रविवार, ६ एप्रिल, २०१४

श्राद्ध

`मटा पुरस्कार' कार्यक्रम छोट्या पडद्यावर पाहिला. पुरस्कारांच्या मध्ये जे छोटे छोटे कार्यक्रम सादर केले जातात, त्यात स्वर्गातील एक दृश्य मराठीतील आघाडीच्या कलावंतांनी सादर केले. सुधीर भट, विनय आपटे आणि भक्ती बर्वे स्वर्गात एकमेकांना भेटतात आणि त्यांच्यात होणाऱ्या गप्पा असं ते पाचेक मिनिटांचं सादरीकरण. त्याच त्या नाचगाण्यांपेक्षा निराळं आणि छान वाटलं. हे जग सोडून गेलेल्या कलावंतांना श्रद्धांजली वाहण्याची एक निराळी रीत. असे अनेक कलावंत असतात ज्यांचा ठसा खोलवर उमटलेला असतो. तो लवकर विसरला जात नाही. निरनिराळ्या कारणांनी, प्रसंगविशेषी त्यांची आठवण निघते. जुन्या आठवणी- किस्से, किंवा अमुक व्यक्ती आता असती तर कशी वागली बोलली असती, तिने कसा व काय विचार केला असता, किंवा आता ती काय करीत असेल असाच साधारण चर्चेचा, आठवणींचा सूर असतो. या सादरीकरणातही तसंच सारं होतं. माणूस स्मरणरंजनात्मक प्राणी आहे हे अशा वेळी पुन्हा अधोरेखित होतं. माणूस सोडून अन्य कोणी असं स्मरणरंजन करतं किंवा नाही ठाऊक नाही. पण माणूस मात्र ते करतो आणि ते स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. ते योग्य किंवा अयोग्य नसतंच. जे भूतकाळात रमतात त्यांना ते आवडतं, छान वाटतं. ज्यांचा पिंड वेगळा ते ठीक ठीक म्हणून पुढे जातात. अशा आठवणी गेलेल्या माणसाला समजत असतील का? आपल्या अशा आठवणी काढल्या जाताना पाहून त्यांना काय वाटत असेल? त्यांचे कुठे अस्तित्व असेल तर त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, इच्छाआकांक्षा, गरजा तशाच असतील का? या सगळ्या प्रश्नांना खरे तर काही अर्थ नाही. कारण त्यांना समाधान करू शकतील अशी उत्तरेच नाहीत. पण ते सगळं होतं तसंच असेल किंवा होतं तसंच राहावं असं मागे राहिलेल्यांना मात्र वाटत असतं. मानवी मनाची कदाचित ही स्वाभाविक भावना असावी. जिवंत असणाऱ्यालाही वाटतं आपला विसर पडू नये आणि जाणाऱ्याची आठवण काढणं, मागे राहणाऱ्यालाही समाधान आणि शांती देऊन जातं. दोघांनाही परस्परांची खबर असणे नसणे हा संदिग्ध मुद्दा आहे. पण या भावना स्वाभाविक म्हटल्या पाहिजेत. सगळ्या समाजात प्रचलित असलेल्या श्राद्ध पद्धती याचाच भाग म्हणायला हरकत नाही. मानवी मनाची ही मूळ व स्वाभाविक भावना लक्षात घेऊनच ती प्रेरक शक्ती ठरू शकते असा विचार जाणत्यांनी केला असेल आणि म्हणूनच उपदेश केला असेल, `मरावे परी कीर्तीरूपे उरावे'. मृत्युनंतर सारं काही संपतं हे किमान या संदर्भात तरी खरं नाही म्हणता येणार. ज्याने जेवढी माया लावून ठेवली असेल तेवढा तो आठवला जातो हे खरं.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार ६ एप्रिल २०१४