गुरुवार, २ जून, २०१६

पहा विचार करून...


१५ मे रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात येतो असे वृत्तपत्रातून लक्षात आले. रोज असा कोणता ना कोणता दिवस साजरा करण्याची गरज संयुक्त राष्ट्रसंघाला जाणवते यातच वर्तमान जागतिक व्यवस्था व वातावरणाचे अपयश लपले आहे. नेमक्या याच दिवशी, वृत्तपत्रात महात्मा गांधींचे नातू कनू गांधी अन त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. शिवा लक्ष्मी दिल्लीतील एका वृद्धाश्रमात राहत असल्याचे प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधी यांचे चिरंजीव रामदास गांधी यांचे कनू गांधी हे पुत्र. वय ८७ वर्षे. स्वाभाविकच ही बातमी वाचल्यावर मनात कणव निर्माण होते. याच बातमीत दुसरे एक प्रसिद्ध गांधी- तुषार गांधी यांची या बातमीवरील प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. तुषार गांधी म्हणतात- `कनू गांधीच यासाठी दोषी आहेत. त्यांचे कधीच कुणाशी पटत नाही, पटू शकत नाही. आम्ही आणि गांधीजींशी संबंधित सगळ्या संस्था त्यांचा सांभाळ करायला तयार असतानाही त्यांच्या स्वभावामुळे, वागण्यामुळे ते टिकत नाहीत.' तुषार गांधी यांच्या या प्रतिक्रियेत काही अन्य रंगही असू शकतील. मात्र याच प्रतिक्रियेत त्यांनी मांडलेला एक मुद्दा मात्र अधोरेखित करून लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणाले- गांधीजींच्या वारसांना सांभाळणे हे सरकारचे काम नाही. अन त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे पटण्यासारखे आहे. मात्र तुषार गांधी यांची प्रतिक्रिया क्षणभर बाजूस ठेवून कनू गांधींचा विचार केला तर काय जाणवते? आजच्या त्यांच्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार असू शकतात. कारण ते स्वत: उच्च विद्याविभूषित असून २५ वर्षे अमेरिकेत राहिले आहेत. त्यांनी नासा सारख्या संस्थेत काम केले आहे. ते आपल्या आयुष्याचे नीट नियोजन करू शकले नाहीत का? की आणखीन काही... अशा प्रकरणी सामान्य माणसापासून मोठ्या लोकांपर्यंत सगळ्यांच्याच प्रतिक्रिया गोंधळलेल्याच राहतात. याचे कारण आहे, आपण पुरेशा गांभीर्याने या गोष्टींचा विचारच करीत नाही.
कधी कधी वाटते की, आपण अति भावनावशतेच्या युगात वावरतो आहोत की काय. अन वृद्धांच्या संबंधातही याच भावनावशतेतून विचार करतो की काय? वृद्धांचा विचार करताना वृद्धांच्या समस्या, वृद्धांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, अन मूळ वृद्धावस्था या तीन अंगांनी विचार करणे आवश्यक आहे. यातील एकाचाही धड विचार आज होताना दिसत नाही. `आम्हाला त्यांनी जन्म दिला आहे. आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांचे ऋण फेडणे आमचे कर्तव्य आहे,' एवढाच विचार होताना दिसतो. अन हा विचार टोकाला पोहोचला की, विवश कर्तव्यबोधात परिणत होऊन एक प्रकारचा inferiority complex निर्माण होतो. आज बहुश: हेच चित्र दिसते.
वृद्धांच्या वेगळ्या समस्या असतात. हातपायच नव्हे, तर कान, डोळे, मेंदू, मन, स्मृती सगळेच थकलेले असते. त्यामुळे परावलंबन येते. स्वत: जे काही करतात तेदेखील व्यवस्थित करू शकत नाहीत. हातून वस्तू पडून जाणे, चालताना अंग कापणे, अडखळणे, सामान्य व्यक्ती १० पावले चालून जाईल तेवढ्या वेळात दोन पावले चालणे, विजेची बटने बंद करायला विसरणे, नळाच्या तोट्या बंद करायचे राहून जाणे, दार बंद करता न येणे किंवा बंद दार उघडता न येणे, खायला-जेवायला वेळ लागणे, कधी कधी खाताना सांडणे, वाहनात बसताना- उतरताना वेळ लागणे, त्रास होणे, स्वत: मोठ्याने बोलणे आणि दुसऱ्यांनी मोठ्याने बोलावे ही अपेक्षा; अशा असंख्य गोष्टी असतात. यातून त्यांना स्वत:ला शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक त्रास होतोच, शिवाय त्यांच्या सोबत राहणाऱ्यांनाही त्रास होतो. आज लाखो घरे अशा गोष्टींनी त्रासलेली आहेत. अनेक घरे तर या त्रासांच्या जोडीला असलेल्या शारीरिक वा मानसिक आजारांनी रया घालवून बसली आहेत. रोजच्या व्यवहारातील एक त्रास अनेकदा पाहायला मिळतो. लघुशंका केल्यानंतर न्हाणीघरात पाणी व्यवस्थित न टाकणे. एक तर मुळात म्हातारपण म्हणा, त्यातच औषधे आदींची भर; त्यामुळे लघुशंकेला उग्र असा दर्प असतो. त्यात न्हाणीघराची निगा योग्य पद्धतीने राखली गेली नाही तर सगळ्या घराला त्रास होतो. भरीसभर घरी कोणी आले की आणखीन पंचाईत. अशा वेळी घरच्या अन्य सदस्यांची चिडचिड होणे, त्रागा होणे स्वाभाविक असते. एकूणच वागण्याबोलण्यात आलेली बेफिकिरी, अनावश्यक अघळपघळपणा, कुठे काय बोलायचे याचे भान नसणे, वस्तू घेतल्या तिथे टाकून देणे; अशाही गोष्टी आढळतात. आपण अर्थहीन होत असून संपत चाललो आहोत या जाणीवेतून मुद्दाम त्रास देण्याची वृत्तीही आढळून येते. या साऱ्याचा त्यांनाही त्रास होतो अन इतरांनाही. त्यांनी हा त्रास किती सहन करायचा आणि बाकीच्यांनी का, किती अन कुठवर सहन करायचा असे प्रश्न निर्माण होतात.
बदललेल्या परिस्थितीचाही विचार अपरिहार्य ठरतो. घरोघरी कमी झालेली माणसांची उपलब्धता, स्त्री व पुरुष दोघांचेही काम करणे, मुलांचे अभ्यास- करीयर इत्यादी वर्तमान समाजाचे वास्तव आहे. यातील कोणाला काय सोडायला वा थांबवायला सांगायचे? तसे सांगणे योग्य ठरेल का? वयाच्या साधारण ७० च्या पुढे हे प्रश्न वाढतात आणि गुंतागुंतीचे होत जातात. उपदेशात्मक आणि भावनात्मक आवाहने अन विश्लेषणे ऐकायला कितीही चांगली व उदात्त वगैरे वाटली तरीही त्याचा ना वृद्धांना उपयोग असतो, ना त्यांचे करावे लागणाऱ्या बाकीच्यांना. अनेकदा तर दोन्ही बाजूंना मोठी क्षुब्धता, अशांती, असमाधान निर्माण होते. त्यात अनेक गोष्टींचा बळी जातो.
सरकारे याबाबत काय करतात वा करू शकतात? एक तर पेन्शन वा अन्य मार्गांनी पैसा देणे; अन दुसरे म्हणजे त्यांच्या समस्या लक्षात घेऊन कायदे करणे. जसे - सगळीकडे लिफ्ट अथवा स्लोपिंग असावे, आधारासाठी कठडे असावे, वाहनांमध्ये आसने आरक्षित असावीत, आवाजावर मर्यादा... इत्यादी. पण या नियमांची अंमलबजावणी होते की नाही, करण्यात आलेल्या सोयी नीट चालतात की नाही आणि त्यांची निगा राखली जाते की नाही, या सोयी पुरवण्यातील अडचणी, सोयी निर्माण करून वृद्धांचे त्रास संपतात का याचा आढावा घेणे; अशा अनेक गोष्टी कामांचा अनावश्यक फापटपसारा वाढवून ठेवतात. पैसा देणे हा तर उपाय होऊच शकत नाही. आज विविध बँका अथवा डाक कार्यालये येथे जाऊन पाहिले तरी वृद्धांना पैसा प्राप्त करण्यासाठी होणारे त्रास लक्षात येतील. अर्थात ते करण्याची इच्छा अन फुरसत कोणाकडेही नाही. आपण जिवंत आहोत यासाठी द्यावयाच्या प्रमाणपत्रापासून, जाणेयेणे, तहान- लघुशंका- कान, डोळे, शरीर यांच्या कमी होणाऱ्या शक्तीचे परिणाम- त्यामुळे फॉर्म भरता न येणे, सही नीट न येणे इत्यादी अडचणी... अशा असंख्य गोष्टी. शिवाय पैसे मिळाले तरीही विविध बिले भरण्यासाठी जाणे, रांगेत उभे राहणे अशा गोष्टी असतातच.
सगळे बाजूला ठेवले तरीही बाहेर वा घरात सुरक्षा हा मुद्दा उरतोच. कॅमेरे बसवले तरीही त्याने घटना थांबवता येत नाहीत. शिवाय सुरक्षा म्हणजे केवळ गुंडांपासूनची सुरक्षा नव्हे. तोल जाऊन पडणे, चक्कर येणे, न्हाणीघराचे दार लागून जाणे, किंवा अनामिक भय यांचे काय? बरे सगळे घटक योग्य आहेत असे धरले; जसे पैसा आहे, घरदार आहे, मुले- सुना- नातवंडे आहेत- तरी समस्या वा त्रास नसतात का? एखाद्या वृद्धाला अचानक काही त्रास सुरु झाला तरीही त्याबाबत कळणे आणि मुलाने, सुनेने घरी येऊन त्यांना घेऊन जाणे यासाठी लागणारा वेळ कसा भरून काढायचा? आजकाल वाढत्या शहरांमुळे हा वेळ वाढतच जाणारा राहील. ही सगळी चर्चा मुख्यत: शहरी भागातील, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नसलेल्या अन बऱ्यापैकी सुशिक्षित वर्गाच्या संदर्भातीलच आहे. पण ग्रामीण भाग, आर्थिक विपन्न समाजबांधव, अशिक्षित वर्ग यातील वृद्धांचे प्रश्न आणि समस्या तर आणखीनच भीषण आहेत. केवळ पैसा, सुविधा अन गोडबोलेपणा यांनी त्या दूर होऊ शकतील का?
याच्याही पलीकडचा एक प्रश्न म्हणजे मानसिकता अन रितेपणा. जगाच्या दृष्टीने निरर्थक होत जाणे, उपभोगाच्या दृष्टीने क्षीण होत जाणे, आयुष्यभराच्या अनुभवांती येणारा तोचतोचपणाचा कंटाळा, अन मृत्यूची चाहूल; या साऱ्याचे काय? त्या संदर्भात तर आज कुठेही चर्चा होताना दिसत नाही. केवळ पैसा, सुविधा, आरोग्य, नातीगोती यापलीकडचे हे विषय आहेत. आतापर्यंत चर्चा केलेल्या सगळ्या घटकांचा संकलित सखोल विचार करून याबाबत उपाययोजना करणे आवश्यक ठरते. केवळ शिळ्या कढीला उत आणल्यासारखे, वृद्धांमध्ये कृत्रिम उत्साह- कृत्रिम चैतन्य- कृत्रिम जीवेच्छा- निर्माण करणे हास्यास्पद ठरते. त्यापेक्षा व्यावहारिक आणि भावनिक वास्तवावर घट्ट पाय रोवून याकडे पाहिले पाहिजे.
प्राचीन भारतीय शास्त्रात उल्लेख असलेल्या आश्रम व्यवस्थेचा या अनुषंगाने विचार व्हायला हवा. प्राचीन भारतीय चिंतन म्हटले की नाके मुरडणे अन `वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेली कीड' या सुविचाराच्या माऱ्याने झालेले बधिरीकरण; याबाहेर पडून या विषयाकडे पाहायला हवे. आजचे वृद्धाश्रम ही निखालस उचलून धरावी अशी गोष्ट नाही. सेवाभाव म्हणून चालणारे वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात केविलवाणे असतात. अन केविलवाणे असले वा नसले तरीही तेथे ठेवण्यात येणारे वृद्ध अन अशी सेवाकार्ये यामागील भावना माणूस म्हणून अधोगतीला नेणारी आहे. समाजात व्यावसायिक वृद्धाश्रम देखील आहेत. मात्र त्यांचा उदेशच व्यावसायिक असल्याने त्याबाबत बोलण्यात अर्थ नाही. समाजाला लाचारी, दुरावा, नकोसेपण, व्यावसायिकता यापासून दूर; आणि वृद्धांचे जीवन सुकर व सार्थ करणारी, त्याचवेळी बाकीच्यांना गृहीत न धरणारी अशी व्यवस्था हवी आहे. अशी व्यवस्था तयार करून, नियोजन करून, लादून होणार नाही. ती विकसित व्हावी लागेल. या विषयाची व्यापक सार्वत्रिक चर्चा हे त्याचे पहिले पाऊल राहील. तरीही ही व्यवस्था कशी असू शकेल याचे एक कल्पनाचित्र-
१२ वर्षांचे एक तप असे म्हणतात. त्याला धरून, जीवनाची सहा तपे पूर्ण झाल्यानंतर म्हणजे वयाची ७२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वृद्धांसाठीच्या स्वतंत्र आश्रमात राहायला जाणे. ७२ व्या वर्षी कौटुंबिक जीवन संपुष्टात येईल अशी सामाजिक व्यवस्था असावी. यानंतर कुठलीही आर्थिक वा अन्य सुविधा देण्यात येऊ नये. वैयक्तिक संपत्ती व मालमत्तेची व्यवस्था त्यांनी त्यांच्या इच्छेने करावी आणि कफल्लक होऊन आश्रमवासी व्हावे. यानंतरची सगळी व्यवस्था सरकार आणि समाज यांनी करावी. तसे करणे त्यांना बंधनकारक असावे. या स्वतंत्र आश्रमांची व्यवस्था परिपूर्ण असावी. एकट्या वृद्धासाठी वा जोडप्यासाठी स्वतंत्र खोल्या असाव्यात. जेवणखाण, कपडेलत्ते, औषधपाणी, वैद्यकीय व्यवस्था, मंदिर, संगणक, ग्रंथालय, वृत्तपत्रे; अशा एक ना अनेक; सगळ्या प्रकारच्या व्यवस्था तेथे असाव्यात. त्यासाठीचा खर्च सरकार अन समाजाने करावा. सरकारचा पेन्शन, अन्य सुखसोयी अथवा सवलती यासाठी होणारा खर्च आणि प्रत्येक व्यक्ती वा कुटुंबाचा त्यासाठी होणारा खर्च या आश्रमांकडे वळवता येईल. अधिकच्या खर्चाची तरतूद करणेही कठीण नाही. कोणत्याही वृद्धाला कोणत्याही कारणासाठी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही अशी या आश्रमांची व्यवस्था राहावी. ही व्यवस्था पाहणारे, राबवणारे, देखभाल करणारे व्यावसायिक लोक असावेत. २४ तास पाळीनुसार ते कामे करतील.
वयाचे ७२ वे वर्ष हे फार होत नाही हे खरे. या वयात माणूस नीट हालचाली वगैरे करू शकतो हेही खरे. पण एकदम गलितगात्र झाल्यावर टाकून दिल्यासारखे स्वतंत्र व्यवस्था करणे योग्य नाही. त्यापेक्षा परावलंबीत्व दृष्टीच्या टप्प्यात येऊ लागताच, पुढील दृष्टीने मनाची तयारी अन सवय म्हणून हे वय योग्य राहील. जे वृद्ध काही काम करू इच्छितात, ते आश्रमाच्या कामात अथवा सामाजिक वा सरकारी कामात सहभागी होऊ शकतील. अर्थात आश्रमात राहण्याच्या मर्यादेत अन त्यांच्या क्षमतेनुसार आणि बिना मोबदला. ५०- १००- २०० अशा संख्येने हे आश्रम असावेत. असे आश्रम तालुका स्थानीच असावेत. याचे दोन लाभ होतील- १) सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त आरोग्यदायी जीवन वृद्धांना मिळेल, २) लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होईल. शहरांवरील भार आणि गावांचे बकालपण काही प्रमाणात नियंत्रित होईल. वृद्धांचा परस्परांना आधार राहील. सुखदुःखात साथ राहील. समान सुखदु:खे असल्याने, शरीराचे अन मनाचे वेग साधारण सारखे असल्याने फरपट होणार नाही. अधूनमधून त्यांच्या सहली वगैरे अर्थात राहाव्यातच. कुटुंबीयांनी भेटायला जाणे किंवा फार नाही (अगदी वाढदिवस, आठवण आली वगैरे) पण लग्नकार्य अथवा मरण अशा प्रसंगी वृद्धांनी घरी जाऊन येण्याची सोय असावी.
मात्र हे होईल का? अन कसे होईल? हे अगदी खरे आहे की, अनेक पातळ्यांवर अनेकांचा अनेक कारणांनी याला विरोध राहील. वृद्धांचाही विरोध राहू शकेल. आपणच आपल्याभोवती उभारलेल्या चौकटी, आपल्याच भावनांचे अन विचारांचे भोवरे यामुळेही विरोध राहील. पैसा, मालमत्ता, अधिकार हातून सोडण्याची तयारी राहणार नाही. माझे लोक वगैरे तर राहीलच. याची थट्टामस्करीही होईल. या साऱ्यासाठी भारतीय आध्यात्मिक विचार आवश्यक आहेत. त्यातही मृत्यूचा विचार आवश्यक. खरे तर मृत्यूचा विचार संपूर्ण जीवनासाठीच आवश्यक आहे. मृत्यूचा विचारच जीवनाचा अर्थ, आशय आणि अभिव्यक्ती घडवीत असतो. मृत्यूचा विचारच जीवनाकडे पाहण्याची दृष्टी विकसित अन प्रगल्भ करतो. एकूणच समाजाने आध्यात्माचा अन मृत्यूचा गांभीर्याने विचार करणे अन वृद्धांनी तर हा विचार अगत्याने अन अग्रक्रमाने करणे आवश्यक. यामुळे म्हातारपण तर सुखी होईलच, पण अपरिहार्यपणे निर्माण होणारी रिक्ततादेखील दूर होईल. जंजाळातून बाहेर पडणे हे अनेक प्रकारच्या गुंतागुंतीतून, त्रासातून बाहेर पडणे असते. जंजाळ न सोडण्यानेच रक्तदाब, मधुमेह अन निद्रानाश असे विकार सतावतात. असंख्य ताणतणाव `धरून ठेवण्यानेच' मागे लागतात. आजचे बहुतांश विकार अन व्याधी जीवनदृष्टीशीच संबंधित आहेत. ती दृष्टी विकसित केली की अनेक बाबी सुरळीत होतील. आज धर्म, देव, आध्यात्म या नावाने जे सुरु आहे ते दुर्दैवाने योग्य मार्गावर नाही. ते माणसाला आध्यात्मिक बनवून मुक्ततेच्या मार्गावर नेण्याऐवजी माणसाला अधिकाधिक ऐहिक अन दुबळे बनवण्यात गुंतले आहे. त्यांनी अधिक सघन आणि सार्थक पसायदान समाजाला देण्याची गरज आहे. सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक व्यवस्थेच्या अंगानेही याचा विचार व्हायला हवा.
पहा विचार करून...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १ जून २०१६