रविवार, ३० मार्च, २०१४

संघ, जातीयवाद आणि डॉ. हेडगेवार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीयवादाचा आरोप अनेकदा करण्यात येतो. या आरोपात नवीन तर काहीच नाही, पण तो original सुद्धा नाही हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या बहुतेक राजकारण्यांनी, बुद्धीजीवींनी, लेखक- विचारवंतांनी, संपादकांनी, विश्लेषकांनी, सुशिक्षितांनी जशा अनेक गोष्टी इंग्रजांच्या उचलल्या आणि अर्थ वगैरेच्या भानगडीत न पडता त्या तशाच पुढे चालू ठेवल्या; तसाच संघावरील हा जातीयवादाचा आरोपही त्यांनी इंग्रजांकडूनच उधार घेतला आहे. १९३२ च्या डिसेंबर महिन्यात मध्यप्रांत- वऱ्हाडच्या प्रांतीय सरकारने `म्युनिसिपल व डीस्ट्रीक्ट कौन्सिलच्या नोकरांनी संघात भाग घेऊ नये’ असे परिपत्रक काढले होते. संघ हा राजकीय चळवळी करतो आणि जातीयवादी आहे अशी दोन कारणे सरकारने त्यासाठी दिली होती. १९३३ च्या डिसेंबर महिन्यात सरकारने याच आशयाचे एक नवीन परिपत्रक काढले. त्यातून राजकीय चळवळीचा आरोप काढून टाकण्यात आला, पण संघ जातीयवादी असल्याचा आरोप मात्र कायम ठेवण्यात आला होता. त्यावेळी परकीय इंग्रजांचे राज्य होते आणि कॉंग्रेसलाही संघाबद्दल मुळीच प्रेम नव्हते. असे असतानाही संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी त्याविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला होता.

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब आपटे, तसेच त्यांचे काका आबाजी हेडगेवार आणि अन्य काही विश्वासू कार्यकर्त्यांशी चर्चा, विचारविनिमय करून डॉक्टर हेडगेवार यांनी अशी योजना आखली की, डीस्ट्रीक्ट कौन्सिले आणि म्युनिसिपालीट्या यांनी मध्यप्रांत सरकारकडे या परिपत्रकाचा निषेध पाठवावा. जे यशस्वीपणे व बहुमताने असा निषेध करू शकतील त्यांनीच तो करावा बाकीच्यांनी त्यात हात घालू नये, अशी सूचनाही त्यांनी केली होती. यामुळे पुढील अधिवेशनात या सरकारी परिपत्रकाचा समाचार घेणे सोयीचे होईल असा त्यांचा कयास होता. या संबंधात अकोल्याचे श्री. गोपाळराव चितळे यांना ६ फेब्रुवारी १९३४ रोजी पाठवलेल्या पत्रात डॉक्टर हेडगेवार यांनी लिहिले होते, `संघावर यत्किंचितही दोषारोपण करता येत नाही अशी सरकारची स्थिती झाली आहे. डिसेंबर १९३२ च्या सर्क्युलरमध्ये संघ कम्युनल व राजकीय चळवळीत भाग घेणारा आहे असे विधान सरकारने केले होते. परंतु डिसेंबर १९३३ च्या सर्क्युलरात राजकीय चळवळीचे विधान सरकारला मागे घ्यावे लागले व संघ फक्त कम्युनल आहे एवढेच पोरकट विधान त्यांनी केले. दोष तर लावता येत नाही व दृष्टीने तर पाहवत नाही, अशी हितविरोधी लोकांची स्थिती झाली आहे. याचवेळी हा संघ कम्युनल नाही, कोणत्याही कम्युनल चळवळीत या संघाने कधीही भाग घेतला नाही व कोणत्याही परजातीचा वा परधर्मियांचा द्वेष किंवा तिरस्कार संघ कधीही करत नाही; म्हणून या संघाला कम्युनल म्हणता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारचे हे नवे सर्क्युलर अनाठायी व अन्याय्य आहे अशा अर्थाचा विरोध; सर्व डीस्ट्रीक्ट कौन्सिले व म्युनिसिपालीटीज यांनी मध्यप्रांत सरकारकडे पाठवणे आवश्यक आहे.’

अशाच आशयाची पत्रे संघ संस्थापकांनी अन्य काही जणांनाही पाठविली होती. त्यानुसार ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. काही डीस्ट्रीक्ट कौन्सिले व म्युनिसिपालीटीज यांनी सरकारच्या सर्क्युलरचा निषेध केलाही आणि तो सरकारकडे पाठवलाही. त्याच्या प्रती डॉ. हेडगेवार यांच्याकडेही पोहोचल्या. त्यावेळी त्यांनी लगेच नागपूरच्या `महाराष्ट्र’ नियतकालिकात त्याचे वृत्त छापण्याची व्यवस्था केली. स्थानिक वर्तमानपत्रात या बातम्या याव्या अशा सूचनाही दिल्या. या निषेध प्रस्तावांबद्दल समाधान व्यक्त करतानाच, त्यातील भाषा व आशय याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अकोल्याचे श्री. गोपाळराव चितळे यांना २५ फेब्रुवारी १९३४ रोजी पाठवलेल्या पत्रात डॉक्टर म्हणतात, `केवळ हिंदू समाजाच्या हिताकरिता हिंदू संघटनेची केलेली चळवळ जर परधर्मियांच्या किंवा परकियांच्या द्वेषमूलक तत्वावर उभारलेली नसेल तर ती कम्युनल होऊ शकत नाही, अशी स्पष्ट व जोरदार भाषा बोलण्याची हीच वेळ आहे, असे मला वाटते. परंतु आपल्याच इच्छेने जग चालत नाही हीही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.’ काम करताना एक एक पाऊल पुढे टाकत, बेरजेचा विचार करीत, आक्रस्ताळेपणा न करता, मिळेल ते पदरात टाकून घेत पुढील मार्ग प्रशस्त करीत जाण्याची संघ संस्थापकांची वैशिष्ट्यपूर्ण शैली कशी होती याचा, हे पत्र म्हणजे उत्तम नमुना आहे.

परंतु डॉक्टर हेडगेवार एवढ्यावरच थांबले नाहीत. मध्यप्रांत कौन्सिलमध्ये सर्क्युलरचा हा विषय यावा आणि त्यात सरकारचा पराभव होऊन हे सर्क्युलर रद्द व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यासाठी सभासदांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे, संघ, संघाचा विचार त्यांना समजावून देणे आणि सरकारी परिपत्रक कसे अयोग्य व अन्याय्य आहे हे पटवून देणे हे काम डॉक्टरांनी अथकपणे व चिकाटीने केले. परिणामी १९३४ सालच्या मध्यप्रांत सरकारच्या हिवाळी अधिवेशनात या परिपत्रकाच्या मुद्यावर मांडण्यात आलेल्या कपात सूचनेवर सरकारचा पराभव झाला. याचे विस्तृत वृत्त डॉक्टरांनी तेव्हाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक सांगलीचे काशीनाथराव लिमये यांना कळविले होते. १६ मार्च १९३४ रोजी लिहिलेल्या या पत्रात डॉक्टरांनी लिहिले होते,

`गेले १५ दिवस हे नागपूर शहराला हलवून सोडणारे व अत्यंत खळबळीचे असे गेले. लोकांचे तोंडी जिकडेतिकडे संघाचाच विषय दिसत असून सरकारचा कल्पनेच्या बाहेर असा पराभव झाल्यामुळे लोकात एक प्रकारचे चैतन्य व उत्साह दिसून येत आहे. प्रत्यक्ष कौन्सिलमध्ये सरकारी बेंचेस वगळून बाकी सर्व लोकनियुक्त, सरकारनियुक्त, मुसलमान, पारशी व ब्राम्हणेतर अशा सर्व सभासदांनी संघासंबंधी काटावर (कपात सूचनेवर) अनुकूल मते दिली. एवढेच केवळ नव्हे तर मुसलमान व पारशी सभासदांनी संघाला अनुकूल अशी भाषणेही केली. अशा रीतीने मध्यप्रांत कायदे कौन्सिलात संघाने अपूर्व विजय मिळविला आहे. हा संघ कम्युनल नाही व असला तरी तसा कम्युनल असणे दोषार्ह नाही व हिंदूंचा हिंदुस्थान म्हणणे हे सत्यकथनच आहे. म्हणून यात आम्हाला काहीच वावगे दिसत नाही, अशाच अर्थाची सर्व सदस्यांची भाषणे झाली. सरकारतर्फे उत्तर देताना चीफ सेक्रेटरी मि. राऊटन व होम मेंबर श्री. राव यांना संघाविरुद्ध कोणताही पुरावा पुढे आणता आला नाही. हिटलर व नाझी यांच्या ध्येयानुसार संघाचे काम चालले असून या विषयावरील डॉ. हेडगेवार यांच्या भाषणाचा पुरावा माझेपाशी आहे, असे होम मेंबर श्री. राव यांनी विधान सोडून दिले. परंतु डॉ. हेडगेवार यांचे ते भाषण वाचून दाखवा, असा पाठपुरावा सभासदांनी केल्यावर होम मेंबरजवळ तसे भाषण मुळातच नसल्याने त्यांची फजिती मात्र झाली. चीफ सेक्रेटरी मि. राऊटन यांनी डॉ. हेडगेवारांचे भाषण म्हणून ४-५ ओळी वाचून दाखवल्या. परंतु त्यात हिंदूंचे हिंदुस्थान एवढेच विधान होते. यात आक्षेपार्ह काय आहे ते दाखवा, असे विचारताच सरकार पक्षीयांची तोंडे बंद झाली. शेवटी काटावरील चर्चेत सरकारतर्फे उत्तर देताना १९३२ साली काढलेल्या सर्क्युलरचे समर्थनार्थ आक्षेपार्ह म्हणून १९३३ साली संक्रांतीचे उत्सव प्रसंगी माजी होम मेंबर सर मोरोपंत जोशी व डॉ. मुंजे यांच्या भाषणाचे उतारे होम मेंबर श्री. राव यांनी वाचून दाखविले. त्यावेळी, १९३३ सालच्या भाषणाबद्दल १९३२ साली सर्क्युलर काढले की काय; असा प्रश्न विचारण्यात येऊन कौन्सिलमध्ये सर्वत्र हंशा पिकला. कम्युनल शब्दाचा अर्थही अनेक सभासदांनी विचारला असता होम मेम्बरांना सांगता आला नाही. संघाविरुद्ध आक्षेपार्ह असे काहीही सरकारला पुढे आणता न आल्यामुळे यावेळी मध्यप्रांतीय कायदे कौन्सिलात संघाचा पूर्ण विजय होऊन कायदेशीरपणाचा छाप संघावर मारला गेला आहे.’

याच विषयाच्या अनुषंगाने खामगावचे संघचालक भास्करराव गुप्ते यांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टरांनी कळवले होते, `मध्यप्रांतीय कायदे कौन्सिलने संघाला पाठींबा देऊन सरकारचा पूर्णपणे पराभव केल्याचे वृत्त आपण वाचले असेलच. या चर्चेत सरकारजवळ संघाचे विरुद्ध यत्किंचितही पुरावा नसल्याचे आढळून आले व सरकारतर्फे लोकल बॉडीजकरता काढलेले सर्क्युलर हे आज्ञावजा नसून उपदेशवजा आहे व लोकल बॉडीजनी हे सर्क्युलर न मानल्यास आम्ही त्यांची ग्रांट वगैरे मुळीच बंद करू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली देण्यात आली.’

या प्रकरणाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.
१) समाजाच्या सर्व जातीधर्माच्या सदस्यांनी संघाची भूमिका उचलून धरली. संघ विशिष्ट जातीचा वा समूहाचा आहे, हा आक्षेप या प्रकरणाने खोटा ठरविला.
२) जनसंघ वा भाजपा यांच्या जन्माच्याच नव्हे, तर भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येण्याच्याही कितीतरी आधीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे त्या निमित्ताने घेतलेल्या भूमिका राजकीय नाहीत हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.
३) कोणाचा विरोध ही संघाची भूमिका नसून सुदृढ हिंदू समाजाची उभारणी हे संघाचे ध्येय आहे आणि ते सुरुवातीपासूनच आहे, हे स्पष्ट झाले.

संघाच्या सातव्या वर्षी सरकारतर्फे संघावर हा प्रहार करण्यात आला होता. नवव्या वर्षी संघाने तो आघात परतवून लावला. संघाचा हा विजय मात्र डॉ. हेडगेवार यांनी साजरा वगैरे केला नाहीच, उलट तो विषय तेथेच संपवून ते कार्यवाढीच्या मागे लागले. संघ आणि संघ विरोधक यांच्यातील परस्पर भिन्न मानसिकतेचे दर्शनच या प्रकरणात होऊन गेले. आज संघावर होणारे आरोप, त्यासाठी वापरण्यात येणारे शब्द, त्यातील फोलपणा, खोटे रेटण्याची निषेधार्ह वृत्ती; या सगळ्याचे मूळ कुठे आहे हे दाखवून देणारा हा इतिहास आहे. ही घातक वृत्ती अजूनही कायम आहे आणि सुक्तासुक्त कसलाही विचार न करता ती कशी डोके वर काढीत असते हे तर सगळ्यांसमोरच आहे.

- श्रीपाद कोठे
- नागपूर

मानवतेचा दीपस्तंभ

वर्ष प्रतिपदा !! गुढी पाडवा !! हिंदू नववर्षाचा प्रारंभदिन. साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त. शुभंकर संकल्पांचा दिवस. मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकून त्यांच्यात विजयाकांक्षा आणि चैतन्य ओतणाऱ्या शकविजयी शालिवाहनाच्या पराक्रमाचा दिवस. प्रभू रामचंद्र रावणाला परास्त करून अयोध्येत परतले तो दिवस. हिंदू नवचैतन्याच्या जागरणाचे अग्रदूत डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मदिनाचा संदर्भ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाहेर फारसा कोणाला ठाऊक असण्याची शक्यता नाही. कारण डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून तो साजरा करण्यात येत नाही. हेच संघाचं वैशिष्ट्य आहे आणि हीच संघाची ताकदही.

खरे तर वर्ष प्रतिपदा हा संघ संस्थापकांचा जन्मदिवस आहे हेही स्वयंसेवकांना त्यांच्या निर्वाणानंतरच कळले. त्यांनी स्वत: त्याचा कधी उच्चारही केला नाही. डॉ. हेडगेवार हे एक अद्भुत व्यक्तित्व होते. संघ समजून घ्यायचा असेल तर डॉ. हेडगेवार समजून घ्यायला हवेत. एवढेच नव्हे तर संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तीमत्वात आहे. संघाचं काम, समाजाचं काम, देशभक्ती, हिंदू संघटन वगैरे बाबी तर आहेतच. परंतु त्या साऱ्यापेक्षाही सुदृढ निरोगी मनाचा माणूस कसा असू शकतो याचं एक अतिशय उत्तुंग उदाहरण त्यांच्या रूपाने सगळ्या जगाला प्राप्त झालं आहे. अशी काय वैशिष्ट्य होती त्यांची?

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याला मिळणारी परिस्थिती, त्याला मिळणारी माणसे, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, त्याचे रूप- व्यक्तिमत्व, देवदत्त गुणदोष यांचा मोठा वाटा असतो. या अंगानेही डॉ. हेडगेवार यांचे जीवन समजून घ्यायला हवे. बालवयातच त्यांचे आई व वडील दोघेही एकाच दिवशी स्वर्गवासी झाले. एकत्रच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता. नागपुरात त्यावेळी आलेल्या प्लेगच्या साथीने त्यांचा बळी घेतला होता. अशी एक घटनाही एखाद्याच्या आयुष्याला कुरतडणारी, अपंग करणारी ठरू शकते. मातापित्यापैकी एकाचे छत्र नसले तरीही आयुष्ये कोमेजून गेलेली पाहायला मिळतात. येथे तर दोघेही नव्हते आणि तेही एकाच दिवशी सोडून गेले. पण डॉक्टरांचे जीवन त्यामुळे कोमेजून गेलेले कुठेही पाहायला मिळत नाही. अशा प्रकारचे दुर्दैव वाट्याला आल्यास जन्मभर कुढत राहणारे, मनाने दुबळे असे अनेक जण पाहायला मिळतात. आजकाल तर आईवडिलांची मुलाच्या आयुष्यातील भूमिका, त्याचे परिणाम वगैरेची किती चर्चा असते. पालकांचे छत्र नसलेल्या मुलांच्या जीवनावर चित्रपट, कथा कहाण्याही तयार झालेल्या आहेत. डॉक्टरांच्या जीवनावर मात्र असा ओरखडा पाहायला मिळत नाही.

अठराविश्वे दारिद्र्य हे डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. घरात चहा-साखर किंवा कधी कधी चूल पेटवण्यासाठी लाकडेही नसत. भिक्षुकीला उतरती कळा लागण्याच्या काळात वडील भावाच्या भिक्षुकीवर घर चालत होते. कसे चालत असेल याची कल्पनाच केलेली बरी. शेतीवाडी, व्यवसाय, वडिलोपार्जित इस्टेट वगैरे काहीही नाही. नाही म्हणायला राहायला वडिलोपार्जित घर तेवढे होते. एकादशीच्या घरी शिवरात्री अशीच स्थिती.

मात्र अशा प्रकारच्या दारिद्र्याने येणारी विकलता त्यांच्या जीवनात आढळून येत नाही. गरिबी ही लाचारी, लोभ, हपापलेपण, कडवटपणा, फटकळपणा अशा अनेक दुर्गुणांना जन्म देते. डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात मात्र या सगळ्याचा अभाव दिसतो. एवढेच नव्हे तर अशी परिस्थिती असूनही त्यांनी कधीही अर्थार्जनाचा विचार केला नाही आणि या संबंधातील निग्रह एवढा की एखाद्याला आर्थिक मदत करतो म्हणण्याची सुद्धा बिशाद होऊ नये. देशासाठी संपूर्ण आयुष्य देण्याचा निश्चय असल्याने त्यांनी विवाहदेखील केला नाही. ईश्वरलाभासाठी अशा प्रकारे संन्यस्त राहण्याची व संन्यास घेण्याची उदाहरणे पाहायला मिळतात; पण देशासाठी, समाजासाठी अर्थार्जनापासून, संसारापासून जाणीवपूर्वक दूर राहण्याचे उदाहरण फार कमी पाहायला मिळते. आणि हेदेखील स्वत: डॉक्टर असून. मनात आणले असते तर भरपूर पैसा मिळवणे, संसार थाटणे काय शक्य झाले नसते?

स्वत: महात्मा गांधी यांनी या संबंधात आशचर्य व्यक्त केले होते. वर्धा येथे भरलेल्या संघाच्या हिवाळी शिबिराला महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. त्यावेळी डॉ. हेडगेवार तिथे उपस्थित नव्हते, पण नंतर ते गांधीजींना भेटायला सेवाग्राम आश्रमात गेले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली होती. गांधीजी इतके प्रभावित झाले होते की, ठरलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल न करणाऱ्या गांधीजींनी या भेटीसाठी ठरल्यापेक्षा अधिक वेळ दिला होता. काही विषयांवर या दोन महापुरुषांमध्ये काही मतभेद होते तरीही, डॉ. हेडगेवार यांनी उभे केलेले काम आणि मुख्य म्हणजे त्यासाठी स्वीकारलेले कठोर व्रतस्थ जीवन यांचे गांधीजींना विशेष कौतुक वाटले. ते त्यांनी बोलूनही दाखवले होते. अर्थाचा अभाव किंवा संसारिक सुखाचा अभाव व्यक्तीला आयुष्यातून उठवू शकतो. डॉ. हेडगेवार यांच्या बाबतीत मात्र असे झाले नाही.

परमेश्वराने डॉ. हेडगेवार यांना रुपाची देणगी दिलेली नव्हती. त्यांचा रंग पक्का काळा होता. चेहऱ्यावर लहानपणीच्या देवीचे व्रण होते. वक्तृत्व, लेखन, गायन वगैरे काही त्यांना मिळालेले नव्हते. असे असूनही लाखो लोक त्यांनी जोडलेत. केवळ जोडले नाहीत त्यांच्या मनात देशासाठी जगण्याचा वन्ही प्रज्वलित केला. देण्यासारखे त्यांच्याजवळ काही नव्हतेच. काही देण्याचे आमिष व आश्वासनही त्यांनी कधी दाखविले व दिले नाही. एक शुद्ध, निर्मळ, धवल प्रेरणा जागृत केली. तीही अत्यंत आत्मविश्वासपूर्वक. रूप-गुणाच्या डावेपणाने येणारी मनोग्लानी व न्यूनगंड त्यांना स्पर्शही करू शकले नाही. एवढेच नाही तर सर्व प्रकारची विपरीत स्थिती असूनही हाती घेतलेल्या अंगीकृत कार्यात दिगंत यश मिळाल्यानंतर अहंगंडही त्यांच्याजवळ फिरकू शकला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अवघ्या १५ वर्षांच्या काळात जाती, पंथ, भाषा, प्रांत या सगळ्या सीमा ओलांडून देशभर पसरलेला पाहण्याचा आनंद त्यांना अनुभवता आला आणि तरीही मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजताना यादवराव जोशी यांना त्यांनी प्रश्न विचारला, `यादवा, मी गेल्यानंतर माझा अंत्यसंस्कार कसा कराल?' अन स्वत:च त्याचे उत्तर दिले, म्हणाले, `अंत्यसंस्कार साध्या घरगुती पद्धतीनेच व्हावा. घरातील व्यक्ती गेल्यानंतर आपण करतो तसा. लष्करी मानवंदना वगैरे नको. कारण आपला संघ हा एक परिवार आहे.' भक्त व साधक परमेश्वराला प्रार्थना करतो, `अहंकाराचा वारा न लागो राजसा'. डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनात निरहंकारीता मूर्त स्वरुपात प्रकट झाली होती.

डॉ. हेडगेवार सुरुवातीला अत्यंत तापट होते. क्रांतिकारकांसोबत त्यांनी काम केले होते. समाजातील अनेक दुष्ट व्यक्तींनाही त्यांच्या संतापाचे चटके सोसावे लागले होते. परंतु असा हा स्वभाव त्यांनी आमुलाग्र बदलून टाकला. हिंदू संघटनेच्या कामाला हात घातल्यानंतरचे त्यांच्या स्वभावातील परिवर्तन सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होते. `स्वभावो दुरतिक्रम:' असे म्हणतात, पण त्यांनी ते शक्य करून दाखविले. हे करतानाच वागणं, बोलणं, चालणं यात कुठेही वेगळेपण नाही, ओढूनताणून काहीही नाही. मुद्दाम लहानपण वा मोठेपण पांघरणं नाही, आढ्यता नाही, दिखावा नाही, लहानात लहान, मोठ्यात मोठे, विद्वानात विद्वान, मित्रात मित्र. ज्ञानेश्वर माउली म्हणते, `अलौकिक नोहावे लोकांप्रती'. डॉ. हेडगेवार यांच्या जीवनात त्याची प्रचीती येते. भव्यतेची, दिव्यतेची दिपवून टाकणारी कोणतीही चमक नाही आणि तरीही हजारो हजार लोकांना पिढ्यानुपिढ्या सकस, निर्मळ प्रेरणा देण्याची ताकद कुठून आली असेल? काय असेल या उर्जस्वल उर्जेचे स्वरूप? धीर-स्थिर-विवेकी-साक्षेपी मनाची घडण कशी असेल?  

डॉ. हेडगेवार तुमच्याआमच्या सारखे माणूस होते. आमच्या प्रमाणेच सज्जन दुर्जन लोकांचा समाज त्यांच्या अवती भवती होता. कौतुक, टोमणे, उपदेश, हेत्वारोप, विरोध, अवसानघात, टीका टिप्पणी, अडथळे, जन्मगत मानवी विकार, विचार हे सगळे सारखेच होते. तरीही त्यांच्या जीवनात प्रकटलेले हार्द आणि nobility of thoughts and deeds हे असामान्य श्रेणीतील होते. कुठली प्रेरणा असेल, कुठली मूस असेल, कोणती अशी गोष्ट असेल ज्यामुळे हे शक्य झाले? आमचा ओढ सहजपणे दुर्बलतेकडे असतो. कोसळणाऱ्या, भेगाळणाऱ्या, दुभंगणाऱ्या मनाची, व्यक्तित्वाची आपल्यावर एक स्वाभाविक मोहिनी असते. त्यामुळे डॉ. हेडगेवार यांच्यासारख्या सुदृढ, गहनगंभीर, नितळ, निर्मळ, संवेदनशील तरीही काटक मनाची, व्यक्तित्वाची घडण आमच्यासाठी फक्त प्रणम्य असते. अशा मनाचा आणि व्यक्तित्वाचा तळ शोधून त्याचे झरे समजून घेण्याची आणि ते आमच्या जीवनात वाहू लागावेत अशी इच्छा जागवण्याची तिथी म्हणजे वर्ष प्रतिपदा.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३० मार्च २०१४

मंगळवार, १८ मार्च, २०१४

उन-सावली

हिवाळ्यात उन लागावं म्हणून उन्हात नेउन ठेवलेल्या कुंड्या माळ्याने आता सावलीत आणून ठेवल्या. हिवाळ्यात कुंड्या सावलीतच राहिल्या असत्या तर झाडे फुलली नसती आणि उन्हाळ्यात कुंड्या उन्हातच राहिल्या तर झाडे कोमेजून जातील किंवा कदाचित मानही टाकतील. झाडं जगायची असतील, फुलायची असतील तर त्यांना उनही हवं आणि सावलीही हवी. खरं तर सगळ्याच गोष्टींचं असंच आहे. पाणी नाही का, झाडांना तेही प्रमाणातच हवे. कमी असले तर झाडे कोमेजणार आणि जास्त झाले तरी नीट वाढणार नाहीत. मुळांशी असलेली माती कोरडी नाही झाली तर मातीचं एअरेशन नाही होणार, झाडाला नायट्रोजन नाही मिळणार; वगैरे वगैरे. मातीला ओलावा हवा, ओल नको. घराच्या भिंतीही ओल आली तर खराब होतात. त्यांचे रंग उडतात, पोपडे पडायला लागतात, अधिक ओल आली तर कुबट वास येऊ लागतो. भिंती ठिसूळ होतात. मुद्दा हा की, ओलावा हवा ओल नको.

आपलं शरीर तरी काय वेगळं आहे? केवळ मऊमऊ मांसाचा गोळा असता तर? कल्पनाही नाही ना करवत? मऊ मांस हवे आणि आधार द्यायला कडक हाडेही हवीतच. वर चिवट असे चामडेही हवे. पोषण मिळावे म्हणून रसही हवेत सगळे. फक्त गोड खाऊन उपयोग नाही. तिखट, आंबट, तुरट, कडू; सगळेच रस हवेत. कर्तृत्वाचे झेंडे फडकवायला उजेड हवा आणि शिणलेल्या शरीराला विश्रांतीसाठी अंधारही हवा. उजेडाविना रंगीबेरंगी फुलांचा आस्वाद घेता येणार नाही आणि अंधाराशिवाय चंद्र-चांदण्यांची शोभा निरर्थक होईल.

पोटच्या गोळ्याला एक क्षण डोळ्याआड न करणारी जन्मदात्री, तो थोडा मोठा झाला की ओरडते, काय सारखा अंगाअंगाशी करतो. जा, जरा मोकळा खेळ थोडा. मुलं सगळ्यांनाच आवडतात, पण मूल हे मुलंच राहिलं तर ते कोणालाही आवडत नाही. जीवनाचं महत्व, सौंदर्य आणि आनंद आहे; तशीच मृत्युचीही आवश्यकता आहे. या जगात मृत्यूच नसता तर किती अनवस्था ओढवली असती, कल्पना करून पहा. विष उतरवण्यासाठीच का होईना, पण विषाचीही आवश्यकता असतेच. दारू वाईटच पण ती व्यसन म्हणून. पण गरज म्हणून? सफाई काम करणारे लोक, शवविच्छेदन करणारे, दहन घाटावर काम करणारे लोक, अतिशय हलाखीची आणि जोखमीची कामे करणारे यांच्यासाठी दारू गरजेची नाही? व्यसन तरी नेहमी कुठे वाईट असतं? वाचनाचं व्यसन, गाण्याचं व्यसन; ही चांगलीच म्हणावी लागतील.

काहीही संघर्ष नसता तर या जगाची प्रगती झाली असती का? बिनासंघर्ष गौरीशंकर चढून जाता येईल का? किंवा प्रशांत महासागर पोहून जाता येईल का? आम्ही व्यायाम करतो म्हणजे काय करतो? आमच्याहून अधिक विरोधी शक्तीशी संघर्ष करतो. रागाशिवाय अनुराग तरी कुठे फुलतो? या जगात सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत- योग्य प्रमाणात, योग्य स्थानी, योग्य वेळी. प्रमाण, स्थान वा वेळ चुकले किंवा त्यात कमी अधिक झाले तर ती गोष्ट अयोग्य वा चुकीची ठरते. त्याने हिताऐवजी अहित होते. विकासाऐवजी विनाश होतो.

असंख्य प्रकारची माणसे दिसतात ती यामुळेच. फक्त दुर्दैवच दुर्दैव वाट्याला आलं तर माणूस पिचून जातो, हतोत्साहित होतो, निराश होतो. त्याला कितीही आशावाद सांगा तो त्याच्या निराशेतून बाहेर येउच शकत नाही. कारण आशा किंवा निराशा या बोलण्याच्या, चर्चेच्या, सांगण्या, समजावण्याच्या गोष्टीच नसतात. अनुभव आला, खुणगाठ पटली की तो आपोआप त्याला प्रतिसाद देतो. तसेच सुदैवाने ज्याला कधीच अपयश, नकार, अभाव यांचा सामना करावा लागला नाही; असा माणूस उत्साहाचे आणि आशेचे जणू कारंजे असतो. मात्र हेही खरे आहे की, अशी व्यक्ती फक्त राजपुत्र सिद्धार्थच राहू शकते, बुद्ध होण्यासाठी त्याला सुखाबरोबरच दु:खेही चाखावीच लागतात. आणि असे बुद्ध होतात तेव्हाच जगाला आधार मिळतो. आम्हाला आधार नको वगैरे म्हणणे ऐकायला ठीक आहे, पण त्यामुळे गटांगळ्या खाणे चुकत नाही. आम्ही कितीही बाता मारल्या तरी आमच्या पायतळीची माती कोणता तरी वटवृक्ष किंवा कुठले तरी गवत हेच धरून ठेवत असतात. गवगवा न करता, समजू न देता.

आम्हाला मात्र काहीतरी एक हवं असतं. अपयशाचं खापर फोडायला एक काही तरी हवं किंवा यशाची गुरुकिल्ली म्हणून एक काही तरी हवं. यश असो वा अपयश, सुख असो वा दु:ख, योग्य असो वा अयोग्य; त्याचं विश्लेषण आम्हाला सरतेशेवटी कुठल्यातरी एका बिंदूवर आणून ठेवायचं असतं. आपण आजारी पडलो तरी त्याचं एकच कारण हवं, लोकशाही व्यवस्था नीट काम करत नाही तरी एकच कारण हवं, या जगातली आणि जगाची कोडी सोडवताना सुद्धा एकच उत्तर हवं. या जगाचं, यातल्या क्रियाकलापांचं, यातील भावभावनांचं मूळ स्वरूपच व्यामिश्र आहे. हे जग ना उन्हाचं आहे, ना सावलीचं; ते आहे उन-सावलीचं. आमची ओढ मात्र एक तर उन्हाकडे असते वा सावलीकडे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १८ मार्च २०१४