सोमवार, १८ एप्रिल, २०११

जल्लोष

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर जो जल्लोष करण्यात आला, त्यावर देवयानी जोशी यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले. त्यात त्यांनी अतिशय समर्पकपणे काही मुद्दे मांडले. त्यावर दुसरे मत असू शकेल असे किमान पत्र वाचताना तरी वाटले नाही. परंतु त्या जल्लोषाची दूसरी एक बाजू मांडून देवयानी जोशी यांचे काही मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न ममता खांडेकर यांनी एका पत्रातून केला. ही दोन्ही पत्रे वाचल्यानंतर काही मूलभूत गोष्टींवर चर्चा व्हायला हवी असे वाटते.
मुळात भारत-पाक सामन्यानंतर साजरा होणारा आनंदोत्सव आणि अंतिम सामना जिंकल्यानंतर साजरा होणारा आनंदोत्सव यात खूप फरक आहे. हा फरक समजून घेणे अवघडही नाही. तो अतिशय स्वाभाविक असाच आहे. पाकिस्तान या शेजारी देशाबद्दलची भारतीयांची भावना जगजाहीर आहे. पण पाकबद्दलचा हा राग म्हणजे भारतीयांची अखंड भारताबद्दलची आकांक्षा आहे असे म्हणणे भाबडेपणाचे आहे. ज्यू लोकांचे फार मोठे उदाहरण आज जगासमोर आहे. १००० वर्षे स्वतंत्र इस्रायलची आकांक्षा उरी बाळगून हाताशी एक इंचही भूमी नसताना त्यांनी जी विजयाकांक्षा दाखवली त्याची तुलना भारत-पाक सामन्यानंतर घालण्यात आलेल्या धुडगुसाशी करणे फारच हास्यास्पद ठरते. आजही अखंड भारताची आकांक्षा तेवत ठेवणारी मंडळी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अरविंद आश्रम हे काम करीत आहेत. अरविंद आश्रमात तर अखंड भारताचेच मानचित्र आजही लावले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गेल्या वर्षीच्या तृतिय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात घोष पथकाने अखंड भारताचे मानचित्र साकार केले होते. कालप्रवाहात आपल्या मातृभूमिचे तुकडे झाले आहेत. ही मातृभूमि पुन्हा अखंड व्हावी ही आकांक्षाही अतिशय योग्य आहे. ते नेमके केव्हा होईल, कसे होईल, त्याचे स्वरुप कसे राहील वगैरे बरेच प्रश्न भविष्याच्या गर्भात दडून बसले आहेत. त्यासाठी आज करता येणारे काम म्हणजे सकारात्मक जनप्रबोधन!! मात्र भारत-पाक सामन्यानंतरच्या धुडगुसात अखंड भारताची आकांक्षा शोधणे बरोबर ठरणार नाही.
दुसरा मुद्दा आहे शत्रु-मित्र भावाचा. पाकिस्तान भारताचा शत्रू आहे यात काहीच वाद नाही. त्यामुळे त्याच्या पराजयाचा आनंद होणे, तो आनंद थोडा अधिक असणे यातही काही गैर नाही. पण ज्यावेळी पाकिस्तानच्या आयाबहिणींचा उद्धार केला जातो तेव्हा ते अयोग्यच म्हटले पाहिजे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही. शत्रुशी कसे वागावे याचे मानदंडही या देशाने तयार केलेले आहेत. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून साडीचोळी देऊन परत पाठवली होती, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. छत्रपतींच्या भोवतालची परिस्थिति आजच्यापेक्षाही कितीतरी जास्त भयानक होती. पण शत्रूचे निर्दालन करताना सुद्धा काही नितीमुल्ये पाळणारा हा समाज आहे, हे राष्ट्र आहे. शत्रुच्या आयाबहिणी भोगण्यासाठी नसतात, त्यांचा सन्मानच करायचा असतो ही आमची संस्कृति आहे. अफजलखानाचा खात्मा केल्यानंतरही त्याचे दफन सन्मानाने करायचे असते, ही आहे आमची परंपरा. राम असो वा कृष्ण वा शिवाजी; शत्रुशी कसे वागायचे याचे नेमके दिशादर्शन त्यांनी केले आहे. हे लक्षात न घेता केवळ भगवा रंग धारण करणे किंवा `भारत माता की जय'च्या घोषणा देणे एवढयाने `कृण्वन्तो विश्वमार्यम'चे स्वप्न साकार होणार नाही.

-श्रीपाद कोठे,
नागपुर.

1 टिप्पणी: