बुधवार, १० डिसेंबर, २०१४

समता म्हणजे विषमतेचे व्यवस्थापन

इंग्रजांच्या आमदानीपासून आमच्यात सगळ्यात मोठा बदल जर कुठला झाला असेल तर आम्ही स्वत:ची अक्कल गहाण टाकायला सोकावलो. त्यातूनच आत्मनिषेध, आत्महीनतेचा प्रादुर्भाव झाला. मग बाहेरचे म्हणजे जणूकाही सगळे स्वर्गीय, अचूक, नेमके, कल्याणकारी वगैरे असे समीकरण झाले. अनेक कल्पना, संकल्पना, घोषणा यांचे असे झालेले आहे. `समता' ही एक अशीच बाब. कुठली तरी प्रतिक्रिया म्हणून देण्यात आलेल्या या नाऱ्याचे सखोल विश्लेषण करण्याची तसदी कधी घेण्यात आली आहे का? समता नावाची गोष्ट खरेच आहे का आणि असू शकते का?

एक बाब निर्विवाद आहे की, या जगाच्या मुळाशी समता असेल तर कोणीही आणि जगातील कोणतीही शक्ती विषमता निर्माण करू शकत नाही. अशी विषमता निर्माण केली तरी ती जास्त काळ टिकणार नाही. अन दुसरीही गोष्ट तेवढीच खरी आहे की, या जगाच्या मुळाशी विषमता असेल तर जगातील कोणतीही शक्ती समता निर्माण करू शकणार नाही. आजूबाजूला एक धावती नजर टाकली तरीही समता नसून विषमता हेच जगाचे वास्तव असल्याचे सहज दिसून येते. एवढेच नव्हे तर समता आम्हाला मनानेही मान्य नसते. आम्ही कोणापेक्षा तरी चांगले/ उजवे/ सुंदर/ मोठे/ श्रेष्ठ/ ज्ञानी/ शहाणे/ कर्तृत्ववान असायलाच हवे असतो. आजवरचा इतिहास देखील विषमतेचाच पक्षधर ठरलेला आहे. अमक्याने असे केले, तमक्याने तसे केले, त्यासाठी व्यवस्था जबाबदार वगैरे वितंडवाद योग्य नाही. कारण समतेसाठी झालेले प्रयत्न त्याच व्यक्तींच्या वा व्यवस्थांच्या विरोधातच झालेत ना? मग मुद्दा फक्त यश वा अपयश एवढाच उरतो. त्यात समतेचा पक्ष नेहमी अपयशी ठरत आलेला आहे. कारण मुळात या विश्वाच्या मुळाशी समता नाही. उत्तर आणि दक्षिण ध्रुव परस्पर विरोधी आहेत आणि म्हणूनच पृथ्वीचा समतोल निर्माण झाला आहे. आपल्याला वरवर असमान, म्हणूनच विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमुळे समतोल निर्माण होतो.

मात्र या देवदत्त, निर्मितीच्या मुळाशी असलेल्या विषमतेचा उपयोग करून स्वार्थ, अन्याय, अत्याचार, दुराचार यांचा हैदोस घातला जाऊ शकतो/ घातला जातो. त्यामुळेच मानवाने आजवर या विषमतेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. जगात झालेले प्रयत्न हे विषमतेच्या योग्य व्यवस्थापनाचेच होते. विषमतेएवढ्याच या जगाच्या मुळाशी असलेल्या करुणेने आणि समतेच्या तेवढ्याच मुलभूत ओढीने माणसाला या व्यवस्थापनासाठी प्रवृत्त केले. अमेरिकेतील श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील विषमता दूर करून गुलामी दूर करण्याचे झालेले प्रयत्न आणि त्यानंतर आजवर जर काही होत असेल तर ते विषमतेचे व्यवस्थापन होय. अगदी आपली राज्यघटनासुद्धा समता निर्माण करू शकली नाही आणि समता निर्माण करू शकणार नाही. ती फक्त विविध प्रकारच्या विषमतेचे व्यवस्थापन करते. कारण समता ही मानवी मनाची उच्च भावना आहे. त्या भावनेची धारणा जेवढ्या प्रमाणात होईल तेवढी समता अनुभवास येईल. अन मानवी भावना उपजत असतात आणि बाह्य परिस्थितीचा त्यावर परिणाम होऊन त्या आकार घेतात. त्यामुळे त्या कधीही समान राहूच शकत नाहीत.

आपल्या देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्था, तसेच मनुस्मृती आदी गोष्टी विषमतेच्या व्यवस्थापनाचेच प्रयत्न होते. अगदी डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा मनुला एक सामाजिक शास्त्रज्ञ म्हटले होते ते उगाच नव्हे. व्यवस्था, त्यातील त्रुटी, त्या बदलण्याची गरज यावर चर्चा होत आली आहे आणि व्हायलाही हवी. अन तसेही या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी काळाच्या भक्ष्यस्थानी पडत नाही. आपले पोषण करणारे सुग्रास भोजन सुद्धा दुसऱ्या दिवशी विष होते. मग एखादी व्यवस्था बिघडली, अपुरी ठरली, त्यात दोष आलेत तर आकाशपाताळ एक का करावे? विचारांशी वैरच करायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण प्रामाणिक आणि गंभीरपणे विचार करायचा असेल तर या सगळ्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतील. आपल्या देशातील जुन्या व्यवस्था, जुने ग्रंथ, जुन्या चालीरीती, जुन्या परंपरा यांचा विचार करताना, त्याविषयी बोलताना हे भान राखले जायलाच हवे. अन नवीन घडी बसवताना मुळाशी जाऊन विचार करायला हवा. त्याला अन्य उपाय नाही.

याचा अर्थ हे लिहिणाऱ्याला पुन्हा चातुर्वर्ण्य आणायचे आहे, अस्पृश्यतेला त्याचे समर्थन आहे, तो समाजविरोधी आहे वगैरे अर्थ ज्यांना काढायचे असतील त्यांच्यासाठी- `आमेन !!'

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा