मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०२२

श्रीलंका

भारताने श्रीलंकेला मदत केल्याची छोटीशी बातमी पेपरला आहे. चांगले आहे. मनाने सहजच आठवले; स्वामी विवेकानंद पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा त्यांचे पहिले स्वागत आणि मानपत्र अर्पण कोलंबोला झाले होते. त्यांचे भाषणही झाले होते. ते भारतातील पहिलं स्वागत होतं. मानपत्र आणि भाषण दोन्हीत तसा उल्लेख तर होताच पण त्याला सगळ्यांची स्वीकृती होती. गेल्या उण्यापुऱ्या सव्वाशे वर्षात असं काय आणि काय काय झालं की, श्रीलंका आणि भारत यांचं एकत्व मनातूनही पुसलं जावं? गडबड फार मोठी आहे. नीट समजून घेतली तर. हा हिंदू/ भारतीय समाज बाह्य आघातांचाच विचार करू लागला आहे. त्यावरच त्याचं लक्ष आहे. स्वतःची शक्ती, सत्व, जीवन यांच्याकडे लक्ष देण्याची त्याला गरज वाटेनाशी झाली. अन तो दुबळा होतो आहे. सबळ होण्याचा त्याचा अर्थदेखील बदलला आहे. त्यामुळेच अखंड भारत म्हटल्यावर सुद्धा आम्हाला फक्त पाकिस्तान आठवतो. वास्तविक भारत म्हणजे काय? हे समजून घ्यायला स्वामीजींचं कोलंबो भाषण पुरेसं आहे. त्याचं वारंवार वाचन सुद्धा आपली जाणीव, दृष्टी आणि चिंतन घडवू शकतं, व्यापक करू शकतं, त्याला दिशा देऊ शकतं. हां, आम्हाला ते आवडेल आणि पटेल का ही मात्र शंका मनात आहे.

- श्रीपाद कोठे

३० नोव्हेंबर २०१९

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

असमर्थनीय

समता परिषदेने अरुंधती रॉय ला पुरस्कार दिला. मानभावीपणे लाखात लाख घालून तिने तो अन्य कोणाला दिला. अन महानतेचा एक कडा सर केल्याचे दाखवत नक्षलवादाला समर्थन देऊन कौतुकही केले. नक्षलवादाची मानवीय चर्चाही भरपूर झालेली आहे. मात्र आपल्या खऱ्याखोट्या अधिकारांसाठी, न्यायासाठी वगैरे दुसऱ्या मानवाची हत्या करणे ही कोणत्याही रंगाची मानवता होऊच शकत नाही. म्हणूनच नक्षलवादाचे स्पष्ट वा प्रच्छन्न समर्थनही होऊ शकत नाही. शिवाय प्रस्थापित शासकीय भूमिकेला हे छेद देणारेही आहे. यासाठी सरकारने अरुंधती बाईंना `सरकारी पुरस्कार' द्यायला हवा, अन तिला पुरस्कार देऊन प्रतिष्ठित करणाऱ्या अन तिच्या नक्षलसंबंधित भूमिकेवर मूग गिळून अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या समता परिषदेच्या भुजबळ महाशयांनाही `सरकारी पुरस्कार' द्यावा.

- श्रीपाद कोठे

२९ नोव्हेंबर २०१५

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

स्वयंसेवक आणि राजकीय पक्ष

नागपूरचे भाजप नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. स्वाभाविकच अनेकांना वाईट वाटले, अनेक जण अस्वस्थ झाले. हिंदुत्व, संघ, भाजप अशीही चर्चा होणे स्वाभाविकच. त्यांना संघाचा कौटुंबिक वारसा होता हेही खरं. पण यात वाईट वाटण्यासारखे वा अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? हां; भाजप या पक्षापुरते दु:ख, अस्वस्थता, धक्का असू शकतात. पक्षाचा फायदा वा नुकसानही असू शकते. त्याहून अधिक काही नाही. कारण कोणाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा दडपून तर टाकता येऊ शकत नाहीत. त्या राहणारच. एकीकडे संघ वाढत जाणार, हिंदुत्वाची स्वीकार्यता वाढत जाणार, अन बहुपक्षीय लोकशाही असल्यामुळे राजकीय आकांक्षा आणि राजकीय गणिते हेही सुरूच राहणार. हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, संघाचे स्वयंसेवक सगळ्या पक्षांमध्ये दिसू लागणार. त्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणेयेणेही राहणारच. आजवर संघ म्हणत असे की आम्हाला कोणताही राजकीय पक्ष वर्ज्य नाही. सगळे पक्ष आपलेच पक्ष आहेत. पण हे एकतर्फी होते. आता विविध पक्षांनाही संघाचे स्वयंसेवक चालू लागतील. विविध पक्षांची संघाबद्दलची एकतर्फी अस्पृश्यता हळूहळू संपू लागेल. हा सामाजिक, राजकीय बदल होणे अपरिहार्य आहे. सगळ्यांना त्याची सवय करून घ्यावी लागेल.

- श्रीपाद कोठे

सोमवार, २२ नोव्हेंबर २०२१

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

थोडेसे अप्रिय

आपली अर्थव्यवस्था १२ टक्के रोखीची आहे. जगाचा हा दर ४ टक्के आहे.

- अर्थमंत्री

अर्थमंत्री महोदय,

१) जेथे ४ टक्के दर आहे त्या अर्थव्यवस्था आपण आदर्श मानता का?

२) `international standard syndrome' चे आपण समर्थन करता का?

३) भारत `सोने की चिडिया' होता तेव्हाही भारताची अर्थव्यवस्था रोखीचीच होती. आजच्यापेक्षा त्याचे प्रमाण अधिकच होते.

४) आपले सरकार सत्तेवर आल्यापासूनच्या अडीच वर्षात foreign exchange reserve दुथडी भरून वाहत आहेत. या काळातही आपली अर्थव्यवस्था cash intense अशीच आहे.

५) IMF, WB यांच्यासाठी cashless चा खटाटोप सुरु आहे का?

६) आपल्यासारख्या तज्ञांनी स्वत:चे (स्वदेशी) paradigms निर्माण करून जगाला ते imitate करायला का लावू नयेत?

@@@@@@@@@@@@@@@@@

आज एका बँक प्रतिनिधीने त्यांचे payment app ऑफर केले. हे करताना ती म्हणाली, याचा उपयोग केल्यास सिनेमाच्या एका तिकिटावर एक फ्री मिळणार. तुम्ही आणि मादाम दोघांसाठी एकच तिकीट. मी एकटाच आहे मादाम नाहीत, हे त्या प्रतिनिधीला सांगण्यात अर्थ नव्हता. म्हणून एवढेच म्हणालो- गेल्या पुष्कळ वर्षात मी सिनेमाला गेलेलोच नाही अन पुढेही बहुतेक जाणार नाहीच. मग? माझ्या या बोलण्यावर ती बुचकळ्यात पडली. संवाद संपला.

cashless economy will push the society towards consumerism. does bjp is for that? भाजपने तसे असायला काहीच हरकत नाही. पण भाजपने हे स्पष्ट करायला हवे. अन तसे असेलच तर दीनदयाळजींचे नाव घेणे थांबवावे.

@@@@@@@@@@@@@@@@@@

जगज्जेता अलेक्झांडर याचा पराभव एका अकिंचन, अनिकेत, अवस्त्र ऋषीने केला होता. भारताची तीच पद्धती आणि परंपरा आहे आणि उपभोगवाद, सत्ताकांक्षा यांचा पराभव तसाच होऊ शकतो. सत्ताकांक्षेचा पराभव दुसरी सत्ता करू शकत नाही. भारतावर थोपवल्या जाणाऱ्या सत्ताकांक्षेचा पराभव सुद्धा याच पद्धतीने व्हावा लागेल. होईल.

@@@@@@@@@@@@@@@@@@

थोडेसे अप्रिय-

`बुडाला औरंग्या पापी, म्लेंच्छसंहार जाहला

अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी'

असे धन्योद्गार समर्थांनी काढल्यानंतरही ते आनंदवनभुवन किती काळ टिकले?

महाप्रतापी आर्य चाणक्याने अपार पुरुषार्थ करून स्थापित केलेल्या विक्रमादित्याचे आणि साम्राज्याचे नंतर काय झाले?

सत्तेचे स्वरूपच तसे आहे. सत्ता क्षणस्थायी असते. राष्ट्र चिरस्थायी असतं.

समाज कोणत्या सत्तेचा किती पाठीराखा आहे यापेक्षा समाज किती राष्ट्रमय आहे हे महत्वाचे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १६ नोव्हेंबर २०१६

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक

भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक (सुधारित) संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. संसदेच्या संबंधित समितीने त्याला मंजुरी दिली आहे. या समितीत सगळ्याच राजकीय पक्षांचे सदस्य असतात. या प्रस्तावात एक तरतूद अशी आहे की- कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार करावयाची असेल तर त्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागेल. अशी तरतूद आहे हे निश्चित. कारण यावरील चर्चेत भाग घेणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी ती नाकारली नाही. शिवाय भाजपाच्या प्रतिनिधीने त्याचे समर्थन केले. असे असेल तर हा भयानक प्रकार आहे. देशाचे माजी मुख्य सचिव राहिलेले टी.आर.एस. सुब्रमण्यम यांनी तर हे विधेयक केराच्या टोपलीत फेकून द्यावे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रस्तावित विधेयकाचे कागद घेऊनच ते बसले होते. टी.आर.एस. सुब्रमण्यम यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, सचोटी आणि अध्ययनाबद्दल तसेच अनुभवाबद्दल कोणालाच शंका नाही. ते भाजपाचे विरोधकसुद्धा नाहीत. आदल्याच दिवशी times now वर नोटा रद्द करण्याचे सशक्त आणि आक्रमक समर्थन करणारे टी.आर.एस. सुब्रमण्यम दुसऱ्या दिवशी सीएनबीसी आवाज वर प्रस्तावित विधेयकावर प्रखर प्रहार करीत होते.

प्रकरण गंभीर आहे एवढे खरे.

- श्रीपाद कोठे

१२ नोव्हेंबर २०१६

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०२२

बिहारच्या निकालानंतर-

१) स्वत:च्या विजयाच्या आनंदापेक्षा भाजपच्या पराभवाचा आनंद अधिक.

२) हा पराभव हिंदुत्व विचारांचा म्हणायचा असेल, तर हा विजय हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट वृत्तीचा म्हणायचा का? लोकांना भ्रष्टाचार हवा आहे का?

३) कथित लोकशाहीने समाज अनेक तुकड्यात विभाजित केला आहे, समाजाला विचारहीन, विवेकहीन बनवले आहे.

४) लोकशाही म्हणजे झुंडशाही.

५) ६५ वर्षात विविध जातीजमाती सशक्त का झाल्या नाहीत याचा विचार करण्यापेक्षा आरक्षणाचा झेंडा उंच धरून लाचार राहणे आणि लाचार ठेवणे हेच लोकांना आवडते.

६) मतभेद उमदेपणाने मान्य करून, मनोमालिन्य उरू न देणे; याऐवजी सगळ्या बऱ्यावाईट गोष्टींना गोंजारत खोटी दिखावटी सहिष्णुता जोपासणे (बोलीभाषेत- मुंह मे राम, बगल मे छुरी), लोकांना भावते.

७) लोकशाही ही खूप अपेक्षा करू नये अशी किंवा फारशा गांभीर्याने घेऊ नये अशी व्यवस्था आहे.

८) गांधीजी किंवा संविधान निर्मात्यांसारख्या आदर्शवाद्यांना लोकशाहीत स्थान नसते. उदा.- समाजाने गोवंशहत्याबंदी, समान नागरी कायदा यासारख्या आदर्श गोष्टींच्या दिशेने चालण्याऐवजी; शक्तीपरीक्षणात यश मिळवण्यासाठी आदर्शांना सामूहिक तिलांजली द्यावी लागते.

९) काही महिन्यांपूर्वी दिल्लीत याहून अधिक बहुमताने आम आदमी पार्टी निवडून आली. आता दिल्लीत फक्त अराजक आहे. बिहारच्या लोकांना कदाचित अराजक हवे आहे किंवा त्यांना फारसे काही कळत नाही.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१५

नोटबंदी

मी नोटबंदीचा समर्थक आहे की विरोधक? मला नाही ठाऊक. तुम्ही म्हणाल ते मला मान्य. पण मला वाटतं- स्व. चंद्रशेखर पंतप्रधान होईपर्यंत कधीही भाजपा वा जनसंघाची सत्ता नव्हती. होती फक्त कॉंग्रेसची सत्ता आणि विविध प्रकारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कम्युनिस्ट, समाजवादी वगैरेंची. त्या ४५ वर्षांच्या आर्थिक धोरणांनी आणि निर्णयांनी चंद्रशेखर सरकारला रिझर्व्ह बँकेचे सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. देशाच्या दिवाळखोरीच्या एकच पाऊल अलीकडे. नोटबंदीने काय बरेवाईट केले असेल ते असो; पण सोने गहाण ठेवून देशाला दिवाळखोर करण्याकडे मात्र नाही नेले, हे नक्की.

- श्रीपाद कोठे

८ नोव्हेंबर २०१७

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अल्पसंख्य हिंदू

काही राज्यात हिंदूंना अल्पसंख्यक दर्जा द्यावा असा एक विचार पुढे येतो आहे. केवळ `अरे'ला `कारे' करण्याची खुमखुमी किंवा चार सवलती पदरात पाडून घेण्यासाठी हे करू नये. याचे दूरगामी मानसिक व व्यावहारिक परिणाम चांगले होणार नाहीत. अगदी एक हिंदू असेल तरीही त्याला अल्पसंख्य म्हणू नये. हे प्रयत्न हिंदूंचेच असले तरीही ते हाणून पाडले पाहिजेत. त्याजागी अल्पसंख्य, बहुसंख्य हे शब्दच हद्दपार करण्याचे वातावरण आणि प्रयत्न व्हावे. आणि या देशातील सगळे रहिवासी `हिंदू' आहेत हे रुजवण्याचा प्रयत्न व्हावा. `सिंधूच्या पलीकडले हिंदू' हा सुरुवातीचा अर्थच प्रमाण ठेवून तो पक्का करावा. हिंदू धर्म याचा अर्थ हिंदू नावाचा धर्म असा न करता हिंदूंचे धर्म असा होईल याचा प्रयत्न व्हावा. म्हणजे त्यानुसार ख्रिश्चन आणि इस्लाम हे सुद्धा हिंदू धर्मच ठरतील. (उपासना पद्धती या अर्थाने धर्म. या पोस्टपुरता.) हिंदू मूळ समुदायवाचक शब्द होता. तो पुन्हा तसाच प्रतिष्ठीत व्हावा. किमान हिंदूंना अल्पसंख्य म्हटले जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत.

- श्रीपाद कोठे

५ नोव्हेंबर २०१७