शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

त्वमानंदमयोसी !!

 'तू आनंदमय आहेस' श्री गणेश अथर्वशीर्षात श्री गणेशाला म्हटलेलं आहे. केवळ आनंद देणारा नाही तर आनंदमय आहेस. तू स्वरूपत: आनंद आहेस. तू आनंद आहेस. जो स्वतःच आनंद आहे तो उदास, दु:खी, वैतागलेला, उद्विग्न कसा असेल? पण असा कायमच आनंदी कसं काय असू शकतं? काय कायम आनंदी कुणी असू शकतं? सुखाचा आनंद आणि दु:खाची वेदना, हे समजतं पण कायम आनंदी कसं काय? मोदक खाण्याचा आनंद, चार मोदक खाल्ले की संपतो. पोटापेक्षा जास्त मोदकांचा आग्रह झाला तर मोद उरत नाही. फुलांच्या सुरेख आरासीचा आनंद, पोटात कावळे ओरडू लागले की क्षय पावतो. नामस्मरणाचा, स्तोत्र पठणाचा आनंद थोड्या वेळाने निद्रानंदाकडे वळतो.

मग हे आनंदमय स्वरूप कसं असेल? ज्या आनंदाला क्षय नाही, ज्या आनंदाला मृत्यू नाही, ज्या आनंदाला अंत नाही; असा आनंद कसा असेल? असेल का? हो, असेल नाही; असतो असा आनंद. कोणत्याही गोष्टीने सुरू होणारा आनंद संपतो. पण हा क्षय नसलेला अक्षय आनंद कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसतो. कोणत्यातरी गोष्टीने मिळणाऱ्या आनंदाला अंत असतो. पण अंत नसलेला हा अनंत आनंद कोणत्याही गोष्टीने मिळत नाही. कोणत्यातरी गोष्टीतून पोहोचणाऱ्या आनंदाचा मृत्यू असतो. पण मृत्यू नसलेला हा अमर आनंद कोणत्यातरी गोष्टीतून पोहोचत नाही. हा आनंद कायम विद्यमान असतो. कोणत्याही गोष्टीशी, कोणत्याही उपाधीशी, कोणत्याही बाह्य कारणाशी तो जखडलेला नसतो. कोणत्याही उपाधीशिवाय, कोणतेही बाह्य कारण नसतानाही तो आनंद असतोच. कसा असतो तो आनंद? कशाचा असतो तो आनंद? कशात असतो या आनंदाचा उगम?

तो असतो आपलं स्वरूप realise होण्याचा आनंद. सुखात किंवा दु:खात, मिळण्यात किंवा गमावण्यात, असण्यात किंवा नसण्यात, जगण्यात किंवा मरण्यात, लाभात किंवा हानीत, शुभात किंवा अशुभात, दृश्यात किंवा अदृश्यात, अंधारात किंवा उजेडात, शब्दात किंवा मौनात, लहानपणात किंवा मोठेपणात; मी कायम असतो. सुख आहे म्हणून मी असतो आणि दु:ख आहे म्हणून मी नसतो, असं नाही. मी कायमच असतो. मी संपत नाहीच. मी संपूच शकत नाही. माझ्या भोवती आहे ते सारं संपतं. संपत नाही तो फक्त मी. अगदी जीवन आणि मृत्यू या देखील फक्त उपाधी. जीवनाआधीही मी असतो आणि मृत्यूनंतरही मी असतोच. 'मी'चं, 'स्व'रूपाचं; हे realisation झालं की जो आनंद असतो; तो असतो अक्षय, अमर, अनंत आनंद. मला क्षय नाही, मला मरण नाही, मला अंत नाही; हे कळल्याने होणारा आनंद मग 'मी'ला आनंदस्वरूप करून टाकतो. मग दुसरं काहीही उरत नाही. असतो तो फक्त निर्विशेष, नि:शेष, निरालंब केवळ आनंद. केवलानंद. कैवल्यानंद. अस्तित्वच आनंदस्वरूप होतं. श्री गणेश असे आनंदमय आहेत, स्वरूपत: आनंद आहेत. उपाधीशून्य आनंद आहेत.

त्यांच्या कृपेने समस्त विश्व आनंदमय होवो, आनंदस्वरूप होवो.

- श्रीपाद कोठे, शनिवार, २२ ऑगस्ट २०२०