मंगळवार, १८ मार्च, २०१४

उन-सावली

हिवाळ्यात उन लागावं म्हणून उन्हात नेउन ठेवलेल्या कुंड्या माळ्याने आता सावलीत आणून ठेवल्या. हिवाळ्यात कुंड्या सावलीतच राहिल्या असत्या तर झाडे फुलली नसती आणि उन्हाळ्यात कुंड्या उन्हातच राहिल्या तर झाडे कोमेजून जातील किंवा कदाचित मानही टाकतील. झाडं जगायची असतील, फुलायची असतील तर त्यांना उनही हवं आणि सावलीही हवी. खरं तर सगळ्याच गोष्टींचं असंच आहे. पाणी नाही का, झाडांना तेही प्रमाणातच हवे. कमी असले तर झाडे कोमेजणार आणि जास्त झाले तरी नीट वाढणार नाहीत. मुळांशी असलेली माती कोरडी नाही झाली तर मातीचं एअरेशन नाही होणार, झाडाला नायट्रोजन नाही मिळणार; वगैरे वगैरे. मातीला ओलावा हवा, ओल नको. घराच्या भिंतीही ओल आली तर खराब होतात. त्यांचे रंग उडतात, पोपडे पडायला लागतात, अधिक ओल आली तर कुबट वास येऊ लागतो. भिंती ठिसूळ होतात. मुद्दा हा की, ओलावा हवा ओल नको.

आपलं शरीर तरी काय वेगळं आहे? केवळ मऊमऊ मांसाचा गोळा असता तर? कल्पनाही नाही ना करवत? मऊ मांस हवे आणि आधार द्यायला कडक हाडेही हवीतच. वर चिवट असे चामडेही हवे. पोषण मिळावे म्हणून रसही हवेत सगळे. फक्त गोड खाऊन उपयोग नाही. तिखट, आंबट, तुरट, कडू; सगळेच रस हवेत. कर्तृत्वाचे झेंडे फडकवायला उजेड हवा आणि शिणलेल्या शरीराला विश्रांतीसाठी अंधारही हवा. उजेडाविना रंगीबेरंगी फुलांचा आस्वाद घेता येणार नाही आणि अंधाराशिवाय चंद्र-चांदण्यांची शोभा निरर्थक होईल.

पोटच्या गोळ्याला एक क्षण डोळ्याआड न करणारी जन्मदात्री, तो थोडा मोठा झाला की ओरडते, काय सारखा अंगाअंगाशी करतो. जा, जरा मोकळा खेळ थोडा. मुलं सगळ्यांनाच आवडतात, पण मूल हे मुलंच राहिलं तर ते कोणालाही आवडत नाही. जीवनाचं महत्व, सौंदर्य आणि आनंद आहे; तशीच मृत्युचीही आवश्यकता आहे. या जगात मृत्यूच नसता तर किती अनवस्था ओढवली असती, कल्पना करून पहा. विष उतरवण्यासाठीच का होईना, पण विषाचीही आवश्यकता असतेच. दारू वाईटच पण ती व्यसन म्हणून. पण गरज म्हणून? सफाई काम करणारे लोक, शवविच्छेदन करणारे, दहन घाटावर काम करणारे लोक, अतिशय हलाखीची आणि जोखमीची कामे करणारे यांच्यासाठी दारू गरजेची नाही? व्यसन तरी नेहमी कुठे वाईट असतं? वाचनाचं व्यसन, गाण्याचं व्यसन; ही चांगलीच म्हणावी लागतील.

काहीही संघर्ष नसता तर या जगाची प्रगती झाली असती का? बिनासंघर्ष गौरीशंकर चढून जाता येईल का? किंवा प्रशांत महासागर पोहून जाता येईल का? आम्ही व्यायाम करतो म्हणजे काय करतो? आमच्याहून अधिक विरोधी शक्तीशी संघर्ष करतो. रागाशिवाय अनुराग तरी कुठे फुलतो? या जगात सगळ्याच गोष्टी आवश्यक आहेत- योग्य प्रमाणात, योग्य स्थानी, योग्य वेळी. प्रमाण, स्थान वा वेळ चुकले किंवा त्यात कमी अधिक झाले तर ती गोष्ट अयोग्य वा चुकीची ठरते. त्याने हिताऐवजी अहित होते. विकासाऐवजी विनाश होतो.

असंख्य प्रकारची माणसे दिसतात ती यामुळेच. फक्त दुर्दैवच दुर्दैव वाट्याला आलं तर माणूस पिचून जातो, हतोत्साहित होतो, निराश होतो. त्याला कितीही आशावाद सांगा तो त्याच्या निराशेतून बाहेर येउच शकत नाही. कारण आशा किंवा निराशा या बोलण्याच्या, चर्चेच्या, सांगण्या, समजावण्याच्या गोष्टीच नसतात. अनुभव आला, खुणगाठ पटली की तो आपोआप त्याला प्रतिसाद देतो. तसेच सुदैवाने ज्याला कधीच अपयश, नकार, अभाव यांचा सामना करावा लागला नाही; असा माणूस उत्साहाचे आणि आशेचे जणू कारंजे असतो. मात्र हेही खरे आहे की, अशी व्यक्ती फक्त राजपुत्र सिद्धार्थच राहू शकते, बुद्ध होण्यासाठी त्याला सुखाबरोबरच दु:खेही चाखावीच लागतात. आणि असे बुद्ध होतात तेव्हाच जगाला आधार मिळतो. आम्हाला आधार नको वगैरे म्हणणे ऐकायला ठीक आहे, पण त्यामुळे गटांगळ्या खाणे चुकत नाही. आम्ही कितीही बाता मारल्या तरी आमच्या पायतळीची माती कोणता तरी वटवृक्ष किंवा कुठले तरी गवत हेच धरून ठेवत असतात. गवगवा न करता, समजू न देता.

आम्हाला मात्र काहीतरी एक हवं असतं. अपयशाचं खापर फोडायला एक काही तरी हवं किंवा यशाची गुरुकिल्ली म्हणून एक काही तरी हवं. यश असो वा अपयश, सुख असो वा दु:ख, योग्य असो वा अयोग्य; त्याचं विश्लेषण आम्हाला सरतेशेवटी कुठल्यातरी एका बिंदूवर आणून ठेवायचं असतं. आपण आजारी पडलो तरी त्याचं एकच कारण हवं, लोकशाही व्यवस्था नीट काम करत नाही तरी एकच कारण हवं, या जगातली आणि जगाची कोडी सोडवताना सुद्धा एकच उत्तर हवं. या जगाचं, यातल्या क्रियाकलापांचं, यातील भावभावनांचं मूळ स्वरूपच व्यामिश्र आहे. हे जग ना उन्हाचं आहे, ना सावलीचं; ते आहे उन-सावलीचं. आमची ओढ मात्र एक तर उन्हाकडे असते वा सावलीकडे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १८ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा