सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५

`मी'ची गंमत !!

मी!! एक अक्षर म्हणायचं की, एक शब्द. खरं तर एक अख्खं वाक्य म्हटलं तरी कमीच वाटेल. `मी'चं वर्णन करायचं तर त्याला किमान एक विश्व म्हणायला हवं. तेच त्याचं यथार्थ वर्णन. एक संपूर्ण विश्व! काय काय येतं त्यात? शरीर, मन, बुद्धी, भाव, भावना, सुख-दु:ख, आनंद-वेदना, एकवचन- बहुवचन, एकाकीपण, सामूहिकता, भूत- वर्तमान- भविष्य; आणि काय काय... `मी'पण फार वाईट, असा उपदेश कानीकपाळी ऐकायला मिळतो; तर `मी'च्या जाणीवेशिवाय एक पाऊलही पुढे टाकता येणार नाही अशी स्थिती. या `मी'मध्ये कशाकशाचा समावेश करायचा अन कशाचा नाही या विवंचनेत असतानाच, `मी' धरायचा की सोडायचा हा यक्षप्रश्न छळत राहतो.

या `मी'ची सार्वत्रिकता देखील गमतीशीर आहे. हा मी सार्वकालिक, सार्वदेशीक आणि सर्वस्थित असा आहे. कोणीही व्यक्ती स्वत:ची ओळख करून देईल तर म्हणेल `मी'. नाव वगैरे नंतर. म्हणजे अमुक नाव आहे ते कोणाचे तर `मी'चे. अशोक, महेश, सुनील, गौतम, ओंकार किंवा सुनिता, मनीषा, वैशाली, कविता, लीला, लैला कोणीही स्वत:ची ओळख सांगेल `मी'. माणसेच कशाला गायी, म्हशी, वाघ, बकऱ्या, पोपट, हरणे, कावळे, चिमण्या बोलू लागले तर म्हणतील- मी. प्राणहीन, निर्जीव समजले जाणारे टेबल, खुर्ची, पेन, पेन्सिल, भांडीकुंडी, कपडेलत्ते हेदेखील समोर उभे ठाकले तर म्हणतील- मी. पंचमहाभूते म्हणतील मी. एवढेच कशाला, कल्पना करा की; मरण पावल्यावर आपण दूर उभे राहून देहाकडे पाहत आहोत तेव्हाही आपण `मी'चा हात सोडणार नाही. म्हणजे त्या निष्प्राण देहाकडे कोण पाहील, तर - मी. गेल्या जन्मी मी अमुक होतो किंवा पुढील जन्मी मी अमुक होईन वा अमुक करेन, अशी वाक्ये तर आपण ऐकत बोलत असतोच. म्हणजे `मी' कोणीतरी आहे आणि आपल्या नावासकट सारे काही त्याला चिकटलेल्या उपाधी आहेत.

आपल्याला या गोष्टीची जाणीवही नसते, तरीही व्यवहार मात्र तसाच असतो. बरे या `मी' मध्ये कुठला फरकही नाही. तसा असता तर वेगवेगळ्या देहांना जशी वेगवेगळी नावे आहेत तशी त्याला विविध नावे राहिली असती. मात्र तसे दिसून येत नाही. सगळ्यांच्या `मी'ला `मी'शिवाय दुसरे वर्णन नाही अन संबोधनही. एक जण दुसऱ्याला एखादे संबोधन वापरतो किंवा एखादे नाव त्यासाठी वापरतो तेव्हा त्याचा अर्थ `तू' असतो. हा तू खूप साऱ्या नावांनी अन लक्षणांनी व्यक्त करता येतो, पण `मी'चे तसे नाही. `मी' म्हणजे फक्त `मी'. याचा दुसरा अर्थ हा की, `मी' ही एकच वस्तू आहे. मी या दोन किंवा अधिक वस्तू असत्या तर त्यांचे वर्णन वा संबोधन वेगवेगळ्या रीतीने करता आले असते. पण तसे करता येत नाही. म्हणून निष्कर्ष काढावा लागतो की, `मी' ही एकच वस्तू आहे. याचा, त्याचा, त्याचा असे वेगवेगळे मी नाहीत. सगळ्यांचा अस्तित्वाचा जो विशिष्ट बोध आहे तो म्हणजे `मी' आणि `मी' उच्चारल्यानंतर जो विशिष्ट बोध होतो तो सगळ्यांचा सारखाच.

बरे, हा `मी' वजा केला तर काय उरेल? कशाचेही अस्तित्वच उरणार नाही. कारण चांगले-वाईट, सुख-दु:ख, योग्य-अयोग्य, प्रेम-द्वेष, आकर्षण-अपकर्षण या साऱ्याचा अनुभव येतो कोणाला, तर `मी'ला. हा मी नसलाच तर अन्य कशालाही अस्तित्व नाही. `मी' असेल तर अन्य गोष्टींचे अस्तित्व आणि अन्य गोष्टींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी `मी' आवश्यक. एखाद्याची स्मृती जाते तेव्हा नाही का, त्या व्यक्तीसाठी अन्य कशाचेही अस्तित्व उरत नाही. सर्वप्रथम जर काही करण्यात येत असेल तर त्याची स्वत:विषयीची स्मृती, म्हणजे त्याचा `मी' त्याला परत मिळवून देणे. त्याला `मी'ची जाणीव नसते तेव्हा अन्य साऱ्या गोष्टी असतातच- त्याचे नाव असते, गाव असते, कुटुंब असते, संबंधित असतात; पण त्या सगळ्याला काहीही अस्तित्व नसते. `मी' परतला की सारे पुन्हा अस्तित्वात येते. थोडक्यात म्हणजे- या विश्वात अस्तित्व म्हणून काही असेल किंवा या विश्वाचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर `मी' आवश्यक आणि हा `मी' सगळ्यांचा, सर्वकाळी, सर्वस्थळी एकच असल्याने स्वाभाविकच असे म्हणता येईल की, या जगात जर काही असेल तर ते आहे केवळ `मी'. `मी'शिवाय या जगात काहीही नाही.

हा `मी' अखंड आहे, तो कुठेही खंडित होत नाही; ही त्याची आणखीन एक गंमत. म्हणजे `मी' आणि अन्य एखादी व्यक्ती वा वस्तू यांच्या मध्ये जी काही पोकळी असेल किंवा त्या पोकळीत जे काही भरून असेल, त्याचाही `मी' असेलच ना! म्हणजे, माझा मी, अन्य व्यक्ती वा वस्तूचा मी आणि दोघांमधील निर्वात किंवा अन्य पोकळी किंवा माध्यम यांचा मी; हे सगळे परस्परांना जोडलेले राहतील. त्यात खंड राहणार नाही, राहूच शकणार नाही. वास्तविक आपल्याला समजणारं वा न समजणारं असं जे काही आहे, ते म्हणजे या `मी'चा एक अखंड, एकरस समुद्र आहे. एकच एक- आपण जितक्या विशालतेची कल्पना करू शकू तितका विशाल एक समुद्र आणि अन्य ज्या ज्या गोष्टींचा प्रत्यय येतो वा बोध होतो, त्या या समुद्राशी एकरूप असलेल्या पण क्षणस्थायी लाटा आहेत. समुद्रातच निर्माण होणाऱ्या आणि समुद्रातच विरून जाणाऱ्या. काही अस्तित्वात असेलच तर ते म्हणजे फक्त `मी'.

ज्यावेळी `माझे' असा भाव येतो त्यावेळी हा `मी' संकुचित केला जातो. कारण त्यावेळी, `मी' आणि `माझे' म्हणून असलेली एखादी गोष्ट या दोन अस्तित्वांचा विचार मनात येतो. म्हणजेच सगळंकाही व्यापून टाकणारा `मी' लहान होतो आणि आपली काही जागा माझे म्हणून कशाला तरी देतो. अशा माझ्या म्हणून जेवढ्या गोष्टी वाढतील तेवढी `मी'ची जागा कमी कमी होत जाईल. माझेपण कमी होत जाईल तसा `मी'चा विस्तार होईल. परंतु माझेपण पूर्ण शून्य झाल्यावर देखील `मी'ला पूर्णत्व येईलच असे नाही. कारण माझे म्हणून काहीही नसले तरीही तटस्थतेचा भाव कायम राहील. ही तटस्थता असली तरीही दुसऱ्या कशाचे तरी अस्तित्व त्यात गृहित धरलेले असतेच. ते सकारात्मक वा नकारात्मक अर्थाने नसेल तरीही `मी' शिवाय दुसरे काही तरी अस्तित्वात आहे, या अर्थाने ते असते. जोवर ही माझेपणाची भावना आणि सोबतच तटस्थतेची भावना लोप पावून केवळ अस्तित्वाची भावना उरत नाही, तोवर `मी' लहान राहील. ज्यावेळी ही केवळ अस्तित्वाची भावना राहील तेव्हा संपूर्ण अस्तित्व आणि मी एकच होऊन जाईल. मग अपूर्ण असं काही राहणार नाही, लहान असं काही काही राहणार नाही आणि विशाल होण्यासारखंही काहीच राहणार नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ९ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा