रविवार, २२ मार्च, २०१५

स्वत:ला तपासण्याची गरज

संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १९९३ सालापासून २२ मार्च हा दिवस `जागतिक पाणी दिवस' म्हणून जगभर पाळला जातो. यावर्षी या दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघातर्फे प्रकाशित अहवालात पाण्याच्या जागतिक समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. या अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की, २०३० साली जागतिक लोकसंख्येला आवश्यक पाण्याच्या फक्त ६० टक्के पाणी उपलब्ध राहील. म्हणजे ४० टक्के लोकांना पाणी उपलब्ध होणार नाही किंवा मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येला कमी वा तुटपुंज्या पाण्यात कामे करावी लागतील. अशा स्थितीत लोक एकमेकांच्या नरडीचा घोट घेऊ लागले तर आश्चर्य वाटायला नको. अशी स्थिती येण्याची शक्यता फार दूर नसून केवळ पुढील १५ वर्षात ही स्थिती येऊ शकेल. भारतातील ज्या तरुणाईचे आज वारंवार कौतुक केले जाते ती तरुण पिढी, त्यावेळी जेमतेम चाळीशीच्या आतबाहेर असेल.

तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे इशारेही आता जुने झाले आहेत. अन दुसरीकडे पाणीप्रश्न दिवसेंदिवस अक्राळविक्राळ होत चालला आहे. अगदीच हातघाईवर आल्याशिवाय एखाद्या गोष्टीकडे लक्षच द्यायचे नाही आणि या वृत्तीलाच पुरुषार्थ मानायचे ही घातक सवय आपण केव्हा टाकून देणार? पाणी समस्या आणि त्यावरील उपाय यांची वारंवार चर्चा होत असते. आज त्या उपायांची स्वत:हून व्यक्तिश:, संस्थाश:, सामूहिक रुपात अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

हे सगळे उपाय करताना स्वत:ला excuse मागण्याची मानसिकताही टाकून द्यावी लागेल. आमच्या सवयी, आमची जीवनशैली, आमच्या आवडीनिवडी यातही खूप बदल करावे लागतील. हे बदल कदाचित फारसे सुखावह राहणार नाहीत. आम्ही आमच्या सुखलोलुपतेचा त्याग करायला तयार आहोत का? आमच्या व्यवहाराची कठोर चिकित्सा करून योग्य गोष्टी करण्याची आमची तयारी आहे का? ज्या गोष्टी करायला हव्यात किंवा करू शकतो, अशा काही गोष्टी-

१) उद्योगांसाठी आज खूप पाण्याचा वापर केला जातो आणि हे पाणी नंतर उपयोगाचे राहत नाही. एवढेच नाही तर ते जमिनीत मुरते तेव्हा त्या जमिनीची आणि त्यातील पाण्याचीही नासाडी करते. खूप औद्योगीकरण, खूप उत्पादन, गरज/ आवश्यकता लक्षात न घेता केवळ पैसा आणि रोजगार निर्मिती यासाठी उद्योग; हे सारे थांबवण्याची तयारी आहे का?

२) निरर्थक गरजा, हव्यास, दिखावूपणा, नावीन्याचा रोग; यासाठी करण्यात येणारी खरेदी किंवा यापोटी होणारी मागणी थांबवण्याची तुमची-आमची किती तयारी आहे? मोटारी, मोबाईल आणि यासारख्या अन्य उत्पादनांची निर्मिती आणि हव्यास यांना मर्यादा घालण्याची तयारी किती आहे?

३) साखरेच्या खूप उत्पादनासाठी उसाची लागवड होते. अमर्याद ऊस लागवडीने पाणी समस्या नसलेल्या भागात आज पाणी समस्या निर्माण केली आहे. अन्य एखाद्या शेती उत्पादनापेक्षा उसाला दहापट पाणी अधिक लागते. यावर उपाय शोधताना समाजाची व्यक्तिश: आणि समूहश: काही जबाबदारी नाही का? उदाहरणार्थ- आज उठसुठ आइसक्रीम खाल्ले जाते. या आइसक्रीमला साखर लागते. एका कपाला कदाचित १० ग्रॅम साखर लागत असेल. आपल्याला वाटते काय त्यात मोठेसे? पण जेव्हा करोडो लोकांचे करोडो कप आपण विचारात घेऊ तेव्हा त्याची व्याप्ती लक्षात येईल. प्रत्येकाची थोडीही कपात सरतेशेवटी मोठा फायदा करून देईल. १०-२० वर्षांपूर्वी मिठाया, पेढे वगैरेंचा वापर आजच्या सारखा नव्हता. आपल्या सवयी, आनंद साजरा करण्याच्या पद्धती यांचा पुनर्विचार केला तर साखरेचा अनावश्यक वापर कमी करता येईल. हे फक्त साखरेचे उदाहरण आहे आणि तेही फक्त आइसक्रीम आणि मिठाई एवढेच मर्यादित. अशा अनेक बाबींचा, वेगवेगळ्या संदर्भात विचार करता येईल. आम्ही तसा तो करायला तयार आहोत का?

४) मातीशी मैत्री करण्याची आमची तयारी आहे का? आमच्या मनाला, नजरेला आज माती नकोशी झाली आहे. त्यासाठी टाईल्स, काँक्रीट यांचा मुक्त वापर होतो. अगदी घराचे आंगण वा रस्त्याच्या कडेची जागा यांचाही अपवाद नाही. याचा दुहेरी तोटा आहे- अ) पाणी मुरण्यासाठी जमीन राहत नाही आणि ब) टाईल्स आणि काँक्रीट धुण्यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर. शिवाय गाड्या धुणे वगैरे गोष्टी आहेतच. चार लोकांना पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक की गाडीची धूळ धुणे आवश्यक? एक तर गाड्यांचा अनावश्यक वापर आणि त्यासोबत जुळलेली प्रतिष्ठेची झूल उतरवून ठेवत नाही तोवर आपल्याला बोलण्याचा काहीही अधिकार राहत नाही. किमान गाड्या पुसाण्यावर भर देऊन, त्या धुण्याला मर्यादित करणे एवढे तर त्वरित करता येईल. नळ, नळांचा वापर, नळांचे प्रकार यांचासुद्धा सखोल विचार व्हायला हवा. तारांकित जीवनशैली जेवढी कमी करता येईल तेवढे पाणी समस्या सोडवणुकीसाठी उत्तम. आम्ही ही तारांकित जीवनशैली नाकारायला तयार आहोत का? जे त्या जीवनाचा उघड पुरस्कार करतात त्यांचा प्रश्नच नाही; पण स्वत:ला पर्यावरणवादी म्हणवून घेणारे, समाजाप्रती संवेदनशील वगैरे म्हणवून घेणारे, धार्मिक आणि आध्यात्मिक म्हणवून घेणारे सुद्धा कळत नकळत अयोग्य मार्गाने जात असतात. आपले मन साफ आहे आणि आपण पाणी प्रश्नाची भरपूर मुद्देसूद, तर्कशुद्ध चर्चा वगैरे केली की काम संपले. परंतु आपली छोट्यातील छोटी कृतीदेखील काय परिणाम करते वा करू शकते याचा विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही.

मला जगता येत नाही, जगणे कळत नाही, मी सुख आणि आनंद नाकारतो; वगैरे दूषणे मला दिली जाऊ शकतील. मनात वा जाहीरपणे अनेक लोक देतीलही. पण जगण्याचे, सुखाचे, आनंदाचे- झुंडीचे मापदंड स्वीकारण्यापेक्षा, करुणामयी विचारशीलतेने जगणे योग्य आहे असे माझे मतही आहे आणि माझा सिद्धांतही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २२ मार्च २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा