शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

संघ, संघटना, संघटीत समाज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा, हा हिंदू नववर्षाचा प्रारंभदिन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा हा जन्मदिन. संघात हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनच साजरा केला जातो, डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून नव्हे. अर्थात डॉ. हेडगेवार यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे संघात सतत स्मरण, चिंतन होत असते. त्यामुळे या प्रसंगी ते प्रमुखतेने होणे स्वाभाविकच ठरते. डॉ. हेडगेवार यांनी आपल्या १५ वर्षांच्या संघकामात अनेक मुलभूत गोष्टींची पायाभरणी केली होती. त्यावरच मग संघाचे विशाल कार्य उभे झाले. त्यातीलच एका मुलभूत विचाराचे या वर्ष प्रतिपदेनिमित्त प्रकट चिंतन.

डॉ. हेडगेवार नेहमी म्हणत असत, की आपल्याला संघाची ज्युबिली साजरी करायची नाही. अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. ५० वर्षे, ६० वर्षे, ७५ वर्षे, ८० वर्षे, १०० वर्षे... अशी वर्षांची उतरंड वाढवीत जायचे आणि आपली संस्था इतकी जुनी आहे वगैरेचे गोडवे गात, किती वर्षे संस्था चालली त्यावरून तिची थोरवी ठरवावी; हे संघाच्या संदर्भात त्यांना अभिप्रेत नव्हते. संघ खूप काळ चालत राहावा वगैरे त्यांची कल्पना नव्हती, हे स्पष्टच आहे. परंतु मग प्रश्न निर्माण होतो की, मग संघ काढला कशाला? आणि तो चालवायचा तरी कुठवर? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही गोष्टी थोड्या नीट समजून घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, संघ हिंदूंचे संघटन करतो. कशासाठी हे संघटन करतो? हिंदू समाज सुसंघटीत करण्यासाठी. सारख्या भासणाऱ्या पण अतिशय वेगळ्या असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. इंग्रजीतील शब्दाचा उपयोग करून ही फोड करता येईल. संघ काय करतो, hindu organisation करतो. कशासाठी करतो? organised hindu society साठी करतो. organisation आणि state of being organised या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संघाला हिंदू समाजाअंतर्गत एखादे संघटन उभे करायचे नाही, असे म्हटले जाते त्याचाही हाच अर्थ आहे. संघाला हिंदूंचे एखादे संघटन तर उभे करायचे नाहीच, पण संपूर्ण समाजाचेही संघटन करायचे नाही. संघाला संघटीत हिंदू समाज उभा करायचा आहे.

एखादी व्यक्ती खूप organised आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा होतो की, ती व्यक्ती गडबड गोंधळ करीत नाही. साऱ्या गोष्टी वेळच्या वेळी करते. रुमाल राहिला, पाकीट विसरलो, बिल भरायचं राहिलं अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीत संभवत नाहीत. एखादी अडचण उभी राहिली तर ती व्यक्ती हातपाय गाळत नाही. त्या व्यक्तीचे वेळेचे, पैशाचे नियोजन पक्के असते. ती आपत्तींना घाबरत नाही, केव्हा काय करायला हवे हे त्या व्यक्तीला नेमके कळते. कोण आपला, कोण परका हे त्याचे आडाखे योग्य असतात. आपण बनवले जात नाही याची ती व्यक्ती पूर्ण काळजी घेते. ही व्यक्ती विचारी, समजूतदार, विवेकी, निर्णयक्षम, समन्वय आणि संघर्ष दोन्हीची क्षमता असणारी अशी असते. थोडक्यात म्हणजे जीवन जगताना सुखी, सुरक्षित आणि सहज जीवन जगणारी व्यक्ती organised आहे असे आपण म्हणतो. हे सारे त्या व्यक्तीला कोणी सांगावे लागत नाही. प्रत्येक वेळी त्यासाठी त्याला प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तो त्याचा पिंड असतो, स्वभाव असतो. त्याचं अस्तित्वच त्या सगळ्या गुणांचा समुच्चय असतं.

समाजाच्याही बाबतीत असंच आहे. कोणतेही अभाव नसणारा, अभाव उत्पन्न झाले तर ते सहज दूर करणारा, भौतिक सुखसोयींनी समृद्ध, संपूर्ण समाज एक आहे या भावनेने ओतप्रोत, स्वत:सोबतच समाजाचा- सृष्टीचा- अन्य समाजाचा विचार करणारा, शत्रू आणि मित्र यांची पारख असलेला, कोणत्याही आपत्तीला समर्थपणे तोंड देऊ शकणारा; अशा समाजाला organised society म्हणता येईल. याच्या अभावी तो समाज विस्कळीत समाज आहे, असेच म्हटले जाईल. आपला समाज, म्हणजेच येथील राष्ट्रीय समाज असलेला हिंदू समाज, असाच विस्कळीत समाज आहे. तो सुव्यवस्थित झाल्याविना हा देश, हे राष्ट्र पुन्हा ताठ मानेने उभे राहू शकणार नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विश्लेषण होते. त्या दृष्टीने संघटीत समाज उभा करण्याचा संकल्प त्यांनी केला.

परंतु असा समाज उभा होण्यासाठी आणि हे सारे सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्तपणे होण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विशिष्ट स्तर आवश्यक आहे. या समाजाच्या विचारांना, विचार करण्याच्या पद्धतीला तसा घाट द्यावा लागेल, त्याच्या सवयी बदलाव्या लागतील, स्वभाव बदलावा लागेल. प्रदीर्घ काळ यासाठी प्रयत्न केल्यानंतर समाजाचा विशिष्ट पिंड तयार होईल, समाजाची वृत्ती तयार होईल. हे घडवून आणण्यासाठी एखादी यंत्रणा हवी. ही यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉ. हेडगेवार यांची ही दृष्टी नीट समजून घ्यायला हवी.

एखादी संघटना उभारायची आणि त्या संघटनेच्या भरवशावर समाजासाठी काम करीत राहायचे, अशी त्यांची दृष्टी नव्हती. समाजाला अशा बाह्य आधाराची गरज लागू नये, प्रत्येक गोष्टीला योग्य-अयोग्य असा प्रतिसाद देण्यासाठी समाज सक्षम असावा; अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. संघ संघटना म्हणून सगळ्या समाजाचे नियमन आणि नियंत्रण करील, अशी त्यांची कल्पना नव्हती. म्हणूनच ज्यावेळी डॉक्टरांना कोणी विचारले की, आमच्या वस्तीत काही गडबड झाली तर तुम्ही संघाचे स्वयंसेवक पाठवाल का? त्यावर ते गमतीने म्हणालेही, `मी माझ्या स्वयंसेवकांना पांघरूण घेऊन झोपायला सांगेन. तुम्ही जर वस्तीसाठी सज्ज होऊन उभे राहणार असाल तर तुमच्या मदतीसाठी मी त्यांना पाठवीन.' संघ काहीही करणार नाही; स्वयंसेवक सारे काही करतील, असेही ते म्हणत त्याचाही तोच अर्थ आहे.

अर्थात अशा आदर्श समाजाची उभारणी होईपर्यंत त्याला नीट सवयी लावण्यासाठी संघालाही, संघ म्हणून पुढे होऊन अनेकदा कामे करावी लागतील. त्यातूनच दिशादर्शन होईल, संस्कार होतील आणि सवयीही लागतील याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नव्हते. त्यामुळेच, रामटेकची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांचे दल पाठवणे असो किंवा नागपुरातील महालक्ष्मी दंग्याच्या वेळी मुकाबला करण्यासाठी स्वयंसेवकांचा उपयोग करून घेणे असो; या गोष्टीही त्यांनी केल्या आहेत. अर्थात `तात्कालिक' आणि `अंतिम' या दोन्ही गोष्टींचे अवधान डॉक्टरांनी नेहमीच राखले होते.

संघ हा सामाजिक काम करणारे संघटन, हे जसे त्यांना अपेक्षित नव्हते; तसेच संघ ही राजकीय संघटना हे देखील अपेक्षित नव्हते. राजकारणात पक्ष संघटन आणि सत्ता असे दोन भाग असतात. त्यात कोण वरचढ यासाठी चढाओढही असते. कम्युनिस्ट पद्धतीत संघटना श्रेष्ठ हे तत्वच आहे. काँग्रेसमध्ये यात परिस्थितीनुरूप बदल पाहायला मिळतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असताना सत्ता संघटनेपेक्षा श्रेष्ठ होती. काही वेळेला संघटना श्रेष्ठ असते. जसे सध्या आहे. संघाची आणि संघ संस्थापकांची ही कल्पना नव्हती. संघटना बांधून सत्ता हाती घेऊन समाजाचे भले होईल, या विचारावर मुळातच विश्वास नसल्याने तसा प्रश्नच उत्पन्न होत नाही. (संघ आणि राजकारण, तसेच जनसंघ- भाजपची उभारणी, आजची भूमिका वगैरे स्वतंत्र विषय आहे.)

डॉ. हेडगेवार यांची ही भूमिका पुढेही कायमच होती. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर सरसंघचालक पदी आलेले गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'

याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'

शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'

या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'

याचा अर्थ राष्ट्रजीवनात संस्था, संघटना राहणार नाहीत अथवा राहू नयेत असा नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की, कोणतीही एखादी संघटना राष्ट्रजीवनाचे निर्धारण करू शकत नाही. उलट गरजेनुसार आवश्यक त्या संघटना, संस्था उभ्या करण्याची, त्यात कालानुरूप परिवर्तन करण्याची आणि गतार्थ संस्था विलीन करण्याची शक्ती आणि विवेक राष्ट्रात सतत जागृत असायला हवा. त्यासाठी चार गोष्टींचा विचार आधारभूत मानायला हवा.
१) राष्ट्राविषयी सुयोग्य धारणा.
२) त्याच्या दृश्य स्वरूपाचे संरक्षण.
३) राष्ट्राच्या मूल्यव्यवस्थेबद्दल आस्था.
४) याविषयी बांधिलकीची भावना.

संघाचे तिसरे सरसंघचालक आणि संघात ज्यांची ओळख प्रति डॉक्टर हेडगेवार अशी आहे, त्या बाळासाहेब देवरस यांनीही यासंबंधात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. सरसंघचालक होण्याच्या पूर्वी १९६५ साली त्यांचे सहा अतिशय महत्वपूर्ण बौद्धिक वर्ग झाले. `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- लक्ष्य व कार्य' या शीर्षकाने त्याचे संकलन प्रकाशितही झाले आहे. संघाच्या कामाविषयी अनेक मूलभुत बाबींची त्यात चर्चा आहे. बाळासाहेब देवरस यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा सारांश असा-

`ज्या समाजातील व्यक्ती स्वार्थरहित होते, त्या समाजात सहज आणि स्वाभाविक सामर्थ्य निर्माण होते. आपल्या समाजात शक्तीचा जो वास्तविक स्रोत आहे, त्या स्वाभाविक सामर्थ्यास जागृत करण्यासाठी संघाचे कार्य चालले आहे. यावच्चंद्र दिवाकरौ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात ठेवण्याची आपली कल्पना नाही. राष्ट्र पुनरुत्थानाच्या ठिणग्यांचे चिरस्थायी वन्हीमध्ये रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार व त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हाही चारित्र्याचा महत्वाचा भाग आहे. शक्ती निर्माण करणे हीच आमची, जे अंतिम लक्ष्य आहे त्यासंदर्भातील भूमिका आहे. ते नीट न समजून घेतल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर संघ नसता तर आज जेवढ्या तात्कालिक समस्या आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर झाल्या असत्या. संघ प्रश्नांचा सम्यक विचार करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वारेच सदैव समाज शक्तिशाली राहील, असा संघाचा विचार नाही. समाजात परिवर्तन घडवू इच्छिणारा संघ हा एक प्रयत्न आहे.'

अर्थात याचा अर्थ संघ लगेच विसर्जित करण्याची वेळ आली आहे असा नाही. उलट आजची परिस्थिती पाहता आणखी शे-दोनशे वर्षे संघाची गरज राहू शकते. आपल्या राष्ट्राविषयी आस्था व बांधिलकी असणारे परंपरेने चालत आलेले घटक संघाबाहेरही विद्यमान होते. आज त्यांचेही क्षरण झाले आहे. त्यामुळे संघकार्याची गरज निर्विवादपणे आहे. मात्र त्याचवेळी संघाच्या कार्याबद्दल योग्य व स्पष्ट धारणा जेवढ्या अधिक प्रमाणात निर्माण होईल, तेवढेच अंतर्गत व बाह्य- समज, गैरसमज, व्यवहारातील अडथळे, अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि संघटीत हिंदू समाज उभा करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल.

- श्रीपाद कोठे
गुरुवार, ११ एप्रिल २०१३
नागपूर

घृणास्पद

आजचा दिवस आयुष्यात आलाच नसता तर फार बरं झालं असतं. घरच्या दोन वृक्षांचा आज बळी गेला आणि तो उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काहीही मी करू शकलो नाही. निराश, हतबल वगैरे सारं काही वाटते आहे आज. एक वृक्ष शेवग्याचा आणि दुसरा कडूलिंबाचा. अनेक दशके जुने हे वृक्ष. त्यांची खोडंच प्रत्येकी २००-३०० किलोची असतील. फेसबुकवर शेअर केलेली एक माहिती आठवली, एक झाडं किती प्राणवायू तयार करतं वगैरे. लाज वाटली स्वत:ची.

असं होतं तर का तोडली ही झाडं? मुळात शेवग्याच्या झाडाने जमीन सोडली होती. त्याचा स्वत:चाच भार त्याला सावरत नव्हता. ते पडण्याची भीती होती. आजूबाजूला दोन घरे होती. विजेच्या तारा होत्या. त्यामुळे ते तोडावं लागणारंच होतं. कडूलिंबाच्या झाडाचं मात्र तसं काहीही नव्हतं. ते मध्ये येत नव्हतं आणि वाकलं वगैरे तर मुळीच नव्हतं. नागपूरच्या जगप्रसिद्ध उन्हाळ्यात आजूबाजूची चार घरं थंड ठेवत होतं. उपकारच होते त्याचे. कडूलिंबाचे उपयोग वगैरे सगळं पाठ होतं. पण काहीही इलाज नव्हता.

कडूलिंबाचं झाड तोडावं लागलं त्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे शेजाऱ्याचं त्याच्याशी असलेलं शत्रुत्व. मागे काही वर्षांपूर्वी तर न सांगता सवरता चक्क आमच्या हद्दीतील ते झाड तोडून टाकण्याचा प्रयत्न शेजाऱ्याने केला होता. तो सतर्कतेने टाळता आला. पण त्याच्या मनात ते सलत होतंच. तो उघडपणे हे करत होता तरीही अन्य शेजाऱ्याचाही तोच ताल होता. दुसरे कारण होते, झाड तोडणारी माणसे. एवढे मोठे झाड आपण तोडणे शक्यच नव्हते. त्यासाठी माणसे बोलावली. त्यांची अट एकच. आम्ही शेवग्याचे झाड तोडतो, पण आम्हाला कडूलिंबाचेही झाड द्या. ते देणार नसाल तर शेवग्याचे झाड तोडण्याचे सहा हजार रुपये द्या. ज्यावेळी त्यांच्याशी बोलणी झाली तेव्हा त्यांचा सारा भर काही हजार रुपये घेण्यापेक्षा कडूलिंबाच्या झाडावरच होता. शेजाऱ्याला तर काय संधी आयतीच चालून आली. झाले. सौदा ठरला आणि दोन्ही वृक्ष पाहता पाहता नामशेष झालेत.

दोन झाडे गेलीत आणि असंख्य पक्षांची वसती उजाड झाली. खारूताईचं क्रीडास्थान धुळीस मिळालं. घराची सावली गेली. शुद्ध प्राणवायु युक्त हवा गेली. मनीम्याऊचं पाठ खाजवण्याचं साधन गेलं. आता पाखरं येतील आणि भिरभिर पाहत निघून जातील. जन्माला आल्यापासून एका जागी उभं राहण्याचं प्राक्तन नशिबी घेऊन आलेल्या या झाडांच्या बुंध्याला टेकून उभं राहिलं की, आपले भोग शीतल होत असत. आता ती शीतलता गेली.

काही गोष्टींना इलाज नसतो. इथे तर गरज, अपरिहार्यता, परिस्थितीची कोंडी; अशा पुष्कळ गोष्टी एकत्र झाल्या होत्या. त्यांनी बाजी मारली. इथपर्यंत ठीक आहे. म्हणूनच मनाची समजूतही घालता येईल. पण ही झाडे तोडल्यानंतर शेजाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि स्वरातून जो आनंद ओसंडून वाहताना पाहिला त्याचं काय करायचं? झाडे गेली त्याचं दु:ख आहेच, आपण काही करू शकलो नाही याचं त्याहून अधिक दु:ख आहे. पण शेजाऱ्यांच्या या आनंदाचं दु:ख नाही, घृणा वाटते. आणि थोडीथोडकी नाही अपार घृणा वाटते. चांगले शिकले सवरलेले. पूजापाठ, भागवत सप्ताह करणारे, गणपती अथर्वशीर्षाची आवर्तने करणारे ब्राम्हण, (मी जातीचा उल्लेखही करण्याचे टाळतो पण माझ्या मनातील चीड इतकी आहे की मी तो उल्लेख मुद्दाम केला.) वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या या साऱ्याशी परिचय, माणुसकी- पर्यावरण वगैरे शब्द माहीत नाही असे नाही... पण केवळ आणि केवळ मनाचा आणि बुद्धीचा कोतेपणा आणि क्षुद्रता, आळस आणि वृत्तीची दरिद्रता यासाठी वृक्षांचा राग आणि ते तोडल्यानंतरचा घृणास्पद आनंद.

आयुष्यातील एक दुर्दैवी घटना म्हणून मनाची समजूत घालेनही, दुसरं छानसं झाड लावून पुन्हा पाखरांना अंगणात बोलावीनही. पण शेजाऱ्यांच्या या छद्मी आनंदाचं काय करू सुचत नाही. काही तरी जोरदार ठेच लागावी अशी मनोमन इच्छा आहे. कधी कधी एखादी गोष्ट अयोग्य आहे हे माहिती असूनही मनाविरुद्ध ती करावी लागते. पण त्याचा आनंद होणे ही राक्षसी वृत्तीच आहे. म्हणूनच मला शेजारी राहणाऱ्या राक्षसांबद्दल मन मोठे वगैरे करायचेच नाही. पाहू या प्रभूच्या मनात काय आहे ते...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३१ मार्च २०१३

`आळीन माळीण फुले दे'

`little red flowers' नावाचा चीनी चित्रपट पाहिला. `निवासी बालवाडी'वरील हा चित्रपट. आपल्या येथे अजून तरी निवासी बालवाडी ऐकिवात नाही. छोट्या छोट्या मुलांचं जीवन. त्यांचं खाणं पिणं, खेळणं, रडणं, मैत्री, भांडणं, मारामाऱ्या, इब्लीसपणा, त्यांचं विश्व... आणि हे सगळं हाताळणाऱ्या त्यांच्या शिक्षिका. या शिक्षिकांचं त्यांना समजून घेणं, रागावण, शिक्षा करणं, कठोर वागणं, प्रसंगी त्यांना मदत करणं... सगळं खूप छान होतं. या विद्यार्थ्यांमधील एक व्रात्य मुलगा चित्रपटाचा हिरो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सारी मुले छोटी छोटी लाल फुले गणवेशावर लावून संचलन करतात आणि शाळेचा निरोप घेतात. चित्रपटाचा व्रात्य हिरो मात्र अखेरीस एकटाच उरतो. इथे चित्रपटाचा शेवट. एखादा विषय किती सहज आणि सकसपणे दाखवला जाऊ शकतो, त्याचं हे उदाहरण.
या मुलांचा एक खेळ मात्र आवर्जून सांगितला पाहिजे. आपल्याकडे मुली `आळीन माळीण फुले दे' असा काहीतरी खेळ खेळतात. दोघींनी एकमेकींसमोर उभे राहायचे आणि एकमेकींचे दोन्ही हात डोक्याच्या वर धरायचे. हातांच्या त्या मांडवाखालून सगळ्यांनी जायचे. गाणे म्हणता म्हणता मधेच थांबायचे आणि जो खाली असेल त्याला धरायचे. ज्याला धरले तो बाद. असा काहीसा तो खेळ. त्या खेळाचे चीनी नाव नाही कळले, पण अगदी तोच खेळ `निवासी बालवाडी'तील त्या छोट्या छोट्या मुली खेळल्या. क्षणभर असं वाटलं की, आपल्याच बालवाडीतील चित्रपट आहे की काय.

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद - १

स्वामी विवेकानंद यांच्या बहुमुखी प्रतिभेचे एक दर्शन त्यांच्या व्यवस्थापक, प्रशासक, संघटक या रूपातही होते. आध्यात्मिक व वैचारिक प्रबोधनाचे काम वाढावे, फोफावावे आणि निरंतर सुरु राहावे यासाठी संस्थात्मक कामाची उभारणीही स्वामीजींनी केली. त्यासोबतच समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि समाज शक्तिमान करण्यासाठी सेवाकार्ये वगैरेची सुरुवातही केली. प्रचंड प्रमाणात केलेली भटकंती, प्रबोधन हेदेखील लक्षणीय आहे. या सगळ्याच कामांमध्ये त्यांच्यातील व्यवस्थापक, संघटकाचे रूप पाहायला मिळते.

सत्ता, संपत्ती, संघटन यापैकी काहीही साथीला नसताना स्वामीजींनी अफाट कार्य केले हे विसरता येत नाही. उलट अक्षरश: शून्यातून सृष्टीची निर्मिती त्यांनी केली असेच म्हणावे लागेल. यासाठी माणसे, पैसा, जागा, कार्यपद्धती, वातावरण हे सारे त्यांनी उभारले. त्यासाठी आवश्यक त्या असंख्य लहानमोठ्या सूचना करण्यापासून जी अनेक व्यवधाने त्यांनी सांभाळली ती आश्चर्य करावी अशीच आहेत.

कोलकाता येथे मठाची स्थापना, त्याचा बेलूरच्या विस्तीर्ण जागेत विस्तार, चेन्नई मठाची स्थापना, हिमालयातील अलमोडा येथे अद्वैत आश्रमाची सुरुवात, प्लेग, दुष्काळ यासारख्या प्रसंगी केलेली सेवाकार्ये, वाराणशीचा सेवाश्रम, न्यूयॉर्क व बोस्टन या अमेरिकेतील आश्रमांची स्थापना, इंग्लंडमध्ये कामाची सुरुवात, विचार प्रसारासाठी मासिकांची सुरुवात, अशी एक ना अनेक कामे आणि त्याची सारी जुळवाजुळव त्यांनी केली.

हे सारे काम स्वामीजींनी उभे केले तेव्हा भारतात अशा प्रकारे एकत्र येउन काम करणे ही नवलाईच होती. अशी कामे फारशी प्रचलित नव्हती, अशी उदाहरणे नव्हती, लोकांना त्याची सवय नव्हती, मदत करण्यासाठी पैसा तर नव्हताच, साधनांचा अभावच होता, वीज- रस्ते- वाहने- दूरध्वनी- अशा सुविधांची कल्पनाच केलेली बरी. आपल्या समाजाची आजची मानसिकता आणि त्यावेळची मानसिकता, आजची आणि त्यावेळची विचारपद्धती, परिपक्वता अशा अनेक बाबींचे अडथळे होते. नवखेपण होते. कोणतीही मळलेली पायवाट नव्हती तर आपली वाट आपणच तयार करीत पुढे चालायचे होते. शिवाय स्वामीजी कधी हिमालयात, कधी कोलकात्यात, कधी राजस्थानात, तर कधी इंग्लंड- अमेरिकेत.

अशा परिस्थितीत स्वत:चे आणि आपल्यासोबत काम करणाऱ्यांचे मनोधैर्य कायम राखणे हे सगळ्यात महत्वाचे ठरते. हे कामही विवेकानंदांनी समर्थपणे केले आहे. याच संबंधात याकोहामा येथून आपला मद्रासी शिष्य अळसिंगा पेरूमल याला १० जुलै १८९३ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `धीर, शांत आणि दृढ भावाने कार्य करावयास हवे. वर्तमानपत्रातील प्रसिद्धी किंवा नावलौकिक हे आपले उद्दिष्ट नाही हे नेहमी लक्षात असू द्या.'

अळसिंगा पेरूमल यांनाच २ नोव्हेंबर १८९३ रोजी शिकागोहून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `भगवान सतत माझ्या पाठीशी आहेत याचा मला दिवसेंदिवस अनुभव येत आहे. आणि मी त्यांच्या आदेशानुसार वागण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचीच इच्छा पूर्ण होवो. आपण जगासाठी मोठमोठी कार्ये करू. नामयशाच्या हपापाने नव्हे, तर पूर्ण नि:स्वार्थ भावनेने. का? असे विचारण्याचा आपल्याला अधिकार नाही.कार्य करता करता मृत्युमुखी पडणे हेच आपले कर्तव्य होय. साहस बाळगा. भगवंताने आपल्याला थोर कर्मे करण्यासाठी निवडले आहे, असा विश्वास असू द्या आणि ती आपण करूच करू. तयार व्हा. पवित्र आणि शुद्ध बना आणि प्रेमासाठीच प्रेम करा. कोणताही स्वार्थ राहू देऊ नका. गरीब, दु:खी व दलित यांच्यावर प्रेम करा. प्रभू तुमच्यावर अवश्य कृपा करील.' कशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी ते करीत होते हे येथे पाहायला मिळते.

आपल्या गुरुबंधूंना न्यूयॉर्क येथून २५ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आपण खूप कार्य केलेच पाहिजे. चैतन्य निर्माण केलेच पाहिजे. त्याशिवाय चालणार नाही. कुछ परवाह नही. सारे जग तुम्ही हलवून सोडाल. वाह गुरु की फतेह! अरे बाबांनो, श्रेयांसि बहुविघ्नानी- चांगल्या कार्यात अनेक विघ्ने नेहमी येतच असतात. या विघ्नांच्या आघातांनीच थोर माणसाचे चरित्र घडत असते.'

परंतु चांगल्या संघटकाला नुसतेच मनोधैर्य वाढवून चालत नाही. छोट्या छोट्या अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. कार्यकर्त्याच्या लक्षात अशा गोष्टी आणून द्याव्या लागतात. कौतुकाची थापही पाठीवर मारावी लागते. अळसिंगा पेरूमल यांना अमेरिकेतून २९ सप्टेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `कोलकाताशी नेहमी पत्रव्यवहार करीत असणे. वत्सा, आतापर्यंत साहस दाखवून तू खरोखर गौरवाचा वाटेकरी झाला आहेस. जी.जी.ने खूपच अद्भुत आणि सुंदर कार्य केले आहे. माझ्या साहसी व नि:स्वार्थी मुलांनो! तुम्ही सर्वांनी फार सुंदर कार्य केले आहे. मला तुमचे मोठे भूषण वाटते. भारताला तुमचे भूषण वाटत आहे. तुमचा जो नियतकालिक काढण्याचा संकल्प होता तो सोडू नका. खेतरीचे राजेसाहेब आणि काठीयावाडमधील लिमडीचे ठाकूरसाहेब यांना माझ्या कार्याची नेहमी माहिती मिळत राहील अशी व्यवस्था करावी.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `आपल्या विचारांचा प्रसार होण्यासाठी आता आपल्याला चांगल्या शक्तिशाली केंद्राची आवश्यकता आहे. सध्या मद्रास आणि कोलकाता येथे अशी दोन केंद्रे झाली आहेत. लवकरच भारतात इतरत्रही आणखी शेकडो केंद्रे होतील. क्षणभरही विचलित होऊ नका. इच्छाशक्तीच जगाला चालवीत असते.'

अशा प्रकारच्या तात्त्विक भूमिकेसोबतच व्यवहाराची देखील त्यांना किती जाण होती हे स्वामी रामकृष्णानंद यांना २२ ऑक्टोबर १८९४ रोजी अमेरिकेतून लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट होते. ते म्हणतात, `अहमहमिका, मत्सर यांना कायमची मूठमाती द्या. त्यांच्या मुळीच आहारी जाऊ नका. प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ करा. कुणाशीही कलह करू नका. सर्वांविषयी सहानुभूती बाळगून कार्य करा. जगाचे हित करणे हाच आपला उद्देश आहे. केवळ आपल्या नावाचा डांगोरा पिटणे नव्हे. स्वत:चा मोठेपणा मिरवण्याची वृत्ती, भांडकुदाळपणा आणि मत्सर या साऱ्यांचा तुम्ही कायमचा त्याग करावा हीच तुमच्यापासून अपेक्षा आहे. पृथ्वीमातेप्रमाणे सहनशीलता तुमच्या ठायी बाणली पाहिजे.'

संघटना, एकीची शक्ती, परस्परांवर विश्वास, सहकार्य व साहाय्य करण्याची तत्परता हे पाश्चात्यांचे गुणविशेष आहेत आणि त्यांच्या यशाचेही तेच कारण आहे. आपणही हे गुण अंगी बाणवले पाहिजेत, असे त्यांनी अनेकदा आग्रहाने सांगितले आहे. अमेरिकेतून ३० नोव्हेंबर १८९४ रोजी अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `लवकरच आणखी काही ठिकाणी मी समित्या स्थापन करू शकेन अशी आशा आहे. आपल्या सर्व शक्ती एकवटून आपण आपल्या धार्मिक संस्थेचा व्यावहारिक भाग संघटित केला पाहिजे. पण आध्यात्मिक बाबतीत त्यातून एखादा पंथ तर निर्माण होत नाही ना याचीही काळजी घ्यायला हवी. धडाक्याने प्रचार सुरु करावयास हवा.सर्व मिळून विचार करा आणि संघटीत व्हा.' किती गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत. आपण समित्या स्थापन करीत आहोत हे सांगून उत्साह वाढविला, आपल्याला धार्मिक कार्य करायचे आहे पण त्याच्या व्यावहारिक बाबीकडे दुर्लक्ष होऊ नये, आपल्याला नवीन पंथ सुरु करायचा नाही याची काळजी घ्यावी, खूप प्रचार करायला हवा, सगळे मिळून विचार करा; या साऱ्याकडे त्यांचे दक्षतेने लक्ष आहे.

एखादे नवीन काम सुरु होते तेव्हा त्यावर टीकाटिप्पणी तर होतेच, पण कामाचे कौतुक करणारे; हे काम महत्वाचे आहे असे म्हणणारे अनेक असतात. गम्मत म्हणजे असे पाठीराखेच अनेकदा त्रासदायक ठरतात. अनेक सूचना त्यांच्याकडून होत असतात, आपले म्हणणे ऐकाल तरच काम वाढेल असा त्यांचा पवित्रा असतो, ते कामावर हक्क सांगू लागतात, लुडबुड करतात. अशा गोष्टींचीही स्वामीजींना जाण होती. त्याविषयी याच पत्रात ते म्हणतात, `आपले कार्य करीत राहा. या लोकांच्या मनाने चालू नका. पण त्यांना दुखावूही नका. खुश ठेवा. अशाने त्यांच्यापैकी एखादा तरी पुढे चांगला निघण्याची आशा आहे. स्वतंत्रपणे आपल्या मार्गाने पुढे व्हा. आयत्या बिळावर रेघोट्या ओढायला सगळेच तयार असतात. खूप सावधगिरी बाळगा व काम करीत राहा.'

एखादे काम करताना लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. टीकाटिप्पणी करीत असतात. त्या सगळ्याची उपेक्षा करावी. ते फार मनावर घेऊ नये असे मार्गदर्शनही विवेकानंदांनी केले आहे. ख्रिश्चन मिशनरी अमेरिकेत व भारतातही आपल्याबद्दल काहीबाही बोलतात हे आपल्याला ठाऊक आहे, पण आपण त्यांना महत्व देत नाही. तुम्हीही त्यांना फार महत्व देऊ नका. सत्कर्म करणाऱ्याची कधीच दुर्दशा होत नाही हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी पेरूमल यांना म्हटले आहे. आपल्या शिष्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्यावर अवलंबून राहू नये. स्वत:च्या मार्गावर धैर्याने चालावे, असा आत्मविश्वासाचा सल्लाही त्यांनी अनेकदा दिला आहे.

आपल्यापुढील काम काय आहे आणि त्यसाठी कशी माणसे आपल्याला हवीत हा तर उत्कृष्ट व्यवस्थापकाचा पहिला मुद्दा असतो. स्वामीजींनी त्यावरही भर दिला आहे. कल्पकता, चिकाटी, शिकलेसवरलेले, बुद्धिमान, साहसी तरुण हवेत. असे तरुण मिळवा आणि त्यांना आपल्यात सामील करून घ्या, असे स्वामीजींचे सांगणे होते. मृत्युच्या जबड्यात उडी घेण्याची तयारी असलेले तरुण ही कामाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संघटना व एखादे काम म्हटले की त्याचे नेतृत्व हा मुद्दा महत्वाचा ठरतो. नेतृत्वासाठी चढाओढ पाहायला मिळते तसेच नेतृत्व टाळण्याची वृत्तीही पाहायला मिळते. नेत्याविषयी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ मध्ये लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `बाबा, नेता काय धरूनबांधून तयार करता येतो? नेतृत्वाचा गुण जन्मजातच असावा लागतो. आले ध्यानात मी काय म्हणतो ते? नेतेपण करणे फार अवघड गोष्ट आहे- दासस्य दास: - अनेकांची अंतरे राखण्याची कला अंगी असायला हवी. स्वार्थाचा, द्वेष मत्सरादिकांचा अगदी समूळ नाश झाल्यावरच खरे नेतेपण अंगी बाणते. प्रथमत: जन्मगुणाने, दुसरे म्हणजे संपूर्ण स्वार्थत्यागाने ते अंगी बाणते. अनेकांची अंतरे राखण्याबद्दल स्वामीजींनी जो निर्देश केला आहे तो तर साध्या कौटुंबिक व्यवस्थापनापासून तर संपूर्ण देशाच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वत्र लागू होणारा आहे.

स्वत: अमेरिकेत असतानाही येथील कामाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. १८९४ मधीलच एका पत्रात ते म्हणतात, `सध्या गरज आहे सेवा व प्रचार अशा दोन्ही प्रकारच्या कार्याची. जिथे तुम्ही दर आठवड्याला जमू शकाल अशी एखादी जागा निवडा. तेथे पूजा वगैरे आटोपून नंतर भाष्यासहित उपनिषदांचे वाचन करा. अशा तऱ्हेने अध्ययन व काम दोन्ही करीत राहा.' याच पत्रात पुढे ते म्हणतात, `जी.जी. हा भावनाप्रधान आहे. तुम्ही आहात शांत डोक्याचे. तेव्हा दोघे मिळून काम करा. अगदी मग्न व्हा कामात. एखादे मध्यवर्ती केंद्रस्थान आवश्यक आहे. सुरुवात करा अगदी लहान प्रमाणावर. कुणावरही सत्ता गाजवण्याचा हव्यास धरू नका. जो उत्कृष्ट सेवा करू शकतो तोच खरा शासक होऊ शकतो. प्राण गेला तरी पर्वा नाही, पण सत्याशी प्रतारणा करू नका. कामातील स्वाधीनता न गमावता वरिष्ठांविषयी आदरभाव असू द्या.' अशा प्रकारे संस्था उभारण्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतानाच, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी आपण अमेरिकेच्या पैशावर अवलंबून राहता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. आकर्षक वक्ता बनण्याचा सल्लाही स्वामीजींनी शिष्यांना दिला आहे. तुम्ही प्रत्यक्ष काय काम केले हे पाहू तर द्या मला एकदा, असे आव्हान देऊन स्वामीजी म्हणतात, मंदिर, छापखाना, एखादे नियतकालिक आणि एखादे निवासस्थान हे करून तर दाखवा. कार्यकर्त्यांना कुठेतरी चेतवावे लागते. पौरुषाला थोडेसे आव्हान हवे असते. तेव्हा त्यातून भव्यदिव्य काही घडते. स्वामीजींनी तेदेखील जाणीवपूर्वक केले आहे.

एखादे काम करताना कौशल्यही हवे असते. स्वामीजींनी आपले सहकारी, शिष्य, कार्यकर्ते यांना हे कौशल्यही शिकवले आहे. अमेरिकेतून १८९४ साली स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `जग हे तत्वांची फिकीर करीत नाही. त्यांना हवी असते व्यक्ती. आपल्याला मान्य असलेल्या व्यक्तींचे मूर्खपणाचे बडबडणे ऐकणे लोकांना परवडते, पण नावडत्या माणसाचे काहीही ऐकून घेण्यास ते तयार नसतात. ही गोष्ट पक्की लक्षात बाळगूनच आपल्या वागणुकीला मुरड घाला. तुमचे शब्द जरी क्वचित कठोर असले तरी तुमच्या प्रेमाचाच खरा प्रभाव पडेल. प्रेमभावना कशाही शब्दात व्यक्त झाली असली तरीही ती ओळखण्याची सहजप्रवृत्ती लोकांच्या ठिकाणी स्वाभाविकपणेच असते.' कार्याच्या यशाची खुबी अतिशय नेमक्या शब्दात स्वामीजींनी येथे सांगितली आहे. याचा अर्थ तत्व सोडून द्यायची, काहीही चालवून घ्यायचे, असा खचितच नाही. पण काम करणाऱ्यांमध्ये एक माणुसकीचा स्पर्श असला तर काम सहज होते. हा माणुसकीचा स्पर्श वंगणाचे काम करतो हे विवेकानंदांनी अधोरेखित केले आहे.

चांगल्या व्यवस्थापकाला फक्त कामाची फिकीर करून चालत नाही. काम करणाऱ्याचीही फिकीर त्याने करायला हवी. काम करणाऱ्यांमध्ये जो स्नेहाचा स्पर्श असायला हवा असे मार्गदर्शन स्वामीजींनी केले तो स्नेहस्पर्श त्यांच्या व्यवहारात देखील होता. हे त्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. स्वामी शिवानंद यांना लिहिलेल्या याच पत्रात कोलकाता भागातील मलेरियाविषयी काळजी व्यक्त करून स्वामीजी लिहितात, `मलेरियाचे मुख्य कारण असते दूषित पाणी. तुम्ही दोन तीन फिल्टर का नाही तयार करीत? आधी उकळून, नंतर फिल्टर करून घेतल्यास पाण्यातील सारे दोष निघून जातात. जंतूंपासून सुरक्षित असलेले पाश्चर कंपनीचे दोन मोठेथोरले फिल्टर विकत आणा. स्वयंपाकाला, प्यायला सारे तेच पाणी वापरा. पाहाल पुन्हा मलेरियाचे नावदेखील ऐकू येणार नाही कुठे.' मलेरियावर उपाय सांगता सांगता शेवटी स्वामीजी हिम्मत वाढवून जातात.

११ एप्रिल १८९५ रोजी अमेरिकेतूनच स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या पत्रातही हा स्नेहस्पर्श दिसून येतो. ते लिहितात, `तुम्ही आजारातून उठला असे तुम्ही लिहिलेत. तरी पण यापुढे तुम्हाला प्रकृतीबाबत खूपच खबरदारी घ्यावयास हवी. उशिरा जेवणे, कुपथ्य करणे व घाण असलेल्या जागी राहणे यामुळे आजार उलटण्याची भीती आहे. आणि मग मलेरियाच्या तावडीतून सुटणे कठीण आहे. पहिली गोष्ट ही करा की एखादे उद्यानगृह भाड्याने घ्या. ३०-४० रुपयात तुम्हाला ते सहज मिळेल. दुसरे म्हणजे पिण्याचे व स्वयंपाकाचे सारे पाणी फिल्टर करून घ्या. बांबूचे मोठे फिल्टर केले की काम भागेल. साऱ्या रोगांचे मूळ म्हणजे दूषित पाणी. पाण्यामुळे रोग होतात; ते पाणी घाण आहे की स्वच्छ आहे यामुळे नाही. रोग होतात ते पाण्यात असलेल्या रोगाच्या जंतूंमुळे. पाणी आधी उकळून मग फिल्टर करून घ्यावे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी. सैपाकी, एखादा नोकर, स्वच्छ अंथरुणे, वेळच्या वेळी जेवणखाण या साऱ्या गोष्टींची आवश्यकता आहे. या साऱ्या सूचना तंतोतंत पाळा.' लाजळूपणाने कामे होणार नाहीत, अध्ययनाकडे लक्ष द्यावे इत्यादी सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

काम पुढे जाते तेव्हा नेत्याचे नावही मोठे होते. ती स्वाभाविक प्रक्रिया असली तरीही त्याने अनेक दोष निर्माण होतात. स्वामीजींनी याकडेही लक्ष दिले आणि सहकाऱ्यांना स्पष्ट शब्दात त्याची कल्पना दिली. १२ जानेवारी १८९५ रोजी अमेरिकेतून अळसिंगा पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या नावाला प्राधान्य देण्याची गरज नाही. माझ्या कल्पना, माझे विचार, प्रत्यक्षात उतरण्याशीच माझे काम. साऱ्या महापुरुषांच्या शिष्यांनी गुरुचे उपदेश व गुरु ही व्यक्ती यांची गल्लत केलेली आढळते. एवढेच नव्हे तर अखेर त्यांनी व्यक्तीसाठी तिचे उपदेश नष्ट करून टाकले. ही गोष्ट घडू नये म्हणून श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी खूप खबरदारी घ्यावयास हवी. विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा. कुणा व्यक्तीसाठी म्हणून नव्हे.' काम उभे करताना स्वामीजी अशा प्रकारे खूप खबरदारी घेत होते.

कामाच्या प्रारंभिक अवस्थेत प्रत्येकालाच लहान मोठी सारीच कामे करावी लागतात. याबद्दल श्रीमती ओली बुल यांना २५ एप्रिल १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी चर्चा केली आहे. ज्ञानयोगाच्या वर्गाला येणाऱ्या सगळ्यांची नावे नोंदवून घ्यायची आणि सगळ्यांना सूचना पाठवायच्या हे एक मोठेच काम आहे. आपण आळसामुळे ते केले नाही. पण आता स्वत: ते काम करीन अशी प्रांजळ कबुलीही स्वामीजींनी दिली. सोबतच वर्गाला येणाऱ्या १२० लोकांची नावे कुमारी हॅम्लिन यांनी उतरवून घेतल्याबद्दल आनंद आणि आभारही व्यक्त केले आहेत.

हिंदू राष्ट्र कशासाठी? कोणासाठी?

माघ वद्य एकादशी, जी विजया एकादशी म्हणून ओळखली जाते; हा गोळवलकर गुरुजींचा जन्मदिवस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक म्हणून ते ओळखले जातात. हिंदू संघटनेच्या कामासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. इस्लाम किंवा ख्रिश्चन यांच्या जन्माच्याही कितीतरी आधीपासून हे राष्ट्र अस्तित्वात आहे. त्यामुळे कोणत्या एखाद्या समूहाच्या, विचाराच्या विरोधात ते उत्पन्नही करावयाचे नाही आणि उभेही करावयाचे नाही. त्याचे स्वयंभू असे व्यक्तिमत्व आहे, हा विचार त्यांनी आयुष्यभर मांडला. हे हिंदू राष्ट्र कशासाठी? अन कोणासाठी याचेही विस्तृत विवेचन त्यांनी वेळोवेळी केले. कार्यकर्ते, जनता, पत्रकार, विद्वान अशा अनेकांपुढे त्यांनी वेळोवेळी याविषयीचे विचार मांडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सिंदी (मार्च १९५४), इंदोर (मार्च १९६०) आणि ठाणे (ऑक्टोबर, नोव्हेंबर १९७२) चिंतन बैठकांमध्ये देखील हिंदू राष्ट्र कशासाठी? कोणासाठी? याचे सखोल विवेचन त्यांनी केले आहे.

सिंदी बैठकीच्या पहिल्याच दिवशी, ९ मार्च १९५४ रोजी त्यांनी या विषयावर विचार व्यक्त केले. जागतिक वाद, तत्वज्ञान, राष्ट्रीयता, आंतरराष्ट्रीयता, राष्ट्रभावना समाप्त करता येईल वा नाही, विश्वराज्य संकल्पना या साऱ्याचा उहापोह करून गुरुजी म्हणतात, `आपल्यापुढे राष्ट्र आणि जग यांच्या समन्वयाचा मार्गच तेवढा शिल्लक राहतो. जर राष्ट्रभावना आपण नाहीशी करू शकत नाही आणि विश्वराज्याची शक्यताही जर दिसत नाही तर मग कोणत्या मार्गाचा अवलंब करावयाचा? आपल्याकडे याचे उत्तर आहे पण भौतिकता हा त्याचा आधार नाही. भौतिकता ही एकाला दुसऱ्यापासून दूर ठेवण्याचेच काम करते. विश्वैक्यासाठी भौतिकतेहून अधिक उच्च भूमिकेची आवश्यकता आहे.' स्पष्ट आहे की ही भूमिका हिंदूंची आध्यात्मिक भूमिका होय. या आध्यात्मिकतेचे थोडक्यात विवेचन करून गुरुजी पुढे म्हणतात, `हिंदूजवळ हे ज्ञान सुरक्षित आहे. अन्य कोणाजवळ हे नाही. जो समाज हे ज्ञान बाकीच्या समाजाला देण्यासाठी वेळोवेळी श्रेष्ठ महापुरुष निर्माण करतो त्या समाजाने उत्तम रीतीने जिवंत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच सामर्थ्य निर्माण करण्यासाठी आम्ही संघटना करतो. म्हणूनच आमची ही संघटना जगाच्या कल्याणासाठीच आहे.' हाच विषय पुढे नेउन त्यांनी तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिघातून बाहेर काढला आहे. याचे अंतिम स्वरूप काय असेल याबद्दल गुरुजी म्हणतात, `हिंदू समाजाला आपण इतके जागृत केले पाहिजे की, तो निश्चल भावाने, आत्मविश्वासाने, जगाच्या बाहेर पाहणाऱ्या प्रवृत्तीला अंतर्मुखी करून हे ज्ञान जगाला शिकवू शकेल.' परंतु त्यांचे हे व्यापक चिंतन केवळ स्वप्नरंजन नाही. अतिशय जमिनीवर राहून ते पुढे म्हणतात, `जगाच्या गोष्टी करावयाच्या म्हणजे घरच्या गोष्टी सोडावयाच्या हा भाव अशुद्ध आहे.दोघांचाही समन्वय हाच श्रेष्ठ आणि उत्तम आहे.'

या सिंदी बैठकीतच त्यांनी या विषयाचा आणखी विस्तार केला आहे. ते म्हणतात, `आम्ही राष्ट्रांचा विनाश नव्हे समन्वय चाहतो. म्हणून आम्ही आपल्या राष्ट्रजीवनाची वैशिष्ट्ये जतन करून मानवतेसाठी त्याचा विकास करू. आपल्या राष्ट्राचे त्याच्या संपूर्ण वैशिष्ट्यांसह संवर्धन करणे हेच हिंदू राष्ट्र निर्माण करणे होय. जगाला संपूर्ण मानवाच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल. हिंदूंची विशेषता कायम राखण्यातच विश्वाचे कल्याण होईल. आपली प्रकृती काय आहे? भौतिकतेचा कमाल विचार करूनही आपण त्यापलीकडे जी वस्तू आहे तिचा साक्षात्कार केला आहे.त्याच दृष्टीने आपण समाजालाही पाहिले पाहिजे.'

सिंदी बैठकीतील सूत्रच इंदोर बैठकीतही कायम असल्याचे पाहायला मिळते. यासंबंधीचे आपले विचार आणखीन स्पष्ट करताना इंदोर बैठकीत गुरुजी म्हणतात, `साऱ्या जगात ज्या ज्या म्हणून राज्यव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्था आहेत त्यात मनुष्यमात्राच्या जीवनाचे लक्ष्य ऐहिक सुख समृद्धीत मानलेले आहे. म्हणजेच खाणे-पिणे, वस्त्र-प्रावरणे, निवासाची स्थाने, सुखोपभोग, वासनावृद्धी, वासना संतुष्ट करणाऱ्या साधनांची वृद्धी, त्या साधनांची उपलब्धी, मनोरंजनाची भिन्न भिन्न साधने हेच जगातील सर्व देशात सर्वसाधारण लक्ष्य त्या देशांनी स्वत:समोर ठेवलेले आहे असे आढळून येते. ज्याचे खूप प्रगतीमान असे वर्णन केले जाते तेथे सामान्य माणसाकडे टेलिफोन, मोटार, मोटारसायकल आदी ऐहिक सुखाची साधने हाच प्रगतीचा मानदंड मानला जातो. वास्तविक मानवाच्या प्रगतीचा हाच मानदंड आहे का?' असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणतात, `आमच्या पूर्वजांनी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखाची आणि ऐश्वर्याची इच्छा बाळगूनही तेच काही जीवनाचे अंतिम लक्ष्य मानलेले नाही. तर मग जीवनाचे लक्ष्य कोणते? चिंतनानंतर त्यांना जे उत्तर मिळाले ते शब्दांच्या पलीकडचे आहे. आपल्या राष्ट्राचे लक्ष्य काय आहे? या अवस्थेच्या प्राप्तीसाठी व्यक्ती अग्रेसर होईल अशी विशुद्ध प्रेरणा देणे हेच ते लक्ष्य होय. प्रत्येक मानव मग तो वन्य अवस्थेतील मानव का न असो, त्याच्या हृदयात ही प्रेरणा जागृत करून तो या लक्ष्यप्राप्तीसाठी वाटचाल करील आणि या सुखाचा अधिकारी ठरेल हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे.'

माणसाने चोवीसही तास पोटाच्याच मागे धावावे काय? असा भेदक प्रश्न उपस्थित करून गुरुजी म्हणतात, `खाणे पिणे आणि सुखाने झोपणे हेच त्यांचे लक्ष्य असल्यामुळे आणि हे जीवन प्राय: पशुसारखेच असल्यामुळे मानवाला पशुसमान बनविणारी रचना त्यांनी केली. आपले लक्ष्य पशुत्वाकडून देवत्वाकडे जाणे हे आहे.' जगातील अन्य व्यवस्थांचे असे विश्लेषण करून आपल्या व्यवस्थेसंबंधी ते म्हणतात, `नवे घर तयार करावयाचे तर जुने घर पाडावे लागते. आजची जी विकृत झालेली समाजरचना आहे तिची इथून तिथपर्यंत पाडापाड करून ढीग रचून ठेवू. मग त्यातून पुढे जे काही विशुद्ध रूप उभे होईल ते होईल. आज तर सर्वांचा एकरस असा समूह बनवून, आपल्या विशुद्ध राष्ट्रीय तत्वाचे संपूर्ण स्मरण अंत:करणात ठेवून, राष्ट्राच्या नित्य चैतन्यमय व सूत्रबद्ध सामर्थ्याची आकांक्षा अंत:करणात जागृत राखणारा समाज उभा करावयाचा आहे.'

याच सूत्राचा पुढे विस्तार करताना गुरुजी म्हणतात, `प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात सत्याच्या आविष्काराचा अनुभव आणि अखिल सृष्टीतील एकात्मतेचे दर्शन घडवून; मानवाला सुखशांतीचा अनुभव प्राप्त करून देणे यातच मनुष्य जीवनाची खरी सार्थकता आहे, हे पटवून देणे हीच ती मुलभूत प्रेरणा आहे. हे कार्य आपल्याला अखिल जगतात प्रसृत करावयाचे आहे. या जगात आपले एक फार मोठे कार्य आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपले हे प्राचीन राष्ट्र आहे आणि त्याचे जीवन जगाचे नेतृत्व करण्यासाठी आहे. परंतु आपण आपल्या देशातील जीवन ठीक करू शकलो नाही, आपण स्वत:ला ओळखू शकलो नाही आणि जगाचे अज्ञान दूर करण्याचा संकल्प केलेले आम्ही जर स्वत:लाच विसरून बसलो तर आपले `वर्ल्ड मिशन' आपण कसे पूर्ण करू शकू?'

हे `वर्ल्ड मिशन' पूर्ण करायचे म्हणजे इतर साऱ्यांचे अस्तित्व आणि वैशिष्ट्य मिटवून टाकायचे का? किंवा या अतिभव्य लक्ष्याकडे वाटचाल करताना हे लौकिक जग सोडून द्यायचे का? या ऐहिक जगातील साऱ्या क्रियाकलापांचे स्थान काय राहील? याविषयी गुरुजी म्हणतात, `निरनिराळे भौतिकतावादी समूह त्यांचाच विचार सर्व लोकांच्या माथी मारून त्यांची डोकी बिघडविण्याचा प्रयत्न करतात, तशी काही आपली कल्पना नाही हे आपण समजून घेतले पाहिजे. याउलट प्रत्येक समाजाला त्याच्या प्रकृतीनुसारच उन्नती, उत्कर्ष आदीची प्रेरणा देत देत त्याच्यावर अंतिम सत्य आणि सद्गुणांचा सत्संस्कार योग्य प्रकारे केला पाहिजे हीच आपली दृढ धारणा आहे. परंतु यासाठी प्रभुत्वसंपन्न, शक्तीसंपन्न, सद्गुण आणि सद्भावनांनी ओतप्रोत; पारलौकिक ज्ञान आणि ऐहिक वैभव यांनी युक्त असे राष्ट्रजीवन प्रथम आपल्या घरी आपण निर्माण करू. आज जगात जितके भौतिक म्हणजेच केवळ जडवादी कार्य चालते त्यांची कबर येथेच बांधली जाईल यात मला मुळीच शंका नाही. या बाबतीत मी बिलकुल निश्चिंत आहे. पण त्यासाठी खूप कष्ट सहन करावे लागतील. खूप किंमत द्यावी लागेल. पण अशा सर्व कार्यांना मूठमाती देऊन श्रेष्ठ मानव जीवनाची निर्मिती आपण करून दाखवूच.'

ठाणे बैठकीतही याच गोष्टीचा निर्देश गुरुजींनी केला. ते म्हणाले, `आपल्या प्राचीन, चिरंतन हिंदू राष्ट्राला जगात पुन्हा श्रेष्ठ स्थान प्राप्त करून देण्याचे ; या राष्ट्राला बलसंपन्न, विजयशाली, सुखी व विश्वातील सर्व मानवांचे कल्याण करण्यास सक्षम बनविण्याचे जे उदात्त ध्येय आम्ही आपल्यासमोर ठेवले आहे त्याची पूर्ती करण्यासाठीच विविध कार्ये व कार्यक्रमांची रचना करण्याकडे आम्ही सर्वांनी लक्ष द्यावयास हवे.'

या ठाणे बैठकीत गुरुजींशी कार्यकर्त्यांशी चर्चाही झाली. अनेक प्रश्नही त्यांना विचारण्यात आले. त्यातील एका प्रश्नावर त्यांनी जे उत्तर दिले ते फार मार्मिक आहे. गुरुजी म्हणाले, `ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू या सर्वांनी एकत्र नांदावे, हे केवळ हिंदूच म्हणत असतो. मुसलमान किंवा ख्रिश्चन म्हणत नाही. आमचा कोणत्याही उपासना पद्धतीला विरोध नाही. पण एखादा कोणी राष्ट्र विघातक कार्य करीत असेल; तर तो कोणीही का असेना - प्रत्यक्ष पुत्र असला तरी - त्याची गय आम्ही करणार नाही. अहल्याबाई आणि शिवाजी महाराज यांचा आदर्श याबाबतीत आमच्यासमोर आहे. तेव्हा राष्ट्रद्रोही व्यक्ती जर इतर धर्माची असेल तर तिच्याशी आम्ही तसाच व्यवहार करू, असे म्हणताना कचरण्याचे आम्हाला काही कारण नाही. आज मात्र नेमके उलटे होते आहे. शत्रू असूनही देशभक्तीचा मुखवटा धारण करणाऱ्यास मित्र बनविले जाते आणि जे रात्रंदिवस देशाचेच हितचिंतन करतात त्या आपल्याच लोकांचा निषेध केला जातो.'

या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाव धारण करणारा आणि फक्त लौकिक गोष्टींच्या मागे धावत सुटलेला जमाव नाही. या लौकिक जगाकडे (देव संकल्पनेसह साऱ्या गोष्टींकडे. कारण देव ही सुद्धा लौकिक गोष्टच आहे.) अलौकिक दृष्टीने पाहण्याची आमची आध्यात्मिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगासाठी जिवंत राहणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांचा समाज असे या हिंदू राष्ट्राचे स्वरूप आहे. ते कोणाच्याही विरोधात नाही, कोणावरही दडपशाही करू इच्छिणारे नाही, जुन्याला कवटाळून बसणारे नाही, ऐहिकता नाकारणारे नाही, नवीनतेचे विरोधी नाही.परंतु त्याच वेळेस अरेरावी खपवून घेणारे, स्वार्थी, सुखलोलुप, विधीनिषेधशून्य, एकांगी असेही नाही. हिंदू राष्ट्र हे सगळ्या जगासाठी आणि संपूर्ण जगाच्या सात्विक सुखशांतीसाठी आहे.

`मल्याळम मनोरमा' या केरळातील मासिकाचे तत्कालीन संपादक के. पी. के. पिशाद्री यांचा अभिप्राय मननीय आहे. पिशाद्री हे स्वत: गांधीवादी होते. संघ वगैरेंशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. महात्मा गांधींच्या हत्येनंतर शिवनी कारागृहात गुरुजींना भेटण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांना भेट नाकारण्यात आली होती. १९६५ साली गुरुजी आयुर्वेदिक उपचारासाठी पालघाटला असताना मात्र ते गुरुजींना भेटले. त्यानंतर अनेकदा त्यांची गुरुजींशी भेट व चर्चा झाली. ते म्हणतात, गुरुजींशी चर्चा करून आणि संघाचे साहित्य वाचून माझ्या सर्व शंका दूर झाल्या. ते मुळीच धर्मांध नव्हते.

हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते, पाठीराखे, हितचिंतक, कार्यकर्ते (संघाचे व अन्यही), विरोधक, विश्लेषक या सगळ्यांनीच हिंदू राष्ट्राचा हा व्यापक, भावात्मक आशय आणि दिशा लक्षात घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर

भाव+ राग+ ताल= भारत

२६ जानेवारीला मित्र-मैत्रिणींना एक मेसेज पाठवला होता की, इंडिया ऐवजी `भारत'चा वापर करा. अगदी इंग्रजीत संभाषण, लेखन करताना सुद्धा `भारत'च वापरा. त्यावर एका मित्राचा रिप्लाय आला की, असे करणे घटनाबाह्य आहे आणि मी भावनाशील होऊ नये. यातील एका मुद्याशी मी सहमत आहे तर एकाशी नाही. भारत या नावाचा वापर करणे घटनाबाह्य नाही. घटनेने `india that is bharat ' असे म्हटलेले आहे. म्हणजे दोन्हीही नावे घटनेने मान्य केली आहेत. त्यामुळे भारत या नावाचा वापर घटनाबाह्य होऊच शकत नाही. मी फक्त घटनेनेच मान्य केलेल्या एका नावाचा आग्रह धरला होता. पण हां, असा आग्रह करण्यात मी भावनांना महत्व देत आहे हे त्या मित्राचे म्हणणे मला पूर्ण मान्य आहे. नव्हे ही भावना सर्वत्र पोहोचावी, सगळ्यांनी ती उचलून धरावी असेही माझे मत आहे.

कोणतीही गोष्ट विशेषत: भाषा समजून घेताना ती `letter and spirit' अशा दोन्ही अंगांनी समजून घेणे आवश्यक असते. नुसतेच शब्द उपयोगाचे नसतात. त्यातील भाव अतिशय महत्वाचा असतो. भावासहित वापरले जाणारे शब्द अर्थवाही असतात एवढेच नाही तर त्यातून प्रवाहित होणारा अर्थ प्रेरक शक्तीसह परिणाम घडवून आणतो. आम्ही या `भाव' अंगाकडे अक्षम्य दुर्लक्ष तर केलेच आहे, उलट आता आम्ही ते नाकारू लागलो आहोत. आज दिसणारे अराजक त्याचाच परिणाम आहे.

आपल्या देशाचे नाव हाच मुद्दा घेऊ. `भारत' म्हटले की स्वाभाविकच `भारत माता की जय' मनात उमटते. इंडिया म्हटल्यावर कितीही प्रयत्न केला तरी `इंडिया माता की जय' येईल का? `भारतमाता' म्हटल्यानंतर जे जिवंत नाते, त्यापोटी येणारी समर्पणाची भावना, बांधिलकी, हजारो वर्षांचे व्यक्तिमत्वाला प्रभावित करणारे संचित, असे सारे काही प्रकट होते. पाहण्याची दृष्टीच बदलते. `i love my india' असे कितीही प्रेमाने म्हटले तरीही `भारत माता की जय'ची स्पंदने निर्माण नाही होऊ शकत. एखाद्या भाषेचा दुस्वास वा प्रेम हा मुद्दाच गैरलागू आहे. त्या-त्या भाषेचे आणि शब्दांचे सहचरी भाव असतात. त्यांचा हा परिणाम असतो. म्हणूनच कुंभमेळ्यात सहभागी होणारे विदेशी भक्त त्यांच्या उच्चारात, त्यांना शक्य होईल तसे `गंगामैय्या की जय' असेच म्हणतात. त्याचे भाषांतर करीत नाहीत किंवा त्यांच्या भाषेत `गंगामैय्या की जय'चा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.

आपण कितीही काही म्हटले तरीही इंडिया म्हटले की, या भूमीशी असलेले नाते; आपला सांस्कृतिक अनुबंध, आपले सामाजिक वातावरण उत्पन्न होत नाही, हे वास्तव आहे. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, कृष्णा, गोदावरी, हिमालय, कन्याकुमारी, राम-कृष्ण, बुद्ध, महावीर, गुरु गोविंदसिंग, शिवाजी, जगन्नाथ रथयात्रा, श्रावणबाळ, जोरावरसिंह- फतेहसिंह, कुंभमेळा, दसरा, दिवाळी, होळी, पुरणपोळी, वडाभात, झुणका-भाकर, नागपंचमी, तुळशीचे लग्न, मंगळागौर, वेद, उपनिषदे, आर्यभट्ट, कणाद, सुश्रुत, अशोक, विक्रमादित्य, कालिदास, शाकुंतल, शेजारधर्म, तुळशी वृंदावन, मरणाला आणि तोरणाला जाण्याचा आग्रह वगैरे वगैरे त्यातील काहीही आशयासह मनात उमटत नाही. असे अनेक दृश्य- अदृश्य धागे असतात ज्यामुळे समाजाच्या मनात `आम्ही' भावाचा उदय होतो.

आम्ही भावनांचा ओलावा काढून टाकून प्रत्येक माणसाचा एकेक ठोकळा करून टाकला आहे. माणूस म्हणजे फारतर एक मत. वास्तविक मत ही एक राजकीय व्यवस्था आहे. माणूस त्या मतापेक्षा खूप अधिक असतो. एक मत टाकले की झाले, असे होत नाही. तो काही राजकीय यंत्राचा एक नट-बोल्ट नाही. केवळ कायदे, नियम, शिक्षेची तरतूद हे सारे; त्याचे विचार आणि व्यवहार यांचे नियमन करू शकत नाही. माणसाचे विचार आणि व्यवहार त्याच्या स्वत:चे मन आणि बुद्धी यांनीच चालत असतात आणि नियंत्रित होत असतात. अन भावनांचे आवाहन त्याचा विवेकबोध जागृत ठेवीत असते. त्यामुळेच आजकाल बुद्ध्यांक लक्षात घेतात तसेच भावनांक देखील मोजू लागले आहेत. आता तर spiritual quotient देखील पाहू लागले आहेत. माणसाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर प्रथम त्याचा सर्वांगीण विचार करायला हवा.

व्यवहारात सुद्धा ही बाब पाहायला मिळते. आपण एखाद्या व्यक्तीसाठी काही करतो तेव्हा त्याच्याविषयी मनात असलेल्या भावना याच निर्णायक ठरतात. `आधी लगीन कोंडाण्याचे, मग रायबाचे' असे म्हणणारे तानाजी मालुसरे किंवा `तोफांचे आवाज येईतो गनिमास खिंड ओलांडू देणार नाही' असे महाराजांना आश्वस्त करणारे बाजीप्रभू देशपांडे भावनांच्या आवेगानेच कार्यप्रवण होत असतात. भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा जे झुंजले, त्यांच्याकडे भावनांशिवाय दुसरे काय होते? अगदी १९६५ च्या भारत- पाक युद्धाच्या वेळी देखील लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान- जय किसान ही घोषणा केली आणि लोकांना बचत करण्याचे, शक्य असल्यास एक वेळ जेवण्याचे आवाहन केले आणि लोकांनी या भावनांना प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक जण तर त्यानंतर जन्मभर एकदाच जेवत असत. भावनांमध्ये माणसाला त्याच्या अंगभूत मर्यादांच्या वर उचलण्याची शक्ती असते. भावनांचे आवाहन माणसाला हिमालयाएवढे कर्तृत्व गाजवण्याचे बळ देते. भावनांचा आधारच माणसाला अनेक संकटातून तारून नेते.

आज मात्र आम्ही सगळीकडूनच या भावनांची हकालपट्टी करण्याच्या मागे लागलो आहोत. सध्या हैद्राबाद बॉम्बस्फोट प्रकरण सुरु आहे. अन्यत्रही बॉम्बस्फोट होत असतात. सुरक्षा यंत्रणांचे अपयश, यावरही चर्चा सुरु आहेत. या सुरक्षा यंत्रणांचे खबरे असतात. त्यांना काही थोडीबहुत रक्कमही दिली जाते, त्यांनी माहिती द्यावी म्हणून. हा सगळा व्यवहार झाला. तो योग्यही आहे, पण आपण त्यात भावना ओतल्या नाहीत. ओतत नाही. आपण तो फक्त पैशाचा व्यवहार म्हणून करतो. त्यामुळे मग कोणी अधिक पैसे दिले की खबऱ्या त्याला माहिती देणार. किंवा `एवढ्या कमी पैशात माहिती कशी देणार' म्हणून बहाणेबाजी करणार. मात्र, आपण जे माहिती देण्याचे काम करीत आहोत ते देशभक्तीचे काम आहे अशी भावना त्याच्या मनात जागवली तर? मग त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळू शकतील.

सरकारी कार्यालयात वा अन्यत्रही लोक काम करताना आढळत नाहीत. किंवा जे काम करतात ते परिणामकारक नसते. टाळाटाळ, चालढकल हे सारे का पाहायला मिळते? कारण काम करण्याची प्रेरणाच मुळी, पैसा कमावणे ही आहे. आपण आपल्याच समाज बांधवांचे काम करतो आहोत, त्यांच्या सुख-सुविधांसाठी काम करीत आहोत. या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो, मिळायलाही हवा. त्यातून आपला चरितार्थ चालतो. पण कामाचा उद्देश पैसा कमावणे हा नाही, तर समाजाचे, लोकांचे हित हा उद्देश आहे ही भावना असली तर माणसे मनापासून आणि चांगले काम करू शकतील. आज मात्र आम्ही कामाची प्रेरणाच खुजी करून टाकली आहे. सारा समाजच निरर्थक, निरुद्देश जगतो आहे. त्याला उद्देश आणि सार्थकता प्रदान करण्यासाठी त्याच्या व्यक्तित्वाच्या भावनिक पैलूकडे लक्ष देण्याची अन तो अधिक समृद्ध आणि सकस बनवण्याची गरज आहे.

सगळ्या जगभरच आज हा पोकळपणा जाणवू लागला आहे. त्यामुळेच इतक्या बैठकी होतात, अहवाल होतात, सर्वेक्षणे होतात, अभ्यास होतात, नियोजन होते, ठराव होतात; त्यातून हाती मात्र काहीच लागत नाही. ज्या माणसांसाठी हे सारे सुरु असते, त्या माणसाला सुटे सुटे करून काही साध्य होणार नाही. माणसाला माणसाशी, समाजाशी, निसर्गाशी, भावनांशी, संवेदनांशी जोडण्याची गरज आहे. `मी आणि माझे' विरुद्ध `सर्वेपि सुखिन: सन्तु' असा हा मूल्यसंघर्ष आहे. `इंडिया' `मी आणि माझे'चा निर्देश करतो; तर `भारत' `सर्वेपि सुखिन: सन्तु'चा निर्देश करतो. म्हणून `भारत' म्हणण्याचा भावनिक आग्रह मी सगळ्या मित्रांना गणराज्य दिनानिमित्त केला होता. दोन दिवसांपूर्वी हैद्राबाद शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांनी पुन्हा एकदा तोच आग्रह करावासा वाटला.

आमच्या देशाचे नाव भारत आहे. अतिशय अन्वर्थक असे ते नाव आहे. त्यात भा=भाव, र=राग, त=ताल आहेत. याच आशयपूर्ण नावाचा आग्रही वापर करीत त्याला गमावलेला ताल परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला तरच भारताची भावसरगम संपूर्ण जगात माधुर्यसंगीत निर्माण करेल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २३ फेब्रुवारी २०१३

चव्हाटा'वरील धटिंगणशाही

फेसबुकवर `चव्हाटा' नावाचा एक ग्रुप आहे. गेल्या शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी `संघ समजून घेताना' या शीर्षकाने एक लेख मी त्यावर टाकला. (हा लेख नेटवर अन्यत्रही टाकला आहे.) त्यावर स्वाभाविकच प्रतिक्रियाही आल्या. आता प्रतिक्रिया म्हटल्यावर काही समर्थनाच्या येणार तर काही विरोधाच्याही. त्यात नवीन काहीच नाही. गेली २० वर्षे लेखन करीत असल्याने ते सवयीचे आहे. `चव्हाटा'वर आलेल्या प्रतिक्रिया मात्र खोडसाळ होत्या. त्यातील आशय आणि शैली पाहून हा खोडसाळपणा स्पष्ट होत होताच. तरीही त्याला उत्तर दिले. अर्थात हे उत्तर खरमरीत असेच होते. त्याचाच एक लेख होईल एवढे विस्तृतही होते. त्यावरही पुन्हा प्रतिक्रिया आली. त्यावरून संबंधितांना विषय समजूनही घ्यायचा नाही आणि नीट चर्चाही करायची नाही हे लक्षात आले. त्यामुळे त्या लिखाणाची आणि लिहिणाऱ्याची थोडीबहुत टिंगलटवाळी करून आणि काही तडाखे लावून मी विषय संपविला.

आज (सोमवार, १८ फेब्रुवारी) त्यावर पुन्हा प्रतिक्रिया दिसल्या. यावेळी झुंडशाही सुरु झाली होती. मी मुद्देसूद दिलेले उत्तर दुर्लक्षित करून काहीतरी इकडतिकडचे भारुड त्यात होते. तेही प्रत्यक्ष वस्तुस्थिती या स्वरूपाचे नसून गृहीतक या स्वरूपाचे. म्हणजे `आम्हाला असे वाटते, म्हणून ते तसेच आहे' अशा पद्धतीचे. तिथवर सुद्धा काही हरकत नव्हती. काही नाठाळ लोक असतातच. पण त्यात एक वाक्य होते की, `असे काही यापुढे लिहाल आणि प्रसारित कराल तर आम्ही तुमच्यावर तुटून पडणारच.' ही चक्क अरेरावी आणि हडेलहप्पी होती. तरीही माझा अनुभव लक्षात घेऊन, माझे निखळ प्रबोधनाचे हेतू आठवून आणि थोडेसे दुर्लक्ष करून; त्यावर काही उत्तर लिहिण्याऐवजी मी दुसरा मार्ग उपयोगात आणला.

माझ्या समर्थनार्थ जे मुद्दे मी मांडले होते त्यांना आधार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे `thoughts on pakistan', महात्मा गांधींचा हिंदुत्वावरील संपूर्ण लेख, सर्वोच्च न्यायालयाचे हिंदुत्वाच्या मुद्यावरील संपूर्ण निकालपत्र, मनुस्मृती आणि डॉ. आंबेडकर याविषयीची काही माहिती आणि अजमेर दर्ग्यापुढून जाणारे संघाचे संचलन आणि त्याचे स्वागत करणारे मुस्लिम बांधव यांचे छायाचित्र `चव्हाटा'वर टाकले. थोड्याच वेळात `चव्हाटा'च्या अॅडमीनचा मेसेज आला की, मी कोणतेही प्रचारकी साहित्य त्या ग्रुपवर टाकू नये. खरे तर मी टाकलेल्या छायाचित्राशिवाय अन्य काहीही प्रचारकी या पद्धतीचे नव्हते. मी त्यांना कळवले की, मी कोणाचा प्रचार वगैरे करण्याचा प्रश्नच नाही. मी माझे विचार स्वतंत्रपणे मांडत असतो. परंतु योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अपप्रचार आणि गैरसमज रोखण्याचा तोच परिणामकारक आणि एकमेव मार्ग आहे. छायाचित्र हा प्रचार नसून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आहे. त्यावर अॅडमीनचे उत्तर आले की, सध्या व्यस्त आहे. मग बोलू. थोड्या वेळाने `चव्हाटा'वर पाहिले तर माझी सगळी पोस्ट काढून टाकलेली होती. मी लगेच अॅडमीनला मेसेज पाठवला आणि ग्रुप सोडला.

हा प्रकार इथेच संपला. तो फार काही मनावर घ्यावा असेही काही नाही. तो ग्रुप सोडल्याने मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही असेही नाही. केवळ फेसबुकचा विचार केला तरीही अन्य अनेक पर्याय आहेत. बाकी मार्ग तर आहेतच. त्या ग्रुपची सदस्यसंख्या साडेआठशेच्या जवळपास आहे. त्याहून जास्त लोकांपर्यंत एका दिवसात प्रत्यक्ष पोहोचण्याची माझी शक्ती आहे. त्यामुळे तोही भाग नाही. हे सगळं काही लिहून शेअर करावं असंही मनात नव्हतं.

परंतु हा प्रकार झाल्यावर दूरचित्रवाणी पाहिली. त्यावर headlines today वर राजीव कंवल चर्चा घेत होता. मार्कंडेय काटजू आणि अरुण जेटली वादावर. मोदींना मुस्लिम समाजाचा असलेला विरोध, हा मुद्दा होता. राजीव कंवल मुद्दा मांडत होता की, मोदी तर मुस्लिम बहुल भागातही जिंकले आहेत. विधानसभाही जिंकले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जिंकले आहेत. पण काटजू यांचे एकच उत्तर, मोदींना मुसलमानांचा प्रचंड विरोध आहे. राजीव कंवल मांडत असलेल्या वास्तवावर बोलायला ते तयारच नव्हते, बस आपला निष्कर्ष रेटणे एवढेच.

वास्तविक, समोर असलेल्या आणि येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा अन्वयार्थ लावून निष्कर्ष काढणे हीच शास्त्रीय पद्धत असू शकते. दुसरी कुठलीही नाही. पण निष्कर्ष आधीच काढायचा, त्याचा आधार `आम्ही म्हणतो म्हणून'; अन्य गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. आणि एकदम जाणवले, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष काय आणि `चव्हाटा'वरील दीडदमडीचे विद्वान काय, एकाच माळेचे मणी. त्यांचे हेतू वेगळे सांगायची गरज आहे का? समाज एकसंध राहावा असे त्यांना खरेच वाटते का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ फेब्रुवारी २०१३

या विकृतांना वठणीवर कसे आणायचे?

आपल्या समाजाला कौतुकाची खूप घाणेरडी सवय लागली आहे आणि राजकारण नामक गोष्टीने सारा समाज नासवून टाकला आहे. आज पुन्हा हे आठवायचे कारण म्हणजे डीजे नावाचा प्रकार. प्रत्येकाला कधी ना कधी हा त्रास सोसावा लागतोच. आम्ही करू मात्र काहीच शकत नाही. तीन-चार तास ज्यावेळी सतत कानठळ्या बसत असतात त्यावेळी करायचे काय? कायदा गाढव असतो म्हणतात ते काही खोटे नाही. अमुक वेळेत तुम्ही डीजे वाजवू शकता. म्हणजे त्या वेळेत कोणाला त्रास होऊ शकत नाही की काय? की त्या वेळेतील त्रास निमूटपणे सहन केलाच पाहिजे? बरे या प्रकारात आनंद काय असतो देवच जाणे. अन समजा माझ्यासारख्या मूर्खाला तो आनंद समजत नसेल वा तो लुटता येत नसेल तरीही, मला त्रास देऊन आनंद साजरा करण्याची परवानगी कोणाला कशी काय असू शकेल? अनेकदा तर समाजातील तथाकथित प्रतिष्ठीतच या प्रकाराशी संबंधित असतात. `जाऊ द्या ना' अशीच त्यांची भूमिका असते.

वास्तविक कोणाच्या तक्रारीची वगैरेही वाट न पाहता कारवाई करण्याचे आणि साहित्य जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना द्यायला हवेत. अन ज्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली जाईल त्या ठाण्यातील अधिकाऱ्याचीच त्वरित बदली करायला हवी. म्हणजे ते स्वत:हून efficiently काम करतील. दुसरे म्हणजे हे साहित्य काही कोणाच्या घरात नसते. बहुतेक वेळा ते भाड्याने आणलेले असते. हा व्यवसाय करणाऱ्यावरच ही कारवाई व्हायला हवी. त्याने सामानच ठेवले नाही तर कोण वाजवणार डीजे. जेव्हा डीजे नव्हते तेव्हाही मंडप डेकोरेशनवाले होतेच ना?

अशा प्रकारची गाणी तयार करणारे, म्हणणारे, वाजवणारे, असे चित्रपट, असे studio या सार्यांवर बंदी घालून कारवाई करायला हवी. यांना दुसरा काही रोजगार नाही मिळाला अन ते मेले तरी काय हरकत आहे. जो दुसऱ्याचा विचार करायला नकार देतो तो जिवंत असल्यापेक्षा मेलेलाच बरा. घर हलवणारे, डोके बधिर करणारे हे गाणे बजावणे बंद व्हायलाच हवे. घरे हलवणाऱ्या गाण्यांपेक्षा मने डोलवणारे संगीत हवे. आजचे गीतकार, संगीतकार ते देऊ शकत नसतील तर त्यांनी मरून जावे. आणि समाजानेही काय पोसायचे आणि काय संपवायचे याचा विवेक शिकला पाहिजे. स्वत:च्या कौतुकाच्या आरत्या ओवाळून घेणे समाजानेही टाकून द्यायला हवे.

ज्यांनी कारवाई करायला हवी ते आणि त्रास सोसूनही तो निमूट सहन करतात ते षंढ आहेत तर दुसऱ्यांचा विचार न करणारे विकृत आहेत, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. सर्व प्रकारचं पाप वाट्याला आलं तरीही चालेल पण अशा विकृतांचं तळपट व्हावं, कधीही भलं होऊ नये, त्यांच्या अंगात किडे पडावे आणि मेल्यावर त्यांनी नरकात जावं याशिवाय दुसरं काहीही म्हणता येण्यासारखं नाही.

संघ समजून घेताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ प्रचारक भय्याजी गाडे यांचे ७ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९२ व्या वर्षी वर्धा येथे निधन झाले. ९ फेब्रुवारी रोजी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक सभा झाली. यात संघाच्या अधिकाऱ्यानसोबतच एन. सुलताना शेख यांनीही भय्याजी गाडे यांना श्रद्धांजली वाहिली. सुलताना शेख या मुस्लिम महिला आहेत हे तर न सांगताही कळणारे आहे. हिंदू राष्ट्राच्या उभारणीचा ध्यास घेतलेल्या संघाचे आजीवन प्रचारक राहिलेले भय्याजी गाडे यांचा आणि त्यांचा काय संबंध? या दोघांचा संबंध हा पिता- पुत्रीचा संबंध होता. सुलताना शेख या मूळ आर्वीच्या. लग्न होऊन त्या वर्धेला आल्या. भय्याजी काही काळ आर्वी शहरात प्रचारक होते. अन्यत्रही प्रचारक म्हणून त्यांनी काम केले. अखेर ते वर्धेला जिल्हा कार्यालयात वास्तव्याला आले. प्रदीर्घ काळ त्यांचे वास्तव्य वर्धा कार्यालयात होते. सुलताना शेख या वर्धा संघ कार्यालयाच्या जवळच राहतात. आर्वीची जुनी ओळख या ठिकाणीच नात्यात परिवर्तित झाली. मग काय? भय्याजींचे दुखणे-खुपणे, चहापाणी अशा सगळ्या गोष्टींकडे स्वयंसेवकांसोबतच सुलताना शेख देखील लक्ष देऊ लागल्या.

तब्येत ठणठणीत होती तोवर भय्याजींचीही सुलताना यांच्या घरी चक्कर ठरलेलीच. प्रसंगविशेषी जेवणखावण पण होत असे. भय्याजींच्या आवडीनिवडी देखील सुलताना यांना ठाऊक आहेत. भय्याजींनी दिलेली शाल आपण सांभाळून ठेवली आहे, असेही त्यांनी श्रद्धांजली सभेत सांगितले. सुलताना यांचे पती आणि मुले यांच्याशीही भय्याजींचा स्नेह जुळला होता. आर्वीचे कोणी वर्धेला आले तर ते, आवर्जून त्यांना सुलताना यांच्याकडे घेऊन जात. त्यांची ओळख करून देत. आपुलकीचा परीघ वाढवीत असत. म्हणूनच श्रद्धांजली सभेत सुलताना शेख यांनाही गहिवरून आले होते.

विशेष म्हणजे, संघालाही यात काही गैर वाटले नाही. कधी कोणी या संबंधांबद्दल नाराजी व्यक्त केली नाही. श्रद्धांजली सभेत तर भय्याजी नव्हते; मंचावर विदर्भ प्रांताचे संघचालक दादासाहेब भडके, महाराष्ट्र- गुजरात- गोवा या तीन राज्यांचा मिळून असलेल्या संघ व्यवस्थेतील पश्चिम क्षेत्राचे प्रचारक सुनील देशपांडे आदी मंडळी होती. तरीही सुलताना यांना बोलावण्यात आले. सभेत आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. संघ मुसलमानांविषयी द्वेष पसरवतो, संघ मुसलमानांचा शत्रू आहे, वगैरे जे समज बाळगले जातात किंवा पसरवले जातात त्यात तथ्य आहे असे, हा प्रसंग पाहून म्हणता येईल का? संघाच्या कामाची एक विशिष्ट शैली आणि पद्धत आहे. ती समजली की मग अनेक गैरसमज दूर होतात.

संघ ब्राम्हणांचा आहे आणि अन्य जातींच्या विरोधात आहे, असेही एक वातावरण सुरुवातीला अनेक वर्षे होते. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने संघाने आता तो समज मोठ्या प्रमाणात दूर केला आहे. स्वत: महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनीही संघाच्या या शैलीचा अनुभव घेतला आहे आणि प्रत्यक्ष संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्याशी त्याविषयी चर्चा केली आहे. मुसलमानांच्या बाबतीतही कालांतराने गैरसमज दूर होतील. समाजातील प्रत्येक माणूस जोडत जायचा आणि प्रेम पेरत जायचे ही ती शैली. कार्यकर्त्याची क्षमता, त्याचे गुणदोष, परिस्थिती यानुसार या शैलीचे परिणाम पाहायला मिळतात.

तत्व आणि व्यवहार यातील तफावत जगात सगळीचकडे, सर्वच क्षेत्रात पाहायला मिळते, अनुभवाला येते. परंतु ही तफावत सुद्धा नीट समजून घ्यायला हवी. तत्व ही एखाद्या महान व्यक्तीने त्याच्या आयुष्याची किंमत देऊन सिद्ध केलेली बाब असते. अन्य सामान्य लोकांना त्याविषयी आस्था आणि ओढ असते. त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही ते करतात. पण त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक मर्यादा असतात. मग तो चुकतो, गैर वागतो. अशा गैर वागण्यामागे स्वार्थ वा काही निराळा हेतूही असू शकतो, पण नेहमीच तसा काही हेतू असतो असे मानण्याची गरज नाही. ही एक संपूर्ण निराळी, दीर्घकालीन प्रक्रिया असते. नियम, कायदे करून, आक्रस्ताळेपणा करून त्यातून फारसे साध्य होत नाही. हे सारे नीट समजून घेणे याचेच नाव परिपक्वता. संघाचा यावरच भर असतो.

याशिवाय आणखीन एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, एखादी व्यक्ती व विचार यांची चिकित्सा, विश्लेषण आदी तटस्थपणे आणि कठोरपणे करतानाही त्याच्याबद्दल स्नेह आणि सहानुभूती बाळगता येते. संघर्ष करतानाही ज्याच्याशी संघर्ष करायचा त्याच्याबद्दल मनात दुष्टावा असण्याचे कारण नाही. पण स्नेह, सहानुभूती आहे याचा अर्थ कणखर चिकित्सा करायची नाही, हे धोरण योग्य नाही. हे नीट समजून घेतले की मग बराच गोंधळ कमी होतो. पुरोगामी, सेक्युलर (धर्मनिरपेक्ष, निधार्मिक, धर्मविरोधक, इहवादी) संघाच्या बाबतीत कधी हे समजून घेतील का? समजून घेऊ शकतील का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १५ फेब्रुवारी २०१३

करुणामयी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, `बल हेच जीवन. निर्बलता म्हणजे मृत्यू.' त्यांच्या सगळ्या विचारातून हीच शक्तीची उपासना झळकताना पाहायला मिळते. पण ही शक्ती कुठेही एकांगी झालेली पाहायला मिळत नाही. याचे कारण त्याला असलेली करुणेची जोड. शक्तीच्या महावस्त्राला स्वामीजींनी करुणेचे अस्तर लावलेले आहे. करुणा हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. ही करुणा एखादी विशिष्ट व्यक्ती, विचार, संदर्भ किंवा अन्य कशाशी बांधलेली नाही. तर स्वामीजींच्या करुणेचा हा प्रवाह अप्रतिहत सर्व चराचरासाठी अबाधपणे वाहत असल्याचे पाहायला मिळते. आत्मविकास, आत्मसंघर्ष, आत्माभिव्यक्ती, सामाजिक उत्थान, आध्यात्मिक उन्नती अशा साऱ्याच पैलूंमध्ये ही करुणा ओतप्रोत भरलेली दिसून येते.

स्वामीजी वृंदावनला जात होते, तेव्हाचा एक प्रसंग. सुमारे ५० किलोमीटर अंतर स्वामीजी पायी चालत गेले. वीसेक किलोमीटर चालून गेले असतील. थकून गेले होते. तेवढ्यात एक माणूस रस्त्याच्या कडेला बसून चिलीम ओढत असलेला त्यांना दिसला. आपणही एकदोन झुरके मारावे म्हणजे जरा हुशारी वाटेल, असे पायपीट करून दमलेल्या स्वामीजींना वाटले. ते त्या माणसाजवळ गेले आणि त्यांनी त्याला चिलीम मागितली. तो घाबरून म्हणाला, `महाराज आपण साधू आहात. मी भंगी आहे. आपल्याला माझी चिलीम चालणार नाही.' हे ऐकताच स्वामीजी आपल्या वाटेने चालू लागले. काहीच अंतर चालून गेले असतील, त्यांच्या मनात विचार आला- आपण संन्यासी आहोत. सर्वाभूती परमेश्वर पाहतो आणि तो माणूस भंगी आहे म्हणून त्याची चिलीम आपल्याला चालत नाही. असे कसे? पुढे गेलेले स्वामीजी परत फिरले. त्या माणसाच्या जवळ बसले अन त्याला म्हणाले, `मला चिलीम भरून दे.' तो माणूस गयावया करू लागला. परंतु स्वामीजींनी त्याला समजावले आणि आग्रह केला. त्याच्या हातची चिलीम त्यांनी ओढली. ताजेतवाने झाले आणि मगच पुढच्या मार्गाला लागले. या छोट्याशा प्रसंगात आपल्या मर्यादेतून बाहेर पडण्याचा आत्मसंघर्ष जसा आहे, तसाच मानव्याचा दाट गहिवर सुद्धा आहे. खरे तर हा गहिवर असल्याशिवाय कशालाही काही अर्थ नाही, असा दूरगामी संदेशही आहे.

स्वामीजींच्या भारतभ्रमणात घडलेला आणखीन एक प्रसंग असाच बोलका आहे. राजस्थानातील खेत्री संस्थानात त्यावेळी स्वामीजी वस्तीला होते. एक दिवस संस्थानाचे महाराज अजितसिंग एका नर्तकीचे गाणे ऐकणार होते. त्यांनी स्वामीजींना निरोप पाठवला. आपण संन्यासी असल्यामुळे नर्तकीच्या गाण्याला येऊ शकणार नाही, असे स्वामीजींनी कळवले. त्या गायिकेला हा निरोप झोंबला. तीही चतुर असली पाहिजे. तिने सुरदासाचा एक अभंग गायला घेतला. अभंग होता, `प्रभू मोरे अवगुण चित ना धरो, समदर्सी है नाम तिहारो, चाहे तो पार करो.' ती गायिका अतिशय करुण स्वरात आळवीत होती, `हे प्रभू तू तर समदर्शी आहेस.' पुढील चरणात म्हटले होते, `लोखंडाचा एक तुकडा देवमूर्तीच्या रुपात असतो आणि दुसरा कसायाच्या हातातील सुरीच्या रुपात असतो. पण परिसाचा स्पर्श झाला की, दोन्हीचे सोने होते.' हे प्रभू तूही तसाच आहेस. तुझ्यापुढे पुण्यवान काय नि पापी काय, सगळे सारखेच. सारी तुझीच लेकरे. सूरदासांच्या या पदातील आर्त व्याकुळता स्वामीजींच्या हृदयाला घर करून गेली आणि त्यांनी गाणे संपल्यावर त्या गायिकेची क्षमा मागितली. मनातील अपार करुणेशिवाय हे शक्य आहे का? असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात व आजूबाजूला घडतच असतात, पण साधारणपणे त्याकडे दुर्लक्ष करण्याचीच प्रवृत्ती आपण पाहतो.

मात्र ही करुणाशीलता एवढ्यापुरतीच नव्हती. स्वामीजींना त्यांच्या प्रवासात त्यावेळच्या समाजाचे विदारक दर्शन होत होते. दारिद्र्य आणि अज्ञान यांच्या विक्राळ दर्शनाने त्यांना अस्वस्थ केले होते. म्हणूनच अनेकदा ते महाराज अजितसिंग यांच्याशी याबद्दल बोलत असत. पैसा आणि सत्ता हाती असलेल्या संस्थानिकांनी यावर उपाय करायला हवा, अशी कर्तव्याची जाणीव ते सतत करून देत असत. सामान्य माणसाला शिक्षण द्यावे. हे शिक्षण त्याच्या हाताला काम देणारे आणि त्याचे मन सदाचाराकडे वळवणारे असावे, असा त्यांचा आग्रह राहत असे. याच प्रवासात अबुमार्ग स्थानकावर त्यांची आपले गुरुबंधू ब्रम्हानंद आणि तुरीयानंद यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी बोलतानाही त्यांनी या दारिद्र्याचा आणि लोकांच्या हलाखीचाच उल्लेख केला. ही परिस्थिती पाहून आपल्याला रात्र रात्र झोप येत नाही, असे आपल्या गुरुबंधूंना सांगता सांगताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्याला फार मोठे काम करावे लागेल, असेही ते त्यांच्याशी बोलताना म्हणाले.

मादाम एम्मा काल्व्हे ही त्या काळातील युरोप व अमेरिकेतील रंगभूमीवरील एक आघाडीची गायिका होती. तिच्याही बाबतीत एक विलक्षण प्रसंग घडला. सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी हे सारे काही पायाशी लोळण घेत असूनही ती मनाने प्रचंड अस्वस्थ, एकाकी आणि खचलेली होती. विवेकानंदांचा मुक्काम त्यावेळी ऑपेरा हाऊसचे मालक मिल्वर्ड अडम्स यांच्याकडे होता. तिने विवेकानंदांना भेटावे असे काही जणांनी तिला सुचवले पण ती काही गेली नाही. एक दिवस तिचा प्रयोग सुरु होता. पहिला अंक झाला. पण दुसऱ्या अंकात आपण काम करू शकणार नाही, आपणास अस्वस्थ वाटते आहे असे ती म्हणाली. तरीही सगळ्यांनी तिला दुसऱ्या अंकासाठी तयार केले. दुसरा अंक संपला आणि मग मात्र ती अस्वस्थ मन:स्थितीतच आपल्या खोलीत गेली. नेहमीप्रमाणेच खोलीबाहेर अनेक लोक उभे होते. पण क्षणभरात तिला लक्षात आले की लोक आहेत पण नेहमीची गडबड गोंधळ नाही. ती बाहेर आली तेव्हा व्यवस्थापकांनी सांगितले की, तिची सहा वर्षांची मुलगी अपघाताने जळून मरण पावली आहे. तिला ही घटना माहीत नसतानाही अंतर्मनातील कुठल्याशा संवेदनेने ती पहिल्या अंकानंतर अस्वस्थ झाली होती. या घटनेनंतर ती पूर्णच ढासळली. ती आत्महत्येचा विचार करू लागली. आपण मिशिगन सरोवरात उडी घ्यावी म्हणून ती बाहेर पडत असे. पण नकळत तिची पावले विवेकानंदांच्या मुक्कामाच्या घराकडे वळत; अन स्वप्नातून बाहेर आल्याप्रमाणे ती भानावर येत असे. ती विवेकानंदांना भेटायला मात्र गेली नाही. चार-पाच वेळा असे झाल्यानंतर मात्र एक दिवस ती मनाचा हिय्या करून स्वामीजींना भेटायला गेली. तिने खोलीत प्रवेश केला तेव्हा स्वामीजी ध्यान करीत होते. एम्मा काल्व्हेने खोलीत प्रवेश करताच ते म्हणाले, `ये मुली. ये. कोणतीही भीती बाळगू नकोस.' एवढ्या शब्दांनीच ती शांत झाली. नंतर त्यांनी तिच्याकडे न पाहताच तिच्या जीवनाविषयी बोलायला सुरुवात केली. अनेक खाजगी गोष्टींचाही त्यांनी उहापोह केला. त्यावर काल्व्हेने विचारले, आपणास हे कोणी सांगितले? त्यावर स्वामीजी उत्तरले, कोणी काही सांगण्याची गरज आहे असे तुला वाटते का? मी तुझे मन एखाद्या पुस्तकासारखे वाचू शकतो. नंतर त्यांनी तिला मन शांत आणि प्रसन्न करण्यास सांगितले. तब्येत सुधारून घेण्यास सांगितले. अतिशय समाधानाने एम्मा काल्व्हे तिथून बाहेर पडली. भाषा, भूषा, देश सारं काही टोकाचं वेगळं असलेल्या एका अपरिचित गायिका नटीविषयी देखील स्वामीजींची वृत्ती केवढी करुणार्द्र होती.

पाश्चात्य देशातील आपला दुसरा प्रवास आटोपून स्वामीजी परतत होते. चार दिवसांचा ग्रीसमधील मुक्काम आटोपून ते इजिप्तला आले होते. एक दिवस संध्याकाळी सोबतच्या काही लोकांसह ते इजिप्तची राजधानी कैरो येथील रस्त्यांवरून फिरत होते. बोलायला अनेक विषय होते. कुठलाही कार्यक्रम नसल्याने सारेच गप्पा आणि भटकण्याच्या मन:स्थितीत होते. चालता चालता अचानक सोबत्यांच्या लक्षात आले की ते नकळत वेश्यांच्या वस्तीत आले आहेत. लगेच सगळे माघारी वळले. त्यांच्यासोबत स्वामीजीही मागे फिरले. पण आपण मागे का फिरलो याचे त्यांना भानच नव्हते. तशात तेथील एका स्त्रीने त्यांना आवाज दिला आणि स्वामीजी सरळ तिच्या समोर जाऊन उभे राहिले. तिचे हावभाव आणि बोलणे स्वामीजींनी ऐकले आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले, `किती दुर्दैवी जीव! आपण स्वरूपत: कोण आहोत याचा तिला पूर्ण विसर पडला आहे. आपलं सारं ईश्वरत्व तिने केवळ आपल्या शरीरात विसर्जित करून टाकलं आहे.' त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले अन त्यांनी हात जोडले. स्वामीजींची ही प्रतिक्रिया पाहून त्या स्त्रियाही भांबावून गेल्या. त्यात सामान्य पुरुषी प्रतिक्रियेचा तर लवलेशही नव्हता, पण घृणा, तिरस्कार, राग, द्वेष इत्यादीही नव्हते. होती ती केवळ अपार करुणा. त्यांच्या मनातील हे भाव थेट त्या वेश्यांच्या हृदयाला भिडले त्यांनी आपले चेहरे झाकून घेतले. त्यातील एकीने त्यांच्या वस्त्राला आदरपूर्वक किंचित स्पर्श केला आणि ती उद्गारली, `साधू पुरुष. ईश्वरी आत्मा.' एम्मा काल्व्हेने हा प्रसंग लिहून ठेवताना म्हटले आहे, समाज ज्यांची हेटाळणी करतो त्यांच्याबद्दल दाटून आलेली ही अपार करुणा पाहून मला येशु ख्रिस्ताची आठवण आली.

स्वामीजींच्या जीवनातील एक प्रसंग असाच हृद्य आहे. इ.स. १९०१ चा अखेरचा काळ होता. कोलकाता येथे गंगेच्या किनाऱ्यावर बेलूर मठाचे काम सुरु होते. या कामावर अनेक संथाळ मजूर काम करत होते. स्वामीजी त्यांच्याशी बोलत असत. त्यांच्या सुखदु:खाच्या गोष्टी ऐकत असत. कधी कधी ते म्हणतही असत, `महाराज तुम्ही आमच्याशी बोलत नका जाऊ. आमचं काम नाही झालं किंवा उशीर झाला तर आम्हाला रागावतील.' पण स्वामीजी त्यांना अभय देत. म्हणत, घाबरू नका. मी पाहून घेईन ते. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगा. त्या मजुरांना तेवढेच बरे वाटे की कोणीतरी आपले म्हणणे ऐकतो. आपली विचारपूस करतो. पुष्कळदा त्या मजुरांची दु:ख ऐकून स्वामीजी भावनावश होऊन जात असत. एक दिवस त्यांनी त्या मजुरांचा प्रमुख केष्टो याला विचारले, `तुम्हाला इथे जेवण दिले तर चालेल का?' त्यावर केष्टो म्हणाला, `तुमच्या हातचं मीठ खाल्लं तर आमची जात बुडेल ना?' त्यावर स्वामीजी म्हणाले, `स्वयंपाकात मीठ घालणार नाही. मीठ वेगळे ठेवू. लागेल तसे घ्यावे.' तसा बेत ठरला आणि एक दिवस बेलूर मठात सगळ्या मजुरांना सुग्रास जेवण देण्यात आले. त्या मजुरांनी असे जेवण कधीही जेवले नव्हते. ते म्हणाले, `महाराज, कसे बनवले हे सारे पदार्थ. आम्ही तर आजपर्यंत कधीच एवढं चांगलं जेवलो नाही.' स्वामीजी पंक्तीतून फिरून सगळ्यांचा समाचार घेत होते. आग्रह करत होते. ज्या दरिद्री नारायणाच्या सेवेचा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला, त्या दरिद्री नारायणाला प्रातिनिधिक रुपात का होईना, पण एक दिवस तरी चांगले पोटभर जेवायला घालावे ही त्यांची इच्छा होती. त्या दिवशी आपल्या शिष्यांशी बोलतानाही ते याच विषयावर बोलले. ते म्हणाले, `दारिद्र्य हा आपला खूप मोठा अन महत्वाचा प्रश्न आहे. हा मठ, पूजाअर्चा, धर्माची शिकवण हे सारे करीत राहून आपण काय करणार आहोत? हे सारे विकून टाकावे. येणारा पैसा गोरगरिबांना वाटून टाकावा आणि आपण सगळ्यांनी भिक्षा मागून गुजराण करावी. गरिबांची सेवा करावी.' अर्थात भावनावेगातील या उद्गारांच्या मर्यादाही त्यांना माहिती होत्या. ज्या समाजासाठी त्यांचे मन तळमळत होते त्या समाजाच्या कल्याणासाठीच बेलूर मठासारख्या कायमस्वरूपी व्यवस्थेची गरज असते हे त्यांनाही ठाऊक होतेच. पण त्यांच्या मनातील करुणा मात्र अशी ओसंडून वाहत असे.

आपल्या या व्याकूळ करुणाशीलतेला अनेकदा त्यांनी आपल्या पत्रातूनही वाट मोकळी करून दिली आहे. शिकागो सर्वधर्म परिषदेच्या त्या जगप्रसिद्ध पहिल्या भाषणानंतरच्या मन:स्थितीचे वर्णन करताना आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `कालपर्यंत जगाला अनभिज्ञ असलेला मी आज जगप्रसिद्ध होऊन गेलो होतो. सारी सुखे माझ्या दाराशी हात जोडून उभी होती. पण रात्रभर माझा डोळ्याला डोळा लागला नाही. सतत माझ्या नजरेपुढे माझ्या देशबांधवांची खपाटीला गेलेली पोटे येत होती. त्यांच्या अज्ञान, हलाखीची आठवण मनाला अस्वस्थ करीत होती. माझी उशी आसवांनी भरून गेली होती.'

दक्षिणेश्वर येथे आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांचा जन्मदिन साजरा झाला. मोठ्या उत्साहात साजऱ्या झालेल्या या उत्सवात काही उपद्रवी लोक, चोर, वेश्या आदीही आले होते. त्यांनीही प्रसाद वगैरे घेतला याबद्दल त्यांच्या गुरुबंधूंनी आपली नाराजी स्वामीजींना पत्रातून कळवली होती. त्यावर स्वामीजींनी पाठवलेले उत्तर स्वामीजींचे अलौकिकत्व सांगून जाते. आपल्या गुरुबंधूंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `काय म्हणता तुम्ही? हे लोक आलेत म्हणून काय झाले? त्यांनाच तर ठाकुरांची खरी गरज आहे. जे जीवनातून विचलित झाले आहेत. भरकटले आहेत त्यांनाच तर प्रकाश हवा. चांगले सभ्य लोक नाराज झाले आणि आले नाहीत तरी चालेल. पण या लोकांना थांबवू नका. त्यांनाच ठाकुरांच्या कृपेची गरज जास्त आहे.' अर्थात हा भावात्मक आशय सांगतानाच त्यांची दृष्टी व्यवहारावरून ढळली नाही. या लोकांमुळे कार्यक्रमात व्यत्यय वा गोंधळ निर्माण होऊ नये. कार्यक्रमाची शिस्त आणि गांभीर्य कायम राहावे याकडे लक्ष देण्यात यावे, असे सांगून त्यासाठी काय उपाय करावे हे देखील स्वामीजींनी याच पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांच्यातील करड्या व्यवस्थापकाचे दर्शनही या पत्रात होऊन जाते. पण म्हणून त्यांच्या मनातील सहृदयता मात्र कोणत्याही स्थितीत झाकोळून जात नाही.

त्यांची अनेक पत्रे; विशेषत: आपल्या शिष्यांना आणि गुरुबंधूंना लिहिलेली अनेक पत्रे, त्यांच्या अतिशय कोमल, कारुण्यपूर्ण मनाची साक्ष देतात. आपल्या पाश्चात्य शिष्यांना लिहिलेल्या एका पत्रात स्वामीजी म्हणतात, `माझ्या मनात सगळ्यांबद्दलच कणव दाटून येते. वाटते की सगळ्यांचे भले होवो. मग मी तशीच प्रार्थना करू लागतो. त्यानंतर मी काहीच करू शकत नाही. माझे डोळे भरून येतात, वाहायला लागतात. सगळ्या जगाबद्दलचे अपार निरपेक्ष प्रेम मनात खूप दाटून येते.' एकदा गप्पांच्या ओघात ते म्हणाले, माझ्या हृदयातील भावनांचा आवेग इतका अधिक असतो की त्यामुळे माझे हृदय मोठे होत आहे. एखादे वेळी ते फुटून जाईल की काय अशी मला भीती वाटते.

दु:खीतांची सेवा, भुकेल्यांचा कळवळा, अज्ञानाची कणव, साहाय्यासाठी धावून जाण्याची तत्परता, हलाखीतील देशबांधवांचे सतत स्मरण, मोक्ष साधनेइतकेच एखाद्याचा दु:खभार हलका करण्याचे महत्व, मानवाच्या सेवेसाठी पुन:पुन्हा जन्म घेण्याची सिद्धता; या साऱ्यातून अपार करुणाशीलतेचे दर्शन होते. त्यांनी बेलूर मठात अनेक पशुपक्षीही पाळले होते. सहृदयता सगळ्यात महत्वाची असे त्यांनी अनेकदा म्हटले आहे. ही सहृदयता, करुणाशीलता त्यांच्या जीवनाचा प्रधान स्वर होता.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ फेब्रुवारी २०१३

अस्सल

गेल्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो, दोन दिवसांसाठी. तेथील नगर वाचनालयाच्या `हेमंत व्याख्यानमाले'साठी. दुसऱ्या व्याख्यानाचा संपूर्ण दिवस रिकामाच होता. वाचनालयाच्या अध्यक्षांबरोबर तेथील प्रसिद्ध जैताई देवीच्या मंदिरात गेलो. तेथील काही लोकांनी जवळच्या कासुर्डी जंगलात वनभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. जाण्यासाठी दोन गाड्या ठरवल्या होत्या. काही लोक स्वयंचलित दुचाकीवरून आले होते. स्वयंपाक मंदिराच्या स्वयंपाकघरातच काही महिलांनी तयार केला होता आणि डब्बे भरून नेण्यात आला होता.
शहरापेक्षा एकदम वेगळा अनुभव. क्याटरिंगवाल्याला ऑर्डर देऊन जेवण न बोलावता, सगळ्यांनी मिळून केलेला स्वयंपाक. चर्चा न करता सहजीवनाचा धडा. गाडीतून जाता-येताना पाहुण्यांची व्यवस्था आधी झाली पाहिजे हा आग्रह. गाणी, मोबाईल, कॅमेरा यांचा अभाव. सतरंजी अंथरण्यापासून सगळ्या छोट्या मोठ्या कामांसाठी सहज पुढे होण्याचा साधेपणा. सारं काही अस्सल.
सहज गप्पागोष्टीत कळलं की, मंदिरातर्फे रोज, वर्षाचे ३६५ दिवस, सामान्य रुग्णालयातील रुग्णांना जेवणाचा डबा पोहोचवला जातो. कधी ५-६ रुग्ण असतात तर कधी ३०-३२. जेवढे रुग्ण असतील तेवढ्यांना जेवण पोहोचवायचे हे ठरलेले. त्यासाठी पैसा, धान्य, अन्य सामुग्री, स्वयंपाक तयार करणे, किती रुग्ण आहेत किती नाहीत हे पाहणे, त्यांना डबे पोहोचवणे... असे सारे काही मंदिरातर्फेच. सरकारी मदत, आदेश, अध्यादेश, निरीक्षक, आढावा... काही नाही. भक्तिभावना आणि त्यापोटी असणारी कर्तव्यभावना या भरवशावर अनेक वर्षांपासून हे सुरळीत सुरु आहे. नियोजन, आखणी वगैरेपेक्षा मनातील विशाल आणि व्यापक प्रेरणा याच शेवटी महत्वाच्या नाहीत का?
नगर वाचनालय देखील मागे नाही. वणीतील एका चौकात लावलेले साने गुरुजींचे छायाचित्र जुने झाले होते. खराब झाले होते. वाचनालयाने पुढाकार घेऊन चौकात नवीन चित्र लावले. नानाजी देशमुखांच्या चित्रकुट प्रकल्पात आणि अन्यही मोठमोठ्या प्रकल्पात आपल्या चित्रकला व शिल्पकलेने ठसा उमटविणारा चित्रकारही भेटला. एखादा रस्त्यावरील सामान्य ग्रामीण माणूस असेच त्याचे दर्शन होते. कोणी सांगितल्याशिवाय हा मोठा कलाकार आहे हे कळणार सुद्धा नाही. `sms पाठवून मला मत द्या'च्या आजच्या जमान्यात हा अनाम कलाकार लक्षात राहून गेला.
७०-८० हजार वस्तीचं छोटंसं शहर. पण तिथे असं बरंच काही अनुभवायला मिळालं. चांगलं, अर्थपूर्ण जगण्यासाठी मुंबई, पुणेच हवं असं कुठे आहे?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ८ फेब्रुवारी २०१३

कोण म्हणतो संघ अतिरेकी नाही?

जयपूरच्या कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अतिरेक्यांना प्रशिक्षण देतात असा आरोप केला आणि एक घनघोर चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी त्याचा प्रतिवाद केला. पण शिंदे म्हणाले त्यात, खरेच काय खोटे आहे? आक्षेप घेण्यासारखे काय आहे त्यात? संघात अतिरेकी तयार केले जातात हे अगदी खरे आहे. गेली ८७ वर्षे लाखो अतिरेकी संघाने तयार केले आहेत. आज संघाच्या ५० हजार शाखा देशभरात आहेत. या शाखा चालवणारे लाखाहून अधिक मुख्य शिक्षक, कार्यवाह; देशभरातील हजारो प्रचारक अतिरेकी नाहीत तर काय आहेत? चांगले शिकले सवरलेले तरुण स्वत:चं घरदार सोडून आयुष्यभर संघ सांगेल ते काम, संघ म्हणेल तिथे करत असतात. हा अतिरेक नव्हे तर काय? पगार नाही, बँकेत खातं नाही, घरदार नाही, बायको- पोरं नाहीत, स्वत:चं असं काही नाही. असे हे प्रचारक. दरवर्षी असे प्रचारक घर सोडून संघाच्या कामासाठी बाहेर पडतात. हा सारा अतिरेक नाही तर काय? लाखो लोक आपापले उद्योग, व्यवसाय, नोकऱ्या सांभाळून; घरदार, संसार सांभाळून अक्षरश: रोज संघाचे काम करतात. कोणता कार्यकर्ता संघाच्या कामाला किती वेळ देतो, याची चर्चा संघाच्या बैठकात होते. हे सारे आपापला वेळ पैसा खर्च करून काम करतात. त्यापायी कधी घरच्यांची, कधी बाहेरच्यांची नाराजीही ओढवून घेतात. हा सारा अतिरेक नाही तर काय?

बरे संघ काय काम करायला सांगतो? ओरिसा, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल कुठेही पूर आला, भूकंप आला, युनियन कार्बाइडसारखी दुर्घटना घडली, अन्य काही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती आली तर धावून जा, शक्य ती सारी मदत करा. जिथे, जिथे जो काही अभाव असेल तो दूर करा. शाळा चालवा, दवाखाने चालवा, अन्य सेवेची कामे करा. समाजात चांगले उपक्रम करा. युद्ध वगैरे सारख्या प्रसंगी तू-तू-मी-मी न करता खांद्याला खांदा लावून काम करा. पाकिस्तान आणि चीन युद्धाच्या वेळीही हेच सांगितले संघाने म्हणूनच तर पंडित नेहरू यांनी प्रजासत्ताक दिनाला संघाला परेडसाठी बोलावले आणि लालबहादूर शास्त्रींनी उच्चस्तरीय बैठकीसाठी गुरुजींना बोलावून घेतले होते.

आणखीन काय काय करायला सांगतो संघ? संघ म्हणतो या देशाला आपली माता माना. सगळ्या लोकांना आपले बंधू माना. अभाव असतील ते दूर करा. अभावच राहू नयेत यासाठी प्रयत्न करा. एकोप्याने राहा. माना झुकवून जगू नका आणि माना झुकवून जगायला लावू नका. मुसलमानही याच देशाचे आहेत हे त्यांना समजावून सांगा. म्हणूनच मग राष्ट्रवादी मुस्लिम मंच स्थापन करा. ख्रिश्चन धर्मगुरूंशी संघाच्या अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणा. कोणी पंजाब वगैरेसारखा वेडेपणा केला तरीही तुम्ही वेडेपणा करू नका. काही माथेफिरू पंजाबात वेडेपणा करीत होते तेव्हा म्हणूनच संघाने सुदर्शनजींना विशेष प्रयत्न करण्यासाठी तिथे पाठवले होते. केशधारी आणि सहजधारी असे वातावरण तापले असतानाच सुदर्शनजी तिथे घरोघरी फिरून एकतेचा संदेश देत होते. संघाचा हा संदेश न आवडून वेड्या लोकांनी एक दिवस मोगा येथील संघशाखेवर चक्क गोळीबार केला होता आणि भगव्या ध्वजापुढेच २० संघ स्वयंसेवक रक्ताच्या थारोळ्यात धराशायी झाले होते. संघाने मात्र त्यांच्यासाठी कोणतीही पदकांची वगैरे मागणी केली नव्हती. आपण आपल्या आईची सेवा करतो ती काय पुरस्कारासाठी करतो का? असा संघाचा सवाल असतो. म्हणूनच सहजपणे काश्मीरच्या एकतेसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्या जीवाची बाजी लावतात. भारतीय जनसंघाची वाढती शक्ती सहन न होऊन कोणाचे तरी माथे ठणकते आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारखा द्रष्टा नेता बेवारस मृतावस्थेत सापडतो. तरीही संघ शांतच असतो. देशात आणीबाणी लावली जाते आणि हजारो स्वयंसेवक विनाकारण १८ महिने तुरुंगात डांबले जातात. पण संघ सांगतो आपलीच जीभ चावली गेली तर आपण दात पडून टाकतो का? मग जाऊ द्या, झाले गेले विसरून जा. सगळेच आपले आहेत. प्रात:स्मरणीय महात्मा गांधीजींच्या हत्येचा आरोप करून हजारो स्वयंसेवकांना आयुष्यातून उठवले जाते, पण संघ सांगतो- आपले काम कोणाच्याही विरोधात नाही. सारा समाज आपलाच आहे.

हे सारे अतिरेकी नाही तर काय? काहीही न मागता, कशाचीही अपेक्षा न ठेवता, स्वत:चाच वेळ-पैसा खर्च करून, कधी काही करायचे असते का? कोणी आपल्या विरोधात काहीही केले तरी त्याबद्दल कटुता बाळगायची नाही, असे कधी असते का? देशभरात केवळ ८०० लोकांना खासदारकीची संधी असताना लाखो लोकांना काम करायला लावायचे म्हणजे काय? काही द्यायचे नाही तर काम कशाला सांगायचे नाही का? सगळा अतिरेकच नाही तर काय.

कोण म्हणतो अतिरेक फक्त वाईट, दुष्ट, समाजविघातक, राष्ट्रविघातक गोष्टींचाच असतो? संघाने ८७ वर्षात साऱ्या जगाला हे दाखवून दिले आहे की- निस्वार्थता, निरपेक्षता, समाजाच्या आणि देशाच्या कल्याणाची कळकळ यांचाही अतिरेक असतो. आणि संघाने असा अतिरेक केला आहे. आता गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशिवाय अन्य कोणाला हा अतिरेक लक्षात आला नाही त्याला ते तरी काय करणार? होय ना हो शिंदेजी?

- श्रीपाद कोठे
नागपूर
३१ जानेवारी, २०१३

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

पुज्यांचे प्रलाप, मठ्ठांची मूर्खता

सध्या विद्वान म्हणवणार्यांना संघ आणि संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा प्रचंड पोटशूळ उठला आहे आणि एकदा पोटशूळ उठला की, माणूस वेदनेने तळमळून जसा काहीही बरळत सुटतो तसेच हे बरळत सुटले आहेत. लोकमतचे सुरेश द्वादशीवार यांनी भागवतांना पुज्य म्हणजे शून्य ठरवून कंडू शमवून घेतला, तर आयबीएन लोकमत वाहिनीवर नेहमी दिसणारे हेमंत देसाई यांनी तर, सरसंघचालकांना घट्ट आणि मठ्ठ म्हणत आपली खाज बोळवून घेतली आहे. असा सरसंघचालक असेल तर संघाचे कसे होईल, अशी चिंताही देसाईने व्यक्त केली आहे. जसे काही संघ खूप वाढला पाहिजे अशीच याची तळमळ आहे. सगळ्यांनीच हे लक्षात ठेवले पाहिजे की, संघ कोणाच्याही आशीर्वादानी, शुभेच्छांनी वा कृपेवर चालत नाही. त्याच्यावर कोणी कधी कृपाही करू शकला नाही आणि कधी अवकृपाही करू शकला नाही. अनेकांनी अवकृपा करण्याचा प्रयत्न केला. अगदी आटोकाट प्रयत्न केला. संघ मात्र त्या साऱ्याला नेहमीच पुरून उरला.

मोहनजी भागवत गेली १५ वर्षे संघाच्या अखिल भारतीय मंडळात आहेत. ज्याला संघाची थोडीही माहिती आहे, त्याला हे माहित असते की संघाचे अखिल भारतीय अधिकारी सतत देशभर भ्रमण करीत असतात. त्यांना स्वत:चे कुटुंब नसते, पगार मिळत नाही, सुट्ट्या नसतात. सतत फक्त प्रवास, कार्यकर्त्यांच्या भेटी, बैठका, कार्यक्रम, चर्चा, विचारपूस अशा अनेक गोष्टी सुरु असतात. अखंडपणे शेकडो, हजारो लोकांना ते भेटत असतात. यात पुरुष असतात, महिला असतात, शिक्षित- अशिक्षित- उच्चशिक्षित, धनी- निर्धन, आबालवृद्ध, विविध भाषांचे लोक, विविध संस्था- संघटना चालवणारे- सांभाळणारे सारेच असतात. सरसंघचालकांना नागपूरबाहेर पडण्याचा सल्ला देण्यापूर्वी ते नागपुरात किती असतात याचा तपशील या दीड शहाण्या पत्रकाराने मिळवायला हवा होता. आजकाल तर सुरक्षा व्यवस्था हा एक मोठा भाग झाला आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेकडून सहज सरसंघचालकांच्या प्रवासाबद्दल त्यांना तपशीलवार माहिती मिळाली असती. सरसंघचालक हे काही अहवालांवर विसंबून कचेरीत बसून काम करणारे सरकारी अधिकारी वा तत्सम कुणी नाहीत. देशभरातील विचारप्रवाह, स्पंदने याची त्यांच्याएवढी जाण कदाचितच कोणाला असेल. गांधीजी देशभर फिरत असत. पण आता राजकारणातही कोणी लोकांमध्ये मिसळत नाहीत. पत्रकारिताही आता लोकांमध्ये मिसळून होत नाही, तर हॉटेल आणि बारमधील रात्रीच्या बसण्यातून होत असते. अशा लोकांनी संघाची उठाठेव करावी हे दुर्दैवी तर आहेच, पण संतापजनक आणि घृणास्पद आहे.

दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत लिहिलेल्या आपल्या लेखात हेमंत देसाई नावाचा हा माणूस लिहितो, `भाजपात अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. त्यांनी भागवतांचा निषेध केला पाहिजे.' का? हा निर्बुद्ध माणूस म्हणतो म्हणून? एकीकडे म्हणायचे भाजपात कर्तृत्ववान महिला आहेत. आहेत ना त्या कर्तृत्ववान, मग ठरवू दे ना त्यांना निषेध करायचा की नाही ते !! तू कशाला सांगतोस बाबा? त्या कर्तृत्ववान आहेत म्हणजे त्यांना बरं- वाईट, योग्य- अयोग्य हे कळते, असेच ना? मग त्यांना जर नाही वाटत भागवतांच्या म्हणण्यात काही गैर, तर तू कोण होतोस त्यांना सल्ला देणारा? या माणसाने आपल्या लेखाची सुरुवात गोपाळ गणेश आगरकर यांच्या काही वाक्यांनी केली आहे. समाजाला कल्याणकारक काय आहे हे आपणासच समजते असे मानणारे काही लोक असतात आणि तेच समाजाचे नुकसान करीत असतात, असा त्याचा अभिप्राय आहे. आपले मत मांडतानाच भाजपच्या आणि राष्ट्र सेविका समितीच्या महिलांना सल्ले देण्याचा अगोचरपणा करणाऱ्या या माणसाला हाच अभिप्राय खरे तर शोभून दिसतो.

राहिला मुद्दा ज्यावरून वाद सुरु झाला तो. आता हे एवढे स्पष्ट झाले आहे की, सिल्चर येथे सरसंघचालक जे काही बोलले त्याचा विपर्यास करण्यात आला आणि इंदोर येथे तर चक्क ते जे बोललेच नाहीत त्यावरून गदारोळ माजवण्यात आला. फक्त क्षणभरासाठी हे मान्य केले की `भारत' `इंडिया' असे काही मोहनजी बोलले, तरी त्याचा अर्थ फक्त एवढाच होईल की, याबाबत त्यांची माहिती अपुरी आहे. (वास्तविक तसे नाही. लोकसत्ता या संघद्वेष्ट्या दैनिकानेच दोन आठवड्यांपूर्वी लोकरंग पुरवणीत जगभरातले २०१० सालचे बलात्काराचे आकडे छापले आहेत. टक्केवारी पाहता अमेरिकेत, ब्रिटनमध्ये हे प्रमाण किती मोठे आहे हे सहज स्पष्ट होऊन जाईल. दीड शहाण्या देसाईने ते पहावे.) पण त्याचा अर्थ चुकूनही, ते महिला विरोधी आहेत असा कसा काढता येईल? त्यांचं पूर्ण वाक्य ऐकणारा कोणीही शहाणा माणूस हे म्हणणार नाही की, ते महिला विरोधी आहेत. पण हा देसाई नावाचा माणूस तर एकाऐवजी दीड शहाणा आहे ना? तो इतका सरळ कसा राहू शकेल? किरण बेदी, चेतन भगत, सागरिका घोष वगैरे लोकांनी खेद व्यक्त केला तरीही या मठ्ठाच्या ओकाऱ्या सुरूच आहेत.

कोट्यवधी लोक मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही. कळते ते फक्त मलाच, असे या बिनडोक देसायाचे मत आहे. कोट्यवधी लोक सरसंघचालकांचे का ऐकतात? कसे ऐकतात? त्यांना का मानतात? हे प्रश्न याला पडतही नाहीत आणि ते त्याला समजूनही घ्यायचे नाहीत. सरसंघचालक कोणाला काय देतात? वा कोणाचे काय बिघडवू शकतात? तरीही लोक त्यांना मानतात. का होते असे, असा साधा प्रश्नही त्याला पडत नाही. सगळे आपल्यासारखे स्वार्थी नसतात आणि जे स्वार्थाचे थडगे बांधून केवळ देश आणि समाजासाठी आयुष्य उधळून देतात त्यांच्या एकेका शब्दासाठी लोक जीव ओवाळून टाकतात. सरसंघचालक अशा श्रेणीत येतात. हेमंत देसाई सारख्या लाळघोट्याना हे जन्मजन्मान्तरीही समजू शकत नाही.

सुरेश द्वादशीवार यांच्याबद्दल काय बोलावे? माझा त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. मी त्यांच्या हाताखाली १०-१२ वर्षे काम केले आहे. एवढा प्रदीर्घ काळ एकत्र काम केल्याने स्वाभाविकच अनेक व्यक्तिगत प्रसंग आणि अनुभवही आहेत. माझ्या अनेक व्यक्तिगत प्रसंगांमध्ये त्यांनी समजूतदार भूमिका घेतली, मला समजून घेतले, माझ्या कामाचे खाजगीत आणि जाहीरपणे कौतुकही केले आहे; यात वादच नाही. त्याविषयीची कृतज्ञता मी खासगीत तर व्यक्त केलीच आहे, पण ती कृतज्ञता जाहीरपणे व्यक्त करण्यातही मला मुळीच संकोच नाही. हां, विचारांच्या बाबतीत आणि विशेषत: संघाच्या बाबतीत ते नेहमीच असहिष्णू आणि आकसपूर्ण आहेत हे मात्र नक्की. माझ्या कामाचे कौतुक करूनही माझ्या करियर संबंधी त्यांना फारशी आस्था कधीच नव्हती, याचे कारणही मी संघाचा निष्ठावान स्वयंसेवक असणे हेच होते. संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या सहस्रचंद्रदर्शन प्रसंगी मी त्यांच्यावर लिहिलेल्या पानभर लेखाचे कौतुक करतानाच `आपल्याला रज्जूभैया वगैरे चालणार नाहीत' अशी पुस्ती त्यांनी जोडलीच होती. मी संघ सोडण्याचा वा लपवण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु त्यामुळे पदोन्नती वगैरेसाठी माझा विचार कधीही झाला नाही हेही वास्तव आहे.

१९९७ साली स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विदर्भातील स्वातंत्र्य संग्रामावर आधारित स्तंभ मी विदर्भरंग पुरवणीत लिहिला होता. मात्र तो पूर्ण वर्षभर न चालता मधेच थांबला. यामागेही संघद्वेष हेच कारण होते. तो स्तंभ सुरु असताना एका आठवड्यात, महात्मा गांधीजी यांनी वर्धेच्या संघ शिबिराला दिलेली भेट, यावर मी लेख लिहिला होता. द्वादशीवार यांनी मात्र तो लेख छापू दिला नाही. हा संघाच्या लोकांचा खोटानाटा प्रचार आहे, असे त्यांचे म्हणणे. संघ आणि महात्मा गांधी यांच्यात संवाद होता हे मान्य करणे त्यांच्या सारख्यांना सोयीचे नाही ना? मग, संघानेच गांधींना मारले, या दाव्यातील जोर कमी होईल त्याचे काय? म्हणजे न्यायालयाने, तत्कालीन कॉंग्रेसच्या नेहरू सरकारने संघाला निर्दोष ठरवले तरी काय झाले? आम्हाला संघाला झोडपायचे आहे आणि आम्ही ते करणारच, असा त्यांचा प्रण आहे.

या घटनेच्या सुमारे दहाएक वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. त्यावेळी मी द्वादशीवार यांना ओळखतही नव्हतो, पाहिलेही नव्हते. नागपूरच्या रेशीमबागेत संघ शिक्षा वर्ग सुरु होता. त्यावेळी मोहनजी भागवत नागपूरचे प्रचारक होते. रात्रीच्या जेवणासाठी मोहनजी, मी वगैरे पंक्तीत बसलो होतो. वाढप सुरु व्हायचे होते. गप्पा सुरु होत्या. तेवढ्यात संघाचे तेव्हाचे विदर्भाचे प्रांत प्रचारक बाबाराव पुराणिक आमच्या पुढच्या रांगेत येऊन बसले. स्वाभाविकच मोहनजींनी त्यांची चौकशी केली. कुठून आलात? प्रवास कसा झाला? तेव्हा बाबारावांनी सांगितले की, ते चंद्रपूरचा एक कार्यक्रम आटोपून आले. मोहनजींनी लगेच विचारले, सुरेश द्वादशीवार कार्यक्रमाला होते का? पुढे मोहनजी म्हणाले, `ते फार छान आणि अभ्यासपूर्ण लिहितात.' एकूणच कोण कसा विचार करतात हे यावरून स्पष्ट व्हावे. त्या काळात द्वादशीवार `तरुण- भारत'साठी लिहित असत. ते आसाम आणि पंजाब समस्यांवर लिहिण्यासाठी त्या दोन्ही राज्यात गेले होते आणि जाताना संघाचे तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे आशीर्वादही घेऊन गेले होते. संघाबद्दल व हिंदुत्वाबद्दल मात्र त्यांना त्यावेळीही प्रेम वा आस्था नव्हती. मोहनजी तर त्यांच्यापेक्षा सहा वर्षाने लहान आहेत. दोघेही चंद्रपूरचे. हा कालचा छोकरा देशभर ओळखला जातो, एवढेच नाही तर त्याच्या शब्दाला केवढे वजन... अन आपली गणिते, आपल्या महत्वाकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नाहीत याचा भयंकर पोटशूळ अलीकडे त्यांना त्रास देतो आहे. अनेक वाद प्रवाद त्यांच्याविषयीही आहेतच ना? संघानेच अनेकांना मोठे केले, पण शेवटी- `पय:पानं भूजन्गानाम, केवलं विषवर्धनम' हेच खरे, असे त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांचे मत असते.

वास्तविक संघ, हिंदुत्व वगैरेचा तात्त्विक विरोध वगैरे फार भुक्कड गोष्टी आहेत. लोकसत्ताचे कार्यालय अंबाझरीच्या पायथ्याशी होते तेव्हाचा एक प्रसंग. एकदा त्यांच्यात व माझ्यात तात्त्विक चर्चा झाली. त्यांच्या केबिनमध्येच. चांगली अर्धा-पाऊण तास चर्चा रंगली. नंतर बाहेर आल्यावर न्यूज रूममध्ये बसलेले तेव्हाचे मुख्य वार्ताहर शैलेश पांडे यांना ते म्हणाले, `अरे शैलेश, आज तर श्रीपादने माझी परीक्षाच पाहिली.' त्यामुळेच तात्त्विक विरोध वगैरेंना फारसा अर्थ नाही. आम्ही आकसाने विरोध करणार. आणि करणार म्हणजे करणारच, हीच त्यांची भूमिका आहे. देव, धर्माच्या वगैरे बातम्या छापायच्या नाहीत अशा सूचना राहत असत. का? त्यांना पटत नाही म्हणून !! एखाद्याला पटते वा नाही, कोणी नास्तिक आहे की देव मानणारा आहे हा मुद्दाच गैरलागू आहे. देव, धर्म, धार्मिक आयोजने, उपक्रम हा समाज जीवनाचा मोठा आणि मुख्य भाग आहे. त्यामुळेच त्याला एक `बातमीमूल्यही' आहे. पण तरीही ते नाही छापायचे. याला असहिष्णुता याशिवाय काय म्हणायचे? तसेच कोणाविषयी आदर दाखवायची गरज नाही, ही भूमिका. वास्तविक एखाद्याबद्दल आदरार्थी बोलण्याने तसे बोलणारच मोठा होतो. पण तेही त्यांना मान्य नसे. आमदार शोभाताई फडणवीस यांना शोभाताई नाही लिहायचे, फक्त शोभा फडणवीस लिहायचे. अशा अनेक गोष्टी.

आज जाहीरपणे सांगावसं वाटतं, द्वादशीवार सर- अनेक कमी अधिक गोष्टी आधीही होत्याच. कधी त्याचा राग यायचा, कधी दुर्लक्ष केले. पण सरसंघचालकांबद्दल तुम्ही जे काही लिहिले आणि ज्या पद्धतीने लिहिले ते दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. मुळात त्याविषयीचं तुमचं आकलनही खूप कोतं आहे. तुमच्याबद्दलचा सारा आदर संपला आहे, सर.

- श्रीपाद कोठे
नागपूर

युवकांचे स्वामी विवेकानंद

१२ जानेवारी हा विश्वविख्यात स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. १९८४ साली भारत सरकारने १२ जानेवारी हा `राष्ट्रीय युवा दिवस' म्हणून जाहीर केला आणि त्या वर्षीपासूनच देशभर `राष्ट्रीय युवा दिवस' साजरा करण्यात येतो. `स्वामी विवेकानंदांचे विचार आणि ज्या ध्येयासाठी ते जगले आणि त्यांनी कार्य केले, ते भारतीय युवकांना महान प्रेरणादायी ठरतील असे वाटल्याने भारत सरकार १२ जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित करीत आहे,' असे भारत सरकारने याबाबत काढलेल्या पत्रकात म्हटले होते. ११ जानेवारी २०१३ रोजी स्वामीजींच्या जन्माला १५० वर्षे पूर्ण झाली असून १२ जानेवारी २०१३ पासून १५१ वे वर्ष सुरु होत आहे. जगभरातील आणि विशेषत: भारतीय युवकांसाठी हा आनंददायी योगायोग आहे.

स्वामीजींच्या जीवनात आणि विचारात युवकांना खूपच महत्वाचे स्थान आहे. योगायोग म्हणजे आज १५० वर्षांनंतरही जगभरातील लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती आणि ऊर्जा असलेल्या स्वामीजींची इहलोकीची यात्रा मात्र युवावस्थेतच पूर्ण झाली. वयाचे ४० वे वर्ष उलटले की प्रौढावस्था सुरु होते असे समजले जाते. साधारणपणे डोळ्यांवर चाळीशी (चष्मा) चढते. स्वामीजींनी ४० वर्षेही पूर्ण केली नाहीत. ३९ वर्षे, ५ महिने आणि २२ दिवस एवढेच लहानसे त्यांचे आयुष्य; पण पराक्रम एवढा उत्तुंग की, पुढची शेकडो वर्षे त्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा आधार घेतला जावा.

लहानपणापासून आध्यात्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्वामीजींची वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांच्या गुरुदेवांशी, रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. स्वामीजींच्या वयाच्या २३ व्या वर्षी परमहंसांनी आपली इह्लीला संपवली. म्हणजे गुरूंचा सहवास त्यांना अवघा ५ वर्षे लाभला. ही ५ वर्षेही अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरील अबोध अशी. परंतु या ५ वर्षातच त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च अशी ब्रम्हावस्था तर प्राप्त करून घेतलीच, पण त्यासोबतच जे ज्ञान, विचार आणि जीवनाची दिशा प्राप्त करून घेतली त्या बळावर अगदी अल्पावधीतच त्यांनी सारे जग हलवून टाकले.

उत्साह, चैतन्य, परिश्रम, संघर्ष, आशावाद, आदर्शवाद, काव्य, संभ्रम, विश्वास- अविश्वासाचे हेलकावे, जग बदलून टाकण्याची आकांक्षा, जग हलवण्याचा महत्प्रयास ही काही जर युवावस्थेची लक्षणं मानली; तर ती सारीच्या सारी अत्यंत प्रखरतेने आणि तीव्रतेने स्वामीजींच्या जीवनात पाहायला मिळतात. लौकिक आणि अलौकिक अशा दोन्ही स्तरांवर शून्यातून सुरु होऊन पूर्णत्वाचा उत्कर्षबिंदू या एकाच छोट्याशा जीवनात गाठल्याचे स्वामीजींच्या आयुष्यात पाहायला मिळते. देव जर असेलच तर त्याच्या या जगात एवढी विषमता आणि विरोधाभास का? देव जर खरेच असेल तर तो दिसत का नाही? अशाच तुम्हा आम्हाला पडणाऱ्या प्रश्नांपासून त्यांच्या अस्वस्थतेची सुरुवात झाली. हेच प्रश्न त्यांनी अनेकांना विचारले पण त्यांचे समाधान झाले नाही आणि युवकांना साजेशा अशा पद्धतीनेच; जिथे समाधान झाले नाही तिथून ते माघारी वळले. त्यांना पडणाऱ्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष मात्र केले नाही. त्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. अखेर रामकृष्ण परमहंस यांच्याशी त्यांची गाठ पडली. त्यांनाही त्यांनी तेच प्रश्न विचारले. त्यावर रामकृष्णांनी त्यांना उत्तर दिले, `होय. मी देवाला पाहिले आहे. अगदी तुला पाहतो आहे तसे. त्याच्याशी बोललोही आहे. आणि तुझी इच्छा असेल तर मी तुलाही त्याचे दर्शन घडवू शकेन.' तोवर त्यांना कोणीही असे अद्भुत उत्तर दिले नव्हते. मात्र रामकृष्णांच्या या आत्मविश्वासपूर्ण उत्तराने त्यांचे समाधान झाले. रामकृष्णांच्या अलौकिक व्यक्तीत्वानेही ते भारावून गेले आणि त्यांनी परिश्रमपूर्वक, अल्पावधीतच आध्यात्मिक सत्याचा साक्षात्कार प्राप्त केला.

त्यांच्या कौटुंबिक जीवनातील एक प्रसंगही त्यांच्या युवा मानसिकतेवर प्रकाश टाकणारा आहे. त्यांचे वडील कोलकाताचे प्रसिद्ध वकील होते. त्यावेळचे कोलकाता आजच्याएवढे मोठे नव्हते तरीही ते देशाच्या राजधानीचे शहर होते. रेल्वे, डाक इत्यादी सेवा तिथे सुरु झाल्या होत्या. इंग्रजांनी सुरु केलेले दक्षिण आशियातील पहिले विद्यापीठ कोलकाता येथे १८५७ साली सुरु झाले होते. न्यायालये होती. स्वामीजींचे वडील अशा राजधानीच्या शहरातील प्रख्यात वकील होते. दोन मजली घरातील वरच्या मजल्यावर वडिलांची कामकाजाची खोली होती. त्या खोलीत पक्षकार त्यांना भेटायला येत असत. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे तेथे पक्षकारांसाठी हुक्के ठेवलेले असत. पण असे वेगवेगळे हुक्के का असा प्रश्न युवा नरेंद्राला (विवेकानंद) पडला. परंतु त्यावेळच्या पद्धतीत विचारायची सोय नव्हती. म्हणून त्यात काय वेगळेपण आहे हे आपणच पाहावे असे नरेंद्राने ठरवले आणि एक दिवस वडील नाहीत असे पाहून त्यांच्या खोलीत जाऊन त्याने सगळे हुक्के पिऊन पाहिले. तेवढ्यात त्याचे वडील तेथे आले. त्यांनी विचारले काय करतो आहेस? नरेंद्राने नेहमीप्रमाणेच सत्य काय ते सांगितले आणि म्हणाला, `हे सारे हुक्के तर सारखेच आहेत. मग इतके सारे वेगवेगळे कशाला?' त्यावर वडिलांनी उत्तर दिले की, `हे वेगवेगळ्या जातींसाठी आहेत. एका जातीचा हुक्का दुसऱ्या जातीचे लोक ओढत नाहीत.' त्यावर नरेंद्र अस्वस्थ झाला. त्याने या भेदभावाबद्दल वडिलांजवळ आपले मत स्पष्टपणे मांडले. नरेंद्राच्या वडिलांचेही डोळे पाणावले. त्याला जवळ घेऊन ते एवढेच म्हणाले, `बेटा, जन्मभर असेच मोठे मन ठेव.' त्यांचा हा आशीर्वाद पुढे कितीतरी पटींनी फळाला आल्याचे स्वामीजींच्या जीवनात पाहायला मिळते.

गुरुदेव रामकृष्ण परमहंस निजधामी गेले तेव्हा स्वामीजी केवळ २३ वर्षांचे होते. सोबतीला आणखीन ११ गुरुबंधू. बहुतेक त्यांच्याच वयाचे. एक दोघे अपवाद. पुढे काय हा प्रचंड मोठा यक्षप्रश्न. संन्यास घेतला असल्याने घर- संसार नाही हे निश्चित झाले होते. गुरुदेवांनी शिकविलेली सत्ये लोकांपर्यंत पोहोचवायची हेही ठरले होते. नरेंद्र फार मोठे काम करणार हे देखील रामकृष्णांनी सांगून ठेवले होते. पण प्रत्यक्षात तर सारा अंधारच होता. काय करायचे, कसे करायचे काही समजत नव्हते. पैसा नव्हता, माणसे नव्हती, संस्था नव्हती, राहायला जागा नव्हती, दिशा नव्हती, खाण्यापिण्याची सोय नव्हती, रामकृष्णांभोवती जे काही लोक जमले होते ते विखरून गेले होते. या मुलांची कोणी दखल घेत नव्हते, कोणी विचारपूस करीत नव्हते. अशा स्थितीत विवेकानंदांनी त्या सगळ्यांना धरून ठेवले. विखरू दिले नाही. एकत्र ठेवले. एवढेच नव्हे तर त्यांचा उत्साह टिकवला, त्यांच्यातील चैतन्य जागे ठेवले. लोक हेटाळणी करीत, दूषणे देत, बोल लावत. पण सारे काही त्यांनी सांभाळून घेतले. पुढे संन्यास धर्मानुसार ते मुक्त संचार करण्यासाठी बाहेर पडले. एकाकी, अनवाणी, अकिंचन असे स्वामीजी फिरू लागले. कधी झाडाखाली राहायचे, कधी कुणाच्या झोपडीत, तर एखादे वेळी राजाच्या महालात सुद्धा. कधी सुग्रास भोजन, तर कधी नदीचे निर्मल जल पिऊन दिवस काढायचे. थंडी, वारा, पाऊस, ऊन या सगळ्याला तोंड देत ते फिरत होते. जशी संधी मिळेल तसे आपल्याजवळील ज्ञान लोकांना देत होते. मोबदल्याची अपेक्षा कधीच नव्हती. फिरताना समाजाची स्थिती, समाजाचे वास्तव, अज्ञान, दारिद्र्य, अनाचार, अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींचे निरीक्षण सुरूच होते. मनाशी नोंद होत होती. इतिहास, भूगोल, लोकजीवन, संस्कृती, कला, धर्म, विज्ञान या साऱ्याचे ज्ञान संग्रहित होत होते. कष्ट, सायास आणि संकल्प यांचे विराट दर्शन स्वामीजींच्या यावेळच्या जीवनातून होते. युवा युवा म्हणजे आणखीन काय असते? या सगळ्या कालखंडाबद्दल नंतरच्या काळात स्वामीजी बोलले आहेत, आपल्या पत्रातून त्यांनी यावर प्रकाश टाकला आहे. ते सारे मुळातून समजून घेण्यासारखे आहे.

याच दरम्यान त्यांना आपल्या जीवनध्येयाचा साक्षात्कार झाला. कन्याकुमारीच्या शिलाखंडावर त्यांना नेमकी दिशा गवसली, काय व कसे करायचे याचे चिंतन पूर्ण झाले. आणि त्यांनी कामाला प्रारंभ केला. त्यानंतर शिकागोची सर्वधर्म परिषद, त्यानंतर चार वर्षे युरोप, अमेरिकेत आध्यात्माचा प्रसार- प्रचार, मठांची स्थापना, अनेक वर्ग, व्याख्याने; तिथून भारतात परतल्यावर कोलंबो ते अलमोडा अशी भारतयात्रा, या भारतयात्रेत या देशाला आणि समाजाला जागे करण्यासाठी केलेली अखंड धडपड, रामकृष्ण मिशनची स्थापना, मिशनचा पाया मजबूत करण्याचे काम, हे कार्य भविष्यात जोमाने चालावे याची पायाभरणी, दुसरा विदेश प्रवास; या साऱ्यावर एक नजर टाकली तरीही त्यातील कर्मविरता स्तिमित करून जाते. प्रचंड कर्मयोग, अखंड ज्ञानयोग, जीवनातील नाट्य, संघर्ष, अद्भुतता, त्यातील ईश्वरी लीला, संपूर्ण मानवमात्राविषयीची अपार करुणा, न आटणारे निखळ प्रेम, त्यांच्या भल्याची कळकळ हे सारेच रोमहर्षक आहे. एकाच छोट्याशा आयुष्यात एवढे अथांग आयुष्य एखादी व्यक्ती जगू शकते आणि असे आयुष्य ती व्यक्ती केवळ जगते असे नाही, तर या जगाचा निरोप घेतल्यावरही भविष्यातील अनेक पिढ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहते, हे सारे रोमहर्षक आहे.

स्वामीजी जसे संपूर्ण जीवन युवा वृत्तीने जगले, तशीच अपेक्षा त्यांनी युवकांकडून केली. शक्तिमय, सश्रद्ध, कर्ममय, त्यागी, समर्पित जीवन युवकांनी जगावे अशी प्रेरणा ते आयुष्यभर देत राहिले. त्यांच्या पहिल्या भारत परिक्रमेतील एक प्रसंग उद्बोधक आहे. एकदा एके ठिकाणी ते काही तरुणांशी बोलत बसले होते. त्याच वेळी त्यांना भेटायला त्या गावातील काही विद्वान लोक आले. त्यांना काही शास्त्रचर्चा करायची होती. स्वामीजींना तसा निरोप देण्यात आला. स्वामीजींनी येतो असे सांगितले व ते तरुणांशी बोलण्यात पुन्हा रमून गेले. पुन्हा निरोप आला. पुन्हा पहिलाच प्रकार घडला. तिसऱ्यांदा जेव्हा निरोप आला तेव्हा स्वामीजी जरा रागावूनच बोलले. म्हणाले, `तुम्हाला दिसत नाही का मी या युवकांशी बोलतो आहे. त्या विद्वानांना वेळ नसेल तर जाऊ द्या. पण या मुलांशी बोलणे झाल्याशिवाय, त्यांचे समाधान झाल्याशिवाय मी येथून उठणार नाही. युवक माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत. उद्याचे जग तेच घडवणार आहेत.' स्वामीजींचा भर सतत युवकांवर, तरुणांवर होता. त्यांची बहुतांश आवाहने तरुणांना उद्देशून वा तरुणांना डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहेत. त्यांचा सारा भर तरुणांच्या क्रियाशीलतेवर होता. तरुण वर्ग सक्रिय आणि सदाचारी झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. आपल्या अखेरच्या दिवशी आपल्या एका गुरुबंधूला ते म्हणाले देखील, `मला १०० विवेकानंद द्या, मी सारे जग बदलून दाखवीन.' केवढा प्रचंड आत्मविश्वास !!!

अमेरिका आणि युरोपचा पहिला प्रवास संपवून स्वामी विवेकानंद १५ जानेवारी १८९७ रोजी कोलंबोला पोहोचले. त्यांचे विदेशातील कर्तृत्व त्याआधीच स्वदेशात पोहोचले होते. त्यामुळे कोलंबो येथे त्यांचे उत्स्फूर्त आणि प्रचंड स्वागत करण्यात आले. कोलंबो येथून सुरु झालेली ही विजययात्रा हिमालयातील अलमोडा येथे संपली. या प्रदीर्घ भारत प्रवासात ठिकठिकाणी त्यांचे भरभरून स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी त्यांना मानपत्रे अर्पण करण्यात आली. सगळीचकडे स्वामीजींची ओजस्वी, आवेशपूर्ण भाषणे झाली. या भाषणांमधून त्यांनी आपल्या मातृभूमीची दयनीय परिस्थिती, येथील समाजाची निष्क्रियता, अंधश्रद्धा, ढोंग, अज्ञान, दारिद्र्य या साऱ्याचे वर्णन- विश्लेषण करतानाच अयोग्य गोष्टींवर कडक प्रहार तर केलेच; परंतु हे सारे कसे बदलता येईल याचीही विस्तृत चर्चा केली. आपला देश व देशबांधव यांचे जीवन सुखशांतीपूर्ण करण्याची व्यापक आणि मुलभूत योजनाही त्यांनी सगळ्यांसमोर ठेवली. त्यांच्या या योजनेच्या केंद्रस्थानी होते या देशातील कोट्यवधी युवक. त्यांच्या सगळ्या भाषणांचा, विचारांचा रोख होता युवकांकडे. कोणतीही खोटी आशा आणि आमिषे त्यांनी दाखवली नाहीत. उलट मनामनातील उच्च ईश्वरी भावनांना आवाहन करून त्यांनी युवकांना सर्वोच्च त्यागाचे आवाहन केले. त्याग आणि सेवा हेच आपले खरे राष्ट्रीय आदर्श आहेत आणि त्याचाच तरुणांनी अंगीकार करावा असे परखड परंतु भावपूर्ण आवाहन त्यांनी युवकांना केले. त्यानंतर देशभर झालेल्या स्वातंत्र्य चळवळी, सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक- धार्मिक आंदोलने आणि त्या साऱ्यांना देशवासीयांनी दिलेला उत्कट प्रतिसाद यामागे विवेकानंदांचे कार्यच प्रेरणा म्हणून उभे होते.

आजही देशातील परिस्थितीवर एक नजर टाकली तर फारशी सुखावह स्थिती नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती तर भयंकर म्हणावी अशीच आहे. माणसाची आत्मकेंद्रित आणि अहंकारी वृत्ती अधिकच वाढलेली आहे. `मला काय त्याचे?' ही भावना नसानसात भिनलेली आहे. आपुलकी, स्नेह, कळकळ हे तर सूक्ष्मदर्शकातून शोधावे लागतात. आदर, श्रद्धा, सहानुभूती, चांगल्या आणि पवित्र गोष्टींची आस्था यांची वानवाच दिसते. कर्तव्याच्या नावाने ठणठणाट. अंमली पदार्थांचे व्यसन, जुगार, दारू, अनिर्बंध आणि विकृत कामवासना, बेशिस्त, संवेदनहीनता हे सारे युवकांचे अविच्छिन्न गुण झालेले दिसतात. सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण त्यात सगळ्यांचा विचार नसून, स्वार्थाचाच विचार प्रमुख आहे. मनोरंजनाच्या नावाखाली चालणारी थेरं ही तर प्रचंड मोठी डोकेदुखी आणि समस्या झालेली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व दिसून येत असले तरीही ते दिशाहीन आणि विचारहीन असल्याचे दिसून येते. याचे परिणामही दिसून येऊ लागले आहेत. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत घडलेले आणि संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारे सामूहिक बलात्कार कांड, हे त्याचे एक उदाहरण म्हणता येईल. रोजची वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या, अन्य प्रसार माध्यमे, social media यातून सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर आहे. या साऱ्यातून ज्यांनी मार्ग काढायला हवा ते भांबावलेले दिसत आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा स्वामीजींनी युवकांना केलेल्या आवाहनाकडे वळण्याची गरज आहे.

मद्रास येथे बोलताना स्वामीजी म्हणाले होते-
`परिस्थिती बदलण्यासाठी माझी एक योजना आहे. ती प्रचंड वाटते, पण ती आवश्यक आहे. तुम्ही विचाराल की यासाठी द्रव्य कोठे आहे? यासाठी द्रव्य अत्यावश्यक नाही. द्रव्य खरोखर काहीच नाही. आयुष्याची गेली १२ वर्षे, मला माझे पुढचे भोजन कोठून मिळेल हे माहीत नसे. पण मी जाणून होतो की पैसे व आवश्यक वस्तू मला प्राप्त होतीलच. कारण त्या माझ्या दास आहेत. मी त्यांचा दास नाही. पण माणसे कोठे आहेत? हाच खरा प्रश्न आहे. मद्रासमधील तरुणांनो, तुमच्यापासून मला आशा आहे. स्वत:वर प्रचंड विश्वास असू द्या. प्रत्येक आत्म्यात अनंत सामर्थ्य वसत असते, अशी दृढ श्रद्धा बाळगाल तरच तुम्ही भारताचे पुनरुत्थान करू शकाल. जे तरुण बलशाली, निरोगी व तीक्ष्ण बुद्धीचे असतील तेच ईश्वराला प्राप्त करून घेतील. तारुण्यातील उत्साह आणि जोम कायम आहे तोवरच तुम्हाला भविष्य घडविण्याची संधी आहे.'

कोलकात्याच्या तरुणांपुढे बोलताना ते म्हणाले-
`कोलकात्यातील तरुणांनो उठा, जागे व्हा. भिऊ नका. आपल्याला अभी: - म्हणजे निर्भय झाले पाहिजे. आपल्या देशाला आज मोठ्या त्यागाची गरज आहे. तरुण लोकच तो करू शकतील. तरुण, उत्साही, शक्तिमान, बुद्धिमान, सुदृढ अशांचेच हे कार्य आहे. हे लक्षात असू द्या की, कोलकात्यातील रस्त्यात खेळणारा मी एक अगदी सामान्य असा मुलगा होतो. मी जर फार मोठे कार्य केले असेल तर तुम्ही त्याहून कितीतरी अधिक कार्य करू शकाल. हृदयातील उत्साह जागवून उठा. आपण गरीब आहोत. आपल्याला मित्र नाहीत असे समजू नका. पैशाने मनुष्य घडविलेला कोणी पाहिला आहे का? मनुष्यच पैसा निर्माण करीत असतो. मनुष्याच्या शक्तीने, उत्साहाच्या बळाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे जग बनलेले आहे.'

१२ नोव्हेंबर १८९७ रोजी लाहोर येथे बोलताना स्वामीजी म्हणाले-
`लाहोरच्या तरुणांनो, तुम्ही शेकडो प्रकारचे समाज स्थापन करा, हजारो राजकीय सभा भरवा, वा लाखो संस्था काढा; पण जोवर ती सहानुभूती, ते प्रेम व सर्वांचा विचार करणारी ती सहृदयता तुमच्या ठायी निर्माण होत नाही, तोवर या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. बुद्धदेवांची सहृदयता जोवर भारतात परत येत नाही, जोपर्यंत भगवान श्रीकृष्णांची वचने प्रत्यक्ष व्यवहारात उतरविली जात नाहीत तोपर्यंत आपल्याला कशाचीही आशा नाही. म्हणूनच लाहोरच्या तरुणांनो, अद्वैताचा शक्तिशाली ध्वज पुन: एकवार उंच उचला. कारण अन्य कोणत्याच आधारावर ते अद्भुत प्रेम तुमच्या ठायी उत्पन्न होऊ शकणार नाही. जोवर सर्वत्र समभावे विद्यमान असणाऱ्या ईश्वराला तुम्ही पाहात नाही तोवर ते अद्भुत प्रेम तुमच्या ठायी निर्माण होणार नाही. उठा, जागे व्हा आणि ध्येयपूर्ती झाल्याविना थांबू नका. त्यागाविना काहीच साध्य होणार नाही. दुसऱ्याला मदत करावयाची असेल तर क्षुद्र स्वार्थाचा त्याग करावाच लागेल. तुम्ही आपल्या सर्वस्वाचा त्याग करा. आपल्या मोक्षाचाही विचार न करता इतरांचे कल्याण करा. आपले राष्ट्र जिवंत राहावे म्हणून तुम्ही उपाशी मरण पावलात- तुमच्या, माझ्यासारखे हजारो लोक मरण पावलेत- तरी बिघडले कोठे? सज्जन असो वा पतित, गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकास मृत्यू हा येणारच. कोणाचेही शरीर चिरकाल टिकत नाही. मगरमिठीप्रमाणे एखाद्या वस्तूस चिकटून राहण्याची दृढता व चारित्र्याचे बल आज आपणास हवे आहे.'

स्वामीजी म्हणत असत, तुम्हाला भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर फुटबॉल खेळा. तुमच्या शरीरात बळ असेल तरच तुम्हाला मोठमोठी तत्वज्ञाने समजू शकतील. तरुणांना जीवनात काही साध्य करावयाचे असेल तर पोलादी बाहू व सिंहसदृश पराक्रमाची गरज आहे असे ते नेहमी म्हणत असत. नि:स्वार्थता आणि मानवमात्राबद्दल निरपेक्ष प्रेम याच आवश्यक गोष्टी होत यावर त्यांचा भर होता.

न्यूयॉर्क येथून १९ नोव्हेंबर १८९४ रोजी लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात-
`माझ्या शूर युवकांनो, आपण सफल होणारच. प्रेम, सच्चेपणा आणि धैर्य यांचीच आवश्यकता आहे. जीवन म्हणजेच विकास, म्हणजेच विस्तार, म्हणजेच प्रेम; म्हणून प्रेम म्हणजेच जीवन. स्वार्थपरायणता म्हणजेच मृत्यू. कारण ज्याचे हृदय प्रेमाने ओथंबलेले नसते असा माणूस मृतच समजावयाचा नाही तर काय? वत्सांनो, दु:खी, अज्ञानी, गरीब यांच्यासाठी इतकी तळमळ वाटू द्या, हृदय इतके व्याकूळ होऊ द्या, तन-प्राण इतके पिळवटून निघू द्या की त्यामुळे हृदय बंद पडण्याची वेळ येईल आणि डोके असे गरगरायला लागेल की वेड लागते की काय असे तुम्हाला वाटू लागेल. मग आपल्या अंतरात्म्याच्या वेदना भगवंताच्या पादपद्मी निवेदन करा. तेव्हाच ते तुम्हाला शक्ती, साहाय्य व अदम्य उत्साह देतील. गेली १० वर्षे सतत माझा एकच मूलमंत्र होता- झुंजा, झुंजत पुढे व्हा. आजही मी पुन्हा तेच म्हणतो- झुंजा, झुंजत पुढे व्हा. जेव्हा दशदिशा निराशेच्या अंध:काराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो- झुंजत पुढे चला. आज आशेच्या प्रकाशाने दशदिशा किंचित उजळल्या असताना देखील माझा तोच मंत्र आहे- चला. झुंजत झुंजत पुढे चला. वत्सांनो भिऊ नका. नक्षत्रतारकाखचित आकाश तुमच्यावर कोसळून तुमचे चूर्ण करून टाकील अशा भयाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू नका. थांबा, थोड्याच वेळात ते तुमच्या पायाखाली आल्याचे तुम्हाला दिसून येईल. जरा धीर धरा. तुम्हाला दिसून येईल की- पैशाने, नावलौकिकाने, विद्येने कशानेही काही साधता येत नाही. एकमात्र प्रेमानेच सारे साधता येते; संकटाच्या अभेद्य भिंती चारित्र्याच्या बळाने पाडून टाकता येतात व मार्ग मोकळा करता येतो. नेहमी सावध राहा. जे जे म्हणून असत्य असेल ते कटाक्षाने टाळा; सत्याची कास कोणत्याही परिस्थितीत सोडू नका. अशाने उशिरा का होईना, पण यश आपले आहे हे निश्चित समजा. भावी ५० शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे.'

स्वामीजींच्या अशा विचारांचे सामर्थ्य वेगळे सांगण्याची गरज नाही. आजच्या संभ्रमित वातावरणातही दिशादर्शन करण्याची त्यांच्या विचाराची आणि जीवनाची ताकद कायम आहे. आवश्यकता आहे त्यांचे जीवन आणि विचार समजून घेण्याची. आपण सारेच त्यांच्या जीवनाचे आणि विचारांचे परिशीलन करू या.

-श्रीपाद कोठे
नागपूर