गुरुवार, १० मार्च, २०११

मला काय त्याचे?

मला काय त्याचे?

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सध्या हिंसक व सूड घेऊ घटनांनी थैमान घातले आहे. परीक्षेत नक्कल करू न दिल्याबद्दल आठव्या वर्गातल्या एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षिकेवर ब्लेडने वार केले. त्यात ती शिक्षिका चांगलीच जखमी झाली. गंमत म्हणजे त्यावेळी वर्गातील मुले, `ब्लेड मारो, कोंपी करो' असे ओरडत होती. अतिशय संतापजनक असा हा प्रकार म्हटला पाहिजे. केवळ आठव्या वर्गातील ही लहान लहान मुले घाबरली असती, भेदरली असती, तर समजण्यासारखे होते. पण त्यांचा attitude विचित्रच नव्हे तर घृणास्पद होता.
महाराष्ट्रात पेट्रोल भेसळीवरून झालेले यशवंत सोनवणे खून प्रकरण अजून विस्मरणात सुद्धा गेलेले नसतानाच अशा प्रकारच्या घटना घडतच आहेत. तेल, डिझेल, पेट्रोल एवढेच काय वाळू, जमीन, भूखंड, दूध असे सारे माफिया प्रकार सर्रास सुरू असून जीवघेणे हल्लेही सुरूच आहेत. महाराष्ट्र असो की दिल्ली अशा असभ्य, असंस्कृत, विधिनिषेधशून्य घटना रोज घडत आहेत आणि त्या सामान्य माणसाच्या सुरक्षेवर, शंतातामय सहजीवनावर प्रश्नचिन्हही लावीत आहेत. महाराष्ट्र व दिल्लीतच असे घडते आहे असे नाही, तर पूर्ण देशभरच हा तमाशा चालू आहे. तपशिलाचा फक्त फरक!! बाकी निर्ढावलेपणा, निर्लज्जपणा, अतिरेक आणि दहशतीची वृत्ती मात्र सारखीच.
आणखीनही एक सारखेपणा सगळीकडे पाहायला मिळतो. तो म्हणजे- माणसांचा, समाजाचा थंडपणा आणि असहायता. एक तर बहुसंख्य समाज अशा घटनांकडे पाहतच नाही. त्याची नजर शेअर बाजार, रिअलिटी शो, दूरचित्रवाणीवरील मालिका, क्रिकेटसारखा जगाच्या जीवनमरणाचा खेळ, मोबाईल; टीव्ही; वेगवेगळी इलेक्ट्रोनिक उपकरणे; गाड्या; यांची मोडेल्स वगैरे वगैरे अतिशय महत्वाच्या गोष्टींवर असते. त्यामुळे त्याला वेळच नसतो.
यानंतरही त्याच्यावर अशी एखादी घटना आदळलीच तर तो नजर फिरवून घेतो. त्याने साधले नाही तर `मला काय त्याचे? माझा त्याच्याशी काय संबंध? मला काय फरक पडतो?' अशी स्वत:ची अन् बाकीच्यांचीही समजूत घालतो. अशा घटना फार मनाला लावून घ्यायच्या नसतात. त्यांचा त्रास करून घेउन आपली मन:शांती बिघडवायची नसते. त्याने उगाचच मनावर ताण येतो आणि जीवनातलं स्वास्थ्य आपण हरवून बसतो असा यौगिक कम आध्यात्मिक सल्लाही आजकाल समाज देऊ लागला आहे. बाकीच्यांना आपण काय सांगू शकतो? काय समजावू शकतो? आपण चांगलं राहावं. असा उपदेशही ऐकायला मिळतो. अशा प्रकारचा विचार करताना, असे युक्तिवाद करताना आपण स्वत:लाच कसे फसवतो आहोत किंबहुना स्वत:च्या पायावरच कसा धोंडा पाडून घेतो आहोत याकडे मात्र समाज सपशेल दुर्लक्ष करू लागला आहे. अशा घटनांना बळी पडणारे अनेकदा दिल्लीतील त्या शिक्षिकेसारखे सज्जन लोकच असतात. कदाचित एखादे वेळी आपल्याही वाट्याला असे काही येऊ शकेल, एवढा साधा विचारही समाजाच्या मनाला स्पर्श करिनासा झाला आहे. आपणाला विचारांची एक देणगी मिळालेली आहे, त्याचा वापर आपण करायला हवा. आजूबाजुच्या बर्यावाईट घटना, शेजारीपाजारी, अन्य लोक यांच्या सुखाच्याच नव्हे तर दु:खाच्या घटना, समाजातल्या निरनिराळ्या व्यवस्था यांचा संवेदनशिलतेने, सह्रुदयतेने, आस्थेने विचार करायला हवा आणि त्यानुसार व्यवहार करायला हवा. चांगल्या घटनांचे कौतुक तर करायलाच हवे पण वाईट घटनांचा निषेधही करायला हवा, त्यावर साधकबाधक चर्चा करायला हवी, आवश्यक तेथे व आवश्यक प्रमाणात सक्रियता हवी... यामुळेच समाज `समाज' या रुपात उभा राहत असतो. समाजाची चांगल्या वाईटाची जाण जागी राहत असते. भल्या लोकांना त्याने बळ लाभते अन् वाईट वृत्तीवर अंकुश राहतो. आणि तेच व्यक्तिच्याही हिताचे असते. हे सारे समजून घेण्याची वृत्तीच जणू लोप पावते आहे की काय अशी भीती वाटावी असे आजचे चित्र आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर.

1 टिप्पणी: