बुधवार, ५ ऑक्टोबर, २०११

रा. स्व. संघाचा दसरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दसरा म्हणजेच विजयादशमी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। इ.स. १९२५ च्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. त्यामुळे हा संघाचा स्थापना दिवसही आहे. १६२६ च्या विजयादशमीला हा उत्सव वार्षिकोत्सव म्हणूनच साजरा केला गेला. त्या दिवशी सायंकाळी एक बैठक संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या घरी झाली. बैठक संपल्यावर पानसुपारी झाली आणि बैठकीतील सारे जण सीमोल्लंघनासाठी नागपूरच्या राजाबाक्षा हनुमान मंदिरात गेले आणि प्रथेप्रमाणे त्यांनी सोने लुटले. हा पहिला उत्सव सुद्धा रा. स्व. संघाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात आला नाही तर वार्षिकोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतर मात्र हळूहळू या उत्सवाचे स्वरूप अधिक ठोस होत गेले. गेली सुमारे १२ तपे हा उत्सव शक्तीची उपासना आणि विजयाकांक्षेचे स्मरण म्हणून साजरा करण्यात येतो. विस्कळीतपणा दूर होऊन समाज संघटित व्हायला हवा. संघटित अवस्था हीच समाजाची स्वाभाविक अवस्था आहे. हा संघटितपणा समाजाच्या अंगोपांगात भिनायला हवा. ही अवस्था उत्पन्न करण्यासाठीच संघ काम करतो आहे. हे काम करण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. विजयादशमी हा हिन्दू परंपरेत शक्तीच्या उपासनेचा महोत्सव आहे. सर्वत्र या काळात शक्तीचे जागरण करण्यात येते. रामाचा रावणावरील विजय, पांडवांचा अज्ञातवास संपून त्यांनी पुन्हा शस्त्र धारण करणे, दुर्गादेवीने महिषासुराचा वध करणे, कौत्सला सुवर्ण दक्षिणा देण्यासाठी रघु राजाने केलेले सुवर्ण दान, व्यक्तीव्यक्तीच्या मनातील दुर्बलतेचा नाश होऊन चेतना जागृत व्हावी यासाठी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीनही रुपांचा एकत्रित आविष्कार असलेल्या दुर्गेची उपासना, शत्रुवर, दुर्गुणांवर, दुर्बलतेवर मात करून विजय मिळवण्याचा संदेश देणारा म्हणून साजरा होणारा विजयादशमी उत्सव संघातही त्याच हेतूने साजरा केला जातो. स्थापना दिवस म्हणून नव्हे.
रा. स्व. संघाच्या स्थापनेनंतर थोड्याच काळात संघाचे लष्करी स्वरूप, त्याच्या शाखा, शारीरिक कार्यक्रम, कवायती, संचलन हे सारे विकसित झाले आणि नंतर विजयादशमीच्या उत्सवातही त्याची झलक पाहायला मिळू लागली. सुरुवातीला हा उत्सव आश्विन शुद्ध नवमी व आश्विन शुद्ध दशमी असे दोन दिवस होत असे. नवमीला सायंकाळी शस्त्रपूजन उत्सव होत असे. त्या दिवशी नागपुरातील सर्व स्वयंसेवक धोतर-कुडता वा पायजामा-कुडता आणि डोक्यावर संघाची काळी टोपी अशा वेशात शस्त्रपूजन उत्सवाला उपस्थित राहत असत. संघाचे घोषपथक मात्र पूर्ण गणवेषात, घोषवादन करत असे. त्या कार्यक्रमात सरसंघचालक, नागपूरचे संघचालक आणि प्रमुख पाहुणे शस्त्रांची पूजा करत. त्यानंतर प्रमुख पाहुणे व सरसंघचालकांचे मार्गदर्शन होत असे. स्वयंसेवकांचे कुटुंबीय आणि निमंत्रित नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित राहत असत. दुसर्या दिवशी म्हणजे विजयादशमीला सकाळी सीमोल्लंघनाचा मुख्य उत्सव होत असे. पहाटे नागपुरातील सर्व स्वयंसेवकांचे घोषाच्या तालावर पथसंचलन होत असे. त्यानंतर मुख्य कार्यक्रम. त्यात व्यायाम योग, दंड, योगचाप, योगासन, सूर्य नमस्कार, नियुद्ध, घोषवादन व संचलन अशी विविध शारीरिक कार्यक्रमांची प्रात्यक्षिके होत असत. तरुण स्वयंसेवकांसोबतच बाल व शिशू स्वयंसेवकांची प्रात्यक्षिकेही या उत्सवात होत असत. दोन्ही दिवशी भाषणांपूर्वी सांघिक व वैयक्तिक गीतही गायले जात असे. त्यानंतर प्रमुख पाहुणे व सरसंघचालक यांचे मार्गदर्शन होत असे. या कार्यक्रमालाही स्वयंसेवकांचे कुटुंबीय व निमंत्रित नागरिक उपस्थित राहत असत. विजयादशमी उत्सवातील सरसंघचालकांचे भाषण विशेष महत्वाचे समजले जाते. संघाचे आगामी वर्षभरातील धोरण काय राहील याचा संकेत सरसंघचालक या भाषणातून देत असतात.
संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संघावरील बंदीचा काळ वगळता विजयादशमीच्या आयोजनात खंड पडलेला नाही. या विजयादशमीच्या उत्सवात बदलही होत आले आहेत. काही वर्षे हा उत्सव नागपूरच्या पटवर्धन मैदानावर होत असे. त्यावेळी संघाचे मुख्यालय असलेल्या मोहिते संघस्थानावरून पथसंचलन निघत असे. तसेच कार्यक्रम संपल्यावर पुन्हा पथसंचलन करीत स्वयंसेवक मोहिते संघस्थानावर परत येत असत. पटवर्धन मैदानानंतर अनेक वर्षे हा उत्सव प्रसिद्ध अशा कस्तुरचंद पार्क मैदानावर होत असे. बाकी सारा कार्यक्रम तसाच राहत असे. बाल व शिशू स्वयंसेवकांना नेण्या आणण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत असे. यावेळी नवमीचा शस्त्रपूजनाचा उत्सव रेशिमबाग मैदानावर होत असे. कालांतराने बाल व शिशू स्वयंसेवकांचा पूर्ण गणवेशातील उत्सव व त्यांची प्रात्यक्षिके शस्त्रपूजन उत्सवात होऊ लागली आणि तरुण स्वयंसेवकांचा उत्सव दशमीला स्वतंत्रपणे होऊ लागला. संख्यावाढ आणि नागपूरचा विस्तार या दोन गोष्टींमुळे यातही बदल होत गेला आणि गेली काही वर्षे बाल व शिशू स्वयंसेवकांचा उत्सव व शस्त्रपूजन उत्सव नागपूरच्या विविध भागात होत आहे. असे साधारण चार उत्सव होतात. हे उत्सव देवीचे नवरात्र सुरू झाल्यानंतर सोयीचा दिवस पाहून आयोजित केले जातात. मध्यंतरी काही वर्षे तरुणांची प्रात्यक्षिके आणि सरसंघचालकांचे प्रमुख भाषण हा कार्यक्रम नवमीला घेऊन दशमीच्या दिवशी सकाळी केवळ पथसंचलन असे आयोजन करण्यात आले होते. नागपूरच्या विविध भागातून हे भव्य पथसंचलन होत असे. त्यामुळे विविध भागातील नागरिकांनाही संघाच्या पथसंचलनाचा परिचय झाला. संघाचे विजयादशमीचे हे भव्य पथसंचलन हा थाटाचा आणि आकर्षणाचा विषय असतो. आता पुन्हा विजयादशमीचा तरुण स्वयंसेवकांचा उत्सव पूर्वीसारखाच दशमीला सकाळी होतो. सकाळी पथसंचलन, नंतर प्रात्यक्षिके, गीत, भाषणे असा हा भरगच्च कार्यक्रम असतो.
बाळासाहेब देवरस सरसंघचालक असेपर्यंत म्हणजे १९९४ पर्यंत नागपूरच्या विजयादशमी उत्सवाचे आणखीन एक वैशिष्ट्य होते. वर्षातून एवढा एकच दिवस सरसंघचालक पूर्ण गणवेशात उपस्थित राहत असत. अन्य कार्यक्रमांना, शिबिरांना, संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला वगैरे सरसंघचालक गणवेशात पाहायला मिळत नसत. गोळवलकर गुरुजीही दसरा उत्सवाला पूर्ण गणवेशात उपस्थित राहत. फक्त टोपी मात्र घालत नसत. बाकी गणवेश असे. रज्जुभैया सरसंघचालक झाल्यापासून मात्र सरसंघचालकांचा गणवेश ही विशेषता राहिली नाही. कारण त्यांनी ज्या-ज्या कार्यक्रमात स्वयंसेवक गणवेशात असतील त्या कार्यक्रमांना गणवेशात उपस्थित राहणे सुरू केले. त्यानंतरच्या सरसंघचालकांनीही ती परिपाठी स्वीकारली.
नागपूरच्या या दसरा उत्सवाला विविध क्षेत्रातील, विविध प्रांतातील महनीय व्यक्तींना अध्यक्ष म्हणून बोलावण्याचा प्रघात आहे. त्या निमित्ताने त्या व्यक्तींना संघाचा, संघ विचारांचा परिचय व्हावा व संघाचे वर्तुळ वाढावे हा प्रयत्न असतो. हृदयनाथ मंगेशकर, भैयुजी महाराज, तरुण सागर जी महाराज, सीबीआयचे माजी संचालक जोगिन्दर सिंह, पत्रकार अरुण शौरी, दलित नेते राजाभाऊ खोब्रागडे, पंजाबचे इतिहासाचे अभ्यासक डॉ. अत्तर सिंह, प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर, शंकराचार्य, हिंदी साहित्यिक डॉ. शैलेन्द्रनाथ श्रीवास्तव, पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह, पद्मश्री डॉ. झिटे अशी विविध क्षेत्रातील मंडळी या उत्सवाला आलेली आहेत.
रा. स्व. संघाच्या दसरा उत्सवाचा भाग नसलेला पण संघ व दसरा या दोन्ही गोष्टींशी संबंध असलेला एक अनौपचारिक असा आणखीन एक कार्यक्रम आहे. संघाच्या एकूण कार्यपद्धतीत त्याचेही एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दसर्यानिमित्त संध्याकाळी सोने म्हणून शमीची वा आपट्याची पाने लुटण्यात येतात. ही पाने देवाला, वडील माणसांना देऊन त्यांचे आशीर्वाद घेणे, स्नेह्यांना, बरोबरीच्या सोबत्यांना ही पाने देऊन त्यांची गळाभेट घेणे अशी एक प्रथा विदर्भात आहे. संघाचे अनेक स्वयंसेवक रेशीमबागेत त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीवर सोने वाहायला संध्याकाळी येतात. स्वत: सरसंघचालकही या दोन्ही श्रद्धास्थानांचे दर्शन घेउन सोने वाहतात आणि त्यानंतर थोडा वेळ त्या ठिकाणी असतात. या वेळात तेथे येणारे स्वयंसेवक दोन्ही समाधींना सोने वाहिल्यावर सरसंघचालकांनाही सोने देतात. या निमित्ताने स्वयंसेवक व सरसंघचालक यांच्यात अनौपचारिक संवाद होतो. स्वयंसेवकांसोबतच कुटुंबीयांचीही ओळख होते. स्वयंसेवकांचा, अन्य अधिकार्यांचा परस्पर परिचय होतो. यातून एक भावबंध निर्माण होतो. संघाच्या एकूण कार्यपद्धतीत अशा प्रकारच्या अनौपचारिक भावबंधाला अतिशय मोलाचे स्थान आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ६ ऑक्टोबर २०११

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा