रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

माफ करा, तुम्हाला राग येईल... पण,

माणसाला ब्रान्डची खूप ओढ असते. दारू, सिगारेटपासून शर्ट-प्यांट आणि मसाल्यांपर्यंतही. औषधे सुद्धा अमुक एका कंपनीची, त्याच नावाची वगैरे हवी असतात. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात आणि समाजाच्या सगळ्याच अंगांना हे कमी अधिक लागू होते. अगदी आध्यात्माचेही ब्रान्ड असतात. मनोरंजन, क्रीडा हेदेखील त्याला अपवाद नाहीत. असे ब्रान्ड ही वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या कारणांनी गरज असते. राजकीय नेत्यांना तर असे ब्रान्डस हवेच असतात. सचिन तेंडूलकर हा असाच एक ब्रान्ड आहे. याचा अर्थ तो चांगला क्रिकेटपटू नाही असा नाही. निर्विवादपणे तो चांगला आणि श्रेष्ठ क्रिकेटपटू आहे. देवदत्त प्रतिभा, अथक परिश्रम आणि देवदत्तच साधेपणा ही त्याची जमेची बाजू आहेच. त्याला नशिबानेही साथ दिली आणि तो एक जीवंत दंतकथा होऊन बसला.

परंतु यात काय मोठेसे? प्रतिभा, परिश्रम आणि साधेपणा या काही दुर्मिळ गोष्टी नाहीत. केवळ तेवढ्यावरून त्याला जेवढे उचलून घेण्यात आले ते न पटण्यासारखे आहे. तो देशासाठी खेळला, त्याने खूप त्याग केला वगैरे तर पोरकट युक्तिवाद आहेत. सचिन देशासाठी खेळला नाही. तो स्वत:साठी खेळला. क्रिकेट हे त्याने स्वत:च्या करिअरसाठी निवडले आणि त्याने त्यात स्वत:ला सिद्ध केले. तो पैसे वगैरे न घेता खेळला नाही. एवढेच नाही तर स्वत:ची महागडी गाडी देशात आणताना त्यावरील कर माफ करण्याची विनंतीही त्याने केली होती. त्याने जी काही कीर्ती, मान्यता, स्नेह मिळवला त्याचा उपयोग देशासाठी केला असेही नाही. सचिन आज एक ब्रान्ड झाला आहे. पण देशापुढील एखादा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा कितपत उपयोग आहे? एखाद्या समस्येच्या संदर्भात जनतेला एखादे आवाहन करण्याची वेळ आली तर सचिन करेल का आणि त्याने तसे आवाहन केले तरी लोक त्याला प्रतिसाद देतील का?

त्याने खूप त्याग केला वगैरे युक्तिवादही केला जात आहे. विशेषत: शनिवारी त्याचा अखेरचा सामना आटोपल्यावर तो स्वत: ज्या पद्धतीने भावूक झाला आणि त्याची पत्नी अंजली देखील ज्या पद्धतीने भावूक झाली ते पाहून सगळ्यांनाच उमाळे आले. प्रश्न त्याच्या वा अंजलीच्या भावूक होण्याचा नाही. जगातील अनेक पती-पत्नी अनेक प्रसंगी असे भावूक होतात. ते सारे खूप खरेही असते. त्यांच्यावर प्रेम करणारे जे असतात त्यांनाही त्यावेळी भरून येते. पण याचा अर्थ त्याने खूप सोसले, त्याग केला वगैरे होत नाही. ज्या गोष्टीवर प्रेम केलं, करिअर केलं ते सोडताना वाईट वाटतंच असतं. खरं तर त्याच्यापेक्षा हजारो पटीने अधिक त्याग लोक करत असतात. अगदी विवेकानंद, गांधीजी, भगतसिंग वगैरे बाजूला ठेवू; पण पोटाची खळगी भरण्यासाठी घरापासून दूर राहावे लागणारे लोक जेव्हा दिवाळी, दसर्याला घरी बायको-पोरांजवळ येऊ शकत नाहीत तेव्हा तो त्याग असतो. तुम्ही-आम्ही सहज आणि सुखाचे आयुष्य जगताना सीमेवर अतिशय कष्टमय जगणारा सैनिक त्याग करीत असतो. स्वत:चं करिअर वगैरे मनातही न आणता दूर कुठेतरी ईशान्य भारतात जाऊन तेथील लोकांसाठी आयुष्य वेचणारा मुलगा-मुलगी त्याग करत असतात. `मी'ला बाजूला ठेवून कुष्ठरोग्यांच्या जखम धुणारे बाबा आमटे त्याग करीत असतात. स्वत:ची डॉक्टरी बंगला, गाडी, बँकजमा यासाठी न वापरता जंगलात जाऊन राहणारे कोल्हे दांपत्य वा बंग दांपत्य हे त्याग करीत असतात. `मी क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही' ही सचिनची कुटुंबियांप्रती भावना असू शकते, पण तो त्याग नाही.

सचिनने लोकांना चार घटका आनंद दिला, थोडा वेळ स्वत:च्या जीवनाचा विसर पाडला. हा विसर केवळ दु:खांचा विसर नव्हता, कर्तव्यांचाही विसर होता. लोक कामधाम सोडून त्याचा खेळ पाहात. तो एक प्रकारचा कैफ होता. सचिनने लोकांना दिलेला आनंद ही केवळ एक झिंग होती. त्याने जे काही दिलं त्याचं आयुष्य किती? २४ तासातच तो छोट्या पडद्यावरून बाजूला झाला आहे. लता-आशाच्या गाण्यांनी जो आनंद दिला आणि पिढ्यानुपिढ्या जन्मापासून मरणापर्यंत करोडो लोकांना जो आधार दिला आणि देताहेत; त्या तुलनेत सचिनने जे दिले त्याची खरंच काही किंमत आहे का? स्वत: अनाम राहून समाजासाठी आणि पुढील पिढ्यांसाठीही भरीव काम करून ठेवणारे अनेक लोक आहेत. ते सचिनपेक्षा निर्विवादपणे श्रेष्ठ होत. कन्याकुमारीला असलेले विवेकानंद शिलास्मारक आणि त्याचे कर्ते एकनाथजी रानडे हे वानगीदाखल एक उदाहरण.

गेल्या काही वर्षात क्रिकेट हा खेळ एक ब्रान्ड म्हणून जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक विकसित करण्यात आला आहे. त्यातील पैसा, लागेबांधे, सट्टेबाजी, राजकारण हे सारे लपून राहिलेले नाही. याच्याच परिणामी मुळात लोकप्रिय असलेला हा खेळ अवास्तव डोक्यावर उचलण्यात आला. योगायोग असा की सचिनने तो स्वत:चं करिअर म्हणून निवडला होता. म्हणूनच सचिनची लोकप्रियता हा तीन घटकांचा एकत्रित परिणाम आहे. क्रिकेट, चांगला खेळाडू आणि ब्रान्ड; हे ते तीन घटक. सचिन दुसर्या खेळात असता तरीही तो चांगलाच खेळाडू राहिला असता. लता मंगेशकर यांनी तर, त्याने आता गोल्फ खेळावे आणि नाव मिळवावे असे म्हटलेच आहे. पण तो अन्य खेळात असता तर एवढी लोकप्रियता त्याला मुळीच मिळाली नसती. अन भारतरत्नही मिळाले नसते. काँग्रेसने प्रचारासाठी केलेली विनंती नाकारणे, लता मंगेशकर यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी व्यक्त केलेली इच्छा, लता मंगेशकर यांचे सचिनप्रेम, राहुल गांधी मैदानात येणे आणि सचिन बाद होणे याचा योगायोग, सचिन ब्रान्डवर स्वार झालेली जनता; अशा विविध कारणांचा संमिश्र परिणाम होऊन सचिनला २०० वा सामना संपताच भारतरत्न जाहीर झाले.

पुढचा ब्रान्ड कोणता राहील कोणास ठाऊक?

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १७ नोव्हेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा