बुधवार, २९ मार्च, २०२३

गणेश चा लेख व माझी प्रतिक्रिया

माझे मित्र गणेश कनाटे यांची सद्यस्थितीत आवश्यक आणि महत्त्वाची अशी ही पोस्ट. (लिंक दिलेली आहे.) त्यावरील माझी प्रतिक्रिया. वादावादी न करता चर्चा सकारात्मक दिशेने जावी एवढीच अपेक्षा. माझी प्रतिक्रिया - 

गणेश, तू हा initiative घेतो आहे याचा समाधान आहे. तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना supplement म्हणून फक्त काही गोष्टी. रोग दूर करायचा असेल तर फक्त लक्षणांचा विचार करून चालत नाही. कारणांचाही विचार करावा लागतो, हे मान्य व्हायला हरकत नसावी. अन तिथे नेमकी बरेचदा पंचाईत होते. गुण अवगुण, बुद्धिमत्ता, क्षमता इत्यादी गोष्टी समूहगत नसतात हे अगदी खरं आहे पण त्या तशा असतात या समजातून बाहेर यावे लागेल. अन ती जबाबदारी सगळ्या जाती, पंथ, पक्ष, संस्था, संघटना यांची आणि त्यात सहभागी प्रत्येकाची आहे. शिवाय हे फक्त लिहिणे वा बोलणे यातूनच नाही तर व्यवहारातून दिसावे, जाणवावे, व्यक्त व्हावे लागेल. आपल्या नागपुरातल्याच एक दोन गोष्टी उदाहरण म्हणून. स्व. सुदर्शनजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक झाले तेव्हा त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले होते. नागपुरातल्या अनेक मोठमोठ्या लोकांनी डॉ. आंबेडकर यांचा पुतळा अपवित्र झाला म्हणून तो धुतला होता. अगदी स्व. भा. ल. भोळे यांच्यासारख्या माणूस त्यात होता. द्वेषपूर्ण आणि द्वेष निर्माण करणाऱ्या या कृत्यावर कोणी कोणी आणि काय प्रतिक्रिया दिल्या? अगदी याच धाग्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणारेही अनेक नागपूरकर आहेत. त्यावेळचे जाऊ द्या. आज 'ते कृत्य चूक होते' एवढे तरी ही मंडळी म्हणू शकते का? हे धैर्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर इच्छाचिंतनाला किती अर्थ राहील?

दुसरे उदाहरण. मुस्लिम राष्ट्रीय मंच. आपल्या नागपूरचेच अन तूही ज्यांच्यासोबत काम केलं आहे ते विराग पाचपोर या मंचाचं काम करतात. हिंदू- मुस्लिम संवाद सौहार्द वाढावा याचा तो प्रयत्न. दोन दशके झाली त्याला. माहिती नाही असे नाही पण किती लेखक, किती पत्रकार, किती विद्वान, किती विचारवंत त्याचा उल्लेख तरी करतात किंवा त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात? मी तर म्हणेन मुद्दाम टाळतात. आजपासून सुमारे साठ वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने अनेक संतांना एकत्र आणून अस्पृश्यता चुकीची असून त्याला धर्माचा आधार नाही अशी जाहीर भूमिका घेतली आणि यासाठी अनेक प्रयत्न केले. समाजातील किती विचारवंतांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला?

- व्यक्तिगत अनुभवांच्या आधारेही खूप बोलता येईल. त्या अनुभवांचेच काही लेख होतील. मात्र संबंधित लोक त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची टवाळी करतात आणि शहाजोगपणे मोठमोठ्या गोष्टी करतात. अन मी चिल्लर लोकांबद्दल बोलतच नाही. अगदी मोठाली नावे आहेत. नाव मोठं लक्षण खोटं असे हे लोक किती ढोंगी असतात हे मला व्यक्तिगत अनुभव आहेत. मी ते गंगार्पण करतो. सगळ्यांनी करायला हवेत पण नाही करू शकत. अन मी म्हणतो तशी अपेक्षा तरी का करावी? उघड दिसणाऱ्या गोष्टींबाबत प्रामाणिक खंत तर व्यक्त करायला हवी. तरच पुढे जाता येईल.

- तू म्हणतो तसे हिंदूंना खोऱ्यातून पळून जावे लागले तसे आजही तिथे राहणारे हिंदू आहेतच. हाच न्याय अन्यत्रही लावायला हवा की नको. देश स्तरावर मुस्लिम समाज राहतो आहेच नं? मग हिंदू बिथरले या ओरड्याला काय अर्थ राहतो? किमान ते तसं नाही हे प्रकटपणे बोलणारे हवेत.

- योगायोगाने आजच्या फेसवुक मेमरीत या विषयाशी संबंधित एक पोस्ट आली. तिची लिंक पोस्ट करतो. पहावी. त्यावर प्रतिक्रिया वाचायलाही आवडेल.


गणेश कनाटे यांच्या पोस्टची लिंक -

https://www.facebook.com/633133472/posts/10158828263108473/


माणुसकी जिवंत असलेले लोक कमी प्रमाणात का होईना पण तेव्हाही होते आजही आहेत! 

१९८६ पासून १९९७ पर्यंत काश्मिरी पंडितांचे खोऱ्यातून मोठया प्रमाणात विस्थापन झाले. ते विस्थापन होण्यापूर्वी पंडितांची लोकसंख्या खोऱ्यातील एकूण लोकसंख्येच्या ४.५% इतकी होती. (काश्मीर फाईल्समध्ये अनुपम खेर ती २% होती, असं म्हणतो.) त्यापैकी बहुसंख्य पंडित खोरे सोडून प्रथम जम्मूला व नंतर देशात इतरत्र स्थलांतरित झाले. इतके मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊनही जवळजवळ ८०० पंडितांचे परिवार खोऱ्यातून कधीच बाहेर पडले नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत. विश्वास बसत नसेल तर श्रीनगरला एक वैष्णो भोजनालय आहे त्याच्या मालकाशी कधी गेलात तर भेटून या.

जर खोऱ्यातील ९५% मुसलमान ५% हिंदूंचे शिरकाणच करायला निघाले असते तर एकतरी पंडित कुटुंब सोडा व्यक्ती तरी खोऱ्याबाहेर जिवंत बाहेर पडू शकली असती काय?

मुसलमानांचा पराकोटीचा द्वेष करणाऱ्या आरती टिक्कु या पत्रकार मुलीच्या कुटुंबालाही एका मुस्लिम मुलानेच त्यांना जीवे मारण्याच्या कटाबद्दल माहिती दिली आणि एका मुस्लिम टांस्पोर्टरच्या ट्रकमधून आधी टिक्कु परिवाराच्या मुली व नंतर संपूर्ण परिवार जम्मूला पोहोचू शकला.

तसेच गांधींच्या हत्येनंतर सातारा-सांगली-कोल्हापूर भागातील ब्राह्मणांच्या घरांवर चालून गेलेल्या जमावासमोर अनेक बहुजन समाजातील नेते, गावागावांतील प्रतिष्ठित नागरिक/नेते उभे झाले नसते तर साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले ब्राह्मण या राज्यात औषधालादेखील उरले नसते,असे आपल्याला वाटत नाही का?

आकड्यांचा खेळ सोडून देऊ. पण काश्मीरच्या प्रकरणात काही माणुसकी जपणारे मुसलमान निश्चितच होते तसेच गांधीहत्येनंतर असलेल्या प्रक्षोभात माणुसकी जपणारे ब्राह्मणेतर लोकही निश्चितच होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे उदाहरण आवर्जून द्यायचे का?

असे असेल तर आज जी मंडळी काश्मीर प्रश्नाचा आधार घेऊन मुसलमानांच्या विरोधात आणि गांधीहत्याप्रकरणी काँग्रेसविचारांच्या बहुजनांच्या विरोधात फेसबुक, व्हाट्सअप्प इत्यादी समाजमाध्यमांवर द्वेष पसरविणारी खोटी माहिती पेरताहेत, यांचा सद्सद्विवेक मेला असे म्हणायचे काय? यांना केवळ इतरांचे रक्त प्यायचे आहे काय? राजकारणात मते मिळविण्यासाठी, सत्ता मिळविण्यासाठी कुणाचेही रक्त सांडले तरी यांना चालतं काय?

माझे म्हणणे भाबडे आणि आजकाल ज्याला शहाणपणा म्हणतात तसे नसलेले वाटत असेल तर माझी काहीही हरकत नाही परंतु समाजात असा द्वेष पसरू नये, कुणी पसरवू नये, यासाठी जे काय करता येईल ते केले पाहिजे, असे मला मनापासून वाटते. अशा कोणत्याही प्रयत्नात मी यथाशक्ती सहभागी होईन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा