गुरुवार, ३१ मार्च, २०२२

मनात येणारे दोन प्रश्न-

 आजकाल सतत मनात येणारे दोन प्रश्न-

१) सतत जात जात जात करणारी प्रसार माध्यमे घटनाविरोधी कृत्य सातत्याने आणि उघडपणे करीत नाहीत का? जात हे ऐतिहासिक वास्तव आहे. पण ती दूर करण्यासाठी तिची चर्चा करणे आणि ती दृढ करण्यासाठी तिची चर्चा करणे यात काही फरक आहे की नाही? राजकीय पक्ष जातीचा वापर करीत असतीलही, ती कदाचित त्यांची गरज असेल. पण माध्यमांची तर ती गरज नाही आणि माध्यमांनी जातीकडे दुर्लक्ष केले तर नक्कीच राजकीय पक्षांच्या प्रयत्नांना मिळणारे खतपाणी बंद होईल आणि जातभावना दुबळी व्हायला मदत होईल. समाजात जे जसं काही आहे ते सांगणं, दाखवणं हे प्रसार माध्यमांचं काम आहेच. पण चांगला, आदर्श समाज घडवण्याची जबाबदारी सगळ्यांचीच असल्याने प्रसार माध्यमांचीही आहेच ना? प्रसार माध्यमे समाजाचा घटक नाहीत का? चांगल्या समाजासाठी सगळ्यांचा हातभार नको का लागायला? त्यांच्या या घटनाविरोधी कृत्याची शिक्षा त्यांना मिळायला हवी की नको?

२) हिंसा ही सभ्य म्हणता येणार नाही. ती समूळ नष्ट करता येईल का हा सुद्धा एक गंभीर प्रश्नच आहे, पण निदान हिंसेला तात्त्विक आणि अधिकृत समर्थन अयोग्यच म्हटले पाहिजे. हेच आपल्या राज्यघटनेला धरूनही आहे. मग अधिकृतपणे हिंसेचे समर्थन करणाऱ्या मार्क्सवादावर देशभरात बंदी का घालण्यात येऊ नये?

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

आम्ही हे स्वीकारू?

तंबाखू उत्पादने हा अलीकडे पुन्हा चर्चेत आलेला विषय. त्या सवयीने असे होते, तसे होते, इतके मरतात वगैरे सुरु असते. काल कोणते तरी सर्वेक्षण आले की, सिगारेट पिण्याने कर्करोग होतो हे खोटे आहे. खरं खोटं काय असेल ते असो. पण कधी कधी मनात प्रश्न येतो या सगळ्याशी सरकारचा काय संबंध? जागृती, प्रचार-प्रसार, नुकसानभरपाई, कज्जेदलाली; यासारख्या गोष्टींवर सरकारे किती वेळ, पैसा, मनुष्यबळ, साधने वगैरे वाया घालवतात. हे सगळे थांबायला नको? समाजाची, प्रत्येक व्यक्तीची काही जबाबदारी असते की नाही? तंबाखू सारखे प्रश्न त्यांचे त्यांनी पाहून घ्यावेत. सरकारने सरळ सांगून टाकायला हवं की, याच्याशी आमचे देणेघेणे नाही. कोणी तंबाखू खाऊन किंवा ओढून मेला तर त्याची जबाबदारी त्याची वा संबंधितांची. सगळ्यांच्या सगळ्या सवयी, वागणे, बोलणे, चालणे, खाणे, पिणे; अन त्या साऱ्याचे परिणाम यांच्याशी सरकारचा काय संबंध? अशा अनेक गोष्टींची यादी करता येईल, नव्हे तशी ती करून सरकारने हे जाहीर करावे की, याच्याशी आमचा संबंध नाही. हेल्मेट हा असाच एक विषय. हेल्मेट नावाची एक वस्तू आहे. ज्याला वाटेल तो वापरेल, ज्याला नाही वापरावेसे वाटणार तो नाही वापरणार. मरेल तर मरेल. हां, सुव्यवस्थेसाठी गाड्यांचे वेग नियंत्रण, वाहने कुठल्या बाजूने चालवावी, कशी कुठे थांबवावी वगैरे गोष्टी ठरवाव्या आणि त्यात कोणी चुकला वा जाणूनबुजून कोणी त्यात हयगय केली तर नियमानुसार त्याला शासन करावे. पण हेल्मेटसक्ती सुव्यवस्थेत बसत नाही. पण सरकार इतके स्पष्ट ठेमेठोकपणे काम करील का? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बावळटपणा, बेजबाबदारपणा यात आघाडीवर असणारा आणि सतत कुणावर वा कशावर अवलंबून राहण्याची सवय असलेला समाज हे स्वीकारेल का?

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, १ एप्रिल २०१५

प्रसन्न जोशींकडून अपेक्षा

मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यद भाई यांच्याशी 'एबीपी माझा'चे प्रसन्न जोशी यांनी तबलीगबद्दल चर्चा केली. चर्चा चांगली झाली. माहितीपूर्ण होती. या चर्चेत बोलताना प्रसन्न जोशी वारंवार म्हणत होते की - याबाबत मला माहिती नाही, असा माझा अंदाज आहे जो खोटाही असू शकतो, तुम्ही याबद्दल माहिती देऊ शकता; इत्यादी इत्यादी. समजून घेण्याची आणि आपल्याला सगळं माहिती नसतं; अशी वास्तववादी भूमिका त्यांनी हिंदुत्व, परंपरा, धर्म, संघ आदींच्या संदर्भातही घेत जावी असं वाटतं.

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

सावधगिरी आणि संशय

कोरोना प्रकरणामुळे स्वच्छता, हायजीन, अंतर अशा गोष्टी पुढे आल्या. ही चांगलीच गोष्ट आहे. यावर बरंच गंभीर आणि गमतीचं बोललं, लिहिलं जातं आहे. या संदर्भात काही वर्षांपूर्वी गाजलेले नॉर्वेतील एक प्रकरण आठवले. एका बंगाली कुटुंबावर लहान मुलांना हाताने खाऊ घालणे, जवळ घेऊन झोपणे अशा काही गोष्टींसाठी कारवाई झाली होती. त्या लहान मुलांना नॉर्वे सरकारने आपल्या ताब्यात घेतले होते आणि बंगाली जोडप्याला परत यावे लागले होते. ही घटना आठवल्यावर वाटले - सावधपणा, सजगता ही संशयीपणात परिवर्तित होऊ नये. आरोग्य इत्यादीची काळजी घेतानाच जगण्याच्या सहजतेने कृत्रिमतेच्या विळख्यात जाण्याचा धोका टाळावा.

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

उपनिषद गंगा

रामायण, महाभारत यानंतर उपनिषद गंगा आजपासून पुनःप्रसारित होणार आहे. रामायण, महाभारता एवढे प्रेक्षक; तेवढी लोकप्रियता उपनिषद गंगाला मिळणार नाहीच. आधीही मिळाली नव्हती. पण उपनिषदांचा अभ्यास अन केवळ अभ्यास नव्हे तर उपनिषदांचा ध्यास घेणारे वाढायला हवेत हे मात्र खरं. रामायण, महाभारत यांची गोडी, त्यांचे आकर्षण आहेच. ते मानवी जगण्याचे ग्रंथ आहेत हेही खरे. सत्याचा असत्यावर विजय, न्यायाचा अन्यायावर विजय वगैरे ठीकच. परंतु हे दोन पुराण ग्रंथ मानवी जीवनाचा पूर्णविराम नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. मानवी जीवनाचे स्वरूप या दोन ग्रंथात व्यापक स्वरूपात, सखोल रीतीने आलेले आहे हे खरेच; पण मानवी जीवनाचे ते अंतिम चित्र नाही. शिवाय व्यावहारिक मानवी जीवनाचे मार्गदर्शन त्यातून होत असले तरीही, मानवी जीवनाच्या मुळाला ते हात घालत नाहीत. उपनिषदे ही या अर्थाने पुढची पायरी आहेत. नवीन युगाच्या मानवासाठीही उपनिषदे मार्गदर्शक ठरतात. ज्या भारतात उपनिषदे जन्माला आली त्या भारतानेही याआधी वा आतापर्यंत उपनिषदे आपल्या जगण्याचा भाग बनवलेली नाहीत. प्रयत्न जरूर केलेत पण अजून ते पूर्णत्वाला गेलेले नाहीत.  उपनिषदे भावी जगाचा आधार होऊ शकतील वा नाही हे तर काळच सांगेल पण आजच्या मानवाच्या प्रश्नांची उत्तरे मात्र तेच देऊ शकतील. उपनिषदे अव्यक्तिक (impersonal) आहेत, सार्वभौमिक आहेत. ती कुठलाही प्रश्न नाकारत नाहीत. कशालाही बुद्धिभेद म्हणत नाहीत. माहीत नसलेल्या गोष्टींना माहीत नाही म्हणायला शिकवतात आणि हे म्हणतानाच ओशाळलेपणा, अपमान, लघुता येऊ देत नाहीत. अन उत्तर देता आले नाही तरी शांति आणि समाधान हिरावून घेत नाहीत. ती मानवाचा प्रवास थांबवित नाहीत आणि त्याला अकारण फिरवतही ठेवत नाहीत. उपनिषदांचा हात अधिकाधिक लोकांनी धरायला हवा हे मात्र वाटतं.

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

मंगळवार, २९ मार्च, २०२२

पुष्कळांना आवडणार नाही तरीही...

मोठ्या प्रमाणात कामगारांचे पलायन सुरू आहे. त्यावर बरीच आक्रस्ताळी, कडवट टीका होते आहे. हे चूक आहे. ज्या पद्धतीने हे पलायन होते आहे त्याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. परंतु त्यावर काही बोलण्यापूर्वी क्षणभर हा विचार करून पहावा की, मी माझ्या कुटुंबासह एखाद्या unforeseen विपत्तीत सापडलो तर? त्यातही एकीकडे जीवाची भीती. अशा स्थितीत आम्ही काय करू? ते जाऊ द्या. सध्याचे २१ दिवसांचे क्वारंटाईन संपेपर्यंत तरी आमचे मानसिक स्वास्थ्य अगदी ठणठणीत राहील याची खात्री किती जण देऊ शकतील? हा काळ समजा (प्रभू करो तसे न होवो) वाढवावा लागला तर किती जणांचे डोके, मन शांत राहील. बाकी आपली परिस्थिती, आपली साधने, आपली वाढ, आपले बुद्ध्यांक आणि भावनांक या गोष्टी आहेतच. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर सुद्धा एक तर्क करता येईल की, त्यांच्या भल्यासाठीच आम्ही म्हणतो आहे नं? हा तर्क आहे तर बरोबर पण कोणाच्या भल्यासाठीही आपण आपली मानवीय सीमा सोडावी का? अन त्यातही आपल्याला प्रत्यक्ष काहीही करावयाचे नसताना. त्यामुळे हा अनावश्यक आक्रस्ताळेपणा योग्य म्हणता येत नाही.

- श्रीपाद कोठे

३० मार्च २०२०

सोमवार, २८ मार्च, २०२२

`आळीन माळीण फुले दे'

`little red flowers' नावाचा चीनी चित्रपट पाहिला. `निवासी बालवाडी'वरील हा चित्रपट. आपल्या येथे अजून तरी निवासी बालवाडी ऐकिवात नाही. छोट्या छोट्या मुलांचं जीवन. त्यांचं खाणं पिणं, खेळणं, रडणं, मैत्री, भांडणं, मारामाऱ्या, इब्लीसपणा, त्यांचं विश्व... आणि हे सगळं हाताळणाऱ्या त्यांच्या शिक्षिका. या शिक्षिकांचं त्यांना समजून घेणं, रागावण, शिक्षा करणं, कठोर वागणं, प्रसंगी त्यांना मदत करणं... सगळं खूप छान होतं. या विद्यार्थ्यांमधील एक व्रात्य मुलगा चित्रपटाचा हिरो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सारी मुले छोटी छोटी लाल फुले गणवेशावर लावून संचलन करतात आणि शाळेचा निरोप घेतात. चित्रपटाचा व्रात्य हिरो मात्र अखेरीस एकटाच उरतो. इथे चित्रपटाचा शेवट. एखादा विषय किती सहज आणि सकसपणे दाखवला जाऊ शकतो, त्याचं हे उदाहरण.

या मुलांचा एक खेळ मात्र आवर्जून सांगितला पाहिजे. आपल्याकडे मुली `आळीन माळीण फुले दे' असा काहीतरी खेळ खेळतात. दोघींनी एकमेकींसमोर उभे राहायचे आणि एकमेकींचे दोन्ही हात डोक्याच्या वर धरायचे. हातांच्या त्या मांडवाखालून सगळ्यांनी जायचे. गाणे म्हणता म्हणता मधेच थांबायचे आणि जो खाली असेल त्याला धरायचे. ज्याला धरले तो बाद. असा काहीसा तो खेळ. त्या खेळाचे चीनी नाव नाही कळले, पण अगदी तोच खेळ `निवासी बालवाडी'तील त्या छोट्या छोट्या मुली खेळल्या. क्षणभर असं वाटलं की, आपल्याच बालवाडीतील चित्रपट आहे की काय.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०१३

बदमाश चीन

चीन अत्यंत खतरनाक आहे असं अनेकांनी सांगितलं आणि १९६० च्या दशकात भारताने त्याचा अनुभवही घेतला होता. आज जगाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो आहे. कोरोना विषाणू चीनच्या वूहान प्रांतात तयार झाला की अमेरिकेच्या जॉर्जिया प्रांतात हा वाद बाजूला ठेवू, पण त्या विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा उचलण्यात चीनने पुन्हा आघाडी घेतली आहे. चीनचे ९० टक्क्यांहून जास्त उद्योग पुन्हा सुरू झाले एवढेच नाही, तर जगाची गरज ओळखून (जी कदाचित त्यानेच निर्माण केली) मोटरगाड्यांच्या कारखान्यात कोट्यवधी मास्क तयार करून ते जगभर पाठवणेही त्याने सुरू केलेले आहे. एका वृत्तानुसार जगातल्या ८९ देशांना वैद्यकीय मदत, वैद्यकीय सामान, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय माणसे चीन पाठवतो आहे. जगाचीही ती मजबुरी झाली आहे. अर्थात हा सगळा माल चांगल्या दर्जाचा असेलच असे नाही. काही देशांनी तर चीनची पार्सले परत सुद्धा पाठवली आहेत. तरीही बाकी जगाला खड्ड्यात ढकलून जगावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न करणारा चीन आताही त्या दिशेने भरधाव निघाला आहे. हे चांगले चिन्ह मात्र नाही.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०२०

कोरोनाचे परिणाम

कोरोनाचे परिणाम हळूहळू पुढे येणार आहेत. रुग्ण, बाधित, मृत्यू, लॉकडाऊन याच्या पलीकडचे ते असणार आहेत. शिवाय ते isolated असणार नाहीत. त्यांचा सामना करायला set rules नाहीत/ नसणार. त्यासाठी लोकांची मानसिकता, दृष्टी, approach या कळीच्या बाबी राहतील. राजकारण, कोणी कोणास काय म्हटले, तू बरोबर की मी, पापे कोणाची; यापलीकडे जाऊन अधिकाधिक सार्थक चर्चा, विश्लेषण, सूचना, दिशा, व्यवहार, तत्वज्ञान यावर भर दिला तर ते उपयोगाचे राहील. आजच जर्मनीतील एका प्रांताच्या अर्थमंत्र्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची बातमी आहे. कोरोनाची चिंता हे त्याचे कारण सांगितले गेले आहे. ते पूर्णांशाने खरे असो वा नसो, त्याचा काथ्याकूट करण्यापेक्षा, कोरोनामुळे अशा घटनाही घडू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे. वरवर पाहताना सुद्धा काही मुद्दे डोक्यात येतात. ते केवळ विचारांचे बिंदू म्हणून -

- आतापर्यंत असलेला उद्योगांचा ढाचा पुढेही तसाच राहील का? रहावा का? राहू शकेल का?

- कामगारांची समस्या कसे रूप घेईल?

- आरोग्य हा ऐरणीवरील विषय राहील. त्या दृष्टीने आजची जीवनशैली, आजचे महानगरांचे स्वरूप, आजचे कामाचे स्वरूप, आजच्या आहाराच्या सवयी; यांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. त्या सगळ्याचा उद्योग पद्धतींवर प्रभाव पडेल.

- कोरोनाने निर्माण केलेल्या मानवी जगण्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आजवरचीच आर्थिक धोरणे, आर्थिक रचना, उत्पादन- वितरण- उपभोग- पद्धती रेटणे योग्य ठरेल का? शक्य होईल का?

- मानवी जीवन आणि नवीन आकार घेणारे अर्थचित्र यासाठी सामान्य माणसाची आर्थिक स्वप्ने, आर्थिक सन्मान, आर्थिक आदर्श यांची फेरमांडणी.

- कोरोनाचे पाप ज्या कोणाचे असेल, पण त्यातून सूड आणि कुरघोडी यांना आगामी काळात आघाडीचे स्थान मिळेल. त्यातून जागतिक राजकारण, जागतिक शक्तीसंतुलन, जागतिक अर्थसंतुलन सुरू होईल. सगळे देश या गोष्टींच्या दावणीला बांधले जातील. त्यातून पुन्हा १०-२०-२५ वर्षांनी असेच नवीन काही संकट/ समस्या जगापुढे उभी होईल.

- असे व्हायचे नसेल तर जगातील सत्ताकांक्षा, प्रभुत्व भावना, सर्वशक्तिमान होण्याची स्पर्धा यांना बाजूला सारावे लागेल. सरकार स्तरावर (केवळ भारत नव्हे, जगभरच्या सगळ्या सरकारांना लागू होते.) हे होणे दुरापास्त. यासाठी जागतिक मानवी समुदायाचा पुढाकार, व्यापक मंथन, नवीन जीवनादर्शांना स्थापित करण्याचे प्रयत्न; असे सगळे व्हावे लागेल.

- निखळ मनाच्या माणसांना ही जबाबदारी उचलावी लागेल.

- श्रीपाद कोठे

२९ मार्च २०२०

रविवार, २७ मार्च, २०२२

@माधव भंडारी,

झी २४ तासवर आजची चर्चा ऐकली. (संसद विरुद्ध अण्णा). तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असल्याने, तुम्ही काय बोलणार हे अपेक्षितच होते. पण त्यातील एकही शब्द पटणारा नव्हता. या विषयावरील माझे म्हणणे मी स्वतंत्रपणे लिहीनच. पण एक-दोन गोष्टी मात्र निदर्शनास आणून द्याव्याशा वाटतात. प्रतिनिधित्वाचा अत्यंत चोथा झालेला मुद्दा. `सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' असे ठणकावून सांगणार्या तुकारामांना आता काहीही स्थान राहिलेले नाही का? प्रतिनिधित्व आणि लोकांचे म्हणणे एवढा एकच निर्णायक घटक राहणार असेल तर `पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो' हेच पुन्हा एकदा ग्राह्य धरायला हवे. मागील चूक आम्ही सुधारत आहोत असे म्हणून `पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो' असा ठरावही लोकसभेने करून टाकावा.

दुसरा मुद्दा सार्वभौमत्वाचा. भारतीय जनता पार्टी अजूनही दीनदयाळजींचे छायाचित्र लावत असते. किती जणांना दीनदयाळजी माहित आहेत कोणास ठाऊक? आपल्याला ते ठाऊक आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यांचं `राष्ट्रजीवन कि दिशा' आपण वाचावे असे मी सुचवतो. सार्वभौमत्व कोणाचे याविषयी दीनदयाळजींनी काय आणि किती स्पष्टपणे लिहिले आहे पाहावे. दीनदयाळजी केवळ academician नव्हते. या देशातील पहिली आघाडी सरकारे स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते एक कार्यकर्ता होते, जनसंघाचे अध्यक्ष होते, रोजच्या राजकारणाशी त्यांचा संबंध होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यांचे विचार वाचावे.

आपण कधी तरी मुलभूत, भावात्मक विचार अन व्यवहार करणार आहोत की नाही. तसे करणार नसू तर भारतीय जनता पार्टी निरर्थक झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.

`आजची व्यवस्था समाजाचे, देशाचे भले करण्यात अपयशी ठरली आहे. या जागी दुसर्या व्यवस्थेचा विचार व्हायला हवा' असे कोणी म्हणत असेल तर त्याला तो अधिकार आहे की नाही? `तुम्ही तुमचे विश्लेषण मांडा आणि तुमची व्यवस्था प्रस्तुत करा' अशी भूमिका घेण्याऐवजी `तुम्ही विरोधी भूमिका घेता याचा अर्थ तुम्ही चूक आहात' किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचे तर, `गुन्हेगार आहात' अशी भूमिका कितपत योग्य म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०१२

सत

धर्म, राष्ट्र आदी शब्दांप्रमाणेच सत् शब्दाचेही झाले आहे. सत् हा `सत्य' याच अर्थाने वापरला, समजला जातो. वास्तविक दोन्हीही वेगळे आहेत. सत्य ही सापेक्ष गोष्ट आहे. त्यामुळेच आजचे सत्य उद्या असत्य होऊ शकते. किंवा परस्पर विरोधी बाबी देखील सत्य असू शकतात. सत्य आणि असत्य हे विरुद्धार्थी शब्द आहेत. मात्र सत् चा विरुद्धार्थी शब्दच नाही. सत् म्हणजे जे सतत असते, ते नसते अशी वेळ- स्थान- अवस्थाच नसते. हे सत् - सत्य आणि असत्य दोन्हीत असते. ते सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व अवस्थात असतेच असते. सत् हे ईशवाचक आहे. `असतो मा सद्गमय' याचा अर्थ असत्याकडून सत्याकडे असा नसून `असत्' कडून `सत्' कडे असा होईल. म्हणजे अशाश्वताकडून (सतत नसणाऱ्याकडून) शाश्वताकडे (सतत असणाऱ्याकडे) गमन असा होईल. सगळ्या अस्तित्वाचा आधार हे सत् आहे किंबहुना सत् हेच या प्रत्ययाला येणाऱ्या विश्वाच्या रुपात अभिव्यक्त झाले आहे. अन फिरून पुन्हा सत् मध्येच विलीन होणार आहे. सत्य शाश्वत नाही. सत् शाश्वत आहे. सत्याचा शेवटी विजय होतो. सत् विजय आणि पराजय दोन्हीत विद्यमान असते. ते जय-पराजय किंवा यासारख्याच असंख्य प्रत्ययकारी भाव, भावना, विचार, कल्पना; त्यांच्या विरोधी भाव, भावना, विचार, कल्पना; किंवा त्यांच्या मधील असंख्य छटा यात विद्यमान असते. भारतीय चिंतनातील हे सत् नीट समजून घेणे अन त्याची सत्याशी सांगड न घालणे खूप महत्वाचे आहे.

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०१६

`भारत माता की जय'च्या निमित्ताने

सगळ्या जगात भारतमातेचा जयजयकार व्हावा.- डॉ. मोहनजी भागवत

भारत माता की जय म्हणण्याची जबरदस्ती करू नये.- डॉ. मोहनजी भागवत

ही दोन वाक्ये वृत्त वाहिन्यांवर आणि सोशल मिडीयावर दिसत आहेत. त्यावरील चर्चाही दिसत आहेत. ही एकाच भाषणातील दोन वाक्ये आहेत की दोन वेगळ्या भाषणातील हे माहीत नाही. पण ही दोन वाक्ये परस्परविरोधी आहेत आणि हा `यु टर्न' आहे अशा चर्चा पाहायला, ऐकायला मिळाल्या. यात परस्पर विरोध कसा किंवा घूमजाव कसे हे कळायला मात्र मार्ग नाही. सगळ्या जगाने भारतमातेचा जयजयकार करावा, याचा अर्थ तो जबरदस्तीने करायला लावावा असा होतो का? किंवा भारत माता की जय म्हणण्याची जबरदस्ती करू नये याचा अर्थ जगाने भारतमातेचा जयजयकार करू नये असा होतो का? अर्थात संघ विरोधकांनाच फक्त सगळे कळत असल्याने असे होत असावे.

वास्तविक या दोन्हीत काहीही विरोध नाही. हा विरोध कसा नाही आणि याचा नेमका आशय काय हे समजावून सांगणाराच, संघाचा नऊ दशकांचा इतिहास आहे. पण तो नीट पाहून, समजून घेणाऱ्यांसाठी. कसा अभिव्यक्त होतो हा आशय संघाच्या इतिहासातून? `भारत', `भारत माता की जय', `वंदे मातरम', `हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र' आदी शब्द आणि विचार मांडायला संघाने १९२५ साली सुरुवात केली. त्यावेळीही त्याला प्रचंड विरोध होता. पण संघाने कोणावरही कसलीही जबरदस्ती न करता आज कोट्यवधी लोकांच्या ते गळी उतरवले आहे आणि कोट्यवधी लोक संघाची भाषा आणि विचार बोलू लागले आहेत. तेही कोणत्याही जबरदस्तीविना. अन ही केवळ संघाची विशेषता नाही. स्वामी विवेकानंद याविषयी बोलताना म्हणाले होते की, फुलाच्या सुगंधासारखे पसरणे हे भारतीय विचारांचे वैशिष्ट्य आणि पद्धती आहे. ते जबरदस्ती न करता पसरत जातात. संघानेही नऊ दशकात ते करून दाखवले आहे. पण जबरदस्ती हीच पद्धती आणि जबरदस्ती हीच वृत्ती, असे मानणाऱ्या, समजणाऱ्या अन तसाच व्यवहार करणाऱ्यांना; ही पद्धती माहीत नसल्याने डॉ. भागवत यांच्या या विधानांमध्ये विरोध किंवा घूमजाव दिसून येणे स्वाभाविक आहे.

या अनुषंगाने काही नोंद घेणे उचित ठरेल. संघाची एक प्रार्थना आहे. ती रोज म्हटली जाते. त्यात दुसऱ्या कडव्याची सुरुवात `प्रभो शक्तिमन' अशी आहे. ईश्वराला काही गुण मागितले आहेत. एकदा सहज विचार करताना, थोडा टोकाचा पण सूक्ष्म विचार मनात आला- हिंदूच्या व्याख्येत सगळ्यांचा समावेश होतो. सगळे याचा अर्थ विविध ईश्वर मानणारे यांच्यासोबतच ईश्वर न मानणारे, अद्वैती यांचा सुद्धा. हे ईश्वर न मानणारे आणि अद्वैती (कारण ते निर्गुण निराकार ईश्वर मानत नाहीत. स्वाभाविकच त्याला काही मागणे हेही अशक्य.) यांनी संघाची प्रार्थना कशी म्हणावी? ते हिंदू आहेत, संघही त्यांना हिंदू मानतो. त्यामुळे संघात सहभागी होण्याला आडकाठी काहीच नाही. पण ही प्रार्थना म्हणणे म्हणजे स्वत:च्या मतांशी वा श्रद्धांशी फारकत घेणेच. कोणाशी बोलावे हा प्रश्न पडला आणि संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, भाष्यकार, विचारवंत श्री. मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांच्याशी बोललो. त्यांना मनातील विचार सांगितला. त्यांनी ऐकून घेतले. मग ते म्हणाले- `तू म्हणतोस ते बरोबर आहे. पण काही गोष्टी नीट समजून घे. एक तर एवढा सूक्ष्म विचार फार कोणी करीत नाहीत. संघाची प्रार्थना सुद्धा ज्या भावनेने म्हटली जायला हवी त्या भावनेने सगळे म्हणत नाहीत. त्यात उपचाराचा भागही बराच असतो. संघाने एक पद्धत आणि विचार, संघटना उभारणीसाठी निश्चित केला आहे. ईश्वर न मानणारे किंवा अद्वैती यांनी प्रार्थना करण्यात संघाला अडचण नाही. पण अशी वेळ आली तर संघ जबरदस्ती करणार नाही. निर्णय त्या-त्या लोकांनी घ्यायचा आहे.' त्यावर माझा प्रश्न होता- `पण संघ तर नि:शेष हिंदू समाजाचे संघटन करतो. मग ईश्वर न मानणाऱ्यांना बाजूला कसे ठेवता येईल, वगळता कसे येईल. अन प्रार्थना म्हणायची नाही तर कार्यात सहभागी कसे होता येईल?' त्यावर बाबुरावजी म्हणाले- `संघ अशा लोकांना बाजूलाही ठेवत नाही, वगळतही नाही. पण संघाच्या शाखेच्या रचनेत उभे राहायचे तर प्रार्थना म्हणावी लागेल. अन ती न म्हणण्याचा निर्णय कोणी घेतला तर तो रचनेच्या बाहेर उभा राहील. रचना सोडून बाकी तो संघाचा राहील, संघाचे कामही करू शकेल.' श्री. वैद्य यांच्याशी झालेली ही चर्चा अन त्यांनी दिलेली उत्तरे इतकी स्पष्ट आहेत की- जबरदस्ती, अभिव्यक्ती, विसंगती इत्यादी प्रश्नांना जागाही उरू नये. अर्थात हे सारे, समजून घेण्याची इच्छा अन तयारी असलेल्यांसाठी.

- श्रीपाद कोठे

नागपूर

सोमवार, २८ मार्च २०१६

सिलेंडर बुकिंग

एकटाच असल्याने दर महिन्यात गॅस सिलेंडर लागत नाही. कधी कधी आणून देणारी मुलं बदलतात. आज ज्याने सिलेंडर आणले त्याने पावती, पैसे देवाणघेवाण झाल्यावर सूचना केली - 'मी तुम्हाला म्हटलं होतं नं, दर महिन्यात नंबर लावत जा.'

त्यावर मी - 'एकतर तू पहिल्यांदा आला आहे. दुसरे तू आधी कधीही मला हे म्हटले नाही. अन सगळ्यात महत्वाचे, हे सांगणारा तू कोण? अन मी का दर महिन्यात नंबर लावायचा?'

पहिल्या दोन मुद्यांकडे निर्ढावलेपणाने दुर्लक्ष करून तो - 'तुम्ही नंबर लावत जा. सबसिडी जमा होत जाईल. मी नंबर विकून टाकत जाईन. दोघांचाही फायदा.'

मी - 'आता बोलला ते बोलला. पुन्हा हे बोलायची हिंमत पण करायची नाही. कानफटात बसेल.'

********************

नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अखिलेश, मायावती, ममता, पवार यापैकी कोणीही किंवा सगळे पंतप्रधान झाले तरी वरीलसारख्या गोष्टींचं काय करतील? काय उपाय यावर? अन कृपया तक्रार करणे वगैरे उपायांचा रतीब घालू नये.

- श्रीपाद कोठे

२८ मार्च २०१९

अजरामर गीत

हे गीत रामायणाचे दिवस आहेत. जेव्हा रेडिओचे चलन जास्त होते तेव्हा गुढीपाडवा ते राम नवमी या नऊ दिवसात सकाळ आणि संध्याकाळच्या कार्यक्रमात गीत रामायणातील कोणते ना कोणते गाणे ऐकायला मिळत असेच. यात हमखास ऐकायला मिळणारं आणि आजही अतिशय लोकप्रिय असलेलं गाणं आहे - 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा'. यमन रागाचा गोडवा, सुधीर फडकेंचा मधुर खणखणीत स्वर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग. दि. माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेले भावोत्कट अर्थवाही शब्द. मनाला नेहमीच सादावणारं हे गीत आज तर अधिक गहिरं होतं. त्याचा सखोल अर्थबोध आपोआप मनात उतरतो.

गाण्याचं ध्रुवपदच किती सखोल आहे. 'दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा... पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' श्रीराम आपला धाकटा भाऊ भरत याला सांगतो आहे - दु:खे ही दैवजात आहेत. जसं रूप जन्मजात असतं, जन्माला चिकटलेलं असतं; तसं दु:ख दैवजात आहे, माणसाच्या दैवाला चिकटलेलं आहे. ते वेगळं काढता येत नाही. त्याच्यासह जगावं लागतं. यासोबतच श्रीराम दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतात - या चिकटलेल्या दु:खासाठी कोणीही दोषी नाही. मानवी जीवनातील सुखदु:खाच्या चक्रासाठी कोणाला वा कोणाकोणाला दोषी ठरवण्याचा खेळ किती फसवा असतो हे जाणिवा प्रगल्भ होत जातात तसतसे कळत जाते. स्वतःचे वा बाकीच्यांचे मानवी प्रयत्न, हेतू, परिस्थिती या साऱ्याच्या पलीकडे आपल्या सुखदु:खाचे मूळ आहे हे उमजत जाते आणि ध्रुवपदाची दुसरी ओळ ओठांवर येते - पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा. मानवाचा पुत्र स्वाधीन नाही, पराधीन आहे.

यानंतरच्या तीन तीन ओळींच्या दहा कडव्यात, ध्रुवपदातील हाच मध्यवर्ती भाव उलगडून सांगितला आहे. यातील सहा कडव्यात प्रत्यक्ष राम - भरताच्या जीवनातील प्रसंगांचे संदर्भ आहेत, तर चार कडव्यात तात्विक विवेचन आहे. पहिल्याच तीन ओळीत राम सांगतात - माता कैकयी किंवा पिता दशरथ हे त्यांचा राज्यत्याग, वनवास यासाठी जबाबदार नाहीत. हा त्यांच्या संचिताचा खेळ आहे असं मत ते व्यक्त करतात. यात श्रीरामांच्या मनाचा मोठेपणा, विनय हे तर दिसतेच; पण दोषारोपणाची तार्किक परिणती निष्कर्षशून्य असते हे वास्तवही अधोरेखित होते.

त्यानंतरच्या दोन कडव्यात, सहा ओळीत; श्रीराम जीवनाचं तत्वज्ञान सांगून भरताचं मन शांत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक उन्नतीचा शेवट पतनात होतो. प्रत्येक चढावाला उतार असतो. सगळ्या प्रकारच्या संग्रहाचा अंती नाशच होतो. नाश होत नाही अशी गोष्टच जगात नाही. अतिशय कठोर असं जीवनाचं हे वास्तव सांगून आणखीन एक सत्य भरतासमोर मांडतात. ते म्हणतात - वियोगार्थ मीलन होते... मीलन हे वियोगासाठीच होत असते. परस्परांपासून दूर जाण्यासाठीच जीव जवळ येतात.

जीवनसत्याचं इतकं परखड विवेचन करून प्रभू राम पुढच्या कडव्यातही त्याचा विस्तार करतात. यात तर ते थेट मृत्यूलाच हात घालतात. जीवासोबतच मृत्यू जन्माला येतो, जीव जन्माला आला म्हणजेच मृत्यूही जन्माला आलाच. जीवन आणि मृत्यू यांची ही जोडीच आहे. दिसणारं, भासणारं सगळं विश्व नाशवंत आहे, नाश पावणारं आहे. इथे माडगुळकर दिसणारं आणि भासणारं असे दोन शब्द वापरतात. दिसणारं म्हणजे व्यक्त आणि भासणारं म्हणजे अव्यक्त, हे दोन्हीही नाश पावणारे आहे. म्हणजे व्यक्ती, व्यवस्था हे जसे नाशवान तसेच; विचार, भावना या अव्यक्त, अमूर्त गोष्टीही नाश पावणाऱ्याच. हे विश्व म्हणजे एक स्वप्न आहे आणि जे जे फळ वाट्याला येतं ते स्वप्नातील आहे. त्यामुळे त्यासाठी शोक काय करायचा? स्वप्नातील गोष्टी स्वप्नात असतात. त्यासाठी शोक करायचा नसतो, अशी ते भरताची समजूत घालतात.

भरताची समजूत घालत श्रीराम पुढे म्हणतात - वडिलांचा स्वर्गवास, भावाचं (म्हणजे त्यांचं स्वतःचं) वनवासाला येणे; या गोष्टी अकस्मात झाल्या तरी त्यात अतर्क्य असं काही नाही. अन या कडव्याच्या तिसऱ्या ओळीत, भरताच्या पितृविरहावर फुंकर घालत त्याला सांगतात - मरण या कल्पनेशी जाणत्या माणसाचाही तर्क थांबतो. इथे गदिमांनी मरणाला कल्पना म्हटले आहे. वास्तविक ही मानवी जीवनातील वास्तव घटना. परंतु श्रीराम हे मानव कुठे आहेत? ते तर भगवदावतार आहेत. लौकिकार्थाने आपल्या धाकट्या भावाचे सांत्वन करतानाही ते त्याला एक आध्यात्मिक जीवनदृष्टी देत आहेत. मृत्यू ही केवळ कल्पना आहे. आपण अमर आहोत. कधी व्यक्त तर कधी अव्यक्त एवढंच. मृत्यू म्हणजे अव्यक्त स्वरूपात जाणे. त्याला प्रत्यक्ष अस्तित्वच नाही. त्यामुळे 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा'.

त्यानंतरच्या दोन कडव्यात, सहा ओळीत; श्रीराम पुन्हा एकदा जीवनाच्या मूलभूत गोष्टींचं विवेचन करतात. ते भरताला विचारतात - वार्धक्य, मरण यातून कोणता प्राणी सुटला आहे? दु:खमुक्त असं जीवन कोणी जगला आहे का? 'जगी सर्वसुखी असा कोण आहे' ही समर्थोक्ती इथे आठवल्याशिवाय राहत नाही. तिसऱ्या ओळीत ते म्हणतात -  वर्धमान होत जाणारे सारेच काही एक प्रकारे क्षयाचा (संपत जाण्याचा) मार्गच चालत असतात. इथे ज्ञानेश्वर माऊलींचे 'जे जे उपजे, ते ते नाशे' मनात येऊन जाते. यानंतरच्या तीन ओळी या 'यथा काष्ठम च काष्ठम च' या संस्कृत सुभाषिताचे चपखल भावांतर आहे. या ओळीच मराठीतील स्वतंत्र वेचा झालेल्या आहेत. दोन ओंडक्यांची सागरात भेट होते, एक लाट येते, त्यांना विलग करते, पुन्हा काही त्यांची गाठ पडत नाही. माणसांचा मेळ हा त्या ओंडक्यांच्या भेटीप्रमाणेच क्षणिक आहे. श्रीराम भरताच्या दु:तप्त मनाला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगत आहेत.

पहिल्या सहा कडव्यात भरताची समजूत घालणे, त्यासाठी जीवनाचं वास्तव त्याला समजावणे, हे झाल्यावर पुढल्या चार कडव्यात मात्र पुन्हा एकदा कर्तव्यकठोर, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजाराम समोर येतात. भरताला आता जणू आदेशच ते देतात - आता अश्रू ढाळू नकोस, डोळे पूस. तुझा आणि माझा प्रवास वेगळा आहे. तू अयोध्येत राजा व्हायचं आहे अन मी वनातील सामान्य माणूस म्हणून राहणार आहे. मला परतण्याचा उगाच आग्रह करू नकोस. पित्याने दिलेलं वचन पाळून आपण दोघेही कृतार्थ होऊ. त्यासाठी मुकुट, कवच धारण कर. तापसी वेष का घालतो? एकामागोमाग एक आज्ञा आणि सूचना श्रीराम भरताला करत आहेत.

एवढं सगळं झाल्यावर, तत्वज्ञान सांगून झालं, मोठा भाऊ म्हणून आज्ञा देऊन झालं; तरी भरत काही ऐकत नसणार. तुम्ही परत अयोध्येला चला हे त्याचे पालुपद सुरूच असणार. तेव्हा श्रीराम त्याला निर्वाणीचं आणि निक्षून सांगतात - वनवसाची चवदा वर्ष संपल्याशिवाय अयोध्येला येणं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. हे त्रिवार सत्य आहे. यात काहीही बदल होणार नाही. आता अयोध्येच्या राज्य संपदेचा तूच एकमेव स्वामी आहेस. परंतु श्रीराम इथेच थांबत नाहीत. अगदी निर्वाणीचं सांगतात - 'पुन्हा नका येऊ कोणी, दूर या वनात'. कोणीही पुन्हा यायचं नाही इथे. आले तर पाहा, असंच त्यांना सांगायचं आहे. अन याचा परिणाम केवढा की, सीता हरणानंतरही आयोध्येतून कोणीही आलं नाही. मात्र एवढे कठोर शब्द वापरल्यानंतर लगेच ते करुणामय होऊन सांगतात - 'प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात'. आपल्याला कठोर कर्तव्य पार पाडायचं असलं तरी, माझ्या मनात तुमच्या बद्दलचा प्रेमभाव जागता आहे. केवळ प्रेमभाव आहे आणि कडीकुलुपात ठेवला आहे, असं नाही. तो जागता आहे. तुम्ही माझ्या सतत स्मरणात असाल. केवढं आश्वासक वचन !! अन शेवटी सांगतात - 'मान वाढवी तू लोकी, अयोध्यापुरीचा'. अयोध्येबद्दलचा मनातला जिव्हाळा, अयोध्येच्या सन्मानाची काळजी, अन पुढील काळात भरताने काय करायचे याचे मार्गदर्शन; असे सारे या एका ओळीत आले आहे.

अतिशय गोड, अर्थपूर्ण, आशयघन असं हे गाणं. जीवनाच्या कठोर सत्याकडे पाठ न फिरवता, किंबहुना त्याला सामोरे जात; कर्तव्यबोध शिकवणारे अजरामर गीत. अजरामर राम चरित्रासारखेच.

- श्रीपाद कोठे

शनिवार, २८ मार्च २०२०

मोगरा फुलताना

मोगरा फुलताना पाहणं आल्हादक असतं अन वेदनादायीही ! शुभ्र, गच्च पाकळ्यातून मनोहारी धुंद गंध वाटत राहणारा मोगरा भुरळ घालत नाही असा कुणी असेल का? जीवनाशी अम्लान, शुद्ध, शुभ्र, निर्डाग नातं जोडतो मोगरा. सकाळी फुले खुडताना पाहावं तर इवल्याशा असणाऱ्या कळ्या, संध्याकाळी टपोर झालेल्या असतात. निशेने त्याच्यावर काळी चादर पांघरली की हळूच केव्हातरी उमलू लागतात त्याच्या पाकळ्या अन सकाळी हसत असतात शुभ्र टवटवीत सुगंधित फुले.

छोट्या छोट्या, मोहरीहूनही लहान मुग्ध कळ्यांची पूर्ण उमललेली फुलं; हा प्रवास निरखणं ओढाळ असतं. त्या प्रत्येक अवस्थेत त्यांना डोळा भरून पाहावं. त्यांना हळू स्पर्श करावा. त्यांच्यावर हलका हात फिरवावा. अन शेवटी हळूच खुडून भरून घ्यावी ओंजळ. अन भरून घ्यावा त्या ओंजळीतला अद्वितीय सुवास तनामनात. जीवनाच्या त्याच त्या रहाटगाडग्यात आल्हादाची पेरणी करतो मोगरा. वसंताची चाहूल लागताच अंगोपांगी फुलून येणारा मोगरा भरून आणि भारून टाकतो नंतरचे दोनेक महिने. या दोनेक महिन्यातील सारे सणवार, समारंभ, कार्यक्रम, उत्सव, लोकांताचे आणि एकांताचे क्षण मोगरामय होत राहतात.

हा आल्हाद पसरणारा मोगरा स्वतः मात्र मौन असतो. काहीही बोलत नाही. त्याचाच आल्हाद त्यालाच सुख देत नाही बहुतेक. त्याची सारी गात्र, त्याचे पंचप्राण, त्याची सगळी शक्ती लागलेली असते सोसण्याकडे. भास्कराचा वणवा पिऊन टाकत, तो दाहक लाव्हाच सुखद सुगंधात रूपांतरित करीत असतो मोगरा. मोगरा सोसत असतो. मोगरा साहत असतो. सृष्टीच्या समस्त तापांचा घनीभूत जाळ. न जळता. सारं चैतन्य निष्प्राण करणारं विष रिचवून टाकणाऱ्या महाकालाच्या व्रतस्थतेने पण त्याच्यासारखे रौद्रतांडव न करता. आत्यंतिक मृदू सहनशीलतेने.

मोगरा फुलू लागला की, आल्हादाचा हात धरून वेदना येते. पाहते फक्त एकटक. काहीही न बोलता. निर्भाव होऊन. अभावितपणे फिरू लागतो हात मोगऱ्यावर. पाने, फांद्या, कळ्या, फुले यांना गोंजारत कुजबुजतो त्याच्या कानात हळूच - 'मला दे ना तुझा ताप थोडासा. दे ना तुझी वेदना मूठभर. दे ना तुझे ओंजळभर सोसणे.' मोगरा फक्त हसतो. निर्विष. छद्मशून्य. अन घालतो समजूत - 'नाही रे देता येत. नाही घेता येत वाटून. सोसावं लागतं ज्याचं त्यालाच. भोगावा लागतो ताप आपला आपल्यालाच. माझे सोसणे देताही येणार नाही अन तुझे काही सोसणे असेल तर ते घेताही येणार नाही. ज्याचा त्याचा ताप अन ज्याचं त्याचं भोगणं.'

माझी अवस्था बिकट होते. मोगऱ्याचं सोसणं कणभरही वाटून घेता येत नाही याची वेदना जाळू लागते. तो वाटत असलेला सुगंध बाजूला सारून त्याचा अनमानही करता येत नाही. एका हाती ज्वालामुखी तोलत, दुसऱ्या हाती टवटवीत सुगंधित फुले तोलायची असतात. स्वर्गीय सुगंधाला चिरंतन वेदनेचं अस्तर लावणाऱ्या सृष्टीचं कवतिक हसूही देत नाही, अन रडूही देत नाही.

- श्रीपाद कोठे

रविवार, २८ मार्च २०२१

सविनय कायदेभंगाचे जनक चैतन्य महाप्रभू

फाल्गुन पौर्णिमा (होळी पौर्णिमा) हा १५ व्या ख्रिस्त शतकातील प्रसिद्ध भगवदभक्त चैतन्य महाप्रभू यांचा जन्मदिवस. इ.स. १४८६ साली बंगालमधील नवद्वीप येथे त्यांचा जन्म झाला. बंगाली मातृभाषा असलेल्या चैतन्य महाप्रभूंचे मूळ नाव विश्वंभर मिश्रा असे होते. कडुलिंबाच्या झाडाखाली जन्म झाल्यामुळे त्यांना निमाई असेही म्हणत असत. त्यांच्या गौर वर्णामुळे त्यांना गौरांग असेही नाव मिळाले. षडदर्शने, तर्कशास्त्र, ज्योतिष्य, भागवत या साऱ्याचे त्यांनी अध्ययन केले. प्रसिद्ध विद्वान म्हणून त्यांची गणना होत असे. वल्लभाचार्यांची कन्या लक्ष्मीप्रिया यांच्याशी त्यांचा वयाच्या पंधराव्या वर्षी विवाह झाला. लग्नानंतर चार पाच वर्षे झाली असतानाच लक्ष्मीप्रिया यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी सनातन मिश्रा यांच्या विष्णूप्रिया नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला.

वडिलांचे पिंडदान करण्यासाठी विष्णूगयेला गेले असताना त्यांची ईश्वरपुरी यांच्याशी भेट झाली. त्यानंतर त्यांचे जीवन पूर्ण बदलून गेले. पांडित्य सोडून ते कृष्णभक्तीकडे वळले. अध्यापन कार्य सोडून देऊन ते सतत नामसंकीर्तनात बुडून गेले. हळूहळू त्यांची ख्याती वाढली. मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्याकडे येऊन शिष्यत्व पत्करू लागले. सार्वजनिक रीतीने सामूहिक नामसंकीर्तन करण्याची एक नवीन उपासना पद्धती त्यांनी विकसित केली. आपले महत्व कमी होईल या भीतीने शाक्त आणि सनातनी पंथाचे लोक त्यांना विरोध करू लागले. एकदा या लोकांनी चांद काझी नावाच्या मुसलमान अधिकाऱ्याकडे चैतन्यांची तक्रार केली. चांद काझीने महाप्रभूंच्या ग्राम संकीर्तनावर बंदी घातली. चैतन्य महाप्रभूंनी ही बंदी झुगारून दिली आणि संकीर्तन दळासह ते चांद काझीकडे पोहोचले. त्याने दळावर शिपाई पाठवले पण चैतन्य डगमगले नाहीत. त्यांचे संकीर्तन सुरूच राहिले. त्यांचा दृढनिर्धार, निष्कपट कृष्णभक्ती आणि आध्यात्मिक तेज यामुळे चांद काझीला माघार घेणे भाग पडले. अन तोही त्यांच्या संकीर्तनात सामील झाला. चैतन्य महाप्रभूंनी सविनय कायदेभंगाची जणू पायाभरणीच केली. जगाई व मधाई यांना इस्लाम पंथातून पुन्हा हिंदू करून घेण्याचे कार्यही त्यांनी केले.

वयाच्या २४ व्या वर्षी, १५०९ साली त्यांनी केशव भारती यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आणि नंतरचा पूर्ण काळ भगवदभक्तीचा प्रचार करण्यात घालवला. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी जगन्नाथपुरी येथे त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. समुद्र किनाऱ्यावरून संकीर्तन करीत जात असताना, समुद्राचा निळा रंग पाहून त्यांना श्रीकृष्णाचा भावावेश झाला आणि अत्यानंदाने कृष्ण कृष्ण करत ते समुद्रात गेले. त्यातच त्यांचा अंत झाला.

वृन्दावनातील कृष्णलीलांची स्थाने शोधून काढण्याचे महत्कार्यही त्यांनीच केले. एक मोठा कालखंड वृंदावन दुर्लक्षित झाले होते. कोणालाही त्याबद्दल काही माहिती नव्हती. तीर्थयात्रेला गेले असताना त्यांना आतून प्रेरणा झाली. त्यानुसार त्यांनी शोध घेतला आणि वृंदावन प्रकाशात आणले. त्यावेळी सर्वत्र इस्लामी राजवट होती. त्यामुळे श्रीकृष्णाचे वृंदावन प्रस्थापित करणे सोपे नव्हते. चैतन्यांनी विचारपूर्वक नियोजन करून आपले सात शिष्य त्या भागात पाठवले आणि सात मंदिरांची उभारणी करून समाजाला त्यांच्याशी जोडले. सैनिकी संघर्ष न करता त्यांनी स्वीकारलेल्या भक्तीमार्गाने, त्यांनी समाज संघटित करून लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

- श्रीपाद कोठे

रविवार, २८ मार्च २०२१

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

संयमित उपभोग

आठवड्यातून एकदा पेट्रोल, डीझेल वापरू नका, असे आवाहन आज पंतप्रधानांनी केले आहे. प्रतिसाद किती मिळेल माहीत नाही. पण अतिशय योग्य आवाहन. कुचाळकी करणाऱ्यांच्या manufacturing fault ला काहीही उपाय नाही. मात्र, somewhere something has to start. फक्त पंतप्रधानांच्या आवाहनाला एक पुस्ती जोडावीशी वाटते की, या आवाहनामागील भावना आपला स्थायी स्वभाव होण्याच्या दृष्टीने वाटचाल व्हावी. या आवाहनाच्या फक्त letters कडे नव्हे तर spirit कडे समाजाची वाटचाल व्हावी. माझ्या दृष्टीने यातील गाभा दोन प्रकारचा आहे- १) उपभोगावर संयम. केवळ पेट्रोल, डीझेल नव्हे; सगळीच साधने, संसाधने, खाणेपिणे, कपडेलत्ते, वस्तू, वास्तू, gadgets, जमिनी असं सगळंच. उपभोगवाद, चंगळवाद, नासाडीवाद यांना रोखण्यासाठी वैचारिक, भावनिक परिवर्तन आवश्यक आहेच. २) सोयी- सुविधा- सवलती- साधने- असे सारे आहे म्हणून वापरा हे मुळातच पशुत्व आहे. हे विचारशून्यतेचं लक्षण आहे. त्याऐवजी सोयी- सुविधा- सवलती- साधने- आवश्यक तेव्हा आणि आवश्यक तेवढी वापरण्याची सवय आणि सराव. अन गरज नसताना ते नाकारण्याची हिंमत. उदाहरणार्थ- महिलांसाठी आज अनेक सवलती आहेत. गर्भवती महिलांसाठी आर्थिक आणि रजा इत्यादी सोयींमध्ये भरघोस वाढ झाली आहे. आवश्यक नसणाऱ्यानी ते नाकारायला हवे. तुम्ही तसं करता का? मोदी या प्रकारे किती वागतात? इत्यादी खुसपटे बौद्धिक दिवाळं वाजल्याची लक्षणे आहेत. ज्यांना मोदी सलतात त्यांना द्वेषासाठी हे विश्वसुद्धा पुरेसं नाही. त्यामुळे त्यांची चिंता करण्याचं काहीही कारण नाही. त्यांचा द्वेष त्यांना लखलाभ होवो. तू-तू मी-मी ऐवजी charity must begin at home.

- श्रीपाद कोठे

२६ मार्च २०१७

खारूताई

खारुताई... तू काल व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या. छान वाटलं गं. असं मनमोकळं बोललं की छान वाटतं. माणसाला काय अन देवाला काय. अन तुला म्हणून सांगतो- माणसं मोकळ्या मनाने न बोलता लपवाछपवी करतात ना आपसात, तशीच ती लपवाछपवी करतात देवांशीही. जाऊ दे. कोणी कसं वागावं हे काय कोणाच्या हाती असतं होय? ते अगदी देवांच्याही हाती नसतं बघ. तुला गंमत वाटेल माझं म्हणणं वाचून, पण असतं मात्र तसंच. आता हेच बघ ना- काल तू म्हणालीस, `माझं खारपण अक्षय राहो'. चांगलं अन योग्यच आहे गं तुझं मागणं. हळवं सुद्धा. अन प्रेरक सुद्धा म्हणता येईल. पण मी जर असं मागणं मागितलं की बाबा- `माझं रामपण अक्षय राहो'; तर सगळ्यांना नाही गं आवडणार ते. लोक म्हणतील- आला मोठा राम. लागून गेला मोठा. देव झाला म्हणून काय झालं? मोठेपणा चढला याच्या डोक्यात, असं म्हणतील. अन मला हे देवपण टाकून देऊन खार व्हावंसं वाटलं तर? ऐकणार आहे का कुणी माझं? बरं दुसरंही आहेच ना... १०० योजने जाऊ शकणारा हनुमंतही लागतोच ना गं... शिवाय कोणी सुषेण, कोणी रागे भरणारा पण पाठ राखणारा लक्ष्मण, नल नील जांबुवंत अंगद हेही हवेतच ना? नुसत्या वाळूने बांधता आला असता का समुद्रावर पूल... आणि सांगू का हवा असतो रावणही- माझं रामपण, अन तुझं खारपण सिद्ध व्हायला. हे काहीच नसतं आपल्या हाती... ना तुझ्या ना माझ्या... आपण फक्त एवढंच करायचं- चालत राहायचं... मनातून काढून टाकायचं लहानमोठेपण... सोडून द्यायचे हट्ट लहान वा मोठे होण्याचे किंवा कसलेही... कोणास ठाऊक- कालचक्राच्या फेऱ्यात कधीतरी; तू होशील राम आणि मी होईन खार... होईलच असेही नाही, नाहीच होणार असेही नाही... कोणाला ठाऊक? गणितं मांडण्याची खोड टाकून देण्याचा प्रयत्न, एवढंच ठेवलंय त्या नियतीने आपल्या हाती... हो, आपल्या हाती- तुझ्या नि माझ्याही... नियती म्हणजे पराभव नाही, नियती म्हणजे कर्मशून्यता नाही, नियती म्हणजे संपून जाणे नाही... प्रगल्भ ज्ञानाच्या अत्युच्च विनयशीलतेला मानवी हुंकाराने बहाल केलेला शब्दालंकार आहे `नियती'... म्हणून सोडून द्यावे स्वत:ला त्या अगम्य चिरंतन प्रवाहावर... ठेवू नये कुठलीच अभिलाषा `रामपणाची' किंवा `खारपणाची' किंवा याची वा त्याची... वाहत राहावे प्रवाहासोबत... अन अंतरी निर्माण होणाऱ्या प्रत्येक उर्मीनुसार कृती करताना फक्त म्हणत राहावे- तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी...

- श्रीपाद कोठे

सोमवार

२६ मार्च, २०१८

पूर्ण काय?

देवांना पळवून झाले आहेच. त्यांना पळू द्या पण मानवाने केलेल्या कोणत्या गोष्टी पूर्ण आहेत. पूर्ण आणि अत्युच्च आदर बाळगूनही, डॉक्टर, नर्स आदी देव आणि इस्पितळांची देवालये असूनही २० हजाराहून अधिक लोक पृथ्वी सोडून गेले. असो. ते वाद ठेवू बाजूला. पण भाषा तरी निश्चित आणि पूर्ण असते का? आता हेच पाहा - सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे आहेत. हे वाक्य योग्य आहे का? लक्षणे याचा अर्थ त्या गोष्टींवरून निष्कर्ष काढता येणे. आता सर्दी, खोकला, ताप म्हणजे कोरोना असा निष्कर्ष काढता येतो का? नाही. किंवा सर्दी, खोकला, ताप म्हणजे दुसरे काही असू शकते. म्हणजे आम्ही भाषेतून एखादी गोष्ट पूर्ण व्यक्त करू शकत नाही. म्हणजेच भाषाही पूर्ण नाही. मानवाने जे जे काही केले त्यात पूर्ण असे काय आहे? एक प्रश्नच आहे.

- श्रीपाद कोठे

२६ मार्च २०२०

गुरुवार, २४ मार्च, २०२२

`खारपण'

ठाऊक आहे मला मी खार आहे. ना शक्ती, ना युक्ती, ना शिक्षण. पण मला ठाऊक आहे मी खार आहे आणि मला कळतं - रामकार्य कोणतं ते. मला रामकार्यच करायचं आहे हेही कळतं. मी ना सैनिक सुग्रीवाचा, ना सदस्य रामसैन्याचा. मी खार आहे अन खारीसारखंच काम करते. तसंच करू शकते. तुमच्या मोठाल्या गोष्टी तुमच्या तुम्ही पाहा, तुमची मोठाली कामे तुमची तुम्ही पाहा. मला नाही ठाऊक तुमचा राम अन मला ठाऊक करूनही घ्यायचा नाही. कसे नाही ठाऊक... पण मला फक्त रामकार्य ठाऊक आहे अन ते खारीच्या शक्तीने, खारीच्या पद्धतीने करणे ठाऊक आहे. वाळूचे चार कण उचलण्याची फक्त माझी शक्ती. ट्रकभर वाळू का नाही उचलता येत याची तक्रारही नाही, खंतही नाही अन मागणेही नाही. किनाऱ्यावर ये जा करता करता होणाऱ्या त्रासाचीही तक्रार नाही. होत असतील वादावादी, होत असेल बाचाबाची त्या वानरांशी... होत असेल तर होत असेल. मला काय त्याचे? कामात खंड पडू नये, बास. कसली भीती नाही, कसली क्षिती नाही. कोणी कोणी म्हणतात- जिवंत असेपर्यंत काम करत राहावं. तेही मनात नसू दे. कारण मला काय ठाऊक जिवंत म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय? अन कशाला शीण हवा. अन हो, आधी होऊन गेलीय म्हणतात एक खार. आलंय कानावर. म्हणून हे द्वाड मन आठवतं- त्या रामाची बोटे तिच्या पाठीवर उमटलेली. ती आठवण तेवढी काढून टाक. त्या खारीला कुठे ठाऊक होतं राम जवळ घेणार आहे आपल्याला. अन तिची इच्छा तरी कुठे होती तशी काही? तशी इच्छा असती तर ती खार राहिलीच नसती. ती झाली असती कोणी तरी दुसरी काही. बस... मी खार आहे अन मला राहू दे तशीच खार... `मी खार आहे, चार वाळूचे कण उचलण्याची माझी शक्ती आहे, अन रामकार्यासाठीच मला चार चार कण उचलत राहायचे आहेत' एवढं आणि एवढंच कळणारी. याहून अधिक काहीही देऊ नकोस, काहीही कळू देऊ नकोस... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... 

- श्रीपाद कोठे

रविवार

२५ मार्च, २०१८

कडुलिंबाची पाने

आज नवीन संवत्सर सुरू होतं आहे. पहिला दिवस गुढीपाडवा. सगळ्यांना शुभचिंतन. हो मुक्त मनाने शुभचिंतन. कारण मी त्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे ज्या मानवजातीने आजवर कितीतरी संकटे पाहिली आणि पचवली आहेत. ही मानवजात हेही संकट पचवून पुढे वाटचाल करेल.

आजच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याचीही रीत आहे. त्यात शास्त्रही आहे आणि भावही. त्यामुळे हा थोडा कडू घास.

साधारण गेल्या आठवडाभरात जगव्यापी कोरोनाची कल्पना आणि झळ भारतातही जाणवू लागली. रविवारच्या 'जनता कर्फ्यू'चे पाऊल आता २१ दिवसांच्या देशव्यापी lockdown पर्यंत आले आहे. विविध प्रकारच्या चर्चा सुरू होणे स्वाभाविकच होते. त्यात माहिती, विश्लेषण, सूचना, चिंता, उपाय असे सगळे आहे. २१ दिवस घरात बसून काय करायचे हा मोठा प्रश्न आहे अन त्यावर विविध उपायही सुचवले आणि केले जात आहेत. मात्र या उपायांमधून आपल्या मर्यादा फार ठळकपणे दिसतात. खाणेपिणे, संगीत, वाचन, झोप, गप्पा, आवरसावर एवढंच करता येतं माणसाला फक्त? आज जी अभूतपूर्व परिस्थिती आहे ती अभूतपूर्व मानव्याची मागणी करते आहे. त्या दृष्टीने विचार, चिंतन केले पाहिजे असा सूर अभावानेही ऐकायला मिळू नये याची नक्कीच खंत वाटते. आपण स्वतःला छोटेच ठेवण्यात समाधानी आहोत का? का आहोत? थोडा वेगळा विचार, थोडा मेंदूला ताण दिल्यावर जर लगेच आमचं डोकं दुखायला लागत असेल किंवा आम्हाला कंटाळा येत असेल तर तो आम्हीच केलेला आमचा अपमान नाही?

प्लेगच्या साथी, देवीच्या साथी येण्याला अजून शतकही झालेले नाही. पुस्तकांमधून आम्ही ते वाचतो. त्यावेळची परिस्थिती, साधने, समाजाचे समाज म्हणून चित्र हे आज कितीतरी बदलले आहे. तरीही आम्ही पायाखालची जमीन सरकल्यासारखे का वागतो आहोत? कसली भीती, कसला त्रास आम्हाला एवढे भेडसावतो आहे? हे भांबावलेपण माणसाला न शोभणारे आहे. संकटाचे गांभीर्य नसणे हे जेवढे चुकीचे तेवढेच संकटाने सैरभैर होणे हेही चूकच. आम्हाला आपल्या चुकाही कबूल करता यायला हव्यात. मानवीयता, करुणा, प्रेम म्हणजे रडकेपणा अथवा बावचळलेपणा नाही; हे समजून घेणे गरजेचे आहे.

आशावादाच्या सगळ्या गप्पा एका विषाणूच्या भीतीने हवेत उडून गेल्या यातच आमचे दुबळेपण आणि जगण्याचा मुखवटा दिसून येतो. आम्हाला यातून बाहेर पडले पाहिजे. संकटाचा मुकाबला भिऊन होत नाही. त्यासाठी निर्भय व्हावे लागते. आपली भगवद्गीता तर त्याहीपुढे जाऊन अभय सांगते. दैवी गुणांमध्ये पहिलं स्थान अभयाला आहे. अभय म्हणजे स्वतः निर्भय असणे आणि भ्यालेल्याला निर्भय बनवणे. अभय म्हणजे स्वतःच्या आणि अन्यांच्या भीतीचे परिमार्जन. भीतीचे हे परिमार्जन केवळ गोड वा गोड वाटणाऱ्या शब्दांनी होत नाही. त्यात गोड शब्दांचे स्थान आहेच पण तेवढ्याने भागत नाही. कठोर आणि क्रूर वास्तवाला डोळ्यात डोळे घालून पाहावे लागते. आपण भारतीय आहोत. हे भारतीयत्व नुसते घोषणा देण्यापुरते नसावे. भगवद्गीतेचा दहावा अध्याय आठवावा. काळाचे जे कराल वर्णन आहे ते पाहावे, अभ्यासावे. धैर्य त्यातून येते. भित्यापाठी ब्रम्हराक्षस ही म्हण प्रसिद्धच आहे. अन कसली भीती? मृत्यूची? जी गीता कानीकपाळी सांगते - 'नैनं छिंदंती शस्त्राणी' ती विसरून गेलो का आपण? की ऊर्जा कमीही होत नाही अन वाढतही नाही केवळ रूप बदलते, असं सांगणारं विज्ञान विसरलो? याचा अर्थ अविचाराने घराबाहेर पडून मनसोक्त भटकावे असा होत नाही. अविचार आणि भय यांच्या मधले समतोल शहाणपण हवे. अविचारी अविचार करतातच. ते अन्य कशाकडे लक्ष देत नाहीत. त्यांचा बंदोबस्त करायचा असतो. ते करणारे आहेत आणि ते त्यांचे काम चोख करतीलही. प्रश्न विचारी लोकांनी आपल्या कोषातून, आपल्या भयातून बाहेर पडण्याचा आहे. कारण त्यातूनच नवीन परिस्थितीला हवा असणारा नवा माणूस उभा राहणार आहे.

कोरोना संकटानंतरचे जग एकदम वेगळे राहील. त्याची चर्चाही सुरू झाली आहे. या चर्चा आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्थांच्या आहेत; व्यक्ती आणि देशांच्या परस्पर संबंधांच्या आहेत; विज्ञान तंत्रज्ञानाच्या आहेत. पण त्या तेवढ्याच असून भागणार नाही. भविष्यातील बदल अधिक सखोल राहावे लागतील. जीवन, करियर, छंद, कमावणे, मिळवणे, जगणे, आनंद, celebration अशा संपूर्ण जीवनाच्या आकृतिबंधाच्या कल्पनाचित्राची फेरमांडणी करावी लागेल. त्यातला प्रत्येकाचा सहभाग, प्रत्येकाची जबाबदारी यांचा बोध जागावा लागेल, हे सगळ्यांना पुरेशा प्रमाणात कळावं लागेल. आम्हाला आमची मन बुद्धीही त्यासाठी नांगरावी लागेल. मिळालेल्या संधीचा त्यासाठीही उपयोग करता यायला हवा.

नवीन संवत्सर, प्रभू राम आणि भगवतीच्या शक्ती जागरणाच्या या काळात; समस्त मानवजातीला त्यासाठी शक्ती बुद्धी प्राप्त होवो या कामनेसह...

कोण रे तू?

कोण रे तू?

मी...

मी 'कोरोना';

अस्सं... काय काम आहे?

तुला नष्ट करायला आलो आहे...

बरं

गमती स्वभाव दिसतो तुझा...

'???'

अरे जे शक्यच नाही

ते सांगतो आहेस

म्हणून म्हटलं...

'नाही, मी खरंच त्यासाठीच आलोय'

'काय करणार नेमकं?'

'खाऊन टाकणार तुला'

'त्याने माझा कोरोना होऊन जाईल

मी संपणार कसा?'

- नाही सुचत उत्तर,

उत्तर सुचेपर्यंत ऐक

मी काय सांगतो ते;

माझा होऊन जाईल कोरोना

मग येईल कोणीतरी

अन टाकेल संपवून मला

तेव्हा होईल माझी माती

देईन आधार सगळ्यांना

जे असतील त्यावेळी या मातीवर

पडेल कधीतरी पाऊस

मग येईन मी उगवून

त्या मातीतून चाफा होऊन

देईन फुलं, देईन सावली;

किंवा होईल

मातीऐवजी पाणी

भागवेन तहान

किंवा जाईन ढगात

येईन पुन्हा परतून पावसातून

समुद्राचा थेंब होईन

फिरून येईन सगळे समुद्र

अगदी तळापर्यंत;

कदाचित होईन

वारा पाण्याऐवजी

फिरून येईन सारं विश्व

स्पर्श करून येईल

उंच उंच गिरीशिखरे

जाऊन येईल थेट

गूढ अंधाऱ्या गुहांमधून

भटकत राहीन खोल खोल दऱ्यातून;

असाच होईन हे किंवा ते किंवा ते

कदाचित पुन्हा माणूस आत्तासारखा

किंवा कदाचित

तुझ्या माझ्यासह हे सगळं

ज्यातून येतं ते

आदिकारण होऊन जाईल

अन होईन एकाच वेळी

माणूस, कोरोना, माती

पशु पक्षी, पाणी, हवा

अन सगळं काही

एकाच वेळी, एकाच ठायी...

पण नष्ट नाही होणार

सांग कसा करणार मला नष्ट?

वल्गना उगाच...

- श्रीपाद कोठे

बुधवार, २५ मार्च २०२०

थोडे स्मरणरंजन

चाळीसेक वर्षांचा क्रम आज खंडित झाला. वर्ष प्रतिपदेला रेशीमबागेत जाण्याचा. पूर्वी तर संघाच्या सहा उत्सवांपैकी पाच उत्सव रेशीमबागेतच होत असत. मग शहराचा आणि कामाचा विस्तार झाल्यानंतर चार उत्सव भागांचे स्वतंत्र होऊ लागले. वर्ष प्रतिपदा उत्सव मात्र कायम रेशीमबागेतच होत राहिला. इथेच संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे समाधी स्थळ आहे. त्यांचा जन्मही गुढीपाडव्याचाच. स्वाभाविकच विशिष्ट भावपोषण यातून होत आले आहे.

चाळीसेक वर्षातल्या गुढीपाडव्याच्या चाळीसेक आठवणी तर आहेतच. तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांची प्रकृती अगदीच नाजूक होती. १९९३ साल होते. ते कार्यक्रमाला आले होते खुर्चीवर बसूनच. उठता येतच नव्हते. बोलणेही नव्हते. त्या उत्सवात स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे बौद्धिक झाले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी बाळासाहेबांचा उल्लेख शरपंजरी भीष्माचार्य असा करून, महाभारतातील भीष्माचार्यांप्रमाणे नुसत्या उपस्थितीनेही ते आमच्यात प्रेरणा आणि चैतन्य संक्रमित करतात असा भावपूर्ण उल्लेख केला होता. अशाच एका कार्यक्रमात डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी भारतीय कालगणना हा विषय मांडला होता. प्रथमच हा विषय कानावर पडला होता.

अशा अनेक आठवणींमधील एक विशेष आठवण आज होते आहे. साल होते १९७९. लक्षात राहण्याचे कारण म्हणजे ते दहावीचे वर्ष होते. आणीबाणी संपून दोन वर्ष झाले होते. काम व्यवस्थित सुरू झाले होते. नागपूर स्तरावर नगरश: गीत स्पर्धा त्यावर्षी घेण्यात आली होती. सगळी गीतं डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरक जीवनावर होती. तशीच योजना होती. त्यावेळी नागपुरात एकूण अकरा नगर होते आणि घोष पथक बारावे. एकूण १२ गीतं झाली होती. त्यातील आमच्या नगराचे आणि घोषाचे अशी दोन गीतं वडिलांची होती. दोन्ही खास त्या स्पर्धेसाठी नव्याने रचली होती. त्यावेळचे घोष प्रमुख श्री. अरविंद देशपांडे आणि आमचे नगर कार्यवाह श्री. भय्याजी पारधी यांनी मागणी करून, मागे लागून ती गीतं तयार करून घेतली होती. श्री. अरविंद देशपांडे हे स्वतः संगीतातील बाप माणूस असल्याने घोष पथकाच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. आमच्या नगराच्या गीताला आकाशवाणीचे अ श्रेणी शास्त्रीय गायक श्री. प्रभाकर काळे यांनी चाल लावली होती. योगायोग असा की ही दोन गीतं पहिल्या दोन क्रमांकावर आली. पहिला क्रमांक आमच्या नगराने म्हटलेल्या 'चंदनाचे चैत्रबन तू' या गीताला मिळाला तर दुसरा क्रमांक घोष पथकाने म्हटलेल्या 'संघ हमारा' या गीताला मिळाला होता. संघाच्या स्पर्धा वेगळ्याच असतात. स्वयंसेवकांना माहिती आहे. स्पर्धा जिंकली तरी आरडाओरड वगैरे नसते. गीत स्पर्धेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गीत कोणाचे हेही कोणाला माहीत नसते. गीत रचणाऱ्यालाही त्याची अपेक्षा नसतेच. असे अनेक गीतकार आहेत. तरीही ज्यांना ठाऊक असते त्यांच्यासाठी आणि व्यक्तिशः गीतकारासाठी ते आनंदाचे क्षण असतात. त्यावर्षी ते क्षण अनुभवले होते. भय्याजी पारधी, अरविंद देशपांडे, वडील या सगळ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रभाकर काळे यांना दीर्घायु लाभो.

१९७९ च्या त्या उत्सवात, त्यावेळी अ. भा. शारीरिक प्रमुख असलेले कु. सी. सुदर्शनजी यांचे स्व. बाळासाहेबांच्या उपस्थितीत भाषण झाले होते. याज्ञवल्क्य मैत्रेयी यांच्यातील काक भुशुंडी संवादाच्या अनुषंगाने त्यांनी विषय मांडला होता. फार समजण्याचे ते वय नव्हते पण सुदर्शनजींच्या भाषणाची ओढ आणि गोडी असणारे ते दिवस होते. काही समजले नाही तरी ऐकावेसे वाटत असे. ते भाषणही तसेच होते.

आज रेशीमबागेत जाता आले नाही. समाधीचे दर्शन नाही. आद्य सरसंघचालक प्रणाम नाही. थोडेसे स्मरणरंजन करून आजची वर्ष प्रतिपदा साजरी केली.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २५ मार्च २०२०

बुधवार, २३ मार्च, २०२२

कोरोनाची आर्थिक किंमत

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात आर्थिक किंमत चुकवावी लागेल असेही म्हटले आहे. ही नेमकी किती राहील, कशी राहील, किती काळ राहील हे सगळे हळूहळू स्पष्ट होणारे विषय आहेत. आज, आत्ता, या क्षणी त्याचा सगळा roadmap द्यावा असं कोणाला वाटू शकतं पण ते अशक्य आहे हे समजणं अजिबात अवघड नाही. यातून मार्ग कसा काढायचा याचा विचारच नव्हे तर त्याची तयारी सुद्धा नक्कीच सुरू झालेली असणार. हा विश्वास, अविश्वासाचा मुद्दा नाही. कारण त्याला पर्यायच नाही. फक्त या बाबी आम्हाला कळल्या वा कळवल्या नाहीत ही तक्रार असू शकते पण ती योग्य म्हणता येणार नाही.

या आर्थिक संकटातून मार्ग काढण्याची जबाबदारी पण सगळ्यांची आहे. सरकार, उद्योग, व्यापार, सामान्य जनता अशा सगळ्यांची ही जबाबदारी आहे. यात प्रत्यक्ष पैशाची व्यवस्था, वितरण इत्यादी जसे राहील; तसेच अपेक्षा, गरजा, उपभोग, साठा, भांबावून न जाणे, attitude, सहकार्य, सवयी या बाबीही येतात. बाकी गोष्टी सगळ्यांनी करावयाच्या आहेत पण पैशाची व्यवस्था सगळे करू शकत नाहीत. सगळे सारख्या प्रमाणात करू शकत नाहीत. मात्र सगळे मिळून करू शकतात. यासाठी केंद्राने पुढाकार घेऊन एक विशेष 'कोरोना सार्वजनिक विश्वस्त निधी' तयार करावा. या संकटासाठी जो task force तयार करण्यात आलेला आहे त्याच्याकडे किंवा वेगळा task force तयार करून त्याकडे ही जबाबदारी देता येईल. ज्यांना ज्यांना जसे शक्य होईल त्यांनी या कोरोना निधीत पैशाचे दान द्यावे. कोटी रुपयात दान देण्याची क्षमता असलेले लोकही देशात आहेत. मानवीय भावनेतून, संवेदनशीलतेतून ते यात आपला वाटा उचलतील असे आवाहन आणि असे वातावरण तयार करावे. आपल्या देशाची, समाजाची ती क्षमता आहे अन परंपराही.

- श्रीपाद कोठे

२४ मार्च २०२०

मंगळवार, २२ मार्च, २०२२

झरे मोकळे करण्याची गरज

पुन्हा एकदा राज्यांची चर्चा सुरु झाली आहे. एक गोष्ट खरी आहे की, मोठ्या राज्यांचे समर्थक असोत किंवा छोट्या राज्यांचे समर्थक असोत; ही सगळी चर्चा- सत्ता, संपत्ती, साधने यांच्या वाटपाची अन मालकीचीच होते. अगदी खऱ्या अर्थाने विचारी अन अभ्यासू म्हणावेत असे लोकसुद्धा यातच अडकलेले असतात. उदाहरण द्यायचे तर, काल झी-२४ तास वर झालेली डॉ. उदय निरगुडकर आणि श्रीहरी अणे यांच्यातील तब्बल तासभराची चर्चा. खरी मेख येथेच आहे. अगदी आम्ही राज्यघटनेत स्वीकारलेली व्यवस्थादेखील यास अपवाद नाही. राज्यांची व्यवस्था federal आणि unitary अशा पद्धतीने होते. आपण federal व्यवस्था स्वीकारली आहे असे बोलले जाते. वास्तविक आपण federal आणि unitary यांचे कडबोळे स्वीकारले आहे. दोन्ही पद्धती स्वतंत्रपणे किंवा दोन्ही पद्धतींचे कडबोळे; या तीनही बाबी अपूर्ण अथवा अयोग्य म्हणाव्या लागतील. कारण त्यामुळे केवळ स्पर्धा आणि संघर्ष उत्पन्न होतात. एवढेच नव्हे तर एक प्रकारचा आंतरिक विरोधाभास तयार होतो.

उदाहरणार्थ- महाराष्ट्राची अस्मिता, एक महाराष्ट्र असे कंठरवाने बोलणाऱ्यांना कर्नाटक, बिहार, तामिळनाडू किंवा अन्य कोणताही प्रांत `आपला' वाटत नाही. मराठी म्हणून एक unit मानणारे लोक भारत हे एक unit मानायला मात्र तयार नसतात. ही बाब अन्य सगळ्या प्रांतांनाही लागू होते. एवढेच नाही तर एकाच प्रांतातील दोन जिल्हे किंवा एकाच जिल्ह्यातील दोन तालुके अथवा एकाच तालुक्यातील दोन गावे अथवा एकाच गावातील दोन घरे अन सरतेशेवटी एकाच घरातील दोन माणसे येथवर हे लोण पोहोचते. आज महाराष्ट्रात पाणी वाटपावरून सुरु असलेले वाद आणि संघर्ष पुरेसे बोलके आहेत. घरापासून तर देशापर्यंत अन त्याही पलीकडे जागतिक स्तरावर, हीच समस्या आहे. आम्ही एक unit म्हणून त्याचा विचार करतो की अनेक unit म्हणून विचार करतो हा मूळ प्रश्न आहे. आम्ही अनेक unit म्हणून विचार करतो त्यामुळे अडचण होते. त्याऐवजी एक unit म्हणून विचार केला तर समस्या दूर होईल. मात्र एक unit म्हणून विचार करायचा असेल तर आमची दृष्टी federal, unitary किंवा त्यांचे कडबोळे अशी न राहता integrated (एकात्मिक) असावी लागेल. आमच्या सगळ्या वैचारिक भोंगळपणाच्या मुळाशी, अन म्हणूनच समस्या सोडवण्याच्या नावाने सुरु असलेल्या कदमतालसाठी एकात्मिक दृष्टीचा अभाव हेच कारण आहे. एकात्मिक दृष्टीच्या अभावीच `हे आणि ते', `आम्ही आणि तुम्ही' अशी भाषा होऊ लागते. `आपण' म्हणजे एकात्मिक दृष्टी. ही `आपण' भावना गरजेनुसार नव्हे, त्या भावनेच्या पोटीच असंख्य लहान units जन्माला घालेल. पण असंख्य लहान units एकत्र येऊन `आपण' भावना निर्माण करू शकणार नाहीत.

या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे- हे सगळे ठीक आहे, पण म्हणजे नेमके काय? तूर्त राज्यासंबंधी विचार करत असल्याने त्याचे सूत्र सांगता येईल की, राज्य हे साधन आहे. साध्य नव्हे. ते साध्य नसल्याने स्वाभाविकच वाटप आणि मालकी याचा विचार सोडावा लागेल. राज्य हे राज्यासाठी नाही, ते जनतेच्या कल्याणाचे एक साधन आहे. त्यामुळे जनतेचे कल्याण हा मुद्दा समोर ठेवून त्याची रचना असावी. म्हणजे केवळ राज्ये लहान असावीत की मोठी असावीत एवढेच नाही; तर त्याचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, मर्यादा यासकट अन्य पुष्कळ बाबींची फेरमांडणी `जनकल्याण' पुढे ठेवून करावी लागेल. कदाचित यात राज्याची शक्ती कमी होईल. शक्यता हीदेखील असू शकते की, एकच केंद्रीय सत्ता असेल आणि मग एकदम प्रशासकीय सोय म्हणून जिल्हे. मधली राज्य ही वस्तूच राहणार नाही. पण राज्य हे साध्य नसून साधन मानल्याने त्याला हरकत असण्याचे कारण नाही. (राज्याच्या संदर्भात चर्चा केली असली तरीही जीवनाच्या बहुतेक सगळ्या अंगांना हे सूत्र लागू होईल. अगदी राज्याचे उद्दिष्ट असलेले `जनकल्याण' म्हणजे काय हे ठरवतानाही हेच सूत्र वापरावे लागेल. नाही तर अनवस्था उत्पन्न होईल.)

ही एकात्मिक दृष्टी स्वीकारली की, मापदंड आणि निकष सारखे करण्याचा वेडेपणा सोडून देता येईल, सोडून द्यावा लागेल. उदाहरणार्थ- आरोग्याचा विचार. हा विचार करताना कोण व्यक्ती औषधांवर अथवा तपासण्या इत्यादींवर किती खर्च करते हे निकष वापरले जातात. एखाद्याची ही गरज जास्त असेल तर एखाद्याची कमी. हा खर्चच करावा लागू नये ही आदर्श स्थिती. पण तसे होत नाही. अमक्यासाठी आरोग्यावर इतका खर्च होत असेल तर दुसऱ्यालाही तितकाच हवा असतो. एवढेच नाही विशिष्ट ठिकाणी काम करणाऱ्यांना देखील समान आरोग्य भत्ता मिळतो. गरज असो की नसो. दुसरे उदाहरण म्हणून पोलिसांचे घेता येईल. काही ठिकाणी अधिक पोलीस लागतील, तर काही ठिकाणी कमी. पोलिसांची गरजच पडू नये ही आदर्श स्थिती. मात्र असा विचार होत नाही. काही ठिकाणी शिक्षण म्हणजे वेगळी बाब राहील अन्यत्र वेगळी. आदिवासी पाडे, छोटी गावे, मोठी गावे, छोटी शहरे, मोठी शहरे, महानगरे येथील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अन अशा अनेक गोष्टी वेगळ्या असतात. त्यांचा विचार उद्दिष्ट लक्षात घेऊन व्हायला हवा. एकात्म दृष्टी बाहेरच्या विषमता आणि विविधता यांच्याकडे लक्ष न देता उद्दिष्टपूर्तीकडे सतत लक्ष पुरवते, तर अनेक unit मानणारी आणि त्यांना एक करण्याचा प्रयत्न करणारी federal अथवा unitary दृष्टी उद्दिष्ट नजरेआड करून बाह्य मापदंड, कसोट्या यांनाच कवटाळून बसते.

ही राज्याचीच नव्हे तर संपूर्ण जीवनाची एकात्मिक दृष्टी विकसित करण्यासाठी (ज्याशिवाय राज्यांची समस्यासुद्धा सुटणार नाही.) संपूर्ण discourse बदलणे, त्याला दिशा देणे ही प्राथमिक गरज आहे. विहीर खोदताना झरे लागणे अन ते मोकळे करणे आवश्यक असते. झरे मोकळे झाले की पाणी आपोआप येत राहते. अन्यथा खड्डे पाण्याने भरून काही होत नाही. आज खड्डे पाण्याने भरण्याचेच काम सुरु आहे. त्यापेक्षा थोडे किचकट वाटले, कठीण वाटले, अशक्य किंवा निरर्थक वाटले, तात्त्विक वाटले तरीही, व्यापक जीवनाच्या संदर्भात झरे मोकळे करण्याचे (discourse बदलण्याचे) काम करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

बुधवार, २३ मार्च २०१६

कोरोना : दोन सूचना

सध्याच्या स्थितीत लोकांची अस्वस्थता, अशांती, ताण वाढत आहेत. दोन गंभीर सूचना कराव्याशा वाटतात. ज्यांना पटणार नाही त्यांनी दुर्लक्ष करावे. अन कृपया अन्यथा कमेंट करू नयेत.

१) शास्त्रीय संगीत ऐकावे. वेळ घालवणे तर होईलच पण त्याने मन, बुद्धी, भावना यांचं ट्युनिंग सुद्धा होईल.

२) ज्यावेळी कोरोनाचा विचार मनात येईल, त्यावेळी स्वतःला सांगावे की, कोरोना आणि मी तत्वदृष्टीने एकच आहोत. कोरोना ब्रम्ह आणि मी ब्रम्ह एकच.

- श्रीपाद कोठे

२३ मार्च २०२०

जीवना !

जीवना ! तू नेहमीच फसवलं आहेस. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? आपल्यासाठी जीव टाकणाऱ्यांना आपल्याशी काहीही देणंघेणं नसतं. काय करायचं मग. मृत्यू फार दयाळू. फसवत नाही. आता माणूस अस्तित्वातच नाही हे समजणं, पचवणं सोपं आहे रे. पण माणूस आहे अन तरीही नाही हे कसं समजायचं, कसं पचवायचं? जीवना, तू आता नाही भूरळ घालू शकत. तू दुखावलं आहेस खूप. खूप वाईट वागला आहेस माझ्याशी. अगदी राक्षसासारखा.

- श्रीपाद कोठे

२३ मार्च २०२१

राजकीय लढायातील अपव्यय

राजकीय लढायांमध्ये किती मनुष्यबळ, मनुष्यतास, धन, वेळ, ऊर्जा, व्यवस्थापन, बुद्धी, साधने वाया जात असतील? गिनती करणेही कठीण आहे. करदात्यांचा पैसा वाया जाणे ही एक बाजू आणि जनतेची कामे, जनतेचे सुख, जनतेची मानसिकता, व्यवस्था; या सगळ्याची होणारी हानी आणि नासाडी वेगळीच. का म्हणून समाजाने राजकारणाचा द्वेष करू नये? बाकी चांगली माणसे आली पाहिजेत वगैरे पोपटपंची ज्यांना करायची त्यांनी खुशाल करावी. वर्षानुवर्षे हेच चालत असूनही ज्यांना राजकारणाबद्दल आशावाद वगैरे बाळगायचा असेल त्यांनी स्वतःचा भोंदूपणा कुरवाळत बसायला काहीच हरकत नाही. मात्र त्यामुळे वास्तव बदलत नाही. मग यावर उपाय काय असा शहाजोग प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शुभेच्छा. पण उपाय शोधायचा असेल तर सर्वप्रथम उपाय हवा आहे यावर; म्हणजेच आजची स्थिती, व्यवस्था, रचना, विचार कुचकामी आहेत यावर; सहमत व्हायला हवे. अन उपाय शोधायचा आहे ही मानसिकता हवी. फक्त तू तू मी मी करण्याची मानसिकता ठेवून, उपाय काय असा प्रश्न विचारायचा असेल तर त्यातून काहीच निघणार नाही.

- श्रीपाद कोठे

२३ मार्च २०२१

सोमवार, २१ मार्च, २०२२

सीमित चौकटी, असीम जीवन

जगण्यासाठी व्यवस्था लागते. व्यवस्था विकसित होताना तिची चौकट तयार होत जाते. चौकटीचे नियम असतात. नियमांची उतरंड होते. त्यात अधिकार श्रेणी तयार होतात. त्या चौकटीत माणूस जगतो. चौकटीच्या सीमा असतात. पण जीवन मात्र असीम असते. चौकटीच्या सीमेबाहेरची ही असीमता कोणाकोणाला कधीकधी खुणावते. असीमाचे हे खुणावणे कधी गरजेच्या रूपात असते. कधी लोभ, मोहाच्या रुपात असते. तर कधी प्रेरणा, स्फुरण या रुपात असते. ज्याला असीमता खुणावते त्याला चौकटच्या बाहेर पडायचे असते. चौकटीतील बाकीच्यांना मात्र चौकटीला धक्का नको असतो. कारण चौकटीच्या बाहेरील काही त्यांना खुणावत नसते. छान आहे की सगळं अशीच त्यांची भूमिका असते. चौकट वाईट नसते, चुकीची नसते; पण अपूर्ण असते. दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. आपण जीवन आणि चौकट याकडे कसं पाहतो त्यावर ते अवलंबून असतं. जीवनाचं आकलन जेवढं अधिक तेवढं; चौकट समजून घेणं, ती लवचिक ठेवणं, तिच्या सीमा विस्तारत नेणं आणि अंति चौकट टाकूनही देणं याची समज आणि उमज वाढत जाते. ही समज आणि उमज जेवढी अधिक असेल तेवढे घर्षण आणि तेवढा संघर्ष कमी असतात.

अशा चौकटी सगळीकडे, सर्वत्र असतात. अन जुन्या चौकटी लयाला गेल्या की नवीन तयार होतात. हे सतत सुरू असतं. कुटुंब, समाज, रीतीभाती, परंपरा, व्यवहार, नीती, संस्था, संघटना, आंदोलने, चळवळी, उपासना, शासन, प्रशासन, शिक्षण, मनोरंजन; एवढेच काय विचार ही गोष्ट सुद्धा याला अपवाद नाही. जगण्याच्या गरजेतून सीमित चौकटी तयार होत राहतात आणि जीवनाची असीमता त्यांना धडका देत राहते. चौकटीबाहेरचं काही दिसलं, जाणवलं, अनुभवलं की ते खोटं वाटतं किंवा चुकीचं वाटतं. आपल्या चौकटीत नाही म्हणजे ते चूक वा अयोग्यच असेल असा विचार बळावतो. कारण असीमतेची कल्पना नसते. अगदी विज्ञानाच्या सुद्धा चौकटी असतात आणि तयार होतात. त्यांना शास्त्र म्हटले जाते. अन शास्त्राच्या बाहेरचं असेल ते चूक ठरतं. यातूनच असीम जीवनाचा प्रवाह संकुचित होतो. परिणामी कट्टरता, आग्रह, काच सुरू होतात. हे टाळायचे असेल तर; जगण्याच्या संदर्भात सीमित चौकटींची अपरिहार्यता आणि जीवनाची असीमता दोहोंची जाणीव वाढायला हवी. तरच कौटुंबिक वाद आणि कलहांपासून, मोठाल्या जागतिक प्रश्नांपर्यंत, अन त्याहीपुढील गुंतागुंतीच्या तात्त्विक प्रश्नांपर्यंत; सगळ्या गोष्टींना सामोरे जाता येईल.

- श्रीपाद कोठे

रविवार, २० मार्च २०२२

स्वत:ला तपासण्याची गरज

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९९३ सालापासून २२ मार्च हा दिवस `जागतिक पाणी दिवस' म्हणून जगभर पाळला जातो. यावर्षी या दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघातर्फे प्रकाशित अहवालात पाण्याच्या जागतिक समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, २०३० साली जागतिक लोकसंख्येला आवश्यक पाण्याच्या फक्त ६० टक्के पाणी उपलब्ध राहील. म्हणजे ४० टक्के लोकांना पाणी उपलब्ध होणार नाही किंवा मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला कमी वा तुटपुंज्या पाण्यात कामे करावी लागतील. अशा स्थितीत लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेऊ लागले तर आश्चर्य वाटायला नको. अशी स्थिती येण्याची शक्यता फार दूर नसून केवळ पुढील १५ वर्षात ही स्थिती येऊ शकेल. भारतातील ज्या तरुणाईचे आज वारंवार कौतुक केले जाते ती तरुण पिढी, त्यावेळी जेमतेम चाळीशीच्या आतबाहेर असेल.

तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे इशारेही आता जुने झाले आहेत. अन दुसरीकडे पाणीप्रश्न दिवसेंदिवस अक्राळविक्राळ होत चालला आहे. अगदीच हातघाईवर आल्याशिवाय एखाद्या गोष्टीकडे लक्षच द्यायचे नाही आणि या वृत्तीलाच पुरुषार्थ मानायचे ही घातक सवय आपण केव्हा टाकून देणार? पाणी समस्या आणि त्यावरील उपाय यांची वारंवार चर्चा होत असते. आज त्या उपायांची स्वत:हून व्यक्तिश:, संस्थाश:, सामूहिक रुपात अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

हे सगळे उपाय करताना स्वत:ला excuse मागण्याची मानसिकताही टाकून द्यावी लागेल. आमच्या सवयी, आमची जीवनशैली, आमच्या आवडीनिवडी यातही खूप बदल करावे लागतील. हे बदल कदाचित फारसे सुखावह राहणार नाहीत. आम्ही आमच्या सुखलोलुपतेचा त्याग करायला तयार आहोत का? आमच्या व्यवहाराची कठोर चिकित्सा करून योग्य गोष्टी करण्याची आमची तयारी आहे का? ज्या गोष्टी करायला हव्यात किंवा करू शकतो, अशा काही गोष्टी-

१) उद्योगांसाठी आज खूप पाण्याचा वापर केला जातो आणि हे पाणी नंतर उपयोगाचे राहत नाही. एवढेच नाही तर ते जमिनीत मुरते तेव्हा त्या जमिनीची आणि त्यातील पाण्याचीही नासाडी करते. खूप औद्योगीकरण, खूप उत्पादन, गरज/ आवश्यकता लक्षात न घेता केवळ पैसा आणि रोजगार निर्मिती यासाठी उद्योग; हे सारे थांबवण्याची तयारी आहे का?

२) निरर्थक गरजा, हव्यास, दिखावूपणा, नावीन्याचा रोग; यासाठी करण्यात येणारी खरेदी किंवा यापोटी होणारी मागणी थांबवण्याची तुमची-आमची किती तयारी आहे? मोटारी, मोबाईल आणि यासारख्या अन्य उत्पादनांची निर्मिती आणि हव्यास यांना मर्यादा घालण्याची तयारी किती आहे?

३) साखरेच्या खूप उत्पादनासाठी उसाची लागवड होते. अमर्याद ऊस लागवडीने पाणी समस्या नसलेल्या भागात आज पाणी समस्या निर्माण केली आहे. अन्य एखाद्या शेती उत्पादनापेक्षा उसाला दहापट पाणी अधिक लागते. यावर उपाय शोधताना समाजाची व्यक्तिश: आणि समूहश: काही जबाबदारी नाही का? उदाहरणार्थ- आज उठसुठ आइसक्रीम खाल्ले जाते. या आइसक्रीमला साखर लागते. एका कपाला कदाचित १० ग्रॅम साखर लागत असेल. आपल्याला वाटते काय त्यात मोठेसे? पण जेव्हा करोडो लोकांचे करोडो कप आपण विचारात घेऊ तेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येईल. प्रत्येकाची थोडीही कपात सरतेशेवटी मोठा फायदा करून देईल. १०-२० वर्षांपूर्वी मिठाया, पेढे वगैरेंचा वापर आजच्या सारखा नव्हता. आपल्या सवयी, आनंद साजरा करण्याच्या पद्धती यांचा पुनर्विचार केला तर साखरेचा अनावश्यक वापर कमी करता येईल. हे फक्त साखरेचे उदाहरण आहे आणि तेही फक्त आइसक्रीम आणि मिठाई एवढेच मर्यादित. अशा अनेक बाबींचा, वेगवेगळ्या संदर्भात विचार करता येईल. आम्ही तसा तो करायला तयार आहोत का?

४) मातीशी मैत्री करण्याची आमची तयारी आहे का? आमच्या मनाला, नजरेला आज माती नकोशी झाली आहे. त्यासाठी टाईल्स, काँक्रीट यांचा मुक्त वापर होतो. अगदी घराचे आंगण वा रस्त्याच्या कडेची जागा यांचाही अपवाद नाही. याचा दुहेरी तोटा आहे- अ) पाणी मुरण्यासाठी जमीन राहत नाही आणि ब) टाईल्स आणि काँक्रीट धुण्यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर. शिवाय गाड्या धुणे वगैरे गोष्टी आहेतच. चार लोकांना पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक की गाडीची धूळ धुणे आवश्यक? एक तर गाड्यांचा अनावश्यक वापर आणि त्यासोबत जुळलेली प्रतिष्ठेची झूल उतरवून ठेवत नाही तोवर आपल्याला बोलण्याचा काहीही अधिकार राहत नाही. किमान गाड्या पुसाण्यावर भर देऊन, त्या धुण्याला मर्यादित करणे एवढे तर त्वरित करता येईल. नळ, नळांचा वापर, नळांचे प्रकार यांचासुद्धा सखोल विचार व्हायला हवा. तारांकित जीवनशैली जेवढी कमी करता येईल तेवढे पाणी समस्या सोडवणुकीसाठी उत्तम. आम्ही ही तारांकित जीवनशैली नाकारायला तयार आहोत का? जे त्या जीवनाचा उघड पुरस्कार करतात त्यांचा प्रश्नच नाही; पण स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवून घेणारे, समाजाप्रती संवेदनशील वगैरे म्हणवून घेणारे, धार्मिक आणि आध्यात्मिक म्हणवून घेणारे सुद्धा कळत नकळत अयोग्य मार्गाने जात असतात. आपले मन साफ आहे आणि आपण पाणी प्रश्नाची भरपूर मुद्देसूद, तर्कशुद्ध चर्चा वगैरे केली की काम संपले. परंतु आपली छोट्यातील छोटी कृतीदेखील काय परिणाम करते वा करू शकते याचा विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही.

मला जगता येत नाही, जगणे कळत नाही, मी सुख आणि आनंद नाकारतो; वगैरे दूषणे मला दिली जाऊ शकतील. मनात वा जाहीरपणे अनेक लोक देतीलही. पण जगण्याचे, सुखाचे, आनंदाचे- झुंडीचे मापदंड स्वीकारण्यापेक्षा, करुणामयी विचारशीलतेने जगणे योग्य आहे असे माझे मतही आहे आणि माझा सिद्धांतही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २२ मार्च २०१५

वेगळा विदर्भ

१) मुंबई, पुणे, नाशिक यापलीकडे जनाधार नसलेले लोकच; श्रीहरी अणे यांच्या विधानावरून गळे काढून तमाशे करीत आहेत.

२) १०५ हुतात्मे झाले. त्यातील विदर्भ, मराठवाडा येथील किती होते?

३) एखाद्या गोष्टीसाठी जीवाची बाजी लावणे याचा अर्थ ती गोष्ट योग्य आहे किंवा त्रिकालाबाधित आहे, असा होतो का?

४) देशाचे तुकडे अन राज्यांची फेररचना या सारख्या बाबी कशा असू शकतात? मग `राज्याचे तुकडे' ही भाषा किती समर्पक आहे?

५) वेगळ्या राज्यामुळे प्राप्त होणाऱ्या बाबी का नाकारल्या जाव्यात?

६) लहान राज्ये प्रगती करणार नाहीत असा आविर्भाव आणताना, या विभागांशिवाय आपले काही खरे नाही हा विचार तर त्यापाठी नाही?

७) एकाच भाषेची अधिक राज्ये झाली तर केंद्रात वजन वाढेल की घटेल?

८) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण; अशी महाराष्ट्राची पाच राज्ये करावीत.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०१६

काश्मीरची स्मरणे

 @ १०-१२ दिवस नेटपासून दूर होतो. त्यातील तीन दिवस जम्मूत होतो. तीन दिवसात जवळपास ३०० सामान्य स्त्री पुरुषांशी बोललो. (संघाचे स्वयंसेवक नाही.) त्यातील एकालाही कन्हैय्या कुमार प्रकरण धड माहीत सुद्धा नव्हते. बहुसंख्य लोकांना तो कोण हेही माहीत नव्हते. सुमारे ९० टक्के लोकांनी कन्हैय्या अन त्याचे म्हणणे उडवून लावले.

@ जम्मूचे रघुनाथ मंदिर काही वर्षांपूर्वीच्या अतिरेकी हल्ल्याने प्रसिद्ध झाले. अजूनही रघुनाथ मंदिर म्हटले की तेच संदर्भ येतात. मात्र आता तेथे गेलात तर नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिराची मोठी आवृत्ती वाटावी. लहान मुले सुद्धा मनसोक्त बागडत असतात. भर बाजारात हे मंदिर आहे. या मंदिरात आणि बाजारात कोणीही एकटादुकटा मुक्तपणे फिरू शकतो.

@ या मंदिराच्या समोरच आपल्याकडच्या सारखे मुगाच्या डाळीचे कुरकुरीत चविष्ट पकोडे सुद्धा मिळतात अन एक नंबर चहा सुद्धा.

@ तवी नदीच्या पात्राला लागून एक चार धाम मंदिर आहे. तेथे आपले पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई सुद्धा आहेत. सगळ्या प्रांतांचे देवादिक आहेत. कोणाचाही त्याला विरोध वगैरे नाही.

@ 'बहु फोर्ट'मधील काली मंदिरात दर मंगळवार अन रविवार हजारो लोक दर्शनाला मुक्तपणे येतात अन तेथील भंडारा भोजनाचा आस्वादही घेतात. जात- धर्म- लिंग या कशाचाही भेदभाव न करता. अन देवी अंगात वगैरेही येते. आपल्याकडच्या सारखीच.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०१६

सिंधू दर्शनाला तिगस्त साली गेलो होतो,आपल्या संघ रचनेतून.श्रीनगरला एका मंदिरात भोजन व्यवस्था होती.आपल्या एकल विद्यालयाच्या टीमने केली होती.एखाद दुसरा अपवाद वगळता व्यवस्थेतील सर्व मुले मुली मुस्लिम होती. - अजय देशपांडे (अमरावती)

सुखी देशांची यादी

आपल्या विचारवंतांची गंमतच असते. सध्या भारत सुखी/ आनंदी देशांच्या यादीत कितवा आहे याची चर्चा सुरू आहे. आधी कोणत्या स्थानी होता वगैरे थोडं बाजूला ठेवू. पण सध्या असलेलं स्थान फार समाधानकारक नाही. अन स्वाभाविकच सगळ्या गोष्टींसाठी सरकार जबाबदार असते हा सिद्धांत स्वीकारल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे सरकार असेल त्याच्यावर जबाबदारी ढकलली की आपण टवाळीसाठी मोकळे ! भारताचं जे काही स्थान आहे त्याचं विश्लेषण करताना सध्याची जीवन पद्धती, जीवन मूल्ये आणि राजकीय व्यवस्था यांच्याकडे बोट दाखवलं जातं. जीवन पद्धती, जीवन मूल्ये आणि राजकीय व्यवस्था या तीन गोष्टी कारणीभूत आहेत, म्हणजेच त्या त्याज्य आहेत. या तीन गोष्टी ज्यांच्याकडून आमच्या इथे आल्या त्यांनीच तयार केलेला संबंधित अहवाल आहे. गंमत इथे आहे. ज्या गोष्टी सोडून देण्याची गरज आहे त्यांचे जन्मदाते, त्यांचे प्रसारक आणि त्यांचे अनुयायी असलेल्या लोकांचा अहवाल मात्र आम्ही योग्य आणि प्रमाण म्हणून स्वीकारतो. ज्यांनी वाटोळं केलं त्यांचाच शब्द प्रमाण मानतो. हा अंतर्विरोध आहे असंही वाटत नाही. म्हणजे एकीकडे अमक्याला काही समजत नाही म्हणायचे अन त्याचवेळी त्याचे विश्लेषण प्रमाण मानायचे. आमच्या विचारविश्वाची ही दयनीय स्थिती आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०१९

देव

संजय राऊत यांचं एक वाक्य पाहण्यात आलं - 'संकटाच्या वेळी पहिले देव पळून जातो' असं काहीसं. निरर्थक या एका शब्दात या वाक्याचे वर्णन केले पाहिजे. पण त्याहीपेक्षा कोणाला तरी, कशाला तरी कमी लेखणे हा त्यातील आशय जास्त बालिश आहे. मूळ मुद्दा हा की, असं वाक्य का येतं? कारण देव आपल्यासाठी काही करत नाही/ करू शकत नाही, या भावनेतून. ही भावना का तयार होते? कारण देवाने आपल्यासाठी काही करावे/ करायला हवे, या अपेक्षेतून. मात्र ईश्वर न मानणारे, बुद्धिनिष्ठ, विज्ञानवादी लोक; जर देव मानतच नाहीत तर अपेक्षा का करतात की देवाने काही करावे? यावर उत्तर येईल की, 'आम्ही अपेक्षा करतच नाही. आम्ही फक्त अपेक्षा करणाऱ्या अज्ञानी, बुद्धीहीन लोकांना समजावून देऊन प्रबोधन करतो. या वाक्याचा तोच अर्थ आहे.' प्रबोधनाची ही कळकळ खरी मानायला काहीच हरकत नाही. पण ज्या विषयाचे प्रबोधन करायचे त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा की नको? देव वगैरे काही नसतं, देवाकडून अपेक्षा करणे गैर असं म्हणताना सुद्धा देवाला गृहितच धरले जाते. देवाने कधी म्हटले आहे की मी तुमच्यासाठी काही करीन. त्याने म्हटलेलेच नाही. ही भक्तांची किंवा अभक्तांची अपेक्षा असते. तो काही आपला नोकर वा गुलाम आहे का? तो करेल वा करणार नाही. तो तुमच्याशी बांधील नाही.  त्याने कधी करार केलेला नाही, शब्द दिलेला नाही. देवाला आपण आपल्या भल्यासाठी पगारी नेमलेले आहे असं समजण्याचं काय कारण? यावर भगवद्गीतेचा हवाला देऊन 'यदा यदा ही धर्मस्य' सांगितले जाईल. गंमत अशी की, याच भगवद्गीतेत 'कर्मण्येवाधिकारस्ते' हेही सांगितलं आहे हे विसरलं जाईल.

'देवाने अवतार घेतला का' हा विचार करतानाही आम्ही विचार करतो तो त्याने काही करावे ही अपेक्षा ठेवून. त्याने कर्म करण्याचा अधिकार दिला आहे. फळाची अपेक्षा सोडून द्यायला सांगितली आहे. देव अवतार घेईल न घेईल, कधी कुठे कसा ते त्याचे तो पाहील, एवढेच नाही तर अवतार घेतल्यावर सुद्धा काय करायचे तो ठरवेल. त्याला तुम्हा आम्हाला नष्टच करायचे असेल तर? त्याने तसे करू नये हे सांगणारे आम्ही कोण? शिवाय अमुक कर्माचं अमुक हे, एवढं, असं फळ, अमक्याला मिळेल; असं वगैरेही देव सांगत नाही. देवाने सांगितलेलं नाही. आम्ही आपल्या अपेक्षा, आपलं वाटणं त्याच्यावर लादतो अन मग तो आहे की नाही हे सिद्ध करण्याच्या मागे लागतो.

सत्य जाणणारा हेही म्हणत नाही की, देव आमचं भलं करेल किंवा तो हेही म्हणत नाही की, देव वगैरे थोतांड आहे. तो म्हणतो - तुला वाटतं तसं. तो जेव्हा यापेक्षा वेगळं काही म्हणतो तेव्हा फक्त कोणावर तरी कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. या जगाचं अंतिम सत्य आपल्या मुठीत आहे या भ्रमापोटी. राऊतांच्या वाक्याचा फक्त हाच अन्वयार्थ आहे.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०२०

रविवार, २० मार्च, २०२२

ईशावास्य उपनिषदातील कवीगौरव...

 

ईशावास्य उपनिषदाचा आठवा मंत्र आहे-

स पर्यगात शुक्रं अकायं अव्रणं अस्नाविरं शुद्धमपापविद्धम,

कविर्मनीषी परिभू: स्वयंभू: याथातथ्यतो अर्थान् व्यदधात शाश्वतिभ्य: समाभ्य:

`अर्थ- वह स्वयंभू ईश्वर सर्वत्र है. शुद्ध है. कायारहित, दोषरहित, मांसपेशियारहित, पवित्र-पाप रहित, कवि, सर्वज्ञ, सर्वव्यापी है वह. उसने चिरंतन प्रजातियों को अपने अपने काम सौंप दिए है.'

थोडक्यात- सर्वव्यापी ईश्वराला `कवी' हे विशेषण वापरले असून; हा संपूर्ण सृष्टीविलास ही त्याची नितांत रमणीय अशी कविता आहे असा अर्थ अभिप्रेत आहे.

यावर रामकृष्ण मठाचे पूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद म्हणतात-

`आत्मा का एक और सुंदर विशेषण यहाँ है- कवि, ऋषी, क्रांतदर्शी. वह महान कवि है. संसार उसकी कविता है, जो तुकबंदी और पद्यों में निकल रही है. कवि शब्द का अर्थ कविता बनानेवाला नहीं है; बल्कि कवि वह है जो दूरदर्शी है, क्रान्तिदर्शी है, जिसमे सूक्ष्म दृष्टी है; तथा जो वस्तुओं के आंतरिक महत्व को देख और समझ सकता है. संसार के बड़े कवि आत्मा के साथ इस गुण में भागीदार है. साधारण रसहीन शुष्क मन के लिए जो बात सामान्य और अर्थहीन है; कवि के लिए वह अर्थ और महत्व से भरा हुआ है. जैसे शेक्सपिअर की काव्यमयी सूक्ष्म दृष्टी का चित्रण करनेवाली एक अंग्रेजी कविता में कहा गया है-

जब पडती है कवि की दृष्टी

गली भी अभिनय रूप लेती है

जब शेक्सपिअर पास से गुजरता है...

कवि के लिए प्रत्येक क्रिया, प्रत्येक अनुभव, प्रत्येक घटना, काव्य के सुझाव से भरी है. उसका संवेदनशील मन उन में अर्थ और महत्व देखता है. प्रकृति में कोई वस्तु या घटना नहीं जो विश्व को आत्मा के साथ आत्मसात न करती हो. कवि दिव्य कवि (ईश्वर) के साथ क्षणिक नाता जोड़कर प्रकृति के दिव्य स्पंदन का अनुभव करता है. साधारण व्यक्ति केवल शुष्क, विभिन्न तथ्यों और घटनाओं को देखता है. अंग्रेजी कवि शेली कहता है, कवि संसार के अस्वीकृत विधायक है.'

- कवी म्हणजे काय? कविता म्हणजे काय? अशी चर्चा बरेचदा होते. वरील विवेचनानुसार, ज्याची दृष्टी सूक्ष्म आहे आणि जो व्यक्ती, वस्तू, घटना, अनुभव, विषय यांचा अर्थ, महत्व आणि आत्मा जाणू शकतो. अन कविता म्हणजे या आत्म्याची अभिव्यक्ती.

- श्रीपाद कोठे

२१ मार्च २०२१

शनिवार, १९ मार्च, २०२२

चोराच्या उलट्या...

दोन दिवसांपूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी नागपूरला येऊन व्याख्यान देऊन गेले. वास्तविक उत्तर प्रदेशातल्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मतांची चार आकडी संख्याही गाठता न आलेल्या पक्षाच्या नेत्याची दखल कोणी आणि का घ्यावी? नाहीच घेणार कोणी. मात्र असे बेदखल होणे चालणार नाही ना? मग मुद्दा शोधण्यात आला- नागपूर विद्यापीठाने निमंत्रण दिले असतानाही कार्यक्रमच रद्द केल्याचे. असे कार्यक्रम रद्द होणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेकदा अनेक कार्यक्रम रद्द होत असतात. त्यात एवढे issue करण्यासारखे काही नसते. अन तो फार मोठा issue असला तरीही तो विद्यापीठापुरता मर्यादित होता. पण मार्क्सवादी पक्ष आणि त्याचे माध्यमातील पाठीराखे यांनी तर कोणत्याही गोष्टीचे गुह्य प्रकट करण्याची भीष्म प्रतिज्ञाच केली आहे ना? झाले. लगोलग आरोप, बातम्या तयार झाल्या. काय तर म्हणे- रा. स्व. संघाने येचुरी यांचे व्याख्यान रद्द करण्यासाठी विद्यापीठावर दबाव टाकला. यापेक्षा हास्यास्पद दुसरे काय असू शकेल? ज्या पक्षाला हजारभर मते मिळवता येत नाहीत त्या पक्षाकडे अन त्याच्या नेत्यांकडे रा. स्व. संघ लक्ष देईल का? संघ बाकी काहीही असू शकेल पण हिशेबीपणात पक्का आहे. विरोधकसुद्धा याची खात्री देतात. या अगदीच निरर्थक आणि क्षुल्लक व्याख्यानासाठी महालच्या संघ मुख्यालयातून काही हालचाली होतील असं समजणं अन तसे आरोप करणं बालिशपणाच्याही पलीकडील आहे. आता तर स्थिती अशी आहे की, कम्युनिस्ट पक्ष आणि लोकांकडे नजर वळवण्याची सुद्धा गरज नाही. आपल्या दुर्दैवाचे खापर फोडायला त्यांना संघ बरा वाटतो, एवढाच त्याचा अर्थ.

बरे विद्यापीठातील व्याख्यान रद्द झाले तर झाले. तसेही चारदोन डोकी आणि वृत्तपत्रातील बातम्या यापलीकडे त्या व्याख्यानातून काय साधले जाणार होते? त्यापेक्षा ते रद्द झाल्याने थोडी तरी चर्चा झाली. येचुरींनी डॉ. काणे यांचे आभारच मानायला हवेत. अन्य एका महाविद्यालयाने त्यांना आमंत्रित केले आणि तेथे त्यांचे व्याख्यान झाले. काय बोलले सीताराम येचुरी? भारतात लोकशाही धोक्यात आहे. काहीही जनाधार नसलेले, काहीही सामाजिक contribution नसलेले येचुरी आमंत्रित केले जातात, ते रोखठोकपणे त्यांचे विचार बोलतात आणि तरीही भारतात लोकशाही धोक्यात? असे उफराटे, गाढवाला ताप आणणारे विश्लेषण कम्युनिस्ट सोडून दुसरे कोण करणार? किंवा असेही म्हणता येईल की, कम्युनिस्ट असे नाही तर कसे विश्लेषण करणार? येचुरी यांनी केरळवर बोलणे स्वाभाविकच होते. केरळमध्ये आमचे कार्यकर्ते मारले जात आहेत असा उलटाच आरोप त्यांनी केला. चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या याच. केरळात काय सुरु आहे ते सगळ्या जगाला माहीत आहे. त्यांच्या बोलण्यावर कोणीही काडीचाही विश्वास ठेवणार नाही. तरीही त्याची दखल घ्यायची म्हटली तर प्रश्न निर्माण होतो की, केरळात सरकार कुणाचे आहे? तुमचे सरकार असताना तुमचे लोक का मारले जातात? कायदा सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असताना त्या घटनांची चौकशी आणि दोषींना सजा असे का होत नाही? स्वत:च्या पक्षाच्या सरकारच्या निष्क्रीयतेकडे दुर्लक्ष करून रुदाली होत देशभर छात्या पिटायच्या हे करुण आहे. कम्युनिस्ट रक्ताला चटावलेले आहेत. अन्यत्र त्यांची उपासमार होत असल्याने केरळात त्यांनी उचल खाल्ली आहे. त्यात मुख्यत: विरोधक टिपले जातात. अन कधीकधी स्वत:च्या शस्त्राने स्वत:चाच घात होतो. त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार कम्युनिस्ट स्वत:च आहेत. सत्ता, संघर्ष, रक्त ही कम्युनिस्टांची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. येचुरींच्या `वैश्विक चिंतनातून' ती लक्षणे बटबटीतपणे अधोरेखित झाली आहेत.

- श्रीपाद कोठे

नागपूर

२० मार्च २०१७

एकतेच्या गोष्टी

आटपाट जग होतं. तिथल्या समाज शास्त्रज्ञानी एकतेच्या १०० गोष्टी निश्चित केल्या. त्यातून दोन विचार निघाले -

१) तुमच्यात या १०० पैकी १ गोष्ट वेगळी आहे. म्हणून तुम्ही - आम्ही वेगळे .

२) तुमच्यात आमच्यात या १०० पैकी एक गोष्ट सारखी आहे. म्हणजे आपण एकच आहोत.

क्रमांक १) - भारतेतर विचारप्रवाह.

क्रमांक २) - भारतीय विचारप्रवाह.

व्यक्ती, कुटुंब, समाज, राजकारण, अर्थकारण, संस्कृती, अध्यात्म ... सगळीकडे क्रमांक १) विचारप्रवाह काम करतो आहे. त्याचा परिणाम - संघर्ष, अशांती, अमानुषपणा, असमाधान, निद्रानाश, अस्वाथ्य इत्यादी.

- श्रीपाद कोठे

२० मार्च २०१८

शुक्रवार, १८ मार्च, २०२२

मोदींनी माफी मागावी, पण...

'टाईम' मासिकाच्या ताज्या अंकात मुखपृष्ठावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापल्यानंतर आणि मुख्य म्हणजे त्यातील लेखात नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांची तुलना करून मोदी हे पंतप्रधान पदासाठी अधिक लायक असल्याचे जे मत व्यक्त करण्यात आले आहे त्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. पुन्हा एकदा गुजरात दंगली ताज्या होत आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी असा सूर आळवला जात आहे. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की, एक noble gesture म्हणून जरी मोदींनी उद्या माफी मागितली (त्याची गरज काय? वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवू) तरी आकाशपाताळ एक करून `आपण त्या दंगलींसाठी जबाबदार असल्याची कबुलीच मोदींनी दिली आहे' असा ओरडा सुरु होईल.

पण राजकारणाचा एक भाग म्हणून मोदींनी त्या दंगलींसाठी माफी मागावी, असे मला प्रामाणिकपणे वाटते. फक्त त्यासाठी त्यांनी एक अट घालावी की, `गोध्रासाठी जबाबदार असलेल्यांनी आणि १९४७ साली देशाची फाळणी केल्याबद्दल कॉंग्रेसने आधी माफी मागावी.' हिंदू-मुस्लीम प्रश्न अतिशय जटील आहे. त्याला ऐतिहासिक पृष्ठभूमी आहे. अनेक पदर आहेत. अशा प्रश्नांवर wishful thinking किंवा गोड गोड बोलण्याने फार काही साधत नाही. जटील प्रश्नांची बाळबोध उत्तरे शोधणार्या नेत्यांनी आणि स्वनामधन्य विचारवंतांनी हे समजून घ्यायला हवे. अर्थात समजून घेण्याची इच्छा आज किती जणांकडे आहे?

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०१२

बी आणि झाड

बी ज्या झाडाचं असेल तीच फळं, फुलं झाडाला लागतात. श्रद्धा, भक्ती, त्याग, प्रेम, सचोटी अशा बहुतेक सगळ्या गोष्टींचंही तसंच आहे. मुळात ते थोडंसं तरी असावं लागतं. मगच त्याचा विकास जीवनात होऊ शकतो. ते बीज नसेल तर कितीही डोकेफोड करा. सगळं व्यर्थ. लाज ही सुद्धा अशीच बाब. तिचं बीजच नसेल तर अगदी रामनाम होईपर्यंत सुद्धा व्यक्ती निर्लज्जच राहते. आपल्यामुळे कोणाला होणाऱ्या त्रासाचा विचार न करणे, आपल्यासाठी बाकीच्यांनी सहन केलं पाहिजे अशी वृत्ती, पुढे जाऊन दुसऱ्याला त्रास होईल असे वागणे आणि त्यात आनंद आणि भूषण वाटणे; या निर्लज्जतेच्या वरच्या पायऱ्याच. अन आपण अधिकाधिक त्रास देऊ शकतो, काय करणार कोणी आपलं; ही सर्वोच्च पायरी. याचंच नाव राक्षसीपणा किंवा अधमता. अगदी आपल्या आजूबाजूलाही असे लोक असतातच.

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०१९

थोडे सोपे सोपे -

१) गर्दी टाळायची आहे तर महानगर मॉडेल ऐवजी, लहान शहरांचे मॉडेल का आणू नये?

२) कोट्यवधी लोक work from home करू शकतात तर त्यांनी लहान शहरात का राहू नये?

३) दोन माणसात एक मिटरचे अंतर ठेवायचे तर आंगण असणारी लहान शहरातील घरे आदर्श ठरत नाहीत का?

४) एसीचे तापमान वाढवण्याच्या जागी विषाणूंचे पोषण करणारे एसीच हद्दपार का करू नये?

५) मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश घरात खेळायला हवे, हे काही काळापूर्वीचे तत्व पुन्हा पुनरुज्जीवित करावे.

६) मानवी activity कमी करूनही जीवन चांगले चालू शकते. वर्तमानातील मानवी activity वाढवण्याचा trend बदलून मानवी activity मर्यादित करण्याचा trend रुळवावा.

७) जगण्यातल्या रिकामपणाचे महत्वही जाणून घ्यावे.

८) गरजांचा फेरविचार करावा.

९) कोरोनाचा संसर्ग झाला किंवा नाही याचा विचार फार तांत्रिक पद्धतीने न करता, शेम्बुड असेल तर कोरोना नाही हे समजून घ्यावे.

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०२०

Conditioning

राष्ट्रपती नियुक्त खासदार हे अनुभवाचा, ज्ञानाचा लाभ करून देण्यासाठी असतात असं म्हणतात. लताजी, रेखा, सचिन किंवा इतर इत्यादींचा अनुभव आणि ज्ञान यांचा किती लाभ झाला हे कधी स्पष्ट झालं नाही. आयोग, संसदीय समित्या इत्यादींमधून लाभ होतो म्हणता येईल. पण अशा समित्यांचे अहवाल, सूचना आदींच्या फायलींनी किती कचरा डब्बे भरले असतील कल्पनाच केलेली बरी. एकूणच आपल्या विचार पद्धतीचं इतकं महाप्रचंड conditioning झालेलं आहे की विचारता सोय नाही.

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०२०

निरस समाज

हा काय करतो? तो काय करतो? यातच रस असणारा निरस समाज तयार होतो आहे. काय योग्य? काय अयोग्य? याचा विचार लोकांना नकोसा होतो आहे. अन असा योग्य अयोग्य विवेक केला तरीही तो स्वतःसहित सगळ्यांसाठी असतो हे मान्य करायला फारसे कुणी तयार नसतात. अन हे मान्य केलं तरीही, योग्य-अयोग्य प्रत्यक्ष व्यवहारात येणं ही एक वेगळी प्रक्रिया असते हे डोक्यात शिरत नाही. इंद्रियांना लागलेलं वळण आणि मन बुद्धीच्या अवस्था यातून वाट काढत व्यवहाराला इष्ट वळण द्यायचे असते, दिले जाते. ही एक विलक्षण सापेक्ष आणि धीमी प्रक्रिया असते; याचं आकलन अभावानेच असतं. या सगळ्यापेक्षा आरोप प्रत्यारोप आणि वादावादी सोपी असते. अन मुळातच बहुसंख्य माणसे सुमार असल्याने सोप्या गोष्टी करत राहतात. हे सगळंच स्वाभाविक आहे. फक्त दोन गोष्टी त्रासदायक असतात. या स्वाभाविक प्रक्रियेत माणसं आणखीन सुमार होत जातात अन त्याचं त्यांचं भानही सुटत जातं. अन दुसरी अडचण म्हणजे, या सुमारपणाच्या कक्षेच्या बाहेर असलेल्यांची कुचंबणा होते.

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०२१

गुरुवार, १७ मार्च, २०२२

उन-सावली

हिवाळ्यात उन लागावं म्हणून उन्हात नेउन ठेवलेल्या कुंड्या माळ्याने आता सावलीत आणून ठेवल्या. हिवाळ्यात कुंड्या सावलीतच राहिल्या असत्या तर झाडे फुलली नसती आणि उन्हाळ्यात कुंड्या उन्हातच राहिल्या तर झाडे कोमेजून जातील किंवा कदाचित मानही टाकतील. झाडं जगायची असतील, फुलायची असतील तर त्यांना उनही हवं आणि सावलीही हवी. खरं तर सगळ्याच गोष्टींचं असंच आहे. पाणी नाही का, झाडांना तेही प्रमाणातच हवे. कमी असले तर झाडे कोमेजणार आणि जास्त झाले तरी नीट वाढणार नाहीत. मुळांशी असलेली माती कोरडी नाही झाली तर मातीचं एअरेशन नाही होणार, झाडाला नायट्रोजन नाही मिळणार; वगैरे वगैरे. मातीला ओलावा हवा, ओल नको. घराच्या भिंतीही ओल आली तर खराब होतात. त्यांचे रंग उडतात, पोपडे पडायला लागतात, अधिक ओल आली तर कुबट वास येऊ लागतो. भिंती ठिसूळ होतात. मुद्दा हा की, ओलावा हवा ओल नको.

आपलं शरीर तरी काय वेगळं आहे? केवळ मऊमऊ मांसाचा गोळा असता तर? कल्पनाही नाही ना करवत? मऊ मांस हवे आणि आधार द्यायला कडक हाडेही हवीतच. वर चिवट असे चामडेही हवे. पोषण मिळावे म्हणून रसही हवेत सगळे. फक्त गोड खाऊन उपयोग नाही. तिखट, आंबट, तुरट, कडू; सगळेच रस हवेत. कर्तृत्वाचे झेंडे फडकवायला उजेड हवा आणि शिणलेल्या शरीराला विश्रांतीसाठी अंधारही हवा. उजेडाविना रंगीबेरंगी फुलांचा आस्वाद घेता येणार नाही आणि अंधाराशिवाय चंद्र-चांदण्यांची शोभा निरर्थक होईल.

पोटच्या गोळ्याला एक क्षण डोळ्याआड न करणारी जन्मदात्री, तो थोडा मोठा झाला की ओरडते, काय सारखा अंगाअंगाशी करतो. जा, जरा मोकळा खेळ थोडा. मुलं सगळ्यांनाच आवडतात, पण मूल हे मुलंच राहिलं तर ते कोणालाही आवडत नाही. जीवनाचं महत्व, सौंदर्य आणि आनंद आहे; तशीच मृत्युचीही आवश्यकता आहे. या जगात मृत्यूच नसता तर किती अनवस्था ओढवली असती, कल्पना करून पहा. विष उतरवण्यासाठीच का होईना, पण विषाचीही आवश्यकता असतेच. दारू वाईटच पण ती व्यसन म्हणून. पण गरज म्हणून? सफाई काम करणारे लोक, शवविच्छेदन करणारे, दहन घाटावर काम करणारे लोक, अतिशय हलाखीची आणि जोखमीची कामे करणारे यांच्यासाठी दारू गरजेची नाही? व्यसन तरी नेहमी कुठे वाईट असतं? वाचनाचं व्यसन, गाण्याचं व्यसन; ही चांगलीच म्हणावी लागतील.

काहीही संघर्ष नसता तर या जगाची प्रगती झाली असती का? बिनासंघर्ष गौरीशंकर चढून जाता येईल का? किंवा प्रशांत महासागर पोहून जाता येईल का? आम्ही व्यायाम करतो म्हणजे काय करतो? आमच्याहून अधिक विरोधी शक्तीशी संघर्ष करतो. रागाशिवाय अनुराग तरी कुठे फुलतो? या जगात सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत- योग्य प्रमाणात, योग्य स्थानी, योग्य वेळी. प्रमाण, स्थान वा वेळ चुकले किंवा त्यात कमी अधिक झाले तर ती गोष्ट अयोग्य वा चुकीची ठरते. त्याने हिताऐवजी अहित होते. विकासाऐवजी विनाश होतो.

असंख्य प्रकारची माणसे दिसतात ती यामुळेच. फक्त दुर्दैवच दुर्दैव वाट्याला आलं तर माणूस पिचून जातो, हतोत्साहित होतो, निराश होतो. त्याला कितीही आशावाद सांगा तो त्याच्या निराशेतून बाहेर येउच शकत नाही. कारण आशा किंवा निराशा या बोलण्याच्या, चर्चेच्या, सांगण्या, समजावण्याच्या गोष्टीच नसतात. अनुभव आला, खुणगाठ पटली की तो आपोआप त्याला प्रतिसाद देतो. तसेच सुदैवाने ज्याला कधीच अपयश, नकार, अभाव यांचा सामना करावा लागला नाही; असा माणूस उत्साहाचे आणि आशेचे जणू कारंजे असतो. मात्र हेही खरे आहे की, अशी व्यक्ती फक्त राजपुत्र सिद्धार्थच राहू शकते, बुद्ध होण्यासाठी त्याला सुखाबरोबरच दु:खेही चाखावीच लागतात. आणि असे बुद्ध होतात तेव्हाच जगाला आधार मिळतो. आम्हाला आधार नको वगैरे म्हणणे ऐकायला ठीक आहे, पण त्यामुळे गटांगळ्या खाणे चुकत नाही. आम्ही कितीही बाता मारल्या तरी आमच्या पायतळीची माती कोणता तरी वटवृक्ष किंवा कुठले तरी गवत हेच धरून ठेवत असतात. गवगवा न करता, समजू न देता.

आम्हाला मात्र काहीतरी एक हवं असतं. अपयशाचं खापर फोडायला एक काही तरी हवं किंवा यशाची गुरुकिल्ली म्हणून एक काही तरी हवं. यश असो वा अपयश, सुख असो वा दु:ख, योग्य असो वा अयोग्य; त्याचं विश्लेषण आम्हाला सरतेशेवटी कुठल्यातरी एका बिंदूवर आणून ठेवायचं असतं. आपण आजारी पडलो तरी त्याचं एकच कारण हवं, लोकशाही व्यवस्था नीट काम करत नाही तरी एकच कारण हवं, या जगातली आणि जगाची कोडी सोडवताना सुद्धा एकच उत्तर हवं. या जगाचं, यातल्या क्रियाकलापांचं, यातील भावभावनांचं मूळ स्वरूपच व्यामिश्र आहे. हे जग ना उन्हाचं आहे, ना सावलीचं; ते आहे उन-सावलीचं. आमची ओढ मात्र एक तर उन्हाकडे असते वा सावलीकडे.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १८ मार्च २०१४

बुधवार, १६ मार्च, २०२२

insolvency code

भाजप सरकारने insolvency code आणून चार लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती भाजप प्रवक्ता गौरव भाटिया यांनी आत्ताच एका टीव्ही चर्चेत सांगितली. भाजप सरकार असं सगळं काम करत असूनही, खनिज तेलाच्या उतरलेल्या किमतीचा फायदा ग्राहकांना न देता, खनिज तेलाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची वृत्ती का किंवा काय मजबुरी आहे हे लोणी खाण्याची?

- श्रीपाद कोठे

महसूल कमी होणार नाही याची काळजीही सरकारला घ्यावी लागते. (लक्ष्मणराव जोशी)

Laxman Joshi हो पण मग येस बँकेत पैसा का ओतायचा स्टेट बँक वा जीवन विम्याचा? हा महसूल वाया घालवणे नाही का?

Shripad Kothe सरकारमध्ये एकच नियम सर्व ठिकाणी सारख्याच पद्धतीने वापरता येत नाही. प्रत्येक निर्णयाचे संदर्भ वेगवेगळे व त्या परिस्थितीनुसार असतात. येस बॅकेचा संदर्भ असा आहे की, अर्थात माझ्या समजुतीनुसार,इथे बॅकिंग प्रणालीवरील विश्वास कायम ठेवण्याचा मुद्दा रिझर्व्ह बॅकेला महत्वाचा वाटला असावा. अर्थात येस बॅकेचे वित्तीय पॅरामीटर्सही त्यासाठी अनुकूल असतील, ज्याची माहिती फक्त रिझर्व्ह बॅकेलाच असू शकते.

Laxman Joshi सर, तपशीलाची चर्चा बहुतांशी न संपणारी आणि मूळ मुद्याला वळसा घालणारी असते. अगदी रिझर्व्ह बँकेच्या प्रशासनात असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये सुद्धा त्यावरून दोन मते असू शकतात/ असतात. मूळ मुद्दा resolve चा आहे. पैशाचा योग्य विनियोग, आर्थिक शिस्त, चलनवाढीचे दुष्टचक्र, अशा अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केलाच जात नाही. पक्ष आणि सरकार कोणाचेही असो, तांत्रिक चर्चेत सगळं गुंडाळायचं हीच नीती दिसते.


इतर स्रोतांमधून कमी झालेल्या महसुलाची भरपाई करण्याची संधी अाहे.

राजेश कुलकर्णी हसण्याची स्मायली मुद्दाम. कारण हे कारण कुठेही केव्हाही कसेही वापरता येते. दुसरे - insolvency इत्यादी जे आहे ती महसुलाची भरपाईच आहे नं. अन भरपाई होतच नसेल तर मूळ धोरणं, योजना, कार्यक्रम यांचाच फेरविचार केला पाहिजे.

टीप - याआधी जेव्हा तेलाचे भाव पडले तेव्हाही महसुलाची भरपाई करून घेतलीच होती.

- श्रीपाद कोठे

१७ मार्च २०२०

डावे आणि उजवे

आज ज्यांना उजवे म्हटलं जातं त्यांची एक चूक म्हणजे, त्यांना चिकटवण्यात आलेलं हे बिरूद त्यांनी स्वीकारलं आणि काही तर आता ते मिरवायला लागले आहेत. मुळातच हे डावे, उजवे ही भाषा सुद्धा चुकीची आहे. काही जणांना ती हवीच आहे. कारण भाषा, शब्द आपल्यासोबत भाव, विचार, धारणा घेऊन येतात. ते माणूस आणि समाज यांचं आंतरिक विश्व, समज, आकलन, छबी या साऱ्यावर परिणाम करतात. मुळात ज्यांना `उजवे' म्हटले जाते ते ना उजवे आहेत ना डावे. ते जीवनाचा जीवन म्हणून विचार करणारे आहेत. (खरे तर पृथ्वीच्या पाठीवर कुठेही आणि कोणीही असा डावा किंवा उजवा नसतो. तसा असूच शकत नाही. संघर्ष जन्माला घालण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी या शब्दावलीचा वापर हेतूपुरस्सर केला जातो. कोणतेही वर्गीकरण हे फक्त अभ्यासासाठी असते, जीवनासाठी नाही.) पण `उजवे' हे बिरूद ठामपणे न नाकारल्याने विचार आणि भूमिका दोन्ही नीट घेताही येत नाहीत, मांडताही येत नाहीत, अन मुख्य म्हणजे मानवी कल्याणाच्या मार्गाने जाण्यात अडचण आणि गोधळ उत्पन्न होतो. leftist pushed us to the wall. (politically) त्यामुळे माझ्या मते- कितीही लादले गेले, कितीही temptation असले तरीही या भाषेचा वापर थांबवला पाहिजे. ज्यांचे हितसंबंध त्याच्याशी जुळले आहेत ते प्रयत्न करणारच की, ही भाषा वापरली जावी. पण त्या डावात न फसता, त्यांनी फेकलेल्या जाळ्यात न अडकता पुढे जायला हवे.

- श्रीपाद कोठे

१७ मार्च २०१९

गोगोईंची नियुक्ती

न्या. गोगोई यांना राज्यसभेवर नियुक्त करण्यात आले. उलटसुलट राजकीय चर्चा झडतील. त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. पण अन्य काही मुद्दे यातून पुढे येतात. त्यावर समाज म्हणून विचार केला पाहिजे. न्या. गोगोई सरन्यायाधीश होते. राष्ट्रपतींना शपथ देण्याचा त्यांना मान होता. सर्वोच्च अशा संसदेच्या निर्णयांची चिकित्सा करण्याचे, त्यावर भाष्य करण्याचे, प्रसंगी निर्णय बदलायला लावण्याचे, कोणत्याही कायद्याची घटनात्मकता निश्चित करण्याचे; असे सारे अधिकार होते. राज शिष्टाचारात राष्ट्रपतींच्या नंतर त्यांना मान होता. पद, पैसा, सन्मान, अधिकार हे सगळे होते. एवढे सारे मिळाल्यावर, भोगल्यावर - अदखलपात्र, सामान्य मंत्र्यापेक्षाही कमी अधिकार आणि सन्मान असणारी, राष्ट्रपती वा पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हाताची घडी तोंडाला कुलूप करावे लागणारी खासदारकी भुरळ कशी आणि का घालू शकते? आपलं मानव म्हणून इतकं अवमूल्यन झालं आहे? हीच जर आपली सामाजिक मूल्य असतील तर मोठ्या तात्त्विक, नैतिक गोष्टी करण्याचा अधिकार आम्ही गमावून बसलो आहोत, हाच त्याचा अर्थ होतो. अन कृपा करून व्यक्तीस्वातंत्र्य, कायदेशीरपणा इत्यादी सांगू नये. त्यांचा भंपकपणा आणि त्यांची निरर्थकता शेंबडे पोरसुद्धा जाणते. एकूणच हा निर्णय आणि तो स्वीकारणे निराशाजनक आहे.

#श्रीपादचीलेखणी


हे आपले सर्व कथन त्याच वेळी लागू पडते ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढविली वा अर्ज केला.

ही महामहिम राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती आहे.

त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा लाभ देशाला व्हावा यासाठी महामहिम जे १२ लोक नियुक्त करतात. त्यातील ही नेमणूक असेल तर त्यात आक्षेपार्ह काय आहे?

(स्वानंद पुंड)

विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड नाकारता आला असता प्रस्ताव. अन मुद्दा अनुभव आणि ज्ञानाच्या लाभाचा. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. सिझरची बायको....

Shripad Kothe 

भारताचे महामहिम राष्ट्रपतींनी दिलेला सन्मान का नाकारायचा? 

तो त्यांचा अपमान नाही का?

ज्ञानाच्या उपयोजनाची अनेक क्षेत्रे आहेत. बरोबर. पण याने ती बंद कुठे होतात.

विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड तुकारामांनी शिवाजींचा नजराणा नाकारला होता. रामशास्त्रीनी पण.

मानवी स्वभावाचा नमुना दाखविणारा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. 20--25 वर्षांपूर्वी चा प्रसंग जेव्हा नागपूरात स्वत:चे नवीन चारचाकी वाहन असणे व ते चालविणे खूप प्रतिष्ठेचे असायचे. नेहमी स्वत:ची कार चालविणाऱी एक सुपरीचित महिला मला पेट्रोल पंपावर भेटली. तेव्हा ती नवीन स्कूटर वर होती. मी हाय हॅलो केले पण तिच्या स्कूटर ची दखल घेतली नाही कारण ती नेहमी कार मध्ये फिरणारी महिला होती. हाॅ, ती जर सायकल किंवा आॅटोने फिरणारी असती तर मी नक्कीच तिच्या प्रगतीची दखल घेतली असती. पण तिला माझा हा मठ्ठपणा सहन झाला नाही. न राहवून  तिने तिच्या नवीन स्कूटर कडे निर्देश करून म्हटले ,"नवीन घेतली, कशी आहे?"

निवृत्त सर न्यायाधीश पदा पेक्षा विद्यमान खासदार पद त्यांना जास्त भावले असेल.

Suresh Khedkar धन्यवाद. माझ्या म्हणण्याची पुष्टी करण्यासाठी. हाच माझा मुद्दा आहे. माणसे सर्वार्थाने लहान आणि सुमार होऊ लागली आहेत. अन 'लहान माणसांचे महान राष्ट्र' यात समाज वाहत जातो आहे. महानतेची किंमत असते. ती चुकवण्याची तयारी नाही.


तुमचा मुद्दा हास्यास्पद आहे. मोठे पद भूषविले नंतर लहान पद स्वीकारण्यात कमीपणा तो कसला? संघात रज्जुभैय्या, सुदर्शनजी यांनी सरसंघचालक पद सोडल्यानंतर स्वयंसेवक होतेच आणि संघांनी दिलेली जवाबदारी पार पाडली. चाणक्याने chandraguptala सम्राट बनवून पुनः शिक्षक पद स्विकारले, 

तर गोगोई ना राष्ट्रपतींनी राज्यसभेवर मनोनित केले तर एवढा gahjab का?

(महेश जोशी)

Mahesh Joshi महेशराव, त्याग आणि लाभाचे पद यात फरक असतो नं. अन कुठली तुलना कुठे करताय? कुठे रज्जूभैय्या अन कुठे गोगोई. माझा मुद्दा हास्यास्पद असो. पण तुमच्या तर्काला लोक नक्कीच हसतील.

मला वाटलेच तुम्ही ज्यांशी तुलना केली त्यावरच टिप्पणी करणार. खरेच त्या महनीय व्यक्तींशी गोगोई यांची काही बरोबरी नसेल, ते मी केवळ उच्चपदस्थ व्यक्ती निवृत्त झाल्यावर सामान्य पातळीवर काम करू शकतो एवढे संगण्यापूर्तेच होते.

तसेही कोणतेही पद हे ठरवले तरच स्वलाभाचे होवू शकते अन्यथा लोकांसाठी, देशासाठी लाभदायक होवू शकते. गोगोई यांच्या नियुक्ती कडे पूर्वग्रदूषित नजरेने का पहावे?

Mahesh Joshi तुम्हाला बहुतेक पोस्टचा भाव कळलेला नाही. हे फक्त लहान मोठं नाही. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे व्रतस्थता. जी भारतीय जीवनाची विशेषता आहे. एका व्यक्तीची व्रतस्थता अन्य हजारो, लाखो लोकांना प्रेरणा आणि आधार देते. अशी व्यक्ती मोठ्या पदावरील असेल तर त्याचा प्रभाव आणखीन मोठा होतो. मी गोगोईंकडून (तशा लोकांकडून) ती अपेक्षा ठेवतो एवढेच. ती अपेक्षा पूर्ण करण्याचे त्यांच्यावर किंवा कोणावर दडपण नाही. पण समाजाच्या downfall मध्ये कायदे अन व्यवहार यापलीकडे जाऊन विचार व्यवहार करणारे जास्त हवेत ही माझी भूमिका आहे. दुसरे म्हणजे, राजकारण आणि राजकीय व्यवस्था यांचा मोह/ भुरळ/ ओढ/ महत्व. आमच्या मनात ते इतकं भिनलं आहे की कमालीच्या बाहेर. समाजाच्या depoliticization साठी वेगळा व्यवहार करणारे आणि वेगळा विचार मांडणारे हवेत. बाकी ज्याला जे वाटते ते त्याने करावे. I am least enamoured by politics.

- श्रीपाद कोठे

१७ मार्च २०२०

अर्थबिंदू

तीन बातम्या वाचल्या -

१) पेट्रोल, डिझेलवर प्राप्त होणाऱ्या करांबद्दल सरकारने संसदेत दिलेली माहिती.

२) प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये झाल्याची बातमी.

३) नागपुरात मालमत्ता कर वाढवण्याच्या प्रस्तावाची बातमी.

सहजपणे चाणक्य आठवले. चाणक्य कशातून तयार झाले? वडिलांच्या अंत्य संस्कारासाठी लाकडे मिळू शकली नाहीत. का? कारण कर देता आला नाही. त्यातून चाणक्य नावाचा ज्वालामुखी जन्माला आला होता.

******

अंत्योदय म्हणजे काय? अंतिम पायरीवरील व्यक्तीचे कल्याण. गांधीजी म्हणत - कोणतीही योजना, निर्णय आदि करताना शेवटला माणूस ध्यानात ठेवला पाहिजे. गांधीजींनी हे आणखीन स्पष्ट करायला हवे होते. कारण योजना, निर्णय आदी तयार करताना अंतिम माणूस ध्यानात ठेवूनही त्याचा त्याला उपयोग होतोच असे नाही. कारण अंत्योदय म्हणजे फक्त अंतिम माणसाला स्वप्न दाखवणे आणि त्यासाठी प्रेरित करणे नाही. अंत्योदय म्हणजे अंतिम माणसाच्या उद्यासोबतच त्याच्या आजचाही विचार. अन अंतिम माणसाचा विचार याचा अर्थ मधल्यांचा विचार नाही असे नाही.

******

तारांकित जीवनशैलीमुळे पैसा फिरत नाही. तो एकरेषीय वाढतो. कोणतीही गोष्ट फिरण्यासाठी त्याचे खालचे व वरचे बिंदू निश्चित हवेत. तारांकित जीवनशैली हे बिंदू ठरवू देत नाही. उलट एखाद्या बिंदूला saturation झाले की नवीन बिंदू ठरवते. त्यामुळे चक्र तयार होण्याऐवजी रेषा तयार होते. आजचा सगळ्यात मोठा आर्थिक प्रश्न हा आहे. परंतु सगळ्यांची प्रामाणिकता गृहित धरून सुद्धा हे सत्य सांगण्याचं धाडस कोणत्याही राजकीय पक्षात, राजकीय नेत्यात, राजकीय विचारधारेत नाही. काँग्रेस, कम्युनिस्ट, रिपब्लिक, समाजवादी, गांधीवादी, स्वार्थवादी अन हिंदुत्ववादी देखील या बाबतीत एकाच पायरीवर आहेत.

******

फक्त काही बिंदू मांडले आहेत. जोडण्याचं काम तुमचं.

- श्रीपाद कोठे

१७ मार्च २०२१

सोमवार, १४ मार्च, २०२२

मुग्धा कर्णिक यांच्या लेखावर

काही चर्चा नजरेस पडल्या. अन वेळ होता म्हणून खोलात गेलो. तेव्हा मुग्धा कर्णिक यांनी दिव्य मराठीत लिहिलेला एक लेख वाचायला मिळाला. त्यांच्याच भिंतीवर. त्या माझ्या मित्र यादीत नाहीत. पण नाव ऐकले आहे. लेख पूर्ण वाचला. पत्रकार, पत्रकारिता, संघ, संघाची सेवाकार्ये, भाजप, अन social media तील troll असे सगळे वाचले. त्यांच्या लेखाखालीच छोटीशी comment करण्याचा विचार होता. पण त्यांनी ती सोय ठेवलेली नाही. त्यामुळे इथे प्रपंच. एकाच मुद्यावर बाईंनी सांगावे- गांधी हत्येच्या मुद्यावर कुमार केतकर यांच्यासारखे महान लोकसुद्धा अजून ज्या पद्धतीने विचार करतात, बोलतात, लिहितात त्यावर आणि त्यांच्या integrity वर तुमचे काय म्हणणे आहे? नव्हे- गांधी हत्येच्या संदर्भात तुमचे स्वत:चे काय म्हणणे आहे? याबाबत खूप लिहिता येईल, लिहिलेही आहे. पण हा जो `राग गांधी हत्या' सतत आळवला जातो त्यावर फक्त जाणून घ्यायला आवडेल. `आम्हाला पटत नाही म्हणून मान्य नाही' हाच तुमच्या बुद्धिवादाचा, चिंतनाचा, लिखाणाचा, निष्कर्षांचा आधार असू नये ही विनंती.

ता.क. - श्रीमती इंदिरा गांधी यांना अटक झाली तेव्हा घरावर आलेल्या मोर्चात माझ्या घराच्या काचा फुटल्या होत्या आणि त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार करणे हेदेखील काय दिव्य होते हे मी जाणतो. अन पत्रकारिता मला अजिबातच नवखी नाही.

- श्रीपाद कोठे

१५ मार्च २०१७

हॉकिंग आणि नास्तिकता

स्टीफन हॉकिंग नास्तिक होते असे म्हणतात. वास्तविक हा भारतबाह्य दृष्टीकोन झाला. कारण त्यांच्या नास्तिकतेचा संबंध ईश्वराशी आणि त्यांच्या ईश्वर कल्पनेशी आहे. आस्तिक याचा भारतीय अर्थ आहे - या जगाच्या रूपाने आपल्याला जे काही प्रतीत होतं ते काही तरी आहे. अन नास्तिक म्हणजे- आपल्या अनुभवाला येतं ते सारं भ्रम असून त्याला वास्तविक अस्तित्व नाही. आस्तिक याचा अर्थ अस्तित्व असणे अन नास्तिक याचा अर्थ अस्तित्व नसणे. या भारतीय दृष्टीने कोणताही वैज्ञानिक नास्तिक असूच शकत नाही. ते सारेच आस्तिक ठरतात कारण आपल्या अनुभवाला येणारं, प्रतीत होणारं जे आहे त्याला काही ना काही अस्तित्व आहे यावर त्यांचा अतूट विश्वास असतो. म्हणूनच ते अस्तित्व शोधून काढण्याचा, त्याचा ठाव घेण्याचा, त्याला आपल्या मुठीत पकडण्याचा, त्यावर स्वामित्व मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. ते शक्य आहे वा नाही इत्यादी विषय वेगळे. पण काही ना काही अस्तित्वात आहे अन ते हाती लागायला हवं असं मानूनच त्यांचे प्रयत्न होत असतात. त्यांना नास्तिक कसं म्हणायचं?

- श्रीपाद कोठे

१५ मार्च २०१८

सोपीकरण

सापेक्षतावाद, क्वांटम मेकॅनिक्स, अद्वैत सिद्धांत, अणू विज्ञान, भगवद्गीता, नासदीय सुक्त, मधुरा भक्ती, कर्णाचा त्याग, सत्यवानाची सत्यनिष्ठा, सावित्रीची तपस्या; या किंवा यासारख्या गोष्टी सोप्या करू नयेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आदर्शांना आपल्या पातळीवर आणण्यापेक्षा आदर्शांच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न करावा. ईश्वराला मानव बनवण्यापेक्षा मानवाने ईश्वर होण्याचा प्रयत्न करावा.

मानवी सभ्यतेचं हेच रहस्य आहे.

- श्रीपाद कोठे

१५ मार्च २०२०

युगप्रवर्तक श्री रामकृष्ण परमहंस

 आज श्री रामकृष्ण परमहंस यांची जयंती. त्यानिमित्त -

(नागपूर तरुण भारतच्या वाचकांनी काल हा लेख वाचला असेल.)

गुरू शिष्य परंपरा आणि गुरू शिष्य जोडी या काही नवीन गोष्टी नाहीत. परंतु गुरू आणि शिष्य दोघांनाही लोकप्रियता आणि स्वीकार्यता लाभणे, तसेच दोघांचाही प्रभाव असणे; या गोष्टी विरळाच. कधी शिष्य तर कधी गुरू जनमानसावर प्रभाव टाकतात. संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर, संत रामदास आणि त्यांचा शिष्य कल्याण, गोपालकृष्ण गोखले आणि महात्मा गांधी; अशी उदाहरणे सांगता येतील. रमण महर्षी, संत तुकाराम, तुकडोजी महाराज, मीराबाई, कबीर, तुलसीदास; यांच्या बाबतीत गुरू वा शिष्य या दोन्ही नात्यांनी कोणाचे नावही सांगता येत नाही, प्रभाव ही दूरचीच गोष्ट. नाही म्हणायला गुरू नानक आणि त्यांच्यानंतरचे दहा गुरू ही परंपरा आहे पण गुरू शिष्य जोडी समान रूपाने प्रभावी असं नाही म्हणता येणार. शिवाय त्यांना शीख पंथाची एक मर्यादा आहेच. मात्र १९ व्या आणि २० व्या शतकाच्या संधिकाळात गुरू आणि शिष्य दोघेही समान रूपाने स्वीकार्य आणि प्रभावी अशी एक जोडी पाहायला मिळते. ती म्हणजे - श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद.

श्री रामकृष्ण परमहंस यांचे अवघे ५० वर्षांचे जीवन हे युगप्रवर्तक जीवन होते. ख्रिस्तोफर इशरवूड म्हणतात त्याप्रमाणे श्री रामकृष्ण एक phenomenon होते. इशरवूड म्हणतात, 'this is the story of phenomenon. I will begin by calling him simply that, rather than 'holy man', 'mystic', 'saint' or 'avatar'; all emotive words with mixed associations which may attract some readers, repel others. A phenomenon is often something extraordinary and mysterious. Ramkrishna was extraordinary and mysterious; most of all to those who were best fitted to understand him. A phenomenon is always a fact, an object of experience. That is how I shall try to approach Ramkrishna.'

जगाची एक आध्यात्मिक परंपरा तर आहेच पण त्यातही भारताची एक महान, मोठी, सशक्त आणि अद्भुत अशी आध्यात्मिक परंपरा आहे. श्री रामकृष्ण परमहंस या आध्यात्मिक परंपरेचे एक उत्तुंग शिखर तर आहेतच शिवाय त्याहूनही खूप काही आहेत. त्यांनी अमुक अमुक कार्य केलं किंवा अमुक अमुक साधना केल्या, असं म्हणणं हेदेखील तोकडं आहे. ते स्वतः तर मी अमुक केलं वा करतो असे म्हणतच नसत. आपण जगन्मातेचे बालक असून तीच सारे काही करते अशी त्यांची केवळ श्रद्धा नव्हती तर तेच त्यांचे जीवन होते. त्यांची भाषाही 'मी'चा प्रयोग केलाच तर त्याच अर्थाने करीत असे.

श्री रामकृष्ण परमहंस म्हणून जग ज्या जीवनाला ओळखतं ते जीवन घडून गेलं एवढंच म्हणता येईल. अतिशय मोठा, कर्तृत्ववान माणूस ज्याप्रमाणे काम करतो, कार्य करतो, विचार आणि व्यवहार करतो; त्या अर्थाने त्यांनी काहीही केलं नाही. विचार, चिंतन, योजना, नियोजन, आढावा, कार्यपद्धती असे काहीही त्यांच्या जीवनात नव्हते. विश्वचालक अचिंत्य शक्ती त्यांच्या माध्यमातून या जगासाठी कार्य करीत होती. योगायोग असा की असे असूनही ते केवळ इतिहासातील कल्पनेत अडकून पडणार नव्हते. नव्या युगाला हव्या असणाऱ्या प्रत्यक्ष पुराव्याच्या रुपात ते जगाला लाभणार होते. छायाचित्रण, लेखन, प्रकाशन, विज्ञान या माध्यमातून दंतकथा वाटावी असे हे जीवन त्यांच्या काळातच नव्हे तर भविष्यासाठीही प्रत्यक्ष झाले.

त्यांच्या जीवितकाळातच लोकांना त्यांच्या महात्मतेची आणि अपूर्वतेची जाणीव होऊ लागली होती. अनेक देशी विदेशी सुबुद्ध सुज्ञ लोक त्यांना भेटत असत. श्री रामकृष्ण स्वतःदेखील पुष्कळांना भेटत असत. अशा अनेक लोकांनी त्यांच्याविषयी आपले अभिप्राय दिलेले आहेत. त्यांच्या जीवितकाळानंतर देखील अनेकांनी त्यांच्या जीवनाचे अनुशीलन केले आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे, करीत आहेत.

विविध संप्रदायांचे आचार्य, विविध शास्त्रांचे अधिकारी पंडित त्यांना भेटून जाणून घेण्याचा प्रयत्न करत. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती १५ डिसेंबर १८७२ ते १५ एप्रिल १८७३ या काळात कोलकात्यात मुक्कामाला होते. श्री रामकृष्णांना हे कळल्यावर एक दिवस ते त्यांना भेटायला गेले. त्याच वेळी ब्राम्ह समाजाचे एक नेते केशवचंद्र सेन दयानंद सरस्वती यांना भेटायला आले. सेन यांना श्री रामकृष्ण ओळखत होते. त्यांना पाहताच श्री रामकृष्णांची समाधी लागली. त्याबद्दल कॅप्टन विश्वनाथ उपाध्याय यांच्याजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दयानंद सरस्वती म्हणाले, 'आपण फक्त वेद वेदांताचा अभ्यास करतो. परंतु त्या शास्त्रांचं फळ मला या महान आत्म्यात पाहायला मिळालं. त्यांना पाहिलं की समजतं की, पंडित फक्त ताक पितात तर यांच्यासारखे महान आत्मे नवनीत मटकावत असतात.'

राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेल्या ब्राम्ह समाजाच्या अनेक नेत्यांना श्री रामकृष्ण भेटले होते. महाकवी रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांना भेटायला ते त्यांच्या जोडासांको येथील निवासस्थानीही गेले होते. श्री रामकृष्णांवरील पहिला लेख २८ मार्च १८७५ रोजी Indian Mirror मध्ये प्रकाशित झाला होता. ब्राम्ह समाजाचा प्रचार करायला युरोप, अमेरिका, जपान इत्यादी देशात जाऊन आलेले प्रतापचंद्र मुजुमदार यांनीही १६ एप्रिल १८७६ रोजी Sunday Mirror मध्ये श्री रामकृष्णांवर लेख लिहिला होता. ख्रिश्चन मिशनरी जोसेफ कुक आणि मेरी पिगॉट २३ फेब्रुवारी १८८२ रोजी गंगेच्या प्रवाहात नावेवर श्री रामकृष्णांना भेटले होते आणि त्यांनीही २६ फेब्रुवारी १८८२ रोजी त्यांच्यावर लेख लिहिला होता.

शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलेले, प्रसिद्ध विचारक, लेखक, संस्कृत व्याकरणावर पुस्तक लिहिणारे आणि बंगाली साहित्याला नवीन वळण देणारे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचीही श्री रामकृष्णांशी भेट झाली होती. त्यावेळी झालेल्या संभाषणात श्री रामकृष्ण त्यांना म्हणाले होते, 'ब्रम्ह ही एकच गोष्ट अद्याप उष्टी झालेली नाही.' (ब्रम्ह काय हे अजून कोणीही तोंडाने सांगू शकलेले नाही.) पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर या वाक्याने एकदम प्रभावित झाले होते. आपल्याला नवीन प्रकाश लाभला असे उद्गार त्यांनी काढले होते.

महाकवी रवींद्रनाथ टागोर २ मे १८८३ रोजी ब्राम्ह समाजात श्री रामकृष्णांना भेटले होते. नंतर १९३६ साली श्री रामकृष्ण यांच्या शताब्दी निमित्त त्यांनी त्यांच्यावर इंग्रजी आणि बंगालीत कविताही केल्या होत्या. याच जन्मशताब्दी निमित्त १ मार्च ते ८ मार्च या काळात कोलकात्याला एक धर्मपरिषद भरवण्यात आली होती. एकूण १५ सत्रांमध्ये जगभरातील अनेक विद्वान, विचारवंत सहभागी झाले होते. त्यातील ३ मार्चच्या संध्याकाळच्या सत्राचे अध्यक्षपद रवींद्रनाथ टागोर यांनी भूषवले होते. धर्म नाकारण्याच्या या काळात श्री रामकृष्ण यांनी प्रत्यक्ष अनुभूतीच्या आधारे भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे सत्य सिद्ध केले, असे भावपूर्ण गौरवोद्गार त्यांनी त्या अध्यक्षीय भाषणात काढले होते.

वंदे मातरम गीताचे रचयिता बंकिमचंद्र चॅटर्जी हेदेखील अधर सेन यांच्या घरी श्री रामकृष्णांना भेटले होते. इंग्रजी रीतिरिवाजांचा पगडा असलेले बंकिमचंद्र, त्यावेळी समाधीच्या उन्मनी अवस्थेत श्री रामकृष्णांनी केलेल्या नृत्य गायनाने इतके प्रभावित झाले की, जाताना त्यांनी श्री रामकृष्णांची पायधूळ मस्तकी लावून त्यांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यांचे निमंत्रण मात्र तसेच राहिले.

'फिनिक्स', 'ट्रिब्युन', 'लीडर', 'प्रदीप', 'प्रभात' या नियतकालिकांचे संपादक राहिलेले नागेंद्रनाथ गुप्ता; आर्यधर्म प्रचारिणी सभेचे संस्थापक आणि 'धर्मप्रचारक'चे संपादक कृष्णप्रसन्न सेन; 'संध्या' आणि 'स्वराज'चे संपादक भवानीचरण बॅनर्जी आणि उपाध्याय ब्रम्हबांधव यांनीही आपल्या लेखणीद्वारे श्री रामकृष्णांचे जीवन, कार्य आणि तत्वज्ञान देशविदेशात पोहोचवले होते. त्यांचे भक्त, शिष्य, ते ज्या काली मंदिरात पुजारी होते ते मंदिर उभारणारी राणी रासमणी आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांच्यावर वेळोवेळी उपचार करणारे डझनभराहून अधिक डॉक्टर्स या सगळ्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले, बोलले आहे. स्वामी विवेकानंद यांना तर त्यांचे इंग्रजीचे प्राध्यापक हेस्टी यांनीच प्रथम श्री रामकृष्ण यांच्याबद्दल सांगितले होते.

हिंदी साहित्यातील प्रसिद्ध छायावादी कवी 'निराला' यांच्यावरही श्री रामकृष्ण यांचा मोठा प्रभाव होता. 'समन्वय' मासिकाच्या १९२२ च्या मे-जूनच्या अंकात निराला यांनी श्री रामकृष्णांवर पहिला लेख लिहिला होता. त्यानंतर १९२३ च्या मार्च-एप्रिल अंकात 'श्री रामकृष्ण आणि राष्ट्रीय जीवन' हा दुसरा लेख लिहिला होता. भारताच्या राष्ट्रीय सत्वाची मर्मग्राही चिकित्सा निराला यांनी त्या लेखात केली होती. 'मतवाला' साप्ताहिकाच्या ५ एप्रिल १९२४ च्या अंकातही निराला यांनी श्री रामकृष्णांवर लेख लिहिला होता. श्री रामकृष्ण केवळ विश्वगुरु नाहीत तर प्रत्यक्ष सत्य आहेत अशी निराला यांची धारणा होती. 'समन्वय'च्या एप्रिल-मे १९२९ च्या अंकात, 'माधुरी' मासिकाच्या मार्च १९३२ च्या अंकात देखील निराला यांनी श्री रामकृष्णांवर लेख लिहिले होते. त्यांच्या कवितांवर सुद्धा श्री रामकृष्ण तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. एक कविता तर त्यांनी श्री रामकृष्णांचे अंतरंग शिष्य स्वामी प्रेमानंद यांच्यावर लिहिली आहे.

Indology चे विद्वान प्राध्यापक मॅक्समुलर यांचा स्वामी विवेकानंद यांच्याशी पत्रव्यवहार झाला होता आणि त्याआधारे त्यांनी श्री रामकृष्णांवर थोडेबहुत लिहिलेही होते. १९१५ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणारे रोमा रोला यांनी तर श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे लिहिली होती. त्यांनी ही चरित्रे प्रसिद्ध मनोचिकित्सक, आधुनिक मानसशास्त्राचे प्रणेते सिगमंड फ्रॉइड यांनाही पाठवली होती. फ्रॉइड यांनी रोमा रोला यांच्या त्या पत्राला उत्तर द्यायला तब्बल दीड वर्ष लावलं होतं. श्री रामकृष्णांचा माँ कालीचा अनुभव हा 'ocean of spirit boundless, dazzling' असा असल्याचे रोमा रोला यांचे म्हणणे होते. या 'oceanic feeling' वर आपले मत काय असेही रोमा रोला यांनी फ्रॉइडला विचारले होते. त्यावर त्याने या अनुभवाची सांगड मृत्यूच्या इच्छेशी घातली होती. श्री रामकृष्णांच्या या अनुभवाने आपली शांति भंग केली असेही त्याने म्हटले होते. अर्थात आध्यात्म आणि त्याची भारतीय धारणा आणि परंपरा याची काहीही जाण नसल्याने फ्रॉईडला श्री रामकृष्णांचे अनुभव आणि तत्त्व आकलन होणे कठीणच होते. एवढेच नाही तर त्यांचे चरित्र लिहिणारे रोमा रोला यांनाही त्याचे यथायोग्य आकलन होऊ शकले नव्हते. दोघांनीही विश्वविषयक आणि जीवनविषयक आपल्या मर्यादित आणि पाश्चात्य आकलनात श्री रामकृष्णांना बसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबद्दलचे या दोघांचे कुतूहल मात्र प्रामाणिक होते. नंतरही अनेक पाश्चात्य अभ्यासकांनी श्री रामकृष्ण समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मानवी तर्क आणि पुस्तकी पांडित्य यात गुरफटल्याने त्यांना श्री रामकृष्णांचे नीट आकलन तर दूरच, उलट ते मनोरुग्ण होते इत्यादी भ्रम त्यातून निर्माण झाले. अर्थात योग्य आध्यात्मिक धारणेतून श्री रामकृष्णांची मांडणी करणारे पाश्चात्य विद्वानही आहेतच.

वर्तमान युगाच्या व्यक्तिवाद आणि स्वातंत्र्य या मूल्यांना ठोस व भक्कम अन तोही अनुभूत आधार देण्याचे युगप्रवर्तक ईश्वरी कार्य करण्यासाठी श्री रामकृष्ण या जगी आले होते. स्त्री, पुरुष, पंथ, संप्रदाय, भाषा, भूगोल, जातीपाती हे सगळे बाजूस सारले जाण्याचा काळ आलेला आहे; व्यक्तीचे महत्व अतोनात वाढणार असल्याने समाजव्यवस्था विस्कळीत होणार आहेत. ऐहिक भोग आणि भोगलालसा चरम सीमेवर पोहोचणार आहेत. परिणामी कट्टरता वाढेल. अशा काळात सगळ्यांना धरून ठेवणारे तत्त्व काय असेल, सगळ्यांना जीवनाचा आशय आणि अर्थ प्रदान करणारे तत्त्व काय असेल; ते श्री रामकृष्णांनी जगाला प्रत्यक्ष दाखवून दिले. ते तत्त्व म्हणजे निरुपाधिक ईश्वरी तत्त्व. सगळ्या अस्तित्वाचा लय ज्यात होतो असं तत्त्व. एकीकडे या ईश्वरी तत्त्वाचं चालतं बोलतं रूप असलेले श्री रामकृष्ण आणि दुसरीकडे - या विश्वाचं जे काही आदिकारण असेल ते आमच्या मुठीत असलं पाहिजे. त्या आदिकारणाने आमच्या आज्ञेने चालायला हवं; असा हट्ट करणारा पाश्चात्य विचार. अशी ही स्थिती आहे. त्यामुळे पश्चिमेतील मी मी म्हणणाऱ्या लोकांनाही श्री रामकृष्णांचं आकलन होऊ शकलं नाही तर त्यात आश्चर्य नाही. मात्र, या जगाची सूत्र आपल्या मुठीत घेण्याच्या भूताने झपाटल्याने उत्पन्न होणारे रोजचे नवनवे प्रश्न आणि त्रास; अखेर तो प्रयत्न सोडून देण्याला बाध्य करतील हे निश्चित. त्यावेळी पुढे काय हा प्रश्न घेऊन उभे असलेल्या मानवजातीला मार्ग दाखवायला श्री रामकृष्ण उभे आहेत.

- श्रीपाद कोठे

रविवार, १४ मार्च २०२१