बुधवार, २४ मार्च, २०१०
कायद्याचे राज्य आणि रामराज्य
कायद्याचे राज्य आणि रामराज्य
श्रद्धेय नानाजी देशमुख स्वर्गवासी झालेत त्याच्या दुसर्या दिवसाचा प्रसंग. आम्ही ८-१० मंडळी जमलो होतो. स्वाभाविक नानाजींचा विषय निघाला. त्यातील एक जण म्हणाला, नानाजींनी संघ सोडला होता. त्याने तरुण भारतच्या बातमीचा हवालाही दिला. मला लक्षात आले त्याला काय म्हणायचे आहे ते. मी म्हटले, नानाजींनी संघ नाही राजकारण सोडले होते ६० व्या वर्षी. त्यानंतरही अनेक वर्षे ते संघ शिक्षा वर्गातही येत असत. त्यांचे बौद्धिक वर्ग मी स्वत: ऐकलेले आहेत. तेव्हा त्याचा जोर नरमला. त्यावरून चर्चा राजकारणावर आली. दूसरा एक जण म्हणाला, असे जर करायचे तर गडकरींना काय फक्त १० वर्षेच मिळणार काय? मी मुद्दा मांडला की, अमेरिकेचे वा रशियाचे पूर्व राष्ट्राध्यक्ष आता काय करताहेत? त्यांचा कालावधी किती होता? त्यावर पहिला मित्र म्हणाला, तेथे तसा कायदाच आहे. अमेरिकेत २ पेक्षा अधिक वेळा राष्ट्राध्यक्ष होता येत नाही. मी म्हटले, नानाजींनी राजकारण कायदा म्हणून नाही तर नैतिकता म्हणून सोडले होते. विषय तिथेच संपला. पण हा विषय त्या चर्चेपुरताच मर्यादित नक्कीच नव्हता.
रामनवमी निमित्त तर त्याचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे. आम्ही कायद्याचे राज्य ही संकल्पना स्वीकारली आहे. ती अतिशय योग्य अशीही आहे. पण तो कायदा आणि कायदा राबवणारे राज्य यांचे मुळात प्रयोजन काय? तर समाज सुव्यवस्थित राहावा हे त्याचे प्रयोजन. म्हणजे समाज ही राज्याशिवाय स्वतंत्र वेगळी अशी काही गोष्ट आहे जिच्यासाठी राज्याकडून कायदा राबविला जावा. यातून एक गोष्ट तर अतिशय स्पष्ट होते की कायदा समाजाची निर्मिती करू शकत नाही. मग प्रश्न उत्पन्न होतो की, समाजाची निर्मिती कशी होते? किंवा दुसर्या शब्दात बोलायचे तर समाज या मूळ घटकाचा आधार काय ज्यापासून त्या घटकाची निर्मिती होते. जसे पाण्याचे मूळ द्रव्य हायड्रोजन व ऑक्सीजन. तसे समाजाचे मूळ द्रव्य काय? तर त्याचे नि:संदीग्ध उत्तर नीति असे आहे. आणि नीतीचा अतिशय सुटसुटीत अर्थ म्हणजे दुसर्याचा विचार करणे. हा विचार स्वार्थासाठीही असू शकतो. मी एकटा जगू शकत नाही. माझ्या गरजा भागवण्यासाठी समाजाची गरज आहे. त्यामुळे मी समाजाचा घटक म्हणून वागले, जगले पाहिजे. हा विचार स्वार्थी असला तरीही नैतिकच आहे. नीतीचा उच्चतम आविष्कारही या जगाने अनेक वेळा अनुभवलेला आहे. परंतु प्रगल्भतेच्या खालच्या स्तरावरही ही नीती उपकारकच ठरते.रामायण हा नीतीग्रंथ आहे. नीतीचे विविध पदर आणि आविष्कार त्यातून व्यक्त झाले आहेत. रामाने वनवास स्वीकारणे, त्याच्यासोबत सीतेने आणि लक्ष्मणानेही वनवास स्वीकारणे, भरताने रामाच्या पादुकांना राज्याभिषेक करून राज्याचा विश्वस्त म्हणून कारभार पाहणे, एका धोब्याच्या लहानशा टिकेवरून रामाने सीतेला वनवासात पाठवणे, सीतेनेही त्यावर काही नाराजी व्यक्त न करणे अशी सारी चढाओढ लागलेली रामायणात पाहायला मिळते. यात किंतु-परंतु नाहीत असे नाही. त्या किंतु-परंतुमध्ये काहीही तथ्य नाही असेही नाही. परंतु रामायणाने मानवमात्रासमोर नीतीचे उत्तुंग शिखर उभे केलेले आहे हे नाकारता येणार नाही. आमच्या भारतीय समाजजीवनावर त्याचा अमिट असा ठसाही उमटलेला आहे. जीवनाच्या अखेरीलाही रामनामाची साथ घेउनच हिन्दू माणूस या जगाचा निरोप घेतो. आयुष्यभर रामाचे नाव घेत पुण्य संपादन करणार्या आमच्या समाजाला नीतीसंपन्न होण्याचा निश्चय आणि कृति मात्र करता येत नाही. राम नामाचा अविरत घोष करीत असतानाच आमचे वागणे मात्र अतिशय ढोंगीपणाचे असते. व्यक्ती जीवनापासून राष्ट्र जीवनापर्यंत हे दुटप्पीपण पाहायला, अनुभवायला मिळते. घराघरात रामकथा माहिती आहे. लाखो ठिकाणी रामकथा, रामायण वाचन, रामलीला, रामायणावरील प्रवचने सुरू असतात. युगानुयुगे हे सुरू आहे. तरीही त्यातील नीतीसंदेश आमच्या हाडीमासी किती रुजला आहे, याचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. समाजात वाईट गोष्टीही आहेतच. परंतु चांगल्या गोष्टीही आहेत आणि त्याचे श्रेय रामायणाला द्यावे लागेल. हीच या रामकथांची उपलब्धी आहे, असा युक्तिवाद करता येईल. मात्र हा युक्तिवाद फसवा म्हणावा लागेल. एक तर नीतीमत्तेचे प्रमाण किती व्यस्त आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. इतक्या वर्षांच्या संस्कारांनंतर ते अधिक असायला हवे होते. दुसरे म्हणजे आहे त्या चांगुलपणावर समाधान मानायचे असेल तर रामराज्याचे स्वप्न पाहण्याला वगैरे काहीही अर्थ उरत नाही. रामनाम घेऊ नये, प्रवचने करू नयेत, पाठ करू नयेत, रामलीला करू नये असा याचा अर्थ मुळीच नाही. तर केवळ रामनाम घेउन आम्ही नीतिमान होऊ शकत नाही. त्यासाठी सतत आमच्या विचार व्यवहाराची चिकित्सा करून, वारंवार त्या संबंधीची जाणीव मनाला करून देऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. आपले व्यवहार करताना दुसर्याचा विचार करणे, आपल्या योजना राबविताना दुसर्याचा विचार करणे, योजना आणि व्यवस्थांची आखणी करताना आणि अंमलबजावणी करताना दुसर्यांचा विचार करणे या मर्यादित अर्थाने नीतीचा अर्थ घेतला तरीही आज आमचे समाजजीवन किती नीतिमान आहे? गांधीजींनी रामराज्याचे स्वप्न समाजापुढे ठेवले होते. आणि त्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व सांगितले होते की, आपली कोणतीही कृती करण्यापूर्वी या समाजातील शेवटल्या टोकाच्या व्यक्तीला काय उपयोग होईल याचा विचार करावा. राजकारणी व्यक्तींचा व्यवहार कसा आहे? आमचे मंत्री बंगल्यात न राहता पंचतारांकित होटलमध्ये राहतात. हे बेकायदा नसेल पण अनैतिक नक्कीच म्हणावे लागेल. मंत्र्यांचे, आमदार, खासदारांचे बंगले केवढे अवाढव्य!!! हे कायदेशीर असेल पण नैतिक खचितच म्हणता येणार नाही. देशाच्या राष्ट्रपतींचा बंगला १२०० एकरात विस्तारलेला, मंत्र्यांचे बंगले सरासरी ३० एकरात पसरलेले आणि कर्जापायी शेतकरी जमीन विकून आत्मह्त्या करीत आहेत. बरे तर बरे जगातील सगळ्यात बलशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा बंगला केवळ १२ एकरात पहुडलाय. आपल्या एखाद्या राज्यापेक्षाही लहान असलेल्या ब्रिटनमधून आलेल्या इंग्रजांना मोकळ्या जमिनी दिसल्या आणि त्यांच्या ऐशोआरामाला बहरच आला. पण आम्ही त्यात बदल करण्याचा विचार तरी केला का? कायदेशीररीत्या यात काहीही चूक नसेल पण नीती म्हणून? सरकारी स्तरावर चालणारी उधळपट्टी नीतीच्या कोणत्या कल्पनेत बसते? उधळपट्टी होऊ नये असा कायदा करता येईलही पण त्यानी उधळपट्टी थांबवता येईल का? आणि सरकार राबवणारे नीतिमान असतील तर कायदा न करताही ही उधळपट्टी थांबवता येईल. सरकारने उधळपट्टी केली तरीही तो पैसा अखेर जनतेच्या हातातच जातो ना! पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालनाच मिळते ना असा युक्तिवाद करणारेही आहेतच. पण समाजाच्या हातात पैसा जाताना जे अर्थचक्र राबविले जाते त्यातून समाजाचा विकास व्हावा, उपयोग व्हावा ही दृष्टी ठेवली जाते का? दरवर्षी विधिमंडळ अधिवेशनासाठी रंगरंगोटी करून contractor ला पैसा मिळत असेल पण सार्वजनिक मुत्रीघरे बांधूनदेखील तो पैसा समाजापर्यंत पोहोचवता येईलच ना. पण ही दृष्टी ठेवून काम करायला नैतिकता असावी लागते. कायदा पाळण्यासाठीही माणूस नीतिमान असणे आवश्यक आहे. नाही तर कायदा धाब्यावर बसवून निर्लज्ज कोडगेपणाचे व्यवहार सुरूच राहतात किंवा बेशरमपणे कायदा वाट्टेल तसा फिरवता येतो. नाहीच काही जमले तर न्यायालयांना कायद्याचे interpretation करायला लावता येते. न्यायव्यवस्थेबाबत नितांत आदर बाळगुनही तिच्या नैतिकतेबाबत छातीठोकपणे बोलणे कठीण आहे. न्यायव्यवस्थेला स्वत:लाही याची जाणीव होऊ लागली आहे.नीतीचा हा प्रश्न केवळ पैशाचे व्यवहार, भ्रष्टाचार, स्त्री-पुरुष संबंध, एवढ्यापुरता किंवा सरकार, राजकारण, न्यायव्यवस्था एवढ्यापुरताच मर्यादित नाही. तुम्ही आम्ही आमच्या रोजच्या व्यवहारात तरी नैतिक आहोत का? प्रत्येकाने शेजारधर्म पाळावा. तो न पाळल्यास कायदेशीर कारवाई करता येईल, पण कायद्याने शेजारधर्म निर्माण करता येईल का? शेजार्याचे स्वयंपाकाच्या गासचे सिलेंडर संपले तर त्याची अडचण मी दूर करावी हे कायदा सांगत नाही पण नीती सांगते. माझ्याकडे वाजणारे गाणे किती मोठ्याने वाजावे, वाहने कशी पार्क करावी, वाहतूक शिपाई नसताना सुद्धा वाहतुकीचे नियम पाळावे, घरी निघणारी ४ लिंबं शेजारी द्यावीत, कार्यालयातील सहकार्याची व्यक्तिगत सुखदुखा:चीही चौकशी करावी, पाण्याचा व्यापार नसावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, शिक्षकांनी मन लावून शिकवावे, विद्यार्थ्यांनी मन लावून शिकावे, ऐशोआराम, सुखसाधने, जीवनाची enjoyment हे सुरू असतानाच आपण विचारीही असेल पाहिजे, खाणेपिणे, टीव्ही पाहणे यासोबतच वाचनही केले पाहिजे, मी जातीपातीचा विचारही करणार नाही, कोणाच्या कोणत्याही प्रकारच्या दुबळेपणाचा वा स्वत:च्या ताकदीचा; तसेच स्वत:च्या दुबळेपणाचा आणि कोणाच्या ताकदीचा गैरफायदा घेणार नाही... ही यादी कितीही वाढवता येईल. या यादीतील एकही गोष्ट आपण नाही केली तरी ते कायद्याला धरुनच आहे. पण त्यातील किंवा त्यासारख्या किती गोष्टी आम्ही करतो त्यावर आमची नितिमत्तेची यत्ता ठरू शकते. चित्रपट माध्यमात तर या विषयाची चर्चा कितीतरी झालेली आढळते. अगदी अलिकडचा `कायद्याचं बोला' हा मराठी चित्रपटही या विषयावरील चांगले भाष्य आहे. समाजाची नैतिक ऊंची कमी असेल, समाजातील नीतीमत्तेचे प्रमाण कमी असेल तर काय होऊ शकते हे आम्ही पाहतोच आहोत. हे प्रमाण वाढले तर मात्र समाजाचे एक चांगले चित्र निर्माण होईलच. त्याशिवाय अनेक समस्या उत्पन्नच होणार नाहीत आणि झाल्याच तर त्या सोडवण्याची समाजाची स्वाभाविक शक्तीही वाढेल. हे सारे आम्हाला माहीत आहे. त्यासाठीच रामायण आहे आणि आमचे ढ़ोंगीपणही कायमच आहे. आम्ही किमान रामाला फसवणार नाही असे निश्चयपूर्वक ठरवले तरीही पुरेसे आहे.
-श्रीपाद कोठे, नागपूर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)