सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

तत्त्व आणि तंत्र

आधी मला वाटायचं की, लोकांना तत्वापेक्षा तंत्राचं आकर्षण असतं. पण आता तसं वाटत नाही. म्हणजे तंत्राचं आकर्षण असतंच पण तत्वापेक्षा नाही. कारण बहुसंख्य लोकांना तत्व ही गोष्टच समजत नाही. त्यांना तंत्रच समजतं. एखादी गोष्ट म्हणजे त्याचं तंत्र एवढीच त्यांची समज असते. तत्व त्यांच्या संदर्भ चौकटीत नसतंच. अन बहुतांश बाबतीत असंच असतं. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, पाककला,  संबंध, शिक्षण, प्रेम, आरोग्य, साहित्य, धर्म, उपासना, भक्ती; एक ना अनेक. तत्वसमज आणि तत्वचर्चा/ तत्वचिंतन हे नसतंच. त्याची जाणीवही नसते. तत्वाची जाण कशी उत्पन्न करायची हाही मोठा प्रश्नच आहे.

- श्रीपाद कोठे

१ मार्च २०२१

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

विज्ञान

आज विज्ञान दिवस. संशोधन आणि त्यातून विकास हे विज्ञानाचं सूत्र. माणूस ज्या गोष्टी हाताळतो किंवा त्याच्या ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांना जे जे जाणवतं; त्यांची संशोधने, चिकित्सा, प्रमेये इत्यादींचा यासंदर्भात विचार होतो. अंतराळ, सागराचे अंतरंग, निसर्ग, पृथ्वीच्या गर्भातील घडामोडी यांचाही यात समावेश होतो. हे सगळे छान आहे. आवश्यक आहे अन योग्यही. यासोबतच मानवी अंतरंग, मानवी वर्तन, मानवी प्रतिक्रिया, मानवी विचार, मानवी संकल्पना आदींचेही संशोधन, विश्लेषण व्हायला हवे. आज विज्ञान म्हणून जे जे संशोधन होते, त्याचा उपयोग करणाऱ्या `मानवा'चे संशोधन मात्र तेवढे होत नाही. जे होते तेही संशोधक आणि अभ्यासक यांच्यापुरतेच मर्यादित राहते. `मानवा'चे, मानवी मन-बुद्धीचे, संवेदनांचे संशोधन आणि अभ्यास हेदेखील विज्ञानाचे अंग समजायला हवे आणि त्याचे उपायोजन करण्यावरही विचार व्हायला हवा. बाह्य आणि आंतर प्रकृती दोन्हीचे विज्ञाननिष्ठ संशोधन आणि उपायोजन हातात हात घालून झाले तर अधिक उपयुक्त ठरेल.

- श्रीपाद कोठे

२८ फेब्रुवारी २०१६

आपलेपणा : स्वार्थी, जबाबदार

आपलेपणा दोन प्रकारचा असतो-

स्वार्थी अन जबाबदार.

स्वार्थी- आपलं म्हणता ना मग थोडं सहन करायला काय हरकत आहे?

जबाबदार- तेही आपलेच आहेत, त्यांना त्रास होऊ नये आपला.

स्वार्थी- हक्काने गाडी घेऊन जायची अन पेट्रोल सुद्धा टाकायचं नाही.

जबाबदार- हक्काने गाडी घेऊन जाईन पण त्याची अडचण होऊ नये याची खात्री करून घेईन.

स्वार्थी- आपल्या माणसाचा मोबाईल सरळ उचलून फोन लावायचा, गेम्स खेळायचे, त्याची सगळी खानेतलाशी करायची, मेसेजेस वगैरे वाचून बिचून घ्यायचे.

जबाबदार- ज्याची त्याची प्रायव्हसी जपली पाहिजे. वस्तू अशा वापरू नये.

स्वार्थी- बोलताना, वागताना तोल सांभाळायची गरज नाही.

जबाबदार- बोलताना, वागताना तोल सांभाळायला हवा.

स्वार्थी- शेजारी आपलेच आहेत, ढकल कचरा त्यांच्या बाजूला.

जबाबदार- शेजारीही आपलेच आहेत, आंबे, लिंबू, पेरू, फुले त्यांनाही देऊ.

- श्रीपाद कोठे

२८ फेब्रुवारी २०१७

बिटकोईन

बिटकोईन ही अर्थप्रभावाची गुन्हेगारी आहे. आपापल्या चलनातील लाखो वा हजारो रुपये गुंतवून लोक बिटकोईन का घेतात? हे व्यवहार कोण करतात? उत्तर फार सोपं आहे अमाप पैसा ज्यांच्याकडे आहे ते तो पैसा आणखीन वाढवण्यासाठी ही गुंतवणूक आणि व्यवहार करतात. यात नुकसान झालं तरी ज्यांचं जगणं बाधित होत नाही असेच लोक यात असतात. त्यांचा पैसा वाया गेला किंवा वाढला तरीही त्या दोन्हीचा त्यांच्या जगण्याशी संबंध असत नाही. त्यांना फक्त त्या व्यवहारांची नशा हवी असते. एक नशा करणारा जसा आपला परिवार बरबाद करतो तसेच ही बिटकोईन नशा करणारे जगाचा परिवार बरबाद करतात. मग अशांना थांबवत का नाहीत? उलट वेगवेगळे लोक या बिटकोईनचे (आभासी चलनाचे) आपापले व्हर्शन का आणत राहतात? आता तर भारतीय रिझर्व्ह बँक सुद्धा आपले स्वतःचे आभासी चलन आणण्याचा विचार करते आहे अशी चर्चा आहे. का? कारण आहे वर्तमानात मानवजातीने स्वीकारलेली जीवनमूल्ये. हा फार गहन वगैरे विषय नाही. कारण या बिटकोईन व्यवहारांना अवैध ठरवण्यासाठी जेव्हा केंद्र सरकारने प्रयत्न केले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावले आणि व्यक्तिस्वातंत्र्य उचलून धरले. अनेक बाबतीतल्या व्यक्तीस्वातंत्र्याप्रमाणेच या बाबतीतही व्यक्तिस्वातंत्र्य घातक ठरते आहे, ठरणार आहे. हे आभासी चलन अवैध ठरवता येत नाही म्हणून अनेक जण आपापले आभासी चलन आणत आहेत. अशी आभासी चलने येऊ नयेत असे वाटत असेल तर असलेल्या आभासी चलनांना अवैध ठरवावे लागेल. त्यासाठी आपली मूल्यव्यवस्था बदलावी लागेल. ही मूल्यव्यवस्था बदलायची तर आपल्या जीवनविषयक मूलभूत धारणा बदलाव्या लागतील. त्यासाठी योग्य तत्वज्ञानाची मांडणी करून ते मानवांच्या मनात रुजवावे लागेल. राजकारणापासून विज्ञानापर्यंत, सुखाच्या कल्पनांपासून मनोरंजनापर्यंत, व्यक्तिगत आकांक्षांपासून व्यवस्थांपर्यंत; सर्वत्र हे करावे लागेल. त्याला पर्याय नाही आणि जवळचा मार्गही नाही. आभासी चलनाचे महासंकट या मूलभूत मानवी जाणिवांच्या परिवर्तनाची मागणी करणारे संकट आहे. अशी संकटे मानवजातीवर येतच राहिली आहेत. त्यातून मानव बाहेर पडलाच आहे. आताही तसेच होईल. हा युक्तिवाद होऊ शकतो. तो समाधान देणाराही आहे आणि बरोबरही आहे. परंतु अपूर्ण आहे. कारण अशी संकटे येणे आणि त्यातून बाहेर पडणे या प्रक्रियेत जे काही नुकसान, त्रास, तडाखे मानवाने भोगले आहेत त्याकडे हा युक्तिवाद दुर्लक्ष करतो. शिवाय तो माणसाचे माणूसपण हिरावून घेतो. त्यामुळेच फार शौर्यपूर्ण वाटणारा हा युक्तिवाद टाकून द्यावा लागतो. वाईट वाटले तरी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायला हवी की, हे मूलभूत जाणीव परिवर्तन करू शकण्याची क्षमता असणारा हिंदू समाज याबद्दल कमालीचा अनभिज्ञ आणि अज्ञानी आहे. दुर्दैवाने सध्याच्या अयोग्य प्रवाहाला बळच देतो आहे. विचित्र आणि उथळ गोष्टींमध्ये बुडाला आहे. शेवटी सर्वकाही predestined असतं हे तर आहेच.

- श्रीपाद कोठे

रविवार, २८ फेब्रुवारी २०२१

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

विश्वास आणि विज्ञान

श्रीदेवी, सुनंदा पुष्कर, महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री, दीनदयाळ उपाध्याय... कोणाच्याही शव विच्छेदन अहवालावर एकमत वा समाधान नाही.

आपण माणसावर विश्वास ठेवतो की विज्ञानावर?

विश्वास कोणावर ठेवला जाऊ शकतो - माणसावर की विज्ञानावर?

विज्ञान माणसाला विश्वास देऊ शकतं का?

बिना विश्वासाने माणूस सुखी, समाधानी होऊ शकतो का?

सुखी, समाधानी होण्यासाठी मनातल्या शंका मारून टाकता येतात का? माराव्यात का?

विज्ञान आणि विश्वास यांचा संबंध आहे का?

विज्ञान आणि विश्वास यांचा संबंध कसा असू शकेल?

विज्ञान की विश्वास? हा प्रश्न बरोबर ठरेल का?

विज्ञान आणि विश्वास हा पर्याय कसा वाटतो?

विश्वासाची उत्पत्ती कशी?

विश्वासाचे विसर्जन कसे? का?

- श्रीपाद कोठे

२७ फेब्रुवारी २०१८

शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

शुंभ निशुंभ

सुग्रास भोजन आणि विष्ठा दोन्हीही एकाच जीवन नावाच्या गोष्टीचे भाग आहेत. दोन्हीची जागा, आवश्यकता आणि दोन्ही हाताळण्याच्या पद्धती, दोन्ही बद्दलचा attitude; वेगळे असतात, असावेच लागतात. दोन्ही जीवनाचा भाग आहेत म्हणून कोणी भरल्या ताटात विष्ठा आणून टाकत नाही. आज मात्र असे लोक दिसायला लागले आहेत. असे लोक आताच जन्माला आले आहेत की समाज माध्यमांमुळे पूर्वीपासून अस्तित्वात असलेले ते आता दिसू लागले आहेत, हे सांगणे अवघड आहे. एक गोष्ट मात्र खरी की, पोच नसणारे असे लोक याच क्षणी कैलासवासी वा वैकुंठवासी झाले तरी काही फरक पडणार नाही. उलट पडलाच तर चांगला फरक पडेल. दुर्दैवाने अशा नतद्रष्ट लोकांपुढे मानवी सभ्यता हतबल होते. शुंभ निशुंभ मातणे म्हणजे काय ते पुराणात पाहण्याची गरजच उरलेली नाही. वर्तमानात आपल्या आजूबाजूलाच ते आहेत.

- श्रीपाद कोठे

२६ फेब्रुवारी २०१९

उपाधीशून्य 'मी'

आज शेगावचे संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा झाला. 'उपाधीशून्य मी' असं त्यांचं स्वरूप. माझं म्हणजे उपाधी. ती अवघी लयास जाऊन उरलेलं निरुपाधिक 'मी'त्व... आत्मत्व... त्यांचं स्मरण सगळ्याच सामान्य, असामान्य जनांच्या उपाधी कमी करो. कारण उपाधीशून्य होत जाणे ऐहिक, लौकिक जीवनासाठीही आवश्यकच आहे. आजच्या ऐहिक जीवनाची सुद्धा सगळ्यात मोठी समस्या उपाधींचा गुणाकार हीच आहे. जय गजानन.

- श्रीपाद कोठे

२६ फेब्रुवारी २०१९

मनोरंजन

ott, digital platform यांच्यासाठी काल मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात आले. त्यावर चर्चा सुरू झाली. एक जुना मुद्दा या चर्चेत पुन्हा आला - परिवारासोबत बसून पाहता येईल अशा मनोरंजनाचा. दुसऱ्या शब्दात - परिवारासोबत बसून पाहता येणार नाही असेही मनोरंजन असते. हा मुद्दा तत्वतः मान्य करणे म्हणजे - आपणच आपल्या विकृतीची मान्यता देणे नाही का? जे सगळ्यांसोबत पाहण्यासारखं नसतं ते पाहण्याची इच्छा भूषणावह म्हणता येईल का? अशा मनोरंजनाला सामाजिक स्वीकार्यता आणि शासकीय मान्यता आपल्या सांस्कृतिक स्तरावर जळजळीत भाष्य म्हटले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

२६ फेब्रुवारी २०२१

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रवाद - भारतीय अन अभारतीय

कालचा दिवस नि:संशय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा होता. त्याचा प्रभाव बराच काळ राहणार आहे. ते स्वाभाविक तर आहेच, पण त्यात अयोग्य देखील काहीही नाही. त्यांनी आपल्या भाषणात, लोकसभेत त्याआधी झालेल्या एका भाषणाचाही उल्लेख केला होता. तो होता, पश्चिम बंगालमधील जादवपूरचे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुगत बसू यांचा. खा. बसू यांचे भाषण खरंच अप्रतिम होते. पण अपूर्ण व अप्रामाणिक होते. अपूर्ण एवढ्यासाठी की, राष्ट्रवादाचे जे मूलगामी विवेचन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याची सांगड ते वर्तमानाशी घालू शकले नाहीत. अन जी सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला ती तर्कदुष्ट आणि पूर्वग्रहदूषित होती. खा. बसू यांनी महर्षि अरविंद, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, नेताजी बोस आदींचा उल्लेख केला. रवींद्रनाथांच्या nationlasim या ग्रंथाचाही उल्लेख केला. अन त्यांची टिप्पणी होती की, आज रवींद्रनाथ असते तर त्यांनाही राष्ट्रद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला असता. त्यांनी न उच्चारलेले पण अध्याहृत असलेले कारण हे की, रवींद्रनाथ आंतर्राष्ट्रवादी (वैश्विक) होते. खा. बसू यांचे वैश्विकता आणि राष्ट्रवाद याबद्दलचे आकलन तर तोकडे आहेच, पण राष्ट्रवादी विचारधारेवर त्यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे.

वैश्विकता आणि राष्ट्रवाद या परस्परविरोधी बाबी आहेत, हा भारतेतर विचार आहे. भारतीय चिंतन परंपरा या दोन्हीत काहीही विरोध वा संघर्ष मान्य करीत नाही. राष्ट्रीयता आणि वैश्विकता या दोन वेगळ्या पायऱ्या आहेत एवढेच. राष्ट्रीयता हा अलीकडचा टप्पा आणि वैश्विकता हा पलीकडचा टप्पा. राष्ट्रवादी असल्याशिवाय कोणी विश्ववादी होऊ शकत नाही, अन राष्ट्रवादी होऊन कोणी तिथेच थांबू शकत नाही. मूलत: भारतीय चिंतन परंपरा पूर्णवादी आहे. ती या संपूर्ण अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहते. या अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तोही त्या unit चाच भाग आहे. अन व्यक्ती ते विश्व या त्याच्या जाणिवांच्या पातळ्या आहेत. राष्ट्र ही त्यातील एक पातळी. जाणिवांची ही साखळी `व्यक्ती'पासून सुरु होते आणि कुटुंब, परिसर, समाज, निसर्ग, राष्ट्र असे करत `विश्व' जाणिवेपर्यंत पोहोचते. मात्र भारतीय चिंतन परंपरा केवळ वैश्विक नाही, ती त्याच्याही पलीकडील चेतन स्तरापर्यंत जाणीवेच्या विकासाची मांडणी करते. या जाणीवा एकाच ठायी एकाच वेळी अस्तित्वात असतात. फक्त त्यांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत कमी अधिक होत असते इतकंच.

या देशातील सगळेच विचार, सगळेच महापुरुष, सगळेच चिंतन वैश्विकच आहे, पण त्याचा राष्ट्रीयतेशी संघर्ष नाही. रवींद्रनाथ टागोर हा काही अपवाद नाही. उपनिषदांपासून आजतागायत हाच प्रवाह चालत आला आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरदेखील विश्वात्मक देवाला, विश्वासाठी पसायदान मागतात किंवा आचार्य विनोबा भावे `जय जगत'चा नारा देतात. एखादी व्यक्ती रोजच्या खाण्यापिण्याचा, कपड्यालत्त्याचा विचार `व्यक्ती' स्तरावरच करते. पण नेपाळला विनाशकारी भूकंप झाला की, लगेच मदतीचा हात पुढे करते. `मी' आणि `विश्व' या दोन्ही जाणीवा तिच्या ठायी आहेतच. त्या विशिष्ट वेळी अभिव्यक्त होतात. या दोनच्या मधील परिवार, परिसर, समाज, राष्ट्र इत्यादीच्या बाबतीतही असेच आहे. चांगले, सुखी, आनंदी, अर्थपूर्ण, सार्थक जीवन जगताना आणि जगण्यासाठी आवश्यक अशा या पायऱ्या आहेत. `मी'चा संपूर्ण विलय होऊन `चेतन' सत्तेत सदासर्वदा अवस्थित व्यक्ती हे व्यक्तित्वाच्या विकासाचे भारतीय मापदंड आहेत. परंतु किती जणांच्या बाबतीत हे वास्तव आहे वा असू शकते? फार थोड्यांच्या बाबतीत, हे त्याचे उत्तर आहे. `मी'च्या मर्यादा आणि `वैश्विक'तेची ओढ आणि आवश्यकता लक्षात घेऊन व्यक्तीच्या उत्तरोत्तर जाणीव विकासाचा विचार आवश्यक ठरतो. तसा तो केला नाही तर त्यातून भांबावलेपण अन सर्वनाश ओढवतो. ज्यांच्या जाणिवांचा स्तर अधिक आहे, त्यांना त्याहून लहान स्तर चुकीचा वाटत असेल तर त्याच्या जाणिवांचा विकास झालेला नसून, त्याच्या बुद्धीला फक्त त्याची माहिती आहे; असा अर्थ काढावा लागेल. ज्याच्या जाणिवांचा खरेच विकास अन विस्तार झालेला आहे, त्याला धाकट्या जाणीवा नाकारण्याची गरज पडणार नाही, कारण त्यातूनच पुढे जायचे असते हे त्याला अनुभवाने माहिती असते. हाच आहे सनातन धर्म. म्हणूनच महर्षी अरविंद म्हणतात भारतीय राष्ट्रवाद = सनातन धर्म.

परंतु हा सगळा विचार करणारा अन त्याचा अनुभव घेणारा व्यक्ती वेगळा आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सगळ्या बाबी त्या व्यक्तीच्या सुख व आनंदासाठी आहेत. व्यक्तीच्या सुख व आनंदाला सहाय्यक ठरतील तोवर त्या योग्य अशी दृष्टी व भावना असेल तर मात्र प्रत्येक स्तरावर संघर्ष अपरिहार्य ठरतो. आज व्यक्ती आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष हे त्याचेच रूप आहे. किंवा एखादी व्यक्ती वैश्विकता, मानवता इत्यादींचा धोशा लावतानाच आपले व्यक्तिगत सुख- सुविधा- साधने- मानसन्मान- पदप्रतिष्ठा- याबद्दल आत्यंतिक संवेदनशील, प्रसंगी असहिष्णू असल्याचे पाहायला मिळते. माझी पदोन्नती न होता दुसऱ्याची झाली तर ते त्याच्यासाठी असह्य ठरते. त्यावेळी त्याची मानवता कुठेतरी गुडूप होऊन जाते. हाच न्याय समूहालाही लावता येईल अन तसे होते तेव्हा राष्ट्र हे विशिष्ट समुहाचे सुख वा प्रभाव यांचे एक उपकरण ठरते अन ते संघर्षाचे कारणसुद्धा. भारताबाहेर झालेला राष्ट्रांचा विकास हा अशा प्रकारे समूहाच्या सुख व वर्चस्वाच्या भावनेतून झालेला आहे. भारतीय राष्ट्रविचार हा व्यक्तीच्या जाणीव विकासाच्या मार्गातील एक टप्पा या अंगाने जाणारा आहे. म्हणूनच सर्वच प्राचीन, अर्वाचीन संत, महापुरुष, ऋषीमुनी, दार्शनिक, चिंतक, विचारवंत हे एकाच वेळी व्यक्तिवादी, समूहवादी, राष्ट्रवादी, मानवतावादी, विश्ववादी अन संपूर्णतावादी होते व आहेत. वेगवेगळ्या वेळेला परिस्थिती नुसार त्यांनी त्याचे प्रतिपादन केले आहे. म्हणूनच मानवतावादी असलेले रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्य आंदोलनातदेखील सहभागी होते. अन विश्वात्मक विचार करतानाच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे गांधीजी त्यांना चुकीचे वाटत नव्हते. उलट आपले आप्त वाटत होते.

एक व्यक्ती असो की संपूर्ण मानवजात; सगळ्यांचे कल्याण हेच उद्दिष्ट ठेवून; व्यवहार आणि विभिन्न मर्यादा लक्षात घेऊन, विकसित झालेल्या रचनेतील, विविध टप्प्यांपैकी एक टप्पा म्हणजे `राष्ट्र' ही दृष्टी असेल तर काहीही नाकारण्याचे कारण नाही, अन कुठला संघर्षही उरत नाही. याउलट आपल्या लहान वा मोठ्या `मी'चे स्वार्थसाधन म्हणून पाहिले तर प्रत्येकच गोष्ट नाकारावी लागते अन प्रत्येकच स्तरावर संघर्षाची पाळी येते. भारताचा अन रा.स्व. संघाचाही राष्ट्रवाद हा जाणीवविकासाच्या मार्गावरील राष्ट्रवाद आहे. अन अन्य लोकांचा राष्ट्रवाद स्वार्थसाधनेचा राष्ट्रवाद आहे. त्यामुळेच खा. सुगत बसू तोंडाने रवींद्रनाथ किंवा महर्षी अरविंद यांचा राष्ट्रवाद सांगत असले तरीही महिषासुरमर्दिनीचे भंजन करणे त्यांना नाकारावे वा दुर्लक्षित करावे लागते. कारण ते स्वार्थसाधनेत अडथळा आणते. याउलट रा.स्व. संघ `हिंदुराष्ट्र' म्हणत असताना सुद्धा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन करू शकतो. त्याला काहीही नाकारावे लागत नाही. संघाला आपला राष्ट्रवाद कोणावरही थोपवायचा नाही. कारण तो थोपवता येतच नाही. जाणीवेचा विकास ही थोपवण्याची बाबच नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताबाहेर आपले काम `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने नव्हे, तर `हिंदू स्वयंसेवक संघ' या नावाने चालवले आहे. राष्ट्राचा परीघ कोणता याचे पूर्ण भान संघाला आहे. अन राष्ट्रच कशाला व्यक्ती ते ब्रम्हांड यांचे परीघ कोणते आणि का, याचे सखोल चिंतन ही भारतीय राष्ट्रवादाची विशेषता आहे. भारतेतर मापदंड लावून, अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे `स्व'ला अवास्तव गोंजारुन भारतीय राष्ट्रवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाती काही लागण्याची शक्यता नाही. `स्व' नाकारायचाही नाही अन त्याच्या परीघाकडे, सामर्थ्याकडे अन मर्यादेकडे दुर्लक्षही करायचे नाही, अशी भूमिका अन दृष्टी असेल तर भारतीय राष्ट्रवाद तर कळेलच, पण संघर्षही कमी करता येईल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१६

Settings

अरे setting मध्ये इतके सारे options असतात. माहित नाही तुला?

नाही बा.

म्हणजे एखाद्याला ब्लॉक करणे एवढंच नाही, तर अगदी साळसूदपणे मित्र म्हणून ठेवूनही त्याला काहीही दिसू नये अशीही सोय करता येते. काय, कोणाला, किती दाखवायचं किंवा पाहू द्यायचं हेही करता येतं. अन अगदी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणं नाकारणंच नाही, कोणाला पाठवू द्यायची किंवा कोणाला पाठवू द्यायची नाही हेही आगावू करून ठेवता येतं.

नाही बा मला नव्हतं माहीत. त्या setting कडे कधी गेलोच नाही.

इतकी वर्षं होऊनही?

हो. कारण, कोणापासून लपवण्यासारखं काहीच नाही. काहीच लपवायचंही नाही. कोणाशी भांडण नाही. दुष्मनी नाही. कोणाबद्दल राग नाही. कोणाला टाळायचं नाही. कोणाला कवटाळायचं नाही. कोणाचा त्रास नाही. हां, कोणी आगाऊपणा केला, बदमाशी केली, जाणूनबुजून दुष्टपणा केला तर सरळ उचलून धरून फेकून देणार. thats all. आणि व्यक्तिगत संबंध वगैरे असतील ते त्या पातळीवर. त्यांची जागा ही नाही. त्यामुळे आडून आडून काही करण्याची गरजच नाही पडत.

- श्रीपाद कोठे

२५ फेब्रुवारी २०१७

गांधीजींचे तिसरे तत्त्व

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प साबरमतीला जाऊन सूत कातून आले. याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा साबरमती आश्रमात सूत कातून आले आहेत. एक प्रकारे गांधीजींच्या दोन गोष्टी जगाला सांगून झाल्या आहेत. एक म्हणजे चरखा आणि दुसरी तर आधीच सांगितली गेली आहे, ती म्हणजे अहिंसा. यापुढे गांधीजींचे आणखीन एक तत्व सांगण्याची वेळ आहे. कोणते? 'हे जग आपल्या कोणाचेही नाही. ईश्वराचे (अनिर्वचनीय - तत्वाचे, चेतनेचे किंवा पदार्थाचे) आहे.' अद्वैताचा हा सर्वोच्च सिद्धांत हाच वास्तविक गांधीजींच्या सगळ्या विचारांचा आधार आहे. हा आधार गांधीजींनी शोधलेला नाही. तो दीर्घ कालावधीत विकसित झालेला आहे. गांधीजींनी फक्त त्याचे पुन्हा प्रतिपादन केले एवढेच. हाच एकमेव असा सिद्धांत आहे जो सगळ्यांना समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची शक्ती बाळगतो. घोर जडवादी सुद्धा अंतिम टप्प्यावर अद्वैतीच होऊ शकतो. अद्वैताशिवाय जडवाद सुद्धा अंतिम टोक गाठू शकणार नाही. सगळ्याच्या सगळ्या विचारांची अंतिम परिणती अद्वैत हीच असू शकते. गांधीजींनी तेच मांडले आहे. मात्र हे स्वीकारणे, मान्य होणे कठीण आहे. 'हे विश्व आपल्या कोणाचंही नाही' हे तत्व मुस्लिम, ख्रिश्चन, भांडवलशाही, साम्यवादी, समाजवादी, लोकशाहीवादी, विज्ञानवादी, इहवादी, बुद्धिवादी; कोणालाही मान्य होणे, समजणे कठीणच. कारण त्यांना उघडउघड हे विश्व त्यांच्या मुठीत हवं आहे/ असतं. पण गंमत म्हणजे हे तत्व हिंदुत्व असून हिंदूंना मान्य होणे कठीण आणि गांधीजींनी प्रतिपादन करूनही 'गांधीजप' करणाऱ्यांना मान्य होणे त्याहून कठीण. कारण हे तत्व मान्य करणे म्हणजे हिंदू, भारत, भारतीयत्व, आध्यात्म, या देशाची परंपरा, या देशाची जीवनशैली, या देशाची विचारपरंपरा स्वीकारणे. गांधी नावाचा जप करणाऱ्या आजच्या लोकांची पंचाईत ही आहे की त्यांना गांधी हे नाव फक्त तोंडीलावणे म्हणून हवे आहे. गांधी नाव घेऊन आपला अजेंडा दामटणे हा उद्देश असल्यावर 'हे जग कोणाचंच नाही' हे तत्व कसं स्वीकारता येईल. उरले हिंदू. त्यांची आज पंचाईत ही आहे की, त्यांच्यासाठी हिंदुत्व हे मुस्लिमांचा बंदोबस्त एवढ्यापुरतेच उरले आहे. जगात एकही मुसलमान उरला नाही म्हणजे हिंदुत्व सुफळ झाले असे होत नाही हे समजून घेण्याची त्याची आज तयारी नाही. मुळात मुस्लिम प्रश्नाची खरी सोडवणूक सुद्धा 'हे जग आपल्या कोणाचंही नाही' हीच असू शकते. हे तत्व रुजून बहरत नाही तोवर एकच समस्या कधी मुसलमान म्हणून, कधी ख्रिश्चन म्हणून, कधी साम्यवाद म्हणून किंवा खूप वेगवेगळ्या नावांनी पुन्हा पुन्हा समोर येतच राहील. एकाच समस्येचं हे वेगवेगळ्या नावांनी पुन्हा पुन्हा जगाला, भारताला, मानवाला ग्रासून टाकणं कमी करायचं असेल तर; 'हे जग आपल्या कुणाचंही नाही' हे तत्व सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. नाही तर सूतकताई फोटोजेनिक तेवढी बनून राहील.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२०

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

ढोंगी

सगळ्या `अफजल गुरु, कन्हैय्या कुमार, उमर खालिद भक्तांनी' स्मृती इराणी यांचं भाषण नक्कीच ऐकलं आहे. हां, आपण ते ऐकलं हे मात्र ते- इतर कुणाला काय, स्वत:चं स्वत:ला देखील कळू देणार नाहीत. या भक्तांचे कुलदैवत राहुल गांधी, कुलदेवता सोनिया गांधी, अन पुजारी मल्लिकार्जुन खडगे समोरासमोर ऐकणे शक्यच नसल्याने उठून घरी गेले अन एकमेकांपासून लपवित सगळ्यांनी घरच्या टीव्हीवर ते भाषण पाहिले, ऐकले. काय `अफजल गुरु, कन्हैय्या कुमार, उमर खालिद भक्तांनो'- टाकता का काही पोस्ट? तुमच्या पोस्ट पाहायला उतावीळ झालो आहे. की घेऊ तुमची नावे??

स्मृती इराणी यांचे भाषण ऐकताना आपल्याला तर बुवा गुरु गोविंदसिंगजी महाराज आठवले- `सवा लाख से एक लडाउं, तब गोविंद नाम कहाउं' व्वा रे शेरनी...

सगळ्या दलित, मागासवर्गीय, आदिवासी बंधू भगिनींना; विचारकांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकच प्रार्थना- आता तरी शहाणे व्हा. नुसत्या शब्दांवर अन घोषणांवर जाऊ नका. कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट राजकारणासाठी किती रोहित तुम्ही गमावणार आहात?

संपूर्ण कॉंग्रेस पक्ष उघडपणे देशद्रोही आहे हेही आज स्पष्ट होऊन गेले हे बरे झाले. `शब्द आणि घोषणा म्हणजे देशद्रोह नसतो' असे निर्लज्ज समर्थन अन तेही दात काढत करणारे ज्योतिरादित्य सिंधिया; एक ऐकून ठेवा- शब्द आणि घोषणा म्हणजे देशद्रोह नसतो हे अगदी खरे आहे. देशद्रोह असतो- त्या शब्दांच्या अन घोषणांच्या मागची भावना. अन ती भावना आज तुम्हीच जगजाहीर केलीत. तेही भर लोकसभेत. देशभक्तीची बातच सोडा; साधे माणूस असाल तरी यानंतर जगाला आपले तोंड तुम्ही दाखवणार नाही. अर्थात तुम्ही माणूस आहात अशीही आम्हाला अपेक्षा नाहीच म्हणा.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१६

कीव करावी

खरंच हसावं की रडावं कळत नाही. यांच्या बुद्धीची तर क्षणोक्षणी कीव येते. ५२ वर्षे संघाने आपल्या इमारतीवर तिरंगा फडकावला नाही, म्हणून-

१) विद्यापीठात तिरंगा फडकावण्याचा निर्णय चूक?

२) त्या निर्णयाला आमचा विरोध?

बिचाऱ्यांची पंचाईत ही झाली आहे की, ध्वजाचा रंग तिरंगा असल्याने `भगवीकरण' पण म्हणता येत नाही.

हे दळभद्री उद्या असेही म्हणतील- या देशात रा. स्व. संघ स्थापन झाला म्हणून आम्ही हा देश विकून टाकू.

किंवा

रा. स्व. संघ या देशाला भारत म्हणतो म्हणून आम्ही याला भारत म्हणण्याला विरोध करतो. (अन असे म्हणणारे आहेत. अगदी व्यक्तिगत माहितीचे आहेत.)

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१६

नियंत्रण आणि परिवर्तन

व्यक्ती आणि समूह (कुटुंब, शेजार, मित्र, सहकारी, परिवार, वेटाळ, वस्ती, गाव, समाज, देश, राष्ट्र, जग, विश्व) यांचा सखोल, व्यापक, सूक्ष्म, गंभीर, साधकबाधक, सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे. अनेक गोष्टी सवयीने, गृहीतके म्हणून, खोलात जाण्याची गरज न वाटणे किंवा त्यासाठी इच्छा व अवकाश नसणे; यामुळे चालत राहतात. हे तितकेसे योग्य नाही. माणूस जन्माला येण्याच्या क्षणापासूनच वर्तुळ आणि चौकटी आकाराला येतात, दोन माणसे भेटतात तिथेच (मूल जन्माला येऊन आईला भेटते तिथपासून) समाज जन्माला येतो. वर्तुळ आणि चौकटी आकाराला येतात हे जेवढे स्वाभाविक आणि अपरिहार्य, तेवढेच वर्तुळ आणि चौकटी सोडून किंवा तोडून बाहेर पडण्याची धडपड हेदेखील स्वाभाविक व अपरिहार्य. भारतीय चिंतनाने ही बाब तत्त्व म्हणून स्वीकारली आहे. संन्यास ही गोष्ट, आश्रम व्यवस्थेचा विचार ही त्याची उदाहरणे. व्यवहारात, रोजच्या जगण्यात, त्या त्या वेळचे कायदे, मान्यता यात हे तत्त्व कसे आणि किती होते हा वेगळ्या अभ्यासाचा विषय. मुक्ती हे जीवनाचं सार मानणे हा भागही लक्षणीय. भारतेतर विचारात मात्र ही पूर्णता दिसत नाही. त्यांच्या धार्मिक विचारात देखील ईश्वरीय संबंधांची चौकट अथवा वर्तुळ हीच कायमची, अंतिम अवस्था आहे. चौकटी आणि वर्तुळ तयार होणे, अन त्यातून बाहेर पडणे या जीवनसत्याच्या संदर्भात असलेल्या धार्मिक दृष्टीने सगळ्या जगण्याला आकार दिला की, जगण्याच्या दृष्टीने धार्मिकतेला आकार दिला; हा विद्वानांचा विषय. परंतु मानवी ऐहिक जगण्यावर, चौकटी अंतिम मानण्याच्या दृष्टीचा प्रभाव फार मोठा आहे. जगातील असंख्य ताणतणाव, अगदी देशादेशांचे संबंध किंवा व्यक्तिगत जीवन देखील याने प्रभावित आहे. भारतीय मुक्ती विचाराचा व्यापक, सर्वकष आढावा घेणे आणि जीवनात तो विचार प्रतिष्ठित करणे याची मोठी गरज भासते.

इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांच्या कट्टरपणाचे आणि हिंदूंच्या समावेशकतेचे कारण सुद्धा यातच दडले आहे. या मूळ विषयाला हात घालत नाही तोवर फार फरक पडणार नाही. इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांना नियंत्रित करण्याचे असंख्य प्रयत्न झाले आणि होत आहेत. अन ते वारंवार अपयशी ठरत आहेत. पराक्रम ही काही नवीन गोष्ट नाही. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणणे असो की पाकिस्तानचे दोन तुकडे करणे असो. पराक्रम पूर्वीही गाजवलेला आहेच. पदरात काय पडले? कबीर किंवा नानक देवांचे किंवा त्यासारख्या संतांचे प्रयत्न सुद्धा फारच मर्यादित यश मिळवू शकले. कारण राजकारण असो वा संत, दोन्ही प्रयत्न  इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांना आपापल्या पद्धतीने नियंत्रित करण्याचे होते, त्यांच्यात मूलभूत, आंतरिक परिवर्तन आणण्याचे नव्हते. मूलभूत, आंतरिक परिवर्तन आणायचे तर विचार, तत्त्वज्ञान यांचा आधार घ्यावा लागतो. ती परिवर्तनाची हमी नसते, पण तो आत पोहोचणारा, आत प्रभावित करणारा आशादायक मार्ग असतो. दुर्दैवाने जो हिंदू समाज हे करू शकतो, तोच त्यापासून दूर जात आहे. तोच आज इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांचा शिकार बनतो आहे. अन याच्या उत्तरात खराखुरा, पक्का हिंदू होण्याऐवजी त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तरे देण्याचा निष्फळ अन निरर्थक प्रयत्न करतो आहे. इस्लाम, ख्रिश्चन वा कम्युनिझम, जडवाद, भोगवाद यांचा वैचारिक, तात्त्विक पराभव वैचारिक, तात्विक पद्धतीनेच करावा लागेल; राजकीय, सामाजिक, लष्करी पद्धती त्यासाठी फारशा उपयोगाच्या नाहीत.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१९

किंमत

'देशातला काम करणारा प्रत्येक माणूस हा समान महत्वाचा आहे. प्रत्येक घटक राष्ट्रउभारणी करतोच. एक सैनिक तेव्हढेच महान आणि बाकीच्यांनी अपराधगंड बाळगावा हा भंपकवाद प्रत्येक नागरीकाने नाकारायलाच हवा.'

राजू परुळेकर यांची ही पोस्ट एकाने पाठवली आणि माझा अभिप्राय विचारला. मी त्या मित्राला कळवलेला अभिप्राय -

'काल इंडिया टीव्हीवर रजत शर्मा यांच्या 'आपकी अदालत'मध्ये एका मुलीने मेहबूबा मुफ्ती यांना प्रश्न विचारला - तुम्ही म्हणता युद्धाने प्रश्न सुटत नाही, पण चर्चेने तरी प्रश्न कुठे सुटला?'

त्यावर मेहबूबा यांचे उत्तर होते - तुझे म्हणणे बरोबर आहे पण दोघात फरक आहे. युद्ध अपयशी ठरलं तरी अन्य हानीसोबत दोन्ही बाजूची जीवहानी होतेच होते, चर्चा अपयशी ठरल्यावर असे होत नाही.'

परुळेकर यांच्या भंपक तर्काला मेहबूबा मुफ्ती यांच्या उत्तरातून अनायास उत्तर मिळाले आहे. मित्राला कळले असेल आणि आपल्याला कळेल अशी आशा करतो.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१९

मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

ही हिंमत दाखवतील का?

गोविंदराव पानसरे यांच्या दुर्दैवी हत्येनंतर सुरु असलेले राजकारण त्याहून दुर्दैवी आहे. मुळातच हिंसेला अधिकृत समर्थन देणाऱ्या कम्युनिस्ट वा मार्क्सवादी यांनी हिंसा-अहिंसा या गदारोळात पडू नये. याचा अर्थ मी हिंसेचे वा पानसरे यांच्या हत्येचे दुरान्वयानेही समर्थन करीत नाही. पण ज्यांना हिंसा त्याज्य वाटत नाही त्यांनी त्यावरून रण माजविणे समजून घेण्याच्या पलीकडील आहे. गंमत म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर, गांधी ही नावे सतत जपणारी मंडळी जेव्हा साम्यवादी म्हणवणाऱ्यांचे निर्लज्ज समर्थन करू लागते तेव्हा त्यांच्या बुद्धीवादाची अन तर्कबुद्धीची कीव केल्याविना राहवत नाही. शाहू, फुले, आंबेडकर, गांधी यांनी सातत्याने साम्यवाद खोडून तर काढलाच, पण ते लोक त्यापासून चार हात दूर राहिले आणि आपापली कामेही त्यांनी त्यापासून दूरच ठेवली. त्यामुळे आजचे त्यांचे भक्त जेव्हा साम्यवाद्यांच्या गळ्यात गळे घालून गळे काढू लागतात, तेव्हा त्यामागील हेतू लपून राहत नाही. हिंदुत्वाचा शत्रू तो आपला मित्र, एवढे एकच त्यांचे ब्रीद असते. यापोटीच तर्कानेही लाजून मान खाली घालावी अशी तर्कटे मी मी म्हणणारे विद्वान करू लागतात. बाकी, कुणाच्याही हत्येची घटना समर्थनीय ठरूच शकत नाही आणि कोणाचे हात कोणाच्या रक्ताने किती बरबटलेले आहेत हेही कोणापासून लपून राहिलेले नाही. नाही म्हणता, यानिमित्ताने साम्यवादी विचारातील हिंसेच्या समर्थनाला आम्ही कायमची मूठमाती देत आहोत असे त्या विचाराच्या कर्त्याधर्त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावे हे बरे. उगाच आगपाखड करण्याऐवजी, ती हिंमत ते दाखवतील का?

- श्रीपाद कोठे

२३ फेब्रुवारी २०१५

गुणवाचक हिंदुराष्ट्र

राष्ट्रवाद म्हणजे काय? कोणाचा राष्ट्रवाद काय आहे? याची चर्चा सध्या सुरु आहे. एक गोष्ट नक्की की, रा.स्व. संघ (अन संघ परिवार) वगळता कोणाचीही काहीही राष्ट्रकल्पना नाही. काही लोकांना राष्ट्र ही बाबच मान्य नाही, तर अनेकांची याबद्दल कल्पनाच नाही. `सगळ्यांना घेऊन चालणे, सगळ्यांचं भलं करणे' अशा भोंगळ, अर्थहीन, बोधहीन तत्वांचा उच्चार करणे हाच त्यांचा राष्ट्रवाद. मुळात राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवाद अशी काही बाब असू शकते का, या जगात राष्ट्र किती; इत्यादी इत्यादी मुद्दे थोडा वेळ बाजूला ठेवले तरीही, एक गोष्ट सगळ्यांना मान्य होण्यात अडचण असू नये की, राष्ट्रवाद म्हणजे मालकीहक्क आणि सौदेबाजी नाही. काही लोक यावर लगेच म्हणतील- हो, हो. राष्ट्रवाद म्हणजे मालकीहक्क नाही. म्हणूनच आम्ही म्हणतो की- भारत हिंदू राष्ट्र नाही. मात्र असे म्हणणाऱ्यांच्या हे लक्षात येत नाही की, राष्ट्रवाद म्हणजे मालकीहक्क नसल्याने जसे ते हिंदूंचे राष्ट्र ठरत नाही तसेच ते मुस्लिमांचे, ख्रिश्चनांचे, शिखांचे, बौद्धांचे, पारशांचेही राष्ट्र ठरत नाही. किंवा अगदी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी या सगळ्यांचेही ठरत नाही. एकाची किंवा दुसऱ्याची किंवा अनेकांची; अशा कोणत्याही प्रकारची मालकी म्हणजे राष्ट्रवाद नाही. सगळ्यांचे भले करणे, म्हणजेही राष्ट्रवाद नाही. राष्ट्रवाद हा काही लोण्याचा गोळा नाही. सगळ्या बोक्यांनी त्यासाठी भांडावं आणि आपापल्या शक्तीनुसार तो बळकवावा. सगळ्यांच्या कल्याणाच्या इच्छेने जे जे काही करावं लागतं; ते करण्याची प्रेरणा, भावना, ते करण्याचे प्रयत्न, त्यासाठी पुढाकार घेण्याची वा माघार घेण्याची तयारी, म्हणजे राष्ट्रवाद. ही प्रेरणा, भावना, प्रयत्न, तयारी ज्यांची ज्यांची असेल ते सगळे राष्ट्रवादी. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी, धर्म न मानणारे, दलित, ओबीसी, सवर्ण, महिला, पुरुष, बालके, प्रौढ, संपन्न, विपन्न, साक्षर, निरक्षर; अगदी सगळ्यांच्या मनात हा राष्ट्रवाद असला पाहिजे. राष्ट्र या भावनेतून आकाराला येत असतं.

(कोणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून- भारत हे हिंदुराष्ट्र आहे, यात वादच नाही. मात्र त्याचा अर्थ ते हिंदूंचे राष्ट्र असा नाही. राष्ट्र असे कोणाचे असूच शकत नाही. खरे तर हिंदुराष्ट्र हीदेखील एक पायरी आहे. जगात केवळ एकच राष्ट्र असू शकते. जगात एक तर राष्ट्र असू शकते किंवा राष्ट्र नसू शकते. पण ती अवस्था- `पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराट' - येईपर्यंतच्या मार्गातील एक टप्पा म्हणून आपल्या राष्ट्राला हिंदुराष्ट्र म्हणायचे. हिंदुराष्ट्र हा मालकीवाचक नसून गुणवाचक शब्द आहे.)

- श्रीपाद कोठे

२३ फेब्रुवारी २०१६

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

मस्तवालपणा ठेचला जायलाच हवा

एका अनिवासी भारतीयाला व त्याच्या सासर्याला मारहाण केल्याबद्दल अभिनेता सैफ आली खान आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली. फार कमी वेळा चांगल्या बातम्या ऐकायला मिळतात. ही बातमी त्यातलीच एक. पैशामुळे येणारा मस्तवालपणा आज अतिशय वाढला आहे. अगदी गल्लीबोळात सुद्धा अशी लाडावलेली धनिक बाळे पाहायला मिळतात. तुम्ही त्यांना बाजूला व्हा असे सुद्धा म्हणू शकत नाही. खोटा पैसा नुसता धो धो वाहतो आहे. अन माणुसपण, शांतता, सहजीवन, स्नेह अशासारख्या सार्या गोष्टी खाऊन टाकत आहे. अभिनेते, अभिनेत्री, खेळाडू (क्रिकेटपटू), खोटा आणि बेहिशेबी पैसा बाळगणारे नेते व नोकरशाह, अप्रामाणिक धनवंत व्यापारी, उद्योगपती हेच आज समाजावर प्रत्यक्ष आणि मानसिक दबाव टाकत आहेत. त्यांची एकूण औकात आणि वकूब काय असतो हे हे सार्यांना ठाऊक आहे. तरीही त्यांचीच आज पूजा होत आहे. त्याचाच एक भाग असलेल्या सैफला काही वेळासाठी का होईना अटक होणे ही म्हणूनच चांगली बातमी आहे. मस्तवालपणा ठेचला जायलाच हवा.

- श्रीपाद कोठे

२२ फेब्रुवारी २०१२

विद्यापीठे

हरयाणातील आंदोलनाने पुन्हा एकदा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आणला. एकाच वर्षात तीन राज्यांमध्ये या मुद्यावरून हिंसक आंदोलने झाली. अजूनही या प्रश्नाला थेट आणि व्यावहारिक रीतीने भिडण्याची सरकार अन समाजाचीही तयारी दिसत नाही. तेच ते चर्वितचरण सुरु असते, सुरु राहील.

आज देशात ७०० च्या आसपास जिल्हे आहेत. (२०१४ चा आकडा ६८३) खासदारांची संख्या ८००, शेअर बाजारात नोंद असलेल्या कंपन्या २ हजाराहून अधिक. आमदारांची संख्या वेगळी. नुसते अहवाल, चर्चा, कोर्टबाजी; यापेक्षा प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण देणारी ७०० विद्यापीठे (प्रत्येक जिल्ह्यात १) विकसित केली तर दहाएक वर्षात हा प्रश्न सुटू शकेल. मी मुद्दाम `विद्यापीठे विकसित' करणे असा शब्द वापरला. कारण विद्यापीठ स्थापन करणे म्हटले की प्रशासन, गुणवत्ता अन आणखीन कसले कसले घोळ होऊ शकतात हे सगळे जाणतात. तसे पाहता खूप साधी बाब. पण....

- श्रीपाद कोठे

२२ फेब्रुवारी २०१७

श्री गुरुजींचे कालातीत चिंतन

आज विजया एकादशी. रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचा आज जन्मदिवस. संघटना आणि संघटीत समाज यातील भेद समजावून सांगून त्यांनी या विषयाचे विवेचन १९६० साली इंदोर येथे झालेल्या चिंतन बैठकीत केले होते. संघ स्वयंसेवकांनी आपल्या नित्य चिंतनाचा विषय करावा एवढा तर तो महत्वाचा आहेच, पण एक social thought म्हणूनही त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.

गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'

याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'

शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'

या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'

- श्रीपाद कोठे

२२ फेब्रुवारी २०१७

अभिनिवेश आणि आक्रस्ताळेपणा नसावा

काल राज्यभरात झालेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रात्री एका वाहिनीवर चर्चा सुरु होती- मतदान सक्तीचे करावे का, या विषयावर. त्यात एक मुद्दा हाही आला की, मतदान सक्तीचे करून; जो मतदान करणार नाही त्याला कोणत्याही सोयी सवलती सुविधा देण्यात येऊ नयेत. एकूणच सध्याच्या अविचारी वातावरणात असे विचार, अशा चर्चा, अशा सूचना येणे यात आश्चर्य वाटायला नको. पण आश्चर्य वाटू नये याचा अर्थ ते विचार आणि तो प्रवाह घातक नाही असा मात्र होत नाही. माणूस, त्याचा जन्म, त्याचं जगणं, त्याचं प्रयोजन, त्याच्या अस्तित्वाचा अर्थ या प्रथम येणाऱ्या बाबी आहेत. सरकार किंवा अन्य सगळ्याच व्यवस्था, रचना इत्यादी त्यानंतरच्या बाबी आहेत. या व्यवस्था, रचना इत्यादी त्याच्या सर्वंकष जगण्याला मदत करण्यासाठी आहेत. त्या supplementary and complimentary आहेत. व्यवस्था, रचना माणसासाठी आहेत; माणूस रचना आणि व्यवस्थांसाठी नाही. हे खणखणीतपणे सांगण्याची खरं तर गरज आहे. तशी ती नेहमीच असते. भारतातील ऋषी मुनी संत आदी हे काम करीत असत. आज दुर्दैवाने तसे ऋषी मुनी संत नाहीत आणि ज्या विचारवंतांनी, चिंतकांनी, समाजाचा सर्वांगाने विचार करणाऱ्या लोकांनी हे सांगायला हवं ते तसं सांगत नाहीत. एक तर त्यांची कुवत नाही किंवा इच्छा नाही. `लोकशाही' नावाचा इतका सावळागोंधळ माजलेला आहे की विचारता सोय नाही. कालच्याच चर्चेत एक मुद्दा नागरिकांच्या कर्तव्याचा आला. पण सरकारच्या कर्तव्याचे काय? मुळातच ही कर्तव्ये, अधिकार इत्यादी कशासाठी असतात? कोणी कोणावर अधिकार गाजवायचा किंवा कोणी कोणावर नियंत्रण ठेवायचे याची चर्चा माणसाच्या माणूसपणाला कमीपणा आणणारी नाही का? अधिकार किंवा नियंत्रणे या भावनाच अतिशय क्षुद्र नाहीत का? यावर तर्क दिला जाऊ शकतो की समाज सुव्यवस्थित राहण्यासाठी हे आवश्यक आहे. हे खरे आहे की, माणूस आदर्शानुसार फार कमी वागतो. मात्र वास्तवतेचा टोकाचा विचार करणारी व्यक्तीही अपेक्षा मात्र आदर्श आणि नैतिकता यांचीच करीत असते. लोकांनी कायदे पाळायला हवेत असे म्हणणे हाही आदर्श नाही का? खरे तर हे आहे की, काही ना काही आदर्श असल्याखेरीज, नितीमत्ता आणि श्रेष्ठतेचे काही ना काही मापदंड अन मानदंड असल्याखेरीज समाज राहूच शकत नाही. त्यामुळेच कमीत कमी व्यवस्था, कमीत कमी धाक आणि जास्तीत जास्त आदर्श, त्यासाठी प्रेरणा जागृत करण्याचे व्यापक प्रयत्न, अधिकाधिक स्वातंत्र्य, पोषक वातावरण; हीच पद्धती उपयुक्त ठरू शकते. आज मात्र नेमके याच्या विरुद्ध- अधिकाधिक व्यवस्था, अधिकाधिक नियंत्रण, अधिकाधिक धाक, जीवनाच्या उच्च प्रेरणांकडे अक्षम्य दुर्लक्ष, पोषक वातावरणाची हेळसांड असेच चालू आहे. पुन्हा प्रश्न उपस्थित होईल की, असा आदर्श समाज प्रत्यक्षात आला तरी त्याला वेळ किती लागेल? वर्तमानात त्याचा काय उपयोग? तर्क बिनतोड वाटला तरीही भुसभुशीत म्हणावा लागेल. भारत का टिकला? हिंदू समाज का अमर झाला? या प्रश्नांची उत्तरे आहेत त्याने हजारो वर्षे आदर्श रुजवण्याचा प्रयत्न केला. ती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती आणि ती कधीच पूर्ण होतही नाही. पण वर्तमानात जगतानाही आंतरिक विकासाच्या प्रेरणा घट्ट धरून ठेवणे एवढेच नाही तर वर्तमानाच्या दबावाला बळी न पडणे हेच या देशाचे वैशिष्ट्य आहे. अन त्यामुळेच आजही चांगुलपणा जपणारा समाज म्हणून तो जगात उभा आहे. आज आम्ही ते सूत्रच सोडून दिले तर मात्र हा गौरव फार टिकणार नाही.

दुसरा जो मुद्दा चर्चेत आला होता तो सोयी सवलती आदींचा. मतदान न करणाऱ्याला सोयी सवलती नाकारणे हे या देशाच्या अन हिंदुत्वाच्या भावनांशी पूर्णत: विसंगत आणि विरोधी आहे. ही भूमी, येथील संसाधने इत्यादी कोणाच्याही मालकीची नाहीत. समाजाची प्रतिनिधी असलेल्या सत्तेचीसुद्धा यावर मालकी नाही. एक व्यक्ती काय किंवा गट काय किंवा सत्ता काय; हे केवळ विश्वस्त आहेत. हे संपूर्ण अस्तित्व आपल्यापैकी कोणीही तयार केलेले नाही, जन्माला घातलेले नाही. तुम्ही ईश्वर माना की मानू नका; या विश्वाचा कर्ता माणूस नाही हे कोणीही नाकारू शकत नाही. तेव्हा हे विश्व ईश्वराचे आहे म्हणा किंवा कोणाचे आहे माहीत नाही म्हणा; पण ते तुमची आमची जहागीर नाही हे निर्विवाद. त्यामुळेच आपण याचे विश्वस्त आहोत आणि सगळ्यांचा, माणसासकट पशु पक्षी झाडे कीटक अन सगळ्यांचा त्यावर भरणपोषणासाठी अधिकार आहे. अमुक कोणी आमची व्यवस्था मानतो अथवा मानीत नाही किंवा आम्ही म्हणतो तसा वागत नाही किंवा आमच्या म्हणण्यानुसार contribute करीत नाही म्हणून त्याला सोयी सुविधा नाकारणे हे पशुत्वाचे अन राक्षसी वृत्तीचे म्हटले पाहिजे. लोकशाही टिकायची असेल तर टिकेल, नसेल टिकायची तर नाही टिकणार. कोणतीही व्यवस्था किंवा अन्यही काही त्याच्या त्याच्या अंगभूत गुणांमुळे आणि या विश्वात त्याची उपयुक्तता असेल तोवरच टिकतात. लोकशाही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. अन विचार न करता बोलण्याच्या वर्तमान पद्धतीप्रमाणे याकडे पाहण्याचीही गरज नाही. छत्रपती शिवाजी, अहल्याबाई होळकर, हरिहर बुक्कराय, सम्राट अशोक, हर्षवर्धन, विक्रमादित्य, पुराणांमध्ये वर्णित स्त्री राज्ये, निषाद राज्ये, कोळी राज्ये ही काही आजची लोकशाही राज्ये नव्हती. एवढा संकेत पुरेसा आहे. अभिनिवेश आणि आक्रस्ताळेपणा टाळून विचार करायला आपण शिकले पाहिजे. घसरण अधिक होऊ नये यासाठी असा विचार आत्ताच करायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २२ फेब्रुवारी २०१७

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

व्यवस्था, अव्यवस्था

व्यवस्था राखताना त्यातून अव्यवस्था किंवा गोंधळ निर्माण होणार नाही हेही पाहिले पाहिजे. सध्याच्या दोन निर्णयांमुळे हा विचार मनात आला. पहिला म्हणजे मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध fir दाखल करण्याचा निर्णय. अन दुसरा निर्णय माघ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना धर्मशाळा वा अन्यत्र निवास देऊ नये यासाठी आदेश. मास्क बांधणे आणि यात्रेसाठी गर्दी न करणे या गोष्टी योग्य आहेतच. पण त्यासाठी जे उपाय केले जातील त्याने नागरिकांचे काय व्हायचे ते होवो पण व्यवस्थांमध्ये गोंधळ वाढेल, व्यवस्था व प्रशासनावर ताण वाढेल याबाबत दुमत होऊ नये. अन ताण आणि गोंधळ वाढल्यावर व्यवस्था आणि प्रशासन किती कार्यक्षम राहील? किती परिणामकारक राहील? मग नेहमीचे कागदोपत्री सगळे ठीकठाक दाखवणे बाकीचे राम भरोसे. काय साध्य होते याने? मग न ऐकणाऱ्या लोकांचे काय करायचे? त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायचे. त्यांचा उपसर्ग बाकीच्यांना होऊ शकतो त्याचे काय? त्याची काळजी बाकीच्यांनी घ्यावी. वास्तविक एका मर्यादेनंतर व्यक्ती काय किंवा व्यवस्था काय, जबाबदारी घेऊ शकत नाहीत. अन एका मर्यादेनंतर जबाबदारी न घेणेच योग्यही ठरते. त्यातूनच लोकांमध्ये स्वतःच्या जबाबदारीची भावना वाढू शकते. सुरुवातीला गोंधळ होऊ शकतो पण त्या गोंधळापोटी होणाऱ्या क्रियाप्रतिक्रियातूनच व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारीची भावना वाढेल. प्रत्येक वेळी प्रशासनाने अन शासनाने सूत्र हाती घेणे आणि शिस्त लावणे वगैरेला काहीही अर्थ नाही. त्याने अपेक्षित परिणाम तर मिळणार नाहीतच पण समाजाचा मनोविकास देखील होणार नाही. आजवर हेच चालत आले आहे. यापुढे हळूहळू बदल व्हावा एवढेच.

- श्रीपाद कोठे

२१ फेब्रुवारी २०२१

मातृभाषा

आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. जगात सगळ्यांनाच मातृभाषा जपण्याची गरज वाटू लागली आहे असाच त्याचा अर्थ होईल. ही गरज वाटणे आणि त्यासाठी ठोस वा प्रतिकात्मक काही करणे चांगलेच. यानिमित्ताने भाषा आणि बोली अशीही चर्चा होणे स्वाभाविकच. मुळात असा भेद करणे फारसे बरोबर वाटत नाही. माणसाने ठरवलेल्या भाषेच्या मापदंडावर बोली बसत नसतील तरीही बोली हीच भाषेची प्रथमावस्था आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही. इतका सोपा असलेला विषय इतका सोपा मात्र राहत नाही. कारण त्यात संख्या, पैसा, अनुदाने, जमिनी, अस्मिता, वर्चस्व, श्रेष्ठत्व अशा गोष्टी जोडल्या जातात. त्यावर तूर्त फारसे बोलणार नाही. पण एका विषयाकडे लक्ष मात्र वेधावेसे वाटते. भारतात २०११ च्या जनगणनेनुसार १९ हजार ५६९ भाषा/ बोली आहेत. त्यातील फक्त १२१ भाषा अशा आहेत की ज्या बोलणाऱ्या लोकांची संख्या १० हजारा पेक्षा जास्त आहे. म्हणजेच १९ हजार ४४८ भाषा/ बोली अशा आहेत ज्या बोलणाऱ्यांची संख्या १० हजाराहून कमी आहे. हे सगळे अभ्यास म्हणून ठीक आहे. इतिहास म्हणून त्याची नोंद असावी हेही योग्यच. पण या सगळ्या भाषा/ बोली टिकवण्याचा प्रयत्न व्हायला हवा असा जर आग्रह धरला जाईल वा जात असेल तर ते मात्र पटणारे नाही. जीवनाचा प्रवाह वाहत असतो. तो स्वाभाविकपणे वाहत राहावा आणि त्या स्वाभाविक धारेत जे काही राहील वा जाईल ते स्वीकारायला हवे. मुद्दाम राखण्याचा प्रयत्न आणि मुद्दाम संपवण्याचा प्रयत्न; दोन्ही चुकीचेच म्हटले पाहिजेत. आज जगभरात मातृभाषेविषयी निर्माण झालेली आस्था, त्या त्या भाषा संपवण्याच्या अनैसर्गिक प्रयत्नांची प्रतिक्रिया आहे. ती योग्यच आहे पण त्याचवेळी अट्टाहास सुद्धा बरोबर नाही. दोन्हीकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.

