शनिवार, २३ जुलै, २०११

प्रतिनिधित्व

छोट्या पडद्यावरील एका चर्चेत एक मुद्दा मांडला गेला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही हिन्दू समाजाचे प्रतिनिधित्व करत नाही. हा मुद्दा मांडणारे प्रतिनिधि राजकीय पक्षांचे होते आणि गैर राजकीय विश्लेषक देखील. हा मुद्दा मांडणारे कोणाचे आणि किती लोकांचे प्रतिनिधित्व करतात? या महान विचारवंतांनी हाक दिल्यावर ५-५० लोक तरी येतात का? पण हा मुद्दा बाजूला ठेवला तरीही एक प्रश्न उरतो की, प्रतिनिधित्व कसे समजून घ्यायचे. राजकीय पक्ष आणि त्यांना मिळणारी मते एवढा एकच मापदंड आहे का? आणि तोही किती खरा आहे? खरे तर तो फसवा आणि खोटाही आहे. फसवा एवढ्यासाठी की, मुळात मतदान होते ५० टक्क्याच्या आसपास. हे मतदान करणार्यांमध्ये विचारपूर्वक मतदान करणारे किती? निरक्षरता, विचारहीनता, देश; समाज; ध्येयधोरणे याविषयीची प्रचंड अनभिज्ञता, पैसा, अन्य प्रलोभने, धाक, गुंडगिरी या सार्याचं विश्लेषण करून काय हाती लागेल? आणि तरीही एखादा पक्ष, त्या पक्षातील नेत्यांचे कोंडाळे या देशाचे प्रतिनिधित्व करून त्याच्या स्वच्छतागृहांपासून परराष्ट्र व्यवहारापर्यंत सार्या गोष्टींचे नियमन करणार. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती? त्याच्यात काही बदल करायचे असतील तरी मग पुढील निवडणुकीपर्यंत वाट पाहा. म्हणजे तोवर बट्याबोळ करायला ते मोकळेच आणि त्या बट्याबोळाची किंमत चुकवायची कोणी? सर्वशक्तिमान जनतेने...!!! नाही तर रुळावरून उतरलेली गाडी रुळावर आणायला न्यायव्यवस्था, समित्या, चौकशा आहेतच. त्यांचे काम होत नाही तोवर पुन्हा निवडणुका... तमाशाला अंत नाही. १९४७ साली देश इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाल्यापासून एकदाही या देशात खर्या अर्थाने देशाचे, जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सरकारच आले नाही. अगदी राजीव गांधी यांना ४०० च्यावर जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्या तेव्हाही नाही.
अशा प्रकारचे प्रतिनिधित्व शक्य आणि योग्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. अनेक मुद्दे येतील, अनेक गोष्टींचा खल करावा लागेल. पण असा मुळातून विचार करण्याची तयारी कोणाची आहे? विविध राजकीय पक्ष, नोकरशाही, जातीपातीचे, भाषांचे, छोट्या मोठ्या विषयांचे गटतट, पत्रकार, विचारवंत, चिंतक, लेखक, साहित्यिक कोणीही यासाठी तयार नाहीत. जे काही चिंतन, विचार होतो तो जागच्या जागेवर चालणार्या कदमतालसारखा. मुळातून काहीच नाही. हितसंबंधांचे जाळे कल्पनेच्या पलिकडे विणले गेलेले आहे. अगदी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या राजकीय पक्षांचेही हितसंबंध आपसात गुंतलेले असतात. बाकीच्यांची बातच सोडा. अशा प्रकारचा काही मुद्दा मांडणे म्हणजे घटनाविरोधी कृत्य, देशद्रोह, राष्ट्रद्रोह वगैरे नाही हेदेखील शांत चित्ताने समजून घ्यायला हवे. आणखीही एक मुद्दा म्हणजे राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच सारे काही असे समजण्याचा. राजकारण, राजकीय पक्ष, सत्ता, त्यांचे करणे किंवा बोलणे म्हणजेच संपूर्ण समाज, देश, त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमान...!!! त्याचे सारे क्रियाकलाप. या अतिशय गचाळ मनोवृत्तीतून आपण बाहेर पडणार आहोत की नाही कधी?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिन्दू समाजाचे प्रतिनिधित्व करतो की नाही याकडे या दृष्टीने आणि या पार्श्वभूमीवर पाहायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश वा अपयश असे समजणे हा शुद्ध निर्बुद्धपणा आहे. पण राजकारणाची काविळ झालेल्या आपल्या मन-बुद्धीला हे पटणेही कठीण आहे. केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये संघाचे भरपूर काम आहे. केरळमध्ये तर गेल्या वर्षी १ लाख पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवकांचा जाहीर कार्यक्रम झाला होता. त्याला सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत उपस्थित होते. इ.स. २००६ साली श्री. गुरूजी जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण केरळ प्रांतात संघाच्या घोष विभागाचा एक अनोखा कार्यक्रम झाला होता. त्याचे नाव होते राष्ट्र रक्षा पथसंचलन. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले स्वयंसेवक केरळ प्रांतातीलच होते. त्यात सहभागी झालेली जनता केरळचीच होती. त्यासाठी जे जे सहकार्य लागले ते केरळीय जनतेनेच केले. असे असूनही तेथे भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार वा खासदार नाही. मग संघ केरळचे काहीच प्रतिनिधित्व करीत नाही असे म्हणायचे का? आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो शाखा आहेत. सुमारे दीड लाख विविध सेवा प्रकल्प आहेत. संघ प्रेरणेतून निर्माण झालेल्या आणि त्या विचारांशी बांधिलकी बाळगणार्या सुमारे तीन डझन देशव्यापी संघटना आहेत. त्यात विद्यार्थ्यांपासून शेतकर्यांपर्यंत, कामगारांपासून कलाकारांपर्यंत समाजाच्या सगळ्या वर्गातील आणि स्तरातील लोक आहेत. त्यात सातत्याने विविध मुद्यांचा खल होत असतो, विचारमंथन होत असते. कार्यक्रम होत असतात.
एकूण समाजासोबतच हिन्दू धर्म म्हणून विचार केला तरीही; विविध शंकराचार्य, अन्य मठ, मठाधीश, पीठे, पीठाधीश, वारकरी, जैन, शिख, बौद्ध आदी संप्रदाय, लाखो मठ, मंदिरे यांच्याशी संघाचा संपर्क आहे. त्यांना संघ अस्पृश्य नाही. संघ वा संघ परिवारातील कार्यक्रमांना त्यांची उपस्थिति असते. त्यांचा सहभाग आणि सहयोगही असतो. हे सारे अक्षरश: मोजदाद करता न येण्यासारखे आहे. भारतीय मजदूर संघ असो वा विद्यार्थी परिषद त्या त्या क्षेत्रातील त्या आज देशातील सगळ्यात मोठ्या संघटना आहेत. हिन्दू समाजातील अस्पृश्यतेसारख्या रुढी घालवण्यासाठी संघाने विविध मार्गांनी आणि अंगांनी जे बहुमुखी व भरीव काम केले आहे ते तर अद्भुत आहे. देशातील इतर कोणत्याही राजकीय अथवा गैर राजकीय संघटनेपेक्षाही संघ आज अधिक प्रमाणात आणि अधिक खोलवर पसरला आहे, रुजला आहे. निर्विवादपणे संघ हिंदूंचा, या समाजाचा, या देशाचा एक सशक्त, प्रबळ प्रतिनिधि आहे. तरीही संघ असा दावा करीत नाही की तो एकमेव प्रतिनिधि आहे आणि हे लक्षणीय आहे. संघाचा पाया किती मजबूत आहे आणि संघ किती जमिनीवर राहून विचार करतो याचेच हे द्योतक आहे. पण लक्षात घेतो कोण?
प्रतिनिधित्व या विषयाच्या अनुषंगाने आणखीही एका मुद्याचा विचार करायला हवा. एखादा निर्णय घेताना वा एखाद्या गोष्टीचा विचार करताना प्रतिनिधित्व ही एकच गोष्ट सर्वोच्च महत्वाची आहे का? खरे तर शेकडो वर्ष आधीच संत तुकारामांनी याचे नि:संदीग्ध उत्तर दिले आहे. ते म्हणतात-
`सत्य असत्यासी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता'
परंतु एवढे सत्यान्वेषी मन, एवढी पारदर्शी प्रज्ञा, मुख्य म्हणजे निखळ प्रामाणिकता आणि स्वार्थरहितता आपल्याकडे किती शिल्लक आहे?

-श्रीपाद कोठे
नागपूर,
शनिवार दि. २३ जुलाई, २०११

1 टिप्पणी: