सोमवार, २६ डिसेंबर, २०११

नवअस्पृश्यता

राजकारणी आणि प्रसार माध्यमे मिळून सध्या आपले छान मनोरंजन करीत आहेत. म्हटले तर मनोरंजन समजून हे सारे सोडून देता येण्यासारखे आहे. पण तेवढेच चिड आणणारे आहे आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी वाईट परिणाम करणारे आहे. त्यामुळे ते सोडून देणे हितावह नाही. आजचे ताजे उदाहरण म्हणजे अण्णा हजारे आणि नानाजी देशमुख यांच्या संबंधांवरून निर्माण झालेला वाद. नानाजी देशमुख आणि अण्णा हजारे यांच्या संबंधांची चर्चा सुरू होताच दिग्विजय सिंह यांचेही नानाजी देशमुख यांच्या सोबतचे छायाचित्र प्रकाशात आले. कदाचित यामुळे या मुद्यावरील राजकीय लढाई थांबेल वा पेटेल. परंतु सगळ्यांनी विचार करण्यासारख्या गोष्टींचा कदाचित उल्लेखही होणार नाही. आपण नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करीत आहोत का, हा मुख्य प्रश्न आहे. अमक्याने तमक्याशी बोलू नये, तमक्याने अमक्याला भेटू नये, याने त्याच्याकडे जाऊ नये, याने त्याच्याशी संबंध ठेवू नये. राजकीय पक्ष वेगळे असले म्हणजे दोन व्यक्ती परस्परांचे शत्रूच असायला हवेत का? वैचारिक मतभिन्नता असली म्हणजे एकमेकांना पाण्यातच पाहायला हवे का? राजकारण, मतभिन्नता, वैचारिक मतभेद या पलिकडे जाऊन पाहण्याची, विचार करण्याची, समजून घेण्याची सवय आम्ही व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही लावून घेणार आहोत की नाही? की केवळ स्वत:च्या बौद्धिक पुढारलेपणाचे ढोल पीटत वारंवार आपली क्षुद्रताच दाखवून देणार आहोत?

कोण होते नानाजी देशमुख? आजच्या सर्वच राजकारण्यानी ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं असे एक लोकोत्तर पुरुष होते नानाजी. ऐन तारुण्यात लग्न, संसार, स्वत:चं आयुष्य हे सारं बाजूला सरून समाजाची सेवा करायची हे व्रत त्यांनी स्वीकारलं. आजच्यासारखं सामाजिक कार्याचं व्यावसायीकरण झालं नव्हतं, समाजकार्याची महाविद्यालये नव्हती, एनजीओज नव्हती, युनोचे वा कोर्पोरेट फंड नव्हते; सामाजिक कार्य म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखं होतं; त्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं माध्यम निवडलं होतं. एका विशिष्ट वळणावर संघाने ठरवलं की समाजाच्या सर्व क्षेत्रात आपल्या विचाराला अनुकूल वातावरण तयार व्हायला हवं, तशी कामं उभी करायला हवी. राजकारण हे त्यातील एक क्षेत्र. या क्षेत्रात संघाने म्हटलं म्हणून नानाजी सक्रिय झाले. स्वत:चं एक आगळ स्थान निर्माण केलं. जयप्रकाश नारायण यांच्यावर जेव्हा पोलिसांनी लाठ्या चालवल्या तेव्हा त्या नानाजींनी स्वत:वर झेलल्या.

ज्यावेळी आपल्या या महान लोकशाहीचा गळा घोटण्यात आला तेव्हा झालेल्या अभूतपूर्व संघर्षाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांचं होतं, परंतु त्या संपूर्ण संघर्षाचं भूमिगत राहून संचालन नानाजी देशमुख यांनी केलं होतं. नानाजी नसते तर आणिबाणी विरुद्धचा संघर्ष यशस्वी झाला असता का, असा प्रश्न पडावा इतकं त्यांचं योगदान मोठं आहे. विविध जाती-धर्माच्या, विचारांच्या, राजकीय झेंद्यांच्या लोकांना एकत्रित आणून संघर्ष करणे अन् तेही भूमिगत राहून, हे खायचं काम नाही. आज जे समाजवादी आणिबाणी विरोधी संघर्षाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जरा इतिहास नीट समजून घ्यावा आणि कृतघ्न होऊ नये. बरे एवढे केल्यानंतरही जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेले उद्योग मंत्री पद नम्रपणे नाकारून, ६०व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली. राजकारण हे लाभहानीचं क्षेत्र आहे, संघर्षाचं क्षेत्र आहे. तेही आवश्यक असले तरीही ६०व्या वर्षानंतर त्यातून बाहेर पडून समाजासाठी रचनात्मक कामाला वाहून घेतले पाहिजे असे तत्वज्ञान स्वीकारुन स्वत:ला ग्राम विकासाच्या कार्यात झोकून दिले आणि वयाच्या साठीनंतर तीन दशके त्याच रचनात्मक कामासाठी झोकून देऊन आदर्श कामे उभी केली अन् स्वत:च एक आदर्श होऊन गेले. सत्तेला गोचिडीसारखे चिकटून बसण्याच्या आजच्या राजकीय संस्कृतीत नानाजींच्या जवळ उभे राहण्याचीही पात्रता किती नेत्यांजवळ आहे?

त्यांचं मोठेपण इथेच संपत नाही. राजकारण सोडले तरीही त्यांच्या कामाची दखल म्हणून त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊ करण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारलीही. परंतु खासदार निधिचा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी त्यास विरोध केला. एवढेच नाही तर तो निधी नाकारलादेखील. आम्ही खासदार आहोत म्हणून देशाच्या संपत्तीवर असा डल्ला मारण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. वास्तविक तो निधी स्वीकारुन स्वत:च्या कामासाठी ते वापरू शकत होते, पण ही खासदार निधीची कल्पना हीच मुळात अनैतिक असल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही. इतकं शुद्ध व्यक्तिमत्व आज संसदेत आहे का?

अशा नानाजींसोबत जर कोणी काम केलं, त्यांच्याशी चर्चा केली, विचारांचीच नव्हे व्यवहाराचीही देवाण घेवाण केली तर हरकत काय आहे? व्यक्तीगत कामांसाठी, स्वार्थ साधनेसाठी कोणी कोणाची मदत घेतली तर चालते पण सामाजिक कार्यात सहभागिता केली तर ती का चालू नये? प्रियंका गांधी राजीव गांधींच्या मारेकर्यान्ना भेटल्या तर चालते. तिथे त्यांनी काय चर्चा केली वगैरे कळले नाही तरी चालते, पण अण्णा आणि नानाजी भेटले तर चालत नाही!!! संघ आणि संघ परिवार ही या देशातील एक मोठी शक्ती आहे. या देशातील करोडो लोक स्वत:ला संघाचा असल्याचे म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्या मार्गाने देशाची, समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. संघाबद्दल दुजाभाव बाळगणार्या लोकांनी, सरकारांनी त्याला चिरडून टाकण्याचे प्रयत्न वारंवार केले. पण या देशाच्या सामान्य शहाणपणाने अन् सुजाण न्यायव्यवस्थेने हे प्रयत्न निष्फळ ठरवले. पण संघाच्या द्वेषाने आंधळे झालेल्यांची मने इतकी विषाक्त आहेत की त्यांना काहीही समजून वगैरे घ्यायचेच नाही. समजले तरी स्वत:चे तुणतुणे थांबवायचे नाही.

संघाचं अस्तित्वही त्यांना सहन होत नाही इतकी टोकाची असहिष्णुता त्यांच्यात आहे. म्हणुनच महात्माजींच्या हत्येत संघाचा काहीही संबंध नाही असा निकाल न्यायालयाने देऊनही गांधी हत्येचा राग मात्र ही मंडळी नित्यनियमाने आळवित असतात. असे करताना आपण न्यायालयाचा अवमान करीत आहोत याचेही यांना भान नसते. न्यायव्यवस्थेचा आदर राखण्यावर प्रवचने मात्र झोडायला हे तयार. सत्तापदे न घेताही, सत्तेचा वापर न करताही समाजासाठी काय करता येऊ शकते याचे अनेक मानदंड संघ परिवाराने, संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उभे केले आहेत. पण ज्यांच्या जगण्याचा उद्देशच मुळी सत्ता, अधिक सत्ता, आणखी अधिक सत्ता आणि पैसा, अधिक पैसा, आणखी अधिक पैसा आहे; त्यांना या सार्याशी काहीही सोयरसुतक नाही. या देशाच्या दुर्दैवाने आज अशांचीच चलती आहे.

- श्रीपाद कोठे, नागपूर
सोमवार, २६ डिसेंबर २०११

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

ब्रेक, वेग आणि नियंत्रण

लहानपणी सायकल शिकताना `ब्रेक हातात ठेवावा' हे वाक्य आपण किती तरी वेळा ऐकलेलं असतं. तसा तो ब्रेक हातात ठेवून सायकल शिकलेलीही असते. कालौघात ते सारे आपण विसरूनही जातो. `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व सत्य आहे आणि जीवनव्यापी आहे हे मात्र लक्षात येत नाही. आज सर्वत्र जे काही सुरू आहे, ऐकायला येते आहे, पाहायला मिळते आहे ते पाहिले की `ब्रेक हातात ठेवावा' हे तत्व वारंवार आठवते. विशेषत: अर्थकारणावरून आज जगभर जो हैदोस सुरू आहे तो पाहिला की, हे तत्व जीवनव्यापी सूत्र म्हणून पटू लागते.

१९१७ साली रशियात सुरू झालेला कम्युनिझमचा प्रवास ग्लासनोस्त, पेरेस्रोइकाच्या खडकावर आपटून फुटला आणि अमेरिकेत व्याप्त अर्थप्रधान, व्यक्तिवादी कल्पना जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यांच्या माध्यमातून जगभर पसरल्या. त्यांचा जोर आणि प्रभाव एवढा होता की, कम्युनिझमचा आणखीन एक गढ असलेला चीनदेखील जुनी खोळ टाकून नव्याने वाटचाल करू लागला. चीनमध्येही कम्युनिझमचे थडगे बांधले गेले. तेव्हापासून अमेरिकन भांडवलशाहीचा रथ चौखूर उधळला. भांडवलशाहीच्या या tytanic ला २००८ साली मोट्ठे छिद्र पडले आणि त्यात पाणी घुसायला लागले. हे अवाढव्य tytanic आता कधी बुडेल याचा काहीही भरवसा राहिलेला नाही.

बुडणार्या जहाजाच्या बावरलेल्या कप्तानासारखे सारे तज्ञ, धोरणकर्ते बावरुन इकडे तिकडे धावाधाव करत आहेत. हाती काहीही लागत नाही, मार्ग सापडत नाही, जहाजातील पाणी कितीही काढले तरीही काही उपयोग होत नाही. देशचे देश बुडू लागले आहेत. package देण्यासाठी अवास्तव नोटा छापल्याने मुद्रास्फीति आणि महागाई वाढली. देशोदेशीच्या केंद्रीय बैंक्सनी योजलेले उपाय पालापाचोळ्यासारखे उडून गेले. गमतीचा भाग म्हणजे अजूनही तथाकथित अर्थतज्ञ आर्थिक सुधारणा वगैरे वेडपट गोष्टीच करीत आहेत. ज्या विकसित वगैरे देशांनी कथित आर्थिक सुधारणा वगैरे केल्या ते देश दिवाळखोरीत निघत आहेत हे सुद्धा कोणी लक्षात घेत नाही. आजुबाजूला घडणार्या गोष्टी मनापर्यंत, बुद्धीपर्यंत पोहोचत सुद्धा नाहीत एवढी हतबुद्धता, भाम्बावलेपण सारीकडे पसरले आहे.
कम्युनिझमने गाडीचे ब्रेक एवढे दाबून ठेवले होते की, गाडी पुढेच सरकत नव्हती आणि भांडवलशाहीच्या गाडीला तर ब्रेकच नाहीत. तिचा वेगही सुसाट आहे. आता या गाडीचे भवितव्य काय हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. क़पाळमोक्ष ठरलेलाच आहे. पाहायचे फक्त एवढेच आहे की, या भीषण अपघातातून कोण वाचते आणि कोणाकोणाची आहुती पडते. जखमी तर बहुतेक सार्यांनाच व्हावे लागेल. गाडीला ब्रेक अत्यावश्यक असतो आणि योग्य वेळी तो वापरायचाही असतो; हा सुवर्णमध्य, हा व्यवहार, हे त्रिकालाबाधित सत्य कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन्हीने नजरेआड केले.

परंतु ब्रेक आणि त्याचा योग्य वापर हे सत्य प्रत्यक्षात येण्यासाठी एक आणखीन गोष्ट अत्यावश्यक असते आणि ती म्हणजे, `नियंत्रण'. हे नियंत्रण असते मनाचे, विचारांचे. नियंत्रण कधीही बाह्य असू शकत नाही. गाडीचा वेग वाढू लागला की, मन सांगते वेग कमी कर आणि आपण ब्रेक लावतो. वळण आले की मन सांगते, वेग कमी कर, अमुक दिशेला गाडी वळव आणि मग तशी कृती केली जाते. मानवी सभ्यतेने आज हे नियंत्रणच गमावले आहे. अर्थकारणापुरते बोलायचे तर, हे संपूर्ण अर्थकारण पैसा मिळवण्याचे अर्थकारण आहे. ही दिशाच चुकीची आहे. ही दिशा वळवून अर्थकारणाचे तोंड माणसाचे सुख, समाधान, शांती, सुरक्षा, सुव्यवस्था, सहजीवन याकडे वळवले जात नाही तोवर आपल्या नशिबी केवळ जंगलात भटकणेच राहील.

-श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, २२ नोव्हेंबर २०११

बुधवार, २ नोव्हेंबर, २०११

गरज आणि अपव्यय

१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्र शासनाने विजेची भरघोस दरवाढ केली आहे. दिल्लीतील केंद्र सरकारही पेट्रोलची पुन्हा भाववाढ करणार असे संकेत आहेत. या दोन्हीचा थोडाफार विरोध होईल आणि पुन्हा सारे काही शांत होऊन जाईल. गेल्या दोन वर्षात महागाई आ वासून उभी आहे. सामान्य दैनंदिन जीवन जगणार्या सामान्य माणसांनाच ही चिंता भेडसावते आहे असे नाही तर सरकार, पंतप्रधान, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जागतिक नेते, जागतिक अर्थसंस्था या सार्यांना महागाईने घोर लावला आहे. जगणे कठीण झालेल्यांना तर ही चिंता सतावते आहेच पण धोरण आणि नियोजन करणार्यांनाही हीच चिंता सतावते आहे. आता तर विकासाची गती थांबली तरी चालेल पण महागाई काबूत यायला हवी, अशा टोकाच्या वाटणार्या भूमिकेपर्यंत रिझर्व बँकेचे गव्हर्नरदेखील बोलू लागले आहेत. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत पण हाती काही लागत नाही. अर्थतज्ञ त्याचे विविध प्रकारे विश्लेषण करतात. ते सारे सामान्य माणसाच्या डोक्यावरून जाते. आपला कोलमडणारा जमाखर्च सावरला जात नाही, एवढेच त्याला कळते. परंतु महागाईचा हा प्रश्न केवळ अर्थशास्त्राचा विचार करून सुटणार नाही हे अर्थतज्ञान्ना कळत नाही आणि एकूण अर्थव्यवहारात आपलीही काही जबाबदारी आहे हे सामान्य माणूस समजून घेत नाही. अर्थतज्ञ स्वत:च्या विश्वात मश्गुल असतात आणि सामान्य माणूस सारे काही अर्थव्यवस्था, अर्थधोरणे आणि ही धोरणे निश्चित करणारे यांच्यावर ढकलून मोकळा होतो.
विजेचे उदाहरण घेऊ. वीज ही आजची जीवनावश्यक बाब झाली आहे. विकासाच्या आणि आधुनिकीकरणाच्या संकल्पनेचे जे काही मापदंड आहेत त्यात ऊर्जेचा अधिकाधिक वापर हा एक मापदंड आहे. वीज हा आज जगभर वापरल्या जाणार्या ऊर्जेचा महत्वाचा घटक आहे. या विजेचा किती प्रचंड गैरवापर होत असतो याचा विचार आपण करतो का? नुकतीच दिवाळी झाली. या काळात विजेचा किती गैरवापर झाला? दिवाळीसारखे सण आवश्यक असतातच. ते नवजीवन देतात, ऊर्जा देतात, अर्थकारणाला चालना देतात. त्यामुळे ते आनंदाने साजरे करायलाच हवेत. पण आनंद साजरा करण्यासाठी घरावर विजेच्या १-२ माळा लावणे ठीक आहे. मात्र जिकडे तिकडे जो प्रचंड झगमगाट दिसतो त्याचे समर्थन करता येईल? नवदांपत्याचा पहिला दिवाळसण, नवीन घरातील पहिली दिवाळी, घरातील नवजात बालकाची पहिली दिवाळी अशा प्रसंगी अधिक रोषणाई समजूनही घेता येईल, पण नियमितपणे साजर्या होणार्या सणालाही ही उबग आणणारी रोषणाई विजेचा अपव्यय नाही तर काय? मोठमोठे मोल्स, दुकाने, अन्यत्र लावण्यात येणारे फलक यात विजेचा किती अपव्यय होतो? शासकीय कार्यालय, अन्य सार्वजनिक संस्था, सार्वजनिक स्थाने येथील वीज वापराकडे कोणाचे लक्ष असते? मंत्री, आमदार, खासदार यांच्या निवासात आवश्यकतेपेक्षा कितीतरी जास्त वीज वापरली जातेच ना! झोपडपट्टी असो वा एका बेडरूमचा ब्लोक वा बंगला; विजेचा वापर योग्य पद्धतीने व गरजेनुसारच केला पाहिजे याचा आग्रह असतो का? शाळा, महाविद्यालये, कारखाने, बैंक्स, विमानतळे... जिकडे नजर टाकावी तिकडे विजेचा अपव्यय सहज पाहायला मिळतो.
या अपव्ययाकडे लक्ष न देण्याची दोन कारणे आहेत. एक तर उपभोगाची मानसिकता. खूप उपभोग म्हणजे खूप सुख, खूप उपभोग म्हणजे खूप आनंद, खूप उपभोग म्हणजे खूप आधुनिकता, खूप उपभोग म्हणजे खूप पुरोगामित्व, खूप उपभोग म्हणजे खूप विकास अशी आज मानसिकता झाली आहे. दुसरा युक्तिवाद म्हणजे आम्ही जी वीज वापरतो त्याचे पैसे भरतो. मग ती अधिक वापरली तर तक्रार का? हा युक्तिवाद बिनतोड वाटत असला तरीही विचारपूर्वक करण्यात येणारा नाही हे सहज ध्यानात येईल. कारण असे की, आपण पैसे देऊन वीज विकत घेऊ शकत असलो तरीही पैशाने वीज उत्पन्न करता येत नाही. दिवाळीपूर्वी कोळशाचा प्रश्न उत्पन्न झाला तेव्हा आपण हा अनुभव घेतला आहे. हा अनुभव आपण कुठेही घेऊ शकतो. अगदी नंदनवन समजल्या जाणार्या अमेरिकेतही. सध्या तेथे बर्फाचे प्रचंड वादळ सुरू आहे आणि त्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला अशा बातम्या आहेत. त्यामुळे पैसा असूनही वीज मात्र नाही. कारण अगदी स्पष्ट आहे, पैसा एखादी गोष्ट विकत घेऊन देऊ शकतो, ती उत्पन्न करू शकत नाही. पैसा हे केवळ विनिमयाचे साधन आहे. पण आज आपण त्यालाच मूल्य देऊन बसलो आहोत त्यामुळे अनेक समस्यांच्या विळख्यात आपण सापडलो आहोत.
विजेचं मूल्य वीज आहे, पाण्याचं मूल्य पाणी आहे, खाद्यपदार्थांचं मूल्य खाद्यपदार्थ आहे, जमिनीचं मूल्य जमीन आहे, मातीचं मूल्य माती आहे, तेलाचं मूल्य तेल आहे, शुद्ध हवेचं मूल्य शुद्ध हवा आहे, भावनांचं मूल्य भावना आहेत, नात्यांचं मूल्य नाती आहेत. अशा अनेक गोष्टी. त्या मुळात असतील तर त्यांचा विनिमय होऊ शकेल. पण त्या नसतीलच तर पैसा कितीही असला तरीही त्याचा उपयोग नाही. पण आज पैसा हेच मूल्य झाल्यामुळे `मी पैसा देतो. त्यामुळे वाट्टेल तेवढा वापर करण्याचा मला अधिकार आहे' ही भावना आणि हा विचार बळावला आहे. एक लक्षात घेतले जात नाही की, एखाद्याने एखाद्या गोष्टीचा अपव्यय केला तर अन्यत्र त्याची कमतरता जाणवणारच. उत्पादन कितीही वाढवले तरीही हे चक्र बदलू शकत नाही. यासाठी भरपूर उत्पादन यासोबतच, आवश्यक आणि गरजेनुसार उपभोग हे सूत्र आवश्यक आहे. या सूत्राच्या अभावी कितीही अधिक उत्पादन केले तरीही तूट जाणवणारच आणि महागाई वाढणारच. अन्नधान्य, पेट्रोलियम पदार्थ, पाणी, जमीन या सार्याच बाबतीत हा अपव्यय आज सुरू आहे.
सामूहिक आणि संघटित स्वरुपातही हा अपव्यय सुरू आहे. त्याला विकासाचा मुलामा देऊन एक तत्त्वज्ञानही निर्माण केले जात आहे.
# पुण्याजवळील लवासा सिटी प्रकल्प अपव्यय नाही तर दुसरे काय आहे? तिथे घर घेण्याची सामान्य माणसाची प्राज्ञा नाही. तिथे ज्या कुणी घर घेतले असेल त्याचे पंचतारांकित आयुष्य व्यवस्थित सुरू आहे. त्यांना घराची गरज मुळीच नाही. त्या लवासा सिटीची कल्पना ज्यांची आहे त्यांनीच, विदेशातून कुठून तरी ती कल्पना सुचल्याचे म्हटले आहे. काहीही कारण नसताना, गरज नसताना हा केवढा अपव्यय. `आमच्याकडे पैसा नावाची निर्जीव वस्तू खूप जास्त आहे' या एकाच कारणासाठी!
# राजधानी दिल्लीजवळील नॉएडा येथे नुकतीच झालेली F -1 ग्रां-प्री स्पर्धा अपव्ययाशिवाय दुसरे काय आहे? पैसा, वेळ, पेट्रोल, वीज या सार्याचा अपव्यय. बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांची वेगाची रग जिरावी यासाठी केलेला सामूहिक तमाशा. अन् पैशाची नशा चढलेल्या लोकांनी त्याचे कौतुक करायचे. दुसरे काय?
# मुकेश अंबानींची गगनचुंबी ईमारत वा सचिनचे नवीन आलिशान घर यांना तरी काय म्हणता येईल?
# किमान अधिवेशनाच्या काळात आमदार, खासदार, मंत्री सामूहिक वाहनांचा उपयोग का करीत नाहीत?
# जगाच्या लोकसंख्येतील फक्त ५ टक्के लोकसंख्या असलेली अमेरिका जगातील २५-३० टक्के निसर्गसाधनांचा वापर करते आणि सर्वाधिक प्रदूषणही निर्माण करते हा अपव्यय नव्हे तर दुसरे काय?
# आमची अनावश्यक खरेदी, `आम्हीही काही कमी नाही' हे दाखवण्यासाठी करण्यात येणारी खरेदी ही पैशाचीच नव्हे तर संसाधने, ऊर्जा, वेळ या सार्याचा अपव्यय नव्हे का?
# पूर्ण वापर न करता वस्तू टाकून देणे, खाण्याच्या पदार्थांची नासाडी हाही अपव्ययच.
हे सारे काही हवेतून निर्माण होत नाही वा पैशाने उत्पन्न करता येत नाही. अनेक प्रकारचा अपव्यय हा तर गुन्हेगारी स्वरूपाचा आहे असेच म्हटले पाहिजे. प्रेमाने वा दटावून, लोभ कायम ठेवून वा नाराजी ओढवून घेऊन, शांतपणे वा आवाज चढवून; पण आज हे सांगण्याची वेळ आली आहे की, अपव्यय थांबवा. व्यक्तिगत अपव्यय थांबवा आणि सामूहिक अपव्ययही थांबवा.
एक प्रश्न मात्र उरतो. गरज आणि अपव्यय ठरवायचे कसे? एक साधे सूत्र मांडता येईल. एखादी कृती वा एखादी खरेदी न केल्यास आयुष्य अडखळत असेल, त्यात अडथळा निर्माण होत असेल, आयुष्य थांबून जात असेल, पुढे जात नसेल, कुंठित होत असेल तर ती गरज. पण आयुष्यात काहीही कमी राहत नसेल, आयुष्य सुरळीत सुरू राहत असेल आणि तरीही एखादी कृती वा खरेदी करत असू तर तो अपव्यय. परंतु असे मोजून मापून निरस वा निर्जीव, आनंदहीन आयुष्य जगता येत नाही. आयुष्यात आनंद, रस असायलाच हवा. मग काय करायचे? गरजेपेक्षा २० टक्के अधिक खर्च वा कृती ही त्यासाठी ग्राह्य धरायला हरकत नाही. २० टक्केपेक्षा अधिक जे काही असेल ते मात्र अपव्ययच मानायला हवा.
आजच्या जीवनशैलीत अपव्ययाचा हा विचार हास्यास्पद वाटू शकेल. परंतु नीट, सर्वंकष आणि भविष्याचा विचार केला तर त्याला पर्याय नाही हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे.

-श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ नोव्हेंबर २०११

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

गांधींचे अर्थचिंतन

इंग्रजांविरूद्धचे स्वातंत्र्य आंदोलन चालवित असतानाही महात्मा गांधींना सतत एक चिंता लागून राहिलेली असे. ती म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या समाजाचे, देशाचे चित्र काय राहील आणि काय राहावे? त्यांच्या स्वप्नातील चित्राचे नाव होते रामराज्य. त्यासाठीचा त्यांचा मार्ग होता अंत्योदय. त्याला अनुसरूनच गांधीजींनी असंख्य विषयांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या या विचारांना, चिंतनालाच `गांधी विचार' म्हटले जाते. वास्तविक आपला असा काही विचार वा तत्वज्ञान नाही असे गांधींनीच स्वत: म्हटले आहे. १९६९ साली गांधी जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचे वर्गीकरण करून विविध विषयांवरील त्यांचे विचारधन संकलित करण्यात आले. गांधींनी अर्थकारण, अर्थव्यवस्था यावरही भरपूर विचार मांडलेले आहेत. परंतु त्यास अर्थशास्त्र म्हणता येणार नाही. ते स्वत:देखील तसे म्हणत नसत. कारण त्यांनी एखाद्या ग्रंथालयात वा विद्यापीठात बसून शास्त्रशुद्ध पद्धतीने अर्थशास्त्र मांडलेले नाही. तर दैनंदिन जीवन जगताना त्यांना जे-जे जाणवले त्यातून आणि जगभर चालणार्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी लक्षात घेउन काही मूलभूत गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या आहेत. रुढ़ अर्थाने ते शास्त्र नाही, ते अर्थचिंतन आहे आणि शास्त्राला मार्गदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे.
ईशावास्योपनिषद, जैन पंथ, tolstoy, रस्किन यांचा त्यांच्या अर्थचिंतनावर प्रभाव आहे. ईशावास्योपनिषदाचा पहिला मंत्र आपल्या अर्थशास्त्राचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. `हे सारे विश्व ईश्वराचे आहे. त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्यायला हवा. कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.' असा त्या मंत्राचा अर्थ आहे. थोडक्यात म्हणजे, सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा स्वामी ईश्वर असून आपण फक्त त्या धनसंपत्तीचे विश्वस्त आहोत, असे गांधीजींचे म्हणणे होते. त्यातूनच त्यांनी विश्वस्त विचार मांडला. या विश्वस्त भावनेच्या अभावी आज दिसेल ती गोष्ट हडपण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. सार्वजनिक संपत्ती, सरकारी मालमत्ता, कार्यालयीन सामान वगैरेची आज कशी वासलात लावली जाते हे सारेच जाणतात. पर्यावरणाचे रक्षण करून सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विश्वस्त विचार साहाय्यक ठरू शकतो. सर्व प्रकारच्या उत्पादन व उपभोग पद्धतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मन:संयम हा त्यांच्या विश्वस्त विचाराचा पाया आहे.
`ही पृथ्वी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकते, पण कुणाचीही हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही' हा त्यांचा आणखीन एक मौलिक विचार आहे. विकास आणि जीवनमान ऊंचावण्याची जी झिंग चढलेली आज पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा विचार अधिकच ठळकपणे नजरेत भरतो. चांगले जीवन जगणे आणि जीवनमान ऊंचावण्याची अघोरी स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. `प्रत्येकाला भाजीभाकरी मिळायलाच हवी, एवढेच नाही तर दूध- तूपही मिळायला हवे' असे खुद्द गांधींनी म्हटलेले आहे. याचा आशय समजून घ्यायला हवा. चांगले सुखी जीवन जगण्याला त्यांचा विरोध नव्हता. आज जी हाव आणि झिंग पाहायला मिळते त्यातूनच भू-माफिया, रेती-माफिया, तेल-माफिया वगैरे अनेक प्रकारचे माफिया उदयाला आले आहेत. जगभरात सध्या पिण्याच्या पाण्यावरून होत असलेले संघर्ष आजच्या अघोरी स्पर्धेचीच परिणती आहे.
आज सारं जग अमेरिका होण्याची स्वप्नं पाहत आहे. परंतु आजचे मापदंड जसेच्या तसे ठेवूनही सार्या जगाला अमेरिका करायचे असेल तर अशा किती पृथ्वी लागतील याचा विचार कोणी करीत नाही. असा विचार कधी पुढे आलाच तर वरच्या स्तरातील लोकांनी आपला जीवनस्तर थोडा खाली आणायला हवा यावर भर देण्याऐवजी; ज्यांना दोन वेळचे पोटभर खायलाही मिळत नाही, सकाळचे मिळाले तर संध्याकाळचे काय असा ज्यांचा संघर्ष आहे; त्यांनाच जीवनस्तर आणखीन घटवण्याचे सल्ले देण्यात येतात. सुमारे वर्षभरापूर्वी केंद्रिय अर्थमंत्र्यांनी विधान केले होते की, विकसनशील देशातील लोक जास्त खायला लागल्याने महागाई वाढू लागली आहे. त्यांचे हे विधानच निर्णय प्रक्रियेतील लोक कशा पद्धतीने विचार करतात, त्यांच्या विचारांची दिशा कोणती आहे ते स्पष्ट करणारे आहे.
याच ठिकाणी गांधीजींचा आणखी एक विचार मोलाचा ठरतो. तो म्हणजे अंत्योदय. कोणतेही काम करताना, कोणतीही योजना करताना, आपल्या कामाचा वा योजनेचा परिणाम काय होईल याचा विचार करताना समाजातील अगदी शेवटच्या व्यक्तीचा प्रथम विचार करा. त्याचा चेहरा डोळ्यापुढे येऊ द्या, असे गांधींचे मत होते. आज नेमके याच्या उलट होत असल्याने प्रचंड मोठा आर्थिक, सामाजिक असमतोल निर्माण झालेला पाहायला मिळतो. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण अशा वेगवेगळ्या नावांनी जे सारे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे परिणाम अपेक्षेच्या नेमके विरुद्ध होत असल्याचे जगभर पाहायला मिळते. या सार्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज व्यवस्थांचा विचार होतो, पैसा, धन, संपत्ती यांचा विचार होतो परंतु हे सारे ज्या माणसासाठी आहे त्याचा विचार मात्र होतच नाही. माणसाचा माणूस म्हणून विचार होणे निकडीचे आहे.

माणूस हा केवळ आर्थिक प्राणी नाही. माणूस केवळ इच्छा, गरजा, वासना यांचे गाठोडे नाही. या गोष्टी माणसाच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेतच, पण केवळ त्यांना खतपाणी घालून, त्याच्या मनातील स्वार्थ आणि वासना यांना आवाहन करून मानवाचे सुखी, शांततापूर्ण सहजीवन उत्पन्न होऊ शकत नाही. त्याच्या मनात चांगुलपणा, भलेपणा, दुसर्याचा विचार करण्याची वृत्ती, करुणा, खाणे-पिणे, मौजमजा यापलीकडे जाण्याची वृत्ती, या जगाला आणि जगव्यापाराला समजून घेण्याची उत्सुकता हे सारे असते. सोबतच उपभोगाच्या सार्या वस्तूंचा कितीही उपभोग घेतला तरीही सुख नावाची गोष्ट हाती लागत नाही ही वस्तुस्थिती... या सार्याचा विचार म्हणजे माणसाचा विचार करणे. माणसाचं जगणं आणि माणसाचं सुख याची सांगड घालणे हेही महत्वाचे.
गांधींनी हा सारा विचार केला. म्हणूनच ते म्हणतात की, माणसाला पैसा मिळवण्यासाठी ६ तासापेक्षा जास्त काम करण्याची गरज नसावी. त्याला मोकळा वेळही मिळायला हवा. कारण असा मोकळा वेळ मिळेल तेव्हाच त्याची सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक, आध्यात्मिक प्रगती होईल आणि तो माणूस म्हणून जगू शकेल. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी त्याची अवस्था होऊ नये. पैसा, सुखाची साधने वाढत आहेत परंतु माणूस आणि माणुसकी लुप्त होते आहे असे आज सर्वत्र ऐकायला मिळते. असे का होते? याच्या मुळाशी जाण्याची आणि आजच्या विपरीत प्रवाहाला योग्य वळण देण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती क्वचित पाहायला मिळते. मानवतेच्या याच वळणावर सशक्त मार्गदर्शन करायला गांधी उभे आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २ ऑक्टोबर २०११

रा. स्व. संघाचा दसरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दसरा म्हणजेच विजयादशमी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। इ.स. १९२५ च्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्यामुळे हा संघाचा स्थापना दिवसही आहे. १६२६ च्या विजयादशमीला हा उत्सव वार्षिकोत्सव म्हणूनच साजरा केला गेला. त्या दिवशी सायंकाळी एक बैठक संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या घरी झाली. बैठक संपल्यावर पानसुपारी झाली आणि बैठकीतील सारे जण सीमोल्लंघनासाठी नागपूरच्या राजाबाक्षा हनुमान मंदिरात गेले आणि प्रथेप्रमाणे त्यांनी सोने लुटले. हा पहिला उत्सव सुद्धा रा. स्व. संघाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला नाही तर वार्षिकोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतर मात्र हळूहळू या उत्सवाचे स्वरूप अधिक ठोस होत गेले. गेली सुमारे १२ तपे हा उत्सव शक्तीची उपासना आणि विजयाकांक्षेचे स्मरण म्हणून साजरा करण्यात येतो. विस्कळीतपणा दूर होऊन समाज संघटित व्हायला हवा. संघटित अवस्था हीच समाजाची स्वाभाविक अवस्था आहे. हा संघटितपणा समाजाच्या अंगोपांगात भिनायला हवा. ही अवस्था उत्पन्न करण्यासाठीच संघ काम करतो आहे. हे काम करण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. विजयादशमी हा हिन्दू परंपरेत शक्तीच्या उपासनेचा महोत्सव आहे. सर्वत्र या काळात शक्तीचे जागरण करण्यात येते. रामाचा रावणावरील विजय, पांडवांचा अज्ञातवास संपून त्यांनी पुन्हा शस्त्र धारण करणे, दुर्गादेवीने महिषासुराचा वध करणे, कौत्सला सुवर्ण दक्षिणा देण्यासाठी रघु राजाने केलेले सुवर्ण दान, व्यक्तीव्यक्तीच्या मनातील दुर्बलतेचा नाश होऊन चेतना जागृत व्हावी यासाठी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीनही रुपांचा एकत्रित आविष्कार असलेल्या दुर्गेची उपासना, शत्रुवर, दुर्गुणांवर, दुर्बलतेवर मात करून विजय मिळवण्याचा संदेश देणारा म्हणून साजरा होणारा विजयादशमी उत्सव संघातही त्याच हेतूने साजरा केला जातो. स्थापना दिवस म्हणून नव्हे.
रा. स्व. संघाच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात संघाचे लष्करी स्वरूप, त्याच्या शाखा, शारीरिक कार्यक्रम, कवायती, संचलन हे सारे विकसित झाले आणि नंतर विजयादशमीच्या उत्सवातही त्याची झलक पाहायला मिळू लागली. सुरुवातीला हा उत्सव आश्विन शुद्ध नवमी व आश्विन शुद्ध दशमी असे दोन दिवस होत असे. नवमीला सायंकाळी शस्त्रपूजन उत्सव होत असे. त्या दिवशी नागपुरातील सर्व स्वयंसेवक धोतर-कुडता वा पायजामा-कुडता आणि डोक्यावर संघाची काळी टोपी अशा वेशात शस्त्रपूजन उत्सवाला उपस्थित राहत असत. संघाचे घोषपथक मात्र पूर्ण गणवेषात, घोषवादन करत असे. त्या कार्यक्रमात सरसंघचालक, नागपूरचे संघचालक आणि प्रमुख पाहुणे शस्त्रांची पूजा करत. त्यानंतर प्रमुख पाहुणे व सरसंघचालकांचे मार्गदर्शन होत असे. स्वयंसेवकांचे कुटुंबीय आणि निमंत्रित नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित राहत असत. दुसर्या दिवशी म्हणजे विजयादशमीला सकाळी सीमोल्लंघनाचा मुख्य उत्सव होत असे. पहाटे नागपुरातील सर्व स्वयंसेवकांचे घोषाच्या तालावर पथसंचलन होत असे. त्यानंतर मुख्य कार्यक्रम. त्यात व्यायाम योग, दंड, योगचाप, योगासन, सूर्य नमस्कार, नियुद्ध, घोषवादन व संचलन अशी विविध शारीरिक कार्यक्रमांची प्रात्यक्षिके होत असत. तरुण स्वयंसेवकांसोबतच बाल व शिशू स्वयंसेवकांची प्रात्यक्षिकेही या उत्सवात होत असत. दोन्ही दिवशी भाषणांपूर्वी सांघिक व वैयक्तिक गीतही गायले जात असे. त्यानंतर प्रमुख पाहुणे व सरसंघचालक यांचे मार्गदर्शन होत असे. या कार्यक्रमालाही स्वयंसेवकांचे कुटुंबीय व निमंत्रित नागरिक उपस्थित राहत असत. विजयादशमी उत्सवातील सरसंघचालकांचे भाषण विशेष महत्वाचे समजले जाते. संघाचे आगामी वर्षभरातील धोरण काय राहील याचा संकेत सरसंघचालक या भाषणातून देत असतात.
संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संघावरील बंदीचा काळ वगळता विजयादशमीच्या आयोजनात खंड पडलेला नाही. या विजयादशमीच्या उत्सवात बदलही होत आले आहेत. काही वर्षे हा उत्सव नागपूरच्या पटवर्धन मैदानावर होत असे. त्यावेळी संघाचे मुख्यालय असलेल्या मोहिते संघस्थानावरून पथसंचलन निघत असे. तसेच कार्यक्रम संपल्यावर पुन्हा पथसंचलन करीत स्वयंसेवक मोहिते संघस्थानावर परत येत असत. पटवर्धन मैदानानंतर अनेक वर्षे हा उत्सव प्रसिद्ध अशा कस्तुरचंद पार्क मैदानावर होत असे. बाकी सारा कार्यक्रम तसाच राहत असे. बाल व शिशू स्वयंसेवकांना नेण्या आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत असे. यावेळी नवमीचा शस्त्रपूजनाचा उत्सव रेशिमबाग मैदानावर होत असे. कालांतराने बाल व शिशू स्वयंसेवकांचा पूर्ण गणवेशातील उत्सव व त्यांची प्रात्यक्षिके शस्त्रपूजन उत्सवात होऊ लागली आणि तरुण स्वयंसेवकांचा उत्सव दशमीला स्वतंत्रपणे होऊ लागला. संख्यावाढ आणि नागपूरचा विस्तार या दोन गोष्टींमुळे यातही बदल होत गेला आणि गेली काही वर्षे बाल व शिशू स्वयंसेवकांचा उत्सव व शस्त्रपूजन उत्सव नागपूरच्या विविध भागात होत आहे. असे साधारण चार उत्सव होतात. हे उत्सव देवीचे नवरात्र सुरू झाल्यानंतर सोयीचा दिवस पाहून आयोजित केले जातात. मध्यंतरी काही वर्षे तरुणांची प्रात्यक्षिके आणि सरसंघचालकांचे प्रमुख भाषण हा कार्यक्रम नवमीला घेऊन दशमीच्या दिवशी सकाळी केवळ पथसंचलन असे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या विविध भागातून हे भव्य पथसंचलन होत असे. त्यामुळे विविध भागातील नागरिकांनाही संघाच्या पथसंचलनाचा परिचय झाला. संघाचे विजयादशमीचे हे भव्य पथसंचलन हा थाटाचा आणि आकर्षणाचा विषय असतो. आता पुन्हा विजयादशमीचा तरुण स्वयंसेवकांचा उत्सव पूर्वीसारखाच दशमीला सकाळी होतो. सकाळी पथसंचलन, नंतर प्रात्यक्षिके, गीत, भाषणे असा हा भरगच्च कार्यक्रम असतो.
बाळासाहेब देवरस सरसंघचालक असेपर्यंत म्हणजे १९९४ पर्यंत नागपूरच्या विजयादशमी उत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य होते. वर्षातून एवढा एकच दिवस सरसंघचालक पूर्ण गणवेशात उपस्थित राहत असत. अन्य कार्यक्रमांना, शिबिरांना, संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला वगैरे सरसंघचालक गणवेशात पाहायला मिळत नसत. गोळवलकर गुरुजीही दसरा उत्सवाला पूर्ण गणवेशात उपस्थित राहत. फक्त टोपी मात्र घालत नसत. बाकी गणवेश असे. रज्जुभैया सरसंघचालक झाल्यापासून मात्र सरसंघचालकांचा गणवेश ही विशेषता राहिली नाही. कारण त्यांनी ज्या-ज्या कार्यक्रमात स्वयंसेवक गणवेशात असतील त्या कार्यक्रमांना गणवेशात उपस्थित राहणे सुरू केले. त्यानंतरच्या सरसंघचालकांनीही ती परिपाठी स्वीकारली.
नागपूरच्या या दसरा उत्सवाला विविध क्षेत्रातील, विविध प्रांतातील महनीय व्यक्तींना अध्यक्ष म्हणून बोलावण्याचा प्रघात आहे. त्या निमित्ताने त्या व्यक्तींना संघाचा, संघ विचारांचा परिचय व्हावा व संघाचे वर्तुळ वाढावे हा प्रयत्न असतो. हृदयनाथ मंगेशकर, भैयुजी महाराज, तरुण सागर जी महाराज, सीबीआयचे माजी संचालक जोगिन्दर सिंह, पत्रकार अरुण शौरी, दलित नेते राजाभाऊ खोब्रागडे, पंजाबचे इतिहासाचे अभ्यासक डॉ. अत्तर सिंह, प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर, शंकराचार्य, हिंदी साहित्यिक डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव, पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह, पद्मश्री डॉ. झिटे अशी विविध क्षेत्रातील मंडळी या उत्सवाला आलेली आहेत.
रा. स्व. संघाच्या दसरा उत्सवाचा भाग नसलेला पण संघ व दसरा या दोन्ही गोष्टींशी संबंध असलेला एक अनौपचारिक असा आणखीन एक कार्यक्रम आहे. संघाच्या एकूण कार्यपद्धतीत त्याचेही एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दसर्यानिमित्त संध्याकाळी सोने म्हणून शमीची वा आपट्याची पाने लुटण्यात येतात. ही पाने देवाला, वडील माणसांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेणे, स्नेह्यांना, बरोबरीच्या सोबत्यांना ही पाने देऊन त्यांची गळाभेट घेणे अशी एक प्रथा विदर्भात आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक रेशीमबागेत त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीवर सोने वाहायला संध्याकाळी येतात. स्वत: सरसंघचालकही या दोन्ही श्रद्धास्थानांचे दर्शन घेउन सोने वाहतात आणि त्यानंतर थोडा वेळ त्या ठिकाणी असतात. या वेळात तेथे येणारे स्वयंसेवक दोन्ही समाधींना सोने वाहिल्यावर सरसंघचालकांनाही सोने देतात. या निमित्ताने स्वयंसेवक व सरसंघचालक यांच्यात अनौपचारिक संवाद होतो. स्वयंसेवकांसोबतच कुटुंबीयांचीही ओळख होते. स्वयंसेवकांचा, अन्य अधिकार्यांचा परस्पर परिचय होतो. यातून एक भावबंध निर्माण होतो. संघाच्या एकूण कार्यपद्धतीत अशा प्रकारच्या अनौपचारिक भावबंधाला अतिशय मोलाचे स्थान आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ६ ऑक्टोबर २०११

बुधवार, २८ सप्टेंबर, २०११

निर्बुद्ध बुद्धिवंत

गेल्या आठवड्यात केंद्रिय नियोजन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आणि देशभर एका खमंग चर्चेला सुरुवात झाली. भारतात तुम्ही जर शहरात राहात असाल तर तुम्हाला रोजच्या जगण्याला ३२ रुपये पुरेसे आहेत आणि तुम्ही जर खेड्यात राहात असाल तर तुम्हाला रोजच्या जगण्याला २६ रुपये पुरेसे आहेत, अशा आशयाचे ते प्रतिज्ञापत्र आहे. देशाचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत. या अतिशय महत्त्वपूर्ण आयोगात अत्यंत बुद्धिमान लोक असतात, असा या आयोगाचा लौकिक आहे. संपूर्ण देशातील योजनांचे नियोजन, सरकारी पैशाचे समन्यायी वाटप वगैरे अतिशय महत्त्वपूर्ण कामे नियोजन आयोग करीत असते. संपूर्ण देशाचा गाडा चालवण्यात नियोजन आयोगाचा सिंहाचा वाटा असतो. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा एक इतिहास आहे. याआधी चार महिन्यांपूर्वी नियोजन आयोगाने असेच प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात आयोगाने शहरात जगण्यासाठी रोज २० रुपये पुरेसे आहेत असे म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून दुसरे सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश दिले होते. त्याला अनुसरून नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
या देशातील सगळ्यात खालच्या आर्थिक स्तरावरील माणुसही हे सांगू शकतो की, नियोजन आयोगाचे हे प्रतिज्ञापत्र किती निरर्थक आहे. तथाकथित बुद्धिवंतांनी आपली निर्बुद्धताच या प्रतिज्ञापत्राद्वारे जगाला दाखवून दिली आहे. हे मत कदाचित फार कठोर वाटेल पण आज सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आणि कोडगेपणाने होत आहेत त्या पाहता या कठोर भाषेला कोणताही पर्याय उरलेला नाही. या प्रतिज्ञापत्राचे समर्थन करण्याचा निलाजरेपणाही सुरूच आहे. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा बेशरमपणा करणारेच हे सारे करू शकतात. या प्रतिज्ञापत्राचे समर्थन करणार्या निरढावलेल्या आणि कोडग्या बुद्धिवंतांनी आणि नेत्यांनी केवळ एक महिना ३२ रुपये रोज याप्रमाणे जगून दाखवावे आणि उदाहरण घालून द्यावे. या देशाचा गाडा चालवणारे लोक माणसांना माणूस तरी समजतात का, हा खरे तर कळीचा मुद्दा आहे.
आज १०-१२ हजार रुपये महिना कमावणारा माणुसही कसाबसा आपला चरितार्थ चालवत असतो. जुनीपुराणी एखादी खटारा दुचाकी घेउन १०-१५ किलोमीटरवर कामाला जाणारा माणूस ७५ रुपये लीटर पेट्रोल झाल्यावर सायकल जवळ करतो. भाज्यांचे दर दुप्पट झाल्यावर त्याच्या ताटातील भाज्या गायब होतात. चप्पल तुटल्यावर अजूनही तो दहा वेळा तीच चप्पल दुरुस्त करून वापरतो. तरीही घरी आलेल्या पाहुण्याला कपभर चहा पाजण्याची माणुसकीही जपतो. या स्तराच्या खालचे तर सोडूनंच द्या. खरे तर नियोजन करणार्या बुद्धिवंतांना सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा परिचयसुद्धा नाही आणि सर्वसामान्य माणूस तर हे विद्वान ज्या पद्धतीने जगतात त्याचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. ३२ रुपयात जगणे होत असेल तर मग खासदारांना लाखो रुपयांचे वेतन व भत्ते कशाला हवेत? नवनवीन वेतन आयोग सरकार का स्थापन करते? नवनवीन गाड्या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना कशाला हव्यात? पण असले कोणतेही प्रश्न विचारायचे नसतात. प्रश्न विचारले तर तुम्ही अस्थिरता निर्माण करता म्हणून हे गळे काढणार. आमच्यावर विश्वास ठेवा हा टाहो तर रोजचाच झाला आहे. का ठेवायचा यांच्यावर विश्वास? हे म्हणतात म्हणून? विश्वास ही गोष्ट मागून मिळत नसते. ती आपल्या कृतीतून प्राप्त करायची असते. नुसत्या पोकळ उक्तितून आणि टाहो फोडून विश्वास मिळत नसतो ही साधी गोष्टसुद्धा या कथित थोरांना कळत नाही.
परंतु या सार्या युक्तिवादाला, तर्काला काहीही अर्थ नाही. कारण आज सारी सूत्रे ज्यांच्या हाती आहेत ते फक्त दरोडेखोर आहेत. दरोडेखोराला फक्त लुटणे माहीत असते. अंगावरच्या कपड्यांपर्यंत सारे काही तो लुटत असतो. अन् लुटायला काही शिल्लक राहिले नाही की लाथ मारून हाकलून देत असतो. नियोजन आयोग काय आणि सरकार काय, याशिवाय दुसरे काहीही करणार नाही याबद्दल शंका नको. हे जे काही करीत आहेत ती त्यांची बुद्धी आहे, असेही समजण्याचे कारण नाही. देशाला महासत्ता, आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी यांना जागतिक बैंक, आंतर्राष्ट्रीय नाणेनिधि तसेच अमेरिका, यूरोप सांगतात त्याप्रमाणे सुधारणा करायच्या आहेत. ते सांगतात सब्सिडी कमी करा आणि यांना सब्सिडी कमी करायच्या आहेत. सब्सिडी कमी करायच्या तर भारतात गरिबी नाही, सगळे लोक कसे सुखाने जगू शकतात हे सिद्ध करायला हवे. त्यासाठी मग हे बुद्धी गहाण टाकलेले बुद्धिवंत प्रयत्न करायला लागतात. त्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि हे सारे तरी कशासाठी? तर त्यांच्या जगण्याला रोज एक चांदणी (२ स्टार, ३ स्टार... ५ स्टार, ७ स्टार..... अनंत स्टार) चिकटावी म्हणून. मात्र जे दीडशहाणे आम्हाला हे करा, ते करा, या सुधारणा करा, त्या सुधारणा करा असे सांगत असतात त्यांनी या सुधारणा मोठ्या प्रमाणावर केल्या तरीही त्यांच्या अर्थव्यवस्था का गडगडल्या? त्यांच्या महाकाय बन्कांचे दिवाळे का निघाले? आज ग्रीससारखे देशचे देश बुडण्याच्या मार्गावर का आहेत? हे वा यासारखे साधेसाधे प्रश्नही या बुद्धिमान लोकांना पडत नाहीत एवढे त्यांचे मेंदू मरून गेले आहेत. मने आधीच मेली होती. त्यामुळे कोणाच्याही सुखदु:खाशी त्यांना घेणे देणे नव्हते. आता मेंदूही मरून गेल्याने चर्चा वगैरेनाही काही अर्थ उरलेला नाही.
आचार्य विनोबा भावे यांनी एकदा असे म्हटले होते की, जगातील सारे व्यवस्थापक घरी बसवा. त्याने जगाचे कल्याण होईल. आज पुन्हा त्याच धर्तीवर म्हणण्याची वेळ आली आहे की, सगळ्या बुद्धिवाद्यान्ना घरी बसवा. त्यानेच जगाचे भले होईल. आज जगात चालत असलेल्या बहुतांश व्यवस्था आणि त्याच्या मुळाशी असलेला विचार आणि तत्वज्ञान यांचे हेतू आणि दिशाच मुळी चुकलेली आहे. त्यामुळे सगळेच भांबावलेले आहेत. अन् तुम्ही आम्ही मेंढरांसारखे अगतिकपणे त्यांच्या मागे फरपटत चाललो आहोत. तथाकथित प्रगती, अधोगतीची मूर्ख चर्चा न करता सारे क्रियाकलाप थांबवून आमची दिशा आणि हेतू यांचा शांतपणे विचार करणे हाच एकमेव उपाय आहे. जे काही करायचे ते त्यानंतर. दिल्लीला जायचे आहे पण बसलो आहोत कलकत्त्याला जाणार्या गाडीत आणि तिथे बसूनच नुसती कावकाव करीत आहोत, अशी आमची अवस्था झाली आहे. पहिले स्वत:चा गाढवपणा मान्य करून गाडीतून खाली उतरावे लागेल. शांतपणे परिस्थितीचा विचार करावा लागेल आणि मग पुढची कृती करावी लागेल. पण समर्थानी म्हटल्याप्रमाणे `जो तो बुद्धीच सांगतो' अशी आज स्थिती आहे. जगाचा पालनकर्ता या जगाचं भलं करेल का?

-श्रीपाद कोठे
बुधवार, २७ सप्टेम्बर २०११
नागपूर

शनिवार, १० सप्टेंबर, २०११

बाप्पा, प्लीज...

बाप्पा तुम्ही आलात आणि १० दिवस कसे तेजाळून गेले. नेहमीप्रमाणेच हे दिवस कसे गेले ते कळलेही नाही. तुमची जादूच अशी आहे की बास! तुमच्या रुपाची भुरळ, तुमच्या गुणांची मोहिनी, तुमच्या प्रसादाची माधुरी, तुमच्या आशीर्वादाची शक्ती अन् तुमच्या अस्तित्वाचा परिमळ या सार्याचा परिणाम होतो आणि वर्षभराची जाळीजळमटं धुतली जाऊन सारं वातावरण कसं सुस्नात होऊन जातं. बाप्पा, उद्या तुम्ही जाणार. `पुढल्या वर्षी लवकर या' म्हणत सारे तुम्हाला भावपूर्ण निरोप देणार. तुम्हीही पुढल्या वर्षी दहाएक दिवस अगोदर येणार असं ऐकतो आहे. छान छान. आम्ही तुमची वाट पाहतच असतो. बाप्पा सगळ्यांनी तुमच्याकडे काही काही मागितलं असणार. तुम्ही त्यांच्या मागण्या मान्यही करणार. बाप्पा तुम्हाला निरोप देता देता माझंही एक मागणं आहे. द्याल मला?
बाप्पा, तुम्ही रिद्धी-सिद्धीचे देवता. त्यामुळे तुमचं सारं काही दिमाखात असतं. छान वाटतं पाहून. गेले १० दिवस मीही तो आनंद अनुभवला आहे. रोज तुमची वेगवेगळी रूपं, तुमची आरास, तुमचे नाना नैवेद्य, तुमच्या दर्शनाला लोटणारी गर्दी, तुमच्या भक्तांची अपार श्रद्धा, त्यांचे दानधर्म... सारं काही पाहत होतो. तुमच्यावरचं माझं प्रेमही माझ्या डोळ्यातून ओसंडताना तुम्हीही पाहिलंच असेल. पण देवा खरं सांगू? आणि खोटं सांगणार तरी कसं म्हणा? तुझ्यापासून लपून काय राहिलं आहे? तर सांगू, तुझ्यावर उधळली जाणारी संपत्ती, सोनं खुपत होतं डोळ्याला. कुठे किती किलो सोनं आहे, किती दागिने आहेत याची चर्चा मला ओशाळं करीत होती. तुझ्याशिवायही चालतातच या चर्चा. मागे २८ युगं विटेवर उभे असलेल्या त्या पांडुरंगाबद्दल आणि त्याच्या रुक्मिणीबद्दलही ही चर्चा ऐकली, पाहिली होती. त्या शेषशायी भगवान विष्णूच्या पद्मनाभ मंदिराने तर मध्यंतरी सार्यांचे डोळेच फिरवले होते. शेवटी विष्णूही तूच ना? अथर्वशीर्षातही `त्वं ब्रम्हा, त्वं विष्णू, त्वं रुद्र' वगैरे वगैरे म्हटलेच आहे ना. माझ्यासाठी तर सारी रूपं तुझीच आहेत. तर विषय होता, सोन्याचा, दागदागिन्यांचा. भक्तगण तुला ते अर्पण करतात ही त्यांची श्रद्धा आहे. पण तुलाही त्याचा मोह आहे? अरे बाप्पा, हे सारं वैभव, ही सारी संपत्ती, एवढंच काय ही सारी चराचर सृष्टी तुझ्याच संकल्पमात्रे निर्माण झाली आहे ना... तरीही त्यातल्या काही तुकड्यांचा तुला मोह व्हावा? नाही देवा, हे नाही पटत. जशी माणसांची संपत्ती असते तशी देवांचीही असू शकते की नाही वगैरे वाद घातले जातात. ते नाही ऐकवत बाप्पा. बाप्पा तुला ठाऊक आहे आज तुझ्या लेकरांची स्थिती काय आहे ते. तुझी लाखोच नव्हे करोडो मुले अन्नान्न फिरत आहेत. पिण्याचे पाणी, औषधे, शुद्ध हवा, तू जिची देवता आहे ती विद्या या सार्याचा किती अभाव आहे तुला माहीतच आहे. साधं माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हेही आढळत नाही. त्यासाठी लागणारा स्नेह, माया, प्रेम दुर्मिळ झालं आहे. पैसेवाल्यांना गरिबांची कणव वाटत नाही, शहरात राहणार्यांना गावात राहणार्यांबद्दल दुजाभाव वाटतो. पैसा, संपत्ती, सोनं, जमीनजुमला बास... हेच विश्व झालं आहे. दुसर्याचा विचार करणं, मिळून मिसळून राहणं वगैरे अडाणीपणाचं लक्षण ठरू लागलं आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी यात काही भेदच राहिलेला नाही. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा माणूस विसरून गेला आहे.
बाप्पा, संपत्तीच्या मोहात पडू नका. त्याचा योग्य विनियोग करा, जास्तीत जास्त दान करा. हे दान गरजूंच्या उपयोगी पडू द्या असं सारेच सांगतात. पण तसं घडताना क्वचित दिसतं. करोडो रुपयांची मोटार फुकट भेट मिळाली तरी त्यावरचा करसुद्धा माफ करावा म्हणून लोक हात पसरतात. असेच लोक आज आमचे देव झाले आहेत!! तू फक्त १० दिवसांचा!!! माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की, ही सुरुवात तू तुझ्यापासून कर. तू सुरुवात केली तर सारंच कसं सुरळीत होईल असं माझी श्रद्धा मला सांगते. हे सोनंनाणं, जडजवाहीर, संपत्ती याचा त्याग कर. लक्ष्मी फिरती राहू दे आणि नुसती फिरती नको, योग्य मार्गाने आणि योग्य मार्गावर फिरती राहू दे. तुझे भक्त कधी कधी त्याचा योग्य विनियोग करतात. पण त्यात नियोजन आणि दृष्टीचा अभाव जाणवतो. या देशातला सगळ्यात शेवटला माणूस सार्यांच्या दृष्टीपुढे असू दे. रिद्धी-सिद्धीवर तुझीच सत्ता चालते. तुझ्या भक्तांवर तर फक्त तुझीच सत्ता चालते. या दोघांनाही समृद्धीकडे पाहण्याची योग्य दृष्टी आणि त्याच्या विनियोगाची योग्य बुद्धी दे. आणि हो, एक पथ्य मात्र जरूर जरूर पाळायला लाव दोघांनाही की, एक छदामही राजकीय नेत्यांच्या व सरकारच्या हाती जाऊ नये. जगातली सारी समृद्धी घशात घालतील आणि तरीही त्यांना ढेकर येणार नाही. त्यांच्या भुकेला अंतच नाही. त्यांना दुरुस्त करणे तुझ्याही आवाक्याच्या पलीकडे आहे. तेव्हा त्यांच्या भानगडीत पडूच नको. तेव्हा बाप्पा, सोड मोह या सार्याचा आणि सार्या विश्वाच्या मंगलमय कल्याणाची दृष्टी आणि बुद्धी तुझ्या भक्तांना आणि रिद्धी-सिद्धीला दे. देशील मला बाप्पा एवढं... प्लीज...

-श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार, १० सप्टेंबर २०११

सोमवार, २२ ऑगस्ट, २०११

दलित बंधू, भगिनींनो... मित्र, मैत्रिणीन्नो...

एक वाद आले अन् शांतपणे निघून गेले. मनाला हायसे वाटले. `आरक्षण' चित्रपट आला. येण्यापूर्वी त्याने थोडी बळ माजवली. पण सुदैवाने सारे काही थोडक्यात निभावले. पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या तीन राज्यांत त्यावर बंदी घालण्यात आली होती. अन्यत्र तो पाहायला मिळाला. तीन राज्यांतील बंदीही नंतर उठवण्यात आली. त्यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या आहेत. या निमित्ताने सार्यांनीच जी समजदारी परिपक्वता दाखवली ती दिलासा देणारीच आहे. या संवेदनशील विषयाचे कसे राजकारण केले जाते तेही उघड होउन गेले. या सार्याचे थोडेबहुत कवित्व पुढेही सुरू राहील. पण ती काही चिंतेची बाब नाही. 'आरक्षण' हा चित्रपट आहे आणि त्यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यासारखे कलाकार आहेत त्यामुळे त्यावर चर्चा झाली. हा चित्रपट हिंदी भाषेत असल्यामुळे त्या चर्चेचे स्वरुपही अखिल भारतीय होते. मात्र, मराठीतही एका पुस्तकाने सामाजिक उडवली आहे. साहित्य आणि चित्रपट या दोन माध्यमांचे वेगळेपण, भाषेची मर्यादा वगैरे गोष्टींमुळे त्याची चर्चा फारशी झाली नाही. पण पुरुषोत्तम खेडेकर नामक माणसाने एक पुस्तक लिहून त्यात ब्राम्हण समाजाबद्दल जी गर ओकली आहे त्याने बळ नक्कीच माजली. त्यातही महत्वाचे म्हणजे दलित समाजातील अनेकांनी त्यावर अत्यंत प्रगल्भ भूमिका घेउन खेडेकरचे दात त्याच्याच घशात घातले आणि समाजात दुही पसरवण्याचा त्याचा कावा उघड केला. आता तर काही दलित बंधुन्नी त्या पुस्तकावरून खेडेकरला न्यायालयात खेचले आहे अशीही माहिती कानी आली आहे. खरंच कोणाही विचारी माणसाला समाधान देल असेच हे सारे आहे.
या निमित्ताने तुमच्याशी काही बोलावेसे वाटले. मनमोकळेपणे. सुरुवातीलाच हे सांगणे योग्य ठरेल की, मी स्वत: ब्राम्हण आहे. खरे तर हे सांगणे मनाला पटत नाही, पण आज परिस्थिति थोडी विचित्र आहे. कोणी कोणाविषयी, कशाविषयी बोलावे, बोलू नये याबद्दल खूप गोंधळ माजवला जातो. या जातीने त्याबद्दल बोलू नये, पुरुषांनी महिलांविषयी बोलू नये, कामगारांनी मालकाबद्दल बोलू नये, मालकाने कामगारांबद्दल बोलू नये, सामान्य माणसाने राजकीय नेत्यांबद्दल बोलू नये वगैरे वगैरे. मुळात बुद्ध होण्यासाठी दु:ख भोगण्याची गरज असतेच असे नाही. नुसते जगाचे दु:ख पाहूनही बुद्ध होता येते, त्यासाठी हवी फक्त मनाची अतीव संवेदनशीलता, निखळता, करूणा. आज मात्र तेवढे सोडून बाकी सार्याचीच चर्चा होते. असो. प्रस्तावनाच मोठी होते आहे. मूळ विषयाकडे वळू या.
आरक्षण ही आपल्या समाजातील एक सामाजिक ऐतिहासिकता आहे. जगात अन्यत्र असा प्रयोग झाला की नाही माहीत नाही, पण सगळ्या जगाने अनुकरण करावे असा हा प्रयोग आहे. माणसाला माणूस म्हणून उभे करण्यासाठी जगाच्या पाठीवर जे जे प्रयत्न झाले असतील त्यातील हा एक आगळावेगळा आणि अनोखा प्रयोग आहे. पण त्याचे आजचे स्वरुप आणि ते कुठवर चालावे हे दोन मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. काय आहे त्याचे आजचे स्वरुप? त्याची ऐतिहासिकता वगैरे विचार न करता आज जो उठेल तो आरक्षण मागतो. मुस्लिमांना आरक्षण हवे, ख्रिश्चनांना आरक्षण हवे, महिलांना आरक्षण हवे, या जातीला हवे, त्या जातीला हवे, आता तर अगदी ब्राम्हणांनाही हवे. आरक्षण मिळावे म्हणून आपण कसे मागास आहोत याची चढाओढ लागलेली. मागास ठरण्याची चढाओढ? जणू काय हा देश, इथल्या संधी, संसाधने हा लोण्याचा गोळा आहे आणि तो पटकवायला सारे धडपडताहेत. हा काय समाज म्हणायचा?
मित्रांनो, असाही एक वर्ग आहे, ज्याला आरक्षण हा प्रकारच मान्य नाही. आरक्षण दिले म्हणजे काही उपकार केला असे वाटणाराही वर्ग आहे. त्याच्याकडे लक्ष देण्याचीही गरज नाही. माझे व्यक्तिगत मत म्हणाल तर, आरक्षण कितीही चालले तरीही माझी हरकत नाही. तरीही माझे म्हणणे असे की, आरक्षण पूर्णत: संपुष्टात यायला हवे. अर्थात याचा निर्णय ज्या समाजाला आरक्षण मिळते त्यानेच करायला हवा. तो वर्ग दलित असो, अन्य मागासवर्गीय असो, महिला असो वा कोणीही. कोणत्याही वर्गाने स्वत:ला असे वेगळे करून घेऊ नये आणि आरक्षणापुरते मर्यादितही करून घेऊ नये. खरे तर घटनाकारांनाही हेच अभिप्रेत नव्हते का? का त्यांनी केवळ १० वर्षांची मर्यादा ठेवली होती आरक्षणाला? हा समाज, येथल्या संधी, शिक्षण, रोजगार वगैरे व्यवस्था पुरेशा आणि न्याय्य असायलाच हव्यात, जेणे करून अशा वेगळ्या व्यवस्थेची गरजच राहणार नाही. पण या बाह्य गरजेसोबतच, मानसिकताही तयार व्हायला हवी. ही मानसिकता तयार करण्याचे काम त्या-त्या समाजगटांनाच करावे लागेल. किमान सुरुवातीला तरी.
आज परिस्थिती बदललेली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्यापासून आपण `दलित चेंबर ऑफ कॉमर्स'पर्यंत येउन पोहोचलो आहोत. economic times ऩे तर यशस्वी दलित उद्योजकांवर एक वृत्तमालिकाच मध्यंतरी चालवली होती. स्वत:चा व्यवसाय चालवणार्या दलितांची संख्या पश्चिम उत्तर प्रदेशात ६ टक्क्यांवरून ३६ टक्क्यांच्याही वर गेली आहे. पूर्व उत्तर प्रदेशात ही संख्या ४ टक्क्यांवरून ११ टक्क्यांवर गेली आहे. बंधुआ मजुरांमधील दलितांचे प्रमाण कमी झाले आहे. स्वत:ची जमीन बाळगणार्या दलितांचे प्रमाण १२ ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. ही सारी आकडेवारी हुरूप वाढवणारी आहे. मंदिरे, पाणवठे, सार्वजनिक ठिकाणे येथे आता दलित समाज मोकळेपणे जा-ये करतो. कुठे काही समस्या निर्माण होत असेल तर ती मुख्यत: स्थानिक व व्यक्तीशी संबंधित असते. समाज म्हणून दलितांच्या मोकळ्या वावराला आता विरोध होत नाही. परंतु ही या सामाजिक समस्येची एक बाजू आहे.
दूसरी बाजू आहे मानसिक. एकात्म, सशक्त समाजासाठी दलित आणि दलितेतर घटकांनीच नव्हे तर सर्वच समाजघटकांनी परस्परांना मनाने स्वीकारण्याची गरज आहे. यासाठी सगळ्यांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. काही गोष्टी सोडाव्या लागतील, काही आग्रह सोडावे लागतील, कटुता तर पूर्ण सोडावी लागेल, माधुर्य वाढवावे लागेल. त्याला पर्याय नाही. एकाच घरातसुद्धा प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावेच लागते आणि प्रेमच द्यावे लागते. प्रेम, स्नेह न देता किंवा त्या बदल्यात अन्य काही देऊन हा सौदा नाही करता येत. यासाठी भरीव प्रयत्न हवेत. याचा अर्थ प्रयत्न होत नाहीत असे नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे प्रयत्न प्रदीर्घ काळापासून करीत आहे. अन्यही लोक करीत आहेत. दलितेतर समाजातील कटुता, नाराजी कमी करण्याचा प्रयत्न संघाने यशस्वीपणे केला आहे. या प्रयत्नांना विरोधही झाला, `नाटके' म्हणून त्याची संभावनाही झाली. तरी त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. अर्थात कोणाचे प्रयत्न दिखाव्याचे असतील, नाटक असेल तरीही त्याचे स्वागतच करायला हवे. कारण अशा प्रयत्नांतूनच, जे साध्य करायचे आहे त्याचा महामार्ग तयार होत असतो. राजकारणाच्या पलिकडे जाऊन दलित समाजानेही व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर असे प्रयत्न करायला हवेत. प्रदीर्घ काळापासून ही समस्या आपल्या समाजात आहे हे खरे आहे. परंतु आज जगाचाच वेग इतका वाढला आहे की, रोजचे जग वेगळे वाटावे. गेल्या १ हजार वर्षात नसतील झाले एवढे बदल मानवी जीवनात सर्वच पातळ्यांवर झाले आहेत. तेव्हा आता ही समस्या देखील लवकरात लवकर कायमस्वरूपी निकालात निघायला हरकत नाही.
आणखीही एक संवेदनशील मुद्दा आहे. तो आहे राज्यघटनेचा. राज्यघटना या विषयावर कोणी बोलू लागले की तो घटनाविरोधी, आंबेडकरविरोधी ठरू लागतो. हे खरेच योग्य आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान नाकारणे हा वेडेपणाच म्हटला पाहिजे, पण त्याविषयी गरजेपेक्षा जास्त संवेदनशीलता जोपासली जाते असे नाही का वाटत? राज्यघटना तयार झाली तेव्हा घटना समितीत २१८ लोक होते. डॉ. राजेंद्रप्रसाद घटना समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. प्रत्येक राज्यातील गणमान्य लोक, अभ्यासक, विद्वान त्यात होते. या सगळ्यांनी विचारविनिमय करून घटना तयार केली. असेही होऊ शकले असते की, पूर्ण घटना तयार करण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकर यांच्यावर असती तर कदाचित राज्यघटना फार वेगळी राहू शकली असती. डॉ. आंबेडकर स्वत: पक्के लोकशाहीवादी होते. त्यामुळे शक्य आहे की, त्यांना हव्या असलेल्या सार्याच बाबी राज्यघटनेत समाविष्ट झाल्या नसाव्यात. महत्वाचे म्हणजे घटना कशासाठी आहे? भारतीय समाजाच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठीच ना? तो उद्देश पूर्ण होतो आहे का? नसेल होत तर त्याची कारणे काय? त्या संदर्भात घटनेचा विचार होणे, यात गैर काय? आपण आपले वडिलोपार्जित जुने घर पाडून त्या ठिकाणी पुन्हा नवीन बांधतोच ना? असे करणे याचा अर्थ आपल्या पूर्वजांचा अवमान, अनादर वा उपेक्षा असा होत नाही. उलट त्यांच्यामुळेच आपण आज ताठ मानेने उभे आहोत अशीच आपली भावना असते. समाज ही एक जीवंत, प्रवाही गोष्ट आहे. त्यासाठी आवश्यक अशा गोष्टी नव्याने उभ्या करणे, जुन्या गोष्टींचा आढावा घेणे, जुन्यातील काय टाकून द्यायला हवे, काय ठेवायला हवे याचा विचार करणे हे सारे जिवंतपणाचे आणि प्रवाहीपणाचेच लक्षण आहे. त्यात डॉ. आंबेडकरांच्या महानतेबद्दल मनात किंतुही येऊ देण्याचे काहीच कारण नाही.
मित्रांनो, संवाद बराच लांबला. पण आज खरेच तुमच्याशी मोकळेपणे बोलावेसे वाटले. माझा माणसावर आणि त्याच्यातील चांगुलपणावर निरपेक्षपणे पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच तुमच्याशी मनातलं एवढ सारं बोललो. काही कमीअधिक लिहिले असेल तर मोठ्या मनाने माफ कराल अशी आशा करतो. तरीही शेवटी आग्रहाची विनंती करतो की, जे काही बोललो त्यावर गांभिर्याने विचार करावा.

- श्रीपाद कोठे
नागपूर,
सोमवार, २२ ऑगस्ट २०११

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

बेशरमच नव्हे मूर्खही

गेल्या महिन्यात जगात एका नवीन गोष्टीची भर पडली. ती गोष्ट म्हणजे `बेशरम मोर्चा' उर्फ `slut walk '. आता बेशरमपणा ही काही अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही. पण या बदलत्या जगात किंवा असे म्हणता येईल की, बदलाचा रोग जडलेल्या जगात आता तीही अभिमानाची गोष्ट ठरू पाहते आहे. अर्थात थटटेवारी न्यावा असा हा प्रकार नक्कीच नाही. याचे कारण त्या मोर्चामागील हेतू. स्त्रियांवरील बलात्कार आणि छेडखानी याविरुद्धचा हा आक्रोश होता. कमी कपडे घालून स्त्रिया रस्त्यावर आल्या आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महिला वर्गाचे तोकडे कपडे घालणे बलात्कारांसाठी कारणीभूत आहे, अशा आशयाची टिपण्णी एका पोलिस अधिकार्याने केली आणि त्याच्याशी असहमती दर्शवण्यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. तरीही एक गोष्ट आग्रहाने नमूद करायला हवी की, हा `बेशरम मोर्चा' हा शुद्ध मूर्खपणा आहे. या प्रकाराची सुरुवात सुदूर पश्चिमेतील कानडात झाली. हे मात्र बरे झाले. कारण महिलांच्या परिधानाची चिंता व चर्चा केवळ भारतापुरती मर्यादित नाही हे त्यातून स्पष्ट झाले. या प्रकाराला विरोध करणार्यांचा आता `संस्कृति रक्षक' म्हणून उपहास करणे बंद व्हायला हरकत नाही. हा phenomenon वैश्विक आहे हे स्पष्ट झाले.
या मोर्चात सहभागी झालेल्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. त्या सार्याचा गोषवारा म्हणजे, `महिलानी कमी कपडे घातले म्हणून बलात्कार होतात हे चूक असून पुरुषांची मानसिकता त्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे आम्ही कमी कपडे घातले तर कोणाला त्यावर आक्षेप का असावा?' यात दोन गोष्टी समाविष्ट आहेत. एक म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार आणि दूसरी म्हणजे कमी कपडे घालणे. खरे म्हणजे या दोन्ही गोष्टींचा परस्परांशी फारसा संबंध नाही. (बुरख्याचे प्रचलन असलेल्या देशांमध्येही बलात्काराचे गुन्हे होतातच.) संबंध नाहीच असे मात्र नाही, पण फारसा नाही हे अगदी खरे. परंतु कमी कपडे घातल्याने अत्याचार होतात असे म्हणणारे जेवढे वेडसर तेवढेच, महिलांवरील अत्याचारासाठी पुरुषी मानसिकता कारणीभूत असल्याने आम्ही कमी कपडे घालू, असा युक्तिवाद करणारेही वेडसरच. महिलांवरील अत्याचार (खरे तर कोणावरीलही अत्याचार, म्हणजे महिला- पुरुष- दलित- ब्राम्हण- मालक- नोकर- माणूस- पशु पक्षी- निसर्ग- अगदी कोणावरीलही) समर्थनीय होऊ शकत नाही, मान्य होऊ शकत नाही. अत्याचार हा अत्याचारच. तो असभ्य, असंस्कृतच म्हणावा लागेल. मग बलात्कार त्याला अपवाद कसा? खरे तर बलात्कार ही एक विकृतीच म्हटली पाहिजे. पुरुषच बलात्कार करतात हे तरी खरे आहे का? स्त्रियांनी केलेल्या बलात्कारांची चर्चा होत नाही, मुळात समाज तो प्रकार असू शकेल असेही मान्य करीत नाही. पण म्हणून तसे घडतच नाही असे समजणे हे आपली समज आणि जाण किती कच्ची आहे तेच दाखवून देणे आहे. पुरुषी मानसिकता, पुरुषी मानसिकता म्हणून ओरडा करताना एका गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. ती म्हणजे, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज ऊठवणे, संघर्ष करणे, लढा देणे यात पुरुषवर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी असतो. थोड्या गमतीदार पद्धतीने (म्हणजे उथळ नव्हे) या गंभीर गोष्टीचा विचार करायचा तर, एकूण जागतिक लोकसंख्येच्या किती प्रमाणात बलात्कार होतात? बहुसंख्य पुरुष संयमित, विचारी आहेत हे नाकारण्यात काय हशील आहे? बलात्कारापेक्षा स्त्री-पुरुषांचे सुखी सहजीवन प्रचंड मोठ्या प्रमाणात जगात विद्यमान आहे. या सहजीवनाला तडे जाण्याचे प्रमाण जगभर वाढत आहे हे मान्य करूनही वास्तव बदलत नाही. बलात्कार होतात म्हणून स्त्रियांनाच का मर्यादा पाळायला लावतात? पुरुषांना का नाही उपदेश करत? यासारखा तर बालिश प्रश्न नसेल. कोणता समाज, कोणता कायदा, कोणता धर्म, कोणती रूढी परंपरा बलात्कार करा म्हणून सांगतात? उलट इस्लामसारख्या कडव्या धर्मातही बलात्काराला कठोर शासनच सांगितले आहे. सर्वत्र या गुन्ह्यासाठी कडक शासन करण्याचीच प्रवृत्ती दिसून येते. हे कायदेही कथित पुरुषी मानसिकतेच्या पुरुषांनीच केलेले आहेत. इथे हेही लक्षात घ्यायला हवे की, केवळ कायदे, नियम, शिक्षा यांनी यावर नियंत्रण मिळविता येत नाही. त्यासाठी प्रबोधन आणि वातावरणही योग्य हवे.
कामवासना ही काही बाहेरून येणारी गोष्ट आहे का? किंवा ती अमुक ठिकाणी, अमुक वेळी उद्दीपित होईल याचे काही गणित आहे का? तसे नाही हे थोडा विचार केला तरीही लक्षात येईल. कामवासना ही जीवाच्या अस्तित्वाला वेढून असलेली किंबहुना त्या अस्तित्वाचाच एक भाग आहे. ही गरज पूर्ण करण्याची सुरक्षित, सन्मानजनक, न्याय्य पद्धतही माणसाने मानवी सभ्यतेच्या विकासप्रक्रियेत विकसित केली आहे. त्यावर आक्षेप घेणारेही आहेत. त्याप्रमाणे साधकबाधक चर्चाही वेळोवेळी चालत असतात. मात्र बलात्कार होतो त्यावेळी केवळ कामवासनेची पूर्ति हा एकच उद्देश असतो काय? खरे तर त्यापाठची मानसिकता ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. निराशा, उद्वेग, बदल्याची भावना, सूड, वैफल्य, कोंडी, संताप या अणि अशा गोष्टीही त्यात प्रामुख्याने असतात. स्त्रीचा उपभोग घेणे म्हणजे आपले वर्चस्व सिद्ध करणे असा विचारही त्यात असतो. अनेक अभ्यासक असेही म्हणतात की, हा मुळात स्त्री व पुरुष यांच्यातील विचार करण्याच्या प्रक्रियेतील फरक आहे. पुरुष स्त्रीचा उपभोग घेउन स्वत:चे श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहतो आणि तिची कोंडी करू पाहतो. तर स्त्रिया स्त्रित्वाचा गैरफायदा घेणे, कोंडी करणे वा अन्य मार्गांनी आपले वर्चस्व सिद्ध करू पाहतात. जगभर या दोन्ही बाबी सर्रास पाहायला मिळतात. हे सारेच मानवी मनाच्या हीनतेचे परिणाम आहेत.
भारतीय तत्त्वज्ञानात तर याचा खूप सखोल विचार केला आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानवी मनाचे (केवळ स्त्री मनाचे, पुरुष मनाचे वा अगदी बाल मनाचेही नव्हे) सहा शत्रू आहेत असेच हे तत्त्वज्ञान सांगते. हे तत्त्वज्ञान सार्याँनाच आपल्या क्षुद्रत्वातून वर यायला सांगते. त्यातच व्यक्तीचे आणि समाजाचेही कल्याण आहे असा या तत्त्वज्ञानाचा दावा आहे. याबाबत दुमत होण्याचेही काही कारण नाही. परंतु आज तर सर्वत्र नेमके या सहा शत्रूचेच उद्दीपन करून सारे व्यवहार सुरू आहेत. त्याचे गोंडस तत्त्वज्ञानही वेळोवेळी मांडले जाते. शिक्षण, अर्थकारण, राजकारण, सामाजिक रीतीरिवाज, संकल्पना, जाहिराती, साहित्य, नाट्य, चित्रपट, वैचारिक प्रबोधन, कौटुंबिक संगोपन या सार्यातूनच माणसाच्या लघुत्वालाच बळ देण्याचे काम होताना दिसते. यापेक्षा वेगळा विचार करणारे उपेक्षित राहतात. कडूनिम्बाचे बी पेरून आंबे खाण्याची स्वप्ने आजचा समाज पाहत आहे. यातून काहीही हाती लागणे कठीण आहे.
महिलांच्या तोकड्या कपड्यांचा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. तोकडे कपडे घालणार्या आणि त्याचा आग्रह धरणार्या महिला आजच्या उन्मत्त व उफराट्या सभ्यतेच्या प्रतीक आणि वाहक आहेत. दुसर्याचा विचार करणे म्हणजे मूर्खपणा असे समजणारा सभ्यतेचा हा प्रवाह स्वत:बद्दल मात्र `मनाला वाटेल तसे वागण्याचा आम्हाला अधिकार आहे' असे मानतो. आज महिलांना तोकडे कपडे का घालावेसे वाटतात? आपल्या शरीराचे प्रदर्शन करून लोकांना आकर्षित करण्याची धडपड त्या का करतात? यात शारीर भावनेपेक्षा वेगळे काही असते का? कमी कपडे घालणार्या स्त्रियांमध्ये बुद्धिमान स्त्रिया नसतातच असे नाही. पण आपल्या शरीराचे प्रदर्शन करण्यात कोणती बुद्धिमत्ता आहे? कर्तृत्व गाजवण्यासाठी असे पेहेराव करणे आवश्यक आहे का? सुधा मूर्ति, किरण बेदी, इंदिरा गांधी, सुषमा स्वराज, बचेंद्री पाल, पी. टी. उषा, कृष्णा पाटील, प्रतिभाताई पाटील, किरण शा... अक्षरश: शेकडो नावे घेता येतील. वावरण्याची सोय म्हणावे तर तेही नाही. उलट हे तोकडे कपडे घालून मोकळेपणे धड चालता येत नाही वावरणे तर दूरच.
हे कपडे तयार करणार्याँचाही उद्देश काय असतो? कपडे तयार करताना अंग प्रत्यंगाचे अधिकाधिक दर्शन कसे होईल याचेच प्रशिक्षण दिले जाते. कपड्यातून अंतर्वस्त्रे दिसायला हवीत असे डिझाईन जाणीवपूर्वक केले जाते. अशी बाहेर दिसणारी अंतर्वस्त्रे बाहेरील वस्त्रांपेक्षा महाग असायला हवीत असा या वर्गातील संकेत आणि कटाक्ष असतो. या सार्याचे साग्रसंगीत प्रशिक्षण असते. या सार्यामागे शारीर भावना उत्तेजित करण्यापलिकडे आणखी कोणता विचार असतो? एकीकडे `महिला या काही विकाऊ वस्तू (commodity ) नाहीत असा आक्रोश करायचा आणि दुसरीकडे त्यांना विकाऊ वस्तू करण्याच्या स्पर्धेत कळत नकळत सहभागी व्हायचे. याला बुद्धिमानी म्हणायचे का? पण अशाच पद्धतीने विचार आणि व्यवहार करणारा एक प्रवाह आज जगात आहे. या प्रवाहाला मुक्त लैंगिक संबंध वावगे वाटत नाहीत. पण मुक्त लैंगिक संबंध मान्य असणार्यान्ना काही त्रास नसतो, त्यांची मानसिक, भावनिक, शारीरिक कोंडी होत नाही, त्यांची कुतरओढ वा घुसमट होत नाही, ते पूर्ण स्वतंत्र आणि सुखी असतात असे समजण्याचे कारण नाही. मुक्त लैंगिक संबंध, त्याचे परिणाम, त्यातील चढउतार यावरही आज सर्वत्र विचार आणि लेखन सुरू आहे. त्यातून फार काही साध्य होत नाही, असाच त्या चिंतनाचा सूर आहे. हे सारे फार दूरचे आहे असेही नाही. आपल्या मराठीतील मेघना पेठे यांच्या `नातीचरामी' या कादंबरीचा या संदर्भात उल्लेख करता येईल. प्रश्न आहे सुखी, सन्मानजनक, सार्थक जीवन जगण्याचा. हे जीवन पुरुषांनाही मिळाले पाहिजे आणि स्त्रियांनाही. `मी'चा जास्तीत जास्त संकोच करणारी आधुनिक सभ्यता आणि त्याचे प्रतिक असणारे तोकडे वा विक्षिप्त कपडे (स्त्रियांचे आणि पुरुषांचेही ) सार्यांनाच हवे असणारे सुखी, सन्मानजनक, सार्थक जीवन उत्पन्न करू शकत नाहीत.
राहता राहिला प्रश्न हा बेशरम मोर्चा काढणार्या महिलांच्या भावनांचा. दोन उदाहरणांचा केवळ उल्लेख यासाठी पुरेसा व्हावा. ज्या बलात्काराच्या व स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे या महिला अस्वस्थ झाल्या त्याच घटनांनी या जगात दोन महान गोष्टींना जन्म दिला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या व बलात्काराच्या घटनांनीच जिजामातेला अस्वस्थ केले होते. अन् तिने शिवाजी घडवला. वर्धेच्या मावशी केळकरांनाही दूर बंगालमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनेच पेटून उठवले आणि त्यांनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. शिवाजी आणि राष्ट्र सेविका समिती आज सार्या जगापुढे आहेत. समस्त स्त्री जातीला त्यांचा आधार आहे. जिजामातेने आणि मावशी केळकरांनी `बेशरम मोर्चा' काढला नाही. पण इतके सारे शहाणपण या बेशरम महिलांना हवे आहे का? त्यांना स्त्रियांची काळजी अधिक आहे की आपल्या तोकड्या कपड्यांची?

- श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार, ६ ऑगस्ट २०११

शनिवार, ३० जुलै, २०११

संसदीय व्यवस्था आणि गांधीजी

अन्ना हजारे व रामदेवबाबा या नावांनी आणि त्यांच्या आंदोलनांनी सध्या देशात खळबळ निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षात सामाजिक आंदोलनातून न दिसणारा युवा वर्ग, संपन्न वर्ग देखील यात सहभागी होत आहे. रुढ़ अर्थाने पददलित समजला जाणारा वर्गही यात स्वत:ची ती पारंपरिक ओळख दूर ठेवून देशाचा एक नागरिक म्हणून सहभागी होत आहे. हेही एक चांगले चिन्ह आहे. या आंदोलनांनी अनेक चर्चा, वाद जन्माला घातले आहेत. त्यातील एक महत्वाचा आणि मूलभूत वाद म्हणजे संसद सर्वोच्च की अन्य एखादी व्यवस्था. काही वर्षांपूर्वी न्यायालये सक्रिय झाली तेव्हाही ही चर्चा सुरू झाली होती. पण लोकशाहीच्या दोन स्तंभांमधीलच हा वाद असल्याने ते पेल्यातील वादळ ठरले. खरे तर लोकशाहीच्या चार स्तंभांची ही कल्पना कोणाची; ती कशी रुजली माहीत नाही, पण चार स्तंभांचा विचार करताना मूळ `जन' स्तंभाची मात्र उपेक्षा होत होती. जनता हाच खरे तर मूळ स्तंभ आहे आणि अन्य सारे स्तंभ त्यावरच उभारले जायला हवेत याचा विसर पडला होता. आता मात्र हा `जन' स्तंभ पेटून उठला आणि त्याचे चटके संसद व कार्यपालिका या दोन स्तंभांना बसू लागले आहेत. न्यायपालिका व प्रसार माध्यमे हे दोन स्तंभ अजून तरी या वादळापासून दूर आहेत, पण असेच चालू राहिल्यास त्या दोन स्तंभांनाही हादरे बसल्याविना राहणार नाहीत.
या पार्श्वभूमीवर अनेक मूलभूत गोष्टींचा विचार होण्याची गरज आहे. या दृष्टीने संसदेबद्दलचे गांधीजींचे मत काय होते हे समजून घेणे उपयुक्त ठरेल. सुमारे १०२ वर्षांपूर्वी म्हणजे १९०९ साली गांधीजींनी आपल्या `हिंद स्वराज' या पुस्तकात सांसदीय पद्धतीविषयी आपली स्पष्ट मते मांडलेली आहेत. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता. येथे कोणतीही व्यवस्था नव्हती. पण इंग्रजी राजवटीमुळे त्यांच्या व्यवस्थांविषयी सुप्त आकर्षण भारतीयांच्या मनात निर्माण झाले होते. त्यातीलच एक होते इंग्लंडचे पार्लमेंट.
इंग्लंडमधील संसदेविषयी गांधीजी म्हणतात, `तुम्ही ज्याला पार्लमेंटची माता म्हणता ते इंग्लंडचे पार्लमेंट वांझोटे आहे आणि वेश्या आहे. आजपर्यंत पार्लमेंटने आपण होउन एक सुद्धा चांगले काम केलेले नाही. त्याच्यावर बाहेरून दडपण आणणारे कोणी नसेल तर ते काहीच करणार नाही. सभासद पगार न घेता, म्हणजेच लोककल्याणाकरिता तेथे जातात असे झाले पाहिजे. लोक स्वत: शिक्षित म्हटले जातात. तेव्हा ते चूक करणार नाहीत असे आपण समजले पाहिजे. अशा पार्लमेंटकडे अर्ज पाठवण्याचे काय कारण? त्यावर दडपण आणण्याचे काय कारण? त्या पार्लमेंटचे काम इतके सरळ असले पाहिजे की, दिवसेंदिवस त्याचे तेज अधिकाधिक पडावे आणि लोकांवर त्याचा परिणाम होत जावा. त्याच्याऐवजी एवढे सर्वच जण मान्य करतात की, पार्लमेंटचे सभासद दांभिक आणि स्वार्थी आढळतात. प्रत्येक जण आपल्या पोळीवर तूप ओढून घेतो. केवळ भीतीमुळेच पार्लमेंट काही काम करते. आज केले ते उद्या रद्द करावे लागते. एकही गोष्ट आजपर्यंत पार्लमेंटने निकालात काढली आहे असे उदहारण आढळत नाही. मोठ्या प्रश्नांची चर्चा पार्लमेंटात चालू असेल तर त्यावेळी सभासद हातपाय ताणून बसतात किंवा बसल्या बसल्या डुलक्या घेतात. त्या पार्लमेंटात सभासद असा आरडाओरडा करतात की ऐकणारे त्रस्त होऊन जातात. एक महान लेखक कार्लाइल याने त्याला `जगाचा बडबडखाना' (`A talking shop of the world') असे नाव दिले आहे. सभासद ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाला विचार न करता मत देतात, तसे द्यायला ते बांधलेले असतात. त्यात कोणी अपवाद म्हणून निघाला तर त्याची शंभर वर्षे भरलीच समजा. जितका वेळ आणि पैसा पार्लमेंट खर्चते तितका वेळ व पैसा जर काही थोड्या चांगल्या माणसांना मिळाला तर लोकांचा उद्धार होईल. हे पार्लमेंट लोकांचे एक खेळणेच आहे, आणि हे खेळणे लोकांना फार खर्चात टाकते. हे फक्त माझे स्वत:चे विचार आहेत असे तुम्ही समजू नका. मोठमोठ्या विचारवंत इंग्रजांनी असे विचार मांडले आहेत. एका सभासदाने तर असे म्हटले आहे की, पार्लमेंट धार्मिक वृत्तीच्या माणसांच्या लायकीचे राहिलेले नाही. दुसर्या एका सभासदाने पार्लमेंट हे मूल (baby ) आहे असे म्हटले आहे. मूल हे सदोदित मूलच राहिलेले तुम्ही कधी बघितले आहे काय? आज सातशे वर्षांनंतर सुद्धा जर पार्लमेंट मूलच राहिले असेल तर ते मोठे होणार केव्हा?'
`तुम्हाला माझे विचार एकदम मान्य होणार नाहीत. पार्लमेंटला मी `वेश्या' म्हटले तेही बरोबर आहे. त्याचा एक कोणी धनी नाही. त्याचा धनी एक कोणी होऊ शकत नाही. पण माझ्या म्हणण्याचा भावार्थ इतकाच नाही. जेव्हा त्याचा धनी कोणी होतो - उदाहरणार्थ पंतप्रधान- तेव्हासुद्धा पार्लमेंटाची चालचलणूक चंचल राहते. जशी दुर्दशा वेश्येची होते तशी पार्लमेंटची होते. पंतप्रधानाला पार्लमेंटची पर्वा नसते. तो आपल्या सत्तेच्या तोर्यात असतो. आपल्या पक्षाची जीत कशी होईल इकडेच त्याचे सारखे लक्ष लागलेले असते. पार्लमेंटने योग्य काम करावे हा विचार त्याच्या मनात क्वचितच असतो. आपल्या पक्षाला बळकटी आणण्याकरिता पार्लमेंटाकडून नाना कामे तो करवून घेत असल्याची उदाहरणे वाटेल तेवढी सापडतात. या सर्वांचा विचार केला पाहिजे.'
`मला काही पंतप्रधानांचा द्वेष नाही. पण अनुभवाने मला असे दिसून आले आहे की, त्यांना खरे देशाभिमानी म्हणता येणार नाही. लौकिक अर्थाने ज्याला आपण लाच म्हणतो ती ते उघडपणे घेत-देत नाहीत म्हणून त्यांना प्रामाणिक म्हणायचे असले तर खुशाल म्हणावे पण त्यांच्याकडे वशिला पोहोचू शकतो. ते इतरांकडून काम करवून घेण्याकरिता पदव्यांची वगैरे लाच पुष्कळ देतात. शुद्ध भाव आणि शुद्ध प्रामाणिकपणा त्यांच्यात नसतो, असे मी छातीठोकपणे म्हणू शकतो.'
याच प्रकरणात गांधींनी पुढे जनतेचे प्रबोधन करणार्या वृत्तपत्रांचीही चर्चा केली आहे. या प्रकरणाचा शेवट करताना त्यांनी एक इशारा दिला आहे. ते म्हणतात- `जर हिंदुस्तान इंग्रज लोकांची नक्कल करू लागेल, तर त्याचा सर्वनाश होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे.' या सार्या चर्चेचा समारोप करताना त्यांनी निष्कर्ष काढला आहे की, हा सारा यूरोपीय सभ्यतेचा परिणाम आहे. संसदीय व्यवस्था हीदेखील या सभ्यतेचीच देणगी आहे. ही सभ्यता नुकसानकारकच आहे, असे मत गांधीजींनी ठामपणे मांडले आहे.
भारतात संसदीय व्यवस्था अस्तित्वात येण्यापूर्वी सुमारे ४१ वर्षे आधी गांधीजींनी ही मते मांडली आहेत आणि भारतातील संसदीय व्यवस्थेला ६१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यातील कानामात्राही बदलावा असे आपल्याला वाटू नये, इतके विलक्षण द्रष्टेपण गांधीजींच्या या विचारात पाहायला मिळते. गांधीजींनी इंग्लंडमध्ये राहूनच बारिस्टर पदवी प्राप्त केली होती. कायदा, राजकीय व्यवस्था, निवडणुका, समाजजीवन, वृत्तपत्रे वगैरेची त्यांना पूर्ण माहिती व जाणीव होती आणि तरीही त्यांनी ही परखड मते मांडली होती. आजचे राजकारण, राजकीय व्यवस्था, राजकीय पक्ष, संसद आणि समाजाची स्थिती पाहताना व त्यावर विचार करताना गांधी दीपस्तंभासारखे उभे राहतात आणि साकल्याने विचार करणारी भविष्यवेधी प्रज्ञा समाज पूर्णपणे गमावून बसला आहे का असा प्रश्न उपस्थित करून जातात.

- श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार, ३० जुलै २०११

शनिवार, २३ जुलै, २०११

प्रतिनिधित्व

छोट्या पडद्यावरील एका चर्चेत एक मुद्दा मांडला गेला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही हिन्दू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हा मुद्दा मांडणारे प्रतिनिधि राजकीय पक्षांचे होते आणि गैर राजकीय विश्लेषक देखील. हा मुद्दा मांडणारे कोणाचे आणि किती लोकांचे प्रतिनिधित्व करतात? या महान विचारवंतांनी हाक दिल्यावर ५-५० लोक तरी येतात का? पण हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही एक प्रश्न उरतो की, प्रतिनिधित्व कसे समजून घ्यायचे. राजकीय पक्ष आणि त्यांना मिळणारी मते एवढा एकच मापदंड आहे का? आणि तोही किती खरा आहे? खरे तर तो फसवा आणि खोटाही आहे. फसवा एवढ्यासाठी की, मुळात मतदान होते ५० टक्क्याच्या आसपास. हे मतदान करणार्यांमध्ये विचारपूर्वक मतदान करणारे किती? निरक्षरता, विचारहीनता, देश; समाज; ध्येयधोरणे याविषयीची प्रचंड अनभिज्ञता, पैसा, अन्य प्रलोभने, धाक, गुंडगिरी या सार्याचं विश्लेषण करून काय हाती लागेल? आणि तरीही एखादा पक्ष, त्या पक्षातील नेत्यांचे कोंडाळे या देशाचे प्रतिनिधित्व करून त्याच्या स्वच्छतागृहांपासून परराष्ट्र व्यवहारापर्यंत सार्या गोष्टींचे नियमन करणार. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती? त्याच्यात काही बदल करायचे असतील तरी मग पुढील निवडणुकीपर्यंत वाट पाहा. म्हणजे तोवर बट्याबोळ करायला ते मोकळेच आणि त्या बट्याबोळाची किंमत चुकवायची कोणी? सर्वशक्तिमान जनतेने...!!! नाही तर रुळावरून उतरलेली गाडी रुळावर आणायला न्यायव्यवस्था, समित्या, चौकशा आहेतच. त्यांचे काम होत नाही तोवर पुन्हा निवडणुका... तमाशाला अंत नाही. १९४७ साली देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाल्यापासून एकदाही या देशात खर्या अर्थाने देशाचे, जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सरकारच आले नाही. अगदी राजीव गांधी यांना ४०० च्यावर जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्या तेव्हाही नाही.
अशा प्रकारचे प्रतिनिधित्व शक्य आणि योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. अनेक मुद्दे येतील, अनेक गोष्टींचा खल करावा लागेल. पण असा मुळातून विचार करण्याची तयारी कोणाची आहे? विविध राजकीय पक्ष, नोकरशाही, जातीपातीचे, भाषांचे, छोट्या मोठ्या विषयांचे गटतट, पत्रकार, विचारवंत, चिंतक, लेखक, साहित्यिक कोणीही यासाठी तयार नाहीत. जे काही चिंतन, विचार होतो तो जागच्या जागेवर चालणार्या कदमतालसारखा. मुळातून काहीच नाही. हितसंबंधांचे जाळे कल्पनेच्या पलिकडे विणले गेलेले आहे. अगदी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांचेही हितसंबंध आपसात गुंतलेले असतात. बाकीच्यांची बातच सोडा. अशा प्रकारचा काही मुद्दा मांडणे म्हणजे घटनाविरोधी कृत्य, देशद्रोह, राष्ट्रद्रोह वगैरे नाही हेदेखील शांत चित्ताने समजून घ्यायला हवे. आणखीही एक मुद्दा म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच सारे काही असे समजण्याचा. राजकारण, राजकीय पक्ष, सत्ता, त्यांचे करणे किंवा बोलणे म्हणजेच संपूर्ण समाज, देश, त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमान...!!! त्याचे सारे क्रियाकलाप. या अतिशय गचाळ मनोवृत्तीतून आपण बाहेर पडणार आहोत की नाही कधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिन्दू समाजाचे प्रतिनिधित्व करतो की नाही याकडे या दृष्टीने आणि या पार्श्वभूमीवर पाहायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश वा अपयश असे समजणे हा शुद्ध निर्बुद्धपणा आहे. पण राजकारणाची काविळ झालेल्या आपल्या मन-बुद्धीला हे पटणेही कठीण आहे. केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये संघाचे भरपूर काम आहे. केरळमध्ये तर गेल्या वर्षी १ लाख पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्याला सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत उपस्थित होते. इ.स. २००६ साली श्री. गुरूजी जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण केरळ प्रांतात संघाच्या घोष विभागाचा एक अनोखा कार्यक्रम झाला होता. त्याचे नाव होते राष्ट्र रक्षा पथसंचलन. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक केरळ प्रांतातीलच होते. त्यात सहभागी झालेली जनता केरळचीच होती. त्यासाठी जे जे सहकार्य लागले ते केरळीय जनतेनेच केले. असे असूनही तेथे भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार वा खासदार नाही. मग संघ केरळचे काहीच प्रतिनिधित्व करीत नाही असे म्हणायचे का? आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो शाखा आहेत. सुमारे दीड लाख विविध सेवा प्रकल्प आहेत. संघ प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि त्या विचारांशी बांधिलकी बाळगणार्या सुमारे तीन डझन देशव्यापी संघटना आहेत. त्यात विद्यार्थ्यांपासून शेतकर्यांपर्यंत, कामगारांपासून कलाकारांपर्यंत समाजाच्या सगळ्या वर्गातील आणि स्तरातील लोक आहेत. त्यात सातत्याने विविध मुद्यांचा खल होत असतो, विचारमंथन होत असते. कार्यक्रम होत असतात.
एकूण समाजासोबतच हिन्दू धर्म म्हणून विचार केला तरीही; विविध शंकराचार्य, अन्य मठ, मठाधीश, पीठे, पीठाधीश, वारकरी, जैन, शिख, बौद्ध आदी संप्रदाय, लाखो मठ, मंदिरे यांच्याशी संघाचा संपर्क आहे. त्यांना संघ अस्पृश्य नाही. संघ वा संघ परिवारातील कार्यक्रमांना त्यांची उपस्थिति असते. त्यांचा सहभाग आणि सहयोगही असतो. हे सारे अक्षरश: मोजदाद करता न येण्यासारखे आहे. भारतीय मजदूर संघ असो वा विद्यार्थी परिषद त्या त्या क्षेत्रातील त्या आज देशातील सगळ्यात मोठ्या संघटना आहेत. हिन्दू समाजातील अस्पृश्यतेसारख्या रुढी घालवण्यासाठी संघाने विविध मार्गांनी आणि अंगांनी जे बहुमुखी व भरीव काम केले आहे ते तर अद्भुत आहे. देशातील इतर कोणत्याही राजकीय अथवा गैर राजकीय संघटनेपेक्षाही संघ आज अधिक प्रमाणात आणि अधिक खोलवर पसरला आहे, रुजला आहे. निर्विवादपणे संघ हिंदूंचा, या समाजाचा, या देशाचा एक सशक्त, प्रबळ प्रतिनिधि आहे. तरीही संघ असा दावा करीत नाही की तो एकमेव प्रतिनिधि आहे आणि हे लक्षणीय आहे. संघाचा पाया किती मजबूत आहे आणि संघ किती जमिनीवर राहून विचार करतो याचेच हे द्योतक आहे. पण लक्षात घेतो कोण?
प्रतिनिधित्व या विषयाच्या अनुषंगाने आणखीही एका मुद्याचा विचार करायला हवा. एखादा निर्णय घेताना वा एखाद्या गोष्टीचा विचार करताना प्रतिनिधित्व ही एकच गोष्ट सर्वोच्च महत्वाची आहे का? खरे तर शेकडो वर्ष आधीच संत तुकारामांनी याचे नि:संदीग्ध उत्तर दिले आहे. ते म्हणतात-
`सत्य असत्यासी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता'
परंतु एवढे सत्यान्वेषी मन, एवढी पारदर्शी प्रज्ञा, मुख्य म्हणजे निखळ प्रामाणिकता आणि स्वार्थरहितता आपल्याकडे किती शिल्लक आहे?

-श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार दि. २३ जुलाई, २०११