शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

संघ, गुरुजी आणि परिवर्तन


सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या दिल्लीतील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आवाका इतका मोठा आहे की त्याचे कवित्व पुढील काही वर्षे सुरु राहणे अपरिहार्य आहे. सध्या गोळवलकर गुरुजी यांच्या bunch of thought चा क्रमांक लागलेला आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीचा प्रमुख राहिलेला आणि नंतर आम आदमी पार्टीत जाऊन, आता पुन्हा राजकारणा बाहेर पडून लिखाणाकडे वळलेला आशुतोष नावाचा पत्रकार, संघावर त्याने लिहिलेले एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध करणार आहे. त्याने स्वत:च हे जाहीर केले असून त्या पुस्तकातही bunch of thought वर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय चालत राहील हे नक्की. या पुस्तकाच्या संदर्भात स्वत: डॉ. भागवत यांनी इतके स्पष्ट आणि नेमके मतप्रदर्शन केले आहे की, वाद होण्याचे कारण नाही. पण समाज माणसांचा बनलेला असतो आणि माणसे विविध प्रकारची, विविध क्षमतांची, विविध प्रकारे विचार करणारी, विविध आकलनाची असतात. त्यामुळे चर्चा स्वाभाविक ठरते. लेखक, वक्ते यांचा हा सामान्य अनुभव असतो की; आपण म्हणतो एक आणि आपण जे म्हटलेलेही नसते तोही अर्थ लोक काढत असतात. त्यामुळे अशा चर्चांचे आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही. शिवाय पहिल्याच दिवशीच्या भाषणाच्या प्रारंभीच सरसंघचालकांनी जो उल्लेख केला होता की, संघ समजावून सांगण्यासाठी from known to unknown अशी अरुंधती न्यायाची पद्धत उपयोगाची नाही. भाषाशास्त्रात ज्याला अनन्वय अलंकार म्हणतात तसा हा प्रकार आहे. त्यामुळे तीही एक अडचण आहेच. म्हणूनच या विषयाची वारंवार मांडणी आवश्यक होऊन बसते.
या चर्चेचे तीन मुद्दे आहेत. १) संघ, २) परिवर्तन, ३) गुरुजींचे पुस्तक. हे तिन्ही विषय एकमेकात मिसळलेले आहेत. रा. स्व. संघ गेली ९३ वर्ष काम करतो आहे. या काळात परिवर्तन हा विषय त्याला आणि संघातील परिवर्तन हा विषय समाजाला नवीन राहिलेला नाही. स्वयंसेवकांना आणि समाजालाही आपल्या परिवर्तनशीलतेने संघाने यापूर्वीही धक्के दिले आहेत. १९३८ सालच्या सिंदी बैठकीनंतर कार्यपद्धती, आज्ञा, प्रार्थना आदी बदल; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संघाच्या प्रतिज्ञेतील बदल; शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमातील वेळोवेळचे बदल; गणवेषातील आजवरचे बदल; रचनांचे बदल; हे तर आहेतच; पण तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आपल्या हयातीतच केलेली पुढील सरसंघचालकांची घोषणा, त्यांचा अंतिम संस्कार सामान्य व्यक्तीप्रमाणे होणे; यासारख्या बदलांनीही संघाची परिवर्तनशीलता आजवर अधोरेखित केली आहे. अर्थात ही परिवर्तने आणि आज ज्या परिवर्तनाची चर्चा सुरु आहे त्यात खूप मोठे अंतर आहे हे खरे. आजवरच्या बाह्य बदलांनी संघाच्या monolithic स्वरूपाला फरक पडत नव्हता; परंतु गुरुजींच्या पुस्तकावरील सरसंघचालकांच्या अभिप्रायाने संघाच्या आंतरिक, वैचारिक, तात्त्विक बैठकीला तडा गेला आहे का; हा अनेकांच्या मनातील खरा प्रश्न आहे. असा तडा गेला असेल तर ते योग्य नाही असे वाटणारे, असा तडा गेला असेल तर दु:ख होणारे आणि असा तडा गेला असेल तर आनंदाच्या उकळ्या फुटणारे असे तीन प्रकारचे लोक आहेत. त्यातही दोन पैलू आहेत. एक आहे गोळवलकर गुरुजी यांच्याविषयीची भावना आणि दुसरा पैलू प्रत्यक्ष विचारांचा. हे दोन्ही पैलू समर्थक आणि विरोधक दोघातही कमीअधिक आहेतच. गुरुजींबद्दल श्रद्धाभाव हा समर्थक आणि स्वयंसेवक यांच्या बाबतीत पाहायला मिळतो, तर गुरुजी म्हणजे संघ असा विचार विरोधकात पाहायला मिळतो. १९४८ चा संघाला चिरडून टाकण्यासाठी करण्यात आलेला राक्षसी आघात आणि स्वातंत्र्योत्तर आमुलाग्र बदललेली परिस्थिती यातून संघाला लखलखीतपणे बाहेर काढून विजयपथावर त्याचा वारू चौखूर उधळण्याची शक्ती त्याला प्राप्त करून देण्यातील गुरुजींचे योगदान; हे या दोन्ही भावनांच्या मुळाशी आहे आणि ते योग्यही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, संघाच्या आंतरिक, वैचारिक, तात्त्विक बैठकीला तडा गेला आहे का?
याचे नि:संदिग्ध उत्तर नाही असे आहे. मुळातच संघाच्या स्थापनेपासून व्यक्तीनिरपेक्षतेवर संघाने एवढा भर दिला आहे की, अशा प्रकारांनी संघटनेला काहीही धक्का बसू शकत नाही. खुद्द गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या अंतिम तीन पत्रात या व्यक्तीनिरपेक्षतेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. `अपना कार्य व्यक्तिपूजक नही राष्ट्रपूजक है’ हे त्यांचेच शब्द आहेत. शिवाय त्यांची स्वत:ची वृत्ती तर अशी होती की, त्यांनी स्वत: स्वत:चे श्राद्ध उरकून घेतले होते. त्यांच्याच हयातीत दुसरा एक वादही निर्माण झाला होता आणि स्वत: गुरुजींनी त्याचे स्पष्टीकरण दिले होते. तो वाद होता, त्यांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेविषयीच्या मतांचा. एका मुलाखतीत प्रश्नोत्तरांच्या ओघात त्यांनी त्या विषयावर मत प्रकट केले होते. त्यानंतर बराच धुरळा उडवण्यात आला. त्यानंतर स्वत: श्री. गुरुजींनी हे स्पष्ट केले होते की, ती मते संघाची नाहीत तर ते त्या व्यवस्थेबाबतचे माझे आकलन आहे. आणखीनही काही बाबी आहेत. श्री गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त गुरुजींच्या विचारांचे जे १२ खंड प्रकाशित झाले त्याच्या प्रस्तावनेत तेव्हाचे सरसंघचालक स्व. सुदर्शनजी यांनी ही गोष्ट स्पष्टपणे नोंदवली आहे की, कोणत्याही महापुरुषांच्या विचारांचे दोन भाग असतात- शाश्वत आणि कालसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष. गुरुजींच्या विचारांचेही तसेच आहे असा त्यांचाही अभिप्राय आहे. त्यामुळे संघाने अधिकृतपणे bunch of thought वर दिलेली प्रतिक्रिया सामान्य प्रक्रियेचा भाग म्हणूनच पाहिली जायला हवी. त्याने संघात वादळ वा फूट इत्यादीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही.
तीन संदर्भांचा उल्लेख अनाठायी ठरू नये. एक पाचवे सरसंघचालक सुदर्शनजी यांच्या संदर्भात. सरसंघचालक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी भोपाळ येथे श्रीमती सोनिया गांधी यांच्याविषयी काही मत मांडले होते. त्यावरून वादंग माजले तेव्हा संघाने अधिकृत पत्रक काढून ते सुदर्शनजी यांचे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले होते. एक प्रकारे आपल्या माजी सरसंघचालकांचे त्यांनी खंडन केले होते. दुसरा संदर्भ श्री. गुरुजींची वृत्ती दाखवणारा आहे. श्री गुरुजी समग्र या १२ खंडातील २ खंड त्यांच्या पत्रांचे आहेत. त्यातील सुधीर फडके यांना लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. सुधीर फडके यांच्या पत्राला दिलेले ते उत्तर आहे. मूळ सुधीर फडके यांचे पत्र तेथे नाही आणि ते माझ्याही वाचण्यात नाही, परंतु गुरुजींच्या उत्तरावरून पुरेसा बोध होतो. संघात सरसंघचालकांना परम पूजनीय म्हटले जाते. सुधीर फडके यांनी पत्र पाठवून गुरुजींजवळ त्याबद्दल आपले वेगळे मत व्यक्त केले होते. त्याला उत्तर देताना गुरुजींनी हे स्पष्ट केले होते की, `तुमची (सुधीर फडके यांना उद्देशून) सूचना योग्यच आहे. मी सामान्य आहे आणि तसेच राहण्याची माझी इच्छा आहे. एवढेच नाही तर सगळ्यांनी मला विसरून जावे आणि केवळ आपल्या कार्याचा विचार करावा. मला परम पूजनीय म्हणू नये यासाठी तुम्ही अखिल भारतीय व प्रांतीय अधिकाऱ्यांशी बोलून प्रयत्न करावा.’ श्री गुरुजी समग्रच्या आठव्या खंडात १९४ क्रमांकाचे हे पत्र आहे. १५ एप्रिल १९५६ रोजी लिहिलेले हे पत्र मुळातून वाचण्यासारखे आहे. श्री गुरुजींचाही काय मानस होता हे त्यावरून स्पष्ट होते.
तिसरा संदर्भ खुद्द संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचा आहे. त्यांना डायरी लिहायची सवय होती. त्या डायरीत त्यांनी त्यांचा मानस लिहिला आहे. ते म्हणतात- `मी या संघाची सुईण आहे. संघाला जन्म देण्यात मी हातभार लावला आहे एवढेच. पण उद्या जर मी संघाच्या कामात निरुपयोगी वाटलो तर मला बाजूला करून आपण योग्य वाटणाऱ्या नवीन व्यक्तीची माझ्या जागी निवड करून संघाचे काम पुढे चालवावे. मी सामान्य स्वयंसेवक म्हणून काम करीत राहीन.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा मूळ विचार आहे, मूळ भाव आहे. यात नाकारणे-स्वीकारणे हा भावच नाही. तो येऊही शकत नाही. कारण एखादी गोष्ट घेऊन चालणे अथवा ती बाजूला ठेवणे यापाठचे कारण स्वार्थ, व्यक्तिगत हेवेदावे, लहरीपणा यातील काहीही नसून कार्याची आणि काळाची गरज एवढेच राहत आले आहे. हिंदू समाजाचे, पर्यायाने राष्ट्राचे आणि त्यापुढील पायरी म्हणजे संपूर्ण विश्वाचे उत्थान- कल्याण- भले होणे- यावर रोखलेली नजर पक्की ठेवून, कार्य आणि काळाची वाटचाल ध्यानी घेऊन स्वीकार-नकार, बदल करीत राहणे. साचलेपण येऊ न देता प्रवहमान राहणे, हे अतिशय कठीण कार्य संघ आजवर करीत आला आहे. सरसंघचालकांचे bunch of thought बद्दलचे वक्तव्य याचाच एक भाग आहे. डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाचे श्वासनिश्वास आहेत. त्यांना सोडले वगैरे भाषा अनुचित आहे, त्या भाषेमागील भाव तर निखालस निंदनीय आहे.
संघाची प्रारंभापासूनची ही भूमिका आणि त्यानुसार वाटचाल ही मूळ हिंदू प्रवृत्तीलाही साजेसी अशीच आहे. तर्को प्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना... नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् ... धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां... महाजनो येन गत: स पन्था: ... हाच भारताचा, हिंदूंचा सनातन विचार आहे. म्हणूनच इथे असंख्य उपासना पंथ, संप्रदाय, जीवनपद्धती, समाजरचना येतजात राहिल्या. या साऱ्यांचे सहजीवन बहरत आले. संघर्ष झाले असतील तर ते मूळ मानवी प्रवृत्तीतील षडरिपूंचा परिणाम म्हणून. जीवन हे प्रवहमान आहे आणि प्रत्येकाला जीवनाचा, जीवनसत्याचा वेगवेगळा प्रत्यय येऊ शकतो. ही सृष्टी नित्यनूतन आहे. तिला विचार, भाव, शब्द, व्यक्ती, रचना, व्यवस्था यांनी बांधून ठेवता येत नाही. ठेवू नये. हां, या जीवनाची ऊर्ध्वगामी दिशा मात्र नजरेआड करू नये. कारण त्यातच हित आहे, सुख आहे, समाधान आहे, सार्थकता आहे; असे भारताचे- हिंदूंचे अनुभवजन्य मत आहे. संघाची वाटचाल आणि सरसंघचालकांचे ताजे मतप्रदर्शन याचाच सहज आविष्कार आहेत.
हे सगळे ठीक. तात्त्विक चर्चा ठीक. पण असे कोणते परिवर्तन झाले की, ही भूमिका घ्यावी लागली? हा कळीचा प्रश्न आहे. बहुसंख्य समाज राजकारणाचा चष्मा लावून वावरत असल्याने तो तसाच अर्थ घेईल. त्याची चर्चा ज्यांना करायची त्यांनी करावी. परंतु परिस्थितीतील बदल हा त्याहून फार फार मोठा आहे. गुरुजींनी ज्यावेळी त्यांचे मत मांडले त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात महदंतर आहे. पाकिस्तानची निर्मिती, मुस्लीम या शब्दाभोवती होणारे विशिष्ट समाजाचे ध्रुवीकरण, ते ध्रुवीकरण होऊ नये यासाठी घेतल्या जाणाऱ्या भूमिका, जगभरातील मुस्लीम समाजाचे मानस आणि जीवन, त्यांचा इतिहास; या सगळ्यातच आज मोठा बदल झालेला आहे. आज पाकिस्तान लयाची चर्चा होते, त्रिवार तलाक रद्द होऊनही मुस्लीम शब्दाभोवती ध्रुवीकरण होत नाही, काही भडक लोक असले तरीही त्यांना प्रतिसाद मिळत नाही, भगवे कपडे घालून एक मुस्लीम व्यक्ती देशभर गोरक्षण आणि संवर्धन यासाठी पदयात्रा काढते, जगभरच्या मुस्लीम देशात हिंदू मंदिरे उभारण्याची सुरुवात झाली आहे, जगभरातील मुस्लीम महिला बुरखा आणि कोषातून बाहेर पडू लागल्या आहेत, मुस्लीम देशात योग मान्यता पावते आहे, कट्टरता अलगथलग पडते आहे, जगभरचे सामाजिक- राजकीय- आर्थिक- सांस्कृतिक- चित्र बदलले आहे, हिंदू म्हणणे आणि म्हणवून घेणे लाजिरवाणे राहिलेले नाही, हिंदुत्वाचा अभिमान बाळगीत हिंदू जग गाजवीत आहेत आणि जगाच्या सुखशांतीत योगदान देत आहेत, जगातील लोक प्रतिनिधीगृहात आणि विभिन्न उपासना पंथांच्या प्रार्थनागृहात हिंदूंना आणि त्यांच्या प्रार्थनांना- त्यांच्या विचारांना प्रवेश मिळालेला आहे. बदल, परिवर्तन हे असे सर्वंकष आहे. ज्यांना ते दिसू शकते त्यांना दिसते, ज्यांना समजू शकते त्यांना समजते. सरसंघचालकांनी व्यक्त केलेले मत, संघाच्या भूमिकेतील तथाकथित बदल या पार्श्वभूमीवरील आणि या संदर्भातील आहे. संघाला यात नवीन काहीही नाही. संघाने अशा अनेक गोष्टी पचवल्या आहेत. बाकीच्यांना आपली पाचनशक्ती ठीकठाक करून घ्यावी लागेल एवढेच.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हिंदू पद्धती, संघ पद्धती


काही दिवसांपूर्वी, ७ सप्टेंबर २०१८ रोजी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शिकागो येथे विश्व हिंदू संमेलनात प्रमुख भाषण झाले. निमित्त होते स्वामी विवेकानंद यांच्या जगप्रसिद्ध शिकागो भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे. `हिंदूंना कोणावर वर्चस्व गाजवायचे नाही,' असे त्यांच्या भाषणाचे सार सांगता येईल. अनेक प्रसार माध्यमांनी ते तसेच लोकांपर्यंत पोहोचवले देखील आहे. या देशाने हजारो वर्षे जो विचार जोपासला, रुजवला, वाढवला तोच सरसंघचालकांच्या भाषणातून प्रतिबिंबित झाला आहे. नुकताच या जगाचा निरोप घेणारे स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी `रग रग हिंदू मेरा परिचय' या लोकप्रिय कवितेतून जो विचार व भाव व्यक्त केला आहे, तोच शिकागोच्या भाषणात प्रकट झाला आहे. थोडक्यात म्हणजे या देशाची हजारो वर्षांची परंपरा, स्वामी विवेकानंद, अटलबिहारी वाजपेयी आणि आता सरसंघचालक डॉ. भागवत असा उदार हिंदू भावाचा एक प्रवाहच वाहतो आहे. सध्याच्या वातावरणात एक सुखद आश्चर्याचा लहानसा धक्काही जाणवला आहे. सगळ्या हिंदूंच्या वतीने सरसंघचालक कसे काय बोलले? ते काय संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधी आहेत का? असे एरवी उत्पन्न होणारे प्रश्न कोणी उपस्थित केले नाहीत. हेही एक सुचिन्हच. वास्तविक जगभरातल्या ६० देशातील हिंदूंच्या प्रतिनिधींसमोर मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांचे भाषण झाले. याचाच अर्थ हिंदूंच्या मोठ्या वर्गाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ते समस्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का इत्यादी प्रश्न गतार्थ होतात.
आणखीन दोन दिवसांनी म्हणजे १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सरसंघचालकांच्या तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रातील नेतृत्वाशी त्यांची चर्चादेखील होणार आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आयोजन केले आहे. अशी छोटी छोटी आयोजने आजवर होत आली आहेत. परंतु नियोजनबद्ध रीतीने आणि व्यापक सहभाग आणि विस्तारित कक्षा असलेले असे हे पहिलेच आयोजन असावे. यात सरसंघचालक काय बोलतात आणि काय चर्चा होते हे प्रत्यक्ष कार्यक्रमानंतर स्पष्ट होईलच. परंतु ते पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या, हिंदू विचारप्रवाह व हिंदू भावप्रवाह याला अनुसरूनच राहील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. याचे कारण म्हणजे रा. स्व. संघाचाही विचारप्रवाह आणि भावप्रवाह तसाच राहत आला आहे.
एका प्रसंगाचे येथे सहज स्मरण होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटायला एक जैन मुनी आले होते. विविध विषयांवर बोलणे सुरु असताना, जैन मुनी म्हणाले - तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना डालडा तूप न वापरण्याचा आदेश का देत नाही? त्यावेळी डालडा तूप वापरण्याविरुद्ध मोठा विचारप्रवाह होता. त्यावर गुरुजी त्यांना म्हणाले- तुमच्याप्रमाणेच डालडा तूप वापरू नये असे माझेही मत आहे. पण मी आदेश कसा देऊ? एक तर संघ असा आदेश वगैरे देत नाही. ती संघाची पद्धत नाही. आमच्याकडे त्यासाठी अधिकार (sanction) नाही आणि तशा पद्धतीने समाजाने चालावे असेही आम्हाला वाटत नाही. संघही तसा चालत नाही. थोडक्यात dominance, वर्चस्व, आदेश हा हिंदुंचाही गुण नाही आणि संघाचाही गुण नाही.
परंतु हा विषय वाटतो तितका सोपा नाही हेही खरे आहे. कारण हा आंतरिक परिवर्तनाचा विषय आहे. बाह्य परिवर्तन किंवा एकूणच बाह्य गोष्टी माणसाला जेवढ्या समजतात, रुचतात, पटतात, उलगडतात, भावतात तेवढ्या आंतरिक गोष्टी; समजत, रुचत, पटत, उलगडत, भावत नाहीत. मनुष्याची एकूण रचनाच तशी आहे. मात्र भारताचे आणि हिंदूंचे हेच वैशिष्ट्य आहे की, त्यांनी प्रयत्नपूर्वक आंतरिक विकासाचा प्रयत्न केला आहे आणि त्यात पुष्कळ अंशी यश मिळवले आहे. जणू हा आंतरिक विकास हाच हिंदुत्वाचा ध्यास आहे. हिंदुत्व बाह्य बाबी नाकारत नाही, बाह्य व्यवस्थापन फेटाळून लावत नाही. परंतु ते हळूहळू कमी होत होत पूर्णत: संपून जावे आणि मानवाचा बाह्य व्यवहार देखील आंतरिक व्यवस्थापनानेच चालावा अशी त्याची दिशा असते. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन, त्याची रचना, नियम, त्यांची लवचिकता या सगळ्यातच आंतरिक विकासाचा हा गाभा असतो. आंतरिक विकासाचे हे सूत्र या सगळ्या प्रयत्नातून गुंफलेले असते. मानवी जीवन हा जिवंत वाहता प्रवाह असल्याने कधी बाह्य तर कधी आंतरिक असे पदर प्रत्ययाला येत असतात. जसजसे हे आकलन वाढते तसतशी ही बाब स्पष्ट होत जाते.
या सूत्राची धारणा पुरेशी झालेली नसल्यानेच भारतात वा भारताबाहेर हिंदुत्व आणि त्याची व्यामिश्रता यांच्या बाबतीत अनेकदा गोंधळ उडतो. संघाच्याही बाबतीत असाच गोंधळ होतो. यातूनच पुष्कळ प्रश्न पुढे येतात. जसे भारतीय जनता पार्टी किंवा त्या पक्षाचे लोक आणि त्या पक्षाची सरकारे संघाच्या आदेशाने चालतात वा नाही हा विषय. भाजपा संघाच्या आदेशाने चालत असेल तर अनेक बाबतीत अंतर्विरोध का पाहायला मिळतो. भाजपा जर संघाची नाळ नाकारत नाही किंवा संघही भाजपाची नाळ नाकारत नाही तर त्यांच्यात विसंवाद का होतो? किंवा अगदी स्वयंसेवकांच्या मनात येणारे प्रश्न सुद्धा असतात. चार पाच दिवसांपूर्वी एक स्वयंसेवक बोलता बोलता म्हणाला- `संघाने पुष्कळ काम केले आहे पण अजूनही आपण आपल्याच स्वयंसेवकांना बदलू शकलेलो नाही. तसे नसते तर, मी केलेला आंतरजातीय विवाह संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या माझ्या वडिलांनीच स्वीकारू नये?' ही त्याची तक्रार नव्हती त्याचे दु:ख होते. कारण तो स्वयंसेवक होता. पण हाच मुद्दा संघाचे टीकाकार वा विरोधक तक्रार म्हणून वा संघाची त्रुटी म्हणून वा संघाचे अपयश म्हणून मांडतील. हा आमचे किंवा तुमचे असा वाद होईल एवढेच. मात्र मूळ मुद्दा बाजूला राहतो की, माणूस आदेशाने नव्हे तर आंतरिकतेने व्यवहार करतो. अन संघाचे काम ही आंतरिकता शुद्ध, प्रगल्भ, व्यापक, सखोल करणे हे आहे. हे प्रदीर्घ काळाचे काम आहे. कदाचित मानवी समाजाला नेहमीच गरज भासणारे. हे नीट ध्यानी घेतले की, संघ आणि संघाचे स्वयंसेवक; संघ आणि ज्या हिंदू समाजासाठी संघ काम करतो तो समाज, संघ आणि ज्या हिंदू भावाने संपूर्ण मानवजात भारून टाकण्याची मनिषा संघ बाळगतो ती मानवजात; यांचे परस्पर नाते, यांचे परस्पर संबंध, व्यवहारातील विस्कळीतपणा वा विसंवाद, तरीही तत्त्वांचे आग्रही प्रतिपादन; या साऱ्याचा उलगडा होत जातो.
संघाचे काम हे आवाहनाचे काम आहे, आव्हानाचे नाही. संघाचे काम निमंत्रणाचे आहे, नियंत्रणाचे नाही. ते आंतरिक परिवर्तनाचे आहे. या आंतरिक परिवर्तनात जोरजबरदस्ती चालत नाही. तो या परिवर्तनाचा मार्ग नाही. जीवनाच्या श्रेयसाची जाणीव करून देणे, विश्वातील उत्तम- उदात्त- उन्नत- भावांची, विचारांची, व्यवहारांची ओळख आणि जाणीव करून देतदेत, मनाला पटवून देतदेत पुढे जाण्याला हातभार लावणे; ही आहे हिंदूपद्धत. हीच आहे संघपद्धत. आकलनाला थोडी किचकट आणि गुंतागुंतीची खरी, पण पक्केपणाची खात्री असणारी !! म्हणूनच तर १७, १८, १९ जानेवारीच्या सरसंघचालकांच्या भाषणमालेचे शीर्षक आहे- `भविष्य का भारत : संघ का दृष्टीकोण'. हा दृष्टीकोन सगळ्यांनी समजून घ्यावा, action plan आपापला राबवावा. दृष्टीकोन ही आंतरिक बाब आहे. तो ठाकठीक करावा. कृती कार्यक्रम बाह्य बाब आहे. त्यात dominance असू नये. ही जी कठोर लवचिकता आहे तेच आहे हिंदूंचे आणि संघाचे वैशिष्ट्य. म्हणूनच नवी दिल्लीतील कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रण देण्यात संघाला गैरही काही वाटत नाही. बाकीच्यांनाही वाटू नये. आंतरिक परिवर्तन होईल त्या प्रमाणात बाकीच्यांचे हे वाटणेही गळून पडेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १५ सप्टेंबर २०१८