बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

काळाचा महिमा की नष्टचर्य?

आमिर खान नावाच्या नटाच्या, `पीके' अशा अनाकलनीय शीर्षकाच्या, चित्रपटाच्या जाहिरातीवरून सध्या बरीच चर्चा सुरु आहे. तो चित्रपट यायला अजून अवकाश आहे आणि त्यातील कथावस्तू काय आहे याचीही फारशी कल्पना कोणाला आहे असे झडणाऱ्या चर्चांवरून दिसत नाही. सध्या चर्चा आहे ती आमिरखानच्या जवळपास नग्न चित्राची. एक गोष्ट निर्विवाद आहे की, तो एक व्यावसायिक नट आहे; त्यामुळे त्याची बहुतेक कृती व्यवसाय नजरेपुढे ठेवूनच होते. अन्यथा अजून चित्रपट यायला चारेक महिने असतानाही जाहिरात करण्याची आणि चर्चा घडवून आणण्याची काय गरज? हे सारे `तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो' या थाटाचं आहे. आता चर्चा होतील, चित्र पाहून उत्सुकता चाळवली जाईल, परिणामी लोक चित्रपटाला गर्दी करतील असा हा मामला आहे.

मग याची चर्चा का करायची? किंवा मी तरी त्यावर का लिहितोय? मी आमिरसाठी लिहित नाहीच, मी लिहितो तुमच्या-माझ्यासाठी. खरा प्रश्न आमिर काय करतो हा नाही, खरा प्रश्न आहे आम्ही काय करतो हा. चित्रपट तारेतारका यांना डोक्यावर कोणी बसवले? कोण बसवतं? तुम्ही आम्हीच ना? आज समाजात खरे आदर्श, खरे हिरो नाहीत असे नाही. अक्षरश: शेकडोंनी त्यांची संख्या आहे. पण आमची धाव असते तारे-तारकांकडे. किती घरात, किती कार्यालयात, किती गप्पांच्या अड्ड्यांवर, किती कॉलेज कट्ट्यांवर, किती महिला मंडळांमध्ये, किती पुरुषांमध्ये अशा खऱ्या हिरोंची चर्चा होते. कधी कुठे झालीच तरीही ती तोंडी लावण्यापुरती. खऱ्या आणि आभासी जीवनाचा विवेक करण्यापासून आम्हाला कोणी रोखले आहे? आम्ही या आभासाला जीवनातून हद्दपार का करत नाही?

कला आणि कलाकार म्हटल्यानंतर चित्रपट क्षेत्रच डोळ्यापुढे का येते? पंडित जसराज वा किशोरी आमोणकर वा उस्ताद राशीद खान किती जणांना ठाऊक असतात? अमृता शेरगिल किंवा अंजोली ईला मेनन किंवा मराठमोळे वासुदेव कामत यांची नावे तरी किती जणांनी ऐकलेली असतात? चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, या साऱ्यांचे विविध प्रकार, त्यांचे छोटे मोठे कलाकार, क्रिकेट वगळता अन्य खेळांचे खेळाडू, विविध वस्तूंचे- विषयांचे संग्राहक- अभ्यासक, सामाजिक कामात आयुष्य झोकून देणारे लोक यांचे तुमच्या-माझ्या जीवनात काय स्थान असते? प्रश्न हा आहे की, चित्रपट नावाच्या या गोष्टीचे over obsession कमी व्हायला हवे की नको आणि ते कमी व्हायला हवे असेल तर कसे होईल? आमची मनोरंजनाची तऱ्हा आणि आनंदाची प्रत किती घसरली आहे आणि एकांगी झाली आहे याचेच हे द्योतक आहे. आनंद आणि सुखाच्या आस्वादनाची आमची क्षमताच जणू आम्ही गमावत आहोत.

आमिर खान व्यावसायिक नट आहे आणि एकूणच समाजातील चित्रपटांचे प्रस्थ कमी करण्याची गरज आहे, हे खरे असले तरीही काही प्रश्न आणि मुद्दे उरतातच. एक तर प्रस्थ कमी होईल तेव्हा होईल तोवर काय? तोवर चित्रपटांचे, त्यातील कलाकारांचे बरेवाईट परिणाम होतात त्याचे काय? समाजाच्या, माणसाच्या जडणघडणीवर त्याचे परिणाम होतात त्याचे काय? आमिर खानने काही चांगले कार्यक्रम केले वगैरे तर्क पुरेसे नाहीत. आज प्रत्येक गोष्ट ठोकळेबाज झाली आहे. त्याचाच हा नमुना. एखादा चांगला कार्यक्रम केला की आटोपले. आदर्श, विचार, संवेदना वगैरे आज फक्त सांगण्याच्या गोष्टी उरल्या आहेत. त्यांचा जगण्याशी संबंध आहे याचे भान कमी होत आहे. म्हणूनच सामाजिक बांधिलकी सांगितली की झाले, त्याला अनुरूप जगलेच पाहिजे असे नाही; अशी आजकाल भावना झाली आहे. आमिरचे चित्र हे त्याचे बोलके उदाहरण आहे. अन्यथा असा आचरटपणा त्याने का केला असता?

व्यक्तीस्वातंत्र्य वगैरेचे पुरस्कर्ते लगेच त्याची बाजू घेवून उभे राहतील. पण अशा व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांनी सध्या उच्छाद मांडला आहे. एका व्यक्तीचा समाज निर्माण होत नाही तोवर व्यक्तीस्वातंत्र्य मर्यादितच राहणार हे लक्षात घ्यायलाच अशांची ना असते. एखादी गोष्ट करण्याचं स्वातंत्र्य असतं, पण त्यावर आक्षेप घेण्याचं स्वातंत्र्य मात्र अशा अवस्थेत नाकारलं जातं. मुळात समाज म्हणजे काय? किंवा व्यक्ती म्हणजे काय? एखाद्या कारखान्यातून तयार केलेला माल आहे का तो? व्यक्ती काय वा समाज काय दोन्ही जिवंत आणि विकसनशील, प्रसरणशील बाबी आहेत. एकाच वेळी, नव्हे एकाच क्षणी असंख्य भावभावना, आवेग, काम करीत असतात. त्यांचे प्रकार, प्रमाण, तीव्रता, वेग हे सारे त्या त्या क्षणी उपस्थित असतात, कार्यरत असतात. त्यांची दिशा कधी एक असेल तर कधी दुसरी, तर कधी आणखीन तिसरी. यातील कोणती गोष्ट योग्य, कोणती अयोग्य, हे कोण ठरवणार आणि कसे? यासाठीच जगभरात त्यातल्या त्यात समतोल असणाऱ्या लोकांनी त्या त्या समाजाची घडी बसवण्याचा उद्योग केला. त्यातूनच सामाजिक बंधने, विधीनिषेध, नीती अनीती वगैरे गोष्टी आल्या.

हे विधिनिषेध, नीतीनियम वगैरेत काही काळाने साचलेपण येतं. त्यामुळे ते बदलावे लागते. मात्र हे बदल म्हणजे ज्याला जे वाटेल ते करणे नव्हे. भारत वगळता जगात अन्यत्र या गोष्टीचा फारसा विचार झालेला नाही. भारतात मात्र सामाजिक नीतीनियमांची आवश्यकता आणि कालप्रवाहात त्यात येणारे अपरिहार्य साचलेपण यांचा विचार सखोलपणे केला होता. म्हणूनच विशिष्ट काळानंतर नवीन नवीन स्मृतींची रचना होत असे. अशा अनेक स्मृती आहेत. या स्मृतींमध्ये नीतीनियमांची, विधीनिषेधांची चर्चा आणि निश्चिती होत असे. एक प्रकारची घटना आणि घटना समिती असे ढोबळ मानाने म्हणता येईल. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्मृतींवर चिंतन केले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय घटनेत महिलांच्या अधिकारांची निश्चिती करताना आपल्याला मनुस्मृतीचा उपयोग झाला असेही त्यांनी स्वत:च म्हटले आहे.

आज मात्र विधिनिषेधशून्यतेचाच आग्रह धरला जाताना दिसतो. तरीही एक लक्षणीय बाब विसरता कामा नये. आज व्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत उदार समजल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशात सुद्धा नग्न लोकांच्या वेगळ्या वसाहती वा राहण्याच्या जागा आहेत. ज्यांना नग्न राहावयाचे आहे ते लोक काही दिवस किंवा कायमचे तेथे जाऊन राहतात. समाजात अशा प्रकारे वावरण्याची परवानगी तेथेही नाही. हे लोक स्वत:ला `निसर्गवादी' म्हणवून घेतात. अजूनपर्यंत असा एखादा समाज जगात कुठेही निर्माण झालेला नाही. काही आदिवासी समाज असे असू शकतील, पण पुढे येवून मागे गेलेला; म्हणजे वस्त्रे परिधान करून पुन्हा नग्नावस्थेत गेलेला समाज मात्र कुठेही नाही.

मूळ प्रश्न आहे नग्नतेचे एवढे आकर्षण का? नग्नता आणि कामवासना यांचा परस्पर संबंध काय? हा संबंध कधी असतो तर कधी नसतो हे वास्तव आहे. तो असतोच असे नाही आणि तो नसतोच असेही नाही. जैन संप्रदायात तर दिगंबर पंथच आहे. पण तेथे कोणालाही तसे राहता येत नाही. त्यासाठी कठोर साधना करावी लागते, मनातील कामभावनेचे कठोर दमन करावे लागते, इंद्रियजय साधावा लागतो; थोडक्यात म्हणजे कामातीत व्हावे लागते तेव्हा दिगंबर राहता येते. यात विकृती येत नसेल का? स्खलन होत नसेल का? विकृती येतही असेल, स्खलन होतही असेल; पण विकृती ही विकृती म्हणूनच मानली जाते. आज सर्वत्र माजलेली आणि बोकाळलेली नग्नता आणि दिगम्बरांची नग्नता यात जमीन अस्मानाचा फरक आहे. `सेक्सी' दिसण्यासाठी वा असण्यासाठी आचरल्या जाणाऱ्या नग्नतेची त्याच्याशी तुलना नाही होऊ शकत.

नग्नतेचे एक तत्वज्ञानही आहे. आदीमता आणि आध्यात्मिकता असे त्याचे दोन पदर आहेत. हे दोन्ही पदर विलक्षण व्यक्तीसापेक्ष आहेत. त्यामुळे ते सामाजिक स्तरावर व्यवहार्य असू शकत नाहीत. कारण समाज ही गोष्टच प्रचंड व्यामिश्र आहे. आदीमता प्रत्ययाला येणाऱ्या जाणीवांवर आधारलेली असते. आज बहुतांश विचार आणि व्यवहार याच प्रत्ययाला येणाऱ्या जाणीवांपुरता सीमित झाला आहे. परंतु या प्रत्ययोत्पादक जाणीवा मूलत: व्यक्तीसापेक्ष असल्याने सामाजिक नीतीनियमांसाठी उपयोगाच्या नसतात आणि जोवर एका व्यक्तीचा समाज किंवा कारखान्यातून काढलेल्या एका साच्याच्या माणसांचा समाज निर्माण होत नाही तोवर अशा जाणीवा कलहाशिवाय दुसरे काहीही निर्माण करू शकत नाहीत. म्हणूनच आमिर काय अथवा अन्य कोणीही काय, मर्यादांच्या चौकटीत राहायला हवेत. तसे ते राहत नसतील तर त्याबद्दल आक्षेप घेण्याचा, त्यावर टीकाटिप्पणी करण्याचा आणि आवश्यक झाले तर कारवाई करण्याचाही अधिकार `समाजाला' असतो.

`संस्कृतीरक्षक’ आणि `संस्कृतीभक्षक’ वगैरे वितंडवाद मनोरंजन करतील पण त्यातून साधणार काहीही नाही. मर्यादा पाळणे ही चुकीची गोष्ट आहे किंवा मर्यादा पाळावी ही अपेक्षा चुकीची आहे असे कसे म्हणता येईल? `संस्कृतीरक्षक’ हा उपहासात्मक शब्द का ठरावा? संस्कृती रक्षणात वाईट काय आहे? `संस्कृतीरक्षक’ चुकीचे किंवा `आधुनिक, पुरोगामी’ बरोबर हे तरी कशावरून? समाज म्हणून विचार करताना `लघुत्तम साधारण विभाजका’चाच विचार करावा लागतो, एखाद्याच्या `वाटण्या’चा नाही. शारीर मनोभावांच्या पलीकडेही खूप मोठे जग आहे आणि ते आजच्या आधुनिक, पुरोगामी माणसाला खुणावत देखील नाही हा काळाचा महिमा म्हणायचा की माणसाचे नष्टचर्य?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २० ऑगस्ट २०१४

गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत- २

भारताच्या भूभागावरील अन्य देशांचा जन्म साम्राज्यवादी कुटीलतेचा आणि ब्रिटीशांच्या प्रशासनिक चतुराईचा परिणाम होता. पाकिस्तानच्या निर्मितीत या दोन कारणांसोबत सांप्रदायिक उन्मादाचे तिसरे कारण महत्वाचे आणि निर्णायक ठरले होते. नव्हे तेच एकमेव कारण वाटावे इतका त्याचा प्रभाव आणि आवाका मोठा होता. म्हणूनच आजही अखंड भारत म्हटले वा भारताची फाळणी म्हटले की, पाकिस्तानची निर्मिती एवढेच प्रामुख्याने डोळ्यासमोर येते. अखंड भारताची चर्चाही त्याभोवतीच फिरत असते. हे अतिशय स्वाभाविक असेच आहे. याची काही करणे अशी-

१) अपरिमित मनुष्यहानी. किमान १० लाख हिंदूंचे शिरकाण भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झाले.
२) जगातील आजवरचे सगळ्यात मोठे मानवी स्थलांतर त्यावेळी झाले. हे स्थलांतरदेखील रोजगार वा युद्ध वा तत्सम कारणांनी नव्हते, तर धार्मिक आधारावर लोकांना विस्थापित करण्यात आले होते- तेही दोन भागांपैकी फक्त एका भागातून, पाकिस्तानातून.
३) मानवी अन्याय, अत्याचार, दुराचार, लुटालूट याला तर सीमाच नव्हती.
४) परस्परांशी संलग्न नसलेल्या हजारो मैल दूर असलेल्या दोन स्वतंत्र भूभागांचा एक देश कृत्रिमरीत्या, शासकीय व प्रशासकीय आदेशाने जन्माला घालण्यात आला.
५) हे विभाजन होऊ नये यासाठी, अन्य कुठल्याही विभाजनापेक्षा कितीतरी अधिक नेत्यांनी प्रयत्न आणि प्रतिष्ठा पणाला लावले होते अन ते सारे पराभूत झाले होते.
६) अन्य देश वेगळे झाले तरीही त्यावेळी भारताचे शत्रू जन्माला आले नव्हते. मात्र पाकिस्तान निर्मितीच्या वेळी एक शत्रू देश जन्माला आला. मुळात पाकिस्तानची निर्मिती प्रशासकीय, राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणांनी झाली नाही तर मुस्लिमांच्या हिंदू द्वेषातून आणि भारत द्वेषातून झाली.

मुळातच `एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति' हे तत्व हजारो वर्षे रक्तात भिनल्यामुळे सांप्रदायिक आधारावर नवीन देशाची निर्मिती या देशाच्या स्वप्नातही आली नव्हती. सांप्रदायिक कलह हेच मुळात मोगलांच्या आक्रमणापासून या देशात आले. इस्लामच्या कट्टरवादी विचारधारेने येथील बहुलतावादी, उदार विचारांना आणि आचारांना पहिला धक्का दिला. त्यानंतर आत्मसुरक्षा आणि क्रियाप्रतिक्रिया न्यायाने या देशाची घडी विस्कटत गेली.

दुसरीकडे या आक्रमणाने हतबुद्ध होऊनही या देशाची विश्वकल्याणी चिंतनधारा आटली नाही. अनेकानेक संत, संप्रदाय, चिंतक, आंदोलने यांनी बाहेरून आलेल्या या लाटेला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशदेखील आले. मूळ संघर्षाची प्रवृत्ती, स्वामित्वाची लालसा आणि त्याला अधिकृत पांथिक पाठींबा असतानाही इस्लामचे भारतीय रूप आकार घेत होते. मूळ भारतीय मानस या दोन भिन्न प्रवाहांच्या एकीकरणासाठी तयार होत होते. अगदी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात देखील याची झलक पाहायला मिळाली होती. धूर्त इंग्रजांना ते लक्षात आले आणि त्यांनी योजनापूर्वक हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे करण्यास सुरुवात केली. आत्मसातिकरणाच्या प्रक्रियेत पहिली पाचर मारली गेली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेने. या विद्यापीठाच्या रूपाने दोन वेगळ्या अस्मिता पोसण्याचे आणि त्यासाठी इस्लामिक कट्टरता जोपासण्याचे, वाढवण्याचे, त्याला खतपाणी घालण्याचे आणि त्याचे तत्वज्ञान तयार करण्याचे एक सशक्त केंद्र १८७५ साली अस्तित्वात आले. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी स्थापना झाल्याचा दावा करणाऱ्या (वास्तविक भारतीय जनतेच्या असंतोषाला निरर्थक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या) काँग्रेस पक्षाच्याही अगोदर मुस्लिम विद्यापीठाची स्थापना घडवून आणण्यात काय हेतू असू शकतो?

अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेपासून सुरु झालेला हा प्रवास १९०५ च्या वंगभंग आंदोलनानंतर १९०६ साली मुस्लिम लीगच्या स्थापनेपर्यंत पोहोचला. इंग्रजांनी पसरलेल्या या जाळ्यात काँग्रेसदेखील फसली. खिलाफत चळवळीने त्याला बळच दिले. पाश्चात्य विचार आणि रीतीरिवाज मानणारे आणि पाळणारे, पारंपारिक अर्थाने मुस्लिम म्हणता येणार नाहीत असे मोहंमद अली जिना हे वेगळ्या पाकिस्तानचे प्रतिक बनले. जिना हे पाकिस्तानचे जनक मानले जातात. परंतु वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मूळ कल्पना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची आहे. १८६७ साली प्रथम त्यांनी ही कल्पना प्रचारित केली. त्यानंतर १८७५ साली त्यांनी मदरसातुल उलुम मुसलमान-ए-हिंद स्थापन केले, त्याचे पुढे मोहम्मेदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज झाले आणि नंतर त्याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठ झाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ साली सर ए.ओ. ह्यूम या ब्रिटीश माणसाच्या पुढाकाराने झाली. सर सय्यद अहमद खान यांना त्यात रुची नव्हती आणि त्यांना त्यात सामील करून घेण्याचा प्रयत्नही काँग्रेसने केला नाही. उलट दोघातील फुट कशी वाढेल याचेच प्रयत्न करण्यात आले. १८८७ साली काँग्रेसचे तिसरे अधिवेशन झाले. बद्रुद्दिन तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी सर सय्यद अहमद खान यांनी त्यांना मुस्लिम हितासाठी काँग्रेसच्या बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस हिंदूंची प्रतिनिधी आहे, असा त्यांचा तर्क होता. त्याला बद्रुद्दीन तय्यबजी यांनी उत्तर दिले की, मुस्लिमांच्या हितासाठी बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसमध्ये राहूनच आपण प्रयत्न करू. परंतु दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या याच बद्रुद्दीन तय्यबजी यांनी काँग्रेस नेतृत्वाला एक लिखित विनंती केली की, काँग्रेसमध्ये मुस्लिमांना न्याय मिळत नाही. मुस्लिमांना न्याय मिळावा आणि त्यांच्यात विश्वास वाढावा यासाठी पाच वर्षे काँग्रेस विसर्जित करावी वा स्थगित ठेवावी. थोडक्यात म्हणजे या ना त्या प्रकारे सतत मुस्लिमांचे तुणतुणे वाजवत ठेवायचे. याच भावनेतून १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.

यामुळे त्यांचे वेगळेपण अधिकच उठावदार झाले. त्यांच्या मागण्यांना जोरही आला. वास्तविक यामागे फूस इंग्रजांचीच होती. मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर हिंदूंची काँग्रेस आणि मुस्लिमांची मुस्लिम लीग असे दोन पक्ष तयार झाले. कोणत्याही विषयावर चर्चा करताना प्रथम तुमच्या दोघांचेही एकमत होऊ द्या, अशी भूमिका ब्रिटीशांकडून सातत्याने घेण्यात आली. प्रथम दोन समुदायांमध्ये परस्पर अविश्वास निर्माण करून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्यात आले आणि नंतर तुम्ही एकत्र आल्याविना काहीही करता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घ्यायची अशी ब्रिटीशांची खेळी होती. काँग्रेसही त्यांच्या या जाळ्यात अडकत गेली. १९१८ चा लखनौ करार याचे उदाहरण म्हणता येईल. लोकमान्य टिळकांनी अतिशय चांगल्या भावनेने या कराराला मान्यता दिली, पण त्यामुळे मुस्लिम लीगला स्वतंत्र गटाची मान्यता आणि शक्ती प्राप्त झाली. स्वाभाविकच त्यापुढील प्रत्येक गोष्टीत मुस्लिम लीगची भूमिका महत्वाची ठरू लागली. दोनच वर्षात टिळकांचे देहावसान झाले. महात्मा गांधी राजकीय पटलावर आले. त्यांना परिस्थितीची कल्पना नव्हती असे नाही. उलट परिस्थितीची कल्पना असल्यामुळेच आणि मुस्लिम लीग प्रत्येक वेळी आडमुठेपणा करील या शंकेनेच त्यांना खुश करण्याचा विचार ते करू लागले. मुस्लिमांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसला त्यांची साथ लाभेल असा त्यांचा होरा होता. परंतु मुस्लिम मानस समजून घेण्यात गांधीजी कमी पडले. मुस्लिमांचा विश्वास प्राप्त करून घेऊन त्यांना अधिकाधिक जवळ आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी तुर्कस्तानातल्या खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. याचा अर्थ काँग्रेस आपली मित्र आहे असा काढण्याऐवजी खिलाफतची मागणी बरोबर आहे असा काढण्यात आला. त्यानंतर अशा मागण्या वाढतच गेल्या आणि प्रत्येक वेळी त्यापुढे वाकणे सुरु झाले. काय योग्य काय अयोग्य याचा विवेक सुटला. एवढेच नव्हे तर मुस्लिमांना जवळ आणण्याच्या या भावनेचा पगडा एवढा होता की मग हिंदूंचा विचार करण्याचीही गरज उरली नाही. मुसलमान म्हणतील ते योग्य आणि ते म्हणतील ते अयोग्य अशी अत्यंत घातक मुलभूत चूक काँग्रेसच्या या धोरणाने झाली. परिणामी अखेर २३ मार्च १९४० रोजी मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली.

मुसलमानांचे लांगुलचालन काँग्रेस करते, ब्रिटीश सरकार त्यांचे लाड करते आणि ब्रिटीश सरकार व मुस्लिम नेते यांच्यापुढे काँग्रेस लाचार होते; अशी भूमिका आणि टीका केवळ हिंदू महासभा किंवा रा. स्व. संघ किंवा काँग्रेस विरोधकच करीत असत असे नाही. प्रत्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी १९४६ साली एक पुस्तक लिहून १९०६ ते १९४६ या काळात मुस्लिम लीगला देण्यात आलेल्या सवलतींची यादीच प्रसिद्ध केली होती. मुस्लिम लीग, काँग्रेसची दिशाहीन स्थिती, इंग्रजांची फोडा झोडा नीती या तीन बाबीच भारत-पाकिस्तान विभाजनासाठी जबाबदार ठरल्या.

भारत व पाकिस्तान हे दोन वेगळे देश होणार, फाळणी होणार हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा मोहम्मद आली जिन्ना यांनी जोरकसपणे लोकसंख्येच्या अदलाबदलीची, म्हणजे प्रस्तावित भारतातील सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात यावे आणि प्रस्तावित पाकिस्तानातील सगळ्या हिंदूंनी भारतात जावे अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अशीच सूचना केली होती. हिंदू व मुसलमान एकत्रितपणे शांततेने आणि सौहार्दाने राहू शकणार नाहीत असे मत त्यांनी `thoughts on pakistan' मध्ये व्यक्त केले होते. काँग्रेसने मात्र ही फाळणी प्रादेशिक आहे, सांप्रदायिक नाही अशी भूमिका घेत लोकसंख्येच्या अदलाबदलीचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि कुठे राहायचे याबाबत लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार राहावा अशी भूमिका घेतली. लोकसंख्येची अदलाबदल होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शेवटच्या औपचारिकता पूर्ण करताना १९४६ साली कॅबिनेट मिशनसमोर प्रश्न आला की, पाकिस्तानात उरलेल्या हिंदूंचे काय? आणि भारतात उरलेल्या मुसलमानांचे काय? त्यावर बॅरि. जिन्नांचे उत्तर होते- `they will be treated as reciprocal hostages. this will prevent mistreating of minorities in both the countries.'

भविष्यकाळात भारताने कधीही यानुसार कृती केली नाही. केवळ राजकीय धोरणाचा भाग एवढेच कारण त्यामागे नव्हते तर भारताचा तो हजारो वर्षांचा स्वभाव आहे. कोणाचाही द्वेष वा सूडभावना हिंदूंच्या/ भारताच्या रक्तातच नाही. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंचा अनन्वित छळ झाला, त्यांना परागंदा व्हावे लागले, त्यांची लोकसंख्या सतत घटत गेली तरीही भारताने मुस्लिमांकडे reciprocal hostages म्हणून कधीही पाहिले नाही. वास्तविक १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारतातील ९० टक्केहून अधिक मुसलमानांनी वेगळ्या पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानात गेलेत मात्र सुमारे ५० टक्के. म्हणजे भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचा त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा होता. तरीही भारताने त्यांना reciprocal hostages म्हणून वापरले नाही. अगदी बांगलादेश निर्मितीच्या वेळीही भारत आपल्या स्वभावानुसारच वागला. आपल्या हाती पडलेल्या हजारो सैनिकांना त्याने सन्मानाने परत केले. बांगलादेश आणि पाकिस्तानात मात्र काहीही कारण नसताना हिंदूंना योजनापूर्वक संपविण्यात आले. भारत भारताच्या स्वभावानुसार वागला आणि ते दोन देश त्यांच्या स्वभावानुसार. मात्र भारताच्या स्वभावाविरुद्ध तक्रार असता कामा नये, त्या दोन देशांच्या स्वभावाविरुद्ध मात्र दाद आणि न्याय मागायलाच हवे. कारण भारताच्या स्वभावाने कोणाचे अहित होत नाही, त्यांच्या स्वभावाने मात्र सगळ्यांचे अहित होते.

भारताच्या पूर्व भागातही मुस्लिम उपद्रव वाढला होता. मुस्लिम लीगने १५ ऑगस्ट १९४६ रोजी `डायरेक्ट अॅक्शन'ची घोषणा केली होती. त्यानंतर कोलकाता आणि बंगालमध्ये जे अभूतपूर्व दंगे उसळले त्याने हिंदूंची ससेहोलपट केली. हजारो हिंदूंना ठार करण्यात आले. मृत्यूचे ते तांडव पाहून गांधीजी अस्वस्थ झाले. ती आग विझवण्यासाठी गांधीजी बंगालमध्ये गेले. एक दिवस संध्याकाळी प्रार्थना सभा सुरु असताना जमावाने प्रार्थना स्थळाला घेरून घेतले. लोक मुस्लिम लीगचा नेता सुहरावर्दी याची मागणी करू लागले. गांधीजींनी सभेत उपस्थित सुहरावर्दीलाच उत्तर द्यायला सांगितले. नाईलाज झालेल्या सुहरावर्दीने `डायरेक्ट अॅक्शन'साठी आपणच जबाबदार असल्याचे मान्य केले आणि गांधीजींच्या उपस्थितीचा फायदा घेत पळ काढला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महात्मा गांधी रात्री ११ वाजताच झोपी गेले होते. रात्री १२ वाजता दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना गांधी शांत झोपून होते.

इंग्लंडचे पंतप्रधान क्लीमेंट अॅटलि यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जाहीर केले की, जून १९४८ अखेर हिंदुस्थानी जनतेकडे सत्ता सुपूर्द करण्यात येईल. १९४७ च्या मार्च महिन्यात लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी घाईने फाळणी उरकली. सत्तांतराची घोषणा करण्याची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी तारीख निश्चित झालेली नव्हती. परंतु फाळणीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने स्वाभाविकच जगभरातील पत्रकार उपस्थित असलेल्या त्या महत्वाच्या पत्रपरिषदेत त्यांना `कधी?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लॉर्ड माउंटबॅटन गडबडले. त्यांनी मनाशी काय हिशेब केला देव जाणे, अन अचानक जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख जाहीर केली. दोन देश वेगळे झाले तो क्षण एकच होता आणि असू शकतो. तरीही पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट आणि भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट असे का? तर लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्हीकडे उपस्थित राहता यावे यासाठी, असे त्याचे उत्तर आहे. हे महाशय नसते उपस्थित राहिले समारंभाला तर काय झाले असते?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ ऑगस्ट २०१४

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत - १

खूपदा चर्चिला जाणारा, चर्चेहून अधिक महत्वाचा असणारा आणि त्याहूनही अधिक गैरसमजांचा एक विषय आहे अखंड भारत. इतिहासातील सत्य आणि भविष्यातील आव्हान आहे अखंड भारत. काय होता अखंड भारत? काय आहे अखंड भारत? काय राहील अखंड भारत?

भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे भारतावरील आक्रमणे. गेल्या हजारो वर्षात भारतावर शेकडो आक्रमणे झाली. इतिहासाच्या शेकडो पुस्तकांमध्ये भारतावर झालेल्या आक्रमणांचा उल्लेख आहे, त्याची चर्चा आहे. अफगाणिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान, तिबेट, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश यांच्यावरील आक्रमणांचा मात्र इतिहास नाही. कारण मुळात हे देश भारताचाच भाग होते. जी काही आक्रमणे झाली ती भारतावरच झाली. येथील भूभाग, येथील अमाप संपत्ती, येथील धनधान्य, येथील ज्ञानविज्ञान लुटण्यासाठी आणि हडपण्यासाठी भारतावर आक्रमणे केली जात आणि या आक्रमणकर्त्यांनी केलेल्या राजकारणातून गेल्या अडीच हजार वर्षात भारताचे २४ तुकडे झाले.

पुराणांमध्ये आणि धर्मशास्त्रांमध्ये भारताचे अतिशय सुस्पष्ट वर्णन असून हिमालयाच्या दक्षिणेला आणि हिंदी महासागराच्या उत्तरेला असलेल्या भूभागाला भारत म्हणतात आणि तेथील लोकांना भारती म्हणतात असे त्यात म्हटले आहे. भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६५ साली दिलेल्या गणराज्य दिन संदेशात विष्णूपुराणातील यासंबंधीचा श्लोकच उद्धृत केला होता. तो श्लोक होता- `हिमालयं समारभ्य यावदेन्दु सरोवरम, तं देवनिर्मितम देश:, हिंदुस्थानं प्रचक्षते'. अशाच आशयाचा दुसराही एक श्लोक आहे- `उत्तरं यत समुद्रस्य, हिमाद्रेश्चैव दक्षिणम, वर्षं तद भारतम नाम, भारती तत्र संतती:' उत्तर आणि दक्षिणेच्या या सीमा नमूद केलेल्या असल्या तरीही भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांचा उल्लेख मात्र नाही. परंतु थोडा नीट विचार केला तर लक्षात येईल की, हिमालयाचा पूर्व-पश्चिम विस्तार आणि हिंदी महासागराचा पूर्व-पश्चिम विस्तार याच भारताच्या नैसर्गिक सीमा होत्या. हिमालय आणि हिंदी महासागर यांचा पूर्व-पश्चिम विस्तार जवळपास सारखाच आहे. पूर्वेला इंडोनेशिया ते पश्चिमेला इराणपर्यंत हिमालय व हिंदी महासागराचा विस्तार आहे आणि या दोघांच्या मधील भूभाग म्हणजेच आजच्या इंडोनेशियापासून तर इराणपर्यंतचा संपूर्ण भूभाग म्हणजे प्राचीन भारत होय. तोच अखंड भारत.

या अखंड भारताचे सिकंदराच्या आक्रमणापासूनच्या अडीच हजार वर्षात २४ तुकडे पाडण्यात आले. या काळात रोमन, ग्रीक, हूण, शक, कुषाण, सिरीयन, पोर्तुगीज, फेंच, डच, अरब, तुर्क, तार्तार, मोगल व इंग्रज यांनी अनेकवार आक्रमणे केली. त्यांचा संघर्ष जसा येथील स्थानिक जनतेशी झाला तसाच त्यांचे आपापसातही संघर्ष झाले. आपापसात करारमदारही झाले. भारताचे काही तुकडे या त्यांच्या करारमदारांचाही परिणाम आहेत. यातील केवळ इंग्रजांनी १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या काळात भारताचे सात तुकडे केले. १८५७ मध्ये भारताचे क्षेत्रफळ ८३ लाख चौरस किलोमीटर होते. आज भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किलोमीटर आणि शेजारील देशांचे क्षेत्रफळ ५० लाख चौरस किलोमीटर आहे.

त्यावेळच्या भारतात एकछत्री राज्यसत्ता नव्हती. वेगवेगळी राज्ये होती. मात्र व्यापार, तीर्थयात्रा, पर्यटन, रोटी-बेटी व्यवहार, नातेसंबंध, वेशभूषा, संगीत, नृत्य, साहित्य, भाषा-बोली, खाद्य परंपरा, ज्ञान-विज्ञान, पूजापाठ, पंथ-संप्रदाय हे सारे मुक्त होते. त्यावर कुठेही बंधने नव्हती. लोक कुठेही जाऊ-येऊ शकत होते. खरे तर एका प्रबळ राज्यसत्तेशिवाय एवढा मोठा देश आणि विशाल समाज एकत्र, सुखशांतीपूर्ण रीतीने कसा राहिला हा सगळ्या जगाच्या चिंतनाचा विषय आहे. भारतात येणारे ह्यू एन त्संग किंवा रिचर्ड बर्टन किंवा त्यांच्यासारखे अनेक पर्यटक वा संशोधक ज्यावेळी येत तेव्हा या संपूर्ण अतिविशाल भूप्रदेशात कुठेही गेले तरीही त्याचा उल्लेख भारत असाच करीत. या देशाच्या कोणत्याही भूभागात पाहिलेली, अनुभवलेली गोष्ट भारतात पाहिलेली वा अनुभवलेली, अशीच नोंद त्यांनी आपापल्या लेखनात केली आहे.

इंग्रजांनी या देशाचा पहिला लचका तोडला त्याचं नाव अफगाणिस्थान. इ.स. १८७६ मध्ये रशिया व ब्रिटीश यांच्यात एक करार झाला त्यानुसार रशिया आणि भारत (इंग्रजांच्या अंमलाखालील) यांच्या सीमेवर एक बफर राज्य निर्माण करण्याचा निर्णय झाला. ते राज्य म्हणजेच आजचा अफगाणिस्थान. शैव संप्रदायी, प्रकृती पूजक, बौद्ध मतावलंबी असलेल्या तेथील जनतेच्या इस्लामिकरणाची प्रक्रिया आधीच सुरु झाली होती. त्या प्रक्रियेला नंतर पूर्णत्व आले. महाराजा रणजीत सिंग यांनी कंधारवर राज्य केल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. धृतराष्ट्राची पत्नी आणि कौरवांची माता गांधारी याच गांधार (कंधार) देशाची राजकन्या होती. १८७६ साली ब्रिटिशांनी हा भूभाग भारतापासून वेगळा केला.

हिमालयातील ४६ लहान मोठ्या सरदारांना एकत्र आणून पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळ राज्याची स्थापना पूर्वीच केली होती. भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेकांनी नेपाळमध्ये आश्रयही घेतला होता. ब्रिटिशांनी आपली ताकद वापरून या पहाडी प्रदेशातील छोट्या छोट्या राजांना सरदारांना एकत्र करून त्यांच्याशी एक करार केला आणि १९०४ साली नेपाळला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देत असल्याचे जाहीर केले. इंग्रजांच्या डाकुगिरीचे हे मासलेवाईक उदाहरण आहे. कोणीही मागणी वगैरे केली नसताना, आपला काहीही संबंध नसताना विश्वसम्राटाच्या स्वत:च स्वत:ला बहाल केलेल्या थाटात केलेल्या त्यांच्या या कृतीने नेपाळ जन्माला आले. तेथे इंग्रजांनी आपले प्रशासन लागू केले. १९४७ सालीच नेपाळलाही ब्रिटनने आपल्या कब्ज्यातून मुक्त केले. १९५३ साली महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारत सरकारला एक निवेदन देऊन नेपाळ भारतात सामील करून घ्यावे आणि नेपाळला भारताचे एक राज्य म्हणून दर्जा द्यावा अशी विनंती केली होती. १९५५ साली रशियाने संयुक्त राष्ट्रसंघात यासाठी दोनदा विशेषाधिकार वापरला होता. परंतु पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भूमिकेने नेपाळ भारतात समाविष्ट होऊ शकला नाही. आजही भारत आणि नेपाळ मधील नागरिकांना परस्परांच्या देशात जाण्यायेण्यासाठी पासपोर्ट व्हिसाची गरज नाही. मात्र भारताच्या चुकीच्या आणि विचित्र धोरणांमुळे नेपाळ हा भारत विरोधासाठी चीनचा अड्डा बनला आहे.

भूतानला १९०६ साली वेगळा देश जाहीर करण्यात आले. १९१४ साली चीन सरकार व ब्रिटीश सरकार यांच्यात एक करार झाला आणि भारत व चीन यांच्यातील एक बफर राज्य म्हणून तिबेटला वेगळा स्वतंत्र देश जाहीर करण्यात आले. हिमालयाचे विभाजन करून मॅकमोहन रेषा तयार करण्यात आली. दोन विस्तारवादी, साम्राज्यवादी शक्तींचे हे जागतिक षड्यंत्र होते. स्वातंत्र्यानंतर १९४९ ते १९५९ या काळात तिबेटकडे पूर्ण दुर्लक्ष करून भारताने तिबेट चीनच्या घशात घातला. एकीकडे तिबेटला चीनचा प्रदेश म्हणून मान्यता देणे आणि दुसरीकडे तिबेटच्या दलाई लामांना आसरा देऊन निर्वासित तिबेटी सरकार स्थापन करण्यास मान्यता देणे, अशा अतिशय भोंगळ धोरणाने आपण एक मोठी डोकेदुखी मागे लावून घेतली. शिवाय १९६२ च्या युद्धात चीनने हडपलेला अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशचा प्रचंड भूभाग तर आपण विसरून गेल्यासारखाच आहे.

याशिवाय थायलंड, कंबोडिया, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, व्हिएत्नाम येथेही भारतीय राजघराण्यांनी प्रदीर्घ काळ राज्य केले. त्या काळात तेथे हिंदू संस्कृती (धर्म, सभ्यता, रीतीरिवाज, कलाकौशल्य, साहित्य, मंदिरे, स्थापत्य, व्यापारउदीम वगैरे) दिमाखाने नांदत होती. ते देशही अलगथलग पडत गेले. श्रीलंका व म्यानमार यांना १९४८ साली ब्रिटीश सत्तेतून मुक्त करण्यात आले. श्रीलंकेत १९७८ साली तर म्यानमारमध्ये २०११ साली नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. म्यानमार म्हणजे खरे तर पूर्वीचा ब्रम्हदेश. त्याच्या नावातच ब्रम्ह होते. लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली याच देशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी हा देश भारताचाच भाग होता. आपले साम्राज्य या ना त्या प्रकारे कायम राहावे किंवा भारतीय उपखंडात ढवळाढवळ करण्यासाठी आपल्याजवळ कायम स्थान राहावे या दूरदर्शी परंतु कुटील हेतूने ब्रिटिशांनी हे तुकडे करून ठेवले होते. यातील सगळ्यात महत्वाचा, मूलगामी आणि सखोल परिणाम करणारी कृती होती पाकिस्तानची निर्मिती. भारताच्या या विभाजनाची कहाणी हा एक स्वतंत्र शोकात्म महाअध्याय आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १३ ऑगस्ट २०१४