गुरुवार, २० जुलै, २०१७

`right to privacy'

`आधार'च्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयात `right to privacy' यावर खल होतो आहे. माणसाचे स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण हा नेहमीच चर्चेत राहिलेला अन तरीही महत्व कमी न होणारा विषय आहे. या निमित्ताने यावर होणारा खल स्वागतार्ह आहे. मात्र हा खल वरवर होतो आहे, फक्त तांत्रिक पद्धतीने आणि तांत्रिक बाबींचा होतो आहे, असे वाटते. त्यावर फारसा विचार कोणी केलेला वा करताना दिसत नाहीत. काल एका वाहिनीवर चर्चा सुरु असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधीने जे तर्क दिले वा युक्तिवाद केला, ते तर फारच केविलवाणे अन तर्कशून्य होते. उथळ होते. जग पुढे चालले आहे, तंत्रज्ञानाची गती खूप आहे. त्या गतीशी जुळवून घ्यावे लागेल. देशाचा विकास करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. इत्यादी. या विकास वगैरे गप्पांच्या पलीकडे आम्ही कधी जाणार?
आज आम्ही एका प्रचंड चक्रव्युहात सापडलो आहोत. आम्ही म्हणजे भारत आणि भारतीय जनता. जगातील अन्य देशांपुढे ही समस्या नाही. कारण भारतीय जीवन वेगळे आहे. एका बाजूला नीती, मूल्ये, धर्म, परंपरा, जीवनदृष्टी, जीवनासंबंधीचा विचार, अन या सगळ्याचा हजारो वर्षांचा सशक्त प्रवाह. अन दुसरीकडे गेल्या शे-दोनशे वर्षात भारताबाहेरून आलेले विचार आणि जीवनदृष्टी. यांच्या संघर्षात आम्ही सापडलो आहोत. आधुनिक ज्ञानविज्ञान, राजकीय व्यवस्था, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था; या साऱ्याचा सुखकर मानवी जीवन घडवण्यातला वाटा; आणि भारतीय जीवनदृष्टी यांचा हा संघर्ष आहे. याचं आकलन कठीण निश्चितच आहे. त्यामुळे भारत, भारतीयता, भारतीय जीवनदृष्टी, आध्यात्म, वैश्विक सहजीवन, सर्वसमावेशकता इत्यादी बाबी स्वीकारणारे, मान्य असणारे सुद्धा केव्हा या साऱ्याला छेद देतात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही.
`right to privacy' चा विचार करतानाही हा व्यूह समोर येतो. त्यावर मंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी फक्त सूत्र म्हणून काही गोष्टी समोर ठेवतो.
स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस. हे जेव्हा कामारपुकुर या त्यांच्या जन्मगावाहून कोलकाता येथे आले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना शिक्षण घेण्याचा आग्रह केला. त्यावेळी तो आग्रह नाकारून त्यांनी भावाला उत्तर दिले- `ही केळी तांदळाची गाठोडी बांधणारी विद्या मला नको.' ते शिकले नाहीत. पैशाचा स्पर्श सुद्धा त्यांना सहन होत नसे. एकदा त्यांच्या शिष्यांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी काही नाणी त्यांच्या अंथरुणाखाली लपवून ठेवली. त्यावेळी अंथरुणावर बसताच त्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांच्या शरीराची आग होऊ लागली. त्यांच्या संवेदना साधनेने एवढ्या तीव्र झाल्या होत्या की पैशाचा स्पर्श त्यांना मुळीच सहन होत नसे. एकदा तर कोळी लोकांच्या ज्या राणीने बांधलेल्या मंदिरात ते पुजारी होते तेथेच, राणी पूजा करीत असतानाही तिच्या मनात पैशाचे विचार चाललेले होते. तेव्हा त्यांनी तिच्या कानाखाली आवाज काढून ते विचार दूर सारून पूजा करण्याचा उपदेश केला होता. सांगण्याचे तात्पर्य हे की, शिक्षण, पैसा इत्यादी नाकारणे यात खूप वावगे वा वाईट काहीही नाही. आजच्या व्यवस्थेत कोणी असे करू शकेल का? प्रत्येकाने धरून बांधून या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजेत, त्यात सहभागी झालेच पाहिजे असे म्हणणे; हा सामाजिक मर्यादांचा भंग आहे. शिक्षण वा पैसा कमावणे हा जसा अधिकार आणि हक्क आहे, तसेच ते नाकारणे हाही अधिकार वा हक्क आहे. आज तर शालेय साहित्य देण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला बँक खाते आवश्यक केले जात आहे. आध्यात्मिक साधकाची जबाबदारी समाजाने आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी पालकांनी घेणे, यात गैर काय आहे? त्यात अडचणी येतात, तर अडचणी दूर करायच्या की व्यवस्थांचा काच वाढवायचा?
राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा व्यवस्थांमध्ये सहभागी व्हायचे की नाही? व्हायचे तर किती? याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असायलाच हवे. आपल्या देशातील प्राचीन व्यवस्थांबद्दल खूप बोलले जाते. ती लवचिक नव्हती असा आक्षेप घेतला जातो. पण वास्तव काय होते? ज्यांना जातीव्यवस्था मान्य नव्हती ते ती बाजूला सारायला मोकळे होते. शीख, बौद्ध, जैन इत्यादी पंथ जातीव्यवस्था आणि त्याची बंधने न मानणारे होते. उपासना पद्धतीच्या बाबतीत असलेले स्वातंत्र्य तर सर्वपरिचित आहे. भाषा काय, भूषा काय, अनेक प्रकारची विविधता या अपार स्वातंत्र्यामुळेच निर्माण झाली. व्यक्ती जोवर विघातक कार्य करीत नाही तोवर त्याला पूर्ण स्वातंत्र्य असायला हवे. मात्र त्याचवेळी त्याची योग्य अयोग्य दृष्टी, नीती अनीती कल्पना, जीवनातील उदात्तता, उन्नत भावना- विचार यांची जाण; यांचे पोषण व्हायला हवे आणि ते काम धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक लोकांनी करायला हवे. आज परिपूर्ण स्वातंत्र्याची बाजू घेणारे चांगले-वाईट, नीती-अनीती मान्य करीत नाहीत. ज्याच्या मनात जे येईल तेच अंतिम आणि त्यासाठी स्वातंत्र्य असावे, असा त्यांचा युक्तिवाद असतो. परंतु त्याने अनवस्था निर्माण होते. दुसरीकडे सामाजिक (प्रशासकीय, राजकीय) बंधने वाढवली तर माणसाचे माणूसपण निकालात निघते. यावरचा उपाय सत्तेची मर्यादा कमी करणे आणि समाजाचा आंतरिक स्तर वाढवणे हा आहे.
भारतेतर विचार नेमका याविरुद्ध आहे. तो सत्तेची मर्यादा वाढवत जातो, माणसाला सामाजिक यंत्राचा निर्जीव भाग बनवतो; त्याचवेळी त्याच्या उदात्त-उन्नत बाजूला नाकारून, मनात येईल ते करण्यासाठी स्वातंत्र्याची मागणी करतो. आजचे न संपणारे संघर्ष त्यामुळेच आहेत. परंतु त्यावर उपाय व्यक्तीचे स्वातंत्र्य मर्यादित करणे नाही. व्यक्तीला समाजाचा एक ठोकळा मानून त्याला एक UID देणे, सामाजिक सुरक्षा क्रमांक म्हणून त्याची ओळख तयार करणे हा भयंकर प्रकार म्हणावा लागेल. त्याचे समर्थन करता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करणे, त्याच्यावर जाईल तिथे लक्ष ठेवणे, त्याच्या सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवणे हे चुकीचे आहे. अशी देखरेख ठेवणारी व्यवस्था असती तर रमण महर्षी, योगी अरविंद, गोळवलकर गुरुजी, समर्थ रामदास स्वामी, गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज, मीराबाई; हे सगळे निर्माण झाले असते का? स्वामी विवेकानंद यांनी तर या व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ठणकावून सांगितले होते की- अशा व्यवस्थेमुळेच भारताबाहेर आध्यात्म विकसित होऊ शकले नाही. आध्यात्म बाजूस ठेवले तरीही, व्यक्तीवर पूर्ण नजर ठेवणारी व्यवस्था चुकीचीच ठरते. अशी व्यवस्था असती तर ना सावरकर काही करू शकले असते ना आणिबाणी विरुद्ध यशस्वी संघर्ष करता आला असता. माणूस हा अमृताचा पुत्र आहे, ही उपनिषदांची वाणी आहे. चारदोन सुबक गोष्टी करून दाखवणे हा काही त्याच्या जीवनाचा आशय आणि उद्देश नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक; अशा सगळ्या क्षेत्रात आज जे सुरु आहे त्यावर एकएक बिंदू घेऊन हा विषय समाजासमोर येण्याची गरज आहे. आम्ही तोंडाने जी भारतीयता बोलतो तिचा अर्थ उलगडत जाण्याची, ती नीट समजून घेण्याची आत्यंतिक गरज आहे. तूतू मीमी आणि तांत्रिक कसरती यांच्या पलीकडे जाण्याची गरज आहे.
सुरक्षा, दहशतवाद, भ्रष्टाचार, सामाजिक न्याय; इत्यादींचा विचार न करताच हा माणूस लिहितो की काय? असे ज्यांना वाटत असेल त्यांना वाटू द्यावे, त्यांनी तसे वाटून घ्यावे. ज्यांना तसे वाटत नाही त्यांच्यासाठी एवढेच म्हणेन- एका लेखात सगळ्याच गोष्टी येऊ शकत नाहीत. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच वरील विचार सूत्र रुपात मांडला आहे. `right to privacy' मी उचलून धरतो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २० जुलै २०१७

गुरुवार, १३ जुलै, २०१७

कुब्जा


काल सकाळपासूनच इंदिरा संत यांची `अजून नाही जागी राधा' मनात फिरू लागली. त्यांच्या कुब्जेने ठाण मांडले. `कुब्जा' !! भारतीय पुराणातील एक स्त्री. कृष्णचरित्राच्या संदर्भात तिचा उल्लेख. श्रीमद भागवतातील ही कथा. ब्रम्हवैवर्त पुराणात सुद्धा तिची कथा. संत सूरदास यांनीही तिच्यावर पद रचले. विष्णू पुराणात किंवा अन्य पुराणात तिचा उल्लेख नाही. रामानंद सागर यांच्या `कृष्ण' मालिकेने ती घराघरात पोहोचवली. कुब्जा ही कंसाची दासी. कुबड आलेली. कृष्ण तिला सरळ आणि सुंदर बनवितो, अशी कथा. तिची कृष्णावर प्रीती जडते आणि कंस वधानंतर कृष्ण तिच्या घरी जाऊन तिची इच्छा पूर्ण करतात असाही उल्लेख. राम अवतारात त्यांच्यावर अनुरक्त झालेली शूर्पणखाच कुब्जा होऊन पुनर्जन्म घेते असाही पुराणात उल्लेख. राम एकपत्नी व्रतधारी असल्याने तिची अपूर्ण राहिलेली इच्छा कृष्ण रुपात पुरवतो. भगवान आपल्या भक्तांना समभावाने कसे वागवतो; त्याच्याजवळ सुरूप, कुरूप असा भेद कसा नाही या अर्थाने सूरदास कथा उलगडतात. रामानंद सागर कंसाच्या जाचातून कुब्जेची सोडवणूक या अंगाने कथा रचतात.
इंदिरा संत यांची कुब्जा मला या सगळ्याहून वेगळी वाटते. व्यक्तिगत आणि विश्वात्मक अशा दोन्ही छटा त्यात जाणवतात. अतिशय नादमधुर आणि आटोपशीर अशी ही कविता समजायला तशी सोपी, पण तशी अवघड देखील. शिवाय चित्रमयी. केवळ बारा ओळींची ही आशयगर्भ कविता. पहिल्या चार ओळीत कुब्जेची मनस्थिती, तिचा अचंबा चपखल बसला आहे. त्या चार ओळी आहेत-
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
अचंबित होऊन कुब्जेच्या मनात प्रश्न येतो- कृष्णाचा प्राण असलेली राधा अजून उठलेली नाही, गोकुळाला जाग आलेली नाही; अशा भल्या पहाटे पलीकडे हा श्रुतीमधुर पावा का वाजतो आहे? ती शोध घेण्याच्या मनस्थितीत आहे. अजून तिला त्या बासरीचा आनंद झालेला नाही. त्या अवेळी बासरी का वाजते आहे हा कुब्जेला पडलेला प्रश्न आहे. दारावरून काही वाजत जात असेल किंवा कुठून गाण्याचे, वाद्यांचे, भजनाचे, band चे आवाज येत असतील तर आपल्या मनात जसे प्रश्न येतात- कोणाकडे? काय? केव्हा? तसाच प्रश्न तिच्या मनात.
नंतरच्या चार ओळीत त्या क्षणांचे, पहाटेचे अधिक स्पष्ट उठावदार वर्णन आणि ती मधुर बासरी ऐकून झालेली कुब्जेची अवस्था येते. त्या ओळी आहेत-
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकून अपुले तनमन
चंद्र मावळतो आहे म्हणजे नक्कीच तो पहाटेचा प्रहर आहे. मावळणारा तो चंद्र रात्रीसारखा शुभ्र नाही केशरी आहे. केशरी चंद्र कधीतरीच दृष्टीस पडणारा. चंद्र म्हणजे शुभ्रच, हे समीकरण. पण अवेळी वाजणाऱ्या पाव्याचे सूर जसे नव्हाळीचे तसाच हा चंद्रही नव्हाळीचा. पहाटेचा वारा सुटला आहे. अशा वेळी, अशा नव्हाळीच्या वातावरणात कानी पडलेल्या मंजुळ स्वरांनी कुब्जा देहभान हरपली आहे. यमुनेवर स्नानाला गेलेली, कंसाकडे चंदनाची उटी घेऊन जायला उशीर होऊ नये म्हणून लगबगीने गोकुळ जागे होण्याआधीच तयारीला लागलेली कुब्जा, अर्ध्या पाण्यात उभी असलेली कुब्जा; तनमन तिथेच टाकून, स्तब्ध होऊन, मोहित झाल्याने देहभान हरपून तशीच उभी आहे. तिचं स्नान, तिची पुढची कामे, चंदन उगाळणे वगैरे राहिले बाजूला. अन तो पावा का वाजतो आहे हा मनात उठलेला प्रश्नही मनच गळून गेल्याने उरलेला नाही. त्याऐवजी तनमनाचा विसर पाडणाऱ्या एका अननुभूत आनंदात ती बुडून गेलेली आहे.
अखेरच्या चार ओळीतील पहिल्या दोन ओळीत कुब्जेची हीच भावावस्था पुढे येते. उरलेल्या दोन ओळीत ती देहमनाच्या भानावर येऊन आनंदाचा जो अनुभव घेतला तो सांगते. त्या ओळी आहेत-
विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
`हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव'
देहभान हरवलेल्या कुब्जेने मग काय केले? हे संपूर्ण विश्वच ओठांना लावले आणि तो गारुडी मुरलीरव ती घटघटा प्यायली. आकंठ. तृप्त होईपर्यंत. उन्हातान्हातून आल्यावर प्रचंड तहान लागते तेव्हा आपण असेच अख्खा तांब्या तोंडाला लावून तेवढे लोटाभर पाणी ढकढका पितो. त्यावेळची शरीरमनाची तगमग आणि ती तगमग शांतवण्याचा प्रयत्न आपण अनुभवलेला असतो. कुब्जेची ही तगमग किती मोठी आणि ती शांतवण्याचा प्रयत्न किती मोठा? तर तिला साधंसुधं फुलपात्र अथवा तांब्या पुरत नाही, ती अख्खं विश्वच ओठांना लावते. ही साधी तहान नाही, युगायुगांची महातहान आहे. अननुभूत तगमग आणि ती शांत करणे आहे. का आहे ती महातहान? कारण ती कुब्जेची आहे. कुब्जा म्हणजे पाठीत वाकलेली. म्हणजेच कुरूप. म्हणजेच नाकारल्या गेलेली. जन्माला घालणाऱ्या ईश्वराने तिला रूप नाकारलं. त्या विश्वनिर्मात्याच्या नकारापासून सुरु झालेली आणि या विश्वातही सुरूच राहिलेली नकारमालिका जिने प्रत्यक्ष भोगली त्या कुब्जेच्या त्या भोगण्यातून, त्या सोसण्यातून उपजलेली असल्याने ती महातहान. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या साऱ्याच ऐहिक, लौकिक, पार्थिव सुखांचे नकारच जिच्या वाट्याला आलेत अशा कुब्जेची ही कहाणी. या जगात माझं जर काहीच नाही, माझ्यासाठी जर काहीच नाही; तर मी या जगात आले तरी कशाला? का जन्माला घातले मला? ज्याने या प्रश्नांचा अनुभव घेतला असेल अशालाच समजू शकणारी ही महातहान. या विश्वात तर उजेडाचा एकही किरण नाही अन त्याच वेळी आभाळी चंद्र असणे तर दूरच, एखादी चांदणीही नाही; अशा उजेड काय असतो याचाही अनुभव नसलेल्या; सुखाची चवही न चाखलेल्या कुब्जेची ती तगमग असते. अशा कुब्जेला मधुमधुर पाव्याचा आनंद लाभण्याचा तो क्षण. अन तोही फक्त तिच्यासाठी, तिच्यापुरता. तिला तिचं सुख लाभल्याचा तो आनंद ती वेडी होऊन, डोळ्यात पाणी आणून सांगते- `हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव'. आपल्यासाठी काहीही नाही या भावनेतून बाहेर पडण्याचा तो क्षण. अभावांच्या सागरात बुडत असताना हाती लागलेल्या भावकणाचे वर्णन करणारी ही भावस्पर्शी, भावमयी कविता. केवळ कुब्जेची नाही, या जगातल्या अभावांच्या सागरात गटांगळ्या खाणाऱ्या सगळ्याच लिंगभेदातीत कुब्जांची !!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ जुलै २०१७

मंगळवार, ४ जुलै, २०१७

अन्नदाता सुखी भव - ६


व्यक्ती आणि समाज दोघांचेही वर्चस्व नको, याचाच अर्थ- दोघांनाही अनिर्बंध स्वातंत्र्य नको. म्हणजेच, नियंत्रित स्वातंत्र्य हवे. नियंत्रण दोन प्रकारचे असते- बाह्य नियंत्रण आणि स्वनियंत्रण. बाह्य नियंत्रण कमी असणे आणि अधिकाधिक कमी होत जाणे; अन त्याचबरोबर स्वनियंत्रण प्रभावी होणे (जास्त वा कमी होणे नाही) ही आदर्श स्थिती होईल. मात्र मूळ मानवी वृत्तीचाही विचार महत्वाचा ठरतो. ही वृत्ती पैशाच्या बाबतीत कमालीची ओढाळ आहे. पैशाकडील ओढ संपता संपत नाही. अर्थात याला सन्माननीय अपवाद असतातच. भारतात तर येथील आध्यात्मिक भावपोषणामुळे पैशाची ही ओढ मोठ्या प्रमाणात नियंत्रित करून त्याला विशिष्ट घाटही देण्यात आला आहे. जगात मात्र तसे नाही आणि आता भारतातही त्याचा मूळ पिंड बदलून पैशामागे धावणारा माणूस घडू लागला आहे, घडवला जाऊ लागला आहे.
अशा स्थितीत यावर बाह्य नियंत्रण गरजेचे होऊन बसते. म्हणूनच, व्यक्तीने अथवा संस्थेने अधिकाधिक किती पैसा बाळगावा हे समाजाची प्रतिनिधी असलेल्या सरकारने ठरवायला हवे. एकदा पैसा बाळगण्याची वरील मर्यादा निश्चित झाली की अनेक गोष्टी आपोआप नियंत्रणात येतील. पैशाची स्पर्धा आटोक्यात येईल. एक तर मर्यादेपेक्षा अधिक कमावण्याचा प्रयत्नच होणार नाही. त्यामुळे अन्य लोकांसाठी space प्राप्त होईल. आज धनाढ्य व्यक्ती वा संस्था सारेच काही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात त्याला मुळात आळा घातला जाईल. जर अनेक गोष्टी ताब्यात घेऊनही एका मर्यादेपेक्षा अधिक काही मिळणार नसेल तर कोण कशाला त्या फंदात पडेल?
मर्यादेच्या बाहेर जाता येत नसल्याने पगारवाढीची जी आंधळी शर्यत सध्या सुरु आहे ती थांबू शकेल. सध्या तर पगार का आणि कसे दिले जातात या प्रश्नांना अर्थच उरलेला नाही. नुकतीच एक बातमी आली होती की, भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांना सालाना फक्त २८ लाख वेतन मिळते. तेच आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना अडीच कोटी वेतन मिळते. या ठिकाणी दोन प्रश्न निर्माण होतात- २८ लाखात चांगले जगता येते की नाही? आणि, अडीच कोटी वेतन कशासाठी? पैसा आणि प्रतिष्ठा यांचा जो अभिन्न संबंध आज दृढ झाला आहे तो तोडल्याशिवाय पर्याय नाही. याचे कारण असे की, या स्पर्धेला अंत नाही. प्रतिष्ठा उंच राखण्यासाठी पैसा वाढवत नेणे यातून श्रेणीबद्धता संपत नाही. खालच्या श्रेणीला पैसा देणे हा मार्ग नाही. कारण खालच्या श्रेणीच्या हाती पैसा वाढला तर वरच्या श्रेणीत तो आणखी वाढणार. कारण प्रतिष्ठा टिकवायची असते. त्यामुळे पैशाचा संबंध जगण्याशी जोडणे, कामाचा संबंध प्रतिष्ठेशी जोडणे, पैशाचा आणि कामाचा तसेच पैशाचा आणि प्रतिष्ठेचा संबंध तोडणे आवश्यक आहे. हे काम साहित्यिक, कलाकार आणि समाजमानस घडवणाऱ्या अन्य लोकांचे आहे. त्यासाठी त्यांनी आधी आजच्या मानसिक आणि वैचारिक चक्रव्युहातून बाहेर पडावे लागेल.
आज `सेवा' या नावाखाली जी असंख्य संघटीत वा असंघटीत कामे चालतात त्यांच्या हाती कामाचे महत्व, कामाची गरज, कामाला लागणारी शक्ती-बुद्धी-युक्ती, कामाची व्याप्ती; हे सगळे लक्षात घेता खूप जास्त पैसा मिळतो. आपल्याला येणारे असंख्य निरर्थक फोन अथवा मेसेजेस, यासाठी जे लोक काम करतात त्यांचे उदाहरण यासाठी घेता येईल. पण त्यांना निष्कारण पैसा मिळतो, त्यामुळे सुखी जीवन मिळते आणि वर प्रतिष्ठाही. जसे मिळणारा पगार, कामाचे स्वरूप यांचा आणि पैशाचा संबंध नाही तसाच विविध वस्तूंच्या किमती ठरवण्याचा काहीही criterion नाही. विविध वस्तूंच्या उत्पादन किमतीची माहिती त्या वस्तूवर छापणे आवश्यक करण्याची मागणी कितीतरी वर्षे होतेच आहे. त्या ऐवजी एमआरपी सारखी तद्दन गाढव कल्पना राबवण्यात येते. ते बंद व्हायला हवे. उत्पादन खर्चावर किती नफा मिळवायचा यावर काहीही बंधन नाही. शिवाय मुळात उत्पादन खर्च कसा ठरवायचा याचाही विचार होत नाही. एखादे उत्पादन जाहिरातींवर अब्जावधी रुपये खर्च करीत असेल तर तो उत्पादन खर्च गणल्या जातो. किंवा अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध head खाली देण्यात येणारा पैसा, वस्तू वा सुविधा यांचाही उत्पादन खर्चात समावेश होतो. हे कितपत योग्य आहे? अनेक कंपन्यांमध्ये मिळणारे जेवणाचे कुपन्ससुद्धा मोठ्या प्रमाणात वाया जातात. त्याचा समावेश मात्र उत्पादन खर्चात होतो.
accounting या नावाखाली चालणारा असा जो अति प्रचंड गोंधळ आहे त्याचा विचार कोणी व केव्हा करायचा? त्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक, राजकीय, पर्यावरणीय परिणामांचा लेखाजोखा कधीतरी मांडायचा की नाही? व्यक्ती वा संस्थेने जास्तीत जास्त किती पैसा बाळगायचा याची मर्यादा निश्चित झाली की, या सगळ्या बाबी सुरळीत होऊ लागतील. कारण अगदी सोपे आहे. आजची ही सगळी सुक्तासुक्त (योग्य वा अयोग्य) धाव का आहे? अधिकाधिक धनाचा ताबा, अधिकाधिक धनाची मालकी मिळण्यासाठी. ती अनिर्बंध हाव मुळातच मोडून काढली की प्रश्न सोपा होत जाईल. ही मर्यादा जशी व्यक्ती व संस्थांना असेल तशीच देवस्थानांनाही असेल. देवाधर्माच्या नावाखाली जो एक पैशाचा बीभत्स व्यवहार पाहायला मिळतो तो त्याने थांबेल. हा बीभत्स व्यवहार सगळ्याच पंथ, संप्रदायांना लागू होतो. यासाठी पुढाकार घ्यावा लागेल धार्मिक नेत्यांना. षडरिपूंच्या अतीत असलेल्या परमेश्वराला वेठीला धरून नाना कथाकहाण्या आदी प्रसृत करून जो धनहव्यास पोसला जातो तो मोडीत काढण्याचे काम धार्मिक नेत्यांनी करावे लागेल. पैसा बाळगण्याच्या वरील मर्यादेमुळे अनावश्यक केंद्रीकरण, शिक्षणाचा बाजार, चलनवाढ, महागाई, सामाजिक विद्वेष इत्यादींना आळा घालणे शक्य होईल. यात येणारे पण-परंतु आणि अन्य काही मुद्यांचा विचार पुढील लेखात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २८ जून २०१७

लेखमाला बाजूला ठेवून


काल `अन्नदाता सुखी भव - ५' लिहून पूर्ण केलं तेव्हा डोक्यात होतं की, उद्या अर्थकारणाच्या प्रत्यक्ष करण्याच्या काही गोष्टींचा उहापोह करावा आणि विषय पूर्ण करावा. परंतु काल लेख पोस्ट केल्यानंतर समोर आलेली एक बातमी आणि एक व्हिडीओ यांनी या विषयाची व्याप्ती मी समजतो त्याहीपेक्षा किती मोठी आहे याचा जणू प्रत्यय आणून दिला. अन ती मालिका बाजूला ठेवून वेगळा लेख लिहायचे ठरवले. अर्थात हा विषय त्या लेखमालेच्या विषयवस्तूवर परिणाम करणारच आहे. बातमी होती एका पुस्तिकेची. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने भारतात सुमारे पाच वर्षांपूर्वी छापल्या गेलेल्या आयुर्वेदाशी संबंधित एका १६ पानांच्या चोपड्यावर सणसणीत बातमी तयार करून पहिल्या पानावर छापली आहे. भारत स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांना नकार देणारा आणि गोमूत्रावर जगणारा देश आहे असा त्या बातमीचा आशय आहे. उघड आहे की भारताची सार्वत्रिक नालस्ती करणे हाच यामागील खोडसाळ हेतू आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे असे नाही आणि हा शेवटला प्रयत्न आहे असेही नाही. त्याला जी उत्तरे ज्यांनी ज्या ठिकाणी द्यायची ते लोक त्या ठिकाणी ती उत्तरे देतीलच. कायदेशीर बदनामीचे खटले वगैरे मार्ग आहेतच. परंतु हा विषय त्याहून अधिक व्यापक आहे.
न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्राने जे म्हणायचे ते म्हटले. पण अशीच मते आपल्या येथेही मांडली जातात की नाही? सरळ उत्तर आहे की मांडली जातात. न्यूयॉर्क टाईम्ससारखा विचार करणारे लोक इथेही आहेत. काल या चोपड्यावर जी चर्चा झाली त्यातही आपल्या येथीलच एका महाभागाने त्या चोपड्यात `मां संस्कारी होना चाहिए' या वाक्यावर अन त्यातील संस्कारी या शब्दावर आक्षेप घेत, त्या शब्दामुळे टीका होत असल्याचे मत मांडले. सर्वसाधारण भारतीय माणसाला याचे आश्चर्य वाटते. संस्कारी शब्द चुकीचा कसा असा प्रश्न त्याला पडतो. मातेने संस्कारी नव्हे तर कसे असावे, असे तो विचारील. कारण असे आक्षेप कुठून जन्म घेतात, कसे जन्म घेतात याच्या खोलात तो जात नाही. `व्यक्तीवाद' हे त्याचे उत्तर आहे. व्यक्ती अंतिम, व्यक्ती महान, व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राहायला हवे, व्यक्तीला सगळे कळते, व्यक्तीला निर्णयाचे अनिर्बंध अधिकार असायला हवेत; हे जे `आधुनिक तत्व' म्हणून स्वीकारले आहे त्याचा हा परिणाम आहे. मग एखादी गोष्ट मांडणाऱ्या व्यक्तीला काय अभिप्रेत आहे यापेक्षा मी त्याचा जो अर्थ लावीत असेल तोच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि अंतिम ठरतो. का? मला तसे वाटते. त्यामुळे मनमानी पद्धतीने अर्थ लावणे, मनमानी पद्धतीने निंदानालस्ती करणे. मनमानी पद्धतीने टिंगलटवाळी करणे. हे प्रकार होत राहतात. `मी' सोडून सगळं जग, सगळी माणसे, सगळे विचार, सगळ्या भावना, सगळ्या पद्धती; टाकावू आहेत, चुकीच्या आहेत, हिणकस आहेत, मस्करीच्याच लायकीच्या आहेत; हा व्यक्तीवादाचा अर्थ आहे. बरे हा व्यक्तिवाद एका व्यक्तीसाठी उभा राहतो. एका व्यक्तीचे विचार, व्यवहार, भावना त्याच्यासाठी महत्वाच्या ठरतात पण सगळ्यांचा विचार चुकीचा ठरतो. म्हणजे `तुम्ही मूर्ख आहात' हे वाक्य बरोबर ठरते आणि `तू मूर्ख आहेस' हे वाक्य मात्र चुकीचे ठरवले जाते.
या सगळ्याचा प्रतिवाद करणारेही `ही आमची पद्धत नाही' याच युक्तिवादात गुंतून पडतात. याच्या बाहेर यायला ते तयार नसतात. त्यांना लक्षातच येत नाही की, आज हे `आमचे अन तुमचे' कालबाह्य झाले आहे, निरर्थक झाले आहे. आज जग भूगोल आणि राज्यसत्ता या अर्थाने वेगवेगळे असले तरीही त्यातील वैचारिक, भावनिक, व्यावहारिक, संकल्पनात्मक अंतर मिटून गेलेले आहे. त्यात कुठेही `आमचे अन तुमचे' राहिलेले नाही. म्हणूनच आज आपल्यासकट सगळ्यांनी डोळे मिटून स्वीकारलेली मूल्ये, तत्व आणि कल्पना यांना आव्हान देण्याची, त्यांच्यातील दोष दाखवून देण्याची गरज आहे. दुर्दैवाने तसे होत नाही. खेदाने म्हणावे लागते की, ज्यांनी या देशाचा पर्यायाने येथील विश्वकल्याणी संस्कृतीचा ध्वज हाती घेतला आहे तेदेखील हा वेध घेण्यात, त्या दृष्टीने वैचारिक मांडणी करण्यात कमालीचे तोकडे पडतात. केवळ गोडगोड स्वप्नरंजन किंवा आज असलेली सत्तानुकुलता याच्यापुढे त्यांचे एकही पाउल पडताना दिसत नाही.
न्यूयॉर्क टाईम्सच्या बातमीच्या निमित्ताने जे एवढे विवेचन केले त्यात काडीचाही अतिरेक नसून वास्तविक स्थिती त्याहूनही भीषण आहे आणि ज्यांनी या सगळ्या आक्रमणाला केवळ भारतासाठी नव्हे, संपूर्ण मानवतेसाठी आणि विश्वकल्याणासाठी आव्हान देण्याची गरज आहे, ते किती तोकडे पडतात हे निदर्शनास आणून देणारा एक व्हिडीओ आज पुढ्यात आला. हिंदी भाषेतील या व्हिडीओचे शीर्षकच आहे- `मुझे सनी लिओनि बनना है'. जवळपास १० मिनिटांच्या या व्हिडीओत एक तरुणी आणि तिचे आईवडील यांचा संवाद आहे. `तुला पुढे काय करायचे आहे?' या घराघरातील संवादाचा हा व्हिडीओ. भारतीय आई वडील मुलगी यांच्यातील हा संवाद. त्याच्या शीर्षकावरूनच संवादाची कल्पना येऊ शकते. तिथेही हतबल आई वडील आणि उद्दाम मुलगी. विचारांची खोली वगैरे तर दूरच विचार वगैरेशी काहीही संबंध असण्याचीच गरज नाकारणारा हा काळ, किती जटील प्रश्न तुमच्या आमच्यासमोर फेकतो आहे हे दाखवणारा हा संवाद आहे. हे सगळे बरोबर आहे असे नाही. हे निरुत्तर करणारे आहे असेही नाही. परंतु या साऱ्याला आजच्याच भाषेत, आजच्याच शैलीत, आजच्याच भावविश्वाला धरून निरुत्तर करण्याएवढे सायास, व्यासंग, चिंतन, पुढाकार, मांडणी यांची मात्र वानवा जाणवते. उथळ तू तू मी मी, छापील वैचारिकता आणि वातावरण आणि परिस्थिती लादत असलेले विषय यातून बाहेर पडून वेध घेणाऱ्या वैचारिकतेचा सशक्त लोंढा आवश्यक आहे हे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २३ जून २०१७

अन्नदाता सुखी भव - ५


पैशाची मालकी आणि माणसाचं जगणं, यावर जगात खूप खल झाला आहे आणि सुरु आहे. पुढेही सुरु राहील. त्यातील दोन प्रवाह महत्वाचे आहेत. एक प्रवाह म्हणतो- पैसा आणि जगणं हे ज्याचं त्याचं वैयक्तिक आहे आणि दुसरा प्रवाह म्हणतो- पैसा आणि जगणं समाजाचा भाग आहे. एकानुसार व्यक्ती महत्वाची आहे, दुसऱ्यानुसार समाज महत्वाचा. एकाच्या मते समाज नावाची गोष्ट निरर्थक आहे. समाज असला काय किंवा नसला काय फरक पडत नाही. किंबहुना समाज वगैरे जेवढ्या लवकर मोडीत काढता येईल काढायला हवा. दुसऱ्याच्या मते समाज हाच सर्वेसर्वा आहे. व्यक्तीला काही अर्थ आणि महत्व नाही. व्यक्ती संपली तरी चालेल. एकाला ढोबळमानाने भांडवलवाद म्हणतात तर दुसऱ्याला समाजवाद. यालाच उजवे- डावे अशाही संज्ञा आहेत. पुष्कळदा वादविवादात हे शब्द आपण ऐकतो. त्या त्या संदर्भात एखाद्या एखाद्या वेळी त्या त्या बाजूचे म्हणणे तर्कसंगत, युक्तीसंगत वाटते किंवा असते. परंतु एकंदर विचार करता या दोन्ही प्रवाहात एकांगीपणाचा मुलभूत दोष आहे.
व्यक्ती आणि समाज या दोन्हीही बाबी योग्य, अपरिहार्य, आवश्यक आहेत. व्यक्तीच्या जगण्यासाठी समाज आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी व्यक्ती, हेच वास्तव आहे. व्यक्तीने समाजावर आणि समाजाने व्यक्तीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला की संघर्ष निर्माण होतो. आज असा संघर्ष सार्वत्रिक, सार्वदेशिक पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षात उपभोगवाद आणि लोकशाही यांनी एक तिसरा प्रवाह जन्माला घातला आहे. हा तिसरा प्रवाह उपभोगाच्या अंगाने व्यक्तिवादी आहे, अन लोकशाही अंगाने समाजवादी आहे. याला स्वत:साठी पूर्ण व्यक्तीस्वातंत्र्य हवे. त्याच्या व्यक्तिगत उपभोगात समाजाची लुडबुड नको. पण त्याच वेळी लोकशाहीवादी असल्याने सगळ्यांना उपभोग मिळायला हवा हे त्याचे मत. अन सगळ्यांना उपभोग मिळण्याची व्यवस्था समाजाने करायला हवी हा त्याचा सिद्धांत. समाज म्हणजे कोण तर समाजाची प्रतिनिधी असलेली राजसत्ता. म्हणजेच- त्या व्यक्तीसह सगळ्या लोकांच्या उपभोगाची व्यवस्था समाज/ सत्तेने करावी. परंतु व्यक्तीच्या जीवनात वा उपभोगात दखल मात्र काडीचीही देऊ नये; असे यांचे म्हणणे असते. हा स्वत: गोंधळलेला आणि समाजात गोंधळ निर्माण करणारा वर्ग आहे. अनेकदा हे लोक स्वत:शीच विसंगत वागतात, बोलतात, विचार करतात. आधुनिक, पुरोगामी इत्यादी विशेषणे ते स्वत:ला लावत असतात.
काही अर्थपूर्ण विचार करायचा असेल तर या गोंधळाच्या पलीकडे जाऊन मुलभूत बाबींचा शोध आणि मांडणी करावी लागेल. तो एक प्रकारचा मध्यममार्ग राहील. आपण ना व्यक्तीला संपवू शकत ना समाजाला. ना व्यक्तीची अबाधित सत्ता राहू शकते, ना समाजाची. कारण व्यक्तीची अबाधित सत्ता राहिली तर त्याचं रोजचं जगणं सुद्धा कठीण होईल. हे समजायला काहीही कठीण नाही. त्यासाठी फार विचाराची गरज नाही. दुसरीकडे समाज सर्वेसर्वा राहिला तर व्यक्तीची गळचेपी ठरलेलीच. त्यातून माणूस जनावर होईल किंवा वेडा होईल. माणसाच्या विकासासाठी आणि चांगल्या, सुखपूर्ण, आनंदी जीवनासाठी व्यक्ती आणि समाज दोघांचेही अस्तित्व, महत्व आणि आवश्यकता मान्य करायला हवे, लक्षात घ्यायला हवे. शिवाय हेही लक्षात घ्यावे लागेल की, याचा एखादा नियम-कायद्यांचा निर्जीव आराखडा, निर्जीव चौकट तयार करता येत नाही, येणार नाही. कारण व्यक्ती व समाज या दोन्हीही जिवंत गोष्टी आहेत. त्यामुळेच प्रवाहमान आहेत. म्हणूनच नियम-कायदे करावे अन राबवावे तर लागतीलच. त्यासोबतच त्यांच्या मर्यादाही ठरवाव्या लागतील, लक्षात घ्याव्या लागतील. किती बांधायचे, किती सोडायचे, किती ताणायचे, कुठे दुर्लक्ष करायचे, कुठे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे या सगळ्याचा तारतम्याने विचार होणे गरजेचे. हे तारतम्य जाणीवेतून येते. त्यामुळे व्यक्तीच्या, समाजाच्या जाणीवा विकसित होणे गरजेचे. दोन अधिक दोन बरोबर चार, अशा गणिती पद्धतीने किंवा आजकाल ज्याला वैज्ञानिक पद्धती म्हणतात तशा काटेकोर पद्धतीने हे तारतम्य आणि या जाणीवा विकसित होऊ शकत नाहीत. व्यक्तीचा मूळ पिंड, माणसाच्या मूळ वृत्ती-प्रवृत्ती, वातावरण, शिक्षण-वळण, प्रभाव, परिस्थिती, संवेदना, विचार, साधना, अवकाश अशा अनेक बाबी त्यासाठी विचारात घ्याव्या लागतात. या जगाचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. समाजाचा मोठा वर्ग असा जाणीवसंपन्न होणे ही प्राथमिक आवश्यकता आहे.
भांडवलवाद आणि समाजवाद यांना टाळून, त्यातील एकांगीपण बाजूला करून, त्यातील योग्य बाबींचा विचार करून, पर्यायी व्यवस्था विकसित करणे म्हणजे; पंडित नेहरूंची मिश्र अर्थव्यवस्था नाही, हे स्पष्ट असणे फार फार महत्वाचे आहे. कारण दोन्ही विचारप्रवाहातील थोड्याथोड्या, बऱ्या वाटणाऱ्या, तांत्रिक व व्यवस्थात्मक बाबी एकत्र करून एक कडबोळे म्हणजे पर्याय नाही. नवीन, तिसरा पर्याय हा तांत्रिक बाबींशी संबंधित नाही; तर जीवनदृष्टी, जीवनहेतू, जीवनाचा आशय यांच्याशी संबंधित असायला हवा. लोकशाहीचा देखील याच अंगाने विचार व्हायला हवा. लोकशाही म्हणजे लोकांची शाही असे एक ढोबळ समीकरण आहे. मात्र मुळातच `शाही' यातील वर्चस्वाचा भाव निकोप जीवनदृष्टीला घातक आहे. शिवाय लोकांचे वर्चस्व म्हणजे कोणाचे वर्चस्व आणि कशाचे वर्चस्व? उन्नत जाणिवांचे लोक `शाही' गाजवू लागले तर कदाचित उपयोग होईलही, पण उन्नत जाणिवांचे लोक हे किती प्रमाणात वास्तव असू शकते? बरे काळाच्या एका टप्प्यावर ते वास्तव असेल तरीही कालप्रवाहात ते किती टिकेल? लोक ही एकजिनसी बाब आहे का? असू शकते का?
चांगल्या जगण्यासाठी पर्याय काय? असा प्रश्न पडलेल्या भारतातील आणि जगभरातील सगळ्यांना या साऱ्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतील. त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. या लेखमालेचा मूळ विषय असलेल्या अर्थचक्राच्या संदर्भात या गोष्टी लक्षात घेऊन काय विचार केला जाऊ शकतो हे पुढील भागात. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २२ जून २०१७

अन्नदाता सुखी भव - ४


अर्थकारण चक्रीय न राहता रेषीय असणे आणि प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावणे या दोन महादोषांनी अर्थकारणाचा तर बट्ट्याबोळ होतोच, शिवाय समाजकारण, संस्कृती, कटुंब, कला, साहित्य, क्रीडा, मानवी संबंध, शिक्षण, पर्यावरण, धर्म, आध्यात्म, विज्ञान सगळेच नासून जाते. शेती आणि शेतकरीच नव्हे तर आज दिसणारी सार्वत्रिक तडफड, ओढाताण, औदासिन्य, अभाव, रोग हे सगळे याचा परिणाम होत. हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. त्यामुळेच कितीही खटपट केली तरीही समाधानकारक तोडगा लाभत नाही. त्यासाठी अर्थकारण रेषीय ऐवजी चक्रीय कसे होईल याचा प्रयत्न आणि कामातून निर्माण होणाऱ्या पैशाऐवजी कामाचे महत्व आणि प्रतिष्ठा वाढेल याचा प्रयत्न आवश्यक आहेत.
अर्थकारण चक्रीय व्हावे याचाच अर्थ त्याला एक अधोबिंदू असावा आणि एक शिरोबिंदू असावा हे आवश्यक. त्या अधोबिंदुच्या खाली कोणी जाणार नाही याची आणि शिरोबिंदुच्या वर कोणी जाणार नाही याची काळजी घेणे ही व्यवस्थेची जबाबदारी. अशी व्यवस्था निर्माण होईल आणि चालेल याची जबाबदारी संपूर्ण समाजाची. थोडक्यात एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी पैसा कोणालाही मिळणार नाही आणि एका मर्यादेपेक्षा अधिक पैसा कोणीही साठवू शकणार नाही अशी तजवीज हवी. सगळी कामे पैसा निर्माण करू शकणार नाहीत, अन जी कामे पैसा निर्माण करू शकतात त्यांची पैसा निर्माण करण्याची शक्ती आणि वेग हेदेखील वेगळेच राहतील. असे होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे पैशाचे असंतुलन निर्माण होणारच. उदाहरणार्थ- अत्यंत निरर्थक असूनही निरनिराळे games तयार करणे, विकणे यातून अमाप प्रमाणावर पैसा निर्माण होणारच. दारूतून मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण होणारच. पण शास्त्रीय संगीताची शिकवणी, तत्वज्ञान यासारख्या कामातून पैसा निर्माण होणे कठीण. आरोग्य विभागातून पैसा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो पण तसे होणे गौरवाचे नसून काळजीचे कारण ठरते. समाजाची ही व्यामिश्रता लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे पैशाचे असंतुलन राहणारच. मग चक्रीय अर्थचक्र चालणार कसे? हा प्रश्न निर्माण होतो कारण आज `पैसा' फिरण्यासाठी एकच घटक विचारात घेतला जातो तो म्हणजे `उपभोग.'
मात्र, पैसा फिरत राहण्यासाठी `उपभोग' हा जसा एक घटक आहे तसाच दुसरा घटक आहे- `दानधर्म'. सुदृढ अर्थकारणासाठी पैसा फिरत राहायला हवा. त्यासाठी उपभोग वाढायला हवा आणि उपभोगासाठी प्रत्येकाने पैसा निर्माण करण्याच्या यंत्राचा भाग असल्याप्रमाणे, घाण्याच्या बैलाप्रमाणे कोलू फिरवत राहायचे; हा आजचा शिरस्ता आहे. यामुळे अर्थकारण एकरेषीय होते तसेच माणसाचे माणूसपण व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही संपून जाते. म्हणूनच `उपभोग' या एका घटकाला `दानधर्म' या दुसऱ्या घटकाची जोड हवी. हा विचार भारतीय समाजाने फार मोठ्या प्रमाणात केलाही होता. नव्हे तोच येथील समाजाचा आधारही होता. त्यामुळेच मोठमोठ्या वादळवाऱ्यात हा समाज टिकून राहिला. त्याची आंतरिक आणि बाह्य जीवनशक्ती चिवटपणे टिकून राहिली. हेच कारण होते की आपला मूलमंत्र होता- `एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ'. `एकमेका साह्य करू, अवघे घालू गोंधळ' ही आजची रीत झाली. त्यासाठी मेळ घालणे आवश्यक. तो कसा घालायचा?
१) पैसा निर्मितीची क्षमता आणि वेग वेगवेगळा राहणार, २) काही व्यक्ती, काही कार्ये पैसा निर्माण करू शकणार नाहीत, ३) निसर्गनिर्मित अथवा मानवनिर्मित संकटे, अडथळे येतच राहणार, ४) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे मात्र सगळ्यांना आवश्यक. या मुलभूत गरजा आहेतच. प्रत्येकाच्या या गरजा पूर्ण व्हायलाच हव्यात. या चारही गोष्टी एकत्रितपणे लक्षात घेऊन व्यवस्था हव्या. ज्या व्यक्ती आणि कार्ये मोठ्या प्रमाणात पैसा निर्माण करू शकतात त्यांनी तो करावाच. पण व्यक्ती आणि कार्यांनी किती पैसा बाळगावा याची वरची मर्यादा निश्चित असावी. त्या मर्यादेपेक्षा अधिकचा पैसाही त्यांचाच राहील. मात्र तो त्यांना वापरता येणार नाही, तर त्यांच्याच नावाने त्याचे दान व्हावे. माणसाला जशी वित्तेषणा (पैशाची ओढ) असते तशीच लोकेषणा (नावलौकीकाची ओढ) असते. या दोन्हीचा मेळ घालायला हवा. पैशाची ओढ आहे तर पैसा कमव, अन अधिकचा पैसा दान कर. एखादी शाळा, दवाखाना, सार्वजनिक इमारती, मुत्रीघरासारख्या सुविधा कोणाच्या नावाने उभ्या राहिल्या तर बिघडते काय? प्रत्येकाच्या मुलभूत गरजा कोणत्याही खर्चाविना पूर्ण होतील अशी व्यवस्था हवी. कोणीही उपाशी राहणार नाही, कोणालाही आरोग्यसुविधा नाही असे होणार नाही, कोणालाही शिक्षण नाही असे होणार नाही. पण यासाठी पैसाही लागणार नाही. `सांझा चुल्हा'सारख्या प्रथा पुनरुज्जीवित व्हाव्यात. मग शेतकऱ्याच्या पदरात पैसा कमी पडला किंवा जास्त तरीही त्याला उपाशी वा रोगी राहावे लागणार नाही. आज गुन्हा केलेला कैदी भोजन आणि आरोग्य यापासून दूर राहत नाही, पण काबाडकष्ट करणारे शेतकरी, मजूर, निराधार, वृद्ध हे मात्र वंचित राहतात. हे बदलायला हवे. आजही अशा काही व्यवस्था आणि उपक्रम आहेत. परंतु त्याचा दर्जा, त्यामागची भावना, त्याचे परिणाम चांगले नाहीत. त्या ऐवजी केवळ वंचितांसाठी नव्हे तर सगळ्यांसाठी मुलभूत गरजा नि:शुल्क असाव्यात. तेथे लहानमोठा भेद नको. असे झाल्यास त्याचा दर्जा, त्यामागील भावना, त्याचे परिणाम उत्तम राहतील.
कसे होऊ शकेल हे? (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ जून २०१७

सुविचारांवर जगणारा समाज


सुविचार ही काही नवीन बाब नाही. कित्येक वर्षांपासून शाळेतील भिंतींवर लावलेले सुविचार सगळेच अनुभवत असतात. कित्येक पिढ्या त्यावर पोसल्या आहेत. परंतु प्रत्येक हातातील मोबाईल आणि त्याला मिळालेली सोशल मीडियाची जोड यांनी या सुविचारांना एक वेगळा आकार, वेगळे रूपरंग आणि वेगळे परिमाण दिले आहे. अनेकदा अनेक महापुरुषांच्या नावाने एकच सुविचार फिरतो तेव्हा आपण बुचकळ्यात पडतो. कधी कधी तर वाटते की, ढगात पोहोचलेल्या या महापुरुषांपैकी कोणी आपल्या नावाचा एखादा viral होणारा असा सुविचार पाहिला तर त्यालाच भोवळ येईल. आपण कधी असं बोललो होतो वा असं लिहिलं होतं असा प्रश्न त्याला पडेल. अनेकदा, मी तर म्हणेन शेकडा ९० टक्केहून अधिक वेळा, हे सुविचार अर्ध्या मिनिटात हवेत उडवून लावता येतात. पण त्यातून वातावरण असे तयार होते की, जगात आता फक्त साधुसंत उरले आहेत किंवा जगात त्रास- दु:ख- वेदना- उपेक्षा- अभाव- हे काही उरलेलेच नाही. एका passive मानसिक समाधानात माणसे तरंगू लागतात. प्रचंड एकांगीपण तयार होऊ लागतं. अशा एकांगी उपदेशातून सारासार विचार आणि सदसद्विवेकाला हळूहळू तिलांजली दिली जाते. जगातील कोणत्याही महापुरुषाने, कोणत्याही धर्मग्रंथाने, कोणत्याही विचारकाने, कोणत्याही शहाण्या माणसाने जगाचे द्वैती स्वरूप नाकारलेले नाही. हे जग रागद्वेषात्मक आहे. त्यात दोन परस्पर विरोधी भाव, विचार, घटना, कल्पना, प्रसंग, दिशा आहेतच. नव्हे असे परस्पर विरोधी आणि विसंगत असणे म्हणजेच हे जग. ही मूळ बाब स्वीकारून मग या जगात कसे राहावे यावर अनेकांनी सखोल खल केला आहे. आम्ही मात्र टिवल्याबावल्या करत करत त्या उपदेशामृतात इतके बुडतो की, सुविचारातून विचारशून्यतेकडे वाटचाल करू लागतो. एकांगी दृष्टी स्वीकारल्यावर विचारशून्यतेशिवाय दुसरे काय हाती लागणार? बरे या माऱ्याने आपण `संत' झाल्याच्या भ्रमात इतके विरघळतो की, त्या सुविचारातील तत्व आपल्या जगण्यावागण्याला लावून पाहिले पाहिजे असे आमच्या मनात डोकावत सुद्धा नाही. आमचा भूतकाळातील व्यवहार, आजचा व्यवहार, भविष्यातील व्यवहार, परीक्षेच्या क्षणीचा व्यवहार हे तपासण्याची तसदी घेण्याची आम्हाला गरजच वाटेनाशी होते. एक प्रकारच्या गुंगीत आम्ही जगायला लागतो. साधे एखाद्याशी चांगले बोलणे, विचारपूस करणे, शुभेच्छा देणे अथवा शुभेच्छा स्वीकारणे; यासारख्या निरुपद्रवी कृती करताना सुद्धा आपल्या मनात किती अन कोणकोणते हिशेब चालतात याचा धांडोळा आपण किती घेतो? चार जणांच्या ग्रुपमध्ये (whats app च्याच नव्हे, घरात, कार्यालयात, संस्थेत, in general) सुद्धा एखाद्याशी चांगले वागलो, त्याला शुभेच्छा दिल्या, त्याच्याशी मोकळेपणाने वागलो तर बाकीचे काय म्हणतील? त्या बाकीच्यांना काय वाटले म्हणजे माझा काय फायदातोटा होईल? असे असंख्य मुद्दे. शिवाय आपले अहंकार, आपले रागलोभ, आवडीनिवडी यांचा आपल्या वागण्या बोलण्यावर होणारा परिणाम वेगळाच. एखाद्याने वेगळा मुद्दा मांडला तरी लगेच अंतर तयार होते. किंवा एखाद्याने शुभेच्छा दिल्यावर त्याला मोकळ्या मनाने प्रतिसाद देण्यात सुद्धा कुचराई केली जाते. सुविचारांना मात्र तोटा नसतो. आपण स्वत: तयार करायचे, आलेले फिरवत राहायचे की झाले. आपण धन्य झालो. एकांगीपण, विचारशून्यता आणि फसगत ही आजच्या `सुविचारांवर जगणाऱ्या' समाजाची अंगभूत लक्षणे होऊ लागली आहेत. याच लक्षणांनी युक्त पार्थाला गीता सांगण्यासाठी पार्थसारथ्याने रक्त आटवले होते. अन त्यापूर्वी त्याची यथेच्छ निर्भत्सना करून आधी त्याचे डोके ताळ्यावर आणले होते. आज पुन्हा अशा एखाद्या पार्थसारथ्याची गरज आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ जून २०१७

अन्नदाता सुखी भव - ३


`अन्नदाता सुखी भव'चा तिसरा भाग लिहिणं काही ना काही कारणाने पुढे जात राहिलं. आज सकाळी एक बातमी वाचण्यात आली आणि वाटलं- कदाचित या बातमीसाठीच लिखाण पुढे ढकलत जावं लागलं असेल. नियती खेळवते म्हणतात ते हेच. काय होती बातमी? अमेझॉन या ऑनलाईन विक्री कंपनीच्या प्रमुखाला आपली पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती दान करावयाची आहे. बातमीच्या शेवटी एक उल्लेख असाही आहे की, जगातल्या १६० हून अधिक लोकांना आपली अवाढव्य संपत्ती दान करायची आहे. ही संपत्ती कुठे आणि कशी दान करायची या चिंतेत हे लोक आहेत. आजच्या अर्थकारणाचा फार महत्वाचा भाग या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. आजचे अर्थकारण पैसानिर्मिती करणारे अर्थकारण आहे. त्या ऐवजी अर्थकारण हे पुरेसा पैसा खेळवणारे अर्थकारण हवे. पैशाची (विनिमयाचे साधन) निर्मिती हा अर्थकारणाचा महत्वाचा पैलू आहेच, पण अर्थकारण त्याच ठिकाणी थांबता कामा नये. आज तसे ते थांबते.
वास्तविक निसर्गचक्र, जीवनचक्र, विचारचक्र, स्वरचक्र यासारखेच अर्थचक्र असायला हवे. ही चक्र कल्पना फार महत्वाची आहे. या संपूर्ण अस्तित्वाचाच तो आधार आहे. हे अस्तित्व चक्रीय आहे. निसर्ग हे त्याचे फार सुंदर आणि लक्षणीय उदाहरण आहे. नेमके आजच्या विचारपद्धतीत ही चक्रकल्पना missing आहे. तेच अर्थकारणालाही लागू आहे. अर्थाचे एक चक्र हवे. त्या चक्रात आवश्यक आणि पुरेसा पैसा हवा. पण चक्र नसेल तर पैसा कितीही असला, आवश्यकतेपेक्षा कितीही अधिक असला तरीही तो फक्त एकाच, म्हणजे वरच्या दिशेने जाईल आणि खालच्या दिशेला त्याचा अभाव अधिकाधिक जाणवेल आणि त्याचा त्रास होईल. शरीरातील रक्त फक्त हृदयाकडेच जात राहिले किंवा फक्त हृदयाकडून जात राहिले तरी अनर्थ होईल. रक्त डोक्यापासून पायाकडे, पायापासून डोक्याकडे आणि हृदयापासून हृदयाकडे जात राहायला हवे. ते खेळते राहायला हवे. आणि गरजेपेक्षा अधिक सुद्धा असायला नको. त्याचे शरीरातील प्रमाण निश्चित असते.
आज याचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात होत नाही. समाजशरीरात आज गरजेपेक्षा किती तरी जास्त पैसा आहे. तोही claim असलेला. unclaimed वेगळाच. मग एवढा पैसा असूनही दारिद्र्य का? शेतकरी आत्महत्या का? शेतकरी कर्जबाजारी का? कारण पैसा फिरत नाही. पैशाची निर्मिती होऊन उपयोग नाही तो फिरायलाही हवा. पुन्हा एकदा हेही लक्षात घ्यायला हवे की तो गरजेहून अधिक सुद्धा नको. हे कसे साधता येईल? पुन्हा एकदा शरीराचे उदाहरण घ्यावे लागेल. हात, पाय, धड, डोळे, कान, नाक, मेंदू हे सारे आपापले काम करतात. हे कामच त्यांच्याकडे रक्त खेचून आणते, त्यांच्यापासून रक्त परत पाठवते आणि हे चक्र सतत सुरु राहते. आणखीन एक- प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी आपापले काम करते, मात्र ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे. रक्तपुरवठ्याशिवाय अवयव काम करू शकणार नाहीत, अवयवांनी काम केले नाही तर शरीर राहू शकणार नाही. पण रक्त तयार करण्याचे आणि पुरवण्याचे काम फक्त हृद्य करीत असते. आजच्या यंत्र-तंत्र युगाने जी यांत्रिक विचारपद्धती उत्पन्न केली त्यात हा विचार होत नाही. संपूर्ण शरीर एक संपूर्णता आहे. त्यामुळे हृदय जे रक्त तयार करतं ते केवळ हृदयाचे नसून संपूर्ण शरीराचे असते. त्यामुळे ते देताना ते संकोच करीत नाही. हृदयाने तयार केलेले रक्त स्वीकारताना अन्य अवयव त्यात कमीपणा वा अपमान मानत नाहीत. आणि ही देवाणघेवाण गरजेनुसार असल्याने अधिक ओरबाडणे, साठवून ठेवणे, संग्रह करणे इत्यादी गोष्टींना वाव नाही. हे अर्थकारणाला लावून पाहिले की अनेक गोष्टींचा उलगडा होतो.
आज आमच्या विचारशून्यतेने आम्ही अनर्थ ओढवून घेतला आहे. हे संपूर्ण अस्तित्व, ही प्रकृती एक संपूर्णता आहे हे लक्षात न घेऊन, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक अस्तित्व वेगळे आहे असे आम्ही मानतो. त्यानुसार प्रत्येक अस्तित्वाने आपापले रक्त तयार करावे आणि त्या भरवशावर जगावे असे मानतो. नेमकी चूक इथे होते. प्रत्येक अवयव आपापले रक्त तयार करू लागला तर रक्ताचे फिरणे थांबेल आणि शरीर संपून जाईल. अर्थकारणाच्या संदर्भात हा विचार कसा करता येईल. जगण्यासाठी पैसा हवा हे निर्विवाद. हा येणार कुठून? त्यासाठी प्रत्येकाने काम करायला हवे. निर्विवाद. पण हे काम म्हणजे पैसा निर्माण करणे नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची प्रत्येक पेशी काम करते. पण ते काम म्हणजे रक्त तयार करणे नव्हे, तसेच प्रत्येकाने काम करायलाच हवे. ती जगण्याची मुलभूत गरज आहे. मात्र काम करणे म्हणजे पैसा तयार करणे नव्हे. आपल्या conditioning मुळे हे समजायला थोडे किचकट आहे, पण ते समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने काम करायला हवे, प्रत्येकाला काम करता यायला हवे. पण काम करणे आणि पैसा यांचा जो संबंध आज आपण जोडलेला आहे तो तोडायला हवा. काम म्हणजे रोजगार म्हणजे पैसा हे समीकरण बदलायला हवे.
प्रत्येक गोष्ट ज्यावेळी पैशात मोजली जाते त्यावेळी त्याला किंमत प्राप्त होते. सगळ्या गोष्टींची किंमत सारखी नसते. मागणी पुरवठ्या नुसार किमती ठरतात. त्याला परिस्थितीची जोड असते. त्यामुळे किंमत या स्वरुपात सगळ्यांना सारखा न्याय देताच येत नाही. म्हणूनच सोने, मोबाईल, शिकवणे, साहित्यनिर्मिती, कलासाधना, घर सांभाळणे, शेतीमाल यांच्या किमती सारख्या राहू शकत नाहीत. त्यांचे मूल्य आणि त्या मूल्याचे महत्व कमी होत नाही, संपत नाही. शेतीमालाचे जगण्याच्या संदर्भातले मूल्य आणि महत्व अजिबात कमी होऊ शकत नाही. तसेच घर सांभाळण्याचे किंवा शिकवण्याचे किंवा कलासाधनेचे किंवा साहित्य निर्मितीचेही. पण या सगळ्या गोष्टींची किंमत सारखी राहू शकत नाही. तसेच यातील सगळ्या गोष्टी पैसा निर्माण करू शकत नाहीत. आज मात्र आम्ही या प्रत्येक कामाला पैसा निर्माण करण्यात लावतो. यामुळे पैसा तर निर्माण होत नाहीच उलट त्याचा दर्जा आणि मूल्य कमी होते आहे. त्याचा फटका एकूण जगण्याला बसतो आहे. (क्रमशः)
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ जून २०१७

अन्नदाता सुखी भव- २


पैसा हा शेतकरी समस्येचा दुसरा महत्वाचा पैलू आहे. कधीकाळी शेतकऱ्याकडे असलेला पैसा आता त्याच्याकडे नाही. `उत्तम शेती'ची आता अधम शेती झाली आहे. याची अनेक कारणे आहेत. लोकसंख्येतील वाढ, शेतीचे हिस्सेवाटे, शेतजमिनी धनदांडग्या लोकांच्या घशात घालण्याचे उद्योग, गावांबद्दल जाणता अजाणता निर्माण झालेली अनास्था, विकास- प्रगती- जगणे- यांचा केंद्रबिंदू शहरांकडे सरकणे, परीटघडीचे आयुष्य आणि लिहिता वाचता येणे म्हणजेच चांगले जीवन हा रुजवलेला व जोपासलेला समज, व्यसने, गतानुगतिकता, राजकारण, आधुनिकतेच्या नावाखालील शेतीचे अनावश्यक रासायनिकरण व यांत्रिकीकरण, परंपरा आणि पारंपरिकतेच्या डोळस स्वीकार-नकाराचा अभाव; अशी ही विविध कारणे आहेत. गेली अनेक वर्षे हे सुरु आहे. तरीही त्याचे आजचे भयावह स्वरूप आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे post globalisation चे चित्र आहे. आजची विदारक स्थिती हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. १९९० पूर्वी शेतकरी आत्महत्या हा विषय नव्हता.
जागतिकीकरणसुद्धा आता २५ वर्षे जुने झाले आहे. एवढेच नाही तर ज्यांनी जागतिकीकरणात आघाडीवर राहून नेतृत्व केले होते ते त्यातून माघार घेऊ लागले आहेत. काही दिवाळखोर झाले आहेत. काही मुठभर लोकांच्या हाती जगातील ८० टक्के संपत्ती साठल्याची जी चर्चा अधूनमधून होते, त्या संपूर्ण phenomenon चा तडाखा संपूर्ण जगाला बसला आहे. भारतातील शेतकरी समस्या हा त्याचाच एक भाग आहे. ही समस्या इतकी किचकट आणि गुंतागुंतीची आहे की, त्यावर `झट मंगनी पट ब्याह' असा उपाय शक्य नाही. ज्यांना अशी अपेक्षा आहे ते अडाणी आणि अशी अपेक्षा जनमानसात निर्माण करून त्याचे राजकारण करू पाहणारे बदमाश आहेत असेच म्हटले पाहिजे. पक्षोपपक्षांचे झेंडे घेऊन नाचणारे बावळट म्हटले पाहिजेत. आज सत्तेवर असणारे, काल सत्तेवर असलेले किंवा उद्या सत्तेवर येणारे यांची यातील भूमिका मर्यादित होती, आहे वा असेल हे समजून घेणे गरजेचे आहे.
एक उदाहरण घेता येईल. शेतीसाठी पैसा पाहिजे. परंतु त्यासाठी पैसा मिळत नाही. का? कारण शेती बेभरवशाची आहे. अगदी कालचे उदाहरण- काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने विदर्भाच्या पातुर भागात इतकी जोरदार हजेरी लावली की शेतात काढून ठेवलेला कोट्यवधींचा शेतमाल मातीमोल झाला. कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी; कधी कीडीचा हल्ला तर कधी प्राण्यांची समस्या; पाऊसपाणी व्यवस्थित झाल्यावरसुद्धा कधी भरघोस पिके तर कधी पिके कमी येणे. दोन शेजारच्या शेतात सारखे पिक पेरले, एकाच वेळी पेरले तरीही त्याचे उत्पादन चार-आठ दिवस मागेपुढे येते. त्यात शेतकऱ्याच्या व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कामांमुळे किंवा मजूर इत्यादी सोय न झाल्याने वगैरे माल मागेपुढे निघतो. एकाचा माल घरात येतो, तर दुसऱ्याचा दोन दिवसांनी पाऊस वा वादळ आले की मातीमोल होतो. उद्योग आणि शेती यात असे कमालीचे अंतर आहे. उद्योगात माणसे, उत्पादन, साठवणूक, वातावरण, परिस्थिती नियंत्रणात असतात. शिवाय उद्योग बुडाला तरी त्याची जमीन, कच्चा वा पक्का माल ताब्यात घेता येतो. काही ना काही वसुली करता येऊ शकते. तरीही बँकांची थकीत कर्जे लाखो कोटी रुपयांवर पोहोचली आहेत. अशा स्थितीत शेतीला पैसा कोण देणार? एखाद्या theme park साठी बँक अथवा जागतिक एखादी संस्था सहज पैसा देते पण शेतीसाठी देत नाही. मग स्वाभाविक हे काम सरकारकडे येते. पण सरकार किती अन काय काय करणार?
सरकारला शेतीलाही पैसा द्यावा लागतो, शाळांनाही पैसा द्यावा लागतो, इस्पितळेही उभारावी लागतात, कला साहित्याची जोपासना करायला पण पैसा पुरवावा लागतो. अशा असंख्य बाबी. पैशाचे सोंग आणता येत नाही पण आणावे लागते. मग कर्जाचे डोंगर उभारावे लागतात, त्यातून पत घसरते, कर्जफेडीची चिंता सतावते, त्यासाठी जनतेच्या खिशाला हात घालावा लागतो. मागणाऱ्यांची संख्या जेवढी अधिक तेवढी जनतेच्या खिशाला कात्री अधिक. ही कात्री सरसकट सगळ्या जनतेच्या खिशाला लागते. ज्या शेतकऱ्याला एका हाताने मदत दिली जाते त्याच शेतकऱ्याच्या अन्य गरजातून थोडे थोडे का होईना काढून घेतले जाते. कर्जाचा पर्याय थोडा बाजूला ठेवला तर धनदांडग्या लोकांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात. त्यांच्याकडून परस्पर काही गोष्टी करून घ्याव्या लागतात. त्यासाठी त्यांच्या अटी शर्ती स्वीकाराव्या लागतात. बरे, आपण स्वीकारलेल्या महान लोकशाहीमुळे निवडणुकांना पैसा लागतो. शेतकरी तो पैसा देऊ शकत नाहीत. पैसा देतात ते उद्योजक आणि व्यापारी हेच. त्यांना हात लावता येत नाही. सरकार कोणाचेही असो. घडते ते हेच. प्रत्येक पक्षाचे आपापले उद्योजक, व्यापारी असतात. त्या त्या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना त्यांचे त्यांचे सरकार हवे असते. दुसरे सरकार आले की त्यांचे नाककान दाबले जातात. जगणे थोडेबहुत तरी मुश्कील होते. आज सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनांमागे हादेखील एक पैलू आहे.
अशा स्थितीत कर्जमाफी किंवा हमीभाव नेहमीच कात्रीत सापडतात. शिवाय कृषीमालाचे भाव वाढवणे याच्या अन्य परिणामांचा विचार होतच नाही. कृषीमालाचे भाव वाढवा म्हणणे ठीक आहे. कदाचित ते वाढवले जातीलही. पण त्याचे परिणाम काय? अन त्याने साध्य काय होणार? सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, शेतकरी हा एकाच वेळी शेती कसणारा उद्योजक आहे, कृषिमाल विकणारा व्यापारी आहे, अन ग्राहकही आहे. एखादा शेतकरी गहू विकेल त्यावेळी डाळ, दूध इत्यादी विकतही घेईल. एखादा शेतकरी भुईमुग विकेल त्याच वेळी गहू, तांदूळ इत्यादी विकत घेईल. भाव वाढतील तेव्हा सगळेच भाव वाढतील. मग गहू विकून अधिक पैसा मिळेल अन त्याच वेळी अन्य गरजा महाग झाल्याने त्यात खर्चही होईल. खाद्यान्नाचे भाव वाढल्याने महागाई वाढेल, नोकरदारांचे महागाई भत्ते वाढतील, माणसांच्या हाती अधिक पैसा आल्याने कारखान्यात उत्पन्न होणाऱ्या उत्पादनांचे भाव वाढतील, वरच्या लोकांकडे पुन्हा अधिकचा पैसा साठेल, शेतकरी आजच्यापेक्षा अधिक पैसा असूनही सगळ्यात शेवटल्या पायरीवरचा शेवटल्या पायरीवरच राहील. त्याचे जगणे आता जसे कठीण आहे तसेच जास्तीचा पैसा मिळाल्यावर सुद्धा कठीणच राहील. आज कृषीमालाचे भाव वाढवण्याचा घाऊक उपाय सांगणारे हे धरून चालतात की बाकी सगळ्या बाबी आज आहेत तशाच राहतील. त्यांचे हे वाटणे दिवास्वप्न किंवा मूर्खांचे नंदनवन याहून अधिक काहीही नाही.
जगभरात, अगदी विकसित देशातसुद्धा हीच स्थिती आहे. त्यामुळेच त्यांनाही शेतीला मोठाली अनुदाने द्यावी लागतात, पैसेवाल्यांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागतात, अन या प्रयत्नात ते अभूतपूर्व कर्जबाजारी होतात किंवा दिवाळखोर होतात. शिवाय ज्याच्याकडे ना शेती आहे, ना उद्योग असा जो कोट्यवधीच्या संख्येतील मजूरवर्ग, कष्टकरी वर्ग आहे त्याचे काय? खायला, प्यायला त्यालाही हवे. त्याला ना हमी भाव, ना महागाई भत्ता, ना वेतन आयोग. जाडीभरडी का होईना भात रोटी खाऊन जगणाऱ्या या वर्गाने गहू, तांदूळ, डाळी, दूध यांचे भाव वाढले तर काय करायचे? पुन्हा सरकारने त्यांना फुकटात धान्य, दूध वगैरे द्यायचे? पुन्हा त्याचा बोजा अर्थयंत्रावर? बरे, हा जो मोठा कष्टकरी वर्ग आहे त्याच्यावरच बाकी संपूर्ण समाजाचा डोलारा उभा असतो. नेहमीच. त्या वर्गाने त्याचे पाहून घ्यावे अशाच राक्षसी मानसिकतेत आज आपण आहोत. माणूस म्हणून तर आपले हे अध:पतन आहेच, पण हा काच वाढला तर; the worm also turns या उक्तीप्रमाणे; संपूर्ण समाजव्यवस्था अस्ताव्यस्त होण्याची शक्यता नजरेआड करून चालणार नाही.
मग काय? पुढील भागात विचार करू.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ११ जून २०१७

`वामांगी'च्या निमित्ताने


दर आषाढी कार्तिकीला येते तशीच आजही अरुण कोलटकर यांची `वामांगी' ही कविता वाचायला मिळाली. नेहमीच मनोरंजन आणि उथळपणा म्हणून त्याकडे पाहतो. आजही तसेच पाहिले. पण त्यासोबतच त्यावर मत मांडावे असेही वाटले.
कोलटकर यांची ही कविता आता भरपूर परिचित झालेली आहे. त्यामुळे कविता येथे देत नाही. ज्यांना ठाऊक नसेल त्यांना ती सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मूळ मुद्यावर येतो. पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रखुमाई नाही. त्यावर ही कविता. कोलटकर यांनी त्यांना वाटला तो अर्थ लावून स्त्रीवादाच्या अंगाने ही कविता लिहिली. पण म्हणून ते सत्य ठरते का? अशीच पुरुषवादी भूमिका घेऊन कविता लिहिता येईलच. ती विठ्ठलाची भूमिका म्हणून मांडता येऊ शकेल. हा सगळाच त्यामुळे पोरखेळ ठरतो. साहित्यिकाने स्वातंत्र्य किती आणि कशाचे घ्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपले प्रश्न, आपली मते मांडताना शतकानुशतके ज्या गोष्टी घडत-बिघडत आल्या आहेत, त्यांचा आधार किती घ्यावा हा मूळ प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देव, धर्म, रूढी, परंपरा, भावना यांना हात घालताना किमान तर्कबुद्धी तरी वापरायलाच हवी. या कवितेच्या संदर्भात ती किमान तर्कबुद्धी वापरायची म्हटले तर प्रश्न निर्माण होतो विठ्ठल-रुक्मिणी यांना खरेच अस्तित्व आहे का? असे कोणी आज वा कधीकाळी होते का? उत्तर स्पष्ट आहे- त्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मग सांगता येत नाही तर त्यावर समग्र जीवनाच्या संदर्भात भाष्य का करायचे? तो प्रश्न भावनांचा, श्रद्धांचा म्हणून दूर ठेवायचा. आपली मते, आपले विचार, आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना वेठीला धरण्याचे कारण नाही. ते काम अन्य प्रकारे होते आणि होऊ शकते. त्यामुळे अशा बाबतीत आक्रस्ताळेपणा करत विनाकारण श्रद्धाभंजन करत सुटणे चुकीचे ठरते. त्यामुळे ही कविता अयोग्य आणि चुकीची म्हणावी लागते.
दुसरा मुद्दा येतो, कवितेच्या आशयाचा. याबाबतीत असे म्हणता येईल की, देव, ईश्वर, धर्म इत्यादींची समज नसलेली ही कविता आहे. मुळात देव, धर्म, ईश्वर, आध्यात्म यांची बांधिलकी आणि श्रद्धा जपणारे सुद्धा याबाबत फारसा विचार करीत नाहीत. मग ज्यांना ते मान्य नाही किंवा त्याला विरोध करायचा आहे त्यांची गोष्टच वेगळी. अरुण कोलटकर असो किंवा `पिके' तयार करणारा अमीर खान असो; एकाच माळेचे मणी. ही दोन नावे फक्त उदाहरण म्हणून घेतली. परंतु असे अक्षरशः असंख्य आहेत. साहित्यिक, विचारवंत, लेखक, कलाकार, पत्रकार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजमानस घडवणारे बहुतांश लोक या गोष्टींचा मुळातून, सखोल अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. किमान असा अभ्यास करणाऱ्यांकडून थोडा सल्ला वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. उलट आपले मत लादण्याचा प्रयत्न करतात. शेकडो वर्षे वारकरी, भागवत संप्रदाय, संत काय म्हणत आहेत याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्ही म्हणतो तोच अर्थ खरा आहे असा दावा करणे हास्यास्पद ठरते. भारतीय तत्वज्ञान, देवदेवता कल्पना, प्रतिकांचे अर्थ, प्रतिकांचा विकास, या साऱ्याचा मानवी जगण्याशी संबंध यांचा सखोल विचार न करता अनेकदा लिहिले जाते. आजचे बहुसंख्य साहित्य हे impulsive साहित्य आहे. कोलटकर यांची ही कविताही तशीच आहे. अतिशय धाडसाने मी हेही म्हणेन की, पुराणे, कथाकहाण्या हे साहित्य देखील impulsive साहित्य आहे. मूळ भारतीय तत्वज्ञान, आध्यात्म, जीवनदृष्टी समजण्यासाठी उपनिषदे हाच संदर्भबिंदू आहे. लोकश्रुती किंवा अन्य साहित्य नाही. अलीकडच्या काळात यावर भाष्य करणारे विवेकानंद, योगी अरविंद असोत किंवा डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान यांचे अध्ययन न करता, जीवन, जगणे इत्यादींचा गांभीर्याने विचार न करता लिहिले जाते. असे लिहावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी असे लिहू नये म्हणून काही ते थांबणार नाहीत. मात्र एका गोष्टीवर आक्षेप घ्यावाच लागेल आणि आग्रहाने ती गोष्ट मांडावी लागेल की, impulsive लिहून ते सिद्धांत म्हणून प्रचारित करू नका.
कोलटकर किंवा त्यांच्या पद्धतीने लिहिणारे लोक ज्या विचारांना प्रमाण मानून लेखन करतात ते विचार आज केवळ भारतात नव्हे संपूर्ण जगात प्रश्नांकित झालेले आहेत. गेली काही शतके हे विचार आपल्या कानीकपाळी इतके ठसवले गेले आहेत की, आम्ही त्यांचा नीट विचार करूच शकत नाही. व्यक्तिवाद, इहवाद, विकास, स्वातंत्र्य, जीवन, जगणं, माणूस इत्यादींच्या संकल्पना, त्यामागील भावना, जगण्याच्या संदर्भातील या सगळ्याचे अनुभव हे सगळेच आज कोलमडून पडले आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार तुकडे तुकडे करून, पृथकपणे करणे आणि सगळ्या गोष्टींचा विचार जोडत जोडत सलगपणे करणे असा मूळ विचारांचा फरक आहे. जोडत जाणे हा भारतीय विचार आणि भाव आहे. तो समजत नाही तोवर अनेक गोष्टी उलगडणे कठीणच. देव ईश्वर असा विषय असल्याने फक्त एक सिद्धांत म्हणून मांडतो. त्याचा विस्तार वाचकांवर सोपवतो. सिद्धांत- भारतीय आध्यात्मदृष्टी सुद्धा अखेरीस ईश्वर सोडून देते. भारतेतर इहवादी, लौकीकवादी दृष्टी तर ईश्वर टाकूनच देते. दोन्हीत ईश्वर संपून जातो. मात्र भारतीय दृष्टी सगळ्या लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक बाबी सामावून घेत घेत जगण्याचं संपूर्णत्व प्रकट करते. त्यात ईश्वर संपणे याचा अर्थ ईश्वराचा विलय आहे. मात्र भारतेतर दृष्टी ईश्वराची तोडफोड करत, जगण्याची चिरफाड करत, तुकडे तुकडे करत, अखेरीस फक्त चिंध्या हाती ठेवते आणि जगणे हा वैफल्याचा उत्सव म्हणून साजरा करते. रखुमाईच्या प्रतिकातून कोलटकर यांनी मांडलेला विचार याला अपवाद नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ जुलै २०१७