बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

गांधींचे अर्थचिंतन

इंग्रजांविरूद्धचे स्वातंत्र्य आंदोलन चालवित असतानाही महात्मा गांधींना सतत एक चिंता लागून राहिलेली असे. ती म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या समाजाचे, देशाचे चित्र काय राहील आणि काय राहावे? त्यांच्या स्वप्नातील चित्राचे नाव होते रामराज्य. त्यासाठीचा त्यांचा मार्ग होता अंत्योदय. त्याला अनुसरूनच गांधीजींनी असंख्य विषयांवर आपले विचार व्यक्त केले. त्यांच्या या विचारांना, चिंतनालाच `गांधी विचार' म्हटले जाते. वास्तविक आपला असा काही विचार वा तत्वज्ञान नाही असे गांधींनीच स्वत: म्हटले आहे. १९६९ साली गांधी जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचे वर्गीकरण करून विविध विषयांवरील त्यांचे विचारधन संकलित करण्यात आले. गांधींनी अर्थकारण, अर्थव्यवस्था यावरही भरपूर विचार मांडलेले आहेत. परंतु त्यास अर्थशास्त्र म्हणता येणार नाही. ते स्वत:देखील तसे म्हणत नसत. कारण त्यांनी एखाद्या ग्रंथालयात वा विद्यापीठात बसून शास्त्रशुद्ध पद्धतीने अर्थशास्त्र मांडलेले नाही. तर दैनंदिन जीवन जगताना त्यांना जे-जे जाणवले त्यातून आणि जगभर चालणार्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी लक्षात घेउन काही मूलभूत गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या आहेत. रुढ़ अर्थाने ते शास्त्र नाही, ते अर्थचिंतन आहे आणि शास्त्राला मार्गदर्शन करण्याची त्याची क्षमता आहे.
ईशावास्योपनिषद, जैन पंथ, tolstoy, रस्किन यांचा त्यांच्या अर्थचिंतनावर प्रभाव आहे. ईशावास्योपनिषदाचा पहिला मंत्र आपल्या अर्थशास्त्राचा आधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. `हे सारे विश्व ईश्वराचे आहे. त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्यायला हवा. कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.' असा त्या मंत्राचा अर्थ आहे. थोडक्यात म्हणजे, सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा स्वामी ईश्वर असून आपण फक्त त्या धनसंपत्तीचे विश्वस्त आहोत, असे गांधीजींचे म्हणणे होते. त्यातूनच त्यांनी विश्वस्त विचार मांडला. या विश्वस्त भावनेच्या अभावी आज दिसेल ती गोष्ट हडपण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. सार्वजनिक संपत्ती, सरकारी मालमत्ता, कार्यालयीन सामान वगैरेची आज कशी वासलात लावली जाते हे सारेच जाणतात. पर्यावरणाचे रक्षण करून सर्व प्रकारच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी विश्वस्त विचार साहाय्यक ठरू शकतो. सर्व प्रकारच्या उत्पादन व उपभोग पद्धतीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मन:संयम हा त्यांच्या विश्वस्त विचाराचा पाया आहे.
`ही पृथ्वी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करू शकते, पण कुणाचीही हाव मात्र ती पूर्ण करू शकत नाही' हा त्यांचा आणखीन एक मौलिक विचार आहे. विकास आणि जीवनमान ऊंचावण्याची जी झिंग चढलेली आज पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा विचार अधिकच ठळकपणे नजरेत भरतो. चांगले जीवन जगणे आणि जीवनमान ऊंचावण्याची अघोरी स्पर्धा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घेण्याची गरज आहे. `प्रत्येकाला भाजीभाकरी मिळायलाच हवी, एवढेच नाही तर दूध- तूपही मिळायला हवे' असे खुद्द गांधींनी म्हटलेले आहे. याचा आशय समजून घ्यायला हवा. चांगले सुखी जीवन जगण्याला त्यांचा विरोध नव्हता. आज जी हाव आणि झिंग पाहायला मिळते त्यातूनच भू-माफिया, रेती-माफिया, तेल-माफिया वगैरे अनेक प्रकारचे माफिया उदयाला आले आहेत. जगभरात सध्या पिण्याच्या पाण्यावरून होत असलेले संघर्ष आजच्या अघोरी स्पर्धेचीच परिणती आहे.
आज सारं जग अमेरिका होण्याची स्वप्नं पाहत आहे. परंतु आजचे मापदंड जसेच्या तसे ठेवूनही सार्या जगाला अमेरिका करायचे असेल तर अशा किती पृथ्वी लागतील याचा विचार कोणी करीत नाही. असा विचार कधी पुढे आलाच तर वरच्या स्तरातील लोकांनी आपला जीवनस्तर थोडा खाली आणायला हवा यावर भर देण्याऐवजी; ज्यांना दोन वेळचे पोटभर खायलाही मिळत नाही, सकाळचे मिळाले तर संध्याकाळचे काय असा ज्यांचा संघर्ष आहे; त्यांनाच जीवनस्तर आणखीन घटवण्याचे सल्ले देण्यात येतात. सुमारे वर्षभरापूर्वी केंद्रिय अर्थमंत्र्यांनी विधान केले होते की, विकसनशील देशातील लोक जास्त खायला लागल्याने महागाई वाढू लागली आहे. त्यांचे हे विधानच निर्णय प्रक्रियेतील लोक कशा पद्धतीने विचार करतात, त्यांच्या विचारांची दिशा कोणती आहे ते स्पष्ट करणारे आहे.
याच ठिकाणी गांधीजींचा आणखी एक विचार मोलाचा ठरतो. तो म्हणजे अंत्योदय. कोणतेही काम करताना, कोणतीही योजना करताना, आपल्या कामाचा वा योजनेचा परिणाम काय होईल याचा विचार करताना समाजातील अगदी शेवटच्या व्यक्तीचा प्रथम विचार करा. त्याचा चेहरा डोळ्यापुढे येऊ द्या, असे गांधींचे मत होते. आज नेमके याच्या उलट होत असल्याने प्रचंड मोठा आर्थिक, सामाजिक असमतोल निर्माण झालेला पाहायला मिळतो. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण अशा वेगवेगळ्या नावांनी जे सारे प्रयत्न सुरू आहेत त्यांचे परिणाम अपेक्षेच्या नेमके विरुद्ध होत असल्याचे जगभर पाहायला मिळते. या सार्याचे महत्वाचे कारण म्हणजे आज व्यवस्थांचा विचार होतो, पैसा, धन, संपत्ती यांचा विचार होतो परंतु हे सारे ज्या माणसासाठी आहे त्याचा विचार मात्र होतच नाही. माणसाचा माणूस म्हणून विचार होणे निकडीचे आहे.

माणूस हा केवळ आर्थिक प्राणी नाही. माणूस केवळ इच्छा, गरजा, वासना यांचे गाठोडे नाही. या गोष्टी माणसाच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग आहेतच, पण केवळ त्यांना खतपाणी घालून, त्याच्या मनातील स्वार्थ आणि वासना यांना आवाहन करून मानवाचे सुखी, शांततापूर्ण सहजीवन उत्पन्न होऊ शकत नाही. त्याच्या मनात चांगुलपणा, भलेपणा, दुसर्याचा विचार करण्याची वृत्ती, करुणा, खाणे-पिणे, मौजमजा यापलीकडे जाण्याची वृत्ती, या जगाला आणि जगव्यापाराला समजून घेण्याची उत्सुकता हे सारे असते. सोबतच उपभोगाच्या सार्या वस्तूंचा कितीही उपभोग घेतला तरीही सुख नावाची गोष्ट हाती लागत नाही ही वस्तुस्थिती... या सार्याचा विचार म्हणजे माणसाचा विचार करणे. माणसाचं जगणं आणि माणसाचं सुख याची सांगड घालणे हेही महत्वाचे.
गांधींनी हा सारा विचार केला. म्हणूनच ते म्हणतात की, माणसाला पैसा मिळवण्यासाठी ६ तासापेक्षा जास्त काम करण्याची गरज नसावी. त्याला मोकळा वेळही मिळायला हवा. कारण असा मोकळा वेळ मिळेल तेव्हाच त्याची सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैचारिक, आध्यात्मिक प्रगती होईल आणि तो माणूस म्हणून जगू शकेल. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी त्याची अवस्था होऊ नये. पैसा, सुखाची साधने वाढत आहेत परंतु माणूस आणि माणुसकी लुप्त होते आहे असे आज सर्वत्र ऐकायला मिळते. असे का होते? याच्या मुळाशी जाण्याची आणि आजच्या विपरीत प्रवाहाला योग्य वळण देण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती क्वचित पाहायला मिळते. मानवतेच्या याच वळणावर सशक्त मार्गदर्शन करायला गांधी उभे आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २ ऑक्टोबर २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा