बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

देवाजीचे देणे

दहावी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेल्या पुतण्याला भेटायला पुण्याला गेलो होतो. एवढ्या दूर आलोत तर चार दिवस भटकून येऊ असा विचार केला. नेहमीप्रमाणेच पर्यटन, सहल असे नसल्याने धोपटी उचलायची अन चालू लागायचे. सोबत, जाण्यायेण्याची व्यवस्था, राहण्याखाण्याच्या सोयी इत्यादी गोष्टी ध्यानात घ्यायच्या नसतातच भटकताना. भटकंती म्हणजे भटकंती. यावेळी होते शिवथरघळ आणि रायगड. त्यातील शिवथरघळ पहिल्यांदाच जाणार होतो. रायगड शाळेत असताना सुमारे ४० वर्षांपूर्वी चढलेला. राज्य परिवहनाच्या पुण्याच्या स्थानकावरून सुरुवात झाली. चौकशीच्या खिडकीवर विचारले तर तिथला माणूस म्हणाला- महडची बस हवी की महाडची. म्हटलं शिवथरघळला जायचं आहे. तो म्हणाला, त्यासाठी महाडची बस. देशाटनाने ज्ञानात भर पडते, असे एका संस्कृत सुभाषितात सांगितले आहे. यावेळी त्याची अशी सुरुवात झाली. महड म्हणजे अष्टविनायकातील एक स्थान. महाड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता ते. सुमारे पाच तासांचा प्रवास करून बस महाडला पोहोचली. दुपारचा एक वाजला होता. महाड स्थानकावर शिवथरघळच्या बसची चौकशी केली. तिथला माणूस म्हणाला- दीड वाजता बस आहे, पण ड्रायव्हर मिळाला तर जाईल. ज्ञानात भर पडणे सुरूच होते. वाट पाहण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. दुसरेही ८-१० लोक होते. त्यांना घळीच्या पायथ्याशी असलेल्या शिवथर गावी जायचे होते. या वाट पाहण्याच्या वेळात बरेच प्रबोधन झाले. या बसची समस्या काय, त्यातील खाजगी वाहनांच्या व्यवसायाचा भाग, कोणाकोणाचे काय काय हितसंबंध, गावातील गट इत्यादीची आपसूक माहिती झाली. अधुनमधून माझी साक्ष काढणेही सुरु होते. मी पहिल्यांदाच महाडला आलो आहे याच्याशी त्यांना सोयरसुतक नव्हते. अखेर बहुप्रतिक्षित बस आली. पण ती शिवथरला जाणार की नाही हे जाणून घेणे महत्वाचे होते. म्हणजे चालक-वाहक तयार असणे महत्वाचे होते. नुसती बस असून उपयोग नव्हता. त्यात पुन्हा पाचेक मिनिटे गेली अन बस जाणार हे निश्चित झाले.
महाडहून साधारण ३०-४० किमीचा प्रवास. हा प्रवास मात्र रमणीय. दुसरा शब्दच नाही. बस चांगली होती, चालवणारा चांगला होता, बसमध्ये गर्दी नव्हती, बाहेर ढग आणि भुरभूर पाऊस होता, आजूबाजूला सर्वत्र हिरवाई अन डोंगर होते. साधारण सव्वादोनला बस शिवथरघळला पोहोचली. २-४ वाहने उभी होती. दोन झोपडीवजा हॉटेल्स. अन पलीकडून प्रचंड आवाज येत होता न दिसणाऱ्या धबधब्याचा. पावले अर्थातच घळीकडे वळली. पन्नासेक मीटर चालून गेलो तर समोर १०० फूट उंच अन वीसेक फूट रुंद धबधबा शिवथर नदीत कोसळत होता. पाच मिनिटे होतो तिथेच उभा राहिलो. मग ही रौद्रसुंदरता जवळून अनुभवण्यासाठी घळीच्या पायऱ्या चढू लागलो. दोन पायऱ्या चढलो अन सर आली धावून. पुढच्या २०-२५ पायऱ्या चढून होईपर्यंत चिंब. मजाच मजा. घळीच्या अगदी समोर कोसळणाऱ्या त्या धबाबा धारांचे वर्णन काय करावे? `सावधान' हा शब्द कानी पडताच ज्यांची विरक्ती जागी झाली त्या विरक्त समर्थांनासुद्धा त्या धबाब्यावर लिहावेसे वाटले यातच सारे आले. नितांत रमणीय अशी ती रौद्रसुंदरता साठवत साठवत घळीत पोहोचलो. मनात आलं- आजही जगाच्या कोलाहलापासून दूर निबिड एकांतात असलेलं हे स्थान साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी कसं शोधून काढलं असेल, इथे २२ वर्षं ते कसे राहिले असतील आणि जगापासून दूर अज्ञात अशा या ठिकाणी जगाच्या नेमक्या दुखण्यावर कालातीत असं औषध श्रीदासबोधाच्या रुपात कसं तयार केलं असेल...
समर्थ स्मरणात मन असतानाच घळीतील समर्थांच्या मूर्तीचे अन प्रभू रामाचे दर्शन घेतले. तिथेच टेकलो. समोर धबधबा कोसळत होता. त्याचा जादुई आवाज आसमंतात भरून राहिला होता. घळीत तुषार येत होते. मिणमिणत्या दिव्यांनी दूर न झालेला अंधार मनावर गारुड जमवीत होता. समर्थ आणि श्रीदासबोध मनात पिंगा घालीत होते. तासभर कसा गेला कळलेच नाही. शेजारी एक सज्जन येऊन बसले. ते धुळ्याचे. नोकरीनिमित्त महाडला. सुटी घालवण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चार गोष्टी झाल्या. त्यांना म्हटले- तुमच्या धुळ्याचे स्व. शंकरराव देव यांनीच ही जागा १९३० साली शोधून काढली. त्यांना ते माहीत नव्हते. त्यांना माझ्याबद्दल उगाचच आदर निर्माण झाला. म्हणाले- तुमचा चांगला अभ्यास आहे दिसतो. मीच खुलासा केला- अहो, अभ्यास वगैरे काही नाही. तिथे पाटी आहे. त्यावर लिहिलेली माहिती आहे ही. आपण लोक कुठे जातो तेव्हा फारसं लक्ष देऊन (attentive राहून) पाहत नाही, फिरत नाही हे पुन्हा प्रत्ययाला आलं. ते सज्जन गेले, मीही बाहेर पडलो. तिथल्या व्यवस्थापनाचे एक दोघे जण समोर बसले होते. त्यांना विचारले- येथे निवासाची काही सोय? त्यांनी पुणेरी कोरडेपणाने अन तटस्थतेने उत्तर दिले- काहीही नाही. मी काही लगेच हार मानणारा नाही. रेटून धरले. नागपूरहून आलोय. चार वाजत आलेत. परतायला बस नाही. इत्यादी. पुणेरी असल्याने त्यांना याचे काहीही वाटायचे कारण नव्हते. दोन मिनिटे उभा राहिलो. मग म्हटले- त्या विकीपेडियावर तर माहिती दिली आहे की, इथल्या हॉलमध्ये राहता येते म्हणून. आता दोघांपैकी एकाला स्वर सापडला. त्यांनी विचारले- किती जण आहात? म्हटलं- एक. एकटा जीव सदाशिव. हे उत्तर ऐकताच लगेच उत्तर आले- नाही सोय राहण्याची. एकट्या माणसाला आम्ही नाही राहू देत. असा अनुभव यापूर्वीही गाठीशी असल्याने मी म्हणालो- मला तुमच्या अडचणी माहीत आहेत. अमुक अमुक ठिकाणीही असेच झाले होते. पण आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र (कार्ड) पाहून त्यांनी परवानगी दिली होती. ते निष्ठावंत मात्र माझा सहानुभूतीने विचार करायला तयार नव्हते. अखेर मी माघार घेतली आणि घळीच्या पायऱ्या उतरलो.
खालच्या हॉटेलात गेलो. मालकाला म्हटले- जेवायचे आहे. `उशीर झाला हो' अशी तक्रार त्याने केली. तरीही जेऊ मात्र घातले. मग त्यालाच विचारले मुक्कामाचे. म्हणाला- नाही. आता आली ना पंचाईत... चहू बाजूंनी उंच डोंगर, निवासाची व्यवस्था नाही, परतायला गाडी नाही, अन संध्याकाळचे पाच वाजलेले. शहरातले संध्याकाळचे पाच आणि डोंगरदऱ्यातले पाच यातील फरकाचे ज्ञान झाले. अर्थात घाबरून जाण्याचं, निराश होण्याचं वगैरे काही कारण नव्हतं. `समर्थाचिया सेवका' कोण वक्र पाहे? मनाशी ठरवलं, अंधार पडायच्या आत शिवथर गावात पोहोचायचं. कोणी घरात घेतलं तर ठीक, नाही तर घराबाहेर घराच्या आडोशाने ताणून द्यायची. सकाळी ताजेतवाने होण्यासाठी नदी आहेच अन मग महाडला पोहोचू. ठरवले अन डोंगर उतरू लागलो. पाच-दहा मिनिटे चाललो अन समोरच्या झाडाआडून एक माणूस सामोरा आला. हातात कोयता असलेला तो, बाजूच्या शेतातील शेतकरी होता. पण हे ध्यानी यायच्या आतच मारुततुल्य वेगाहून अधिक वेगाने मनात काय काय येऊन नाही गेले... गेले काही तास मनात समर्थ, श्रीराम, हनुमान आदींच्या सोबतीला श्रीदासबोध, श्रीरामायण अन त्यामुळेच वाल्मिकीही होते. म्हटले- हा वाल्या कोळी तर नाही. पण मी काही देवर्षी नारद नाही. हा आपल्याला लुटेल का? मारून टाकेल का? अन लगेच हेही आले- लुटले तर लुटले, मारले तर मारले. या शिवथर नदीतून वाहत वाहत अंती तर सागरालाच भेटायचे आहे. पण काहीही झाले नाही. आम्ही एकमेकांना ओलांडून पुढे गेलो.
थोडे आणखीन पुढे चाललो अन एक ऑटोरिक्षा येताना दिसली. म्हटले, याला चमत्कार, प्रभूची कृपा इत्यादी म्हणायला हरकत नाही. त्याला हात दाखवला. महाडला नेशील का विचारले. हो म्हणाला. तो कोणाला तरी शिवथरघळला घेऊन चालला होता. प्रवास पुन्हा घळीकडे सुरु झाला. घळीत भेटलेले धुळ्याचे सज्जन त्याच रिक्षात होते. त्यांनाही उशीर झाला होता अन इकडे येणारी ही रिक्षा त्यांनी पकडली. मला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणाले- तुम्ही मुक्काम करणार होता नं. काय झाले? मी त्यांना सगळा प्रकार सांगितला. आमच्याशिवाय त्या रिक्षात एक महीला अन एक पुरुष, असे दोघे होते. त्या महीला माझे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होत्या. माझे बोलणे झाले. दोन मिनिटांनी त्यांनी मला विचारले- तुम्ही संघाचे काम करता का? माझ्या आश्चर्याला सीमा नव्हती. मी म्हटले- हो. पण तुम्ही कसे काय विचारले? त्या म्हणाल्या- मला वाटले. तोपर्यंत घळ आलीच होती. त्या म्हणाल्या- चला वर. मी म्हटले- तुम्ही जाऊन या. आम्ही जाऊन आलो मघाशीच. तशा त्या म्हणाल्या- चला तर. आम्ही वर गेलो. त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थांना त्या म्हणाल्या- तुम्ही या दर्शन करून. अन त्या वळल्या व्यवस्थापक मंडळींकडे. अन सुरु झाला तोफखाना- यांना का राहू देत नाही? इतक्या दुरून लोक येतात. काय करायचे त्यांनी? सोय असून नकार का? कोणाशी बोलू सांगा? त्यांची सरबत्ती आणि व्यवस्थापकांचे ना, सुरूच होते. त्या परिसरातून फोन लागत नाही. पण त्या महीला त्यांना म्हणाल्या- मला माहीत आहे एक जागा. तिथून फोन लागतो. चला माझ्यासोबत आपण फोन करू. अखेरीस मी मध्ये पडलो. म्हटले- त्या एवढं म्हणतायत तर फोन लावून पहा ना... नाही तर मी जाईन परत. त्यावर व्यवस्थापक राजी झाले. ते इमारतीच्या आत गेले. आत बाकीही काही मंडळी होती. मी बाहेरच थांबलो. आत काय झाले कोणास ठाऊक. सगळे बाहेर आले. अन व्यवस्थापक मला म्हणाले- तुमचं एखादं ओळखपत्र दाखवा अन सामान आत घ्या. दर्शनाला आलेल्या गृहस्थांना रात्री मुंबईला परतायचे होते. त्यामुळे त्या महिलेने माझे नाव, फोन नंबर लिहून घेतले अन ती मंडळी परतली.
नागपूरहून पुण्याला जातानाच ठरवले होते- शिवथरघळला मुक्काम करायचा. ऐन वेळी नकार मिळाला होता अन तासा दीड तासातच नाट्यमय रीतीने माझा शिवथरघळ येथील मुक्काम सुरु झाला होता
एकदाचे मुक्कामाचे निश्चित झाल्यावर मात्र काही अडचण झाली नाही. व्यवस्थापक मंडळीही `नागपूरकर, नागपूरकर' म्हणून बोलू लागले. संध्याकाळी तेथील प्रार्थना झाली. त्यात सहभागी झालो. प्रार्थना आटोपून बाहेरच्या जागेत उभे होतो तेवढ्यात `हे लोक राजकारणी आहेत' हे सांगण्याची गरज पडू नये अशा पद्धतीने १५-२० लोक घळ चढून आले. त्यातील एक जण माझ्याचकडे आले. म्हणाले- रायगडचे उपजिल्हाधिकारी आहेत. मी त्यांना व्यवस्थापकांकडे पाठवले. थोडी धावपळ वाढली. सुमारे अर्धा तास तो गट होता. मला त्या साऱ्याशी काहीही करावयाचे नव्हते. मिट्ट काळोखात काही दिसतं का, जाणवतं का हे शोधण्याचा माझा खेळ सुरु होता. रात्री कळले, आलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी नव्हते तर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याचे पी.ए. होते. ज्यांना राजकारणाची थोडीफार ओळख आहे तेही जाणतातच की, तिथे पी.ए.चे सुद्धा पुष्कळ पी.ए. असतात. असो. थोड्या वेळाने व्यवस्थापकांनी आवाज दिला- `नागपूरकर चला जेवायला.' वरण, भात, भाजी, पोळी, कढी असे छान जेवण झाले. व्यवस्थापक मंडळींपैकीच एकाच्या कोणाचा तरी त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे जिलबी आली होती. तिचाही आस्वाद घेतला. जरा वेळ शतपावली, गप्पाटप्पा झाल्यावर झोपायच्या मार्गाला सगळे लागले. तिथे राहणाऱ्या लोकांची नियमित व्यवस्था आहे. ते तिकडे गेले. मुक्कामाला येणाऱ्या बसचे चालक वाहक रोज तिथेच मुक्कामाला असतात. त्यामुळे त्यांचीही व्यवस्था आहेच. माझी सोय मोठ्या हॉलमध्ये होती. थोड्या वेळाने चालक वाहक आले. त्यांची जेवणे झाली. थोड्या शिळोप्याच्या गप्पा. तेही झोपायला गेले. मी एकटाच होतो. मुख्य व्यवस्थापक जवळ आले. त्यांच्या मनात गेले काही तास असलेला प्रश्न त्यांनी केला- `त्या महिला कोण तुमच्या?' म्हटलं- `कोणीही नाहीत. त्या मला रिक्षात भेटल्या.' त्यांचं समाधान झालं नाही हे स्पष्ट दिसत होतं. पण बोलले काही नाहीत. मीच म्हणालो- `माझी तीव्र इच्छा होती. प्रभूने ती अशी पूर्ण केली असं मला वाटतं. यावर फार डोकं खर्च करावं हेही माझ्या स्वभावात नाही.' त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक? किंचित हसले अन म्हणाले, `विश्रांती घेऊ या. शुभ रात्री.' ते झोपायला गेले. शे-दोनशे माणसे झोपू शकतील एवढ्या त्या दालनात आता मी अन बाहेरील धबधब्याच्या पार्श्वसंगीताच्या साथीने मूर्तीतून माझ्यावर कृपावर्षाव करणारे समर्थ एवढेच होतो. पांघरूण घेतले अन डोळे मिटले.
