सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

बँक बुडणे

बँक बुडणे ही आता नवीन बाब राहिलेली नाही. ठेवीदारांचे पैसे बुडू नयेत यासाठी त्याला दिलेले संरक्षण म्हणजे DICGC (deposit insurance and credit guarantee corporation) याचे संरक्षण एक लाख रुपयांपर्यंतच असते हे खरे पण ठेवीदारांना एक लाख रुपयेही मिळत नाहीत. वरून हजार रुपये काढायलाही रांगा लावून ताटकळत बसावे लागते. कारण मुळात या बँका बुडतच नाहीत. ठेवीला असलेले विमा संरक्षण बँक बुडाल्यावर मिळते. मात्र रिझर्व्ह बँक निर्बंध घालते ते बँक वाचवण्यासाठी. म्हणजे बुडू नये म्हणून दिलेली ती संधी असते. त्यामुळे व्यवहारात बँक बुडाली म्हटले तरी बँक बुडालेली नसते. खरी समस्या इथे आहे. बँक पुन्हा पूर्व स्थितीत आणणे अथवा बुडाली हे ठरवणे; ही किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. एखादी व्यक्ती वर्षानुवर्षे कोमात असण्याची स्थिती असते तसे हे. यात ठेवीदारांना हकनाक त्रास सोसावा लागतो. अनेकांची जीवनाची गाडी रुळावरून घसरते, तर अनेक आयुष्यातून उठतात. काहीही गुन्हा वा चूक नसताना सामान्य माणूस भरडला जातो. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. बँकेच्या सक्षमतेबद्दल शंका येऊन रिझर्व्ह बँक जेव्हा पाऊल उचलते तेव्हाच ग्राहकांना विम्याचे पूर्ण संरक्षण देऊन सामान्य माणसाला दिलासा देता येऊ शकेल. हा अनुभव घेतल्यावर साहजिकच ग्राहक आपला पैसा दुसरीकडे जमा करेल. त्यामुळे अर्थ व्यवस्थेतील पैसा कायम राहील आणि ग्राहकांचेही नुकसान होणार नाही. बँक पूर्व स्थितीला आणण्याचे प्रयत्न पुढेही सुरूच राहतील. बँकेवर निर्बंध आणल्यानंतर ग्राहकांना धीर धरायला सांगण्यात येते त्याऐवजी रिझर्व्ह बँकेने थोडा धीर धरून विशिष्ट मुदतीसाठी बँकांना आपल्या ठेवीचा जो अंश रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो त्यात बँकांना सुट द्यावी. बँक बुडवण्यात भूमिका असणाऱ्या धेंडांना धडा शिकवणे ही महत्वाची बाब आहेच. ते करावेच पण ते सामान्य ग्राहकांच्या जीवावर करू नये. घोटाळे आणि शिक्षा हाताळताना सामान्य माणसाला वेठीस न धरता मोकळे करण्याचा विचार प्राधान्याने करणे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

२७ सप्टेंबर २०१९

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

प्रवाहपतीत होऊ नये

हिंदुत्व एका संस्कृतीचं नाव आहे. ती एक जीवनशैली आहे. भारतीयत्वाचा पर्यायी शब्द आहे. त्याची सांगड एखाद्या पक्षाशी घालणं अनुचित आहे. भारतीयत्व आणि हिंदुत्व एक आहे असं म्हटलं जातं, तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की- राजकीय व्यवस्था म्हणून अनेक पक्ष राहणारच. समाज आहे तोवर राजकीय आकांक्षा बाळगणारे अनेक जण राहणारच. हिंदुत्वात सगळ्याच विचारांचा समावेश होणार असेल तर, टोकाच्या डाव्यांपासून टोकाच्या उजव्यांपर्यंत सारे हिंदुत्वाच्या कक्षेत येतील, यायला हवेत. सगळा देश हिंदुत्वाने भारला जाईल तेव्हा काय एकच पक्ष राहील की काय? असे होणार नाही/ होऊ नये. राजकीय विचार, राजकीय भूमिका, राजकीय इच्छा/ आकांक्षा या राहणारच. तेव्हा पक्षही अनेक राहणारच. हिंदुत्व अतिप्रचंड आहे. त्याला पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न त्याचे विरोधक जाणीवपूर्वक करतात. मात्र हिंदुत्व समर्थकांनी तेच केल्यास त्याने हिंदुत्वाची शक्ती वाढण्यापेक्षा हिंदुत्वाचे खच्चीकरणच होईल. शिवसेनेकडे फक्त हिंदुत्वाचे स्टीकर होते बाकी काहीही नाही. त्यामुळे एवढ्या विचाराची, दूरवर पाहण्याची वगैरे तिच्याकडून अपेक्षाच करता येत नाही. परंतु हिंदुत्वाचा गांभीर्याने विचार करणाऱ्यांनी मात्र प्रवाहपतीत होऊ नये.

- श्रीपाद कोठे

२६ सप्टेंबर २०१४

शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२

सामूहिक शहाणपण

लाखो वर्षांच्या वाटचालीत माणसाने अनेक गोष्टींचा विकास केला. बाह्य व आंतरिक प्रकृतीवर मात करीत करीत ही जी वाटचाल केली त्यालाच आपण सभ्यता म्हणतो. या सभ्यतेच्या विकासात एक सामूहिक शहाणपणही विकसित झाले. त्या सामूहिक शहाणपणाने आपल्याला काही मुलभूत, शाश्वत सत्ये शिकवली आहेत. त्यातली काही अशी-

१) एक आंबा पूर्ण गाडीभर आंबे नासवून टाकू शकतो.

२) अन्याय करणारा तर दोषी असतोच, पण अन्याय निमूटपणे पाहणारा देखील दोषीच असतो.

३) गुन्हे करणारा तर दोषी असतोच, पण गुन्हेगाराला आश्रय देणाराही दोषीच असतो.

४) संपूर्ण प्रजेबद्दल समान भावना, यासोबतच निर्विवाद चारित्र्य म्हणजेही राजधर्म.

५) charity must begin at home.

६) caesar's wife must be above suspision.

आपल्या सर्वशक्तिमान संसदेला व संसद सदस्यांना मात्र ही सत्ये मान्य नसावीत. नाही तर गुन्हेगारांना संरक्षण देणारा अध्यादेश केंद्र सरकारने काल का काढला असता? असो. सामूहिक शहाणपण भलेही काहीही सांगत असो. शहाणपणाने वागलेच पाहिजे असे तर काही सरकारवर बंधन नाही ना?

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१३

सत्तेचं भूत

आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. दोन वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी साजरी होईल. आज त्यांनी उभ्या केलेल्या पक्षाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आहे. दीनदयाळजींनी सत्ता/ राजकारण हे समाजजीवनाचे एक अंग मानले. त्याला खूप जास्त महत्व देणे आणि समाजाचे अस्तित्व, समाजाचे सुखदु:ख, समाजाचे भलेबुरे यासाठी सत्तेला अमर्याद महत्व देणे त्यांच्या विचारांशी विसंगत आहे. या एका मुद्याचा सगळ्या व्यक्ती, संस्था, संघटना, सगळे पक्ष यांनी सखोल आणि गांभिर्याने विचार करायला हवा.

एक निरीक्षण फक्त या संदर्भात नोंदवावेसे वाटते- प्रभू रामचन्द्रांपासून तर छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत शेकडो, हजारो प्रजाहितरक्षक, विश्वकल्याणाची दृष्टी आणि प्रामाणिक तळमळ असणारे आणि अफाट कर्तृत्व असणारे राजे-महाराजे (शासक) भारतात आणि भारताबाहेर होऊन गेले. मात्र त्यातील कोणतीही राजवट वा व्यवस्था चिरकाल टिकली नाही. एवढेच नाही तर समाजाची सुखदु:ख वाढली किंवा कमी झाली नाहीत आणि समाजाची मानसिक, बौद्धिक, आत्मिक, सांस्कृतिक प्रगती वगैरे फारशी झाली नाही. आदिम समाज आजच्या सुस्थितीत आला याची कारणे सत्तेपेक्षा सत्तेच्या बाहेर अधिक आहेत. सत्तेचं/ राजकारणाचं भूत आपल्या मनातून आणि मानगुटीवरून उतरविण्याची नितांत गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१४

चर्चा हिंदुत्वाची

हिंदुत्व, गुरुजींचं हिंदुत्व, संघाचं वर्तमान हिंदुत्व, हिंदुत्व दुर्बल होऊ नये आदी आदी चर्चा तेजीत आहेत. श्री गुरुजी, विचारधन, (मास मिडिया वाचून चर्चा आणि विचार करणाऱ्यांना हे नाव माहिती नसेल... bunch of thought याचं मराठी नाव आहे `विचारधन'.) श्री गुरुजींची मुस्लिम विषयक भूमिका इत्यादी मोठे विषय आहेत. प्रसंगोपात्त त्यावर लिहीनच. पण श्री गुरुजींची भूमिका चूक होती येथपासून तर संघाने घेतलेली ताजी भूमिका बोटचेपी आणि लांगूलचालन करणारी आहे, निवडणूक समोर ठेवून घेण्यात आलेली आहे; येथवर मते मांडली जात आहेत. या मंथनाला दिशा म्हणून स्वा. सावरकर यांच्या `हिंदुत्व' ग्रंथातील अगदी शेवटला परिच्छेद वाचावा. या परिच्छेदात एका पुस्तकाची असेल नसेल पण एका प्रबंधाची शक्ती नक्कीच आहे. तो परिच्छेद असा-

`हेही तितकेच निश्चित आहे की जेव्हा केव्हाही अशी वेळ येईल तेव्हा हिंदुलोक सर्व जगाला दुसरे तिसरे काही सांगणार नाहीत तर तेच जगाला करावयास सांगतील की जे गीतेने सांगितले, जे बुद्धाने उपदेशिले. ज्यावेळी हिंदू मनुष्य हा हिंदुत्वातीत होतो त्यावेळेला तो शंकराचार्यांप्रमाणे ‘वाराणसी मेदिनी’ म्हणून गावयाला लागतो नि तुकाराम महाराजांप्रमाणे ‘आमुचा स्वदेश भुवनत्रयामध्ये वास’ असे गर्जून उठतो. काय म्हणता? माझा स्वदेश? ऐका तर, बंधूंनो! माझ्या देशाच्या मर्यादा म्हणजे, त्रैलोक्याच्या मर्यादा. तीच माझ्या देशाची सीमा!'

(स्वा. सावरकर, `हिंदुत्व' या पुस्तकाचा शेवटला परिच्छेद.)

विरोधक, समर्थक हे दोन्ही बाजूला ठेवून एक विनंती करावीशी वाटते; चर्चा आणि वादविवाद किंचित कमी करून वाचन, व्यासंग आणि चिंतन थोडे वाढवले तर समाजाच्या हिताचे होईल. फुकटच्या सल्ल्याबद्दल रागावू नये.

- श्रीपाद कोठे

२५ सप्टेंबर २०१८

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

हिंदुत्वाची चिंता

हिंदुत्व ज्यांचा प्राण आहे असे अनेक प्रामाणिक कार्यकर्ते, विचारवंत, पत्रकार, सामान्य लोक सध्या सुरु असलेल्या शिवसेना-भाजप संघर्षावरून खूप चिंतीत आहेत. त्यांच्या भावना ठीक आहेत, पण एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते की- हिंदुत्व अशा एखाद्या युतीवर किंवा ती तुटण्यावर वगैरे अवलंबून नव्हते, नाही आणि असणार नाही. आपलं आजचं जीवन, आजची राजकीय व्यवस्था, आजची पक्षपद्धती यांचा मागमूसही नव्हता तेव्हापासून हिंदुत्व आहे. खरं तर इतिहास डोळे उघडतो तेव्हापासून हिंदुत्व आहे. अन अंतापर्यंत ते राहणार आहे. अशी असंख्य स्थित्यंतरे त्याने पचवून टाकली आहेत.

- श्रीपाद कोठे

२३ सप्टेंबर २०१४

बदलाचे साधन व्हावे

सरसंघचालकांच्या आरक्षण विषयक विधानावरील खा. रामदास आठवले यांची प्रतिक्रिया आज वाचण्यात आली. मला मनापासून ती आवडली. आठवले म्हणतात, `जातीव्यवस्था पूर्ण समाप्त केल्यास आम्ही जातीवर आधारित आरक्षण सोडून देऊ.' यावर दुमत होण्यासारखे काहीच नाही. फक्त मुद्दा आहे की, हे साध्य कसे करायचे? अन हे साध्य झाले हे कसे समजायचे? खरे तर आज जातीव्यवस्था आहे असे म्हणणे हा एक विनोद होय. आज कोणी जातीनुसार व्यवसाय करीत नाही. अनेक विविध जातींचे लोक दुसऱ्या जातींचे समजले जाणारे व्यवसाय करीत आहेत. अगदी ब्राम्हण माणूस केशकर्तनालय चालवतो आहे. काही लोक आपापले व्यवसाय करतात पण त्याची कारणे जातीव्यवस्था नसून अन्य आहेत. जसे- आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सवय, सुलभता, आवड; इत्यादी. मग आज जात आहे कुठे? राजकारण, विविध सवलती, सुविधा, कुटुंबातील काही रीती- आचार- इत्यादी, अन भांडणांची खुमखुमी जिरवण्यासाठी. खाणेपिणे या विषयात जात आता जवळपास नसल्यासारखी आहे. काही अपवाद असतील. त्यात व्यक्तिगत संबंध किंवा धार्मिक व्रत आदी गोष्टी आहेत. पण व्यवस्था म्हणून तर तो विषय मोडीतच निघाला आहे. विवाह हा एक विषय आहे जेथे जात अजूनही महत्वाची ठरते. पण त्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तेथे जबरदस्ती उपयोगाची नाही. कारण सवयी, आवडीनिवडी, वातावरण असे अनेक मुद्दे असतात. जसजसे सामाजिक अभिसरण वाढते आहे विवाह या विषयातील जात हा मुद्दा निवळत आहे. तो अजून निवळेल. १०० वर्षांपूर्वीच्या मानाने समाजाने आज तो बदल समाधान वाटावे एवढा स्वीकारलेला आहे.

मग जात आहे कुठे तर राजकारण, सवलती, सोयीसुविधा आणि मनात. राजकारण, सवलती, सोयीसुविधा या गोष्टी अशा आहेत की त्या बाबतीत जात वा अन्य कोणताही आधार सोडायला कोणी कधी तयार होणार नाही. माणूस खूपच, म्हणजे कमालीचा आदर्शवादी झाला तरच ते शक्य होईल. नजीकच्या काही शे वर्षात तरी ते शक्य नाही. त्यामुळे या बाबतीत कधीतरी थोड्या कठोरपणे चिकित्सा व उपचार करावेच लागतील. दुसरी जागा आहे मन. ती बाब तर पूर्णत: वैयक्तिक आहे. खा. आठवले यांच्यासारख्यांनी स्वत:ला अमुक जातीचे वगैरे मानणे सोडून दिले, आपल्या मनातून ते काढून टाकले की, जातीव्यवस्था तेवढ्या प्रमाणात मोडून पडेल. असे मनातून जात काढून टाकणारे जितके असतील तितकी या प्रक्रियेला गती मिळेल. आज मराठा म्हणा, दलित म्हणा, की अन्य नेते स्वत:च्या मनातून ही भावना काढून टाकतात का? पवार किंवा आठवले किंवा मायावती किंवा लालू किंवा मुलायम किंवा नितीश किंवा जयललिता; आपापल्या मनातून स्वत:ची वा दुसऱ्या कुणाची जात पुसून टाकतात का? जगाला दाखवण्यासाठी नव्हे प्रामाणिकपणे. यासाठी व्यक्तिगत संकल्प हवा. फाटे न फोडता मी स्वत:पासून सुरुवात करेन तर होईल, या निश्चयाने चालावे लागेल. कोण काय करते याची फार चर्चा करण्यापेक्षा मी काय करायला हवे याचा विचार केला तर होईल. ते सगळ्यांनी करावे यासाठी ज्याला जसा प्रयत्न करणे शक्य आहे तसा प्रयत्न त्यांनी करावा. आठवलेंनीही करावा. मग त्यांना कोणाला आवाहन करावे लागणार नाही- आधी जातीव्यवस्था संपवा म्हणून. प्रत्येकाने हव्या असलेल्या बदलाचे स्वत: साधन होण्याचा प्रयत्न करायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २३ सप्टेंबर २०१५

बुधवार, २१ सप्टेंबर, २०२२

प्रश्न अनंतमूर्ती यांना...

मोदी पंतप्रधान झाल्यावर, अत्यंत व्यथित झाल्याने अनंतमूर्ती जर भारतात राहू शकत नसतील, तर ते कुठे राहू शकतील? जिहाद वा क्रुसेड यांना अधिकृत मान्यता देणाऱ्या समाजाचे मोठे वास्तव्य असणाऱ्या देशांमध्ये? हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब टाकणाऱ्या देशामध्ये? क्रांतीच्या नावाखाली लाखो लोक मारणाऱ्या स्टालिन, ख्रुश्चेव्ह्च्या देशात? तायनानमेन चौकाची युद्धभूमी करणाऱ्या देशात? अब्जावधी लोकांना ठार मारून टाकणे हाच पुरुषार्थ मानणाऱ्या समाजांसोबत? लोकशाहीचा हवाला देत तेलाचे राजकारण करणाऱ्या देशात? कुठे राहू शकतील ते? गोध्रा आणि गुजरात दंगली ही चांगली गोष्ट नाहीच. पण भारताच्या फाळणीचे काय? केवळ ६५ वर्षांपूर्वी आपलेच १० लाख बंधू भगिनी क्रूरपणे मारल्या गेले होते. ज्या नेहरूंचे गुणगान अनंतमूर्ती करतात त्या नेहरूंच्या नाकर्तेपणामुळे १९४७, १९६२, १९६५ मध्ये जे भारतीय सैनिक प्राणास मुकले, त्याचे काय? हे जग, त्यातील व्यवहार, त्याचे व्यामिश्र स्वरूप, हिंसा-अहिंसा, न्याय-अन्याय, स्वातंत्र्य-समानता, बंधुत्व वगैरे वगैरे बद्दल जे प्रचंड अपुरं, उथळ, पोरकट आकलन बुद्धिवंत म्हणवणार्यांमध्ये आहे ते याचं कारण आहे. युरोपीय विचारांचा पगडा याच्या मुळाशी आहे. क्रिया-प्रतिक्रिया याचा वैज्ञानिक सिद्धांत प्रतिपादन करताना व्यवहारातील त्याचे स्वरूप मात्र समजण्याची यांची तयारीही नसते आणि ताकदही. शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी हा क्रिया-प्रतिक्रिया सिद्धांत खोटा ठरवून उभं राहावं लागतं. त्यासाठी बुद्धीपलीकडील बाबींचं आकलन आणि समज हवी, म्हणजेच आध्यात्म हवं. इहवादी, बुद्धिवादी यांना ते मान्य नाही. त्यामुळे त्यांचं विवेचनही अपुरं राहतं आणि व्यवहार भरकटलेला.

- श्रीपाद कोठे

२२ सप्टेंबर २०१३

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

डॉ. मनमोहन सिंग - स्वच्छ?

अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी अणुऊर्जा आयोगाला बाजूस सारून पुढे जाण्याचा निर्णय पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीने यासंबंधीचे टिपण तयार केले आहे. मागील कार्यकाळात खासदार विकत घेऊन अणुकरार केला आणि सरकारही वाचवले. मग किरकोळ व्यापारात विदेशी (अमेरिकी) गुंतवणूकदारांना आमंत्रण. अन आता नियम आणि पद्धती बाजूस सारून व्यवहार. शिवाय कोळसा फाईल्स वगैरे आहेच. तरीही पंतप्रधान स्वच्छच ???

शोध पत्रकारिता कशी होते? प्रथम काहीतरी शंकास्पद वाटते. मग निरीक्षण केल्यावर पुन्हा शंका बळावते. त्यानंतर शोध घेऊन छडा लावला जातो. मागील दसऱ्याच्या वेळी गडकरींच्या कंपन्या शोधण्यासाठी कुत्र्यासारखे फिरणारे पत्रकार आता ते सारे विसरूनही गेले. कारण गडकरींना अध्यक्ष पदावरून दूर करण्याचे महत्कार्य आटोपले होते. मनमोहन सिंग यांच्याबद्दल मात्र प्रसार माध्यमांना शंकाही येत नाही. काय म्हणायचे? हिप्नोटीझम, विकाऊ वृत्ती, देशद्रोह, निर्लज्जता, कॉंग्रेसधार्जिणेपणा, भाजपाद्वेष... की आणखीन काही?

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१३

जावेद अख्तर यांची धूर्तता

एक ज्येष्ठ कार्यकर्ते, संस्कार भारती विदर्भ प्रांताचे संघटन मंत्री आणि माझे मित्र अजयजी देशपांडे यांनी एक व्हिडीओ पाठवला. जावेद अख्तर यांचा. कोणत्या तरी वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमातील काही मिनिटांचे क्लिपिंग. राजदीप सरदेसाई नावाचे कथित पत्रकार तो कार्यक्रम संचालित करीत आहेत. गोड शब्द, तर्कपूर्ण पद्धती आणि आक्रमकपणे सत्य पण घातक गोष्टी कशा गळी उतरवायच्या याचा उत्तम नमूना. ही क्लिप कधीची माहीत नाही, पण विषय तोच सहिष्णुता. भारताची परंपरा फार महान आहे. आपण ती पुढे चालवणार की महानता सोडून लहान होणार, असा जावेद अख्तर यांचा सवाल. स्वाभाविकच पेचात टाकणारा. मात्र तेवढाच धूर्त. आजवर हीच धूर्तता चालत आली आहे. तुम्ही महान आहात, तुम्ही थोर आहात इत्यादी सांगून; स्वत: कसेही वागायला मोकळे. आम्ही कसेही वागलो तरी चालेल. तुमच्या देवदेवता, धर्म, परंपरा, आचारविचार, तुमची भावधारा, प्रतिके यावर आम्ही कशीही टीकाटिप्पणी करू, कशीही टिंगलटवाळी करू, त्यांना हास्यास्पद ठरवू, त्यांची निन्दानालस्ती करू, त्यांचा अपमान करू, तुम्हाला काय अभिप्रेत आहे त्याला अर्थ नाही आम्हाला काय अर्थ काढायचा आहे तोच आम्ही काढू... तरीही तुम्ही शांतच राहायचे कारण तुम्ही महान आहात. हे आणि असेच जावेद साहेब बोलले. शोले किंवा पिके चित्रपटाचे उदाहरण देऊन बोलले.

जावेद साहेब लाज वाटायला पाहिजे तुम्हाला खरे तर. आमच्या मराठीत एक म्हण आहे. मराठीत असल्याने तुम्ही ती ऐकली नसेल. म्हण आहे- मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये. साधं शहाणपण शिकवणारी ही म्हण आहे. पण तुम्ही अन तुमच्यासारखे कोपराने खणत गेलात अन मग जे व्हायचे ते होतेच. आतून कोणी फणा काढला तर नंतर ओरडता कशाला? सहिष्णू सहिष्णू म्हणत जेव्हा तुम्ही अतिरेक केला, आतल्या नागाला डिवचलं तेव्हा त्याने फणा उगारला. आता त्याचा राग शांत होईपर्यंत वाट पाहावी लागेलच. पण तुम्हाला तो फणा पाहून कमरेचं सावरणं कठीण होतंय. तुमची पंचाईत ही आहे. अन हिंदूंना - तुम्ही महान आहात हे सांगताना; कोणी काही म्हणत नाही याचा अर्थ त्याला काहीही म्हणावे असा होत नाही; तसा अर्थ काढणे असभ्यपणा असतो, ते म्हणजे चांगुलपणाचा गैरफायदा घेणे असते; हे तुमच्यासारख्या संवेदनशील सृजनशील माणसाला कळत नाही? हे म्हणजे carrying coal to new castle असे आहे. मुख्य म्हणजे हिंदूंच्या सहिष्णूतेवर आपापल्या स्वार्थाची आणि विकृतींची पोळी भाजून घेण्याचा कावा ओळखू न शकल्यानेच आजची दुरवस्था आली आहे. अगदी काल जम्मू काश्मीरच्या उरी तळावर झालेला हल्ला सुद्धा या तुमच्या निर्लज्ज काव्याचाच परिणाम आहे. मात्र आता हा कावा ओळखून हिंदू वागू लागला तर तुम्हाला शहाणपण सुचायला लागले आहे.

एक पक्कं लक्षात ठेवा- आमच्या महानतेचं काय करायचं आम्ही पाहून घेऊ. आम्ही महान राहू किंवा लहान होऊन जाऊ. महान काय किंवा लहान काय; कोणत्याही लेबलांचं आम्हाला कौतुक नाही. ज्याला जे म्हणायचं असेल ते म्हणा. पण यापुढे कावेबाजपणा चालणार नाही एवढं नक्की. तेवढी खूणगाठ बांधून ठेवा.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१६

परराष्ट्र धोरण

युद्धात विजयी होण्याचा पहिला नियम हा की, युद्धाची वेळ, स्थळ आणि पद्धत आपण निश्चित करायची असते. शत्रूने नाही. शत्रूला हवं तेव्हा, तिथे आणि त्या पद्धतीने युद्ध केल्यास यशाची शक्यता फार कमी असते. शिवाजी महाराजांचा आपल्याला सार्थ अभिमान असतो. त्यांनी वापरलेल्या युद्द तंत्राचं भान आणि थोडा अभ्यासही करायला हवा. अफजलखानाने उभ्या महाराष्ट्रात थैमान घातले असताना, अगदी तुळजा भवानीच्या मूर्तीवर घण घातले असतानाही महाराजांनी आपले फासे हातून सुटू दिले नाहीत. कालपासून जो क्षोभ देशभर उसळलेला आहे तो अतिशय योग्य असला तरीही एक प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे- आम्हाला प्रतिक्रिया हवी आहे की शत्रूचा चोख बंदोबस्त? दुसरी गोष्ट हीही ध्यानात घ्यायला हवी की, देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध यांच्यात मोदी सरकार आल्यापासून आमुलाग्र बदल झाला आहे. १९६५ च्या चीन युद्धापर्यंत तर पंडित नेहरू आणि त्यांच्या पक्षाला सक्षम लष्कराची गरजच वाटत नव्हती आणि लालभाईंनी तर उघडपणे चीनला समर्थन दिले होते. अशा लोकांनी जी संरक्षण आणि परराष्ट्र नीती सहा दशके राबवली ती पूर्णत: बदलून भारताला अनुकूल असे निर्णय, त्यांची कार्यवाही, त्याचे परिणाम इत्यादी बाबी खूप गुंतागुंतीच्या आणि सगळ्या प्रकारची शक्ती, बुद्धी आणि युक्ती यांची मागणी करणाऱ्या आहेत. याचा अर्थ पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी पुढील सहा दशके लागावीत अथवा लागतील असा मुळीच नाही. मात्र, पाकिस्तान जन्माला घालण्यासाठी जगभरातील कोणी कोणी काय काय केले, त्याला किती काळ आणि तयारी लागली हे विसरू नये. अन ते लक्षात ठेवून पाकिस्तानला संपवण्यासाठी काय काय अन कसे करावे लागेल याचा थोडा विचार करावा. बाकी, जनतेत अशा गोष्टींचा आक्रोश असलाच पाहिजे. जोश के साथ होश भी हो... इतनाही.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१६

हेल्मेट व सामान्य माणूस

आमच्याकडे दारावर इडली, सांबारवडा विकणारा एक जण येत असे. एवढ्यात दिसत नाही. एक भोपु वाजवत तो फिरायचा. एक जुनी लुना किंवा तसलीच गाडी. त्यावर तीन चार डबे लावून तो फिरायचा. ते ठेवण्याची व्यवस्थाही त्याने केली होती. एकदा तो सायकल घेऊन आला. त्याला विचारलं तर म्हणाला, वो हेल्मेट की झंझट है ना.

आज देशभर असे लाखो लोक आहेत, जे अशी कामे करून जगतात. गाडी outdated झाली वगैरे त्यांना कळत नाही. ते आहे त्या स्थितीतून पुढे जात असतात. बरं त्यांनी प्रत्येक ठिकाणी, चार चार पावलांवर हेल्मेट घाल काढ करावी का? विम्याच्या बाबतीतही तो टाळण्याचा विचार करतो. कारण कमाई तेवढी नसते. मग कपात कुठे कुठे करता येईल याचा तो विचार करतो. काय पुढे ढकलता येईल याचा तो विचार करतो. जुन्या गाड्यांना तर विमा काढणाऱ्यांनीच नकार दिल्याची उदाहरणे आहेत. अन हे सगळं चूक, अयोग्य, अनैतिक नाही.

भाजी वगैरे व्यवसाय करणारे सकाळी भाजी आणायला गाडी (दुचाकी) घेऊन जातात आणि मग ठेल्यावर भाजी विकतात. त्यांच्या गाड्या अशाच असतात. शिवाय हेल्मेटचा प्रॉब्लेम असतोच. घरोघरी दूध देणारे याच प्रकारात येतात.

बरे हेल्मेट नियमित घालणारा माणूसही एखादे वेळी अनवधानाने, घाईघाईत किंवा काही अडचणीमुळे त्याविना गाडीवर असू शकतो. त्यावेळी पोलिसांच्या तावडीत न सापडणे हा त्याच्या नशिबाचा भाग समजायचा का?

हे सगळे शहरी भागात. ग्रामीण भागाचे काय? त्याला विमा काढायला, परवाना नवीन करायला किंवा पियुसी करायलाही गाव सोडून जावं लागतं. घर, घरची कामं, वेळ, सवड, शेतीभाती, पाऊसपाणी, पेट्रोल खर्च असं सगळं पाहून तो निर्णय घेतो.

आपण या सगळ्यांना एका झटक्यात बेजबाबदार, गुन्हेगार वगैरे ठरवायचं का? अन तसं ठरवणं हे आपल्याला कोणत्या पातळीवर उभे करते?

बाकी, अपघात कशाने होतात, कसे होतात? त्याची कारणे? यांचा तर विचार करण्याची गरजच नाही. Soft target सामान्य माणूस बरा. त्याला उठसुठ बोल लावता येतो, अक्कल शिकवता येते, अन वेठीलाही धरता येतं. अन आम्ही सर्वज्ञ असल्याने, सगळ्या जगाच्या भल्याचा मक्ता परमेश्वराने आम्हालाच दिला असल्याने, आम्हाला जे वाटते तेच बाकीच्यांना वाटायला हवे. दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी बाजू असू शकते याचा विचार करणे म्हणजे ईश्वराने दिलेल्या मकत्याचा अनादरच नव्हे का?

तेव्हा असो.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०१९

जाती व्यवस्था

आरक्षण मागणाऱ्या आणि आरक्षण देणाऱ्या सगळ्यांनी आधी आपण जाती मानतो, जाती व्यवस्था आपल्याला मान्य आहे; असे जाहीर करावे. तसे करायचे नसेल किंवा तसे करणे घटनाविरोधी होणार असेल; तर सामाजिक वा आर्थिक कमकुवत असणारी कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक म्हणूनच कमकुवत राहील. एकही व्यक्ती कमकुवत राहू नये अशी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवस्था विकसित करणे ही शासनाची जबाबदारी आहे. जी जात व्यवस्थाच आम्ही संपवलेली आहे त्या जातींच्या आधारे नोकऱ्या, शिक्षण, व्यवसायात प्रमाण शोधणे आणि त्यावरून गोंधळ माजवणे निर्बुद्धता आहे. सगळ्यांना (१३०/ १४०/ १५० कोटी लोकांना) चांगले जीवन, चांगले शिक्षण मिळायला हवे; हाच discourse राहायला हवा, हीच भाषा राहायला हवी, हेच ध्येय राहायला हवे. बाकी सगळ्या विद्वतचर्चा निरर्थक आहेत.

- श्रीपाद कोठे

१९ सप्टेंबर २०२०

शेती कायदे आणि जीवनदृष्टी

चित्रपट असो, मनोरंजन क्षेत्र असो, अर्थकारण असो, राजकारण असो; चर्चेचे दोनच बिंदू असतात. प्रामाणिकता आणि कार्यक्षमता. या दोन गोष्टींवरूनच वाद, भांडणे अन आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण ज्यासाठी या चर्चा करतो त्याचा एक महत्वाचा बिंदू मात्र बहुधा लक्षात घेतला जात नाही. तो म्हणजे जीवनदृष्टी. जोवर त्या बिंदूकडे लक्ष दिले जात नाही तोवर फार काही समाधानकारक होईल अशी आशा करण्यात अर्थ नाही.

दोन दिवसांपूर्वी संसदेत पारित झालेली तीन शेती विषयक विधेयके हे याचे उदाहरण म्हणता येईल. दलाल हा शब्द वाईट अन चुकीचा आहे की, दलालीची वृत्ती वाईट अन चुकीची आहे? सरकारी मंडी मोडीत काढून कॉर्पोरेटला त्यासाठी मुक्तद्वार देणे, याने दलाली संपेल का? उलट सरकार किमान मतांच्या भीतीने आणि लालचीने तरी समाजाला उत्तरदायी असतं. कॉर्पोरेट्ससाठी तर फक्त पैसा हाच देव असतो. कॉर्पोरेट्स समाजाचा विचार करतात वा करतील हे कोणीही छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही. दलाली मोडून काढण्यासोबतच डाळी, धान्य, खाद्यतेल आदी वस्तू आता 'जीवनावश्यक वस्तू' राहणार नाहीत. हा तर विनोद म्हणावा लागेल. शेती व्यवसाय surplus production मुळे अडचणीत आला आहे आणि 'जीवनावश्यक वस्तू' कायद्यामुळे साठवण करण्यात अडथळा येतो असा एक तर्क करण्यात येतो. पण  'जीवनावश्यक वस्तू' हा दर्जा काढून घेण्याने साठेबाजी वाढणार नाही का?

ग्राहक हा घटक तर यात कुठेच नाही. कॉर्पोरेट्समुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल हे क्षणभर गृहित धरले तरी ग्राहकांची लूट होणार नाही याची काय शाश्वती? तसेच ग्राहक म्हणजे फक्त नोकरदार वर्ग नसतो, तर कापूस पिकवणारा शेतकरी पण धान्य आणि अन्य वस्तूंचा ग्राहक असतोच. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणारे कॉर्पोरेट्स तो माल देशांतर्गत ग्राहकांना प्राधान्याने विकतील याचाही काय भरवसा? दुष्काळी वा पूर परिस्थिती वा युद्धजन्य परिस्थितीत जनतेच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी कॉर्पोरेट्स घेतील का?

याचा अर्थ आज असलेली व्यवस्था आदर्श आहे असा नक्कीच नाही. मग मार्ग कसा काढायचा? यासाठीच जीवनदृष्टीचे परिवर्तन हवे. पहिली आणि प्राथमिक बाब तर ही की, समाजाला आदर्शवादी बनवायला हवे. ही सतत चालणारी प्रक्रिया औपचारिक आणि अनौपचारिक रीतीने सतत सशक्तपणे चालत राहायला हवी. दुसरे म्हणजे; उत्पादन, वितरण, विक्री, व्यवस्थापन, मालाची ने आण या सगळ्याचे विकेंद्रीकरण हवे. कॉर्पोरेट्स म्हणजे विकेंद्रीकरण नाही. मागे शांताकुमार यांनी संसदेत बोलताना साठवणुकीच्या जुन्या, परंपरागत पद्धतींना प्रोत्साहन देण्याचा मुद्दा मांडला होता. शेतकऱ्यांच्या घरोघरी भरपूर साठवण करण्याची जी पद्धत होती (त्याला बहुतेक गव्हाणी/ कणगी हा शब्द आहे) तसे प्रत्येक जण आपापली साठवण करू शकेल असे काहीतरी असायला हवे. गावागावात यासाठी लॉकर व्यवस्था केली जाऊ शकते.

मुख्य म्हणजे, शेतमालासाठी जशी किमान आधारभूत किंमत असते तशी कमाल किंमत सुद्धा निश्चित केली जावी. यालाच price band म्हणतात. शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठीही असे price band ठरवायला हवे. देशांतर्गत गरज पूर्ण करणे; दुष्काळ, पूर अथवा युद्ध या काळात किंवा सामान्य काळातही टंचाई उत्पन्न होणार नाही; या गोष्टींना प्राथमिकता राहील. देशी गरजांकडे दुर्लक्ष करून निर्यात करणे किंवा टंचाई निर्माण करून साठे दडवून ठेवणे; दोन्ही दंडनीय गुन्हे असायला हवेत.

हे असेच व्हायला हवे असे नाही. पण समाज याचा अर्थ समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक असा अर्थ ध्यानात घेऊन; त्या प्रत्येक घटकाचा विचार प्रत्येक व्यवस्थेने, प्रत्येक कायद्याने, प्रत्येक तरतुदीने केला पाहिजे. व्यवसाय किंवा कोणतेही काम आपल्याच पोळीवर तूप ओढण्यासाठी करायचे नाही, हा विचार सतत जागवत राहायला हवे. कोणत्याही घटकाने कोणाशीही शत्रुत्वाची भावना, प्रतिस्पर्धेची भावना ठेवू नये. कोणी कोणाला लुबाडू नये. यासाठी जीवनदृष्टी बदलावी लागेल. केवळ तांत्रिक काथ्याकूट करून होणार नाही.

- श्रीपाद कोठे

शनिवार, १९ सप्टेंबर २०२०

शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

निष्पक्ष

कर्नाटकातल्या राज्य सरकारने नुकताच एक सभ्य निर्णय घेतला, सगळ्या कर्मचाऱ्यांनी अंगभर कपडे घालूनच आले पाहिजे. पुरुष तर साधारण अंगभरच कपडे घालतात. त्यामुळे हा निर्णय महिला कर्मचारी समोर ठेवून होता हे स्पष्ट आहे. यावर मते मतांतरे असतील, पण गमतीचा भाग म्हणजे प्रसार माध्यमांनी यावर काहीही कोल्हेकुई केली नाही. भारतीय जनता पार्टीने असा काही निर्णय घेतला असता तर केवढे वादळ उठले असते. शिवसेनेने मुंबईतील दुकानांमध्ये लागलेले स्त्रियांचे पुतळे हटवण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा केवढा गहजब झाला होता. आता मात्र प्रसार माध्यमे आणि स्त्रीवादी देखील `अळीमिळी गुपचिळी'. कुठे गेले तत्व आणि कुठे गेले स्वातंत्र्य? कर्नाटकात कॉंग्रेसचे सरकार आहे हे तर कारण नसावे? इतर वेळी जो उपटसुंभपणा पाहायला मिळतो त्यामागील खरे सूत्रधार कोण म्हणायचे? आणि तरीही प्रसार माध्यमे निष्पक्ष? हाहाहा !!!

- श्रीपाद कोठे

१८ सप्टेंबर २०१३

सरसंघचालकांच्या वक्तव्याच्या निमित्ताने

'हिंदूंनी अशास्त्रीय प्रथांचा त्याग करावा,' या सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या वक्तव्याची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. अशी चर्चा होण्यात गैर काहीही नाही. पण त्यावरून संघ, हिंदू, डॉ. भागवत यांच्यावर टीकाटिप्पणी व्हावी हे मात्र न समजण्यासारखे आहे. उलट संघ, हिंदू यांना प्रतिगामी, मागास म्हणून हिणवणाऱ्या लोकांनी याचे मनापासून स्वागत करायला हवे. पण त्यासाठी मनाची प्रामाणिकता अन उमदेपणा हवा. तसा तो किती आहे हे या निमित्ताने स्पष्ट होते आहे.

सरसंघचालकांच्या या खऱ्याखोट्या (कारण त्यांच्या ज्या भाषणातील हे वाक्यांश आहेत ते काही जाहीर भाषण नव्हते. अन कोणी पत्रकार प्रतिनिधीही त्याला उपस्थित नव्हते.) वक्तव्यानंतर कथित पुरोगामी अन सुधारणावाद्यांनी आपापल्या याद्या सादर केल्या आहेत. त्यांना जे विषय अशास्त्रीय वाटतात त्यावर संघाची काय भूमिका आहे, किंवा त्या मुद्यांवर संघ का बोलत नाही, संघ मोघम का बोलतो; असेही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. एका कार्यकारी संपादकाने तर संघाने आधी गोळवलकर गुरुजींचे विचार जाहीरपणे नाकारावेत आणि मग बोलावे, असा अतिशय आचरट सल्लाही देऊन टाकला आहे. नेहमीप्रमाणेच, संघ यावर काही प्रतिक्रिया देण्याची शक्यता नाही.

वास्तविक बदल, परिवर्तन ही बाब हिंदू समाजासाठी मुळीच नवीन नाही. हजारो वर्षातील पाचपन्नास वर्षांचा कोणताही कालखंड असा नाही ज्यात हिंदू समाज, रूढी, प्रथा, परंपरा बदलल्या नाहीत. अन असाही कालखंड नाही जेव्हा समाज नेतृत्वाने या बदलांचे स्वागत केले नाही किंवा त्यांना उचलून धरले नाही. हां, एक गोष्ट मात्र निश्चित की, केवळ बदलासाठी बदल, कोणाला वाटतं म्हणून बदल, कोणाला संतुष्ट करण्यासाठी बदल, कायदे वा अन्य दबावाने बदल, बदलांचा गाजावाजा, बदल करताना आवेश अन आक्रस्ताळेपणा करणे, असा आक्रस्ताळेपणा करून बदलाची प्रक्रिया सुकर करण्याऐवजी संघर्ष निर्माण करणे अन कडव्या गटांना जन्म देणे; यासारख्या गोष्टी हिंदूंनी आणि संघानेही टाळल्या आहेत.

ज्ञान विज्ञानाचे वावडे ना संघाला आहे ना हिंदूंना. पण आपल्याला जे अन जसे वाटते, ते अन तसेच प्रत्येकाला वाटते किंवा वाटायला हवे, त्यानुसारच सगळ्यांनी वागायला हवे, तसे वागत नसतील तर ते कुचकामी, अशांचे जगणे अशक्य करून टाकावे; वगैरे परिवर्तनाच्या कल्पना ना संघाच्या आहेत ना हिंदूंच्या. मुळात अशा कल्पना अशास्त्रीय आहेत. अस्पृश्यता वा जातिभेदाच्या संदर्भात संघाने जेवढे काम केले आहे, तेवढे अन्य कोणीही केलेले नाही. पण संघाची स्वत:ची अशी एक शैली आहे अन ती काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे. बाकीच्यांनीही तिचे अनुकरण करावे अशी ती शैली आहे. पण रा.स्व. संघ हे आपल्या देशात `नावडतीचे मीठ' असल्याने ते अळणी ठरवले जाते. त्याला काही इलाज नाही.

सामाजिक प्रथा, परंपरा सतत बदलत असतातच. अगदी ज्या गोळवलकर गुरुजींचा कट्टर म्हणून उल्लेख केला जातो त्यांनीही हे स्पष्ट केले होते की, `हिंदू राष्ट्रवृक्षाची अनेक पाने जुनी झाली आहेत. जीर्णशीर्ण झालेली आहेत, पिकली आहेत. ती गळून जातील. ती गळून जाऊ द्यायला हवीत. त्यात वाईट वाटण्यासारखे, दु:ख करण्यासारखे, शोक करण्यासारखे काहीही नाही. या वृक्षाला नवीन पालवी फुटेल अन तो आपल्या अंगभूत जीवनरसाने पुन्हा बहरून येईल.' स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, योगी अरविंद, महात्मा गांधी, डॉ. हेडगेवार अशी मालिकाच सांगता येईल ज्यांनी नेहमीच हिंदू समाज काळानुरूप राहावा यासाठी प्रयत्न केले. मुद्दा फक्त एवढाच उरतो की- शास्त्रीय काय अन अशास्त्रीय काय? जे जे जुने ते अशास्त्रीय अशी जर धारणा असेल तर कठीण होईल. किंवा प्रयोगशाळा ही एकच शास्त्रीयतेची कसोटी असेल तर कठीण होईल. किंवा उपयुक्तता हाच शास्त्रीयतेचा एकमेव निकष असेल तर कठीण होईल. सरसंघचालकांना आपापल्या याद्या सादर करणाऱ्यांनी याचाही विचार करायला हवा.

शास्त्रीय याचा अर्थ सगळ्या अंगांचा विचार करून, अभिनिवेशरहित राहून, स्थायी- संघर्षरहित वा कमीत कमी संघर्षाच्या मार्गाने- हारजीत याच्या पलीकडे जाऊन शुद्ध विश्व कल्याणाची दृष्टी ठेवून असा जर घेतला; जो सरसंघचालकांना अपेक्षित असावा; तर अनावश्यक आक्रस्ताळा वादविवाद टाळता येऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १८ सप्टेंबर २०१५

@ Charudatta Jichkar अहो जिचकार, हिंदू धर्म authority ने चालत नाही. अन तुम्हाला हवे म्हणून त्याने तसे चालावे हा दहशतवाद झाला. आधी जरा धर्म, हिंदू, समाज, सामाजिक परिवर्तन वगैरे गोष्टी समजून घ्या नीट. त्यासाठी लोक आपली आयुष्यची आयुष्य लावतात. तुम्ही काही वर्षे तरी लावा अन मग बोला. उगाच पानटपरीवरची शेरेबाजी नका करू.

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

कावेरीचा विवाद

कावेरी प्रश्न पुन्हा पेटला. तो पहिल्यांदाच पेटलाय असं मात्र नाही. हे व्यवस्थांचं अपयश आहे. याचे दोन अर्थ होतात. १) विद्यमान व्यवस्था तोकडी आहे आणि ती बदलायला हवी. २) केवळ व्यवस्था करून प्रश्न सुटत नाहीत.

ज्यावेळी कावेरी पाणीवाटपाची व्यवस्था केली गेली तेव्हा ती पुरेशीच होती. म्हणूनच ती स्वीकारण्यात आली. मग व्यवस्था असूनही प्रश्न का निर्माण होतात? कारण कोणतीही व्यवस्था हा प्रश्न सोडवण्याचा एक भाग आहे. एकमेव भाग नव्हे, हे लक्षात घेतले जात नाही. व्यवस्था, परिस्थिती आणि माणूस हे तीन घटक मुख्यत: असतात. त्यातील व्यवस्था याच घटकाची खूप चर्चा होते. त्यावरच वेळ, पैसा, नियोजन सगळे खर्च होते. कारण ते सोयीचे असते. त्यामुळे खापर फोडण्यासाठी एक हक्काची जागा मिळते. सगळ्या सामाजिक वा अन्य प्रश्नांची हीच गत आहे. कारण परिस्थिती आपल्या हाती नसते आणि `माणूस' घडवणे किचकट, वेळखाऊ आणि काही प्रमाणात बेभरवशाचे व अगम्य काम आहे. ती धीराची व्यामिश्र प्रक्रिया आहे. त्यापेक्षा सोपेसोपे व्यवस्था तयार करणे किंवा तिच्या नावाने बोटे मोडणे, हेच आपण स्वीकारतो.

दीर्घकालीन भल्यासाठी मात्र `केवळ व्यवस्थेने प्रश्न सुटत नाहीत' हा मंत्र वारंवार जपण्याची गरज अशा वेळी जाणवते.

- श्रीपाद कोठे

१३ सप्टेंबर २०१६

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०२२

सशस्त्र क्रांती

प्रा. सरोज गिरी नावाचे कोणी डावे विचारवंत (???) आहेत. त्यांनी republic tv वरच्या चर्चेत आज उघडपणे `होय, या देशात सशस्त्र क्रांती व्हावी असे मला वाटते.' असे विधान केले. त्यानंतर झालेल्या गोंधळानंतरही `मी आपल्या म्हणण्यावर ठाम आहे,' असे ते सातत्याने सांगत राहिले. डाव्यांचे वास्तव रूप अनेकदा उघड झालेले आहेच. आज ते परत एकदा उघडे पडले. हे महाशय प्राध्यापक आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ते कशा प्रकारे प्रबोधित करीत असतील? अन देशभरातील हजारो महाविद्यालयातील असे अनेक प्राध्यापक मिळून (याचा अर्थ एकत्र येऊन किंवा सगळ्यांचे स्वतंत्र योगदान एकत्रित करून) कोणती मानवता जन्माला घालत आहेत? आमच्या पद्धतीने चला, आमचे विचार मान्य करा अन्यथा सशस्त्र संघर्ष करू; ही भूमिका कोणता विचारी माणूस मान्य करू शकेल? तरीही त्यांची तळी उचलून धरणाऱ्यांना काय म्हणायचे आणि त्यांचे काय करायचे? मानवता, सहृदयता, सहिष्णूता यांची जपमाळ ओढणाऱ्या लोकांचा चेहरा आणि मन किती विकारी, विषारी अन विखारी आहे; हे अजूनही लक्षात येऊ नये? या महाशयांनी आज इतक्या जणांचे वस्त्रहरण केले की, कितीही श्रीकृष्ण आले तरीही यांची लाज झाकली जाणार नाही. खरे तर या वस्त्रहरणाचा पोत इतका विलक्षण आहे की, उघड्या पडलेल्या सगळ्यांची तर सोडाच कुणा एकाचीही लाज झाकेल एवढे वस्त्र आज अखिल जगात उपलब्ध नाही. मानवतेला लागलेल्या या कीड्यांनी शक्य झालेच तर किमान फाटक्या चिंध्यांमध्ये तोंड लपवता आले तर लपवावे.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१७

अहो प्रसन्न जोशी

प्रसन्ना जोशी परवा जोरजोरात ओरडत होता- पितृत्वाचं काय? पितृत्वाचं काय? विषय होता- नथुराम गोडसे संघाचा होता वा नाही.

अहो प्रसन्ना जोशी (आणि कंपनी) काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? नथुराम गोडसे संघात येत असे म्हणून त्याच्या कृतीचं पितृत्व संघाकडे? अहो, महात्मा गांधी हे हरीलाल गांधी यांचे प्रत्यक्ष पिता होते? मग हरीलालच्या कृत्यांचे पितृत्व महात्मा गांधींना द्यायचे का? का नाही देत ते श्रेय? इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे श्रेय जवाहरलाल नेहरूंचे का? तायनानमेन चौकातील शेकडो विद्यार्थ्यांच्या हत्येचे श्रेय कार्ल मार्क्सच्या झोळीतच टाकायचे ना? स्टालिनने केलेला नरसंहार सुद्धा मार्क्सने तयार केलेल्या वातावरणामुळेच ना? जगभरात इस्लामच्या नावाने थैमान घालून अमाप जीवांची हत्या करणाऱ्या, अगदी कराचीतील १२५ बालकांना अल्लाघरी पाठवण्याची जबाबदारी मुहम्मद साहेबांचीच म्हणायची का?

बरे ते जाऊ द्या. संघाने तयार केलेल्या वातावरणावर तुमचा आक्षेप असतो. ठीक. संघाने तयार केलेल्या वातावरणाने गांधीजींची हत्या झाली. मग एकदोन किंवा दहा वीस नव्हे, तब्बल दहा लाख; पुन्हा सांगतो, तब्बल दहा लाख हिंदूंना यमसदनी पाठवण्यासाठी कोणी तयार केलेले वातावरण कारणीभूत होते? कधीतरी करा ना चर्चा? कराल का? तुम्ही नाही करणार याची खात्री आहे. दहा लाख हिंदूंच्या हत्येचं पितृत्व टाका ना कॉंग्रेसच्या पदरात. की ते १० लाख मृत्यू माणसांचे नव्हते? दखल घेण्यासारखे नव्हते?

इंदिरा गांधी, राजीव गांधी, दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, लालबहादूर शास्त्री, बेनझीर भुट्टो, अब्राहम लिंकन, जॉन केनेडी अशा अनेक हत्यांसाठी कोणी तयार केलेले वातावरण जबाबदार होते? अन गांधीजींची हत्या झाली तेव्हा संघ २३ वर्षांचा होता. गोळवलकर गुरुजी सरसंघचालक होऊन फक्त आठ वर्षे झाली होती. त्यानंतर २५ वर्षे गुरुजी सरसंघचालक होते. अन संघ आता ९१ वर्षांचा आहे. या काळात तसे काही वातावरण का नाही तयार झाले?

अन वातावरणाची एवढी चिंता करता, मग आजकालच्या मुलींच्या परिधानामुळे मुलांमधील लैंगिक गुन्ह्यांचे वातावरण तयार होते असे म्हटल्यावर नाकाला मिरच्या का झोंबतात? की वातावरण निर्मिती फक्त हत्येच्या संदर्भातच होत असते? अन तीही फक्त संघाकडूनच?

जरा जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगत जा हो.

- श्रीपाद कोठे

१० सप्टेंबर २०१६

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०२२

समाज म्हणजे काय?

आपण समाज, समाज म्हणतो तो काय असतो? कसा असतो? काळा की गोरा? लठ्ठ की रोडका? अन हे प्रश्न मी विचारतोय- तुमच्या माझ्यासाठी. आज सगळ्यात जास्त धोकादायक जर काही असेल, सगळ्यात जास्त त्रासदायक जर काही असेल, सगळ्यात जास्त चिंताजनक जर काही असेल; तर ते आहोत तुम्ही आम्ही. दोन वेळ भरपेट जेवण, दोन वेळ नाश्ता, अनेकदा चहा, जायला यायला गाड्या, राहायला घर, घरात पुस्तके, इंटरनेट, शिकले सवरलेले, ग्रंथालये कोळून पिणारे, रोज गळणाऱ्या टीव्हीतून ज्ञानामृत प्राशन करणारे तुम्ही आम्ही हा खरा धोका आहे. ज्यांना हे सारे उपलब्ध नाही ते ना त्रासदायक आहेत ना धोकादायक.

गुडगावच्या शाळेत एका विद्यार्थ्याचा जीव जातो. त्या प्रकरणाचे सत्य समाजापुढे आणण्यासाठी पत्रकार त्याच्या घरी पोहोचतो. डोळ्यात पाणी येणे स्वाभाविकच. त्याच्या आईशीही बोलतो. अन तिथेच उभे राहून, खोलीच्या बाहेरही न येता- सरकारला, मुख्यमंत्र्यांना, शाळा प्रशासनाला प्रश्नांवर प्रश्न विचारत सुटतो. या वा अशासारख्या घटना सरकार, मुख्यमंत्री, शाळा प्रशासन यांच्या भरवशावर सुटू शकतात का; हा प्रश्न तूर्त बाजूला ठेवू. पण त्यांना विचारावयाचे प्रश्न तरी किमान कुठे उभे राहून विचारायचे याचे भान न ठेवणारा पत्रकार म्हणजे समाज? तरुण तेजपाल विमानाने जातो आहे. त्याच्या मागे धावणारी पत्रकार; हवाई सुंदरीने बाजूला करूनही त्याचा पिच्छा सोडायला तयार होत नाही. हा समाज? परंपरानिष्ठ तरुणांनी valentine day ला भेटकार्डाच्या दुकानावर दगडफेक केली किंवा गौरक्षकांनी उत्पात केला तर; तुमचा कायद्यावर विश्वास नाही का? कायदा हातात का घेता? असा रोकडा सवाल करणाऱ्या प्रसार माध्यमांनी कायद्यावर विश्वास नसल्यासारखे वागणे आणि त्यावर काहीही न बोलणे म्हणजे समाज? जबाबदार फक्त शासन, प्रशासन? शालेय विद्यार्थ्यांमध्ये बेजबाबदारपणे वागण्याची इच्छा जागवणाऱ्या जाहिराती आणि त्या करवून घेणारे उत्पादक, तसेच दूरगामी परिणामांचा विचार न करता `गंमत हो' म्हणून त्याचे समर्थन करणारे पालक; या सगळ्यांना काहीच जबाबदारी नसणे म्हणजे समाज?

@@@@@@@

मेधा खोले नावाच्या एका महिलेने जी काही तक्रार केली; त्यासाठी हातची कामे सोडून गोंधळ माजवणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? कायद्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे काय करायचे असते हे न समजणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? व्हायचे ते होईल ना त्याचे. त्यासाठी आपापसात लाथाळी करणारे, भूमिका घेणारे, कधी थेट शिवीगाळ करणारे किंवा ते फार वाईट दिसेल म्हणून विनोदाची शाल पांघरून कुचाळक्या करत, आपल्या मनातील न गेलेली जात दाखवून देणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? प्रथा, परंपरा, रूढी, मान्यता, श्रद्धा, व्यवहार आणि कायदे, नियम आदींचा संबंध, अनुबंध इत्यादीवर पाच मिनिटेही गंभीर विचार करण्याची क्षमता आणि पात्रता नसलेले तुम्ही आम्ही म्हणजे समाज? आदर्श विचार, व्यवहार हा पांढऱ्यावर काळे करण्याचा विषय नाही आणि पांढऱ्यावर काळे करून तो साधताही येत नाही. तो जगण्याचा विषय आहे. मन मोठं, सखोल, व्यापक होणं म्हणजे आदर्श होत जाणं. एखाद्याला शिक्षा देऊन अथवा तो वाईट वागला म्हणून टीका वा टवाळी करून त्याचं मन मोठं आणि शुद्ध होईल का; हा प्रश्नही न पडणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? अन अमुक कोणी असा वागला असं म्हणताना, मागच्या क्षणापेक्षा या क्षणी मी व्यापक, शुद्ध, समजदार झालो आहे हे स्वत:ला सांगणे ही देखील माझी जबाबदारी असते; याचे भानही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? षड्रिपूंमध्ये फक्त काम आणि क्रोध एवढेच नाहीत; लोभ, मोह, मद, मत्सर हेही आहेत. हे सारे कमी करत जाण्याऐवजी वाढवण्यातच आयुष्य घालवणारे आणि झुंडीलाही त्यात काहीही वावगे वाटत नसल्याने त्याचे समर्थन करीत राहणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज? मेधा खोले यांच्यापेक्षा आपणही फार वेगळे नाही आहोत हे समजण्याची लायकीही नसणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@

गौरी लंकेश यांच्याविषयी हळूहळू जे बाहेर येत आहे त्यावरून त्या बाईंचा वकूब फारच सुमार होता आणि वृत्तीही चांगली नव्हती हे सिद्ध होते. जीएसटीच्या विषयावर चर्चा सुरु असताना वापरलेले sanitary napkins पंतप्रधानांना पाठवण्याची भाषा बोलणारी स्त्री सभ्य म्हणायची का? अशी भाषा उद्या मी वापरली तर?? की भाजप, संघ, हिंदुत्व यांना विरोध करणारे कोणीही फक्त योग्यच असतात? दुर्दैवी हत्याकांडाचे दु:ख मलाही आहे, तुम्हालाही आहे. दुर्दैवी हत्याकांडाची चिंता मलाही आहे, तुम्हालाही आहे. माझा सवाल एवढाच की, दुर्दैवी हत्याकांडामुळे हलकटपणाकडे दुर्लक्ष करायचे का? समाज काय असतो? कोणत्या तरी सोयीच्या घटनेचा आडोसा घेऊन हलकटपणाकडे दुर्लक्ष करणारे तुम्ही आम्ही म्हणजे समाज?

@@@@@@@@@@

या सगळ्याला थेट भिडल्याशिवाय आणि ते भिडताना स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची खोड टाकून दिल्याशिवाय तुम्हाला मला हवे असलेले चित्र तयार होणार नाही एवढे मात्र निश्चित.

- श्रीपाद कोठे

नागपूर

९ सप्टेंबर २०१७

चामड्याच्या पट्टा

येताजाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सहिष्णू होण्याचा उपदेश देणाऱ्यांसाठी-

जैन बांधवांच्या व्रतानिमित्त मांसविक्री बंद करण्याच्या विषयावरून दिसून येणाऱ्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, संघाचा तीन वर्षांपूर्वीचा एक निर्णय केवढा लक्षणीय ठरतो. संघात गणवेषासाठी वापरला जाणारा पट्टा पूर्वी चामड्याचा राहत असे. एका उत्सवाला जैन मुनी पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी विचारले- या चामड्याच्या पट्ट्याला पर्याय देता येणार नाही का? अन संघाने प्रतिनिधी सभेत विचार करून निर्णय घेतला की, पट्टा चामड्याचा राहणार नाही. पुन्हा या गोष्टीचा गाजावाजा देखील नाही. दुसऱ्यांचा आदर, बदलाची मानसिकता अन स्वाभाविकता याचे हे मनोज्ञ उदाहरण आहे.

कोण काय आहे अन किती पाण्यात आहे हे समजण्यासाठी एवढे पुरे.

- श्रीपाद कोठे

९ सप्टेंबर २०१५

लंबक

१) सहिष्णुता,

२) सर्वधर्म समभाव,

३) सगळ्यांचा आदर,

४) अल्पसंख्यकांचे हक्क,

कुठे गेले हे सगळे? जैन बांधवांसाठी चार दिवस मांस-मच्छी नाही खाल्ले तर कोणते आभाळ कोसळणार आहे? चार दिवस मांस खायला नाही मिळाले तर काय मरण ओढवणार आहे? खरे तर तसे झाल्यास चांगलेच होईल. पृथ्वीचा भार कमी होईल. एका कबुतराला वाचवण्यासाठी स्वत:चे मांस काढून देणाऱ्या शिबी राजाच्या या देशात चार दिवस मांसाहार करता येणार नाही यासाठी एवढा आक्रोश? शेजारच्या घरी एखादा मृत्यू झाल्यास त्या घरी चूलही पेटू न देता, सगळ्यांची जेवणे करण्याची जबाबदारी घेणारा समाज एवढा `स्व' केंद्रित व्हावा? स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थाने एवढा बरबटून जावा? बाकीच्यांचे काय व्हायचे ते होवो, आम्हाला हवे ते, हवे त्या वेळेला, हवे तसे झालेच पाहिजे !!! कोणते तत्वज्ञान आहे हे? अन यावर कोणीही काहीही बोलू नये? तथाकथित आधुनिक विचारांची अन तत्वांची वगैरे एवढी मानसिक गुलामी? निर्लज्जता या शब्दानेही मान टाकावी एवढी दयनीय अवस्था? या निर्लज्जांना हे ठासून सांगितलेच पाहिजे की, तुमचा बौद्धिक दहशतवाद चालणार नाही. कोणाला आम्ही हिटलर वाटलो तर वाटलो. तुम्ही जर अतिरेक करणार असाल तर लंबक जागेवर आणण्यासाठी आज ना उद्या दुसऱ्या टोकाला ताकद लावावी लागेलच.

बाय द वे- स्वत:च्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी जिवंत प्राण्यांच्या मानेवर सुरी फिरवणाऱ्यांना माणसांच्या मृत्यूवर येताजाता गळे काढण्याचा अधिकार राहावा का? ही सृष्टी तुमच्या बापाची नाही. यच्चयावत जीवजंतु, वनस्पती, माणसे सगळ्यांची आहे.

- श्रीपाद कोठे

९ सप्टेंबर २०१५

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२

थट्टेखोरांसाठी

डॉ. मोहनजी भागवत यांच्या 'भारतातील सगळे हिंदूच' या वक्तव्यावरून आधीही चर्चा झाली होती आणि कालपासून पुन्हा सुरू झाली आहे. या वक्तव्यावर टीका करणारे किंवा त्याची थट्टा करणारे यांनी अनंत काणेकर या प्रसिद्ध मराठी साहित्यिकांचं 'धुक्यातून लाल ताऱ्याकडे' हे छोटंसं पुस्तक वाचावं. १९३६-३७ साली लिहिलेलं हे पुस्तक, रशियातील कम्युनिस्ट क्रांतीचा चमत्कार भाविकपणे पाहण्यासाठी केलेल्या प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे. काणेकर अजिबात हिंदुत्ववादी नव्हते. डॉ. भागवत यांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने त्यात काय लिहिलेले आहे ते टीकाकारांनी आणि थट्टेखोरांनी वाचावे. त्यावेळी डॉ. भागवत यांचा जन्मही झाला नव्हता. राजकीय आखाड्यात जे कानावर पडते तेवढेच म्हणजे जगाचे संपूर्ण ज्ञान असे समजणाऱ्या सगळ्यांना कोपरापासून नमस्कार.

(या पुस्तकावरील माझा जुना लेख सापडला तर नक्की शेअर करीन.)

संघाची सहिष्णुता

संघाची असहिष्णूता, विरोधी विचारांची गळचेपी यावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहज काही गोष्टी मनात आल्या. नागपूर हे संघाचे मुख्यालय. काहीही झाले की, नागपुरातून आदेश आहे का? अशी विचारणा होते. याच नागपुरात `तरुण भारत' नावाचे एक दैनिक वृत्तपत्र आहे. ते संघाचे मुखपत्र आहे असे लोक समजतात. त्या दैनिकाने लेखक, विचारवंत म्हणून ज्यांना समाजात मान्यता मिळवून दिली; त्यातील तीन नावे- दिवंगत भा. ल. भोळे, श्री. सुरेश द्वादशीवार, डॉ. भाऊ लोखंडे. हे तिघेही ज्येष्ठ लेखक, विचारवंत पूर्वीही कधी आणि आताही संघाचे दुरान्वयेही समर्थक वा हितचिंतक नव्हते, नाहीत. संघाच्या मुखपत्राने मात्र त्यांचे स्तंभ अथवा अन्य लेखन आवर्जून आणि कधीकधी मागून घेऊन प्रसिद्ध केले. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस `तरुण भारत'चे अध्यक्ष असताना संघाशिवाय अन्य लोकांचे लेख, त्यांच्या बातम्या छापायला हव्यात यासाठी किती आग्रही होते हे सर्वपरिचित आहे. बरे, हा फक्त इतिहास आहे का? तर नाही. आजच्या घडीला संघाला पाण्यात पाहणारी आणि सोशल मीडियावर सतत संघाविरुद्ध आघाडीवर असणारी दोन नावे आहेत- अतुल अच्युतराव सोनक आणि अरुणाताई सबाने. तरुण भारतने यांचेही स्तंभ चालवले आहेत आणि आजही त्यांचे लेखन तरुण भारत प्रसिद्ध करीत असते. एवढेच कशाला, आज तरुण भारतचे संपादक असलेले (नेमके designation मला लक्षात नाही. पण पहिल्या तीनमध्ये असलेले) श्री. श्याम पेठकर हे तर तरुण भारतात कार्यरत आहेत आणि सतत लिहित असतात. ते दुरान्वयानेही संघाचे समर्थक वा हितचिंतक नाहीत. त्यांचे मित्रमंडळ, त्यांची उठबस असलेले लोक, त्यांचे विचार आणि त्यांचे लिखाण सगळ्यांना ठाऊक आहे. ही काही नावे फक्त उदाहरण म्हणून आहेत. या नावांशी माझे कोणतेही शत्रुत्व नाही. उलट, सगळ्यांशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. याबाबतीत आणखीन एक मी नक्की सांगू शकतो की, संघाचे समर्थक वा हितचिंतक यांना `तरुण भारत'ची ही भूमिका अनेकदा पटत नाही. आवडत नाही. अनेकदा ते त्यामुळे नाराजही असतात. तरीही `तरुण भारत'च्या सुरुवातीपासून अगदी आजच्या क्षणापर्यंत ही भूमिका सतत राखण्यात आली आहे. कमीअधिक प्रमाणात देशभरातील संघप्रेरणेने चालणाऱ्या प्रसार माध्यमात हेच चित्र आहे. संघाच्या मुख्यालयातून काही संदेश जात असेल तर तो हा आहे.

याउलट- १९९७ साली देश स्वातंत्र्याची सुवर्णजयंती साजरी करीत असताना, मी लोकसत्ता दैनिकात वर्षभर लिहिलेल्या, विदर्भातील स्वातंत्र्य संग्रामावरील स्तंभाचा ३६ वा किंवा ३७ वा लेख थांबवण्यात आला होता. कारण काय? तर तो लेख होता, महात्मा गांधी यांनी वर्धेच्या संघ शिबिराला दिलेल्या भेटीवरील. संघाची गांधीविरोधी प्रतिमा रेटायची असेल तर हे करणे भागच ना? मीही भूमिका घेतली- माझा तो लेख छापाल तरच पुढील मालिका चालवायची. त्याला नकार मिळाल्याने ५२ भागांची मालिका मध्येच मी थांबवली. असे वेगवेगळे खूप अनुभव आहेत. खूप व्यक्तिगत होईल म्हणून ते टाळतो. फक्त एक उल्लेख मात्र करतो. दिवंगत नरेंद्र दाभोळकर या भल्या माणसानेही संघ वा हिंदुत्व यावरील माझा लेख प्रसिद्ध करायला मला व्यक्तिश: स्वच्छ आणि स्पष्ट नकार दिला होता.

यावर वेगळे काही म्हणणे आवश्यक आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

७ सप्टेंबर २०१७

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

रुदाली

गौरी लंकेश यांच्या हत्येचे मला दु:ख आहे. मी त्याचा निषेध करतो आणि हे कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावे, अशीही माझी इच्छा आहे. कोणाला हे प्रामाणिक वाटो की न वाटो. माझी ती भावना आहे आणि विचारपूर्वक बनवलेले मतही. मात्र त्याचवेळी, एकाच श्वासात मला हेही सांगायचे आहे की, या निमित्ताने सार्वजनिक रुदाली करणाऱ्या बहुतांश लोकांवर माझा विश्वास नाही. कारण, याच दक्षिण भारतातल्या केरळ राज्यात संघ स्वयंसेवकांच्या ज्या हत्या झाल्या त्यासाठी तोंड उघडण्याचा प्रांजळपणा मला या रुदालींमध्ये दिसला नाही. `आम्हाला आमच्या प्रामाणिकपणासाठी कोणाच्या certificate ची गरज नाही' असा शहाजोगपणा त्यांनी जरूर करावा. परंतु आपला प्रामाणिकपणा पटवून देण्याची आणि सिद्ध करण्याची त्यांची धमक नाही हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. कम्युनिस्टांनी केलेल्या राजकीय हत्यांची जाहीर कबुली देणारी अन त्याचे समर्थन करणारी व्यक्ती केरळ मंत्रिमंडळात आजही आहे. यावर शेपूट घालणाऱ्या या रुदालींचाही मी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांसोबतच निषेध करतो.

- श्रीपाद कोठे

६ सप्टेंबर २०१८

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

महागाई

दारावर नेहमी येणाऱ्या भाजी विक्रेत्याला आज विचारले, आपल्या वस्तीत भाजी व्यवसाय करणारे किती जण असतील? म्हणाला, पुष्कळ आहेत. पण सध्या दहा असतील. भाज्या महागल्याने कमी झाले. भाज्या उतरल्या की वाढतील पुन्हा. त्याच्या उत्तरावरून स्पष्ट आहे की, महागाईने केवळ ग्राहक कमी होत नाहीत तर व्यवसाय करणारे, म्हणजेच रोजगारही कमी होतात. महागाई वाढत जाणे हे अर्थशास्त्राच्या अंगानेही योग्य नसते. दुर्दैवाने महागाई न वाढवणारा अर्थविचार जग आणि तज्ञ म्हणवणारे करत नाहीत.

- वाढू द्या हो महागाई. गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यालाच चार पैसे मिळतील ना. असा युक्तिवाद करणारे भाबडे असतात असेच म्हटले पाहिजे. भाज्या पाच रुपये, दहा रुपये किलो असण्याचे वास्तव अनेकांच्या गाठीशी असेल. आज भाज्या ८० रुपये किलोला पोहोचल्या आहेत. म्हणजे किमान आठ पट. शेतकऱ्यांचा पैसा आणि जीवनमान, भाजी विक्रेत्यांचा पैसा आणि जीवनमान तसे वाढले आहे का? किती जणांचे वाढले आहे? दलाल ही एकच समस्या आहे का? मुळात ही समस्या आहे की व्यवस्थेतील त्रुटी?

- शेतकऱ्याला पैसा मिळण्याचा विचार करतानाच; भाजी, धान्य, किराणा आदी गोष्टी; समाजातल्या 'आहे रे' आणि 'नाही रे' या दोन्ही वर्गांसाठी असतात; या वास्तवाचा विचारही हवा की नको?

- नीट, सखोल, साधकबाधक विचार न करता वरवर काहीतरी बोलणे, सुचवणे, करणे; असलेल्या नसलेल्या करुणेचे प्रदर्शन; या गोष्टी टाळणे आपल्याला कधी जमणार?

- श्रीपाद कोठे

५ सप्टेंबर २०२०

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

गांधी हत्या, रा. स्व. संघ आणि देवदास गांधी

राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर गांधी हत्येचा आरोप केल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानंतर १५ दिवसांच्या आतच, त्यांचे पुत्र देवदास गांधी यांनी त्या प्रकरणावर एक लेख लिहिला होता. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी त्यांनी लिहिलेला हा लेख गांधीजींनी सुरु केलेल्या साप्ताहिक हरिजनमध्ये १५ फेब्रुवारी १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. लेखाचे शीर्षक होते- `i speak as an orphan'. देवदास गांधी हे महात्मा गांधींचे पुत्र तर होतेच, पण हिंदुस्थान टाईम्स या अग्रगण्य दैनिकाचे संपादक सुद्धा होते. त्यांच्या दीर्घ लेखात त्यांनी त्या घटनेचा पुष्कळ आढावा घेतला आहे. तो सगळा मुळातून वाचण्यासारखा आहे. रा. स्व. संघाच्या संदर्भात देवदास गांधी यांनी त्या लेखात काय म्हटले आहे? ते खालीलप्रमाणे-

`the rss was once a movement which evoked my admiration. physical culture, drill, early rising and a disciplined living was its basis when it commenced. but soon adventurers came into the picture. some saw in it personal salvation and political opportunity. deterioration set in. shocking things began to be said by some of the leaders. first in private, then even publicly. at last someone started harbouring the darkest thoughts. but let us not loose our perspective. there are people in the hindu mahasabha and in the rss who would have given their lives to save gandhiji had they known. and this obviously applies to the vast majority of them. there is no more than a handful of individuals who are guilty of this crime. nor should we confuse maharashtra with a few maharashtrians who have lurking accomplices elsewhere. it is said that some of them celebrated the events by eating sweets. that is too comic for words.'

या अतिशय स्पष्ट भूमिकेवर वेगळ्या भाष्याची गरज नाही. त्याच्या अन्वयांबद्दल पुन्हा केव्हा तरी.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१७

आंधळेपणा

दिवसाची स्थिती वेगळी असते, रात्रीची वेगळी असते. बालकांची स्थिती वेगळी असते, वृद्धांची वेगळी असते. शाळा महाविद्यालयातील स्थिती वेगळी असते, चित्रपटगृहातील वेगळी असते. तशीच विकसित देशातील स्थिती वेगळी असते, अविकसित देशातील स्थिती वेगळी असते. भरपूर जमीन, कमी लोकसंख्या, भरपूर साधने, वेगळा विकासक्रम असलेले देश आणि कमी जमीन, मोठी लोकसंख्या, निराळा विकासक्रम असलेले देश यांची स्थिती वेगळी असते.

हे पुराण लावण्याचे कारण म्हणजे सध्या चर्चेत असलेला वाहन कायदा. मुळात पर्यावरण हा विषय गुंतागुंतीचा. त्यावर नीमहकीम तोडगे असू शकत नाहीत. एकीकडे उद्योगांपासून तर अनेक गोष्टींनी प्रदूषण वाढवायचे आणि पियुसी प्रमाणपत्र नसेल तर मोठा दंड करून प्रदूषण नियंत्रण करण्याचा देखावा करायचा हे योग्य नाही. आज सर्वत्र रस्ते, मेट्रो, रेल्वे, बांधकामे यासारखी कामे सुरू आहेत. त्यांनी प्रचंड प्रदूषण होते. त्याचा दंड कोण भरणार? त्याच्या परिणामांचे काय? दुसरीकडे चप्पल घेण्यासाठीही महिन्याच्या बजेटचा विचार करणाऱ्या सामान्य माणसाला वाहन कायद्याचा धाक दाखवायचा? कष्टाने आपला संसार उभा करणारी व्यक्ती कष्ट थोडे कमी व्हावे यासाठी गाडी घेते त्याला नियम आणि कायद्याच्या फेऱ्यात अडकवणार? बरं त्याच्या घरी दोन चार झाडे असली तर त्याला प्रदूषण कमी केल्याबद्दल काही पैसा देणार का? फटाके फोडून प्रदूषण करणारे आणि फटाके न फोडणारे यांना एकच न्याय लावायचा का? झाडांचा आणि मातीचा पत्ता नसणाऱ्या टोलेजंग सदनिकांमध्ये राहून, एसी आणि गाड्यांनी प्रदूषण वाढवणारे आणि बाकीचे यांना एकच न्याय का? हेल्मेट सारख्या बाबतीत व्यावहारिक विचार हवा की नको? इतके करून सगळे नियम पाळणाऱ्या कोणाला दुर्दैवाने जीव गमवावा लागला तर संबंधित अधिकारी, मंत्री राजीनामे देतील का?

या बाबतीत आणखीन एक कोन असू शकतो. आज भारताला जगाच्या बरोबरीत उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय आर्थिक विकासासाठी गुंतवणूक आकर्षित करणे इत्यादी आहेच. तेव्हा त्यांनी तयार केलेले मापदंड, त्यांच्या अपेक्षा, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी; यानुसार चालणे, निर्णय घेणे, योजना, कायदे इत्यादी करण्याचा एक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव असू शकतो का? नक्कीच असू शकतो. परंतु असा दबाव झुगारून देण्यासाठी; याच्यात्याच्याकडे न पाहता स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या पद्धतीने चालण्यासाठी लागणारी शक्ती- युक्ती- बुद्धी- यांचाही लेखाजोखा घ्यायला हवा. ते कठीण आहे हे मात्र खरे.

- श्रीपाद कोठे

४ सप्टेंबर २०१९

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

माणूस असा असतो?

दिनूकाका गेले. दिनूकाका म्हणजे दिनकरराव जोशी. भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. एकाच वेटाळात राहणारे, एकाच शाखेचे स्वयंसेवक, `national organisation of bank workers' (NOBW) या संघटनेत अन पर्यायाने भारतीय मजदूर संघात वडील अन ते दोघेही सक्रिय, दत्तोपंत ठेंगडी ही समान श्रद्धा; या कारणांमुळे दिनकरराव झालेत दिनुकाका. नागपूर शहर विस्तारू लागले आणि `महाल' या नागपुरच्या मूळ वस्तीतील लोक शहराच्या वेगवेगळ्या दिशांना नवीन वस्त्या वसवू लागले. दिनुकाका अन वडील दोघेही याच पद्धतीने `भगवाननगरात' आले. त्यावेळच्या भगवाननगराची आता फक्त कल्पनाच करायची. आजूबाजूला शेते पसरलेली, रस्ते नाहीत, वीज नाही, वाहने वगैरे तर कोणाकडेच नव्हती. वाहन म्हणजे सायकली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे. पलीकडच्या मानेवाडा गावाच्याही पलीकडे घोगली नदी, जंगल वगैरे. त्या जंगलातील कोल्हे वगैरे प्राणी वस्तीपर्यंत येत असत असे त्यावेळचे जाणकार सांगतात. अशा या वस्तीत स्वाभाविकच सगळ्यांचा सगळ्यांशी घरगुती परिचय. सणवार, हळदीकुंकू अशा निमित्तांनी घरोघरी प्रत्येकाचे जाणेयेणे. त्यातच काही संघाची मंडळी. त्यांनी स्वाभाविकच शाखा सुरु केली. परस्पर संपर्क, सहयोग, आधार आणि परिचय यांना त्याचाही हातभार लागला. गेल्या शतकातील ६० च्या दशकाच्या उत्तरार्धाचा हा काळ. दिनुकाकांना तेव्हापासून पाहिलेले.

सुरुवातीला संघाची भगवाननगर शाखा आजच्या भगवाननगर चौकाच्या शेजारी लागत असे. आजचे शाखेचे स्थान आणीबाणीनंतरचे. तेव्हाच्या शाखेचे मैदान दिनुकाकांच्या घराच्या जवळ. त्यामुळे शाखेसाठी रोज लागणारे ध्वज, ध्वजदंड इत्यादी सामान त्यांच्याच घरी ठेवत असत. त्यामुळे रोज सायंशाखा आटोपल्यावर सगळेजण ते सामान परत ठेवण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी जात. तिथे पाणी वगैरे पिऊन मग घरी परतायचे. तासभर खेळ वगैरे झाल्याने तहान लागत असेच. इकडे आम्ही बच्चे कंपनी पाणी पीत असताना तिकडे गोठ्यातल्या गायींना ठेवलेली पाण्याची बादली उचलून ठेवून दिनुकाका सायकलने बाहेर पडत असत, भगवाननगरातून सीताबर्डीवरील NOBW च्या कार्यालयात जायला. हा त्यांचा रोजचा शिरस्ताच होता. सकाळी उठल्यावर प्रभात शाखा, नंतर चार घरी संपर्क करून आंघोळ- पूजा- जेवण करून सायकलने रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी जाणे, बँक आटोपल्यावर घरी परतताना घरच्या गायींसाठी कॅरियरवर बांधून चारा घेऊन येणे. घरी आल्यावर हातपाय धुवून गायींना चारापाणी करणे, दूध काढणे, जेवणे, तयार होऊन NOBW च्या कार्यालयात जाणे. रात्री १०-११ वाजता घरी परतणे.

कित्येक वर्षे हा क्रम होता. हळूहळू यात काही बदल झाले. सायकलची प्रथम व्हिकी झाली, मग बजाजची स्कूटर झाली, मग स्कुटी, मग अॅक्तिव्हा; असे बदल झाले. घरच्या गायीही कमी झाल्या, मग संपल्या. दिनुकाका हे त्यांच्या काकांजवळ राहिले. त्यांना सगळे रामभाऊ काका म्हणत. ते नवयुग विद्यालयात शिक्षक होते. त्यांना मुलगा नसल्याने दिनुकाका त्यांच्याजवळ राहिले. दिनुकाका हे रामभाऊ काकांच्या भावाचा मुलगा. रामभाऊ काकांना सात मुली. अन दिनुकाका त्यांचा एकुलता एक भाऊ. मात्र या कौटुंबिक वास्तवाचा कोणाला थांगपत्ताही लागू नये, असा सगळ्यांचा व्यवहार. अकृत्रिम, सहज, आतून आलेला. सगळ्या बहिणींची शिक्षणं, लग्न, संसार, काका-काकूंचा सांभाळ, तब्येती, त्यांचे स्वर्गवास असे सगळे इतक्या सहज, निर्व्याज, हसतमुख पद्धतीने की विचारता सोय नाही.

आणीबाणीच्या काळात रामभाऊ काका नागपूर कारागृहात होते. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी घरावर होतीच. दिनुकाका संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्यावर पण जबाबदारी होतीच. भूमिगत पत्रकांचे वितरण, कारागृहातील स्वयंसेवकांच्या कुटुंबांची जबाबदारी, त्या कुटुंबांची आर्थिक मदत- त्यांना धीर देणे- दुखणी- अडचणी- अशा अनेक गोष्टी; शिवाय बैठका वगैरे. हळूहळू दिनुकाकांचे घरचे व्याप आणि जबाबदाऱ्या कमी झाल्या, तशा बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. भारतीय मजदूर संघाच्या कामातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. प्रथम विविध कामगार संघटना, नंतर भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रांताची जबाबदारी, मग क्षेत्राची जबाबदारी, मग अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अशी ती चढती भाजणी होती. संघ आणि संघ परिवाराच्या रचनेनुसार वरचे पद म्हणजे मोठी जबाबदारी, अन मोठी जबाबदारी म्हणजे अधिक काम, अधिक वेळ देणे अन अधिक परिश्रम. त्यामुळेच दिनुकाकांचे वय वाढत होते तसेच परिश्रमसुद्धा. प्रवास, दौरे सतत सुरु असत. पण न थकता, न कुरकुरता, न तक्रार करता हे सगळे सुरु होते. अन हे सगळे करतानाच प्रभात शाखेत जाणेही थांबले नाही. भारतीय मजदूर संघाचे काम करतानाच संघातील सक्रियता भंगली नाही. त्यामुळेच संघ शिक्षा वर्गातही वर्ग कार्यवाह म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या शाखेत जाणे किंवा संघाचा गणवेश घालून घराबाहेर पडणे अतिशय कठीण असल्याच्या काळात अन नवीन, पूर्णत: प्रतिकूल असलेल्या वस्तीत पाय रोवून उभे राहणे सोम्यागोम्याचे काम नाही. संघाच्या सुरुवातीच्या काळात हजारो स्वयंसेवकांनी ते केले आहे. दिनुकाका त्यातीलच.

दिनुकाकांना मुलबाळ नव्हते. पण त्यांच्या व्यवहारात, विचारात, मानसिकतेत त्याचा कुठेही परिणाम जाणवला नाही. कधीही अन कोणालाही. तोंडाने आपल्या अभावांचा, त्रासाचा उच्चार करणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. हा विलोप किती असावा? तर कालच्या त्यांच्या अंत्ययात्रेत डॉ. रामभाऊ तुपकरींनी मला हळूच विचारले- श्रीपाद, दिनूभाऊंना मुलबाळ काय? डॉ. रामभाऊ तुपकरींनी हे विचारणे याला खूप महत्व आहे. ज्याला रामभाऊ तुपकरी माहीत आहेत त्यालाच हे कळेल. संघातील एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, तरुण भारतचे प्रकाशन करणाऱ्या नरकेसरी प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम अर्बन बँकेचे संस्थापक संचालक, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम मेटॅलर्जी विभागाचे प्रमुख आणि नंतर अधिष्ठाता; असे रामभाऊ. संघ आणि परिवारातील अनेक वरिष्ठांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध. त्यात दिनुकाकाही आलेत. पण दिनुकाकांना मुलबाळ नाही हे त्यांनाही माहीत नव्हते. इतकी विलोपी वृत्ती. हे त्यांच्या व्यवहारातही दिसून येत असे. वयाच्या ८० पर्यंत सुद्धा घरची बिले भरणे आदी कामे ते स्वत: करत. घरातील हवेनको, भाजी-किराणा, औषधपाणी, दुरुस्ती-डागडुजी वगैरे सगळे. घरी येणाऱ्यांचा राबता तर होताच. काकू नेहमीच हसून स्वागत करीत. चहापाणी, खाणेपिणे करीत. पण काकूंचा चहा झाला की, स्वयंपाकघरात जाऊन तो बैठकीच्या खोलीत घेऊन येणे अन आलेल्याला देणे हे दिनुकाका करीत.

वृत्तीची ही सात्विकता नेहमीच अनुभवायला मिळत असे. दोन वर्षांपूर्वी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांचा एक कार्यक्रम भगवाननगरात झाला. कार्यक्रम अगदी घरगुती. नगराचे संघचालक डॉ. रमाकांत कापरे यांच्याकडे जेवण. त्यानिमित्ताने डॉ. कापरेंनी सगळ्या जुन्या, मोहनजींसोबत काम केलेल्या स्वयंसेवकांनाही भोजनाला बोलावले होते. सुरुवातीला एकत्र बसणे, गप्पा वगैरे अन मग भोजन असा कार्यक्रम. गप्पा वगैरे झाल्या. उपलब्ध जागेनुसार भोजनाची व्यवस्था दोन भागात झाली. सरसंघचालक, काही स्वयंसेवक, घरची मंडळी यांची पंगत डॉ. कापरेंकडे झाली, अन त्यांच्याच घरापुढील राचलवार यांच्या घरी बाकी लोकांची व्यवस्था. जेवणे वगैरे झाल्यावर सरसंघचालक थोडा वेळ डॉ. कापरे यांच्याकडे बसले. नंतर कार्यालयात परत गेले. दिनुकाका मात्र त्यावेळी समोरच्या घरी भोजन वगैरे आटोपल्यावर सरसंघचालकांना निरोप देण्यासाठी बाहेर उभे होते. आपण वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहोत, आत जाऊन बसलो तर कोण काय म्हणणार आहे? किंवा भोजन करून निघून गेलो तर काय होते? किंवा आपल्याला कोणी बसा वगैरेही म्हटले नाही; असे काहीही त्यांच्या मनाला शिवले सुद्धा नाही. लहान मोठ्या, मान अपमानाच्या कृतक कल्पना त्यांच्या जवळही फटकत नसत.

व्यक्तिगत अनुभवही असाच असायचा. वास्तविक मी म्हणजे त्यांच्यासमोर `पोर'. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून त्यांनी मला पाहिलेले. पण मोठा झालो, पत्रकारितेत आलो, त्यामुळे थोडीबहुत ओळख निर्माण झाली, थोडे लिहू बोलू लागलो; त्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. बोलताना एकेरी बोलत असले तरीही `पोर' म्हणून न वागता सन्मान राहत असे. आपल्यालाच ते बरं वाटत नसे. पण त्यांनी सहजपणे तो बदल केला. असा बदल करणे सोपे नसते. मनाचे उमदेपण आणि मोठेपण त्यासाठी हवे. एकदा स्व. दत्तोपंत ठेंगडी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. त्यांनी मला भेटायला बोलावले. त्या भेटीच्या वेळीही त्यांचा हा विलोपीपणा पाहायला मिळाला. स्व. दत्तोपंत आणि मी जवळपास तीनेक तास बोलत होतो. काकूंच्या हातचा इडलीसांबार अन चहाचा आस्वाद घेत आमचे बोलणे सुरु होते. पण दिनुकाका तेथे येऊनही बसले नाहीत. ते माझ्यापेक्षा वयाने तर मोठे होतेच, भारतीय मजदूर संघात मोठे पदाधिकारी होते, त्यांचेच घर होते; ते आले असते, बसले असते, बोलले असते तर त्यात वावगे काहीच नव्हते. पण पंतांनी मला बोलावले होते अन आम्ही बोलत होतो, तेव्हा बाजूला राहण्यात त्यांना कसलाही अनमान वाटला नाही.

निरपेक्ष आत्मीयता हाही दिनुकाकांचा विशेष. त्यातून गोष्टीवेल्हाळ. जो दिसेल त्याच्याशी बोलणार, त्याची विचारपूस करणार, कोणी कधीही गेला तरी त्याला उपलब्ध असणार, त्याच्यासाठी वेळ देणार. म्हणूनच वस्तीत असो वा भारतीय मजदूर संघात त्यांचा लोकसंपर्क अन लोकसंग्रह अफाट होता. शाखेत येणारे स्वयंसेवक, त्यांचे घरचे लोक यांच्याशी तर त्यांचा संबंध होताच; पण शाखेत कधीही न येणाऱ्यांशीही त्यांचे जातायेता अनौपचारिक बोलणे, विचारपूस राहत असे. या लोकसंग्रहात उच्च जातींचे समजले जाणारे, खालच्या जातींचे समजले जाणारे, दलित, आदिवासी, मुसलमान, ख्रिश्चन, महिला असे सगळेच होते. अशा प्रकारच्या संबंधांचे अनेक हृद्य अनुभव त्यांच्या संग्रही होते. ते किस्से बरेचदा ऐकायलाही मिळत असत. गेली काही वर्षे त्यांच्या पायांनी त्यांच्याशी असहकार केला होता. दहापंधरा मिनिटे उभे राहणेही कठीण होत असे. पण फिरणे, गाडी चालवणे, प्रवास, संपर्क हे सारे सुरूच होते. कामाच्या निमित्ताने देशभर फिरून झाले होते. कामगार संघटनेचे काम केल्याने उद्योगपती, मालक, सरकार अशांशी देखील परिचय होता. विविध भाषा बोलत असत. सहज बोलताना मराठीवरून कधी हिंदीवर, तर कधी इंग्रजीवर जात असत. अन ते देखील धाराप्रवाही.

२३ ऑगस्टला त्यांनी घरी सत्यनारायण पूजा ठरवली होती. श्रावण मासानिमित्त. त्यासाठी सोवळे नेसून तयार असतानाच ते खाली पडले. लगेच दवाखान्यात भरती करण्यात आले. मेंदूतील रक्तस्रावाने ते कोसळले होते. त्याचेच रुपांतर अंग लुळे पडण्यात झाले. त्याउपरही उपचारांना प्रतिसाद देत होते. पण परवा, १ सप्टेंबरला संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली. १२ ऑगस्ट रोजी त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली होती. एक कृतार्थ आणि सुदीर्घ आयुष्य जगून दिनुकाका गेले.

स्वत:साठी काही न मागता, कशासाठीही कुरकुर वा तक्रार न करता, अभावांचा वा कष्टाचा बाऊ न करता, आपला विचार कमी आणि बाकीच्यांचा विचार जास्त; असे जगता येते का? माणसे अशी जगतात का? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर `होय' असे आहे. दिनुकाका हे त्याचे उदाहरण आहे. त्यांच्यासारखी माणसे पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा; साधेपणा, माणुसकी, आत्मविलोपी वृत्ती, कष्ट, निर्वैर या केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत, जगण्याच्या गोष्टी आहेत यावर अविश्वास ठेवण्याचे कारण उरत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, ३ सप्टेंबर २०१५

Secularism

secularism ही कल्पनाच मुळात भुक्कड आहे. सत्ताकांक्षा हे त्याचे मूळ आहे. राजा श्रेष्ठ की उपासना पंथ श्रेष्ठ? सत्ता कोणाची चालावी? या वादातून secularism चा जन्म झाला. त्यातून धर्म (वास्तविक उपासना पंथ) व राज्यव्यवस्था वेगळे असा प्रवाह निर्माण झाला. भारतेतर उपासना पंथ हे वास्तविक उपासना पंथ कमी आणि ईश्वराच्या नावाने राजकारण करणारे गट अधिक आहेत. त्यांची तुलना भारतीय उपासना पंथांशी होऊ शकत नाही. भारतातील ईश्वर मानणारे किंवा ईश्वर न मानणारे पंथ संप्रदाय सुद्धा या ऐहिक अस्तित्वाला शेवटचे टोक मानत नाहीत. शिवाय सत्ताकांक्षा हे त्यांच्या तत्वात कुठेही बसत नाही. त्याग, संयम, अपरिग्रह इत्यादी त्यांची वैशिष्ट्ये आणि शिकवण आहे. अन येथील समाजाच्या अंगोपांगात ती एवढी भिनली आहे की, येथील उत्तुंग कर्तृत्वाचे राजेदेखील सत्ता ही स्वत:ची खाजगी जहागीर तर मानत नाहीतच, उलट त्याचा त्याग करून तपश्चर्येला निघून जातात. राजा रन्तिदेव असो, राजा जनक असो, सम्राट चंद्रगुप्त वा अशोक असो, छत्रपती शिवाजी असोत, हरिहर बुक्कराय असोत, की आणखीन अनेक. त्याग आणि तपश्चर्येचा आदर्श त्यांनी जगून दाखवला आहे. त्यामुळेच `धर्म' या सर्वव्यापी कल्पनेचे तर सोडाच, उपासना पंथ या अर्थानेही राज्य व धर्म वेगळे करण्याची चर्चा भारतात अनाठायी आहे. विश्वनिर्मात्याने सगळी अक्कल भारताबाहेरच वाटली आहे या भ्रामक समजातून बाहेर येणे गरजेचे आहे. हे न समजल्यामुळेच, राजकारण आणि धर्म वेगळे करण्याची चर्चा केली जाते. त्याच्या परिणामी दिवा अथवा समई पेटवणे, कार्यालयात देवादिकांचे फोटो लावणे, सरस्वती वंदना आदी गोष्टींवर वाद होतो. त्या बंद केल्या जातात. सत्ताकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे की हे? this or this? जीवनाकांक्षेचा स्वाभाविक परिणाम असतो- हे आणि हे. this and this. or आणि and यातील फरक नीट समजून घेतला तर भुक्कडपणातून सुटका होऊ शकते. मानवी जीवनासाठी (व्यक्तिगत आणि सामाजिक) राजकारण आणि धर्म दोन्हीची गरज होती, आहे, राहील. त्यामुळे दोहोत कुरघोडीची स्पर्धा आणि संघर्ष असणे, निर्माण करणे, कल्पिणे, समजणे; हे सगळेच बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. दोन्हीपैकी एकही वरचढ नसून, परस्परपूरक आहेत. राजकारण आणि धर्म (उपासना पंथ या अर्थाने सुद्धा) दोन्हीने समन्वयाने, हातात हात घेऊन चालणे, हाच भारतीय आदर्श आणि सिद्धांत होऊ शकतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, ३ सप्टेंबर २०१७