मंगळवार, ४ जुलै, २०१७

अन्नदाता सुखी भव - ४


अर्थकारण चक्रीय न राहता रेषीय असणे आणि प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावणे या दोन महादोषांनी अर्थकारणाचा तर बट्ट्याबोळ होतोच, शिवाय समाजकारण, संस्कृती, कटुंब, कला, साहित्य, क्रीडा, मानवी संबंध, शिक्षण, पर्यावरण, धर्म, आध्यात्म, विज्ञान सगळेच नासून जाते. शेती आणि शेतकरीच नव्हे तर आज दिसणारी सार्वत्रिक तडफड, ओढाताण, औदासिन्य, अभाव, रोग हे सगळे याचा परिणाम होत. हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. त्यामुळेच कितीही खटपट केली तरीही समाधानकारक तोडगा लाभत नाही. त्यासाठी अर्थकारण रेषीय ऐवजी चक्रीय कसे होईल याचा प्रयत्न आणि कामातून निर्माण होणाऱ्या पैशाऐवजी कामाचे महत्व आणि प्रतिष्ठा वाढेल याचा प्रयत्न आवश्यक आहेत.
अर्थकारण चक्रीय व्हावे याचाच अर्थ त्याला एक अधोबिंदू असावा आणि एक शिरोबिंदू असावा हे आवश्यक. त्या अधोबिंदुच्या खाली कोणी जाणार नाही याची आणि शिरोबिंदुच्या वर कोणी जाणार नाही याची काळजी घेणे ही व्यवस्थेची जबाबदारी. अशी व्यवस्था निर्माण होईल आणि चालेल याची जबाबदारी संपूर्ण समाजाची. थोडक्यात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी पैसा कोणालाही मिळणार नाही आणि एका मर्यादेपेक्षा अधिक पैसा कोणीही साठवू शकणार नाही अशी तजवीज हवी. सगळी कामे पैसा निर्माण करू शकणार नाहीत, अन जी कामे पैसा निर्माण करू शकतात त्यांची पैसा निर्माण करण्याची शक्ती आणि वेग हेदेखील वेगळेच राहतील. असे होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे पैशाचे असंतुलन निर्माण होणारच. उदाहरणार्थ- अत्यंत निरर्थक असूनही निरनिराळे games तयार करणे, विकणे यातून अमाप प्रमाणावर पैसा निर्माण होणारच. दारूतून मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण होणारच. पण शास्त्रीय संगीताची शिकवणी, तत्वज्ञान यासारख्या कामातून पैसा निर्माण होणे कठीण. आरोग्य विभागातून पैसा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो पण तसे होणे गौरवाचे नसून काळजीचे कारण ठरते. समाजाची ही व्यामिश्रता लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे पैशाचे असंतुलन राहणारच. मग चक्रीय अर्थचक्र चालणार कसे? हा प्रश्न निर्माण होतो कारण आज `पैसा' फिरण्यासाठी एकच घटक विचारात घेतला जातो तो म्हणजे `उपभोग.'
मात्र, पैसा फिरत राहण्यासाठी `उपभोग' हा जसा एक घटक आहे तसाच दुसरा घटक आहे- `दानधर्म'. सुदृढ अर्थकारणासाठी पैसा फिरत राहायला हवा. त्यासाठी उपभोग वाढायला हवा आणि उपभोगासाठी प्रत्येकाने पैसा निर्माण करण्याच्या यंत्राचा भाग असल्याप्रमाणे, घाण्याच्या बैलाप्रमाणे कोलू फिरवत राहायचे; हा आजचा शिरस्ता आहे. यामुळे अर्थकारण एकरेषीय होते तसेच माणसाचे माणूसपण व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही संपून जाते. म्हणूनच `उपभोग' या एका घटकाला `दानधर्म' या दुसऱ्या घटकाची जोड हवी. हा विचार भारतीय समाजाने फार मोठ्या प्रमाणात केलाही होता. नव्हे तोच येथील समाजाचा आधारही होता. त्यामुळेच मोठमोठ्या वादळवाऱ्यात हा समाज टिकून राहिला. त्याची आंतरिक आणि बाह्य जीवनशक्ती चिवटपणे टिकून राहिली. हेच कारण होते की आपला मूलमंत्र होता- `एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ'. `एकमेका साह्य करू, अवघे घालू गोंधळ' ही आजची रीत झाली. त्यासाठी मेळ घालणे आवश्यक. तो कसा घालायचा?
१) पैसा निर्मितीची क्षमता आणि वेग वेगवेगळा राहणार, २) काही व्यक्ती, काही कार्ये पैसा निर्माण करू शकणार नाहीत, ३) निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित संकटे, अडथळे येतच राहणार, ४) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मात्र सगळ्यांना आवश्यक. या मुलभूत गरजा आहेतच. प्रत्येकाच्या या गरजा पूर्ण व्हायलाच हव्यात. या चारही गोष्टी एकत्रितपणे लक्षात घेऊन व्यवस्था हव्या. ज्या व्यक्ती आणि कार्ये मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण करू शकतात त्यांनी तो करावाच. पण व्यक्ती आणि कार्यांनी किती पैसा बाळगावा याची वरची मर्यादा निश्चित असावी. त्या मर्यादेपेक्षा अधिकचा पैसाही त्यांचाच राहील. मात्र तो त्यांना वापरता येणार नाही, तर त्यांच्याच नावाने त्याचे दान व्हावे. माणसाला जशी वित्तेषणा (पैशाची ओढ) असते तशीच लोकेषणा (नावलौकीकाची ओढ) असते. या दोन्हीचा मेळ घालायला हवा. पैशाची ओढ आहे तर पैसा कमव, अन अधिकचा पैसा दान कर. एखादी शाळा, दवाखाना, सार्वजनिक इमारती, मुत्रीघरासारख्या सुविधा कोणाच्या नावाने उभ्या राहिल्या तर बिघडते काय? प्रत्येकाच्या मुलभूत गरजा कोणत्याही खर्चाविना पूर्ण होतील अशी व्यवस्था हवी. कोणीही उपाशी राहणार नाही, कोणालाही आरोग्यसुविधा नाही असे होणार नाही, कोणालाही शिक्षण नाही असे होणार नाही. पण यासाठी पैसाही लागणार नाही. `सांझा चुल्हा'सारख्या प्रथा पुनरुज्जीवित व्हाव्यात. मग शेतकऱ्याच्या पदरात पैसा कमी पडला किंवा जास्त तरीही त्याला उपाशी वा रोगी राहावे लागणार नाही. आज गुन्हा केलेला कैदी भोजन आणि आरोग्य यापासून दूर राहत नाही, पण काबाडकष्ट करणारे शेतकरी, मजूर, निराधार, वृद्ध हे मात्र वंचित राहतात. हे बदलायला हवे. आजही अशा काही व्यवस्था आणि उपक्रम आहेत. परंतु त्याचा दर्जा, त्यामागची भावना, त्याचे परिणाम चांगले नाहीत. त्या ऐवजी केवळ वंचितांसाठी नव्हे तर सगळ्यांसाठी मुलभूत गरजा नि:शुल्क असाव्यात. तेथे लहानमोठा भेद नको. असे झाल्यास त्याचा दर्जा, त्यामागील भावना, त्याचे परिणाम उत्तम राहतील.
कसे होऊ शकेल हे? (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ जून २०१७

सुविचारांवर जगणारा समाज


सुविचार ही काही नवीन बाब नाही. कित्येक वर्षांपासून शाळेतील भिंतींवर लावलेले सुविचार सगळेच अनुभवत असतात. कित्येक पिढ्या त्यावर पोसल्या आहेत. परंतु प्रत्येक हातातील मोबाईल आणि त्याला मिळालेली सोशल मीडियाची जोड यांनी या सुविचारांना एक वेगळा आकार, वेगळे रूपरंग आणि वेगळे परिमाण दिले आहे. अनेकदा अनेक महापुरुषांच्या नावाने एकच सुविचार फिरतो तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो. कधी कधी तर वाटते की, ढगात पोहोचलेल्या या महापुरुषांपैकी कोणी आपल्या नावाचा एखादा viral होणारा असा सुविचार पाहिला तर त्यालाच भोवळ येईल. आपण कधी असं बोललो होतो वा असं लिहिलं होतं असा प्रश्न त्याला पडेल. अनेकदा, मी तर म्हणेन शेकडा ९० टक्केहून अधिक वेळा, हे सुविचार अर्ध्या मिनिटात हवेत उडवून लावता येतात. पण त्यातून वातावरण असे तयार होते की, जगात आता फक्त साधुसंत उरले आहेत किंवा जगात त्रास- दु:ख- वेदना- उपेक्षा- अभाव- हे काही उरलेलेच नाही. एका passive मानसिक समाधानात माणसे तरंगू लागतात. प्रचंड एकांगीपण तयार होऊ लागतं. अशा एकांगी उपदेशातून सारासार विचार आणि सदसद्विवेकाला हळूहळू तिलांजली दिली जाते. जगातील कोणत्याही महापुरुषाने, कोणत्याही धर्मग्रंथाने, कोणत्याही विचारकाने, कोणत्याही शहाण्या माणसाने जगाचे द्वैती स्वरूप नाकारलेले नाही. हे जग रागद्वेषात्मक आहे. त्यात दोन परस्पर विरोधी भाव, विचार, घटना, कल्पना, प्रसंग, दिशा आहेतच. नव्हे असे परस्पर विरोधी आणि विसंगत असणे म्हणजेच हे जग. ही मूळ बाब स्वीकारून मग या जगात कसे राहावे यावर अनेकांनी सखोल खल केला आहे. आम्ही मात्र टिवल्याबावल्या करत करत त्या उपदेशामृतात इतके बुडतो की, सुविचारातून विचारशून्यतेकडे वाटचाल करू लागतो. एकांगी दृष्टी स्वीकारल्यावर विचारशून्यतेशिवाय दुसरे काय हाती लागणार? बरे या माऱ्याने आपण `संत' झाल्याच्या भ्रमात इतके विरघळतो की, त्या सुविचारातील तत्व आपल्या जगण्यावागण्याला लावून पाहिले पाहिजे असे आमच्या मनात डोकावत सुद्धा नाही. आमचा भूतकाळातील व्यवहार, आजचा व्यवहार, भविष्यातील व्यवहार, परीक्षेच्या क्षणीचा व्यवहार हे तपासण्याची तसदी घेण्याची आम्हाला गरजच वाटेनाशी होते. एक प्रकारच्या गुंगीत आम्ही जगायला लागतो. साधे एखाद्याशी चांगले बोलणे, विचारपूस करणे, शुभेच्छा देणे अथवा शुभेच्छा स्वीकारणे; यासारख्या निरुपद्रवी कृती करताना सुद्धा आपल्या मनात किती अन कोणकोणते हिशेब चालतात याचा धांडोळा आपण किती घेतो? चार जणांच्या ग्रुपमध्ये (whats app च्याच नव्हे, घरात, कार्यालयात, संस्थेत, in general) सुद्धा एखाद्याशी चांगले वागलो, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याच्याशी मोकळेपणाने वागलो तर बाकीचे काय म्हणतील? त्या बाकीच्यांना काय वाटले म्हणजे माझा काय फायदातोटा होईल? असे असंख्य मुद्दे. शिवाय आपले अहंकार, आपले रागलोभ, आवडीनिवडी यांचा आपल्या वागण्या बोलण्यावर होणारा परिणाम वेगळाच. एखाद्याने वेगळा मुद्दा मांडला तरी लगेच अंतर तयार होते. किंवा एखाद्याने शुभेच्छा दिल्यावर त्याला मोकळ्या मनाने प्रतिसाद देण्यात सुद्धा कुचराई केली जाते. सुविचारांना मात्र तोटा नसतो. आपण स्वत: तयार करायचे, आलेले फिरवत राहायचे की झाले. आपण धन्य झालो. एकांगीपण, विचारशून्यता आणि फसगत ही आजच्या `सुविचारांवर जगणाऱ्या' समाजाची अंगभूत लक्षणे होऊ लागली आहेत. याच लक्षणांनी युक्त पार्थाला गीता सांगण्यासाठी पार्थसारथ्याने रक्त आटवले होते. अन त्यापूर्वी त्याची यथेच्छ निर्भत्सना करून आधी त्याचे डोके ताळ्यावर आणले होते. आज पुन्हा अशा एखाद्या पार्थसारथ्याची गरज आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ जून २०१७

अन्नदाता सुखी भव - ३


`अन्नदाता सुखी भव'चा तिसरा भाग लिहिणं काही ना काही कारणाने पुढे जात राहिलं. आज सकाळी एक बातमी वाचण्यात आली आणि वाटलं- कदाचित या बातमीसाठीच लिखाण पुढे ढकलत जावं लागलं असेल. नियती खेळवते म्हणतात ते हेच. काय होती बातमी? अमेझॉन या ऑनलाईन विक्री कंपनीच्या प्रमुखाला आपली पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती दान करावयाची आहे. बातमीच्या शेवटी एक उल्लेख असाही आहे की, जगातल्या १६० हून अधिक लोकांना आपली अवाढव्य संपत्ती दान करायची आहे. ही संपत्ती कुठे आणि कशी दान करायची या चिंतेत हे लोक आहेत. आजच्या अर्थकारणाचा फार महत्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आजचे अर्थकारण पैसानिर्मिती करणारे अर्थकारण आहे. त्या ऐवजी अर्थकारण हे पुरेसा पैसा खेळवणारे अर्थकारण हवे. पैशाची (विनिमयाचे साधन) निर्मिती हा अर्थकारणाचा महत्वाचा पैलू आहेच, पण अर्थकारण त्याच ठिकाणी थांबता कामा नये. आज तसे ते थांबते.
वास्तविक निसर्गचक्र, जीवनचक्र, विचारचक्र, स्वरचक्र यासारखेच अर्थचक्र असायला हवे. ही चक्र कल्पना फार महत्वाची आहे. या संपूर्ण अस्तित्वाचाच तो आधार आहे. हे अस्तित्व चक्रीय आहे. निसर्ग हे त्याचे फार सुंदर आणि लक्षणीय उदाहरण आहे. नेमके आजच्या विचारपद्धतीत ही चक्रकल्पना missing आहे. तेच अर्थकारणालाही लागू आहे. अर्थाचे एक चक्र हवे. त्या चक्रात आवश्यक आणि पुरेसा पैसा हवा. पण चक्र नसेल तर पैसा कितीही असला, आवश्यकतेपेक्षा कितीही अधिक असला तरीही तो फक्त एकाच, म्हणजे वरच्या दिशेने जाईल आणि खालच्या दिशेला त्याचा अभाव अधिकाधिक जाणवेल आणि त्याचा त्रास होईल. शरीरातील रक्त फक्त हृदयाकडेच जात राहिले किंवा फक्त हृदयाकडून जात राहिले तरी अनर्थ होईल. रक्त डोक्यापासून पायाकडे, पायापासून डोक्याकडे आणि हृदयापासून हृदयाकडे जात राहायला हवे. ते खेळते राहायला हवे. आणि गरजेपेक्षा अधिक सुद्धा असायला नको. त्याचे शरीरातील प्रमाण निश्चित असते.
आज याचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात होत नाही. समाजशरीरात आज गरजेपेक्षा किती तरी जास्त पैसा आहे. तोही claim असलेला. unclaimed वेगळाच. मग एवढा पैसा असूनही दारिद्र्य का? शेतकरी आत्महत्या का? शेतकरी कर्जबाजारी का? कारण पैसा फिरत नाही. पैशाची निर्मिती होऊन उपयोग नाही तो फिरायलाही हवा. पुन्हा एकदा हेही लक्षात घ्यायला हवे की तो गरजेहून अधिक सुद्धा नको. हे कसे साधता येईल? पुन्हा एकदा शरीराचे उदाहरण घ्यावे लागेल. हात, पाय, धड, डोळे, कान, नाक, मेंदू हे सारे आपापले काम करतात. हे कामच त्यांच्याकडे रक्त खेचून आणते, त्यांच्यापासून रक्त परत पाठवते आणि हे चक्र सतत सुरु राहते. आणखीन एक- प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आपापले काम करते, मात्र ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे. रक्तपुरवठ्याशिवाय अवयव काम करू शकणार नाहीत, अवयवांनी काम केले नाही तर शरीर राहू शकणार नाही. पण रक्त तयार करण्याचे आणि पुरवण्याचे काम फक्त हृद्य करीत असते. आजच्या यंत्र-तंत्र युगाने जी यांत्रिक विचारपद्धती उत्पन्न केली त्यात हा विचार होत नाही. संपूर्ण शरीर एक संपूर्णता आहे. त्यामुळे हृदय जे रक्त तयार करतं ते केवळ हृदयाचे नसून संपूर्ण शरीराचे असते. त्यामुळे ते देताना ते संकोच करीत नाही. हृदयाने तयार केलेले रक्त स्वीकारताना अन्य अवयव त्यात कमीपणा वा अपमान मानत नाहीत. आणि ही देवाणघेवाण गरजेनुसार असल्याने अधिक ओरबाडणे, साठवून ठेवणे, संग्रह करणे इत्यादी गोष्टींना वाव नाही. हे अर्थकारणाला लावून पाहिले की अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
आज आमच्या विचारशून्यतेने आम्ही अनर्थ ओढवून घेतला आहे. हे संपूर्ण अस्तित्व, ही प्रकृती एक संपूर्णता आहे हे लक्षात न घेऊन, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अस्तित्व वेगळे आहे असे आम्ही मानतो. त्यानुसार प्रत्येक अस्तित्वाने आपापले रक्त तयार करावे आणि त्या भरवशावर जगावे असे मानतो. नेमकी चूक इथे होते. प्रत्येक अवयव आपापले रक्त तयार करू लागला तर रक्ताचे फिरणे थांबेल आणि शरीर संपून जाईल. अर्थकारणाच्या संदर्भात हा विचार कसा करता येईल. जगण्यासाठी पैसा हवा हे निर्विवाद. हा येणार कुठून? त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. निर्विवाद. पण हे काम म्हणजे पैसा निर्माण करणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची प्रत्येक पेशी काम करते. पण ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे, तसेच प्रत्येकाने काम करायलाच हवे. ती जगण्याची मुलभूत गरज आहे. मात्र काम करणे म्हणजे पैसा तयार करणे नव्हे. आपल्या conditioning मुळे हे समजायला थोडे किचकट आहे, पण ते समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने काम करायला हवे, प्रत्येकाला काम करता यायला हवे. पण काम करणे आणि पैसा यांचा जो संबंध आज आपण जोडलेला आहे तो तोडायला हवा. काम म्हणजे रोजगार म्हणजे पैसा हे समीकरण बदलायला हवे.
प्रत्येक गोष्ट ज्यावेळी पैशात मोजली जाते त्यावेळी त्याला किंमत प्राप्त होते. सगळ्या गोष्टींची किंमत सारखी नसते. मागणी पुरवठ्या नुसार किमती ठरतात. त्याला परिस्थितीची जोड असते. त्यामुळे किंमत या स्वरुपात सगळ्यांना सारखा न्याय देताच येत नाही. म्हणूनच सोने, मोबाईल, शिकवणे, साहित्यनिर्मिती, कलासाधना, घर सांभाळणे, शेतीमाल यांच्या किमती सारख्या राहू शकत नाहीत. त्यांचे मूल्य आणि त्या मूल्याचे महत्व कमी होत नाही, संपत नाही. शेतीमालाचे जगण्याच्या संदर्भातले मूल्य आणि महत्व अजिबात कमी होऊ शकत नाही. तसेच घर सांभाळण्याचे किंवा शिकवण्याचे किंवा कलासाधनेचे किंवा साहित्य निर्मितीचेही. पण या सगळ्या गोष्टींची किंमत सारखी राहू शकत नाही. तसेच यातील सगळ्या गोष्टी पैसा निर्माण करू शकत नाहीत. आज मात्र आम्ही या प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावतो. यामुळे पैसा तर निर्माण होत नाहीच उलट त्याचा दर्जा आणि मूल्य कमी होते आहे. त्याचा फटका एकूण जगण्याला बसतो आहे. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ जून २०१७

अन्नदाता सुखी भव- २


पैसा हा शेतकरी समस्येचा दुसरा महत्वाचा पैलू आहे. कधीकाळी शेतकऱ्याकडे असलेला पैसा आता त्याच्याकडे नाही. `उत्तम शेती'ची आता अधम शेती झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. लोकसंख्येतील वाढ, शेतीचे हिस्सेवाटे, शेतजमिनी धनदांडग्या लोकांच्या घशात घालण्याचे उद्योग, गावांबद्दल जाणता अजाणता निर्माण झालेली अनास्था, विकास- प्रगती- जगणे- यांचा केंद्रबिंदू शहरांकडे सरकणे, परीटघडीचे आयुष्य आणि लिहिता वाचता येणे म्हणजेच चांगले जीवन हा रुजवलेला व जोपासलेला समज, व्यसने, गतानुगतिकता, राजकारण, आधुनिकतेच्या नावाखालील शेतीचे अनावश्यक रासायनिकरण व यांत्रिकीकरण, परंपरा आणि पारंपरिकतेच्या डोळस स्वीकार-नकाराचा अभाव; अशी ही विविध कारणे आहेत. गेली अनेक वर्षे हे सुरु आहे. तरीही त्याचे आजचे भयावह स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे post globalisation चे चित्र आहे. आजची विदारक स्थिती हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. १९९० पूर्वी शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हता.
जागतिकीकरणसुद्धा आता २५ वर्षे जुने झाले आहे. एवढेच नाही तर ज्यांनी जागतिकीकरणात आघाडीवर राहून नेतृत्व केले होते ते त्यातून माघार घेऊ लागले आहेत. काही दिवाळखोर झाले आहेत. काही मुठभर लोकांच्या हाती जगातील ८० टक्के संपत्ती साठल्याची जी चर्चा अधूनमधून होते, त्या संपूर्ण phenomenon चा तडाखा संपूर्ण जगाला बसला आहे. भारतातील शेतकरी समस्या हा त्याचाच एक भाग आहे. ही समस्या इतकी किचकट आणि गुंतागुंतीची आहे की, त्यावर `झट मंगनी पट ब्याह' असा उपाय शक्य नाही. ज्यांना अशी अपेक्षा आहे ते अडाणी आणि अशी अपेक्षा जनमानसात निर्माण करून त्याचे राजकारण करू पाहणारे बदमाश आहेत असेच म्हटले पाहिजे. पक्षोपपक्षांचे झेंडे घेऊन नाचणारे बावळट म्हटले पाहिजेत. आज सत्तेवर असणारे, काल सत्तेवर असलेले किंवा उद्या सत्तेवर येणारे यांची यातील भूमिका मर्यादित होती, आहे वा असेल हे समजून घेणे गरजेचे आहे.
एक उदाहरण घेता येईल. शेतीसाठी पैसा पाहिजे. परंतु त्यासाठी पैसा मिळत नाही. का? कारण शेती बेभरवशाची आहे. अगदी कालचे उदाहरण- काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने विदर्भाच्या पातुर भागात इतकी जोरदार हजेरी लावली की शेतात काढून ठेवलेला कोट्यवधींचा शेतमाल मातीमोल झाला. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी; कधी कीडीचा हल्ला तर कधी प्राण्यांची समस्या; पाऊसपाणी व्यवस्थित झाल्यावरसुद्धा कधी भरघोस पिके तर कधी पिके कमी येणे. दोन शेजारच्या शेतात सारखे पिक पेरले, एकाच वेळी पेरले तरीही त्याचे उत्पादन चार-आठ दिवस मागेपुढे येते. त्यात शेतकऱ्याच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कामांमुळे किंवा मजूर इत्यादी सोय न झाल्याने वगैरे माल मागेपुढे निघतो. एकाचा माल घरात येतो, तर दुसऱ्याचा दोन दिवसांनी पाऊस वा वादळ आले की मातीमोल होतो. उद्योग आणि शेती यात असे कमालीचे अंतर आहे. उद्योगात माणसे, उत्पादन, साठवणूक, वातावरण, परिस्थिती नियंत्रणात असतात. शिवाय उद्योग बुडाला तरी त्याची जमीन, कच्चा वा पक्का माल ताब्यात घेता येतो. काही ना काही वसुली करता येऊ शकते. तरीही बँकांची थकीत कर्जे लाखो कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. अशा स्थितीत शेतीला पैसा कोण देणार? एखाद्या theme park साठी बँक अथवा जागतिक एखादी संस्था सहज पैसा देते पण शेतीसाठी देत नाही. मग स्वाभाविक हे काम सरकारकडे येते. पण सरकार किती अन काय काय करणार?
सरकारला शेतीलाही पैसा द्यावा लागतो, शाळांनाही पैसा द्यावा लागतो, इस्पितळेही उभारावी लागतात, कला साहित्याची जोपासना करायला पण पैसा पुरवावा लागतो. अशा असंख्य बाबी. पैशाचे सोंग आणता येत नाही पण आणावे लागते. मग कर्जाचे डोंगर उभारावे लागतात, त्यातून पत घसरते, कर्जफेडीची चिंता सतावते, त्यासाठी जनतेच्या खिशाला हात घालावा लागतो. मागणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढी जनतेच्या खिशाला कात्री अधिक. ही कात्री सरसकट सगळ्या जनतेच्या खिशाला लागते. ज्या शेतकऱ्याला एका हाताने मदत दिली जाते त्याच शेतकऱ्याच्या अन्य गरजातून थोडे थोडे का होईना काढून घेतले जाते. कर्जाचा पर्याय थोडा बाजूला ठेवला तर धनदांडग्या लोकांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात. त्यांच्याकडून परस्पर काही गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यासाठी त्यांच्या अटी शर्ती स्वीकाराव्या लागतात. बरे, आपण स्वीकारलेल्या महान लोकशाहीमुळे निवडणुकांना पैसा लागतो. शेतकरी तो पैसा देऊ शकत नाहीत. पैसा देतात ते उद्योजक आणि व्यापारी हेच. त्यांना हात लावता येत नाही. सरकार कोणाचेही असो. घडते ते हेच. प्रत्येक पक्षाचे आपापले उद्योजक, व्यापारी असतात. त्या त्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना त्यांचे त्यांचे सरकार हवे असते. दुसरे सरकार आले की त्यांचे नाककान दाबले जातात. जगणे थोडेबहुत तरी मुश्कील होते. आज सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांमागे हादेखील एक पैलू आहे.
अशा स्थितीत कर्जमाफी किंवा हमीभाव नेहमीच कात्रीत सापडतात. शिवाय कृषीमालाचे भाव वाढवणे याच्या अन्य परिणामांचा विचार होतच नाही. कृषीमालाचे भाव वाढवा म्हणणे ठीक आहे. कदाचित ते वाढवले जातीलही. पण त्याचे परिणाम काय? अन त्याने साध्य काय होणार? सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, शेतकरी हा एकाच वेळी शेती कसणारा उद्योजक आहे, कृषिमाल विकणारा व्यापारी आहे, अन ग्राहकही आहे. एखादा शेतकरी गहू विकेल त्यावेळी डाळ, दूध इत्यादी विकतही घेईल. एखादा शेतकरी भुईमुग विकेल त्याच वेळी गहू, तांदूळ इत्यादी विकत घेईल. भाव वाढतील तेव्हा सगळेच भाव वाढतील. मग गहू विकून अधिक पैसा मिळेल अन त्याच वेळी अन्य गरजा महाग झाल्याने त्यात खर्चही होईल. खाद्यान्नाचे भाव वाढल्याने महागाई वाढेल, नोकरदारांचे महागाई भत्ते वाढतील, माणसांच्या हाती अधिक पैसा आल्याने कारखान्यात उत्पन्न होणाऱ्या उत्पादनांचे भाव वाढतील, वरच्या लोकांकडे पुन्हा अधिकचा पैसा साठेल, शेतकरी आजच्यापेक्षा अधिक पैसा असूनही सगळ्यात शेवटल्या पायरीवरचा शेवटल्या पायरीवरच राहील. त्याचे जगणे आता जसे कठीण आहे तसेच जास्तीचा पैसा मिळाल्यावर सुद्धा कठीणच राहील. आज कृषीमालाचे भाव वाढवण्याचा घाऊक उपाय सांगणारे हे धरून चालतात की बाकी सगळ्या बाबी आज आहेत तशाच राहतील. त्यांचे हे वाटणे दिवास्वप्न किंवा मूर्खांचे नंदनवन याहून अधिक काहीही नाही.
जगभरात, अगदी विकसित देशातसुद्धा हीच स्थिती आहे. त्यामुळेच त्यांनाही शेतीला मोठाली अनुदाने द्यावी लागतात, पैसेवाल्यांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात, अन या प्रयत्नात ते अभूतपूर्व कर्जबाजारी होतात किंवा दिवाळखोर होतात. शिवाय ज्याच्याकडे ना शेती आहे, ना उद्योग असा जो कोट्यवधीच्या संख्येतील मजूरवर्ग, कष्टकरी वर्ग आहे त्याचे काय? खायला, प्यायला त्यालाही हवे. त्याला ना हमी भाव, ना महागाई भत्ता, ना वेतन आयोग. जाडीभरडी का होईना भात रोटी खाऊन जगणाऱ्या या वर्गाने गहू, तांदूळ, डाळी, दूध यांचे भाव वाढले तर काय करायचे? पुन्हा सरकारने त्यांना फुकटात धान्य, दूध वगैरे द्यायचे? पुन्हा त्याचा बोजा अर्थयंत्रावर? बरे, हा जो मोठा कष्टकरी वर्ग आहे त्याच्यावरच बाकी संपूर्ण समाजाचा डोलारा उभा असतो. नेहमीच. त्या वर्गाने त्याचे पाहून घ्यावे अशाच राक्षसी मानसिकतेत आज आपण आहोत. माणूस म्हणून तर आपले हे अध:पतन आहेच, पण हा काच वाढला तर; the worm also turns या उक्तीप्रमाणे; संपूर्ण समाजव्यवस्था अस्ताव्यस्त होण्याची शक्यता नजरेआड करून चालणार नाही.
मग काय? पुढील भागात विचार करू.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ११ जून २०१७

`वामांगी'च्या निमित्ताने


दर आषाढी कार्तिकीला येते तशीच आजही अरुण कोलटकर यांची `वामांगी' ही कविता वाचायला मिळाली. नेहमीच मनोरंजन आणि उथळपणा म्हणून त्याकडे पाहतो. आजही तसेच पाहिले. पण त्यासोबतच त्यावर मत मांडावे असेही वाटले.
कोलटकर यांची ही कविता आता भरपूर परिचित झालेली आहे. त्यामुळे कविता येथे देत नाही. ज्यांना ठाऊक नसेल त्यांना ती सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मूळ मुद्यावर येतो. पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रखुमाई नाही. त्यावर ही कविता. कोलटकर यांनी त्यांना वाटला तो अर्थ लावून स्त्रीवादाच्या अंगाने ही कविता लिहिली. पण म्हणून ते सत्य ठरते का? अशीच पुरुषवादी भूमिका घेऊन कविता लिहिता येईलच. ती विठ्ठलाची भूमिका म्हणून मांडता येऊ शकेल. हा सगळाच त्यामुळे पोरखेळ ठरतो. साहित्यिकाने स्वातंत्र्य किती आणि कशाचे घ्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपले प्रश्न, आपली मते मांडताना शतकानुशतके ज्या गोष्टी घडत-बिघडत आल्या आहेत, त्यांचा आधार किती घ्यावा हा मूळ प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देव, धर्म, रूढी, परंपरा, भावना यांना हात घालताना किमान तर्कबुद्धी तरी वापरायलाच हवी. या कवितेच्या संदर्भात ती किमान तर्कबुद्धी वापरायची म्हटले तर प्रश्न निर्माण होतो विठ्ठल-रुक्मिणी यांना खरेच अस्तित्व आहे का? असे कोणी आज वा कधीकाळी होते का? उत्तर स्पष्ट आहे- त्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मग सांगता येत नाही तर त्यावर समग्र जीवनाच्या संदर्भात भाष्य का करायचे? तो प्रश्न भावनांचा, श्रद्धांचा म्हणून दूर ठेवायचा. आपली मते, आपले विचार, आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना वेठीला धरण्याचे कारण नाही. ते काम अन्य प्रकारे होते आणि होऊ शकते. त्यामुळे अशा बाबतीत आक्रस्ताळेपणा करत विनाकारण श्रद्धाभंजन करत सुटणे चुकीचे ठरते. त्यामुळे ही कविता अयोग्य आणि चुकीची म्हणावी लागते.
दुसरा मुद्दा येतो, कवितेच्या आशयाचा. याबाबतीत असे म्हणता येईल की, देव, ईश्वर, धर्म इत्यादींची समज नसलेली ही कविता आहे. मुळात देव, धर्म, ईश्वर, आध्यात्म यांची बांधिलकी आणि श्रद्धा जपणारे सुद्धा याबाबत फारसा विचार करीत नाहीत. मग ज्यांना ते मान्य नाही किंवा त्याला विरोध करायचा आहे त्यांची गोष्टच वेगळी. अरुण कोलटकर असो किंवा `पिके' तयार करणारा अमीर खान असो; एकाच माळेचे मणी. ही दोन नावे फक्त उदाहरण म्हणून घेतली. परंतु असे अक्षरशः असंख्य आहेत. साहित्यिक, विचारवंत, लेखक, कलाकार, पत्रकार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजमानस घडवणारे बहुतांश लोक या गोष्टींचा मुळातून, सखोल अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. किमान असा अभ्यास करणाऱ्यांकडून थोडा सल्ला वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. उलट आपले मत लादण्याचा प्रयत्न करतात. शेकडो वर्षे वारकरी, भागवत संप्रदाय, संत काय म्हणत आहेत याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्ही म्हणतो तोच अर्थ खरा आहे असा दावा करणे हास्यास्पद ठरते. भारतीय तत्वज्ञान, देवदेवता कल्पना, प्रतिकांचे अर्थ, प्रतिकांचा विकास, या साऱ्याचा मानवी जगण्याशी संबंध यांचा सखोल विचार न करता अनेकदा लिहिले जाते. आजचे बहुसंख्य साहित्य हे impulsive साहित्य आहे. कोलटकर यांची ही कविताही तशीच आहे. अतिशय धाडसाने मी हेही म्हणेन की, पुराणे, कथाकहाण्या हे साहित्य देखील impulsive साहित्य आहे. मूळ भारतीय तत्वज्ञान, आध्यात्म, जीवनदृष्टी समजण्यासाठी उपनिषदे हाच संदर्भबिंदू आहे. लोकश्रुती किंवा अन्य साहित्य नाही. अलीकडच्या काळात यावर भाष्य करणारे विवेकानंद, योगी अरविंद असोत किंवा डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान यांचे अध्ययन न करता, जीवन, जगणे इत्यादींचा गांभीर्याने विचार न करता लिहिले जाते. असे लिहावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी असे लिहू नये म्हणून काही ते थांबणार नाहीत. मात्र एका गोष्टीवर आक्षेप घ्यावाच लागेल आणि आग्रहाने ती गोष्ट मांडावी लागेल की, impulsive लिहून ते सिद्धांत म्हणून प्रचारित करू नका.
कोलटकर किंवा त्यांच्या पद्धतीने लिहिणारे लोक ज्या विचारांना प्रमाण मानून लेखन करतात ते विचार आज केवळ भारतात नव्हे संपूर्ण जगात प्रश्नांकित झालेले आहेत. गेली काही शतके हे विचार आपल्या कानीकपाळी इतके ठसवले गेले आहेत की, आम्ही त्यांचा नीट विचार करूच शकत नाही. व्यक्तिवाद, इहवाद, विकास, स्वातंत्र्य, जीवन, जगणं, माणूस इत्यादींच्या संकल्पना, त्यामागील भावना, जगण्याच्या संदर्भातील या सगळ्याचे अनुभव हे सगळेच आज कोलमडून पडले आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार तुकडे तुकडे करून, पृथकपणे करणे आणि सगळ्या गोष्टींचा विचार जोडत जोडत सलगपणे करणे असा मूळ विचारांचा फरक आहे. जोडत जाणे हा भारतीय विचार आणि भाव आहे. तो समजत नाही तोवर अनेक गोष्टी उलगडणे कठीणच. देव ईश्वर असा विषय असल्याने फक्त एक सिद्धांत म्हणून मांडतो. त्याचा विस्तार वाचकांवर सोपवतो. सिद्धांत- भारतीय आध्यात्मदृष्टी सुद्धा अखेरीस ईश्वर सोडून देते. भारतेतर इहवादी, लौकीकवादी दृष्टी तर ईश्वर टाकूनच देते. दोन्हीत ईश्वर संपून जातो. मात्र भारतीय दृष्टी सगळ्या लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक बाबी सामावून घेत घेत जगण्याचं संपूर्णत्व प्रकट करते. त्यात ईश्वर संपणे याचा अर्थ ईश्वराचा विलय आहे. मात्र भारतेतर दृष्टी ईश्वराची तोडफोड करत, जगण्याची चिरफाड करत, तुकडे तुकडे करत, अखेरीस फक्त चिंध्या हाती ठेवते आणि जगणे हा वैफल्याचा उत्सव म्हणून साजरा करते. रखुमाईच्या प्रतिकातून कोलटकर यांनी मांडलेला विचार याला अपवाद नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ जुलै २०१७

शुक्रवार, ९ जून, २०१७

अन्नदाता सुखी भव- १


देशभर सध्या शेतकरी गाजतो आहे. तूतू मीमी ला अंत नाही. समाज, त्याचे सारे व्यवहार, त्याचे विचार आणि विचारशक्ती सारेच राजकारणाच्या दावणीला बांधले गेल्याने सगळंच कठीण झालं आहे. त्यामुळे त्या संदर्भात काहीही न बोललेलेच बरे. मात्र हा विषय त्यापलीकडे जाणारा आहे, अन त्या पल्याडच्या गोष्टी बोलणे, लिहिणे आवश्यक आहे.
शेती अन शेतकरी यांची मूळ समस्या काय आहे? पैसा आणि प्रतिष्ठा या दोन मूळ समस्या आहेत. शेतकऱ्याजवळ पैसा नसणे, शेतीसाठी पैसा नसणे, सरकार वा अन्य यंत्रणा यांनी शेतीसाठी पुरेसा पैसा न देणे किंवा खर्च न करणे, उपलब्ध पैशाचा अयोग्य वापर; हे पैशाच्या समस्येचे रूप आहे. शेतकरी, शेती, शेतकरी कुटुंब, जमीन, माती, ग्रामीण जीवन, कष्ट याकडे अप्रतिष्ठा दृष्टीने, हिणकस दृष्टीने पाहणे; त्याची मस्करी करणे; त्याविषयी तुच्छता; हे प्रतिष्ठेच्या समस्येचे रूप आहे. शिवाय या दोन्ही समस्या परस्परात गुंतल्या आहेत आणि परस्परांशी निगडीत आहेत. या दोन्हीचा सखोल विचार आवश्यक आहे.
आज किती जण चार-आठ दिवस खेड्यात जाऊन राहतात? किती खासदार, आमदार गावातल्या घरी राहतात? मदत करणारे किती celebrity आठ दिवस गावात जाऊन राहतात? शेती वा शेतकऱ्यांवर बेंबीच्या देठापासून चर्चा करणारे मुद्रित वा दृकश्राव्य माध्यमातील किती लोक खेड्यात जाऊन राहू शकतील? पर्यटन म्हणून का होईना गावात मुक्कामाला जाणारे किती आहेत? गाव सोडून शहरात आलेले किती गावी जाण्यास इच्छुक आणि उत्सुक असतात? का ही अनास्था? खराब रस्ते, वीज, पाणी, स्वच्छतागृहे यांची समस्या, मोबाईल रेंज न मिळणे, शहराचा आकार- स्वरूप- सोयी- खाणेपिणे- सिनेमे- भाषा- बोलणेचालणे- यापासून थोडा वेळ सुद्धा दूर राहण्याची तयारी नसणे; ही काही कारणे. यातून मार्ग काय? गावी जाऊन राहायला सुरुवात करणे. सुरुवातीला त्रास होईलच. दहा, शंभर, हजार, काही हजार अशी संख्या वाढत गेली तर त्यातूनच आज गावखेड्यात असलेला सुविधांचा अभाव दूर होईल. फक्त अभाव दूर करा म्हणून किंवा ते दूर करण्यासाठीच्या इमारती, रचना, व्यवस्था उभ्या करून अभाव दूर होणार नाही. आधी लोकांनी गावाकडे जावे लागेल, तिथे राहावे लागेल. त्रास सोसावा लागेल. पायवाट कशी तयार होते? सुरुवातीला चालणाऱ्यांना त्रास सोसावाच लागतो. जेवढे अधिक लोक ही तयारी करतील तेवढा समस्या सुटण्याला हातभार लागेल. आजही पुष्कळ जण जातात, पण नव्हाळीचे भाकरी-भरीत, हुरडा आदी खाण्यासाठी; तिथून येताना पिशव्या भरून आणून; `त्यांनी येताना आग्रहाने हे दिले' म्हणून फुशारकी मारता यावी यासाठी जातात. मात्र गावात गेल्यानंतर जसा त्रास सहन करू तसेच आपल्या पदरात काही पाडून घेण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही टाकण्यासाठी जाऊ, ही भावना घेऊन जायला हवे. तिथे जे काही मिळेल ते धान्य फळे, घरगुती तयार केले जाणारे पदार्थ, वस्तू इत्यादी; तिथे जाऊन, पुरेसे पैसे देऊन घेऊ हा विचार व्हावा लागेल. केवळ गावातून आणलेल्या मालाची शहरात फुशारकी मारणे किंवा गावातल्या लोकांवर आपल्या चकाचक गाडीची, भारी मोबाईल, कपडेलत्ते, पादत्राणे, बोलणेचालणे आदींची मोहिनी घालणे याहून वेगळा विचार करावा लागेल. गावी जाऊन राहण्यातून त्यांच्यापर्यंत स्नेह आणि पैसा पोहोचावा याची काळजी घ्यावी लागेल. आहे तयारी?
प्रतिष्ठेच्या प्रश्नाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे- शेती करण्याची, असलेली शेती सोडून न देण्याची मानसिकता तयार होणे. त्यासाठी पैसा आणि नियोजनबद्ध प्रयत्न हवेत. शहरांमध्ये मेट्रो, सिमेंट रस्ते, पाण्यावरील विमाने, बुलेट ट्रेन, मॉल्स इत्यादी उभारण्यापेक्षा त्या पैशातून तालुका स्थानी शीतगृहांची साखळी उभारणे, साठवणुकीची व्यवस्था उभारणे, शेतमालाच्या बाजारपेठा शहरात उभारण्यापेक्षा तालुक्याला उभारणे, तालुका केंद्र करून शाळा, महाविद्यालये, दवाखाने, इस्पितळे उभारणे ही दिशा धरावी लागेल. ग्राहकांच्या फुकट्या मानसिकतेला आवाहन करून ग्रामीण मालाला उठाव देण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा, ग्राहकाच्या सदसद्विवेकाला आवाहन करून तालुक्याच्या बाजारपेठेला जाण्याची त्याची मानसिकता तयार करावी लागेल. जाहिराती, प्रसार माध्यमे, मनोरंजन, प्रबोधनाचे अन्यान्य मार्ग यांचा वापर त्यासाठी आग्रहाने करावा लागेल. आहे तयारी?
याशिवाय पैशाचा प्रश्न महत्वाचा आहे. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ जून २०१७

सोमवार, १५ मे, २०१७

पाहा विचार करून...

आफ्रिका सोडून संपूर्ण जगावर मोठा सायबर हल्ला झाला. आपल्या येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या. जगभरातच याची चर्चा सुरु आहे. हा हल्ला आटोक्यात आला असून सुरक्षेची चर्चा सुरु झाली आहे. परंतु जी माहिती नको त्याच्या हाती लागून गेली त्याचे काय? त्याचा वापर तर तो करणारच. त्या माहितीच्या आधारे जगभरात उत्पात करून होईपर्यंत नव्याने करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचा भेद करण्याची क्षमता व कौशल्य हे लोक विकसित करणार आणि पुन्हा हल्ला करणार. डिजिटल व्यवहारांचे आक्रमकपणे व अभिनिवेशाने समर्थन करणारेही आता बिचकू लागले आहेत. तुमचे-आमचे, तूतू-मीमी हे होईलच. संपूर्ण जगाची कबर खोदल्या गेली तरीही तूतू-मीमी सोडायचं नाही, सुटणार नाही असा शाप देऊनच माणसाला जन्माला घातलं असणार. मात्र या माणसांमधीलच काही हाताच्या बोटावर मोजावेत असे अपवाद असलेल्यांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा.

एक गोष्ट निर्विवाद आहे की, सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन तत्वांवर वर्तमान सभ्यता- संस्कृती- जीवन- उभे आहे. यावर या जीवन पद्धतीचे समर्थक आणि टीकाकार दोघेही एकमत होतील. पण गमतीची गोष्ट म्हणजे- या जीवनपद्धतीने ज्या समस्यांच्या गर्तेत माणसाला लोटले आहे, त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे, त्या समस्यांवर केले जाणारे उपाय सुद्धा; सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन गोष्टींवरच आधारित असतात. नव्हे- सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; याच दोन संदर्भात विचार करण्याचं आमच्या बुद्धीचं प्रचंड conditioning झालेलं आहे. अगदी प्रामाणिकातल्या प्रामाणिक व्यक्ती अन प्रयत्नसुद्धा याला अपवाद नाहीत. जे ही बाब समजू शकतात त्यातील ९० टक्केहून अधिक तूतू-मीमी मध्ये अडकलेले असतात. काही चांगला बदल खरंच घडून यायचा असेल तर या जगातील ७०० कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक विचारी अन सुजाण झाले पाहिजेत; हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नाही.

वर्तमान जगण्याच्या मूळ तत्वांना खूप आदर्श, आध्यात्मिक तत्वांचा मुलामा देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. हे अगदी सहज शक्य आहे. पण आध्यात्मिकता अथवा आदर्श ही आंतरिक प्रकृती आहे. चराचराला कवेत घेणे, चराचराशी एकरूप होणे, चराचराशी समत्वाचा व्यवहार, चराचराचं एकत्व; इत्यादी गोष्टी आंतरिक प्रकृतीशी संबंधित आहेत. बाह्य व्यवहारात विषमता, विविधता, अल्पता, वेगवेगळेपणा, आटोपशीरपणा; याच गोष्टी असू शकतात. आंतरिक प्रकृतीचा अखंड विस्तार आणि बाह्य व्यवहार छोट्या छोट्या मर्यादांमध्ये; हेच जीवनाचे सूत्र असू शकते.

शांतपणे विचार करणाऱ्यांसाठी फक्त एक संकेत- भारताच्या आर्थिक इतिहासाचे नवनवे अध्ययन आणि त्याचे निष्कर्ष आता समोर येत आहेत. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही. परंतु भारताच्या त्या वैभवकाळात - भारत राजकीय दृष्टीने अशांत होता, आजच्यासारखे केंद्रीभूत शिक्षण- संशोधन नव्हते, जातीव्यवस्था अतिशय भक्कम होती, संपन्नता असूनही सुरक्षेचे उपाय वाढवण्याची गरज तर पडत नव्हतीच उलट घरांना कुलूपे न घालण्याचे प्रयोग यशस्वी होत असत, सारे काही कोणाच्या तरी हातात घट्ट धरून ठेवण्याची पद्धती नव्हती, एकच एक सत्ताकेंद्र नसल्याने नियमांची विस्कळीतता होती. या सगळ्या गोष्टींचा विचारही व्हायला नको?