नवीन प्रबोधन पर्वाची गरज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. या महामानवाला अभिवादन करतानाच मी ब्राम्हण आहे हे सांगणे मला आवश्यक वाटते. कारण हा लेख वाचून `हा लिहिणारा कोणत्या जातीचा आहे' अशी चर्चा कोणी करण्यापेक्षा ते मला प्रशस्त वाटते. कारण समाजाची मानसिकता आजही जातीनुसार विचार करण्याची आहे. डॉ. बाबासाहेबांसह अन्य अनेक संत, समाजसुधारक, संस्था आदींनीही यासाठी अथक प्रयत्न केले. तरीही अजून परिस्थितीत म्हणावा तसा पालट झालेला दिसत नाही. स्वामी विवेकानंद पाश्चात्य देशातून स्वदेशी परतल्यानंतर श्रीलंकेतील कोलंबो येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि तेथून त्यांची भारतयात्रा सुरु झाली अन हिमालयातील अलमोडा येथे ती समाप्त झाली. या कोलंबो ते अलमोडा यात्रेपासून भारतीय प्रबोधन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर अनेकांनी हे प्रबोधन पर्व अतिशय सशक्तपणे पुढे नेले. हे प्रबोधन पर्व डॉ. आंबेडकर यांच्या निधनाने १९५६ साली संपुष्टात आले. या पर्वातूनच अनेक चळवळी देशभरात उभ्या राहिल्या. त्यांचे सकारात्मक परिणामही झाले. परंतु त्या सार्याचा आढावा घेऊन पुढील प्रबोधनाची सुरुवात मात्र झाली नाही.
जात या गोष्टीचा विचार केला तर सामाजिक वास्तव कसे आहे? प्रत्येक जात आपापला अभिनिवेश घेऊन उभी आहे. दलित चळवळीमध्येच आज मोठे विचारमंथन सुरु झाले आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्म, जागतिकीकरण असे त्याचे विविध पैलू आहेत. मायावतींचा बसपा असो की महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्ष, दोघांनीही आपापल्या पक्षातर्फे निवडणुकीत ब्राम्हणांना काही जागा दिल्या पाहिजेत असे ठरवले आहे. दलितेतर संघटनाही दलितांशी फटकून वागत नाहीत. शंकराचार्यासारखी व्यक्तीही डॉ. आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर जाऊन त्यांना अभिवादन करते आणि दलित नेतेही ठिकठिकाणी गणपती आणि रामनवमी उत्सव साजरे करतात. दलित व ब्राम्हण यांच्याशिवायचा मोठ्या प्रमाणावरील शेकडो जाती जमातीत विखुरलेला बहुजन समाज आपापले रीतीरिवाज, श्रद्धा, अंधश्रद्धा जपत आधुनिक होण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या ५०-१०० वर्षात बदललेली जीवनशैली, अर्थव्यवस्था, आर्थिक हितसंबंध, अर्थकारण, शहरीकरण, जागतिकीकरण, प्रसार माध्यमांचा प्रचार प्रसार आणि प्रभाव यामुळे जातींची तटबंदी काहीशी विस्कळीत झालेली आहे. असे असतानाही जातीची भावना संपुष्टात आली असे मानता येईल का? जातीजातीतील वैमनस्य, परस्पर द्वेष, अविश्वास नाहीसा झालेला आहे असे म्हणता येईल का? याचे उत्तर नकारार्थी आहे. वरवर काहीही दिसत असले तरीही मनात खोलवर रुतलेल्या गोष्टी गेलेल्या तर नाहीतच उलट काही प्रमाणात टोकदार झाल्या आहेत असाच अनुभव येतो. `मी जातीचा विचार करीत नाही' असे कोणी म्हणत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवायला लोक तयार नसतात. atrositi च्या खोट्या तक्रारी ही आज नवीन बाब राहिलेली नाही. त्याचवेळी त्याविरुद्ध उभे राहणारे दलित बंधूही आहेत. दुसरीकडे आरक्षणामुळेच सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत असा ठाम समज बाळगून दलितांचा राग करणारेही आहेत. त्याच वेळी हा राग योग्य नाही असे आग्रहाने सांगणारे सवर्णही आहेत. दलित वा मागासवर्गीय म्हणून अन्याय अत्याचार होण्याच्या घटना आजही घडतात. पण त्याविरुद्ध आवाजही उठवला जातो. अशा घटनांना सामाजिक मान्यता मिळणे आता शक्य नाही. एक प्रकारची fluid situation असल्याचे पाहायला मिळते. ब्राम्हण, बहुजन समाज, दलित या सार्यामध्येच टोकदार द्वेषभावना बाळगणारे आणि सम्यक विचार करणारे आज पाहायला मिळतात.
महिलांच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळते. ५० वर्षापूर्वीची महिलांची स्थिती आणि आजची महिलांची स्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सर्व क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आता तर ३३% आरक्षणाची मागणीही पूर्ण झाली आहे. महिला असल्यामुळे अन्याय होण्याच्या घटना घडत असतातच पण त्यांची सामाजिक मान्यता संपुष्टात आली आहे. महिला असण्याचा, स्त्रीत्वाचा गैरवापर करणार्या महिलांचे प्रमाणही मोठे आहे. पण त्याच वेळी हे योग्य नाही असे मानणार्या महिलाही आहेत. आम्ही कर्तृत्ववान झालो म्हणून आता कुटुंबाचा वगरे विचार करण्याची गरज नाही किंवा आमच्यातील स्वाभाविक ऋजुता समूळ नष्ट केली पाहिजे असे म्हणणार्या महिला आहेत तशाच स्त्रीने सात्विकता जपून, कोमल भावना जपून योग्य ते परिवर्तन घडवले पाहिजे असा आदर्श वस्तुपाठ घालून देणार्या महिलाही आहेत. धर्माच्या बाबतीतही आज हीच परिस्थिती पाहायला मिळते. सगळ्यांनी मिळून मिसळून राहायला हवे असे मनापासून वाटणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा वर्ग सर्व धर्मसंप्रदायात आहे. अगदी रा. स्व. संघ प्रेरित विश्व मंगल गो-ग्राम यात्रेतही मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. त्या यात्रेनिमित्त राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनावर १० लाखाहून अधिक मुस्लिमांनी सह्या केल्या. समारोपाला जाहीर सभेमध्ये ३ मुस्लिम विचारवंत नेते शंकराचार्य आणि सरसंघचालक यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले जगाने पाहिले. एकूणच विविध प्रकारच्या अस्मिता हळूहळू बोथट होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे आणि त्याच वेळी कट्टरताही अनुभवायला मिळते आहे.
गेल्या १५-२० वर्षात अन्यही अनेक प्रश्न समाजात उत्पन्न झाले आहेत. व्यसनाधीनता, उच्छ्रुंखलता, बेछूट आणि बेपर्वा तरुणाई, `मी' सोडून अन्य सार्याबद्दलची अनास्था, उथळपणा; विचार, समजुतदारी, सभ्यता याविषयी नकारात्मक भावना, शेकडो प्रकारचे प्रदूषण. या सार्याच प्रश्नांवर समंजस भूमिका घेणारे लोक सर्व जाती, पंथ, संप्रदाय, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यात पाहायला मिळतात. परंतु तरीही सर्वत्र गोंधळाची स्थितीच दिसून येते. म्हणूनच एका नव्या प्रबोधन पर्वाची आवश्यकता आज जाणवू लागली आहे.
गेल्या शेकडो वर्षातील समाजाची स्थितीशीलता दूर करून त्याच्यात चैतन्य निर्माण करण्यासाठी जी मोडतोड होणे आवश्यक होते ती गेल्या १०० वर्षात झाली आहे. यापुढे नवीन समाज आणि समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने सृजनात्मक प्रबोधनाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या काळात त्याचे सूत्रही समाजापुढे ठेवले होते. नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये भविष्यातील समाजाचे चित्र मांडताना ज्या प्रकारच्या राजकीय पक्षाचे चिंतन त्यांनी मांडले होते ते पुरेसे बोलके आहे. ते विवेचन राजकीय पक्षापुरते असले तरीही त्यांना वेळ मिळाला असता तर त्यांनी त्याचे सामाजिक, आर्थिक, धार्मिक आदी पैलूही नक्कीच उलगडले असते. दुर्दैवाने त्यांनी दलितांसाठी दिलेला लढाच फक्त आग्रहाने पुढे आला. मात्र त्यांच्या कल्पनेतील आणि दृष्टीपुढील समाज हा नक्कीच अतिशय परिपक्व, व्यामिश्र, विविधतेने संपन्न, विचारी, समजूतदार आणि परिपक्व असा समाज होता. दलितांसाठी त्यांनी केलेली आंदोलने हा त्या मार्गावरील एक महत्वाचा टप्पा होता. पण त्यांची दृष्टी तेवढ्या पुरतीच होती असे म्हणणे चुकीचे ठरेल. म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि प्रज्ञा, शील, करूणा या त्रिसूत्रीवर भर दिला. नवीन प्रबोधन पर्व याच त्रिसूत्रीवर आधारित असायला हवे. कारण त्यातच माणसाला माणूस बनवण्याची ताकद आहे. आणि माणूस खर्या अर्थाने माणूस बनल्याखेरीज कितीही व्यवस्था आणि आंदोलने झालीत, कितीही महापुरुष आले आणि गेले तरीही समाज आहे तिथेच राहील. किंबहुना मानवी सहजीवन अधिक नकोसेच होत जाईल. मानवी सहजीवन सुखकारक होण्यासाठी आवश्यक असलेली सहवेदना जागृत करण्याचे काम प्रज्ञा, शील, करूणा ही त्रिसूत्रीच करू शकते. तसे न झाले तर काय होऊ शकते हे आपण आज पदोपदी अनुभवतो आहोतच. या त्रिसूत्रीवर आधारित नवीन प्रबोधन पर्वाची तातडीची गरज आहे याची नोंद या प्रज्ञापुरुषाच्या जयंती निमित्त करणे उचित ठरेल.
-श्रीपाद कोठे, नागपूर.