश्नच कुठे येतो? शिवाय ती दक्षिणी मंडळी संख्येने खूप आहेत. पांघरुणे कमी पडली असतील.' वगैरे वगैरे. दहा एक मिनिटे वाद झाला. अखेर मी म्हणालो- `सोड आता. मला त्यात रस नाही. तुम्ही कसे काय आलात?' तेव्हा तो क्रांतिकारक बोलला- `आम्ही मोटर सायकलने फिरायला निघालो आहोत. आमची गाडी झाली खराब. आता काय करायचे? म्हणून इथे आलो मुक्कामी.' म्हणजे राहणे, जेवणखाण यासाठी त्यांना रामदास स्वामी, ब्राम्हण, हिंदू, धर्म इत्यादी गोष्टी चालतात. त्यांची सगळी व्यवस्था, तीही फुकटात करताना कोणीही त्यांना जातपात, राजकीय मते, विचारधारा आदी विचारत नाही. तरीही त्यांच्या मनातील आकस कणभर कमी होत नाही. एवढेच नाही तर नसलेले मुद्दे काढून भांडणे लावता येतील का याचा उपद्व्याप सतत त्यांच्या डोक्यात सुरु असतो.

कुमार केतकर यांच्यापासून, कुठल्या तरी पुरोगामी प्रगतीशील आदी विचारांच्या फुटकळ संघटनेचे टीनपट तरुण; छोट्या वा मोठ्या वर्तुळात; सारख्याच खुटीउपाड मानसिकतेचे. सतत जळत्या काड्या फेकणारे.

- श्रीपाद कोठे

१ जून २०१८

वर्णद्वेष

अमेरिकेतील दंगलींनी अमेरिकेचा मुखवटा तर गळून पडला आहेच, पण प्रत्येक गोष्टीत अमेरिका अमेरिका करणाऱ्या लोकांनाही आरसा दाखवला आहे. सतत आत्मनिंदा करणाऱ्यांची वाचा किमान या संदर्भात बंद झाली हे चांगले झाले. परंतु या दंगलींना वर्णभेदाचे रूप देणे मात्र तितकेसे योग्य वाटत नाही. हां, एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर या दंगली सुरू झाल्या हे खरे आहे. पण घडलेल्या घटनेमागे वर्णद्वेष आहे असा निष्कर्ष कसा काढता येईल? ज्या अमेरिकेत कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आरामात राज्यकारभार करतात, ज्या अमेरिकेत सामान्य जीवनात कुठे वर्णभेद नाही; त्या ठिकाणी वर्णद्वेषाचा निष्कर्ष एकदम कसा काढता येऊ शकेल? कोणतीही व्यक्ती दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा, कोणत्याही कारणाने द्वेष करू शकतेच. ज्याप्रमाणे कोण कोणावर का प्रेम करेल सांगता येत नाही तसेच द्वेषाचेही आहे. अगदी जे चार पोलीस त्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, त्यांच्या मनात कृष्णवर्णीय लोकांविषयी दुष्ट बुद्धी राहू शकतेच. परंतु ही subjective बाब म्हणावी लागेल. त्यावरून अमेरिकेत मोठा वर्णद्वेष आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. भारतासह जगभरातच माणसाच्या विचारपद्धतीत हा दोष शिरलेला आहे. तो दूर व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

१ जून २०२०

सोमवार, ३० मे, २०२२

हिंदुत्वाचा आर्थिक आशय

आजचा भाजप हा हिंदुत्व आणि उपभोगवाद, भांडवलशाही यांचे एकीकरण असलेला राजकीय पक्ष आहे. हिंदुत्वाचा राजकीय आशय, काही प्रमाणात हिंदुत्वाचा सामाजिक आशय समाजात स्थिर झाले आहेत आणि भाजपातही स्थिर झाले आहेत. मात्र हिंदुत्वाचा आर्थिक आशय अजून हिंदुत्वनिष्ठांनाच नीट आकलन झालेला नाही. हिंदुत्वाचे रक्षण आणि अभिमान यासाठी ज्याप्रमाणात हिंदू सक्रीय आहे त्या प्रमाणात हिंदुत्वाचा आर्थिक आशय आणि आयाम समजून घेण्याची तयारी अद्याप नाही. एकात्म मानववादाच्या आधारे हिंदुत्वाचा आर्थिक आशय समाजात रुजविण्यात हिंदुत्वनिष्ठ अपयशी ठरले आहेत. एकात्म मानववाद म्हणजे अंत्योदय अशी घोषणा देऊन भाजपने स्वत:चे आणि समाजाचेही नुकसान केले आहे. अमक्याने अमके म्हटले आहे, अशी दोन चार कोटेशंस तोंडावर फेकण्याने काही होऊ शकत नाही. दत्तोपंत ठेंगडी यांनी `तिसरा मार्ग' लिहिला म्हणून जग बदलत नाही. किंवा गुरुजी, दत्तोपंत ठेंगडी, दीनदयाळ उपाध्याय किंवा अगदी विवेकानंदांपासून सगळे हिंदुत्वनिष्ठ महान व्हावेत म्हणूनही `तिसरा मार्ग' चालण्याची गरज नाही. ते महान ठरतील वा लहान; परंतु मानवजातीच्या भल्यासाठी हिंदुत्वाचा आर्थिक आशय आणि त्याचे आयाम मध्यवर्ती मानवी जीवनाचा भाग व्हायला हवेत. याची जाणीव कितपत आहे?

आज संपूर्ण जगात उपभोगवाद आणि भांडवलशाही यांचाच बोलबाला आहे, हा काही तर्क वा विश्लेषण होऊ शकत नाही. प्रश्न आहे तो - हा बोलबाला किती योग्य वा कल्याणकारी आहे हा? तसा तो नसेल तर तो चुकीचा मार्ग टाकून देण्याचे धाडस आणि शहाणपण दाखवावे लागेल. उगाच टिमक्या वाजवण्यात अर्थ नाही. स्वास्थ्य नीट राहावे याऐवजी औषधे खाण्याला प्राधान्य देणारी माणसाची मानसिकता, त्याची ही सुखलोलुपता, त्याचे हे निर्ढावलेपण चूक आहे तर चूकच म्हटले पाहिजे. चूक म्हणून काही होणार आहे का? हो. होणार आहे. काही प्रमाणात का होईना, मानवाचा विवेक कायम राहणार आहे. परंतु `काय होणार चुकीला चूक म्हणून' ही वृत्ती ठेवली तर विवेक गमावायला वेळ लागणार नाही आणि एकदा विवेक गमावला की मानवाला भविष्य नाही.

- श्रीपाद कोठे

३१ मे २०१८

विकास

सध्या पेट्रोलची दरवाढ आणि देशाचा विकास, कल्याणकारी योजना आदींचे अगदी रण माजले आहे. अतिशय गुंतागुंतीच्या या विषयांकडे आपण पुरेशा गांभीर्याने पाहतो का हा मुद्दा आहे. काही ठळक मुद्दे विचारार्थ-

१) विकास आणि योजना यांचे दाखले देऊन जेव्हा पेट्रोल दरवाढीचे समर्थन केले जाते तेव्हा एक गोष्ट विसरली जाते की, ज्यांच्यासाठी योजना केल्या जातात त्यांनाच पुन्हा दरवाढीचे चटके बसतात. गोळाबेरीज शून्य. मग योजनांची टिमकी कशाला वाजवायची? उदा.- रस्ते बांधण्यासाठी पैसे लागतात. त्यासाठी दरवाढ. ठीक. मान्य. पण त्या रस्त्यावरून एस.टी.त बसून येणारा आदिवासी वा ग्रामवासी एस.टी. भाडेवाढीचा बळी ठरतोच. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एका नळाने टाके भरायचे आणि दुसरे नळ उघडून ठेवायचे, अशी ही स्थिती आहे.

२) विकास आणि कल्याणकारी योजना यांचा अर्थ काय? एखाद्याच्या मनातील कल्पनाचित्र, स्वप्नं, जीवनशैली, गरजा हे सारे आज आम्ही एकत्र करून टाकले आहे. हे चुकीचे आहे. चार पदरी, सहा पदरी रस्ते हा विकास आहेच, पण यातील किती गरजेचे आहेत आणि किती स्वप्न याचा ताळेबंद मांडायचा की नाही? शहरीकरण म्हणजे फक्त महानगरे का? आटोपशीर शहरे हा विचार का करू नये?

३) महसूल केवळ पेट्रोल वा अन्य एखाद्या वस्तूतूनच मिळतो का? एखाद्या वस्तूतून अधिकाधिक किती महसूल मिळवायचा याचा विवेक हवा की नाही? भ्रष्ट लोकांची जप्त करण्यात येणारी संपत्ती, जप्त केली जाणारी संपत्ती यांची विकासासाठी लागणाऱ्या महसुलाच्या संदर्भात चर्चा का होत नाही? एखाद्या गोष्टीचा सर्वंकष विचार का नाही? आजही लुना वा त्यासारखी वाहने चालवून कसेबसे जगणारे असंख्य लोक आहेत. त्यांचाही विचार हवा की नाही?

४) धोरणे आणि योजना आदींचा विचार आपल्या साधनांच्या आधारे करायचा की दुसऱ्यांच्या साधनसंपत्ती आणि मापदंडावरून? अमेरिका, रशिया, आखाती देश यांच्याकडे स्वत:चे पेट्रोल आहे. आपल्याला निसर्गाने कच्चे तेल दिलेले नाही. हे वास्तव स्वीकारून जगायचे की नाही? मग पर्याय काय? पशुउर्जेचा विचार का नको? लोक हसतील, जग हसेल, नावं ठेवेल, कसतरी वाटतं; या कारणांसाठी पशुउर्जा नाकारणे योग्य का म्हणायचे? बैल, घोडे, गाढव, खेचर यांचा अधिकाधिक वापर करण्याचा विचार का नको? त्यातील अमानुषता काढून टाकून, त्यासाठीचे उपाय करून त्यांचा वापर करायला काय हरकत आहे? बिनकामाचा माणूस भार असतो, मग बिनकामाचे पशू भार नाहीत का? तसेही बैलांना गाडीला किंवा नांगराला जुंपत असत, गायींना नाही. ही मानवीय करुणाच होती. तिचा अधिक विस्तार करून आणि त्याचवेळी या करुणेचा अतिरेक टाळून पशुउर्जा वापरता येऊ शकते. मातीच्या रस्त्यांपेक्षा डांबरी रस्त्यांवर मोठ्या लोखंडी चाकाच्या गाड्या कमी कष्टात चालू शकतात. शिवाय renewable energy. `महानगरे' याऐवजी आटोपशीर शहरे आणि सायकलींचा वापर. जग काय म्हणेल ते म्हणू द्यावे. आपल्याला आपले जगणे महत्वाचे, हा विचार करण्यात चूक काय? प्रतिष्ठेच्या भिकार कल्पना टाकणे जड का वाटावे?

५) ७० वर्षात काही झाले नाही म्हणून ५ वर्षात सारे काही करून टाकण्याचा आक्रस्ताळेपणा कशासाठी? असा आक्रस्ताळेपणा करूनही अपेक्षित ते साध्य होईल याची शाश्वती आहे का? समाजाची गती, वृत्ती, स्वभाव याकडे दुर्लक्ष करून चालणे योग्य आहे का? समाजाची गती, वृत्ती, स्वभाव यातील परिवर्तन अशा घिसाडघाईने होत नसते, त्याचा थोडा थोडा प्रयत्न करत राहावे लागते. आपला समाज मंद गतीने चालणारा असेल तर ते स्वीकारले पाहिजे. तिसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला सहा महिन्यात पहिला मेरीट आणण्याचा प्रयत्न स्पृहणीय म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३१ मे २०१८

रविवार, २९ मे, २०२२

पेरियार

आयआयटी मद्रासचा वाद सुरु करण्यात आला आहे. हीच पेरियार रामस्वामी नायकर चळवळ आहे, ज्या चळवळीने हिंदी भाषा, हिंदू देवता, ब्राम्हण; यांच्याबद्दल विद्वेष पसरवून अनेक संघर्ष उभे केले. आर्य-द्रविड असे वाद आणि संघर्ष उभे केले. अन ते केवळ भांडणाचा कंडू शमवून घेण्यासाठी. त्यात राजकारण सुद्धा फारसे नव्हते. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या अन्य दक्षिणी राज्यांमध्ये हे वाद, संघर्ष, विरोध नसल्यासारखेच आहेत; हे लक्षात घेतले की पेरियार चळवळीचे खरे रूप कळेल. डॉ. आंबेडकरांचे नाव लावायचे आणि बुद्धिभेद करायचा हा नवीन धंदा आता त्यांनी सुरु केला आहे. अशा वृत्तींना उखडूनच टाकायला हवे. सगळ्यांनी आयआयटी मद्रासच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.

- श्रीपाद कोठे

३० मे २०१५

लक्ष्मणरेषा

स्वा. सावरकर यांच्या संबंधात घेतलेल्या चर्चेच्या शीर्षकावरून एबीपी माझा रोष झेलत आहे. त्या कार्यक्रमाला दिलेले खोडसाळ शीर्षक अयोग्य होतेच. त्यावर आक्षेप, दबाव आणि नंतर दिलगिरी व्यक्त करीत दुसरा कार्यक्रम; येथवर योग्यच झाले. परंतु आता जाहिरातदारांना जाहिराती न देण्यासाठी आवाहन, चॅनेलवर बहिष्कार; आदी जे सुरू आहे त्याच्याशी सहमत होता येत नाही. प्रामाणिक मतभेद, प्रामाणिक विचारभेद, खोडसाळपणा, दुष्टपणा, देशद्रोह (यादीत भर घालता येईल) असे विविध प्रकार असतात. त्याचा विरोध करण्याच्या, त्याला आळा घालण्याच्याही पद्धती असतात. त्यांचे तारतम्य असले पाहिजे. हातावरची माशी मारायला तलवार वापरणे व्यवहार आणि मानसिकता दोन्ही अर्थाने चुकीचे ठरते. ज्या हिंदुत्वाचा रथ आज पुढे निघाला आहे त्याचे वैशिष्ट्यच लक्ष्मणरेषा हे आहे. जगाच्या व्यवहारात सगळ्याच भल्याबुऱ्या गोष्टी असतात, पण लक्ष्मणरेषेचे भान राखणे आवश्यक असते. ते राखले नाही तर मूळ हिंदुत्व आशयच गमावल्यासारखे होईल.

- श्रीपाद कोठे

३० मे २०१९

शनिवार, २८ मे, २०२२

आरक्षण

आठ दिवसांचे गुर्जर आंदोलन ५% आरक्षण पदरात पाडून घेऊन अखेर संपले. नेहमीप्रमाणेच उनाड मनात विचार आला-

पूर्वी जातींच्या रूपाने १००% आरक्षण होते. आता सगळीकडे एक घास, दोन घास, चार घास; असे तुकडे असतात. पूर्वी एकगठ्ठा एकाधिकार होता. दुसऱ्या कोणालाही कसला वाटा नाही. त्या व्यवसायातील पैसा तुमचाच, माणसे तुमचीच, तंत्रज्ञान तुमचेच, अन्न तुमचेच, मुली तुमच्याच. तुमच्या कसल्याही गोष्टीवर दुसऱ्या कुणाचा काहीही उजर नाही. होते आरक्षणच. दोन आरक्षणाचे प्रकार फक्त वेगळे. कोणते चांगले, कोणते वाईट; कसे ठरवायचे? आणि त्याविरुद्ध कल्ला तरी का करायचा?

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१५

कालमापन

जगभरातच एखादी जुनी गोष्ट सांगायची असेल तर B.C. (before christ) (ख्रिस्तपूर्व) असे वापरतात. अमुक एखादी गोष्ट सांगताना, जे त्यावेळी नव्हतेच त्याचा संदर्भ देण्याऐवजी कालमापना संदर्भात सगळ्यात जुन्या असलेल्या युगाब्द किंवा त्यासारख्या पद्धतीचा वापर नाही का करता येणार? सगळ्यांनी विचार करावा आणि जाणत्यांनी प्रकाश टाकावा. अर्थात लक्षावधी वर्षे जुन्या असलेल्याही काही गोष्टी आहेत. त्यांचे कसे करायचे हा प्रश्नच आहे. पण त्याला काही इलाजही नाही. आपल्या हातात जे आहे ते म्हणजे, सगळ्यात जुना जो संदर्भ असेल त्याला अनुसरून कालमापन पद्धत आणि त्याची शब्दावली रूढ करणे.

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१५

चर्चा निष्फळ का?

बहुतांश चर्चा निष्फळ का ठरतात? कारण त्या चर्चा करणारे कोणा ना कोणाचे प्रतिनिधी असतात. केवळ राजकीय पक्षांचेच नाही, तर शेतकरी, गरीब, महिला, युवा, शिक्षक, व्यावसायिक; असे कोणत्या ना कोणत्या गटाचे प्रतिनिधित्व ते करीत असतात. अन कोणताही प्रतिनिधी हा ज्यांचे प्रतिनिधित्व करतो, त्यांच्याच बाजूने बोलणार. त्यांचेच मुद्दे मांडणार. त्यांचीच भूमिका सांभाळणार. `ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' हा सामान्य नियम आहे. ज्यावेळी कोणाचेही प्रतिनिधित्व न करणारी व्यक्ती मत मांडेल, बोलेल, विश्लेषण करेल, उपाय सांगेल; तेव्हा ते अधिक समतोल राहू शकेल. तोच विचार, चर्चा, मत; ग्राह्य मानता येईल. तीच चर्चा सार्थक मानता येईल. प्रतिनिधींच्या चर्चा आणि विश्लेषणे एकांगीच राहणार.

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१८

गर्दी

एव्हरेस्ट शिखरावर गर्दी (ट्राफिक जॅम) या विषयाकडे नाही म्हटले तरी दुर्लक्षच झाले. गेल्या आठवड्यात या गर्दीने महाराष्ट्रातील दोघांना प्राण गमवावे लागले. साहसी पर्यटन या विषयाचा विचार करताना जीवाला धोका ही गोष्ट back of the mind कुठेतरी असते हे खरे पण म्हणून त्याकडे डोळेझाक करणे योग्य ठरत नाही. शिवाय या गर्दीचे जे अन्य परिणाम आहेत त्यासाठी देखील या विषयाकडे दुर्लक्ष होऊ नये.

साहस ही काही माणसाला नवीन गोष्ट नाही. ती आजचीच आहे असेही नाही. पण सगळ्याच गोष्टींच्या अतिरेकी व्यावसायिकतेचे जे होते तेच गिर्यारोहणालाही लागू होते. शिवाय मानवी मनात अतिरेकी राक्षसी आकांक्षेचे जे रोपण केले जाते त्याचाही यात वाटा आहे.

- स्वतःला सिद्ध करण्याची,

- काहीतरी अचाट करून दाखवण्याची,

- सगळ्यात पुढे जाण्याची/ राहण्याची,

- जग मुठीत धरण्याची,

- हपापलेपणाची,

- काय करू अन काय नको याची,

- सगळ्या गोष्टींवर हक्क सांगण्याची/ ताबा मिळवण्याची,

(अशा अनेक गोष्टींची)

जी गळेकापू स्पर्धा आहे, त्याचाच हा परिणाम आहे. शहरातले रस्ते असोत की एव्हरेस्ट शिखर, मुलांच्या ऍडमिशन असो की हॉटेलातील पदार्थ; असंख्य ठिकाणी जो ट्राफिक जॅम होतो त्याचं मूळ मानवी मनोवृत्तीत आहे. आम्हाला मनोवृत्तीकडे लक्ष द्यायचं नाही, तिला वळण लावायचं नाही; अन परिस्थिती मात्र बदलायची आहे. सगळं आलबेल करायचं आहे. याहून हास्यास्पद दुसरं काय असू शकेल?

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१९

शुक्रवार, २७ मे, २०२२

प्रार्थना

सकाळी उठल्यावर न चुकता, `कराग्रे वसते लक्ष्मी', `समुद्रवसने देवी' आणि `सर्वेपि सुखिनः सन्तु' म्हणून मगच अंथरूणातून उठायचं; हा नेम आहे. संस्कार म्हणा, सवय म्हणा, भोळेपणा म्हणा की बावळटपणा. पण आता त्याला एक गोष्ट जोडण्याचं ठरवलं आहे. रात्री झोपताना एक प्रार्थना करायची, `या जगात जनावरांच्या रुपात राहणारा कोणीही माणूस उद्या सकाळी झोपेतून उठू नये.' याचं जे काही पाप लागेल, नरकात जावं लागेल आणि आणखीन काय काय असेल ते सगळं भोगायची तयारी करून ही प्रार्थना करणार आहे. जनावरांच्या रुपात राहणारा माणूस याची सरळ सोपी व्याख्या आहे- `स्वत:शिवाय अन्य कोणाचा विचार न करणारा माणूस.'

इतक्या टोकाचा विचार करण्याचं कारण जुनंच- कानठळ्या बसवणारा डी.जे. नावाचा प्रकार. विज्ञान तंत्रज्ञानाने लावलेला अणुबॉम्बपेक्षा त्रासदायक प्रकार म्हणजे डी.जे. अणुबॉम्ब एका क्षणात साफ करतो. स्पष्ट शत्रुत्व घोषित करतो. इथे सगळाच मामला तिरपागडा. डी.जे. लावणारा शत्रूही नसतो आणि तरीही प्रचंड वैताग देतो. बरे पोलिसांना फोन केला तर त्यांचे उत्तर असते की काय करायचे, रात्री ११ वाजेपर्यंत काही करता येत नाही. कायदे करणारेही इतके बिनडोक कसे काय असू शकतात हा प्रश्नच आहे. अरे, रात्री ११ वाजेपर्यंत काय त्रास होत नाही का? आणि एखाद्याचा आनंद हा दुसऱ्याला त्रास देणाराच का असावा? मागचा पुढचा कोणताही विचार न करता असे डी.जे. लावणारे, त्यांना परवानगी देणारे, तसे कायदे बनवणारे हे सगळेच राक्षस आहेत.

याविरुद्ध काय आणि कशी मोहीम करावी हा गहन प्रश्न आहे. अनेकांचे अनेक निहित स्वार्थ, दुराग्रह, अंगातली मस्ती अशा अनेक बाबी आहेत. बरे कोणत्या कामगार संघटना, विद्यार्थी संघटना, वेगवेगळी मंडळे, वृत्तपत्रे, अन्य प्रसार माध्यमे वगैरे कोणीही याबद्दल काहीही बोलायला, करायला तयार नाहीत. यासंबंधात काय होईल, काय नाही हा भाग पुढचा पुढे. मी मात्र आजपासूनच हे लोक उद्या सकाळी उठूच नयेत, अशी प्रार्थना करणार आहे. जगभरातील ज्यू लोक १२०० वर्षे रोज प्रार्थना करीत असत, उद्या सकाळी आपण जेरुसलेम मध्ये भेटू. १२०० वर्षांनी त्यांची प्रार्थना सफल झाली म्हणतात. माझी प्रार्थनाही जेव्हा सफल व्हायची तेव्हा होवो. तोपर्यंत एकच प्रार्थना- `माणसाच्या रूपातल्या जनावरांनी उद्याचा दिवस पाहू नये.'

- श्रीपाद कोठे

२८ मे २०१४

एक पाऊल पुढे...

आज सकाळी एका मुख्याध्यापक मित्राचा भ्रमणध्वनी आला. बाकी बोलता बोलता त्याने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला- `आमच्या शाळेतील एक शिक्षिका विदेशात फिरायला जाणार आहेत. पाच लाख रुपये खर्च करणार आहेत. मी (म्हणजे मुख्याध्यापक) त्यांना म्हटले, छान आहे. आम्हाला आनंद आहे. आम्ही तुम्हाला विमानतळावर सोडायला येऊ. पुष्पगुच्छ आणू. या आनंदाच्या क्षणी मी तुम्हाला एक विनंतीही करतो. आपण शाळेसाठी २५ हजार रुपये द्या. मी अन्य लोकांकडूनही काही रक्कम जमवतो. आपण त्यातून शाळेची रंगरंगोटी करू.' मित्राने सांगितले, त्या शिक्षिका नाही म्हणाल्या. माझ्या पैशावर माझा अधिकार आहे म्हणाल्या. मग मित्र त्याचे म्हणणे सांगू लागला- `ज्या शाळेकडून त्यांना सगळं काही मिळालं. त्यांचं आयुष्य, त्यांचं घरदार, त्यांचं विदेश फिरून येणं; वगैरे होते आहे, त्या शाळेसाठी एखादा पगार देण्याची मात्र त्यांची तयारी नाही. त्या शिक्षिका आरक्षित वर्गातील आहेत. हुशारही आहेत. आमची शाळा जुनी आहे. बहुतेक आर्थिक, सामाजिक मागास वर्गातीलच विद्यार्थी आहेत. आजकाल शाळांची स्थिती मोठी बिकट आहे. त्यात ज्यांनी सहजपणे जाणीवपूर्वक सहकार्य करायला पाहिजे त्यांची मानसिकता फार वेगळी आहे.' मुख्याध्यापक असलेला हा मित्र स्वत: आदिवासी आहे.

त्याचा किस्सा आणि त्याची व्यथा ऐकल्यावर सहज मनात आलं- आपण सगळ्यांनी एक पाऊल पुढे टाकायला हवं आहे. आज शिक्षण, नोकरी, व्यवसाय यात अनेक जण चांगला जम बसवताहेत. स्वत:च्या कष्टाने, परिश्रमाने अनेक गोष्टी साध्य करताहेत. अनेकांना आरक्षणाचा (केवळ जातीचे नव्हे, वर्गाचे, महिलांचे असेही) लाभही होतो आहे. त्याला हरकत नाही. पण एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर आपण त्याच्या उत्कृष्टतेकडे, अचूकतेकडे, तत्परतेकडे गेले पाहिजे याचा आग्रह दिसत नाही. जसे- शिक्षक म्हणून लागल्यावर विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान, कौशल्य देण्याचा, संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न वगैरे. जसे- सरकारी नोकरी लागली असेल तर आपल्याकडील फाईल्स लवकर हातावेगळ्या करणे, कार्यालयात कामासाठी आलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवून त्याचे काम अडवून न ठेवता लवकर करून देणे, सौजन्याने वागणे वगैरे. अशा अनेक गोष्टी. व्यक्तिगत पातळीवर एखादी गोष्ट साध्य केल्यानंतर बाकीच्यांचे जीवन सुखी सुरळीत व्हावे, चांगले वातावरण तयार व्हावे, अनेक संस्था, चळवळी सशक्त व्हाव्या; इत्यादीसाठी `मी काही करू शकतो का?' हा विचार करून एक पाऊल पुढे टाकले तर !!

- श्रीपाद कोठे

२८ मे २०१५

बुधवार, २५ मे, २०२२

stakeholders?

काश्मीरवरील चर्चेत stakeholders हा शब्द वारंवार वापरला जातो. अर्थात याआधी अन्यत्रही तो वापरला गेला आहेच. परंतु हा शब्द मुळातच चुकीचा, भ्रामक आहे. हा शब्द आणि त्यामागील भाव दोन्हीही निपटून काढणे गरजेचे आहे. राष्ट्र, देश, जमीन, संसाधने हे सारे काही लोण्याचा गोळा नाही की, बोक्यांनी त्यासाठी भांडावे अन त्या भांडणाला stakeholders हा भारदस्त शब्द वापरून सभ्यतेचे पांघरुण घालावे. मातीचा एकही कण, पाण्याचा एकही थेंब, हवा अन तिचे composition, खनिजे, भूगोल, पृथ्वी यातील काहीही कोणत्याही माणसाने अथवा मानवसमूहाने तयार केलेले नाही. त्यामुळे मालकी हक्क, वाटा अन वारसा, stakeholders हा सगळ्या बाबी पूर्णपणे चुकीच्या आहेत. त्या मोडीत काढायला हव्यात.

- श्रीपाद कोठे

२६ मे २०१७

लोकशाहीची भयाण शोकांतिका

द्वेष हा त्याज्य म्हणजे त्याज्यच आहे. कोणतेही कारण त्याचे समर्थन करू शकत नाही. याचा अर्थ द्वेष या जगातून संपून जाईल या भ्रमात मी नाही. अगदी माझ्या मनात सुद्धा द्वेषाची एखादी लहर येऊ शकते. परंतु त्याचे समर्थन नाही होऊ शकत. सत्तेची मग्रुरी किंवा सत्ता विरहाचा पोटशूळ, अन्यायग्रस्ततेचे वास्तव किंवा अन्यायग्रस्ततेचे तुणतुणे; अशा कोणत्याही परिस्थितीत द्वेषाचे समर्थन होऊ शकत नाही. काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अपघातानंतर जी द्वेषाची कावीळ पाहायला मिळाली ती निषेधार्ह आहे.

मात्र, ही द्वेषाची कावीळ षंढपणाने अन थंडपणाने नजरेआड करणारे अधिक निषेधार्ह अन घातक आहेत. मूळ कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या अनेक रंगछटा, कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, लोहियावादी, मानवतावादी, स्त्रीवादी, पुरोगामी; या सगळ्या टोळ्या; तसेच यापैकी कोणत्याही टोळीत सामील नसलेला आणि स्वत: विचार करणारा मोठा समाज; ज्या वेगवेगळ्या कारणांनी मुग गिळून बसतो, स्पष्ट बोलण्याचे, लिहिण्याचे टाळतो; ते अधिक आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. दलित, बहुजन, मागास, महिला, आदिवासी इत्यादी विशेषणे लावणाऱ्या सामान्य माणसाला द्वेष मान्य आहे का? नसेल, तर तो अशा वेळी ठाम व स्पष्ट मतप्रदर्शन का करीत नाही. चांगुलपणा आणि नीतिमत्तेच्या गोष्टी करण्याचा सारा नैतिक अधिकार या लोकांनी गमावला आहे.

खुद्द भाजप आणि अन्य राष्ट्रवादी, हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती आणि शक्ती यांचीही मर्यादा अशा वेळी उघड होते. त्यांनीही आपल्या भूमिकांचा आणि धोरणांचा पुनर्विचार करायला हवा. आज भाजपकडे सगळ्या समाजगटांचे मोठे संख्याबळ आहे. परंतु कोणीही कोणत्याही कारणाने कोणाचा द्वेष करू नये, करता कामा नये; असे बोलण्याची त्यांचीही हिंमत नाही. त्यांच्याही भूमिका `कोणाला काय वाटेल' या राजकीय हिशेबातच घुटमळत राहतात. दलित, बहुजन, आदिवासी अशा अनेक गटातटांनी सवर्ण अन ब्राम्हण द्वेषातून बाहेर यावे हे आवाहन का करता येऊ नये? का केले जाऊ नये? सामान्य मानवी सद्गुणाला सत्तेचे बटिक व्हावे लागणे ही लोकशाहीची भयाण शोकांतिका आहे.

- श्रीपाद कोठे

२६ मे २०१७

space आणि स्थान

काल बारावीचा निकाल लागला. आज वृत्तपत्रात सगळीकडे एकच प्रश्न- तू कोण होणार आहेस? उत्तरंही नेहमीचीच. गेली कित्येक वर्ष यात काहीही वेगळं दिसत नाही. तू कोण होणार आहेस? या प्रश्नावर, मी माणूस होणार आहे, मी संत होणार आहे, मी ईश्वर होणार आहे; असं उत्तर कोणी दिल्याचं आठवत नाही. तुम्ही म्हणाल- अहो, तो प्रश्न अन ते उत्तर अगदी छोट्याशा मर्यादित अर्थानेच असतं. त्यात कशाला बाकीच्या गोष्टी घुसवता. हा तर्क अन युक्तिवाद अगदी बरोबर आहे अन तो मला पटतोही. मात्र त्यावरच माझा आक्षेपही आहे. एखादी गोष्ट पटणे, म्हणजे ती योग्य असणे नव्हे. माझा आक्षेप हा की, हे मर्यादितपण, हे तात्पुरतेपण आपण शिक्षणाचा, शिक्षण व्यवस्थेचा; एवढेच नव्हे तर जीवनाचा भागच बनवून टाकला आहे. हे मर्यादितपण, हे तात्पुरतेपण सगळ्या समस्यांचे मूळ आहे. आयुष्यातल्या कोणत्याही वळणावर, कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही थांब्यावर, अथवा कोणत्याही क्षणावर; व्यापक जीवनादर्श पुढे ठेवणंच आम्ही विसरलो आहोत अथवा आम्ही ते सोडून दिले आहे. परिणामी प्रेरणा खुंटल्या, विचारशीलता अधू झाली. चतुराई वाढली, पण समंजसपणा- विवेकीपणा- विचारशीलता- लोपली. चतुराई वाढल्याने क्षमता, कौशल्य इत्यादी वाढले. पण कशासाठी हे सारे, याचा विवेक गमावला आणि भेसूर निरर्थकता जन्माला घातली. ज्यांना जगण्याचे प्रश्न आहेत त्यांचे असमाधान समजून तरी घेता येईल, पण ज्यांना खाणेपिणे, राहणेजगणे, औषधपाणी यांच्या समस्या नाहीत त्यांचे असमाधान कसे समजून घ्यायचे? हे असमाधान एकतर चुकीच्या मार्गाने गेल्याने आलेले असते किंवा आतील आध्यात्मिकता ढवळून निघाल्याने आलेले असते. दोन्ही गोष्टी व्यापक जीवनादर्शाच्या अभावी आलेल्या असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दिली जाणारी समर्याद उत्तरे पुढे गेल्यावर कोणत्या आकांक्षा निर्माण करतात? मला जगातील सगळ्यात मोठा डॉक्टर व्हायचे आहे, मला सगळ्यात मोठा व्यापारी व्हायचे आहे, सगळ्यात मोठा वकील व्हायचे आहे, सगळ्यात मोठा अमुक व्हायचे आहे, सगळ्यात मोठा तमुक व्हायचे आहे... ना आर्यभट्टाने, ना कणादाने, ना सुश्रुताने, ना न्यूटनने, ना आईनस्टाईनने, ना शंकराचार्यांनी, ना येशूने, ना रामाने, ना कृष्णाने; कोणीही मला जगात सगळ्यात मोठे अमुक व्हायचे वगैरे ठरवले नव्हते. ते स्वत: जे होते तेच राहिले अन स्वत: अधिक अधिक उंच, व्यापक, सखोल होत राहिले. `कोणापेक्षा' हा विषयच त्यांच्या गावी नव्हता. आजही काही लोक हे स्वत:सारखे राहण्याचे अन स्वत: उंच, व्यापक, सखोल होत जाण्याचे तत्व बोलतात. मात्र ज्यांची नावे वानगीदाखल वर घेतली आहेत त्यांच्यात अन या लोकात एक मूलभूत फरक आहे. ते लोक स्वत: मोठे झालेत दुसऱ्यांसाठी, हे लोक स्वत: मोठे होतात स्वत:साठी. `कशासाठी' या प्रश्नाच्या उत्तरात सगळा दृष्टीकोन सामावलेला असतो. म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घोषणा दिली- `कृण्वन्तो विश्वमार्यम' सगळ्या जगाला आर्य करण्याची, सगळ्या जगाला उन्नत करण्याची. `मी' माझी space आणि माझे स्थान यांची काळजी करतानाच, बाकीच्यांची space आणि बाकीच्यांचे स्थान यांचीही काळजी घ्यायला हवीच. मी जगातला सगळ्यात मोठा अमुक होईन असे कोणी म्हणतो तेव्हा तो अन्य कोणाची तरी space आणि स्थान लाटत असतो एवढे खरे. आयुष्याच्या सगळ्या वळणांवर व्यापक जीवनादर्शांची चर्चा म्हणूनच व्हायला हवी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २६ मे २०१६

गरमी

या मोसमात देशभरात गरमीने ६०० लोकांचा बळी घेतला आहे. अनेकांना विविध आजार आणि त्रास होत आहेत ते वेगळे. ही गरमी आज नव्याने आलेली नाही. भारताचे भौगोलिक स्थान असेच आहे की, येथे गरमी स्वाभाविक आहे. ती काल होती, आज आहे अन उद्याही राहील. फरक फक्त एवढाच झाला आहे की, गरमी शोषणारे घटक कमी झाले आहेत आणि गरमी वाढवणारे घटक वाढले आहेत. माती, पाणी, झाडे कमी झालीत. त्यांची जागा सिमेंट कोन्क्रीटने घेतली. सिमेंट कोन्क्रीट, टाईल्स, काचा, धातू इत्यादी गोष्टी उष्णता शोषून घेत नाहीत. दुसरीकडे, एअर कंडीशनर, पेट्रोलचे ज्वलन, विजेचा वापर हा उष्णता उत्सर्जित करतो आहे. जी तल्लखी जाणवते ती त्यामुळे. यात बदल करून उष्णता शोषून घेणारे घटक वाढवून आणि उष्णता उत्सर्जित करणारे घटक कमी करून बदल घडवता येईल. कोण घडवेल? तुम्हा आम्हालाच करावे लागेल. आपण करू का?

- श्रीपाद कोठे

२६ मे २०१५

मंगळवार, २४ मे, २०२२

कर्पूरगौरं

जिथे जिथे पूजा किंवा काही धार्मिक कार्यक्रम होतात, तिथे तिथे सगळ्यात शेवटी `कर्पूरगौरं...' आरती होते. खरं तर ते भगवान शिवाचं नमन आहे. मुळात ती आरती नाहीच. तो नमनाचा श्लोक आहे. म्हणून पाहावा हवं तर. शेवट काय आहे- नम: शिवायै च नम: शिवाय. शिवाय त्यात शिवाचं वर्णन करताना त्याचा रंग कसा आहे हे सांगण्यासाठी शब्द वापरला आहे- कर्पूरगौरं. त्या श्लोकाचा कापूर वा आरती यांच्याशी काही संबंध नाही. पण कसा आणि कुठून तरी हा प्रकार सुरु झाला आणि रूढ झाला. म्हणजे तो सुरु ठेवण्याला वगैरे माझा काही आक्षेप नाही. पण एक नोंद करावीशी वाटली आणि या प्रकाराचे मूळ कुठे आणि काय, हे जाणण्याची उत्सुकता वाटली. एवढ्यासाठीच. बाकी - नम: शिवायै च नम: शिवाय.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१४

थोडे लक्ष इकडेही...

सध्या उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे, छंद वर्ग वगैरे बरेच सुरु आहेत. अनेक गोष्टी मुलामुलींना तिथे शिकवल्या जातात. पण असं लक्षात येतं की, खूप छोट्या छोट्या गोष्टी; आवश्यक असून आणि आयुष्यभरासाठी असूनही दुर्लक्षित राहतात.

१) चपला, जोडे नीट रांगेत ठेवणे. पादत्राणे दारापुढे काढू नये. पादत्राणे घालून घरात जाऊ नये. काही कामांच्या ठिकाणीही पादत्राणे आत नेता येत नाहीत. तिथे सरळ, जोडीने आणि रांगेत ती ठेवावी. कशीही टाकू वा फेकू नयेत.

२) सायकली किंवा अन्य वाहने नीट उभी करणे. वाहने दारापुढे उभी करू नयेत, अंतर ठेवून उभी करावीत, एका वाहनामागे लागून दुसरे वाहन उभे करू नये. आपल्याला वा दुसऱ्याला काढता येईल अशी वाहने उभी करावी.

३) रुमाल, पेन, मोबाईल, पाकीट, किल्ल्या योग्य पद्धतीने जागच्या जागी ठेवावे.

४) कपड्यांच्या घड्या कशा घालाव्या. कपडे बोळे किंवा गोळे करून टाकू नये.

५) पायपुसणी कशी ठेवावी.

६) रिमोट, चार्जर इत्यादी वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात.

७) तेलाच्या बाटल्या, पावडरीचे डब्बे बंद करून ठेवावे. कंगवा साफ करून जागच्या जागी ठेवावा.

८) हातपुसणी (नॅपकिन्स) कोंबून किंवा गोळा करून न ठेवता मोकळे ठेवावे.

९) चादरी कशा आंथराव्या, खोळा कशा घालाव्या, पांघरुणांच्या घड्या कशा कराव्या.

१०) पाणी कसे भरावे. बादल्या भरताना किंवा नळाखाली लावताना काय काळजी घ्यावी.

११) भांड्यांवर झाकण्या कशा ठेवाव्या.

१२) केर काढणे, जाळी जळमट साफ करणे, केर भरणे.

१३) संडास, बाथरूमची स्वच्छता. संडास, बाथरूम वापरल्यानंतर स्वच्छ आणि नेटके करून बाहेर येणे.

१४) झाडांना पाणी टाकणे.

१५) गाण्यांचा वा टीव्हीचा आवाज मर्यादित ठेवणे.

१६) कचरा जागच्या जागी टाकणे.

१७) दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याची चूक सुधारून घेणे किंवा देणे, स्वत:च्या हातापायाने काम करणे- यात काहीही वाईट, कमीपणाचे, अपमानजनक नाही हे समजावणे.

१८) धुतलेले कपडे नीट पिळून, झटकून, टोकाला टोक जुळवून वाळत घालणे.

१९) स्वयंपाक वा जेवणानंतर भांडी स्वच्छ करून, एकात एक घालून, त्यात पाणी घालून आटोपशीर पद्धतीने ठेवणे.

२०) पाण्याच्या बादल्या, टब, मग्गे अस्ताव्यस्त न ठेवणे.

२१) वर्तमानपत्र नियमित वाचणे आणि जुने वर्तमानपत्र पतंगीसारखे न उडवता, व्यवस्थित घडी घालून गठ्ठा करून ठेवणे.

यादी आणखीनही वाढू शकेल. पण या गोष्टी सांगणे, करवून घेणे, अंगी मुराव्या म्हणून त्याचा वारंवार सराव करून घेणे; या गोष्टी आढळत नाहीत. यामुळे चांगल्या सवयी, व्यवस्थितपणा तर निर्माण होईलच; पण सौंदर्यदृष्टी (ज्याचा प्रचंड अभाव जाणवतो) निर्माण होऊन जन्मभर या गोष्टींचा उपयोग होईल. घरात किंवा घराबाहेर होणारे अनेक संघर्ष सुद्धा कमी होऊ शकतील.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१५

रामायण आणि प्रतिसृष्टी

वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकी होणे हा भारताचा जगाला संदेश आहे. त्यांनी जगाला रामायण दिले. दुसरे ऋषी विश्वामित्र. यांनी प्रतिसृष्टी निर्माण केली. यातील रामायण कालजयी ठरले. आजही त्याची ओढ अन त्यातील तत्वांचे अन मूल्यांचे आवाहन कायम आहे. प्रतिसृष्टी मात्र फक्त पुराणकथेत उरली आहे.

आजही रामायण आणि प्रतिसृष्टी हे दोन्ही प्रवाह आहेतच. पैसा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, पौरुष, सत्ता यांच्या भरवशावर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे प्रयत्न, संकल्प आहेतच. अन दुसरीकडे या सगळ्याच्या मर्यादा सांगणारी `रामायणी वृत्ती'ही आहे. नराचा नारायण झालेल्या महर्षींनी केलेल्या दोन महान कार्यांपैकी काय टिकले हे जग पाहतं आहे. आज तर नारायणाचा नर होण्याची घोडदौड सुरु आहे, अन त्याच वेळी प्रतिसृष्टीची मनोरथेही. काळाचा फैसला मोठा छान असेल. पण आपण तो फैसला ऐकण्यासाठी राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१६

मानवतावाद

तथाकथित मानवतावादी लोकांवर बरीच टीकाटिप्पणी होत असते. मीही करीत असतो. परंतु हा विषय त्यापेक्षा सखोल विचार करण्याचा आहे. करुणा आणि न्याय हे दोन आजच्या वर्तमान मानवतावादाचे स्तंभ आहेत. आजच्या नीतीचेही हेच दोन स्तंभ आहेत. खरी मेख इथे आहे. वास्तविक करुणा आणि न्याय या वाईट गोष्टी खचितच नाहीत. परंतु त्या स्वयंभू वा स्वयंपूर्ण नाहीत. त्या निरपेक्षपणे चांगल्या नाहीत. सध्या सुरु असलेल्या मेजर गोगोई प्रकरणाचे उदाहरण घेतले तर हा विषय आणखीन स्पष्ट होईल. मेजर गोगोई यांच्यावर टीका होते आहे. का? त्याने एका आंदोलक तरुणाला जीपला बांधले म्हणून. यात एक गोष्ट खरी आहे की, त्या तरुणाच्या जीवाला धोका होता. हा करुणेचा विषय आहे. मात्र त्याच वेळी हेही तेवढेच खरे आहे की, सुमारे दोन डझन लोकांच्या जीवाला भडक डोक्याच्या ९०० तरुणांचा धोका होता. या दोन धोक्यातील फरक हा आहे की- जीपला बांधलेल्या तरुणाचा धोका स्पष्ट होता, तर दोन डझन लोकांना असलेला धोका hidden होता. तो foresee करावा लागतो. या ठिकाणी करुणेची मर्यादा स्पष्ट होते. ती म्हणजे, निर्भेळ करुणा पुढील धोके वा पुढील गोष्टी foresee करू देत नाही. ती सदसद्विचाराला पंगु बनवते. निर्भेळ करुणेची दुसरी मर्यादा म्हणजे- ती गैरफायदा घेते वा घेऊ शकते हे लक्षात घेतले जात नाही. आज काश्मिरात सतत होणारी दगडफेक आणि त्याची पाठराखण करणारे देशी वा विदेशी, मानवी करुणेच्या आडून स्वत:चे स्वार्थ साधून घेतात. परंतु बहुसंख्य लोकांच्या मनात मानवता म्हणजे निर्भेळ अन निरपेक्ष करुणा ही भावना असल्याने; तसेच आजच्या कायद्यांचा आधारही हाच अपूर्ण मानवतावाद असल्याने गोंधळ निर्माण होतो. हीच बाब न्यायाची सुद्धा आहे. न्यायाच्या मर्यादा लक्षात न घेता केवळ न्याय न्याय हा धोशा लावला जातो. करुणा किंवा न्याय या दोन्ही गोष्टी चांगल्या अन योग्य असल्या तरीही त्या स्वत:त परिपूर्ण नाहीत. compassion and justice are not complete in itself. त्यांचा विचार आणि निर्णय, अन्य त्याहून व्यापक अशा परिमाणाच्या संदर्भात करावा लागतो. आज सगळ्याच विचारातून, व्यवस्थातून, सिद्धांतातून हे जीवनव्यापी प्रयोजनाचे व्यापक संदर्भ लुप्त होऊन, मानसिक वा बौद्धिक लहरी हाच मुख्य आधार झाला आहे. खरा मुद्दा हा आहे. त्याला आव्हान दिल्याशिवाय चक्रव्यूह भेदला जाणे कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१७

चर्चेची भाषा

आपल्या विचारांची अन चर्चेची भाषा बदलण्याची मोठी गरज आहे. उदा. - १)  'सरकारने जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायला हव्यात.' २) 'जनतेच्या कल्याणासाठी सरकार.' ही दोन्ही वाक्ये भ्रम निर्माण करतात, गोंधळ उत्पन्न करतात, चुकीची मानसिकता निर्माण करतात. याचे खूप वेगवेगळे परिणाम होतात. हे परिणाम केवळ perception चे नसतात, प्रत्यक्ष व्यवहारातही होतात, अंमलबजावणीत होतात. अगदी एखादा प्रबंध लिहिता येईल एवढी त्याची व्याप्ती आहे. 'सरकारचे ध्येय आणि हेतू, लोककल्याण हेच असायला हवे.' ही आणि एवढी शब्दरचना योग्य आणि पुरेशी होऊ शकते. अघळपघळ, भावनेच्या भरात, अन विशिष्ट स्वार्थी हेतू ठेवून वापरली जाणारी भाषा अनिष्ट ठरते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत, शब्दांच्या वापरात, वाक्यरचनेत; खूप सारे बदल करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१८

रामदेवबाबा विवाद

रामदेवबाबा विवाद हा आपली विचार पद्धती किती सडली आहे याचं उदाहरण आहे. लिहिता पुष्कळ येईल पण तूर्त एकच मनोभाव - उपचार पद्धती आणि वैद्यकीय पद्धतींच्या तुलनात्मक चिकित्सेचा विषय कचऱ्याच्या टोपलीत जाऊ नये.

प्रामाणिक भावना, प्रामाणिक कृती, प्रामाणिक कष्ट; हे सगळ्या गोष्टींचं समर्थन नाही होऊ शकत. विद्यमान वैद्यक शोषण करतं, त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, त्याला पुष्कळ चिकित्सेची गरज आहे; हे का नाकारावं; याकडे का दुर्लक्ष करावं? आधुनिक वैद्यक परिपूर्ण आहे का?

ज्या पद्धतीने ima चे लोक चिडले त्यावरून 'दाल मे कुछ काला है' हा निष्कर्ष काढता येऊ शकतो. अशा विचार पद्धतीने कोणत्याही शास्त्राचा किंवा मानवतेचा विकास नाही होऊ शकत. हा विवाद भारतीय ethos शी सुसंगत नाही.

साध्या नाक्यावरच्या औषध दुकानदारांनाही चारचाकी गाड्या अन विदेश पर्यटन offer करणाऱ्या औषध कंपन्या नफेखोरी करत नाहीत का?

अलोपॅथी काय किंवा आयुर्वेद काय किंवा होमिओपॅथी काय; कोणाकडेही रामबाण उपाय नाही, जादूची कांडी नाही. आरोग्य क्षेत्रासाठीचे हे वाक्य जीवनाच्या अन्य क्षेत्रांनाही लागू होतेच. प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र यातून मानवजात बाहेर यायला हवी.

या देशाची संस्कृत भाषा, या देशातील विभिन्न मातृभाषा, या देशातील वेशभूषा, या देशातील खाद्यपदार्थ; सगळं एकेक संपवणं सुरू आहे. त्यात आयुर्वेदही आहे. एकेक करून सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेण्याच्या भांडवलशाही वृत्तीचा हा प्रयत्न आहे. भांडवलशाहीला विरोध करणारे डावे मात्र, दुर्दैवाने भारत विरोधासाठी भांडवलशाही set करत असलेल्या अजेंड्याला पाठिंबा देतात.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०२१

रविवार, २२ मे, २०२२

बिना आंघोळीने

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचं प्रशिक्षण घेतलं तेव्हा महिन्याभरात एकदा किंवा दोनदा सूचना राहत असे- `आज पाणी पुरेसे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही आंघोळी करू नये. पिण्याचे पाणीही जपून वापरावे. वाया घालवू नये.' वर्गातील शेकडो स्वयंसेवक (वर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले, शिक्षक, वर्गाच्या व्यवस्थेतील, अधिकारी... सगळे स्वयंसेवक) सूचनेचे पूर्ण पालन करीत आणि भर मे महिन्याच्या नागपुरातील उन्हाळ्यात कोणतीही कुरकुर न करता आनंदाने राहात. वर्गाच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमातही काहीही बदल होत नसे.

संघ शिक्षा वर्गाचे द्वितीय वर्ष क्षेत्रश: सुरु झाले, तेव्हा नागपूरच्या स्वयंसेवकांच्या गटासोबत मी, विजय खळतकर आणि श्याम पत्तरकिने असे तिघे जण शिक्षक-व्यवस्थापक म्हणून नाशिकला गेलो होतो. तेथे गोदावरीच्या काठावर गंगापूर रोडला के.टी.एच.एम. महाविद्यालयात वर्ग होता. त्या वर्गात पहिल्यांदा पूर्ण महिनाभर आंघोळ करायला मिळाली. पाण्याची कमतरताच नव्हती. एक तर बाजूच्या गोदावरीमुळे ऊन जाणवतच नव्हते. रात्री तर थंडी वाजत असे. त्यावेळी याच गोष्टींचे खूप अप्रूप वाटले होते.

- श्रीपाद कोठे

२३ मे २०१५

अवास्तव किमतींचे वास्तव

आजच्या वर्तमानपत्रात सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २०-२५ टक्के कमी केल्याची बातमी आहे. ही रक्कम आठ हजारापेक्षा अधिक आहे. किमती एवढ्या कमी केल्या म्हणून अनेकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असेल. आता आपण हा फोन घ्यायला काही हरकत नाही असा विचार काहींनी केला असेल. मनात विचार आला, आता ही कंपनी तोटा सहन करून हे स्मार्टफोन विकणार की काय? तसे तर शक्य नाही. कोणताही व्यापारी तोटा सहन करून माल विकत नाही. तो माल खराब होणारा असला, सडणारा असला, बाजारात अतिप्रचंड प्रमाणात असला तरच एखादे वेळी असे होईल. परंतु टिकणारा, कारखान्यात तयार झालेला, मागणी असलेला माल असा तोटा स्वीकारून कोणी विकणार नाही. यासाठी काहीतरी कारण खासच असले पाहिजे. ते कारण जे काही असेल ते असो. एक खरे की आता त्या फोनवर कंपनीने नफा थोडा कमी केला. याचा अर्थ कंपनीने आतापर्यंत भरपूर नफेखोरी केली.

जगात आठ हजार रुपयात महिन्याचा संसार करणारी कुटुंब आहेत आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त आकारणारी कंपनी आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त देणारे लोक आहेत. कशाचा कशाला मेळ नाही. ही नफेखोर वृत्ती अनेक ठिकाणी आढळते. कधी कधी मोटारींच्या किमती काही हजाराने कमी केल्याच्या अशाच बातम्या वाचायला मिळतात. बरे, काही धोरणात्मक बदल झाले, सरकारचे कर कमी झाले वगैरे प्रकार असेल तर गोष्ट वेगळी. तसे नसताना ग्राहकी आकर्षित करण्यासाठी किंवा माल खपवण्यासाठी असे भाव कमी केले जातात तेव्हा आश्चर्याऐवजी चीड येते.

माणसाच्या नफेखोरीला काही सीमा नसेल आणि कदाचित इलाजही नसेल. पण मग सरकार नावाच्या यंत्रणेचे काय? जेव्हा अशा वृत्ती वेगवेगळ्या प्रकारे गैर मार्गाने समाजाला त्रास देतात, लुटतात, शोषण करतात, गैरफायदा घेतात तेव्हा त्यावर लक्ष ठेवून नियंत्रण आणायला हवे की नाही? वस्तूंच्या वा सेवांच्या किमती ठरवण्याची काही नीती आहे की नाही? नसेल तर का नाही आणि असेल तर ती कोणत्या बासनात गुंडाळून ठेवली आहे? की ज्याला जसे वाटेल तसे भाव त्याने ठरवायचे? गेली अनेक वर्षे ग्राहक पंचायत मागणी करते आहे की, वस्तूंचे भाव निर्मितीमूल्यावर (उत्पादन मूल्यावर) आधारित असावेत. तसे होताना मात्र दिसत नाही. आपण वापरीत असलेल्या शर्ट, चपलांपासून, संगणक, गाड्या येथपर्यंत अनेक गोष्टींचे भाव अनेकदा अवास्तव असल्याचे आढळून येते.

सामान्यपणे त्याबद्दल लोकांची तक्रारही नसते. कधी कधी तर एखाद्या गोष्टीसाठी जास्त पैसे मोजणे यातच प्रतिष्ठा आणि समाधान मानले जाते. वास्तविक भाव कमी असेल आणि त्या वास्तविक भावात खरेदी केली असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी वाजवी किंमत मोजली असेल तर तो तुच्छतेचा विषय होतो. म्हणूनच एखाद्या बड्या पंचतारांकित वगैरे हॉटेलात चहा पिऊन आलो तरी आपली कॉलर ताठ होते. कारण आम्ही अवास्तव पैसे मोजलेले असतात. टपरीवरचा चहा आणि पंचतारांकित चहा यांच्या किमतीत एवढा फरक का असतो तर प्रतिष्ठेसाठी. आज अगदी कोटी कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. टाटांनी गरिबांसाठी आणलेली नॅनो आणि ऑडी यात लागणारे सामान, त्यांची जोडणी, जुळणी, रंग, मजुरी वगैरेत इतका फरक का?

तुमच्या-माझ्या मनातील पैशाशी जोडलेला उच्चनीच भाव याच्या मुळाशी आहे. निर्मितीमूल्याशी संबंध नसलेल्या किमती आपल्या प्रतिष्ठेचा गंड जोपासतात. त्यामुळे त्या आपल्यालाही हव्या असतात. आपण एक प्रकारे फसवले गेलो, ठकवले गेलो, लुबाडले गेलो याची खंत वा दु:ख आम्हाला नसते. तर आपण अधिक पैसा खर्च केला आणि कोणापेक्षा तरी अधिक पैसा खर्च केला, अवास्तव पैसा खर्च केला याचे समाधान आमच्यासाठी महत्वाचे असते. याचाच फायदा उचलून नफेखोरी केली जाते.

एक माहितीतला किस्सा वानगीदाखल सांगायला हरकत नाही. दोन कुटुंब सुटीच्या दिवशी दिवसभराच्या सहलीसाठी गेली होती. येताना गावातील एका ओळखीच्यांच्या शेतात गेली. शेतकऱ्याने स्वाभाविकच शेतातील झाडाला लागलेली संत्री, पालक ताजा ताजा तोडून पाहुण्यांना दिले. `अतिथी देवो भव' हा त्याच्यावरचा संस्कार. दोन्ही कुटुंब घरी परतली. दोन दिवसांनी त्या कुटुंबातील गृहिणीमध्ये बोलणे झाले तेव्हा एकीने संत्री, पालक यांचे कौतुक केले तर दुसरीने तिला सांगितले, `मी तर ते आमच्या कामवाल्या बाईला देऊन टाकले. नाही तरी ते काही चांगले नव्हते. त्यापेक्षा reliance fresh मध्ये चांगले आणि ताजे मिळते. मी काल तिथूनच आणली संत्री.' असे म्हणून तिने reliance fresh मधील संत्री दुसरीपुढे ठेवली. झाडावरच्या संत्र्यांपेक्षा दुकानातील संत्री तिला ताजी वाटली याचे कारण चकचकाट आणि त्यासाठी मोजलेले पैसे. तिच्यासाठी शेतकऱ्याचा स्नेह, संत्र्यांचे ताजेपण, मैत्रिणीला संत्री खाऊ घालणे; यापेक्षाही मोजलेले पैसे मोलाचे आणि महत्वाचे होते. वेगवेगळ्या संदर्भात असे अनुभव आपण कुठेही घेऊ शकतो.

मात्र ही वृत्ती अनिष्ट, अनैतिक आणि असमतोल निर्माण करणारी आहे. माणसातील प्रामाणिकता, समबुद्धीने विचार व्यवहार करण्याची उर्मी आदि गुणांचा ऱ्हास यामुळे होतो. शिवाय यातून कृत्रिम असमतोल निर्माण होतो. कच्चा माल, खनिजे, उर्जा ताब्यात घेण्याची प्रवृत्ती वाढते. साठेबाजी वाढते. उधळपट्टी वाढते. भाववाढ होते, चलनवाढ होते. परिणामी सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय असमतोल वाढतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो खर्च करतो, तुम्हाला काय हरकत आहे; असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण तो गैरलागू आणि अयोग्य आहे. मुळात पैसा आहे म्हणून खर्च करतो अशी स्थिती नसून, खर्च करण्यासाठी पैसा दिला जातो आणि मिळवला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, काही माणसांच्या प्रतिष्ठांसाठी मानवी प्रतिष्ठेचा बळी दिला जातो.

पाणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. वास्तविक पाण्यावर प्रत्येकाचा समान अधिकार असायला हवा. पण आज तुमच्या खिशात पैसे असतील तर तुम्हाला चांगले पाणी मिळणार आणि खिशात पैसे नसतील तर पिऊ नये असे पाणी मिळणार किंवा मग पाणीच मिळणार नाही अशी स्थिती आहे. याच्या पलीकडची स्थितीही एखाद्या वेळी पाहायला मिळते. उद्या ती सार्वत्रिक होऊ शकते. ती म्हणजे- पैसे असूनही पाणी मिळणार नाही. कारण एक तर पाणीच उपलब्ध असणार नाही किंवा नफेखोरी वाढल्याने तुमच्याकडील पैसे त्यासाठी पुरणार नाहीत. जगभरातील पाण्याच्या समस्येवर नजर टाकल्यास हे वास्तव स्पष्ट होते. कारण मुळात पाण्याचं मूल्य पाणी हेच आहे. लोखंडाचं मूल्य लोखंड हेच आहे. कापसाचं मूल्य कापूस हेच आहे. झोपेचं मूल्य झोप हेच आहे. प्रेमाचं मूल्य प्रेम हेच आहे. आज करोडो रुपये, सर्व सुखसुविधा, औषधे असूनही झोप गायब झाली आहे याचे कारण आपण झोपेचं मूल्य ओळखूच शकलो नाही. प्राणवायूचे मास्क लावून लोकांना फिरावं लागतं याचंही कारण हेच आहे की, आपण प्राणवायूचं मूल्य ओळखलं नाही. तसं नसतं तर प्राणवायूचा गळा घोटणाऱ्या गाड्यांना आम्ही आमच्या जगण्यात अवास्तव महत्व दिलंच नसतं.

ही सगळी एक साखळी आहे. मुळात पैसा, वस्तू, सुख वगैरे गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहे. सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २५ टक्के कमी करणे, नफेखोरी, त्यात गुंतलेली प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्या या दृष्टीशी संबंधित आहेत. सगळं जग आज या दुष्टचक्रात सापडलं आहे. हे दुष्टचक्र भेदणे आवश्यक आहे, हे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २२ मे २०१४

शुक्रवार, २० मे, २०२२

झाडे आख्यान

- खूप झाडे लावली पाहिजेत.

- झाडे लावा झाडे.

- ही जागा रिकामीच आहे ना, इथे झाड लावून टाका.

- रिकाम्या जागा झाडांनी भरा.

- काय तुम्ही झाडांचे शत्रू...

- किती रखरखीत आहे इथे, झाडे का लावत नाही.

- झाडांशिवाय जगणं हे पाप आहे.

- जितकी माणसे तितकी झाडे.

- घराचं सौंदर्य महत्वाचं आहे, पण झाडे त्याहून जास्त महत्वाची आहेत.

- झाडांशी शत्रुत्व करून इमारतींचं सौंदर्य वाढवलं तर, आपलं आणि जगाचं सौंदर्य कोमेजून जाईल.

- झाडांसाठी एखाद्याशी भांडण करायलाही हरकत नाही.

- सगळ्यांशी गोड बोलावेच, पण झाडांच्या शत्रूंशी तिखट आणि कडू बोलायला हरकत नाही.

- आपसात खूप काही निरर्थक बोलण्यापेक्षा थोडे झाडांशीही बोलावे.

- आपला स्वार्थ म्हणून तरी झाडे लावा, जगवा, वाढवा, जोपासा.

- झाडांशी शत्रुत्व म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे.

- झाडांचे महत्व न कळणाऱ्याला स्वार्थसुद्धा कळत नाही, असेच म्हणावे लागेल.

ही आणि यासारखी वाक्ये आपल्या रोजच्या बोलण्यात, व्यवहारात यायला हवीत. त्यातून एक सकारात्मक वातावरण नक्कीच तयार होईल. अन्य टिवल्या बावल्या फक्त १% कमी करून तो वेळ, ती उर्जा, तो उत्साह, ती सक्रियता झाडे (वृक्ष या अर्थाने. बाल्कनीत एखाद्या छोट्याशा कुंडीत लावलेलं दुर्लक्षित तुळशीचं रोपटं या अर्थाने नव्हे.) या विषयाकडे लावली तरी परिस्थितीत खूप फरक पडेल. सुरुवातीला कंटाळवाणं वाटू शकेल. पण हा सगळा सवयीचा भाग असतो. चित्रपट आणि क्रिकेट सारख्या कंटाळवाण्या गोष्टी आपण आवडीने चघळतोच ना !!!

शांघाय शहराची चर्चा आपल्या येथे जुनी आहे. पंतप्रधान मोदी तेथे गेल्याने तिला पुन्हा उजाळा मिळाला. तेथील वर्णनात्मक माहितीपट पाहताना जाणवला तो तेथील झाडांचा अभाव. आम्हाला अशी शहरे नको, असे मोदींना सांगण्याची ताकद सुद्धा आपण ठेवली पाहिजे. मोदींमुळे स्वच्छता या विषयालाही चांगले दिवस आले आहेत आणि ते चांगलेच आहे. पण स्वच्छता ही निसर्ग, झाडे, माती, पशू पक्षी यांच्याशी विरोधी स्वरुपात पाहिली व आचरली जाऊ नये.

झाडांचे प्रेम आम्हालाही आहे, पण त्यासाठी जंगले वाढवा. झाडांची ब्याद शहरात, घरांजवळ आणि आपल्या रोजच्या जगण्यात नको; ही भूमिकाही टाकून द्यायला हवी. झाडांची, निसर्गाची, मातीची, पशू पक्ष्यांची जवळीक वाढली तर माणसातली पशू वृत्ती, स्वार्थी वृत्ती हळूहळू आपोआप कमी होते हेही लक्षात ठेवायला हवे. प्रदूषण दूर करण्यासोबतच माणसाला माणूसपण मिळवून देण्यात निसर्गाचा वाटा असतो. त्याकडे डोळेझाक नको.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०१५

अनोखे कोकणची सोनल

आज अचानक आठवली सोनल. `अनोखे कोकण'मधील सोनल. `अनोखे कोकण' हे एक प्रदर्शन आहे गणपती पुळेचं. गणपती पुळे या कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील प्रसिद्ध ठिकाणी असलेलं. जुन्या कोकणातील गाव कसा होता. त्याचे व्यवहार कसे चालत वगैरे या ठिकाणी शिल्पांकित करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन पाहायला गेलो तेव्हा ते दाखवण्यासाठी आणि समजवण्यासाठी जी मुलगी माझ्यासोबत मार्गदर्शक म्हणून होती ती सोनल. अशा आजूबाजूच्या खेड्यातील काही मुली तिथे काम करतात. त्यांना तयारही छान केले आहे. त्या सारे समजावून सांगतात. हे `अनोखे कोकण' दाखवताना आम्ही एका शिल्पासमोर उभे राहिलो. सोनल सांगू लागली- `हा कासार. हा मुलींना, बायांना बांगड्या भरून देतो. लहान मुलींना बांगड्या भरून देण्याचे तो पैसे घेत नाही. दहाव्या बाराव्या वर्षी मुलीचे लग्न होत असे. तेव्हाही हा बांगड्या भरून देत असे. तेव्हा त्याला मुलीचे वडील एक सोन्याचा तुकडा देत असत. तो त्याला पुरे. दुसऱ्या एखाद्या मुलीचं लग्न होईल तेव्हा पुन्हा दुसरा सोन्याचा तुकडा. एक प्रकारे आजच्या भाषेत सांगायचं तर, तो दहा वर्षांचं क्रेडीट देत असे.' त्या शिडशिडीत बांध्याच्या काळ्यासावळ्या कोकणी खेड्यातील सोनलच्या तोंडून क्रेडीट शब्द आला तेव्हा छान वाटलं. तिला त्याचा अर्थ फार समजत असावा किंवा नसावा. ती शिकवल्याप्रमाणे सांगत होती. पण नकळत माझ्यासारख्या शहरी माणसाला आपल्या समाज जीवनात मुरलेल्या विश्वास आणि मानवतेचं दर्शन मात्र त्यामुळे घडलं होतं. आजच्या अर्थकारणात लोप पावलेल्या आणि पारंपरिक अर्थकारणाचा जणू आधारच असलेल्या विश्वास आणि मानवता, या दोहोंची रुजवणूक पुन्हा कशी होऊ शकेल? सगळ्यांनी विचार करावा असाच प्रश्न आहे, नाही का?

- श्रीपाद कोठे

२१ मे २०१५

सर्वांगीण

मूळ ओंकार, त्याचं सात स्वरात विभक्त होणं, पुढे तो पसारा सावरण्यासाठी २२ श्रुतीत त्याची विभागणी; अन पुन्हा विविध स्वरांचा मेळ घालीत मूळ ओंकाराकडे जाणे; म्हणजे संगीत. परंतु हे केवळ संगीताला लागू नाही, तो सृष्टीचा सनातन नियम आहे. वर्गीकरण आणि समानीकरण, पृथक्करण आणि एकीकरण, संघटन आणि विघटन, शक्तीसंचय आणि शक्तीक्षय, विश्लेषण आणि संश्लेषण; या आणि यासारख्या क्रिया सतत सुरू असतात. तोच सृष्टीचा आधार आहे. दुर्दैवाने १९ व्या शतकापर्यंतचे विज्ञान आणि त्याला आधार बनवून जगभर झालेले प्रबोधन यांनी वर्गीकरण, पृथक्करण, विश्लेषण यांनाच उचलून धरले. अणूच्या आंतररचनेपासून जीवनाच्या हेतूपर्यंत भेदांचीच मांडणी केली. ती चूक नाही पण भेदांचा पुन्हा मेळ घालायचा असतो हा सृष्टीचा नियम त्याने अडगळीत टाकला. यातून दोन प्रवृत्ती उदयास आल्या - पृथकता नाकारणे आणि पृथकताच सत्य मानणे. एकच काहीतरी सत्य असू शकते, एकच काहीतरी कारण असू शकते, एकच काहीतरी आधार असू शकतो, एकच काहीतरी अर्थ असू शकतो; यासारख्या एकांगी वृत्तीचे अमाप पीक आले. आज त्याचाच धुडगूस सर्वकाली, सर्वदेशी, सर्वलोकी, सर्वत्र पाहायला मिळतो. कायद्यापासून  नितीपर्यंत, आरोग्यापासून शिक्षणापर्यंत,  बाल संगोपनापासून विज्ञानापर्यंत, कृषीपासून तत्वज्ञानापर्यंत. २० व्या शतकातील विज्ञानाने कूस पालटली असली आणि एकांगी, एकसुरी, एकरेशीय दृष्टी मोडीत काढली असली तरीही त्याला वैज्ञानिक दृष्टी म्हणून मान्यता मिळालेली नाही आणि नवीन अनेकांगी दृष्टी विकसित करणारे जीवनव्यापी प्रबोधनही झालेले नाही. अगदी अत्याधुनिक समजले जाणारे विचार सुद्धा आत्यंतिक एकांगीपणाने ग्रस्त आहेत. विचारपद्धती, विचारक्षमता, दिशा या सऱ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. यात बदल करण्यासाठी वैज्ञानिकता याऐवजी सर्वांगीण किंवा सर्वांकष असा शब्दप्रयोग हे पहिले पाऊल म्हणून उचलायला हवे.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०१८

शाश्वत धर्म

भारताबाहेरील बहुतांश समाज युगधर्म आणि आपद्धर्म यांच्याच आधारे चालतात. शाश्वत धर्माचा विचार तेथील पुष्कळांनी केला आहे पण भारताएवढा नाही. अन भारतीय समाजात शाश्वत धर्म मुरवण्याचा जेवढा सातत्यपूर्ण प्रयत्न झाला तेवढा अन्यत्र झाला नाही. जे प्रयत्न झाले ते अयशस्वी राहिले. भारतात युगधर्म आणि आपद्धर्म यासोबतच शाश्वत धर्माचा प्रवाहदेखील वाहत राहिला. हा प्रत्येक धर्म पार पाडणारे वेगवेगळे होते, त्यांची भाषा वेगवेगळी राहत असे, त्यांचे विषय आणि प्रतिपादन वेगवेगळे राहत असे, त्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असत. त्यामुळेच भारताबाहेरच्या समाजांना अभिप्रेत असलेली monolithic एकता भारतात नाही. मानव जातीसमोरील आजचे प्रश्न, आजच्या समस्या या monolithic विचारांमुळे उत्पन्न झालेल्या आहेत. शाश्वत धर्माची विश्वव्यापी चर्चा घडवण्याची आणि त्याला मानव जीवनात रुजवण्याचा प्रयत्न करण्याची ही एक चांगली संधीही आहे. या दिशेने पुढे जायला हवे. त्यामुळे विश्व मानव जातीपुढील समस्या कमी होण्यासोबतच भारताचे श्रेष्ठत्वही सिद्ध होईल. भारतीय श्रेष्ठत्वाची चर्चा करून ते होणार नाही.

- श्रीपाद कोठे

२१ मे २०२१

बुधवार, १८ मे, २०२२

संपत्तीचा अधिकार

 

लॉकडाऊनमुळे अर्थकारणाची मोठी चर्चा जगभरात सुरू आहे. काय झालं नेमकं लॉकडाऊनमुळे? आदल्या दिवशीपर्यंत असलेली संपत्ती, पैसा, लॉकडाऊन झाल्याबरोबर संपून गेला का? उडून गेला का? जादूने गायब झाला का? जळून राख झाला का? असं काहीच झालं नाही. पैसा जेवढा होता तेवढाच होता. फक्त एकच झाले की त्याचे फिरणे बंद झाले. हे फिरणे सुरू होणे एवढीच फक्त महत्वाची गोष्ट. पण तसे न होता, किंबहुना पैसा पुन्हा फिरू लागण्याचे प्रयत्न सुरू होण्यापूर्वीच जगभरातील सरकारांनी अर्थव्यवस्थेत अतिरिक्त पैसा ओतणे सुरू केले. यामुळे अर्थकारणात पैसा वाढणार. आधीचा पैसा जिथल्या तिथे आणि अर्थचक्र फिरण्यासाठी नव्याने पैसा. हा अधिकचा पैसा येतो कुठून? १) नवीन वा वाढीव कर, २) कर्ज, ३) चलनाची नवीन छपाई. याच्या परिणामी चलनवाढ म्हणजेच सामान्य भाषेत महागाई वाढते. अर्थचक्र फिरू लागते. पण अर्थचक्रातील पैसा फारसा वाढत नाही. जी वाढ दिसते ती फक्त कागदांवर. कारण कागदांवर जुना पैसा आणि नवीन पैसा एकत्र दिसतो पण प्रत्यक्षात जुना थांबलेला पैसा जिथला तिथे साचतो. नवीन पैसा व्यवहारात फिरतो. ही एक प्रकारे स्वतःची, अन अर्थकारणाची फसवणूक आहे. वर्षानुवर्षे अशीच फसवणूक होत आली आहे. त्यामुळे जगातला एकूण पैसा आणि माणसांचे जगणे यांचा ताळमेळ कधीच बसत नाही. यासाठी नवीन पैसा ओतण्याआधी एका ठिकाणी थांबून संचय होणारा पैसा अर्थचक्रात कसा येईल याचा विचार करावा लागेल. पण कसा येईल हा पैसा अर्थचक्रात? ज्यांच्याकडे काही दिवस वा काही महिने खर्च चालवण्याची क्षमता आहे त्यांचा पैसा फिरत राहतो. पण ज्यांच्याकडे त्याहून अधिक वा खूप अधिक आहे त्यांचा पैसा मात्र साचून राहतो. तो त्यांचा पैसा असल्याने त्याला हात लावता येत नाही. सरकारांचा नाईलाज होतो. या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न येतो. तो म्हणजे - संपत्तीचं स्वामित्व.

संपत्ती कोणाची? संपत्तीवर अधिकार कोणाचा? या संदर्भात तीन विचार प्रामुख्याने पुढे येतात.

१) संपत्तीची मालकी व्यक्तीची. त्यामुळे त्याचा विनियोग, उपभोग यांचा अधिकार त्याचा. ही भांडवलशाही दृष्टी म्हणता येईल.

२) संपत्तीवर अधिकार समाजाचा म्हणजे सरकारचा. ही साम्यवादी दृष्टी म्हणता येईल. ती प्रत्यक्षात आलेली नाही, येऊ शकत नाही. कोणताही मानव समूह ते मान्य करू शकत नाही.

३) संपत्ती बाळगणारा हा त्या संपत्तीचा विश्वस्त आहे. हा सर्वोदयी विचार म्हणता येईल. मात्र कट्टर सर्वोदयी वा गांधीवादी तरी हे मान्य करून आपल्या संपत्तीवर उदक सोडायला तयार होतील का?

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही यासंबंधात विचार मांडलेला आहे. ते म्हणतात - 'खाजगी संपत्ती पूर्णपणे नष्ट करणे अयोग्य आहे. असे केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा, सुरक्षितता, समाधान आणि उद्यमशीलता नष्ट होतात. परंतु संपत्तीचा अनिर्बंध अधिकार व तिचा अनिर्बंध उपभोग हेही योग्य नाही. संपत्तीच्या अधिकाराला मर्यादा असल्या पाहिजेत. या मर्यादा व्यक्ती व समाज यांच्या समुचित गरजा व जीवनमूल्ये यांच्या आधारे ठरवण्यात याव्या.' याचे आणखी विवेचन करताना पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणतात - 'संपत्तीचे मानवी जीवनातील स्थान व प्रयोजन कोणते हे तपासून पाहिल्याशिवाय अर्थशास्त्राची मांडणी होऊ शकणार नाही. संपत्तीविषयक समस्यांचा विचार करताना अर्थशास्त्राला नीतीशास्त्रात व राज्यशास्त्रात शिरावे लागेल.' आज अनेक अर्थतज्ञही हाच विचार बोलू लागले आहेत की, केवळ अर्थशास्त्र मानवाच्या आर्थिक समस्या सोडवू शकणार नाही. त्याला नीतिशास्त्र, धर्म, आध्यात्म यांची जोडही द्यावीच लागेल. म्हणूनच आपला समग्र विचार मांडताना दीनदयाळ उपाध्याय स्पष्ट शब्दात सांगतात - 'समाजाला आदर्शवादी बनवावे लागेल.' आज संपत्तीच्या स्वामीत्वाची जी चर्चा होते, त्या संबंधात जे निर्णय वा विचार होतो, त्या संदर्भातले कायदे वा घटनेतील तरतुदी; या सगळ्यांपेक्षा दीनदयाळ उपाध्याय यांचा विचार वेगळा आणि मौलिक आहे. तर्काच्या आधारे अधिक योग्य आहे. समाज आणि विविध सामाजिक व्यवस्थांनी तो स्वीकारण्याचा प्रयत्न करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १९ मे २०२०

मंगळवार, १७ मे, २०२२

रिझर्व्ह बँकेचा अनैतिक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक निर्णय घेतला आहे. बँक खाते उघडण्याची व स्वतंत्रपणे वापरण्याची वयोमर्यादा १० वर्षेपर्यंत खाली आणली आहे. हा निर्णय का घेण्यात आला हे विस्ताराने वाचायला, ऐकायला मिळाले नाही. परंतु यावर व्यापक सामाजिक मंथन होणे आवश्यक आहे. नीती या शब्दाचे इंग्रजीत दोन अर्थ होतात- policy आणि morality. policy नेहमीच moral वा ethical राहीलच असे नाही. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सुद्धा तशाच प्रकारचा म्हटला पाहिजे.

या विषयाला अनेक बाजू आहेत. एक तर या वयात मुलांकडे बँक खाते काढण्यासाठी पैसा असतो का? बालकांना काम करण्यास कायद्याने बंदी असल्याने त्यांच्याजवळ कमाईचे पैसे असणार नाहीत. जे काही पैसे असतील ते आई-वडिलांनी दिलेले खाऊचे, खेळण्याचे, वाढदिवस वा तत्सम प्रसंगाचे पैसे असतील. घरच्या घरी ते साठवणे आणि मोठी रक्कम जमा झाली की त्याचा विनियोग करणे हे रूढ आहे. मुलांना पैशाचे महत्व पटवून देणे, बचतीची सवय लावणे यासाठी ते योग्य आहे आणि पुरेसेही. त्याहून अधिकची गरज आहे का?

रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याने बँका मुलांची खाती उघडण्याचा प्रयत्न करतील. जाहिराती होतील, कदाचित शाळातून प्रयत्न होतील, अन्यही मार्ग उपयोगात आणले जाऊ शकतात. त्यामुळे मुलांमध्ये खाती उघडण्याची चढाओढ लागेल. त्यातून अनिष्ट स्पर्धा सुरु होईल. नको असलेलं श्रेष्ठ कनिष्ठत्व सुरु होईल. ते वय लक्षात घेता हे प्रकार किती विविध पद्धतींनी परिणाम करतील याचा विचार रिझर्व्ह बँकेने केला असेल असे वाटत नाही. यामुळे घरोघरी अशांतता निर्माण होईल. अभ्यासाची मानसिकता बिघडेल. जी मुले खाती उघडू शकणार नाहीत त्यांच्या मनात न्यूनगंड वा हिनगंड किंवा खातेधारक मुलांचा दुस्वास निर्माण होईल. बालवयातील मुलांची वर्तणूक, त्यांची विचार करण्याची क्षमता यावर या गोष्टींचा परिणाम होईल. काही पालक सधन असतात आणि आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन, चर्चा त्यांना आवडत असते, हवीही असते. असे पालक मुलांच्या खात्यांचा त्यासाठी उपयोग करून घेतील. महिलांच्या कंपूत आपापल्या मुलांच्या खात्यांवरून चर्चा आणि हेवेदावे होतील.

दुसरे म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने मुलांना पैसा त्यांच्या मताने खर्च करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे मुलांना आई-वडिलांकडे हट्ट करण्याची गरज नाही. एकीकडे मुलांना नाही म्हणा, त्यांना नकार ऐकण्याची आणि पचवण्याची सवय लावा असे मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत आणि दुसरीकडे नकाराची, त्यातून विकसित होणाऱ्या चांगल्या-वाईट तारतम्याची व्यवस्थाच नष्ट करणारे हे पाऊल आहे. भरीसभर आज चहुभोवताल असलेली आकर्षणे. असे तर नाही की, याच कारणाने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला की, मुलांच्या हातात पैसा आला म्हणजे ते या आकर्षणांना बळी पडून अधिकाधिक खर्च करतील. एकूणच केवळ तंत्राचा विचार करण्याच्या आजच्या काळात, अर्थतंत्राचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असावा. बाजाराला उठाव देण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणून. अर्थतंत्राचा विचार करताना अर्थनीतीला तिलांजली देण्यात तसेही काय मोठेसे? अर्थकारण महत्वाचे समाज गेला खड्ड्यात.

असंख्य अर्थहीन गोष्टींनाच आधुनिकता आणि सभ्यता समजत जो गोंधळ सध्या जगभर सुरु आहे, त्याचा हा परिणाम आहे. या साऱ्या भोंगळ गोष्टी दूर सारून मुळातून विचार करण्याची, समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. आर्थिक स्वतंत्रता ही अशीच एक भोंगळ बाब. आर्थिक स्वतंत्रता हा या लेखाचा विषय नाही, पण विषयाच्या अनुषंगाने त्याचा विचार आवश्यक आहे. आज आपल्याकडे एक कुटुंब व्यवस्था आहे. जिथे ती नाही तिथे ती उभी करण्याचे प्रयत्न होतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे आश्वासन देण्यात येते. आपल्या या कुटुंब व्यवस्थेत परस्पर अवलंबित्व महत्वाचं आहे. या अवलंबित्वाचा अतिरेक आणि गैरवापर या समस्या आहेत. त्यांची चिंता करण्याची गरज आहे. पण म्हणून `आम्हाला कोणाची गरज नाही' हा उद्धट भाव योग्य तर नाहीच उलट कुटुंब व्यवस्थेला छेद देणारा आहे. it's like throwing a baby with a bathwater. पैसा, त्याचा विनियोग, त्याची उपलब्धता, निर्णय; या सगळ्यासाठी मुले-मुली आपल्या पालकांवर अवलंबून असतात. या बाबतीत हळूहळू ती स्वतंत्र होतात. यातून योग्य-अयोग्यता, तारतम्य, पैशाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते. हे असेच व्हायलाही हवे. आयुष्य ही एका दिवसात जगून घ्यायची गोष्ट नाही, एका दिवसात समजण्याची गोष्ट नाही, एका दिवसात करून टाकण्याची गोष्ट नाही. तसेच जन्माला येतानाच सगळं ज्ञान, समज वगैरे घेऊन कोणीही येत नाही. एकूणच आयुष्य ही एक विकासाची प्रक्रिया आहे. सगळ्याच अंगांना हे लागू आहे. पैसा, त्याचा विनियोग यालाही ते लागू आहे. ही प्रक्रिया मुद्दाम मोडीत काढणे वा बदलणे हे morality या अर्थाने अनैतिक आहे.

ही समज आणि दृष्टी विकसित होणे याशिवायही अवलंबित्वाचे उपयोग आहेत. त्यातील एक म्हणजे त्यातून निर्माण होणारा भावबंध. कोणासाठी काही करणं यातून होणारं मनाचं उन्नयन, त्यातून मिळणारा आनंद, वात्सल्याची भूक या साऱ्याची पूर्ती पालकांच्या दृष्टीने; तसेच कृतज्ञतेची भावना, प्रेम, आदर, अशा पद्धतीने वागायचं असतं हा संस्कार बालकांच्या दृष्टीने; या  जीवन समृद्ध करणाऱ्या बाबी आहेत. संपन्न करण्याच्या नादात समृद्धीकडे दुर्लक्ष का व्हावे? आज सगळ्या वेडपट गोष्टींकडे ओढा दिसून येतो. अमेरिकेत मुले खूप लहान वयात आई-वडिलांपासून दूर होऊन कमवायला लागतात म्हणून आम्हालाही त्याचीच ओढ लागते. माणसाचा माणूस म्हणून विचार न करता एक आर्थिक प्राणी, एक सामाजिक प्राणी, एक राजकीय प्राणी असाच विचार करणाऱ्या या आधुनिकतेच्या अशा अनेक गोष्टींचा खरे तर मुळातून विचार आवश्यक आहे.

महाकवी कालिदासाने एका ठिकाणी म्हटले आहे-

पुराणमित्येव् न साधु सर्वम्

नचापि काव्यम् नवमेत् वद्यम्

संत: परिक्षान्यतरद भजन्ते

मूढ: परप्रत्ययनेन बुद्धि:

(जुनं सारं सोनं नाही, नवीन सारं काव्य -सुंदर मधुर या अर्थाने- नाही; संत- समतोल व्यक्ती या अर्थाने- सारासार विचार करतात आणि मूर्ख लोक दुसऱ्याच्या बुद्धीने चालतात.)

काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वैद्यकीय व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबत लिहिले होते. त्यावेळी प्रख्यात अस्थीतज्ञ पद्मश्री डॉ. विक्रम मारवा यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला होता. तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आजही कानात आहे. ते म्हणाले होते, `वैद्यकीय व्यवसायाला वैद्यकीय तंत्रज्ञासोबतच वैद्यकीय तत्वज्ञाची गरज आहे.' आज सगळ्याच क्षेत्रांबाबत हे म्हणण्याची पाळी आली आहे. तंत्रशरण समाजाला तत्वज्ञानाची फार मोठी गरज आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी आपल्या `स्वरमयी' या पुस्तकात याच आशयाचं एक वाक्य नमूद केलं आहे. ते वाक्य आहे - `जो समाज तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष करून तंत्रज्ञानावर अधिक भर देतो, त्या समाजाला काही काळानंतर त्यापैकी एकाचीही गरज उरत नाही.' आशय हा की, त्याचं समाज म्हणून अस्तित्वच नष्ट होतं. या साऱ्याचा गांभीर्याने आणि मुळातून विचार केल्याशिवाय policy आणि morality यातील भेद समजणे अवघड आहे. अन हा भेद समजून घेत नाही तोवर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयासारखे समाजाच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारे अनैतिक निर्णय येतच राहणार आहेत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १८ मे २०१४

ही लढाई बरी नव्हे...

एकदा युधिष्ठिराला विचारण्यात आले- `जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते?' त्यावर युधिष्ठीर म्हणाले- `माणूस रोज स्वत:च्या डोळ्यांनी मरण पाहतो आणि तरीही स्मशानातून बाहेर पडताना असा बाहेर पडतो की, आपण अमर आहोत. जगातील हे सगळ्यात मोठे आश्चर्य आहे.' युधीष्ठिरांच्या या उत्तरावर दुमत होण्याचे कारण नाही. उलट सगळ्यांना पटेल असेच ते उत्तर आहे. पुढच्या क्षणी काय होणार हे सांगता येत नाही, सगळ्या गोष्टींची अखेर मृत्यू आहे हेही ठरलेले आहे आणि तरीही माणूस असा वागत असतो की, तो जणूकाही अमरपट्टा घेऊन आलेला आहे.

अरुणा शानभाग या अभागी महिलेचा आज मृत्यू झाला. त्यासंबंधीचे वृत्त पाहताना युधीष्ठिराच्या या उत्तराची प्रकर्षाने आठवण झाली. खरे तर गेली ४२ वर्षे त्या मृत्यूची याचना करीत होत्या, कधी यमाकडे तर कधी तुमच्या आमच्या जगाकडे. आज अखेर तो दिवस उजाडला. `मी अरुणा' नाटकात अरुणा शानभाग यांची भूमिका करणाऱ्या चिन्मयी सुभाष यांची प्रतिक्रियाही ऐकली. त्यांनी नाटकाविषयी, अरुणा शानभाग यांच्याविषयी सांगितले. आठवणींना उजाळा देताना त्या म्हणाल्या- `आम्ही त्यांचा मोठा वाढदिवस साजरा केला होता. अर्थात त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते सारे आपल्यासाठीच होते.' फार मोठा अर्थ या दोन वाक्यात आहे. खरंच जीवन म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? पाच सहा फुटाचा देह, त्याचे अवयव, चालणारा श्वास की मेंदूची प्रतिक्रियाशक्ती? मेंदूची ही प्रतिक्रिया कितीही क्षीण असली किंवा समजण्याच्या पलीकडची असली किंवा अनाकलनीय असली, तरीही त्याला जीवन वा जगणे म्हणायचे? कशाला म्हणायचे जगणे? आम्हाला तो देह पाहिला की बरे वाटते म्हणून तो टिकवायचा? त्या देहातील जे कोणी आहे त्याला बरे वाटते वा नाही याचा विचार न करताच? धडधाकट शरीराच्या व्यक्तीला शरीर सोडावेसे न वाटणे स्वाभाविक असते. तसेच ते `गलितगात्र' या शब्दाच्याही पलीकडे गेलेल्याला वाटत असेल? अगदी सर्वोच्च न्यायालयानेही दयामरणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यांची सेवा करणाऱ्या नर्सेसनी त्यावेळी पेढे वाटून आनंदही साजरा केला होता. पण खरेच `आपले वाटणे' यापलीकडे अशा गोष्टींना अर्थ असतो? मानवी जगण्याचा तराजू अशावेळी अकारण भावनांच्या बाजूने थोडा अधिक झुकतो का?

त्यांच्या अंत्यसंस्कारावरून झालेला वादही असाच दुर्दैवी. नाते आणि परंपरा यांचे कारण सांगून त्यांच्या अंत्यसंस्काराचा हक्क मागणे अयोग्यच आहे, पण आम्ही त्यांची सेवा केली म्हणून आम्हाला तो हक्क आहे हे म्हणणेही योग्य नाही वाटत. मुळात अंत्यसंस्कार करणे ही हक्काची बाब कशी असू शकते? आपण किती छोट्या छोट्या गोष्टीत अडकतो? अन युधिष्ठिराचे उत्तर आठवते. जिथे या सगळ्या जगालाच तात्पुरते अस्तित्व आहे तिथे अंत्यसंस्काराचा हक्क मागणे कसेतरीच वाटते नाही का? नर्सेसनी सुद्धा शव नातेवाईकांना देऊन टाकले असते तरी त्यांनी केलेली सेवा, त्यांचे समर्पण, त्यांची बांधिलकी कोणीही नाकारली नसती. नातेवाईकांचा तर प्रश्नच नाही. सहानुभूती पदरात पडून घेण्याचाच त्यांचा हा प्रयत्न आहे. परंतु खरा प्रश्न- कोण खरे, कोण खोटे वगैरे नाहीच. प्रश्न आहे- अधिकार वगैरेचा विचारच मुळात चुकीचा आहे हा. त्यातही माणूस गेल्यानंतर तर अशी अधिकारांची लढाई केविलवाणीच ठरते.

अर्थात हे काही नवीन नाही. अगदी सामान्य माणसांच्या सामान्य कुटुंबातही असे वाद होतात. कोणी अंत्यसंस्कार करायचे यावरून. संतांच्या शिष्यांमध्येही असे वाद झालेले आहेत आणि त्यापायी अंत्यसंस्कार दोन दोन तीन तीन दिवस रखडलेले आहेत. अलीकडच्या काळात गाजलेला वाद म्हणजे कवी ग्रेस यांचा. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी असाच वाद झाला होता आणि सुमारे दोन तास अंत्यसंस्कार खोळंबला होता. जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते, या प्रश्नावरील युधिष्ठिराचे उत्तर किती सार्वलौकिक होते याचाच प्रत्यय अशा वेळी येतो.

जीवन आणि मृत्यू यांचाही विचार अशा वेळी मनात येतोच. भारतीय राज्यघटनेने सगळ्यांना जगण्याचा मुलभूत अधिकार दिलेला आहे असे म्हटले जाते. कधीकधी गंमत वाटते याची. राज्यघटना अस्तित्वात नव्हती तेव्हा तो अधिकार नव्हता का? हा अधिकार असा देता वगैरे येतो का? देता येतच असेल तर जन्माला घालणारा सोडून कोण तो देऊ किवा काढून घेऊ शकतो? मुळात जन्म म्हणजे काय? जगणे म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? दोघांचा काय संबंध? मृत्यू म्हणजे पूर्णविराम का? मृत्यू म्हणजे अस्तित्वहीन होणे का? भगवद्गीता तर म्हणते की- मृत्यू म्हणजे केवळ वस्त्र बदलणे. जीर्ण झालेले कायारूपी वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करणे. भारतीय चिंतन तर मृत्यू मानतच नाही. आम्ही अमृताचे पुत्र आहोत, अमर आहोत, आम्हाला मरण नाहीच असे ते म्हणते. जन्म अथवा मृत्यू याचा अर्थच आम्हाला कळलेला नसताना, त्यांच्या अधिकारांची वगैरे लढाई बरी वाटत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, १८ मे २०१५

कपिल शर्मा शो

कपिल शर्माच्या कार्यक्रमात नर्सेसचा अवमान होत असल्याच्या कारणावरून पंजाबमध्ये परिचारिका आंदोलन करीत आहेत. त्यातील तथ्य मला माहित नाही. पण तरीही माझा परिचारिकांना पाठींबा आहे. त्यांनी हा मुद्दा खूप ताणावा अन कपिल शर्माच्या त्या कार्यक्रमावर बंधन यावे. तसेच हा मुद्दा न्यायालयात जावून एकूणच अशा कार्यक्रमांच्या संदर्भात मार्गदर्शक निर्देश दिले जावेत. आज विनोद, विनोदी कार्यक्रम, विनोदी दृष्टी या सगळ्याचा जो बाजार झाला आहे, तो संपुष्टात यायलाच हवा. जगातील सगळ्या गोष्टी, सगळ्या व्यक्ती, सगळ्या संस्था, सगळे विचार, एकूणच यच्चयावत सगळं काही - आपल्या बा...ची जहागीर असून आपल्या मर्कटलीलांचा कच्चा माल म्हणूनच हे जग अस्तित्वात आलं आहे, असा अनेकांचा समज आहे. असा समज असणारे वाढत आहेत. एकूणच `विनोद' या विषयाची सर्वांगानी गंभीर चर्चा आवश्यक आहे. विनोदाचेही त्यातच भले आहे.

- श्रीपाद कोठे

१८ मे २०१६

अस्मिता

गावोगावी परतणाऱ्या मजुरांचा विषय सध्या सगळीकडे सुरू आहे. हा विषय ज्या प्रकारे समोर आला आहे त्यातले काही घटक असे...

- राजकारण करणे,

- मजुरांना चुकीची माहिती देणे,

- मजुरांना भडकवणे,

- व्यक्ती आणि समाजाचा मनोबौद्धिक स्तर फारच कमी असणे,

- धैर्य, शांतता, संयम, धीर; यासारख्या गुणांचा अभाव,

- फेडरल व्यवस्था,

- जबाबदारी, कर्तव्य, कोणी करायचं याचे वाद आणि अस्पष्टता,

- पुढचा अंदाज घेऊन निर्णय व कृती न करणे,

- मानवीयतेचा अभाव,

- अनैसर्गिक परिस्थितीत भोंगळ आदर्शवादीतेचा विक्षिप्तपणा,

- आपण पूर्ण आहोत हा प्रत्येकाचा आग्रह,

या सगळ्याच गोष्टी समाज म्हणून आपला पराभव अधोरेखित करणाऱ्या आहेत. पण आपल्याला तसे वाटते का?

जबाबदारी निश्चित करणे, शिक्षा करणे, न्याय मिळवणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, अन्यायाविरुद्ध दाद मागणे; अशा गोष्टींना इतकं अवास्तव महत्व आम्ही देऊ लागलो की; परस्पर विश्वास निर्माण करणे, आत्मियता जोपासणे, त्या आधारे समस्या सोडवणे, अडचणीतून मार्ग काढणे; या गोष्टी आम्ही विसरूनच गेलो आहोत. आमच्या विचार आणि व्यवहारातील जिवंतपणा नष्ट होऊन आम्ही passive जीवन जगतो आहोत. मुख्य म्हणजे याचं आग्रहाने आणि अभिनिवेशाने समर्थन करतो आहोत. तुमच्या माझ्या साध्या साध्या प्रतिक्रिया सुद्धा यात contribute करीत असतात. पण आम्हाला त्याची जाणीव असते का? Why we can't hold ourselves back?

आम्हाला आमच्या गट अस्मिता मोठ्या का वाटू लागल्या? त्या कमी कशा करता येतील? प्रश्न याची किंवा त्याची नाही. सगळ्यांच्याच अस्मिता कमी करण्याची गरज आहे. व्यक्तींच्या, गटांच्या, व्यवस्थांच्या, सरकारांच्या, व्यवसायांच्या; अगदी सगळ्यांच्या अस्मिता जीवनानुगामी करणे गरजेचे आहे. आपण समाज म्हणून, देश म्हणून, माणूस म्हणून एक आहोत; हे आपण उत्पन्न करू शकलो नाही. हे आपले सामूहिक अपयश आहे. हे कसे बदलेल?

- श्रीपाद कोठे

१८ मे २०२१

साहित्यसृजकांची जबाबदारी

कोविडच्या संदर्भातील दोन कविता आणि 'वैकुंठधामातील मुडद्यांचा संवाद' शीर्षकाने पाच कथा वाचण्यात आल्या. यावर काही लिहू असं वाटलं नव्हतं त्यामुळे हे साहित्य संग्रही ठेवावं असं काही वाटलं नाही. मात्र त्यातली पारुल खक्कर यांची एक कविता आणि पाच लघुकथा पुन्हा सापडल्या. एक कविता मात्र सापडली नाही. काय व्यक्त व्हावं समजेना. दुर्लक्ष करावं असंही वाटलं. पण पुन्हा विचार आला की, दुर्लक्ष करणं बरं नाही.

जीवनातील महत्वाच्या घटनांचे पडसाद साहित्यात उमटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. अन सगळ्या जगाला हलवून सोडणाऱ्या कोविडचे पडसाद साहित्यात उमटणार नाहीत असं तर शक्यच नाही. सध्याची स्थिती हा केवळ विनोदाचा मसाला नक्कीच नाही. त्यावर गंभीर साहित्य निर्माण होणे आवश्यक आहे, अपरिहार्य आहे अन योग्यही.

परंतु साहित्य म्हणजे केवळ क्षणिक भावनांचा एकांगी शब्दखेळ असतो का? असावा का? मानवी भावभावना, अडीअडचणी, संघर्ष, तडजोडी, सृजन, विनाश, घडणे, बिघडणे; हे साहित्यातून येणारच. यायलाच हवं. आत्यंतिक व्यावहारिक मनांना संवेदनांचे अस्तर लावून त्याची मानवीयता जिवंत ठेवण्याचं काम हेच साहित्य करत असतं. पण ही सारी शब्दसृष्टी अविचारी, एकांगी, अविवेकी असावी का? या प्रश्नाचे उत्तर जर नकारार्थी असेल किंवा नकारार्थी असायला हवे असेल तर; साहित्य सृजकांचीही काही जबाबदारी असते हे लक्षात घ्यायला हवे. काय असते ही जबाबदारी? ही जबाबदारी असते, जीवनाचा सखोल आणि समग्र विचार करणे. साहित्यिक हा विचारवंत असेलच असे नाही, त्याने वैचारिक लेखनच करावे असेही नाही. पण आपले लिखाण वरवरचे, भावनावेगात वाहणारे नसावे; आपल्या लिखाणाने वाचकांना विचारी बनवता आले नाही तरी अविचारी बनवू नये; एवढे तर पाहायला हवेच ना? आपल्याकडे शब्द आहेत आणि त्यांची जुळणी करण्याचे देवदत्त कौशल्य आहे म्हणून; आपल्या भावना भडकपणे, वाचणाऱ्यांना पिसाट बनवण्याच्या पद्धतीने मांडाव्या का? साहित्यसृजकांनी आपल्या श्रेष्ठत्वासोबतच आपल्या या जबाबदारीचेही भान ठेवायला हवे.

आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मानवी जीवनासंबंधीच्या आजच्या कल्पना, धारणा, गृहितके, स्वप्ने, आकांक्षा, अपेक्षा, विश्लेषणे इत्यादी खूप एकांगी आहेत. मानवी जीवनाची श्रेष्ठता जमेस धरूनही हे म्हणणे भाग आहे की, मानव एकटा वा समूह म्हणून सर्वशक्तिमान नाही. मानवाचे व्यावहारिक जीवन आणि भावजीवन या दोन्हीला हे लागू होते. आज मात्र मानवी जीवनाची ही मर्यादा, अन त्याचे पराधीनत्व मान्य करणे पाप समजण्याचा काळ आहे. माणूस जे करेल ते व्हायलाच हवे ही आजच्या मानवाची विकृत आकांक्षा आहे. अन मानव जे करेल ते होईलच हा अतिविकृत विश्वास आहे. यातूनच व्यवस्था, सरकारे, माणसे यांचे मूल्यमापन केले जाते. मानवी अपूर्णता लक्षात घेऊन अधिकाधिक पूर्णतेकडे जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी अपयशाच्या जबाबदाऱ्या निश्चित करून संघर्ष छेडले जातात. हे अयोग्य आहे याची जाण उत्पन्न करण्याची स्वाभाविक जबाबदारी असलेले साहित्य सृजक देखील याच मार्गाने जातात. परिणामी जीवनासोबतच साहित्य क्षेत्रही कार्यकर्त्यांचे आखाडे होत जातात.

या आखाड्यांच्या नशेत आज समाज डोलतो आहे. समाज ही कार्यकर्त्यांच्या दावणीला बांधलेली वस्तू नाही. अधिकाधिक विकसित होत जाणारी ती एक प्रक्रिया आहे याचा विचार, ज्यांनी करायला हवा ते मानस घडवणारेही करीत नाहीत; ही शोकांतिका आहे.

जीवनाचे एकांगी, विकृत, विद्रुप दर्शन आणि जीवनाचे सर्वांगीण, समग्र, सखोल आकलन; यांचा हा तात्विक संघर्ष आहे. आमचे आणि तुमचे करून काहीही होणार नाही. साहित्याच्या संदर्भातच बोलायचे तर, भावनांना विचारांची डूब देण्याची गरज आहे. जाता जाता कोणाच्या तरी भावनांना हात घालणे किंवा संवेदनशीलतेच्या नावाखाली भडकपणा करणे टाळायलाच हवे. साहित्याने केवळ मानवी मन व्यक्त करू नये, सोबतच मानवी मन घडवावे देखील. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ती ती साहित्यसृजकांची जबाबदारी ठरते.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, १८ मे २०२१

सोमवार, १६ मे, २०२२

उच्च रक्तदाब दिवस

आजकाल जागतिक `उच्च रक्तदाब दिवस' देखील पाळण्यात येतो. पाळोत बिचारे. पण रक्तदाब वाढतो कशामुळे? खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे. उदा. - स्वच्छता !!! लोक उगाचच त्याचा बाऊ करतात किंवा तणाव घेतात. पण खरं सांगतो, बाऊ करण्यासारखं किंवा तणाव घेण्यासारखं काही नसतं त्यात. आता माझंच घ्या ना. घरातील एक कोपरा काल तब्बल आठ वर्षांनी आवरला, साफसूफ केला. काही नाही हो... सगळं मिळून तासाभरात काम झालं आणि कचरा किती निघाला म्हणता? बाकीच्या घराचा रोज जेवढा निघतो ना तेवढाच. आठ वर्षांनी तितकाच कचरा आणि रोजचाही तितकाच कचरा. कशाला जास्त कष्ट करायचे आणि तणाव घ्यायचा, चिंता करायची. बरं आठ वर्ष कोपरा साफ केला नाही तरीही, मलेरिया, डेंग्यू, टायफोईड, कर्करोग वगैरे काही झालं नाही. अगदी उच्च रक्तदाब सुद्धा नाही. पाहा बुवा, मी आपलं शेअर केलं सगळ्यांशी. बाकी काही सांगायचं वगैरे नाही. नाही तर म्हणाल, किती आळशी म्हणून.

- श्रीपाद कोठे

१७ मे २०१५

अंमलबजावणीचे काय?

देशाच्या अर्थमंत्री रोज काही घोषणा करीत आहेत, योजना जाहीर करीत आहेत. २० लाख कोटींची चर्चा तर आहेच. यापुढचा प्रश्न आहे, ज्यासाठी हे सगळे चालले आहे ते होईल कसे. How the money and plans will be translated on ground? How the desired results will be met? नुकतीच एक बातमी सगळीकडे आहे की, राज्यातील अशा सुमारे पाच हजार शाळा, ज्यांची पटसंख्या १० आहे, अशा बंद करणार. या बातमीवर जरी नीट खोलवर विचार केला; मुळात शाळांना परवानगी, शिक्षण प्रसाराची भूमिका, वास्तवापासून कोसो दूर असणारा आणि कशाचा कशाशी ताळमेळ नसणारा त्याबद्दलचा विचार, अन त्याच्या अंमलबजावणीची एकूणच सर्वव्यापी गंमत; यांचा विचार केला तर; आव्हान किती मोठे आहे हे ध्यानात येईल. हे उदाहरण महाराष्ट्राचे आहे म्हणून लगेच केंद्र - राज्य असा विचार करणे पोरकटपणा होईल. सगळ्या देशभर सर्वत्र, सगळ्या क्षेत्रात आणि स्तरांवर; कमीअधिक हीच अवस्था आहे. ग्रामीण भागातही तेच आणि शहरी भागातही तेच. यातून पुढे जाण्यासाठी काय योजना, कोणता मार्ग, कसे आवाहन, किती विचार, विचारांची दिशा; या सगळ्याचा मोठा अभाव मात्र जाणवतो. नुसताच पैसा ओतणे, योजना जाहीर करणे, घोषणा करणे, शिक्षेची तरतूद करणे, कठोर कायदे आणि त्यांची त्याहून कठोर अंमलबजावणी; हे सगळेच फार सुमार, उथळ आणि हास्यास्पद असते. यातून बाहेर पडण्याचा निर्धार, त्याची तयारी, त्यासाठीची पावले; या गोष्टी तातडीने आवश्यक आहेत.

- श्रीपाद कोठे

१७ मे २०२०

सुनील आंबेकर यांचे पुस्तक

रा. स्व. संघाचे अखिल भारतीय अधिकारी श्री. सुनील आंबेकर यांनी नुकतेच the rss roadmaps for the twentyfirst century हे पुस्तक लिहिले आहे. नागपूर तरुण भारत दर रविवारी त्याचा भावानुवाद क्रमशः प्रकाशित करीत आहे. आज जो मजकूर प्रसिद्ध झाला आहे त्याची सुरुवातच संघाच्या religion विषयीच्या भूमिकेने आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे, या संबंधात संघ आणि हिंदू महासभा यांच्या विचारात गंभीर फरक आहे; असे स्पष्टपणे म्हटले आहे.

हे मुळातून वाचले पाहिजे. हा विषय व्यापक पद्धतीने समजून घेतला पाहिजे. संघ समजून घेणे, हिंदुत्व आणि त्याचे प्रवाह समजून घेणे, भारत आणि भारताचा इतिहास आणि वर्तमान समजून घेणे, सुस्पष्ट वैचारिकता आणि भविष्य; या सगळ्या अंगांनी हा विषय समजून घ्यायला हवा. ही अपेक्षा सगळ्यांकडूनच असली तरीही, स्वयंसेवक असल्याचा गौरव असणाऱ्यांकडून विशेष आहे. सध्या सुरू असलेल्या विषयात; मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांसाठी कशाला, नास्तिकांना कशाला मंदिर संपत्तीची उठाठेव; इत्यादी जे विषय येतात त्यावरही; संघाची भूमिका काय असू शकते याचा अदमास घेण्यासाठी हा विषय मुळातून समजून घेतला पाहिजे.

याच भावानुवादात पंडित नेहरू यांच्या १९४८ सालच्या एका भाषणाचा परिच्छेद देण्यात आला आहे. संघ आणि नेहरू यांच्या भूमिकेतील साधर्म्य दाखवण्यासाठी. 'स्वीकार्यता' काय असते आणि संघाच्या संदर्भात ती कशी आहे; हे विरोधकांनी आणि स्वयंसेवक व समर्थकांनी समजून घेणेही आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

१७ मे २०२०

रविवार, १५ मे, २०२२

कालमहिमा

कोणीतरी कधीतरी बोललं की, हिंदू लोक माहीतच नसलेल्या गोष्टी कवटाळून बसतात अन प्रत्यक्ष प्रत्ययाला येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निरर्थक जीवन जगतात. झाले, आपणही त्याचीच री ओढू लागलो अन खाणे-पिणे, मौजमजा, स्पर्धा-  संघर्ष- कुरघोडी- म्हणजेच सारसर्वस्व आहे असे समजून तसे वागू लागलो. जणू काही तो जो कोणी जे काही बोलला तेच सत्य आहे असे समजून... त्यावर प्रश्न विचारावे, तर्क मांडावे, भवती न भवती करावी असेही आम्हाला वाटले नाही. यालाच म्हणतात का कालमहिमा??

- श्रीपाद कोठे

१६ मे २०१६

पाहा विचार करून...

आफ्रिका सोडून संपूर्ण जगावर मोठा सायबर हल्ला झाला. आपल्या येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या. जगभरातच याची चर्चा सुरु आहे. हा हल्ला आटोक्यात आला असून सुरक्षेची चर्चा सुरु झाली आहे. परंतु जी माहिती नको त्याच्या हाती लागून गेली त्याचे काय? त्याचा वापर तर तो करणारच. त्या माहितीच्या आधारे जगभरात उत्पात करून होईपर्यंत नव्याने करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचा भेद करण्याची क्षमता व कौशल्य हे लोक विकसित करणार आणि पुन्हा हल्ला करणार. डिजिटल व्यवहारांचे आक्रमकपणे व अभिनिवेशाने समर्थन करणारेही आता बिचकू लागले आहेत. तुमचे-आमचे, तूतू-मीमी हे होईलच. संपूर्ण जगाची कबर खोदल्या गेली तरीही तूतू-मीमी सोडायचं नाही, सुटणार नाही असा शाप देऊनच माणसाला जन्माला घातलं असणार. मात्र या माणसांमधीलच काही हाताच्या बोटावर मोजावेत असे अपवाद असलेल्यांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा.

एक गोष्ट निर्विवाद आहे की, सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन तत्वांवर वर्तमान सभ्यता- संस्कृती- जीवन- उभे आहे. यावर या जीवन पद्धतीचे समर्थक आणि टीकाकार दोघेही एकमत होतील. पण गमतीची गोष्ट म्हणजे- या जीवनपद्धतीने ज्या समस्यांच्या गर्तेत माणसाला लोटले आहे, त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे, त्या समस्यांवर केले जाणारे उपाय सुद्धा; सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन गोष्टींवरच आधारित असतात. नव्हे- सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; याच दोन संदर्भात विचार करण्याचं आमच्या बुद्धीचं प्रचंड conditioning झालेलं आहे. अगदी प्रामाणिकातल्या प्रामाणिक व्यक्ती अन प्रयत्नसुद्धा याला अपवाद नाहीत. जे ही बाब समजू शकतात त्यातील ९० टक्केहून अधिक तूतू-मीमी मध्ये अडकलेले असतात. काही चांगला बदल खरंच घडून यायचा असेल तर या जगातील ७०० कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक विचारी अन सुजाण झाले पाहिजेत; हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नाही.

वर्तमान जगण्याच्या मूळ तत्वांना खूप आदर्श, आध्यात्मिक तत्वांचा मुलामा देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. हे अगदी सहज शक्य आहे. पण आध्यात्मिकता अथवा आदर्श ही आंतरिक प्रकृती आहे. चराचराला कवेत घेणे, चराचराशी एकरूप होणे, चराचराशी समत्वाचा व्यवहार, चराचराचं एकत्व; इत्यादी गोष्टी आंतरिक प्रकृतीशी संबंधित आहेत. बाह्य व्यवहारात विषमता, विविधता, अल्पता, वेगवेगळेपणा, आटोपशीरपणा; याच गोष्टी असू शकतात. आंतरिक प्रकृतीचा अखंड विस्तार आणि बाह्य व्यवहार छोट्या छोट्या मर्यादांमध्ये; हेच जीवनाचे सूत्र असू शकते.

शांतपणे विचार करणाऱ्यांसाठी फक्त एक संकेत- भारताच्या आर्थिक इतिहासाचे नवनवे अध्ययन आणि त्याचे निष्कर्ष आता समोर येत आहेत. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही. परंतु भारताच्या त्या वैभवकाळात - भारत राजकीय दृष्टीने अशांत होता, आजच्यासारखे केंद्रीभूत शिक्षण- संशोधन नव्हते, जातीव्यवस्था अतिशय भक्कम होती, संपन्नता असूनही सुरक्षेचे उपाय वाढवण्याची गरज तर पडत नव्हतीच उलट घरांना कुलूपे न घालण्याचे प्रयोग यशस्वी होत असत, सारे काही कोणाच्या तरी हातात घट्ट धरून ठेवण्याची पद्धती नव्हती, एकच एक सत्ताकेंद्र नसल्याने नियमांची विस्कळीतता होती. या सगळ्या गोष्टींचा विचारही व्हायला नको?

- श्रीपाद कोठे

१६ मे २०१७

लोकसहभाग?

प्रभू राम, विक्रमादित्य, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी, अहल्यादेवी होळकर, हरिहर बुक्कराय... या कोणत्याही राजवटीत लोकसहभाग नव्हता. तरीही आजही त्या आदर्शच ठरतात. इंग्रजांनी आम्हाला त्यांची राजकीय व्यवस्था सांगितली, शिकवली, लादली. आम्ही आमच्या राजकीय व्यवस्था, राजनीती, मूलतत्वे त्यांना का सांगितली नाहीत? का सांगत नाही? प्रामाणिक, सखोल आणि व्यापक विचार करणाऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०१९

संघर्षाचे कारण

सगळेच संघर्ष...

उदा. - १) इस्रायल, पॅलेस्टाईन; २) कोरोनाच्या निमित्ताने पाहायला मिळणारे विविध संघर्ष; ३) राजकीय, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक संघर्ष,  ४) आरक्षणाचा संघर्ष; असे असंख्य. हे सगळेच भय आणि भोग यांच्या पोटी जन्म घेतात. हे ध्यानात न घेतल्यानेच संघर्ष उत्तरोत्तर वाढत आहेत. संघर्षशून्य स्थिती is utopia. पण संघर्ष कमी नक्कीच होऊ शकतात अन व्हायला हवे. त्यासाठी प्रयत्नही होतात पण ते कमी होत नाहीत कारण त्याच्या मुळाशी आपण जात नाही.  अगदी मुस्लिम, ख्रिश्चन, साम्यवादी इत्यादी संघर्ष सुद्धा याच प्रकारचे. म्हणूनच ते संपवण्यासाठी झालेल्या आजवरच्या सगळ्या प्रयत्नांनी नवीन संघर्षांना जन्म दिला. मूळ लक्षात घेतले नाही तर पुढेही असेच होत राहील. नावे काहीही असली तरीही. भय आणि भोग ही मूळ कारणे address करायला हवीत अन त्याची पद्धत प्रचलित पद्धतींहून वेगळी असणं अपरिहार्य आहे.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०२१

आयुर्वेद

मोठी विचित्र परिस्थिती आहे आपली. इंग्रजी राजवटीपासून आत्मनिषेधाची अशी वावटळ सुरू झाली आहे की ती थांबता थांबत नाही. आता हेच पहा ना. सध्या आरोग्य हा महत्वाचा विषय आहे. स्वाभाविकच उपचारपद्धती हाही मुद्दा येतो. पण आयुर्वेद हा टीकाविषय. का? कारण तो भारतीय आहे. भारतीयांना काही समजत होते का? शक्यच नाही. त्यामुळे त्यात अर्थ नाही. अन भारत म्हणजे काय तर ब्राम्हण. भारत म्हणजे भगवा रंग. भारत म्हणजे अध्यात्म. इत्यादी. म्हणून आयुर्वेद म्हणजे ब्राम्हणी, भगवं, ऐहिकाची उमज नसलेलं. मग भगवं वस्त्र घालणारे रामदेव बाबा ब्राम्हण नसले तरी त्यातलेच. संघात जाणारे असंख्य अब्राम्हण त्यातलेच. देवदेवता, मंदिरे, धर्मग्रंथ, संत यांचे अनुसरण करणारे अब्राम्हण असले तरी त्यातलेच. इत्यादी इत्यादी. अन आमचे अकल्याण भारताने म्हणजे ब्राह्मणांनी म्हणजे भगव्याने म्हणजे धर्माने केले. त्यामुळे ते किंवा त्यातले म्हणजे आमचे शत्रू म्हणून विरोध. मग आम्हाला प्रश्नही पडत नाही की बाबा, भगवान बुद्ध वा शिवाजी वा असं कोणतंही नाव; यांच्या काळी उपचार कसे होत असत? दुर्दैवाने छत्रपती ५० वर्षेच जगले पण आज आयुर्वेद सोडून असलेल्या उपचार पद्धतीत सुद्धा कमी वयात माणसे निरोप घेतातच. अन भगवान बुद्ध तर छान दीर्घ आयुष्य जगले. आधुनिक उपचार पद्धतींची पहाट सुद्धा व्हायची होती तेव्हाची ही गोष्ट आहे. जीवनाच्या अशा असंख्य गोष्टी आहेत. पण... द्वेष, आंधळेपणा, दुराग्रह सोडा रे मित्रांनो. मोकळ्या मनाने जगायला शिका.

- श्रीपाद कोठे

१६ मे २०२१

शनिवार, १४ मे, २०२२

मंदिरांची संपत्ती

हिंदू मंदिरांच्या संपत्तीवरून सध्या वाद सुरू झाला आहे. या निरर्थक आणि चुकीच्या वादासाठी हिंदुत्वाचे पाठीराखे जबाबदार आहेत हे स्वीकारण्यास अडचण येऊ नये. काँग्रेस पक्षाने मंदिरांची संपत्ती देशासाठी वापरावी अशी अपेक्षा व्यक्त केल्यामुळे त्याला विरोध केलाच पाहिजे; ही भावनाच विचित्र आणि चुकीची आहे. काँग्रेस हिंदुत्वविरोधी आहे की नाही यावर वेगळी चर्चा होईल पण त्याने उपस्थित केलेल्या विषयावर चर्चा करताना, त्याला विशिष्ट दिशा देताना; त्याच्या side effects चा विचार करायचा की नाही? राजकीय प्रतिक्रियेची आमची उबळ इतकी अनिर्बंध व्हावी की, आम्ही सारासार विचाराला तिलांजली द्यावी? समजा मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग सरकारने केला तरी तो अंदाधुंद राहील का? तसा वापर काँग्रेसच्या तिजोरीत पैसा ओतेल का? इथल्या कामांसाठी, लोकांसाठी वापरला जाणारा पैसा इटलीला कसा काय पोहोचेल? आपण काय बोलतो, काय नाही; कशाचंही काही भान राहू नये हे लज्जास्पद आहे.

दुसरा मुद्दा येतो, केवळ हिंदू मंदिरांची संपत्ती का? याच्याही विविध बाजू आहेत. काँग्रेसने हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग करावा अशी अपेक्षा केली असेल तर सरकारने तोच विषय पुढे नेऊन, सगळ्या धार्मिक संस्थांच्या संपत्तीच्या उपयोगाची एखादी योजना बनवावी. त्याऐवजी निरर्थक तू तू मी मी आवडणं हे आमचा सामाजिक स्तर खालावल्याचं चिन्ह आहे.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे - संपत्तीविषयीची दृष्टी. संपत्तीविषयी एक आध्यात्मिक दृष्टी प्रतिपादन करणाऱ्या हिंदूंनी त्या दृष्टीला तिलांजली द्यावी का? व्यवहार म्हणून, बाकीचे अमुक अमुक पद्धतीने वागतात म्हणून; वगैरे वगैरे वगैरे तर्क देत आपण आपली दृष्टी, भूमिका, विचार, भाव गंगार्पण करायचे का? जीवनाच्या सगळ्याच अंगांविषयी असे धर्मसंकट उभे राहू शकते. नव्हे उभे झालेले आहे. मानवी जीवनाला सर्वार्थाने वर उचलून घेणे, मानवी मनाला, मानवी भावनांना, मानवी जाणिवांना, मानवी जीवनाला वर उचलणे; अधिक परिष्कृत करणे; मानवाची उंची आणि व्याप्ती असीम वाढवणे; हे हिंदुत्व आहे. टुकार घाणेरड्या राजकारणापायी त्याला चूड लावायची का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय खाज बोळवण्यासाठी या समाजाच्या, या देशाच्या चारित्र्याचा DNA बदलून टाकण्यात आम्हाला लाज वाटावी की वाटू नये, हा मूळ मुद्दा आहे.

एक निश्चित समजून चालावे की हिंदुत्वाचे हे उर्जस्वल चारित्र्य कोणाचेही कर्तृत्व नसून; या समग्र अस्तित्वाच्या मूळ तत्वातून ते आलेलं आहे. अशा अब्जावधी मानवी कर्तृत्वान्ना आणि गलिच्छ राजकारणाला हवेत भिरकावून देऊन पुन्हा त्या उर्जस्वल चारित्र्याची स्थापना ते स्वतःच करेल.

स्वामी विवेकानंद म्हणतात - मी त्या ईश्वराचा सेवक आहे ज्याला माणूस म्हणून ओळखले जाते. मंदिरांचे सोने चांदी या ईश्वरासाठी उपयोगात आणण्यात वाईट वा चुकीचे काय आहे? जोवर सूर्य चंद्र आहेत तोवर आपल्या नावाने सोने चांदीचे ढीग जमा करणे हा कोणता धर्म, हे कोणते आध्यात्म, हे कोणते शहाणपण? तारतम्य आणि विवेकाने मंदिरांची संपत्ती देशासाठी वापरण्यात काहीही गैर नाही. मंदिरे तसा उपयोग करीत असतातच तो शेवटल्या रुपयांपर्यंत करून त्याग आणि समर्पणाचा, अध्यात्माचा आदर्श स्थापित करायलाही हरकत नाही.  भावनावेगात वा आवेशात न येता याबद्दल भूमिका घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १५ मे २०२०

शुक्रवार, १३ मे, २०२२

स्वयंपूर्ण जिल्हा

कोरोना एक गोष्ट शिकवतो आहे पण त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. त्याचा एक संदेश हा आहे की; अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी, वीज, दळणवळण; या बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे. या क्षणापासून त्या दिशेने प्रयत्न झाले तर भविष्यात त्याचा फायदा होईल हे निश्चित. ही स्वयंपूर्णता नीट लक्षात मात्र घ्यायला हवी. याबाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा एवढे म्हणणे आणि तसा प्रयत्न करणे पुरेसे नाही. कारण ते संदिग्ध होऊन जाते. देश स्वयंपूर्ण होऊनही लोकांना त्याचा उपयोग होईलच असे नाही, लोकांना त्यापासून सुखकर जीवन मिळेलच असे नाही. त्यामुळे वर नमूद केलेल्या बाबींमध्ये देशाने स्वयंपूर्ण होण्याचा विचार मनात ठेवून, प्रत्येक जिल्हा या बाबीमध्ये अधिकाधिक स्वयंपूर्ण व्हावा अशी शब्दावली प्रचारात यायला हवी. बाकीच्या गोष्टी थोड्या मागे ठेवता येऊ शकतात पण या मूलभूत गोष्टी प्राधान्याने व्हाव्यात.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२१

गुरुवार, १२ मे, २०२२

वर्तमान अर्थसमस्या आणि स्वामी विवेकानंद

लंडनच्या `दि एको'मध्ये १८९६ साली स्वामीजींची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्यात `दि एको'च्या प्रतिनिधीचा पहिलाच प्रश्न होता की, `आजकाल लोक असार व गौण भागावर अधिक भर देतात असे तुम्हास वाटते काय?' त्यावर स्वामीजींनी जे उत्तर दिले ते समाजातील अर्थमानसिकतेवर प्रकाश टाकणारे आहे. स्वामीजी म्हणाले- `मागासलेल्या राष्ट्रात सर्वत्र आणि पुढारलेल्या देशात कमी सुसंस्कृत असलेल्या वर्गात तसेच आढळते. सुसंस्कृत आणि श्रीमंत लोकांची गोष्ट निराळी आहे असे तुमच्या प्रश्नात अभिप्रेत आहे आणि खरोखरच ती निराळी आहे. धनिक वर्ग एक तर द्रव्याचा उपभोग घेण्यात दंग आहे किंवा अधिक द्रव्यप्राप्तीसाठी धडपडत आहे. हे लोक आणि संसारातील कामात मग्न असलेले बहुसंख्य लोक म्हणतात की धर्म हा मिथ्या आहे, निरर्थक आहे, मूर्खपणा आहे. अन त्यांना प्रामाणिकपणे तसे वाटत असते. देशभक्ती किंवा रूढी हाच प्रचलित धर्म बनला आहे. लोक आजकाल चर्चमध्ये जातात ते केवळ कोणाच्या लग्नासाठी किंवा केवळ कोणाला पुरण्यासाठी जातात.' सुसंस्कृत आणि श्रीमंत यातील सूक्ष्म भेद स्वामीजींनी फार खुबीने या उत्तरात स्पष्ट केला आहे. सुसंस्कृत लोकांची गोष्ट निराळी आहे याचा अर्थ ते लोक धर्माच्या गौण भागाकडे विशेष लक्ष न देता त्यातील मुख्य भागच ग्रहण करतात आणि श्रीमंत लोकांची गोष्ट निराळी आहे याचा अर्थ, श्रीमंत लोक धर्माच्या गौण वा मुख्य कोणत्याच भागाकडे लक्ष देत नाहीत.

या उत्तरावर प्रतिनिधीने दुसरा प्रश्न विचारला- `आपल्या संदेशामुळे हे लोक चर्चमध्ये अधिक जाऊ लागतील काय?' या प्रश्नाच्या उत्तरात स्वामीजींनी आपले म्हणणे अधिक खोलवर स्पष्ट केले. ते उत्तरले- `माझ्या बोलण्याचा तसा परिणाम होईल असे मला वाटत नाही. कारण कर्मकांडाशी किंवा विशिष्ट मतांशी माझा मुळीच संबंध नाही. धर्मच मानवी जीवनाचे सर्वस्व आहे आणि प्रत्येक गोष्टीत धर्म आहे हे दाखवून देणे एवढेच माझे जीवितकार्य आहे. इंगलंडमधील एकंदर विचारप्रवाहाबद्दल आम्ही काय बोलणार? लोकराज्याचा उदय होणार हेच साऱ्या घटना दर्शवित आहेत. त्याला तुम्ही सोशालिझम म्हणा की आणखी काही म्हणा. काम कमी असावे, कोणाचा जुलूम नसावा, युद्ध होऊ नये, भरपूर अन्न मिळावे आणि अशा रीतीने जीवनातील आवश्यकतांची पूर्ती व्हावी हीच लोकांची आकांक्षा असणार. धर्माचा, मानवाच्या चांगुलपणाचा आधार प्राप्त झाल्याशिवाय या देशातील सभ्यता किंवा इतर कोणतीही सभ्यता टिकून राहण्याची काय शाश्वती आहे? धर्म हा सर्व गोष्टींच्या मुळाशी जातो हे निश्चित जाणून असा. धर्म जर सुप्रतिष्ठित असेल तरच सर्वकाही चांगले होईल. धर्माचा जो सारभूत तत्वज्ञानात्मक भाग आहे त्याची लोकांच्या मनात स्थापना करणे फारच कठीण कार्य आहे. कारण लोकांचे प्रचलित आचारविचार या तत्वज्ञानात्मक भागापासून फार दूर असतात.'

स्वामीजींनी या उत्तरात लोकांच्या चांगुलपणाचा जो मुद्दा मांडला आहे, त्याची आज पदोपदी आठवण आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्टाचार, घोटाळे, स्वार्थ, एकमेकांचे गळे कापणे, जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी- जागृतीत- स्वप्नावस्थेत- पैशाकडे असलेली धाव आणि त्याला लाभणारी प्रतिष्ठा; यांनी अर्थचक्रापुढे (अर्थव्यवस्था, अर्थरचना, अर्थोत्पादन, अर्थोपभोग, अर्थवितरण, अर्थनियोजन हे सगळे मिळून अर्थचक्र) उपस्थित केलेले प्रश्न पहिले की, स्वामीजींचे म्हणणे पटल्याशिवाय राहत नाही. समाजाचे अर्थकारण धर्मापासून तुटून राहू नये. ते तसे राहिले तर अनर्थकारी ठरेल असाच त्याचा आशय आहे.

- श्रीपाद कोठे

१३ मे २०१५

मंगळवार, १० मे, २०२२

भुलभुलय्यात कुठवर फिरायचे?

वा वा... आधी सलमान, आता जयललिता. काहीच महिन्यांपूर्वी खुर्ची सोडावी लागलेल्या अम्मा चार आठ दिवसात पुन्हा मुख्यमंत्री होणार. आनंद आहे. कशाकशाचं कौतुक करायचं आम्ही? न्यायव्यवस्थेचं, लोकशाहीचं, प्रसार माध्यमांचं, पोलिसांचं, तपास यंत्रणांचं, नोकरशाहीचं, जनता जनार्दनाचं? घाबरू नका, थोड्याच दिवसात देशातील सगळे तुरुंग, पोलीस कोठड्या रिकाम्या होतील आणि देश पूर्णपणे गुन्हेमुक्त होईल. मग फक्त चालेल आरोग्यदायी स्पर्धा. कोण सत्तेवर येतो याची स्पर्धा, कोण भ्रष्टाचार अधिक करतो याची स्पर्धा, कोण किती गुंड पोसतो याची स्पर्धा, कोण किती मुडदे पाडतो याची स्पर्धा, कोण अमली पदार्थांची तस्करी वगैरे जास्त करतो त्याची स्पर्धा, कोण जास्तीत जास्त बेताल- बेमुर्वतखोर- उन्मत्तपणे- वागतो याची स्पर्धा. अन या स्पर्धेतून सर्वोत्तम तोच टिकेल आणि आबादी आबाद होईल. अर्थात ही स्पर्धा मान्य नसणारे उरणारच नाहीत, हे वेगळे सांगायला नकोच.

यातील प्रतिक्रियेचा भाग बाजूस काढून विचार केला तर लक्षात येते की- न्यायप्रक्रिया, व्यवस्था, फौजदारी व दंड संहिता, कायदे, नियम सगळंच आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. त्याहीपेक्षा अधिक म्हणजे आपण स्वीकारलेली फार उदात्त वगैरे वाटणारी ब्रिटीश संसदीय व्यवस्था बदलण्याची गरज आहे. निवडणुका या सगळ्या वाईट गोष्टींची जननी आहे, हे प्रत्यक्ष राजकारणीही मान्य करतात. पण खरी जननी आहे आपली संसदीय व्यवस्था. मुळात लोकशाही याचा अर्थ फक्त आपल्या येथे असलेली संसदीय व्यवस्था एवढाच नाही. लोकशाहीच्या अन्यही व्यवस्था आहेत. मुख्य म्हणजे या व्यवस्थांमध्ये आणखीन भर टाकली जाऊ शकत नाही असेही नाही. पण त्यासाठी प्रथम प्रामाणिक मन, प्रामाणिक भावना आणि प्रामाणिक विचारांची गरज आहे.

कायदे, संसदीय व्यवस्था, एवढेच नव्हे तर ज्याचे अतिशय फाजील कौतुक केले जाते ते `फेडरल स्ट्रक्चर' सुद्धा बदलण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन घटना समिती बसवायला हवी. पण असा विचार जरी व्यक्त केला तरी केवढा आणि किती वेगवेगळा आकांत केला जाईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या उथळपणाला काहीही उपाय नाही. या जगातील सगळी क्षमता आणि बुद्धिमत्ता संपून गेलेली आहे असेच मानायचे असेल तर त्याला काय करणार? आज स्पष्ट, सत्य बोलण्याची सुद्धा कोणाची इच्छा आणि तयारी नाही. हे परिवर्तन घडवून आणणे तर दूरची गोष्ट राहिली. भुलभुलय्यात फिरण्यातच सार्थकता मानणाऱ्यांची कमी नाहीच ना?

- श्रीपाद कोठे

११ मे २०१५

सोमवार, ९ मे, २०२२

आईनस्टाईनच नव्हे, भारतातही...

सलमानवरील एका चर्चेत, मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना; न्या. वळसे पाटील यांनी एक छान मुद्दा मांडला. ते म्हणाले- नीती वगैरे आता राहिली नाही. नीती काय असते, कशी रुजते याबद्दल ते म्हणाले- आईनस्टाईन रोज जेवताना विचार करीत असे की मी आज जे जेवणार आहे त्यामागे किती हात राबले आहेत, किती जणांनी घाम गाळला आहे, इत्यादी. अतिशय छान आणि अनुकरणीय अशीच ही गोष्ट आहे.

यानिमित्ताने एका गोष्टीची मात्र नोंद करावीशी वाटते. न्या. पाटील यांनी सांगितलेली ही भूमिका किमान आपल्या देशाला नवीन नाही. भोजनापूर्वी म्हटली जाणारी प्रार्थना, हा प्रकार अगदी वेदकाळापासून आपल्या देशात रूढ आहे. रा.स्व. संघाच्या किंवा राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमांमध्ये जेथे भोजन असेल तेथे हा प्रकार असतोच. संघाशी वगैरे काहीही संबंध नसलेले लाखो लोकसुद्धा (अगदी खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत) हा भाव व्यक्त करतात. परंतु आज त्याकडे तुच्छतेच्या दृष्टीने पाहिले जाते. संघातील या प्रकाराला तर `ब्राम्हणी पद्धत' वगैरे हिणवणारे महाभाग आहेत. कुसुमाग्रजांची एक कविता आहे `अग्निपुत्र' शीर्षकाची. त्यात तर केवळ भोजन नव्हे तर संपूर्ण जीवन आणि एक जीवन नव्हे तर संपूर्ण मानवी इतिहासाला लागू होईल असा कृतज्ञता भाव व्यक्त झाला आहे.

न्या. पाटील यांनी आईनस्टाईनचे उदाहरण दिले याबद्दल माझे काहीच म्हणणे नाही. पण आपल्या येथील जे काही चांगले, अनुकरणीय आहे ते त्याज्य, हीन असल्याचा समज बाळगून त्याकडे दुर्लक्ष करणारी एक वृत्ती आपल्याच देशात मोठ्या प्रमाणात आहे. ही वृत्ती टाकून देण्याची गरज आहे. आत्महीनतेची वृत्ती आणि त्यातही जाणूनबुजून तसे करण्याची वृत्ती, त्यामागील द्वेषभावना या गोष्टी असू नये एवढेच. न्या. पाटील हेदेखील संघ, या देशातील परंपरा वगैरेबद्दल फारशी आस्था ठेवणारे म्हणून परिचित नाहीत. या निमित्ताने त्यांनाही प्रार्थना की आपल्या मनात असलेले गैरसमज वगैरे काढून टाकावे. ज्या गोष्टी चांगल्या, अनुकरणीय आहेत; त्या तशाच असणार. त्यात भेद करू नये.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १० मे २०१५

समतेचे घोळ

समतेचे मूल्य स्वीकारून जे अनेक घोळ झालेत त्यातील काही-

१) भजन आणि लावणी एकाच पातळीवर आणून ठेवले. दोन्ही गोष्टी समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत हे निश्चित. पण म्हणून त्यांचं स्थान, परिणाम, प्रमाण एकसारखे नाहीत. फडावर भजन आणि मंदिरात लावणी केविलवाणीच ठरणार. आम्ही दोन्हीला केवीलवाणं करून ठेवलं. दुसरीकडे भजन आणि लावणी दोन्हीला स्थान देणारं, पण भजनाकडे ओढ लागेल अशा रीतीने त्यांना गोंजारणारं घर आम्ही विस्कटून टाकलं.

२) शास्त्रीय संगीत आणि कानाचे पडदे फाडून टाकणारे संगीत यांनाही एकाच पातळीवर आणून ठेवले. ऋतू आणि वेळेनुसार मानवी अथवा निसर्गाच्या भावभावना, चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या संगीताची जादू आम्ही घालवली, अन त्याच वेळेस शारीरिक अन मानसिक भ्रष्टता, विस्कळीतपणा आणि त्रास जन्माला घालणाऱ्या संगीताला डोक्यावर चढवले. हे तर दूर, या समतेच्या मूल्याने न्यायचिंतनाला एवढे पंगु बनवले की, मेंदूच्या नसा फाडून टाकणाऱ्या डीजेला आळा घालण्याच्या प्रयत्नात शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना कात्री लावली. मुळातच रात्रीची गती-स्थिती-प्रकृती लक्षात घेऊन विकसित झालेल्या शास्त्रीय संगीताचे रात्रकालीन संदर्भ दुर्लक्षून त्याची अभिव्यक्ती आणि विकास दोन्हीही खुंटवून टाकले.

३) धर्माच्या क्षेत्रातही या समता मूल्याने धुमाकूळ घालून धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या प्रयोजनालाच सुरुंग लावला. पंथ संप्रदायांचा विकास आणि सुधारणा बाधित केल्या. `सगळे धर्म समान' हे आध्यात्मिक अर्थाचे आणि अंतिम हेतूच्या दृष्टीने सापेक्ष सत्य असलेले विधान मूल्य म्हणून स्वीकारल्याने; पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती, पूजा पद्धती, त्यांचे तत्वज्ञान, त्यामागील तर्क इत्यादीची सापेक्ष, निरपेक्ष, तौलनिक चर्चा त्याज्य ठरली. मग हिंदुस्थानातील धर्म, पंथ हिंदुस्थानबाहेरील धर्म, पंथापेक्षा वेगळे आहेत हे मानण्याचे कारण उरले नाही. या वेगळ्या धर्म पंथांनी, त्यांच्या व्यवहारपद्धतींनी, त्यांच्या तत्त्वज्ञानानी मानवी विकासाला, सभ्यतेला लावलेली वेगळी वळणे विचारांच्या कक्षेच्या बाहेर गेली. भारताबाहेरील सगळेच्या सगळे पंथ, संप्रदाय (ईश्वर मानणारे अथवा ईश्वर न मानणारे) हे जडवादी आहेत आणि भारतातील जडवादी समजले जाणारे पंथ, संप्रदाय चैतन्यवादी आहेत हे लक्षात घेण्याची गरज उरली नाही. त्यांचे होणारे वेगवेगळे परिणाम लक्षात घेण्याची गरज उरली नाही. यामुळे मूलत: चैतन्यवादी असणारी भारतीय भक्तीधारा हळूहळू जडवादी होऊ लागल्याची चिंता करण्याची गरज उरली नाही. आत्मिक उन्नतीच्या गरजेतून विकसित होणाऱ्या पंथ, संप्रदायांची वाढ आणि परिणामी आत्मिक विकास धुळीस मिळवला. बाह्य आचार व्यवहारात समानतेची मागणी करतानाच, विविधता आणि त्याचा उपयोग नजरेआड झाला.

