निमित्त मोनिका व राधिकाचे...
मोनिका किरणापुरे खून प्रकरण सध्या नागपुरात गाजते आहे. मोनिका मूळची नागपूर जिल्ह्यातील रामटेकची राहणारी. नागपूरला राहून एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ती शिकत होती. त्याच्या दोनेक दिवस आधी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत राधिका तन्वर या महाविद्यालयीन युवतीचा भर रस्त्यात खून करण्यात आला होता. राधिकाचे प्रकरण दिल्लीचे असल्याने दूरचित्रवाणीवर त्याची खूप चर्चा झाली. त्यामानाने मोनिका प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली नाही. कदाचित त्यामुळेच असावे की, राधिकाचा खुनी दोन दिवसांनी मुंबईत पकडला गेला. मोनिकाचा खुनी मात्र अजूनही सापडलेला नाही. राधिकाचा खुनी तिचा एक मित्रच होता. मोनिकाचा मारेकरीही कदाचित तिला ओळखणाराच असावा. दोन्ही प्रकरणात तरुण विद्यार्थ्यांनी पुढाकार घेउन वातावरण तापविले. विद्यार्थ्यांचा मोर्चा वगैरे प्रकार यशस्वी आणि प्रभावी पार पडले. राधिकाचा खुनी सापडल्यानंतर मात्र ते प्रकरण थंड झाले आहे. मोनिकाचा खुनी सापडल्यानंतर नागपुरातील प्रकरणही शांत होईल. यापूर्वीही पुष्कळदा असेच घडलेले आहे. संबंधित प्रकरणाचे आरोपी पकडले गेल्यावर चर्चा शांत व्हावी अशा या घटना आहेत का?
आरोपी पकडले गेल्यावर कायदा आपल्या पद्धतीने काम करील हे खरे आहे. चौकशी होईल, आरोप सिद्ध होतील, शिक्षा होईल. पण भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची खात्री देता येईल का? युवा वर्गानेही याचा गंभीर विचार करायला हवा. राधिका आणि मोनिका या दोन्ही घटना काही निर्जन अरण्यात झालेल्या नाहीत. या दोघीही महाविद्यालयात जात असताना भर रस्त्यात या घटना घडल्या आहेत. शेकडो लोक त्यावेळी आजुबाजुला होते. त्यात महाविद्यालयीन युवकही होते. मात्र त्यांनी काहीही केले नाही. या मुलींच्या मदतीलाही कोणी धावून गेले नाही आणि आरोपीला पकडण्याचा प्रयत्नही कोणी केला नाही. सगळ्यात गंभीर हीच बाब आहे. का माणसे एकमेकांच्या मदतीला धावून जात नाहीत? या प्रश्नाचा विचार करण्यासाठी थोडा आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करायला हवा.
काय आहे आजचे वास्तव? विशेषत: विशितल्या तरुणाईचे? प्रचंड वेगाने गाड्या हाकणे, तासंतास मोबाईलवर बोलणे, मोठमोठ्याने आरडाओरड, कानठळ्या बसवणार्या आवाजात गाणी ऐकणे अन् त्यावर बेधुंद नाचणे, स्वत:बद्दलचे अवास्तव आणि अनावश्यक ग्रह आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रचंड उर्मटपणा आणि उद्धटपणा. साधी दुचाकी वा चारचाकी सुद्धा व्यवस्थित पार्क करायला हवी याकडे आजचा तरुण लक्ष देतो का? बरे त्याला तसे सांगायचीही सोय नसते. असे कोणी सांगितलेच तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काय कटकट म्हणून संभावना केली जाते. नाही तर सरल उर्मटपणे उत्तरे दिली जातात. सांगणार्याचा अपमान केला जातो, पाणउतारा केला जातो. बहुसंख्य तरुणांच्या वागण्याबोलण्याची, व्यवहाराची आज हीच स्थिती आहे. गल्लीबोळात तरुण-तरुणी प्रेमचाळे करीत हिंडत असतात. मर्यादा सोडून वागणार्या अशा तरुणांना कोणी हटकले तर त्याचे काय होते हे सार्याँना ठाऊक आहे. यात युवतीही मागे नाहीत. अधिकाधिक बेबंद वागणे म्हणजेच आजची तरुणाई झाली आहे. त्या विरुद्ध कोणी बोलले तर त्याला आपण का त्यांच्या फंदात पडलो असे वाटू लागते. बहुसंख्य तरुण वर्ग परस्परांशी तर फटकून वागतोच पण एकूण सगळ्यांनीच एकमेकांशी आणि आपल्याशी फटकून वागावे अशीच त्याची इच्छा आणि प्रयत्न असतो. यातूनच घरात, बाहेर, मित्रांमध्ये, महाविद्यालयात आणि एका अर्थाने समाजातच सर्व प्रकारच्या औपचारिक, अनौपचारिक संबंधात मोठी दरी तयार होऊ लागली आहे. त्यामुळे एकमेकांसाठी धावून जाणे, मदत करणे ही प्रवृत्ती लोप पावत आहे. एवढेच नव्हे तर कोणी मदतीचा हात पुढे केलाच तर त्याच्या वाट्याला जो त्रास आणि हेटाळणी येते त्यामुळे मदतीचे हातही आखडू लागले आहेत.
याचा परिणाम केवळ मदतीला धावून जाणे वा न जाणे एवढ्यापुरताच मर्यादित राहत नाही. एकमेकांच्या भानगडीत पडायचे नाही आणि `मला सारे समजते', `मी आता लहान नाही', `प्रत्येकाने आपापले पाहावे' या तरुणाईच्याच विचारशून्य वल्गनांमुळे विद्यार्थ्यांनाही कोणाचे काय चालले आहे, कोणाची भांडणे आहेत, स्वभाव कसे आहेत, बलस्थाने कोणती, दुर्बल स्थाने कोणती हे काही माहीत नसते. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर ती का घडली असावी याचे केवळ तर्कच करावे लागतात. आज आपल्या सुरक्षेची मागणी करणारी मुले मुली काही ठोस माहिती देऊन आरोपीपर्यंत पोहोचायला आणि सत्य उघड करायला फारशी मदत करू शकत नाहीत हेही वास्तव आहे. सहज, स्वाभाविक व आस्थापूर्ण संबंध असेल तर विपरीत घटना रोखताही येऊ शकते. संबंधात निर्माण होणार्या ताणतणावांना वाट करून देता येऊ शकते. पण हे ताणतणाव वाढत गेले की त्याचा स्फोट होतो. आत्मीय संबंधांचे वंगण नसल्यामुळे असे अपघात होण्यापूर्वीच टाळले जाण्याचीही शक्यता कमी होते.
तरुणांमधे सतप्रवृत्त, विचारी, समजूतदार वर्ग नाहीच असे नाही पण हा समजूतदार वर्ग एकूण तरुण वर्गात किती प्रभावी आहे. किंवा हा समजूतदार वर्ग प्रभावी व्हावा म्हणुन सार्याच पातळ्यांवर किती प्रयत्न केले जातात? तरुण वर्गच इतिहास घडवत असतो, जग घडवत असतो हे शंभर टक्के खरे आहे. पण सगळेच तरुण फार चांगलं काही तरी घडवतात असे नाही. विवेकानंद हे विवेकानंद होते, भगतसिंह भगतसिंह होते, शिवाजी शिवाजी होते म्हणून त्यांनी इतिहास घडवला. ते तरुण होते म्हणून त्यांनी इतिहास घडवला नाही. तरुण काय घडवू शकतो याची ही उदाहरणे आहेत. तरुण वय हे काही घडवायला साहाय्य नक्कीच करतं, पण केवळ तरुण आहे म्हणून कोणी काही घडवू शकत नाही. माझ्या या विचारांमुळे तरुण वर्ग संतप्त होऊ शकेल, सगळ्याच गोष्टींचे कौतुक करणारा एक वर्ग समाजात असतो तोही नाराज होऊ शकेल. पण तो बदल घडवून आणू शकणार नाही. बदल घडवून आणायचा असेल तर त्याची सुरुवात स्वत:पासून करावी लागेल. तरुणाईला सुद्धा!!! नाही तर अशा घटना होतच राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा