शनिवार, १५ सप्टेंबर, २०१८

हिंदू पद्धती, संघ पद्धती


काही दिवसांपूर्वी, ७ सप्टेंबर २०१८ रोजी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शिकागो येथे विश्व हिंदू संमेलनात प्रमुख भाषण झाले. निमित्त होते स्वामी विवेकानंद यांच्या जगप्रसिद्ध शिकागो भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याचे. `हिंदूंना कोणावर वर्चस्व गाजवायचे नाही,' असे त्यांच्या भाषणाचे सार सांगता येईल. अनेक प्रसार माध्यमांनी ते तसेच लोकांपर्यंत पोहोचवले देखील आहे. या देशाने हजारो वर्षे जो विचार जोपासला, रुजवला, वाढवला तोच सरसंघचालकांच्या भाषणातून प्रतिबिंबित झाला आहे. नुकताच या जगाचा निरोप घेणारे स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी `रग रग हिंदू मेरा परिचय' या लोकप्रिय कवितेतून जो विचार व भाव व्यक्त केला आहे, तोच शिकागोच्या भाषणात प्रकट झाला आहे. थोडक्यात म्हणजे या देशाची हजारो वर्षांची परंपरा, स्वामी विवेकानंद, अटलबिहारी वाजपेयी आणि आता सरसंघचालक डॉ. भागवत असा उदार हिंदू भावाचा एक प्रवाहच वाहतो आहे. सध्याच्या वातावरणात एक सुखद आश्चर्याचा लहानसा धक्काही जाणवला आहे. सगळ्या हिंदूंच्या वतीने सरसंघचालक कसे काय बोलले? ते काय संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधी आहेत का? असे एरवी उत्पन्न होणारे प्रश्न कोणी उपस्थित केले नाहीत. हेही एक सुचिन्हच. वास्तविक जगभरातल्या ६० देशातील हिंदूंच्या प्रतिनिधींसमोर मुख्य मार्गदर्शक म्हणून त्यांचे भाषण झाले. याचाच अर्थ हिंदूंच्या मोठ्या वर्गाने त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ते समस्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात का इत्यादी प्रश्न गतार्थ होतात.
आणखीन दोन दिवसांनी म्हणजे १७, १८ व १९ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सरसंघचालकांच्या तीन व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसात समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रातील नेतृत्वाशी त्यांची चर्चादेखील होणार आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे आयोजन केले आहे. अशी छोटी छोटी आयोजने आजवर होत आली आहेत. परंतु नियोजनबद्ध रीतीने आणि व्यापक सहभाग आणि विस्तारित कक्षा असलेले असे हे पहिलेच आयोजन असावे. यात सरसंघचालक काय बोलतात आणि काय चर्चा होते हे प्रत्यक्ष कार्यक्रमानंतर स्पष्ट होईलच. परंतु ते पहिल्या परिच्छेदात उल्लेख केलेल्या, हिंदू विचारप्रवाह व हिंदू भावप्रवाह याला अनुसरूनच राहील याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाही. याचे कारण म्हणजे रा. स्व. संघाचाही विचारप्रवाह आणि भावप्रवाह तसाच राहत आला आहे.
एका प्रसंगाचे येथे सहज स्मरण होते. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना भेटायला एक जैन मुनी आले होते. विविध विषयांवर बोलणे सुरु असताना, जैन मुनी म्हणाले - तुम्ही तुमच्या स्वयंसेवकांना डालडा तूप न वापरण्याचा आदेश का देत नाही? त्यावेळी डालडा तूप वापरण्याविरुद्ध मोठा विचारप्रवाह होता. त्यावर गुरुजी त्यांना म्हणाले- तुमच्याप्रमाणेच डालडा तूप वापरू नये असे माझेही मत आहे. पण मी आदेश कसा देऊ? एक तर संघ असा आदेश वगैरे देत नाही. ती संघाची पद्धत नाही. आमच्याकडे त्यासाठी अधिकार (sanction) नाही आणि तशा पद्धतीने समाजाने चालावे असेही आम्हाला वाटत नाही. संघही तसा चालत नाही. थोडक्यात dominance, वर्चस्व, आदेश हा हिंदुंचाही गुण नाही आणि संघाचाही गुण नाही.
परंतु हा विषय वाटतो तितका सोपा नाही हेही खरे आहे. कारण हा आंतरिक परिवर्तनाचा विषय आहे. बाह्य परिवर्तन किंवा एकूणच बाह्य गोष्टी माणसाला जेवढ्या समजतात, रुचतात, पटतात, उलगडतात, भावतात तेवढ्या आंतरिक गोष्टी; समजत, रुचत, पटत, उलगडत, भावत नाहीत. मनुष्याची एकूण रचनाच तशी आहे. मात्र भारताचे आणि हिंदूंचे हेच वैशिष्ट्य आहे की, त्यांनी प्रयत्नपूर्वक आंतरिक विकासाचा प्रयत्न केला आहे आणि त्यात पुष्कळ अंशी यश मिळवले आहे. जणू हा आंतरिक विकास हाच हिंदुत्वाचा ध्यास आहे. हिंदुत्व बाह्य बाबी नाकारत नाही, बाह्य व्यवस्थापन फेटाळून लावत नाही. परंतु ते हळूहळू कमी होत होत पूर्णत: संपून जावे आणि मानवाचा बाह्य व्यवहार देखील आंतरिक व्यवस्थापनानेच चालावा अशी त्याची दिशा असते. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन, त्याची रचना, नियम, त्यांची लवचिकता या सगळ्यातच आंतरिक विकासाचा हा गाभा असतो. आंतरिक विकासाचे हे सूत्र या सगळ्या प्रयत्नातून गुंफलेले असते. मानवी जीवन हा जिवंत वाहता प्रवाह असल्याने कधी बाह्य तर कधी आंतरिक असे पदर प्रत्ययाला येत असतात. जसजसे हे आकलन वाढते तसतशी ही बाब स्पष्ट होत जाते.
या सूत्राची धारणा पुरेशी झालेली नसल्यानेच भारतात वा भारताबाहेर हिंदुत्व आणि त्याची व्यामिश्रता यांच्या बाबतीत अनेकदा गोंधळ उडतो. संघाच्याही बाबतीत असाच गोंधळ होतो. यातूनच पुष्कळ प्रश्न पुढे येतात. जसे भारतीय जनता पार्टी किंवा त्या पक्षाचे लोक आणि त्या पक्षाची सरकारे संघाच्या आदेशाने चालतात वा नाही हा विषय. भाजपा संघाच्या आदेशाने चालत असेल तर अनेक बाबतीत अंतर्विरोध का पाहायला मिळतो. भाजपा जर संघाची नाळ नाकारत नाही किंवा संघही भाजपाची नाळ नाकारत नाही तर त्यांच्यात विसंवाद का होतो? किंवा अगदी स्वयंसेवकांच्या मनात येणारे प्रश्न सुद्धा असतात. चार पाच दिवसांपूर्वी एक स्वयंसेवक बोलता बोलता म्हणाला- `संघाने पुष्कळ काम केले आहे पण अजूनही आपण आपल्याच स्वयंसेवकांना बदलू शकलेलो नाही. तसे नसते तर, मी केलेला आंतरजातीय विवाह संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या माझ्या वडिलांनीच स्वीकारू नये?' ही त्याची तक्रार नव्हती त्याचे दु:ख होते. कारण तो स्वयंसेवक होता. पण हाच मुद्दा संघाचे टीकाकार वा विरोधक तक्रार म्हणून वा संघाची त्रुटी म्हणून वा संघाचे अपयश म्हणून मांडतील. हा आमचे किंवा तुमचे असा वाद होईल एवढेच. मात्र मूळ मुद्दा बाजूला राहतो की, माणूस आदेशाने नव्हे तर आंतरिकतेने व्यवहार करतो. अन संघाचे काम ही आंतरिकता शुद्ध, प्रगल्भ, व्यापक, सखोल करणे हे आहे. हे प्रदीर्घ काळाचे काम आहे. कदाचित मानवी समाजाला नेहमीच गरज भासणारे. हे नीट ध्यानी घेतले की, संघ आणि संघाचे स्वयंसेवक; संघ आणि ज्या हिंदू समाजासाठी संघ काम करतो तो समाज, संघ आणि ज्या हिंदू भावाने संपूर्ण मानवजात भारून टाकण्याची मनिषा संघ बाळगतो ती मानवजात; यांचे परस्पर नाते, यांचे परस्पर संबंध, व्यवहारातील विस्कळीतपणा वा विसंवाद, तरीही तत्त्वांचे आग्रही प्रतिपादन; या साऱ्याचा उलगडा होत जातो.
संघाचे काम हे आवाहनाचे काम आहे, आव्हानाचे नाही. संघाचे काम निमंत्रणाचे आहे, नियंत्रणाचे नाही. ते आंतरिक परिवर्तनाचे आहे. या आंतरिक परिवर्तनात जोरजबरदस्ती चालत नाही. तो या परिवर्तनाचा मार्ग नाही. जीवनाच्या श्रेयसाची जाणीव करून देणे, विश्वातील उत्तम- उदात्त- उन्नत- भावांची, विचारांची, व्यवहारांची ओळख आणि जाणीव करून देतदेत, मनाला पटवून देतदेत पुढे जाण्याला हातभार लावणे; ही आहे हिंदूपद्धत. हीच आहे संघपद्धत. आकलनाला थोडी किचकट आणि गुंतागुंतीची खरी, पण पक्केपणाची खात्री असणारी !! म्हणूनच तर १७, १८, १९ जानेवारीच्या सरसंघचालकांच्या भाषणमालेचे शीर्षक आहे- `भविष्य का भारत : संघ का दृष्टीकोण'. हा दृष्टीकोन सगळ्यांनी समजून घ्यावा, action plan आपापला राबवावा. दृष्टीकोन ही आंतरिक बाब आहे. तो ठाकठीक करावा. कृती कार्यक्रम बाह्य बाब आहे. त्यात dominance असू नये. ही जी कठोर लवचिकता आहे तेच आहे हिंदूंचे आणि संघाचे वैशिष्ट्य. म्हणूनच नवी दिल्लीतील कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रण देण्यात संघाला गैरही काही वाटत नाही. बाकीच्यांनाही वाटू नये. आंतरिक परिवर्तन होईल त्या प्रमाणात बाकीच्यांचे हे वाटणेही गळून पडेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १५ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा