गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

अबोल क्रांती

अबोल क्रांती

आज १७ सप्टेंबर. एक महिना झाला. वंदनीय उषाकाकुंनी या जगाचा निरोप घेतला त्याला. १७ ऑगस्टला संध्याकाळी अहल्या मंदिराच्या खालच्या सभागृहात त्यांचं अंत्यदर्शन घेऊन बसलो होतो. सेविका विष्णू सहस्रनाम पाठ करीत होत्या. तेव्हाच मनात एक विचार आला. पण तो सगळ्यांशी शेअर करावा का? ते योग्य होईल का? असा प्रश्न सतावत होता. रा. स्व. संघ, रा. से. समिती, अन संबंधित संस्थांची विचाराची, व्यवहाराची एक विशिष्ट शैली आहे. त्यात माझा हा विचार अन त्याहीपेक्षा तो जाहीरपणे मांडणे बसेल का? मला वाटत नाही. त्यामुळे काही लोकांना ते कदाचित आवडणार नाही. परंतु मी संघाबाहेरही भरपूर काम केलं आहे अन वावरलो आहे. भरीस भर आजचं वातावरण. चालणाऱ्या चर्चा, मतमतांतरे. यामुळे आज पुन्हा तो विचार मनात आला आणि तो मांडावा असंही वाटलं. असा काय विचार होता?

दिवंगत उषाकाकू समितीच्या प्रमुख संचालिका तर होत्याच, पण एक गृहिणी होत्या. गृहिणी म्हटल्यानंतर जे चित्र उभे राहते तशाच त्या होत्या. पण त्यांना मुलबाळ नव्हतं. सामान्यपणे वापरला जाणारा बटबटीत शब्द वापरायचा तर त्या निपुत्रिक होत्या. शिवाय ऐन पन्नाशी ओलांडल्यावर बाबाकाका हे जग सोडून गेले होते. म्हणजे त्या सधवा नव्हत्या. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी त्यांचा विवाह होऊन गेला होता. यावरून त्यांचा काळ लक्षात यावा. त्यावेळची विचारपद्धती, समाज, समज, रूढी; अशा अनेक बाबी. तरीही उषाकाकूंनी समितीच्या माध्यमातून प्रचंड कार्य केले. प्रथम उत्तर प्रदेश सारख्या जुन्या विचारांना, परंपरांना चिकटून राहणाऱ्या प्रांतात आणि नंतर संपूर्ण देशभर. निपुत्रिक आणि विधवा हे दोन शब्द उच्चारल्यावर उभे होणारे चित्र आणि भाव फारसे चांगले नसतात. एक स्त्री या नात्याने व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून अनेक बाबींना तोंड द्यावं लागतं. एक कायमचं अपुरेपण, अपंगत्व, दु:ख, वेदना, विचित्र वागणूक; अशा अनेक बाबी. पण उषाकाकुंच्या बाबतीत हे सारे जणू लुप्त होऊन गेले होते. काय विलक्षण मन असेल त्यांचं. केवढी खंबीरता, केवढ धैर्य, केवढा समतोल !!! समाजात या दोन गोष्टींबाबत सामान्यपणे होणाऱ्या प्रतिक्रिया, त्याचे परिणाम आपण अनुभवत असतो. ते खोटे वा लहान असते असे मुळीच नाही. ते फार मोठे आणि तीव्र असते. अन म्हणूनच उषाकाकुंचे जीवन अधिक लक्षणीय ठरते. त्यांच्या निव्वळ असण्यातून त्यांनी आणि समितीने देशभरातील लाखो महिलांच्या आणि कुटुंबांच्या मनातील `निपुत्रिक आणि विधवा' याबाबतची काजळी पुसून टाकली. केवढे मोठे कार्य. केवढी अद्भुत अबोल क्रांती !!! ना उसासे, ना आक्रोश. ना समाजाचे ताडन, ना धर्मावर आघात. केवढी अचाट साधना. अनेकदा मला वाटतं- संघ, समितीच्या अशा हिमालयाएवढ्या कार्यकर्त्यांचा याही अंगांनी विचार व्हायला हवा. समाजापुढे यायला हवा. दुर्बलता तर असतेच. पण त्यासोबत अशी सबळ उदाहरणे, विशिष्ट perspective सह समाजासमोर यायला हवीत.

उषाकाकूंचा विचार करताना सहजच श्री सारदा मांचा विचारही मनात येतो. श्री सारदा मां म्हणजे श्री रामकृष्ण परमहंस यांच्या सहधर्मचारिणी. त्यांचं दाम्पत्य जीवन हा एक स्वतंत्र फार फार मोठा विषय आहे. त्याला स्पर्श करणंही कठीण. मात्र एका मर्यादेत विचार करायचा तर त्याही निपुत्रिक आणि विधवा. श्रीरामकृष्णांनी १८८६ साली देह ठेवला. तो काळ नजरेपुढे आणून पाहावा. त्यानंतर मां १९२० पर्यंत हयात होत्या. त्यांना सगळ्या शिष्यांनी, रामकृष्ण संघाने गुरुपदी विराजमान केलं होतं. अतिशय आदर, श्रद्धा, सांभाळ आणि स्वीकार सगळ्यांनी केला.

सगळ्या मतमतांतरात या स्मृतीही असाव्यात.

- श्रीपाद कोठे

नागपूर

रविवार, १७ सप्टेंबर २०१७