परिणामी, जीवनाची सार्वत्रिक परवड झाली.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १० मे २०१६

दान

एक कोटी रुपये दान देऊ शकतील असे एखाद कोटी लोक भारतात नक्कीच आहेत. त्यांनी ते द्यावे. दान हा अर्थचक्राचा महत्वाचा घटक व्हायला हवा. आज ती कल्पनाही केली जात नाही. जे कल्पना करतात वा करू शकतात ते बोलण्या, लिहिण्याला, मांडण्याला बिचकतात. कोण काय म्हणेल? कोण हसतील? कोण टर उडवतील? कोण अशास्त्रीय ठरवेल? याचा विचार त्यांच्यावर स्वार असतो. दान हा अर्थचक्राचा घटक, हा हिंदू वा भारतीय विचार आहे. सगळ्या गोष्टींना हिंदू वा भारतीय tag लावणारे बहुतांश लोक हिंदू वा भारतीय ethos आणि मूल्यांचा विचार करत नाहीत हे दुर्दैवी वास्तव आहे.

'पोटाला आवश्यक तेवढ्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्याहून अधिक बाळगणारा चोर आहे' हा हिंदू अर्थशास्त्राचा विचार प्रसिद्ध तत्त्वचिंतक दत्तोपंत ठेंगडी मांडत असत. डॉ. हेडगेवार यांनीही १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवक दलाचे प्रमुख म्हणून विषय नियामक समितीकडे पाठवलेल्या एका प्रस्तावात 'जगाची भांडवलशाहीतून मुक्तता' असा शब्दप्रयोग केला होता. स्वामी विवेकानंद यांनी सरकारी सवलतींपेक्षा दानाची पद्धत समाजधारणेला अधिक चांगली असल्याचे म्हटले आहे. आज मात्र दान, गरिबांचा विचार, संपत्तीची अधिकतम मर्यादा, न्याय्य वाटप; इत्यादी गोष्टी हिणकस म्हणून पाहिल्या जातात. साम्यवादावर प्रहार करणारे हिंदुत्ववादी कळत नकळत भांडवलशाही स्वीकारतात. हे दोन्ही विचार समाजाला, मनुष्य जीवनाला आणि अर्थचक्रालाही लाभकारी नाहीत; हे एकतर त्यांना समजत नाही वा समजून घ्यायचे नाही. विचारांचे आणि दृष्टीचे हे परिवर्तन कसे आणता येईल ही मोठी समस्या आहे.

पुष्कळ गोष्टी स्पष्टपणे बोलता यायला हव्यात. एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलणे म्हणजे दुष्टपणा नसतो. हे समीकरण डोक्यातून काढून टाकायला हवे. स्वामी विवेकानंद आणि अमेरिकेतील जगप्रसिद्ध उद्योजक जॉन डी. रॉकफेलर यांच्या दोन भेटी आणि संवाद हा या संदर्भात दिशादर्शक आहे. रॉकफेलर हे अब्जोपती उद्योजक काही लोकांच्या आग्रहास्तव विवेकानंदांना भेटायला गेले. त्यावेळी स्वामीजींनी त्यांना स्पष्ट सांगितले की, तुम्हाला मिळालेली संपत्ती तुमची नाही. ती लोकांच्या कल्याणासाठी तुमच्याकडे देण्यात आली आहे. रॉकफेलर यांना याचा राग आला. ते निघून गेले. काही दिवसांनी पुन्हा आले आणि त्यांनी आपण एका संस्थेला दिलेल्या दानाची माहिती सांगितली. अन ते स्वामीजींना म्हणाले, 'याने तुमचे समाधान होईल अशी आशा करतो.' त्यावर स्वामीजी त्यांना म्हणाले, 'तुम्हीच मला धन्यवाद द्यायला हवेत.' त्यानंतर १८९५ पासून रॉकफेलर यांच्या कल्याण निधीला सुरुवात झाली. 'पैसा मिळवणे आणि जमा करून ठेवणे हा मानवी जीवनाचा उद्देश नाही' असे मत त्यांनी नंतरच्या काळात व्यक्त केले होते.

या घटनेतील संपूर्ण आशय आमच्या जीवन जाणिवांचा, सिद्धांतांचा, व्यवस्थांचा, विचारांचा, चर्चांचा विषय व्हायला हवा. नुसत्या वांझ राजकीय चर्चांएवढे ते सोपे नाही. कठीण गोष्टींना सामोरे जाणे हे केवळ रणांगणावर आवश्यक असते असे नाही. ते वैचारिक, भावनिक रणांगणावर सुद्धा आवश्यक असते. असे योद्धे पुढे यायला हवेत.

- श्रीपाद कोठे

रविवार, १० मे २०२०

रविवार, ८ मे, २०२२

हॉकिंग आणि टॉयनबी

नुकतंच स्टीफन हॉकिंग यांचं एक मत प्रसिद्ध झालं आहे. त्यात ते म्हणतात- `पुढील १०० वर्षांनी माणसाने राहण्यासाठी ही पृथ्वी योग्य राहणार नाही. त्याने आपले दुसरे घर शोधावे.' त्यांच्या या मतासाठी त्यांनी तीन कारणे सांगितली आहेत- जीवनाचा वेग, माणसातील हिंसक वृत्तीत झालेली वाढ आणि तंत्रज्ञानाचा वाढता पसारा. हे वाचताना गंमत वाटली. आपण ज्या फांदीवर बसलो आहोत त्यावर कुऱ्हाड चालवू नये, ही अतिशय बाळबोध परंतु जीवनमरणाशी संबंधित शिकवण सुद्धा आता आम्ही गुंडाळून ठेवतो आहोत. आधुनिक बुद्धिवाद आणि विज्ञानवाद याद्वारे आम्ही आज आत्मघातापर्यंत पोहोचलो आहोत. तरीही आमच्या बुद्धीची गुर्मी काही उतरत नाही. आमचा शेवट झाला तरीही चालेल, पण आम्ही बुद्धी अन कथित विज्ञानाचा दंभ आणि दर्प टाकून द्यायला तयार नाही. हॉकिंग सारखा प्रचंड बुद्धिमान माणूस माणसाला ही पृथ्वी सोडून जाण्याचं आवाहन करतो, पण त्यानेच केलेल्या याविषयीच्या कारणमीमांसेला धरून; यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी बंद करा, याची कारणेच मोडीत काढा, असे काही म्हणत नाही. आम्ही मोडीत निघालो तरीही चालेल पण आम्ही आमचा मार्ग, आमची दिशा, आमची दृष्टी बदलणार नाही. कथित आधुनिकतेपोटी आम्ही मुलभूत शहाणपण सुद्धा गमावून बसण्याच्या टोकावर आलो आहोत. दुर्दैवाने कोणी यावर बोलायला, याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अन इंग्रजीत ज्याला `call spade a spade' असे म्हणतात तसे रोखठोक बोलायचे धाडसही कोणी करीत नाही. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील. मी मोदीजींचा नाव घेऊन मुद्दाम उल्लेख केला. त्यांच्यावर टीका हा उद्देश नाही. पण आज असलेली त्यांची लोकप्रियता, त्यांच्या शब्दाला असलेले वजन आणि अर्थ पाहता, त्यांनी अतिशय नेमके बोलायला हवे. त्यांच्या एकेका शब्दाचे अनेक आणि खोल अर्थ होतात. त्यामुळे ते जेव्हा वैज्ञानिकतेवर बोलतात तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेले व नसलेले अर्थही त्यातून काढले जातात. खालच्या स्तरापर्यंतच्या विचारपद्धतीवर, दृष्टिकोनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे त्यावर किती भर द्यायचा, त्याचा किती आणि कशा प्रकारे, कशा शब्दात पाठपुरावा करायचा याचाही सखोल विचार आवश्यक ठरतो. तसा तो होताना दुर्दैवाने दिसत नाही. याचा अर्थ विज्ञान नाकारणे, बुद्धी नाकारणे असा होत नाही. अगदी आदिम समाजात सुद्धा विज्ञान आणि बुद्धी दोन्हीही होतेच अन पुढेही राहणारच. मुद्दा एवढाच की त्यांच्या कक्षा काय आणि किती असाव्यात? त्यांच्या कक्षा ठरवताना कशाच्या संदर्भात विचार करावा. आज बुद्धी आणि विज्ञान या दोघांनीही समग्र अस्तित्वाचे संदर्भ धुडकावून लावले आहेत. चिंतेचा विषय हा आहे. या दोन्हीचा भस्मासुर झाला आहे. आम्ही त्याचा विचार करण्याचे शहाणपण दाखवणार का? कळीचा मुद्दा हा आहे. एका गीतातील एक ओळ सहजपणे आठवते- `सृजनहीन विज्ञान व्यर्थ है, यदि प्राणी का उपकार नही है... भौतिकता के उत्थानो मे जीवन का उत्थान न भुले... स्वार्थसाधना कि आंधी मे वसुधा का कल्याण न भुले...'

स्टीफन हॉकिंगच्या या मताच्या संदर्भात काही दशकांपूर्वी Arnold Toynbee यांनी व्यक्त केलेले विचार चिंतनीय वाटतात. Toynbee म्हणतात- `today we are still living in this transitional chapter of the world's history, but it is already becoming clear that a chapter which had a western beginning will have to have an indian ending if it is not to end in the self destruction of the human race. in the present age, the world has been united on the material plane by western technology. but this western skill has not only `annihilated distance'; it has armed the people of the world with weapons of the devastating power at a time when they have been brought to point blank range of each other without yet having learnt to know and love each other. at this supremely dangerous moment in human history, the only way of salvation of mankind is an indian way. the emperor ashoka's and mahatma gandhi's principles of non-violence and shri ramkrushna's testimony to the harmony of religions, here we have the attitude and the spirit that can make it possible for the human race to grow together into a single family- and, in the atomic age, this is the only alternative to destroying ourselves.

in the atomic age the whole human race has a utilitarian motive for following the indian way. no utilitarian motive could be stronger or more respectable in itself. the survival of the human race is at stake. yet even the strongest and most respectable utilitarian motive is only a secondary reason for taking ramakrushna's and gandhi's and ashoka's teaching to heart and acting on it. the primary reason is that this teaching is right- and is right because it flows from a true vision of spiritual reality.'

स्वामी विवेकानंद म्हणाले होते- विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र यावेच लागेल. अन या एकीकरणात दोघांनाही परस्परांना खूप तपासावे लागेल आणि सवलती द्याव्या लागतील. गेल्या शंभर वर्षात विज्ञानाने खूप सवलती घेतल्या आणि अध्यात्माची खूप तपासणी झाली. आता विज्ञानाची तपासणी सुरु होण्याची वेळ आलेली आहे. आम्ही तयार आहोत का? दुर्दैवाने हिंदुत्ववादी, गांधीवादी, भारतवादी फक्त शब्द वापरतात गाभ्याला स्पर्शही करीत नाहीत. toynbee ने पौर्वात्य व पाश्चात्य असा जो भेद केला आहे तो समजून न घेता; `पाश्चात्य'वर पूर्वेचे आवरण चढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तो निश्चितच अपुरा आणि चुकीचा आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, ९ मे २०१७

श्रीपादजी अगदी मूलभूत स्वरूपाचे चिंतन आपण  मांडले.आपल्या वैचारिक  अभिनिवेशांना बाजूला ठेवून संपूर्ण मानव समुदायाच्या कल्याणाचा विचार मांडणारे असे चिंतन ही संबंध विश्वमानवाचीच आजची चिंता आहे.एका अर्थाने त्याच्या उद्याच्या अस्तित्वाची ही काळजी आहे.

आपण हॉकिंग,टॉयनबी,विवेकानंद यांचा उल्लेख केला आहे.गांधीजी,गोळवलकर गुरुजी,आणि दिंनदयालजी  यांनीही अशाच स्वरूपाचे विचार मांडले आहेत.हाही उल्लेख आवर्जून करायला हवा होता. 

मानवी जीवन सुखकर,समृद्ध करायला निघालेला आणि त्यामुळेच सगळ्याच मानवी समुदायाला प्राणापेक्षा प्रिय असलेला विज्ञानाचा ब्रह्मराक्षस सगळी मानवी सभ्यताच गिळंकृत करेल की काय अशी भिती सगळ्या विश्वालाच भेडसावते आहे.त्यातूनच "Living right way.. through nature and spirituality " यासारखी चिंतने, परिषदा, चळवळी उभ्या होत आहेत.एकूणच माणूस,समाज आणि निसर्ग यांच्या सहयोग आणि परस्परावलंबित्वावर पुन्हा एकदा जग विचार करायला लागलं आहे.

थोडक्यात मानवी समाजासाठी श्रेय काय ? विज्ञानाने निर्माण केला आभासी आणि आसुरी समृद्धीच्या राक्षसी विळख्यातून मानवी अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे यावर अनेक चिंतक चिंता व्यक्त करीत आहेत.

अडचण या विचारांना प्रत्यक्षात कोणी आणि कसे उतरवायचे ही आहे.त्यासाठी मुळातून आपल्या राजकीय,सामाजिक प्रक्रियेबद्दल चिंतन व्हायला हवे.

समाजाची धारणा आणि त्याला खऱ्या योग्य पथावर नेण्याचे कार्य सत्तानिरपेक्ष सज्जन शक्तीजिचे नेतृत्व सर्वसंगपरित्याग केलेल्या ऋषी परंपरेकडे असेल, या समाजधारणेतून आपल्याकडे  व्यक्ती,समाज आणि पर्यावरण यांच्या परस्पर सहयोगातून साकारलेले आदर्श जीवन अस्तित्त्वात आले होते.आपण म्हणता त्याप्रमाणे निस्वार्थ तपस्या आणि साधनेतून  समाज जीवनाच्या सम्यक हिताचे सत्य ही ऋषी शक्ती निर्भयपणे समाजासमोर मांडीत असे.त्यांचा सत्याचा आग्रह निरपेक्ष राहात असे.समाजाला काय श्रेयस आणि काय प्रेयस याचे योग्य ते भान देत श्रेयसाप्रती अनुगामी करणे हाच त्यांचा जीवनोद्देश राहात असे

आज ती रचना अस्तित्वात नाही.त्याऐवजी राजसत्ता केंद्रित समाज रचना जगासोबत आपणही स्वीकारली आहे.साऱ्या सामाजिक जीवनाचे केंद्र राजकीय सत्ता झाले आहे.तीच सर्वंकष आणि सार्वभौम झाली आहे.समाज जीवनाची सारी क्षेत्रे विलक्षण गतीने आणि ताकदीने प्रभावित करण्याची ताकद तिच्यात आहे.दुर्दैव हे आहे की सत्तेचे राजकारण समाजाच्या श्रेयसापेक्षा प्रेयसालाच जास्त महत्व देणारे आहे.कारण लोकमत हेच सत्तेच्या राजकारणाचे कारक आहे. लोकानुरंजन,लोकानुनय,त्यातून  लोकप्रियता,त्यातून सत्ता,सत्तेतून ,मत्ता,मत्तेतून पुन्हा सत्ता हे विषचक्र ही लोकतंत्र नावाच्या राजकीय रचनेची अपरिहार्यता आहे.त्यामुळे नरेंद्र मोदी असोत की अन्य कोणी, या राजकीय चक्रव्यूहात ते अडकले आहेत. आणि तीच त्यांची मर्यादा आहे.

जे समाजाला प्रिय आहे पण दूरगामी दृष्टीने घातक त्याच्यासाठी आहे.त्यापासून समाजाला परावृत्त करण्याची ताकद कोणत्याच राजकीय नेतृत्वात आज शक्य नाही.कारण त्यांना पुन्हा लोकांमधून निवडून यायचे आहे.

त्यामुळे समाजाला कठोरपणे खऱ्या श्रेयसाकडे नेणे एकट्या राजकीय सत्तेच्या आधारे कदापि शक्य नाही.मोदींसारख्या कणखर राजकीय शक्तीला समाजातील सज्जनांच्या बलदंड प्रसंगी सत्तेलाही नमवू शकणाऱ्या सज्जन शक्तिची समर्थ साथ त्यासाठी गरजेची आहे.

सध्या तरी संघशिवाय अशी दुसरी शक्ती दृष्टीपथ्यास नाही.आपण उल्लेख केलेले सारे महानुभाव वैश्विक मांगल्याचे आणि श्रेयसाचे हे मुलभूत चिंतन मांडून थांबले.ते साकार कशाच्या आणि कोणाच्या बळावर करायचे याची ब्लूप्रिन्ट दुर्दैवाने ते देऊ शकले नाही.सत्ता निरपेक्ष शाश्वत समाज धारणेसाठी आवश्यक सज्जन शक्तीची ब्लूप्रिन्ट डॉ हेडगेवार नावाच्या समाज शास्त्रज्ञाला सुचली.त्याचे स्वप्न आता राष्ट्रजीवनाला प्रभावित करू शकेल या ताकदीला नक्कीच पोहचले आहे. प्रश्न आपण उपस्थित केलेल्या मूलगामी चिंतन आणि बदलाचे हे आव्हान ही संघशक्ती कशी पेलणार आणि ते संघाने पेलावे यासाठी समाजातील सज्जन शक्ती संघाशी स्वतःला जोडून घेत सक्रिय कशी होणार हाच आहे.

- आशुतोष अडोणी

आशुतोष जी, आपल्या आत्मिय दीर्घ प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

काही मुद्दे-

1) डॉक्टर हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ जी यांचा उल्लेख माझ्या लेखात नाही हे खरं आहे. मला वाटतं प्रत्येक वेळी ते आवश्यक नाही. विषयवस्तू आणि त्याची मांडणी या अनुषंगाने सहज जे येईल ते मांडावे. माझी तशी भूमिका असते. अमुक नाव यायला हवं किंवा अमुक यायला नको हे दोन्ही नसतं. शिवाय विशिष्ट समूह हेही लक्ष्य नसल्याने मांडणीच्या चौकटीत येईल तसे उल्लेख असतात.

2) आपण ब्ल्यु प्रिंट चा उल्लेख केला आहे. तशी ब्ल्यू प्रिंट शक्य आणि आवश्यक असते का? यावर दीनदयाळजींनी काहीही लिहिलेलं वा बोललेलं नाही. परंतु त्यांचा याबाबत काय विचार राहू शकला असता यावर दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांचे मत मांडले आहे. अन हे मत मांडताना, स्वा. सावरकर, लेनिन आणि चे गव्हेरा यांच्यात लंडन हाऊस मध्ये ब्ल्यू प्रिंटवर काय चर्चा झाली होती त्याचा संदर्भ दिला आहे. शक्य झाल्यास तो नजरेखालून घालावा.

3) संघ आणि संघटित ऋषीशक्ती - संघ, संघटना याबद्दल आपण सगळ्यांनाच एक वेगळं ममत्व आहे. मी स्वतः तृतीय वर्ष शिक्षित तर आहेच, अन बारा वर्ष तृतीय वर्षात शारीरिक शिक्षक आणि चर्चा प्रवर्तक राहिलो आहे. तरीही मला वाटते, संघटना या गोष्टीच्या मर्यादेचा विचार फारसा होत नाही. तो व्हायला हवा. पंथवेडेपणा त्यातून जन्माला येण्याची शक्यता असते.

संघटनेच्या या अंगभूत मर्यादांमुळेच ऋषी शक्ती संघटीत नव्हती, नाही अन असू शकत नाही. गरजेनुसार एकत्र होण्याची मात्र शक्यता असते. तशी ती होत आली आहे, पुढेही येत राहील. त्यासाठी संघटना (organisation) आणि संघटित अवस्था (organised state) यांचा सखोल विचार आवश्यक आहे.