”भ्याडपणा आणि हिंसा यांच्यात निवड करण्याचा जर प्रसंग आला तर मी हिंसा करावी म्हणेन. उदाहरणार्थ, माझ्या थोरल्या मुलाने जेव्हा मला विचारले की, १९०८ साली तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी जर मी हजर असतो, तर मी काय करायला पाहिजे होते? पळून जाऊन तुम्हाला मारू द्यायचे हे योग्य झाले असते, की आपल्या शरीरबळाचा जो उपयोग मला करता आला असता आणि करावासा वाटले असते तो करून, तुमचा बचाव करणे योग्य झाले असते ? मी त्याला  सांगितले की, हिंसा वापरून सुद्धा माझा बचाव करणे हेच तुझे कर्तव्य ठरले असते. मी बोअर युद्धात, झुलूंच्या बंडात आणि पहिल्या महायुद्धात जो भाग घेतला; तो या माझ्या मतामुळेच. म्हणूनच हिंसामार्गावर विश्वास असणाऱ्यांनी शस्त्रे चालविण्याचे शिक्षण घेतले पाहिजे असे मी सांगत असतो. हिंदुस्थानने आपल्या सत्वाची पायमल्ली होत असलेली भ्याडपणे उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्यापेक्षा त्याचे रक्षण करण्याकरिता शस्त्रे हाती घेतलेली मला पत्करली. शिक्षा करण्याची शक्ती असेल तेव्हाच ती न करण्यात क्षमा आहे. एखादा दीन जीव आपण क्षमा करतो असे म्हणतो तेव्हा त्यात काही अर्थ नसतो.’
– महात्मा गांधी (congress brochure no. 1 – satyagraha. all india congress committee publication. page 44-45)
माझ्या कल्पनेतील समाजात अत्याचार घडणारच नाहीत. पण आज ज्या समाजात आपण राहत आहोत त्यात असे अत्याचार घडत आहेत हे खरे आहे. त्या बाबतीत माझे उत्तर अगदी नि:संदिग्ध आहे. अहिंसा व्रत घेतलेला पुरुष अथवा स्त्री प्रत्याघात न करता आणि मनात क्रोध किंवा त्वेष न आणता आपले किंवा आपल्या स्त्रीजनांचे रक्षण करीत करीत मरून जाईल. त्यांनी मरून जावे. शूरत्वाचे हे अत्युच्च स्वरूप आहे. (हरिजन- २१ ऑक्टोबर १९३९)
हा महान जीवनधर्म अनुसरण्याची ज्या व्यक्तीची किंवा व्यक्तीसमूहाची शक्ती अथवा इच्छा नसेल त्याच्या बाबतीत प्रत्याघात किंवा आमरण प्रतिकार हीच त्याच्या खालोखाल उत्तम गोष्ट आहे. अर्थात ती पहिल्या गोष्टीपासून अतिशय दूर आहे. भ्याडपणा म्हणजे नपुंसकपणा आहे आणि तो हिंसेहूनही अत्यंत वाईट आहे. भ्याड मनुष्याला सूडाची इच्छा तर असते, पण स्वत: मरणाला भीत असल्याने तो दुसऱ्यांनी आपल्याकरिता रक्षणाचे काम करावे अशा इच्छेने दुसऱ्यावर, म्हणजे त्या त्या काळच्या सरकारवर अवलंबून राहतो. भ्याड मनुष्य हा मनुष्यच नव्हे. स्त्री-पुरुषांच्या कोणत्याही समाजाचा घटक म्हणून राहण्यास तो नालायक आहे. (हरिजन- १२ सप्टेंबर १९४६)
मी मानीत असलेला अहिंसाधर्म ही पराकाष्ठेची क्रियाशील शक्ती आहे. त्यात भ्याडपणाला किंवा दुर्बलतेला बिलकुल वाव नाही. हिंसक मनुष्य हा कधी ना कधी अहिंसक बनण्याची आशा आहे; पण भ्याडाच्या बाबतीत ती मुळीच नाही. म्हणून मी अनेक वेळा सांगत आलो आहे की, आम्हाला आमचा, आमच्या स्त्रियांचा आणि आमच्या पूजास्थानांचा बचाव आत्मक्लेशाच्या म्हणजेच अहिंसेच्या बळावर कसा करावा याचे ज्ञान नसेल तर, आणि आपण मर्द असू तर लढाई करून त्यांचा बचाव करण्याची तरी शक्ती निदान आपल्यात असली पाहिजे. – महात्मा गांधी (selection- page 160)
आमच्या अहिंसाभक्तांच्या बाबतीत दु:खाची गोष्ट ही आहे की, त्यांनी अहिंसेचे आंधळे स्तोम माजवून लोकांत खऱ्या अहिंसेचा प्रचार होण्याच्या मार्गात फार मोठे विघ्न उत्पन्न केले आहे. अहिंसेविषयी आज जे प्रचलित मत आहे (आणि जे माझ्या मते चुकीचे आहे) त्याने आपल्या मनोदेवतेला भूल पाडली आहे. आणि कठोर शब्द, कठोरपणे बनवलेली मते, क्रोध आणि मत्सर, तसेच क्रूर लालसा या व यासारख्या हिंसेच्या इतर अनेक सूक्ष्मतर प्रकारांसंबंधी आमच्या भावना मारून टाकल्या आहेत. माणसांचा आणि प्राण्यांचा सावकाशीने केला जाणारा छळ, स्वार्थलंपटपणाने त्यांची केली जाणारी उपासमार आणि पिळवणूक, दुबळ्यांची मनसोक्त केली जाणारी विटंबना आणि त्यांच्यावर होणारा जुलूम व त्यांच्या स्वाभिमानाची केली जाणारी हत्या; या सर्व गोष्टी ज्या आपण आज आपल्या सभोवार पाहत आहोत त्या, केवळ सद्बुद्धीने केलेल्या जीवहत्येपेक्षा किती तरी पटीने हिंसक आहेत ही गोष्ट आपण वरील प्रकारच्या अहिंसेबद्दलच्या मतामुळे विसरून जातो.
– महात्मा गांधी (young india, 4 october 1928)
एखादा वेडा झालेला मनुष्य मोकाट सुटलेला आहे आणि पुढे येईल त्यावर हाणामार करीत आहे अशा वेळी त्या वेड्याला आवरण्याकरिता शरीरबळाचा उपयोग केला तर तो योग्य म्हणता येईल की नाही? किंवा एखादा जमाव क्षुब्ध होऊन मनाला येईल ते करीत सुटला आहे; तर त्याला आवरण्यासाठी समजा अश्रुधूर वापरला तर ते योग्य होईल की नाही? अशा प्रश्नांना माझे उत्तर असे की, या उपायांची मी केव्हाही गय करीन. परंतु अहिंसेच्या दृष्टीकोनातून ते उपाय योग्य आहेत असे मात्र मी म्हणणार नाही. शुद्ध, अहिंसक उपाययोजनेवर विश्वास ठेवण्याइतके अहिंसेचे प्रमाण तुमच्यामध्ये नाही असे मी म्हणेन. ते जर असेल तर तुमची नुसती उपस्थिती तो वेडा शांत होण्याला पुरेशी होईल. अहिंसा ही काही एखादी यांत्रिक गोष्ट नाही. `मी शरीरबलाचा उपयोग करणार नाही’ एवढे म्हणून काही तुम्ही अहिंसक होत नाही. ती हृदयात स्फुरली पाहिजे. तसे स्फुरण असेल तर ती कोणत्या ना कोणत्या कृतीतून प्रकट होईलच. ती मग खुण असेल, नुसता दृष्टीक्षेप असेल किंवा मौन सुद्धा असू शकेल. पण ती जी काही कृती होईल त्याने चूक करणाऱ्याचे अंत:करण विरघळेल आणि चूक घडण्याला आळा बसेल.
अश्रुधुराचा उपयोग आदर्श अहिंसेच्या दृष्टीने योग्य म्हणता येणार नाही. पण एखाद्या असहाय्य तरूण मुलीला अत्याचारापासून वाचविणे किंवा क्षुब्ध झालेल्या जमावाला पिसाटपणाची कृत्ये करण्याला अटकाव करणे हे अश्रुधूर वापरल्यावाचून काही शक्य नाही. अशा धर्मसंकटात जर मी सापडलो तर साऱ्या जगाविरुद्ध जाऊन मी त्यांचा बचाव करीन. मी अहिंसेचा धर्म पत्करल्यामुळे या कृत्यांना अडथळा करू शकलो नाही, असे जर मी ईश्वरापुढे गेल्यानंतर म्हणू लागलो, तर ईश्वर मला क्षमा करणार नाही. अहिंसा ही स्वयंप्रभावी आहे. संपूर्णपणे अहिंसक असणारा मनुष्य हा स्वभावत:च हिंसा करण्याला असमर्थ असतो किंवा तिचा त्याला उपयोगच नसतो. कोणत्याही परिस्थितीत त्याची अहिंसा ही पुरेशी समर्थ असते.
म्हणून हिंसेचा वापर हा कोणत्याही प्रमाणात आणि कोणत्याही परिस्थितीत अयोग्य असे जेव्हा मी म्हणतो, तेव्हा ते मी सापेक्ष अर्थाने म्हणतो. एका शाश्वत सिद्धांताला अमुक अपवाद, तमुक अपवाद असे मान्य करण्यापेक्षा माझ्यातच पुरेशी अहिंसा नाही असे मी म्हणणे अधिक योग्य ठरते. दुसरी गोष्ट म्हणजे, अहिंसेला अपवाद नाहीत असे मानल्यामुळे अहिंसेच्या तंत्रात ज्या उणीवा असतील त्या भरून काढण्याची मला प्रेरणा मिळते. `अहिंसाप्रतिष्ठायां तत् सन्निधौ वैरत्याग:’ (अहिंसा सुप्रतिष्ठित झाली असताना तिच्या सान्निध्यात वैरभाव टिकतच नाही.) या पतंजली मुनींच्या सूत्रावर माझा अक्षरशः विश्वास आहे.
– महात्मा गांधी (हरिजन, ९ मार्च १९४०)
मला विंचवा सापांची, वाघा सिंहांची, प्लेगच्या उंदरांची आणि दूषित माश्यांची भीती वाटते. तशीच भयानक दिसणाऱ्या दरोडेखोरांची आणि मारेकऱ्यांचीही मला भीती वाटते. हे मला कबूल केले पाहिजे. यापैकी मी कोणालाही भिता कामा नये हे मला समजते. पण ही काही बुद्धीची कसरत नव्हे. ती हृदयाची करामत आहे. ईश्वराच्या भितीशिवाय इतर सर्व भीती टाकून द्यायला पोलादाहूनही कठीण अंत:करण लागते. असे असले तरीही अहिंसेवर विश्वास आणि हिंसेवर विश्वास यामध्ये दक्षिण आणि उत्तर किंवा जीवन आणि मरण यांच्याइतके अंतर आहे. जो आपल्या भवितव्याची अहिंसेशी म्हणजे प्रेमधर्माशी सांगड घालतो, तो हिंसेचे वर्तुळ रोजच्या रोज कमी करीत जातो आणि तितक्या प्रमाणात जीवन आणि प्रेम यांची वाढ करतो. जो हिंसेवर म्हणजे द्वेषधर्मावर निष्ठा ठेवतो तो हिंसेचे वर्तुळ रोजच्या रोज वाढवीत जातो आणि तितक्या प्रमाणात मृत्यू आणि द्वेष यांची वाढ करतो.
– महात्मा गांधी (हरिजन, २२ जून १९३५)
हिंसा तेवढी सर्व वाईट आणि म्हणून तिचा निषेधच केला पाहिजे. हा जरी सिद्धांत असला तरी अहिंसाभक्ताने लढाई करणाऱ्या दोन पक्षात आक्रमक आणि बचाव करणारा असा भेद जर केला आणि तसा भेद करून अहिंसक रीतीने; म्हणजे बचाव करणाऱ्याला वाचविताना आपला प्राण देऊन, जर त्याने त्याची बाजू घेतली तर ते क्षम्य आहे. नव्हे ते अहिंसाभक्ताचे कर्तव्य आहे. या त्याच्या हस्तक्षेपामुळे कदाचित झगडा लवकर थांबण्याचा संभव आहे आणि कदाचित दोन पक्षात त्यामुळे सलोखा घडून येण्याचाही संभव आहे.
– महात्मा गांधी (हरिजन, २१ ऑक्टोबर १९३९)
महात्मा गांधी यांचे `अहिंसा’ या विषयावर काय म्हणणे होते या संदर्भात त्यांचे काही वेचे वर दिले आहेत. गांधीजींचे लिखाण इतके विस्तृत आहे आणि त्यांचे विषय इतके विविध आहेत की, ते सगळे वाचून काढणे हाच आयुष्यभराचा एक उपक्रम करता येईल. मी पोस्ट केलेले ८-१० वेचे हे वानगीदाखल आहेत. परंतु त्यावरून काही निष्कर्ष मात्र निश्चितपणे काढता येतात.
१) गांधीजींची अहिंसा ही आपण समजतो त्याहून अधिक खोल, व्यापक, सर्वस्पर्शी, व्यावहारिक आहे.
२) कॉंग्रेस आणि पंडित नेहरू यांनी interpret केलेले गांधी खरे गांधी नाहीत.
३) कॉंग्रेस आणि पंडित नेहरू यांनी देशाच्या माथी मारलेल्या `गांधी’ने देशाचे नुकसानच केले.
४) कॉंग्रेस आणि पंडित नेहरू यांनी देशाच्या माथी मारलेल्या `गांधी’मुळे एकीकडे बोटचेपेपणा आणि दुसरीकडे `मजबुरी का नाम महात्मा गांधी’ अशी भावना निर्माण झाली.
५) नथुरामने गांधीजींना मारल्याचा कॉंग्रेसने फायदा करून घेतला. कॉंग्रेस विसर्जित करणारे गांधीजी त्या पक्षाला नकोच होते. तसेच गांधी जगणारा आणि गांधी विचारांशी अधिक जवळीक असणारा रा.स्व. संघही कॉंग्रेसला नको होता. गांधींना नथूरामने अनायसे संपवले. कॉंग्रेसने संघाला संपवण्यासाठी याचा पुरेपूर वापर केला.
६) कॉंग्रेसच्या या खेळीने गांधी बाजूस सारल्या गेले. उरली केवळ गांधी नावाची भुते. खरे गांधी काय आहेत हे धूसर होत होत संपून गेले.
७) या प्रकरणात रा.स्व. संघ आणि स्वा. सावरकर यांना जे काही भोगावे लागले त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांचा राग गांधींवर निघाला. संघाने कधीच गांधीद्वेष केला नाही, पण स्वयंसेवकांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. अजूनही करावे लागतात. सावरकर या प्रकरणानंतर १७-१८ वर्षे होते. पण त्यांचा तो काळ बहुतांश निराश अवस्थेत गेला. त्यामुळे त्यांच्या मार्गावर गांधींची मांडणी करण्याचा प्रयत्नच झाला नाही.
८) गांधींशी कोणालाच काही देणेघेणे नाही असे पाहून डाव्यांनी आपले घोडे दामटले. त्यांना कॉंग्रेस, गांधी, संघ, सावरकर हे काहीच नको होते. त्यांना भारतच नको होता आणि भारतीयताही नको होती. भारताचे ते काहीच वाकडे करू शकत नव्हते. मग त्यांनी गांधी हातात धरून भारतीयता संपवण्याचे प्रयत्न सुरु केले.
९) परिणामी गांधीवादी म्हणवणारे अनेक पंथ निर्माण झाले. अशा डाव्या गांधीवादी पंथांनी हातात व तोंडात गांधी बाळगला पण त्याच्या साहाय्याने अभारतीयता, जडवाद, भोगवाद, नास्तिकता, वर्गसंघर्ष पेरला. रामायण, भगवद्गीता, वेद, उपनिषदे, प्राचीन भारतीय शास्त्रे, प्राचीन भारतीय व्यवस्था-रचना हे सारे गांधी विचारांचे, आचारांचे आधार होते. डावे गांधीवादी पंथ आणि लोक हे शब्द उच्चारायला सुद्धा तयार नसतात. उच्चारलेच तर फक्त शिव्याशाप देण्यासाठी.
१०) कॉंग्रेसने स्वार्थासाठी, हिंदुत्वनिष्ठांनी स्वाभाविक चीड आणि गैरसमजातून आणि डाव्यांनी हेतूपुरस्सर विकृतीकरण करून गांधी अडगळीत टाकले. त्यामुळे गांधींची समयानुकूल व्याख्या करणे तर दूरच, गांधी जसे होते तसे मांडलेही गेले नाहीत.
– श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १४ फेब्रुवारी २०१७