सोमवार, २६ डिसेंबर, २०११

नवअस्पृश्यता

राजकारणी आणि प्रसार माध्यमे मिळून सध्या आपले छान मनोरंजन करीत आहेत. म्हटले तर मनोरंजन समजून हे सारे सोडून देता येण्यासारखे आहे. पण तेवढेच चिड आणणारे आहे आणि एकूणच सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी वाईट परिणाम करणारे आहे. त्यामुळे ते सोडून देणे हितावह नाही. आजचे ताजे उदाहरण म्हणजे अण्णा हजारे आणि नानाजी देशमुख यांच्या संबंधांवरून निर्माण झालेला वाद. नानाजी देशमुख आणि अण्णा हजारे यांच्या संबंधांची चर्चा सुरू होताच दिग्विजय सिंह यांचेही नानाजी देशमुख यांच्या सोबतचे छायाचित्र प्रकाशात आले. कदाचित यामुळे या मुद्यावरील राजकीय लढाई थांबेल वा पेटेल. परंतु सगळ्यांनी विचार करण्यासारख्या गोष्टींचा कदाचित उल्लेखही होणार नाही. आपण नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करीत आहोत का, हा मुख्य प्रश्न आहे. अमक्याने तमक्याशी बोलू नये, तमक्याने अमक्याला भेटू नये, याने त्याच्याकडे जाऊ नये, याने त्याच्याशी संबंध ठेवू नये. राजकीय पक्ष वेगळे असले म्हणजे दोन व्यक्ती परस्परांचे शत्रूच असायला हवेत का? वैचारिक मतभिन्नता असली म्हणजे एकमेकांना पाण्यातच पाहायला हवे का? राजकारण, मतभिन्नता, वैचारिक मतभेद या पलिकडे जाऊन पाहण्याची, विचार करण्याची, समजून घेण्याची सवय आम्ही व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणूनही लावून घेणार आहोत की नाही? की केवळ स्वत:च्या बौद्धिक पुढारलेपणाचे ढोल पीटत वारंवार आपली क्षुद्रताच दाखवून देणार आहोत?

कोण होते नानाजी देशमुख? आजच्या सर्वच राजकारण्यानी ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं असे एक लोकोत्तर पुरुष होते नानाजी. ऐन तारुण्यात लग्न, संसार, स्वत:चं आयुष्य हे सारं बाजूला सरून समाजाची सेवा करायची हे व्रत त्यांनी स्वीकारलं. आजच्यासारखं सामाजिक कार्याचं व्यावसायीकरण झालं नव्हतं, समाजकार्याची महाविद्यालये नव्हती, एनजीओज नव्हती, युनोचे वा कोर्पोरेट फंड नव्हते; सामाजिक कार्य म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखं होतं; त्या काळात त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं माध्यम निवडलं होतं. एका विशिष्ट वळणावर संघाने ठरवलं की समाजाच्या सर्व क्षेत्रात आपल्या विचाराला अनुकूल वातावरण तयार व्हायला हवं, तशी कामं उभी करायला हवी. राजकारण हे त्यातील एक क्षेत्र. या क्षेत्रात संघाने म्हटलं म्हणून नानाजी सक्रिय झाले. स्वत:चं एक आगळ स्थान निर्माण केलं. जयप्रकाश नारायण यांच्यावर जेव्हा पोलिसांनी लाठ्या चालवल्या तेव्हा त्या नानाजींनी स्वत:वर झेलल्या.

ज्यावेळी आपल्या या महान लोकशाहीचा गळा घोटण्यात आला तेव्हा झालेल्या अभूतपूर्व संघर्षाचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांचं होतं, परंतु त्या संपूर्ण संघर्षाचं भूमिगत राहून संचालन नानाजी देशमुख यांनी केलं होतं. नानाजी नसते तर आणिबाणी विरुद्धचा संघर्ष यशस्वी झाला असता का, असा प्रश्न पडावा इतकं त्यांचं योगदान मोठं आहे. विविध जाती-धर्माच्या, विचारांच्या, राजकीय झेंद्यांच्या लोकांना एकत्रित आणून संघर्ष करणे अन् तेही भूमिगत राहून, हे खायचं काम नाही. आज जे समाजवादी आणिबाणी विरोधी संघर्षाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जरा इतिहास नीट समजून घ्यावा आणि कृतघ्न होऊ नये. बरे एवढे केल्यानंतरही जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी देऊ केलेले उद्योग मंत्री पद नम्रपणे नाकारून, ६०व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती घेतली. राजकारण हे लाभहानीचं क्षेत्र आहे, संघर्षाचं क्षेत्र आहे. तेही आवश्यक असले तरीही ६०व्या वर्षानंतर त्यातून बाहेर पडून समाजासाठी रचनात्मक कामाला वाहून घेतले पाहिजे असे तत्वज्ञान स्वीकारुन स्वत:ला ग्राम विकासाच्या कार्यात झोकून दिले आणि वयाच्या साठीनंतर तीन दशके त्याच रचनात्मक कामासाठी झोकून देऊन आदर्श कामे उभी केली अन् स्वत:च एक आदर्श होऊन गेले. सत्तेला गोचिडीसारखे चिकटून बसण्याच्या आजच्या राजकीय संस्कृतीत नानाजींच्या जवळ उभे राहण्याचीही पात्रता किती नेत्यांजवळ आहे?

त्यांचं मोठेपण इथेच संपत नाही. राजकारण सोडले तरीही त्यांच्या कामाची दखल म्हणून त्यांना राज्यसभेची खासदारकी देऊ करण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारलीही. परंतु खासदार निधिचा प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी त्यास विरोध केला. एवढेच नाही तर तो निधी नाकारलादेखील. आम्ही खासदार आहोत म्हणून देशाच्या संपत्तीवर असा डल्ला मारण्याला त्यांचा पूर्ण विरोध होता. वास्तविक तो निधी स्वीकारुन स्वत:च्या कामासाठी ते वापरू शकत होते, पण ही खासदार निधीची कल्पना हीच मुळात अनैतिक असल्याने त्यांनी ती स्वीकारली नाही. इतकं शुद्ध व्यक्तिमत्व आज संसदेत आहे का?

अशा नानाजींसोबत जर कोणी काम केलं, त्यांच्याशी चर्चा केली, विचारांचीच नव्हे व्यवहाराचीही देवाण घेवाण केली तर हरकत काय आहे? व्यक्तीगत कामांसाठी, स्वार्थ साधनेसाठी कोणी कोणाची मदत घेतली तर चालते पण सामाजिक कार्यात सहभागिता केली तर ती का चालू नये? प्रियंका गांधी राजीव गांधींच्या मारेकर्यान्ना भेटल्या तर चालते. तिथे त्यांनी काय चर्चा केली वगैरे कळले नाही तरी चालते, पण अण्णा आणि नानाजी भेटले तर चालत नाही!!! संघ आणि संघ परिवार ही या देशातील एक मोठी शक्ती आहे. या देशातील करोडो लोक स्वत:ला संघाचा असल्याचे म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. त्या मार्गाने देशाची, समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. संघाबद्दल दुजाभाव बाळगणार्या लोकांनी, सरकारांनी त्याला चिरडून टाकण्याचे प्रयत्न वारंवार केले. पण या देशाच्या सामान्य शहाणपणाने अन् सुजाण न्यायव्यवस्थेने हे प्रयत्न निष्फळ ठरवले. पण संघाच्या द्वेषाने आंधळे झालेल्यांची मने इतकी विषाक्त आहेत की त्यांना काहीही समजून वगैरे घ्यायचेच नाही. समजले तरी स्वत:चे तुणतुणे थांबवायचे नाही.

संघाचं अस्तित्वही त्यांना सहन होत नाही इतकी टोकाची असहिष्णुता त्यांच्यात आहे. म्हणुनच महात्माजींच्या हत्येत संघाचा काहीही संबंध नाही असा निकाल न्यायालयाने देऊनही गांधी हत्येचा राग मात्र ही मंडळी नित्यनियमाने आळवित असतात. असे करताना आपण न्यायालयाचा अवमान करीत आहोत याचेही यांना भान नसते. न्यायव्यवस्थेचा आदर राखण्यावर प्रवचने मात्र झोडायला हे तयार. सत्तापदे न घेताही, सत्तेचा वापर न करताही समाजासाठी काय करता येऊ शकते याचे अनेक मानदंड संघ परिवाराने, संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उभे केले आहेत. पण ज्यांच्या जगण्याचा उद्देशच मुळी सत्ता, अधिक सत्ता, आणखी अधिक सत्ता आणि पैसा, अधिक पैसा, आणखी अधिक पैसा आहे; त्यांना या सार्याशी काहीही सोयरसुतक नाही. या देशाच्या दुर्दैवाने आज अशांचीच चलती आहे.

- श्रीपाद कोठे, नागपूर
सोमवार, २६ डिसेंबर २०११