गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा – ३


ज्याला भारत विविधता म्हणतो त्याला त्यांनी विषमता असे नाव दिले. हे जग कुणीतरी त्याच्या लहरीने तयार केले आणि त्यातील discrepancy दूर करणे हे आपले काम आहे असे ते मानतात. तर या विश्वात मूलभूत विविधता आहेत. प्रत्येक गोष्टीचे अंगभूत गुणधर्म आहेत, त्याची बलस्थाने आणि मर्यादा आहेत, माणूस या सगळ्यावर अधिराज्य गाजवायला जन्माला आलेला नाही; ही भारताची धारणा आहे. त्यामुळेच इच्छा, आकांक्षा, गरजा, भुका, मन, बुद्धी; या साऱ्याचा आणि त्यांच्या अखंडपणे चालणाऱ्या विभ्रमांचा सतत आढावा आणि व्यवस्थापन करावे लागते; असे भारत म्हणतो. अन्य लोकांना मात्र हे मान्य नाही. त्यांच्या मते मानवी मनात आलेली, बुद्धीला सुचलेली प्रत्येक गोष्ट साकार करणे, प्राप्त करणे हा केवळ अधिकारच नव्हे, तर जीवनमरणाचा प्रश्न असतो. भलेही नंतर त्यातील फोलपणा लक्षात येईल आणि त्यामुळे वैफल्य वाट्याला येईल. भारत नेमका याच्या वेगळा विचार करतो. त्यामुळे व्यक्तिगत गोष्टींना आळा घालण्यात काही गैर नाही असे त्याला वाटते. जगालाही आज तसे वाटू लागले आहे. नीतीमत्ता खुंटीला टांगून ठेवणारा आणि उपभोगवादाशी सांगड घातलेला इहवाद आज जगालाही चटके देऊ लागला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सुख, शांति अशी जी स्वप्ने माणसाने बाळगली त्या साऱ्यांना या इहवादाने हरताळ फासला आहे. नुकतेच अमेरिकेतील black Friday sale चे काही व्हिडीओ पाहण्यात आले. त्यासाठी उडालेली झुंबड आणि तिथल्या अधिकाधिक वस्तू ताब्यात घेण्यासाठीचा हपापलेपणा आणि धावपळ तेथील एकूण आर्थिक आणि सामाजिक स्थितीची कल्पना देत होते. आर्थिक विषमता, शारीरिक-मानसिक रोग, जीवनाविषयीची निरर्थकता, हिंसा, भावनिक रिक्तता, भय, anxiety, तांत्रिकतेचा भस्मासूर अशा अनेक बाबींनी ग्रस्त होत जाणारी मानवजात आज भांबावल्यासारखी झाली आहे. तिचा जीवनप्रवाह कुंठीत झाल्यासारखा वाटतो आहे. विचार, प्रयत्न, धडपड यांचे डबके तयार झाले आहे. या डबक्यातून बाहेर पडण्यासाठी, जीवनाचा प्रवाह वाहता करण्यासाठी जी दृष्टी, बुद्धी, धाडस हवे त्याचा अभाव जाणवतो आहे. हा अभाव दूर करणे इहवादाला शक्य नाही हे कधीकधी, कुठेकुठे जाणवते पण ते मान्य करण्यात मानवी अहं आणि मानवी बुद्धीची दांभिकता आड येते. गेली पुष्कळ शतके जो विचार, जे तत्वज्ञान, ज्या धारणा, ज्या भावना उराशी बाळगले; ज्याचा उदोउदो केला; जे अभिनिवेशाने जगासमोर ठेवले; या साऱ्याचे मनबुद्धीवर जे संस्कार झाले; ते पुसून नवीन पर्व सुरु करणे तसेही कठीण असणारच.
भारताच्या संदर्भात मात्र स्थिती जरा वेगळी आहे. हजारो वर्षांच्या अनुभवाच्या, जीवनाच्या, विचारांच्या प्रभावाने भारताने या नीतीशून्य उपभोगवादी इहवादाला सहजासहजी स्वीकारलेले नाही. गेली अनेक दशके या दोहोत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे कालचक्राचा फेरा म्हणा किंवा या समाजाचे नाकर्तेपण म्हणा किंवा अन्य काहीही; पण या समाजाची ऐहिक वाताहत झाली होती. त्यामुळे एक संपन्न, सुखी, सर्वसमावेशी ऐहिक जीवन उभे करणे हेही भारताच्या प्राधान्यक्रमात आहे. चांगुलपणा आणि संपन्नता यांनी भारताबाहेरील विविध शक्तींनी भारताचे जे लचके तोडले, जी दुर्दशा केली; त्यातून उभे राहणे हेही आव्हान आहे. जुने तत्वज्ञान, जुने संस्कार, जुनी मूल्यव्यवस्था; ऐहिकतेची पूर्ती; अन जागतिक प्रवाहांचा मारा; या तीन अंगांनी भारतीय सामाजिक जीवन वर्तमानात आकार घेते आहे. या तिन्हींच्या समन्वयाचे, सामंजस्याचे अन संघर्षाचे स्वरही उमटत असतात. यातील इष्ट आणि अनिष्ट, सकस आणि हिणकस यांची निवड हे एक मोठे आव्हान आहे. `माझे – तुझे’ करून यातून मार्ग निघणार नाही. हेही ध्यानात घेतले पाहिजे की, आजच्यासारखेच जीवन कालचे वा परवाचे वा त्यापूर्वीचे नव्हते. अर्थ (पैसा), नाती, लैंगिकता, स्त्री, पुरुष, देश, विदेश, शिक्षण, आनंद, सुख, स्वास्थ्य; अशा असंख्य गोष्टींच्या कल्पना आज कल्पनातीत बदलल्या आहेत. त्या प्रत्येकाचे विश्लेषण करायचे तर एकेक जन्म लागेल, एवढा तो पसारा मोठा आहे. मात्र त्याच्या मुळाशी गेल्यास एक बाब स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होते. ती म्हणजे – सत्ता आणि उपभोग ही वर्तमानाची मूल्ये आहेत आणि त्याग आणि समन्वय ही भारताची मूल्ये आहेत. सत्ता आणि उपभोग यांनीच इहवाद अतिशय आग्रही आणि असहिष्णू होतो; तर त्याग आणि समन्वय यामुळे भारतीय आध्यात्मिक विचार अनाग्रही आणि सहिष्णू ठरतो. अगदी छोट्या मोठ्या घटना, वाद, प्रसंग यातही हे दिसून येते. सत्ता आणि उपभोग यांच्या शीर्ष स्थानी असणाऱ्यांना ते स्थान टिकवून ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही अथवा ज्यांना ती मान्य नाहीत त्यांच्याही गळी ती उतरवण्याचे विविध प्रयत्न होत राहतात. मनोरंजन, विचार, साहित्य, जाहिराती अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून सत्ता, संघर्ष, उपभोग, शोषण यांचे एक तत्वज्ञान तयार केले जाते. भारताचे तत्वज्ञान आणि समन्वयाच्या आधारे उभी असलेली कुटुंब व्यवस्था हे या शक्तींना अडथळे आहेत. त्यामुळे त्यावर आघात करणे, ते मोडीत काढणे, त्याबद्दल भ्रम उत्पन्न करणे, त्यासाठी खऱ्याखोट्याचा आधार घेणे; असे सगळे प्रकार होतात. ब्राम्हण या शब्दावर आघात हा वास्तविक भारतीय तत्वज्ञानावर आघात असतो. स्त्रियांना स्वतंत्र आणि सबल करणे याचा अर्थ, कुटुंब व्यवस्था मोडीत काढणे हा असतो. या दोन्हीवर आघात म्हणजे भारतीय मूल्यांवर आघात असतो. हे चक्र आता मागे फिरवणे शक्य नाही. यातूनच मार्ग काढणे आवश्यक आहे.
महिलांचा विचार करायला हवा, ही काही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. ते समाजाने मान्य केलेले आहे. तसा तो व्हायलाही लागला आहे. अगदी स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मावशी केळकर आणि अशा अनेकांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि प्रयत्नही केले आहेत. मात्र यांच्या भूमिका, त्यांची दृष्टी आणि आजचा यासंबंधातील विचारप्रवाह यातील फरक आणि अंतर समजून घेणे महत्वाचे ठरते. मानवी विकासाची भारतीय कल्पना आणि त्यासाठी आवश्यक अवकाश, बळ स्त्रियांना प्राप्त व्हावे हा त्यांचा आशय होता. आज मात्र सगळ्यांशी फटकून राहणारी, पुरुषनिरपेक्ष, भोगैक सर्वस्व मानणारी, अर्थप्रधान विचार करणारी, सत्तावादी स्त्री हाच आदर्श मांडला जातो आहे की काय अशी स्थिती आहे. दुर्दैव म्हणजे, वर ज्या महापुरुषांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याशी नाते सांगणारे स्त्री-पुरुषही यात जाणता अजाणता हातभार लावत असतात. एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत नृत्यमुद्रेतील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मी ज्यावेळी त्यावर नाराजी व्यक्त केली त्यावेळी एक हिंदुत्वनिष्ठ कलाकार महिला मला म्हणाली – `त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? आपल्याला gorgeous महिला पाहण्याची सवय नाही.’ मी विषय थांबवला. परंतु विचारांचं, भावनांचं, दृष्टीचं penetration किती आहे यासाठी फक्त हे उदाहरण.
चारपाच दिवसांपूर्वी एकाने मला बीबीसी मराठीवरील एक ब्लॉग पाठवला. त्याचं शीर्षक वाचून तो मला का पाठवला असावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो. ब्लॉग पाठवणाऱ्याला विचारलं. त्याने त्याचं कारणंही सांगितलं. काय होता ब्लॉगवरील लेख? ब्रेसियरचा इतिहास आणि ती वापरण्याचे फायदे तोटे. मात्र त्यात दोन उल्लेख होते – एक म्हणजे भारतात महिला आपली अंतर्वस्त्रे लपवून वाळवतात; अन दुसरा उल्लेख होता एक महिला सुद्धा दुसऱ्या महिलेला ब्रा दिसत असेल तर ते खुणेने सांगून लपवायला सांगते. प्रश्न असे आहेत की, हे दोन्ही उल्लेख लेखाच्या विषयाशी सुसंगत आहेत का आणि भारतीय महिलांच्या या सवयीत टीका करण्यासारखे वा आक्षेप घेण्यासारखे काय आहे? मर्यादा, लज्जा, शालीनता यात वाईट काय? आक्षेपार्ह काय? त्या कल्पना सतत बदलत असतात. बदलतील. पण याविषयीच्या fashion tv किंवा fox life यांच्याच कल्पना आणि मापदंड योग्य आणि भारतीय कल्पना आणि मापदंड अयोग्य, मागास, टाकाऊ हे कसे? एखादी महिला पोहण्याच्या पोशाखातच पोहणार. त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही. कोणाला वाटत नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे. पण धाडसी खेळ, पर्यटन, मॉल, मंदिर, नृत्य किंवा अशाच अनेक ठिकाणी तोकडा, तंग, असभ्य पोशाख घालण्याचे समर्थन केले जाते तेव्हा; हा प्रवास दैहिकतेच्या दिशेने आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.
रामदेवबाबांच्या एका टीव्ही कार्यक्रमात भावना सेठ नावाची एक अभिनेत्री होती. त्यात हाच प्रश्न आला तेव्हा तिने उत्तर दिले होते – आम्हाला आवडते आम्ही घालतो. लोकांनी पाहावे, मिटक्या माराव्या, घरचा रस्ता धरावा. आज ही भावना सोशल मीडियातून देखील व्यक्त होताना दिसते. असा उत्तेजक वा अभद्र पोशाख करताना तुझ्या मनात नेमके काय असते? असा प्रश्न एकदा एका मुलीला विचारला तेव्हा तिने जो उथळ आक्रस्ताळेपणा केला तो मी अनुभवलेला आहे. जयपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया टुडेच्या एका संपादकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. हाच विषय होता. ते म्हणाले – `दिल्लीत माझ्या apartment मध्ये शेजारी एक कुटुंब राहतं. तेथील सुनबाई सगळ्या प्रकारचे कपडे घालते. अगदी मिनी, मायक्रो वगैरे. पण पूर्ण धार्मिक, आध्यात्मिक आहे.’ मी त्यांना विचारले - `आध्यात्मिक म्हणजे काय?’ मग ते काहीही बोलले नाहीत. दैहिकता मर्यादित, नियंत्रित, नियमित करणे जर आवश्यक वाटत नसेल तर, त्याला धार्मिक, आध्यात्मिक म्हणता येईल का? आपण जरा साधासुधा पोशाख केला तर बावळट ठरू याची भीती आज भारतीय स्त्रीच्या मनात बसली आहे की नाही? एकीकडे भगवे झेंडे घेऊन, भारतीय पोशाख करून गाड्या चालवीत शक्तीप्रदर्शन करणारी स्त्रीसुद्धा, घरी आल्यावर टीव्हीवर नृत्याच्या नावाखाली तोकड्या कपड्यातील नृत्य करणाऱ्या मुलीच्या पायात हात घालून तिला दहा जण उचलून घेतात हे मेलेल्या नजरेने पाहते की नाही? कुठे राहिला मूल्यबोध? आपण अनैतिक नव्हे, ननैतिक होतो आहोत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रम कोणत्या भावना, कोणती मूल्ये, कोणते मापदंड प्रक्षेपित करीत असतात. म्हाताऱ्या व्यक्तींच्या लैगिक भावनांचा विचार भारतात होत नाही. तो व्हायला हवा अशी विचारपेरणी सुरु झालेली आहे. त्या विचाराबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण लैगिकता हेच जीवन किंवा त्यापासून बाजूला जाणे म्हणजे चूक, पाप, मागासपण असा जो सूर आणि मांडणी असते ती संपूर्ण समाज दैहिकतेच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न असतो. स्त्री ही भोगाची वस्तू नाही हे वाक्य पार घासून गुळगुळीत झालेले आहे. पुरुषांचे सोडूनच द्या, स्त्रियांना तरी हे मनातून किती मान्य आहे? उपभोग घेऊ न देणे आणि उपभोगाची वस्तू नाही हे मान्य असणे यात फरक नाही का? या अनिर्बंध मोकळेपणाला सत्ताकांक्षा येऊन मिळाली की आणखीनच उत येतो. आपला नवरा आपल्यासाठी sanitary napkins घेऊन आला ही सोशल मीडियावर सगळ्यांना सांगून आनंद साजरा करण्याची गोष्ट कशी काय असू शकते? असाच एक चित्रपट मध्यंतरी आला होता. त्याचे कोण कौतुक? कशासाठी? हे सगळे न करताही स्त्रीचे अस्तित्व, तिचे अवकाश, तिच्या गरजा सहअनुभूतीने समजून घेणे आणि हा चिल्लर, पोरकट बाजारूपणा यातला फरक आपण समजून घेणार की नाही? आपण कुठे जातो आहोत आपल्याला तरी कळते आहे का?
समस्या असंख्य आहेत. त्या पुरुषांच्या आहेत अन स्त्रियांच्याही आहेत. केवळ स्त्रियांच्या अशाही आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, लैंगिक, मानसन्मानाच्या अशा अनेक आहेत. चौकट राजा नावाचा चित्रपट बहुतेक मराठी लोकांनी पाहिलेला असेल. त्या अपघात झालेल्या पुरुषाची समस्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक जशी आहे तशीच लैंगिक पण आहे. वेडे लोक, अपघातग्रस्त लोक, शारीरिक- मानसिक- बौद्धिक- कमतरता असलेले लोक; अन अशा खूप वेगवेगळ्या लोकांच्या असंख्य समस्या आहेत. यात स्त्री आणि पुरुष असे करता येत नाही. एवढेच नाही तर काहीही कमतरता नसलेल्या लोकांच्या समस्या असतात त्यातही स्त्री वा पुरुष असा भेद करता येत नाही. एक लग्न की अधिक लग्न, समलैंगिकता योग्य की अयोग्य, ईश्वर आदी मानायचे की नाही; अशा अनेक गोष्टींकडे उपेक्षा अथवा मस्करीपेक्षा आस्थेने पाहायलाच हवे. परंतु याकडेही दुर्लक्ष नको की; पिंड, वृत्ती, गरज, इच्छा, आकांक्षा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तर आणि समज, कौशल्य, स्वभाव, परिस्थिती, योग्य-अयोग्यता, compatibility, परंपरा, कल्पना, जुन्यातून बाहेर पडण्याची वृत्ती, जुने टाकून देण्याच्या नावाने अयोग्य किंवा अनावश्यक गोष्टींना मिळणारे पोषण, संधी, आर्थिक- सामाजिक व्यवस्था, जीवनशैली, अपेक्षा, अवास्तव अपेक्षा, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, अनुभव, छुपे वा उघड हेतू, आग्रहीपणा; असे अक्षरशः असंख्य कंगोरे असतात. या सगळ्यांचा घाऊक विचार करणे, घाऊक सिद्धांत मांडणे, अमुक विरुद्ध अमुक असा रंग देणे, न्यायअन्यायाचे स्वरूप देणे; हे शहाणपणाचे नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या प्रचलित अर्थाचे स्वातंत्र्य आणि सुख मिळवणारे सुद्धा किती विविध प्रकारे जीवनाला कंटाळतात, जीवन संपवण्याचे पाऊल उचलतात हे आता नव्हाळीचे राहिलेले नाही. आर्थिक स्वावलंबनाच्या विचाराने आता लग्न जुळवतानाच `तुझे तू, माझे मी’ हे स्वरूप घेतलेले आहे; अन पुरुषी अत्याचाराच्या खऱ्याखोट्या मांडणीने पुरुषविहीन जीवनाचा पुरस्कार करण्यासाठी फेसबुकचे प्रोफाईल काळे ठेवण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आम्हाला हेच हवे आहे का यापेक्षाही, यातून सगळ्यांचे कल्याण किंवा आमचे व्यक्तिगत सुख, समाधान, शांति तरी प्राप्त होईल का; हा कळीचा प्रश्न आहे. मानवीय आणि दैवी म्हणून जे जे गुण, प्रतीके, पद्धती विकसित झाल्या वा करण्यात आल्या त्यांचा साधकबाधक विचार करण्याचे नाकारणे हा करंटेपणा म्हणावा लागेल.
भारताचे काय होईल? हिंदूंचे काय होईल? आध्यात्माचे काय होईल? हे प्रश्नच गैरलागू आहेत. त्यांचे काय होईल याची चिंता करण्याची गरज नाही. इहवादी भोगवादाने, सत्तावादाने या साऱ्याची राखरांगोळी केली आणि ते भस्म फासून विश्वविजयाचे कितीही तांडव केले तरीही त्या राखेतून पुन्हा भारत, हिंदू आणि आध्यात्माचा फिनिक्स भरारी घेईल. प्रश्न हा आहे की, आम्हाला मर्यादित का होईना जे समजते त्याकडे दुर्लक्ष करून आजवरचे सारे शुभ, मंगल, कल्याणकारी आम्हीच उधळून टाकण्याचा नतद्रष्टपणा करणार आहोत का? Geneticaly modified माणूस जन्माला घातल्याचा दावा आज शास्त्रज्ञ करीत आहेत. येणाऱ्या भस्मासुराला ओळखण्याची गरज आहे. स्त्रीत्वाच्या किंवा अन्य कोणत्याही भावुकतेच्या प्रवाहात वाहून जाणे योग्य ठरणार नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २९ नोव्हेंबर २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा – २


ब्राम्हण ही जात वा व्यवस्था म्हणून अस्तित्वात नाही. खरे तर कोणतीच जात अस्तित्वात नाही. जे काही असेल तर ते त्याचे विखुरलेले निष्प्राण अवशेष. मात्र ब्राम्हणत्व कधीच संपले नव्हते, आजही संपलेले नाही. ऋषीमुनींच्या माध्यमातून, संतमहंतांच्या माध्यमातून, भिक्खुंच्या आणि श्रमणांच्या माध्यमातून; ब्राम्हणत्व सतत वाहते राहिले. संपूर्ण जगाला आर्य, ब्राम्हण, ऋषी स्तरावर पोहोचवणे हेच भारताने आपले ध्येय उराशी बाळगून ठेवले. विचार आणि व्यवहार अधिकाधिक निर्मळ होणे हा त्याच प्रयत्नांचा भाग. महात्मा गांधींनी स्वत:च्या आईला दिलेल्या वचनापोटी विलायतेत शाकाहारासाठी केलेली भटकंती किंवा अलीकडे जगाने `जागतिक शाकाहार दिवस’ साजरा करणे आणि जगभरात शाकाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणे हे ब्राम्हणत्व विस्तारत असल्याचेच लक्षण आहे. केवळ शाकाहार हा मुद्दा नाही. मानवाच्या जगण्याचा स्वरच बदलणे ही मुख्य बाब. कोणता स्वर आहे ब्राम्हणत्वाचा? या स्थूल जगण्यातील प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया अथवा संवेदन; विनाशी आणि तात्पुरते आहे. जीवनाचा एक याहून वरचा स्तर आहे. तो लौकिक नाही. त्या सर्वोच्च स्तरावर संपूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आनंद, संपूर्ण समाधान, अमरता आहे. उलट या स्थूल जगण्यात प्रत्येक पावलावर मर्यादा, पारतंत्र्य, असमाधान, नश्वरता, ओढाताण आहे. हे जे जीवनाचं वास्तव स्वरूप आहे तो आहे ब्राम्हणत्वाचा स्वर. त्यामुळेच व्यवहारातील नाव, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, कौतुक; अशा सगळ्याच गोष्टींची मर्यादा मानवी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत राहिला. मर्यादित जीवन आणि अमर्याद जीवनाची स्वयंभू ओढ यांचा मेळ, समन्वय घालत घालत जगणं बहरत राहिलं. यातूनच श्रेष्ठत्वाचा वेगळा दृष्टीकोन भारतात विकसित झाला.
एक गोष्ट वारंवार लक्षात घ्यायला हवी की, भारताच्या दृष्टीने श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अन्य जगाने या दोन्ही गोष्टी एक केल्या, एकत्रच पाहिल्या, त्यांचा एकत्रित बोध धरून ठेवला. भारताने मात्र श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन निराळ्या गोष्टी आहेत असे प्रतिपादन केले. किंबहुना सत्ता नाकारणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण ठरले. जोवर हा फरक नीट ध्यानात घेतला जात नाही तोवर अनेक गोष्टींचा उलगडा कठीणच. या चिंतनातूनच `उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा’ अशी नीतीतत्वे विकसित झाली. दुसऱ्याचा विचार, समन्वित विचार, साकल्याने विचार हेच भारताचे विशेष राहिले. व्यक्तिगत लाभहानी किंवा ऐहिकाचा ध्यास नव्हता असे नाही. त्याचे महत्व नव्हते असेही नाही. परंतु त्यासाठी किती आकांत वा उरस्फोड करायची याचा विचारही होत असे. आमच्या सामाजिक पद्धती, व्यवस्था, धारणा, कल्पना या अंगाने पहाव्या लागतात. उलट भारताबाहेरील विचारात या सगळ्याच्या विरोधी सूर दिसतात. भारताने खूप विचारपूर्वक या विश्वातील मर्यादांचा स्वीकार केला. त्याउलट अन्य जगाने या मर्यादा म्हणजे कटकारस्थान असल्याचा तर्क मांडला. अन त्याला अनुसरून संघर्ष हा स्थायीभाव विकसित केला. समन्वय फेटाळला. समन्वय म्हटले की तडजोड येते, कोणाला तरी पाऊल मागे घ्यावे लागते, मनाची, भावनांची, गरजांची ओढाताण होते. ते सारेच त्रासदायक असतेच. परंतु विचारपूर्वक भूमिका घेत राहिले, परिस्थिती- क्षमता- इत्यादी समजून घेत अशा तडजोडी केल्या तर त्रास कमी होतो. याचा अर्थ तडजोडच करायची असा नाही. लढायचे सुद्धा. पण लढण्यापूर्वी कृष्णशिष्टाई आणि गीतेचा आसरा घ्यायला विसरायचे नाही. हे समजून घेतल्याशिवाय भारतातील कोणतीही गोष्ट समजणे कठीण. ती जातीव्यवस्था असो की कुटुंबव्यवस्था. एक लक्षात घेतले पाहिजे की या दोन्ही आज वास्तवात अस्तित्वात नाहीत. परंतु पुढील व्यवस्थांचा विकास करताना कोणती तत्वे विचारात घ्यावी लागतील हे ध्यानात येण्यासाठी हा विचार आवश्यक ठरतो. या पार्श्वभूमीवर पुरुषसत्ताक आणि महिला यांचा विचार करावा लागतो.
श्रेष्ठत्व म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे श्रेष्ठत्व याच विचारातून भारताबाहेरील लोकांनी भारताकडे पाहिले. अन त्यानुसार विविध जातींचा संघर्ष, स्त्री-पुरुष संघर्ष, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा-आधुनिकता यांचा संघर्ष, विज्ञान-आध्यात्म यांचा संघर्ष, उत्तर-दक्षिणेचा संघर्ष; अशी मांडणी केली. पण तसे नव्हते. एक तर प्रत्येक व्यक्तीने, गटाने स्वतंत्रपणे फुलण्यातून विविध आचारविचार, भाषा-भूषा इत्यादी विकसित झाले होते. किंवा श्रमविभागणी हे तत्व होते. किंवा सुव्यवस्था हे तत्व होते. हे सगळे लादलेले होते असा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला जातो हे समजण्यापलीकडचे आहे.
मुळात व्यवसायांचे स्वरूप गृहउद्योग अशाच स्वरूपाचे होते. लोहार, सुतार, गवळी, तेली वा अन्य व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरील महिला घरातच व्यवसायात सहभागी होऊ शकत. काही व्यवसाय घरीच करण्याचे नव्हते पण ते महिलांनी करू नये असा कुठे आदेश नव्हता. शिक्षणाची आजची कल्पना मनात ठेवून जर आम्ही त्यावेळी शिक्षण नव्हते असे म्हणू लागलो तर ते हास्यास्पद म्हणावे लागेल. कष्ट, साधनांची उपलब्धता, सुख या गोष्टी फारशा नव्हत्याच. मी जिथे राहतो त्या ठिकाणी अगदी ५० वर्षे पूर्वी वीज नव्हती, रस्ते नव्हते. यावरून कल्पना करावी. खरं तर आपण कल्पनाही करू शकत नाही. कृष्णधवल चित्रपट पाहून सुद्धा त्या काळाची किती कल्पना आपण करू शकतो? अन तरीही आपण शेकडो, हजारो वर्षांच्या वाटचालीवर बेधडक टिप्पणी करीत राहतो. हे विचित्र आहे. अगदी १९७० च्या दशकात आलेल्या शोले चित्रपटात डाकूंच्या दहशतीचे चित्रण आहे. अगदी अलीकडेपर्यंत चंबळ वगैरे सारखे प्रदेश होतेच. रात्री लुटल्या जाऊ नये म्हणून रेल्वे गाड्या विशिष्ट भागातून रात्री न चालवण्याच्या घटना अगदी दशकभरातल्या आहेत. असे असताना समाजाने, स्त्रियांनी आणि पुरुषांनी मिळून; एकत्रित विचारविनिमय करून कामांचे विभाजन, वाटणी केली नसेल कशावरून? की आम्हीच फक्त विचार करणारे आणि संवेदनशील म्हणून जन्माला आलो आहोत?
सगळा साधकबाधक विचार न करता काहीतरी शब्द प्रचलित करायचे. त्यावर आपल्या मनातील अर्थ चिकटवायचे आणि गोंधळ अन संघर्ष निर्माण करायचा. परस्पर अविश्वास, तणाव, भय निर्माण करायचे; हे शहाणपणाचे नक्कीच नाही. घरची कामे म्हणजे दुय्यम, हिणकस, अन्याय, टाकावू; असं एकदा ठरवलं की मग वाद सुरु होतात. पण मुळात अशी भावना होती का? अशी भावना निर्माण होण्यासारखे जगणे होते का? जे काही जगण्याचे स्वरूप होते त्यातही महिला सण, खेळ, महिलांचे म्हणून काही प्रसंग असे सारे करीत होत्याच. त्यांचं दु:ख व्यक्त होत नव्हतं म्हणताना आपल्या डोक्यात त्यांची पुस्तके एवढाच विचार राहत असेल तर कठीण आहे. मुळात पुस्तके, छापखाने, मुद्रण हे सारे किती जुने आहे. आज सगळे काही बोटांच्या टोकावर येऊनही किती स्त्रिया वा पुरुष लिहितात, वाचतात. किती जणांना त्याची गरज वाटते? आज वेद, उपनिषदे, पुराणे सगळे उपलब्ध असताना किती ते वाचण्याचे, त्याचे अध्ययन करण्याचे कष्ट घेतात? वेद ऐकले की शिक्षा होत असे की नाही ठाऊक नाही, पण आज किती जण त्याचे अध्ययन करतात? मूळ मानवी वृत्ती आज अनेक गोष्टी सुकर झाल्या असताना जर अशी आहे, तर जेव्हा एखाद्या पुस्तकाची प्रत काढायची म्हणजे महिनोनमहिने मान खाली घालून लिहून काढावी लागत असेल; त्यावेळी मानवी वृत्ती कसा विचार करीत असेल? कसला म्हणजे कसला विचार करायचाच नाही असे जर ठरवले तर मात्र गोष्ट वेगळी. मूळ मुद्दा हा की जुन्याचा फार अधिक गूळ न पाडता, त्या समाजाची स्वीकार शीलता किती आहे; बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती किती आहे; हे बदल स्वीकारताना जुन्याशी असलेला धागा जोडून ठेवून पुढे जाण्याची वृत्ती किती आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नव्याचा स्वीकार करताना त्यातील पोषक आणि विनाशक यांचे तारतम्य करण्याची वृत्ती किती आहे; यावर समाजाची पत आणि प्रत ठरते. भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान होते, त्यांना चरकात ढकलणे हेच भारतात केले जात होते; इत्यादी अवास्तव, अर्थहीन, अतिरंजित वादात न अडकता; किंबहुना असे वाद, अशी शब्दावली, अशी भावना प्रयत्नपूर्वक बाजूस सारून वर्तमानाला योग्य प्रतिसाद कसा देता येऊ शकतो याची चर्चा हवी.
या विषयाचा आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वर्तमानाचा स्वीकार करताना उभे राहणाऱ्या आव्हानांचा. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २७ नोव्हेंबर २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा - १


jack dorsey या ट्विटर सीईओचा आगाऊपणा गाजतो आहे. काही दिवसांनी तो शांत होईल. पण त्या निमित्ताने जे मुद्दे, जे विषय चर्चेत आलेत आणि येताहेत ते समाजमंथनाचे विषय आणि मुद्दे आहेत. ब्राम्हण आणि पुरुषसत्ताक असे दोन विषय आणि हे दोन विषय ज्या तिसऱ्या विषयाशी जोडण्यात आले तो तिसरा विषय म्हणजे महिला. एक बाब सुरुवातीलाच नमूद करण्याची गरज आहे की, या तिन्ही विषयाबाबत शांतपणे, गांभीर्याने आणि साधकबाधक चर्चा आज केली जात नाही आणि कोणाची तसे करण्याची फारशी तयारी नाही. ऐतिहासिक कारणांमुळे या विषयांबाबत बोटचेपी, उथळ, भरकटलेली अशीच चर्चा अधिक होते. मुख्य म्हणजे मनात भय बाळगून भीतीयुक्त विचार होतो. बचावात्मक चर्चा होते. त्यामुळे गाभा सुटून जातो. ऐतिहासिक कारणे दोन प्रकारची आहेत. एक म्हणजे मूळ भारतीय समाजाचा विकासक्रम, त्याचा जीवनप्रवाह आणि दुसरे म्हणजे या समाजाचा बाहेरील जगाशी गेल्या दोन शतकात आलेला संबंध. कोणत्याही जीवनप्रवाहात स्वाभाविकपणे येणारे अडथळे, साचलेपण, त्यातील तात्कालिक आणि स्थायी तत्वे, त्यांचे स्थलकालत्व, उपयुक्तता, उपयुक्ततेच्या कक्षेत न येणाऱ्या गोष्टी; असे अनेक घटक असतात. भारतीय समाजातही हे सारे आहेच. भरीसभर हा जीवनप्रवाह सुदीर्घ असल्याने या सगळ्या घटकांची गुंतागुंत आणि त्याचे स्वरूप समजून घेणे, समजावून देणे अधिकच जिकीरीचे आणि कष्टाचे आहे. त्यामुळे वारंवार वाद आणि गोंधळ होतो अन पुन्हापुन्हा या विषयांची मांडणी करावी लागते.
पहिला मुद्दा ब्राम्हण, ब्राम्हणवाद, ब्राम्हणीपणा इत्यादी. सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट ही की अन्य अनेक शब्दांप्रमाणे ब्राम्हण या शब्दाचे विविध अर्थ होतात. त्याच्या संदर्भानेही त्याचे अर्थ बदलतात. मुळात ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण येथपासून एक जातीविशेष असे त्याचे अर्थ होतात. पण या वेगवेगळ्या अर्थातून ब्राम्हणपणाची जी लक्षणे डोकावतात ती कोणती? एक म्हणजे नियमबद्ध असणे आणि दुसरे म्हणजे श्रेष्ठत्व भावना. या दोन गोष्टीत ब्राम्हण आणि त्यापासून निघणाऱ्या सगळ्या शब्दांच्या अर्थछटा येऊन जातात. प्रश्न असा की, नियमबद्धता आणि श्रेष्ठत्व भावना यात वावगे काय आहे? आणि हे दोन्ही निर्मूल करता येतात का? ज्या twitter सीईओ वरून हा वाद सुरु आहे त्याचेच उदाहरण घेता येईल. हा वाद सुरु झाल्यावर अशी एक माहिती आली की, तो विपश्यना करण्यासाठी गेलेला आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकत नाही. तो विपश्यनेला गेल्याने बाहेरील जगाशी संबंध नाही, फोन आदी नाही. हा ब्राम्हणीपणा नाही का? वेगळेपण, नियमबद्धता, व्रतस्थता, त्यातून येणारी मी श्रेष्ठ आहे ही भावना; हे सारे ब्राम्हणत्व नाही तर काय? पण आपल्याला तसे वाटत नाही कारण तो विपश्यना करून परत आल्यावर त्याची मानगूट धरता येईल. मात्र एक गोष्ट खरी की, ब्राम्हण ही वृत्ती आहे. ती मानवाची मूलभूत वृत्ती तर आहेच शिवाय काही प्रमाणात आवश्यक आणि मानवी विकासासाठी योग्य अशीही आहे. हीच वृत्ती संपत्ती संग्रहावर आधारित क्लब मेम्बरशीप इत्यादीत सुद्धा झळकते. शशी थरूर ज्यावेळी विमानातील सामान्य वर्गाला cattel class म्हणून हिणवतो त्यावेळी हीच वृत्ती असते. मग भारत आणि अन्य जग यात फरक काय आहे? भारताने या वृत्तीची सांगड ज्ञान, तपश्चर्या, आध्यात्म, स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन यांच्याशी घातली आणि व्रतस्थ साधेपणाची बंधने घालून तिला प्रवाहित केले. अन्य जगाने तिचा शास्त्रशुद्ध विचार न करता मोकळे सोडून दिले. स्वाभाविकच मानवाच्या उतरणीला लागण्याच्या स्वभावाप्रमाणे ती वृत्ती आकार घेत गेली आणि सत्ता आणि संपत्तीची बटिक बनली. ब्राम्हण वृत्तीला विशेषाधिकार दोन्हीकडे मिळाले. पण भारतात विशेषाधिकार हे पैसा आणि सत्ताविहीन राहिले. भारताबाहेर ते पैसा आणि सत्ताश्रीत राहिले. म्हणूनच स्वामी विवेकानंद ठणकावून सांगत असत- `तुमच्या डॉलरवर आधारित जातिभेदापेक्षा भारतीय जातीव्यवस्था खूप सरस आहे.’ मात्र, कोणत्याही जीवमान घटकाप्रमाणे त्या व्यवस्थेत दोष आले, त्या व्यवस्थेची वाताहत झाली. परंतु त्या व्यवस्थेने जे काही पोषण केले होते त्याचे काही गुण कायमही राहिलेत. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर किंवा गाडगे बाबा जेव्हा या साऱ्याबाबत बोलत तेव्हा त्यात जो विवेक राहत असे, त्यात आक्रस्ताळेपणाचा अभाव राहत असे आणि त्यात जी सुजाण समजूत राहत असे ती बाकीच्यांमध्ये राहत नाही. ब्राम्हण ही काही हलक्याने घेण्याची गोष्ट नाही, काहीतरी अंगात आल्यासारखे करून जाळून टाका, फोडून टाका, फेकून द्या; असे करण्याची गोष्ट नाही. त्यातील दुष्टपणा, स्वार्थीपणा काढून टाकायला हवा एवढेच. त्यामुळेच गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून ब्राम्हणी आचारांचे, उच्चारांचे अनुकरण करायला सांगत. मिलिंद महाविद्यालयात शिक्षक नियुक्त करताना बाबासाहेब आंबेडकर यांनी आवर्जून ब्राम्हण शिक्षक नियुक्त केले. किंवा रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रतिकात्मक म्हणून मनुस्मृती जाळली तरीही तिच्यातील त्यांना योग्य वाटलेल्या गोष्टींचा आणि मनूचाही त्यांनी गौरव केला आहे. भारतीय समाज व्यवस्थेने सगळ्या समाज घटकांना काही ना काही आर्थिक संरक्षण दिलेले आहे, असे गौरवोद्गार देखील कोकणातील खोत कायद्याबाबत विधिमंडळात बोलताना त्यांनी काढले होते. समग्रतेने विचार करून विवेकाने वागणे, बोलणे हीच त्यांची महानता होती.
ज्यांना आपले अन्य हेतू साध्य करायचे होते आणि आहेत त्यांना मात्र हा विवेक आणि विचार करण्याची गरज नसते. त्यामुळेच ब्राम्हण या शब्दाबाबतही असाच भ्रम, अविचार, विवेकशून्यता सहेतूक पसरवली गेली. ब्राम्हण शब्दही काळाच्या ओघात लोप पावला असता तरीही हरकत नव्हती पण आपले दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी तो जिवंत ठेवण्यात आला आणि त्याला सगळ्या वाईट गोष्टी, हिणकस गोष्टी जोडण्याची जणू स्पर्धा लागली. महात्मा गांधींच्या हत्येसारख्या घटनांनी त्या प्रयत्नांना बळही दिले. राजकीय सत्तालाभासाठी झालेले असे प्रयत्न तर अगदीच बटबटीत असतात. हे प्रयत्न देशातच होतात असे नाही तर विदेशातील सहेतूक प्रयत्नही असतात. माणसाची एक वृत्ती असते. गोष्टी एकमेकांना जोडण्याची. जसे अनेकांना सवय असते मोठ्या व्यक्तींबरोबर फोटो काढून घ्यायची. कुठेतरी, कोणत्या तरी निमित्ताने फोटो काढला जातो. मग तो फोटो दाखवून स्वत:ची पत वाढवून घ्यायची. किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या बातमीत आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने का होईना आपले नाव येण्यासाठी खटपट करणारे असतातच. का? वलय प्राप्त होते. वास्तविक संबंध नसतो, पण तो असल्याचे भासवून काही साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी गोष्टी जोडण्याची वृत्ती आहे त्याचा उपयोग अनेकदा अक्कलहुशारीने केला जातो. मग संस्कृत, शुद्ध बोलणे, जेवणापूर्वी श्लोक- मंत्र म्हणणे, वागण्या- बोलण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी, अगदी पान वाढण्याची पद्धत, आवडीनिवडी, वेशभूषा, मर्यादा अशा छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा `ब्राम्हणी’ असा शब्द चिकटवायचा आणि या गोष्टींचे साहचर्य, ऐक्य लोकांच्या मनावर बिंबवायचे. हेटाळणीच्या अंगाने त्याची चर्चा करायची आणि त्याबाबत नकारात्मक मानस तयार करायचे. सगळ्यांना सुरक्षात्मक पवित्र घ्यायला लावायचा. अशी ही खेळी असते.
एक उदाहरण या निमित्ताने आठवतं. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने ज्येष्ठ संपादक मामासाहेब घुमरे यांच्या मनोगताचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला होता. नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर चंद्रपूरलाही असा एक कार्यक्रम झाला होता. पत्रकार म्हणून मामासाहेब घुमरे त्यासाठी गेले होते. त्यानंतर झालेल्या भोजनाच्या वेळी, बाबासाहेबांनी वाढणाऱ्या लोकांना आवाज देऊन सांगितले होते की- `तो घुमरे आहे ना तो बामन आहे. त्याला आपले हे (मांसाहारी) चालत नाही. त्याला वाढताना काळजी घ्या.’ बाबासाहेबांचा आक्षेप आणि अन्य लोकांचे विरोध यातील फरक समजून घ्यायला हा एक प्रसंग पुरेसा आहे.
ब्राम्हण वृत्ती ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे. तिला वळण लावणे आणि योग्य पोषण देणे मानवी विकासासाठी आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी मर्यादा आखून घ्याव्या लागतात, काही यम नियम निश्चित करून पाळावे लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी करता येणार नाहीत हे लक्षात घ्यावे लागते, नियमपालन करावे लागते. अमुक गोष्ट साध्य करून आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त करावयाचे आहे ही भावना एक प्रबळ प्रेरणा असते. श्रेष्ठत्वाची ही भावना नसेल तर माणूस हीनत्व भावनेने ग्रासतो, निराशेत जातो आणि हळूहळू संपत जातो. यासाठी साध्य विचारपूर्वक ठरवावे लागते. भारताने दीर्घ विचारांती हे साध्य भारतीय जनसमुहापुढे ठेवले. जीवनाचा आध्यात्मिक आशय हे ते साध्य होय. ऐहिकता ही साधनांपुरती आहे आणि आध्यात्मिकता हेच शाश्वत जीवन आहे, हा विचार भारतीय चिंतकांनी समाजापुढे ठेवला. याने अनेक गोष्टी साध्य झाल्या. जीवनातील विफलता निपटून काढण्यात आली. ऐहिकतेसंबंधीचे वखवखलेपण नियंत्रित केले गेले. एकाच वेळी आंतरिक समाधान आणि बाह्य व्यवस्था यासाठी आवश्यक मानस तयार केले. या पायावरच भारताच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक व्यवस्था; जाणीवा, कल्पना, संकल्पना, कला, क्रीडा या सगळ्यांनी आकार घेतला. हळूहळू नियमबद्धता, व्रतस्थता, श्रेष्ठत्व जाणीव ब्राम्हण जातीच्या (अध्ययन, अध्यापन, पौरोहित्य) बाहेर नेण्याचे प्रयत्नही झाले. वारकरी संप्रदाय हे असे उदाहरण म्हणता येईल. आजही लोक श्रावणात मांसाहार करत नाही, हेदेखील ब्राम्हणत्व संपूर्ण समाजात; जात निरपेक्षपणे रुजवण्याच्या प्रयत्नाचे उदाहरण म्हणता येईल. ऐहिक उपभोग मर्यादित प्रमाणात आणि मर्यादित रीतीने घ्यावेत हा विचार समाजभर रुजवण्याचे प्रयत्न होत राहिले. हे सगळे जबरीने नव्हते. सत्तेच्या आधारे तर नव्हतेच. म्हणूनच आचार विचारांचे असंख्य नमूने पाहायला मिळतात. याने ऐहिकतेला अडथळा केला होता असेही नाही. सोन्याचा धूर निघत असे किंवा भिकारी सापडत नव्हते किंवा घरांना कुलुपे लावत नसत अशा प्रकारची जी वर्णने ऐकायला, वाचायला मिळतात ती काय सांगतात? खाणेपिणे, वस्त्रप्रावरणे, इमारती, भाषा, गणित, आयुर्वेद, पारिभाषिक शब्द, कथाकहाण्या, नृत्य- नाट्य- साहित्य-, दर्शने, सिल्क रूट, विविध देशांचे लोक इथे येऊन जाणे, विविध देशांची आक्रमणे, विविध राजे, राजघराणी, व्यवसाय याबाबत उपलब्ध माहिती; हे सगळे ऐहिकतेला नाकारून कसे शक्य होईल. हां, दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे सातत्याने विविध प्रकारे जीवनाच्या संपूर्णतेचा संस्कार आणि व्यावहारिक मर्यादा आणि विवेक. अर्थात ही मर्यादा आणि विवेक यामागेही संपूर्ण समाजाचा विचार हीच प्रेरणा होती. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून झेललेल्या विविध आक्रमणांनी दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे विस्कळीतपणा आला आणि सुरक्षात्मक उपाय मोठ्या प्रमाणावर करावे लागले. चिंतन, सुधार, व्यवस्था थांबून गेले.
आक्रमकांनी हे सगळे समजून न घेणे स्वाभाविक होते. आकलन न झाल्याने आणि स्वत:चे वर्चस्व टिकवण्याच्या गरजेपोटी; अशा दोन्ही रीतीने त्यांनी भारतीय समाजाचे चित्रांकन आणि मूल्यांकन केले. शिवाय वीज, वाहने, उद्योग, दळणवळण, विज्ञान तंत्रज्ञान, इंटरनेट, संगणक; हे तर जगभरातच अगदी अलीकडचे. त्यांचा आर्थिक, सामाजिक परिणाम सगळ्या जगावर कसा झाला आणि होत आहे; हे नजरेआड करून जुन्याचे विश्लेषण, मूल्यांकन केले जाते. या सगळ्या आधुनिक गोष्टींच्या आधी, म्हणजे तीनचारशे वर्षे पूर्वी जगभरातील समाज कसे होते याचा विचार करण्याची फुरसत फारशी कोणाला नसते. त्यातच गेल्या शंभरेक वर्षात, विशेषतः गेल्या ६०-७० वर्षात जगभरात मानवी मूल्यांची जागा उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्यांनी कशी घेतली हे न पाहता आणि त्याची अनुभवावर आधारित साधकबाधक चर्चा न करता; ती उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्येच योग्य आणि आवश्यक आहेत असे गृहित धरून; मतप्रदर्शन आणि विचार केला जातो. jack dorsey ला देण्यात आलेले आणि त्याने प्रदर्शित केलेले पोस्टर आणि त्यात उल्लेखित ब्राम्हणी, पुरुषसत्ताक हे उल्लेख आणि महिला वर्गाशी ते जोडून देण्याची चलाखी; याचाच परिणाम आहे. पुरुषसत्ताक आणि महिला हे दोन मुद्दे पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २४ नोव्हेंबर २०१८

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

शहाण्या अर्थकारणासाठी...

लक्ष्मी उत्सवाची दिवाळी येते आहे. त्याचा प्रत्यक्ष आनंदोत्सव सुरु होण्यापूर्वी, लक्ष्मीचिंतनाचे दोन मुद्दे. चार दिवस आधीच. कारण `ज्ञानाची दिवाळी', `शब्दांचे धन' वगैरे कितीही शुभेच्छा दिल्या, घेतल्या तरी प्रत्यक्षात त्याकडे त्यावेळी लक्ष नसतंच. असो.
पहिला मुद्दा म्हणजे, लक्ष्मी- पैसा- अर्थ- संपत्ती- फिरती राहायला हवी. सुदृढ अर्थकारण त्यावरच अवलंबून असतं. आज मात्र पैसासंचय आणि क्षयशून्य पैसावाढ हाच अर्थधर्म झाला आहे. अनेक evils यामुळेच आहेत. पुष्कळदा असा मुद्दा मांडला जातो की, भरपूर पैसा कमावणारे दान करतातच ना. हे काही अंशी खरे आहे. पण पैसा फिरता राहणे म्हणजे केवळ असे दान नाही. एक तर धनवान व्यक्तींचे हे दान त्यांच्या संपत्तीच्या तुलनेत अल्प असते. ते जुन्या भारतीय राजे लोकांप्रमाणे कोश खुला करणे नसते. त्यामुळे जो पैसा फिरण्यासाठी ते देतात तो थोडा असतो. बाकीचा अधिक प्रमाणातील पैसा संचय होतो. हा संचय वाढत जातो. त्यामुळे बिल गेट्स वा बफे वा अंबानी यांचे दान म्हणजे पैसा फिरणे नाही म्हणता येत.
पैसा फिरणे ही कल्पना लक्षात येण्यासाठी आकाशपाळण्याचे उदाहरण घेता येईल. तो पाळणा पूर्ण वर जातो आणि विशिष्ट उंचीवर गेल्यावर खाली येतो. यावेच लागते. हे उदाहरण म्हणून घेतले आहे त्यामुळे लगेच त्याचे अन्य गुण, लक्षणे इत्यादी काढून फाटे फोडून चर्वण करू नये. मूळ मुद्दा हा की, पैशाचा वर जाणारा आलेख एका मर्यादेच्या वर जाऊ न देणे हे पैसा फिरता राहण्यासाठी आवश्यक आहे. इथे हे लक्षात घ्यायला हवे की, खाली येताना पाळण्यातील माणूस सुरक्षित असतो आणि तो खाली येतो तरीही जमिनीला टेकत नाही. पैसावाढ व्यक्तिगत स्वरुपात आणि समाज म्हणूनही वेगवेगळ्या पद्धतींनी उभ्या, आडव्या, तिरप्या; रेषांमध्ये, दिशांमध्ये फिरत राहायला हवी. त्याचे खालचे टोक आणि वरचे टोक सांभाळणे आणि न भरकटता तो फिरत राहील याची काळजी करणे हे पाळणा फिरवणाऱ्याचे (नियंत्रकाचे) काम. तपशील आणि योजना हा वेगळा विषय आहे. पण दिशा आणि तत्व म्हणून आजच्या पैसासंचयी विचार आणि पद्धती ऐवजी; पैसा फिरता राहील असा विचार आणि पद्धती विकसित होणे गरजेचे.
दुसरा मुद्दा धोरणात्मक आणि मानसिकतेशी संबंधित. नुकतीच नागपुरात महापौर परिषद झाली. महापालिकांच्या उत्पन्नाचे स्रोत वगैरे विषय झालेच. त्यातही नागपूर महापालिका दिवाळखोरीच्या काठावर असल्याची एक बातमीही झळकली. या अनुषंगाने जे काही होते वा होईल ते आजच्या प्रवाहाशी सुसंगत असेच राहील. पण या प्रवाहाचाच फेरविचार गरजेचा आहे. कोणता आहे प्रवाह? खर्चाचा विचार आधी करायचा आणि उत्पन्नाचा नंतर. त्यासाठी कर्ज आदी आहेच आणि कर्ज फेडायला उत्पन्नाच्या स्रोतांची चाचपणी. नाहीच साधले तर दिवाळखोरी. आज अगदी व्यक्तीपासून देशांपर्यंत हीच तऱ्हा आहे. म्हणूनच ग्रीस वा अन्य देशांना दिवाळखोर व्हावे लागते. किंवा अमेरिकेला कर्ज घेण्याची मर्यादा संपून गेल्यावर काय करायचे या प्रश्नाचा नेहमीच सामना करावा लागतो. यासाठी खर्चाच्या आधी उत्पन्नाचा विचार आणि उत्पन्नाच्या प्रमाणात खर्चाचा विचार ही पद्धत (जुनाट वाटली तरीही) हिताची. यासाठी व्यक्तिगत स्तरावर आणि सत्ता वा प्रशासकीय स्तरावर वेगवेगळा विचार करावा लागेल. व्यक्तिगत स्तरावर विचार, सवयी, मानसिकता, संस्कार, स्वप्न, इच्छा, आकांक्षा यांची मांडणी करावी लागेल. सरकारी आणि प्रशासकीय स्तरावर या सगळ्या गोष्टींसोबत आणखीनही काही गोष्टींचा विचार करावा लागेल. उदाहरणार्थ- शस्त्रास्त्रांवरील खर्च. जगाची स्थिती आणि मानसिकता विचित्र आहे. शस्त्रांवरील खर्च ही काही प्रमाणात आणि कधीकधी गरजही असते; पण त्याचा बराचसा भाग बड्या देशांच्या अर्थकारणाशी आणि सत्ताकारणाशी सुद्धा संबंधित आहे. त्यांच्या लॉबीज आहेत. त्यांना सर्वसामान्य मानवी समुदायाशी घेणेदेणे नाही. पण त्याचा भुर्दंड तुम्हा आम्हाला सोसावा लागतो. त्यात आपण भरडलेही जातो. हीच बाब विज्ञानाच्या विविध शाखातील संशोधनाचीही आहे. त्यातील जीवनसापेक्ष, विश्वकल्याणी उद्देशाने होणारे संशोधन आणि अन्य संशोधन या बाबींचा वेगळा विचार हवा. जीवनसापेक्ष आणि विश्वकल्याणी म्हणजे काय आणि त्यांची मर्यादा यांचा विचार; ही मानवातल्या शहाण्या सामूहिकतेची जबाबदारी आहे.
सत्ता आणि प्रशासकीय खर्चाचा आणखीन एक पैलू आहे. त्यात लोकरंजन, सत्ता पक्की करण्याचा प्रयत्न, राजकारण, भ्रष्टाचार यांचा समावेश होतो. सरकार जो खर्च करते, ज्या योजना राबवते, जी तरतूद करते, ज्या कल्पना आणि स्वप्ने जागवते- मांडते- पूर्ण करण्याचा प्रयत्न करते; ते सारे निवडून देणाऱ्या लोकांच्या मनातील असते का? ते काही लोकांच्या वा सगळ्या लोकांच्या मनात असले तरीही, खर्चासाठीच्या दहा बाबींच्या क्रमवारीत त्या त्या गोष्टींचा प्राधान्यक्रम कशाच्या आधारे ठरवला जातो? कोण ठरवते? सत्तारूढ (लोकप्रतिनिधी वा अधिकारी) व्यक्तीची कल्पना लादण्याचे प्रमाण किती? अगदी इमारतींच्या रंगरंगोटी वा नूतनीकरणापासून अनेक लहानमोठ्या गोष्टी; लोकांच्या पैशातून होत असल्या तरीही त्या साऱ्याला लोकांची संमती वा सहमती असते का? सरकारी वा खाजगी कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे भत्ते वा सोयीसवलती यांचाही या अनुषंगाने विचार आवश्यक ठरतो. पंतप्रधान होण्यापूर्वीच्या एका मुलाखतीत श्री. नरेंद्र मोदी यांनी एक मुद्दा मांडला होता. ते म्हणाले होते, `मी जिथे जातो तिथे सगळी व्यवस्था असते. मुख्यमंत्री येणार असल्याने सगळे चांगले, नवीन वगैरे लागते. हे लक्षात आल्यावर मी अधिकाऱ्यांना बोलावले आणि सांगितले की, जी काही व्यवस्था असेल ती चांगली, स्वच्छ असलीच पाहिजे; पण प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृहातील बादल्या, मग वगैरे किंवा जाजम वगैरे नवीन घेण्याची काय गरज? हा सगळा खर्च कमी करता येऊ शकतो. तसे करा.' ते पंतप्रधान झाल्यावर या अनुषंगाने काय स्थिती आहे माहिती नाही. पण हा अर्थधर्म व्हायला काय हरकत आहे? नव्हे तो अर्थधर्म होणे हीच शहाण्या अर्थकारणाची नांदी ठरेल.
अर्थकारण हा जगड्व्याळ आणि सततचा विषय आहे. येत्या लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मीचिंतनाचे दोन मुद्दे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१८

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

स्वयंसेवक

(विजयादशमी... रा. स्व. संघाचा स्थापना दिवस... त्यानिमित्त...)
स्वयंसेवक
स्वयंसेवक !! मराठीतला एक साधा शब्द. पण आज त्या शब्दाला एक वेगळा अर्थ आणि वलय प्राप्त झालं आहे. स्वयंसेवक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच, असं एक समीकरण ठरून गेलं आहे. वास्तविक हा शब्द काही संघाने coin केलेला नाही. तयारही केलेला नाही किंवा त्यावर त्याचा स्वामित्व हक्कही नाही. तरीही संघ आणि स्वयंसेवक यांचे एक साहचर्य निर्माण झाले आहे. समाजात अशी उदाहरणे विरळाच असतात. डॉ. हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापना केली तेव्हा एक वचन वऱ्हाड, विदर्भात प्रचलित होते. `ना बाप का डर, ना मां का डर; बेटा बन गया व्होलन्तिअर’. या वचनाचा उल्लेख करून डॉ. हेडगेवार सांगत की, संघात आपण केवळ volunteer चं भाषांतर करून स्वयंसेवक शब्द योजलेला नाही. राजकीय पक्ष ज्या अर्थाने छोटीमोठी पडेल ती कामे करणाऱ्या तरुणांसाठी स्वयंसेवक शब्द वापरतात तसा आपण वापरत नाही. स्वयंप्रेरणेने राष्ट्राची सेवा करणारे ते स्वयंसेवक हा अर्थ संघाला अभिप्रेत आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. कालौघात त्यांची धारणा आणि त्यांनी योजलेला शब्द समानार्थी होऊन समाजात प्रतिष्ठीत आणि स्थिर झाले आहेत.
कोण असतो हा स्वयंसेवक? कसा असतो? काय करतो? स्वयंसेवक होणे म्हणजे काय? काय असते त्याची पद्धत? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे खूप सोपी आहेत किंवा कठीणही. ज्याच्या त्याच्या मनोभावानुसार. रा. स्व. संघाच्या शाखेत एकदा एखादी पुरुष व्यक्ती आली की ती व्यक्ती संघाचा स्वयंसेवक होऊन जाते. शाखेत येऊन तुम्ही ध्वजाला प्रणाम केला की तुम्ही झाले स्वयंसेवक. त्यासाठी दुसरे काहीही करावे लागत नाही. हां, संघाच्या अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे संघ स्थापनेनंतर ४-५ वर्षे थोडी वेगळी पद्धत होती. ज्याला स्वयंसेवक करून घ्यायचे त्याला डॉ. हेडगेवार यांना भेटावे लागत असे. डॉक्टर त्याच्याशी वैयक्तिक माहिती, सामाजिक स्थिती वगैरेबाबत बोलत आणि मग ती व्यक्ती स्वयंसेवक होत असे. अर्थात त्याही वेळी स्वयंसेवक होणे म्हणजे शाखेत येणे, अशीच पद्धत आणि असाच अर्थ होता. स्वयंसेवक याचा अर्थ संघाचा सदस्य. परंतु या सदस्याची नोंदणी, प्रवेश शुल्क, वार्षिक वा आजीवन शुल्क, हजेरीपट वगैरे काहीही नसते. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे निरोप देणे, शिबीर आदींची माहिती देणे यासाठी शाखेचे मुख्य शिक्षक, कार्यवाह, गणशिक्षक, गटनायक यांच्याकडे स्वयंसेवकांची म्हणजे शाखेत आलेल्यांची एखादी यादी असते. पण ती कुठे सादर वगैरे करावी लागत नाही. त्याचे रजिस्टर नसते. कार्यकर्ता बदलला की तो जुनी यादी मागून घेतो किंवा स्वत:ची नवीन यादी तयार करतो. ज्याला जशी नावे आठवतील तशी यादी तयार होते. ही यादी कमी जास्त होत असते. कधी कोणी सुटून जातात, तर कधी अमुक स्वयंसेवक असावा असं वाटून नाव जोडलं जातं. निरोप देणे, माहिती देणे, संपर्क याहून अधिक या यादीचा उपयोग नसतो. काही विशिष्ट अशा स्वयंसेवक याद्याही असतात. जसे संघ शिक्षा वर्गाचे तृतीय वर्षाचे शिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांची यादी किंवा शारीरिक विभागाची, बौद्धिक विभागाची, विविध व्यावसायिक गटांची अशाही याद्या असतात. या विभागांच्या विशेष कार्यक्रमांची, अभ्यासवर्गांची माहिती देणे, निरोप देणे यासाठी. ही झाली स्वयंसेवकांची नोंद.
स्वयंसेवक होण्यासाठी जशी कोणती विशेष पद्धत नाही, तशीच किमान गुणवत्ताही नाही. यच्चयावत कोणतीही पुरुष व्यक्ती संघाची स्वयंसेवक होऊ शकते. वय, जात, प्रांत, भाषा, व्यवसाय, शिक्षण काहीही असो वा नसो. ओळखीने, बोलावण्याने किंवा उत्सुकतेने तुम्ही शाखेत आलात; उत्सवाला आलात; भगव्या ध्वजाला प्रणाम केलात की तुम्ही स्वयंसेवक झालात. या स्वयंसेवकांवर कोणते बंधनही नसते. रोज शाखेत आलेच पाहिजे ही अपेक्षा असली तरीही त्यासाठी जबरदस्ती नसते वा ते बंधनकारक नसते. तुम्ही एकदा आलेत म्हणजे तुम्ही जन्मभराचे स्वयंसेवक. पुन्हा कधी शाखेत आले नाहीत तरीही. एखाद्याने स्वत:ला स्वयंसेवक म्हणवून घेणे थांबवले तरीही संघाच्या दृष्टीने तो स्वयंसेवक राहतो. शाखेत असताना किंवा उत्सवात असताना तेथील अनुशासन पाळावे ही स्वाभाविक अपेक्षा असते. अन अनुशासन मोडण्यासारखे काही कारण राहत नसल्याने, तसेच वरिष्ठ अधिकारीही अनुशासन पाळत असल्याने नवीन वा जुना स्वयंसेवक स्वाभाविक, सहजपणे अनुशासन पाळतो. कधी एखादा अप्रिय प्रसंग घडला आणि अनुशासन नाही पाळले वा अनुशासन मोडून, रागावून कोणी निघून गेला तरीही; त्याच्या स्वयंसेवक असण्यात काहीही बाधा येत नाही. तो स्वयंसेवक राहतोच. प्रत्येक स्वयंसेवक रोज शाखेत येतोच असे नाही आणि तो प्रत्येक उत्सवाला किंवा कार्यक्रमाला येतोच असेही नाही. शाखा चालत राहते, उत्सव वा अन्य कार्यक्रम होत राहतात; निरोप कमीअधिक दिले जातात; स्वयंसेवक कधी उपस्थित राहतात, कधी राहत नाहीत. सगळा राजीखुशीचा मामला. स्वयंसेवकत्व मात्र अढळ राहते.
एखादी व्यक्ती स्वयंसेवक झाली की त्याचा काय फायदा? त्याला काय मिळतं? स्वयंसेवकाला काहीही मिळत नाही, त्याचा काहीही फायदा नाही. काहीही म्हणजे अक्षरशः काहीही मिळत नाही. यावर विश्वास ठेवणे सामान्यपणे जड जाते. पण जे जे शाखेत गेले आहेत त्यांना हे माहिती आहे. अन हे माहिती असणे अनुभूत असल्याने जगातील कोणीही काही सांगितले तरीही त्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. जे अनेक स्वयंसेवक नाराज होऊन संघात जाणे बंद करतात, संघाशी संबंध ठेवत नाहीत तेदेखील या मुद्यावर सहमत असतात. जसे स्वयंसेवक झाल्यावर मिळत काहीच नाही तसाच त्याचा फायदाही काही नसतो. हां, अनेक माणसांशी संपर्क येतो त्यामुळे कुठे एखादी नोकरी, कुठे शाळा महाविद्यालयात प्रवेश होऊन जाते, सुकर होते. पण स्वयंसेवक असल्यामुळे नोकरी मिळते, प्रवेश मिळतो; असे नसते. पुष्कळदा अशी अपेक्षा ठेवून येणाऱ्या लोकांची निराशाही होते. परंतु संघ अशी अपेक्षा निर्माण करत नाही, होऊ देत नाही आणि पूर्णही करत नाही. हां, व्यक्तिगत संपर्कातून, संबंधातून जे काही फायदे (??) होत असतील, तो भाग वेगळा. याउलट तोटा मानले तर, स्वयंसेवक होण्याचे तोटेच असतात. शाखेत वा कार्यक्रमात जायचे म्हणजे वेळ द्यावा लागतो. लहान वा मोठी जबाबदारी घेणाऱ्या स्वयंसेवकाला तर जास्तच वेळ द्यावा लागतो. जबाबदारी मोठी म्हणजे वेळही जास्त देणे. आपण संघासाठी, संघकार्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे; हा एक आग्रहाचा, चिंतनाचा, बौद्धिक वर्गाचा, सततच्या पाठपुराव्याचा विषय असतो; इतके वेळ देणे महत्वाचे असते.
ज्याप्रमाणे वेळ खर्च करावा लागतो त्याचप्रमाणे पैसाही पदरचा खर्च करावा लागतो. संघाचा खर्च चालवण्यासाठी संघाने गुरुदक्षिणा नावाची जी पद्धत रूढ केली आहे त्यात दक्षिणा समर्पण हा तर भाग असतोच, पण गणवेशात कार्यक्रम असेल तर स्वत:चा गणवेश स्वत:च खर्च करून तयार करावा लागतो. एनसीसी, पोलीस किंवा लष्कराप्रमाणे स्वयंसेवकांना गणवेश मिळत नाही. शिबीर, निवासी वर्ग, संघ शिक्षा वर्ग यांचाही खर्च शुल्क रुपात करावा लागतो. जाणेयेणे तर स्वत:च्या पैशाने करावेच लागते. नैमित्तिक अशा स्वरुपाची मदत गोळा केली जाते तेव्हा त्यातही धन रूपाने योगदान देणे स्वयंसेवकाकडून अपेक्षित असते. जसे नैसर्गिक आपत्ती, वनवासी कल्याण आश्रमासाठी निधी संकलन, ज्या ठिकाणी इमारत बांधकाम आदी असेल तेथे त्यासाठी निधी देणे; हे सुरूच असते. अर्थात सगळेच स्वयंसेवक नेहमीच असा खर्च करतात, योगदान देत असतात असेही नाही. जशी वेळ असेल, जशी परिस्थिती असेल, जशी गरज असेल त्याप्रमाणे.
सुरुवातीच्या काळात तर कार्यक्रमांची आणि शिबिरे आदींची सगळी व्यवस्था स्वयंसेवक स्वत:च करीत असत. राहुट्या उभारणे किंवा मंडप उभारणे यासारखी कामेही करत. मैदानाचे रेखांकन सुद्धा स्वयंसेवक करतात. प्रांत वा अखिल भारतीय बैठकी, प्रतिनिधी सभा यासाठीच्या व्यवस्था स्वयंसेवक उभारतात. हे सगळे विनामोबदला. सुट्या घ्याव्या लागल्या तर सुट्या घेऊन. व्यवसाय बाजूस ठेवावा लागला तर बाजूस ठेवून. डॉक्टर हेडगेवार तर शाखेच्या मैदानाची झाडझूड, मैदानावर पाणी टाकणे ही कामेही स्वयंसेवकांना सोबत घेऊन करीत असत. जेथे शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नसेल, त्यासाठी कोणी उपलब्ध नसेल तर सामान्य स्वयंसेवकच शाखा लावत असतो. प्रचारक वा प्रणामाचा अधिकार नसलेले अधिकारी शाखेत आले तर तो सामान्य स्वयंसेवकच प्रणाम घेतो. त्याला वेगळे काही करावे लागत नाही. कारण रचना हा गौण भाग असून कार्य महत्वाचे. स्वयंसेवक हाच संघवाहक असतो.
स्वयंसेवक म्हणून काही फायदा नसला तरीही व्यक्तीला काहीच मिळत नाही असे नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याला एक ओळख मिळते. ज्या ठिकाणी शाखा असेल आणि सगळ्या प्रकारचे स्वयंसेवक येतात त्या ठिकाणी एखादा सामान्य व्यवसाय करणारा, निम्न प्रकारची नोकरी करणारा स्वयंसेवक डॉक्टर, वकील, प्राध्यापक अशा प्रतिष्ठीत व्यक्तींशी सहज बोलू शकतो. त्यांच्या घरी जाऊ शकतो. आपण शाखा या विशेष गटाचे एक सदस्य आहोत ही ओळख त्याला मिळते. सूर्यनमस्कार, आसने, योगचाप, छोटेछोटे खेळ शिकायला मिळतात. शारीरिक स्वास्थ्य बिनापैसा प्राप्त होते. कथा, परंपरा- संस्कृती यांची माहिती; समाज, देश, परिस्थिती यांची माहिती मिळते, विचार ऐकण्याची, विचार करण्याची सवय लागते, ठरवून काम करण्याची सवय लागते. असे काही लाभ होत असले तरीही गवगवा होत नाही. तुम्ही एखादा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला, पार पाडला तरीही कौतुक होत नाही. टाळ्या मिळत नाहीत. छान गीत म्हटलं, चांगली कथा सांगितली किंवा उत्तम भाषण दिलं तरीही पुरस्कार मिळत नाही. ज्यांना तशी अपेक्षा असते ते स्वाभाविकच निराश वा नाराज होतात, पण खूप चांगली व दर्जेदार गुणसंपदा असलेले लोकही स्वयंसेवक म्हणून कसलीही अपेक्षा न ठेवता, लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने वावरत असतात.
जे स्वयंसेवक शाखेत रमतात, ज्यांना गोडी लागते, स्वआग्रहाने नियमित येतात, सहभागी होतात, लहानमोठी कामे मनापासून करतात त्यांच्यावर गणशिक्षक, मुख्यशिक्षक, कार्यवाह अशा जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. याच पद्धतीने अखिल भारतीय स्तरापर्यंत पदाधिकारी निवडले जातात. व्यक्तीची संघकार्यातील सक्रियता पाहून त्याला प्रतिज्ञा दिली जाते. प्रतिज्ञा घेतलेल्या स्वयंसेवकाची सक्रियता पाहून त्याला संघ शिक्षा वर्गाच्या प्रशिक्षणाला जाण्याची अनुमती मिळते. एकूण स्वयंसेवकांच्या तुलनेत प्रतिज्ञा घेतलेल्या स्वयंसेवकांची संख्या कमी असते, तर संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण घेणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या त्याहूनही कमी असते. संघाचे काम करण्यासाठी किंवा जबाबदारी देण्यासाठी प्रतिज्ञा किंवा प्रशिक्षण आवश्यक भाग नसतो. अगदी संघचालक पदावरील व्यक्तीचेही संघ शिक्षा वर्गाचे प्रशिक्षण झालेले असेलच असे नसते. या सगळ्याचे set rules नाहीत. अन म्हणूनच कदाचित गेली ९३ वर्षे संघाचं काम सुखेनैव सुरु आहे. नियमांचे जंजाळ कार्यात अडथळेच अधिक आणत असते. संघाने हे जंजाळ टाळले आहे. रचना उभी करण्यासाठी काही नियम, काही पद्धत आवश्यक असते. त्याला तेवढेच महत्व देऊन, अधिक महत्व न देता, काम करणे ही संघाची पद्धत आहे. त्यामुळेच एखादा स्वयंसेवक प्रतिज्ञा न घेतलेला, प्रशिक्षण न घेतलेला असेल तरीही त्याने दक्ष अशी आज्ञा दिली की सगळे दक्ष होतात.
स्वयंसेवक झाल्याने किंवा स्वयंसेवक म्हणून सक्रीय झाल्याने जशी शाबासकी मिळत नाही, तसेच स्वयंसेवकाने संघाशी संबंध ठेवले नाहीत म्हणून किंवा संघाला प्रतिकूल कृती केली म्हणून शिक्षाही मिळत नाही. येण्यासाठी पायघड्या नाहीत आणि निघून गेले तर लाखोळी नाही. नागपूरच्या एका विजयादशमी उत्सवाला तर कुठल्याशा एका मुद्यावरून साधारण डझनभर स्वयंसेवक पूर्ण गणवेशात दंडाला काळ्या फिती बांधून निषेध म्हणून, मुख्य कार्यक्रम मैदानाच्या बाजूला पूर्ण वेळ बसले होते. त्यावेळी स्व. रज्जुभैय्या सरसंघचालक होते. पण त्यांच्यावर कुठली कारवाई वगैरे झाली नाही. व्यक्तिगत रीतीनेही स्वयंसेवक नाराज वगैरे होतात. काही काळ बाहेर जातात. बाहेर गेलेले पुन्हा सक्रीय सुद्धा होतात. तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस हे याचे मोठे उदाहरण आहे. काही स्वयंसेवक काही काळ सक्रीय असतात मग कंटाळा येऊन, कौटुंबिक अडचणींमुळे, व्यावसायिक अडचणींमुळे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे निष्क्रियही होतात. काही कोणतेही कारण नसतानाही निष्क्रिय होतात. एखादे काम सातत्याने करण्याचीही प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. कोणी कोणी एकदा संघात आला की अगदी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठाही बाळगतो, सक्रियही असतो. असे अखेरच्या श्वासापर्यंत सक्रीय राहणारे केवळ प्रचारक असतात असे नाही तर अनेक गृहस्थ स्वयंसेवक देखील असतात. सगळेच असे राहू शकतील असे संघालाही वाटत नाही. संघ हे माणसांचे काम आहे. अनाग्रहाचे काम आहे. यामुळेच स्वयंसेवक होण्यापासून तर त्याने आयुष्यभर आपले स्वयंसेवकत्व सांभाळण्यापर्यंत सगळ्या गोष्टींकडे संघ पुरेशा स्वाभाविकपणे पाहतो. काही अपवाद असतात. ते सगळीकडे, सगळ्याच बाबतीत असतात.
स्वयंसेवकाने समाजाविषयी, देशाविषयी, मूल्यांविषयी कृतज्ञतेची आणि बांधिलकीची भावना ठेवावी; त्यानुसार जीवन जगावे; अन प्रत्यक्ष संघाच्या कामातून, संघप्रेरणेने चालणाऱ्या कामातून किंवा संघाशी संबंध नसलेल्या कामातून किंवा व्यक्तिगत रीतीने हा समाज चांगला, सुव्यवस्थित राहावा यासाठी योगदान देत राहावे; एवढी संघाची अपेक्षा असते. तसे सांगणे अन शिकवणेही असते. संघाची ही अपेक्षा पूर्ण करणारे स्वयंसेवक असतात तसेच ही अपेक्षा पूर्ण न करणारे किंवा विपरीत वागणारे स्वयंसेवकही असतात. चांगल्या स्वयंसेवकांमुळे संघाला प्रतिष्ठा मिळते, समाजाचा फायदा होतो; विपरीत वागणाऱ्या स्वयंसेवकांमुळे संघाला दोष लागतो, समाजाचा तोटा होतो. संघ या गोष्टीकडेही सहज प्रक्रिया म्हणून पाहतो. संघाचे आग्रह कायम राहतात. पद्धत कायम राहते. प्रत्येक जण स्वयंसेवक आहे ही भावना कायम राहते. संघाने स्वयंसेवकाच्या जीवनाचे नियंत्रण करावे. त्याला चांगले वागायला भाग पाडावे. त्याच्या बऱ्यावाईट कृत्यांची जबाबदारी घ्यावी; अशी समाजाची अपेक्षा असते. संघ मात्र सुरुवातीपासूनच अशा नियंत्रणाचा विचार बाजूस सारत आला आहे. व्यक्तीचे किंवा समाजाचे असे नियंत्रण करणे शक्यही नसते आणि योग्यही नसते. परंतु चांगल्या प्रेरणा जागवणे, भाव रुजवणे, प्रबोधन करणे हे संघटनेचे काम. त्यातून आपापल्या मगदुराप्रमाणे ग्रहण करून स्वयंसेवक जगतात, वागतात. त्यांच्या क्षमतेप्रमाणे हा प्रवाह वाहत राहतो. वाढत राहतो. काही भोवरेही तयार होतात. तेही स्वयंसेवकांमुळेच. स्वयंसेवकत्वाचे आदर्शही समाजाने पाहिले, अनुभवले आहेत; अन स्वयंसेवकत्वाला काळिमा फासणारी उदाहरणेही समाजाने पाहिली, अनुभवली आहेत. संघ मात्र सगळ्यांना स्वयंसेवक मानून प्रेरणा जागवण्याचे काम करत राहतो. संघासाठी जे भगव्या ध्वजाला प्रणाम करून गेले आहेत ते तर स्वयंसेवक असतातच, पण जे अजून आलेले नाहीत तेही भावी स्वयंसेवक असतात. संपूर्ण समाज स्वयंसेवक - स्वयंप्रेरणेने राष्ट्राची सेवा करणारी व्यक्ती – व्हावा ही संघाची मनीषा आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१८

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

संघ, गुरुजी आणि परिवर्तन


सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या दिल्लीतील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आवाका इतका मोठा आहे की त्याचे कवित्व पुढील काही वर्षे सुरु राहणे अपरिहार्य आहे. सध्या गोळवलकर गुरुजी यांच्या bunch of thought चा क्रमांक लागलेला आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीचा प्रमुख राहिलेला आणि नंतर आम आदमी पार्टीत जाऊन, आता पुन्हा राजकारणा बाहेर पडून लिखाणाकडे वळलेला आशुतोष नावाचा पत्रकार, संघावर त्याने लिहिलेले एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध करणार आहे. त्याने स्वत:च हे जाहीर केले असून त्या पुस्तकातही bunch of thought वर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा विषय चालत राहील हे नक्की. या पुस्तकाच्या संदर्भात स्वत: डॉ. भागवत यांनी इतके स्पष्ट आणि नेमके मतप्रदर्शन केले आहे की, वाद होण्याचे कारण नाही. पण समाज माणसांचा बनलेला असतो आणि माणसे विविध प्रकारची, विविध क्षमतांची, विविध प्रकारे विचार करणारी, विविध आकलनाची असतात. त्यामुळे चर्चा स्वाभाविक ठरते. लेखक, वक्ते यांचा हा सामान्य अनुभव असतो की; आपण म्हणतो एक आणि आपण जे म्हटलेलेही नसते तोही अर्थ लोक काढत असतात. त्यामुळे अशा चर्चांचे आश्चर्य वाटण्याचेही कारण नाही. शिवाय पहिल्याच दिवशीच्या भाषणाच्या प्रारंभीच सरसंघचालकांनी जो उल्लेख केला होता की, संघ समजावून सांगण्यासाठी from known to unknown अशी अरुंधती न्यायाची पद्धत उपयोगाची नाही. भाषाशास्त्रात ज्याला अनन्वय अलंकार म्हणतात तसा हा प्रकार आहे. त्यामुळे तीही एक अडचण आहेच. म्हणूनच या विषयाची वारंवार मांडणी आवश्यक होऊन बसते.
या चर्चेचे तीन मुद्दे आहेत. १) संघ, २) परिवर्तन, ३) गुरुजींचे पुस्तक. हे तिन्ही विषय एकमेकात मिसळलेले आहेत. रा. स्व. संघ गेली ९३ वर्ष काम करतो आहे. या काळात परिवर्तन हा विषय त्याला आणि संघातील परिवर्तन हा विषय समाजाला नवीन राहिलेला नाही. स्वयंसेवकांना आणि समाजालाही आपल्या परिवर्तनशीलतेने संघाने यापूर्वीही धक्के दिले आहेत. १९३८ सालच्या सिंदी बैठकीनंतर कार्यपद्धती, आज्ञा, प्रार्थना आदी बदल; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संघाच्या प्रतिज्ञेतील बदल; शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रमातील वेळोवेळचे बदल; गणवेषातील आजवरचे बदल; रचनांचे बदल; हे तर आहेतच; पण तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आपल्या हयातीतच केलेली पुढील सरसंघचालकांची घोषणा, त्यांचा अंतिम संस्कार सामान्य व्यक्तीप्रमाणे होणे; यासारख्या बदलांनीही संघाची परिवर्तनशीलता आजवर अधोरेखित केली आहे. अर्थात ही परिवर्तने आणि आज ज्या परिवर्तनाची चर्चा सुरु आहे त्यात खूप मोठे अंतर आहे हे खरे. आजवरच्या बाह्य बदलांनी संघाच्या monolithic स्वरूपाला फरक पडत नव्हता; परंतु गुरुजींच्या पुस्तकावरील सरसंघचालकांच्या अभिप्रायाने संघाच्या आंतरिक, वैचारिक, तात्त्विक बैठकीला तडा गेला आहे का; हा अनेकांच्या मनातील खरा प्रश्न आहे. असा तडा गेला असेल तर ते योग्य नाही असे वाटणारे, असा तडा गेला असेल तर दु:ख होणारे आणि असा तडा गेला असेल तर आनंदाच्या उकळ्या फुटणारे असे तीन प्रकारचे लोक आहेत. त्यातही दोन पैलू आहेत. एक आहे गोळवलकर गुरुजी यांच्याविषयीची भावना आणि दुसरा पैलू प्रत्यक्ष विचारांचा. हे दोन्ही पैलू समर्थक आणि विरोधक दोघातही कमीअधिक आहेतच. गुरुजींबद्दल श्रद्धाभाव हा समर्थक आणि स्वयंसेवक यांच्या बाबतीत पाहायला मिळतो, तर गुरुजी म्हणजे संघ असा विचार विरोधकात पाहायला मिळतो. १९४८ चा संघाला चिरडून टाकण्यासाठी करण्यात आलेला राक्षसी आघात आणि स्वातंत्र्योत्तर आमुलाग्र बदललेली परिस्थिती यातून संघाला लखलखीतपणे बाहेर काढून विजयपथावर त्याचा वारू चौखूर उधळण्याची शक्ती त्याला प्राप्त करून देण्यातील गुरुजींचे योगदान; हे या दोन्ही भावनांच्या मुळाशी आहे आणि ते योग्यही आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की, संघाच्या आंतरिक, वैचारिक, तात्त्विक बैठकीला तडा गेला आहे का?
याचे नि:संदिग्ध उत्तर नाही असे आहे. मुळातच संघाच्या स्थापनेपासून व्यक्तीनिरपेक्षतेवर संघाने एवढा भर दिला आहे की, अशा प्रकारांनी संघटनेला काहीही धक्का बसू शकत नाही. खुद्द गोळवलकर गुरुजींनी लिहिलेल्या अंतिम तीन पत्रात या व्यक्तीनिरपेक्षतेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. `अपना कार्य व्यक्तिपूजक नही राष्ट्रपूजक है’ हे त्यांचेच शब्द आहेत. शिवाय त्यांची स्वत:ची वृत्ती तर अशी होती की, त्यांनी स्वत: स्वत:चे श्राद्ध उरकून घेतले होते. त्यांच्याच हयातीत दुसरा एक वादही निर्माण झाला होता आणि स्वत: गुरुजींनी त्याचे स्पष्टीकरण दिले होते. तो वाद होता, त्यांच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेविषयीच्या मतांचा. एका मुलाखतीत प्रश्नोत्तरांच्या ओघात त्यांनी त्या विषयावर मत प्रकट केले होते. त्यानंतर बराच धुरळा उडवण्यात आला. त्यानंतर स्वत: श्री. गुरुजींनी हे स्पष्ट केले होते की, ती मते संघाची नाहीत तर ते त्या व्यवस्थेबाबतचे माझे आकलन आहे. आणखीनही काही बाबी आहेत. श्री गुरुजी जन्मशताब्दीनिमित्त गुरुजींच्या विचारांचे जे १२ खंड प्रकाशित झाले त्याच्या प्रस्तावनेत तेव्हाचे सरसंघचालक स्व. सुदर्शनजी यांनी ही गोष्ट स्पष्टपणे नोंदवली आहे की, कोणत्याही महापुरुषांच्या विचारांचे दोन भाग असतात- शाश्वत आणि कालसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष. गुरुजींच्या विचारांचेही तसेच आहे असा त्यांचाही अभिप्राय आहे. त्यामुळे संघाने अधिकृतपणे bunch of thought वर दिलेली प्रतिक्रिया सामान्य प्रक्रियेचा भाग म्हणूनच पाहिली जायला हवी. त्याने संघात वादळ वा फूट इत्यादीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही.
तीन संदर्भांचा उल्लेख अनाठायी ठरू नये. एक पाचवे सरसंघचालक सुदर्शनजी यांच्या संदर्भात. सरसंघचालक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी भोपाळ येथे श्रीमती सोनिया गांधी यांच्याविषयी काही मत मांडले होते. त्यावरून वादंग माजले तेव्हा संघाने अधिकृत पत्रक काढून ते सुदर्शनजी यांचे व्यक्तिगत मत असल्याचे म्हटले होते. एक प्रकारे आपल्या माजी सरसंघचालकांचे त्यांनी खंडन केले होते. दुसरा संदर्भ श्री. गुरुजींची वृत्ती दाखवणारा आहे. श्री गुरुजी समग्र या १२ खंडातील २ खंड त्यांच्या पत्रांचे आहेत. त्यातील सुधीर फडके यांना लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. सुधीर फडके यांच्या पत्राला दिलेले ते उत्तर आहे. मूळ सुधीर फडके यांचे पत्र तेथे नाही आणि ते माझ्याही वाचण्यात नाही, परंतु गुरुजींच्या उत्तरावरून पुरेसा बोध होतो. संघात सरसंघचालकांना परम पूजनीय म्हटले जाते. सुधीर फडके यांनी पत्र पाठवून गुरुजींजवळ त्याबद्दल आपले वेगळे मत व्यक्त केले होते. त्याला उत्तर देताना गुरुजींनी हे स्पष्ट केले होते की, `तुमची (सुधीर फडके यांना उद्देशून) सूचना योग्यच आहे. मी सामान्य आहे आणि तसेच राहण्याची माझी इच्छा आहे. एवढेच नाही तर सगळ्यांनी मला विसरून जावे आणि केवळ आपल्या कार्याचा विचार करावा. मला परम पूजनीय म्हणू नये यासाठी तुम्ही अखिल भारतीय व प्रांतीय अधिकाऱ्यांशी बोलून प्रयत्न करावा.’ श्री गुरुजी समग्रच्या आठव्या खंडात १९४ क्रमांकाचे हे पत्र आहे. १५ एप्रिल १९५६ रोजी लिहिलेले हे पत्र मुळातून वाचण्यासारखे आहे. श्री गुरुजींचाही काय मानस होता हे त्यावरून स्पष्ट होते.
तिसरा संदर्भ खुद्द संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचा आहे. त्यांना डायरी लिहायची सवय होती. त्या डायरीत त्यांनी त्यांचा मानस लिहिला आहे. ते म्हणतात- `मी या संघाची सुईण आहे. संघाला जन्म देण्यात मी हातभार लावला आहे एवढेच. पण उद्या जर मी संघाच्या कामात निरुपयोगी वाटलो तर मला बाजूला करून आपण योग्य वाटणाऱ्या नवीन व्यक्तीची माझ्या जागी निवड करून संघाचे काम पुढे चालवावे. मी सामान्य स्वयंसेवक म्हणून काम करीत राहीन.’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा मूळ विचार आहे, मूळ भाव आहे. यात नाकारणे-स्वीकारणे हा भावच नाही. तो येऊही शकत नाही. कारण एखादी गोष्ट घेऊन चालणे अथवा ती बाजूला ठेवणे यापाठचे कारण स्वार्थ, व्यक्तिगत हेवेदावे, लहरीपणा यातील काहीही नसून कार्याची आणि काळाची गरज एवढेच राहत आले आहे. हिंदू समाजाचे, पर्यायाने राष्ट्राचे आणि त्यापुढील पायरी म्हणजे संपूर्ण विश्वाचे उत्थान- कल्याण- भले होणे- यावर रोखलेली नजर पक्की ठेवून, कार्य आणि काळाची वाटचाल ध्यानी घेऊन स्वीकार-नकार, बदल करीत राहणे. साचलेपण येऊ न देता प्रवहमान राहणे, हे अतिशय कठीण कार्य संघ आजवर करीत आला आहे. सरसंघचालकांचे bunch of thought बद्दलचे वक्तव्य याचाच एक भाग आहे. डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी हे संघाचे श्वासनिश्वास आहेत. त्यांना सोडले वगैरे भाषा अनुचित आहे, त्या भाषेमागील भाव तर निखालस निंदनीय आहे.
संघाची प्रारंभापासूनची ही भूमिका आणि त्यानुसार वाटचाल ही मूळ हिंदू प्रवृत्तीलाही साजेसी अशीच आहे. तर्को प्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना... नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम् ... धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां... महाजनो येन गत: स पन्था: ... हाच भारताचा, हिंदूंचा सनातन विचार आहे. म्हणूनच इथे असंख्य उपासना पंथ, संप्रदाय, जीवनपद्धती, समाजरचना येतजात राहिल्या. या साऱ्यांचे सहजीवन बहरत आले. संघर्ष झाले असतील तर ते मूळ मानवी प्रवृत्तीतील षडरिपूंचा परिणाम म्हणून. जीवन हे प्रवहमान आहे आणि प्रत्येकाला जीवनाचा, जीवनसत्याचा वेगवेगळा प्रत्यय येऊ शकतो. ही सृष्टी नित्यनूतन आहे. तिला विचार, भाव, शब्द, व्यक्ती, रचना, व्यवस्था यांनी बांधून ठेवता येत नाही. ठेवू नये. हां, या जीवनाची ऊर्ध्वगामी दिशा मात्र नजरेआड करू नये. कारण त्यातच हित आहे, सुख आहे, समाधान आहे, सार्थकता आहे; असे भारताचे- हिंदूंचे अनुभवजन्य मत आहे. संघाची वाटचाल आणि सरसंघचालकांचे ताजे मतप्रदर्शन याचाच सहज आविष्कार आहेत.
हे सगळे ठीक. तात्त्विक चर्चा ठीक. पण असे कोणते परिवर्तन झाले की, ही भूमिका घ्यावी लागली? हा कळीचा प्रश्न आहे. बहुसंख्य समाज राजकारणाचा चष्मा लावून वावरत असल्याने तो तसाच अर्थ घेईल. त्याची चर्चा ज्यांना करायची त्यांनी करावी. परंतु परिस्थितीतील बदल हा त्याहून फार फार मोठा आहे. गुरुजींनी ज्यावेळी त्यांचे मत मांडले त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात महदंतर आहे. पाकिस्तानची निर्मिती, मुस्लीम या शब्दाभोवती होणारे विशिष्ट समाजाचे ध्रुवीकरण, ते ध्रुवीकरण होऊ नये यासाठी घेतल्या जाणाऱ्या भूमिका, जगभरातील मुस्लीम समाजाचे मानस आणि जीवन, त्यांचा इतिहास; या सगळ्यातच आज मोठा बदल झालेला आहे. आज पाकिस्तान लयाची चर्चा होते, त्रिवार तलाक रद्द होऊनही मुस्लीम शब्दाभोवती ध्रुवीकरण होत नाही, काही भडक लोक असले तरीही त्यांना प्रतिसाद मिळत नाही, भगवे कपडे घालून एक मुस्लीम व्यक्ती देशभर गोरक्षण आणि संवर्धन यासाठी पदयात्रा काढते, जगभरच्या मुस्लीम देशात हिंदू मंदिरे उभारण्याची सुरुवात झाली आहे, जगभरातील मुस्लीम महिला बुरखा आणि कोषातून बाहेर पडू लागल्या आहेत, मुस्लीम देशात योग मान्यता पावते आहे, कट्टरता अलगथलग पडते आहे, जगभरचे सामाजिक- राजकीय- आर्थिक- सांस्कृतिक- चित्र बदलले आहे, हिंदू म्हणणे आणि म्हणवून घेणे लाजिरवाणे राहिलेले नाही, हिंदुत्वाचा अभिमान बाळगीत हिंदू जग गाजवीत आहेत आणि जगाच्या सुखशांतीत योगदान देत आहेत, जगातील लोक प्रतिनिधीगृहात आणि विभिन्न उपासना पंथांच्या प्रार्थनागृहात हिंदूंना आणि त्यांच्या प्रार्थनांना- त्यांच्या विचारांना प्रवेश मिळालेला आहे. बदल, परिवर्तन हे असे सर्वंकष आहे. ज्यांना ते दिसू शकते त्यांना दिसते, ज्यांना समजू शकते त्यांना समजते. सरसंघचालकांनी व्यक्त केलेले मत, संघाच्या भूमिकेतील तथाकथित बदल या पार्श्वभूमीवरील आणि या संदर्भातील आहे. संघाला यात नवीन काहीही नाही. संघाने अशा अनेक गोष्टी पचवल्या आहेत. बाकीच्यांना आपली पाचनशक्ती ठीकठाक करून घ्यावी लागेल एवढेच.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१८

शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हिंदू पद्धती, संघ पद्धती


काही दिवसांपूर्वी, ७ सप्टेंबर २०१८ रोजी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शिकागो येथे विश्व हिंदू संमेलनात प्रमुख भाषण झाले. निमित्त होते स्वामी विवेकानंद यांच्या जगप्रसिद्ध शिकागो भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे. `हिंदूंना कोणावर वर्चस्व गाजवायचे नाही,' असे त्यांच्या भाषणाचे सार सांगता येईल. अनेक प्रसार माध्यमांनी ते तसेच लोकांपर्यंत पोहोचवले देखील आहे. या देशाने हजारो वर्षे जो विचार जोपासला, रुजवला, वाढवला तोच सरसंघचालकांच्या भाषणातून प्रतिबिंबित झाला आहे. नुकताच या जगाचा निरोप घेणारे स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी `रग रग हिंदू मेरा परिचय' या लोकप्रिय कवितेतून जो विचार व भाव व्यक्त केला आहे, तोच शिकागोच्या भाषणात प्रकट झाला आहे. थोडक्यात म्हणजे या देशाची हजारो वर्षांची परंपरा, स्वामी विवेकानंद, अटलबिहारी वाजपेयी आणि आता सरसंघचालक डॉ. भागवत असा उदार हिंदू भावाचा एक प्रवाहच वाहतो आहे. सध्याच्या वातावरणात एक सुखद आश्चर्याचा लहानसा धक्काही जाणवला आहे. सगळ्या हिंदूंच्या वतीने सरसंघचालक कसे काय बोलले? ते काय संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधी आहेत का? असे एरवी उत्पन्न होणारे प्रश्न कोणी उपस्थित केले नाहीत. हेही एक सुचिन्हच. वास्तविक जगभरातल्या ६० देशातील हिंदूंच्या प्रतिनिधींसमोर मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांचे भाषण झाले. याचाच अर्थ हिंदूंच्या मोठ्या वर्गाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ते समस्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का इत्यादी प्रश्न गतार्थ होतात.
आणखीन दोन दिवसांनी म्हणजे १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सरसंघचालकांच्या तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रातील नेतृत्वाशी त्यांची चर्चादेखील होणार आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आयोजन केले आहे. अशी छोटी छोटी आयोजने आजवर होत आली आहेत. परंतु नियोजनबद्ध रीतीने आणि व्यापक सहभाग आणि विस्तारित कक्षा असलेले असे हे पहिलेच आयोजन असावे. यात सरसंघचालक काय बोलतात आणि काय चर्चा होते हे प्रत्यक्ष कार्यक्रमानंतर स्पष्ट होईलच. परंतु ते पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या, हिंदू विचारप्रवाह व हिंदू भावप्रवाह याला अनुसरूनच राहील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. याचे कारण म्हणजे रा. स्व. संघाचाही विचारप्रवाह आणि भावप्रवाह तसाच राहत आला आहे.
एका प्रसंगाचे येथे सहज स्मरण होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटायला एक जैन मुनी आले होते. विविध विषयांवर बोलणे सुरु असताना, जैन मुनी म्हणाले - तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना डालडा तूप न वापरण्याचा आदेश का देत नाही? त्यावेळी डालडा तूप वापरण्याविरुद्ध मोठा विचारप्रवाह होता. त्यावर गुरुजी त्यांना म्हणाले- तुमच्याप्रमाणेच डालडा तूप वापरू नये असे माझेही मत आहे. पण मी आदेश कसा देऊ? एक तर संघ असा आदेश वगैरे देत नाही. ती संघाची पद्धत नाही. आमच्याकडे त्यासाठी अधिकार (sanction) नाही आणि तशा पद्धतीने समाजाने चालावे असेही आम्हाला वाटत नाही. संघही तसा चालत नाही. थोडक्यात dominance, वर्चस्व, आदेश हा हिंदुंचाही गुण नाही आणि संघाचाही गुण नाही.
परंतु हा विषय वाटतो तितका सोपा नाही हेही खरे आहे. कारण हा आंतरिक परिवर्तनाचा विषय आहे. बाह्य परिवर्तन किंवा एकूणच बाह्य गोष्टी माणसाला जेवढ्या समजतात, रुचतात, पटतात, उलगडतात, भावतात तेवढ्या आंतरिक गोष्टी; समजत, रुचत, पटत, उलगडत, भावत नाहीत. मनुष्याची एकूण रचनाच तशी आहे. मात्र भारताचे आणि हिंदूंचे हेच वैशिष्ट्य आहे की, त्यांनी प्रयत्नपूर्वक आंतरिक विकासाचा प्रयत्न केला आहे आणि त्यात पुष्कळ अंशी यश मिळवले आहे. जणू हा आंतरिक विकास हाच हिंदुत्वाचा ध्यास आहे. हिंदुत्व बाह्य बाबी नाकारत नाही, बाह्य व्यवस्थापन फेटाळून लावत नाही. परंतु ते हळूहळू कमी होत होत पूर्णत: संपून जावे आणि मानवाचा बाह्य व्यवहार देखील आंतरिक व्यवस्थापनानेच चालावा अशी त्याची दिशा असते. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन, त्याची रचना, नियम, त्यांची लवचिकता या सगळ्यातच आंतरिक विकासाचा हा गाभा असतो. आंतरिक विकासाचे हे सूत्र या सगळ्या प्रयत्नातून गुंफलेले असते. मानवी जीवन हा जिवंत वाहता प्रवाह असल्याने कधी बाह्य तर कधी आंतरिक असे पदर प्रत्ययाला येत असतात. जसजसे हे आकलन वाढते तसतशी ही बाब स्पष्ट होत जाते.
या सूत्राची धारणा पुरेशी झालेली नसल्यानेच भारतात वा भारताबाहेर हिंदुत्व आणि त्याची व्यामिश्रता यांच्या बाबतीत अनेकदा गोंधळ उडतो. संघाच्याही बाबतीत असाच गोंधळ होतो. यातूनच पुष्कळ प्रश्न पुढे येतात. जसे भारतीय जनता पार्टी किंवा त्या पक्षाचे लोक आणि त्या पक्षाची सरकारे संघाच्या आदेशाने चालतात वा नाही हा विषय. भाजपा संघाच्या आदेशाने चालत असेल तर अनेक बाबतीत अंतर्विरोध का पाहायला मिळतो. भाजपा जर संघाची नाळ नाकारत नाही किंवा संघही भाजपाची नाळ नाकारत नाही तर त्यांच्यात विसंवाद का होतो? किंवा अगदी स्वयंसेवकांच्या मनात येणारे प्रश्न सुद्धा असतात. चार पाच दिवसांपूर्वी एक स्वयंसेवक बोलता बोलता म्हणाला- `संघाने पुष्कळ काम केले आहे पण अजूनही आपण आपल्याच स्वयंसेवकांना बदलू शकलेलो नाही. तसे नसते तर, मी केलेला आंतरजातीय विवाह संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या माझ्या वडिलांनीच स्वीकारू नये?' ही त्याची तक्रार नव्हती त्याचे दु:ख होते. कारण तो स्वयंसेवक होता. पण हाच मुद्दा संघाचे टीकाकार वा विरोधक तक्रार म्हणून वा संघाची त्रुटी म्हणून वा संघाचे अपयश म्हणून मांडतील. हा आमचे किंवा तुमचे असा वाद होईल एवढेच. मात्र मूळ मुद्दा बाजूला राहतो की, माणूस आदेशाने नव्हे तर आंतरिकतेने व्यवहार करतो. अन संघाचे काम ही आंतरिकता शुद्ध, प्रगल्भ, व्यापक, सखोल करणे हे आहे. हे प्रदीर्घ काळाचे काम आहे. कदाचित मानवी समाजाला नेहमीच गरज भासणारे. हे नीट ध्यानी घेतले की, संघ आणि संघाचे स्वयंसेवक; संघ आणि ज्या हिंदू समाजासाठी संघ काम करतो तो समाज, संघ आणि ज्या हिंदू भावाने संपूर्ण मानवजात भारून टाकण्याची मनिषा संघ बाळगतो ती मानवजात; यांचे परस्पर नाते, यांचे परस्पर संबंध, व्यवहारातील विस्कळीतपणा वा विसंवाद, तरीही तत्त्वांचे आग्रही प्रतिपादन; या साऱ्याचा उलगडा होत जातो.
संघाचे काम हे आवाहनाचे काम आहे, आव्हानाचे नाही. संघाचे काम निमंत्रणाचे आहे, नियंत्रणाचे नाही. ते आंतरिक परिवर्तनाचे आहे. या आंतरिक परिवर्तनात जोरजबरदस्ती चालत नाही. तो या परिवर्तनाचा मार्ग नाही. जीवनाच्या श्रेयसाची जाणीव करून देणे, विश्वातील उत्तम- उदात्त- उन्नत- भावांची, विचारांची, व्यवहारांची ओळख आणि जाणीव करून देतदेत, मनाला पटवून देतदेत पुढे जाण्याला हातभार लावणे; ही आहे हिंदूपद्धत. हीच आहे संघपद्धत. आकलनाला थोडी किचकट आणि गुंतागुंतीची खरी, पण पक्केपणाची खात्री असणारी !! म्हणूनच तर १७, १८, १९ जानेवारीच्या सरसंघचालकांच्या भाषणमालेचे शीर्षक आहे- `भविष्य का भारत : संघ का दृष्टीकोण'. हा दृष्टीकोन सगळ्यांनी समजून घ्यावा, action plan आपापला राबवावा. दृष्टीकोन ही आंतरिक बाब आहे. तो ठाकठीक करावा. कृती कार्यक्रम बाह्य बाब आहे. त्यात dominance असू नये. ही जी कठोर लवचिकता आहे तेच आहे हिंदूंचे आणि संघाचे वैशिष्ट्य. म्हणूनच नवी दिल्लीतील कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रण देण्यात संघाला गैरही काही वाटत नाही. बाकीच्यांनाही वाटू नये. आंतरिक परिवर्तन होईल त्या प्रमाणात बाकीच्यांचे हे वाटणेही गळून पडेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १५ सप्टेंबर २०१८