सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

राष्ट्रसंतांचे ग्रामनिर्माण विषयक चिंतन

चंद्रपूर जिल्ह्यातील नेरी येथे काल (रविवार २१ डिसेंबर २०१४ रोजी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पार पडले. तेथे `राष्ट्रसंतांचे ग्रामनिर्माण विषयक चिंतन' या विषयावर बोलण्याचा योग आला. ते भाषण आंतरजालावरील मित्र, रसिक अन अभ्यासू वाचकांसाठी.


राष्ट्रसंतांचे ग्रामनिर्माण विषयक चिंतन

राष्ट्रसंत वं. तुकडोजी महाराजांनी गावाचा सखोल विचार केला असून त्यासंबंधात नेमके व्यावहारिक मार्गदर्शनही केले आहे. त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाचे नावच `ग्रामगीता' असे आहे. ग्रामगीतेमध्ये प्रत्येकी पाच अध्यायांचे आठ भाग असून प्रत्येक भागाला पंचक असे म्हटले आहे. त्यातील तिसरे पंचक हे `ग्रामनिर्माण पंचक' आहे. यात ११ ते १५ या पाच अध्यायांचा समावेश आहे. ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माणकला, ग्रामआरोग्य आणि गोवंशसुधार अशी या पाच अध्यायांची शीर्षके आहेत. अकराव्या `ग्रामरक्षण' या अध्यायात १०९ श्लोक आहेत. या १०९ श्लोकांचे तीन भाग केले असून प्रत्येक भागाला वेगवेगळे शीर्षक दिले आहे. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- गावातील असुर व ग्रामसेनेची आवश्यकता. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे- सात्विकता पण दुबळी नको; चांगुलपणातही तारतम्य ठेवा. तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- ग्रामसेनेचे कर्तव्य. बाराव्या `ग्रामशुद्धी' या अध्यायात १०८ श्लोक आहेत. या १०८ श्लोकांचे चार भाग केले असून प्रत्येक भागाला वेगवेगळे शीर्षक दिले आहे. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- खेड्याची दुरवस्था, तिचे कारण व उपाय. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे- ग्रामसफाईची परंपरा व रामधूनची भूमिका. तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- खताचे महत्व व व्यवस्था. चौथ्या भागाचे शीर्षक आहे- रामधून वर्णन. तेराव्या ग्रामनिर्माणकला या अध्यायात ११८ श्लोक असून त्याचे तीन भाग केले आहेत. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- गावच्या दारिद्र्याचे कारण व स्वावलंबनाचे महत्व. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे- उपयुक्त स्वावलंबी कला व तिचा विकास. तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- कलात्मक आदर्श ग्रामरचना. चौदाव्या ग्रामआरोग्य या अध्यायात १३० श्लोक असून त्यांचे चार भाग आहेत. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- रोगराईची कारणे व लोकांचे अज्ञान. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे- आदर्श दिनचर्येची आवश्यकता व भाग्यवंताची व्याख्या. तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- प्रात:कालीन कार्ये व प्रार्थनासमय. चौथ्या भागाचे शीर्षक आहे- सात्विक भोजनाचे महत्व. पंधराव्या गोवंशसुधार या अध्यायात ९६ श्लोक असून त्यांचे पाच भाग आहेत. पहिल्या भागाचे शीर्षक आहे- गाईच्या ऱ्हासाची कारणे. दुसऱ्या भागाचे शीर्षक आहे- गोमातेचे दिव्यत्व. तिसऱ्या भागाचे शीर्षक आहे- गोवंश सुधारणेची आवश्यकता व उपाय. चौथ्या भागाचे शीर्षक आहे- सात्विक आहार व उत्पादक व्यायाम. पाचव्या भागाचे शीर्षक आहे- सदाचार प्रभाव.

तुकडोजी महाराजांनी ६० वर्षांपूर्वी केलेली वर्णने आणि विश्लेषण आजही लागू पडेल असे आहे. गावातील वातावरणाची चर्चा करताना ते म्हणतात- `सज्जन लोक म्हणतात की, आम्ही चांगले काम करतो. मिळूनमिसळून राहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही संघटना केली, सज्जनांना निवडून आणले. दुर्जनांपुढे मात्र काही चालत नाही. त्यांना कितीही समजावून सांगितले, त्यांची सेवा केली; तरीही ते जुमानत नाहीत. पदोपदी अडवणूक करतात, कार्यकर्त्यांना विरोध करतात. चांगल्याचे वाईट कसे होईल याचा प्रयत्न करतात. वातावरण बिघडवतात. सज्जनांवर संकट आणतात. कारस्थाने करतात. सत्तेचा पाठिंबा मिळवून दहशत पसरवतात. यावर काय करावे?' आज आपण ज्या तक्रारी करतो त्यापेक्षा यात काय दुसरे आहे? ६० वर्षांपूर्वीचे रडगाणे आजही तसेच आहे. कारण माणूस हा माणूसच असतो. कधीही आणि कुठेही. सत्तेच्याही मर्यादा असतात आणि केवळ चांगली माणसे निवडून दिलीत की झाले हा समजही खोटा आहे, हेच तुकडोजी महाराजांच्या या विवेचनातून स्पष्ट होते. पण मग करायचे काय? यावर काय काहीच उपाय नाही?

तुकडोजी महाराज म्हणतात-
मित्रा ! जो जो जेथीचा रोग, तेथेचि त्याची औषधी सांग
योजकचि पाहिजे कराया उपयोग, कुशलपणाने...

पुढे महाराज म्हणतात- सत्य कमजोर पडल्यावर असत्य शिरजोर होते. त्यामुळे सत्याने कठोर, सामर्थ्यशाली झाले पाहिजे. सत्याचे बळ कसे वाढेल तेही त्यांनी सांगितले आहे. लोकांमध्ये दहशत असली तरीही तळमळीच्या लोकांनी सक्रिय संघटन वाढवावे. संघटनेचे महत्व सांगताना ते म्हणतात-

हत्तीस आवरी गवती दोर, मुंग्याही सर्पासी करिती जर्जर
व्याघ्रसिंहासी फाडिती हुशार, रानकुत्रे संघटोनी

या संघटनेने काय करावे यावर महाराज म्हणतात- संघटनेने अन्याय निर्मूलन करून न्यायदान करावे. गावाचे रक्षण करावे. सगळ्यांनी आपले दु:ख संघटनेला सांगावे आणि संघटनेने कोणावर अन्याय होऊ देऊ नये. यासाठी प्रामाणिक, त्यागी, निर्भय, चरित्रवान लोक संघटनेत असावेत. गावाच्या या सेवकांनी प्रसंगी गावाचे सैनिक व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. काही अपराध घडल्यास त्वरित सगळ्यांना सांगावे. हाक देताच सगळ्यांनी एकत्र व्हावे. एखादा समजूतदार असून सहकार्य करीत नसेल तर त्याला चिमटे घेऊन उठवले पाहिजे असे महाराजांचे परखड मत आहे. गुन्हेगाराला प्रथम समजावून सांगावे. पण तो मानला नाही तर; बहिष्कार, असहकार करून त्याचे आधार तोडावे. नाक दाबले की तोंड उघडते, असे महाराजांचे सरळसोट पण जहाल तत्वज्ञान आहे. असा हा गुन्हेगार तरीही ऐकत नसेल आणि सत्तेच्या प्रभावाने उन्मत्त झाला असेल तर त्याची गावातून हकालपट्टी करावी, असा त्यांचा सल्ला आहे. महाराजांचे हे उपाय आज अमलात आणले तर कोणाकोणाला गावातून हद्दपार करावे लागेल याची कल्पनाच केलेली बरी. उठसुठ, काहीही समजून न घेता तुकडोजी महाराजांचे नाव घेणाऱ्या किती नेत्यांना आणि सामान्य माणसांनाही त्यांचे हे जहालपण मानवेल आणि पेलवेल? त्यांच्याच शब्दात सांगायचे तर-

ऐसी असावी गावाची तयारी, तरीच गाव बनेल स्वर्गपुरी
नलगे सत्ताधीशांची तुतारी, पाठीमागे...

यावर कोणाच्याही मनात सहजच येणाऱ्या प्रश्नाची चर्चाही तुकडोजी महाराजांनी केली आहे. कोणता तो प्रश्न? शांतीचा पुरस्कार करणारे तुकडोजी महाराज इतके जहाल कसे काय? सज्जन, दुर्जन यांच्यात सारखाच भगवान आहे; दया, क्षमा, शांती हीच खरी संपत्ती असे विचार ऐकून काय करावे? महाराज खणखणीत शब्दात सांगतात-

ऐका ऐसी विचारसरणी, ऐकोनी भुलू नये कोणी
तारतम्यची ठेवोनी मनि, गाव सुधारावे विचारे...

चोरबाजारातही नोकर इमानदारच पाहिजेत, असे लक्षात आणून देत महाराज म्हणतात, सेवा कोणाची करावी, कोणाची नाही याचेही तारतम्य असले पाहिजे. शांती, क्षमा, विश्वासूपणा, परोपकार या गोष्टी प्राण गेल्या तरी सोडू नये, हे सांगतानाच, जेथे निर्दयपण हवे तेथे दगडापेक्षाही कठीण होण्यासाठी महाराज सांगतात. गांज्यात भिक उडवणारा भिकारी, साधूच्या वेशात लोकांना ठकवणारे; यांच्यावर केलेली दया म्हणजे दया नव्हे. सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन म्हणजे धर्मपालन, हा हजारो वर्षांपासून या देशात उचलून धरला गेलेला विचारच तुकडोजी महाराज आग्रहाने, जोरकसपणे ग्रामरक्षणासाठी पुढे मांडतात. मुक्याला शांत आणि दुबळ्याला भोळा म्हणणे तुकडोजी महाराजांना मान्य नाही. त्यांनी यावर कठोर कोरडे ओढले आहेत. असा सज्जन कार्यकर्ता कसा असावा याची अपेक्षा व्यक्त करताना महाराज म्हणतात- तो चकाट्या न पिटणारा, कोणालाही न फसणारा, परनिंदा न आवडणारा, अडल्यापडल्याला धावून जाणारा, कोणी उणीदुणी करत असेल तर तत्काळ उठून जाणारा, मागे न बोलता तोंडावर बोलणारा, निर्भय-निर्मळ, अहंकारापासून दूर, संकटात न घाबरणारा जो असेल तोच शांत सात्विक समजावा आणि तोच गावाचे हित करू शकेल, असा विश्वास महाराज व्यक्त करतात.

अशा सज्जनांच्या ग्रामसेनेने काय करावे? दारू, गांजा, भांग, अफू, जुगार, वेश्या या गोष्टी गावात उरू देऊ नयेत; व्यसनांचे निर्मूलन करावे; अनिष्ट प्रथा, बळीची प्रथा, अंधश्रद्धा बंद कराव्या; परस्परांना मदत करून अडीअडचण सोडवावी; प्रसंगी स्वत:ची जागा- जमीन देऊनही सगळ्यांची सोय करावी; लग्नकार्यात सगळ्यांनी कामाला धावून जावे, केवळ आईवडिलांवर भार पडू देऊ नये; सगळ्यांनी थोडेथोडे जमवून वरवधूंना साहित्य द्यावे; आग लागणे, विहिरीत पडणे, कॉलरा येणे, मूर्च्छा येणे अशा प्रसंगी लगेच धावून जावे. असे सहकार्य वाढत राहिले तर गावाला काहीच उणे पडणार नाही, असा त्यांना विश्वास होता.

अकराव्या अध्यायात ग्रामसेनेची विस्तृत चर्चा केल्यानंतर ग्रामगीतेच्या बाराव्या अध्यायात तुकडोजी महाराजांनी ग्रामशुद्धीचा विचार केला आहे. पुस्तकात, कवितेत गावाचे फार रम्य वर्णन असते परंतु प्रत्यक्ष गावात काय स्थिती असते? सगळीकडे घाण, रस्त्यावर आलेले ओटे, त्यामुळे रस्त्याने गाडी जायला त्रास; कोणी घरातली नाली रस्त्यावर काढली, कुठे सांडपाणी साचलेले, त्यावर डास- अळ्या- किडे, त्यामुळे रोगराई; गुरेढोरे रस्त्यावरच बांधलेली, केर- काचा- खिळे- सडकी फळे- शेंगा- टरफले- अन्न- काहीही वाटेल ते रस्त्यावर किंवा कुठेही टाकून दिलेले किंवा पडलेले, सांडलेले; सगळे रस्ते विष्ठेने भरलेले, उकिरडे साचलेले; जुन्या विहिरींची डागडुजी नाही, पाण्यात पाचोळा सडतो आहे; अशी गावांची विचित्र स्थिती. वरून म्हणायचे `खेड्याकडे चला'. कोण चलणार खेड्याकडे? गावातले वतनदार, इजारदार, ग्रामजोशी, वेशकर असे ज्यांना ज्यांना म्हणून जबाबदाऱ्या होत्या ते ते चुकले. त्यामुळे गावाची ही अवस्था झाली. महाराजांच्याच शब्दात सांगायचे तर-

जे जे गावी शहाणे झाले, शक्तीयुक्तींनी पुढे निघाले
ते सर्व शहराकडे धावले, म्हणोनी माजले रान येथे

हे सगळे दुरुस्त करायला शहाण्यांनी पुन्हा गावाकडे जावे. आदर्श गाव हाच राष्ट्राचा पाया आहे, असे महाराजांचे सांगणे आहे.

पूर्वी भंगी, कामदार, महार हे लोक पूर्ण गाव स्वच्छ ठेवीत, नंतर फक्त पाटलांची गल्ली ते सुंदर ठेवू लागले यावर नेमके बोट ठेवून तुकडोजी महाराज म्हणतात- जागोजागी मांडलेले देव, नगरप्रदक्षिणा या गोष्टी साफसफाई व्हावी म्हणूनच योजल्या होत्या. पण आता तर देवांजवळच उकिरडे तयार झाले. नगरप्रदक्षिणेचा तालतितंबा झाला. त्यात बेढंग नाचगाणे शिरले, नीट वाद्ये नाहीत, चांगली भावना नाही, आयाबाया पाहून खिदळणे, चालण्याची शिस्त नाही, जनावरांसारखा धिंगाणा, धक्काबुक्की, शिवाय अस्वच्छता तर पाहायलाच नको. ही प्रदक्षिणेची विटंबना आहे अशी स्पष्ट कानउघाडणी करून महाराज म्हणतात, यासाठीच त्यांनी `रामधून' सुरु केली. `रामधून' ही नवीन गोष्ट नसून, नगरप्रदक्षिणेचीच परंपरा आहे आणि गावाच्या पुनर्निर्माणासाठी आपण ती सुरु केली आहे हेही ते स्पष्ट करतात. सगळ्यांनी मिळून गाव स्वच्छ करावे, नीटनेटके करावे, सुंदर करावे, गलिच्छता निपटून काढावी; असा महाराजांचा हितोपदेश आहे.

गावातून निघणारा कचरा, घाण यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर खतखड्डे करावे, त्यात सगळा कचरा टाकावा, त्यातच जनावरांचे शेणमूत्र टाकावे, म्हणजे त्याचे खत होईल. लोकांसाठीही चरसंडास असावे. त्यामुळे महिलांची कुचंबणा होणार नाही, त्यांचा सन्मानही राखला जाईल. कचऱ्याच्या खताप्रमाणेच मानवी विष्ठेचेही खत बनवावे. याबद्दल तुकडोजी महाराज म्हणतात-

अहो ! ही निसर्गाची रचना, समजलीच पाहिजे सर्व जना
खाद्यचि होते खत जाणा, खतापासोनी खाद्योत्पत्ती

अशा प्रकारे गावातच टाकावू गोष्टींपासून खत तयार करून शेतीचे उत्पन्न घ्यावे. म्हणजे एकीकडे रोगराई दूर होईल आणि दुसरीकडे उत्पन्नही वाढेल. त्यामुळे गावात आरोग्य आणि संपदा नांदेल. मात्र हे समजावून सांगायलाही समिती पाहिजे. त्या समितीने गावात जागृती करावी.

`रामधून' कशी असावी याचेही तपशीलवार मार्गदर्शन महाराजांनी केले आहे. ते म्हणतात- `आधी ग्रामशुद्धी करावी. सूर्यनारायण निघण्यापूर्वी सडासंमार्जन करावे, मार्गावर रांगोळ्या काढाव्या, ठिकठिकाणी संतांच्या - थोर पुरुषांच्या तसबिरी ठेवाव्या, आंब्याची तोरणे बांधावी, मग गांभीर्याने रामधून काढावी. महिला मुलींच्या स्वतंत्र रांगा असाव्या. मिरवणुकीत मध्ये मध्ये गीते म्हणणारे असावेत. सेवकांनी गणवेशात बाजूने चालावे. `रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम' असे प्रथम गायकाने म्हणावे, त्यानंतर सगळ्यांनी म्हणावे. अधूनमधून देशभक्तीची, देवभक्तीची, ग्रामसुधारणेची गीते म्हणावी. शेवटी चौकात किंवा मैदानात समारोप करावा. तेथे भाषणात लोकांना नीटनेटके राहण्यास, सहकार्याने राहण्यास, स्वच्छ राहण्यास, शिस्तबद्ध राहण्यास, प्रेमाने राहण्यास, गावाचा स्वर्ग करण्यास प्रेरणा मिळेल असे मार्गदर्शन करावे. शेवटी जयघोष करून रामधून संपवावी.' या `रामधुन'ने काय होईल? महाराज म्हणतात- लोकांना रस्त्याने धड चालता येत नाही. रामधूनमुळे सहज चालणे- बोलणे येईल, शिस्तीने बसणे- उठणे कळेल, गाणे वाजवणे कळेल, घराघरांची दुरुस्ती होईल, सौंदर्याची प्रीती वाढेल, अस्वच्छतेची प्रवृत्ती मिटेल, सहकार्याची वृत्ती वाढेल, आपण एक आहोत ही भावना वाढेल, आळशीपणा पळून जाईल, गुणप्रदर्शनाला वाव मिळेल, लोक प्रसन्न राहतील. महाराजांनी या `रामधून' उपक्रमाला `सहकार्याची बोधशाळा' म्हटले आहे.

ग्रामरक्षण आणि ग्रामशुद्धीचा विचार सांगितल्यावर महाराजांनी ग्रामनिर्माणकलेची चर्चा केली आहे. तेराव्या अध्यायात पहिल्याच श्लोकात महाराज म्हणतात-

हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे, हे सूत्र ध्यानी ठेवोनी खरे
आपुले ग्रामची करावे गोजिरे, शहराहुनी...

हे सूत्र विसरल्यामुळे गावात दैन्य, दारिद्र्य पसरले. शहरात यंत्रे आली, गावातील उद्योजकता मेली, कुशल माणसे शहरात गेली. गावाची बुद्धी, समृद्धी, कष्टाळू शक्ती, हस्तकला सगळं लोपलं. गावात फक्त शेती उरली, तीही कशीबशी चालवली जाते. शिक्षित, सामर्थ्यवान नोकरीसाठी वणवण फिरतात. अशा परिस्थितीत गावाची उन्नती कशी होणार? हा सवाल करून तुकडोजी महाराज म्हणतात- छोटे उद्योग आणि शेती सगळ्यांचे पोषण करेल, कोणीही दीन उरणार नाही. गावाचा कच्चा माल कमी भावात विकला जातो आणि पक्का होऊन परत येतो तेव्हा दामदुप्पट भावाने घ्यावा लागतो, ही खरी शोकांतिका आहे. त्यासाठी शहरांवर अवलंबून न राहता स्वावलंबन हाच उपाय असल्याचे त्यांचे मत आहे. स्वावलंबी होऊन घरोघर बायका मुलांसहित सगळ्यांनी कष्ट करावे, काही ना काही उत्पादक काम करावे, गावाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी गावातच तयार कराव्या, त्यासाठी आवश्यक कलाकौशल्ये शिकावी, हाती उद्योग आणि मुखी रामनाम असा आदर्श गाव उभा करावा, असे त्यांचे सांगणे आहे.

काय काय कला असू शकतात? महाराज सांगतात- गोड बोलण्याची कला, नेटके राहण्याची कला, अंगमेहनतीची कला, सुंदर लिहिणे, स्पष्ट वाचणे, घरे बांधणे, विटा- मडकी- सूरया- कवेलू- कुंड्या- तयार करणे, लाकूडकाम, हातोडे- खिळे- ऐरणी- कुऱ्हाडी- सापळे- विळे- पावडे- कुदळी- शिंके- तयार करणे, दगडकाम, फडे- झाडण्या- चटया- पलंग- पायपोस- मोट- डवरे- वखरे- कापड- सूत- तयार करणे, शेतीची रचना, झाडे लावणे, घरोघरी भाजीपाला, घराची सजावट; अशा कितीतरी गोष्टी असू शकतात ज्यासाठी गावाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. महाराजांच्याच शब्दात सांगायचे तर-

ऐसी कला असावी कष्टार्जित, स्वावलंबी उद्योगे उन्नत
नखशिखांत ओजही त्यात, जो जीवन जागवी देशाचे...
कुणाची कला शरीर भूषवी, कुणाची टापटीप दर्शवी
कुणाची कला गावची सजवी, हौसेने आपुल्या...
मानवी कला गाव शोभवी, गावाची कला प्रांत जागवी
प्रांताची कला देश भूषवी, वैशिष्ट्याने...

`मुखी राम, हाती काम' या तत्वाने चालणारी सेवकमंडळे गावोगावी असावी. श्रमदानाचे सप्ताह घ्यावेत, रस्ते सगळ्यांनी मिळून दुरुस्त करावे, नदी-तळ्याकाठी स्वच्छता, घाटांची बांधणी- डागडुजी करावी, उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याचा वापर करावा, सडकांच्या दुतर्फा वृक्षारोपण करावे, ठिकठिकाणी मुत्रीघरे बांधावी, कचरा कुंड्या ठेवाव्या, त्यातच कचरा टाकावा, असे मार्गदर्शन करतानाच एक खूप महत्वाची गोष्ट महाराज सांगतात. सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असलेली ही बाब आहे. महाराज म्हणतात- कुठे घरे मोडकी असतील तर सगळ्यांनी तेथे जाऊन ती नीटनेटकी करून द्यावी- `हाही आमुचा' म्हणोनिया. हे सगळ्यात महत्वाचे आहे. `आमचा' ही भावना सगळ्यात महत्वाची. हा माणूस आमचा, हा गाव आमचा, हा देश आमचा. ही भावना नसेल तर कोणतेही काम होणार नाही, झाले तरी त्याला फारसा अर्थ नाही आणि ही भावना असेल तर कोणतेही काम होण्यात अडचण येणार नाही.

पुढे महाराज म्हणतात- मेलेल्या गुराढोरांची नीट ठरलेल्या जागी व्यवस्था लावावी. ठिकठिकाणी सूचनाफलक लावावे, रस्ते, चौक यांना थोरांची नावे द्यावी, रस्त्यावर प्रकाशाची व्यवस्था असावी, गावात शाळा- कोंडवाडा- गुजरी- अवश्य असले पाहिजे. कोणी कोठेही माल ठेवतात, गुरेढोरे मोकाट फिरतात, सांडउबड होते, धक्काबुक्की होते, असे होऊ नये. आम्ही कर देतो त्यामुळे आम्ही मनाला वाटेल तसे वागू, असे म्हणणारेही असतात. त्यांना दुरुस्त करावे, असे महाराज सांगतात. वजन, माप, माल, जागा, पद्धती यासाठी गावाची समिती असावी. पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वानरसेना येऊ देऊ नये. ग्रामरचना सर्वांगीण असावी हे सांगताना महाराज म्हणतात-

सर्वांगीण असावी ग्रामरचना, मनोरंजनासहित पुरवाव्या भावना
जेणेकरून ग्रामवासीयांना, आठव न ये शहराचा...

ही खूप महत्वाची गोष्ट आहे. गावातील लोकांना शहराची आठवण सुद्धा येऊ नये असे गाव असले पाहिजे. हे महाराजांचे स्वप्न होते. मनोरंजन कसे असावे? व्याख्याने, कीर्तने, कलापथक, वादविवाद, पोवाडे, सात्विक नाटके, सुंदर बागा, त्यात वृक्ष- वेली- लताकुंज- क्रीडांगणे- पाळणे- असावे, जातपात विसरून सहभोजन चालावे, गावात विश्रामगृह असावे, ते सगळ्यांसाठी मोकळे असावे, तेथे सुंदर विहीर, भिंतीवर सुवचने असावी, आखाडा असावा, त्यात व्यायाम व्हावा, ग्रंथालय असावे, त्यात पुस्तके- वृत्तपत्रे असावी, गावाचे हस्तलिखित मासिक असावे, घरांना क्रमांक, नावाच्या पाट्या असाव्या, लोकगीते- गोष्टी- कहाण्या- यांचा संग्रह करावा, आरोग्यधाम असावे, त्यात सुतिकागृहाची सोयही असावी, वैद्य- सुईणी यांचे सहकार्य घ्यावे, टपाल कार्यालय असावे; अशा असंख्य सूचना महाराजांनी गावाच्या उभारणीसाठी दिल्या आहेत. ग्रामगीतेच्या तेराव्या अध्यायाच्या अखेरीस आपले मन मोकळे करताना महाराज म्हणतात-

ऐसे गाव होता आदर्शपूर्ण, शहराहुनीही नंदनवन
सर्वांचे करील आकर्षण, सुंदर जीवन तुकड्या म्हणे...

चौदाव्या अध्यायाची सुरुवात करताना महाराज म्हणतात- एका भाविक श्रोत्याने प्रश्न केला की, गावाचे शहर केले तरी देवाचा कोप होऊन रोगराई आली, साथ आली तर काय करायचे? त्यावर महाराज उत्तर देतात- देवदेवता किंवा परमेश्वर कृपामय असतात. त्यांच्या ठायी कोप नाही. अन ते कोपलेच तर दुष्टांवर कोपतात. निरपराध्याला छळणाऱ्याला देव म्हणत नाही. आपलीच कृती आपल्याला जाचत असते. आपणच आपले शत्रू असतो. आपण सगळीकडे घाण करून ठेवली, त्यात जंतू झाले; शुद्ध आहार-विहार नाही, केव्हाही कुठेही, काहीही खाणे, हॉटेलात खाणे, तिखट खूप खाणे; कधीही झोपायचे, कधीही उठायचे; कुठेही थुंकायचे; मग रोग पसरणार नाहीत, साथी येणार नाहीत तर काय? वरून ओरडायचे देवाचा कोप झाला. मग करणी, पिशाच्च, अंगारे धुपारे, कोंबड्या बकऱ्यांचे बळी; हे सगळे चुकीचे आहे हे सांगताना तुकडोजी महाराज एक मार्मिक प्रश्न विचारतात. ते विचारतात- संतांनी देवास प्रसन्न करून घेतले तेव्हा कोणते बळी दिले होते? देवाला ज्या पशुचा बळी हवा तो पशू आहे, आपला भ्रम आणि अभिमान.

गाव निरोगी व्हायला काय करावे लागेल? प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक व्यक्ती आदर्श घडवावा लागेल. त्यासाठी दिनचर्या सात्विक हवी. सगळ्यात पहिले म्हणजे, हवा निर्धार. त्यावरच ऐहिक, आध्यात्मिक उत्कर्ष अवलंबून आहे. नाही तर नियम बियम केलेले असतातच, पण दुर्लक्ष केले की सारे बिघडते. रात्री जागरण करायचे, सकाळी उशीरा उठायचे, लोळत पडायचे, दिवस आळसात घालवायचा याने आरोग्य बिघडते. बद्धकोष्ठता मागे लागते, पोट बिघडते अन मग सुरु होते रोगांची रांग. शिवाय कामे होत नाहीत, नोकरचाकर सुद्धा आळशी होतात, कामे टाळतात. म्हणून सकाळी लवकर उठावे. अन उठल्यावर काय करावे याचेही नेमके मार्गदर्शन महाराज करतात. उठून बसताच अंथरुणातच प्रात:स्मरण करावे. त्यावेळी जो संकल्प करतो की कोणाचेही वाईट होऊ नये, त्याची सन्मार्गाने उन्नती निश्चित होते, असे महाराजांचे सांगणे आहे. त्यानंतर शौचमुखमार्जन करावे, उष:पान करावे, मग थंड पाण्याने स्नान करावे. या ठिकाणी महाराज जे सांगतात ते पाहून आश्चर्यही वाटते. थंड पाण्याने स्नान करावे हे सांगताना महाराज म्हणतात, त्याने त्वचाशक्ती जागी होते आणि सौंदर्य लाभते. मेंदूही थंड राहतो आणि बुद्धीचा उत्कर्ष होतो. स्नानानंतर सामुदायिक ध्यान-उपासना करावी, सकाळी फिरून यावे; धावणे, चालणे, आसने, सूर्यनमस्कार असे सगळीकडे सुरु आहे; असे चित्र गावाचे दिसावे. नंतर काही स्वाध्याय, अभ्यास करावा. मग सगळीकडे स्वच्छता करावी. गडीमाणसांनी मदत करावी पण काम प्रत्येकाने करावे. पूर्वीच्या काळी तिन्हीत्रिकाळ स्नानसंध्या करावयास सांगितले जाई ते संस्कार करण्यासाठीच होते, असे नमूद करून महाराज म्हणतात-

निद्रेचिया आदिअंति, दिवसरात्रीच्या संधीप्रती
आणि भोजनसमयी संकल्प होती, ते बनती दृढ संस्कार...

यानंतर महाराजांनी सात्विक भोजनाचे महत्व विशद केले आहे. महाराज म्हणतात-

जनीभोजनी हरी आळविणे, गीतापाठादी उच्चारणे
सात्विक भाव हृदयी भरणे, शुद्ध करी जीवनासी

ते म्हणतात- यावर कोणी विचारतील की, भोजनात कशाला देव वगैरे पाहिजे? छान हास्यविनोद का करू नये? तर त्याचे उत्तर आहे- भोजन म्हणजे पिंडसंस्कार आहे. भोजन करताना जसा विचार करावा तसेच गुण भिनतात. त्यामुळे स्वच्छ, सुंदर, पवित्र वातावरणात हातपाय धुवून पुसून भोजन करावे. प्रत्येकाने संबंधित काही ना काही काम करावे. अन्न वाढणे झाल्यावर प्रथम शांतीमंत्र म्हणावा, आचमन घ्यावे, चित्राहुती घालाव्या, मग भूमातेचा प्रसाद म्हणून अन्नदात्याचे स्मरण करून यज्ञकर्म करतो आहे या भावनेने भोजन करावे. भोजन करताना वेडेवाकडे बोलू नये, क्रोध करू नये, श्लोक वगैरे म्हणावे. राजस, तामस, सात्विक असे भोजनाचे प्रकार असल्याचे सांगून महाराज म्हणतात, आपल्या प्रकृतीप्रमाणे भोजन करावे. काही जीव चुनखडीही खातात, काही मांस किडेही खातात. मानवाने मानवपणाला शोभेल असे खावे. मद्य मांसाहार करणाऱ्यात विकारबुद्धी वाढते, संसर्ग होतो, रोग लागतात. माणसाच्या गुणांवर आहाराचाही परिणाम होतो हे महाराज स्पष्टपणे सांगतात. संस्कार कसे होतात, गुण कसे अंगी येतात यावर महाराज म्हणतात-

काही आनुवंशिक गुण येती, रक्त रेताचिया मिश्रस्थिती
काही खाण्यापिण्याचेही होती, संस्कार अंगी...
काही संगतीने वळणे लागे, भूमिपात्रे काही परिणाम जागे
काही प्रयत्नशीलतेचे धागे, वळविती जीवा...

महाराजांनी किती चौफेर विचार केला होता हे येथे पाहायला मिळते. माणसाने सात्विक अन्नच ग्रहण करावे हे सांगून ते म्हणतात, सात्विक अन्नच सहज मिळते. भाजीभाकरी, भातपोळी, सूर्यकिरणांनी तयार झालेले शेतातील कंद, भाज्या फळे, कोंडामिश्रित हेच सात्विक अन्न. साधे, सहज, ताजे ते सात्विक. मिठाया, तळकट, तेलकट, मसालेदार, नासके, आंबलेले, खूप तिखट, खूप गोड खाऊ नये, असा त्यांचा स्पष्ट सल्ला आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाणे, जिभेचे चोचले पुरवीत गरजेपेक्षा जास्त खाणे टाळावे. त्याने पोटे बिघडतात, आरोग्य खराब होते, वैद्याकडे धावावे लागते, असे सांगून महाराज म्हणतात-

पहिले खावोनी मस्त व्हावे, मग औषधे घेवोन पचवावे
ऐसे उपद्रव कासयासी करावे, उन्मत्तपणे...
उगीच आहे ऐसे खाणे, पचविण्यासाठी चूर्ण घेणे
अन्नरसाची नासाडी करणे, कशासाठी?

आग्रह करणारे हितचिंतक नसून घातक आहेत असे त्यांचे मत आहे. आहारात गाईचे दुध, तूप असावे असेही ते म्हणतात. चौदाव्या अध्यायाच्या या शेवटल्या भागात महाराज एखाद्या आहारतज्ञाच्या रुपात पाहायला मिळतात.

ग्रामनिर्माण पंचकातला शेवटचा म्हणजे ग्रामगीता ग्रंथातला पंधरावा अध्याय आहे `गोवंश सुधार'. अध्यायाच्या सुरुवातीला गाईच्या ऱ्हासाची चर्चा महाराजांनी केली आहे. कोणी मुद्दा मांडला, `आता गाईच राहिल्या नाहीत. गाईचे म्हणून म्हशीचे दुध पाणी मिसळून विकतात. चपला जोड्यांसाठी करोडो गाईवासरांची हत्या होते. चारापाणी महाग, माणसालाच पोटाला मिळत नाही, तर गायींना काय खाऊ घालायचे?' त्यावर महाराज म्हणतात- `यासाठी आपणच जबाबदार आहोत. गोवंश होता तोवर दारिद्र्य, रोगराई नव्हती. गोमय, गोमूत्र यांनी भूमीचा कस कायम होता. गावागावात धान्याची पेवे भरली होती. गायीगुरांना गोधन म्हणत असत.' मग काय झाले? महाराज म्हणतात-

परि पुढे झाले दुर्लक्ष, काही भोवला राज्यपक्ष
गायी होऊनी बसल्या भक्ष्य, वाढले दुर्भिक्ष त्यागुणे...

आपण चहाकॉफी पिऊ लागलो. त्यासाठी म्हशीच्या दुधाकडे वळलो. अन गायीसोबत सर्वस्वाला मुकलो. ज्याने प्राणी विकून खाल्ला त्याला एकदा संतोष मिळाला, पण ज्याने स्वत:चे पोट बांधून गायीस पाळले त्याला पुढे कायम सौख्य लाभले.

गोमातेचे दिव्यत्व सांगताना ते म्हणतात- `गोरक्षणी स्वरक्षण' या भावनेतून अनेक शूरांनी प्रसंगी गायीसाठी प्राणही दिले आहेत. श्रीकृष्ण, शिवशंकर, वशिष्ठ, दत्तदिगंबर, राजा दिलीप, राजा शिवाजी; हे अपार गोभक्त होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला होता. करतली भिक्षा, तरुतळी वास असे त्यांचे जीवन होते. तरीही त्यांनी गोसेवा टाळली नाही. गायीच्या शरीरात सर्व देवदेवता आहेत हाच त्यांचा भाव होता. गाय देशाचे अधिष्ठान आहे. तिच्या शेणात लक्ष्मीची वस्ती आहे. गोरसात धन्वंतरी, माता सरस्वती असे सगळेच आहेत; असे सांगून महाराज म्हणतात-

गाय जिवंत आरोग्यधाम, तिचे पुत्र प्रत्यक्ष परिश्रम
राष्ट्रसुखाचा मार्ग सुगम, गोसेवेयोगे...

त्यामुळे गोवंशसुधार होईल असे उपाय करणे सगळ्यांचे कर्तव्य आहे. कसाई आपल्या गावातून गायी नेत असेल तर सगळ्यांना त्याचे दु:ख व्हायला हवे आणि त्या गायी गावाने परत आणल्या पाहिजे. गावातील गायींच्या दलालांना हाकलून द्यावे किंवा समजावून दुसऱ्या कामाला लावावे. विकणाऱ्यालाही समजवावे की, एवढ्याने काय तू श्रीमंत होणार आहे? शेण गोमूत्र यांचा उपयोग करून घे, अशी समजूत घालावी. गायीला मरतुकडे ठेवू नये. तिला चारा, पेंड खाऊ घालून हत्तीसारखी करावी. प्रेमाने गोंजारावे आणि प्रसन्न ठेवावे. सांडदेखील आदर्श असावा. बैलाची शेती करावी. महाराज म्हणतात-

उत्तम गायी, सुंदर सांड; पाहता वाटे आनंद उदंड
दुध पिवोनी मुले प्रचंड, शक्ती दाविती..
सर्वथैव यंत्रांनीच काही, शेती सुखकर होणार नाही
गावची संपत्ती गावी राही, सुगम तो मार्ग उत्तम...

गावोगावी गोरक्षण असावे. त्याची योग्य व्यवस्था असावी. निरनिराळे प्रयोग करावे, देशोदेशी काय सुरु आहे त्याची माहिती सगळ्यांना द्यावी. गायीगुरांसाठी दवाखाना असावा. हे सगळे सांगताना एक महत्वाची बाब महाराज सांगतात, गावात चराऊ जमीन असावी. जमीन नसेल तर सरकारकडून त्यासाठी जमीन मोकळी करून घ्यावी. यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही.

पुढे महाराज आहार आणि व्यायामाची चर्चा करतात. सात्विक आहाराचा त्यांचा आग्रह महत्वाचा आहे. ते म्हणतात-

सर्व करावे जे जे करणे, परी सुधारावे सात्विक खाणे
त्यावाचोनी सद्बुद्धी येणे, कठीणची वाटे...

परंतु नुसते खाऊन उपयोग नाही. त्याने मेद वाढेल. त्यासाठी आरोग्यदायी व्यायाम केला पाहिजे. अंगातून घाम निघाला पाहिजे. व्यायामाशिवाय सात्विक भोजन अयोग्य. व्यायामाने जडत्व दूर होते, तरतरी राहते, रक्तव्यवस्था उत्तम राहते. प्रतिकार शक्ती वाढते, स्फूर्ती वाढते. मात्र नुसता व्यायाम करून, शरीर कमावून, पहेलवानी करणे त्यांना पसंत नाही. व्यायामाने शरीर मजबूत करून गावाच्या सेवेसाठी ते लावले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. महाराज म्हणतात-

तोचि खरा पहिलवान, देहउन्नती साधुनी पूर्ण
सेवेसाठी अर्पितो जीवन, हनुमंतापरी...

केवळ दंडबैठका म्हणजे व्यायाम नाही. पाणी काढणे, दळणकांडण, लाकडे फोडणे, जमीन खोदणे; अशा प्रकारचा उत्पादक व्यायाम हा चांगला. त्याने कामेही होतील, आरोग्य लाभेल, खर्चही वाचेल आणि श्रमाला प्रतिष्ठाही मिळेल; असे महाराजांचे सांगणे आहे. वनस्पतींचा सहवास, सुर्यकिरणातील सत्वांश, शुद्ध हवेतील श्रम अमृतासमान होय असे महाराज म्हणतात.

या सगळ्याचं सार सांगताना महाराज म्हणतात-

भोजनस्थानी, निद्रास्थानी, सभास्थानी, उद्योगस्थानी
विशेष प्रसंगी, सहजस्थानी, सद्विचारेची वर्तावे...

अशा रीतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गावाचे एक चित्र रेखाटले आहे. राष्ट्राचा उद्धार व्हायचा असेल तर गावाचा उद्धार व्हायला हवा आणि गावाचा उद्धार गावातील लोकांच्या भरवशावरच होऊ शकतो; हे त्यांचे सूत्र आहे. सरकार त्याच्या स्थानी आहे. पण त्यावर अवलंबून न राहता, त्याच्या तोंडाकडे न पाहता; भगवदगीतेत म्हटल्याप्रमाणे `उद्धरेत आत्मनात्मानम' या पद्धतीने गावाने आपली उन्नती करावी असा महाराजांचा आग्रह आहे. त्यासाठी संघटनेपासून सवयींपर्यंत, आहारापासून मानसिकतेपर्यंत, व्यायामापासून व्यवस्थांपर्यंत अनेक गोष्टींची तपशीलवार चर्चा करून व्यावहारिक मार्गदर्शन महाराजांनी केले आहे. हे मार्गदर्शन जातीपातीच्या पलीकडे जाणारे आणि या देशाच्या हजारो वर्षांच्या सनातन परंपरेशी नाळ जोडून असलेले आहे. आजच्या पोशाखी, झगमगाटी, दिखाऊ, स्वार्थी आणि एकांगी जीवन पद्धतीपेक्षा निराळा असा हा मार्ग आहे. तो सगळ्यांच्या कल्याणाचा आहे हे सगळ्यांना मनोमन पटत असते. त्यावर चालणे हेच आव्हान असते. गेली अनेक दशके त्यांचा फक्त राष्ट्रसंत म्हणून गौरव करण्यात आला, पण नेते काय- पुढारी काय- सरकारे काय- अन सामान्य माणसे काय- त्यांच्या शिकवणुकीकडे दुर्लक्षच करण्यात आले. येणाऱ्या काळात ही चूक सुधारली जाईल अशी आशा करू या.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २१ डिसेंबर २०१४

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

अभिनंदनीय आणि आनंददायी

संयुक्त राष्ट्रसंघाने काल `आंतर्राष्ट्रीय योगदिनाची' अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता २०१५ च्या २१ जून पासून दरवर्षी २१ जून हा दिवस `आंतर्राष्ट्रीय योगदिन' म्हणून साजरा होईल. तेही जगभर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधात केलेली सूचना उचलून धरण्यात आली आणि थोड्याथोडक्या नव्हे, चक्क १७७ देशांनी त्या सूचनेला पाठिंबा दिला आणि काल त्याची प्रत्यक्ष अधिकृत घोषणा करण्यात आली. तमाम भारतीय जनतेच्या अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. दुर्दैवाने हा आनंद आणि अभिमान दिसून आलेला नाही. वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांची ही मुख्य `हेडलाईन' व्हायला हवी होती. पण तसे झालेले नाही. तू-तू, मी-मी आणि अन्य क्षुद्रता आपल्यात किती ठासून भरलेली आहे याचीच जणू पावती यानिमित्ताने मिळाली आहे. ना सरकारी स्तरावर, ना विरोधी पक्षांतर्फे, ना प्रसार माध्यमात, ना सामाजिक स्तरावर, ना सोशल मीडियात; कुठेही हा आनंद, अभिमान, उल्हास, कौतुक दिसून आलेले नाही. कोणत्याही विरोधी पक्षाने या निर्णयाचे स्वागत का केले नाही? हजारो वर्षांची योगपरंपरा जागतिक स्तरावर मान्यता मिळवीत असेल तर ते अभिनंदनीय नाही का? `योग' या गोष्टीची अंगभूत शक्ती आणि श्रेष्ठता, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आजवर खपलेले आणि अजूनही खपणारे लोक यांचा हा विजय; आम्हाला व्यापक आणि सकारात्मक करू शकलेला नाही. `योगा' लोकप्रिय करण्यासाठी स्वत:च्या सीडी काढून स्वत: लोकप्रियता आणि पैसा मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही चकार शब्द तोंडातून काढण्याचे कष्ट घेतले नाही. असो. यात बदल होईल तेव्हा होईल. मात्र आज `आंतर्राष्ट्रीय योगदिन' जाहीर झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करून त्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचे आणि त्या परंपरेच्या आजच्या अनुयायांचे त्रिवार अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे.

आता `योग' या विषयाची जगभर चर्चा होईल. योगासने शिकवणाऱ्या लोकांची मागणी होईल. योगदिनाला शुभेच्छापत्रे पाठवली जातील. ई-शुभेच्छापत्रेही उपलब्ध होतील. योगाची मंडळे निघतील. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याची एक व्यावसायिक बाजूही आहे. त्यात काही गैर आहे असेही नाही. अगदी भारताला विदेशी चलन सुद्धा त्यातून मिळू शकेल. परंतु हे सारे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील ते भाषण किती जणांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ज्यांनी लक्षपूर्वक ऐकले त्यांना ते किती लक्षात आहे माहित नाही. पुन्हा लक्षात असलेल्या भाषणाचा कशा पद्धतीने अन्वयार्थ लावला जातो; या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. मोदींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की, आपण आपली जगण्याची शैली बदलण्याची गरज आहे. पर्यावरणापासून तर अर्थकारणापर्यंत, आरोग्यापासून तर समाजकारणापर्यंत सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ते आवश्यक आहे. `योग' या अपेक्षित जीवनशैलीचा मार्ग दाखवतो. त्यामुळेच `योग' म्हणजे केवळ शारीरिक कसरतीचा एक प्रकार असा विचार न करता, महर्षी पतंजली यांनी म्हटल्याप्रमाणे - `योग: चित्तवृत्तीनिरोध:' हे लक्षात घ्यायला हवे. योगासनांसोबत त्याच्या सखोल तत्वज्ञानाचा, योगाने केलेल्या मानवी जीवनाच्या तलस्पर्शी विश्लेषणाचा प्रचार-प्रसार होईल; त्यासंबंधातील समज वाढेल, आचरण वाढेल यावर जोर द्यायला हवा. `योगा'द्वारे शरीर चांगले राखून पैसा, मानसन्मान, पदप्रतिष्ठा, करीयर, शारीरिक सुखोपभोग, अधिकाधिक संग्रह आणि अधिकार; यांचीच आराधना करायची असेल तर तो `योग' या मूळ वस्तूचा/ भावनेचा/ संकल्पनेचा घोर अपमान ठरेल. `सर्वे सन्तु निरामयाः' सोबतच `सर्वे भद्राणि पश्यन्तु' हा `योगा'चा म्हणूनच भारतीय चिंतनाचा गाभा आहे हे विसरता कामा नये. संपूर्ण जगभरातील ७०० कोटी लोकांच्या जीवनात योगाच्या माध्यमातून इष्ट परिवर्तन येवो आणि सगळ्यांच्या जीवनात निरामयतेसोबतच भद्रता नांदो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ डिसेंबर २०१४

बुधवार, १० डिसेंबर, २०१४

समता म्हणजे विषमतेचे व्यवस्थापन

इंग्रजांच्या आमदानीपासून आमच्यात सगळ्यात मोठा बदल जर कुठला झाला असेल तर आम्ही स्वत:ची अक्कल गहाण टाकायला सोकावलो. त्यातूनच आत्मनिषेध, आत्महीनतेचा प्रादुर्भाव झाला. मग बाहेरचे म्हणजे जणूकाही सगळे स्वर्गीय, अचूक, नेमके, कल्याणकारी वगैरे असे समीकरण झाले. अनेक कल्पना, संकल्पना, घोषणा यांचे असे झालेले आहे. `समता' ही एक अशीच बाब. कुठली तरी प्रतिक्रिया म्हणून देण्यात आलेल्या या नाऱ्याचे सखोल विश्लेषण करण्याची तसदी कधी घेण्यात आली आहे का? समता नावाची गोष्ट खरेच आहे का आणि असू शकते का?

एक बाब निर्विवाद आहे की, या जगाच्या मुळाशी समता असेल तर कोणीही आणि जगातील कोणतीही शक्ती विषमता निर्माण करू शकत नाही. अशी विषमता निर्माण केली तरी ती जास्त काळ टिकणार नाही. अन दुसरीही गोष्ट तेवढीच खरी आहे की, या जगाच्या मुळाशी विषमता असेल तर जगातील कोणतीही शक्ती समता निर्माण करू शकणार नाही. आजूबाजूला एक धावती नजर टाकली तरीही समता नसून विषमता हेच जगाचे वास्तव असल्याचे सहज दिसून येते. एवढेच नव्हे तर समता आम्हाला मनानेही मान्य नसते. आम्ही कोणापेक्षा तरी चांगले/ उजवे/ सुंदर/ मोठे/ श्रेष्ठ/ ज्ञानी/ शहाणे/ कर्तृत्ववान असायलाच हवे असतो. आजवरचा इतिहास देखील विषमतेचाच पक्षधर ठरलेला आहे. अमक्याने असे केले, तमक्याने तसे केले, त्यासाठी व्यवस्था जबाबदार वगैरे वितंडवाद योग्य नाही. कारण समतेसाठी झालेले प्रयत्न त्याच व्यक्तींच्या वा व्यवस्थांच्या विरोधातच झालेत ना? मग मुद्दा फक्त यश वा अपयश एवढाच उरतो. त्यात समतेचा पक्ष नेहमी अपयशी ठरत आलेला आहे. कारण मुळात या विश्वाच्या मुळाशी समता नाही. उत्तर आणि दक्षिण ध्रुव परस्पर विरोधी आहेत आणि म्हणूनच पृथ्वीचा समतोल निर्माण झाला आहे. आपल्याला वरवर असमान, म्हणूनच विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमुळे समतोल निर्माण होतो.

मात्र या देवदत्त, निर्मितीच्या मुळाशी असलेल्या विषमतेचा उपयोग करून स्वार्थ, अन्याय, अत्याचार, दुराचार यांचा हैदोस घातला जाऊ शकतो/ घातला जातो. त्यामुळेच मानवाने आजवर या विषमतेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. जगात झालेले प्रयत्न हे विषमतेच्या योग्य व्यवस्थापनाचेच होते. विषमतेएवढ्याच या जगाच्या मुळाशी असलेल्या करुणेने आणि समतेच्या तेवढ्याच मुलभूत ओढीने माणसाला या व्यवस्थापनासाठी प्रवृत्त केले. अमेरिकेतील श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील विषमता दूर करून गुलामी दूर करण्याचे झालेले प्रयत्न आणि त्यानंतर आजवर जर काही होत असेल तर ते विषमतेचे व्यवस्थापन होय. अगदी आपली राज्यघटनासुद्धा समता निर्माण करू शकली नाही आणि समता निर्माण करू शकणार नाही. ती फक्त विविध प्रकारच्या विषमतेचे व्यवस्थापन करते. कारण समता ही मानवी मनाची उच्च भावना आहे. त्या भावनेची धारणा जेवढ्या प्रमाणात होईल तेवढी समता अनुभवास येईल. अन मानवी भावना उपजत असतात आणि बाह्य परिस्थितीचा त्यावर परिणाम होऊन त्या आकार घेतात. त्यामुळे त्या कधीही समान राहूच शकत नाहीत.

आपल्या देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्था, तसेच मनुस्मृती आदी गोष्टी विषमतेच्या व्यवस्थापनाचेच प्रयत्न होते. अगदी डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा मनुला एक सामाजिक शास्त्रज्ञ म्हटले होते ते उगाच नव्हे. व्यवस्था, त्यातील त्रुटी, त्या बदलण्याची गरज यावर चर्चा होत आली आहे आणि व्हायलाही हवी. अन तसेही या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी काळाच्या भक्ष्यस्थानी पडत नाही. आपले पोषण करणारे सुग्रास भोजन सुद्धा दुसऱ्या दिवशी विष होते. मग एखादी व्यवस्था बिघडली, अपुरी ठरली, त्यात दोष आलेत तर आकाशपाताळ एक का करावे? विचारांशी वैरच करायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण प्रामाणिक आणि गंभीरपणे विचार करायचा असेल तर या सगळ्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतील. आपल्या देशातील जुन्या व्यवस्था, जुने ग्रंथ, जुन्या चालीरीती, जुन्या परंपरा यांचा विचार करताना, त्याविषयी बोलताना हे भान राखले जायलाच हवे. अन नवीन घडी बसवताना मुळाशी जाऊन विचार करायला हवा. त्याला अन्य उपाय नाही.

याचा अर्थ हे लिहिणाऱ्याला पुन्हा चातुर्वर्ण्य आणायचे आहे, अस्पृश्यतेला त्याचे समर्थन आहे, तो समाजविरोधी आहे वगैरे अर्थ ज्यांना काढायचे असतील त्यांच्यासाठी- `आमेन !!'

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० डिसेंबर २०१४

सोमवार, ८ डिसेंबर, २०१४

मनोरंजनाचे ठेकेदार

होय, आम्ही बावळटांचे शिरोमणी आहोत आणि राहू. आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत, आम्हाला आमचे अधिकार आणि कर्तव्ये आहेत अन त्यांचा उपयोग करत आम्ही बावळट राहणारच. तो जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा !!! असा कृतसंकल्प केलेले अनेक जण आजूबाजूला आहेत अन ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपले मनोरंजन करीत असतात. दोन दिवसांपासून त्यांना विषय मिळालाय `श्रीमद भगवद्गीता'. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी `श्रीमद भगवद्गीता' राष्ट्रीय ग्रंथ घोषित करावा अशी सूचना केली आणि या मनोरंजनाचा ठेका घेतलेल्यांना कडकडून वृश्चिकदंश झाला. अन एका संस्कृत (म्हणूनच अमानवी, अराष्ट्रीय, जुनाट, मागास, प्रतिगामी) सुभाषितात वर्णन केल्याप्रमाणे - आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला आणि वरून वृश्चिक दंश झाला की, जशी अवस्था व्हावी तसे यांचे झाले.

आज राष्ट्रीय पशु, पक्षी, भाषा, गान, गीत, प्रतीके वगैरे घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय ग्रंथ मात्र नाही. काय हरकत आहे राष्ट्रीय ग्रंथ असायला? वाचाल तर वाचाल वगैरे पांचट वाचाळपणा करणारेही यावर किंचाळतील- नको, नको. राष्ट्रीय ग्रंथ नको. काय करायचा राष्ट्रीय ग्रंथ? नसला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून काय होते? खरेच आहे त्यांचे. प्रश्न फक्त एवढाच येतो मनात- माणसांना नावेच नसली तरी काय होते? सगळ्यांना एकेक क्रमांक. १२५ कोटींच्या भारतात १२५ कोटी क्रमांक. नवीन जन्मलेल्यांना जुने रिकामे झालेले क्रमांक द्यायचे, गरज पडली तर त्यात भर घालायची. कशाला हवीत नावे तरी? धान्य, खाणेपिणे, स्वयंपाकपाणी, कुपोषण अन अन्य साऱ्या गोष्टी अन झगडे कशाला हवेत? खायला मिळालं तरी माणूस कधी तरी मरणार; खायला नाही मिळालं तरी मरणार. केव्हाही मेलं तरी काय फरक पडतो? असंच सगळ्या गोष्टींचं होऊ शकेल. पण नाही- आम्हाला काही माहीत नाही. राष्ट्रीय ग्रंथ मात्र नको. का नको?

या `का'चे उत्तर हे मनोरंजनाचे ठेकेदार देणार नाहीत. कारण त्यात त्यांचा निभाव लागणार नाही, हे त्यांना पूर्ण ठाऊक आहे. ग्रंथ, पुस्तके, ज्ञान, बुद्धिवाद, तर्क वगैरेची बाजू घेऊन भांडणारे हे लोक राष्ट्रीय ग्रंथ या गोष्टीला विरोध का करतात, याला उत्तर नाही असे मात्र नाही. याला उत्तर आहे की, असा ग्रंथ केवळ आणि केवळ हिंदूंचा ग्रंथ असू शकतो. या विदुषकांना कितीही वेदना झाल्या, कितीही त्यांना त्रास झाला, कितीही त्यांची कोंडी झाली तरीही; येशु ख्रिस्त म्हणजेच ख्रिश्चन पंथ २००० वर्षांच्या पूर्वी आणि इस्लाम १६०० वर्षांच्या आधी अस्तित्वातच नव्हते हे सत्य त्यांना नाकारता येत नाही. अन त्यापूर्वीपासूनचा, किंबहुना त्यांच्या एकूण इतिहासाहून दुपटीहून वा तिपटीहून अधिक काळाचा भारताचा इतिहास ज्ञात आहे आणि तो हिंदूंचा आहे, हेही नाकारता येत नाही आणि पचवता येत नाही. गिळता येत नाही आणि ओकता येत नाही अशी त्यांची स्थिती आहे. उद्या राष्ट्रीय ग्रंथ घोषित करायचा म्हटले तर ज्यांचा जन्मच या भूमीत झाला नाही, त्या बायबल आणि कुराणाला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करताच येणार नाही. आली ना पंचाईत? बरे ही पंचाईत अशी की, श्रीकृष्ण अन त्याने सांगितलेली श्रीमत भगवद्गीता ५१५१ वर्षे आधी का आली (तीही भारतात अन हिंदूंच्या ओठी) आणि बायबल आणि कुराण इतक्या उशिरा का जगात आले, असा सवाल करत; त्या अदृश्य नियतीने केलेल्या या अन्यायाविरुद्ध धाव तरी कोणत्या न्यायालयात घेणार? फारच पंचाईत झाली बुवा विदुषकांची. अगदी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये रे देवा...

विदुषकांचा दुसरा प्रकार आहे, जो श्रीमत भगवद्गीतेच्या गुणात्मक मूल्यांकनाच्या मागे लागतो. गंमत म्हणजे, हा वर्ग एकीकडे गांधीजी, विनोबाजी, ज्ञानेश्वरी वगैरेचे दाखले देणे, त्यांना उचलून धरणे, ते सगळ्या जगाचे मार्गदर्शन करू शकतील वगैरे दावे करीत असतो. ज्ञानेश्वरी हा श्रीमत भगवद्गीतेवरीलच टीकाग्रंथ आहे आणि गांधीजी, विनोबाजींच्या जीवनात गीतेला अनन्यसाधारण स्थान होते; हे लक्षात ठेवण्याची त्याला गरजच वाटत नाही. खरं तर त्याने हे सगळे लक्षात ठेवावे ही आपली अपेक्षाच चुकीची नसते का? विदुषक काय असं लक्षात ठेवून त्याचं विश्लेषण, तर्क वगैरे करत असतो? यातील एक तर अण्णा हजारेंचे उजवे हात समजले जातात. आता त्या अण्णांनी आत्यंतिक निराशेतून बाहेर आल्यावर ज्ञानेश्वरी हाच प्राण मानला आणि त्याच प्रेरणेतून राळेगणसिद्दी घडवली. म्हणजेच या गावाने उभे राहण्यामागे एक प्रकारे गीतेचीच प्रेरणा नाही का? गीताच नसती, त्यावर ज्ञानेश्वरी आकारास आली नसती, तर अण्णा आधारहीन भटकत राहिले असते कदाचित. माणूस उभा होण्यासाठी आणि त्याच्या हातून चांगल्या सृष्टीचे सृजन होण्यासाठी अत्यंत बळकट प्रेरणा लागते. ती प्रेरणा गीता देते याचं हे जिवंत उदाहरण रोज पाहत असतानाच गीतेला गुणात्मक वगैरे विरोध करणे हे विदुषकी नाही तर काय म्हणायचे? केवळ ज्ञानेश्वरी नाही, अण्णांना निराशेतून सर्वप्रथम बाहेर काढणारे होते स्वामी विवेकानंद. त्यांनीही गीतेला जीवनाचा आधार मानलेच आहे. पण असे असले तरीही गीता हिंसेचा पुरस्कार करते, गीता चातुर्वर्ण्याचा म्हणजेच विषमतेचा पुरस्कार करते; वगैरे वगैरे करत आम्ही गळे काढणारच, हा या विदुषकांचा निर्धार अगदी अनुकरणीय असाच आहे. याच गीतामृताच्या आधारे ज्ञानेश्वरांनी सर्वसमावेशक, समतायुक्त भागवत पंथ निर्माण केला. परंतु आम्ही ज्ञानेश्वरीचे गोडवे गात, त्याच गीतेतून विषमतेचे हलाहल काढून दाखवू, हा निर्धार लहानसहान नाही.

भारताची राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ आहे असे म्हणणाऱ्यांनी देखील भावना बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ विचार करायला हवा. राज्यघटना नक्कीच सगळ्यांच्या आदरास पात्र आहे, असायला हवी. परंतु राज्यघटना ही राज्यशकट हाकण्यासाठी सामूहिक चिंतनातून साकारलेला मार्गदर्शक ग्रंथ आहे, तो मानवी गुणावगुण- मानवी प्रेरणा- मानवी अस्तित्व- अशासारख्या भावविषयांचा ग्रंथ नाही. ही मर्यादा लक्षात घ्यायला हवी. एवढेच नाही तर भावविषय मानवी जीवनात सर्वोच्च असतात हे नाकारण्यात हशील नाही. म्हणूनच न्यायालयात न्याय घटनेनुसार होत असला तरीही खरे बोलण्याची शपथ आपापल्या श्रद्धेनुसार घेतली जाते. मंत्री वा लोकप्रतिनिधी म्हणून राज्यघटनेनुसार काम केले जात असले तरीही ते प्रामाणिकपणे करण्याची शपथ आपापल्या श्रद्धेनुसार घेतली जाते. प्रश्न निर्माण होईल, मग फक्त भगवद्गीता का? त्याचे सोपे उत्तर आहे, या देशातील बहुसंख्य लोकांची ती श्रद्धा आहे आणि सगळ्यात प्राचीन आहे. सगळ्या श्रद्धा समान असल्या तरीही व्यवहारात एखादा निर्णय घेताना निवड एकाचीच होणार. त्यात मानअपमान किंवा तशाच अन्य गोष्टी आणणे पूर्णत: चुकीचे आहे.

उरतो मुद्दा श्रीमत भगवद्गीतेतील संकल्पना, तर्क, इहवाद, आध्यात्मिकता, चिंतन, दृष्टीकोन या गोष्टी. त्यावर हजारो वर्षांपासून चर्चा, चिंतन सुरु आहे आणि पुढेही ते सुरूच राहील. त्या साऱ्याची चर्चा इथे करण्याची गरज नाही. मात्र एक नमूद करून ठेवायला हवे की, या पृथ्वीवरील ऐहिक आणि आध्यात्मिक जीवनाला उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल असेच गीतेचे तत्वज्ञान आहे. अगदी त्यातील हिंसा-अहिंसा, समता-विषमता, इहवाद-आध्यात्म, जन्म-मृत्यू या सगळ्यासह. गेल्या शे-पाचशे वर्षातील कथित जागतिक, ऐहिक, समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, व्यक्तिवादी, स्वातंत्र्य- समता- बंधुता- वादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे लोकांनी जो प्रचंड वैचारिक आणि व्यावहारिक चक्रव्यूह निर्माण केला आहे. त्यातून सुटण्याचा मार्गही आधुनिक अभिमन्युंना ठावूक नाही, तो मार्ग दिसत नाही, अन त्यांची ती क्षमताही नाही. त्या मार्गाने दिवस सरतील तसतशी मानवजात अधिकच मोठ्या चक्रव्युहात अडकत जाईल आणि अंती दु:ख- वेदना- हताशा- यांचीच शिकार होईल हे निर्विवाद. इच्छाचिंतन वा मनोभाव म्हणजे जग नाही. या जगातील कितीही मोठ्या आणि कितीही उदात्त माणसाने किंवा विचाराने जगाची निर्मिती केलेली नाही. त्यामुळे दंभ सोडून देणेच अंती हिताचे ठरेल. अर्जुनाचा हा दंभ मोडून काढण्याचे काम महाभारत युद्धाच्या वेळी याच श्रीमत भगवद्गीतेने केले. आजही एक प्रकारे अर्जुनासारख्याच संभ्रमात सापडलेल्या जगाला त्यातून बाहेर काढण्याचे काम श्रीमत भगवद्गीता करेल. त्यासाठीच तो राष्ट्रीय ग्रंथ व्हायला हवा. मानवी कल्याणाचा तो अंतिम थांबा नव्हे, त्या मार्गावरील तो एक थांबा आहे.

बाकी, विदुषक आणि त्यांचे मनोरंजन चालू राहणारच आहे. आपण चार घटका आनंद घ्यावा. कसे?

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ९ डिसेंबर २०१४