रविवार, १३ जुलै, २०१४

आपले असले तरीही...

आपल्या मराठीत एक छान म्हण आहे- `आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं.' माणसाची ही स्वाभाविक वृत्ती असते. परंतु एखादी गोष्ट स्वाभाविक आहे म्हणजे योग्य आहे, अनुकरणीय आहे किंवा ग्राह्य आहे; असे होत नाही. योग्य- अयोग्यता किंवा स्वीकार- नकार यांचा निकष स्वाभाविकता हा नाही. भारतात नव्याने आलेल्या भाजपा सरकारचा विचार करताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अतिशय परिश्रमांनी एक सत्तांतर देशात घडून आले आहे. त्याचे अनेक अर्थ आणि अन्वय आहेत. ते हळूहळू प्रकट होतील. विचार, आचार आणि वृत्ती या सगळ्याच बाबतीत जीर्ण शीर्ण झालेल्या, भरकटलेल्या पक्ष आणि व्यक्तींकडून ही सत्ता खेचून घेऊन भारतीय जनतेने आपल्या सुजाणतेचा आणि सुबुद्धतेचा परिचय घडवला आहे. परंतु सुरुवातीला नमूद केलेल्या म्हणीप्रमाणे अवस्था होऊ नये याची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. उत्साह आणि आनंद कधीकधी अंध बनवतो हे विसरता कामा नये.

हा इशारा देण्याचे कारण आहे सध्या सुरु असलेले अर्थकारण. आज प्रत्यक्ष अर्थकारणासोबतच त्यातील बारीकसारीक बाबींची चर्चादेखील होते. ही अतिशय चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. सामान्य माणूस जेवढा माहितीने परिपूर्ण, सजग, आस्थावान आणि परिपक्व राहील तेवढे चांगले. मुद्दा एवढाच की, ही माहिती- चर्चा- एकांगी नको. साधकबाधक हवी. साधकबाधक हा शब्द नेमका लक्षात ठेवायला हवा. विशिष्ट विचारांनी किंवा कृतीने काय साधता येईल आणि त्याने कशाला बाधा उत्पन्न होईल या दोन्हीवर लक्ष देण्याची आवश्यकता असते.

आज एक मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो की, तुम्हाला सेवा हव्या असतील तर त्यासाठी पैसा मोजावा लागेल. हा मुद्दा मांडताना, ऐकताना फार चांगला आणि तर्कशुद्ध वाटतो. परंतु त्याचे परिणाम काय होऊ शकतील आणि मुळात तो सिद्धांत म्हणून बरोबर आहे का? ही भाषा ही भांडवलशाहीची भाषा आहे. प्रत्येक गोष्टीचे वस्तूकरण, वस्तूंचे किंमतीकरण ही भांडवलशाहीची रीत आहे. यात भावना, विचार, नाती, प्रतिभा, ईश्वर यांचेही वस्तूकरण होते. ही विकृती व्यवहारात काय रूप घेऊ शकते याकडे संकेत करणारी एक बातमी आजच वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. व्हेनेझुएला देशातील कराकस येथे असलेल्या विमानतळावर शुद्ध हवेत श्वास घेण्यासाठी २० डॉलर्स म्हणजे १२०० रुपये एवढा कर आकारला जातो आहे. उद्या आपण आपल्या घराच्या गच्चीवर उभे राहून मोकळ्या हवेचा आनंद घेत असू तर त्यावर कर वा शुल्क लागणार नाही कशावरून? पैसा मिळवणे एवढाच उद्देश झाल्यानंतर शोधायचे असते फक्त निमित्त.

भांडवलशाहीच्या अशा अनेक गोष्टींनी, मूल्यांनी, सिद्धांतांनी जगात सध्या उच्छाद मांडला आहे. त्यावर जगभर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचा त्रास आणि उपसर्ग सगळ्या जगाला डंख मारतो आहे. यावर काहीही उपाय नाही अशा विचाराने जग हतबुद्ध झालेले पाहायला मिळत आहे. या सगळ्याची वर्णने आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया आणि अमेरिका अशा दोन शक्ती जगात कार्यरत होत्या. परंतु १९८६ साली रशियातील मार्क्सवादाच्या पतनानंतर भांडवलशाहीला वैचारिक आणि व्यावहारिक टक्कर देणारी कोणतीही शक्ती जगात उरली नाही. मार्क्सवाद त्याच्या अंगभूत कमजोरीमुळे कोसळणार होताच. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या चिंतकांनी त्याचे सखोल विश्लेषण करून त्याबाबत इशाराही दिला होता. रशियापाठोपाठ चीन आणि अन्य कम्युनिस्ट देशांनीही मार्क्सवाद टाकून दिला. यामुळे जगभर निर्माण झालेली पोकळी भांडवलशाहीने व्यापून टाकली. आज या भांडवलशाहीची चलती आहे. परंतु या भांडवलशाहीने समस्या सोडविण्याऐवजी समस्या वाढवूनच ठेवल्या. या भांडवलशाहीने वाढवून ठेवलेल्या काही समस्या अशा-
१) आर्थिक, प्रादेशिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असमतोल.
२) असंख्य स्तरांवरील असंतोष.
३) असंख्य स्तरांवरील संघर्ष.
४) असंख्य प्रकारचे तणाव.
५) विविध रोग आणि प्रकृतींच्या तक्रारी.
६) भावनिक एकारलेपण, भावनिक रिक्तता, भकासपणा.
७) प्रदूषण, पर्यावरणाचा विनाश.
८) मानवातील पशुत्वाची वाढ.
९) विचारशून्यता, मूल्यविहीनता, विवेकहीनता.
१०) सुखशांतीच्या अभावात भरघोस वाढ.
ही यादी बरीच वाढवता येईल. या सगळ्यांच्या परिणामी भांडवलशाही देखील कोसळणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. फक्त याची अधिकृत घोषणा कधी होईल एवढाच भाग आहे. महत्वाचा प्रश्न आहे पुढे काय? मानवी समाजाची पुढील वाटचाल कशी राहील? मार्क्सवाद आणि भांडवलशाही लयाला गेल्यानंतर मानव जातीपुढील तिसरा पर्याय कोणता?

सामान्य माणसांचा समाज हाच त्या तिसऱ्या पर्यायाचा आधार राहील. पण समाज म्हणजे काय? आज जे चित्र जगभरात पाहायला मिळते तशा समाजातून मात्र हा तिसरा पर्याय विकसित होऊ शकणार नाही. काय आहे आजचे चित्र? शुद्ध हवेसाठी करआकारणी करणाऱ्या ज्या वृत्ताचा उल्लेख सुरुवातीला केला आहे. त्याच बातमीत आजच्या समाजाचेही चित्र आहे. या करावर तेथील जनतेत काय प्रतिक्रिया आहे हे सांगताना बातमीत म्हटले आहे की, सोशल मीडियात या कराविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत असून त्याची थट्टामस्करीही करण्यात येत आहे. एक मासलेवाईक प्रतिक्रियाही बातमीत देण्यात आली आहे ती अशी- `विमानतळाच्या खिडक्या फुटलेल्या आहेत, शौचालयांमध्ये पाणी नाही, कुत्र्यांचा मुक्त वावर आहे पण काहीही नसले तरीही येथे ओझोन मात्र आहे.' ही प्रतिक्रिया भारतातील नाही, व्हेनेझुएला येथील आहे हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे.

व्हेनेझुएलाची लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे. प्रति चौरस किलोमीटरमध्ये फक्त ७७ लोक राहतात आणि त्यांचा वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १२ हजार अमेरिकन डॉलर एवढा आहे. भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे. येथे प्रति चौरस किलोमीटरमध्ये ३७८ लोक राहतात आणि येथील वार्षिक उत्पन्न दर प्रति माणशी सुमारे १६०० अमेरिकन डॉलर एवढा आहे. म्हणजेच भांडवलशाहीच्या आणि वर्तमान अर्थशास्त्राच्या भाषेत तो विकसित देश आहे आणि त्याचे आर्थिक मापदंड आदर्श आहेत. तरीही तेथे व्यक्त झालेली प्रातिनिधिक प्रतिक्रिया ही भारताचीही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होऊ शकेल अशी आहे. भांडवलशाहीचे दारूण अपयश आणि जगभरातील समाज नावाची गोष्ट किती रसातळाला गेली आहे याचे ते निदर्शक आहे. बेजबाबदार, भरकटलेला, उद्दिष्टहीन, सगळ्या गोष्टींसाठी सरकारच्या तोंडाकडे पाहणारा, स्वत:वर कोणतीही जबाबदारी न घेणारा, खा- प्या- मजा करा- यातच मश्गुल, मला काय त्याचे ही मानसिकता, कोणतीही गोष्ट करण्यासाठी पुढे होण्यापेक्षा त्यावर वांझ टवाळकी करणारा, विचारहीन अशा माणसांचे विशाल समूह हीच आज जगभरातील समाजाची स्थिती आहे. या समाजातून मानवी कल्याणाचा तिसरा पर्याय विकसित होऊ शकत नाही.

मार्क्सवादाचे खरे स्वरूप समजावून सांगण्याच्या संदर्भात ज्या महानुभवांचा वर उल्लेख केला आहे, त्यांनीच भांडवलशाहीच्या परिणामांची चिकित्साही केली आहे आणि भाकीतही. त्यासोबतच तिसऱ्या पर्यायाचे मार्गदर्शनही केले आहे. त्यांच्याशिवाय योगी अरविंद, भारताचे राष्ट्रपती राहिलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, दत्तोपंत ठेंगडी यांचीही नावे त्यात जोडता येतील. दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक, सामाजिक, प्रशासकीय, कायदेविषयक आदी अनेक बाबींची चर्चा करणारे एक पुस्तक आहे- त्याचे नावच आहे Third Way - तिसरा मार्ग. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद याच तिसऱ्या मार्गाचे विवरण करणारा आहे. गांधीजींचा सर्वोदय याच तिसऱ्या पर्यायाचे वेगळे नाव आहे.

कोणता आहे हा तिसरा पर्याय? तो संपूर्ण स्वतंत्र विषय आहे. या ठिकाणी एक मात्र नमूद करणे आवश्यक आहे की, भारतीय जनता पार्टी; तिसरा पर्याय सांगणाऱ्या महानुभवांचा वारसा सांगत असली तरीही तिच्या आर्थिक चिंतनात- ध्येय धोरणात- त्याला स्थान राहिलेले नाही. याची तीन कारणे आहेत- १) मुळात त्या तिसऱ्या मार्गाबद्दल अविश्वास, अनादर आणि अनास्था. २) आजची देशांतर्गत आणि जागतिक परिस्थिती. ३) समाजाची मानसिकता. या तीन कारणांमुळे ज्यांना तिसरा पर्याय योग्य वाटतो तेदेखील काहीही करू शकत नाहीत. ही तिन्ही कारणे दूर केल्याशिवाय सध्याच्या स्थितीतून मार्ग निघणार नाही. ही तीन कारणे ३, २, १ या क्रमाने दूर करावी लागतील. म्हणजेच सगळ्यात पहिले समाजाची मानसिकता ठीकठाक करावी लागेल. ती मानसिकता पुढील इष्ट बदलांना चालना देईल. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचे राज्य आल्याचा विविध कारणांनी आनंद झालेल्या लोकांनी या तिसऱ्या मार्गाचा अभ्यास, चिंतन केले पाहिजे. तो मार्ग संपूर्ण समाजापुढे ठेवला पाहिजे. त्यासाठी योग्य वातावरण, साधकबाधक विचार समाजात सुरु व्हायला हवा. केवळ `आपला तो बाब्या' या स्वाभाविक वृत्तीने भाजपच्या हाताला हात लावून मम म्हणून चालणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १३ जुलै २०१४

शुक्रवार, ११ जुलै, २०१४

डॉ. ईश्वरचंद्र

प्राचार्य अरविंद खांडेकर यांचं डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावरचं टिपण वाचलं आणि मन ४१ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात पोहोचलं. खरं तर मनात संभ्रम आहे, मन:स्थिती द्विधा आहे; डॉ. ईश्वरचंद्र यांच्यावर लिहावं की नाही याबद्दल. न लिहिलं तर कृतघ्नता होईल आणि लिहिलं तर स्वत:बद्दल बोलावं लागेल. हे बोलणंही सामान्य हवापाण्याचं नाही तर काहीसं वेगळं. पण स्वत:विषयी बोलण्याचा प्रमाद पत्करूनही डॉ. ईश्वरचंद्र यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे आणि आवश्यकही. माझ्या आयुष्यातील त्यांचं स्थानच तसं आहे.

१९७३ चा उन्हाळा. चवथीची परीक्षा दिली होती. निकाल लागायचेच होते. उन्हाळ्याचं हुंदडणं सुरु होतं. त्या दिवशीचा खेळ होता- धनुष्यबाण. बांबूच्या कमच्यांचे धनुष्यबाण तयार करायचे आणि वेगवेगळे शत्रू तयार करून त्यावर निशाणा साधायचा. निशाणा अर्थातच झाडे, सायकली, भिंतीवरचा एखादा बिंदू वगैरे. थोडा वेळ गेला आणि कदाचित ती वेळच तशी असावी- सोबतच्या मित्राचा बाण माझ्या डाव्या डोळ्याला लागला. एकदम डोळा बंद झाला. रक्त वगैरे काही नाही. पण डोळा उघडताच येत नव्हता. एकदम पळापळ झाली. त्यावेळी वाहने, फोन काहीही नव्हते. वस्तीत घरेच मोजकी तर डॉक्टर कुठले? पुरुष सगळे नोकरीवर गेलेले. सगळीच पंचाईत. बरे दुखणे नाही, रक्त नाही, रडणे नाही; फक्त डोळा उघडत नव्हता एवढेच.

मी आणि मित्र शेजारी शेजारीच राहणारे, दोघांचे वडीलही लहानपणापासूनचे सख्खे मित्र. सुरुवातीला नागपूरच्या महाल भागात राहणारे, मग नोकरीही एकाच बँकेत, घरे बांधली तीही शेजारी शेजारीच. रा. स्व. संघाच्या घोषदलातही दोघे होतेच. संध्याकाळी मित्राचे वडील घरी आले. त्यांना सगळा प्रकार कळला. ते म्हणाले, आपण पहिले डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टरांकडे जायचे म्हणजे प्रथम फॅमिली डॉक्टर असलेले डॉ. ब. ग. पांडे यांच्या महालच्या दवाखान्यात जायचे. मित्राच्या वडिलांनी एक सायकल रिक्षा आणली. त्यावेळी ऑटोरिक्षा असतील तरीही तुरळक, नवसासायासाचे. मी आणि आई रिक्षात, मित्राचे वडील त्यांच्या सायकलवर. जाताना त्यांची सायकल मध्येच पंक्चर झाली. ते म्हणाले, तुम्ही व्हा पुढे. मी सायकल दुरुस्त करून येतो. आम्ही दवाखान्यात पोहोचलो. डॉ. पांडेंनी तपासले, इंजेक्शन, औषधे दिली. तेवढ्यात मित्राचे वडील व माझे वडील दोघेही दवाखान्यात पोहोचले. माझे वडील बँकेतून घोषाच्या रात्र शाखेत गेले होते. संघ मुख्यालयाच्या शेजारी मोहिते संघस्थानावर ही शाखा लागते. मित्राचे वडील दवाखान्यात येण्यापूर्वी तिथे गेले. त्यांनी तिथे निरोप दिला आणि ते दोघेही पोहोचले होते. डॉ. पांडे म्हणाले, मी तात्पुरते उपचार केले आहेत पण उद्या सकाळी पहिल्यांदा मेडिकलला घेऊन जा.

दुसऱ्या दिवशी सकाळी आई वडिलांसोबत मेडिकलला. तिथे होते- डॉ. ईश्वरचंद्र. ते वय काहीही लक्षात राहण्याचं नव्हतं. अनेक तपशील, माहिती घरी झालेल्या चर्चेतून, गप्पातून अपडेट झालेली आहे; पण डॉ. ईश्वरचंद्र यांचं ते दर्शन मात्र खरे सांगतो माझ्या पूर्ण लक्षात आहे. एखादा फोटो काढावा तसं. उंचपुरे, गोरेपान, थोडे टक्कल, दाट मिशा, ताठ कणा परंतु कमरेतून अतिशय किंचित पुढे झुकून चालणे, ज्ञान- कौशल्य- आत्मविश्वास- संपन्नता- संपूर्ण व्यक्तीमत्वातून जणू निथळत असलेले. डॉक्टर सिंधी किंवा पंजाबी असावेत. पंजाबी असतील तर केशधारी नव्हते, सहजधारी होते. भरदार देहावर डॉक्टरचा पांढरा अॅप्रन, गळ्यात स्टेथोस्कोप, डोळ्यावर चष्मा, बोलणे अतिशय सौम्य मृदू, हालचाली नेमक्या, काटेकोर आणि देखण्या- सफाईदार नृत्याच्या हालचालीसारख्या. गडबड गोंधळ नाही, आरडाओरड नाही. आजच्या मेडिकलशी तुलना केली तर कुठेही मेळ न खाणारे. त्यांनी लगेच तपासायला घेतले. ती वेगवेगळी यंत्रे, त्यांनी तपासणी, कधी उजेडात तपासणी, कधी अंधार करून तपासणी. शेवटी म्हणालेत- डाव्या डोळ्याच्या आतल्या नसांना मार लागला आहे. त्या डॅमेज झाल्या आहेत. आपण उपचार करू. रोज यावं लागेल. त्यांचं आश्वासक बोलणं, आश्वासक स्पर्श अजूनही लक्षात आहे. त्यानंतर दोन महिने रोज सकाळी मेडिकलला जाणे सुरू होते. रोज पूर्ण तपशीलवार तपासणी, डोळ्यात औषधे टाकणे आणि एक दिवस उजव्या हाताला- एक दिवस डाव्या हाताला अशी इंजेक्शने घेणे. यातला एकही दिवस असा गेला नसेल जेव्हा डॉक्टरांनी विचारले नाही- कैसे हो? आणि निघताना डोक्यावर हात ठेवून म्हटले नाही- सब ठीक हो जायेगा.

दोन महिन्यांनंतर एक दिवस इंजेक्शन, औषधे झाल्यावर ते वडिलांना बाजूला घेऊन म्हणाले- `आपण खूप प्रयत्न केले. पण मला वाटतं डावा डोळा आतून पूर्ण खराब होतो आहे. तो पूर्ण काढून टाकावा लागेल. नाही तर त्याचा उपसर्ग कदाचित उजव्या डोळ्याला सुद्धा होईल आणि देव करो तसं न होवो, पण उजवा डोळाही हातून जाऊ शकेल. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. ताबडतोब सांगा तुमचा निर्णय.' आई वडिलांनी लगेच निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी रुग्णालयात दाखल. जागतिक मान्यता मिळवलेला त्यावेळचा डोळ्यांचा निष्णात डॉक्टर शस्त्रक्रिया करणार होता. संध्याकाळी कोणीतरी म्हणाले, डॉक्टर ईश्वरचंद्र नाही कोणीतरी दुसरेच डॉक्टर शस्त्रक्रिया करतील. घरच्यांना घोर लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया होणार होती. सकाळी डॉक्टर आल्याबरोबर त्यांना विचारले, काल कोणीतरी असं असं म्हणत होतं. डॉक्टर लगेच म्हणाले- त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. हे शासकीय रुग्णालय आहे. लोक काहीही बोलत असतात. शस्त्रक्रिया मीच करणार आहे. सगळे निश्चिंत झाले. शस्त्रक्रिया झाली. डावा डोळा काढून टाकावा लागलाच पण उजवा डोळा पूर्ण सहीसलामत वाचला. डॉ. ईश्वरचंद्र यांची तत्परता, कौशल्य यालाच सारे श्रेय आहे. त्यांनी थोडा जरी उशीर केला असता तरी आज हे जग माझ्यासाठी अंधार झाला असता. गेली चार दशकांहून अधिक काळ मी हे जग पाहतो आहे, सारे व्यवहार करतो आहे याचे सर्वाधिक श्रेय डॉक्टर तुमचे आहे. आणि रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर पहिल्यांदा तपासायला गेलो तेव्हाचे त्या देवदूताचे शब्द होते-  `खुद को कभी कम मत समझना. एक आंख गयी तो उसकी ताकद दुसरे आंख को दे कर गयी है.'

डॉक्टर मी कधीच स्वत:ला कमी मानले नाही. तुमचे म्हणणे पूर्ण लक्षात आहे माझ्या. म्हणूनच दुसरे एक डॉक्टर मित्र माझ्या मागे लागले होते- `अपंग म्हणून नोंदणी करून टाक. बरेच फायदे असतात. प्रवासात वगैरे तर फायदा होतोच पण गॅस एजन्सी, पेट्रोल पंप वगैरेही मिळू शकेल.' त्यांना मी नकार दिला. ते डॉक्टर मित्र स्वत: अधू आहेत पायाने. अपंगांसाठी त्यांनी पुष्कळ कामही केलेले आहे. पण डॉक्टर मी स्वत:ला कणभरही कमी समजत नाही आणि माझ्या व्यवहारातही कधी कोणाला माझ्यातील त्रुटीची जाणीवही होत नाही. मग मी कशाला घेऊ सवलती बिवलती. जोपर्यंत कोणीही स्वत:ला अपंग समजत नाही तोवर कोणीही अपंग नसतो. आणि माझ्यातील त्रुटी फारच कमी आहे. सहज मात करता येईल अशी. माझ्यापेक्षा खूप गरज असलेले खूप लोक आहेत, त्यांना मिळावी मदत.

त्यानंतर कधीच संबंध आला नाही डॉ. ईश्वरचंद्र यांचा. आज प्राचार्य खांडेकरांचा लेख वाचला. त्यांना फोन केला. तेव्हा पुष्कळ बोलले प्राचार्य. डॉक्टर दहा दिवसांपूर्वी गेलेत. त्यांचे वय होते ९३ वर्षे. म्हणजे माझ्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया केली तेव्हा ते होते ५२ वर्षांचे. मी होतो ९ वर्षांचा. त्यांच्या त्यावेळच्या वयाचा होण्यासाठीही मला अजून दोन-अडीच वर्षे आहेत. डॉक्टरांनी मेडिकल सोडले. त्यानंतर बर्डीवर स्वत:चा दवाखाना उघडला. त्या दवाखान्यातील जागतिक कीर्तीच्या डोळ्याच्या डॉक्टरची तपासणी फी होती २० रुपये. कोणी तीही देऊ शकत नसेल तर तीही माफ. हजारो लोकांना दृष्टी देणाऱ्या या डॉक्टरने सहकारी वगैरे ठेवून व्याप वाढवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्यानंतर आपली व्रतस्थता जपली जाईल याची काय शाश्वती? त्यामुळे परमेश्वर करवून घेतो तोवर करणे. गीतेतील कर्मयोगाचे आचरण. प्राचार्यांच्या लेखावरून कळले, डॉक्टर नागपूर विद्यापीठातसुद्धा सक्रिय होते. अनेक कामात त्यांचा सहभाग होता. आजच्या डॉक्टर लोकांना डॉ. ईश्वरचंद्र माहीत नाहीत. एक काळ आपल्या ज्ञानाने, कौशल्याने, सेवेने गाजवलेला; जागतिक कीर्ती संपादणारा नेत्रतज्ञ आयुष्याच्या शेवटी बेदखल होतो. यालाच म्हणतात कालचक्र. म्हणूनच जगणे आणि जगण्याचे समाधान पैसा, कीर्ती, पद, प्रतिष्ठा यांना बांधून ठेवू नये. हाच आहे गीतेचा सनातन संदेश. तो जगणारे तृप्त आणि कृतार्थ असतात. डॉ. ईश्वरचंद्र असेच तृप्त आणि कृतार्थ होते.

Thank You डॉ. ईश्वरचंद्र तुम्ही माझी दृष्टी आणि नजर वाचवलीत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ११ जुलै २०१४

रविवार, ६ जुलै, २०१४

चांगले, वाईट आणि मनाची शुद्धता

एक फार जुनी आणि प्रचलित गोष्ट आहे. श्रीकृष्ण एकदा युधिष्ठीर आणि दुर्योधन यांना एक काम सांगतात. युधिष्ठिराला सांगतात की, दिवसभर फिरून गावात किती दुर्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दुर्योधनाला सांगतात की, गावात दिवसभर फिरून किती सज्जन लोक आहेत ते पाहा आणि मला सांगा. दोघेही आपापल्या कामाला लागतात. संध्याकाळी परत येतात. श्रीकृष्ण विचारतात, सांगा तुम्हाला काय आढळले? युधिष्ठीर म्हणतात- गावात एकही दुर्जन व्यक्ती आढळली नाही. दुर्योधन म्हणतात- गावात एकही सज्जन व्यक्ती आढळली नाही.

एक बोधकथा म्हणून ही कथा सांगितली जाते आणि `दृष्टी तशी सृष्टी’ हा त्याचा बोध सांगितला जातो. आपली दृष्टी स्वच्छ, निर्मळ राहावी असा त्याचा निष्कर्ष. ही कथा वा त्याचा निष्कर्ष चूक आहे असे नाही. परंतु तो अपुरा आहे एवढे निश्चित. कारण आमची दृष्टी स्वच्छ व निर्मळ राहावी हे जेवढे खरे तेवढेच हेही खरे की, हे जग चांगल्या व वाईटाचे, सज्जनता व दुर्जनतेचे मिश्रण आहे. प्रत्येकाचा अनुभव हेच सांगतो. आम्हाला मात्र अनुभवाच्या त्या त्या क्षणी जग पूर्ण सज्जन वा पूर्ण दुर्जन वाटत असते. ही सज्जनता वा दुर्जनता अनुभव आल्यानंतर ठरवावयाची बाब आहे. त्याआधी काही निष्कर्ष काढता येत नाही. काही व्यक्ती वा घटना वारंवार घडतात, संपर्कात येतात, प्रत्ययाला येतात; तेव्हा पूर्वानुभवावरून काही ठोकताळे करता येतात. ते ठोकताळे करणे आणि त्यानुसार वागणे, काळजी घेणे आवश्यक असते.

कुठली तरी एकच बाजू घेणे चुकीचे असते. जगात फक्त दुर्जनच आहेत असे समजून सतत काळजी करत राहणे, शंकेखोरपणे वागणे, संशय घेत राहणे, अति सावधानता, त्यामुळे वृत्तीत- वागण्यात कटुता- रुक्षता- कडवटपणा- फटकळपणा- अंती आपलेच नुकसान करतात. दुसरीकडे जगात फक्त सज्जनच आहेत असे समजून वागल्यास त्याची मोठी किंमत पदोपदी मोजावी लागते. लुबाडणूक, फसवेगिरी, गृहीत धरले जाणे, डावलले जाणे, अपमान हे सारे वाट्याला येते. शिवाय आपल्याला कोणीही ठकवतात याचे जे दु:ख होते ते वेगळेच. म्हणूनच सज्जनता आणि दुर्जनता दोन्ही कळले पाहिजे, दोन्हीची जाण असली पाहिजे आणि त्या-त्या पद्धतीने वागता आले पाहिजे. सदा शंकेखोर किंवा सदा बिनधास्त दोन्ही चुकीचे. यालाच म्हणतात- चित्तशुद्धी.

अनेकदा चित्तशुद्धीचा अर्थ सज्जनता असा घेतला जातो. तो योग्य नाही. शुद्ध पाणी याचा अर्थ जे पाणी गढूळ नाही हा जसा आहे तसाच सरबत हे सुद्धा शुद्ध पाणी नाही. शुद्ध पाणी ते जे गढूळ करता येते किंवा ज्याचे सरबत बनवता येते. `पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाया वैसा’ हे शुद्ध पाण्याचे लक्षण आहे. सज्जनता आणि दुर्जनता समजणारं आणि त्याच्याशी त्या-त्या पद्धतीने वागू शकणारं मन म्हणजे शुद्ध मन. मनाची ही शुद्धता प्राप्त करणं म्हणजे माणूस होणं. हात, पाय, कान, नाक, डोळे आहेत; भाषा बोलू शकतो; म्हणजे माणूस नाही. केवळ दुर्जनतेनी मन भरून टाकणं किंवा केवळ सज्जनतेनी मन भरून टाकणं; या दोन्ही विकृती. मनाच्या शुद्धतेनी साम्यावस्था प्राप्त करणे म्हणजे प्रकृती.

परंतु मनाची ही शुद्धता मिळवायची कशी? काही मने असतात जी म्हणतात- मला काहीही कळत नाही बुवा. काही मने म्हणतात- मला सारे काही कळते. काही लोकांना वाटते आपण फारच निरर्थक, दुबळे आणि अपूर्ण आहोत. काही लोकांना वाटते आपण सार्थक, सबळ आणि परिपूर्ण आहोत. आपल्याला कोणापासून काही शिकण्याची, समजून घेण्याची गरज नाही असे त्यांना वाटते. आपल्याला कोणी काही म्हणतो वा सांगतो याचाही त्यांना राग येतो, त्रास होतो. याउलट काही लोक सतत पडती भूमिका घेऊन वागतात. असे लोक जबाबदाऱ्या टाळतात, चालढकल करतात, सांगकामेपणा करतात. अशा लोकांचा कोणाला काही आधारही नसतो, उलट अनेकदा त्यांचा बोजाच होतो. फाजील आत्मविश्वास असणारे, अति अहंकारी; तसेच आत्मविश्वासहीन, व्यक्तित्वहीन असे बहुतांश पाहायला मिळतात. या दोघांचेही मन शुद्ध नसते.

मी स्वयमेव संपूर्ण नाही पण मी निरर्थक शून्यही नाही. मी अनेकांपेक्षा कमी आहे पण अनेकांपेक्षा अधिकही आहे. सगळ्याच गोष्टी मला कळत नाहीत पण अनेक गोष्टी मला कळतात. मला पुष्कळापासून पुष्कळ शिकण्यासारखे आहे आणि पुष्कळांना पुष्कळ शिकवण्यासारखेही माझ्याकडे आहे. आपल्या बलस्थानांची आणि आपल्या दुर्बलस्थानांची नीट, नेमकी जाण ही खरी गरज असते. ही जाण उत्पन्न होणे सततच्या प्रयत्नांनी शक्य होते. हे प्रयत्न स्वत:चे स्वत:च करायचे असतात. हा मानसिक, बौद्धिक व्यायाम आहे. अति आणि फाजील चर्चा, प्रश्नोत्तरे वगैरेपेक्षा आत्मपरीक्षण, आत्मविश्लेषण आणि प्रामाणिक प्रयत्न यासाठी आवश्यक. एखादी व्यक्ती असा मानसिक, बौद्धिक व्यायाम करते की नाही हे सांगावे लागत नाही. ते आपोआप कळते.

आपल्याला कोणापासून शिकण्यासारखे, ग्रहण करण्यासारखे आहे; त्यांच्यापासून शिकणे, ग्रहण करणे; कोणाचे बोलणे ऐकले पाहिजे ते ऐकणे, समजून घेणे; कोणाकडे दुर्लक्ष करायचे, कोणाचे बोलणे कानाआड करायचे, कोणाला टाळायचे वगैरे गोष्टी या मानसिक, बौद्धिक व्यायामाचा भाग होत. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. ही आहे प्रकृती. ही प्रकृती अशी का? चांगले आणि वाईट म्हणजे काय? हे दोन्ही कुठून येते? त्यांचे अंतिम गंतव्य कोणते? माझा त्यांचा संबंध काय? या आणि अशा प्रश्नांची सुरुवात म्हणजे संस्कृतीची सुरुवात. या प्रश्नांचा मागोवा घेतघेत अंतिम टोक गाठणे म्हणजे संस्कृतीची चरमसीमा. म्हणजेच सुसंस्कृततेचा आदर्श. युधिष्ठीर आणि दुर्योधन दोघेही निरनिराळ्या अंगाने विकृतीची उदाहरणे आहेत, तर श्रीकृष्ण हा सुसंस्कृततेचा सर्वोच्च आदर्श.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ६ जुलै २०१४

गुरुवार, ३ जुलै, २०१४

मराठी साहित्य संमेलन आणि विज्ञानाची दांभिकता

एखादी घटना किंवा परिस्थिती एखादं तत्व चांगल्या प्रकारे समजावून सांगते. नुसता विचार अनेकदा गळी उतरत नाही, अनेकदा दुर्लक्षित राहतो. येणारे मराठी साहित्य संमेलन पंजाबात नामदेव महाराजांच्या गावी होणार अशी बातमी वाचली आणि अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचाराला बळकटी मिळाली. कोणता विचार घोळतोय मनात? विचार आहे आधुनिक विज्ञानाचा. आधुनिक विज्ञानाने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्याचे ऋण मानव जातीवर आहे. परंतु या सगळ्या गोष्टींवर बोळा फिरवणारी एक कोणती गोष्ट जर विज्ञानाने केली असेल, तर ती म्हणजे- विज्ञानाने माणसाला प्रचंड दांभिक बनवले आहे. माणसाचा दंभ अपार वाढवला आहे. विज्ञान त्याच्या डोक्यात गेलं आहे. नुकतेच एक साहित्यिक मला म्हणाले, तू जे काही लिहितो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो ते विज्ञानामुळेच ना? मी त्याच्याशी सहमत नव्हतो. आज माझं म्हणणं उचलून धरलं गेलं. नामदेवांच्या काळी कुठे होतं आधुनिक विज्ञान? वैज्ञानिक- तांत्रिक सोयी, उपकरणे? तरीही उत्तर, दक्षिण सर्वत्र त्यांनी संचार केला. त्यांना ना प्रवासाची अडचण आली ना भाषेची. ना खाण्यापिण्याची ना कपड्यालत्त्याची. लिखाण केलं, कीर्तनं केली, प्रवचनं केली. अन ही सगळी निर्मिती एवढी सकस की अनेक शतके लोटूनही ताजी टवटवीत. काळाचा जंग त्यावर चढू शकला नाही.

अनेक गोष्टी सांगता येतील. आर्यभट्टाने संशोधन केले तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? खाण्यापिण्याच्या वस्तू, आसऱ्यासाठी घरे, सुशोभनासाठी रंग ज्यांनी प्रत्यक्षात आणले, त्यांच्या सार्थक रचना आणि परंपरा निर्माण केल्या तेव्हा कुठे होते विज्ञान- तंत्रज्ञान? छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जो अचाट पराक्रम घडवला तेव्हा विज्ञान- तंत्रज्ञान एवढे प्रगत नव्हतेच ना? त्यांनी सगळ्या गडांवर केलेली बारमाही पाण्याची व्यवस्था आधुनिक छत्रपती आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञान वापरून एका जिल्ह्यापुरतीही करू शकले नाहीत. भगवान बुद्धाने आपल्या धम्माचा जगभर प्रचार विज्ञान - तंत्रज्ञानाच्या शिवायच केला. हजारो वर्षांचे वेद उपनिषदांचे ज्ञानभांडार आधुनिक विज्ञान तंत्रज्ञाना शिवायच जतन करण्यात आले. पुरातन ज्ञानभांडारातील खूप सारे ज्ञान नामशेष झाले असेल तर तेही आक्रमणे वा अनास्था यामुळे.

जगभरातील मानवी सभ्यतेचा इतिहास याचा साक्षी आहे. माणूस प्रगती करतच होता. जगण्याच्या सर्व अंगांचा विचार करत होता. जुन्या गोष्टींमध्ये सुधारणा करत होता. जगणे समृद्ध करत होता. विज्ञान तंत्रज्ञान हेसुद्धा याच मार्गावरील एक स्थानक आहे. पण कुणास ठाऊक का आणि कसे, पण अशी काही जादू झाली की माणूस त्याला अंतिम स्थानक समजू लागला. एवढेच नव्हे तर त्यालाच जगण्याचा पर्याय मानू लागला. त्यातूनच प्रचंड दंभ वाढला. दिवसागणिक प्रत्ययाला येतं की, विज्ञान सगळ्या समस्या सोडवू शकत नाही, तंत्रज्ञान आम्हाला सुख देऊ शकत नाही, विज्ञान तंत्रज्ञान माणसाचं मन सन्मार्गी बनवू शकत नाही; तरीही आमचा दंभ मात्र कमी होत नाही. या दांभिकतेने परस्पर द्वेष, ईर्ष्या, स्पर्धा यांच्यात वाढच केली. आमची विचारशक्ती, आकलनशक्ती, धारणाशक्ती आटवून टाकली. तरीही आम्ही दंभ टाकून द्यायला मात्र तयार नाही.

विज्ञान- तंत्रज्ञानाच्या अनेक गोष्टी तर आपण स्वत:च नाकारतो. अणुबॉम्बची तर माणसाने धास्तीच घेतली आहे, पण अत्यंत आधुनिक असा laptop वापरणे सुद्धा अयोग्य असल्याने वापरू नये असा प्रवाह सुरु झाला आहे. अनेक antibiotics आज निकामी झाली आहेत. एवढेच काय विज्ञानाने स्वत:ची गृहितके तपासून पाहणे सुरु केले असून, आजचे विज्ञान स्वत:ला science of uncertainty म्हणवून घेत आहे. तरीही माणूस मात्र विज्ञानाचा दंभ सोडायला तयार नाही. मानवी मेंदूतून निघालेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक शोध, प्रत्येक विचार योग्य- स्वीकार्य- कल्याणकारी- आहे का, याचा विचार करून नीरक्षीरविवेक करण्यापासून ही दांभिकता माणसाला रोखून धरत आहे. विज्ञान तंत्रज्ञान यांचे स्वत:चे मूल्य शून्य आहे. त्याचे मूल्य त्याच्या उपयोगावर अवलंबून आहे. विज्ञान तंत्रज्ञान हे साधन आहे साध्य नव्हे. ती मानवी जगण्याला मदत करू शकणारी एक अतिरिक्त बाब आहे. त्याचं नियमन माणसाने करायचं आहे. हे नियमन करण्यासाठी प्रथम त्याला देण्यात आलेलं सर्वोच्च स्थान मनातून पुसून टाकावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानवाला त्याच्याहून अधिक उंच- व्यापक- सखोल- व्हावं लागेल. त्यासाठी त्याने बाळगलेला विज्ञानाचा दंभ आणि त्यातून अंगी बाणलेला दांभिकपणा टाकून द्यावा लागेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ जुलै २०१४

सोमवार, २३ जून, २०१४

बायकोशी बोलल्याचे पैसे

तपशील खुपसा लक्षात नाही. पण एक किस्सा पक्का लक्षात आहे. एका मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट नावाच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमात एका वऱ्हाडी कवीने सांगितला होता. एक माणूस नवीन नवीन लग्न झालेला मधुचंद्राला जातो. चार दिवस हॉटेलमध्ये मुक्काम करून मौजमजा करतो. घरी परतण्याचा दिवस येतो. हॉटेल सोडण्याची तयारी सुरु असते. हॉटेलचा व्यवस्थापक बिल देतो. माणूस चक्रावून जातो. एवढे बिल? तो व्यवस्थापकाला म्हणतो, हा हिशेब समजावून सांगा. व्यवस्थापक समजावून सांगतो. अमक्याचे इतके, तमक्याचे इतके वगैरे. तो माणूस म्हणतो, अरे पण अमुक चार गोष्टी तर आम्ही घेतल्याच नाहीत. (उदा. सकाळचे जेवण) त्यावर व्यवस्थापक म्हणतो, तुम्ही या सोयी घेतल्या नाहीत, सकाळचे जेवण घेतले नाहीत, पण आम्ही तर ते देऊ केले होते ना !! माणूस काहीच बोलू शकत नाही. व्यवस्थापक खोलीतून निघून जातो. दोघे नवरा बायको सामान घेऊन काउंटरवर येतात. माणूस व्यवस्थापकाजवळ जातो आणि त्याला म्हणतो, द्या हजार रुपये. व्यवस्थापक गोंधळात पडतो. विचारतो, कसचे? माणूस त्याला म्हणतो, अहो चार दिवस रोज संध्याकाळी दोन तास तुम्ही माझ्या बायकोशी गप्पा मारत बसलात ना, त्याचे. तुमच्या बिलाचे पैसे त्यातून वजा करून एक हजार उरतात ते परत द्या. व्यवस्थापक उसळतो. म्हणतो, मी कधी बोललो तुझ्या बायकोशी? माणूस उत्तरतो- अहो साहेब, तुम्ही नसाल बोलला पण ती तर तयार होऊन बसली होती ना तुमच्याशी बोलायला.

असाच दुसरा एक किस्सा घर घेण्याच्या संदर्भात झी मराठीवर सध्या सुरु असलेल्या फू बाई फू मध्ये सादर करण्यात आला होता. हे किस्से आठवावेत असंच सध्या वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-पुणे बसच्या भाड्याचा विषय होता गप्पांचा. तेव्हा कळले की, तिकीट का वाढवले तर पिण्याच्या पाण्याचे वगैरे पैसे त्यातच लावलेले असतात आणि पाणी नको असेल तर? या माझ्या बावळट प्रश्नावर उत्तर होते, नाही ते द्यावेच लागतील. भ्रमणध्वनीचं उपकरण विकत घ्यायचं आहे, तर या १० सोयी असलेलंच घ्यावं लागेल. तुम्हाला त्या सोयी हव्या असोत की नसोत, तुम्हाला त्या घेण्याशिवाय पर्याय नाही.

सुधारणा, सोयीसुविधा, विकास वगैरेची आज ही अवस्था आहे. सध्या गाजत असलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या संदर्भात हा विषय पुन्हा डोक्यात आला. चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी भाववाढ करण्यात आली, असा जोरकस युक्तिवाद करण्यात येत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हा की, म्हणजे नेमके काय? त्यासाठी एक शब्द वापरला जातो, जागतिक दर्जाची स्थानके. जागतिक दर्जाची स्थानके कोणाला हवी आहेत? अमेठीत स्मृती इराणी यांच्या प्रचार सभेत बोलताना मोदी त्यांच्या खास शैलीत लोकांना म्हणाले होते, `तुम्हाला काय मर्सिडीज मोटारी हव्यात? तुम्ही काय अमुक मागता/ तुम्ही काय तमुक मागता?' आणि त्यावर स्वत:च उत्तर देताना ते म्हणाले होते- `नाही. तुम्ही मागता फक्त पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, आरोग्य.' रेल्वेच्या बाबतीतही तेच खरे आहे. कोट्यवधी लोकांची मागणी एवढीच आहे की- गाड्या वेळेवर धावाव्या, पाणी उपलब्ध असावे, स्वच्छता असावी, आरक्षण फार त्रासदायक नसावे, बसायला, थांबायला पुरेशी सोय असावी. उगाच सगळी स्थानके एसी वगैरे करायची, टाइल्स तोडून मार्बल बसवायचे याची गरज नाही. सगळ्या गाड्या एसी, प्रत्येक डब्यात टीव्ही, इंटरनेट, अमुक- ढमुक वगैरेची काहीही आवश्यकता नाही. मुळात सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक सोयी सुविधा, सार्वजनिक व्यवस्था सामान्य परंतु दर्जेदार असाव्यात. अनेकांना त्या परवडू शकतील, पण अनेकांना त्या परवडणार नाहीत. अनेकांना त्या परवडत असूनही नको असतील. त्यामुळे सोयी सुविधांचे हे गाजर दाखवणे बंद झाले पाहिजे. जे लोक प्रवासभर टीव्ही पाहिल्याशिवाय वा इंटरनेटशिवाय जगू शकत नाहीत त्यांनी स्वत:ची सोय करून घ्यावी. जबरदस्तीने लादणे पूर्णत: अयोग्य आणि अन्याय्य आहे. ग्राहक संघटनांनीही याविषयी सक्रिय व्हायला हवे.

स्वच्छता वगैरे मुद्दे तर असे आहेत की अर्धेअधिक प्रश्न लोकांशी, त्यांच्या सवयींशी, जबाबदारीच्या भावनेशी संबंधित आहेत. सुरक्षेचा मुद्दाही असाच. आजच प्रवीण दीक्षित यांचे एक वक्तव्य वाचण्यात आले. सध्या ते महाराष्ट्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आहेत. पूर्वी ते नागपूरचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळी त्यांच्याशी चर्चेचा योग आला होता. आजचे त्यांचे वक्तव्य आणि त्यावेळी चर्चेत त्यांनी व्यक्त केलेले मत सारखे आहे. त्यांचे मत असे की, सुरक्षेसाठी लोकसहभाग आणि लोकभावना महत्वाची. ती नसेल तर बाकी कितीही उपाययोजना करा, सीसी टीव्ही, कमेरे लावा फारसे काहीही होणार नाही. लोक जर प्रवास करताना एकमेकांशी बोलायलाही महाग असतील, कोणाची बॅग चोरीला गेली तर मला काय त्याचे अशी वृत्ती असेल किंवा उघडपणे डब्यात बलात्कार होताना पाहूनही त्याकडे डोळेझाक करत असतील तर त्यांची सुरक्षा प्रत्यक्ष ब्रम्हदेव सुद्धा करू शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टी खूप गुंतागुंतीच्या आणि वेगळ्या पद्धतीने हाताळण्याच्या आहेत. केवळ निधी हवा, निधी हवा असे म्हणून भागणार नाही.

रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची करण्याचा प्रयत्न योग्य की अयोग्य हा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवला तरीही प्रश्न उरतोच की, अशा तऱ्हेने तो दर्जा प्राप्त करता येईल का? ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे की, ६० वर्षांच्या शासनकाळात या देशातील सरकारे अक्षम्य बेपर्वाईने वागली. पण म्हणून बिघडलेले सारे काही सहा महिन्यात सुरळीत होईल का? शिवाय असंख्य अशा गोष्टी आहेत ज्यासाठी पैशाची नव्हे तर मानसिकता, इच्छाशक्ती, विचारशीलता, सवयी, अभ्यास, निर्धार, मूल्यांशी बांधिलकी, आदर्श उदाहरणे यांची गरज आहे. रेल्वे स्थानके चांगली करण्यासाठी पैशाची गरज आहे हे नक्की. पण आजवर त्यासाठी जो पैसा देण्यात आला त्याचे काय झाले? तो कोणीतरी खाल्ला, उधळला, वाया घालवला म्हणून आज भुर्दंड भरा - हा तर्क होऊ शकत नाही. सामान्य लोकांनी जे प्रचंड बहुमताने भाजपला निवडून दिले, त्यातील एक महत्वाचे कारण आहे, या सरकारने आजवर झालेला अपहार वसूल करावा आणि ज्यांनी तो केला त्यांना अद्दल घडवावी. याऐवजी ज्याचा या अपहाराशी फारसा संबंध नाही त्यालाच वेठीस धरणे चुकीचे आहे. भारताबाहेरील काळा पैसा, वैधपणे परंतु अनैतिकपणे कमावलेली लाखो कोटींची संपत्ती या बाबी थोडावेळ दूर ठेवू. तरीही आज देशभरातील सगळ्या बँकांमधील सगळे लॉकर्स सील करून त्यातील अवैध संपत्ती सरकारजमा केली तरीही हजारो कोटी रुपये उभे राहतील. रेल्वे दरवाढ हा जर कटू निर्णय असेल तर हे अन्य पर्याय देखील कटूच आहेत. आज गरज आणि अपेक्षा अशा वेगळ्या कटू निर्णयांची आहे. भाकरीची चोरी हीदेखील चोरीच असते आणि सोन्याची चोरी हीदेखील चोरीच असते. परंतु भाकरीची चोरी माफच करायला हवी. कारण ती अस्तित्वाच्या अपरिहार्यतेतून करण्यात आलेली असते. सोन्याची चोरी ही चोरीच्या वृत्तीतून करण्यात आलेली असते. तसे जर नाही केले तर एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, घोडा, वाघ, हत्ती यांना घाबरून शेळीचा बळी दिल्याप्रमाणे होईल. असा बळी देणे कदाचित नैसर्गिक असेल, पण सभ्यतेला धरून नक्कीच नाही.

लोक आज दारू, सिगारेट, चपला- जोडे, मोबाईल, सिनेमा यावर किती खर्च करतात; मग दरवाढीला विरोध का असाही युक्तिवाद केला जातो. त्यावर तर्क असा की, मग या गोष्टींचे दर आणि त्यावरील कर वाढवा ना. त्याला कोणाचा आक्षेप आहे? करा म्हणावे ज्यांना आणि जेवढा खर्च करायचा असेल तो. सरकारी तिजोरीत भर पडेल. केंद्र सरकारचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तर तसा प्रस्तावही दिला आहे. दारूची किंमत दुपटीने वाढवा अशी त्यांची सूचना आहे. धान्य साठवण्याची गोदामे वगैरे बनवण्यासाठी भाजपचेच अश्विनीकुमार यांनी अनेक सूचना केल्या होत्या. मनमोहन सिंग सरकार असताना राज्यसभेत महागाईवर झालेल्या चर्चेत, काहीही अतिरिक्त पैसा खर्च न करता, लोकसहभागातून सध्या आहे त्याच स्थितीत धान्य साठवण्याची व्यवस्था कशी करता येईल याचे सुंदर विवेचन त्यांनी केले होते. अशा लोकांचे काँग्रेसने न ऐकणे समजता येईल, पण भाजपनेही आपल्या लोकांचे ऐकू नये, समजून घेऊ नये?

सरकार नवीन आहे, हेतू चांगले आणि स्वच्छ आहेत. वेळ दिला पाहिजे हेही खरे. मात्र देशाचे, समाजाचे भले करायचे आहे याच्या अति उत्साहात विवेक सुटू नये एवढेच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २३ जून २०१४

शनिवार, २१ जून, २०१४

आत्मविलोपी

महापुरुषांची अखेरसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असलेली अनेकदा पाहायला मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार हेदेखील त्याला अपवाद नाहीत. २१ जून १९४० रोजी त्यांनी इहलोकीचा निरोप घेतला. त्या दिवशी तिथी होती, ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. वय होते अवघे ५१ वर्षे. धिप्पाड आखाड्यात कसलेला देह त्यांनी अक्षरश: चंदनासारखा झिजवला.

त्यांच्या प्रकृतीची ओळख होण्यासाठी एक उदाहरण पुरेसे आहे. ते वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कोलकाता येथे असतानाचा प्रसंग. सुरुवातीचे दिवस होते. खानावळवाला नियमितपणे डबे पाठवीत असे. काही दिवसांनी डॉक्टरांनी त्याला सांगितले की, तो पाठवतो तेवढा डबा त्यांना पुरत नाही. डबा जास्त पाठवावा. खानावळवाल्याला शंका आली की, अशी तक्रारवजा मागणी तर अन्य कुणाचीही नाही. न जाणो, दोघांचा डबा एकासाठी मागवून दोघे जेवतील. पैसे वाचवण्यासाठी विद्यार्थी असे करू शकतात. तेव्हा खानावळवाल्याने अट घातली की, तू येथे तेवढे जेवून दाखव तरच तुला जास्त डबा पाठवीत जाईन. डॉक्टरांनी अट मान्य केली व पूर्ण केली. तेव्हापासून त्यांना जास्त डबा मिळू लागला. असा हा देह अखेरच्या दिवसात जर्जर झाला होता. १९२५ च्या विजयादशमीला संघाची स्थापना केल्यानंतर त्या कार्यासाठी केलेली प्रचंड मेहनत, अखंड धावपळ, देहाचे संवर्धन- संरक्षण- पोषण- याविषयीची कमाल अनास्था; यामुळे त्यांचा वज्रासारखा देह आतून पोखरत गेला. शिवाय डोक्याला असलेल्या विवंचना वेगळ्याच.

त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसात ते नागपूरचे तेव्हाचे संघचालक श्रीमंत बाबासाहेब घटाटे यांच्या सिव्हिल लाईन्सच्या बंगल्यातच वास्तव्याला होते. तेथेच त्यांच्यावर पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला लंबर पंक्चर म्हणतात. या शस्त्रक्रियेत पाठीतून थेंब थेंब असे पाणी निघते. डॉ. हेडगेवार यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली तेव्हा मात्र पाठीतून पाण्याची धार निघाली होती. `रक्ताचे पाणी करणे' या वाक्प्रचाराचा जणू प्रत्ययच त्यावेळी आला होता. असे असतानाही मनात मात्र फक्त संघाचाच विचार होता. आपल्या स्वीकृत कार्याशी एवढी तद्रूपता क्वचितच पाहायला मिळते. या आजारातच नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना भेटायला आले होते. पण त्यावेळी डॉक्टर झोपले असल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. झोपेतही ते देशाचे स्वातंत्र्य आणि संघाचे काम याबद्दलच बोलत असत. दुसऱ्या कोणत्याही विषयाला त्यांच्या हृदयात स्थान नव्हते.

एवढे आजारी असूनही आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हालचालीला बंदी केली असूनही, नागपूरला सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात ते समारोपाला गेले होते. संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचे दोन भाग असतात, एक जाहीर समारोप आणि दुसरा फक्त सहभागी स्वयंसेवकांसाठी खाजगी समारोप. हट्ट केल्यामुळे डॉ. हेडगेवार यांना जाहीर समारोपाला नेण्यात आले होते. मात्र तेथे ते बसू शकले नाहीत आणि त्यांना परत नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी खाजगी समारोपाला मात्र ते गेलेत. तेथे त्यांनी आपले अखेरचे ऐतिहासिक भाषणही केले. त्यावर्षी प्रथमच देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक त्या वर्गासाठी आले होते. संघाचे काम देशव्यापी झाल्याचे सुखद दृश्य त्यांना पाहता आले होते. त्याचा उल्लेख करून आपण आपल्यापुढे भारताचे लघु रूप पाहतो आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.

या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काही दिवसांची गोष्ट. डॉक्टर बिछान्यावर पडून विश्रांती घेत होते. यादवराव जोशी त्यांच्याजवळ बसले होते. डॉक्टरांनी यादवराव जोशींना विचारले, `संघाचा कोणी अधिकारी मरण पावला तर त्याचा अंत्यसंस्कार कसा कराल?' यादवराव गडबडले. त्यांना प्रश्नाचा रोखही लक्षात आला. परंतु त्यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डॉ. हेडगेवार स्वत:च त्यांना म्हणाले, `अंत्यसंस्कार लष्करी इतमामात वगैरे करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आपला संघ हा एक परिवार आहे. त्यामुळे परिवारातील एखादी व्यक्ती निधन पावल्यावर जसा साधेपणाने अंत्यसंस्कार केला जातो, तसाच संघाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचाही अंत्यसंस्कार करावा.' काय विलक्षण व्यक्तिमत्व असेल त्यांचे !! संघटनेचा अतिशय दूरचा विचार करून त्यासाठी मोलाचे मार्गदर्शन तर त्यात आहेच. शिवाय स्वत:बद्दलची विलक्षण आत्मविलोपी वृत्तीही त्यात आहे. मी स्थापन केलेली संघटना, माझी संघटना, मी सर्वोच्च प्रमुख, मी रक्ताचे पाणी करून ती नावारूपाला आणली, संपूर्ण भारतभर त्याचा विस्तार केला, माझे कर्तृत्व... कशाकशाचाही स्पर्शही मनाला नाही. शिवाय भाबडेपणाने, भक्तिभावाने कोणी तशा भावना बाळगू नये, तशा भावनांचे पोषण होऊ नये यासाठी स्वत:हून तो विषय मार्गी लावून देणे. एखाद्या योग्याला साजेशी अशीच मनाची ही अवस्था म्हणायला हवी. त्यांचा  अंत्यसंस्कार त्यांना अभिप्रेत अशाच साधेपणाने रेशीमबाग येथे पार पडला. आज त्याच ठिकाणी त्यांच्या समाधीवर स्मृती मंदिर उभे आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २१ जून २०१४

गुरुवार, १९ जून, २०१४

पंचतारांकित शैली शक्य आहे का?

आज सगळीकडे विकास, सुख,समृद्धी, आधुनिकता, विज्ञान- तंत्रज्ञान, वेग, झगमगाट यांची चर्चा पाहायला मिळते. थोडक्यात म्हणजे पंचतारांकित जीवनपद्धतीची चर्चा. बाकी सगळ्या गोष्टी, सगळे विचार बाजूला ठेवले तरी एक प्रश्न उभा राहतो की, जगातील सगळ्या ७०० कोटी लोकांना असे पंचतारांकित जीवन उपलब्ध करून देणे शक्य आहे का? जगाचे सोडून देऊ. भारतातील १२५ कोटी लोकांना असे जीवन उपलब्ध करून देणे तरी शक्य आहे का? आज सुमारे ४० कोटी लोक दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेतून बाहेर पडले आहेत. तेवढ्याच लोकांना पाणी, वीज, आरोग्य आदी सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. हा आजचा सर्वसामान्य स्तर १२५ कोटी लोकांना उपलब्ध करून द्यायचा म्हटले तरी जमीन, पाणी, धान्य, जंगल, शेती, खनिजे इत्यादीवर किमान तिपटीने ताण वाढेल. या साऱ्या गोष्टी किमान तिप्पट लागतील. हे योग्य आहे अथवा नाही हा मुद्दा सध्या बाजूलाच ठेवू. किमान हे शक्य आहे का याचा विचार तरी करायला हवा की नाही? आणि हा स्तर पंचतारांकित स्तरापर्यंत पोहोचवायचा म्हटले तर काय होईल? किती अनवस्था प्रसंग येईल? १२५ कोटी लोकांचे जाऊ देऊ. आज जी ४० कोटी जनता थोडीफार निर्धास्त आहे, तिच्या डोळ्यातील- मनातील पंचतारांकित जीवनाचे स्वप्न पूर्ण करायचे म्हटले तरीही नैसर्गिक साधने पुरी पडतील का? तथाकथित जागतिकीकरणाची सुरुवात झाल्यानंतर सगळ्या जगात मोठे परिवर्तन येऊ लागले. पण त्याचा परिणाम काय झाला? विकसनशील देशातील लोक जास्त जेवायला लागल्याने अन्नधान्याची कमतरता जाणवू लागली आणि महागाई वाढली, अशी विश्लेषणे मी-मी म्हणणारे अभ्यासक आणि विद्वान करू लागले. या विश्लेषणात काहीच तथ्य नाही असे नाही. मागणी आणि पुरवठ्याचा तो साधा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मानवनिर्मित नसून निसर्गदत्त आहे. पण याचा अर्थ विकसनशील देशातील लोकांनी पोटभर जेवू नये असा नाही. किंबहुना जगातील प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर पशूंना आणि पक्ष्यांना आणि किटकांनाही पोटभर, पुरेसे, पौष्टिक अन्न मिळालेच पाहिजे.

प्रश्न आहे तो हा मेळ कसा घालायचा हा? सर्वप्रथम एक गोष्ट कितीही विसंगत, कर्कश वाटली तरीही कानीकपाळी ओरडून सांगायला हवी की पंचतारांकित जीवनपद्धती चुकीची आहे. त्या पद्धतीने जगणे चूक आहे आणि त्याची स्वप्ने पाहणेही चूक आहे. व्यवहार आणि नैतिकता या दोन्ही अंगांनी ते चूक आहे. साधे परंतु आरोग्यदायी (आरोग्य- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक,सांस्कृतिक, आध्यात्मिक) जीवन हाच हेतू आणि आदर्श असायला हवा. असे झाले नाही आणि सध्या सुरु आहे तीच जीवनपद्धती सुरु राहिली तर जे त्यात यशस्वी होतील ते माणूस राहणार नाहीत आणि जे त्यात मागे पडतील त्यांना वरच्या स्तरातील लोकांवर संघर्ष लादण्यावाचून पर्याय राहणार नाही. असे होऊ नये अशी प्रामाणिक इच्छा असेल तर जीवनाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागेल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य या मुलभूत गरजा आहेत. त्यांना सर्वोच्च प्राथमिकता द्यावी लागेल आणि या मुलभूत गोष्टी सगळ्यांना पुरेशा उपलब्ध होतील हे पाहावे लागेल. बाकी गोष्टींपैकी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी निश्चित करून अनावश्यक गोष्टींना निकाली काढावे लागेल. (अनावश्यक- उदा. – मोटारी, चंद्रावर मानवी वसाहत उभारणे वगैरे.) आमच्या सवयी, इच्छा आकांक्षा, प्रतिष्ठा सन्मान, संकल्पना (आधुनिकता, प्रगती, विकास, पुढारलेपण, मागासलेपण); इत्यादी बाबींची फेरमांडणी आणि पुनर्व्याख्या करावी लागेल. जगण्याच्या असंख्य मितींचा विकास करावा लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार सांभाळला त्यावेळी प्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला वंदन केले. संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात आणि निवडून आल्यानंतरच्या गंगाआरतीच्या वेळी बोलतानाही त्यांनी गांधीजींचे संदर्भ दिले. एकूण जीवनाच्या, विशेषत: अर्थकारणाच्या संदर्भात गांधीजींनी सांगितलेल्या काही मुलभूत गोष्टी लक्षात घेणे, विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. गांधीजींनी म्हटले होते-

साधे शेतकऱ्याचे जीवन हेच खरे जीवन.

प्रत्येकाला केवळ भाजीभाकरीच नव्हे तर त्यासोबत दुध तूपही मिळायला हवे.

या वसुंधरेकडे सगळ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे, पण कुणा एकाचीही हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही.

माणसाने पोटासाठी (चरितार्थासाठी) दिवसाचे सहा तास काम करावे, बाकी वेळ त्याने स्वत:चे जीवन जगण्यासाठी आणि घडवण्यासाठी द्यावा.

यंत्राने माणसाची जागा घेऊ नये, माणसावर प्रभुत्व गाजवू नये. यंत्र माणसाला सहायक असले पाहिजे.

गांधीजींच्या विचारातील या काही ठळक बाबी. या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करण्यातूनच भावी पर्यायी जीवनरचना आकारास येईल. एका आणखीन महत्वाच्या गोष्टीची नोंद करणे आवश्यक आहे. आपल्या सगळ्या अर्थविचारांचा आधार ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र आहे हे गांधीजींनी ठासून सांगितले होते. त्यांचा विश्वस्त विचारसुद्धा त्या मंत्रातूनच विकसित झालेला आहे. `हिंदस्वराज’मध्ये तर त्यांनी स्पष्टच म्हटले आहे की, पाश्चात्य सभ्यता कुचकामी आहे. पाश्चात्य सभ्यता मानवाला सुखी करू शकत नाही. सभ्यता याचा अर्थ जगण्याच्या सवयी, जगण्याच्या पद्धती, जगण्यामागचा विचार, जगण्याच्या कल्पना संकल्पना, जगण्याचे संदर्भ, जगण्याचा आशय, जगण्याचे हेतू, जगण्याचे मापदंड, जगण्याचे सारभूत आणि आधारभूत तत्वज्ञान; या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टी पाश्चात्य ठेवून गांधीजींचे नाव घ्यायचे आणि सगळ्यांना सुखी करण्याची धडपड करायची यातून फार काही साध्य होणार नाही. जगात उभे राहण्यासाठी एका मर्यादेपर्यंत जगाचा विचार करणे, जगाच्या स्पर्धेत उतरणे हे आवश्यक आणि योग्य आहे. मात्र त्याचवेळी जगापुढे पंचतारांकित जीवनाच्या जागी जीवनाचा नवीन, योग्य, संतुलित आदर्श ठेवण्याचे आणि त्याचे उदाहरण घालून देण्याचे काम हे भारताचे काम आहे. आजवरच्या सगळ्या महापुरुषांनी, चिंतकांनी हेच सांगितले आहे.

गांधीजींचे नाव घ्यायचे पण वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, हिंदू; हे शब्द आले की शेपूट घालायचे असे चित्र पुष्कळदा पाहायला मिळते. दुसरीकडे हिंदुत्वाची मशाल खांद्यावर घेतलेले अनेक जण गांधीजी हे नाव पाल अंगावर पडावी तसे झटकतात. आधुनिक आणि अत्याधुनिक जीवनशैलीचे पुरस्कर्ते तर गांधीजींना काही समजत होते यावरच विश्वास ठेवत नाहीत. आपल्याला यातून बाहेर पडावेच लागेल. एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनीही विश्वकल्याणी अर्थकारणासाठी त्रिसूत्री सांगितली होती. १) अधिकाधिक उत्पादन, २) संयमित उपभोग आणि ३) न्याय्य वितरण; ही ती तीन सूत्रे होत. गांधीजी आणि दीनदयाळजी यांचा आशय एकच आहे आणि त्याचा आधारही एकच आहे. पर्यायी, संतुलित जीवनशैलीचा स्वीकार आणि आग्रह हा संपूर्ण समाजाचा विषय आहे. सरकारला आणि व्यवस्थांना त्यासाठी बाध्य करणे ही समाजाची जबाबदारी आहे. आजच्या बेजबाबदार वातावरणात समाजाला, समाजातील प्रत्येकाला ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जून २०१४