सुमारे दीड ते दोन वर्षांच्या काळातल्या एका अमेरिकन स्त्रीच्या आयुष्यातील घडामोडीन्वर आधारित ही कादंबरी। १९८४ ते १९८६ हा तो कालखंड. बेट्टी महमूदी. मिशिगन येथे राहणारी एक अमेरिकन महिला. इराणमधून अमेरिकेत येउन वैद्यकीय शिक्षण घेणार्या आणि व्यवसाय करणार्या महमूद यांच्याशी ती विवाह करते. १९८० साली झालेला हा तिचा दुसरा विवाह. पहिल्या नवर्यापासून तिला दोन मुले होती. दुसर्या लग्नानंतर तिला एक मुलगी होते. तिचं नाव, माहतोब (म्हणजे इराणी भाषेत चंद्रप्रकाश). इतर अनेक संसारांप्रमाणे त्यांचाही संसार अंधार प्रकाशाचा खेळ खेळत, पण छान सुरु असतो. मात्र त्याच सुमारास इराणमध्ये राज्यक्रांती होते. अयातुल्ला खोमेनी सत्तेवर येतात. ही क्रांति प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्याची तयारी सुरु झालेली असते. अमेरिकाविरोध हा त्याचा एक भक्कम महत्वाचा आधार असतो. त्यामुले स्वाभाविकच अमेरिकेतील इराणी लोकांना अमेरिकेविरुद्ध उभे करणे आणि त्यांच्या साहाय्याने आणि त्यांच्या माध्यमातून क्रांति घडवून आणणे याचा खोमेनीचा प्रयत्न असतो. डॉ. महमूदी या सगळ्यात इराणच्या बाजूने सामील होतो. क्रांति होते, खोमेनी सत्तेवर येतो आणि आपण इराणला जाऊ असा धोशा डॉ. महमूद आपली पत्नी बेट्टी हिच्या मागे लावतो. तिचा त्याला विरोध असतो. पण आपण १५ दिवसांसाठी जाऊ. माझ्या माणसान्ना भेटू व परत येऊ असे तो बेत्तीला सांगतो. ती तयार होते आणि डॉ. महमूद, बेट्टी व माहतोब इराणला येतात.
तेथे आल्यावर मात्र डॉ। महमूद हलुहलू आपले इरादे उघड करतो. आता आपल्याला येथेच राहावे लागणार. अमेरिकेला पुन्हा आपल्याला कधीच जाता येणार नाही हे बेत्तीला पुरते ध्यानात येते. परंतु ती संघर्ष करते. अमेरिकेला परत जायचे हा तिचा ठाम निश्चय असतो. तिची झालेली फसवणूक, इराणमधील वातावरण, तिथलं जगण, तिथले संघर्ष, इराणमध्ये आल्यावर स्पष्ट झालेले डॉ. महमुदचे रूप या सार्यामुले तिचा मायदेशी परतण्याचा निर्धार दृढ होतो. पण हे काही सोपे काम नसते. अन् जरी ते शक्य झालेच तरी बेत्तीला आपली मुलगी माहतोबला गमवावे लागले असते. कारण इस्लामी कायद्यानुसार मुलांची मालकी नवर्याचीच असते. कोणत्याही परिस्थितीत ती आईला मिळू शकत नाहीत. अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये सुद्धा. बेत्तीला मात्र माहतोबला गमवायचे नसते. ती तिची मुलगी होती म्हणुन, तिच्यावर तिची माया होती म्हणुन आणि माहतोबच्या वाट्याला चांगल्या मनुष्याचे आयुष्य यावे म्हणुन. अमेरिकेला परतण्याच्या काही संधी तिला मिळतातही. पण तिला मुलीला सोडून जायचे नसल्याने तिची पंचाइत होते. अमेरिकन कायदाही याबाबत हतबल असतो.
या सार्या संघर्षात बेत्तीच्या वाट्याला काय येत नाही? मारहाण, शिव्याशाप, नजरकैद, अपमान, अनन्वित शारीरिक मानसिक छळ। सारेच काही. सोबतीला म्हणावे असे कोणीही नाही. परका देश, परका वेश, परका धर्म, संपूर्णपणे विरुद्ध टोकाची समाजव्यवस्था, जीवनशैली, पद्धती. आधारासाठी असलेल्यांचाही किती भरवसा धरावा हा पदोपदी सतावणारा प्रश्न. एक नरकाचं आयुष्य वाट्याला आलेलं. तिनी केलेले संतती प्रतिबंधक उपाय हासुद्धा तिच्यासाठी शाप ठरलेला. इतकी वाईट स्थिती. कुठे फोन करणं, कोणाशी संपर्क करणं हेही अवघड. जीवावर काय बेतेल याचा भरवसा नाही. प्रत्येक क्षण काळ होउन आलेला. अशा परिस्थितीत ती अवैध मार्गाने पलुन जाण्याचा मार्ग निवडते. इराणच्या सीमेवरील टोल्यांमध्ये खोमेनी व इराणबद्दल असलेला असंतोष तिच्या उपयोगी येतो. पण हा मार्गही सहजसाध्य नसतो.
थोडीही फट राहिली, कोणाला संशय आला, कोणाच्या हाती लागलं तर सरळ यमलोकच। आणि यातून निभावलं तरीही इराण- तुर्कस्तान सीमेवरचे पहाड आणि बर्फ पार करताना यमराज भेटणार नाहीतच याची काहीही शाश्वती नाही। मात्र हा सगला संघर्ष करून बेट्टी यशस्वीपणे मिशिगनला परत येते। मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या वडिलांना भेटते आणि माहतोबसह पुढचं आयुष्य जगते, एक माणूस म्हणुन। माणूस म्हणुन जगताना वाट्याला आलेले खडतर दुर्दैव झुगारून देण्याचे भगीरथ प्रयत्न, त्या प्रयत्नांच्या आड येणारे घटक, मानवी मनोविकासाच्या वाटचालीत अजुनही युगानुयुगे मागे असलेला समाज, त्याच्या धर्मश्रद्धा, अमानुषता, मानवी स्वभावातल्या खल प्रवृत्ती, या सार्याचा अंगावर शहारे आणणारा हा एक अत्यंत परिणामकारक प्रथमपुरुषी आलेख आहे. १९९७ साली मेहता प्रकाशनाने हे पुस्तक प्रसिद्ध केले तोपर्यंत तरी बेट्टी सुरक्षित होती, माहतोबच्या शीतल चन्द्रप्रकाशाच्या सहवासात. कोणी सांगावं भविष्य?
पुस्तकाचे नाव- नॉट विदाउट माय डॉटर
लेखिका- बेट्टी महमूदी
सहलेखक- विल्यम होफर
अनुवाद- डॉ. लीना सोहोनी
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस
khup sundar pustak parikshan...pustak wachen nakki.
उत्तर द्याहटवा