मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि सृजनशीलता


अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सृजनशीलता यांची चर्चा पुन्हा उफाळली आहे. `आमचे आणि तुमचे' किंवा `अधिकार' याहून वेगळी चर्चा मात्र होताना दिसत नाही. मुळात सृजनशीलता म्हणजे काय? कोणत्याही कलाकृतीला सृजनशीलता म्हणता येईल का? सध्या ज्या पद्मावतीची चर्चा सुरु आहे, त्यात कसले सृजन आहे? चित्रपट न पाहतादेखील छातीठोकपणे हे सांगता येऊ शकते की त्यात कसलेही सृजन नाही. तसेही बहुतांश लेखन, चित्रपट, गाणी किंवा अन्य कलाकृती यात सृजन किती अन काय असते हा प्रश्नच आहे. विचार, भावना, माहिती किंवा मानव्य या दृष्टीने कसले सृजन असते त्यात? मग त्याची बाजू घेऊन कंबर कसून उभे राहण्यात काय अर्थ? किमान चित्रपट हा तर आज निव्वळ व्यवसाय उरलेला आहे. त्यासाठी फार गंभीर तात्विक वगैरे होण्याची गरजच नाही. सध्याच्या चित्रपटांबद्दल ढोबळ मानाने म्हणता येईल की ते तयार झाले काय किंवा न झाले काय; काहीही फरक पडत नाही. उलट ते तयार न झाले, नवीन चित्रपट येणेच बंद झाले तर भलेच होईल.

दुसरा मुद्दा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. एक लक्षात घेतले पाहिजे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे जसे एक मूल्य आहे तसेच संवेदनशीलता हेही एक मूल्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सृजनशीलता याची कड घेणारे तमाम लोक संवेदनशीलता या मूल्याबाबत कधीच बोलत नाहीत. एका समुदायाची नव्हे, एका व्यक्तीचीही भावना दुखावत असेल तर आम्ही ती कृती करणार नाही; ही संवेदनशीलतेची सर्वोच्च पायरी ठरेल. व्यवहारात तशी अपेक्षा करणे चूक ठरेल. परंतु आपल्याला वाटते ते गल्ला भरण्यासाठी रेटत नेणे, त्याला फार गंभीर मानवीय तत्त्वाचा मुलामा देणे ही संवेदनशून्यता ठरते. तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सृजनशीलता जपणाऱ्या मंडळींचा approach आणि attitude असाच संवेदनशून्य आहे यात वाद होऊ नये.

कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही करणे योग्य म्हणता येईल का? समग्र मानवी जीवन; तसेच `सार आणि असार' हा विचार कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली बाजूस सारणे चुकीचेच ठरते. उकिरडा घराबाहेर असला काय किंवा घरात असला काय, आरोग्यावर परिणाम करतोच. तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते, हिणकस वाटते तर पाहू नका; इत्यादी युक्तिवाद यामुळेच अर्थहीन ठरतात. `स्वातंत्र्य' या गोष्टीचं इतकं चिल्लर interpretation आज होऊ लागलं आहे, की प्रत्येक लहानसहान गोष्टीचा परिणाम अन्य साऱ्या जीवन व्यवहारावर होत असतो हेच आपण विसरून गेलो आहोत. असा परिणाम होतो म्हणून जीवन व्यवहार जसा बांधून ठेवता येत नाही, बांधून ठेवू नये; तसाच तो मोकाट सोडता येत नाही, सोडू नये; हेही महत्वाचे. हे संतुलन राहण्यासाठी व्यक्ती आणि समाज दोहोंचीही परिपक्वता महत्वाची. अन अशा परिपक्वतेसाठी `सार आणि असार' यांचे भान जागे असणे आवश्यक. खूप अगदी साधं किंबहुना क्षुल्लक वाटावं असं एक उदाहरण घेता येईल. समाज माध्यमांवर एक पोस्ट पुष्कळदा फिरत असते - अमुक अमुक नावे कोणाची? त्यात काही नावे असतात आणि खाली त्यांना समाजात ज्या नावाने ओळखतात ती नावे. संत, महापुरुष यांची ती नावे असतात. यात harmful काही नाही. पण असारता किती आणि कशी असू शकते, याचं हे उदाहरण आहे. संत वा महापुरुष यांच्या माहितीची बखर डोक्यात कोंबणे आणि त्यांचे नाव घेऊन किंवा न घेताही त्यांचा विचार, त्यामागील भाव जीवनात रुजणे; यातील सार काय आणि असार काय? आज चित्रपट असो, इतिहास असो, राजकारण असो, अर्थकारण असो, दैनंदिन जीवन असो; सार आणि असार याची जाणीव, याचं भान याकडे आपलं अक्षम्य दुर्लक्ष्य होते आहे का?

चित्रपट वा अन्य कलांच्या संदर्भात हेच म्हणता येईल. `पद्मावती'चा वाद सुरु असतानाच, कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकाचे निर्माते स्व. एकनाथजी रानडे यांच्यावरील बायोपिक काही शहरात दाखवण्यात आला. पद्मावती देखील इतिहास आहे आणि एकनाथजी देखील इतिहास आहेत. इतिहासातील काय सारभूत आणि काय असार याची ही दोन उदाहरणे. चित्रपट क्षेत्रातील संजय लीला भन्साळीसारख्या असंख्य लोकांना; भारतातील अशा असंख्य दैदीप्यमान इतिहास पुरुषांबद्दल, महिलांबद्दल चित्रपट, माहितीपट, लघुपट तयार करावेत; देशाचा भूगोल, खाद्यसंस्कृती, कला, उत्तुंग प्रतिभेचे कलाकार, जीवनाच्या उत्तुंगतेला स्पर्श करण्यासाठी जगलेले लोक, जनावरे, निसर्ग, कविता, साहित्य, भाषा; असे एक ना अनेक विषय आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावे; गावागावात, शाळाशाळात ते दाखवत हिंडावं; असं का वाटत नाही. यानंतर एकही पैसा कमावला नाही तरीही चांगलं आयुष्य जगू शकतील एवढा पैसा आणि समाधान देणारे नावलौकिक यांच्याजवळ आहे. तरीही ते असे का वागतात आणि तसे का वागत नाहीत; याचं कारण आहे; त्यांच्या जीवनाच्या प्रेरणाच कोत्या आणि खुज्या आहेत. या विषयांवर गहन विद्वतचर्चा करणारेही या मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष करून असार गोष्टींचीच चर्चा करतात कारण त्यांच्याही जीवनप्रेरणा तशाच खुज्या आणि कोत्या आहेत. आज हे स्पष्टपणे आणि निर्भीडपणे बोलण्याची वेळ आलेली आहे.

आपल्याला सशक्त जीवनप्रेरणा हव्यात, जीवनाचे सारभूत तत्व हवे की नको; हे तुम्ही आम्हीच ठरवायचे आहे. तो ना शासनाचा विषय आहे, ना शिक्षणाचा, ना प्रसार माध्यमांचा, ना विद्वानांचा. कारण जगणं हे तुमचं आमचं असतं.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २१ नोव्हेंबर २०१७