शनिवार, ३० एप्रिल, २०२२

विदेशी अहवाल

जगभरातल्या कोणकोणत्या संस्था भारताबद्दल कसले कसले अहवाल तयार करीत असतात कोणास ठाऊक. इथल्या धार्मिक, सामाजिक स्थितीवर अहवाल; येथील कंपन्यांवर अहवाल; येथील लोक किती आनंदात राहतात यावर अहवाल... सतराशे साठ अहवाल. एक ना धड भाराभर चिंध्या, अशी स्थिती. दोन गोष्टी करायला हव्यात-

१) हे अहवाल पूर्णपणे दृष्टीआड करणे/ दुर्लक्षित करणे.

२) आम्ही हे अहवाल वगैरे मानीत नाही, हे अधिकृतपणे ठणकावून सांगणे.

- श्रीपाद कोठे

१ मे २०१५

तृष्णा

आजकाल भगवान बुद्ध हे एक status symbol अन icon झाले आहेत. त्यांचे अनुयायी असलेले वा नसलेले, संवेदनशील असणारे कलाकार- विचारवंत, सामाजिक जाणीवा असणारे लोक, एवढेच नाही तर दिवाणखान्याला शोभा येते म्हणून त्यांची मूर्ती वा तसबिरी लावणारेही; बुद्धाबद्दल, त्यांच्या जीवनातील प्रसंगांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल. त्यांच्या सुविचारांबद्दल, त्यांच्या मार्गाबद्दल बोलत असतात. पण एक जाणवते, त्यातील एखादा अपवाद सोडला तर किती जणांना त्यांच्या मूळ चिंतनाबद्दल आस्था असते. भगवान बुद्ध म्हणत- तृष्णा हीच सगळ्या अनर्थाचे, अशांतीचे, संघर्षाचे मूळ होय. त्यामुळे तृष्णा टाकून द्यायला हवी. त्यांचे नाव घेणाऱ्यांमध्ये, त्यांचा हा विचार किमान पटणारे तरी किती असतील.

एक गंमत- एकदा रेल्वेने नागपूरला परतत असताना वर्धेहून काही मुले मुली डब्यात चढली. त्यातील एक मुलगी माझ्या शेजारच्या जागेवर येऊन बसली. बोलघेवडी होती. त्यावरून कळले ती बौद्ध आहे. तिचे नाव होते- तृष्णा. अन यावर तिनेच टिप्पणीही केली होती, तृष्णा सर्व अशांतीचे मूळ कारण आहे, अशी.

आता बोला...

- श्रीपाद कोठे

१ मे २०१६

पाणी व्यवसाय

पाणी हा एक मोठा विषय आहे. निवडणुकीपेक्षाही खूप मोठा. पण त्याच्याकडे लक्ष मात्र अत्यल्प असतं. पाण्याच्या अनुषंगाने दोन सूचना-

१) पाणी व्यवसायावर पूर्ण बंदी. व्यक्ती, उद्योग, संस्था, सरकार कोणीही पाण्याचा व्यवसाय करू शकणार नाही अशी बंदी.

२) जानेवारी ते जून असे सहा महिने शीतपेय निर्मितीवर पूर्ण बंदी.

या दोन उपायांनी पाणी समस्येच्या संदर्भात मोठी मदत होऊ शकेल.

- श्रीपाद कोठे

१ मे २०१९

प्रतिके

मनात जन्म घेणाऱ्या ईश्वराला व्यक्त करण्याच्या प्रयत्नात त्याला कोणत्या ना कोणत्या प्रतिकात (मूर्ती, माणूस, पुस्तक, शब्द, भाव, वस्तू, वास्तू किंवा आणखीन काही) बांधले जाते. पुढे ते प्रतीकच ईश्वर ठरते. त्याही पुढे त्या प्रतिकाशिवाय दुसरे काही ईश्वर नाही अशी धारणा जन्म घेते. इथून पंथवेडाला सुरुवात होते. उदात्तता आणि उत्कटतेच्या आवरणात भक्ती माणसाला खुजे करते. परिणामी व्यक्ती आणि समाज दोघांचेही नुकसान होते. असे होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रतिकाच्या मर्यादेच्या ज्ञानाची जाणीव करून द्यावी लागते. ज्ञान आणि भक्ती यांच्या आंतरिक देवाणघेवाणीतून सार्थक प्रवास होतो.
******************
काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष केला. देश जागा केला, एक केला. देशाच्या पुरुषार्थाचे ती प्रतीक ठरली. पण या प्रतिकालाच देश, देशभक्ती इत्यादी ठरवण्याचा प्रयत्न झाला. देशभक्तीच्या प्रतिकाची मर्यादा दुर्लक्षित केली गेली. काँग्रेस आणि देश त्याचे परिणाम भोगतो आहे.
******************
अनेकांना आवडणार नाही पण सध्या हिंदुत्वाला प्रतिकांशी, पक्षाशी बांधण्याचा प्रयत्न होतो आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील.

- श्रीपाद कोठे
१ मे २०१९

शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

स्मारक दत्तोपंतांचे

श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथल्या पैतृक घराच्या संबंधाने एक टिपण आज वृत्तपत्रात वाचायला मिळाले. हे घर राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी इच्छा त्यात व्यक्त करण्यात आली आहे. हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याला पाठींबा सुद्धा मिळू शकतो. मला मात्र असे वाटते की- त्या घराचे राष्ट्रीय स्मारक होऊ नये. असे राष्ट्रीय स्मारक स्वत: स्व. दत्तोपंतजी आणि भारतीय चिंतन परंपरा यांच्याशी विसंगत ठरेल. स्मारके, आठवणी, इतिहास इत्यादी विषयीची त्यांची आणि भारतीय चिंतन परंपरेची दृष्टी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवी. कर्म, पुनर्जन्म, मुक्ती इत्यादी बाबींचाही त्यासोबत समग्रतेने विचार व्हायला हवा. आज आपण अंतर्बाह्य अपार अभारतीयतेने वेढून गेलेलो आहोत. त्यामुळे हा विचार चुकीचा वा विक्षिप्त वाटू शकेल. परंतु योग्य विचार करू शकणाऱ्या लोकांनी यावर मंथन करायला हवे.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०१७

मुलामुलींचे प्रमाण

एका जुन्याच विषयाचा एक संदर्भ आज पुन्हा वाचण्यात आला. तो म्हणजे- मुलांच्या तुलनेत मुलींची कमी होणारी संख्या. महाराष्ट्रात तर हे प्रमाण एक हजार मुलांमागे ९०० मुली असे आहे असे म्हणतात. या विषयावर चर्चा, आवाहने नेहमीच होत असतात. परंतु नेहमीप्रमाणेच ती उथळही असतात. `स्व' बाजूला ठेवून गांभीर्याने विचार करणाऱ्यांसाठी या संदर्भात काही मुद्दे मांडावेसे वाटतात.

१) हजार मुलांमागे ९०० मुली याचा अर्थ हे प्रमाण १० टक्के कमी.

२) याचा सरळ सरळ अर्थ असा की, १० टक्के मुलांना अधिकृतपणे अविवाहित ठेवणे भाग आहे.

३) १० टक्के मुलांना शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, भावनिक गरजांपासून जबरदस्तीने दूर ठेवण्याचे परिणाम चांगले होतील का?

४) समाजाचा विचार तूर्त थोडा बाजूला ठेवला तरीही १० टक्के पुरुषांना त्यांच्या स्वाभाविक विकासापासून हे दूर ठेवणे नव्हे का?

५) स्त्री पुरुष लोकसंख्येचे प्रमाण सारखे होऊ शकेल का?

६) तसे होईपर्यंत काय?

७) यावर काय उपाय असू शकतो?

८) monogamy हा सामाजिक, नैतिक, धार्मिक, आध्यात्मिक आदर्श म्हणून प्रस्थापित करून त्याची जोपासना करावी. मात्र कायद्याने polygamy ला अवैध ठरवू नये.

९) समाजात दोन्हीला मान्यता असावी. जबाबदारीची पद्धती निश्चित व्हावी.

१०) तसेही समाज हा व्यामिश्र असतो. एखादी व्यक्ती लग्न, कुटुंब इत्यादीपासून दूर राहू शकते. शारीरिक आदी गरजा बाजूला सारून सार्थक आयुष्य जगू शकते. तसेच काहींच्या या गरजा वेगळ्याही असू शकतात. हे स्त्री व पुरुष दोघांनाही लागू आहे.

११) कायद्याने या विविध वृत्तींना मोकळीक दिली तर त्यातून स्वाभाविक सामाजिक संतुलन साधले जाऊ शकते.

१२) आज कमी असलेली मुलींची संख्या किंवा यावरील उपायांचा परिणाम होऊन २५-५० वर्षांनी कदाचित वाढू शकणारा मुलींचा समाजातील टक्का (किंवा मुलांचाही) यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या त्यामुळे कमी होऊ शकतील.

१३) सगळ्यांसाठी धरूनबांधून सगळ्या समान गोष्टी ही अभारतीय पद्धती आहे. शिवाजी वा श्रीकृष्ण यांनी अधिक लग्न केले म्हणून भारताने त्यांना तिरस्कृत केले नाही. अन अधिक लग्न करूनही द्रौपदीला प्रात:स्मरणीय दर्जा दिला.

१४) विविध वृत्तीप्रवृत्तींना सामावून घेत स्वाभाविक सामाजिक संतुलन साधणे, या भारतीय मार्गाचा सखोल विचार आवश्यक आहे.

१५) उपासना मार्गांच्या बाबतीतच नव्हे तर सामाजिक व्यवस्था, रीतीरिवाज यांच्या बाबतीत सुद्धा भारत सदैव सहिष्णू आणि उदार राहिला आहे. त्याची व्यवस्थित मांडणी भारतासाठी अन जगासाठीही आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०१७

भाग्ययोग

एचएमव्हीने प्रभा अत्रेंची मारुबिहाग व कलावती अशी रेकॉर्ड काढली होती. नंतर आलेल्या कॅसेटच्या काळातही ते कॉम्बिनेशन होतेच. आज मारुबिहाग ऐकला आणि कलावतीची एक आठवण जागी झाली. आनंदाचा खजिना म्हणा, समाधानाचे आणि अहंकार वाढवण्याइतके अभिमानाचे क्षण म्हणा की, कुठल्या तरी अनभिज्ञ पुण्याचे फळ म्हणा; असे काही क्षण, प्रसंग आयुष्यात येतात. राग कलावतीचा अनुभव तसाच. संघ शिक्षा वर्गाच्या द्वितीय वर्षात शिक्षार्थी होतो. धरमपेठ विज्ञान महाविद्यालयात. रात्रीची जेवणानंतरची निवांत वेळ. गीत अभ्यासासाठी बौद्धिक कक्षात गेलो. मा. मोहनजींनी (प्रांत प्रचारक) गीताचा अभ्यास घेतला. आणखीन एक दोघे होते. अभ्यास आटोपल्यावर सहज गुणगुणत कलावती सुरू झाला आणि मा. मोहनजींनी प्रभाताईंचा कलावती 'तन मन धन तोपे वारू' पूर्ण जसाच्या तसा... ना पेटी तबला तंबोरा काहीही. निव्वळ अप्रतिम. परमेश्वराने केवढी मोठी मैफिल नियोजित करून ठेवली होती माझ्यासाठी. कोणालाही हेवा वाटावा अशी. कर्तृत्वशून्य भाग्ययोग. दुसरं काय?

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०१९

कृतिशीलता

मानवी प्रयत्न, मानवी बुद्धिमत्ता, मानवी नियोजन, अपार धन, सांघिक प्रयत्न; अशा सगळ्या दीर्घ काळ चाललेल्या गोष्टींना अंगठा दाखवून; निसर्ग स्वतः स्वतःचे नुकसान भरून काढतो आहे. शहराशहरातील वायूप्रदूषण कमी झाले, दर्शनीय शक्ती (visibility) वाढली, नद्या स्वच्छ झाल्या, ओझोनचे छिद्र भरले. मानवी कृतीशीलता वाढवण्याने निसर्ग आणि मानवी स्वास्थ्य यांची हानी होत असेल तर, कुठल्यातरी अगम्य कारणांसाठी मानवी कृतीशीलता सतत वाढवत नेण्याच्या वृत्तीचा, तत्वज्ञानाचा, प्रयत्नांचा; फेरविचार करून त्या कृतीशीलतेला आळा घालायला नको का?

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२०

अर्थक्रांती

सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी समृद्ध लोकांवर अधिक कर लावण्याचा एक प्रस्ताव प्रत्यक्ष कर मंडळाकडे देण्यात आल्याचे वृत्त आहे. वर्षाला एक कोटी रुपयांचे उत्पन्न असलेल्या लोकांचा super rich असा उल्लेख त्यात आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कर लावावा अशी सूचना करण्यात आली आहे. त्याचा काय तो निर्णय होईलच. माझी सूचना अशी की - राहते घर आणि २५ कोटी रुपये याच्या वरील सगळी व्यक्तिगत संपत्ती सरकारची करून घ्यावी. पुन्हा एकदा सुरळीत कारभार सुरू झाल्यावर पुन्हा हे लोक पैसा कमवू शकतीलच. यात संपत्तीचा अधिकार सुरक्षित राहीलच फक्त तो तात्पुरता मर्यादित केला जाईल. तसेही बहुतेक सगळेच अधिकार परिस्थिती सापेक्षच असतात. संपत्तीचा अधिकारही तसाच आहे. ही सूचना थोडी कठोर वाटेल. पण सध्याची परिस्थिती आणि मानवीयता यांचा विचार करून तसा काही विचार करायला हरकत नसावी.


- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२०


मला आपली सूचना फारशी पटत नाही कारण सगळेच श्रीमंत 420गीरी करत मोठे होत नाहीत. अनेक जण त्यांच्या मेहनतीने आणि स्किलने मोठे होतात. अशा लोकांना उत्तम काम करण्याची उत्तेजनाच राहणार नाही..


Yuvraj Tare सूचना न पटणे ok. पण त्यांनी ४२० गिरी करून पैसा कमावला अन म्हणून तो घ्यावा असं म्हटलेलं नाही अन अभिप्रेतही नाही. परिस्थिती आणि मानवता यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. अन संपत्ती ही एका मर्यादेतपर्यंतच व्यक्तिगत मालकीची असावी. एखाद्याने कितीही स्वतःच्या कष्टाने अन बुद्धीने संपत्ती कमावली तरी, त्याचे विश्लेषण केले तर, त्यात अनेकांचा सहभाग असल्याचे सहज लक्षात येते. तसेही श्रमिकांना समान अधिकार, श्रम आणि भांडवल यांचे समान मूल्य; या गोष्टी आपण अजून कुठे स्वीकारल्या आहेत? शिवाय अभिनेते, अभिनेत्री, राजकारणी यांच्या अब्जावधींच्या संपत्तीला तुम्ही म्हणता ते निकष लावता येत नाहीच.


Shripad Kothe समजा एक व्यक्ती विशिष्ट निर्मिती कारखाना, सेवा क्षेत्रात व्यवसाय चालवत आहे आणि वर्षाला  एक दोन कोटींचे इन्कम आहे आणि त्याची संपत्ती साधारण 20 ते 25 कोटींच्या घरात आहे तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला व्यवसाय वृद्धी करण्याची इच्छाच राहणार नाही. सगळेच नाही पण बहुतांश व्यावसायिक स्वतःच्या संपत्ती निर्माणसाठीच व्यवसाय वृद्धी आणि व्यावहारिक सचोटी मेंटेन करत असतात. मी व्यवसायाने फायनान्शियल प्लॅनर आहे त्यामुळे Money Motivates the Most.. असा माझा अनुभव आहे. जर माझी संपत्तीच माझी राहणार नसेल तर मी मेहेनत कोणासाठी करू? माझ्या संपत्तीतून किंवा कमाईतून  काही भाग समाजकार्यासाठी देणं वेगळं आणि बळजबरीने तो हिसकावून घेणं वेगळं... यातून अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसेल, म्हणून हे व्यवहार्य नाही..


Yuvraj Tare पैसा ही एक प्रेरणा असते यावर दुमत होऊच शकत नाही. पण ती एकमेव असते असेही नाही. ती एकमेव असावी असेही नाही. दुसरे म्हणजे संपत्ती बाळगण्याची वरची मर्यादा जर असेल तर एखादी व्यक्ती तिथवर नक्की प्रयत्न करू शकेल, करेल. त्यापलीकडे नाही करणार. त्याने काय फरक पडेल? एका अंबानी ऐवजी काही हजार संपन्न लोक निर्माण होतील. कारण अमुक मर्यादेपलीकडे जर काही प्राप्त होणार नाही तर जी पोकळी राहील ती कोणीतरी भरेलच. मानवी जगण्याच्या गरजेतून होणारा तो सार्वत्रिक विकास राहील. आजच्यासारखा एकांगी आणि अनर्थकारी विकास राहणार नाही. फार तर अमुक मर्यादेहून जास्त कमावता येत नाही हा चडफडात होऊ शकेल काही लोकांचा. पण जीवन म्हणजे केवळ पैसा असा विचार करणाऱ्यांचा तो प्रश्न आहे. त्याची फिकीर केलीच पाहिजे असे नाही. पैसा हेच जीवन असं समजणाऱ्या आजच्या अर्थविचारा ऐवजी जीवनासाठी पैसा असा अर्थविचार करण्याची गरज आहे. आजच्या आर्थिक प्रश्नांची उत्तरेही त्यातच आहेत.


Shripad Kothe एक अंबानी बुडल्याने 60 लाख शेअर होल्डर पण बुडतील. हे सर्व शेअर होल्डर्स करोडपती नाहीत. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही म्हण इथे सुद्धा वेगळ्या अंगाने लागू पडते. इथे टाटांसारखे उद्योगपती सुद्धा आहेत. अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर उत्पादन व सेवा पुरवतात यांचे सुद्धा काही अधिकारी कोट्यावधी चे पॅकेज घेतात. दुसरं म्हणजे उद्योग करणाऱ्यां अनेकांची संपत्ती ही आभासी (Notional) असते. ती  त्यांच्या उद्योगाच्या तात्कालिक स्थिती आणि शेअर बाजारातील उतार चढवांवर अवलंबून असते.. खरं तर तुम्ही जे म्हणत आहात ते कम्युनिस्ट अर्थव्यवस्थेचे मत आहे परंतु तिथेही ते लागू पडले नाही याचं उदाहरण चिनी अर्थव्यवस्था सुद्धा भांडवलवादीच आहे. पैसा ही एकमात्र प्रेरणा नाही असे आपले मत आहे परंतु दुर्दैवाने आपल्या अर्थचक्राच्या दृष्टीने तसेच आहे. सद्यस्थितीत अर्थव्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची आणि परस्परावलंबी आहे. आपण म्हणत आहात ती कदाचित आदर्श अर्थव्यवस्थेची लक्षणे असू शकतात पण सद्य स्थितीत व्यवहार्य नाही.. 


Yuvraj Tare मी आदर्श रुजवणारा माणूस आहे. कदाचित लाख वर्षांनी तसे होईल. मला फिकीरही नाही अन घाईही नाही. मी कम्युनिस्ट, भांडवलशाही, हिंदुत्व किंवा कोणत्याही head खाली वा लेबल लावून विचार करतच नाही. मी जीवनाचा मूलभूत विचार करतो आणि मांडतो. माझे कोणतेही आग्रह नाहीत. मी माणसाचा आणि समाजाचा विवेक जगवण्याचं काम तेवढं करतो. ही माझी मर्यादा मी घालून घेतलेली आहे. समाज समाजाचे पाहील. टीचभर आयुष्यात अमुक काही करून दाखवण्याची स्वप्ने वगैरे मी पाहतच नाही. मी फक्त माळरानावर बिया विखरून देतो.

कोरोनानंतर

कोरोनानंतरचे जग वेगळे राहील हे तर आता खूप बोलून झालं आहे. नवीन व्यवस्था स्वीकारावी लागेल हा विचारही मांडला जातो आहे. पण म्हणजे नेमके काय याची चर्चा हे पुढचे पाऊल ठरावे. हा पुढचा विचार करताना, आवश्यक आणि अनावश्यक अशी मांडणी करावी लागेल. काय धरून ठेवायचे, काय सोडून द्यायचे, कशात बदल करायचे, नवीन काय करावे लागेल; अशी सगळी चर्चा सिद्धांत, विचार, कल्पना, सूचना, व्यवहार; अशा सगळ्या अंगांनी करावी लागेल. आजवर जीवनाचा भाग असलेल्या पुष्कळशा गोष्टी सोडून द्याव्या लागतील. हे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पांथिक, वैज्ञानिक, मनोरंजन अशा सगळ्या क्षेत्रांना लागू होईल. उदाहरण म्हणून - मंगळाच्या, बुधाच्या, सूर्याच्या, चंद्राच्या मोहिमा. संरक्षण, स्वाभिमान, achievement, सन्मान, श्रेष्ठत्व या पलीकडे जाऊन त्या मोहिमांचे विश्लेषण करावे लागेल. सगळे ग्रहतारे आपल्या मुठीत घेण्याला अपार प्रतिष्ठा देऊन त्यासाठी चढाओढ आणि कुरघोड्या करणे; त्यासाठी वैज्ञानिक गुन्हेगारीचा उपयोग करणे; या साऱ्याचेच वैय्यर्थ तपासावे लागतील. कोणाला तरी पुढाकार घेऊन यातील फोलपणा सांगावाच लागेल. माणसाला केवळ त्याच्या धार्मिक श्रद्धाच नव्हे तर जीवनाच्या सगळ्या अंगांशी संबंधित श्रद्धा आणि धारणांची कठोर चिकित्सा करावी लागेल. पेटंटसारख्या छोट्याछोट्या विषयांचा जीवनानुवर्ती विचार करावा लागेल. व्यावसायिक फायदे आणि अधिराज्य गाजवण्याची स्वप्ने यातून जगाला बाहेर काढण्याचा मोठा प्रयत्न माणसाला करावा लागणार आहे.

नवीन जगाची चर्चा करताना, प्राप्त परिस्थितीचा संधी म्हणून कसा उपयोग करता येईल; असाच साधारण सूर असतो. यावर गांभीर्याने विचार करावा लागेल. संकटात संधीचा शोध ही कल्पना योग्य आहे का याचा खोलवर विचार आवश्यक आहे. भावी मानवी जीवनाच्या वाटचालीची मार्गदर्शक तत्वे - सर्वेपि सुखीन: सन्तु, एकमेका साह्य करू, वसुधैव कुटुंबकम अशी राहतील की; स्पर्धा, बळी तो कान पिळी, जीसकी लाठी उसकी भैस; ही राहतील? कधी नव्हे तो आज माणूस हे सारे समजून घेण्याच्या मनस्थितीत येतो आहे. जागतिक मानवी मनाला त्या दिशेने पुढे नेण्याचे काम विचारवंत, तत्वज्ञ, policy makers, decision makers, जनमन घडवणारे सगळे घटक यांना करावे लागणार आहे. याशिवाय जे काही केले जाईल ते अप्रामाणिक वा निरर्थक ठरेल. आजच्या परिस्थितीचे हे मोठे आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे

गुरुवार, ३० एप्रिल २०२०

गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

अनुमान आणि निष्कर्ष

आंबे विकणारे दिसले आणि बाईक बाजूला घेतली, तर आंबे विकणाऱ्या त्या ३-४ जणांनी वेढून घेतलं. ये आम लो, ये आम मिठा है, काट के दिखाऊ क्या, पहले खा के देखो बाद मे लेने का... एकच गलका सगळ्यांचा. गाडी उभी सुद्धा केली नव्हती. मग तसाच गाडीवर बसून त्यांना म्हटलं- `मुझे देखने दोगे या नही? जो पसंद आयेगा ले लुंगा. पहले देखने तो दो.' मग शांत झाले. मनात ठरवलंच होतं, इथून आंबे घ्यायचे नाहीत. असा कलकलाट करणाऱ्या आणि माझं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या आंबे विक्रेत्यांना हीच शिक्षा. (केवढा मोठा पराक्रम ना?) उगीच एक-दोन आंबे उचलून पाहिले. वास वगैरे घेऊन पाहिला. म्हटलं, पसंद नही है. पुढे निघालो.

माझी प्रतिक्रिया- काय हे आंबेवाले? तुटून पडतात अगदी. सुचू देत नाहीत.

पुढे एक जण दुकान थाटून बसलेला. आंबे चांगले वाटले. बाईक थांबवली, उभी केली. आंब्याच्या चार-पाच जाती होत्या. आंबेही चांगले. दुकानदाराला विचारलं- काय भाव आहे? तो आपल्याच तालात मग्न. आंबे हातात घेऊन पाहिले. रस होईल की चिरून खावे लागतील याचा अंदाज घेतला. पुन्हा विचारलं- काय भाव दिले आंबे? दुकानदाराने काहीतरी चुळबुळ केली फक्त. आंब्यांचा वास वगैरे घेऊन पाहिला. काही क्षण असेच गेले. चिडून गेलो. म्हटलं, `अरे भैय्या आम बेचना नही है क्या? मै कब से पुछ रहा हुं और आप है की जवाब ही नही दे रहे.' अखेर त्याला कंठ फुटला, `बोलो क्या चाहिये?' माझे उत्तर, `आम के दुकान मे आम ही लुंगा ना?' दुकानदार- `हां. कौनसा दू? कितना दू?' तिथे माझा संयम संपला. मनात म्हटलं, अरे बाबा पहले भाव बिव सांगशील की नाही? पण काहीही बोललो नाही. वळलो, गाडी काढली, मार्गाला लागलो. अपेक्षेप्रमाणेच तो काहीही म्हणाला नाही.

माझी प्रतिक्रिया- काय आंबेवाले असतात? धड बोलत सुद्धा नाहीत गिऱ्हाईकांशी.

सहज मनात विचार आला. एक जण असा, एक जण तसा; पण मी मात्र हे आंबेवाले म्हणून सगळ्यांना एकाच मापाने मोजतो. वास्तविक त्यांचा व्यवसाय फक्त सारखा. स्वभाव मात्र त्यांचे त्यांचे स्वत:चे. एखादा व्यवस्थित बोलणारा पण अंगावर न येणारा असा मध्यममार्गी आंबे विक्रेताही असू शकेलच. पण मी मात्र माझा एक अनुभव सगळ्या आंबेवाल्यांसाठी लागू करतो.

बाकी ठिकाणीही आपण बहुतेक असेच करतो आणि आपला अनुमान आणि निष्कर्षाचा खेळ सुरु असतो. एक-दोन अनुभव आले की लगेच, आपला समाज असा आहे तसा आहे इत्यादी. सवयी, स्वभाव, गुण वगैरे समाजाचे कसे असतील? मध्यंतरी वृत्तपत्रात एक लेख वाचत होतो. महिलाविषयक होता. लेखिकेने  लिहिले होते- युरोपात महिलांनी मतदानाचा हक्क प्राप्त करण्यासाठी मोठा लढा दिला. आपल्या देशात तसा लढा द्यावा लागला नाही आणि लेखिकेची गाडी लगेच घसरली `आपला पुरुषप्रधान समाज'वर. म्हणजे काहीही चांगले होवो वाईट होवो, पुरुषप्रधान समाज म्हणून थोडी बोटे मोडलीच पाहिजेत. उदाहरणांची अशी जंत्री भरपूर देता येईल. मुद्दा एवढाच की एखाद्या गोष्टीचे सार्वत्रिकीकरण करून निष्कर्ष काढताना तारतम्य बाळगायला पाहिजे. सरधोपटपणे असे करता येत नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, २९ एप्रिल २०१४

समतेच्या नावानं चांगभलं

'समतेला माझा विरोध का?' या २२ एप्रिलच्या माझ्या लेखावर पुष्कळ वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. या प्रतिक्रियांमुळे माझी भूमिका स्पष्ट करण्याची पुन्हा संधी मिळाली. त्यासाठी प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. जी टीका करण्यात आली वा आक्षेप नोंदवण्यात आले त्यातील तीन प्रमुख आहेत. १) समता व समानता या दोन भिन्न बाबी आहेत. २) विकासासाठी संधींची समानता आवश्यक. ३) निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता यांची तुलना अयोग्य आहे.

या तिन्हीतील कुठलाच मुद्दा नवीन नाही. वरवर पाहता बिनतोडही आहे. मात्र थोडा खोलवर विचार केला तर त्यातील फोलपणा लक्षात येईल. समता आणि समानता या दोन भिन्न बाबी आहेत हे म्हणणे ठीक, पण त्यातील नेमका फरक सांगणे अवघड आहे. समता ही मनातील एक उच्च भावना आहे, पण त्याचे व्यवहारातील रूप कसे असेल? प्रेम ही जशी लक्षणांवरून जाणावयाची गोष्ट आहे, तशीच समता ही लक्षणांवरून जाणावयाची बाब आहे. अन ही लक्षणे समानतेच्या अधिकाधिक जवळ जाणारीच असावी लागतील. समुद्र आणि त्याच्या लाटा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत पण स्वतंत्र नाहीत. त्या अन्योन्याश्रयी आहेत. समुद्राशिवाय लाटा नाहीत आणि लाटांशिवाय समुद्र नाही. त्या केवळ भिन्न अवस्था आहेत. तसेच समता आणि समानता यांचे आहे. मनातील समता व्यवहारात येताना समानतेच्या रूपानेच येऊ शकते.

याच्याशीच संबंधित मुद्दा म्हणजे, निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता. निसर्गदत्त विषमता कोणीही नाकारत नाही. नाकारू शकत नाही. पण मानवनिर्मित विषमता मोडून काढण्याची चर्चा होते. प्रश्न असा आहे की, ही मानवनिर्मित विषमता येते कोठून? तिचे मूळ कोठे आहे? तिचे मूळ निसर्गदत्त विषमतेतच आहे याचा विसर पडतो. एखादी व्यक्ती स्वार्थी वा दुष्ट असते आणि ती शोषण, हिंसा वा अन्य तशा प्रकारच्या गोष्टी करते. पण स्वार्थी अथवा नि:स्वार्थी, दुष्ट अथवा सुष्ट हे भेद, ही विषमता निसर्गदत्त नाही का? निसर्गदत्त विषमता ही रूप, गुण, बुद्धी, परिस्थिती, वृत्ती, स्वभाव; अशा सगळ्याच प्रकारची असते. मानवी विषमता त्यातूनच जन्मास येते. अन ही निसर्गदत्त विषमता मिटवण्याचा रामबाण उपाय आज तरी माणसाकडे नाही. दुष्टाला सुष्ट करण्याची काय प्रक्रिया आहे? शिक्षण, संस्कार, विपश्यना वगैरे सारख्या पद्धती खरेच या जगातील सगळी कटुता, कृपणता, क्रूरता वगैरे घालवू शकतात? बरे आज एक कोटी दुष्टांना सुष्ट केले तरी उद्या तसेच तयार होतीलच ना? रोज लाखो बालके स्वत:चा पिंड घेऊन जन्माला येत असतात. शिवाय जगात घडणाऱ्या घटनांच्या क्रियाप्रतिक्रियातून माणसांचे वर्तन, विचार घडत, बिघडत असतात. पैसा, साधने, तंत्रज्ञान, माणसे यांचे कमीअधिक प्रवाह गरजेनुसार वाहत असतात. तेव्हा निसर्गदत्त विषमता आणि मानवनिर्मित विषमता या दोन गोष्टी नसून, एकीतूनच दुसरी जन्म घेते, हे समजून घेणे गरजेचे आहे.

तिसरा मुद्दा आहे- विकासासाठी संधींची समानता. हा तर फारच तकलादू आहे. यातून जंगलचा न्यायच उत्पन्न होण्याची शक्यता आहे आणि आज तेच पाहायला मिळत आहे. गॅट किंवा डंकेल प्रस्ताव आणि संपूर्ण जागतिकीकरणाची प्रक्रिया याच युक्तिवादावर आधारित होती. आज मात्र विपरीत चित्रच पाहायला मिळते. अगदी साधी गोष्ट आहे- रिलायन्स आणि खेडेगावातील एखादा दरिद्री शेतकरी यांना समान संधी आहे. पण रिलायन्स भाजी विकण्याचा दरिद्री शेतकऱ्याचा व्यवसाय करू शकते, पण दरिद्री शेतकरी रिलायन्स उभे नाही करू शकत. उलट यातून विनाश होतो तो दरिद्री शेतकऱ्याचाच. कायदे वगैरेची चर्चा न केलेलीच बरी. न्याय मागण्याची समान संधी असतानाही आज त्या संदर्भात काय स्थिती आहे? खरे तर सत्ता गाजवणे, कोणापेक्षा तरी वरचढ होणे, जग मुठीत बाळगणे, सर्वशक्तिमान होणे, वगैरे वगैरे असंख्य नावांनी मानवाच्या मनात अंगभूत असलेल्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरीपुंचा पुरता बंदोबस्त होईपर्यंत संधींच्या समानतेतून चांगलेच उत्पन्न होईल ही आशा करणे भाबडेपणाचे आहे. देण्यात आलेली संधी प्रत्येक जण उदार, विशाल मनाने आणि सद्वृत्तीने वापरेल याचा काय भरवसा? उलट तसे न होण्याचीच शक्यता अधिक. संधी मिळायचा अवकाश की मनातील स्वार्थ, सत्तालालसा उफाळून आल्याच म्हणून समजा. मुख्य म्हणजे स्वत: पुढे जाण्यासाठी दुसऱ्याला मागे ढकलणे, दुसऱ्याचे पाय खेचणे किंवा दुसऱ्याचे अहित करणे यात काय वावगे आहे, या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत संधींची समानता काय आणि किती साध्य करू शकेल?

मग उपाय काय? उपाय आहे- माणसापुढे जगण्याचे व्यापक प्रयोजन ठेवणे. जगणे म्हणजे पैसा, वस्तू, साधने यांचा संग्रह वाढवीत जाणे नाही आणि जगणे म्हणजे जगवणे, ही व्यापक दृष्टी रुजवीत जाण्याची नितांत गरज आहे. मला पुढे जायचे आहे, मला अमुक मिळवायचे आहे, याच्यावर मात करायची आहे, त्याच्यावर मात करायची आहे (याच्यावर, त्याच्यावरमध्ये निसर्गही आला), याच्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे वगैरे चुकीची प्रयोजने काढून टाकण्याची गरज आहे. संपूर्ण जीवनदृष्टीच बदलावी लागेल. ही जीवनदृष्टी बदलली की समता वगैरे आपोआपच साध्य होईल आणि मानव त्याहूनही खूप पुढे निघून जाईल. समतेसाठी आटापिटा करून ती साध्य होणार नाही आणि विपरीत परिणाम करेल. कारण माणसाच्या मनात आमुलाग्र बदल करण्याची, त्याच्या मनात उच्चतर भावांची प्रेरणा देण्याची शक्ती त्यात नाही. उच्चतर आदर्शांच्या साधनेने, रुजवणुकीनेच काही तरी मार्ग निघू शकेल. अर्थात- संपूर्ण गीता सांगितल्यावरही तुझा निर्णय तू घे असे सांगणाऱ्या पार्थसारथ्याची परंपरा मी सांगतो. त्यामुळे माझे म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह नाही. प्रत्येकाचा आपापला विचार असावा.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २९ एप्रिल २०१५

इतिहास दृष्टी

सगळ्यांच्या विचारार्थ एक मुद्दा ठेवावासा वाटतो-

इतिहास, इतिहासात रमणे, इतिहासाच्या आधारे श्रेष्ठत्व सिद्ध करणे, इतिहासाच्या आधारे मालकीचे दावे करणे, इतिहासाच्या आधारे अनेक गोष्टी सिद्ध करण्याचा प्रयत्न; या सगळ्या बाबी इंग्रजांची अन पाश्चात्य विचारांची देणगी आहे. मूळ भारतीय विचारपरंपरा अन जीवन दृष्टी अशी नाही. त्यामुळे प्रचलित काळ प्रवाहासोबत चालण्यासाठी त्या पद्धतीचा उपयोग अपरिहार्यता म्हणून करतानाच, त्यात न अडकता त्यातून बाहेर पडणे आणि जगालाही त्यातून बाहेर काढणे आवश्यक वाटते. खूप सर्वस्पर्शी पद्धतीने याकडे पाहता येईल. सगळ्यांनी विचार करावा असे वाटते.

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०१६

मुळाशी पोहोचावे

श्रीलंकेतील घडामोडींनी मुस्लिम दहशतवाद पुन्हा चर्चेत आला आहे. उपायांची चर्चाही सुरू आहे. हे सारे ठीकच आहे. पण मुळाशी पोहोचणारे नाही. आणि मुळाशी पोहोचणारे प्रयत्न केल्याशिवाय या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तीही मिळणार नाही. या समस्येच्या मुळाशी दारूल हरब व दारूल इस्लाम अशी जी शिकवण/ मांडणी केली जाते ती आहे. मदरसे बंद करणे वगैरे वरवरचे उपाय आहेत. ही मूळ मांडणी आणि शिकवण मनातून, विचारातून काढून टाकणे; हा खरा उपाय आहे. अन तेच आव्हानही. धर्म, तत्वज्ञान, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान या जीवनांगाचे ते काम आहे. वर्तमान प्रयत्नांपेक्षा हे प्रयत्न वेगळे राहतील. राजकीय, लष्करी, सामाजिक यांच्याहून वेगळे असे हे प्रयत्न राहणे अपरिहार्य आहे. हे सगळे नीट समजून घेणे आणि असे प्रयत्न सुरू होणे हे मात्र आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०१९

शास्त्र अन व्यवहार

आरोग्य हा सध्या मोठा विषय आहे. स्वाभाविकच ऍलोपॅथीशिवाय आयुर्वेद, होमिओपॅथी, योग इत्यादींची चर्चाही होते. उपाय सुचवले जातात. केलेही जातात. अन टीकाटिप्पणीही होते. विशेषतः ऍलोपॅथी सोडून अन्य उपचार पद्धतींवर. ऍलोपॅथीची गृहितके, अध्ययन, अध्ययन- विचार- संशोधन- पद्धती; यांच्या आधारे विश्लेषण केले जाते. म्हणजे ऍलोपॅथीच्या चौकटीत न बसणारे म्हणून अनेक गोष्टी टीकेचे लक्ष्य होतात. प्रश्न आहे, ऍलोपॅथीच्या बाहेर काही असू शकत नाही का? जे ऍलोपॅथीला ठाऊक नाही ते असूच शकत नाही का? अशा विज्ञानवादी, शास्त्रीय विचार करणाऱ्या टीकाकारांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, मूल कसं होतं याचं शास्त्रीय ज्ञान नसताना माणसाला मुलं होत नव्हती का?

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०२१

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

भवभयातील रतीरंग

आज रात्री बरोब्बर ७० वर्षे होतील. २८ आणि २९ एप्रिल १९४५ च्या मधली रात्र...!!!

जवळपास साडेचार महिन्यांपासून, तारीखच सांगायची तर १६ जानेवारी १९४५ पासून अडॉल्फ हिटलर बर्लिन शहरात एका भुयारात राहत होता. सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा शेवट नजरेच्या टप्प्यात आला होता. आपल्या क्रौर्यगाथांनी दहशत निर्माण करणारा, वंशश्रेष्ठतेचा दुराग्रही योद्धा चारही दिशांनी घेरला गेला होता. अमेरिका, सोव्हिएत युनियन यांच्या मित्र देशांच्या फौजा जर्मनीत घुसून बर्लिनच्या दिशेने पुढे सरकत होत्या. लाखो माणसांना मुंगीसारखे चिरडून टाकणारा हिटलर एका भुयारात लपून बसला होता. उंदरासारखा असे मात्र म्हणता येणार नाही. कारण तिथूनही आपली सत्ता चालवण्याचा त्याचा आटापिटा सुरूच होता. जर्मनीची हार होणार हे निश्चित झाल्यावर त्याने जर्मनीतील सगळी औद्योगिक प्रतिष्ठाने जमीनदोस्त करण्याचा हुकुम त्या भुयारातून दिला. ही औद्योगिक प्रतिष्ठाने शत्रूच्या हाती पडू नयेत हा उद्देश. शस्त्रास्त्र मंत्री अल्बर्ट स्पिअर याला या कामाची जबाबदारी त्याने सोपवली. स्पिअरने काहीही प्रतिसाद न देता त्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. २० एप्रिल १९४५ ला त्याचा ५६ वा वाढदिवस होता. त्याच दिवशी सोव्हिएत फौजांनी जर्मनीची राजधानी बर्लिनवर तुफान बॉम्बहल्ला केला. पूर्ण जर्मनी भाजून काढली. बर्लिनच्या संरक्षणासाठी जर्मन फौजांनी यावे ही त्याची आज्ञा पाळण्यास लष्कराने नकार दिल्याची बातमी त्याला २२ एप्रिल रोजी देण्यात आली तेव्हा तो पूर्ण निराशेत बुडाला आणि त्या क्षणी त्याने सर्वप्रथम आपला पराभव अटळ असल्याचे मान्य केले. त्याच दिवशी त्याने हेही जाहीर केले की, शेवटपर्यंत आपण बर्लिनमध्येच राहू आणि अखेरीस स्वत:वर गोळी झाडून घेऊ. डॉ. वेर्नर हेस यांना त्याने आत्महत्येची खात्रीची पद्धत कोणती याची माहितीही विचारली. डॉ. हेस यांनी बंदूक व विष यांचा एकत्र उपयोग करण्याचा सल्ला दिला. ज्यावेळी फिल्ड मार्शल हर्मन गोरिंग याला याविषयी कळले तेव्हा त्याने हिटलरला एक तार पाठवली. १९४१ च्या निर्णयाप्रमाणे आपण तुमचे उत्तराधिकारी असल्याने आता तसे जाहीर करावे, असे त्याने त्या तारेत म्हटले होते. यावर हिटलर संतापला आणि त्याने गोरिंगला काढून टाकण्याचे आदेश दिले. २७ एप्रिल १९४५ रोजी बर्लिनचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटला. हिटलरचे अधिकारी तहाच्या व शरणागतीच्या हालचाली करीत असल्याचे त्याला कळले. त्याचा नुसता संताप संताप होत होता. सगळीकडून घेरला गेलेला, अधिकारी, सैन्य सगळे सोडून जात असलेले, पराभव समोर दिसतोय आणि स्वत: एकाकी असहाय्य अशी त्याची अवस्था झाली होती.

दरम्यानच्या काळात त्याने आपली प्रेयसी ईव्हा ब्राऊन हिला बर्लिनला बोलावून घेतले होते. त्याच्यापेक्षा २३ वर्षांनी लहान असलेली ईव्हा ब्राऊन १९२९ पासून म्हणजे १६ वर्षांपासून त्याची प्रेयसी होती. ती छायाचित्रकार होती. हिटलरची उपलब्ध असलेली अनेक छायाचित्रे तिनेच काढली आहेत. पूर्ण घायाळ झालेल्या प्रियकराच्या हाकेला ओ देऊन तीही त्याच्याकडे भुयारात आली. २८ आणि २९ एप्रिलच्या मधल्या रात्री त्या दोघांनी विवाह केला. भुयारात सोबत असलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत लोकांच्या उपस्थितीत, जगाला हालवणाऱ्या हिटलरचा विवाह झाला. विवाहाच्या प्रमाणपत्रावर ईव्हा ब्राऊनने आपले नाव बदलून ईव्हा हिटलर असे केले. नवविवाहित जोडप्याने उपस्थितांना अल्पाहार दिला आणि ते आपल्या शयनकक्षात गेले. तेथे रात्री हिटलरने आपले मृत्युपत्र लिहिले. २९ एप्रिलच्या पहाटे चार वाजता त्याने मृत्युपत्रावर सही केली. २९ एप्रिल रोजीच त्याला त्याचा सहकारी, इटलीचा बेनिटो मुसोलिनी आणि त्याची पत्नी क्लारा यांना मारून व उलटे करून लटकावल्याची बातमी कळली. त्या क्षणी त्याने आधीच घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्याला देण्यात आलेल्या सायनाइड विषाबद्दल त्याला संशय निर्माण झाला तेव्हा त्याने ते आपली लाडकी कुत्री ब्लोंडी हिला खाऊ घातले. ब्लोंडी तत्काळ मरण पावली. हिटलरच्या मनाची खात्री पटली. ३० एप्रिल रोजी सोव्हिएत फौजा भुयारापासून १६०० फुटांवर येउन पोहोचल्या होत्या. हिटलरने भुयारातील सहकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यांना सूचना दिल्या. दुपारी एक वाजता जोडप्याने दोन सहकारी आणि खानसामा याच्यासोबत जेवण घेतले. नंतर त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला. दुपारी अडीच वाजता ते आपल्या खाजगी कक्षात गेले. तासाभराने म्हणजे ३० एप्रिल १९४५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हिटलरच्या शयनकक्षातून बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला. काही मिनिटे वाट पाहून सहकारी आत गेले तेव्हा एका सोफ्यावर अडोल्फ व ईव्हा निष्प्राण पडलेले होते. अडोल्फच्या डाव्या बाहुपाशात असलेली ईव्हा शांत होती. तिच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती. अडोल्फच्या कपाळातून उजव्या बाजूने रक्त येत होते. ठरल्याप्रमाणे आधी ईव्हाने सायनाइडचे चोकलेट खाल्ले आणि ती मेल्याची खात्री झाल्यावर अडोल्फने स्वत:वर गोळी झाडून घेतली. सहकाऱ्यांनी लगेच त्यांचे मृतदेह बाहेर आणले. शत्रू तोंडावर उभाच होता. त्याच्या हाती ते लागायला नको होते. त्यामुळे दोन्ही निष्प्राण देहांवर पेट्रोल टाकण्यात आले आणि ते पेटवून देण्यात आले. त्यावर आतील कागदांच्या चळती आणून टाकल्या गेल्या. काहीही मागे राहू नये याची काळजी घेतली गेली. तरीही सोव्हिएत फौजांनी काही अवशेष नंतर हस्तगत केलेच आणि अनेक वर्षेपर्यंत, अनेकदा त्याची छाननी, तपासणी, खात्री करून घेण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. न जाणो, हातावर तुरी देऊन हिटलर निघून तर गेला नसेल आणि हे अवशेष अन्य कोणाचे तरी असतील. अचानक हिटलर कुठून तरी टपकेल तर !! भवभयाचे किती रंग !!!

भयापोटीची आक्रमकता, आक्रमणातून उत्पन्न झालेले भय, अस्तित्वाचे भय, अस्तित्व संपल्यानंतरही उरलेले कल्पनेतील भय... भवभयाचे कितीतरी रंग... अन त्यात मिसळलेला ईव्हा आणि अडोल्फचा रतीरंग...!! सगळे राख होणार हे दिसत असूनही, असे काय होते की तिने त्याच्याकडे यावे? पुढचा दिवसही आपला नाही हे ठाऊक असतानाही लग्न करण्याची काय गरज होती? कोणते समाधान मिळाले दोघांनाही? कोणता आनंद मिळाला? चाळीस तासांपेक्षाही कमी अवधीच्या या संसाराने कोणते पूर्णत्व बहाल केले असेल त्यांना? जगाला नाचवणाऱ्या योद्ध्याला कोणती कमतरता होती? आणि कोणतेही भविष्य नाही, नावही बदनामच होणार हे माहित असतानाही कोणती प्रीती होती? भयाने अंतर्बाह्य वेढले असतानाही, कोणता आधार पुरवला असेल या रतीरंगाने? या पृथ्वीच्या रंगमंचावरील नाटकांना अंत नाही हेच खरे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

२८ एप्रिल २०१५

आमीर मोहनजी

नाही म्हणायला आता आमीर खानने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारला आहे, तेही लतादीदींच्या उपस्थितीत. नंतर त्यांचे भाषणही ऐकले अर्धा तास. त्या भाषणाला सगळ्यांनी उभे राहून उत्कट प्रतिसाद दिला. दुसरीकडे पाणी फौंडेशनच्या द्वारे आमीर महाराष्ट्राच्या गावागावात फिरतो आहे. त्याच्यासोबत किरण वहिनीही असतात. सगळेच एकूण छान, शांत, सुखद चालू आहे. आता किरण वहिनींनी एकदाचे टीव्ही camera पाहून म्हणून टाकावे- भारतात फिरायला आता भीतीबिती नाही वाटत. कुठेच असहिष्णुता वगैरे नाही. भारत हा सगळ्यांनी राहण्यासारखा छान देश आहे. मग पाहू या काही गमतीजमती होतात की, धोरणात्मक शांतता राहते किंवा आणखीन काही. असहिष्णू वगैरे म्हटल्यानंतर किंवा पीके वगैरे चित्रपट बनवल्यानंतर सुद्धा सरसंघचालकांनी मोकळ्या मनाने त्यांचे कौतुकच नव्हे अभिवादन केले. उमदेपणाने त्यांना स्वीकारले. किरण वहिनींनी जर कबुली दिलीच भारताच्या सहिष्णुता अन सुरक्षिततेची तर कोण कोण त्यांना प्रत्यक्ष किंवा परोक्ष जवळ वा दूर ठेवेल हे पाहणं मनोरंजक नक्कीच राहील.

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०१७

न्यूड

न्यूड : ‘कपडा जिस्म पे पहनाया जाता है, रुह पे नही’

हे शीर्षक वाचलं. शीर्षक चटकदार आहे. भुरळ पाडणारं सुद्धा. पण मनात आलं - रुहबद्दल सांगता पण दाखवता तर जिस्म !! हीच समस्या झाली आहे. रुहच्या नावाने जिस्म का? रुह दाखवता येतच नाही, अन जिस्म लपवता येत नाही. अन हा केवळ संस्कृती, संस्कृतीवर आघात वगैरेपुरता विषय नाही. तसं समजणं फारच बलिशपणा होईल. अन तसं केल्यास काहीच उत्तरही मिळणार नाही. ना संस्कृतीवाल्यांना, ना रुह जिस्म करणाऱ्यांना. दोन्हीकडचा प्रवास दुर्दैवाने थांबला आहे. कारण सत्यशोधनापेक्षा दोन्हीकडे आत्मप्रेम अधिक आहे.

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०१८

मेंदू

माणसाला सगळं समजणं शक्य आहे का? असं म्हणतात की, आपल्या मेंदूचा खूप थोडा भाग आपण वापरतो. कोणीही अद्याप मेंदूचा १०० टक्के उपयोग केलेला नाही. १०० टक्के किंवा आज करतो त्याहून अधिक मेंदूचा उपयोग करणे आपल्या हाती आहे का? समजा ते आपल्या हाती आहे आणि आपण १०० टक्के उपयोग केला तरीही, या अस्तित्वाच्या संपूर्णतेचं ज्ञान आपल्याला होईल का? आपला मेंदू ज्या तत्त्वाने आणि ज्या पद्धतीने तयार केला वा झाला असेल, त्याचे ज्ञान कसे होईल? Input आणि output यानुसार मेंदू तयार होताना input अधिक असणार आणि output म्हणजे मेंदू कमी असणार. काही ना काही wastage असणार. हे जे मेंदूच्या बाहेर राहिलेले आहे, त्याचे ज्ञान मेंदूला होईल का? तर्क दृष्टीने तरी मानवी मेंदूला (१०० टक्के उपयोगानंतरही) संपूर्णतेचं ज्ञान होणं शक्यतेच्या बाहेरील ठरतं.

एक मुद्दा आणखीनही - कोणत्याही गोष्टीचं, या विश्वाचं किंवा अगदी कशाचंही ज्ञान केवळ मेंदूच्या द्वारेच होऊ शकतं का? ज्ञान संपादनाच्या मेंदूशिवाय अन्य पद्धती आहेत का?

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०१८

'मी'चे 'आनंदस्वरूप'

आज आद्य शंकराचार्यांची जयंती. त्यांचे निर्वाणषटकम प्रसिद्ध आहे. केवळ सहा पदात तत्वज्ञानाचं समग्र सार आचार्यांनी सांगितलं आहे. या सहा पदांचा शेवट एकाच वाक्याने होतो. ते आहे - चिदानंद रूप: शिवोहं शिवोहं !! प्रत्येकी चार ओळींची ही सहा पदे. प्रत्येकातील तीन ओळी 'मी' कोण नाही हे सांगतात. अन अखेरची ओळ 'मी' कोण आहे हे सांगते. वास्तविक भारताचा तत्वविचार टोकाचा व्यक्तिवादी आहे. भारताचे सामाजिक चिंतन देखील त्याच्या आगळ्या व्यक्तिवादावर आधारलेले आहे. (तो एक स्वतंत्र विषय आहे.) आचार्य या स्तोत्रात भारताचा हा व्यक्तीविचार मांडतात. भारतेतर जगात 'मी'शी स्वाभाविक वा कृत्रिम पद्धतीने जोडलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये 'मी'शोधण्याचा प्रयत्न होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर 'माझे' म्हणून जे जे काही असते त्यावर 'मी'चे आरोपण केले जाते. भारतीय व्यक्तीविचार मात्र स्वाभाविक वा कृत्रिम पद्धतीने जोडलेल्या गोष्टी बाजूला सारून, 'माझे' बाजूला सारून सोलीव, निखळ, absolute, केवळ 'मी' आपल्यापुढे मांडतो. 'माझे' ही संज्ञा लावता येईल ते सारे 'मी' समोरून सरकणारे एक चलचित्र आहे. चलचित्र कोणतेही असू शकते. पडदा तोच असतो. 'मी' तोच असतो. चलचित्रासोबत पडदा बदलत नाही. 'माझे' बदलते, 'मी' बदलत नाही. व्यक्तीविचारांच्या या मूलभूत भिन्नतेमुळे एकूण जीवनातच खूप फरक पडतो. 'मी' गमावणे दोन्ही विचारांना मान्य नाही. ते होऊच शकत नाही. परंतु 'माझे'मध्ये 'मी' शोधल्याने भारतेतर जीवनात वस्तू, व्यक्ती, विचार, शरीर, भावना, इतिहास, निर्मिती; अशा असंख्य गोष्टींना अनन्यसाधारण स्थान मिळाले. या साऱ्यांचा संग्रह करणे, तो संग्रह टिकवणे, घट्ट धरून ठेवणे; आवश्यक होऊन बसले. त्यासाठीचा अट्टाहास हे जीवनाचं प्रमुख लक्षण आणि दिशादर्शक तत्व झालं. कारण 'मी' हा या सगळ्या गोष्टींच्या संग्रहाचं नाव समजलं गेलं. याउलट भारतीय विचारांनी 'मी' आणि 'माझे' यांच्यात फरक केला. अन 'माझे' बाजूला करून शुद्ध 'मी' वर लक्ष केंद्रित केले. आचार्यांनी निर्वाणषटकात हेच सांगितले आहे. एक आणखीन महत्वाची गोष्ट त्यांनी यात सांगितली आहे. ती म्हणजे - या शुद्ध 'मी'चे स्वरूप. 'माझे' बाजूला सारून 'मी' मिळेल असे मोघम सांगून आचार्यांनी सोडून दिलेले नाही. त्यांनी हाती येणाऱ्या शुद्ध, सोलीव 'मी'चे स्वरूप सांगितले आहे. ते आहे - चिदानंद रूप. हा आनंदमय मी समजून घेणेही गरजेचे आहे. आनंद म्हटला की आपल्या मनात विशिष्ट चित्र उभं राहतं. हास्याचा गडगडाट, माणसांचा मेळा, खाणे पिणे वस्त्र प्रावरणे, गप्पागोष्टी, कल्लोळ, वेगवान कृती, नृत्य; अशा काही कल्पना मनात आपोआप तयार होतात. पण त्याला आनंद म्हणता येईल का? संन्यासी परंपरेत आपण गंभीरानंद असं नावही ऐकतो. गंभीर असून आनंद कसा असू शकेल? मुळात आनंद या गोष्टीचं नीट आणि योग्य चित्र तयार करण्याचा प्रयत्न पुरेशा प्रमाणात व्हायला हवा. आनंदाचं प्रमुख लक्षण म्हणजे 'रमणे'. माणूस ज्यात रमतो तिथे त्याला आनंद मिळतो असं म्हणता येईल. हे रमणं बहिर्मुखी असू शकतं किंवा अंतर्मुखी सुद्धा. आनंदाचं दुसरं लक्षण म्हणजे त्याने कोणाला त्रास होऊ शकत नाही. कोणाला त्रास होत असेल तर त्याला आनंद म्हणता येणार नाही. आनंदाचं तिसरं लक्षण म्हणजे, तो स्वयंभू असतो. त्याला अन्य कशाचा आधार, अन्य कशाची मदत लागत नाही. ही तीनही लक्षणे असणारा आनंद हा खरा आनंद. 'मी'चं आनंदस्वरूप हे असं आहे. आजच्या घडीला तर हे फारच महत्वाचे आहे. कोरोनाने 'माझं' काढून घेतलं आहे. अन 'माझं'मध्ये 'मी' आणि 'आनंद' शोधण्याच्या प्रयत्नांनी निराशा आणि वैफल्य पदरात घातलं आहे. 'मी' आणि 'मी'चं 'आनंदस्वरूप' यांचं आचार्यांनी केलेलं विवेचन म्हणूनच अधिक कालोचित ठरतं.

- श्रीपाद कोठे

मंगळवार, २८ एप्रिल २०२०

सोमवार, २५ एप्रिल, २०२२

देवाची निवृत्ती

एकदोन ठिकाणी पोस्ट वाचल्या-

`बुद्धी, प्रयत्न आणि विज्ञान यांच्या साहाय्याने सारं काही प्राप्त करून घ्यायला हवं. आता देवाचा हा आधार टाकून देऊन त्याला निवृत्त करायला हवं.'

चटकदार परंतु उथळ हा वर्तमान युगाचा गुण पुन्हा प्रत्ययाला आला. मनात आले- मीरेला काय कमी होते म्हणून ती महाल सोडून रस्त्यांवर फिरत राहिली? भगवान बुद्धांना काय कमी होते की सगळे बाजूस सारून त्यांनी जंगलाचा रस्ता धरला? भक्तश्रेष्ठ प्रल्हाद तर बोलूनचालून राजपुत्र होता. त्याला नारायणाचे नाव का घ्यावेसे वाटले? आजही उच्च विद्याविभूषित तरुण तरुणी रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, इस्कॉन वगैरे ठिकाणी जाऊन साधे, अनाम आयुष्य का जगतात? गेला बाजार, `the monk who sold his ferari' कशासाठी? आपल्या मगदुरानुसार निरीक्षण, विश्लेषण करून शाश्वत सिद्धांत प्रतिपादित करायचे, हे जरा जास्तच होतं नाही का?

- श्रीपाद कोठे

२६ एप्रिल २०१५

शेवटची इच्छा

कधी कधी लोकांच्या पोस्ट दिसतात. माझ्या मित्रांची संख्या पाच हजार झाली आहे. त्यामुळे कृपया यापुढे मित्रविनंती स्वीकारता येणार नाही. किंवा माझा हा दुसरा अकौंट असून त्यावर मित्रविनंती पाठवावी. छान वाटतं या जगन्मित्रांबद्दल. अन एक जुना प्रसंगही आठवतो. महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष होते. आणि शेवटचे दिवस. एक दिवस सगळे एकत्र जमले. निरोप देणेघेणे असाच प्रकार, पण कार्यक्रम थोडा औपचारिक- म्हणजे निश्चित ठरवून. त्यात एक कार्यक्रम होता की, सगळ्यांनी एका डब्ब्यात आपली शेवटची इच्छा लिहून चिठ्ठ्या टाकायच्या. खरं तर फाशीच्या वेळी विचारली जाणारी ही गोष्ट. पण कुणाला तरी सुचलं. आता आपण भेटणार नाही, शेवटची भेट. मग शेवटची इच्छाही. तर त्या चिठ्ठ्या सगळ्यांनी टाकल्या. मग त्यांचं वाचन. मी चिठ्ठीवर लिहिलं होतं- `कुणालाही माझी आठवण राहू नये.' त्याची खूप चर्चा झाली. पुष्कळांनी गंमतही घेतली. बहुतेकांना आश्चर्यही वाटलं. मलाही आश्चर्य वाटलं. मला आश्चर्य वाटलं की, या लोकांना एवढ काय आश्चर्य वाटतंय? मित्रविनंतीच्या पोस्ट पाहताना वाटलं, आजही लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल. अन मलाही आश्चर्य वाटेल की, यांना आश्चर्य का वाटतंय? तसेही ते फार महत्वाचे नाहीच म्हणा. कारण मित्रांची संख्या कितीही वाढली तरीही लक्षात ठेवतोच कोण की, मी अशी विचित्र अखेरची इच्छा बाळगावी? शेवटची इच्छा बदलावी का गड्या?

- श्रीपाद कोठे

२६ एप्रिल २०१५

बौद्धिक संपदा आणि भारतीयता

आज जागतिक बौद्धिक संपदा दिवस (intellectual property rights day) आहे. त्यानिमित्ताने पेटंट, स्वामित्व, ट्रेडमार्क इत्यादी बौद्धिक संपदा पैलूंचा विचार होईल. या सगळ्याचा उहापोह होईल. कोण किती मागे वा पुढे आहे, आपण काय करण्याची गरज आहे; आदी विषयांची चर्चा पण होईल. संबंधित कायदे, नियम, संकेत, तरतुदी हे विषयही चर्चेत येतील. परंतु दूरगामी दृष्टी आणि भविष्य या संदर्भात महत्वाचा असलेला एक विषय मात्र चर्चेत येणार नाही. त्याचीही नोंद घ्यायला हवी. तो मुद्दा म्हणजे, बौद्धिक संपदा अधिकार ही गोष्टच अयोग्य आहे. 'आज'ची गरज म्हणून त्याचा पुरेसा विचार करतानाच, त्यातून बाहेर पडण्याचे धोरण- पद्धत- तत्वज्ञान- यांचाही विचार व्हायला हवा.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे 'चौकीदारी' ही बाब चर्चेत आली आहे. स्वतः मोदी यांनीही त्याचे विश्लेषण केले आहे. सध्या एक राजकीय घोषणा आणि भ्रष्टाचारावर अंकुश एवढे त्याचे स्वरूप मर्यादित असले तरी, 'चौकीदारी'चा व्यापक जीवनार्थ सार्वजनिक चर्चेत आणणे/ येणे आवश्यक आहे. ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र याच 'चौकीदारी'चा, विश्वस्त कल्पनेचा विचार मांडतो. गांधीजींच्या चिंतनाचाही तो केंद्रबिंदू होता. गांधीजी तर म्हणत असत की, जगातील सारेचे सारे साहित्य नष्ट झाले आणि एवढा एक मंत्र उरला तरी मानवजातीला आशा आहे.

भारतीय चिंतनाचा हा गाभा आहे. म्हणूनच बौद्धिक संपदा अधिकार ही कल्पनाच भारतीय आत्म्याशी मेळ न खाणारी आहे. जगाच्या एकूण व्यवहाराच्या संदर्भातही ही कल्पना त्रासदायक आहे. स्वार्थ, सत्ता, स्वामित्व, संपत्ती हेच भारतेतर विचारांचे विषय प्रामुख्याने राहिले आहेत. त्यापोटीच आणि त्यासाठीच अनेक कल्पना आणि व्यवस्था जन्माला घालण्यात आल्या. बौद्धिक संपदा अधिकार ही सुद्धा त्याच पठडीतील कल्पना आणि व्यवस्था. भारतीय विचारांची केंद्रवर्ती कल्पना मात्र स्वार्थ, सत्ता, स्वामित्व, संपत्ती ही नसून, 'सर्वेपि सुखीन: सन्तु' ही आहे. त्यामुळे सर्व प्रकारची मानवीय संपदा आणि मानवीय उद्यम ही सगळ्या जगासाठी आहे, हीच भारतीय भावना आहे आणि असू शकते. आजची परिस्थिती या भारतीय भावनेसाठी अजिबात पोषक नाही. परंतु याचा अर्थ ती चुकीची आहे असा होत नाही आणि अयोग्य गोष्ट सुरूच राहावी असाही त्याचा अर्थ काढता येत नाही. आहे त्याच स्थितीतून मानवतेची नौका योग्य धारेला लावणे ही सुज्ञांची जबाबदारी आहे.

जगाचा वर्तमान प्रवाह बदलण्यासाठी प्रथम एका सशक्त तत्वज्ञानाची गरज आहे. ईशावास्य उपनिषदाचा प्रथम मंत्र आणि असंख्य अधिकारी व्यक्तींनी त्यावर केलेले भाष्य, त्याचा लावलेला आणि सांगितलेला अन्वयार्थ; यांचा व्यापक प्रचार प्रसार, चर्चा, खंडन मंडन होत राहायला हवे. यातूनच एक सशक्त तत्वज्ञान आकार घेईल. तत्वज्ञान हा शब्द, ही कल्पना आणि त्याचा भाव याबद्दल आज असलेली नकारात्मक भावना टाकून द्यावी लागेल. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचं एक पुस्तक आहे, 'स्वरमयी'. या पुस्तकाच्या पहिल्याच पृष्ठावर त्यांनी एक वाक्य दिलेले आहे. कोणाचे आहे लक्षात नाही पण वाक्य असे आहे - 'जो समाज तत्वज्ञानापेक्षा तंत्रज्ञानाला अधिक महत्व देतो त्या समाजाला कालांतराने दोन्हीची गरज उरत नाही.' केवळ कौशल्य, तंत्र, कायदे, व्यवहार एवढ्याने भागणार नाही; तर एक सशक्त तत्वज्ञान हीसुद्धा मानवतेची गरज आहे. बौद्धिक संपदा या विषयाच्या संदर्भातही ते खरे आहे.

शेवटी श्री रामकृष्ण परमहंस यांचा एक प्रसंग सांगून समारोप करतो. एकदा कोलकात्याचे एक प्राध्यापक त्यांना भेटायला आले आणि त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले. माणूस, त्याचे प्रयत्न, त्याचे जीवन यात ईश्वर नावाच्या गोष्टीला काय स्थान, असाच चर्चेचा रोख होता. सगळे प्रश्न, तर्क वगैरे ऐकून श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले - केवढी तुमची बुद्धी, किती तुमचे ज्ञान. बरं मला सांगा हे सगळं तुमच्याकडे आलं कुठून? तुम्ही म्हणता तुमची बुद्धी, ही तुमची बुद्धी तुम्हाला मिळाली कशी, दिली कोणी? 'चौकीदारी', विश्वस्त भावना यांचं मूळ इथे आहे. आपण जे जे आपलं म्हणून म्हणतो ते ते आलं कुठून? त्याचा मूळ मालक कोण? ही पृथ्वी, त्यावरील साधनसंपत्ती; एवढंच नाही तर आपलं शरीर- मन- बुद्धी- गुण- वारसा- शक्ती- ठेवी- सगळं सगळं आपल्याजवळ आलं कुठून? त्याच्या अगदी मुळाशी जाऊन त्याचा खराखुरा मालक कोण, याचा वेध घेण्याचा प्रयत्न केल्याशिवाय 'सर्वेपि सुखीन: सन्तु' याकडे जाणे शक्य होणे नाही. एका सशक्त जीवन तत्वज्ञानाच्या पायाभरणीसाठी हे गरजेचे आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २६ एप्रिल २०१९

रविवार, २४ एप्रिल, २०२२

समाजाचं भलंबुरं

समाजाचं भलंबुरं समाजावर अवलंबून असतं, सत्तेवर नाही; या सिद्धांतावर आधारित हजारो वर्षांच्या प्रयत्नांमुळे आज आपण सुस्थितीत आहोत. आज मूळ सिद्धांत आपण सोडून दिल्यासारखा दिसतो आहे. तसे प्रयत्न ही दूरचीच गोष्ट. वाद आणि संघर्ष फक्त यासाठी की माझा गट की तुझा. नाही तर सगळे सारखे असा निष्कर्ष काढून हतबलता अन दोषारोपण. असंच चालत राहिलं तर पुढील १०० वर्षात आपण नष्ट होऊ का, असा विचार मनात येऊन जातो. अगदी हृदयाच्या तळापासून 'सत्ता' उखडून टाकलेले किती आहेत? किमान मनामनातील 'सत्ता' उखडून टाकणे आवश्यक असं मनातून वाटणारे किती. अगदी 'सत्ता हे साधन आहे साध्य नाही' अशी गुळमुळीत भूमिका सुद्धा नको. सत्तेचं काय करायचं त्याची स्वतंत्र चर्चा करू, पण समाजाचं हित अहित फक्त आणि फक्त समाजावर अवलंबून असतं हे भिनायला हवं. नाही तर कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०१८

स्मशानात वाढदिवस

भंडारा डेटलाईनची एक बातमी आज वाचण्यात आली. एका तरुणाने आपला वाढदिवस मित्रांसोबत स्मशानभूमीत साजरा केला. मृत्यू जीवनाचं सत्य आहे तर असं करायला काय हरकत आहे? उलट त्याने वृत्तीचं समत्वच निर्माण होईल, असा युक्तिवाद होऊ शकतो. अन तो युक्तिवादच दाखवून देतो की, आमचे विचार आज किती गोंधळलेले आहेत. स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करायचा तर संडासात जेवायचे का नाही? उद्या कोणी महाभाग करेलही कदाचित. सगळाच वेडगळपणा. जन्म, जगणं आणि मृत्यू एकाच जीवनाचे भाग असले तरीही, अवस्था म्हणून ते वेगळेच आहेत. तांदूळ आणि भात वेगळे, कणिक आणि पोळी वेगळे. परंतु समता या शब्दाने आमच्या विचारात, वृत्तीत, भावनांमध्ये, मानसिकतेत, दृष्टीत इतका गोंधळ माजवला आहे की विचारता सोय नाही. आपण एकाच वेळी समान आणि असमान असतो. या विश्वाची रचना आणि प्रकृतिच तशी आहे. परिपक्वता, विचारीपण, आध्यात्मिकता, धर्म, नीती म्हणजे विश्वाचं हे स्वरूप समजून घेणं. म्हणूनच भगवद्गीता स्पष्टच सांगते - भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ प्रकारांनी माझी प्रकृती विभक्त आहे. प्रकृतीचे परा आणि अपरा असे दोन प्रकार आहेत. अपरा प्रकृतीत भिन्नत्व आहे, असमानता आहे आणि परा प्रकृतीत पूर्ण साम्यावस्था आहे. (अध्याय ७, श्लोक ४ आणि ५). भारतेतर विचारांनी अपरा प्रकृतिचाच विचार केला आणि त्यात साम्यावस्था पाहण्याचा, कल्पिण्याचा, आणण्याचा प्रयत्न ते करतात. त्याने साम्यावस्था तर दूरच, अनवस्था वाट्यास येते. आज ठायी ठायी त्याचे दर्शन होते. भांडाऱ्याच्या तरुणाच्या कृतीने पुन्हा एकदा ते सिद्ध झाले.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०१८

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

पाप आणि गुन्हा


पाप आणि गुन्हा या दोन्ही कल्पनात व्यक्तीची चूक ही मूळ गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तसंच जगत, वागत असते. परिस्थितीच्या दबावामुळे त्यात बदल होतो वा करावा लागतो. परिस्थितीचा दबाव कधी जोरजबरदस्तीचा मामला असतो, तर कधी राजीखुशीचा. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावेही दिली जातात. जोरजबरदस्तीचा भाग असेल तर त्याला; तडजोड, किंमत चुकवणे, अपरिहार्यता यासारखे रंग लाभतात. राजीखुशीचा मामला असेल तर त्याला प्रेम, त्याग, सेवा असे रंग लाभतात. पण मुळात परिस्थितीचा हा दबाव आपण स्वीकारतोच का? त्याचे साधे, सरळ उत्तर आहे जगण्यासाठी. आजुबाजूला माणसे, निसर्ग, वातावरण काहीही नाही आणि जगतोय ही कल्पनाही करणे शक्य नाही आणि तसे जगणेही शक्य नाही. असे जगताना स्वाभाविकच काही मर्यादा येतात आणि त्यातून सर्वसाधारण शहाणपणातून काही नियमांचा जन्म होतो. सुरळीत (सुखी, समाधानी किंवा सार्थक वगैरे नाही) जगण्यासाठी हे नियम पाळण्याला सगळे मान्य करतात. हे नियम न पाळणे म्हणजे चूक. चूक या गोष्टीला त्याहून फार अर्थ नाही. तसे पाहिले तर चूक नावाची काही गोष्टच नाही. नियम न पाळणे हाच त्याचा अर्थ. आणि चूक केली की दिली जाते ती सजा. सजा देण्यासाठी चूक सिद्ध करावी लागते. त्यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात गुन्हा आणि धार्मिक नीतीच्या भाषेत म्हणतात पाप. परंतु या दोनमध्ये बाकी काही फरक नसला तरीही एक सूक्ष्म भेद आहे आणि तो सूक्ष्म असला तरीही तसा मोठा आणि महत्वाचा आहे. जेव्हा एखाद्या चुकीकडे गुन्हा म्हणून पाहिले जाते तेव्हा त्याचा निर्णय चूक करणारी व्यक्ती सोडून बाकीचे करतात. काय शिक्षा द्यायची तेदेखील अन्य लोक ठरवतात. अन शिक्षा भोगून संपली की त्या चुकीतून सुटका होते. मात्र, एखाद्या चुकीकडे पाप म्हणून पाहिले की, त्याचा अंतिम निर्णय चूक करणाऱ्याच्या मनातून व्हावा लागतो. त्यासाठी प्रायश्चित्त त्याच्याच मनाने घ्यावे लागते. प्रायश्चित्त घेऊनही सुटका नसते, तर उपरती होऊन पुन्हा चूक होऊ नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी त्याच्यावरच असते. त्यामुळे पाप कल्पनेत संबंधिताच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असते. त्यातून व्यक्तीच्या आंतरिक विकासाच्या शक्यता विस्तारतात. गुन्हा म्हटल्यावर सदसद्विवेकबुद्धीला आवाहन असलेच पाहिजे असे नाही. त्यामुळेच आंतरिक विकासाच्या शक्यताही धूसर होतात. सामुहिक जीवनातील चूक आणि त्याला सजा एवढेच त्याचे स्वरूप असते. आज पाप ही कल्पना सोडून दिल्यासारखी दिसते. त्यामुळे penance, प्रायश्चित्त (चित्त महत्वाचे), तपस्या या गोष्टी कालबाह्य ठरत आहेत. म्हणूनच आंतरिक विकासाचा अभाव जाणवतो. या आंतरिक विकासासाठी जगात जे काही प्रयत्न आजवर झालेत त्यातील `पाप-पुण्य' संकल्पना हाही एक महत्वाचा प्रयत्न आहे. कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य यांच्यासाठी `गुन्हा' ही बाब योग्य असली तरीही, त्याला `पाप-पुण्य' याचीही जोड देता येईल का? या दोन्ही कल्पनांचा समन्वय अधिक पूर्णतेकडे नेईल का? विचार व्हायला काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, २४ एप्रिल २०१५

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

मिरच्या खाऊ, तिखट लागायला नको...

सध्या `कोर्ट' चित्रपट बराच गाजतो आहे. एवढेच नाही तर तो चित्रपट आवडणारे आणि नावडणारे यांच्यातील वाद-चर्चा त्याहून अधिक गाजत आहेत. तशातच काल दिल्लीत आपच्या सभेत एका शेतकऱ्याने गळफास लावून घेतला. या दोन्ही गोष्टींचा विचार सुरु असताना वाटले- खरंच चित्रपट काय, राजकारण काय आणि प्रसार माध्यमे काय; यांचा जगण्याशी संबंध किती असतो? `कोर्ट' चित्रपट खूपच चांगला असेल किंवा अतिशय सुमार असेल. एक कलाकृती यापेक्षा त्याचे महत्व ते काय? यापूर्वीही न्यायव्यवस्थेचे वाभाडे हिंदी-मराठी चित्रपटांनी काही कमी काढलेले नाहीत. किती विचार केला गेला त्याचा? किती फरक पडला परिस्थितीत? हां, त्या चित्रपटांचा प्रभाव कदाचित नवीन चित्रपटापेक्षा कमी असेल. पण त्याने काय फरक पडतो? तुम्हा आम्हाला चघळायला एक विषय यापेक्षा काय अधिक? बरे अशा चित्रपटांनी व्यक्तीच्या संवेदना वगैरे जागृत होतात असे आपण बिनधास्त गृहीत धरतो. तसे असते तर आजवर समाज असा संवेदनाहीन का राहिला असावा? जी बाब कोर्टाची तीच बाब शेतकरी आत्महत्यांची. आजपासून १५ हून अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच तापल्या उन्हाळ्यात मी आणि आमचे छायाचित्रकार शेखर सोनी यांनी आठ दिवस सगळा विदर्भ आमगाव ते खामगाव पालथा घातला होता. एकच विषय- शेतकरी आत्महत्या. सरकार, प्रशासन सगळे हालले होते. मुख्यमंत्री मनोहर जोशींना विदर्भात तातडीने धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर त्या कामाला पत्रकारितेचा मोठा पुरस्कार वगैरेही मिळाला आणि आम्ही तो मिरवला. पण आज काय स्थिती आहे? का असे होते?

दोन गोष्टी आहेत. एक तर- चित्रपट असो वा माध्यमे, ही प्रत्यक्षात फारसे  काही करू शकत नाहीत. आर्थिक, सामाजिक, राजकीय, भावनिक, वैचारिक; कुठल्याही अर्थाने फार काही करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे- तुमच्या माझ्यासारखा मोठा वर्ग, आपले जगणे या साऱ्याशी जोडून घ्यायला तयार नसतो. आम्ही चर्चा करू, सहानुभूती दाखवू, मदतही करू; पण हे सगळे ज्या विशिष्ट जीवनपद्धतीमुळे आणि जीवनदृष्टीमुळे होते, ती पद्धती आणि दृष्टी बदलायला मात्र आमची तयारी नसते. आम्ही मिरच्या खाऊ पण त्या तिखट लागायला नको, अशी आमची उफराटी विचारपद्धती आहे. स्वत:च्या सवयी, सुख, सवलती यांच्यावर पाणी सोडण्यास कोण तयार आहे? स्वत:ला चिरत जाऊन स्वत:च्या चुका आणि मर्यादा किमान स्वीकारण्याची कोणाची किती तयारी असते?

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०१५

कर्जाचे दुष्टचक्र

जागतिक नाणेनिधीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण जगावर कर्जाचे प्रचंड ओझे असून, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील या कर्जओझ्याचे प्रमाण जागतिक उत्पन्नाच्या २२५ टक्के एवढे मोठे आहे. याचे विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था कोसळतील आणि मग कर्जाची परतफेड सुद्धा होऊ शकणार नाही, अशी भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आज संपूर्ण जगभरात `ऋण काढून सण साजरे करणे' हाच शिष्टाचार झालेला आहे. यातून खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण होते का? नाणेनिधीचा अहवाल लक्षात घेतला तर या पद्धतीने संपत्ती निर्माण न होता, शून्याच्याही खाली घसरते, असेच म्हणावे लागेल. उत्पन्न १०० रुपये आणि देणी २२५ रुपये असतील तर सांपत्तिक स्थिती घसरली असेच म्हणणार ना? या पार्श्वभूमीवर संपत्ती निर्माणाबाबत स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २५ एप्रिल १९६५ च्या मुंबईतील भाषणात जे विचार मांडले ते मननीय आहेत. अर्थव्यवस्थेतील बचतीचा भारतीय दृष्टीकोन मांडणारे ते विवेचन आहे. भारतीय गृहिणीचे अर्थशास्त्र; तसेच इस्लामिक आणि जैन अर्थशास्त्रसुद्धा याच बचतीच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. पोरकट, बालिश, हास्यास्पद; अशी त्याची संभावना करता येईल, करणारे करतीलही; नव्हे करतातच. अलीकडेच लोकसत्ताचा अग्रलेख असाच शेलका शेरेबाजी करणारा होताच. निमित्त होते सरसंघचालकांचे मुंबई stock exchange मधील भाषण. ज्यात त्यांनी भारतीय अर्थविचार मध्यवर्ती असावा असा मुद्दा मांडला होता. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला संपत्ती निर्माणाचा `बचत सिद्धांत' हा भारतीय अर्थविचार आहे. व्यक्तीपासून देशापर्यंत आणि पुढे संपूर्ण जगाचाही तो विचार व्हावा. नाणेनिधीच्या अहवालाने ते अधोरेखित केले आहे. ऋण काढून सण साजरे करण्याने ना संपत्ती निर्माण होत, ना अर्थव्यवस्था उभ्या राहात. बचतीचा राजमार्ग मात्र संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्थाही बळकट करतो.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भाषणातील अंश-

`प्रत्येक को काम अर्थव्यवस्था का आधारभूत लक्ष्य होना चाहिए. अर्थात स्वस्थ एवं सवय व्यक्ति के लिए अपनी गृहस्थाश्रम की आयु में जीविकोपार्जन की व्यवस्था होनी ही चाहिए. आज एक ओर- १० वर्ष का बालक और ७० वर्ष का बुढा काम में जुता हुआ है तो दूसरी ओर २५ वर्ष का नौजवान बेकारी से उबकर आत्महत्या कर बैठता है. इस अव्यवस्था को दूर करना होगा. केवल हाथ उत्पादक नहीं बन सकते. उनके लिए पूंजी का सहयोग चाहिए. श्रम और पूंजी में से किसी की भी अवहेलना नहीं की जा सकती. पूंजी निर्माण के लिए आवश्यक है कि संपूर्ण उत्पादन का उपभोग करने के स्थान पर उसमे से कुछ बचाया जाए और उसे भावी उत्पादन के लिए काम में लिया जाए. उपभोग में संयम के बिना पूंजी नहीं बनेगी. कार्ल मार्क्स जिस अतिरिक्त मूल्य की चर्चा करता है वही पूंजी निर्माण का आधार है. पूंजीवादी अर्थव्यवस्था में उद्योगपति इस अतिरिक्त मूल्य के सहारे पूंजी निर्माण करता है. समाजवादी व्यवस्था में यह काम राज्य के द्वारा होता है. दोनों ही पद्धतियों में संपूर्ण उत्पादन का वितरण श्रमिकों में नहीं होता. यदि उत्पादन की पद्धति बड़े पैमाने की और केंद्रित रही तो पूंजी निर्माण के लिए श्रमिक के द्वारा किये गए संयम और त्याग का भी भान नहीं होता. विकेंद्रीकरण में यह लाभ है कि पूंजी के रूप में इस अतिरिक्त मूल्य के प्रयोग में श्रमिक का भी हाथ रह सकता है.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना - २५ एप्रिल १९६५)

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०१८

No... No...

सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे. अनेक अर्थांनी. या स्थितीत मनोनिग्रह सुद्धा अभूतपूर्वच लागेल. ज्यांना हे पटतं त्यांनी त्याचा अधिकाधिक अवलंब करावा लागेल. सगळ्याच गोष्टींवर अभूतपूर्व ताण आहे. काम करणाऱ्या लोकांवर ताण आहे, काम न करणाऱ्यांवर ताण आहे, रुग्णालये- डॉक्टर्स- नर्सेस- या क्षेत्रातील अन्य लोक यांच्यावर ताण आहे, पोलिसांवर ताण आहे, राजकारण्यांवर ताण आहे, सरकारवर ताण आहे, प्रशासनावर ताण आहे, इमारतींवर ताण आहे, यंत्रणांवर आणि रचनांवर ताण आहे, अर्थकारणावर ताण आहे. ताण नाही कशावर? अन या ताणाची कारणे मानवीय आणि मानवेतर अशी दोन्हीही आहेत. त्यामुळे या स्थितीत समर्थांचा 'जनी वादविवाद सोडून द्यावा' हा उपदेश सतत स्वतःला सांगण्याची गरज आहे. अर्थात हा माझा उपदेश नाही अपेक्षा आणि इच्छा आहे. माझी अपेक्षा आणि इच्छा पूर्ण केलीच पाहिजे असं कोणावर बंधन असण्याचं किंवा तसा नैतिक वा अन्य दबाव असण्याचंही कारण नाहीच. प्रत्येक जण स्वतंत्र आहे. फक्त एवढंच वाटतं की, अत्यंत मनोनिग्रहाने स्वतःला सांगायला हवे की - टीकाटिप्पणीला, दोषारोप इत्यादीला, जबाबदाऱ्या आदी ठरवण्याच्या घाऊक चर्चांना, अनावश्यक विश्लेषणांना no म्हणजे no. अगदी a Big Big No. अनेकांना ही अपेक्षा आवडणार नाही, अनाठायी वाटेल. त्यांना तो अधिकार आहे. मात्र आम्ही स्वतःला किती मर्यादा घालून घेतो यावरून आपली समाज म्हणून पत आणि प्रत ठरेल. स्निग्ध ज्योतीचा प्रकाश हवा असेल तर समई होऊन धग सोसण्याची तयारी असायला हवी.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२१

बुधवार, २० एप्रिल, २०२२

मोठ्या आवाजासाठी शिक्षा

आनंद साजरा करणे म्हणजे खूप मोठ्या आवाजात अनाकलनीय असे काहीतरी कर्कशपणे वाजवणे; असा समज असणाऱ्यांना एकत्र करून मोठ्या बंद साउंडप्रुफ हॉलमध्ये कोंडून ते ऐकवतात त्यापेक्षाही (जगात जेवढा मोठा आवाज शक्य असेल तेवढ्या आवाजात) मोठ्या आवाजात त्यांना गाणी ऐकवावी. अगदी त्यांचे मेंदू आणि कान फाटून जाईपर्यंत. त्या आधी बाहेर येण्याची वा गाणी न ऐकण्याची विनंती कोणी केली तर ती मुळीच ऐकू नये. त्यांच्या नको इतक्या उत्साहाला हाच उतारा आवश्यक आहे. त्यांची रग अशाच पद्धतीने जिरू शकते. पुन्हा त्यांच्या आवडीची गाणीच काय काहीही ऐकण्याची त्यांची क्षमता काढून घ्यायला हवी.

कोणाला हे फार हिटलरी पद्धतीचे वाटेल, पण तेच आवश्यक आहे. कारण माणसासारखा विचार आणि व्यवहार माणसासाठी केला जातो. जनावरांसाठी नाही. आणि आज माणूस समजल्या जाणाऱ्या जनावरांचीच चलती आहे. या जनावरांना जनावरांच्या पद्धतीनेच वागवले पाहिजे. सगळी माणसे सारखी असतात वगैरे तत्वज्ञान कुठून आले माहीत नाही, पण ते पूर्ण चुकीचे आहे. सगळे सारखे, सगळ्यांना सारखी बुद्धी, सगळ्यांना सारख्या भावना, सगळ्यांच्या सारख्या गरजा वगैरे दळभद्री तत्वज्ञान टाकून देऊन जमीनीवर पाय ठेवून नीती-नियम, कायदेकानून वगैरे बनवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१४

शहरी माणूस आणि पाणी

शहरी माणूस पाणी समस्येसाठी काय करू शकतो?

१) पाण्याच्या बाटल्या विकत घेणे बंद करू शकतो. अगदी प्रवासात सुद्धा घरून १-२ बाटल्या घेऊन जाण्याचा आग्रह ठेवला तर पाणी लॉबी, पाणी माफिया यांना आळा घातला जाईल.

२) हॉटेलात सुद्धा साध्या पाण्याचा आग्रह. हे साधे पाणी स्वच्छ ठेवावे यासाठी हॉटेलला आग्रह. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा त्याग. विशेषत: महिला व मुलींनी हे करावे. बावळट पुरुष आपोआप तसे करतील. महिला वर्गाच्या आग्रहाखातर किंवा प्रभाव पडावा म्हणून पाण्याची बाटली घेतली जाते.

३) किमान दोन वृक्ष लावणाऱ्या, हॉटेलच्या प्रमाणात माती मोकळी ठेवणाऱ्या अन rain water harvesting करणाऱ्या हॉटेलमध्येच जाणे. या गोष्टींसाठी त्यांच्याकडे आग्रह धरणे. यासाठी लहान लहान गट करणे. मोठे गट नकोत. जाणीव उत्पन्न करणे अन सततच्या आग्रहाने कृती करायला लावणे एवढ्या मर्यादित कामासाठी.

४) शाळा, महाविद्यालये, संस्था, मंडळे, वाचनालये, अन्य जाहीर कार्यक्रमात मंचावर किंवा अन्यत्र पाण्याच्या बाटल्या ठेवण्यापेक्षा लोटी-पेला आणि स्वच्छ पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१६

निमित्त प्लगचे

काल एक प्लग आणायला वीज सामानाच्या दुकानात गेलो. ४-५ जण होते अन दुकानदार एक कुलर दुरुस्त करीत होता. माझ्या आधी आलेल्या त्या ४-५ जणांपैकी एकाने दुकानदाराला विचारले- `एखादा मुलगा आहे का?' दुकानदाराने काम काय असा प्रतिप्रश्न केला. तो माणूस म्हणाला- `घरचा एक बोर्ड निघाला आहे. दुसरा बोर्ड घरी आहे. फक्त लावायचा आहे.' दुकानदाराने उत्तर दिले- `तीन चार दिवस मुलं बाहेरगावी गेली आहेत.' काही क्षण घोटाळून तो माणूस निघून गेला. तो गेल्यावर बाकीच्या लोकांकडे वळून दुकानदार म्हणाला- `मुलगा नाही असं नाही. पण त्या माणसाची परिस्थिती पहा. इथून चार घरं पलीकडेच राहतो. मी ओळखतो त्याला. मुलगा पाठवला असता तर हात लावायचे १०० रुपये घेतले असते. तो बिचारा नाही देऊ शकत एवढे पैसे. आता करेल काही तरी. दोरीने- ताराने बांधून वगैरे.' काय म्हणणार? म्हटले तर दुकानदाराची समजूतदारी. अन म्हटले तर वर्तमान स्थितीवरील भाष्यही. वर्तमान अर्थकारणाने निर्माण केलेले असे अनेक प्रश्न, उपप्रश्न, प्रवाह सतत अनुभवायला मिळतात. यांना अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात स्थान नसते अन अर्थसंकल्पातही. शास्त्रे, धोरणे, योजना, व्यवस्था जगण्याशी कधी जोडल्या जाणार?

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१६

राजकारणाची पापे

अनेक गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे, योग्य गोष्टी बाजूला सारणे, सोयीचे अर्थ काढणे आणि सोयीचा व्यवहार करणे, विशिष्ट शब्द प्रचलित करून त्यांना सन्मान वा अवमान बहाल करणे, छोटे छोटे असंख्य गट असंख्य आधारांवर तयार करून त्यांच्यात संघर्ष सुरू करून कायम करणे. अन या साऱ्यांचे समर्थन करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे; ही १९४७ नंतर भारतीय राजकारणाने केलेली पापे आहेत. यामुळे निर्माण झालेली परिस्थिती निर्मल करण्यासाठी त्याच मार्गाने जाणे उपयोगाचे नाही.  हा narrative बदलणे हे मोठे आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१९

प्राणवायूने मृत्यू

प्राणवायू मिळत नाही म्हणून मृत्यू होत असतानाच, प्राणवायूमुळे मृत्यू व्हावे. याला नियतीशिवाय काय म्हणणार? चर्चा, दोषारोप खूप होतील. गलथानपणा, तांत्रिकतेचा अभाव इत्यादी इत्यादी. पण याच नाशिकच्या रुग्णालयात प्राणवायूचा उपयोग केला जात होताच. प्राणवायू हाताळणारे लोक होतेच. टँकरवर काम करणाऱ्यांनी याआधीही तेच काम केलेले. पण यापूर्वी अशी दुर्घटना घडली नाही. आताच घडली. काय म्हणायचं? दोषारोप, राजकारण हा सगळा घाणेरडेपणा होईलच. मुद्दा अपघाताच्या समर्थनाचा नाही, दुर्दैवी मृत्यूंची वेदना आहेच. परंतु मानवी प्रयत्न आणि कौशल्ये यापलीकडेही काहीतरी असतं हे ध्यानी घेतलं तर आक्रस्ताळेपणा, अनावश्यक गोंधळ या गोष्टी तर कमी होतीलच. शिवाय कामे अधिक जबाबदारीने पार पाडण्याची वृत्ती विकसित होत जाईल. धीर मात्र हवा.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२१

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

सामाजिक स्वभाव

वय वर्षे १५ ते ६० यांच्यासाठी रोज एक तास श्रमदान सक्तीचे केले तर? वस्ती, सदनिका, कार्यालये, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे; अशा सगळ्या ठिकाणी श्रमदान. कोणालाही कोठेही जाऊन त्या कामात सहभागी होण्याची मुभा असावी. या कामाची नोंद, त्यावर आधारित प्रमाणपत्र किंवा अन्य सवलती वगैरे गोष्टी दूरच ठेवाव्यात. हां, नोंद नाही केली तर कदाचित सक्तीचे नाही करता येणार. पण एक वातावरण तयार करून, तसे आवाहन समाजाला करायला काय हरकत आहे? यात पद, हुद्दा, व्यवसाय वगैरे काहीही आड यायला नको. १५ ते ६० वयोगटातील सगळ्या स्त्री पुरुषांनी आपणहून श्रमदान करावे. कोणी जगातला मोठा कुबेर असो, कोणी डॉक्टर असो, अभियंता असो, शिक्षक, प्राध्यापक असो, पत्रकार, लेखक असो, बँक कर्मचारी वा अधिकारी असो... अगदी कोणी म्हणजे कोणीही. एक तास श्रमदान करायचे. किती मोठे काम होऊ शकेल. शाळा, महाविद्यालये, कारखाने, कार्यालये, रेल्वे स्थानके, बसस्थानके, भाजीमंड्या, रस्ते, नद्या, घाट; सगळा देश चकाचक होऊ शकेल. कोट्यवधी वृक्षांची लागवड होऊ शकेल. कार्यालयीन धारिका (फायली), ग्रंथालये, पुस्तके सगळी नीट लावली जातील. रस्ते तयार होऊ शकतील, तलाव खोदले जाऊ शकतील, अनेक गोष्टींची डागडुजी, रखरखाव होऊ शकेल, रंगरंगोटी होऊ शकेल. अशा एक ना अनेक गोष्टी होतील. मंत्री वगैरेही त्याला अपवाद नाही. अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान सुद्धा अपवाद नकोत. ज्या देशाचे सर्वोच्च नेते सुद्धा एक तास श्रमदान करतात असा जगातील एकमेव देश, असा लौकिक व्हायला काय हरकत आहे? मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत अमुक क्रमांकावर आहेत, पण तरीही ते रोज एक तास श्रमदान करतात; अशी जगभर चर्चा व्हायला काय हरकत आहे. अर्थात हे सहज स्वयंस्फुर्तीने व्हावे. त्याची नोंद, त्याच्या जबाबदाऱ्या वगैरे गोष्टी आल्या की सगळे बिघडून जाते. एक तास श्रमदान करणे हा आपला सामाजिक स्वभाव व्हावा. काय हरकत आहे?

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०१५

भाषेचा आग्रह

वैशाख शुद्ध पंचमी

आदि शंकराचार्य यांची जयंती.

त्यांनी रचलेले निर्वाणषटक. केवळ सहा श्लोकांमध्ये अध्यात्माच्या 'अस्ति' 'नास्ति' दोन्हीचा मेळ घालून केवल सत्याचं दर्शन घडवणारे हे षटक. यासोबतच जीवनविषयक असंख्य प्रश्नांची सोडवणूक करणारे, नित्याचं जीवन जगताना समोर उभे ठाकणाऱ्या असंख्य साध्या वा कूट प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत करणारे, जीवनाला पूर्णतेकडे घेऊन जाण्याची अपार शक्ती असलेले हे सहा श्लोक - निर्वाणषटक.

मात्र भाषेचा फरक किती पडू शकतो ते आज आणखीन जाणवले. इंग्रजीत nirvan shatak असे लिहिल्यास 'शतक' होण्याची शक्यताच जास्त. ते 'षटक' राहण्यासाठी संस्कृत वा मराठीतच हवे. शतक आणि षटक -  केवढा फरक पडतो भाषेने !!

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०१८

प्रज्ञा सिंह

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावरून जो गदारोळ सुरू झाला आहे तो पाहून, आपण एका निर्बुद्ध युगात जगतो आहोत याचा विषाद वाटतो.

- साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे, तक्रार करणारे, ते नाकारणारे किंवा त्यांना शहाणपण शिकवणारे; सगळ्यांनी; फार नाही मिनिटभर स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पाहावे.

- एखाद्या व्यक्तीची भूमिकेनुरूप वेगळी कृती असू शकते हे समजू न शकणाऱ्या समाजाला विचारी म्हणणं शक्य नाही. हेमंत करकरे यांच्या दोन्ही कृती खऱ्या असू शकतात आणि साध्वी प्रज्ञा यांनी त्यांची आपबिती सांगितल्यामुळे करकरे यांनी दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जे शौर्य दाखवले त्याला बाधा येते असेही समजण्याचे कारण नाही. समजा दहशतवादी हल्ला झाला नसता तर? दोन वास्तव गोष्टींची कशीही तर्कशून्य सांगड घालणाऱ्यांना विचार करता येतो असे म्हणणे धाडसाचे होईल.

- सोय, गैरसोय !! सगळ्यात मोठा मुद्दा. एखाद्या व्यक्तीचे हाल, त्याचे सोसणे, त्याचे भोगणे (अन हे सारे तीव्रता, प्रकार आणि प्रमाण यात कितीतरी अधिक) यापेक्षा तथाकथित, ज्याला शेंडा ना बुडूख, असे public perception अतिशय महत्वाचे ठरते; हा तर संतापजनक आणि घोर निराश करणारा भाग आहे. लोकशाही काय, त्यासाठीच्या निवडणुका काय अन एकूणच सगळा तमाशा, त्याची अगतिकता यांची चीड येत नाही. उलट कथित व्यवस्थेचे गोडवे गात थोडं सोसलं पाहिजे, असं म्हणण्याचा निर्लज्जपणा; मानवी जीवनाची आणि या युगाची लाज वाटायला लावतो. साध्वीने सहन करायला पाहिजे असं म्हणण्याऐवजी, त्यांचे वक्तव्य सहानुभूतीने सहन करण्याची शक्ती आपल्यात हवी; असे न वाटणे हा समाजाचा पराभव आहे.

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०१९

दृष्टी मार्क्सचीच

कार्ल मार्क्सने इतिहासाचे त्याचे विश्लेषण आणि आकलन मांडले. अन वर्तमानात सगळीकडे सगळे लोक तोच आधार मानत आहेत. मार्क्सवादाला विरोध करणारेही नकळत त्याचाच आधार घेऊन आपले प्रतिपादन करीत असतात. इतिहासाचा अर्थ, अन्वय, अभ्यास, आकलन हे सगळे मार्क्सच्या परंपरेतून आलेलेच. फक्त याबाबत आमचे म्हणणे योग्य एवढाच भूमिकेतील बदल. इतिहासाकडे पाहण्याची मूळ दृष्टी, इतिहासाचा वर्तमानाशी, भविष्याशी आणि जीवनाशी अनुबंध याबाबत मार्क्सपेक्षा वेगळी, मूलभूत मांडणी करण्याची गरज कोणाला वाटत नाही. मार्क्सवादाला विरोध म्हणजे फक्त मार्क्सवादी (डावे, साम्यवादी, समाजवादी) राजकीय पक्षांना विरोध आणि मार्क्सवादाचा पराभव म्हणजे फक्त त्या राजकीय पक्षांचा पराभव अशी साधारण समजूत असते. मूळ वैचारिक मांडणी, गृहितके इत्यादींचा मूलभूत विचार केला जात नाही.

- श्रीपाद कोठे

२० एप्रिल २०२१

सोमवार, १८ एप्रिल, २०२२

सेवेच्या पलीकडे...

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा आणि `नाम फौंडेशन' या दोन सकारात्मक गोष्टींची चर्चा सध्याच्या पार्श्वभूमीवर सुरु आहे. यातून प्रेरणा घेऊन लोकही व्यक्तिश: अन समूहश: या वा अशा कामांमध्ये सहभागी होत आहेत. ही सुखावणारीच बाब आहे. परंतु हे सारे इथेच थांबायला वा घोटाळायला नको. पाणी, दुष्काळ, शेती, शेतकरी आत्महत्या इत्यादी विषयांच्या मुळाशी जाऊन काही करण्याची गरज आहे. आजकाल सेवा करणे अथवा एखादी समस्या हाती घेऊन ती सोडवण्याचा उद्योग करणे; अन त्यातील यशाच्या प्रमाणानुसार पाठ थोपटणे किंवा थोपटून घेणे हे चालू असते. त्याची सकारात्मक बाजू ध्यानी घेऊनही एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे- मुळात समस्या निर्माण होणार नाहीत वा कमी निर्माण होतील आणि सेवेची गरजच पडणार नाही, असा समाज उभा करण्याचा प्रयत्न हवा. आज दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होते आहे.

पाणी, दुष्काळ, शेती, शेतकरी आत्महत्या इत्यादी विषयांचा संबंध जसा राजकारण, अर्थकारण, नियोजन, धोरणे आदींशी आहे; तसाच तो शहरी जीवनशैली, शहरी व ग्रामीण जीवनातील तफावत, मानसिकता, आदर्श आदींशीही आहे. मी जर म्हटले की, ज्या समस्यांसाठी `नाम फौंडेशन' काम करीत आहे त्यांचा संबंध मनोरंजन उद्योगाशीही आहे तर त्यात गैर काहीही नाही. या मुद्याला हसणारे, त्याची टर उडवणारे राहतीलच, पण त्यामुळे वास्तव बदलणार नाही. मनोरंजन उद्योग आज जी स्वप्ने लोकांना विकत आहे, जी जीवनचित्रे लोकांपुढे ठेवीत आहे; त्यातून साधे, कष्टाचे प्रामाणिकपणाचे जीवन जगण्याची प्रेरणा आणि बळ मिळू शकेल का? आम्ही गुळगुळीत, सुखासीन, सुखवस्तू जीवन जगायचे, तेच चित्र स्वप्न म्हणून विकायचे अन समस्येच्या नावाने काही दानधर्म करायचा किंवा टिपे गाळायची हे ढोंग आहे. नाना पाटेकर किंवा मकरंद अनासपुरे हे नक्कीच ढोंग करीत नाहीत. पण बाकी उद्योगाचे काय? क्रांती रेडकर, हेमांगी कवी, रमेश देव यांच्या भूमिका असलेल्या एका चित्रपटात हे ढोंग अतिशय परिणामकारकपणे रेखाटले आहे. पण पुढे काय? चित्रपटात ढोंग रेखाटून वा दाखवून काय होणार? रोजच्या जगण्यातून ते दूर झाले पाहिजे.

शिवाय जी जीवनशैली, जे जीवनादर्श, जे विचार आज समाजात स्थिर झाले आहेत अन पसरत आहेत; तेच या समस्यांसाठी जबाबदार आहेत. सगळ्या गोष्टींचे केंद्रीकरण, मोठ्या शहरातून लहान गावांकडे जाण्याऐवजी गावे ओस पाडून शहरांकडे घेतली जाणारी धाव, कितीही उत्पादन करा, कितीही संपत्ती निर्माण करा- एक तर त्याचा अपहार किंवा नासाडी, निरर्थक गोष्टींना देण्यात येणारी प्रतिष्ठा, निरर्थक गोष्टींना देण्यात येणारे महत्व, त्याचा समाजाच्या विविध घटकांवर होणारा व्यावहारिक, मानसिक, भावनात्मक परिणाम; याही गोष्टींचा पंचनामा आवश्यक आहे. माणसाला किती मनोरंजनाची गरज आहे, मनोरंजन म्हणजे काय, मनोरंजन आणि जीवन यांचा संबंध, आजचे चित्र या साऱ्याचाही साधकबाधक विचार हवा. गावातील मुलेमुली निरर्थक कामे करायला मुंबईसारख्या ठिकाणी येतात. त्यांना चार पैसे मिळतात म्हणून आपणही करुणार्द्र होऊन समाधानाचे उद्गार काढतो. पण असे निरर्थक काम करून चार पैसे मिळवले जातात; तेव्हा आवश्यक अन महत्वाच्या कामांना लागणारे मनुष्यबळ कमी होते हे आमच्या ध्यानातच येत नाही. दुसरीकडे तुम्ही चांगले, सुखाचे जीवन जगायचे अन आम्ही तुमच्यासाठी मातीत, शेणात, उन्हापावसात कष्ट उपसायचे का हा प्रश्नही बरोबर आहे. यातून मार्ग काय? तो कसा काढायचा? या प्रश्नांना थेट भिडावे लागेल. त्यासाठी उथळ, बिनकामाच्या, निरर्थक गोष्टींची आहुती द्यावी लागेल, किंमत चुकवावी लागेल. अनेक चुकीच्या गोष्टी, चुकीच्या आहेत हे स्पष्टपणे सांगावे लागेल. जीवनाचा, जगण्याचा ओघ, प्रवाह वळवावा लागेल, कदाचित पूर्णपणे विरुद्ध दिशेला वळवावा लागेल.

हे करताना असंख्य प्रश्न निर्माण होतील त्यांना व्यावहारिक अन सैद्धांतिक उत्तरे द्यावी लागतील. संपूर्ण जीवनदृष्टीचा फेरविचार करून नव्याने मांडणी करावी लागेल. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या संवेदनशील प्रतिभावंतांनाच याची सुरुवात करावी लागेल. हे शासनाचे काम नाही. मग शासन भाजपचे असो, कॉंग्रेसचे असो, कम्युनिस्टांचे असो, रिपब्लिकन पक्षाचे असो की आणखी कोणाचे. अगदी आपल्यापैकी कोणीही किंवा नाना वा मकरंद पंतप्रधान झाले तरीही हे काम शासन, प्रशासनाचे नाही. प्रतिभावंत कलाकार, विचारवंत, लेखक, साहित्यिक यांचेच हे काम आहे. जगात आजवर त्यांनीच समाज घडवले अन बिघडवले आहेत. समस्यांच्या स्थायी उपायांसाठी सेवेच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १९ एप्रिल २०१६

संकेत - युगास्ताचे, युगोदयाचे

सरकार, मानवी बुद्धिमत्ता, मानवी कौशल्ये, मानवी प्रयत्न, मानवी ज्ञान, विशाल व्यवस्था, विशाल स्वप्ने, सत्ता- संपत्ती- स्वार्थ- संघर्ष- स्वामित्व- ; यांच्या मर्यादा आणि निरर्थकता दाखवून मानवी दंभ मोडून काढणारा हा काळ आहे. हा दंभ मोडून मानवाला, जाणिवेच्या चार पायऱ्या वर चढवणे हा नियतीचा उद्देष असू शकतो. (किंबहुना आहे.) यात नियती किती यशस्वी होते हे येणारा काळच दाखवेल.

महाभारतात भीष्मांच्या तोंडी एक प्रसिद्ध वचन आहे. 'न राज्य, ना राजा; दंड नाही, अन दंड करणाराही नाही' मग लोक कसे राहतील? सुव्यवस्था कशी राहील? भीष्म सांगतात - 'सगळी प्रजा धर्मानुसार चालेल आणि परस्परांचे रक्षण करेल.' शासक आणि शासन यांचे असंख्य प्रयोग अनादी काळापासून होत राहिले आहेत. अगदी भारतातही. मोठमोठे सिद्धांत, मोठाली तत्त्वे, मोठाले विचार, मोठाल्या योजना. सगळे होत राहिले अन कोसळत राहिले. आता हा भ्रमनिरास अधिक पक्का करून 'धर्मानुसारी चालण्याकडे' मानव समाजाला घेऊन जाण्याचा नियतीचा हा प्रयत्न आहे. माणूस हे जेवढे नीट समजून घेऊ शकेल तेवढे त्याचे हित होईल.

मानवी बुद्धी, कौशल्ये, ज्ञान, प्रयत्न या गोष्टी पूर्णतः निरर्थक असेही म्हणता येत नाही आणि त्यांना परिपूर्णही म्हणता येत नाही. मात्र, आजवर कमीअधिक प्रमाणात हेच दोन प्रवाह राहिले आहेत. एक 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' आणि दुसरा 'मानवी प्रयत्नांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या वल्गना.' दोन्हीतील तथ्य आणि दोन्हीच्या मर्यादा ध्यानी घेऊन नवीन मार्ग प्रशस्त करणारी जाणीव उत्पन्न करणे हाही नियतीचा आणखीन एक उद्देश. माणूस हे किती समजून घेईल त्यावर त्याचा जीवनमार्ग निश्चित होईल.

बाह्य, ऐहिक जीवनाची स्वाभाविक ओढ हाच मानवी जगण्याचा आशय आहे असे समजून केलेल्या वाटचालीमुळेच; विशाल व्यवस्था, विशाल स्वप्ने, सत्ता, संपत्ती, स्वार्थ, संघर्ष, स्वामित्व हाच मानवी विचार, व्यवहाराचा पाया झाला. अगदी आध्यात्मिक म्हणवल्या जाणाऱ्या समाजातही हीच स्थिती होती आणि आहे. परंतु यांची मर्यादा आणि निरर्थकता  गळी उतरवून; माणसाला त्याच्या आंतरिक अवकाशाकडे वळवणे हा नियतीचा आणखीन एक उद्देश आहे. या आंतरिक जाणीवेला बौद्धिक मान्यता देणे पुरेसे नाही तर ती मानवाच्या लौकिक आणि अलौकिक अस्तित्वाचा भाग होणे; म्हणजेच जाणिवेच्या चार पायऱ्या वर चढणे. नियती देत असलेला हा पाठ माणूस शिकला तर त्याचेच भले आहे.

नियती युगास्ताचे आणि युगोदयाचे संकेत देते आहे.

- श्रीपाद कोठे

सोमवार, १९ एप्रिल २०२१

रविवार, १७ एप्रिल, २०२२

Naked and afraid

सध्याची एकूण परिस्थिती गंभीर आहे यात वादच नाही. प्रत्येक जण आपापल्या शक्तीबुद्धीप्रमाणे या परिस्थितीला प्रतिसाद देतो आहे, व्यक्त होतो आहे. दहशत, भीती या गोष्टी तर आहेतच. परंतु प्राप्त परिस्थितीला तोंड देणेही क्रमप्राप्त आहे. सहज discovery वाहिनीवरचा एक कार्यक्रम आठवला. कार्यक्रमाचं नाव आहे naked and afraid. एक प्रकारचा साहसी खेळ किंवा challenge असं या कार्यक्रमाचं स्वरूप. दोन व्यक्तींनी (एक महिला व एक पुरुष किंवा दोन महिला किंवा दोन पुरुष) २१ दिवस जंगलात राहायचं. २१ दिवस पूर्ण दिवसरात्र नग्न. कोणतीही सोय, सुविधा, साधने नाहीत. दोघांना विशिष्ट ठिकाणी सोडलं की त्यांनी आजूबाजूला शोध घ्यायचा. दोघांच्या दोन बॅग्स ठेवलेल्या असतात. त्यात एखादा चाकू, एखादी करवत, एखादं भांडं, एखादी चकमक, नकाशा अशा दोन चार वस्तू असतात. ते २१ दिवस काय खायचं, पाणी कोणतं अन कसं प्यायचं, निवारा कसा तयार करायचा, आग कशी पेटवायची, चकमक नसेल तरी जाळ कसा करायचा हे सगळं त्यांनी त्यांचं पाहायचं. थंडी, वारा, ऊन, पाऊस, भयाणता, पशू, किडे; या सगळ्या गोष्टींचा सामना करायचा. बिना कपड्यांनी, बिना अंथरूण पांघरूण, बिना चप्पल जोडे. काही जोड्या पूर्ण २१ दिवस यशस्वी पूर्ण करतात. काही जोड्या पूर्ण करू शकत नाहीत अन परत फिरतात. काही जोड्यातील एक व्यक्ती मध्येच सोडून परतते आणि दुसरी तिच्याहून अधिक काळ राहते किंवा एकट्यानेच उरलेले सगळे दिवस पूर्ण करते. असे सगळे प्रकार. जंगल असल्याने सगळ्याच गोष्टी extreme. त्यात हे लोक चॅलेंज कसे स्वीकारतात, कसे पूर्ण करतात हे हिमतीचंच. यात आणखीन एक प्रकार आहे - naked and afraid alone. यात एकच व्यक्ती २१ दिवस राहते. हे सगळं shoot करतात याचा अर्थ आजूबाजूला कोणीतरी माणसे असतीलच, असा तर्क करता येऊ शकेल. मला याबाबत तपशीलाची माहिती नाही. शोधण्याचा मी प्रयत्नही केला नाही. कोणाला असल्यास द्यावी. पण अशा प्रकारे adverse conditions मध्ये राहण्यासाठी किती धाडस, हिंमत, धैर्य, शक्ती, कणखरपणा, मनशक्ती लागत असेल हाच विचार मला मोलाचा वाटतो. भलेही हे चॅलेंज २१ दिवसांचेच असते पण म्हणून त्याचे मोल कमी होत नाही. कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच त्यात सहभागी होणारे naked राहत असले तरीही त्यात 'तसं' काहीही नाही. आज परिस्थितीनेही आपल्यासमोर एक बिकट चॅलेंज ठेवलेले आहे. ते स्वीकारण्याचं बळ हा कार्यक्रम देऊ शकतो. परिस्थितीला टाळू नये तर भिडावं, हा मला या कार्यक्रमाचा संदेश वाटतो.

- श्रीपाद कोठे

१८ एप्रिल २०२१

शनिवार, १६ एप्रिल, २०२२

तंत्र लोकशाही

वेगवेगळ्या प्रकारच्या लोकशाहीची चर्चा होत असते. तंत्र लोकशाहीची चर्चा मात्र ऐकिवात नाही. अशी तंत्र लोकशाही असायला मात्र हवी. तंत्रज्ञानाचा विकास, त्याचे उपायोजन, त्याचे upgradation अशा सगळ्याच बाबतीत लोकशाही हवी. आज ती नाही. राज्यकर्ते, उद्योजक, तंत्रकुशल लोक यांच्या विळख्यात तंत्रज्ञान अडकले आहे.

एक छोटासा मुद्दा - आपण रोज वापरत असलेले apps अपडेट होत राहतात. अन हे सतत होत राहते. का? कशासाठी? बरं त्यात फार काही तथ्य असतं असं नाही. एखादं function इथून काढून तिथे टाकणे, माहिती- चित्र- चिन्ह- यांची उभी रचना आडवी किंवा आडवी रचना उभी करणे; यासारख्या निरुपद्रवी दिसणाऱ्या, भासणाऱ्या आणि असणाऱ्या बाबी लादल्या जातात आणि या निरर्थक आणि निरुपद्रवी बाबींवर वेळ, पैसा, मन, बुद्धी आणि ऊर्जा वाया घालवावी लागते. कशासाठी? करोडो लोकांच्या या बहुमोल गोष्टी अत्यंत निरर्थक बाबींसाठी वेठीला धरण्याचा अधिकार कोणाला कसा काय असू शकतो? वरून user friendly वगैरे शब्दांचे खेळ करण्याचा निलाजरेपणाही सुरूच असतो. User friendly याचा अर्थ तंत्रकुशल व्यक्तीची सोय किंवा आवड किंवा लहर किंवा सोस; असा नाही होऊ शकत. बहुतांश तंत्रकुशल व्यक्ती या एकांगी, हट्टी आणि उर्मट वृत्तीच्या असतात. अगदी प्लम्बर, गवंडी पासून तर information technology च्या मोठमोठ्या व्यक्तींपर्यंत. हा सार्वत्रिक अनुभव आहे. या तंत्रकुशल व्यक्तींची दृष्टी आणि जाणीव व्यापक करणे नितांत गरजेचे आहे.

खूप साऱ्या गोष्टी आहेत पण त्यासाठी सगळ्यात पहिली बाब म्हणजे तंत्रज्ञान हा शब्द, ही कल्पना, ही बाब यांच्याविषयी मनात असलेला aura निपटून काढणे ही होय. तंत्रज्ञान याकडे तुच्छता किंवा अपार आदर भावना या दोन्ही प्रकारे न बघता अन्य बाबींसारखीच ती एक गोष्ट आहे ही वृत्ती वाढायला हवी. तरच तंत्रज्ञान आणि जीवन हातात हात घालून चालू शकतील.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १७ एप्रिल २०१९

शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२

इकडेतिकडे

१) शब्द न पाळण्याचा एक महारोग समाजाला लागला आहे. त्यात भर म्हणजे दिलेला शब्द पाळू शकत नसल्यास ते संबंधितांना सांगण्याची जबाबदारी आपली नसते, ही अपार श्रद्धा बाळगण्याएवढे बेजबाबदार निर्ढावलेपण आता समाजाच्या अंगी मुरून गेले आहे. कौशल्य विकासात या रोगाच्या दुरुस्तीला काही वाव आहे का माहीत नाही, की हा रोग वाढवणे हाच कौशल्य विकासाचा गाभा होऊन बसेल?

२) दुष्काळाच्या संदर्भात- कर्नाटक भाजपचे अध्यक्ष येडीयुरप्पा यांनी एक कोटी रुपयांची गाडी घेऊन पाहणीला जाणे आणि महाराष्ट्राचे मंत्री एकनाथ खडसे यांच्या दौऱ्यासाठी helipad तयार करण्यासाठी हजारो लिटर पाणी वापरणे; या दोन गोष्टींवरून टीकाटिप्पणी सुरु आहे. ही टीकाटिप्पणी रास्त आहे. ते केवळ भाजपचे आहेत यासाठी त्यावर पांघरूण घालणे वा दुर्लक्ष करणे बरोबर नाही. केवळ संवेदनशीलताच नव्हे, तर एक वेगळी मूल्यभावना रुजवण्याचा प्रयत्न भाजपने करायलाच हवा. ही पक्षाची जबाबदारीही आहे अन पक्षाच्या समर्थक आणि हितचिंतकांची भावना अन अपेक्षाही. बटबटीत भोगवाद या देशाचा स्वभावही नाही अन तो जगासाठी कल्याणकारीही नाही. भाजपने त्याचे समर्थक होऊ नये.

- श्रीपाद कोठे

१६ एप्रिल २०१६

क्रौर्य

 काही तासांपूर्वीची लोकसत्ताची बातमी-

केरळमध्ये एका हॉस्पिटलमध्ये नाळही न कापलेल्या बालिकेचा मृतदेह फ्लश करण्यात आला होता. पाणी तुंबल्याने तपासले तेव्हा लक्षात आले. बाकी माहिती अद्याप नाही.

- माझ्या मते हेही क्रौर्यच.

- प्रत्यक्ष जन्मदात्री माताही (म्हणजे स्त्री) सहभागी असणारच. तिच्या माहितीशिवाय हे कसे होऊ शकेल?

- अशा घटना नवीन नाहीत.

****************************

तू-तू, मी-मी करणे माझा स्वभाव नाही अन हेतूही. माणूस (स्त्री वा पुरुष वा त्याशिवाय) विचारी व्हावयास हवा, त्याचे विचारीपण सखोल- साधकबाधक- परिपूर्ण- व्हावे; हाच हेतू. एकांगीपणा, भडकपणा, निरर्थकता राहू नये एवढेच.

पाहा पटलं तर.

****************************

- क्रूरतेचा उगम कुठे असतो?

- सगळ्याच चांगल्या वा वाईट, मानुषी अथवा अमानुष भाव भावनांचे उगम कुठे? त्यांचे स्वरूप काय? त्यांचे व्यवस्थापन, त्यांचे नियमन, त्यांचा आवाका, अपरिहार्यता, संवेदन; अशा असंख्य गोष्टींचा शांतपणे (थंडपणे नव्हे) विचार करणे हे माणूसपणाचे लक्षण. नुसतेच भडक शेरेबाजी, भडक आक्रोश, थयथयाटी स्त्रीवाद, बावळट मानवतावाद, राजकीय चढाओढ; हे सारेच आत्यंतिक निरर्थक.

*****************************

माहिती म्हणून-

- `क्रौर्य' या विषयावरील विशेषांक संपादित केला होता तेव्हा त्यासाठी विविध अंगांनी `क्रौर्य' विषयाची चर्चा करताना तीन महिलांनी (एक डॉक्टर, एक वकील आणि एक विद्यार्थिनी) सांगितले होते- स्त्रीया पुरुषांच्या तुलनेत अधिक क्रूर असतात.

- `भय' या विषयावरील विशेषांक संपादित केला होता तेव्हा एका वकिलांनी `वैद्यकीय संदर्भात भय' या विषयाचा encyclopedia च पाठवला होता.

व्याप्ती किती असते आणि आपण किती वरवर पाहतो, विचार करतो; याकडे निर्देश करण्यासाठी ही माहिती दिली.

- श्रीपाद कोठे

१६ एप्रिल २०१८

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

चांगलं, वाईट

हे जग छान व्हावं (छान, चांगलं, सुंदर, सुखी, आनंदी यांच्या आपापल्या कल्पना) यासाठी भूतकाळात कोट्यवधी प्रयत्न झाले, वर्तमानकाळात कोट्यवधी प्रयत्न होत आहेत आणि भविष्यकाळीही कोट्यवधी प्रयत्न होतील. पण त्यातील कोणीही यशस्वी झाले नाही.

मात्र,

हे जग वाईट व्हावं (स्वार्थी, कपटी, संघर्षमय, दु:खी, कुरूप, आसुरी यांच्याही आपापल्या कल्पना) यासाठीही भूतकाळात कोट्यवधी प्रयत्न झाले, वर्तमानकाळात कोट्यवधी प्रयत्न होत आहेत आणि भविष्यकाळीही कोट्यवधी प्रयत्न होतील. आणि त्यातीलही कोणीही यशस्वी झाले नाही.

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१५

From panchajanya

उन्होंने (दत्तात्रय जी होसबले- सहसरकार्यवाह, रा.स्व. संघ) बिलियर्ड खिलाड़ी गीत शेट्टी की पुस्तक (सक्सेस वर्सिस जॉय) का उदाहरण देते हुए कहा कि शेट्टी ने अपनी पुस्तक में लिखा है कि जब वह बिलियर्ड के पहली बार विश्व विजेता बने तो उन्हें बड़ा धन मिला, सम्मान मिला, उन्हें कई जगह बुलाया गया। दूसरी बार वे प्रतियोगिता में हार गए। उनके मन में अंतर्द्वंद्व चलता रहा। अंत में वह इस निष्कर्ष पर पहुंचे कि मैं सफलता के लिए खेल को खेला इसलिए हार गया। मैंने खेल का आनंद नहीं लिया। इसके बाद उन्होंने मन में धारणा बनाई कि वे सिर्फ आनंद के लिए खेलेंगे। उन्होंने ऐसा सोचा और खेले, फिर वे जीत गए। वे नौ बार विश्वविजेता बने। इसलिए सेवाकार्य जब करें तो सफलता के लिए नहीं, बल्कि आनंद के लिए करें। (आभार- पांचजन्य)

पांचजन्य में प्रकाशित यह वक्तव्य सभीसे साझा करने के कुछ कारण है-

१) संघ के सेवाकार्यों का भाव स्पष्ट हो.

२) संघ के नेता/ कार्यकर्ता कुछ पढ़ते नहीं, जानकारी रखते नहीं, दुनिया से कटे रहते है, अपने ही खयालों में खोये रहते है, संघ से बाहर कुछ अच्छा हो तो उसकी ओर ध्यान भी नहीं देते, जीवन के संबंध में वो अनभिज्ञ रहते है; इत्यादि जो बातें चलती है, ऐसी जो धारणाएँ समाज में है; वह ठीक हो.

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१५

आघात

काल उत्तर भारतात ७ क्षमतेचा भूकंप झाला. त्याच्या दोनच दिवस आधी ६.८ क्षमतेचा भूकंप झाला होता. कालच्या भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमार सीमेवर होता, तर त्याआधीच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. ६ पेक्षा अधिक क्षमतेचा भूकंप मोठा व गंभीर समजला जातो. गेल्या वर्षी नेपाळला उद्ध्वस्त करणारा भूकंप ७.८ क्षमतेचा होता. अलीकडे भूकंपाचे प्रमाण आणि चर्चा वाढली आहे. या पृथ्वीवर आपण करीत असलेल्या आघातांचा यात वाटा असू शकेल का? जेवढ्या शक्तीने आणि जेवढ्या वेगाने पृथ्वीवर आघात करता येतील तेवढे करणे सुरु आहे. जणू त्याची चढाओढच लागली आहे. अगदी तुम्हीआम्ही देखील यात सहभागी आहोत असे समजायला हरकत नाही. विमाने, रेल्वे, स्वयंचलित वाहने, बांधकामे, अणुस्फोट, सौंदर्यीकरणे, डीजे... अशा अनेक गोष्टी चढत्यावाढत्या प्रमाणात सुरु आहेत. हे धक्के आम्हाला जाणवत नाहीत असे नाही. डीजेच्या हादऱ्यांनी जीव गेल्याच्या गणेशोत्सवातील बातम्याही जुन्या झाल्या आहेत. तरीही हे कमी करण्याऐवजी वाढवता कसे येईल याचाच प्रयत्न सुरु असतो. सामान्य माणसालाही तेच हवे असते. प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ असावे ही जिल्ह्यातील सामान्य लोकांचीही इच्छा असते. तो विकासाचा मापदंडही असतो. हेच योग्य आहे असा आपला समजही असतो. त्यात काही वावगे आहे किंवा असावे हे आमच्या मनाला स्पर्शही करीत नाही. पण आम्हाला वावगे वाटत नसले किंबहुना योग्य वाटत असले तरीही परिणाम होतच असतात. माती, पाणी, डोंगर, जंगल, खनिजे, त्यांचे पोत आणि प्रत हे निसर्गाच्या गतीनेच होत असते. अगदी आईच्या पोटातील बाळाची वाढ होण्यासाठीही अजूनही नऊ महिने लागतातच. आम्हाला मात्र घाई सुटली आहे. आम्हाला दोन दिवसात मूल मिळाले तरी हवे आहे. कदाचित आम्ही ते मिळवूही. आपल्या हातातील गोष्टींचा वेग वाढवूही, पण निसर्गाला वेग वाढवण्यासाठी आम्ही बाध्य करू शकत नाही. हे आघात केवळ भूकंप येण्यापुरते मर्यादित आहेत का? वास्तविक या आघातांचा परिणाम भूगर्भापर्यंत होतो. पाण्याचे स्रोत, पाण्याच्या वाहिन्या विकसित होण्यातही त्यामुळे अडथळे येतातच. अशा पुष्कळ गोष्टी. निसर्गाचा वेग आणि पद्धती यावर आघात करून ती बिघडवणे शेवटी आपल्या तरी हिताचे ठरेल का? आधुनिकता, विज्ञान, प्रगती या नावांनी परिणाम टाळता येतात का? अन हे समजूनही त्यापासून परावृत्त न होणे याला दंभ आणि दर्प याशिवाय काय म्हणायचे?

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१६

महायुद्धांचे आकडे

गेले दोन दिवस सिरीया आणि अफगाणिस्थानातील अमेरिकेच्या हल्ल्यांची चर्चा आहे. काल तर अण्वस्त्र वगळून आज जगात असलेल्या बॉम्बपैकी सगळ्यात मोठा बॉम्ब अमेरिकेने वापरला. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे का अशी सार्थ शंका व्यक्त होऊ लागली आहे. विविध लहानमोठी युद्धे आणि दोन जागतिक महायुद्धे यांच्या माध्यमातून जगावर सत्ता स्थापन करणे किंवा अवांच्छित शक्तींना नियंत्रित करणे यांचे प्रयत्न जगभरात होत आलेले आहेत. अगदी भारतात देखील. रावण वा कंस यांना नियंत्रित करण्यासाठी श्रीराम व श्रीकृष्ण यांनी युद्ध केले. तर राजसूय इत्यादी यज्ञाच्या वेळी होणाऱ्या लढायातून वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न झाले. सिकंदराने विश्ववर्चस्वासाठी लढाया केल्या. शिवाजी महाराजांनी तत्कालीन आतंकवाद निपटून काढण्यासाठी लढाया केल्या. गेल्या दोनशे वर्षांचा इतिहास तर ताजा आहेच. वर्चस्व अथवा त्रासदायक शक्तींचे नियंत्रण या दोनच गोष्टी लढाया अथवा युद्ध यांच्या मुळाशी पाहायला मिळतात. यातील त्रासदायक गोष्टींचे नियंत्रण ही अपरिहार्य आणि आवश्यक बाब आहे. वर्चस्व ही ना अपरिहार्य बाब आहे ना आवश्यक. पण त्रासदायक गोष्टींच्या नियंत्रणासाठी वर्चस्व आवश्यक होऊन बसते. कालांतराने या वर्चस्वातूनच त्रासदायक गोष्टी जन्माला येतात. मानवजातीपुढील हा एक dilemma किंवा paradox आहे.


भारताने यावर उत्तर शोधले आहे. अस्वस्थता आणि संघर्ष या परिस्थितीत करावयाचा व्यवहार आणि शांततेच्या परिस्थितीत करावयाचा व्यवहार यांची फोड करून. जगाला या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत हे पूर्ण लक्षात घेऊनच वाटचाल करावी लागते हे भारताचे म्हणणे आहे. याला अनुसरूनच त्याने कामे इत्यादीची वाटणी केली होती. समाजाला, माणसाला अधिकाधिक `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याचा प्रयत्न सतत व्हावयास हवा ही त्याची एक बाजू आणि त्याला emergency अन contingency यांच्यासाठी सिद्ध ठेवायला हवे ही दुसरी बाजू. `मन-बुद्धी'श्रीमंत करण्याची बाजू अधिक मजबूत करत दुसऱ्या बाजूची गरज कमी करत जाणे हे भारताचे प्राचीन सूत्र. यालाच म्हणायचे सभ्यता आणि संस्कृती. जगाने तर याचा काही विचारच केला नाही. परंतु भारतही मार्गच्युत झाला. त्यामुळे आज स्थिती अशी आहे की गांधी आणि सावरकर यांच्यावरून आपण भांडत बसतो. गांधी आणि सावरकर दोघेही आवश्यक असतात हे आम्हाला उमगतच नाही. emergency अन contingency च्या वेळी गांधी उपयोगाचा नाही म्हणून आम्ही त्याला शिव्या घालतो आणि `मन-बुद्धी'च्या श्रीमंतीच्या मार्गात सावरकर अडथळा ठरतात म्हणून त्यांना शिव्या घालतो. शिव्या घातल्या की प्रतिक्रिया होऊन त्यांचे समर्थक गटतट निर्माण होतात. माणूस आणि समाज जिथल्या तिथेच राहतो. आपले कर्मदरिद्रीपण महापुरुष आणि परिस्थिती यांच्यावर ढकलून आम्ही मूर्खता कुरवाळत बसतो. दोघेही आवश्यक आहेत. दोघांची वेगवेगळी स्थाने आहेत. दोघांची बलस्थाने आहेत अन दोघांच्या मर्यादा आहेत. त्यांचा योग्य उपयोग करून आम्हास पुढे जायचे आहे हे भान आम्ही गमावून बसलो आहोत. जगाला ही दृष्टी देणे हेच भारताचे प्रयोजन आहे. आम्हालाच त्याचे आकलन होत नसेल तर आम्ही जगासंबंधीचे कर्तव्य काय पार पाडणार? अन भारत जगाला ही दृष्टी देणार नाही, जगाच्या जीवनात ती पूर्ण मिसळून टाकणार नाही तोवर; महायुद्धांचे आकडे मोजणे संपणार नाही.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, १४ एप्रिल २०१७

सुविचार

एक सुविचार डोळ्यांपुढून सरकला - 'आतापर्यंत खूप चांगल्या गोष्टी खूप सांगून झाल्या आहेत. आता कृतीची गरज आहे.' मनात पहिला विचार चमकून गेला - 'वाह, लोक किती छान, वेधक, चटकदार लिहितात.' अन पाठोपाठ दुसरा विचार आला - 'किती विचार न करता लिहितात.' हो पूर्ण विचार करून मी हे म्हणतोय. कारण यात दोन गोष्टी गृहित धरल्या आहेत - १) अमुक अमुक गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी आणि २) कोणीतरी सांगतो तसे माणसाने वागायला हवे किंवा कोणी सांगतो तसे माणूस वागत असतो. ही दोन्ही गृहितके योग्य आहेत का? तर या दोन्ही गोष्टी पुष्कळशा काल्पनिक आहेत हे सहज लक्षात येते. चांगल्या गोष्टी समान्यपणे सारख्या असल्या तरीही, परिस्थिती, वेळ, गरजा, अपेक्षा, उपलब्धता, मानसिकता अशा असंख्य गोष्टी त्यावर परिणाम करत असतात. अन कोणीतरी अमुक चांगलं, अमुक वाईट वगैरे सांगितल्यावर त्यानुसार जगाने वागावे ही अपेक्षा तर फारच गमतीशीर. कोणी का वागावे दुसऱ्या कोणाच्या सांगण्याने? मुख्य म्हणजे असे प्रत्यक्षात असू शकते का? माणसे म्हणजे काय कारखान्यात बनवलेली खेळणी आहेत? प्रत्येक माणूस ही निसर्गाची अपूर्व कृती असते. तिचा हेतू, तिचे स्थान, तिची क्षमता सगळंच वेगळं असतं. हाताची पाचही बोटं सारखी असतात का? त्यामुळे चर्चा, उपदेश, संस्कार वगैरे वगैरे एका साधारण अर्थानेच घ्यावे लागतात. तसे घेतले नाही तर माणूस अवाजवी अपेक्षा करू लागतो, अनावश्यक आग्रही होतो, निराश होतो. अनेकदा सुविचारांची अशीच गत होते.

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१९

महामानवाला भावांजली वाहताना

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या १२५ व्या जयंती दिनी युनोपासून सर्वत्र त्यांना भावांजली अर्पण करण्यात आली हे योग्यच झाले. त्यांच्या जीवनाचा अन विचारांचा उहापोह देखील झाला. काही चित्रवाणी वाहिन्यांनी तर त्यांचे विचार समजून घेण्यासाठी संपूर्ण आठवड्याचे नियोजन केले. दलितांचे मसीहा आणि राज्यघटनेचे शिल्पकार यापेक्षा अधिक असलेले त्यांचे योगदान, त्यांचे अन्य पैलू यांचेही या निमित्ताने दर्शन घडले. राजकीय पक्षांनी त्यांच्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. हे सगळे ठीकच झाले. दिवस मावळता मावळता काही गोष्टी मनात आल्या.

१) या महामानवाने बंधुतेवर जोर दिला होता. ही बंधुता सगळ्या समाज घटकात असावी असे त्यांचे म्हणणे. त्यामुळे सवर्णांनी दलित व अन्य मागासवर्गीय यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. तसेच दलितांनी सवर्ण आणि अन्य मागासवर्गीय यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. अन अन्य मागासवर्गीयांनी सवर्ण आणि दलित यांच्याबद्दल मनात अढी व द्वेष ठेवू नये. आजचे चित्र फारसे सुखद नाही. ते बदलण्याची सुरुवात स्वत:पासून करावी.

२) बाबासाहेब आधुनिक काळातील विचारक्रांतीचे प्रवर्तक होते. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित गोष्टी व्यक्तिवादी न होऊ देणे हे महत्वाचे ठरते. त्यांनी स्वत:च विभूतीपूजेवर कोरडे ओढले होते. आज त्यांना सन्मान देण्याचा विचार त्यांच्या तसबिरी, त्यांचे पुतळे आणि त्यांची स्मारके यातून बाहेर यायला हवा. उदाहरण म्हणून एक सांगता येईल. दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील त्यांच्या संबंधित वास्तू स्मारक करण्यात आल्या. आजच्या निमित्ताने नागपूरच्या श्याम हॉटेलचाही त्यात समावेश करण्यात आला. हे आवश्यक होते का? हे टाळायला नको का? त्याऐवजी श्याम हॉटेलच्या जागेचा उपयोग वसतिगृह किंवा नागपुरात उपचारासाठी किंवा परीक्षा इत्यादीसाठी येणाऱ्या लोकांना आवश्यक असणाऱ्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी करता येणार नाही का? भावना, विचार अन व्यवहार (जागा इत्यादी... वाढत्या लोकसंख्येत जागा हा महत्वाचा घटक आहे) यांची सांगड घालता यायला हवी.

३) त्यांचे महान कार्य असलेल्या राज्य घटनेविषयी नीट विचार करता आला पाहिजे. त्यांनी स्वत:च म्हटले होते की, ही घटना राबवणारी माणसे चांगली नसतील तर तिचा उपयोग होणार नाही. याचा सरळ अर्थ असा होतो की, राज्यघटना आणि माणसे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. राज्यघटना राबवली म्हणजे चांगली माणसे तयार होतील असे नाही, तर राज्यघटना राबवायला चांगली माणसे हवीत. ही कुठून अन कशी येणार? चांगली माणसे तयार होणे अन मिळणे ही राज्यघटनेच्या बाहेरील बाब आहे, असाच त्याचा आशय होऊ शकतो. याचाच अर्थ ती राज्यघटनेची मर्यादा आहे. राज्यघटनेवर एक नजर टाकली तरीही हे स्पष्ट होते. तिचे २२ भाग आणि १२ शेड्यूल यांच्या शीर्षकांची नावे वाचली तरीही हे स्पष्ट होते की, ही राज्यघटना शासन व प्रशासन यंत्रणेची चर्चा करते. मानवी भावभावना, विचार-विकार, व्यवहार, त्यांचे परस्पर संबंध, त्यांचे होणारे परिणाम, अशा अनेक विषयांचा त्यात अंतर्भाव नाही. याच कारणाने स्वत: लिहिलेली राज्यघटना असूनही धर्माचे महत्व त्यांना वाटले आणि राज्यघटना स्वीकारल्यानंतर सहा वर्षांनी त्यांनी बौद्ध पंथाचा स्वीकार केला. थोडक्यात म्हणजे राज्यघटनेचे कार्य आणि तिचा परीघ वेगळा आहे. व्यक्ती अन त्याचे व्यक्तिगत अन सामुहिक जीवन; तसेच त्याच्या जीवनाचा व्यापक आशय हे त्याहून मोठे आहे. त्यामुळे राज्यघटनेला `पोथीनिष्ठ पावित्र्याची भावना' जोडणे योग्य ठरणार नाही. बाबासाहेबांचे अनुयायीच नाहीत, तर त्यांचा विविध कारणांसाठी विविध पद्धतीने उपयोग करून घेणारे लोकही याबाबतीत बोटचेपी भूमिकाच घेताना दिसतात.

- श्रीपाद कोठे

१४ एप्रिल २०१६

मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

decongestion

नागपूरचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ताजी मुलाखत काल झी बिझिनेस वर पाहिली. जमीन अधिग्रहण विधेयकापासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक विषय होते. अन असेच फारसे महत्व नसलेले वा तात्पुरते महत्वाचे विषयच लोकांच्या लक्षात राहतात. पण एक खूप मोठा, महत्वाचा आणि दूरगामी मुद्दा त्यांनी मांडला. तो लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. मुलाखत घेणाऱ्या अमिष देवगणने त्यांना विचारले- `दिल्लीत विकास कामांवर घालण्यात आलेल्या बंदीचे काय?' (याविषयी मला माहिती नाही. हा विचारलेला प्रश्न होता.) त्यावर गडकरी म्हणाले ते महत्वाचे आहे. ते म्हणाले- ही बंदी अतिशय योग्य आहे. अन केवळ दिल्लीच नव्हे तर सगळ्याच मोठाल्या शहरांचं decongession करण्याची आवश्यकता आहे. आज कोणीही इतक्या स्पष्टपणे, धाडसाने आणि ठामपणे हे बोलत नाही. विकासाची आणि माणसांचीही जी धाव सुरु आहे ती भयंकर चुकीची आहे आणि तो प्रवाहच उलटा फिरवण्याची गरज आहे. गडकरींनी ही भूमिका मांडली, यासाठी त्यांचे जाहीर अभिनंदन.

फक्त काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. गेली अनेक वर्षे मी सातत्याने ही भूमिका मांडत आलो आहे. त्यावर लिहित आलो आहे. अगदी पंतप्रधानांना सुद्धा माझ्या सूचना पाठवल्या आहेत. मला एवढंच सुचवायचं आहे की याबाबत त्यांनी गंभीर आणि सजग असायला हवं. उदाहरण म्हणून दोन गोष्टी- १) मुंबईचा विकास आराखडा आणि २) नागपूरच्या विकासाचा प्रयत्न. माझ्या मते या गोष्टींचाही, शहरांच्या decongession च्या संदर्भात विचार व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०१५

Hyper sensitivity

एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर नातेवाईक, आप्त आणि त्रयस्थ यांची विशिष्ट प्रतिक्रिया असते. अन डॉक्टरची अवस्था दयनीय होते. बलात्काराच्या घटनेचेही असेच असते. घटना खरीच असते, अयोग्यच असते, संताप आणणारीच असते. पण त्यावरील प्रतिक्रिया आणि attitude योग्य असतातच असे नाही. प्रशासन म्हणून कडक भूमिका आणि क्रिया आवश्यकच. मात्र समाज म्हणून या गोष्टीचा जेवढ्या शांतपणे विचार करायला हवा तेवढा केला जात नाही. अन याच hiper sensitivity चा गैरफायदा राजकारणी घेतात. राहुल गांधी यांनी मध्यरात्री इंडिया गेटवर हेच केले. राजकारण्यांनी राजकारण करण्यापेक्षा आणि समाजाने अधिक सजग, pro active राहून आपल्या आजूबाजूला अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेणे, वातावरण चांगले ठेवणे, मदतीचे अन्याय पर्याय उपलब्ध करणे, २४×७ आपण तयार असणे; या गोष्टी व्हायला हव्यात. नुसते आरडाओरडा करणे ना प्रसार माध्यमांना शोभत ना समाजाला. आपला आधार वाटला पाहिजे ही भावना वाढली पाहिजे. कोणावर तरी जबाबदारी टाकणे, कोणाला तरी अडचणीत टाकणे, कोणाला तरी खाली मान घालायला लावणे, कोणावर तरी point score करणे; हे आपल्याला हवे आहे की; घटना घडू नये हे हवे आहे? वाईट वाटले, लागले, दुखले तरीही; हे सांगणे- बोलणे- लक्षात घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०१८

सोमवार, ११ एप्रिल, २०२२

आदराचे वागणे

कोणी माझ्याशी आदराने, सन्मानाने, प्रेमाने, आपुलकीने वागावं- बोलावं हा माझा अधिकार असू शकतो का? मला तसे वाटत नाही.

कोणी माझ्याशी आदराने, सन्मानाने, प्रेमाने, आपुलकीने वागावं- बोलावं हे दुसऱ्याचं कर्तव्य असावं का? मला तसेही वाटत नाही.

माझं दुसऱ्याशी चांगलं वागणं किंवा दुसऱ्याचं माझ्याशी चांगलं वागणं, हे वागणाऱ्याचा चांगुलपणा, सज्जनता, सुजनता, सात्विकता यांचा परिणाम असला पाहिजे. वागणाऱ्याची वृत्ती, विचार, जडणघडण आणि त्याला मिळणारे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यांचा यात वाटा असतो. म्हणूनच `चांगला व्यवहार' ही तत्वनिष्ठ बाब नसून, वस्तुनिष्ठ बाब आहे. त्यामुळेच `चांगला व्यवहार' या गोष्टीचे, कल्पनेचे सामान्यीकरण करणे फसवे ठरते. याच कारणाने कायदे, नियम, तत्व इत्यादी गोष्टी एका अर्थी निरर्थक ठरतात. पण म्हणून `चांगले वागणे' याचे महत्व अन आवश्यकता नाही असे होत नाही. मात्र त्यासाठी अन्य बाबींपेक्षा व्यक्तीची समजूतदारी अन परिपक्वता हेच कळीचे मुद्दे ठरतात. `चांगले वागणे' समजूतदारी अन परिपक्वता यांची मागणी करीत असतं.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०१६

काही महत्वाच्या बातम्या...

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती कमी झाली.

- कुठे अन्न मिळतं का यासाठी अमेरिकन लोक गाड्या काढून वणवण फिरताहेत. अन अन्नासाठी रांगा लावत आहेत.

- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना केली आहे की, केंद्राने २० लाख कोटी रुपये अर्थव्यवस्थेत ओतावे.

- आयपीएल रद्द होण्याने क्रिकेट संघटनेला मोठा आर्थिक तोटा होईल.

*************

या सगळ्या बातम्या आर्थिक विषयांच्या आहेत. सगळ्या जगभरच अशा प्रकारचे मंथन सुरू आहे. त्यावर मतमतांतरे व्यक्त होणेही स्वाभाविक आहे. त्यातील दुर्दैवाची गोष्ट एवढीच की, त्या मतांमध्ये अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, ज्या तपासून पाहण्याची गरज आहे. जसे ट्रम्प यांची संपत्ती कमी होणे वाईट आहे असे गृहीत धरले जाते. किंवा क्रिकेट संघटनेला तोटा होऊ नये हे गृहीत धरले जाते. किंवा सरकारने अर्थ व्यवस्था उचलून धरावी, सगळ्यांची संपत्ती सुरक्षित राखावी इत्यादी गृहीत धरले जाते. अशा आणखीनही बाबी. परंतु ही गृहीतके योग्य आहेत का असा प्रश्न मात्र विचारला जात नाही.

ट्रम्प यांची संपत्ती कमी झाली किंवा क्रिकेट संघटनेला फायदा झाला नाही तर त्यासाठी उर बडवायची काय गरज? संपत्तीची वाढ एकरेषीय (linear) राहायला हवी, ती वाढत तर राहायला हवी पण ती कधीच किंचीतही कमी मात्र व्हायला नको. ही अपेक्षाच हास्यास्पद, अव्यवहार्य आणि विसंगत आहे. जीवनाच्या अन्य सगळ्या अंगांप्रमाणे संपत्ती सुद्धा चक्रीय (cyclic) असणेच योग्य असते. आर्थिक बाबींची चर्चा करताना हा मुद्दा महत्वाचा ठरतो.

सरकारने सगळं काही करावं ही देखील अशीच अवास्तव अपेक्षा. भारतात आपण घरात धान्य, किराणा, पैसे साठवून/ जमवून ठेवतो. अतिशय मूलभूत अशी ही सवय आणि वृत्ती आहे. त्यामुळे आमच्याकडे गाड्या नसतील पण आम्हाला अन्नान्न व्हावे लागत नाही. आज आपलेही विद्वान, नियोजनकर्ते अर्थव्यवस्थेतील गाड्यांचे महत्व वगैरे पाजळतात तेव्हा कपाळावर हात मारून घेण्याशिवाय पर्याय नसतो. तथाकथित decision makers ला विचारी होण्याची किती गरज आहे हे सहज लक्षात येणारे आहे.

हीच गोष्ट सरकारने अर्थव्यवस्थेत पैसा ओतण्याची. सरकार नावाच्या यंत्रणेला पैसा देणाऱ्या भांडवलप्रधान व्यवस्थेने विकसित केलेले हे तत्वज्ञान आहे. एक नवा पैसाही कमी न होता तहहयात आपले व्यवस्थित चालायला हवे अशी यांची इच्छा असते. सरकारने पैसा ओतावा पण तो आणावा कुठून? एक तर चलन वाढवा किंवा कर्ज घ्या. चलन वाढवले तरी चलनाची किंमत घसरले आणि कर्ज घेतले तरी घसरेल. गेली कित्येक वर्षे जगभरात हेच सुरू आहे. त्यामुळेच कोरोना असो वा नसो, अर्थव्यवस्था नेहमीच अडचणीत राहतात आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कधीही आपली उद्दिष्टे पूर्ण करू शकत नाहीत. डिजिटल व्यवहार हा काही त्यावर तोडगा नाही कारण त्याने फक्त चलनाच्या वापराची पद्धत बदलते मूळ चलनवाढीची समस्या तशीच राहते. यासाठी संपत्ती निर्माण कशी होते याचा विचार, संपत्तीची चक्रीय व्यवस्था, अन संपत्तीची उद्दिष्टे यांचा मुळातून विचार होणे गरजेचे आहे. हे तात्त्विक वाटण्याचा संभव आहे पण आजची समस्याच मुळात तात्त्विक आहे त्याला जोडतोडीचे व्यावहारिक उत्तर चालू शकत नाही.

भारताचा विचार करायचा तर धाडसाने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. चार दोन अब्जाधीशांची संपत्ती कमी झाली किंवा हॉटेल, गृहबांधणी, आरोग्य या क्षेत्रातील साखळी कंपन्या मोडल्या; मनोरंजन क्षेत्र मोडून पडले तरी उर बडवून घेण्याचे कारण नाही. खानपान, गृहबांधणी, आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती, असंख्य उद्योग यांचं ज्ञान, कौशल्य, मनुष्यबळ आजही भारतभर सगळीकडे भरपूर उपलब्ध आहे. प्रश्न एवढाच आहे की, त्याकडे डोळसपणे पाहण्याची आणि महानगरीय चाकोरीबाहेर पाहण्याची तयारी हवी. जिगर हवी. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तशी वीस लाख कोटींची गरजच नाही. दोन लाख कोटीत देखील देश पुन्हा उभा होईल. प्रामाणिक धाडसाची मात्र गरज आहे.

- श्रीपाद कोठे

रविवार, १२ एप्रिल २०२०

प्रवाह

जीवन हा प्रवाह आहे. अन हा प्रवाह जन्मापासून सुरू होत नाही आणि मृत्यूशी थांबत नाही. जन्म ते मृत्यू हा त्या प्रवाहातील एक छोटासा भाग आहे. हे मान्य करायला वा पटायला धार्मिक, आध्यात्मिक, पुनर्जन्मवादी वगैरे होण्याची वा असण्याची गरज नाही. शुद्ध इहवादी, शुद्ध जडवादी, शुद्ध भौतिकवादी, शुद्ध भोगवादी व्यक्तीबाबतही हेच सत्य असते. कारण ज्याला सामान्यपणे जीवन म्हटले जाते त्याचे पोषण करणारे बहुतेक सगळेच घटक या सनातन प्रवाहातूनच मिळतात. भाषा, भूषा, भवन, भावना, खाद्यपदार्थ, ज्ञान, विज्ञान, अनुभव, जाणिवा, धारणा, गृहितके, कल्पना, सोयी, सवयी, सुरक्षा; अशा असंख्य गोष्टी जीवनाच्या या प्रवाहात सतत वाहत असतात. जन्म ते मृत्यू या टप्प्यात आपण त्यातूनच काही ना काही वेचून घेतो. वेचून घेतलेले कधी तसेच तर कधी बदलून घेतो आणि स्वतःला समृद्ध करतो. त्यातील आपल्याला जे योग्य वाटते ते आणि जे योग्य वाटत नाही तेही या प्रवाहाचं देणं असतं. परंतु जीवनाच्या या प्रवाहीपणाचं नीट आकलन नसलं तर, आपण भविष्याचा कर्ता आणि मालक होण्याचा प्रयत्न करतो किंवा भूतकाळाला नावे ठेवतो, भूतकाळाच्या चुका निश्चित करतो. मुळात आमच्या जीवनाचा जो तुकडा असतो त्या तुकड्याच्या आधारे आणि त्या संदर्भात भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे मूल्यांकन करणे, आजच्या काळाच्या फुटपट्ट्या 'काल'ला किंवा 'उद्या'ला लावणे हे फारसे समजदारीचे म्हणता येत नाही. जीवनाच्या अमूर्त घटकांनाच नव्हे तर मूर्त घटकांना सुद्धा गच्च चौकटीत बांधता येत नाही.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०२१

रविवार, १० एप्रिल, २०२२

कोणीही कोणाचं नसतं !!

तिशीच्या पुढील प्रत्येक जण कधी ना कधी, कुठे ना कुठे; एक वाक्य म्हणतोच- `कोणीही कोणाचं नसतं.’ अगदी सामान्य माणसापासून जगावर अमिट छाप सोडून जाणारे प्रज्ञावंत, प्रतिभावंत सुद्धा हे बोलून, सांगून जातात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज असोत, खलील जिब्रान असो की आदि शंकराचार्य असोत; हे सत्य सांगून गेले आहेत. एकच वाक्य तिघेही सांगतात पण किती फरक असतो त्यात?

कुसुमाग्रजांचे `नटसम्राट’ आप्पा बेलवलकर जेव्हा म्हणतात, `पाठीवर आभाळ घेऊन फिरणाऱ्या त्या हत्तींना विचारा, तेही सांगतील- कोणीही कोणाचं नसतं.’ तेव्हा त्याचा अर्थ असतो, कोणीतरी कोणाचं तरी असायला हवं. कोणी कोणाचं नसतं, या कटू व्यावहारिक अनुभवावरील ती स्वाभाविक मानवी प्रतिक्रिया असते. त्यात थोडासा रोष, तक्रार, वैताग असतो. `कोणी कोणाचं नसतं’ हे वास्तव; वास्तव राहू नये, अशी इच्छा त्यातून व्यक्त होते.

खलील जिब्रानचा `प्रोफेट’ गावातील लोकांना जेव्हा सांगतो की, `तुमची मुले तुमची नाहीत. ती तुमच्यातून आली आहेत.’ त्यावेळी तो `कोणीही कोणाचं नाही’ या सत्याचं तात्त्विक विवेचन करीत असतो. जीवनाचा अनुभव, निरीक्षण, चिंतन, सार्वत्रिकीकरण या आधारावर तो जीवनाचं तत्वज्ञान मांडतो.

आदि शंकराचार्य आपल्या निर्वाणषटकात जेव्हा सगळ्या गोष्टींचं, `हे मी नाही, ते मी नाही’ असं वर्णन करतात तेव्हा तेही `कोणीही कोणाचं नाही’ असंच सांगत असतात. मी- बुद्धी नाही, अहंकार नाही, आई नाही, वडील नाही, गुरु नाही, मोक्ष नाही, बंध नाही, भूक नाही, तहान नाही; असं सांगणारे शंकराचार्य कोणी कोणाचं असण्याची गरजच मोडीत काढतात. मात्र एक फार मोठा फरक ते करतात, अमुक नाही, तमुक नाही असं सांगत असतानाच मग मी कोण आहे हेही सांगतात आणि म्हणतात- `चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम’. मी चिदानंदरूप शिव आहे. म्हणूनच शंकराचार्य जेव्हा `कोणीही कोणाचं नाही’ असं सांगतात तेव्हा ते त्रागा किंवा तत्वज्ञान या स्वरुपात न राहता, `कोणी आणि कोण’ यांच्या सत्यदर्शनाची अनुभूती या स्वरुपात आपल्यापर्यंत येतं.

- श्रीपाद कोठे

नागपूर

शुक्रवार, ११ एप्रिल २०१४

ज्याचा त्याचा प्रश्न

मन आणि बुद्धी हे एकमेकांना पर्याय आहेत अशी आपली पुष्कळदा जाणता किंवा अजाणता धारणा असते. मग आपण ज्याचा वापर करतो तेच महत्वाचे आहे असे आपण हिरीरीने मांडतो. पुष्कळदा तर त्यासाठी आपण सवलतीची अपेक्षा ठेवत असतो. म्हणजे मन वापरणाऱ्याला सुप्त अपेक्षा असते की, बुद्धीच्या त्रुटी किंवा चुका दुर्लक्षित केल्या जाव्यात किंवा त्या माफ केल्या जाव्यात. तर बुद्धीचा वापर करणाऱ्याच्या नजरेत मनाची काही मातब्बरी नसते. भावना, दुसऱ्याचा विचार वगैरे निरर्थक आहे, असे त्याचे मत. कोणताही निर्णय घेताना, योजना करताना, काम करताना, वागताना वगैरे यापैकी एकाचाच वापर करताना आणि त्याचा आग्रह धरताना बहुतेक जण आढळतात. खरे तर विश्वनिर्मात्याने दोन्ही निर्माण करून दोन्हीचे वितरण केले आहे. दोन्हीच्या जागा, प्रयोजन आणि त्या त्या ठिकाणी त्याच्या उपयोगाचे प्रमाण हे त्याने मोकळे सोडले आहे. तीच आपली कसोटी असते. कसोटी पार करणाराच पुढे जात असतो. तिथेच राहायचे असल्यास, `ज्याचा त्याचा प्रश्न.'

- श्रीपाद कोठे

५ एप्रिल २०१५

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्र हा नेहमीच कुतूहलाचा, उत्सुकतेचा आणि वादाचा विषय असतो. आपल्या आयुष्यात काल काय झाले हे एखाद्या अपरिचिताच्या तोंडून ऐकण्यात मौज असते. मुख्य म्हणजे पुढे काय होईल हे जाणण्याची इच्छा तर स्वाभाविकच. त्या बाबतीत प्रत्येकाचे आपापले बरेवाईट, खरेखोटे अनुभव असू शकतात. व्यक्तिश: मला फलज्योतिष या गोष्टीत रस नाही अन मी त्या भानगडीत पडत नाही. मात्र ज्योतिषाचा विशेषत: जन्मपत्रिका या विषयाचा अभ्यास/ वाचन फार छान असते, असे माझे मत आहे. ज्यांना माणसात रस आहे, त्यांनी तर त्याचा अवश्य अभ्यास करावा. मानवी जीवनाचा, मानवी मनाचा, मानवी संबंधांचा, मानवी व्यवहाराचा अतिशय तलस्पर्शी विचार त्यात आहे. त्याची कारणमीमांसा वगैरे नाही लक्षात येणार किंवा नाही पटणार, पण मानवी जीवनाची गुंतागुंत किती आणि कशी असते वा असू शकते, याचा मोठ्ठा पट उलगडत जातो. आपल्याला पडणाऱ्या, सतावणाऱ्या अनेक प्रश्नांचे उत्तम विरेचन त्याने होऊ शकते.

- श्रीपाद कोठे

१० एप्रिल २०१५

चलन निर्मिती

अर्थकारणात आज चलनाचे महत्व जगभरातच वाढले आहे. किंबहुना ते वाढवण्यात आले आहे. ते कमी करणे आवश्यक आहे. ते कसे करता येईल यावर मंथन व्हायला हवे. अभ्यासक, तज्ञ, जाणकार, यात रुची असणारे, समाजाबद्दलच नव्हे तर स्वत:विषयी, माणसाच्या चांगल्या जीवनाविषयी आस्था असणाऱ्या, चिंता आणि चिंतन करणाऱ्या सगळ्यांनी यावर विचार करायला हवा. विषय खूप मोठा आहे. तूर्त एकच संकेत पुरेसा आहे की, शस्त्रात्रे, मद्य, अन्य अमली पदार्थ, सगळ्या प्रकारची तस्करी या आणि अशा गोष्टीतून चलनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. या गोष्टींची ती inherent ताकत आहे. मात्र धान्य, भाजीपाला, कापडचोपड, शरीरश्रम, खनिजे यासारख्या गोष्टींची inherent चलननिर्मिती क्षमता कमी आहे. परिणाम असा होतो की, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चलननिर्मिती होऊन ते ज्यांच्या हाती जाते, त्यांचा जमीन, पाणी, हवा, माणसे या सगळ्या मुलभूत गोष्टींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असतो. आज अर्थकारणात जे पाहायला, अनुभवायला मिळत आहे, तो याचाच परिणाम आहे.

- श्रीपाद कोठे

१० एप्रिल २०१५

'sugar tax' च्या निमित्ताने

ब्रिटनमध्ये शीतपेयांवर `sugar tax' लावणार असल्याची चर्चा आहे. लागेलही. त्यात दोन मुद्दे आहेत. १) साखरेच्या जास्त सेवनाने माणसाचे वजन वाढते. वाढत्या वजनाचा हा धोका कमी करण्यासाठी त्यावर कर लावायचा आणि लोकांना साखरेचे सेवन कमी करण्याच्या दिशेने ढकलायचे. खरंच असं होतं का? होऊ शकतं का? लोक शीतपेये पिणं सोडतील की कर भरणं पसंत करतील? आजवरचा अनुभव पाहता कर भरण्यालाच लोक प्राधान्य देण्याची शक्यता अधिक. असं असताना आणि जगभरात अशा विविध विषयांना मिळणारा प्रतिसाद पाहता असे सहज म्हणता येते की, अशा उपायांनी माणसाचे भले वगैरे फारसे होत नाही. फास्ट फूड, धूम्रपान, दारू आदी विषयांचे हेच आहे. मुळात प्रश्न हा आहे की, कल्याणकारी राज्याने माणसाचे व्यक्तिगत वा सामाजिक आयुष्य किती हाती घ्यावे? मानवी जीवनाचे नियंत्रण राज्य, सरकार, कायदे, नियम यांनी किती करावे? सध्या नियंत्रणे वाढवण्याचा प्रकार वाढतो आहे. अशा प्रकारे माणसाचे भले वगैरे होत नाही हा अनुभव गाठीशी असूनही. याचा दुसरा परिणाम हा झाला आहे की, माणसाचा विवेक, सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा, विचारक्षमता, विचारप्रक्रिया, विचारीपणा, आंतरिक विकास, जबाबदारीची भावना आणि जाणीव, सामूहिक जीवनासाठीची मानसिकता; या साऱ्याचा ऱ्हास होतो आहे. याच ठिकाणी दुसरा मुद्दा लक्षात घेतला तर विषय स्पष्ट होतो. २) काय आहे दुसरा मुद्दा? दुसरा मुद्दा हा की, या `sugar tax' ने ब्रिटन सरकारला जास्त महसूल मिळेल. खरी मेख इथे आहे. आज जगात कोणालाही पैसा पुरत नाही. व्यक्ती असो की सरकार. त्यामुळे वेळोवेळी पैसा मिळवण्याचे विविध उपाय केले जातात. कर, उपकर, सेस आदी त्याच प्रकारात मोडतात. तो किती योग्य वा अयोग्य किंवा ज्यासाठी कर आकारण्यात येतो ते त्याने साध्य होते वा नाही; हा मुद्दाच नसतो. आपल्या तिजोरीत अधिक पैसा जमा होणे हा एकच उद्देश. अगदी ग्रामपंचायतीपासून देशाच्या सरकारांपर्यंत हेच सूत्र. हेच व्यक्तीच्या पगाराच्या बाबतीत. कर्मचाऱ्याला देण्यात येणारे विविध भत्ते हे ज्यासाठी देण्यात येतात ते साध्य होते का? त्याची गरज आहे का? हे प्रश्न अस्थानी ठरतात. उत्पादनांच्या किंमती ठरवण्यात हेच सूत्र. आपल्या तिजोरीत पैसा अधिक जमा झाला पाहिजे. हे सूत्र का रुजले? कारण अर्थकारणाचा जीवनाशी संबंध तुटला. जेव्हा अर्थकारणाचा संबंध जीवनाशी होता तेव्हा- कामाचा मोबदला, त्या मोबदल्यातून खर्च, बचत आणि बचतीचा योग्य विनियोग हे सूत्र होते. खर्चाचा विचार मिळकतीनंतर होत असे. आता खर्चाचा विचार आधी आणि तो जुळवण्यासाठी मिळकतीचा विचार नंतर होऊ लागला आहे. खर्चाला मर्यादा असूच शकत नाही. मग त्या अमर्याद खर्चासाठी पैसा येत राहिला पाहिजे आणि तो वाढत राहिला पाहिजे. चलनवाढ, मंदी, संपत्तीचे असमान वितरण, साधने व संसाधने यांची उधळपट्टी, प्रदूषण, अभाव, अनास्था, अस्वस्थता, ताण, चिंता, स्पर्धा, सामाजिक- कौटुंबिक- मानसिक- अस्वास्थ्य; हे सारे याचे परिणाम आहेत. अधिक खर्च म्हणजे अधिक चांगलं जीवन, अधिक खर्च म्हणजे अधिक दर्जेदार जीवन, अधिक खर्च म्हणजे श्रेष्ठता; त्यासाठी जाहिराती, मालिका, चित्रपट, साहित्य, तत्वज्ञान, विचारव्यूह, शिक्षण, वातावरण यातून सतत आवाहनांचा- प्रलोभनांचा मारा; आणि यातून विकसित होणाऱ्या पद्धतशीर यंत्रणेतून पैसा आणि सत्ता मुठीत ठेवणे; असा हा व्यूह आहे. त्याचा माणसाच्या जगण्याशी वगैरे फारसा संबंध नाही. असलाच तर पैसा आणि सत्ता यावर प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नातील एक पाऊल एवढाच मानवी जगण्याचा संबंध. माणसाच्या जगण्यासाठी पैसा हे सूत्र जाऊन, पैशासाठी मानवी जगणं असा हा प्रकार आहे. या साऱ्या विचारासाठी वेळ आणि इच्छा नसलेला सामान्य माणूस मग, स्वच्छ हवेसाठी `प्राणवायू कर' देऊ लागतो. ज्यावर आपला काडीचाही हक्क नाही त्यावर कर्तेधर्ते कर लावू लागतात आणि तुम्ही-आम्ही living standard च्या उड्या मारू लागतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १० एप्रिल २०१८

मृत्यूचिंतन

कोरोना युरोपात थैमान घालतो आहे. बातम्या असे सांगतात की, त्या देशात मृतदेह ठेवायला पेट्या कमी पडताहेत, मृतदेह पुरण्याच्या जागा कमी पडताहेत. या देशांनी मृतदेहांचे दहन करावे अशी सूचनाही केली जाते. अभिवादनाची भारतीय पद्धती स्वीकारली तर अंत्य संस्काराची पद्धतही स्वीकारावी. पण हे इतके सोपे नाही आणि असे होईल असेही वाटत नाही. कारण अभिवादन करण्यामागे फार मोठी जीवनदृष्टी, मोठे तत्वज्ञान नाही. ते एक gesture आहे. अंत्यसंस्कार करताना मात्र जीवनदृष्टी आणि तत्वज्ञान त्यामागे असते. ज्या देशांमध्ये मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण झाली आहे ते बहुतेक ख्रिश्चन मताचे अनुयायी आहेत. त्यांची जीवनाकडे आणि मृत्यूकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. त्यांच्या धारणा वेगळ्या आहेत. त्यांचे समज वेगळे आहेत. हे सगळे एकाएकी टाकून देणे शक्यही नसते आणि तशी अपेक्षाही करता येत नाही. मात्र या पार्श्वभूमीवर जीवन आणि मृत्यू याकडे पाहण्याच्या, या बाबी समजून घेण्याच्या विविध विचारांची चर्चा होऊ शकते नव्हे ती झालीही पाहिजे. कारण त्यातून ही समस्या या क्षणी किती कमी होईल हा भाग महत्वाचा नाही. ती तशीही लगेच कमी होण्याची शक्यता कमीच आहे. परंतु जीवन आणि मृत्यू संबंधीच्या दृष्टीची ही चर्चा दोन बाबींच्या मुळाला हात घालेल. एक म्हणजे मानवी मृतदेहांच्या दफन पद्धतीने निर्माण केलेल्या समस्यांना (कोरोना निरपेक्षपणे) त्यातून उत्तर मिळेल. अन दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे - यातून एकूणच जीवनदृष्टी आणि जीवनमूल्यांना आकार देता येईल. आज जगभर एकूणच जीवनासंबंधी जो चर्चेचा नुसता चोथा केला जातो आणि मार्ग काही निघतच नाही, तो मार्ग यातून निघेल. मृत्यूच्या विचाराशिवाय जीवनाचा विचार अपूर्ण आहे. आम्ही भारतीय सुद्धा आत्मा, परमात्मा खूप बोलतो पण त्याला कांदे, बटाटे, टमाटे याहून अधिक किंमत देता येत नाही. या आत्मा, परमात्मा आदीचं नीट आकलन, त्याचा योग्य बोध आणि त्यानुसार जीवनाची रचना करायची असेल तर मृत्यूचा विचार क्रमप्राप्त ठरतो. मृत्यूचा विचार म्हणजे मृत्यूला कवटाळणे नाही तर त्याच्या स्वरूपाचा विचार. जीवनाच्या अर्थपूर्ण स्वीकारासाठीचा विचार. पाश्चात्य आणि भारतीय विचारांचा फरक समजून घेण्यासाठीही हे महत्वाचे आहे. रामकृष्ण मिशनचे पूर्व अध्यक्ष, जागतिक कीर्तीचे विद्वान विचारावंत, ब्रम्हलीन स्वामी रंगनाथानंद 'भारतीय संस्कृती का सार' या त्यांच्या व्याख्यानात म्हणतात - 'कोई भी तत्वज्ञान मृत्यू की समस्या सुलझाए बिना प्रगल्भता प्राप्त नहीं कर सकता. युनानी संस्कृती के महत दोषो मे से यह एक था.' वर्तमान पाश्चात्य जीवन, जीवनदृष्टी,  जीवनमूल्य, तत्वज्ञान यांच्या मुळाशी ही युनानी संस्कृती आहे, असे प्रतिपादन करून लोस डिकीनसन यांचे एक मत ते उद्धृत करतात की, 'जितनी अधिक पूर्णता से युनान को जगत अपने घरसदृश लगा, जितनी खुशी से और स्वतंत्रता से अपनी शक्तियो का प्रयोग करने से उसने स्वयं को तैय्यार किया, जितनी प्रबलता और तीव्रता से उसने कार्य और उमंगभरा जीवनयापन किया, उतना ही विसंगत, कटू और समझ से परे ऐसी वृद्धता और मृत्यू की विलक्षणता का उसे दर्शन हुआ. इस समस्या पर उसे अपने धर्म द्वारा केवल अत्यल्प प्रकाश मिला. और उससे भी कम सांत्वना मिली. युनानी जीवनसंगीत का यह बेसुरीलापन समाप्त किये बिना इस संस्कृती की न्यूनता खतम नहीं होगी.' आज पाश्चात्य जगतच नव्हे तर पाश्चात्य जीवन हेच जगाचे कमीअधिक जीवन झाले असल्याने संपूर्ण जगापुढे हे मूलभूत संकट पुन्हा उपस्थित झाले आहे. केवळ सध्याच्या समस्येवर मार्ग काढणे एवढेच याचे स्वरूप नाही अन तेवढ्याने भागणारेही नाही. त्याहून अधिक खोल जाण्याची गरज आणि परिस्थिती आज मानवासमोर आलेली आहे. ज्या हिंदू/ भारतीय चिंतनाला हे आव्हान पेलावे लागणार आहे, त्यासाठी हिंदू/ भारतीय समाज तयार आहे का? किती तयार आहे? काळच सांगेल.

- श्रीपाद कोठे

शुक्रवार, १० एप्रिल २०२०