- श्रीपाद कोठे

रविवार, २१ फेब्रुवारी २०२१

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

राजदीप राष्ट्रविरोधीच

राजदीप सरदेसाई फेसबुकवर trending क्रमांक १ वर दिसत आहेत. `मी बीफ खातो. त्यामुळे मी राष्ट्रविरोधी आहे', असे त्याने छाती काढून म्हटल्याचे त्यात दाखवत आहे. अभारतीय विचारांनी पोसलेली बुद्धीशून्यता आणि मूर्खपणा त्याच्या या वाक्यातून झळकतात. त्याने हे वाक्य कोणत्याही अर्थाने अन कशासाठीही म्हटले असो, पण तो राष्ट्रविरोधी आहेच. अन त्याचे कारण त्याचे बीफ खाणे नाही. तर त्याचा उन्माद आणि उन्मत्तपणा हे आहे. `मी कोणाचाही अन कशाचाही विचार करणार नाही. माझ्या मनास येईल ते करीन. शिवाय ते करताना ज्यांना ते पटत नाही त्यांना जाणीवपूर्वक दुखावेन', हा जो उर्मटपणा अन उन्मत्तपणा आहे; तो या राष्ट्राचा स्वभाव नव्हता, नाही. ते या राष्ट्राचे लक्षण नाही. राजदीप या राष्ट्राचा स्वभाव आणि लक्षण यांच्या विरोधी वागत असल्याने तो राष्ट्रविरोधी आहे. अभारतीय विचारांनी गेल्या शतकभराहून अधिक काळ या राष्ट्राला विकृत करण्याचा जो प्रयत्न केला त्याचे हे परिणाम आहेत. अन्यथा, गोमांसच नव्हे एकूणच मांसाहारापासून लोकांना दूर करण्याचे प्रयत्न या देशातील हजारो, लाखो लोकांनी गेली हजारो वर्षे केले आहेत. माकडातून उत्क्रांत झालेल्या माणसाला याच्याही पुढे ईशत्वाकडे नेण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग होता व आहे. महात्मा गौतम बुद्ध असोत, महात्मा महावीर असोत की महात्मा गांधी; सगळ्यांनी हा प्रयत्न केला. पण या प्रयत्नांनाही संघ परिवाराचा अजेंडा ठरवताना आपण केवढे बुद्धीदारिद्र्य दाखवीत आहोत याचेही भान या तर्कटांना राहत नाही. मांसाहारच नव्हे, व्यक्त आणि अव्यक्त स्वरूपातल्या असंख्य अशा गोष्टी आहेत, ज्या माणसात, समाजात आहेत. पण त्या अंतिम नाहीत. त्या दूर सारून पुढे जाणे म्हणजे मानवाचा महात्मा होणे आहे. या देशात असे कोट्यवधी महात्मे अज्ञात भूतकाळापासून होत आलेले आहेत. त्यांनीच माणसाचे दिव्य स्वरूप सगळ्या समाजापुढे प्रत्यक्ष उदाहरणातून ठेवले आहे. सगळे अभारतीय विचार माणसाचे हे दिव्यत्व नाकारून त्याचे माकडचाळे उचलून धरतात. भारतीय व्यक्तीस्वातंत्र्य मनुष्याला दिव्यत्वाकडे जाण्याचा विचार देते, अभारतीय व्यक्तीस्वातंत्र्य माणसाला पुन्हा माकड होण्याचा उपदेश देते. राजदीप या अभारतीय व्यक्तीस्वातंत्र्याचा उद्घोष करतो; म्हणूनच तो राष्ट्रविरोधी आहे. त्याने त्रागा केला तरी, अन न केला तरीही.

- श्रीपाद कोठे

१९ फेब्रुवारी २०१६

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

कायद्याचे राष्ट्र अन राष्ट्राचा कायदा

जेएनयु प्रकरण, कन्हैय्या अटक, राजकीय पक्षांच्या याबाबत भूमिका; या साऱ्यांच्या चर्चेत कायद्याचा उल्लेख वारंवार होतो. सगळ्या गोष्टी कायद्यानुसार व्हायला हव्या, कायदा आपले काम करेल, कायदा सर्वोच्च इत्यादी सतत कानावर आदळते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, कायदे राष्ट्र जन्माला घालत नाहीत, राष्ट्र कायद्यांना जन्म देते. कायदे वा घटना राष्ट्र जन्माला घालत नाही, उभं करत नाही, घडवत किंवा बिघडवत नाही. उलट राष्ट्र आपल्या गरजेनुसार प्रकृतीनुसार घटना, कायदे इत्यादीला आकार देत असते. कायदे किंवा घटना नसतानाही राष्ट्र अस्तित्वात असते. अन ते जिवंत आणि सशक्त असले तर त्याचा प्रत्ययही येत असतो. अगदी साधी गोष्ट आहे. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी कुठे कायदे वा घटना होती. अन त्यानंतर १९४७ पर्यंत; तब्बल ९० वर्षे जो लढा चालला तो लढा कोणी दिला? किंवा ९० वर्षे चाललेल्या या संघर्षाला जो प्रतिसाद मिळाला तो कोणी दिला. कशाच्या आधारे, कशाच्या भरवशावर, कशासाठी, अन कोणी हा सारा खटाटोप अन सायास केला? व्यवस्थाशून्य अवस्थेत जिवंत राहून, त्या स्थितीतून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार कोणी केले? हे सारे जी शक्ती, जी भावना घडवून आणते; ते राष्ट्र. ते कायदे, घटनेवर अवलंबून नसते. ते आपल्या गरजा आणि प्रकृतीला अनुसरुन कायदे वा घटना यांना आकार देते अथवा त्यांना निकाली काढून त्या जागी दुसऱ्या व्यवस्था निर्माण करते. जगभरात विविध मानवी समूहात जे बदल वा परिवर्तने होत आली आहेत आणि आजही होत आहेत; ती राष्ट्र भावनेचा परिणाम आहेत. ज्यावेळी नियम, कायदे, घटना वा व्यवस्थांच्या आधारे समाज उभा करण्याचा प्रयत्न होतो, राष्ट्र जन्माला घालण्याचे कृत्रिम प्रयत्न होतात त्यावेळी ते असफल तर होतातच, शिवाय स्वत:ला अन जगाला भारभूतही होतात. इस्लाम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट, समाजवाद, भांडवलशाही यांनी हाच dogmatic approach घेऊन प्रयत्न केलेत अन ते जगाला भार बनलेत. जगभरातील घडामोडींवर नजर टाकली तर आता लोकशाही म्हणून स्वीकारलेल्या व्यवस्थांचा क्रमांक लागल्याचे दिसेल. ब्रिटीश, फ्रेंच, पोर्तुगीज यांना जगभरातून गाशा गुंडाळावा लागल्यानंतर सर्वत्र लोकशाहीचे वारे वाहू लागले. कायद्यांची चौकट हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण बनले. त्यातून आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले आहे. अन प्रत्येक लहानमोठ्या देशात विविध स्तरांवर, विविध संघर्ष उभे राहत आहेत. याचा अर्थ राज्याची लोकशाही रचना, भांडवल, समाजाबद्दलची करुणा, विविध पंथ- संप्रदायांची गरज या गोष्टी चुकीच्या आहेत वा त्यांची मुळीच आवश्यकता नाही असे नाही. मात्र ही सगळी साधने आहेत. ती मूळ नाहीत, ती अपरिहार्य नाहीत, ती अपरिवर्तनीय नाहीत याचा विसर पडता कामा नये. यांच्या आकारास येणे आणि लय पावणे याच्या मुळाशी, ही उत्पत्ती आणि लय घडवून आणणारी जी बाब आहे ती आहे राष्ट्र. ती नीट समजून घेतली तर सगळ्यांच्याच फायद्याचे ठरू शकते.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१६

मणिशंकरचा थयथयाट

सुदर्शन वाहिनीवर `walk the talk' सुरु होता. मणिशंकर अय्यरचा. प्रश्न विचारत होते वाहिनीचे संपादक चव्हाणके. बोलता बोलता अय्यर बोलले- `या देशाची महानता आहे की त्याने सगळ्यांचे स्वागत केले. सगळ्यांना आसरा दिला. आदर केला. म्हणूनच जगातील पहिले चर्च भारतात उभे राहिले. ख्रिस्ताच्या मायभूमीत अन कर्मभूमीत सुद्धा चर्चेस नंतर उभी झालीत.' त्यावर संपादक चव्हाणके यांनी लगेच प्रश्न केला- `ख्रिश्चन लोकांशी असा आत्मीय व्यवहार करणारे कोण होते? तुम्ही म्हणता तसे घडण्यापूर्वी येथे कोण होते? तुम्ही म्हणता तो देशाचा स्वभाव घडवणारे, जोपासणारे कोण होते?' अन लगेच मणिशंकर अय्यरचा स्वर बदलला. म्हणाले- `ते तुम्ही हिंदू हिंदू नका करू.'

ढोंगीपणा, बेशरमपणा, दुतोंडीपणा, मस्तवालपणा, क्षुद्रता यापेक्षा वेगळी काही असू शकते?

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१५

राजा - प्रजा

राजासारखी प्रजा असते की प्रजेसारखा राजा? याची चर्चा जगभर अनेकांनी केली आहे. अगदी व्यास महर्षींनी देखील यावर मत दिले आहे. त्या सगळ्या थोरांची क्षमा मागून एक मुद्दा विचारार्थ-

याच्यामुळे ते की त्याच्यामुळे हे? या चर्चेत मुळात एक मुद्दा अध्याहृत आहे की- मानवी प्रयत्नामुळे हे जग चालत असतं. पण खरंच असं असतं का? अन क्षणभर मान्य केलं की, मानवी प्रयत्नांनीच हे जग चालतं; तर एक प्रश्न पुढे येतो की- या प्रयत्नांची प्रेरक आणि कारक शक्ती कोणती? अमुक कृती किंवा अमुक विचार कर किंवा करा; अमुक गोष्टीचा अर्थ अमुक अमुक; यासारख्या असंख्य गोष्टी माणूस मुळात का आणि कशा करतो? अन जी कोणी प्रेरक वा कारक शक्ती वा तत्व असेल किंवा नसेल ते एकाच गोष्टीबाबत प्रत्येकाला वेगवेगळं काही का सांगते? वेगळं आकलन, वेगळा तर्क, वेगळा अर्थ.

मुळात अनादी काळापासून अनंत काळापर्यंत चालणारा हा मानवी जीवनाचा व्यापार आकलन करण्याची माणसाची क्षमता आहे का?

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१८

एकांगी

कोणी म्हणतो म्हणून माणूस जडवादी असतो का? कोणी म्हणतो म्हणून माणूस चेतनवादी असतो का? कणभर सुद्धा जडवादी नसलेली आध्यात्मिक व्यक्ती जगात असेल का? झाली असेल का? कणभरसुद्धा जडवाद बाजूस न सारणारी जडवादी व्यक्ती जगात झाली असेल का? असेल का? जड-चेतन, विचार-भावना, अंधार-उजेड, स्वतंत्र-परतंत्र, व्यक्ती-समाज, विज्ञान-अध्यात्म, स्त्री-पुरुष; अशा असंख्य रंगी ढंगी अन प्रकृतीच्या घटकांचे स्थान आहेच आहे. या परस्पर टोकाच्या मधील असंख्य रंग ढंग अन प्रकृतीच्या अगणित घटकांचे सुद्धा स्थान आहे. मुख्य म्हणजे ते सगळे समजून घेतले तरीही तळ गाठता येणे शक्य नाही. अन ही देखील मानवी प्रवृत्तीच आहे की- तो कोणती तरी एकच गोष्ट उचलतो आणि एकांगी होतो अन होतच जातो. ही एकांगीपणाची प्रक्रिया थांबवून सर्वांगी (खरं तर अनेकांगी. कारण सर्वांगी हाही शब्द आमची दांभिकता दाखवणारच. अन ही दांभिकता अधोरेखित व्हावी म्हणूनच सरळ सरळ अनेकांगी शब्द न वापरता सर्वांगी शब्द वापरून त्याचे स्पष्टीकरण.) दृष्टीचा विकास करण्याचा प्रयत्न म्हणजे- सभ्यतेचा प्रवास, संस्कृतीचा प्रवास, माणूस घडण्याचा प्रवास, माणसाचा देवमाणूस होण्याचा प्रवास, माणसाचा सुपर-माणूस होण्याचा प्रवास. हे प्रयत्न म्हणजेच मानवी उत्क्रांती. बाकी माणसाला शेपूट होते की नव्हते या गोष्टी गौणच.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१८

कुटुंब व्यवस्था

काल डॉ. मोहनजी भागवत यांनी कुटुंब व्यवस्थेच्या संदर्भात काही वक्तव्य केले. त्यावर कोण गदारोळ माजला. आज दोन वेगवेगळ्या वृत्तपत्रात दोन मजकूर वाचले. यातील एकही वृत्तपत्र तरुण भारत, पांचजन्य, organiser, विवेक इत्यादी नाही.

एक मजकूर आहे, विनापत्य राहण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये मूळ धरतो आहे. त्याची कारणमीमांसाही आहे. दुसरा मजकूर आहे, मुली महिला पळून का जाताहेत. दोन पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील काही आकडेवारीही त्यात आहे. पळून जाण्याचे हे प्रमाण छोट्या कालावधीत दोन डझनाच्या पुढे आहे. याचीही थोडी कारणमीमांसा आहे. तिसरा मजकूर आजच्या वृत्तपत्रात नाही. पण आज घराघरात चर्चा असते तो म्हणजे; विवाहजुळणी. त्याचीही कारणमीमांसा होत असते आणि ती सगळ्यांच्या परिचयाची आहे.

तिन्ही बाबतीत पैसा आणि शिक्षण यांनी माणसाच्या मनात निर्माण केलेली उन्मत्तता हेच कारण आहे. याचीच परिणती घटस्फोट किंवा कुटुंबांच्या विघटनात होते. ही साधा तर्क, साधे अनुभव, साधी समजूतदारी आहे. आजच्या दोन्ही वृत्तपत्रात आणि घरोघरी होणाऱ्या मतप्रदर्शनात हेच मुद्दे पुढे येतात.

जीवनाच्या अन्य अंगांप्रमाणेच शिक्षण आणि संपन्नता यांनी त्यांचे मूळ हेतू गमावले आहेत. Career, achievement, goals, targets यांना जे अति आणि अवास्तव महत्व आले आहे; आणि भरीस भर व्यक्तिवादाची त्याला जी जोड मिळाली आहे; त्याने व्यक्तिजीवन, समाजजीवन ज्या पद्धतीने अस्थिर, अशांत, पोकळ आणि निरर्थक करून टाकले आहे; तो सगळ्यांच्याच चिंतेचा विषय आहे. नाटके, चित्रपट, कथा, कविता, निबंध, मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय विचार विनिमय; या सगळ्यात हे झळकत असतेच.

त्यावरचे उपाय म्हणून ज्यावेळी समुपदेशक किंवा आध्यात्मिक चिंतक पैसा, शिक्षण आणि अन्य ऐहिक बाबींना मर्यादित करण्यास सांगतात तेव्हा ते योग्यही ठरते. तेच डॉ. मोहनजी भागवत सांगतात तेव्हा मात्र तो टळावकी आणि उपहासाचा विषय होतो !

आज जगापुढे अर्थाच्या प्रभावाचे संकट आ वासून उभे आहे. (यावरील विस्तारपूर्वक विवेचन 'अर्थप्रभावाची गुन्हेगारी' या ब्लॉगवर उपलब्ध माझ्या लेखात वाचता येईल.) दुसरे तेवढेच महत्वाचे संकट म्हणजे; माहिती आणि अध्ययन यांचे ज्ञानात रूपांतर करण्याचे. माहिती म्हणजे ज्ञान नाही, हे वाक्य अनेकदा ऐकायला मिळते. (अर्थाचे आकलन थोडे असते हा भाग वेगळा.) पण अध्ययन म्हणजेही ज्ञान नाही. खूप अध्ययन असणारा पंडित असू शकतो ज्ञानी नाही. आज ज्ञाननिर्मितीची मोठी समस्या आहे.

एक महत्वाची बाब शेवटी नमूद करणे आवश्यक आहे. सरसंघचालक काही बोलतात, भाष्य करतात तेव्हा; ते सगळ्या मानव समूहासाठी असते आणि त्यात संघ स्वयंसेवकांचाही समावेश असतो. स्वयंसेवक म्हणजे काही विशेष अथवा वेगळी कॅटेगरी नसते. एवढेच की एका रचनेचा भाग आहोत हे त्यांनी स्वीकारले असल्याने ते त्याकडे किंचित सौम्यपणे पाहतात. मात्र पुष्कळदा स्वयंसेवकांचीही वेगळी मते असतात. सरसंघचालक ज्यावेळी बोलतात त्यावेळी ते स्वयंसेवक आणि अन्य अशा सगळ्यांच्या विचार प्रक्रियेला आवाहन असते.

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०२०

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

शांतपणे

१) शांतपणे वाचणे, पूर्ण वाचणे

२) शांतपणे पाहणे, पूर्ण पाहणे

३) शांतपणे ऐकणे, पूर्ण ऐकणे

४) शांतपणे समजून घेणे, पूर्ण समजून घेणे

५) प्रत्येकच गोष्ट स्वत:शी relate न करणे

६) आपल्याशी संबंधित एखादी गोष्ट दिसल्यावर लगेच ते कौतुक आहे किंवा टीका आहे; असा निष्कर्ष न काढणे

या गोष्टी दुर्मिळ असतात का? या गोष्टी दुर्मिळ का असतात?

- श्रीपाद कोठे

१७ फेब्रुवारी २०१६

अभिव्यक्तीचा खरा चेहरा

- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर काल पश्चिम बंगालच्या जादवपूर विद्यापीठात तोच प्रकार घडला. शिवाय `जेएनयु'चे समर्थन आणि संघविरोधी घोषणा स्पष्टपणे देण्यात आल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नाटकाचा खरा चेहरा सगळ्यांना माहिती आहेच. तो अधिक स्पष्ट झाला.

- अतिशय निरर्थक शत्रुघ्न सिन्हा आजही ओकला. अरे मुर्दाडा, त्या कन्हैय्याने एकीकडे भाषण गोरगरीबांचे करायचे अन उमर खालिदला १० दिवस जेएनयुत राहण्याची, कारवाया करण्याची अन नंतर पळून जाण्याची सोय करायची आणि तरीही कन्हैय्याने देशविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत, म्हणून तो दोषी नाही; असे तू म्हणायचे... तुझी पोरगी अंगावर जेवढे कपडे ठेवते तेवढीही अक्कल तू ठेवत नाही हे जगाला कशाला दाखवतो?

- दशकानुदशके आम्ही विद्यापीठांमधून संघ, हिंदुत्व, एकात्म मानववाद येऊ देणार नाही. संघ आणि त्याच्या विषयांवर सेमिनार होऊ देणार नाही. प्रसार माध्यमातून त्यांना तांदळातल्या खड्याप्रमाणे बाहेर काढू. हिंदू, हिंदुत्व, भारत, परंपरा, वेद, उपनिषदे, धर्म, तत्वज्ञान, भारतीय प्राचीन विज्ञान- अर्थशास्त्र- राजनीती- समाजव्यवस्था-, एकसंध भारत; कशाकशाला लोकांपुढे येऊही देणार नाही... तरीही आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ठेकेदार...!!! या ठेकेदारांचे ठेके रद्द करून त्यांना देशोधडीला लावण्यात काहीही गैर नाही.

- डावे आणि पुरोगामी समजतात तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे `मुंह मे आया बक दिया; ******* मे आया हग दिया' नसते. आधी अभिव्यक्ती म्हणजे काय हे शिका, बावळटांनो.

- श्रीपाद कोठे

१७ फेब्रुवारी २०१६

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

या विकृतांना वठणीवर कसे आणायचे?

आपल्या समाजाला कौतुकाची खूप घाणेरडी सवय लागली आहे आणि राजकारण नामक गोष्टीने सारा समाज नासवून टाकला आहे. आज पुन्हा हे आठवायचे कारण म्हणजे डीजे नावाचा प्रकार. प्रत्येकाला कधी ना कधी हा त्रास सोसावा लागतोच. आम्ही करू मात्र काहीच शकत नाही. तीन-चार तास ज्यावेळी सतत कानठळ्या बसत असतात त्यावेळी करायचे काय? कायदा गाढव असतो म्हणतात ते काही खोटे नाही. अमुक वेळेत तुम्ही डीजे वाजवू शकता. म्हणजे त्या वेळेत कोणाला त्रास होऊ शकत नाही की काय? की त्या वेळेतील त्रास निमूटपणे सहन केलाच पाहिजे? बरे या प्रकारात आनंद काय असतो देवच जाणे. अन समजा माझ्यासारख्या मूर्खाला तो आनंद समजत नसेल वा तो लुटता येत नसेल तरीही, मला त्रास देऊन आनंद साजरा करण्याची परवानगी कोणाला कशी काय असू शकेल? अनेकदा तर समाजातील तथाकथित प्रतिष्ठीतच या प्रकाराशी संबंधित असतात. `जाऊ द्या ना' अशीच त्यांची भूमिका असते.

वास्तविक कोणाच्या तक्रारीची वगैरेही वाट न पाहता कारवाई करण्याचे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना द्यायला हवेत. अन ज्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाईल त्या ठाण्यातील अधिकाऱ्याचीच त्वरित बदली करायला हवी. म्हणजे ते स्वत:हून efficiently काम करतील. दुसरे म्हणजे हे साहित्य काही कोणाच्या घरात नसते. बहुतेक वेळा ते भाड्याने आणलेले असते. हा व्यवसाय करणाऱ्यावरच ही कारवाई व्हायला हवी. त्याने सामानच ठेवले नाही तर कोण वाजवणार डीजे. जेव्हा डीजे नव्हते तेव्हाही मंडप डेकोरेशनवाले होतेच ना?

अशा प्रकारची गाणी तयार करणारे, म्हणणारे, वाजवणारे, असे चित्रपट, असे studio या सार्यांवर बंदी घालून कारवाई करायला हवी. यांना दुसरा काही रोजगार नाही मिळाला अन ते मेले तरी काय हरकत आहे. जो दुसऱ्याचा विचार करायला नकार देतो तो जिवंत असल्यापेक्षा मेलेलाच बरा. घर हलवणारे, डोके बधिर करणारे हे गाणे बजावणे बंद व्हायलाच हवे. घरे हलवणाऱ्या गाण्यांपेक्षा मने डोलवणारे संगीत हवे. आजचे गीतकार, संगीतकार ते देऊ शकत नसतील तर त्यांनी मरून जावे. आणि समाजानेही काय पोसायचे आणि काय संपवायचे याचा विवेक शिकला पाहिजे. स्वत:च्या कौतुकाच्या आरत्या ओवाळून घेणे समाजानेही टाकून द्यायला हवे.

ज्यांनी कारवाई करायला हवी ते आणि त्रास सोसूनही तो निमूट सहन करतात ते षंढ आहेत तर दुसऱ्यांचा विचार न करणारे विकृत आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व प्रकारचं पाप वाट्याला आलं तरीही चालेल पण अशा विकृतांचं तळपट व्हावं, कधीही भलं होऊ नये, त्यांच्या अंगात किडे पडावे आणि मेल्यावर त्यांनी नरकात जावं याशिवाय दुसरं काहीही म्हणता येण्यासारखं नाही.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०१३

संघचर्चा

संघविरोधक आणि नाराज स्वयंसेवक यांचा ४-५ जणांचा एक गट आणि निष्ठावंत स्वयंसेवक आणि समर्थक असा ४-५ जणांचा एक गट. दोघांमधील चर्चा-

विरोधक- संघाचे खूप चुकते. भाजपला control नाही करू शकत. कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना डोक्यावर बसवतात. संघाचे लोक असून जातीपातीचा विचार करतात. बाकीच्यांसारखी आता यांनाही ब्राम्हणांची allergy व्हायला लागली आहे.

समर्थक- संघाच्या काही मर्यादा आहेत. निवडणुकीची अशी काही समीकरणे असतात. आपला संघटनेवर, पक्षावर विश्वास असला पाहिजे. समजा न पटणारा निर्णय झाला तरीही तो मान्य केला जायला हवा.

दोन्ही पक्षांचे तडाखेबंद, आक्रमक, सशक्त युक्तिवाद. पण मुळातच निवडणुका, राजकारण हे संघाचं कामच नाही, याची जाणीव मात्र दोघांनाही नाही. ना विरोधकांना ना समर्थकांना. याला जबाबदार अर्थात मोठ्या प्रमाणात संघच.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०१७

पुलवामानंतर

पुलवामा घटनेनंतर एक स्वाभाविक आक्रोश सर्वत्र आहे. लोकदेखील फार काही ऐकून घेण्याच्या, विचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. परंतु हीच वेळ आहे की, काही गोष्टींचा मुळातून, शांतपणे विचार करायला हवा. याच क्षणी काही गोष्टी अधिक नेमक्या समजून घेता येऊ शकतात. अर्थात हे व्यक्तिगत पातळीवरच शक्य आहे. जाहीरपणे या गोष्टी मांडणे फारसे कठीण नसले तरीही, एक तर त्याचा उपयोग नाही आणि दुसरे म्हणजे त्याला फाटे फुटून फक्त गोंधळ तेवढा माजेल. विचार करणाऱ्या लोकांनी मात्र व्यक्तिश: काही गोष्टींचा शांतपणे विचार करायला हवा असे वाटते.

१) पुलवामा सारखी घटना पहिल्यांदाच घडली आहे का?

२) दुष्ट शक्तींचा पूर्ण नायनाट शक्य आहे का? (दुष्टता आणि सुष्टता यांची मुळं.)

३) चंद्रगुप्त, शिवाजी, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग, बंदा बैरागी, पेशवे, क्रांतिकारक, नेताजी, इंदिरा गांधी (बांगला देश), अटलजी (कारगिल); किंवा जगात सर्वत्र शीत किंवा प्रत्यक्ष युद्धे; दोन जागतिक महायुद्धे, रामायण वा महाभारत युद्धे; यातील कोणत्याही युद्धाने दुष्टता नाहीशी झाली का?

४) सिकंदराच्या स्वारीपूर्वीचा मोठा काळ, इस्लाम स्थापनेपूर्वीचा मोठा काळ; भारतीय समाज शांततापूर्ण व सुखी जीवन कसा आणि कशाच्या भरवशावर जगला?

५) सिंधू नदीच्या खोऱ्यातील वैदिक संस्कृती (विचार, मानस आणि धारणा या अर्थाने) हळूहळू कशी पसरली आणि स्थिरपद झाली?

६) मानवी संस्कृती किंवा सुसंस्कृत मानव घडवण्यात hard power आणि soft power चा वाटा किती?

७) किती काळापासून soft power कडे दुर्लक्ष होते आहे?

८) आपल्यावर लादल्या गेलेल्या परिस्थितीचा सामना करण्याचा आपद्धर्म निभावताना, सुसंस्कृत मानव घडवणाऱ्या soft power ला जीवनात मध्यवर्ती स्थान देण्यासाठी काय करावे लागेल?

९) soft power म्हणजे केवळ भूतकालीन श्रेष्ठतेचे गुणगान का?

१०) श्रेष्ठतेचे सिद्धत्व आणि श्रेष्ठतेला मान्यता म्हणजे soft power ला जीवनात मध्यवर्ती स्थान मिळणे का?

११) विद्यमान socio-politico-economic व्यवस्था, रचना, धारणा, तत्वज्ञान अंतिम म्हणून स्वीकारून नवीन world order चा, त्यासाठीच्या soft power चा विकास शक्य आहे का?

१२) नवीन world order चा, त्यासाठीच्या soft power चा विकास न करता मानवी प्रश्न सोडवणे शक्य आहे का? सुख शांतीपूर्ण मानवी सहअस्तित्व शक्य आहे का?

१३) इस्लाम, ख्रिश्चन, मार्क्सवाद, इहवाद, जडवाद, समाजवाद, विज्ञानवाद यांना राजकीय वा सामाजिक दृष्ट्या पराभूत करणे हा उद्देश असावा का? अपूर्ण विचारांना पूर्णता कशी येईल याचा उहापोह हवा की त्यांना पराभूत करण्याचा? असा पराभव होऊ शकतो का?

१४) या अन्यान्य विचारांच्या पूर्णतेचा मार्ग आणि पद्धती काय असू शकेल?

१५) ज्या पद्धतीने वैदिक आर्यांनी भारताच्या मोठ्या भूभागावर सुसंस्कृत मानवी जीवन साकारलं तोच प्रवाह संपूर्ण जगासाठी का विचारात घेऊ नये?

१६) या दृष्टीने जाणीव किती आहे? तयारी आणि प्रयत्न किती आहेत?

हे पूर्णपणे बाजूला सारता येईल किंवा त्यास जोडही देता येईल. वैचारिकांच्या अवलोकनार्थ.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०१९

सगळीच गंमत

इंदुरीकर महाराज सध्या गाजताहेत. अगदी आपण करीत असलेले कीर्तन सोडून देऊन शेती करण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यावर कीर्तन सोडू नका अशा विनंत्याही होत आहेत. चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षांनी सुद्धा त्यांना कीर्तन न सोडण्याची विनंती केली आहे. या विषयावरच्या अनेक बातम्या वा पोस्ट वाचल्यावर सुद्धा वादाचं नेमकं कारण मात्र मला समजू शकलेलं नाही. हां, मुलगा वा मुलगी हवी असल्यास अमुक पद्धत अवलंबावी; हाच एक मुद्दा सर्वत्र आहे. पण त्यात एवढा गोंधळ करण्याचे काय कारण? एखाद्याचे एखादे मत असू शकते.  चूक असेल, बरोबर असेल हा वेगळा भाग. पण जणू काही कोणाला मतच असू नये किंवा असलेच तर फक्त आमच्या मताला धरूनच असावे, या हट्टाला काय म्हणावे?

समाजात सध्या पसरलेल्या झोटिंगशाहीचाच हा नमुना आहे. विचार म्हणा वा सगळ्यांच्या भल्याची कामना म्हणा; या चांगल्या गोष्टींनाही आता वर्चस्ववादाची लागण झालेली आहे. माणसाच्या, समाजाच्या, निसर्गाच्या, जगाच्या भल्याची प्रामाणिक तळमळ सुद्धा या वर्चस्ववादाच्या तडाख्यातून सुटत नाहीत. न जाणो वेगळा विचार, वेगळी भावना, वेगळी गोष्ट लोकांनी स्वीकारली तर आपण अलगथलग पडू की काय अशी भीती यापाठी असेल का? जीही कारणे असतील ती असोत, पण आपण आपले विषय, आपले विचार मांडत राहावेत. काय स्वीकारायचे वा नाकारायचे हे लोक ठरवतील. इतकी उदार वृत्ती क्वचितच पाहायला मिळते. अगदी मस्करी वाटावी अशीही मते असू शकतातच आणि ती बाळगण्याचा अधिकारही मान्य केलाच पाहिजे. जोवर कोणाला इजा होत नाही, जोवर कोणाची लुबाडणूक होत नाही, जोवर कोणाच्या जगण्यात अडथळा आणला जात नाही तोवर; सगळ्यांना विचार, व्यवहार, मतांचे स्वातंत्र्य असायलाच हवे. हे स्वातंत्र्य काढून घेणे वा अमान्य करणे म्हणजे मानवी विचारांचा विकास थांबवणेच होय. असे होता कामा नये.

अमुक एखादी गोष्टच सत्य, योग्य, न्याय्य, करणीय वगैरे निश्चित करून; त्या साच्यात सारं काही ओतण्याचा प्रयत्न आणि अट्टाहास ही मानवी दुर्गतीच म्हटली पाहिजे. योग्य काय, चांगलं काय तर मला जे तसं वाटतं ते. ही धटिंगणशाही होईल. मानापमानाच्या कल्पना हा विषय तर हास्यास्पदच्याही पलीकडे गेलेला आहे. एखादी गोष्ट न पटणे वा त्यावर वेगळे मत असणे ही एक गोष्ट पण त्याने लगेच अपमान वगैरे कसा होऊ शकेल? अपत्यसंभव हा आता सार्वजनिक चर्चेचा विषयही झालेला आहे. तो taboo राहिलेला नाही. परंतु तो विशिष्ट भाषेत आणि विशिष्ट लोकांनीच बोलला तर योग्य असं म्हणणं वैचारिक दिवाळखोरी ठरेल. त्या विशिष्टतेच्या चौकटीबाहेर सुद्धा मते, विचार असू शकतात. एचढेच नाही तर ती मांडण्याचा अधिकारही असतोच. परिपक्व समाजाने अशा गोष्टींकडे पाहण्याची, त्यावर चर्चा करण्याची योग्य शैली विकसित केली पाहिजे.

- श्रीपाद कोठे

रविवार, १६ फेब्रुवारी २०२०

सायकल

सहज सायकल वापरता येईल अशी शहरं विकसित केली तर ना महागाई वाढणार, ना विदेशी गंगाजळी कमी होणार, ना प्रदूषण होणार. पण शासन, प्रशासन, राजकारण, उद्योग, अन समाज यांना हे हवं आहे का? सायकल ही फॅशन म्हणून चालवणे पुरेसे नाही. अन सध्याच्या शहरी रचनेत आणि आकारात सायकल हे दैनंदिन जीवनाचं वाहन होऊ शकत नाही. एकीकडे शहरांची सूज दुर्लक्षित करायची अन बाकीच्या गोष्टी करायच्या हे काही फारसं बरोबर नाही. सायकल चालवणे म्हणजे मागासपण, सायकलचा वापर म्हणजे जगाच्या स्पर्धेत माघारणे, सायकलचा वापर म्हणजे हसण्याची गोष्ट, सायकल चालवणारा समाज म्हणजे आदिमानवाचा समाज; ही मानसिकता असेल तोवर काही बदल होऊ शकणार नाही. पण सायकल चालवणे यात काहीही कमीपणा नाही, अगदी काही दशके आधी सिनेमाच्या हिरोईन सुद्धा सायकल चालवीत, स्वयंचलित वाहनांच्या जाळ्यात फसणे म्हणजे काही शक्तींच्या हातचे खेळणे होणे किंवा काही शक्तींना पोसणे; या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०२१

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

काही निरीक्षणे...

- बहुसंख्य लोकांसाठी वाचन, लेखन, चिंतन, मनन, ध्यान, धारणा; ही कामेच नसतात. या गोष्टी म्हणजे रिकामटेकडेपणा.

- ज्या अल्पसंख्यांना ही कामे असतात असं वाटतं, त्यातल्या बहुसंख्यांसाठी ही वेळ मिळाला तर करण्याची कामे असतात. आवर्जून करण्याची, त्यासाठी वेळ काढण्याची, वेळ राखून ठेवण्याची, प्राधान्याची कामे नसतात.

- बोलणे ही शेवटल्या क्रमांकाची गोष्ट असते वा असू शकते, यावर बहुसंख्य लोकांचा विश्वास नसतो.

- कमी बोलणारे सुद्धा संधी मिळत नाही म्हणून वा बोलू शकत नाही म्हणून कमी बोलतात.

- अनेक लोक मुके असू शकतात, पण मौन असणारे अत्यल्प.

- श्रीपाद कोठे

१५ फेब्रुवारी २०२१

रविवार, १३ फेब्रुवारी, २०२२

सुहृदाला उत्तर

द्वेष करण्यासाठी माणसं तीन दिवसात तयार करता येतात...!

पण प्रेम करणारी माणसं सहा महिन्याची गोष्ट सोडाच,

एक पूर्ण आयुष्य खर्चूनही तयार करता येत नाहीत...

एकटी व्यक्ती प्रेम करते!

समुदाय द्वेष भिनवण्यासाठीच असतो!

हिंमत दाखवून एकटी व्यक्ती बना!'

एका सुहृदाने श्री. राजू परुळेकर यांची ही पोस्ट मला पाठवली आणि माझे मत विचारले. वर परुळेकर यांची पोस्ट आणि खाली माझे सुहृदाला दिलेले (परुळेकर यांना नव्हे) उत्तर.

परुळेकर मोठे आणि महान आहेत. मी काय बोलू त्यावर? पण तू विचारले म्हणून प्रयोजन. ही पोस्ट सरसंघचालकांच्या वक्तव्यावर बेतली आहे हे न सांगताही कळणारे आहे. त्यांच्या कोणत्याही मताशी मी सहमत नाही. तत्वज्ञाचा आव आणून लिहिणारी, बोलणारी मंडळी अलीकडे अमाप पिकली आहेत. हा त्यातलाच नमूना. या लोकांना स्वत:ला प्रश्न विचारण्याचीसुद्धा गरज वाटत नाही. हे निष्कर्ष आधी काढतात अन मग त्यावर विश्लेषण बेततात. आता एकेक मुद्दा घे.

मुद्दा १ - `द्वेष करण्यासाठी माणसं तीन दिवसात तयार करता येतात...!'

याच्याएवढं बालिश विधान नाही. द्वेष करायला शिकवावं लागतच नाही. अरे साधं फोन घेतला नाही यावरून लोक नाराज होतात ना? आपल्या रोजच्या जगण्यावर नजर टाक. अशी असंख्य उदाहरणे सापडतील. मी तुला व्यक्तिश: अशी शे-दोनशे लोकांची यादी बसल्या बसल्या देऊ शकेन, ज्यावरून माझे म्हणणे सिद्ध होईल. विषय वाढेल म्हणून आवरते घेतो.

मुद्दा २ - `पण प्रेम करणारी माणसं सहा महिन्याची गोष्ट सोडाच,

एक पूर्ण आयुष्य खर्चूनही तयार करता येत नाहीत...'

हे सुद्धा आपल्या स्वत:च्या आयुष्यात आपण तपासून पाहू शकतो. हां, फक्त त्यासाठी दुराग्रह, टोकाचा अहंकार, मी म्हणजे विश्व या व अशा गोष्टी सोडाव्या लागतात. अन हे संघाशी जोडलं तर मग तर बोलायलाच नको. संघस्थानावर घाण (म्हणजे चक्क मानवी विष्ठा) करून ठेवण्याएवढा द्वेष करणारे सुद्धा नंतर संघाचे स्वयंसेवक कसे झाले किंवा चक्क संघ संस्थापकांची समाधी फोडून टाकणारे नंतर संघाचे समर्थक आणि सहानुभूतीदार कसे झाले; हा संघाचा जगजाहीर इतिहास आहे. शाखेत जाताना किंवा मोठ्या उत्सवाला जाताना कसा कसा त्रास होत असे आणि नंतर वातावरण कसे बदलले हे माझ्यासह अनेक लोक स्वत:च्या अनुभवातून सांगू शकतील. ५-१० पोरांना घेऊन सुरु झालेला संघ एवढा वाढला; त्याचा संपूर्ण इतिहासच द्वेषाला प्रेमात परिवर्तीत करण्याचा आहे.

त्यांच्या या आक्षेपाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण सुद्धा करायला हवं. संघ ९३ वर्षांपासून काम करतो आहे. तो कुटुंबवत्सल माणसांचे संघटन आहे आणि त्या माणसांना घेऊनच तो काम करत असतो. हिंसा, द्वेष शिकवून इतकी वर्षे संघटन उभं करता येतं का? सामान्य पापभिरू, कुटुंबवत्सल माणसे वर्षानुवर्षे द्वेष आणि हिंसा करीत राहू शकतात का? जगात ज्यांनी ज्यांनी द्वेषावर आधारित कामे केली त्यांचे आणि त्यांच्या कामाचे आयुष्य किती होते? त्यात किती व कोणती माणसे सामील झाली? साधा विचार आहे- आणिबाणीच्या काळात भूमिगत असलेल्या संघाच्या हजारो लोकांना आणि संघाच्या बैठका आदींना महिला वर्गाने आणि संघाच्या नसलेल्या संघ स्वयंसेवकांच्या शेजाऱ्यापाजार्यानी मदत केली. म्हणून तो संघर्ष यशस्वी झाला. एखादा कार्यकर्ता एखाद्या घरी आलेला असताना अचानक पोलीस टपकले, तर मागच्या वा शेजारच्या घरातून तो कार्यकर्ता सटकून जात असे. अशा प्रकारचं सहकार्य हे द्वेष शिकवल्याने मिळवता येतं का? हा प्रश्न अशा लोकांना पडूच शकत नाही. उलट यावर हे विकृतश्रेष्ठ तर्कट करतील की, बाबा पोलिसांची ब्याद नको म्हणून शेजारी अळीमिळी गुपचिळी राहत असतील. या वाह्यातपणाला अंत नसल्याने उत्तर देण्याची गरजच नाही. अन्य हजारो प्रसंगी संघाचे लोक समाजातून व्यक्ती स्तरावर आणि संस्था स्तरावर जे सहकार्य मिळवतात ते द्वेषाच्या आधारे मिळवता येऊ शकते का? पण विद्वानांनी विचार केलाच पाहिजे असे कोठे आहे?

मुद्दा ३ - `एकटी व्यक्ती प्रेम करते!

समुदाय द्वेष भिनवण्यासाठीच असतो!

हिंमत दाखवून एकटी व्यक्ती बना!'

निव्वळ हास्यास्पद आणि तर्कशून्य सुद्धा. लिहिणाऱ्याने पाच वर्षं एकटी व्यक्ती म्हणून जगून उदाहरण घालून द्यावे. मग यावर बोलता येईल. त्यांनी चलाखीने समुदाय हा शब्द वापरला आहे. पण समाज हा सुद्धा समुदायच आहे. उगाच `बाल की खाल' काढण्याचा इरसालपणा करू नये. मुद्दा आहे एकटे राहण्याचा. त्यांनी समाज सोडून एकटे म्हणजे अगदी एकटे (कुटुंब हा सुद्धा प्राथमिक स्तरावरील समुदायच) कोणत्या तरी बेटावर जगून दाखवावे. मग बोलू.

तुझे समाधान झाले ना? मला फक्त तेवढेच हवे.

- श्रीपाद कोठे

१४ फेब्रुवारी २०१८

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

Perception

अनेक गोष्टी perception च्या असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि त्याचं सतत सुरु असलेलं काम, हे दिल्लीत कोण कुठे असावं किंवा सत्ता कोणाची असावी, यासाठी नाही. संघ त्यासाठी काम करत नाही. पण हे मान्य नसल्याने, यावर विश्वास नसल्याने किंवा हे समजत नसल्याने अनेक चर्चा, समज- गैरसमज, वाद- प्रतिवाद, खंडन- मंडन, आरोप- प्रत्यारोप सुरु असतात आणि त्यांचा गलबला माजलेला दिसतो. त्यातच या विषयाची चर्चा करताना- `संघ राजकारण करत नाही का? संघाचे भाजपवर नियंत्रण नाही का? संघाची राजकारणात लुडबुड कशाला?' वगैरे सारखे प्रश्न उपस्थित होतात आणि चर्चाच भरकटत जाते. मात्र, `संघाचं काम दिल्लीत कोण असावं किंवा नसावं' यासाठी नाही हे स्पष्ट झालं तर अनेक भ्रम दूर होतील. आज निर्माण होणारे वा केले जाणारे अनेक प्रश्न मग त्यामुळे कायमचे निकाली निघतील. म्हणजे कसे- तर संघ राजकारण करतो का, पक्ष चालवतो का- या प्रश्नांचे सरळ उत्तर आहे की, तो तसे करीत असेल किंवा नसेल; तरीही तो दिल्ली कोणाची असावी यासाठी काम करीत नाही. संघ त्याला जेव्हा जे योग्य वाटेल ते (सभ्य भारतीय समाजाच्या चौकटीत राहून) करेल, पण त्याचा उद्देश दिल्ली कोणाची असावी हा नाही. आणखीन स्पष्ट करायचं तर- १) दिल्लीत एखादी सत्ता आली म्हणून त्याचं काम संपत नाही, २) दिल्लीतून एखादी सत्ता गेली म्हणून त्याचं काम थांबत नाही, ३) दिल्लीत एखाद्याची सत्ता आली वा आली नाही तरीही काम सुरूच राहतं, ४) त्याच्या सत्ता विषयक कामाचा केंद्रबिंदूही सत्ता नसतो (बाकीच्या कामांचा तर नसतोच), ५) सत्ता धरून ठेवावी म्हणून संघ आपले विचार, काम आणि कार्यपद्धती बदलत नाही. समर्थक, विरोधक, हितचिंतक, निरीक्षक सगळ्यांनीच हा सूक्ष्म मुद्दा लक्षात ठेवायला हवा.

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०१५

जनता जिंकली, राष्ट्रही जिंकावे

कसे होईल काय होईल म्हणता म्हणता दिल्लीच्या निवडणुका झाल्या, निकाल लागले, आता काही दिवस त्याचे कवित्वही सुरु राहील. एकमेकांवर चिखलफेक करणे हा तर आपला स्थायी भाव. त्यासाठी चांगले कारण मिळाले आहे, त्यामुळे होळीपूर्वीच धूळवडीचाही अनुभव घ्यायला मिळतो आहे. या सगळ्याचा फार आनंद व्हावा असेही काही नाही आणि फार दु:ख व्हावे असेही त्यात काहीच नाही. तरीही असा आनंद आणि दु:ख होताना पाहायला मिळते आहे.

सत्तेचे येणे जाणे, राजकीय पक्षांचे जय पराजय, प्रचंड बहुमत या गोष्टी काही अभूतपूर्व नाहीत. त्यांचा अनुभव भारतीय जनतेने घेतलेलाच नाही असेही नाही. अशा गोष्टी किती तात्कालिक असतात हेही आपण अनुभवलेले आहे. यानिमित्ताने लोकशाही आणि जनतेची सर्वोच्चता यांचीही चर्चा अनेकवार झडली आहे. शेवटी सामान्य माणूस म्हणजेच मतदार राजा म्हणजेच जनता सर्वेसर्वा असून ती ठरवेल तेच खरे, असा जनताशरण भाव व्यक्त होऊन सगळी चर्चा संपते. यात फारसे वावगे काही आहे असेही नाही. पण एवढेच पुरेसे नाही, हेही तितकेच खरे.

काही वर्षांपूर्वीची एक घटना आठवते. नागपूर विद्यापीठाच्या गांधी भवन सभागृहात, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये काम करणाऱ्या एका संस्थेने, एक वादविवाद स्पर्धा आयोजित केली होती. विषय होता `अभ्यासक्रमात इंग्रजीची सक्ती'. त्या ठिकाणी वादविवाद आटोपल्यावर आणि स्पर्धेचा निकाल जाहीर होण्यापूर्वी या विषयावर बोलण्यासाठी संस्थेने मला बोलावले होते. नेहमीप्रमाणे मधला वेळ भरून काढणे अशी त्या भाषणाची योजना नव्हती तर विद्यार्थ्यांनी या विषयाचा सांगोपांग विचार करावा, परंतु त्यांच्या स्पर्धेवर काही परिणाम होऊ नये; अशी त्या भाषणाची योजना होती. सुमारे एक तास मी माझा विषय ठेवला. इंग्रजी भाषेची सक्ती योग्य नाही, असा माझ्या भाषणाचा आशय होता. कार्यक्रम संपला, पुरस्कार वितरण झाले. अन तीन चार दिवसांनंतरची गोष्ट. दिवाळी तोंडावर आली असल्याने नागपुरात काही प्रदर्शने वगैरे लागली होती. अशाच एका प्रदर्शनात मी गेलो होतो. पाचेक मिनिटे झाली असतील, दोन मुले माझ्याजवळ आलीत. अन मला म्हणालीत- `सर तुम्ही चुकलात.' मी बुचकळ्यात पडलो. मी विचारले- `तुम्ही कोण?' ते दोघे म्हणाले- `आम्ही परवाच्या वादविवाद स्पर्धेत होतो. तुमचे भाषण ऐकले.' मी म्हटले- `ते ठीक आहे. पण मी काय चुकलो?' त्यावर त्यांनी जे सांगितले त्याने सगळा उलगडा झाला. झाले असे होते की, त्या स्पर्धेनंतर दोनच दिवसांनी त्यावेळचे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यवतमाळचे प्रा. वसंत पुरके यांनी इंग्रजी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला होता. माझे भाषण आणि प्रा, पुरके यांचा तो निर्णय यांची सांगड घालून त्या विद्यार्थ्यांनी निष्कर्ष काढला होता, `सर तुम्ही चुकलात.' त्यावर मी त्यांना काय उत्तर दिले तो भाग वेगळा. पण त्यांनी काढलेला निष्कर्ष ही समाजाची सामान्य मनोभूमिका त्यावेळी होती अन आजही आहे.

एखादी गोष्ट योग्य का? कारण ती सत्तेने केली वा म्हटली म्हणून. एखादी गोष्ट बरोबर का? कारण त्यावर राजमुद्रा उमटली म्हणून. सारे काही सत्तेच्या दारी. हे केवळ चूक बरोबर एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर जनतेचे वा समाजाचे भले कोण करणार? तर सत्ता. सत्ताकारणाशी संबंधितांचा तो दावाही असतो अन युक्तिवादही. जनतेने मागण्या करायच्या आणि सत्तेच्या इच्छुकांनी त्या मागण्या पूर्ण करण्याची आश्वासने द्यायची. दुसरीकडे सत्तेच्या इच्छुकांमधील चढाओढीमुळे जनतेनी न केलेल्या मागण्यांचीही प्रलोभने दाखवायची आणि मते पदरात पाडून घेऊन सत्ता काबीज करायची. या सगळ्याच गोष्टी तपासून पाहायला हव्यात.

एक तर सत्ता करेल तेच योग्य किंवा सत्ता ठरवेल तीच पूर्व दिशा, ही मानसिकताच चुकीची आहे. मी किंवा तो किंवा ती किंवा ते म्हणतात म्हणून एखादी दिशा पूर्व दिशा ठरत नाही. ज्या दिशेला सूर्य उगवतो तीच पूर्व दिशा. पूर्व दिशा ठरवण्याची कसोटी एखाद्याचे वाटणे किंवा एखाद्याचा निर्णय ही नसून, सूर्याचे उगवणे ही आहे. तुकाराम महाराजांनीही हेच समजावण्याचा प्रयत्न केला होता. `सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' ही त्यांची उक्ती प्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट- जनतेचे भले कोण करू शकते तर सत्ता, ही धारणा सुद्धा चुकीची आहे. आज असलेले कायदे, नियम, दंड, अपराधासाठीच्या शिक्षा; असे सगळे असूनही गोंधळ, अराजक, गुन्हेगारी अशा गोष्टी का कमी होत नाहीत? वाटेल तिथे थुंकू नये, वाटेल तशी वाहने चालवू नये, वीज वा पेट्रोल सारख्या गोष्टी जपून वापराव्या, पाण्याचा अपव्यय टाळावा, आपली कोणतीही कृती करताना आजूबाजूचा/ परिस्थितीचा/ माणसांचा विचार करावा, सूड/ द्वेष/ गैरफायदा घेऊ नये; या सगळ्या गोष्टी नसतील तर कायदे, नियम वा सरकार काय करणार? तसे असते तर जगात हत्येच्या गुन्ह्याला सगळीकडे जबर शिक्षा असतानाही हत्या बंद का झाल्या नाहीत? जगातील सगळे ७०० कोटी लोक करोडपती होऊ शकतील एवढी संपत्ती असूनही अर्धे लोक उपाशीपोटी का झोपतात? असे खूप चर्वितचर्वण करता येईल. त्यात खूप बुद्धिवाद, युक्तिवाद, तर्क यांचीही गरज नाही. सरकार वा सत्ता सारेच काही करू शकत नाही आणि सरकार वा सत्ता जे काही करते वा करू शकते ते यशस्वी व्हायचे असेल तरीही जनता त्यासाठी योग्य प्रकारची हवी. आम्ही कसेही वागू/ काहीही करू आणि तरीही आम्ही सुखी झालो पाहिजे असे म्हणणे हा तर्कदुष्टपणा आहे. मुख्य म्हणजे असे होणे अशक्य आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करतील हे अशक्य आहे आणि मोदींनी दिलेली आश्वासने ते पूर्ण करतील हेही अशक्यच आहे. हे सगळ्या व्यक्तींना आणि पक्षांना लागू आहे. मोदींच्या एका घोषणेचे उदाहरण घेऊ. मोदी नेहमी म्हणतात- `सबका साथ सबका विकास'. हे म्हणायला, ऐकायला आणि नंतर भांडाभांडी करायला ठीक आहे; पण हे खरेच शक्य आहे का? समाजात अनेक स्वाभाविक संघर्ष असतात. उद्योजक आणि शेतकरी यांचा मुद्दा घेता येईल. मोदी सरकारला एक वर्ष व्हायच्या आतच आणि या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येण्याच्या आधीच चर्चांना ऊत आला आहे, मोदी सरकारचा अर्थसंकल्प कल्याणकारी राज्याच्या असेल की विकासाचा? रिझर्व्ह बँक प्रत्येक वेळी व्याज दर कमी करेल असे उद्योजकांना वाटते आणि रिझर्व्ह बँक महागाईचे कारण देऊन व्याजकपात टाळते. अशी असंख्य उदाहरणे सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, प्रशासकीय जीवनात पाहायला मिळतील. आणि प्रत्येकच वेळी समेटाचे प्रयत्न यशस्वी होतीलच असेही नाही. कोणा तरी एकाच्या बाजूने त्या त्या वेळी, त्या त्या प्रसंगी उभे राहावे लागते. मग कुठे गेले `सबका साथ, सबका विकास'? हे मोदींना माहीत नाही असे नाही. पण ती राजकारणाची असहायता आहे. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही हे केजरीवाल यांना ठाऊक नाही असे नाही. गेल्या वेळच्या ४९ दिवसात याचा अनुभव येउन गेला आहे. खूप किचकट, पैसा वगैरे लागणाऱ्या गोष्टींचे जाऊ द्या. पण जनता दरबाराचे काय हाल झाले? अखेर ती कल्पनाच रद्द करावी लागली. सगळ्या शिक्षकांना कायम करण्याच्या मुद्यावरून जे झाले त्याचेही तसेच. यावर हे म्हणता येईल की, यावरून धडा घेऊन जनता दरबारसारखे उद्योग पुन्हा न करण्याची खबरदारी घेता येऊ शकते. अगदी बरोबर पण भोळसट असा हा युक्तिवाद आहे. कारण मुद्दा केवळ जनता दरबाराचा नाही, तर जनतेच्या अपेक्षा आणि जनतेचा व्यवहार यांचाही आहे.

देशाचं एकूण जीवन सुखी, संपन्न, सुसंवादी होण्यासाठी सरकार आणि जनता अशा दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात. केवळ सरकार आणि केवळ जनता काहीही करू शकणार नाही. सरकारी योजना, त्याची प्रशासकीय अंमलबजावणी, त्याला जनतेचा योग्य तो प्रतिसाद आणि सहभाग अशा सगळ्याच गोष्टींची गरज असते. पण केवळ एवढेही पुरेसे नसते. ज्या काही कृती केल्या जातात, योजना आखल्या जातात, मागण्या केल्या जातात त्या योग्य आहेत का, शक्य आहेत का, व्यवहार्य आहेत का, त्याचे व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, जग, पर्यावरण, मानसिकता, मानसिक, आध्यात्मिक घटक; यांच्यावर होणारे परिणाम, या साऱ्यांच्या क्रिया प्रतिक्रिया; या सगळ्याचा विचार आवश्यक असतो. परंतु या सगळ्यासाठी सवड आणि आवड आज किती आणि कुठे आहे? `मुंह मे आया बक दिया' अशीच आज उक्ती आणि कृतीची, विचारांची स्थिती आहे. यातून घटकाभराचे समाधान, घटकाभराचा उन्माद मिळू शकेल. त्याहून अधिक काही नाही. अनेकदा सरकारला आणि जनतेलाही कटू गोष्टी सांगाव्या लागतात, नकार द्यावे-घ्यावे लागतात. सरकार तर हे करूच शकत नाही, पण जनतेची सुद्धा यासाठी तयारी नसते. यातून जेव्हा सरकार सशक्त असते तेव्हा अधिनायकवाद उभा राहतो आणि सरकार दुबळे असेल तेव्हा झुंडशाही निर्माण होते. केवळ असेच चक्र सुरु ठेवायचे का? हे चक्र भेदायला हवे की नको? अगदी आपल्या भारताचेच उदाहरण घेऊन बोलायचे तर, अनेकदा जनतेने विविध राज्य सरकारे किंवा केंद्र सरकारांना सळो की पळो करून सोडले आहे आणि अनेकदा सरकारांनीही जनतेला चरकातून पिळून काढले आहे. आपल्या येथील व्यवस्थेने दर पाच वर्षांनी याचा हिशेब होत असतो. आणि पाठ थोपटून घेण्याच्या किंवा दोषारोपणाच्या त्याच त्याच चर्चांची गुऱ्हाळे लागलेली पाहायला मिळतात.

ही समस्या कशी सोडवायची आणि ही समस्या सोडवायची म्हणजे नेमके काय, याचा विचार व्हायला हवा. त्यालाच खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणी म्हणता येईल. प्राचीन भारतीय चिंतन परंपरेने या समस्येवर विचार करून तोडगा सांगितला आहे. याच चिंतन परंपरेचे आधुनिक प्रतिनिधी असलेले स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, गोळवलकर गुरुजी, दीनदयाळ उपाध्याय, दत्तोपंत ठेंगडी यांनीही त्यावर तोडगा सांगितला आहे. या विचारांचे सार हे की, सरकार आणि जनता यांनी मिळून बनलेल्या समाजात एक तिसरा घटक राहील जो या दोहोंना (सरकारला व समाजाला) योग्य दिशा देण्याचे काम करेल. या तिसऱ्या घटकाला कोणी ऋषी परंपरा म्हटले , तर कोणी आचार्यकुल. कल्पना मात्र तीच. ही कल्पना अशी की, समाजात काही निस्पृह, नि:स्वार्थ, त्यागी, चिंतनशील व्यक्ती असतात. त्यांना स्वत:साठी काहीही नको असते, देहधारणा करण्यापुरते ग्रहण करणे हा त्यांचा स्वभाव असतो, साधेपणा, अलिप्तता, करुणामय चिंतनशीलता, विश्वात्मकता, सत्यान्वेषण; ही त्यांची लक्षणे असतात. कोणी सांगितल्यावरून ते तसे नसतात तर त्यांची प्रकृतीच अशी असते. सत्ता, संपत्ती वा अन्य प्रलोभने वा भय यापुढे न झुकता ते राहू शकतात. त्यांना कोणाकडून काहीही नको असते; नाव, पैसा, पदे- काहीही नाही. अन कोणी देऊ केले तरी ते बाजूस सारण्याची त्यांची हिंमत असते. देणाऱ्याचा अनादर करणे हा हेतू नाही तर स्वत: स्वीकारलेली व्रतस्थता हे त्याचे कारण असते. अशा वीतरागी लोकांनी सरकार व समाजाचे मार्गदर्शन करावे आणि सरकार व समाजाने ते स्वीकारावे. हे कार्य प्रबोधन, मार्गदर्शन, जागृती, या स्वरूपाचे असावे. त्या त्या व्यक्तींना योग्य वाटेल त्याप्रमाणे त्यांनी आपले काम करावे. एखादी संघटना, संस्था वगैरे पद्धतीचे ते काम नसावे कारण त्यामुळे त्याचा मूळ उद्देशच बाधित होईल. कुठलीही अभिलाषा नसल्याने आणि कोणतेही बंधन नसल्याने असे लोक निर्भयपणे योग्य अयोग्याचे मार्गदर्शन करतील. जनतेने त्यानुसार विचार विनिमय करून, संस्था, आंदोलने, उपक्रम वगैरे करून पुरुषार्थ करावा आणि स्वत:चे आणि देशाचे जीवन सुखी व आनंदी करावे. या पद्धतीमुळे अधिनायकवाद आणि झुंडशाही या दोन्हीला आळा घालणे शक्य होईल आणि जनता व सरकार यांच्यात सुसंवाद आणि सामंजस्य निर्माण होऊ शकेल.

असे झाले तर मग बीटी बियाणे देशात चालेल की नाही, स्मार्ट सिटीची योजना राबवायची की नाही, रामजन्मभूमी कोणाची, धर्मांतराचे काय करायचे, लोकसंख्या असमतोल कसा हाताळायचा, पैसा किती असावा, जगावे कसे आणि कशाकरिता, मूल्य कुठली असावीत, शहरे किती आणि केवढी असावीत, तंत्रज्ञानाचे स्थान, विविध कल्पना- संकल्पना रुजविणे, समाज विचारी, समजूतदार होणे, हक्क आणि कर्तव्ये यासोबतच जबाबदारीची भावना वाढीस लागणे, कोणी काय मागायचं/ किती मागायचं/ का मागायचं; या गरजांची पूर्ती कशी करायची... इत्यादी इत्यादी इत्यादी असंख्य गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी समाजाने आणि सरकारने अशा वीतरागी व्यक्तींकडे पाहावे. थोडक्यात म्हणजे आज प्रत्येक गोष्टीसाठी सत्ता आणि संपत्ती यांच्या तोंडाकडे पाहण्याची आणि त्यांचा शब्दच प्रमाण मानण्याची वृत्ती बदलून सत्ता व संपत्तीच्या मोहापासून आणि दोषांपासून दूर असलेल्या लोकांकडे पाहणे समाजाने सुरु करावे. ती राष्ट्र उभारणीची सुरुवात ठरेल. आपण कोणत्याही पक्षाशी बांधील नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. आता आपण राजकारण वा सत्ता वा संपत्ती यांच्याशी बांधील नाही हे दाखवून देणे हा जनतेच्या, राष्ट्राच्या दिशेने होणाऱ्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा असायला हवा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०१५

युद्धस्थिती

अरे राहुल गांधी, सरसंघचालकांच्या वक्तव्यावर ट्विट करण्यापेक्षा - युद्धाची स्थिती आल्यास तीन तासात १० हजार बाटल्या रक्त उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन द्यायचं होतं. पण तुमच्या आजच्या पुढच्या शंभर पिढ्या आल्या तरी तुझी ती हिंमत नाही. अन सरसंघचालकांवर टीका करणारे सगळे एकत्र आले तरी त्यांची ती ताकद नाही. युद्ध म्हणजे काय ते तरी कळतं का तुम्हाला? युद्धाच्या स्थितीत काय काय करावं लागतं ते कळतं का तुम्हाला? त्या असंख्य कामांसाठी, कठीण परिस्थितीसाठी अनेक प्रकारची माणसे लागतात. संघाने त्यासाठी आपली तयारी तरी दाखवली. तुम्ही एवढे तरी आश्वासन देऊ शकता का की, युद्धाची स्थिती आल्यास, युद्ध संपेपर्यंत आम्ही टीकेचा, टवाळकीचा शब्दही उच्चारणार नाही. तुम्ही आणि तुमचे दळभद्री बुद्धीचे अन दळभद्री वृत्तीचे बाजारबुणगे यांची लायकी अशी बाजारात का मांडता?

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०१८

प्रशिक्षण आणि प्रेरणा...

कालपासून विसरूनच गेलो होतो. आत्ता अचानक आठवलं. ज्या भारत-चीन युद्धानंतर नेहरूंना लाजेकाजेस्तव संघाला गणतंत्र दिवसाच्या परेडला आमंत्रण द्यावं लागलं होतं; त्यावेळचीच गोष्ट. तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना एका लष्करी अधिकाऱ्याने (बहुतेक करीआप्पा) विचारलं होतं- तुमच्या स्वयंसेवकांनी ज्या प्रकारे काम केलं, त्यासाठी तुम्ही त्यांना कुठे, कधी आणि कसं प्रशिक्षण देता? त्यावर गुरुजींनी त्यांना उत्तर दिलं होतं- आम्ही त्यांना फक्त कबड्डी खेळवतो. अन तेच अगदी खरंही आहे. याचं प्रत्यंतर अन्यत्रही अनेकदा आलेलं आहे. संघाने पूर, दुष्काळ, भूकंप इत्यादी आपत्तीत जेव्हा कामे केली तेव्हा; अनेकांना प्रश्न पडला की अशा कामांचं प्रशिक्षण या लोकांना कोणी, कुठे, कधी दिलं? अनेकदा लोकांनी हा प्रश्नही विचारला आहे. असा प्रश्न विचारणाऱ्यात विदेशी लोकही आहेत. अन बाकी कामे कशाला; प्रत्यक्ष संघाच्या कामाचे तरी प्रशिक्षण किती लोक घेतात? प्रत्यक्षात काम करणारे मात्र त्याहून कितीतरी पटीने अधिक असतात. शाखा चालवण्याचं प्रशिक्षण न घेताच हजारो लोक शाखा चालवत असतात आणि त्यातून शक्ती आणि कामे उभी राहतात. डॉक्टर हेडगेवारांच्या काळात तर कसलं प्रशिक्षण अन कसलं काय !! तरीही २०-२५ वर्षांचे तरुण देशात सगळीकडे गेले अन त्यांनी काम उभं केलं. संघ प्रशिक्षणापेक्षा प्रेरणेवर भर देतो. हेच त्याच्या यशाचं अन शक्तीचं रहस्य आहे. `क्रियासिद्धी: सत्वे, भवती महतांनोपकरणे' हे संघातील आवडतं सुभाषित आहे. संघाच्या विरोधकांना, संघाच्या टीकाकारांना, संघाच्या टवाळखोरांना संघ समजत नाही याचं कारण हेच आहे. त्यांचं लक्ष प्रेरणेकडे नसतंच. त्यांना फक्त प्रशिक्षण दिसतं. वास्तविक जगभरात सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात समग्र जीवनलक्ष्यी दृष्टीने या पैलूचा विचार व्हायला हवा. प्रशिक्षणाचा भडीमार करून परिणाम का मिळत नाहीत हा प्रश्न तर सगळ्यांना वारंवार पडतोच. परंतु अहंकारी दांभिकतेने आम्ही प्रेरणेचा मुद्दा विचारात घेतच नाही. आज अगदी `जगायचं का?' या प्रश्नापासून प्रेरणेचा अभाव आहे. संघ नेमके ते करतो आणि त्यातही महत्वाचे म्हणजे या प्रेरणा स्वार्थी लौकिक प्रेरणांचे जागरण नसून, अलौकिक प्रेरणांचे जागरण आहे.

असो. संघाच्या शक्तीचे आणि यशाचे रहस्य जाऊ द्या; संघाच्या विरोधकांना, संघाच्या टीकाकारांना, संघाच्या टवाळखोरांना संघाच्या मर्यादा आणि दुर्बलतेचे आकलन तरी कुठे आहे? अन त्याचेही कारण सारखेच आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १३ फेब्रुवारी २०१८

अंधार हेच हत्यार

`अंधार हेच हत्यार' या शीर्षकाचा एक मजकूर दुपारी आला. अमोल पालेकर यांना जे भाषण करण्यापासून थांबवले ते हे भाषण आहे, अशी माहिती सोबत आहे. जर खरंच हे ते भाषण असेल तर ते गंभीर, विरोधी विचार बाळगणाऱ्या लोकांनी चिंता करण्याजोगे, आक्षेपार्ह इत्यादी इत्यादी काहीही नसून हास्यास्पद तेवढे आहे. हा मजकूर वाचून मला तर त्यांना थांबवणाऱ्या लोकांची आणखीनच गंमत वाटली. आयोजकांची पण काही भूमिका आता पुढे आलेली आहे. पण खरे कारण सगळ्यांचा थोडा वेळ वाचावा हेच असू शकते. अर्थात हा माझा अंदाज. या मजकुरात २०१९ च्या निवडणुकीचा अन त्यात घ्यायच्या भूमिकेचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे तर सारेच स्पष्ट होते. माझे मत असे की, अशा गोष्टी `let it be' अशा भूमिकेतून पहाव्या, चालू द्याव्या. त्याने संबंधितांचे विरेचन होईल, उगाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी इत्यादी ठपके बसणार नाहीत, दूध का दूध होत राहील. खोट्या प्रतिमा गळून पडतील. आविर्भाव निकालात निघतील. अन पालेकर किंवा त्यांच्यासारख्या भूमिका असणाऱ्यांनी जसे लोकांना गृहित धरू नये तसेच त्याहून वेगळी भूमिका असणाऱ्यांनीही लोकांना गृहित धरू नये. हा किंवा तो कोणीच लोकांना फसवू शकत नाही. लोक स्वत: विचार करत असतात, समजून घेत असतात, अर्थ लावत असतात. फार तर आपली भूमिका मांडावी पण उगाच भांडून अन विरोध करून शक्तीक्षय करू नये.

(टीप- आजच, काल लिहून झालेली `अंधाराची मिठी' ही कविता पोस्ट केली आहे. त्या कवितेचा अन `अंधार हेच हत्यार' याचा काहीही संबंध नाही. अन एका पृच्छकाला सांगितले तसे, ही कविता सुखासीन झोपेवरची आहे असे समजायलाही हरकत नाही. 😃😃 )

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०१९

फुकट

दिल्लीत आम आदमी पार्टी निवडून आली. एकदाचं गंगेत घोडं न्हालं. आता त्या निवडणुकीचं विश्लेषण सुरू आहे. आम आदमीने 'फुकट'ची लावलेली सवय हाही एक विषय आहे. त्यावर होणारे मतप्रदर्शन आणि त्याचे विश्लेषण हे मात्र फारसे गांभीर्याने होते आहे असे वाटत नाही. लोक तर व्हेनेझुएलाच्या स्थितीपर्यंत तर्क ताणत आहेत. एकूणच माणूस आणि मानव समूह विचारशीलतेकडे जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचेच चित्र आहे.

जगताना कसल्याही गोष्टीची किंमत चुकवावी लागू नये, सारं काही फुकट मिळावं; असं म्हणणं, असं वाटणं, अशी धोरणे; हे पूर्णतः चूक आहेच. परंतु प्रत्येक गोष्टीला price tag लावणे हेही अयोग्य आहे. सवलती, अनुदान, फुकट; या गोष्टी जगभरात सर्वत्र आहेत. त्या अपरिहार्य आहेत आणि योग्यही आहेत. प्रश्न एवढाच की; कुठे, कधी, कोणाला, कशा आणि किती? प्रत्येक गोष्टीची price tag, ती सगळ्यांसाठी सारखी आणि ती चुकवल्याशिवाय पर्याय नाही; ही भांडवलशाही वृत्ती योग्य तर नाहीच पण मी मी म्हणणाऱ्या भांडवलशाही समाजात सुद्धा तसे होत नाही, होऊ शकत नाही. मग पर्याय काय?

पर्याय आहे मध्यम मार्ग. ना हे टोक, ना ते टोक. हा मध्यम मार्ग हा नेहमीच आणि सगळ्याच बाबतीत जिकिरीचा असतो. मुख्य म्हणजे त्यासाठी सारासार विचार, विवेकी वृत्ती, समजुतदारीचा विशिष्ट स्तर, परिपक्वता; या गोष्टी आवश्यक असतात. व्यक्तीच्या, समाजाच्या, देशाच्या, जगाच्या अर्थकारणाचा विचार करतानाही हे लागू होते/ व्हायला हवे. व्यक्ती आणि व्यक्तीसमूहाच्या गरजा, त्या गरजा भागवण्यासाठीची कामे, ती कामे करण्यासाठी लागणारी कौशल्ये, यातून निर्माण होणारे स्तर, यातील प्राधान्यक्रम, गरजांचे आणि कामांचे पर्याय, परिस्थिती आणि मानसिकता यांची परिवर्तनशीलता, विविध क्षमता; अशा असंख्य बाबींचा विचार करावा लागतो. हा विचार करताना लक्षात येते की, काम (वर्क) आणि किंमत यांची सांगड घालणे शक्य असतेच असे नाही. प्रत्येक कामाचे मूल्य सारखे असते असेही नाही. मुळातच गरजा, कामे, उपलब्धता, सामग्री इत्यादींचा सुयोग्य मेळ घालण्याचा प्रयत्न म्हणजे किंमत किंवा मूल्य. हे सारे लक्षात घेऊन योजना, धोरणे, सिद्धांत, शब्दावली, कार्यक्रम ठरवावे लागतात. मुख्य म्हणजे या सगळ्याची किमान थोडीशी तोंडओळख आणि जाणीव लोकसमूहातील बहुसंख्य लोकांना असायला हवी. ती असेल तरच समाजाचा सहभाग आणि प्रतिसाद योग्य राहू शकेल.

असं झालं तर आणि होईल तेव्हाच न्यायपूर्ण आणि संतोषदायी धोरणे, कार्यक्रम आणि व्यवस्था आकारास येईल. त्यासाठी आवश्यक अशी अर्थनीती आणि अर्थनैतिकता आकार घेईल. तोपर्यंत लोकांना फुकटे म्हणणे, स्वाभाविक मानवी सवयी आणि भावनांचा राजकीय वा अन्य फायद्यासाठी गैरवापर करणे, आपल्याला आवडणाऱ्या पक्षाची धोरणे दुर्लक्षित करून न आवडणाऱ्या पक्षांच्या नावानी बोटे मोडणे; हे सुरूच राहणार.

आपण आपली गंमत पाहावी.

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०२०

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

काय बदलले?

पूर्वी वर्णव्यवस्था होती. सत्ता व संपत्तीवर कब्जा मिळवणे आणि मनोमालिन्य यासाठी त्यावर टीका झाली. आज लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सत्ता व संपत्तीवर कब्जा मिळवणारे आहेतच आणि पक्षांच्या चिठ्ठ्या लावून एकमेकांना पाण्यात पाहणे, दुस्वास करणे, तिरस्कार- द्वेष सगळेच आहे. एक जण दुसऱ्याबद्दल चांगले बोलायला, समजून घ्यायला, कुजकटपणा टाकून द्यायला तयार नाही. काय बदलले?

- श्रीपाद कोठे

१२ फेब्रुवारी २०१६

वेगळे घर आणि कलह

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया येथील प्रकरणांवर चर्चा सुरु असताना एकाने मुद्दा मांडला की, अफजल गुरूच्या संबंधात काश्मीरच्या पीडीपी पक्षाची भूमिकाही वेगळी (म्हणजे त्याची फाशी अयोग्य आहे अशी) आहे. भाजपा त्यांच्यासोबत सत्तेत राहू शकते, अन जेएनयु व प्रेस ट्रस्ट मधील लोकांवर मात्र आक्षेप; हे कसे? प्रश्न खरंच छान आहे. वरवर पाहता बिनतोड सुद्धा. पण हा युक्तिवाद ऐकला आणि खुदकन हसायला आलं. आईनस्टाईनची एक गोष्ट सांगतात. त्याने मांजर आणि तिच्या पिल्लासाठी दोन वेगळी दारे केली होती. मांजरीच्या मोठ्या दारातून लहान पिल्लू जाऊ शकेल हे सापेक्षतेचा सिद्धांत मांडणाऱ्या आईनस्टाईनच्या लक्षातच आलं नाही. बहुधा आजचे सगळे विद्वान आईनस्टाईनच्या मार्गावरच असावेत. अन्यथा वरील बिनतोड युक्तिवाद सुचलाच नसता. कुटुंबातल्या घटकांनी गरजेपोटी, सोयीसाठी वेगळे राहणे आणि कलहातून कुटुंब विभक्त होणे याचा फरक कळणे इतके दुरापास्त का व्हावे? अफजल गुरुबद्दल वेगळे मत वा सहानुभूती असणे आणि ज्या व्यवस्थेने याबाबत निर्णय घेतला त्याबद्दल शत्रुत्व असणे, देशाच्या शत्रूबद्दल प्रेम असणे, मनात केवळ सूड आणि द्वेष असणे; यातील फरक समजत नाही की समजून न समजल्यासारखे करायचे आहे? देशभरात अगदी दिल्ली ते गल्ली असे लोक आहेत. विचारस्वातंत्र्य अन अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्या नावाखाली त्यांना सूड, द्वेष आणि शत्रुता करायची आहे. एका घराची दोन, तीन, चार घरे होणे क्लेशदायक नसते. क्लेशदायक असतो कलह. कलह कधीच समर्थनीय होऊ शकत नाही. डार्विनचा सिद्धांत, समाजवाद, पाश्चात्य लोकशाही, इंग्रजांची सत्ताभिलाशी धूर्तता; यांनी या देशात संघर्ष आणि संघर्षाच्या chain reaction ची बीजे पेरली. येथील असलेल्या व नसलेल्या देखील त्रुटींचा, कमजोरींचा, येथील वेगळ्या जीवनशैलीचा आणि जीवनदृष्टीचा उपयोग त्यांनी यासाठी करून घेतला. काळाचा महिमा आणि सत्ता व संपत्तीची जादू यांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. समस्यांचा वा प्रश्नांचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीने करावयाचा असतो आणि त्यावरील उपायांचा विचार संश्लेषणात्मक पद्धतीने करायचा असतो. सगळे पाश्चात्य विचार, सिद्धांत वा शास्त्रे मात्र; समस्या आणि त्याचे उपाय दोन्हीचा विचार विश्लेषणात्मक पद्धतीनेच करतात. उदा.- बोटाला काही झाले तर त्याची चिकित्सा बोट म्हणूनच करावी लागेल. पण त्याला पट्टी बांधताना किंवा प्लास्टर घालताना किंवा औषधयोजना करताना हाताचा वा संपूर्ण शरीराचा विचार अपरिहार्य ठरतो. पट्टी बांधताना वा प्लास्टर घालताना बाकीच्या हाताची सोय, गैरसोय पाहावी लागतेच. किंवा द्यावयाच्या औषधाचा अन्य काही परिणाम होत नाही ना हेही पहावे लागते. कारण त्रास बोटाला असला तरीही बोट हे हाताचे वा शरीराचे अंग आहे हे नजरेआड करून चालत नाही. यालाच म्हणतात एकात्म दृष्टी. holistic approach तो हाच. मात्र गेली अनेक वर्ष शिक्षण, प्रबोधन, बौद्धिक चळवळी आदी माध्यमातून आमची दृष्टी इतकी विकृत करून टाकली आहे की हे समजण्याची शक्तीही आम्ही गमावतो आहोत की काय असे वाटते. महात्मा गांधी ज्यावेळी म्हणत की, don't throw baby with bathwater, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. चुकीच्या रस्त्याने आम्ही खूप दूर आलो आहोत. मागे फिरून पुन्हा योग्य मार्ग धरावा लागेल. त्याला इलाज नाही. काश्मीर काय, फुटीरतावाद काय, इसीस काय किंवा विचार वा अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे काय... योग्य रस्ता धरण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १२ फेब्रुवारी २०१६

धर्म

'धर्म' या शब्दाची, विषयाची चर्चा बरेचदा होते. पुष्कळदा `धर्म' म्हणजे कायदा-नियम, कर्तव्य, अंगभूत गुण या अर्थानेही वापरला जातो. `धर्म' हा पूजापद्धतीपेक्षा अधिक काहीतरी आहे हे सांगण्यासाठी अशा रीतीने समजावले जाते. परंतु याचाही थोडा अधिक विचार हवा. कायदा-नियम म्हणजे जर धर्म म्हटले तर हिटलर, मुसोलिनी, स्टालिन, उत्तर कोरियाचा विद्यमान किम जोंग यांनी केलेले कायदे `धर्म' होतील का? किंवा ट्रंप करताहेत ते कायदे `धर्म' होतील का? अथवा, पंतप्रधान मोदी अनेक कायदे रद्द करताहेत म्हणजे ते `धर्म' निकालात काढत आहेत असे म्हणता येईल का? जसे कायदा-नियम यांचे तसेच कर्तव्य आणि अंगभूत गुण यांचेही. कायदा पाळणे हे कर्तव्य असल्याने सविनय कायदेभंग अथवा सत्याग्रह हे धर्मविरोधी म्हणावे लागतील. अंगभूत गुणांबद्दल तर बोलायलाच नको. आळस किंवा भांडखोरपणा हे पण अंगभूत गुण असतात. ते `धर्म' होणार नाहीत हे स्पष्टच आहे. मग `धर्म' म्हणजे काय? त्यावर स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. पण, कायदा-नियम, कर्तव्य, अंगभूत गुण आणि पूजापद्धती यांचे `धर्म' संदर्भातील स्थान सारखेच एवढे मात्र म्हणता येईल. या साऱ्याच गोष्टी `धर्म' वहन करणाऱ्या असतील तरच त्या `धर्म' होऊ शकतील एवढे खरे. सोपे करणे ही पुष्कळदा गरज असते. पण सोपे करण्याचे तोटे अन मर्यादाही असतात.

- श्रीपाद कोठे

१२ फेब्रुवारी २०१७

पोळी अन टाळी

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी...

हाच सर्वसामान्य आचार असतो.

राज्य कोणाचेही असो. त्याने फरक नाही पडत. त्या सत्तेला अन सत्ताधाऱ्याला ते अभिप्रेत असण्या नसण्याचा प्रश्नच नसतो.

अगदी घरात सुद्धा असेच असते.

बुद्धिवाद्यांना मात्र हे पटत नाही. हेही सर्वसामान्यच असते.

निष्कर्ष - बुद्धिवादी सर्वसामान्य असतो. 😊

- श्रीपाद कोठे

१२ फेब्रुवारी २०२०

गरजा

गरजा कमी करायला हव्यात, असं पुष्कळदा बोललं जातं. पुष्कळदा पुष्कळांना ते पटतंही. मात्र गरजा कमी करायला हव्यात असं म्हणताना; शारीरिक गरजा, खाणंपिणं, कपडेलत्ते, वस्तू; यांचाच बहुधा विचार असतो. पण माणसाच्या गरजा फक्त शारीरिक नसतात; भावनिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय; अशाही गरजा असतात. याही गरजा मर्यादित करणं खरं तर आवश्यक असतं. सगळ्या प्रकारच्या गरजांचं व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे.

- श्रीपाद कोठे

१२ फेब्रुवारी २०२०

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

उचित, अनुचित

अमोल पालेकर यांचे भाषण थांबवण्याचे प्रकरण गाजते आहे. त्यांचे भाषण थांबवण्याची गरज नव्हती अन तसे करणे चूक आहे. या प्रकरणी औचित्यभंगाचा मुद्दाही मांडण्यात येतो आहे. तोही अस्थानी आहे. त्यासाठी बारसे अन मर्तिक याचे जे उदाहरण दिले जात आहे तेही न पटणारे. संबंधित कार्यक्रम साहित्य विषयक, कला विषयक होता. दुसरे म्हणजे तो काही शाळा वा महाविद्यालयाचा कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमात चौकटीत, तयार केलेले भाषण  म्हणून दाखवणे अपेक्षित नसतेच. पाहुण्यांनी त्यांचे विचार, चिंतन मांडणे हेच अपेक्षित असते. त्यामुळे पालेकर यांनी चूक केली असे म्हणता येणार नाही.

- दुसरा मुद्दा म्हणजे क्षणभर मानू की त्यांचे बोलणे अयोग्य होते. तरीही हेच म्हणावे लागेल की, त्यांना बोलू द्यायला हवे होते. काय झाले असते ते बोलले असते तर? लोकांनी त्याचे मूल्यमापन केले असते ना. आजकाल चर्चेत वर्चस्व सिद्ध करणे यालाच अवास्तव महत्व दिले जाते. चर्चा ज्या लोकांसाठी, समाजासाठी केली जाते त्याला काही समजते याकडे दुर्लक्ष केले जाते. वादात वरचढ ठरलो म्हणजे लोकांना पटले, लोकांनी मान्य केले असे तर नसते ना? तरीही बौद्धिक कुरघोडीचा आटापिटा कशाला? प्रत्येकाने आपापले म्हणणे मांडावे. बाकी लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोपवावे. अशा पद्धतीचा परिणाम देखील सखोल, दीर्घ काळ राहतो. पण यासाठी जे चिंतन हवे, जो सायास हवा तो कमी पडतो हे मान्य करणे भाग आहे.

- तिसरा विषय... चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य; यांचे निकष माझे किंवा तुझे असे नसतात. माझे म्हणणे चूक असू शकते, तुझे म्हणणे बरोबर असू शकते किंवा माझे बरोबर असू शकते अन तुझे चूक, किंवा दोघांचेही बरोबर अथवा दोघांचेही चूक. असे काहीही असू शकते. त्यामुळे चर्चा विषयाची, मुद्यांची व्हावी; तू आणि मी ची होऊ नये. तशी ती होत असेल तर त्याला   वैचारिक चर्चा म्हणता येणार नाही. शिवाय भारतीय वा हिंदू पद्धती तर विलक्षणच आहे. पूर्ण गीता सांगितल्यावर सुद्धा सांगणारा काय म्हणाला? यथेच्छसि तथा कुरु... त्यामुळे पालेकरांना बोलू देतानाही उघडे पाडणे, कोंडीत पकडणे असे कोणतेही भाव न ठेवता विचारांचे आदानप्रदान हाच हेतू असायला हवा. तुम्ही चूकच किंवा आम्ही बरोबरच हे ठरवून चर्चा, विचार योग्य म्हणता येणार नाहीत. षडदर्शनांचा विकास, अनेकानेक शास्त्रे, रचना, पद्धती, जीवनाची असंख्य उपांगे यांचा विकास कसा झाला असेल वा होतो; याचाही विचार आवश्यक आहे. मानवी जीवन आणि त्याची उपांगे यांच्या संदर्भात अंतिम शब्द बोलून झाला आहे आणि आता फक्त त्यासाठी फौज उभी करणे एवढेच बाकी आहे असे समजण्याचे कारण नाही.

- पालेकर जे काय बोलत होते म्हणून सगळीकडे आलेले आहे ते खरे मानले तर वास्तविक ते हिंदू विचारांचा पूर्वार्ध मांडत होते असेच म्हणावे लागेल. त्यांचेच म्हणणे पुढे नेऊन हिंदुत्वाला जोडणे फारसे कठीण नाही. पण त्यासाठी हिंदुत्वाचे जीवनलक्षी चिंतन आधी समजावे लागते. अनेकांना वाईट वाटेल पण हिंदुत्व सत्तेशी वा सत्ताकारणाशी जोडणे म्हणजे हिंदुत्वाचे नुकसान करणे असते. जीवनातील सत्तेचे केंद्रीय स्थान बाजूस सारावे असे म्हटले की, लक्षावधी इंगळ्या डसल्याची भावना जोवर होते तोवर हिंदुत्व वादग्रस्तच ठरत राहील. हिंदुत्वाचे सैन्य खडे करतानाच हिंदुत्वाचा आशय, गाभा अधिकाधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर हिंदुत्वाच्या नावाने उभा होणारा समाज स्वतः अहिंदू होऊन जाईल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ११ फेब्रुवारी २०१९

बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा न पटणारा निर्णय

महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा एक निर्णय आज वाचण्यात आला. घटस्फोटीत महिलांना पुनर्विवाहानंतर सुद्धा पोटगी मिळत राहील अशी तरतूद करण्याच्या संबंधातला. याला विचित्र म्हणावे, विक्षिप्त म्हणावे की आणखीन काही. पोटगी कशासाठी असते? निराधार महिला अन निराधार मुलांच्या किमान गरजा पूर्ण व्हाव्या यासाठी. एखाद्या महिलेने पुनर्विवाह केल्यानंतर ती निराधार राहते का? तिचा नवीन पती तिची अन असल्यास मुलांची जबाबदारी घेणारा असायला नको का? पोटगी ही आयुष्य वाऱ्यावर येऊ नये यासाठी असायला हवी की आयुष्याचा स्तर वाढवण्यासाठी? मानवाच्या सहज प्रवृत्तींचा विचार करायला हवा की नको? मऊ लागले की कोपराने खणायचे हा मानवाचा स्वभाव आहे. त्याला पुरुष वा स्त्री, लहान वा मोठा, श्रीमंत वा गरीब असा अपवाद करता येत नाही. त्यातही पैसा ही अशी गोष्ट आहे की जिचा लोभ कधी कमी होत नाही आणि कितीही असला तरीही तो पुरा पडत नाही. पैशापाठी धावणे आणि पैशासाठी रडणे ही मानवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. याला अपवाद नसतात असे नाही. ते अपवाद हेच आदर्श असतात आणि असायला हवेत. पण आदर्शाचा विचार करताना जमिनीवरून पाय निसटू द्यायलाही नकोत. पण ज्याला लाभ मिळतात तो ते जास्तीत जास्त कसे लाटता येतील हेच पाहतो आणि राज्यकर्ते नावाची जमत तर कोणाला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणूच शकत नाही. त्यांना सगळ्यांनाच खुश करायचे असते. खुशामत आणि सौदेबाजीची जी पाळंमुळं पसरली आहेत, जी मानसिकता पसरली आहे; त्यावर मुलभूत आणि कायमस्वरूपी विचार आणि व्यवस्था होणे गरजेचे आहे. `आज'चा आणि `आत्ता'चा विचार करणारा मानव आहे तोवर कोणाचेच काही खरे नाही.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१५

विषाणू आणि सहिष्णुता

कर्करोग अन टीबीचे विषाणू यांच्या बाबतीत कोणीही सहिष्णू राहू शकत नाही, कोणीही सहिष्णू राहू नये. त्यांच्याबाबत सहिष्णू राहणारे गाढव, मूर्ख, हरामखोर, षंढ किंवा फारच सभ्यतेने बोलायचे तर आत्मघाती असतात. या विषाणूंना चिरडून त्यांचे अस्तित्व संपवून टाकावे लागते. होय, मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटना आणि त्यांचे पोषण करणारे दिल्ली ते गल्ली पसरलेले लोक यांच्याच संदर्भात बोलतो आहे.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१६

राजकारण

संसदेतील भांडणे, उत्तरप्रदेशातील यादवी, तामिळनाडूतील तमाशा, अमेरिकेतील ट्रंप युग, महाराष्ट्रातील निवडणुका- राजी, नाराजी, तत्वनिष्ठा, व्यावहारिकता; असं सगळं उघड्या डोळ्यांनी पाहूनही (अन कित्येक युगं हेच पाहूनही) -

१) राजकारणात चांगल्या माणसांनी उतरलं पाहिजे,

२) मतदान करून अंकुश ठेवला पाहिजे,

३) प्रतिनिधीला परत बोलावण्याची तरतूद हवी,

इत्यादी इत्यादी इत्यादी गोष्टींवर श्रद्धापूर्वक भर देणाऱ्या लोकांच्या बालबुद्धीची कीव करावी की हसावं?

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१५

Uncertain

आपल्या मनात पुढच्या क्षणी काय येईल ते सांगता येत नाही. तरीही त्याचं विश्लेषण करण्याचा, त्याचे अर्थ शोधण्याचा, ते ठीकठाक करण्याचा वगैरे घाऊक प्रयत्न आपण करत असतो. आपल्या अन दुसऱ्यांच्या विचार, व्यवहाराची चौकट बांधण्याचा प्रयत्न करतो. मग कधीही न अनुभवलेल्या गोष्टी साहित्यातून, कलेतून वगैरे समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा उलगडा करण्याचा उद्योग करतो. नुकताच स्टीफन हॉकिंग यांचा ७५ वा वाढदिवस झाला. ते म्हणाले- अखेरपर्यंत माझा मेंदू नीट राहावा. म्हणजे मेंदू आपल्या हातात नाही याची जाणीव आहे तरीही त्याच बेभरवशाच्या मेंदूवर सारी मदार आपण टाकत राहतोच. आपल्या गमतींना खरंच अंत नाही.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१७

कळ

१) हा दगड घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो सोने घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा दुर्गुण घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो सद्गुण घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा अज्ञान घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो ज्ञान घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा अपमान घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो सन्मान घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा कचरा घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो फुले घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा भणंगपणा घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो नाती घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.


१) हा द्वेष घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याने ते खाली ठेवले.

२) तो प्रेम घेऊन चालला होता. हाताला कळ लागली तेव्हा त्याला ते खाली ठेवावे लागले.

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१७

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

सोने आणि नोटा

सरकारी स्टॅम्प आणि एखादा अंक असल्याशिवाय कागदाला काहीही किंमत नसते. त्याविना त्याची किंमत शून्य. अमुक वर्षीच्या नोटा चलनातून बाद, असेही होते.

मात्र, सोन्याच्या छोट्याशा कणालाही सरकारी स्टॅम्प आणि कुठल्या अंकाची काहीही गरज नसते. त्याशिवायही त्याला किंमत असते. अन ही किंमत कालत्रयी असते.

बहुतांश माणसे सोने होण्याचा ध्यास घेण्याऐवजी नोटा होण्याचीच धडपड का करीत असावीत? मुख्य म्हणजे, त्यांना सोन्याऐवजी नोटांचेच आकर्षण आणि महत्व अधिक का असते?

- श्रीपाद कोठे

९ फेब्रुवारी २०१५

`मी'ची गंमत !!

मी!! एक अक्षर म्हणायचं की, एक शब्द. खरं तर एक अख्खं वाक्य म्हटलं तरी कमीच वाटेल. `मी'चं वर्णन करायचं तर त्याला किमान एक विश्व म्हणायला हवं. तेच त्याचं यथार्थ वर्णन. एक संपूर्ण विश्व! काय काय येतं त्यात? शरीर, मन, बुद्धी, भाव, भावना, सुख-दु:ख, आनंद-वेदना, एकवचन- बहुवचन, एकाकीपण, सामूहिकता, भूत- वर्तमान- भविष्य; आणि काय काय... `मी'पण फार वाईट, असा उपदेश कानीकपाळी ऐकायला मिळतो; तर `मी'च्या जाणीवेशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही अशी स्थिती. या `मी'मध्ये कशाकशाचा समावेश करायचा अन कशाचा नाही या विवंचनेत असतानाच, `मी' धरायचा की सोडायचा हा यक्षप्रश्न छळत राहतो.

या `मी'ची सार्वत्रिकता देखील गमतीशीर आहे. हा मी सार्वकालिक, सार्वदेशीक आणि सर्वस्थित असा आहे. कोणीही व्यक्ती स्वत:ची ओळख करून देईल तर म्हणेल `मी'. नाव वगैरे नंतर. म्हणजे अमुक नाव आहे ते कोणाचे तर `मी'चे. अशोक, महेश, सुनील, गौतम, ओंकार किंवा सुनिता, मनीषा, वैशाली, कविता, लीला, लैला कोणीही स्वत:ची ओळख सांगेल `मी'. माणसेच कशाला गायी, म्हशी, वाघ, बकऱ्या, पोपट, हरणे, कावळे, चिमण्या बोलू लागले तर म्हणतील- मी. प्राणहीन, निर्जीव समजले जाणारे टेबल, खुर्ची, पेन, पेन्सिल, भांडीकुंडी, कपडेलत्ते हेदेखील समोर उभे ठाकले तर म्हणतील- मी. पंचमहाभूते म्हणतील मी. एवढेच कशाला, कल्पना करा की; मरण पावल्यावर आपण दूर उभे राहून देहाकडे पाहत आहोत तेव्हाही आपण `मी'चा हात सोडणार नाही. म्हणजे त्या निष्प्राण देहाकडे कोण पाहील, तर - मी. गेल्या जन्मी मी अमुक होतो किंवा पुढील जन्मी मी अमुक होईन वा अमुक करेन, अशी वाक्ये तर आपण ऐकत बोलत असतोच. म्हणजे `मी' कोणीतरी आहे आणि आपल्या नावासकट सारे काही त्याला चिकटलेल्या उपाधी आहेत.

आपल्याला या गोष्टीची जाणीवही नसते, तरीही व्यवहार मात्र तसाच असतो. बरे या `मी' मध्ये कुठला फरकही नाही. तसा असता तर वेगवेगळ्या देहांना जशी वेगवेगळी नावे आहेत तशी त्याला विविध नावे राहिली असती. मात्र तसे दिसून येत नाही. सगळ्यांच्या `मी'ला `मी'शिवाय दुसरे वर्णन नाही अन संबोधनही. एक जण दुसऱ्याला एखादे संबोधन वापरतो किंवा एखादे नाव त्यासाठी वापरतो तेव्हा त्याचा अर्थ `तू' असतो. हा तू खूप साऱ्या नावांनी अन लक्षणांनी व्यक्त करता येतो, पण `मी'चे तसे नाही. `मी' म्हणजे फक्त `मी'. याचा दुसरा अर्थ हा की, `मी' ही एकच वस्तू आहे. मी या दोन किंवा अधिक वस्तू असत्या तर त्यांचे वर्णन वा संबोधन वेगवेगळ्या रीतीने करता आले असते. पण तसे करता येत नाही. म्हणून निष्कर्ष काढावा लागतो की, `मी' ही एकच वस्तू आहे. याचा, त्याचा, त्याचा असे वेगवेगळे मी नाहीत. सगळ्यांचा अस्तित्वाचा जो विशिष्ट बोध आहे तो म्हणजे `मी' आणि `मी' उच्चारल्यानंतर जो विशिष्ट बोध होतो तो सगळ्यांचा सारखाच.

बरे, हा `मी' वजा केला तर काय उरेल? कशाचेही अस्तित्वच उरणार नाही. कारण चांगले-वाईट, सुख-दु:ख, योग्य-अयोग्य, प्रेम-द्वेष, आकर्षण-अपकर्षण या साऱ्याचा अनुभव येतो कोणाला, तर `मी'ला. हा मी नसलाच तर अन्य कशालाही अस्तित्व नाही. `मी' असेल तर अन्य गोष्टींचे अस्तित्व आणि अन्य गोष्टींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी `मी' आवश्यक. एखाद्याची स्मृती जाते तेव्हा नाही का, त्या व्यक्तीसाठी अन्य कशाचेही अस्तित्व उरत नाही. सर्वप्रथम जर काही करण्यात येत असेल तर त्याची स्वत:विषयीची स्मृती, म्हणजे त्याचा `मी' त्याला परत मिळवून देणे. त्याला `मी'ची जाणीव नसते तेव्हा अन्य साऱ्या गोष्टी असतातच- त्याचे नाव असते, गाव असते, कुटुंब असते, संबंधित असतात; पण त्या सगळ्याला काहीही अस्तित्व नसते. `मी' परतला की सारे पुन्हा अस्तित्वात येते. थोडक्यात म्हणजे- या विश्वात अस्तित्व म्हणून काही असेल किंवा या विश्वाचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर `मी' आवश्यक आणि हा `मी' सगळ्यांचा, सर्वकाळी, सर्वस्थळी एकच असल्याने स्वाभाविकच असे म्हणता येईल की, या जगात जर काही असेल तर ते आहे केवळ `मी'. `मी'शिवाय या जगात काहीही नाही.

हा `मी' अखंड आहे, तो कुठेही खंडित होत नाही; ही त्याची आणखीन एक गंमत. म्हणजे `मी' आणि अन्य एखादी व्यक्ती वा वस्तू यांच्या मध्ये जी काही पोकळी असेल किंवा त्या पोकळीत जे काही भरून असेल, त्याचाही `मी' असेलच ना! म्हणजे, माझा मी, अन्य व्यक्ती वा वस्तूचा मी आणि दोघांमधील निर्वात किंवा अन्य पोकळी किंवा माध्यम यांचा मी; हे सगळे परस्परांना जोडलेले राहतील. त्यात खंड राहणार नाही, राहूच शकणार नाही. वास्तविक आपल्याला समजणारं वा न समजणारं असं जे काही आहे, ते म्हणजे या `मी'चा एक अखंड, एकरस समुद्र आहे. एकच एक- आपण जितक्या विशालतेची कल्पना करू शकू तितका विशाल एक समुद्र आणि अन्य ज्या ज्या गोष्टींचा प्रत्यय येतो वा बोध होतो, त्या या समुद्राशी एकरूप असलेल्या पण क्षणस्थायी लाटा आहेत. समुद्रातच निर्माण होणाऱ्या आणि समुद्रातच विरून जाणाऱ्या. काही अस्तित्वात असेलच तर ते म्हणजे फक्त `मी'.

ज्यावेळी `माझे' असा भाव येतो त्यावेळी हा `मी' संकुचित केला जातो. कारण त्यावेळी, `मी' आणि `माझे' म्हणून असलेली एखादी गोष्ट या दोन अस्तित्वांचा विचार मनात येतो. म्हणजेच सगळंकाही व्यापून टाकणारा `मी' लहान होतो आणि आपली काही जागा माझे म्हणून कशाला तरी देतो. अशा माझ्या म्हणून जेवढ्या गोष्टी वाढतील तेवढी `मी'ची जागा कमी कमी होत जाईल. माझेपण कमी होत जाईल तसा `मी'चा विस्तार होईल. परंतु माझेपण पूर्ण शून्य झाल्यावर देखील `मी'ला पूर्णत्व येईलच असे नाही. कारण माझे म्हणून काहीही नसले तरीही तटस्थतेचा भाव कायम राहील. ही तटस्थता असली तरीही दुसऱ्या कशाचे तरी अस्तित्व त्यात गृहित धरलेले असतेच. ते सकारात्मक वा नकारात्मक अर्थाने नसेल तरीही `मी' शिवाय दुसरे काही तरी अस्तित्वात आहे, या अर्थाने ते असते. जोवर ही माझेपणाची भावना आणि सोबतच तटस्थतेची भावना लोप पावून केवळ अस्तित्वाची भावना उरत नाही, तोवर `मी' लहान राहील. ज्यावेळी ही केवळ अस्तित्वाची भावना राहील तेव्हा संपूर्ण अस्तित्व आणि मी एकच होऊन जाईल. मग अपूर्ण असं काही राहणार नाही, लहान असं काही काही राहणार नाही आणि विशाल होण्यासारखंही काहीच राहणार नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, ९ फेब्रुवारी २०१५