पहाटे ४ वाजता प्रसन्न जाग आली. आवरून बाहेर आलो तर काळोख रुपयात एक आणा कमी झाला होता. मंडळींची सकाळच्या प्रार्थनेची तयारी सुरु होती. बाहेर बसूनच मी त्या प्रार्थनेत सहभागी झालो. लगेच गरमागरम चहा झाला. आंघोळ उरकून निघण्याची तयारी करावी या विचारात होतो. थंड पाण्याची सवय असूनही गरम पाणी मिळाल्यास बरे असे वाटण्याएवढी थंडी होती. नजर टाकली तर आचाऱ्याने भला मोठा गंज पाणी तापायला ठेवला होताच. आंघोळ उरकून, तयारी करून अन घळीत जाऊन आलो. शिवथरघळच्या भेटीची अन निवासाची पुरचुंडी बांधून घेतली अन पायऱ्या उतरलो. सव्वासातला बस हलली. डोंगर पार करत फोनच्या रेंजमध्ये पोहोचलो तर फोन वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घेतला अन खुलासा झाला. पलीकडून काल माझ्यासाठी व्यवस्थापनाशी भांडणाऱ्या ताई बोलत होत्या. काही अडचण आली का, निघालात का इत्यादी विचारपूस. अन शेवटी निमंत्रण- `तुम्ही महाडला येताहात. स्थानकाच्या मागेच चालत येण्याच्या अंतरावर माझे घर आहे. चहा नाश्त्याला या.' नाही म्हणणे असभ्य ठरले असते. एक तर त्यांनी माझी मदत केली होती अन अचानक आपल्याला मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही होतीच. त्यांच्या घरी पोहोचलो. छोटेसे नीटनेटके दोनच खोल्यांचे घर. म्हणजे मुळात तो मोठा वाडा. वाटण्या वगैरे झाल्या अन प्रत्येकाच्या वाट्याला जे आले त्यात प्रत्येकाने आपापले संसार थाटलेले. अर्थात ही सगळी माहिती नंतर झाली. गेल्यावर आगत स्वागत झाले. परिचयाची देवाणघेवाण झाली. तेव्हा कळले- त्या ताई विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महिला प्रमुख आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या कामाशिवायही पुष्कळ सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात. कपाटात शोभणारी मेडल्स, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे त्याची साक्ष पटवतात. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की, प्रशांतजी हरताळकर (आता दिल्लीत मुक्काम, विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे काम पाहतात.) सुद्धा त्यांच्याकडे बरेचदा राहून गेले आहेत. त्यानंतर दुराव्याचे कारण उरले नाही. कारण प्रशांतजी ओळखीचेच. शिवाय विदर्भातले. मूळ अकोल्याचे पण अनेक वर्षे नागपुरात राहिलेले. त्यामुळे औपचारिकता गळून पडली. चहा नाश्ता झाला.
आता काय कार्यक्रम? त्यांचा प्रश्न. म्हटले- रायगडला जायचे आहे. आमचे खाणेपिणे सुरु असतानाच एक दोन काका लोक आले होते. एक त्यांच्या परिचयातील निवृत्त शिक्षक श्री. भुस्कुटे. स्वत: चांगले लेखक. त्यांचा मुलगा संजय भुस्कुटे मुंबईला प्रसार माध्यमात. अन दुसरे बँकेतून निवृत्त झालेले. ताई डबे देण्याचा व्यवसायही करतात. अन्य अनेक कमाईच्या अन बिन कमाईच्या कामांसह. ते काका डबा घ्यायलाच आले होते. त्यांना ताईंनी काही सूचना दिल्या आणि त्या काकांनी मला रायगडला जाणाऱ्या गाडीत बसवून दिले. निघताना मलाही सूचना दिल्या- पायऱ्यांनी जाऊ नका. पाऊस आहे, त्यामुळे निसरडे असेल. शिवाय धुकं आहे. काहीही दिसणार नाही. अन तुम्ही एकटे जाताहात. त्यामुळे रोप वे ने जा. रोप वे च्या मालकांनाही त्यांनी फोन केला, आपले पाहुणे येताहेत म्हणून. निघताना म्हणाल्या- संध्याकाळी आले की इकडेच यायचे. रात्रीचे जेवण इथेच. त्यानंतर मी काही बोलणार तर त्या म्हणाल्या- रात्रीच्या मुक्कामाचं मी पाहते. शेजारी काका आहेत. एकटेच असतात. त्यांच्याकडे होईल सोय. समजूतदारीचा विशिष्ट स्तर असला की अनेक गोष्टी सोप्या, सहज होतात त्या अशा.
रायगडावर पोहोचलो. रोप वे चे तिकीट काढले. नजर इकडे तिकडे फिरवली. तिथे संघाचे चौथे सरसंघचालक रज्जुभैयांचा एक फोटो लागलेला दिसला. कुठल्या तरी कार्यक्रमाला ते आले असतानाचा. रोप वे च्या माझ्या capsule मध्ये दोन तरुण पोरे अन कर्नाटकचा एक हौशी फिरस्ता होता. capsule वर सरकू लागली अन क्षणार्धात खालचे सगळे तर गायब झालेच पण समोरचा भलाथोरला रायगड सुद्धा दिसेनासा झाला. प्रचंड धुके दाटले होते. गडावर कसे होणार. फिरता येईल की नाही अशी चर्चा करीतच चढणे सुरु होते. दोघा तरुणांपैकी एक जण फारच बहाद्दर होता. एवढा की, पहिल्या मिनिटाला त्याने मिटलेले डोळे त्याला उतरायला सांगितले तेव्हाच उघडले. रायगडावर उतरलो तेव्हा धुके थोडे कमी झाले होते अन भुरभूर सुरु झाली होती. आमच्या चौघांचा एक गट तयार झाला होता. त्या गटासाठी एक वाटाड्या केला आणि भ्रमंती सुरु झाली. ४० वर्षांपूर्वी पाहिले होते त्यातील काही आठवते का हे पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राणीवसा, राजमहाल, टांकसाळ, राजदरबार, सिंहासन असे करत करत होळीच्या माळावर पोहोचलो. वाटाड्याने जाहीर केले. आम्ही इथवरच येत असतो. बाजारपेठ, केदारेश्वर मंदिर, महाराजांची समाधी तुमची तुम्ही पाहा. त्याचा निरोप घेऊन निघालो. होळीचा माळ पार केला. तिथेच स्थानिक बाया, मुली चहा, बिस्किटे विकत होत्या. चहा घेतला. त्याच पिठले भाकरी जेवणाची सोयही करतात. जेवण कराल का म्हणून त्यांनी विचारले. जेवायचे होतेच. मी आणि दोघे तरुण यांनी होकार दिला. बाजारपेठेतून मधल्या वाटेने शे-दोनशे फुटाची ढलान उतरते तिथे पाच-सहा झोपड्या आहेत. तिथेच आम्हाला जेऊ घालणाऱ्या लीलाबाईची झोपडी. आम्हाला तिने ती दाखवली. तिला झोपडी दिसत होती. त्यावरचा झेंडा दिसत होता. आम्हाला मात्र धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. अखेर तिच्यासोबत खाली उतरून मी प्रत्यक्ष पाहून आलो अन पावले केदारेश्वराकडे वळली.
मंदिरात पोहोचलो. गाभाऱ्यात गेलो. त्या ओल्या अंधारात गुडघे खाली टेकवले. केदारेश्वराच्या पिंडीला स्पर्श केला अन अंगांग शहारले. हीच ती ज्योतिर्मय पिंडी जिला; त्या मृत्युंजय महापुरुषाने अन त्याला जन्म देणाऱ्या पुण्यश्लोक माऊलीने अनेकवार स्पर्श केला असेल. हीच ती ज्योतिर्मय पिंडी; जिच्याजवळ त्यांच्या मनातील कैक आशा निराशेच्या ओंजळी रीत्या झाल्या असतील. अन हीच ती पिंडी जिच्या छायेत त्या मृत्युन्जयाने अनंताच्या प्रवासाला पाऊल उचलले होते. थोडा वेळ निरव शांततेत तिथेच घालवला. बाहेर आलो. समोरच्या प्रांगणातील महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. स्वराज्यासाठी बेलाग राजधानी वसवणाऱ्या हिरोजी इंदोलीकरच्या पायरीला भक्तिभावाने स्पर्श केला अन परतीची वाट धरली. पीठ मळून ठेवून अन पिठले तयार करून लीलाबाई आमची वाटच पाहत होती. हातपाय धुवून झोपडीत शिरलो. पाच मिनिटात पिठलं, भाकरी, कांदा, मिरची, चटणी अशा थाळ्या समोर आल्या. तुटून पडलो, पण मांडीला अंग घासत म्याऊ म्याऊ करणाऱ्या मनिला भाकरीचा तुकडा टाकल्यानंतरच. जेवताना चारदोन गोष्टी झाल्या. रोज गिऱ्हाईक मिळतात का? त्यावर उत्तर होते- हो, रोज मिळतात. कधी एक, कधी दोन, कधी चार-पाच. काही कार्यक्रम असला की मग मात्र गर्दी होते. पुढचा प्रश्न होता- तेवढं पुरतं का? त्यावर उत्तर होतं- हो पुरतं. मनोमन माहीत होतं की त्यांच्या झोळीत अजून पडायला हवं आहे. पण समाधान काय असतं हे अनुभवायला मिळालं अन त्याच वेळी बाहेर थैमान घालणारं असमाधान डोक्यात चमकून गेलं. पूर्ण उभं राहून बाहेर पडता येणं अशक्य असलेल्या त्या कुडातून बाहेर पडताना विचार करून पाहिला, कशी राहत असतील या पाच-सहा झोपड्यातील लोकं इथे. अंधार पडल्यावर काय करीत असतील. दिनचर्या कशी असेल, सण उत्सव कसे असतील, सुख दु:ख कशी असतील, भीती वाटत असेल का... इत्यादी. फारसा कल्पनाविलास नाही करता आला.
रायगड दर्शन करून महाडला परतलो. ताईंना फोन केला. म्हटले- रायगड दर्शन छान झाले. आता चवदार तळ्याला कसे जायचे सांगा. दलितोद्धाराच्या चळवळीचे ते ऐतिहासिक प्रतिक पाहून येतो. त्यांनी रस्ता सांगितला. त्यानुसार गेलो. ते ऐतिहासिक तळे पाहिले. आता तो परिसर राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आला आहे. मोठ्ठा तलाव, बगीचा, डॉ. आंबेडकरांचा पुतळा अन एक इमारत तेथे आहे. तिथे थोडावेळ घालवून परतलो. ताई वाटच पाहत होत्या. चहा झाला. सोबतच गप्पाही. ताईंना दोन मुली. दोघींचीही लग्न झालेली. यजमान एका मुलीकडेच गेलेले होते. त्या मूळ मराठा. ब्राम्हण तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे गेली ३३ वर्षं माहेरच्यांनी त्यांचं नाव टाकलेलं. सासरी मात्र सगळ्यांनी स्वीकारलं. गणपतीला त्यांच्याच हातचे मोदक हवेत. लग्नाच्या वेळी शिक्षण फक्त दहावीपर्यंत. नंतर बारावी केलं. आता मुलीपासून प्रेरणा घेऊन एलएलबी करणार आहेत. पण शिक्षण नसूनही कामात, संघटनेत, कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या, मिरवणुकांच्या आयोजनात वाघ; पोलिसांशी भांडायलाही कमी नाही की, मुलींना लाठीकाठी शिकवण्यात कमी नाही; भाषणही देणार अन रायगडावर दोन हजार वृक्षही लावणार. चहासोबत हा सगळा इतिहास कळला. मग म्हणाल्या मी थोडी बाहेर जाऊन येते. तुम्हाला आंघोळ करायची असेल, कपडे धुवायचे असतील तर उरकून घ्या. त्या बाहेर गेल्या. मी आंघोळ, कपडे धुणे उरकले. तोवर त्या आल्याच. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. मी सह्याद्री पाहू लागलो. निग्रहाने अन्य वाहिन्या नाकारणारे लोक आहेत हे नक्की.
थोड्या वेळाने जेवणे झाली. मग त्या म्हणाल्या, मी जाऊन येते. माझी एक मुस्लिम मैत्रीण आहे. शाळेत असतानाची. तिला आज रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तिने निमंत्रण दिले- 'कितीही वेळ झाला तरीही ये. अगदी मध्यरात्री सुद्धा चालेल. मी तिच्याकडे जाऊन येते.' साधारण नऊ वाजले होते. तासाभरात त्या जाऊन आल्या. थोड्या वेळ बोलून शेजारच्या काकांकडे गेलो. ते सानिया मिर्झाचा खेळ पाहत होते. त्यांनी स्वागत केले. बिछाना तयारच होता. मला त्यांच्याकडे सोपवून ताई घरी गेल्या. आम्ही जरा वेळ गप्पा मारल्या. काका ६५ वर्षांचे. अविवाहित. एकटेच असतात. इलेक्ट्रिकची कामे करतात. दुकान होते. बंद केले आहे. अजून हिमालयात ट्रेकिंगला जातात. छान गट्टी जमली. रात्री झोप झाली. सकाळी उठलो. त्यांना उठवले. त्यांनी लगेच चहा केला. पाणी तापवले. आंघोळ वगैरे करून तयार झालो. नागपूरला येण्याचं निमंत्रण दिलं. निरोप घेण्यासाठी शेजारी ताईंकडे गेलो. पाच मिनिटे टेकलो. त्यांनी हातावर बर्फी ठेवली. पाणी दिले. त्यांनाही नागपूरचे निमंत्रण दिले. रस्त्यापर्यंत त्या सोडायला आल्या. त्यांचा निरोप घेतला अन पुढचा प्रवास सुरु झाला.
त्यांनी मला का विचारले असेल- तुम्ही संघाचे आहात का म्हणून? का माझ्यासाठी भांडल्या असतील? विश्वास का टाकला असेल? हे प्रश्न घेऊनच बसमध्ये चढलो. एक मात्र खरं की, सर्वत्र अविश्वासाचे वातावरण असतानाही लोक परस्परांवर विश्वास ठेवतात अन तो सार्थही ठरवतात. सगळ्यांनाच असा अनुभव येईल का? संघाचे सगळेच लोक असे वागतील का? संघाचे आहोत म्हणून कोणी त्यांच्याकडे गेलेत तर त्यांनाही अशीच वागणूक मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच राहतील. कुठला तरी ऋणानुबंध तर नक्कीच असेल, पण त्यासोबतच या अनुभवातील दोन्ही घटकांचा - माझा व ताईंचाही - विश्वास की, हे संघाचे संस्कार आहेत आणि जे काही घडत असतं ते ती अज्ञात शक्तीच घडवीत असते हेही कमी महत्वाचे नक्कीच नाहीत.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ जुलै २०१६

अखंड भारत म्हणजे...

ऑगस्ट महिना आला की, अखंड भारताचा विषय सहजच येतो. येत्या १५ ऑगस्टला ६९ वर्षे पूर्ण होतील. पण त्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. खरे तर अखंड भारत हा विषय तेवढ्यापुरता नाहीच. तो फार मोठा आहे. या विषयाची चर्चाही भरपूर होते. अखंड भारताचे पक्षधर आणि त्यात अर्थ नाही अशा दोन्ही बाजू पुढे येत असतात. मात्र `अखंड भारत' म्हणजे नेमके काय याचा विचार दोन्ही बाजूंना फारसा केलेला दिसत नाही. अगदी शेषराव मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या पुस्तकाचा प्रतिवाद या स्वरुपात प्रकाशित झालेल्या पुस्तकात सुद्धा अखंड भारताची चर्चा नाही. त्या कल्पनेची मांडणी देखील नाही. अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते आणि अखंड भारत म्हणताना काय अभिप्रेत असते; या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही तफावतच पुष्कळशा वादविवादांना जन्म देते.
अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते? भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचे एक राज्य, एक पंतप्रधान, एक मंत्रिमंडळ, एक राज्यघटना इत्यादी. शिवाय १९४७ च्या फाळणीमुळे जी पार्श्वभूमी लाभली आहे त्यामुळे, हिंदू-मुस्लिम संख्या आणि त्यांचे संबंध. अखंड भारत म्हटल्यावर साधारण याच्यापलीकडे चर्चा वा कल्पना जात नाही. मात्र अखंड भारत म्हणजे एवढेच अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. `अखंड भारत' आमच्या राष्ट्रीयत्वाचा हुंकार आहे. ती आमच्या राष्ट्रीयत्वाची आकांक्षाही आहे. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हेदेखील नीट समजून घ्यायला हवे. भारतीय राष्ट्रकल्पना आणि nation कल्पना एकच नाहीत हेही समजून घ्यायला हवे.
राष्ट्र म्हणजे काय? `आम्ही एक आहोत' ही जनसमूहातील भावना म्हणजे राष्ट्र. राज्य ही राष्ट्राला मजबूत करणारी आणि त्याचे संरक्षण करणारी एक व्यवस्था आहे. राष्ट्र आपल्याला हवी ती राज्यव्यवस्था निर्माण करतं किंवा नको असणारी राज्यव्यवस्था बदलून टाकतं. राष्ट्र ही मूळ आणि सर्वोपरी बाब आहे. पण ज्याला राष्ट्र म्हणतात अशी ही ऐक्यभावना असते तरी कशी? ती कशी निर्माण होते? कशी वाढते? त्याचा नेमका उगम आणि स्वरूप काय? याबाबत भरपूर गोंधळ आहे. निवासाचा भौगोलिक प्रदेश, भाषा, चालीरीती, परंपरा, प्राचीनता, जाती, पंथ, संप्रदाय, पूजापद्धती, इतिहास, मालकी इत्यादी आधारावर जनसमूहात ऐक्य निर्माण करण्याचे, ऐक्य टिकवण्याचे, एकत्व साधण्याचे अनेक प्रयत्न झाले अन आजही होत आहेत. हे सगळेच प्रयत्न फसलेले आहेत. अन भविष्यात होणारे असे प्रयत्न फसतील यातही शंका नाही. जगाचा प्राचीन अन अर्वाचीन इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. कोट्यवधी शवांचे उसासे, लाखो मैल लांबीच्या रक्ताच्या नद्यांचे नि:श्वास, मानवतेच्या अपार हानीचे हिशेब या इतिहासात दबलेले आहेत. मग याचा अर्थ हा आहे का की, राष्ट्र ही चुकीची बाब आहे? राष्ट्रकल्पना टाकून द्यायला हवी का? असा काही निष्कर्ष काढण्याआधी भारताची राष्ट्रकल्पना समजून घ्यायला हवी.
अथर्ववेद सांगतात- व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासातून राष्ट्र उदयाला येतं. व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासाची ही पहिली पायरी नाही अन शेवटचीही पायरी नाही. पहिली पायरी आहे कुटुंब. त्यानंतर क्रमाने भवताल, गाव, ग्रामसमूह, असे करत करत `आत्मवत सर्वभूतेषु' इथवर प्रवास चालतो. राष्ट्र ही त्या प्रवासातील वैश्विकतेच्या अलीकडची पायरी आहे. भाषा, परंपरा, इतिहास, रीतीभाती इत्यादी गोष्टी राष्ट्र जन्माला घालत नाहीत, तर आत्मभावाच्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियेतून त्यांचा विकास होतो. या आत्मभावाच्या विकासाला जे जे साहाय्यक ते ते त्यामुळे स्वीकार्य ठरते, राष्ट्रीय ठरते. त्यातूनच राष्ट्रीय स्वभाव, राष्ट्रीय मूल्य आकाराला येतात. ही दृष्टी अन त्यासाठीचे प्रयत्न यातूनच भारतीय राष्ट्र विकास पावले. त्याचा स्वभाव आणि चारित्र्य घडले. म्हणूनच ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पारशी या सगळ्यांना भारताने उदार आश्रय दिला. भारतभरातील भाषाभूषा ऐक्यभावनेच्या आड आल्या नाहीत. भारतीय ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दर्शनातून, सगळे विश्वब्रम्हांड एकाच स्पंदनाचे आविष्कार आहेत या साक्षात्कारातून ही भारतीय दृष्टी विकसित झाली. म्हणूनच योगी अरविंद तर पुढे जाऊन म्हणतात- indian nationalism is nothing but sanatan dharma. त्यामुळेच भारतात एक सर्वसमावेशक, नित्य विस्तारशील राष्ट्र आकारास आलं.
परंतु प्रश्न तेव्हा निर्माण झाले जेव्हा भारतात आलेल्या काही शक्तींनी सर्वसमावेशक दृष्टी नाकारली. भारताने विकसित केलेली ही जीवनदृष्टी आणि जीवनशैली नाकारून एकांगी भूमिका ज्यावेळी भारतात मूळ धरू लागली अन धुडगूस घालू लागली, त्यावेळी स्वत:च्या विश्वकल्याणी दृष्टीचे, विचारांचे, तत्वांचे अन जीवनाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या राष्ट्राने केला. म्हणूनच संघर्ष आणि रणवीरांचा इतिहास तुलनेने अलीकडचा आहे. वेद, उपनिषदांमध्ये रणसंघर्ष नाही. मात्र अलीकडील काळात रचलेल्या पुराणांमध्ये हा संघर्ष आहे. त्याचे कारणच संघर्षाचा विचार, त्यासाठीची सिद्धता आणि प्रत्यक्ष पराक्रम यांचा इतिहास या मूळ राष्ट्रावरील आक्रमणानंतरचा आहे. या संघर्षाचा मोठा आणि अलीकडचा परिणाम म्हणजे १९४७ ची भारताची फाळणी होय. या हजारेक वर्षांच्या संघर्षाचा परिणाम हा झाला की, या राष्ट्राच्या स्वाभाविक विकासाला खीळ बसली. याचा अर्थ आत्मभावाच्या विकासाला, एकत्वभावनेची अनुभूती अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसली. त्यासाठी करावयाच्या उदात्त अन प्रचंड उद्यमाऐवजी सर्वसमावेशकता नाकारणाऱ्या शक्तींशी संघर्षातच काळ, शक्ती, बुद्धिमत्ता, धन सगळे खर्ची पडले.
या पार्श्वभूमीवर अखंड भारताचा विचार महत्वाचा ठरतो. सगळ्यांना सामावून घेत, शांततापूर्ण सहजीवन हा जर भारतीय राष्ट्रकल्पनेचा व्यावहारिक आशय घेतला तर; अस्मिता भडकावून छोटे मोठे गट तयार करणे, त्याआधारे सत्ता आणि संपत्तीसाठी सतत संघर्ष करणे ही भारतेतर राष्ट्रकल्पना त्याज्यच ठरते. पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानची समस्या याच `आम्ही तुम्हाला मानत नाही' या उद्दंडतेचा परिणाम आहेत. नव्हे जगभरातील अशांतता, उद्रेक, स्थलांतराचे प्रश्न, देशांचे घडणे अथवा मोडणे, युरोपीय युनियनसारखे प्रयोग फसणे, अण्वस्त्राचा धोका हे सगळे exclusivist सत्ताकांक्षी अस्मितेचे अन त्यालाच राष्ट्र समजण्याचे परिणाम आहेत. याच्या मुळाशी भारतेतर जीवनदर्शनांची अपूर्णता आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व जगात कोणीही नाकारीत नाही. मात्र ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वीही होत नाहीत. हे प्रयत्न जिथे अडतात किंवा अपयशी ठरतात तेथे जीवनदृष्टीचा, विचारांचा अपुरेपणा हेच कारण असल्याचे दिसून येते. एखादी गोष्ट का स्वीकारायची अथवा का नाकारायची, एखाद्या गोष्टीचा आग्रह का धरायचा अन एखादी गोष्ट का सोडून द्यायची अशासारखे प्रश्न जीवनदृष्टीच्या अपुरेपणाने निर्माण होतात. भारताने या समस्येवर मात करीत प्रदीर्घ काळ एकरस समाज येथे घडवला. एक सत्य, व्यापक, व्यावहारिक, सर्वसमावेशक, सगळ्यांचा आदर करणारे, पण लघुता- क्षुद्रता- अभद्रता- यांचा त्याग करीत `आम्ही एक आहोत' हा राष्ट्रभाव विकसित करणारे उत्तुंग जीवनदर्शन सगळ्यांपुढे ठेवून, तशा आदर्श जीवनाची आकांक्षा जागवून भारताने ते केले. संपूर्ण जगालाही शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग कोण दाखवणार? जे त्या मार्गावरून चालले आहेत ते. भारत आणि या भारतातील हिंदू समाज यांच्यावरच ही नियतीदत्त जबाबदारी आहे. म्हणूनच ऋषींनी `वसुधैव कुटुंबकम' म्हटले, ज्ञानोबांनी `हे विश्वची माझे घर' म्हटले आणि आचार्य विनोबांनी `जय जगत' म्हटले. परंतु हे होईल कसे? हा जो प्रवास राहील त्याचा प्रारंभ म्हणजे `अखंड भारत'.
१९४७ साली भारत खंडित झाला. अपार जीवितहानी, वित्तहानी झाली. खूप कटुता निर्माण झाली. या साऱ्याची चर्चा होते त्यावेळी त्याची कारणे शोधून आरोप प्रत्यारोप होतात. रा. स्व. संघ, हिंदू महासभा यांनी भारत अखंड राहावा यासाठी काही केले नाही असा आक्षेप घेतला जातो. तर महात्मा गांधींनी आपल्या प्रेतावरून भारताचे विभाजन होईल असे म्हटल्याची अन त्यांनी काहीही केले नाही अशीही टीका होते. कॉंग्रेसने तर अधिकृतपणे विभाजनाला मान्यता दिलीच. कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे हवे होते त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरजच नाही. मात्र ही सगळी चर्चा विभाजन का स्वीकारले याची आहे. विभाजन का झाले याची नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रा. स्व. संघ, हिंदू महासभा, गांधीजी, कॉंग्रेस यापैकी कोणीही देश तोडण्याची मागणी वा भाषा केली नव्हती. देश अखंड राखण्यात कोणी अपयशी ठरले असेल, कोणी विभाजन मान्य केले असेल; मात्र तशी कोणाची मागणी नव्हती. दुसऱ्या शब्दात या सगळ्या संस्था, संघटना, पक्ष अन लोक हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाचे विरोधी नव्हते. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र राहू नये असे यापैकी कोणाचेही म्हणणे नव्हते. याचे मुख्य कारण हिंदूंची बहुसंख्या हेच होते. हिंदू कुठेही असला तरीही स्वभावतः सहअस्तित्ववादीच असतो. मग विभाजन कशामुळे झाले? विभाजन सहअस्तित्वाला नकार देण्याच्या मुस्लिम मानसिकतेमुळे झाले. आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्हाला विशेष लाभ, विशेष दर्जा असला पाहिजे, अन्य लोक दुय्यम आहेत या मुस्लिम प्रवृत्तीतून भारत विभाजित झाला. ही मानसिकता नाकारणारी मुस्लिम संख्या थोडी होती, प्रभावहीन होती हे विभाजनाचे एकमेव कारण आहे. विभाजन घडवून आणणाऱ्या पाश्चात्य शक्तींनीही याच मानसिकतेचा आधार घेऊन, तिला खतपाणी घालून विभाजन प्रत्यक्षात घडवले. द्विराष्ट्रवाद कोणाची देणगी आहे यावरही चर्चा होत असते. त्यात स्वा. सावरकर यांचेही नाव येते. चर्चेपुरता हा दावा स्वीकारला तरीही, सावरकरांना दोन देश हवे होते असा त्याचा अर्थ होत नाही. एकाच देशात दोन राष्ट्रसमूह राहू शकतात. त्यामुळे द्विराष्ट्रवाद कोणीही प्रतिपादन केलेला असला तरीही ते भारत विभाजनाचे कारण नाही. भारत विभाजनाचे एकमेव कारण सहअस्तित्वाला नकार देणारी मुस्लिम मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीचे पोषण करणारे त्यांचे तत्वज्ञान हेच आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खंडित स्वरुपात स्वतंत्र झाल्यानंतर मात्र एक लक्षणीय बदल झाला. कॉंग्रेसने उराशी बाळगलेले अखंड भारताचे ध्येय सोडून दिले. गांधीजींनीही आपल्या अखंड भारताच्या स्वप्नाला तिलांजली दिली. परंतु रा. स्व. संघ, हिंदू महासभा, स्वा. सावरकर यांनी मात्र अखंड भारताच्या ध्येयाचा त्याग केला नाही. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेला भारतीय जनसंघ या राजकीय पक्षानेही अखंड भारताचे ध्येय स्वीकारले होते. यातील हिंदू महासभा शक्तिहीन आणि निष्प्रभ झालेली आहे. सावरकरांचा वारसा सांगणारी कोणतीही संघटीत शक्ती अस्तित्वात नाही. अन भारतीय जनसंघाचा नवीन अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षाने अखंड भारत हा विषय टाकून दिलेला आहे. रा. स्व. संघ मात्र अजूनही अखंड भारताचे स्वप्न बाळगून आहे. प्रसिद्ध समाजवादी डॉ. राममनोहर लोहिया यांनी जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासह अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल या स्वरुपात एका confederation ची कल्पना मांडली होती. रा. स्व. संघातर्फे अजूनही अखंड भारताचे स्मरण केले जाते आणि त्याची ती आकांक्षाही आहे.
अखंड भारत ही वास्तविकता होऊ शकेल का? कशी असेल ही वास्तविकता? याचाही विचार अस्थानी ठरू नये. एक राज्य, एक सरकार, एक पंतप्रधान, एक सैन्यदल, एक कायदा असे त्याचे स्वरूप राहणार नाही हे निश्चित. असे स्वरूप राहणारच नाही असे नाही. पण त्याला प्रदीर्घ काळ लागेल. सुरुवातीला तसे चित्र नसेलच. यासोबतच हेही लक्षात घ्यायला हवे की, अखंड भारत म्हणजे केवळ भारत- पाकिस्तान- बांगलादेश- एवढेच नाही. अखंड भारत या कल्पनेत श्रीलंकेपासून अफगाणिस्तानपर्यंत आणि पूर्वेला नेपाळ, ब्रम्हदेश, भूतान पर्यंत सगळ्या लहानमोठ्या देशांचा समावेश असेल. ढोबळ मानाने आज ज्याला `सार्क' म्हणून ओळखले जाते तो प्रदेश. या प्रदेशात भारताशिवाय जे देश आहेत त्यांच्यात मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध व अन्य लोकही राहतात. त्यांच्यात खूप वितुष्ट वा शत्रुत्व नाही. पूजापद्धती, आचारव्यवहार इत्यादी मिळतेजुळते आहे. श्रीलंकेचे प्रमुख भारतातील मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीलंकेतील महिला साडी परिधान करतात. खूपसे साम्य आणि सौहार्द्र या देशांमध्ये आहे. `सार्क'च्या माध्यमातून विविध प्रकारची देवाणघेवाण यांच्यात होत असते. एक आर्थिक गट म्हणून पुढे येण्याचीही या देशांची आकांक्षा आहे. परस्परांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आदी लागू नये असेही प्रयत्न सुरु आहेत. हीच देवाणघेवाण अधिक व्यापक आणि मूलगामी करीत वैचारिक आणि भावनिक स्तरापर्यंत वाढवली तर अखंड भारताचा एक महत्वाचा टप्पा साध्य होईल. असे झाल्यास निर्माण होणारी शक्ती आजच्या `भारतीय उपमहाद्विपाचे' `भारत' होण्यासाठी मोठा आधार ठरेल. अखंड भारत प्रत्यक्षात येण्याची सुरुवात पाकिस्तानपासूनच व्हायला हवी असे कुठे आहे?
मुख्य अडचण पाकिस्तान व बांगलादेश यांची आहे. परंतु आजची परिस्थिती तशीच राहील असे नाही. वास्तविक हे दोन्ही देश आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने इतके खिळखिळे झाले आहेत की, त्यांचे अस्तित्व टिकेल का असा प्रश्न उघडपणे चर्चिला जातो. त्यांचे अस्तित्वच टिकणार नाही अशी साधार भीती अनेकांना वाटते. उद्या समजा हे देश विखुरले तर? जागतिक शक्ती त्यांचा अफगाणिस्तान करणार नाहीत याची शाश्वती देता येत नाही. आपल्या शेजारी दुसरा अफगाणिस्तान तयार होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे हे देश विखुरलेच तर त्यावेळी निर्णायक चाल खेळणे भारताला आवश्यक ठरेल. तशी चाल भारत खेळू शकला तर तेही अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल ठरेल. अनेकांना हे पटणार नाही, पण सध्याच्या स्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेश विखरु नयेत असाच भारताचा प्रयत्न असायला हवा. हे दोन्ही देश एकसंघ राहावेत यासाठी भारताने प्रयत्न करायलाही हरकत नाही.
अखंड भारताचा सकारात्मक विचार करण्यासारखे काही बदल १५ ऑगस्ट १९४७ नंतर झाले आहेत का, याचाही विचार क्रमप्राप्त ठरतो. असे बदल झाले आहेत असे ठामपणे म्हणता येईल. कोणते आहेत हे बदल?
१) हिंदूंची वाढलेली शक्ती. हिंदूंचे संघटन, हिंदूंची आर्थिक, सामाजिक, राजकीय शक्ती वाढलेली आहे.
२) भारतातील मुसलमानांची मानसिकता १०० टक्के पाकिस्तानी राहिलेली नाही.
३) पाकिस्तानपेक्षाही अधिक मुस्लिम भारतात राहतात अन तेही हिंदूंबरोबर. भारतातील, पाकिस्तानातील अन जगभरातील मुस्लिमांना आता याची जाणीव होऊ लागली आहे.
४) भारताची एक देश म्हणून वाढलेली शक्ती अन त्याने जगात प्राप्त केलेले स्थान.
५) पाकिस्तान निर्मितीबद्दल झालेला पाकिस्तानी नागरिकांचाच भ्रमनिरास.
६) भारताशी शत्रुत्व करू नये असा विचार करणारी सध्या लहान असणारी पण पुढे वाढण्याची शक्यता असलेली पाकिस्तानातील शक्ती.
७) इस्लामअंतर्गत सुरु झालेले परिवर्तनाचे प्रयत्न.
८) इस्लामच्या नावाने सुरु असलेल्या दहशतवादाचे इस्लामच्याच अनुयायांना बसणारे तडाखे.
ही सगळीच कारणे भारतापासून दूर झालेल्या देशांना भारताच्या जवळ येण्यासाठी बाध्य करू शकतात, बळ पुरवू शकतात. परंतु एकीकरणाची ही प्रक्रिया केवळ सत्ता आणि संपत्तीच्या लाभहानीपुरती किंवा व्यावहारिक देवाणघेवाणीपुरती राहून चालणार नाही. तसे झाले तर त्यातून हितसंबंधांची गटबाजी निर्माण होईल, अखंड भारत नाही. अशा प्रकारची देवाणघेवाण, कला साहित्य क्रीडा यातील सहकार्य आणि सहयोग इत्यादीसोबत; कोणत्याही काळात आणि कोणत्याही लोकांसाठी, कोणत्याही परिस्थितीत आधारभूत ठरू शकणारे भारतीय जीवनदर्शन रुजवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति', `सर्वेपि सुखिनः सन्तु', `सर्वं खल्विदं ब्रम्ह', `ईशावास्यमिदं सर्वम' ही आणि यासारखी जीवनदृष्टी घडवणारी तत्वे जगण्याचा एक भाग होतील हे पाहिले पाहिजे. यासाठी प्रथम आजच्या भारतात मोठे वैचारिक अन भावनिक परिवर्तन हवे. त्यातून आजच्या भारताची क्षमता वाढेल. ती वाढल्याशिवाय पुढे पाउल टाकताच येणार नाही. भारताची ही क्षमता केवळ तंत्रज्ञान, उद्योग, शेती, सेवा, पैसा, साधने, सुखसोयी यांची क्षमता नसावी. या सगळ्यासह विचारांची क्षमता हवी. विचारांची व्यापकता, कणखरता, मुळापर्यंत जाण्याची तयारी, त्यातून विकसित होणारी जीवनदृष्टी, त्या दृष्टीला अनुकूल व्यवहार; ही सगळी त्या क्षमतेची अंगे होत. यातून अखंड भारत साकार होईल. अन अखंड भारत साकार होणे optional नाही. जमले तर करू बुवा, नाही तर नाही; असे चालूच शकत नाही. अखंड भारत व्हावाच लागेल, त्याला पर्याय नाही. कारण त्याशिवाय संपूर्ण पृथ्वीवरील मानवी सहअस्तित्व सार्थक, शांततापूर्ण अन आनंददायी होऊच शकत नाही. अखंड भारताचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत भूमिका आणि रणनीती म्हणून अनेक बाबी कराव्या लागतील. वरवर पाहता त्या अखंड भारताच्या स्वप्नाशी विसंगत वाटू शकतील. उदाहरणार्थ- अण्वस्त्रसज्जता. अखंड भारताच्या अंतिम चित्रात त्याला काहीही स्थान नाही. पण त्याची तात्कालिक अपरिहार्यता देखील नाकारता येत नाही. सिद्धांत, भूमिका आणि धोरण यांचा संतुलित विचारव्यवहार अन अशा विचारव्यवहाराची सार्वत्रिक समज या गोष्टी आवश्यक आहेत.
थोर तत्वचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अखंड भारत या संबंधाने व्यक्त केलेले विचार अखंड भारताच्या दिशेने करावयाची वाटचाल, त्याची तात्विक भूमिका आणि त्याचे व्यवहारिक मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्या दीर्घ लेखात पंडितजी लिहितात- `अखंड भारत केवळ देशाच्या भौगोलिक एकतेचा परिचायक नाही, तर जीवनाच्या भारतीय दृष्टिकोनाचा द्योतक आहे. हा दृष्टीकोनच अनेकतेत एकतेचे दर्शन घडवीत आहे. म्हणूनच आमच्या बाबतीत अखंड भारत ही अशी एखादी राजकीय घोषणा नाही, की जी विशिष्ट परिस्थितीत लोकप्रिय होईल म्हणून आम्ही स्वीकारली आहे.अखंड भारताची धारणा हा आमच्या संपूर्ण जीवनदर्शनाचा मूलाधार आहे. जर आम्ही युगायुगातून वाहत आलेल्या आपल्या जीवनधारेच्या अंत:प्रवाहाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू, तर आम्हाला असे आढळून येईल की, आमची राष्ट्रीय चेतना सदैव अखंडतेसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही पुष्कळ प्रमाणात सफलही झालो आहोत. १९४७ चा पराजय हा भारतीय एकत्वाच्या अनुभूतीचा पराजय नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या नावावर केलेल्या भ्रांत प्रयत्नांचा पराजय आहे. जर भौगोलिक दृष्ट्या खंडित झालेल्या भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये एकत्वाची अनुभूती शक्य असेल, तर शेष भूभाग आपल्याशी एकजीव व्हायला वेळ लागणार नाही. एकतेच्या अनुभूतीच्या अभावाने जर देश खंडित झाला आहे, तर त्या अनुभूतीच्या अस्तित्वाने तो अखंड होईल. आम्ही त्याचसाठी प्रयत्न करायला हवा.'
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० ऑगस्ट २०१६

गुरुवार, २ जून, २०१६

पहा विचार करून...


१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात येतो असे वृत्तपत्रातून लक्षात आले. रोज असा कोणता ना कोणता दिवस साजरा करण्याची गरज संयुक्त राष्ट्रसंघाला जाणवते यातच वर्तमान जागतिक व्यवस्था व वातावरणाचे अपयश लपले आहे. नेमक्या याच दिवशी, वृत्तपत्रात महात्मा गांधींचे नातू कनू गांधी अन त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शिवा लक्ष्मी दिल्लीतील एका वृद्धाश्रमात राहत असल्याचे प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधी यांचे चिरंजीव रामदास गांधी यांचे कनू गांधी हे पुत्र. वय ८७ वर्षे. स्वाभाविकच ही बातमी वाचल्यावर मनात कणव निर्माण होते. याच बातमीत दुसरे एक प्रसिद्ध गांधी- तुषार गांधी यांची या बातमीवरील प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. तुषार गांधी म्हणतात- `कनू गांधीच यासाठी दोषी आहेत. त्यांचे कधीच कुणाशी पटत नाही, पटू शकत नाही. आम्ही आणि गांधीजींशी संबंधित सगळ्या संस्था त्यांचा सांभाळ करायला तयार असतानाही त्यांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे ते टिकत नाहीत.' तुषार गांधी यांच्या या प्रतिक्रियेत काही अन्य रंगही असू शकतील. मात्र याच प्रतिक्रियेत त्यांनी मांडलेला एक मुद्दा मात्र अधोरेखित करून लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणाले- गांधीजींच्या वारसांना सांभाळणे हे सरकारचे काम नाही. अन त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे पटण्यासारखे आहे. मात्र तुषार गांधी यांची प्रतिक्रिया क्षणभर बाजूस ठेवून कनू गांधींचा विचार केला तर काय जाणवते? आजच्या त्यांच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार असू शकतात. कारण ते स्वत: उच्च विद्याविभूषित असून २५ वर्षे अमेरिकेत राहिले आहेत. त्यांनी नासा सारख्या संस्थेत काम केले आहे. ते आपल्या आयुष्याचे नीट नियोजन करू शकले नाहीत का? की आणखीन काही... अशा प्रकरणी सामान्य माणसापासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्याच प्रतिक्रिया गोंधळलेल्याच राहतात. याचे कारण आहे, आपण पुरेशा गांभीर्याने या गोष्टींचा विचारच करीत नाही.
कधी कधी वाटते की, आपण अति भावनावशतेच्या युगात वावरतो आहोत की काय. अन वृद्धांच्या संबंधातही याच भावनावशतेतून विचार करतो की काय? वृद्धांचा विचार करताना वृद्धांच्या समस्या, वृद्धांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अन मूळ वृद्धावस्था या तीन अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. यातील एकाचाही धड विचार आज होताना दिसत नाही. `आम्हाला त्यांनी जन्म दिला आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांचे ऋण फेडणे आमचे कर्तव्य आहे,' एवढाच विचार होताना दिसतो. अन हा विचार टोकाला पोहोचला की, विवश कर्तव्यबोधात परिणत होऊन एक प्रकारचा inferiority complex निर्माण होतो. आज बहुश: हेच चित्र दिसते.
वृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात. हातपायच नव्हे, तर कान, डोळे, मेंदू, मन, स्मृती सगळेच थकलेले असते. त्यामुळे परावलंबन येते. स्वत: जे काही करतात तेदेखील व्यवस्थित करू शकत नाहीत. हातून वस्तू पडून जाणे, चालताना अंग कापणे, अडखळणे, सामान्य व्यक्ती १० पावले चालून जाईल तेवढ्या वेळात दोन पावले चालणे, विजेची बटने बंद करायला विसरणे, नळाच्या तोट्या बंद करायचे राहून जाणे, दार बंद करता न येणे किंवा बंद दार उघडता न येणे, खायला-जेवायला वेळ लागणे, कधी कधी खाताना सांडणे, वाहनात बसताना- उतरताना वेळ लागणे, त्रास होणे, स्वत: मोठ्याने बोलणे आणि दुसऱ्यांनी मोठ्याने बोलावे ही अपेक्षा; अशा असंख्य गोष्टी असतात. यातून त्यांना स्वत:ला शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक त्रास होतोच, शिवाय त्यांच्या सोबत राहणाऱ्यांनाही त्रास होतो. आज लाखो घरे अशा गोष्टींनी त्रासलेली आहेत. अनेक घरे तर या त्रासांच्या जोडीला असलेल्या शारीरिक वा मानसिक आजारांनी रया घालवून बसली आहेत. रोजच्या व्यवहारातील एक त्रास अनेकदा पाहायला मिळतो. लघुशंका केल्यानंतर न्हाणीघरात पाणी व्यवस्थित न टाकणे. एक तर मुळात म्हातारपण म्हणा, त्यातच औषधे आदींची भर; त्यामुळे लघुशंकेला उग्र असा दर्प असतो. त्यात न्हाणीघराची निगा योग्य पद्धतीने राखली गेली नाही तर सगळ्या घराला त्रास होतो. भरीसभर घरी कोणी आले की आणखीन पंचाईत. अशा वेळी घरच्या अन्य सदस्यांची चिडचिड होणे, त्रागा होणे स्वाभाविक असते. एकूणच वागण्याबोलण्यात आलेली बेफिकिरी, अनावश्यक अघळपघळपणा, कुठे काय बोलायचे याचे भान नसणे, वस्तू घेतल्या तिथे टाकून देणे; अशाही गोष्टी आढळतात. आपण अर्थहीन होत असून संपत चाललो आहोत या जाणीवेतून मुद्दाम त्रास देण्याची वृत्तीही आढळून येते. या साऱ्याचा त्यांनाही त्रास होतो अन इतरांनाही. त्यांनी हा त्रास किती सहन करायचा आणि बाकीच्यांनी का, किती अन कुठवर सहन करायचा असे प्रश्न निर्माण होतात.
बदललेल्या परिस्थितीचाही विचार अपरिहार्य ठरतो. घरोघरी कमी झालेली माणसांची उपलब्धता, स्त्री व पुरुष दोघांचेही काम करणे, मुलांचे अभ्यास- करीयर इत्यादी वर्तमान समाजाचे वास्तव आहे. यातील कोणाला काय सोडायला वा थांबवायला सांगायचे? तसे सांगणे योग्य ठरेल का? वयाच्या साधारण ७० च्या पुढे हे प्रश्न वाढतात आणि गुंतागुंतीचे होत जातात. उपदेशात्मक आणि भावनात्मक आवाहने अन विश्लेषणे ऐकायला कितीही चांगली व उदात्त वगैरे वाटली तरीही त्याचा ना वृद्धांना उपयोग असतो, ना त्यांचे करावे लागणाऱ्या बाकीच्यांना. अनेकदा तर दोन्ही बाजूंना मोठी क्षुब्धता, अशांती, असमाधान निर्माण होते. त्यात अनेक गोष्टींचा बळी जातो.
सरकारे याबाबत काय करतात वा करू शकतात? एक तर पेन्शन वा अन्य मार्गांनी पैसा देणे; अन दुसरे म्हणजे त्यांच्या समस्या लक्षात घेऊन कायदे करणे. जसे - सगळीकडे लिफ्ट अथवा स्लोपिंग असावे, आधारासाठी कठडे असावे, वाहनांमध्ये आसने आरक्षित असावीत, आवाजावर मर्यादा... इत्यादी. पण या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, करण्यात आलेल्या सोयी नीट चालतात की नाही आणि त्यांची निगा राखली जाते की नाही, या सोयी पुरवण्यातील अडचणी, सोयी निर्माण करून वृद्धांचे त्रास संपतात का याचा आढावा घेणे; अशा अनेक गोष्टी कामांचा अनावश्यक फापटपसारा वाढवून ठेवतात. पैसा देणे हा तर उपाय होऊच शकत नाही. आज विविध बँका अथवा डाक कार्यालये येथे जाऊन पाहिले तरी वृद्धांना पैसा प्राप्त करण्यासाठी होणारे त्रास लक्षात येतील. अर्थात ते करण्याची इच्छा अन फुरसत कोणाकडेही नाही. आपण जिवंत आहोत यासाठी द्यावयाच्या प्रमाणपत्रापासून, जाणेयेणे, तहान- लघुशंका- कान, डोळे, शरीर यांच्या कमी होणाऱ्या शक्तीचे परिणाम- त्यामुळे फॉर्म भरता न येणे, सही नीट न येणे इत्यादी अडचणी... अशा असंख्य गोष्टी. शिवाय पैसे मिळाले तरीही विविध बिले भरण्यासाठी जाणे, रांगेत उभे राहणे अशा गोष्टी असतातच.
सगळे बाजूला ठेवले तरीही बाहेर वा घरात सुरक्षा हा मुद्दा उरतोच. कॅमेरे बसवले तरीही त्याने घटना थांबवता येत नाहीत. शिवाय सुरक्षा म्हणजे केवळ गुंडांपासूनची सुरक्षा नव्हे. तोल जाऊन पडणे, चक्कर येणे, न्हाणीघराचे दार लागून जाणे, किंवा अनामिक भय यांचे काय? बरे सगळे घटक योग्य आहेत असे धरले; जसे पैसा आहे, घरदार आहे, मुले- सुना- नातवंडे आहेत- तरी समस्या वा त्रास नसतात का? एखाद्या वृद्धाला अचानक काही त्रास सुरु झाला तरीही त्याबाबत कळणे आणि मुलाने, सुनेने घरी येऊन त्यांना घेऊन जाणे यासाठी लागणारा वेळ कसा भरून काढायचा? आजकाल वाढत्या शहरांमुळे हा वेळ वाढतच जाणारा राहील. ही सगळी चर्चा मुख्यत: शहरी भागातील, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसलेल्या अन बऱ्यापैकी सुशिक्षित वर्गाच्या संदर्भातीलच आहे. पण ग्रामीण भाग, आर्थिक विपन्न समाजबांधव, अशिक्षित वर्ग यातील वृद्धांचे प्रश्न आणि समस्या तर आणखीनच भीषण आहेत. केवळ पैसा, सुविधा अन गोडबोलेपणा यांनी त्या दूर होऊ शकतील का?
याच्याही पलीकडचा एक प्रश्न म्हणजे मानसिकता अन रितेपणा. जगाच्या दृष्टीने निरर्थक होत जाणे, उपभोगाच्या दृष्टीने क्षीण होत जाणे, आयुष्यभराच्या अनुभवांती येणारा तोचतोचपणाचा कंटाळा, अन मृत्यूची चाहूल; या साऱ्याचे काय? त्या संदर्भात तर आज कुठेही चर्चा होताना दिसत नाही. केवळ पैसा, सुविधा, आरोग्य, नातीगोती यापलीकडचे हे विषय आहेत. आतापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या घटकांचा संकलित सखोल विचार करून याबाबत उपाययोजना करणे आवश्यक ठरते. केवळ शिळ्या कढीला उत आणल्यासारखे, वृद्धांमध्ये कृत्रिम उत्साह- कृत्रिम चैतन्य- कृत्रिम जीवेच्छा- निर्माण करणे हास्यास्पद ठरते. त्यापेक्षा व्यावहारिक आणि भावनिक वास्तवावर घट्ट पाय रोवून याकडे पाहिले पाहिजे.
प्राचीन भारतीय शास्त्रात उल्लेख असलेल्या आश्रम व्यवस्थेचा या अनुषंगाने विचार व्हायला हवा. प्राचीन भारतीय चिंतन म्हटले की नाके मुरडणे अन `वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेली कीड' या सुविचाराच्या माऱ्याने झालेले बधिरीकरण; याबाहेर पडून या विषयाकडे पाहायला हवे. आजचे वृद्धाश्रम ही निखालस उचलून धरावी अशी गोष्ट नाही. सेवाभाव म्हणून चालणारे वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात केविलवाणे असतात. अन केविलवाणे असले वा नसले तरीही तेथे ठेवण्यात येणारे वृद्ध अन अशी सेवाकार्ये यामागील भावना माणूस म्हणून अधोगतीला नेणारी आहे. समाजात व्यावसायिक वृद्धाश्रम देखील आहेत. मात्र त्यांचा उदेशच व्यावसायिक असल्याने त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही. समाजाला लाचारी, दुरावा, नकोसेपण, व्यावसायिकता यापासून दूर; आणि वृद्धांचे जीवन सुकर व सार्थ करणारी, त्याचवेळी बाकीच्यांना गृहीत न धरणारी अशी व्यवस्था हवी आहे. अशी व्यवस्था तयार करून, नियोजन करून, लादून होणार नाही. ती विकसित व्हावी लागेल. या विषयाची व्यापक सार्वत्रिक चर्चा हे त्याचे पहिले पाऊल राहील. तरीही ही व्यवस्था कशी असू शकेल याचे एक कल्पनाचित्र-
१२ वर्षांचे एक तप असे म्हणतात. त्याला धरून, जीवनाची सहा तपे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वयाची ७२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वृद्धांसाठीच्या स्वतंत्र आश्रमात राहायला जाणे. ७२ व्या वर्षी कौटुंबिक जीवन संपुष्टात येईल अशी सामाजिक व्यवस्था असावी. यानंतर कुठलीही आर्थिक वा अन्य सुविधा देण्यात येऊ नये. वैयक्तिक संपत्ती व मालमत्तेची व्यवस्था त्यांनी त्यांच्या इच्छेने करावी आणि कफल्लक होऊन आश्रमवासी व्हावे. यानंतरची सगळी व्यवस्था सरकार आणि समाज यांनी करावी. तसे करणे त्यांना बंधनकारक असावे. या स्वतंत्र आश्रमांची व्यवस्था परिपूर्ण असावी. एकट्या वृद्धासाठी वा जोडप्यासाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात. जेवणखाण, कपडेलत्ते, औषधपाणी, वैद्यकीय व्यवस्था, मंदिर, संगणक, ग्रंथालय, वृत्तपत्रे; अशा एक ना अनेक; सगळ्या प्रकारच्या व्यवस्था तेथे असाव्यात. त्यासाठीचा खर्च सरकार अन समाजाने करावा. सरकारचा पेन्शन, अन्य सुखसोयी अथवा सवलती यासाठी होणारा खर्च आणि प्रत्येक व्यक्ती वा कुटुंबाचा त्यासाठी होणारा खर्च या आश्रमांकडे वळवता येईल. अधिकच्या खर्चाची तरतूद करणेही कठीण नाही. कोणत्याही वृद्धाला कोणत्याही कारणासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही अशी या आश्रमांची व्यवस्था राहावी. ही व्यवस्था पाहणारे, राबवणारे, देखभाल करणारे व्यावसायिक लोक असावेत. २४ तास पाळीनुसार ते कामे करतील.
वयाचे ७२ वे वर्ष हे फार होत नाही हे खरे. या वयात माणूस नीट हालचाली वगैरे करू शकतो हेही खरे. पण एकदम गलितगात्र झाल्यावर टाकून दिल्यासारखे स्वतंत्र व्यवस्था करणे योग्य नाही. त्यापेक्षा परावलंबीत्व दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागताच, पुढील दृष्टीने मनाची तयारी अन सवय म्हणून हे वय योग्य राहील. जे वृद्ध काही काम करू इच्छितात, ते आश्रमाच्या कामात अथवा सामाजिक वा सरकारी कामात सहभागी होऊ शकतील. अर्थात आश्रमात राहण्याच्या मर्यादेत अन त्यांच्या क्षमतेनुसार आणि बिना मोबदला. ५०- १००- २०० अशा संख्येने हे आश्रम असावेत. असे आश्रम तालुका स्थानीच असावेत. याचे दोन लाभ होतील- १) सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त आरोग्यदायी जीवन वृद्धांना मिळेल, २) लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल. शहरांवरील भार आणि गावांचे बकालपण काही प्रमाणात नियंत्रित होईल. वृद्धांचा परस्परांना आधार राहील. सुखदुःखात साथ राहील. समान सुखदु:खे असल्याने, शरीराचे अन मनाचे वेग साधारण सारखे असल्याने फरपट होणार नाही. अधूनमधून त्यांच्या सहली वगैरे अर्थात राहाव्यातच. कुटुंबीयांनी भेटायला जाणे किंवा फार नाही (अगदी वाढदिवस, आठवण आली वगैरे) पण लग्नकार्य अथवा मरण अशा प्रसंगी वृद्धांनी घरी जाऊन येण्याची सोय असावी.
मात्र हे होईल का? अन कसे होईल? हे अगदी खरे आहे की, अनेक पातळ्यांवर अनेकांचा अनेक कारणांनी याला विरोध राहील. वृद्धांचाही विरोध राहू शकेल. आपणच आपल्याभोवती उभारलेल्या चौकटी, आपल्याच भावनांचे अन विचारांचे भोवरे यामुळेही विरोध राहील. पैसा, मालमत्ता, अधिकार हातून सोडण्याची तयारी राहणार नाही. माझे लोक वगैरे तर राहीलच. याची थट्टामस्करीही होईल. या साऱ्यासाठी भारतीय आध्यात्मिक विचार आवश्यक आहेत. त्यातही मृत्यूचा विचार आवश्यक. खरे तर मृत्यूचा विचार संपूर्ण जीवनासाठीच आवश्यक आहे. मृत्यूचा विचारच जीवनाचा अर्थ, आशय आणि अभिव्यक्ती घडवीत असतो. मृत्यूचा विचारच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विकसित अन प्रगल्भ करतो. एकूणच समाजाने आध्यात्माचा अन मृत्यूचा गांभीर्याने विचार करणे अन वृद्धांनी तर हा विचार अगत्याने अन अग्रक्रमाने करणे आवश्यक. यामुळे म्हातारपण तर सुखी होईलच, पण अपरिहार्यपणे निर्माण होणारी रिक्ततादेखील दूर होईल. जंजाळातून बाहेर पडणे हे अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतून, त्रासातून बाहेर पडणे असते. जंजाळ न सोडण्यानेच रक्तदाब, मधुमेह अन निद्रानाश असे विकार सतावतात. असंख्य ताणतणाव `धरून ठेवण्यानेच' मागे लागतात. आजचे बहुतांश विकार अन व्याधी जीवनदृष्टीशीच संबंधित आहेत. ती दृष्टी विकसित केली की अनेक बाबी सुरळीत होतील. आज धर्म, देव, आध्यात्म या नावाने जे सुरु आहे ते दुर्दैवाने योग्य मार्गावर नाही. ते माणसाला आध्यात्मिक बनवून मुक्ततेच्या मार्गावर नेण्याऐवजी माणसाला अधिकाधिक ऐहिक अन दुबळे बनवण्यात गुंतले आहे. त्यांनी अधिक सघन आणि सार्थक पसायदान समाजाला देण्याची गरज आहे. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व्यवस्थेच्या अंगानेही याचा विचार व्हायला हवा.
पहा विचार करून...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ जून २०१६

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रवाद - भारतीय अन अभारतीय


कालचा दिवस नि:संशय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा होता. त्याचा प्रभाव बराच काळ राहणार आहे. ते स्वाभाविक तर आहेच, पण त्यात अयोग्य देखील काहीही नाही. त्यांनी आपल्या भाषणात, लोकसभेत त्याआधी झालेल्या एका भाषणाचाही उल्लेख केला होता. तो होता, पश्चिम बंगालमधील जादवपूरचे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुगत बसू यांचा. खा. बसू यांचे भाषण खरंच अप्रतिम होते. पण अपूर्ण व अप्रामाणिक होते. अपूर्ण एवढ्यासाठी की, राष्ट्रवादाचे जे मूलगामी विवेचन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याची सांगड ते वर्तमानाशी घालू शकले नाहीत. अन जी सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला ती तर्कदुष्ट आणि पूर्वग्रहदूषित होती. खा. बसू यांनी महर्षि अरविंद, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, नेताजी बोस आदींचा उल्लेख केला. रवींद्रनाथांच्या nationlasim या ग्रंथाचाही उल्लेख केला. अन त्यांची टिप्पणी होती की, आज रवींद्रनाथ असते तर त्यांनाही राष्ट्रद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला असता. त्यांनी न उच्चारलेले पण अध्याहृत असलेले कारण हे की, रवींद्रनाथ आंतर्राष्ट्रवादी (वैश्विक) होते. खा. बसू यांचे वैश्विकता आणि राष्ट्रवाद याबद्दलचे आकलन तर तोकडे आहेच, पण राष्ट्रवादी विचारधारेवर त्यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे.

वैश्विकता आणि राष्ट्रवाद या परस्परविरोधी बाबी आहेत, हा भारतेतर विचार आहे. भारतीय चिंतन परंपरा या दोन्हीत काहीही विरोध वा संघर्ष मान्य करीत नाही. राष्ट्रीयता आणि वैश्विकता या दोन वेगळ्या पायऱ्या आहेत एवढेच. राष्ट्रीयता हा अलीकडचा टप्पा आणि वैश्विकता हा पलीकडचा टप्पा. राष्ट्रवादी असल्याशिवाय कोणी विश्ववादी होऊ शकत नाही, अन राष्ट्रवादी होऊन कोणी तिथेच थांबू शकत नाही. मूलत: भारतीय चिंतन परंपरा पूर्णवादी आहे. ती या संपूर्ण अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहते. या अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तोही त्या unit चाच भाग आहे. अन व्यक्ती ते विश्व या त्याच्या जाणिवांच्या पातळ्या आहेत. राष्ट्र ही त्यातील एक पातळी. जाणिवांची ही साखळी `व्यक्ती'पासून सुरु होते आणि कुटुंब, परिसर, समाज, निसर्ग, राष्ट्र असे करत `विश्व' जाणिवेपर्यंत पोहोचते. मात्र भारतीय चिंतन परंपरा केवळ वैश्विक नाही, ती त्याच्याही पलीकडील चेतन स्तरापर्यंत जाणीवेच्या विकासाची मांडणी करते. या जाणीवा एकाच ठायी एकाच वेळी अस्तित्वात असतात. फक्त त्यांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत कमी अधिक होत असते इतकंच.

या देशातील सगळेच विचार, सगळेच महापुरुष, सगळेच चिंतन वैश्विकच आहे, पण त्याचा राष्ट्रीयतेशी संघर्ष नाही. रवींद्रनाथ टागोर हा काही अपवाद नाही. उपनिषदांपासून आजतागायत हाच प्रवाह चालत आला आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरदेखील विश्वात्मक देवाला, विश्वासाठी पसायदान मागतात किंवा आचार्य विनोबा भावे `जय जगत'चा नारा देतात. एखादी व्यक्ती रोजच्या खाण्यापिण्याचा, कपड्यालत्त्याचा विचार `व्यक्ती' स्तरावरच करते. पण नेपाळला विनाशकारी भूकंप झाला की, लगेच मदतीचा हात पुढे करते. `मी' आणि `विश्व' या दोन्ही जाणीवा तिच्या ठायी आहेतच. त्या विशिष्ट वेळी अभिव्यक्त होतात. या दोनच्या मधील परिवार, परिसर, समाज, राष्ट्र इत्यादीच्या बाबतीतही असेच आहे. चांगले, सुखी, आनंदी, अर्थपूर्ण, सार्थक जीवन जगताना आणि जगण्यासाठी आवश्यक अशा या पायऱ्या आहेत. `मी'चा संपूर्ण विलय होऊन `चेतन' सत्तेत सदासर्वदा अवस्थित व्यक्ती हे व्यक्तित्वाच्या विकासाचे भारतीय मापदंड आहेत. परंतु किती जणांच्या बाबतीत हे वास्तव आहे वा असू शकते? फार थोड्यांच्या बाबतीत, हे त्याचे उत्तर आहे. `मी'च्या मर्यादा आणि `वैश्विक'तेची ओढ आणि आवश्यकता लक्षात घेऊन व्यक्तीच्या उत्तरोत्तर जाणीव विकासाचा विचार आवश्यक ठरतो. तसा तो केला नाही तर त्यातून भांबावलेपण अन सर्वनाश ओढवतो. ज्यांच्या जाणिवांचा स्तर अधिक आहे, त्यांना त्याहून लहान स्तर चुकीचा वाटत असेल तर त्याच्या जाणिवांचा विकास झालेला नसून, त्याच्या बुद्धीला फक्त त्याची माहिती आहे; असा अर्थ काढावा लागेल. ज्याच्या जाणिवांचा खरेच विकास अन विस्तार झालेला आहे, त्याला धाकट्या जाणीवा नाकारण्याची गरज पडणार नाही, कारण त्यातूनच पुढे जायचे असते हे त्याला अनुभवाने माहिती असते. हाच आहे सनातन धर्म. म्हणूनच महर्षी अरविंद म्हणतात भारतीय राष्ट्रवाद = सनातन धर्म.

परंतु हा सगळा विचार करणारा अन त्याचा अनुभव घेणारा व्यक्ती वेगळा आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सगळ्या बाबी त्या व्यक्तीच्या सुख व आनंदासाठी आहेत. व्यक्तीच्या सुख व आनंदाला सहाय्यक ठरतील तोवर त्या योग्य अशी दृष्टी व भावना असेल तर मात्र प्रत्येक स्तरावर संघर्ष अपरिहार्य ठरतो. आज व्यक्ती आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष हे त्याचेच रूप आहे. किंवा एखादी व्यक्ती वैश्विकता, मानवता इत्यादींचा धोशा लावतानाच आपले व्यक्तिगत सुख- सुविधा- साधने- मानसन्मान- पदप्रतिष्ठा- याबद्दल आत्यंतिक संवेदनशील, प्रसंगी असहिष्णू असल्याचे पाहायला मिळते. माझी पदोन्नती न होता दुसऱ्याची झाली तर ते त्याच्यासाठी असह्य ठरते. त्यावेळी त्याची मानवता कुठेतरी गुडूप होऊन जाते. हाच न्याय समूहालाही लावता येईल अन तसे होते तेव्हा राष्ट्र हे विशिष्ट समुहाचे सुख वा प्रभाव यांचे एक उपकरण ठरते अन ते संघर्षाचे कारणसुद्धा. भारताबाहेर झालेला राष्ट्रांचा विकास हा अशा प्रकारे समूहाच्या सुख व वर्चस्वाच्या भावनेतून झालेला आहे. भारतीय राष्ट्रविचार हा व्यक्तीच्या जाणीव विकासाच्या मार्गातील एक टप्पा या अंगाने जाणारा आहे. म्हणूनच सर्वच प्राचीन, अर्वाचीन संत, महापुरुष, ऋषीमुनी, दार्शनिक, चिंतक, विचारवंत हे एकाच वेळी व्यक्तिवादी, समूहवादी, राष्ट्रवादी, मानवतावादी, विश्ववादी अन संपूर्णतावादी होते व आहेत. वेगवेगळ्या वेळेला परिस्थिती नुसार त्यांनी त्याचे प्रतिपादन केले आहे. म्हणूनच मानवतावादी असलेले रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्य आंदोलनातदेखील सहभागी होते. अन विश्वात्मक विचार करतानाच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे गांधीजी त्यांना चुकीचे वाटत नव्हते. उलट आपले आप्त वाटत होते.

एक व्यक्ती असो की संपूर्ण मानवजात; सगळ्यांचे कल्याण हेच उद्दिष्ट ठेवून; व्यवहार आणि विभिन्न मर्यादा लक्षात घेऊन, विकसित झालेल्या रचनेतील, विविध टप्प्यांपैकी एक टप्पा म्हणजे `राष्ट्र' ही दृष्टी असेल तर काहीही नाकारण्याचे कारण नाही, अन कुठला संघर्षही उरत नाही. याउलट आपल्या लहान वा मोठ्या `मी'चे स्वार्थसाधन म्हणून पाहिले तर प्रत्येकच गोष्ट नाकारावी लागते अन प्रत्येकच स्तरावर संघर्षाची पाळी येते. भारताचा अन रा.स्व. संघाचाही राष्ट्रवाद हा जाणीवविकासाच्या मार्गावरील राष्ट्रवाद आहे. अन अन्य लोकांचा राष्ट्रवाद स्वार्थसाधनेचा राष्ट्रवाद आहे. त्यामुळेच खा. सुगत बसू तोंडाने रवींद्रनाथ किंवा महर्षी अरविंद यांचा राष्ट्रवाद सांगत असले तरीही महिषासुरमर्दिनीचे भंजन करणे त्यांना नाकारावे वा दुर्लक्षित करावे लागते. कारण ते स्वार्थसाधनेत अडथळा आणते. याउलट रा.स्व. संघ `हिंदुराष्ट्र' म्हणत असताना सुद्धा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन करू शकतो. त्याला काहीही नाकारावे लागत नाही. संघाला आपला राष्ट्रवाद कोणावरही थोपवायचा नाही. कारण तो थोपवता येतच नाही. जाणीवेचा विकास ही थोपवण्याची बाबच नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताबाहेर आपले काम `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने नव्हे, तर `हिंदू स्वयंसेवक संघ' या नावाने चालवले आहे. राष्ट्राचा परीघ कोणता याचे पूर्ण भान संघाला आहे. अन राष्ट्रच कशाला व्यक्ती ते ब्रम्हांड यांचे परीघ कोणते आणि का, याचे सखोल चिंतन ही भारतीय राष्ट्रवादाची विशेषता आहे. भारतेतर मापदंड लावून, अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे `स्व'ला अवास्तव गोंजारुन भारतीय राष्ट्रवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाती काही लागण्याची शक्यता नाही. `स्व' नाकारायचाही नाही अन त्याच्या परीघाकडे, सामर्थ्याकडे अन मर्यादेकडे दुर्लक्षही करायचे नाही, अशी भूमिका अन दृष्टी असेल तर भारतीय राष्ट्रवाद तर कळेलच, पण संघर्षही कमी करता येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१६

रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

वर्तमान, अपुऱ्या मानवतावादाचे परिणाम

`साहित्यिकांची नाराजी' प्रकरण अजून सुरूच आहे. त्यातील राजकारण, पुरस्कार वगैरे परत करणाऱ्या साहित्यिकांचे हेतू, त्यांच्या मनातील आपपरभाव इत्यादी बाबी थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तरीही एक गोष्ट जाणवते की, त्यांच्या भूमिकेचा पूर्ण प्रामाणिकपणा मान्य करूनही त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण आपल्या कृतीसाठी त्यांच्याकडून जी कारणे दिली जात आहेत, त्याची जी विश्लेषणे व स्पष्टीकरणे दिली जात आहेत त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाऊ शकेल. नव्हे ते तसे लावले जायला हवे. नाराज, निराश, राजीनामे देणारे साहित्यिक मानवतावादी आहेत. अन त्यांचं वैचारिक, भावनिक पोषण करणारा हा वर्तमान मानवतावाद मुळातच अपुरा, अर्धवट, चुकीचा आहे. त्याचा आधार, त्याची गृहितकं, त्याने जन्माला घातलेल्या कल्पना- संकल्पना, त्याने तयार केलेल्या मान्यता, त्याने रेखलेले चित्र; हे सारेच अपुरे व चुकीचे आहे.

सिग्मंड फ्रॉईडचे मानसशास्त्र हा त्याचा फार मोठा आधार आहे. एक तर मुळातच फ्रॉईडने त्याचे सगळे विचार, तर्क, सिद्धांत विकृत व्यक्तींच्या निरीक्षण, परीक्षणावरून काढलेले आहेत. त्यामुळेच ते एकांगी आहेत. त्याने केवळ जाणीवयुक्त बाह्य मन मान्य केले. नेणिवेतील अबोध मन फ्रॉईडला मान्यच नाही. त्यामुळेच तो माणसाची बहिर्मुखता फक्त मान्य करतो. केवळ बहिर्मुखता सत्य आहे अंतर्मुखता असत्य म्हणूनच त्याज्य आहे असे तो म्हणतो. शिवाय कामभावना या विश्वातील सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असल्याचा त्याचा सिद्धांत किती तकलादू आहे हे वरवर विचार केला तरीही लक्षात येते. गेल्या वर्षी नेपाळमध्ये महाविनाशकारी भूकंप झाला. तेव्हा सगळ्या जगाने त्याला जो प्रतिसाद दिला त्याच्या मुळाशी कुठे कामभावना होती? अन अशा व्यक्तिगत अन सामूहिक घटना अपवादात्मक नसून नियमित घडत असतात. शिवाय कामभावना ही मूळ बाब मानली तरीही केवळ दोन शरीरांचे मिलन यापलीकडे फ्रॉईड जाऊ शकलेला नाही. अस्तित्वाच्या सूक्ष्म स्तरांवरील कामभावनेचा विकास त्याच्या आवाक्यात येऊ शकलेला नाही. भारतीय तंत्रविचारात सुद्धा या विश्वाच्या मुळाशी कामभावना मान्य केली आहे. त्यातूनच शिव-शक्ती वा पुरुष-प्रकृती कल्पना आल्या. पण या कल्पना म्हणजे दोन शरीरांचे स्थूल मिलन नाही. मन, बुद्धी आणि चेतन पातळीवरील कामभावनेचे संवेदन आणि प्रकटीकरण स्थूल शारीर जाणीवांपेक्षा निश्चितच निराळे राहील. पण बहिर्मुखी जाणीवाच अंतिम सत्य मानल्याने फ्रॉईड त्या भावनांचा विकास करूच शकला नाही.

फ्रॉईडला त्याचाच सहकारी असलेल्या कार्ल जंगने आव्हान दिले होते. खरे तर दोघेही मित्र. दोघांनी मिळून १९११ साली आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण समिती स्थापन केली होती. पण अबोधात्मक मन हाच दोघांच्या मतभेदांचा मुद्दा झाला. वर्षभरातच फ्रॉईडने स्वत: त्यास वेगळे होण्याची विनंती केली आणि जंगने वेगळे होऊन आपले काम सुरु ठेवले. नंतर त्याने आपले `विश्लेषणात्मक मानसशास्त्र' मांडले. जाणीवेपलीकडील जीवनशक्तीचा सिद्धांत त्याने मांडला. जीवनातील द्वंद्व आणि संघर्ष त्या जीवनशक्तीतून उत्पन्न होतात, असे त्याचे मत होते. एवढेच नव्हे तर उपनिषदातील या विश्वाची मूळ शक्ती आणि आपण प्रतिपादन करीत असलेली जीवनशक्ती यातील साम्यही जंगने दाखवले आहे. त्याविषयी मतांतरे आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय चिंतनाने मनापलीकडील अस्तित्वाचे अनेक स्तरही सांगितले आहेत. हे स्तर अनुभवगम्य नसून अनुभूतीगम्य आहेत असे भारतीय चिंतन सांगते. मात्र, स्थूल इंद्रियगम्य बाह्य विश्व हेच एकमेव आणि अंतिम सत्य होय. तेच मानवाचे खरे रूप होय हा फ्रॉईडचा सिद्धांत मात्र भारतीय चिंतनाला आणि त्याचा सहकारी राहिलेल्या जंगलाही मान्य नाही.

दैनंदिन जीवनात सुद्धा फ्रॉईडच्या मान्यता अपुऱ्या असल्याचे प्रत्ययास येते. तरीही जगभर त्याच मान्यता उचलून धरण्यात आल्या. याची तीन कारणे असू शकतात- १) काळाचा महिमा, २) व्यापारी संस्कृतीचे/ जीवनपद्धतीचे हितसंबंध, ३) इंद्रियगम्य सुखाची मानवाची लालसा. परंतु कारण कोणतेही असले तरीही, केवळ बाह्य जगाच्या प्रेरणा माणसाचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन सुखी, शांत, समाधानी बनवू शकत नाहीत. त्यातून केवळ तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक, व्यावहारिक संघर्षच जन्माला येऊ शकतात. अन्यथा संभ्रम निर्माण होऊ शकतो. निराशा वाढू शकते. दुसरे काहीही नाही. आज जगभरात याचा प्रत्यय येऊ लागलेला आहे.

बहिर्मुखी इंद्रियगम्य विश्वच सत्य मानल्याने व्यक्ती वा समूहाच्या क्रिया अथवा विचार अथवा भावना यांचं मूल्यांकन दृश्य बाबींवरून केले जाते. तसेच त्यांच्या उगमाची, निर्मितीची चर्चा वगैरे करण्याची गरज उरत नाही. जसे प्रेम ही भावना समजून घ्यायची तर गोड आणि नाजूक वागणे-बोलणे हे त्याचे मापदंड. प्रेम हे एक जीवनमूल्य. त्यामुळे गोड-नाजूक वागणे-बोलणे आवश्यक. मग लहान मुलांना रागावणे किंवा शिस्त लावणे वगैरे मानवतावादात बसत नाही. त्यातून `दाग अच्छे है' ही भावना आकारास येते. अशा प्रकारच्या अयोग्य प्रतिमांचा मारा सुरु होतो. तो व्यावसायिक लाभ मिळवून देतो. त्यामुळे अशा प्रतिमा उचलून धरल्या जातात. दिसायलाही छान वाटतं. केवढं मानवतेचं दर्शन आहे, असं वाटतं. पण डाग पाडणे चुकीचे आहे, योग्य नाही; असे वळण लावायचे असेल तर थोडी कठोरता दाखवावी लागते. पण कठोरता म्हणजे प्रेमाचा अभाव, म्हणजे मानवतेच्या विरोधी. अशी ही शृंखला तयार होत जाते. मग बाह्य कठोरतेची उपयोगिता, आवश्यकता, अन त्यातील प्रेम आकलन करण्याची क्षमताच संपून जाते.

समस्यांच्या संदर्भातही हेच दिसते. हिंदू-मुस्लिम संबंधांचा विचार करायचा असेल तर गेल्या अनेक शतकांचा विचार आवश्यक ठरतो. पण तो करायचा म्हणजे काही कठोर गोष्टी बोलाव्या लागतील. कठोर विश्लेषण करावे लागेल. पण बाहेर दिसणाऱ्या कठोरतेचा अर्थ विरोध, दुष्टता, शत्रुता असा लावला गेल्याने; कठोर विश्लेषण होऊ शकत नाही. गोड गोड बोलणे हाच चांगुलपणाचा अन भलेपणाचा निकष ठरू लागल्याने समस्या जटील होत गेल्या. अगदी संयुक्त राष्ट्रसंघ देखील ठराव आणि निषेध यापलीकडे जगातील संघर्ष अन समस्या सोडवू शकलेले नाही. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे उदाहरण घेता येईल. मानवी संवेदना हा त्यांचा प्रांत. त्याचं चित्रण, वर्णन त्यांनी ताकदीने केलं. पण फाळणीच्या वेदना स्वत: भोगल्या असूनही फाळणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी वा कमी करण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत. त्यासाठी काही कठोर गोष्टी कराव्या लागतील. पण कठोरता म्हणजे मानवतेला काळीमा अशी काहीशी धारणा झाल्याने त्यांचा नाईलाज असावा.

बाह्य गोष्टी प्रमाण मानल्याने, आत पाहण्याची, खोलात जाण्याची, कारणमीमांसा करण्याची गरज उरत नाही. अमुक घटना का घडली किंवा अमुक गोष्ट का करायची वा करायची नाही इत्यादीचा विचार अनावश्यक ठरतो. फक्त आपल्या कल्पनाचित्रानुसार गोष्टी घडाव्यात एवढे इच्छाचिंतन उरते. ते नियमित सुरुच राहते आणि समस्याही तशाच कायम राहतात. अमूर्त भावना आणि जाणिवांना दृश्य प्रतिकात बांधण्याचा प्रयत्न साहित्यिक अन कलाकार करतात. आपल्याला जाणवणाऱ्या जाणीवांचं नेमकं स्वरूप, तसेच त्या येतात कुठून याचा संभ्रम कायम राहतो आणि त्या संभ्रमित अवस्थेतच त्या त्या जाणीवांना एखाद्या आकारात, चौकटीत, प्रतिकात कोंबण्याचा प्रयत्न सुरु राहतो. त्या चौकटीत न बसणारी गोष्ट चुकीची ठरू लागते. सूत्ररुपात सांगायचे तर- बाह्य गोष्टी प्रमाण मानायच्या, त्याच्या व्यक्तीसापेक्ष चौकटी तयार करायच्या, सगळ्या घटना- विचार त्यात कोंबायचे, जे कोंबले जाऊ शकणार नाहीत ते चुकीचे अन त्याज्य ठरवायचे. हिंसा-अहिंसा, सुख-दु:ख, न्याय-अन्याय, खरे-खोटे, ज्ञान-अज्ञान, योग्य-अयोग्य, इष्ट-अनिष्ट, चांगले-वाईट, श्रेष्ठ-कनिष्ठ; या व अशा सगळ्या गोष्टींचे निकष म्हणजे चौकटी.

या जगातून दु:ख संपूर्ण नाहीसे होणे शक्य आहे का? या जगातून संघर्ष पूर्ण नाहीसा होणे शक्य आहे का? या जगातून विविधता नाहीशी होणे शक्य आहे का? मी आणि समूह यातील एकच या जगात राहील अशी स्थिती येऊ शकते का? स्वप्न आणि वास्तवाचा संबंध काय? सगळे गोडगोड, छानछान होऊ शकत नसेल तर कशासाठी धडपड करायची? अशा असंख्य प्रश्नांची मालिका उभी राहते, जिची उत्तरे बाह्य इंद्रिय अनुभवांनी मिळू शकत नाहीत. ती तशी मिळवण्याची साहित्यिकांची, कलाकारांची धडपड निष्फळ ठरते ती तेवढ्यासाठीच. केवळ बाह्य विश्वाच्या कसोट्या लावणे एकांगीच ठरणार. त्यातूनच चिंतनशीलतेचा अभाव निर्माण होतो आणि स्वप्नाळूपणाचा बुजबुजाट. साहित्यिकांचे राजीनामे आणि अन्य अशाच बाबी याच एकांगीपणाचा परिणाम आहेत. खरी समस्या हे राजीनामे वगैरे नसून, बाह्य आणि आंतरिक विश्वाचे संतुलन साधून या विश्व व्यापाराकडे पाहण्याची निकोप, सार्थ दृष्टी कशी विकसित करता येईल हा आहे. राजीनामे वगैरेसारख्या उठवळ समस्या त्याने आपोआपच नियंत्रित होतील. एकांगी असण्यापेक्षा एकात्म असणे, संतुलित असणे नेहमीच चांगले असते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २५ ऑक्टोबर २०१५

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

नऊ दशकांची अमृतवर्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता अपरिचित राहिलेला नाही. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणून संघ ओळखला जातो. तरीही संघाची ओळख पटलेली आहे का, असा प्रश्न विचारला तर तो वावगा ठरणार नाही. संघाचे समर्थक, संघाचे विरोधक, संघाबद्दल आस्था बाळगणारे, संघाला पाण्यात पाहणारे, एवढेच नव्हे तर संघाचे स्वयंसेवकही आपापल्या पद्धतीने संघाची ओळख पटवून देतात, संघाचे मूल्यमापन करतात किंवा संघाबद्दलचे आपले मत तयार करतात. त्यात काहीही तथ्य नसते असे नाही. परंतु ते परिपूर्ण असते असेही नाही. संघ स्वत:देखील स्वत:ची ओळख कधी कधी देतो. मात्र तीही पूर्ण ओळख असतेच असे नाही. विशिष्ट संदर्भ घेउन आलेले ते एक दर्शन असते. परिपूर्ण दर्शन मात्र नसते.

संघाचे भाष्यकार आणि थोर विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी संघाचे स्वरुप समजावून देताना भाषाशास्त्रातील अनन्वय अलंकाराचे उदहारण देत असत. अनन्वय अलंकार कसा असतो हे सांगण्यासाठी संस्कृत भाषेत एक श्लोक आहे.

`गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा:
रामरावणयोर्युद्धम, रामरावणयोरिव'
म्हणजे आकाश आकाशासारखंच आहे, सागर सागरासारखाच आहे आणि राम-रावण युद्ध हे राम- रावण युद्धासारखेच आहे. त्याप्रमाणेच संघही संघासारखाच आहे. तो नीट समजून घेण्यासाठी त्याचे विविधांगी, गुंतागुंतीचे स्वरुप समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात संघाला अशा विश्लेषणाची गरज नाही. इ.स. १९२५ पासून आजतागायत संघ त्याच्या पद्धतीने चालत राहिला आहे आणि वाढत राहिला आहे. मात्र संघाला याची गरज नसली तरीही संघाला जे साध्य करायचे आहे त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अशा विश्लेषणाची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे येते ती संघाची शाखा. एका मैदानावर भगवा ध्वज रोवलेला. त्यासमोर काही लोक एकत्र झालेले आणि त्यांचे काही कार्यक्रम. हे कार्यक्रम खेळ, नियुद्ध, संचलन, दंड, लेझीम, सूर्यनमस्कार, योगासने, व्यायामयोग, घोष, गीतगायन, कथाकथन, चर्चा, भाषण, प्रार्थना असे अनेक प्रकारचे असू शकतात. हीच सामान्यपणे समाजाला असलेली संघाची ओळख आहे. संघ काय करतो. तर शाखा चालवतो. या शाखांमध्ये येणाऱ्या लहानमोठ्या साऱ्यांना स्वयंसेवक म्हणतात. या स्वयंसेवकांचे वर्षभरात काही कार्यक्रम होतात. त्यावेळी ते विशिष्ट गणवेश घालतात. या कार्यक्रमांमध्ये भाषणे होतात आणि त्यातून संघाचा विचार सांगितला जातो. याहून अधिक फारसे कोणाला ठाऊक नसते. अगदी संघाच्या स्वयंसेवकाला किंवा कार्यकर्त्यालाही! संघाचे काम करायला त्याची फारशी गरजही नसते.

संघाची कार्यपद्धती, त्याची संघटनात्मक रचना, कार्यपद्धती व रचना यांचा विकास, संघाचा इतिहास याविषयी अत्यल्प माहिती असते. संघाचे म्हणून काही साहित्य आहे, पुस्तके आहेत याची अनेकांना कल्पनाही नसते आणि तरीही एखादी व्यक्ती संघाचा कार्यकर्ता असते. एखादा महाविद्यालयीन विद्यार्थी, क्वचित शालेय विद्यार्थी सायं शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असतो. प्रभात शाखेचा एखादा स्वयंसेवक वा कार्यकर्ता निवृत्तीनंतरच संघाच्या शाखेत आलेला असतो. वयाच्या साठीत त्याने पहिल्यांदा संघाचा गणवेश घातलेला असतो. संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण कार्यकर्त्याने घेतलेलेच असते असे नाही. एक दिवस कधी तरी संघाच्या शाखेत आलेली व्यक्तीही आयुष्यभर संघाचा स्वयंसेवक असते. काही स्वयंसेवक काही दिवस, महिने वा वर्ष संघाचे काम करत असतात. तर काही आयुष्यभर संघाचे काम करतात. नवनवीन शाखा सुरू होत असतात. सुरू असलेल्या काही शाखा बंदही पडतात आणि पुन्हा सुरुही होतात. शाखा सुरू वा बंद करण्याचे आदेश निघत नाहीत. माणसांची उपलब्धता हाच एकमेव मुद्दा. माणूस उपलब्ध असेल तर शाखा चालते नाही तर बंद. शाखा चालवणाऱ्या या कार्यकर्त्यांना काहीही मिळत नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान एवढेच काय एखादे प्रमाणपत्रही नाही. प्रमाणपत्र मिळाले तरी त्याचा उपयोग तरी काय होणार, हा एक वेगळाच प्रश्न आहे. असे प्रश्न ज्याच्या मनात येतात तो आपोआपच कामापासून दूर होतो. कारण काही देण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ही संघाची स्पष्ट भूमिका आहे. असे दूर झालेले लोकही संघाचे स्वयंसेवक मात्र राहतातच. त्यांच्या स्वयंसेवकत्वाला काहीही बाधा येत नाही. जसे काम करण्याच्या मोबदल्यात काहीही मिळत नाही. तसेच काम करण्यासाठी वा स्वयंसेवक होण्यासाठीही काहीही द्यावे लागत नाही. त्यासाठी नोंदणी, नोंदणी शुल्क वगैरे नसते. गणवेश, शिबिर, वर्ग, सहल यासाठीचा खर्च मात्र स्वत:च करावा लागतो. संघाचे काम चालवण्यासाठी स्वयंसेवक स्वत:च पैसा गोळा करतात. वर्षातून एकदा त्यासाठी गुरुदक्षिणेचा कार्यक्रम होतो. ज्याला जितके पैसे द्यायचे असतील तितके तो भगव्या ध्वजापुढे समर्पण करतो. कोण किती देतो याची ना चर्चा होत ना त्यासाठी काही बंधन आहे. गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे हेदेखील बंधन नाही. गुरुदक्षिणा न देता वा त्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता सुद्धा एखादी व्यक्ती स्वयंसेवक राहू शकते.

गेली ९० वर्षे हा क्रम सुरू आहे. खरे तर आपण सारे हा एक चमत्कार घडताना पाहतो आहोत. काहीही आकर्षकपणा नाही, काहीही फायदा नाही, उलट तोटाच! आणि तरीही एखादे कार्य सतत चालूच राहते. विस्तारत राहते. समाजाला प्रभावित करीत राहते. याला आश्चर्य नाही तर काय म्हणणार? लोक संघाचे काम का करतात? संघ म्हणतो शाखा चालवा आणि लोक त्या चालवतात. हे कसे काय घडून येते? खरं तर यावर विश्वास बसणेही कठीण. पण जे प्रत्यक्ष दिसते ते नाकारणार तरी कसे? माणसे येतात- जातात, पिढ्या बदलतात, संकटे येतात, संघर्ष होतात, मतभेद होतात, तरीही सातत्य कायम राहते, ऊर्जा कायम राहते, प्रभाव कायम राहतो. हे कसे आणि का होते हा एक गूढ प्रश्नच आहे. याचे नेमके उत्तर कोणाकडेही नाही. अगदी संघाकडेही नाही. खरे तर संघ याचा विचारही करीत नाही. सतत फक्त काम करीत राहायचे एवढेच संघाला माहीत आहे. असा सगळा `जर-तर'चा मामला असूनही, trial and error चे गणित असूनही, देशस्थ विस्कळीतपणाचा खाक्या असूनही संघ चालतो आणि वाढतो आहे. वयाची ९० वर्षे पूर्ण केल्यावरही गतार्थ न होता सार्थ ठरतो आहे. संदर्भहीन न होता सयुक्तिक ठरतो आहे. या पृथ्वीवर एक आश्चर्य घडताना आपण पाहतो आहोत.

समाजाला हलवून टाकणाऱ्या अनेक व्यक्ती, चळवळी, उपक्रम, विचार या जगाने पाहिले आहेत. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभाव निर्माण करीत खळबळ उडवून दिली आहे. मात्र थोड्याच अवधीत त्या इतिहास झाल्या आहेत. खळबळ निर्माण करणारी व्यक्ती, कार्यक्रम वा विचार संघाजवळ कधीच नव्हते. तरीही समाजाला हलवून टाकणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना, विचार यांच्यापेक्षा संघ उजवा ठरतो. ९० वर्षे हा कालावधी खूप मोठा नाही, पण तो खूप लहानही खचितच नाही. सातत्य, विचारांची आणि कार्यपद्धतीची अखंडता, काळाबरोबर पावले टाकण्याची वृत्ती आणि क्षमता या साऱ्याच बाबतीत संघाचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे हे सारे एवढ्या शांतपणे की काही घडते आहे हे कुणाला जाणवू सुद्धा नये. ढोल पिटणे, जाहिरातबाजी, आक्रस्ताळेपणा यापैकी काहीही नाही. बरे संत प्रवृत्तीच्या एखाद्या व्यक्तीने हे केले तर समजून घेता येईल. परंतु संघाने मात्र सर्व प्रकारच्या गुणदोषांनी युक्त अशा लाखो सामान्य माणसांकडून ही मौन साधना करवून घेतली आहे. पिढी दर पिढी हजारो लोकांना टोकाच्या निरपेक्षपणे कार्याला प्रवृत्त करून कार्यरत ठेवण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण असावे. पद, प्रतिष्ठा, पैसा, मानसन्मान तर नाहीच पण ईश्वरप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती वगैरे अभौतिक किंवा मानसिक समाधान, आत्मिक समाधान वगैरे भावनिक बाबीही नाहीत. आणि तरीही संघाची यशस्वी वाटचाल यथार्थपणे सुरूच आहे.

संघाचा हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजाला अपरिचित अशी ८-१० माणसे केवळ एकत्र झाली होती आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर ती एकत्र झाली होती. त्यात विचार, ध्येयनिष्ठा वगैरे फारसे नव्हते आणि ९० वर्षांच्या वाटचालीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे नाव धारण करणारे काम दररोज देशभरात ५० हजार स्थानी चालते. यात ५० लाख स्वयंसेवक रोज एकत्र येतात आणि या मातृभूमीविषयीच्या आपल्या कर्तव्याचे स्मरण करून तिच्या उज्वल जीवनाविषयी प्रार्थना करतात. या व्यतिरिक्त हजारो स्थानांवर आठवड्यातून एकदा वा महिन्यातून एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून लाखो लोक एकत्र येउन या समाजाचा, देशाचा विचार करतात. त्यातील अनेक जण प्रत्यक्ष काही ना काही कामही करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे बिरुद न लावणाऱ्या परंतु संघ हीच प्रेरणा असलेल्या, तसेच वैचारिक आणि भावात्मक दृष्टीने संघाशी जोडल्या गेलेल्या आणि व्यवहारात संघाशी समन्वय राखून काम करणाऱ्या तीन-चार डझन अखिल भारतीय संस्था आहेत.

या संस्था समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. संघाप्रमाणेच त्यांचेही स्वरुप अखिल भारतीय असेच आहे. राष्ट्रीय, अखिल भारतीय, आदी विशेषणे लावणाऱ्या अन् एखाद्या वस्ती वा गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या संस्थांसारखे हे स्वरुप नाही. तर या साऱ्या संस्था खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आहेत. संघाचे काम तर तालुका स्तरापर्यंत पोहोचले आहेच, पण अन्य संस्थांपैकी अनेक संस्थांचा पसाराही तालुका स्तरापर्यंत पसरला आहे, तर बाकीच्या संस्थांचे काम जिल्हा स्तरापर्यंत तरी पोहोचलेले आहेच. भौगोलिक दृष्टीने विचार केला तर संपूर्ण देश संघाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कामाने व्यापला आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर बहुतेक साऱ्या क्षेत्रात संघाचे काम पोहोचले आहे. सर्व प्रकारच्या आर्थिक स्थितीतील लोक या कामाशी जोडले गेले आहेत. सर्व प्रकारच्या जाती धर्माचे लोक संघाशी संलग्नित आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये केवळ पुरुष येत असले तरीही राष्ट्र सेविका समितीच्या माध्यमातून महिलाही या कामात सक्रिय आहेत. अन्य संस्थांच्या कामातही महिलांचा सहभाग लक्षणीय असाच आहे. समाजाच्या प्रत्यक्ष सेवेची कामे दीड लाखाहून अधिक आहेत. लाखो स्त्री-पुरुष स्वत:साठी काहीही न मिळवता या सेवाकार्यांच्या माध्यमातून समाज सुशिक्षित, सुदृढ, सुसंस्कृत, आरोग्यसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नित्य आणि नैमित्तिक असे प्रत्यक्ष संघाचे काम, अन्य संस्था संघटनांचे काम, सेवाकार्य यासाठी माणसे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखो स्त्री-पुरुष हुडकून काढणे हेच खरे तर एक अशक्य कोटीतील काम आहे. परंतु संघाने अशी माणसे नुसती हुडकून काढली नाहीत तर त्यांना कामाला लावले. कामांचे आणि माणसांचे नियोजन केले. व्यवस्था निर्माण केल्या आणि त्या सातत्याने पुढे सुरू ठेवल्या. लोक जुने होत असतात, निवृत्त होत असतात. हे अतिशय नैसर्गिक आहे. अशा लोकांच्या जागी नवीन माणसांना क्रियाशील करावे लागते. संघाने तेही यशस्वीपणे केले आहे. ही कामे करणारी माणसे शिकली सवरलेली आहेत. उच्चविद्या विभूषित आहेत. स्वत: कर्तृत्ववान आहेत. विचारी आहेत. अशा माणसांना थातुरमातुर वैचारिक वा भावनिक आवाहन बांधून ठेवू शकत नाही, सक्रिय ठेवू शकत नाही. एखादे साधे गणेशोत्सव मंडळ चालवणे आणि टिकवणे किती कठीण असते याचा अनुभव आपण सतत घेत असतो.

संघाने मात्र हे असाध्य, साध्य करून दाखविले आहे. इ. स. २००६ साली संघाचे दुसरे सरसंघचालक श्री. गुरूजी यांची जन्मशताब्दी होती. त्यासाठी देशभरात जे कार्यक्रम झाले त्यात ५ लाख गावातील लोक सहभागी झाले होते. देशात सुमारे ७ लाख गावे आहेत. म्हणजे ७० टक्केहून अधिक गावातील लोक यात सहभागी झाले होते. संघकार्याचा हा विस्तार केवळ देशातच झालेला आहे असे नाही, तर जगातील सुमारे ४० देशांमध्ये संघाचे काम चालते आणि सगळ्यांनी त्याची दखल घ्यावी असे स्वरुप आता त्यास प्राप्त झाले आहे. ९० वर्षांचा हा प्रवास सरळ होता असेही नाही. खूप वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करीत हा प्रवास झालेला आहे. हा संघर्ष बाह्य होता, आंतरिक होता, परक्यांशी होता, स्वकीयांशी होता, राजकीय होता, सामाजिक होता, आर्थिक होता, भावनिक होता, शारीरिक होता, बौद्धिक होता. अनेकदा तर संघाचे अस्तित्व संपवून टाकण्याचा प्रयत्न झालेला जगाने पाहिला आहे. ज्या समाजासाठी संघ अव्याहत काम करतो आहे त्या समाजाने प्रदीर्घ काळ त्याला मनापासून स्वीकारलेही नव्हते. संपूर्ण विपरीत परिस्थितीचा सतत सामना करीत संघ इथवर पोहोचला आहे.

हे करताना त्यातील अखंडत्वही कायम आहे. एकच संघधारा वाहते आहे. त्याच्या शतधारा झाल्या नाहीत हीदेखील एक लक्षणीय बाब आहे. छोटी मोठी कामेदेखील एकसंध फार कमी काळ टिकतात. कधी नेतृत्वावरून वाद तर कधी तात्विक वाद!! कधी कार्यपद्धतीवरून मतभेद. परिणाम मात्र एकच. संघटनेत फाटाफूट. संघकार्याचे वैशिष्ट्य हे की, संघावर नाराज होउन बाहेर पडलेल्यांनी आपली वेगळी कामे सुरू केली पण पर्यायी वा समांतर संघ काढला नाही. ते शक्य झाले असते वा नाही हा मुद्दा वेगळा, पण कोणी पर्याय निर्माण करण्याचा गांभीर्याने विचारही केला नाही. याशिवाय जी कामे मूळ स्वरूपात टिकतात ती एका विशिष्ट मर्यादेतच काम करीत राहतात. सतत वर्धिष्णु राहूनही अखंडत्व कायम राखणे हेही एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. संघाची स्थापना १९२५ सालाची. महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय, सामाजिक क्षितिजावर उदय झाला १९२० साली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापनाही १९२० सालाचीच. म्हणजे सर्वोदय आणि कम्युनिझम यांच्यापेक्षा संघ ५ वर्षांनी लहान. कम्युनिस्ट पार्टीने सर्व प्रकारचे मार्ग आपल्या कार्यवाढीसाठी अवलंबिले. हिंसाचारही नाकारला नाही. अनेक वर्षे सत्ता उपभोगली. मोठा काळ सत्तेची सहानुभूती कम्युनिझमला मिळाली. गांधींच्या कार्याला तर देशात आणि जगातही अतिशय अनुकूलता होती व आहे. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही कामांची तुलना आज केली तर संघाचे यश आणखीनच ठळकपणे जाणवते.

केवळ विचार केला तरीही अंगावर शहारा यावा असा हा प्रवास आहे. जगाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या संघटनेचा प्रवास एवढा रोमांचक आणि अद्भुत राहिला असावा. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल प्राशन करून भगवान शंकरांनी तांडव केले होते. संघाने मात्र शांतपणे हलाहल पचवून टाकले आहे आणि समाजावर मात्र शांती आणि सौहार्दाचा अमृतवर्षावच केलेला आहे. असे सारे असतानाही सर्वाधिक गैरसमज असणारी संघटनाही संघच आहे. मोठ्या प्रमाणावर हेटाळणी सहन करणारी संघटनाही संघच आहे. आपल्याच कार्यकर्त्यांची नाराजी झेलणारीही संघटना संघच आहे. संघाच्या वाट्याला एवढे शिव्याशाप, एवढे तर्ककुतर्क का आले वा येतात. संघाबद्दल एवढा गोंधळ का आहे? तरीही संघ का वाढला? तरीही संघ का काम करतो आहे? संघाला नेमके करायचे तरी काय आहे? कशासाठी एवढा सारा खटाटोप सुरू आहे? काय साध्य करायचे आहे? काय मिळवायचे आहे? संघाला स्वत:ची प्रतिमा आणि वास्तव याविषयी काय वाटते? आजवरचा प्रवास आणि विस्तार याविषयी संघाला काय वाटते?

या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, संघाबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आणि संघाविषयी सम्यक आकलन करून सारासार मत बनवण्यासाठी संघाची नीट ओळख करून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे ६ वेगवेगळ्या दृष्टींनी संघ समजून घ्यावा लागेल.
१) संघाचे संघटनात्मक स्वरुप
२) संघ विचारधारा
३) संघ भावधारा
४) संघ- समाज परिवर्तनाचे माध्यम
५) संघाची ऐतिहासिक भूमिका
६) वैश्विक सभ्यतेच्या प्रवासातील संघाचे योगदान

संघाने अशी मांडणी आजवर केलेली नाही. हे हिन्दू राष्ट्र आहे, त्याची सर्वांगीण उन्नती व्हावी आणि या राष्ट्राने या जगातील आपला भार समर्थपणे वहन करावा एवढेच संघाने म्हटले आहे. या सहा कोनातून केलेले विश्लेषण परिपूर्ण असेल असेही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभरीकडे वाटचाल करीत असताना त्याचा असा आढावा घेणे आवश्यक मात्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०१५

महाकवीच्या गावाची सफर

प्रसिद्ध हिंदी छायावादी कवी सूर्यकांत त्रिपाठी `निराला' यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीप्तीने काल त्यांची एक कविता टाकली आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. संस्कार भारतीच्या साहित्य विधेची एक अखिल भारतीय बैठक उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथे होती. तीन दिवसांची बैठक आटोपल्यावर परतीच्या आरक्षणाप्रमाणे लोक परतत होते. एक पूर्ण दिवस माझ्याकडे रिकामा होता. बाकीही काही मंडळी होती. दिवस कसा घालवायचा यावर चर्चा सुरु झाली. संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. अध्यक्ष पाटण्याचे डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव यांनी सुचवले- कवी `निराला' यांचे गाव इथून जवळ आहे. तिथे जाऊन येता येईल का पाहा. कार्यकर्त्यांनी विचारपूस केली तर ते शक्य होईल असे वाटले. मग काय? लगबग सुरु झाली. हिंदी साहित्य विश्वात ख्यातीप्राप्त डॉ. श्रीवास्तव यांच्यासह दुसऱ्या श्रेष्ठ साहित्यिकाच्या गावाची सफर म्हणजे आनंदच. डॉ. श्रीवास्तव, संस्कार भारतीचे तेव्हाचे अ.भा. संघटन मंत्री योगेन्द्रजी, अस्मादिक, अन्य दोन-तीन लोक असे `निराला' यांच्या `बैसवाडा' गावी निघालो. दीप्तीही होती सोबत.

दोनेक तासात उन्नाव वरून `बैसवाडा'ला पोहोचलो. प्रथम तेथील शाळेत गेलो. त्या शाळेला `निराला' यांचेच नाव आहे. शाळेचे मुख्याध्यापक, अन्य शिक्षक, कर्मचारी सगळेच आनंदून गेले होते. कवीचे गाव पाहायला आजकाल कोण जातात? पण ही देशभर फिरणारी बडी मंडळी (म्हणजे डॉ. श्रीवास्तव, योगेन्द्रजी) आपल्या छोट्याशा गावात आली याचं विलक्षण कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शिक्षक मंडळी आम्हाला शाळेच्या गच्चीवर घेऊन गेली. तिथे `निराला' यांची एक कविता कोरलेली होती. हे कवीवर आणि कवितेवर प्रेम करणारे लोक आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरली नव्हती. डॉ. श्रीवास्तव प्रत्येक गोष्ट टिपून घेत होते. शांतपणे ऐकत होते. पाहत होते.

शाळेतून आमची गाडी गावातल्या `निराला' यांच्या घराकडे निघाली. अन्य साधारण खेड्यांप्रमाणेच बैसवाडाही होते. छोट्या बोळात गाडी अडली. ना मागे, ना पुढे. डॉ. श्रीवास्तव अन योगेन्द्रजी उतरले अन चालू लागले. आम्हाला त्यांचे अनुकरण करणे भागच होते. पाचेक मिनिटात आमचा ताफा विश्वप्रसिद्ध हिंदी कवी `निराला' यांच्या झोपडीत पोहोचला. तेथे कोणीही राहत नव्हते. ओसाड. आजूबाजूचे लोक जमले. कोणी काही, कोणी काही सांगू लागले. कोणी सुसंगत, कोणी असंगत. त्यात एक विचित्र वाटावा असा माणूस होता. गावात बहुतेक अशी माणसे असतातच. पूर्ण खेडवळ, जरा स्क्रू ढिला आहे की काय असे वाटावे असा, गबाळ्या. जे बोलेल ते समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याने श्रम करायला हवेत अशी अपेक्षा करणारा. १०-१५ मिनिटे आम्ही तिथे घालवली. डॉ. श्रीवास्तव खाली वाकले त्यांनी त्या ओसाड झोपडीला नमस्कार केला. तिथली चिमूटभर माती कपाळाला लावली. अन आम्ही परत निघालो. दाराबाहेर पाऊल टाकले तर तो विचित्र माणूस डॉ. श्रीवास्तव यांच्याजवळ आला अन काही सांगू लागला. एका कार्यकर्त्याने त्याला हाडहुड करून बाजूला केले.

आम्ही परत शाळेत आलो. तिथे गाडी उभी होती. गाडीत बसून उन्नावचा रस्ता धरला. जसे आम्ही गाव सोडले, तसे तोवर शांत असलेले डॉ. श्रीवास्तव हाडहुड करणाऱ्या त्या कार्यकर्त्याकडे वळले. त्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले- `त्या माणसाला तू असे का घालवून दिले. अशाच माणसांकडे अनेकदा पुष्कळ काही असते. अशी माणसे विचित्र असंबद्ध बोलत असतील. कंटाळवाणे वाटेल आपल्याला पण ते नीट शांतपणे ऐकले, संगती लावण्याचा प्रयत्न केला तर खूप काही पदरात पडते. अन आपल्या हाती काही लागले नाही, तरीही काय होते? त्या माणसाने `निराला' यांच्यासोबत काळ घालवला असेल. त्यांना कधी काही हवे नको पाहिले असेल. त्यांच्यासोबत रागाचे, हास्यविनोदाचे क्षण घालवले असतील. ते सांगण्याची त्याला जी ऊर्मी असते तिचेही महत्व आहेच ना? अन काहीच नसेल तरीही आपल्याला ज्या महाकवीबद्दल विलक्षण आदर आहे, त्याच्यासह राहिलेला एक माणूस म्हणून तरी त्याच्याशी नीट वागायला हवे की नको?' तो कार्यकर्ता खजील होऊन बसला होता. पण गाडीतील बाकीच्यांनाही, म्हणूनच मलाही- जीवनाची किती विलक्षण जाण प्राप्त झाली होती.

रस्त्यात एक छोटे गाव लागले. तेथील टपरीवर चहाचा आस्वाद घेऊन उन्नावचा प्रवास सुरु झाला. पुढच्या तासभर डॉ. श्रीवास्तव महाकवी `निराला' आणि त्यांचे `राम कि शक्तीपूजा' यावर बोलत होते. ज्यांना डॉ. श्रीवास्तव माहिती आहेत, त्यांना ज्यांनी ऐकले आहे असे समजू शकतील, आम्हाला त्यावेळी मिळालेली मेजवानी. स्वत: उत्कृष्ट ख्यातीप्राप्त साहित्यिक, हिंदीचे प्राध्यापक, भाषेवर प्रभुत्व, भाषेचा गोडवा, विद्वत्ता, वक्तृत्व अन काय नव्हते त्यांच्याकडे. व्यक्तित्वही प्रभावी. व्यक्तित्व अन वक्तृत्व असे की, अगदी अटलजी मंचावर असतानाही श्रोत्यांच्या मनात रेंगाळणार ते डॉ. श्रीवास्तवच. उन्नाव कधी आले ते कळलेच नाही.

काही योग नियतीने लिहून ठेवलेलेच असतात. असाच त्या दिवशीचा योग होता. `निराला' यांच्या गावची निराळीच सफर कायमचे आनंदनिधान झाली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५