बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

संघाच्या बैठका

(रा. स्व. संघाची एक समन्वय बैठक आजपासून दिल्लीत सुरु झाली. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने प्रसार माध्यमात या बैठकीची चर्चा सुरु आहे. त्या निमित्ताने संघातील `बैठक' या प्रकाराची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न.)

संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बैठक या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. अनेक प्रकारच्या बैठकी सतत सुरू असतात. शाखा बैठक, गण बैठक, गटनायक बैठक, गणशिक्षक बैठक, आठवडी किंवा साप्ताहिक बैठक, मासिक बैठक, कार्यकर्ता बैठक, अधिकारी बैठक, श्रेणी बैठक, प्रांत बैठक, प्रचारक बैठक, शारीरिक बैठक, बौद्धिक बैठक, व्यवस्था बैठक, समन्वय बैठक, चिंतन बैठक, टोळी बैठक, कार्यकारिणी बैठक, अ. भा. कार्यकारी मंडळ बैठक, अ. भा. प्रतिनिधी सभेची बैठक... अशा अनेक बैठका सतत आणि विविध स्तरांवर होत असतात. कधी कधी `ती बैठक सोडून काही बोला बुवा' अशी टिप्पणीही ऐकायला मिळू शकते इतक्या विविध प्रकारच्या या बैठका असतात. मात्र असा बैठकांचा अतिरेक वाटत असला तरीही त्या आग्रहाने सुरू असतात आणि संघाच्या वाटचालीत, कार्यक्रमांच्या आयोजनात, सुसूत्रतेत, नियोजनात, अनुशासनात त्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे.

शाखा स्तरावरील बैठकीत विशेषत: स्वयंसेवकांच्या याद्या तयार करणे, निरोप देण्याची व्यवस्था, पत्रिका वितरण, वस्तीतील संपर्क, मोठ्या कार्यक्रमांची माहिती, शाखेच्या कार्यक्रमांचे नियोजन वगैरे विषय असतात. मंडल, विभाग, नगर क्षेत्राची दर आठवडयाला बैठक होते. प्रत्येक क्षेत्राचा दिवस वेगवेगळा असू शकतो, वेळ वेगवेगळी असू शकते. स्थानिक कार्यकर्त्यांची सोय त्यासाठी लक्षात घेतली जाते. या बैठकीत त्या त्या क्षेत्रातील आठवडाभरातील कामाचा आढावा घेणे, पुढील आठवडयाचे नियोजन, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या शाखांना भेटींचे नियोजन, माहितीची देवाणघेवाण, प्रचार पुस्तिका, पत्रके यांचे वाटप वगैरे विषय असतात. याशिवाय प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांचा समन्वय, माहितीचे आदानप्रदान, प्रवास, नियोजन यासाठी बैठकी होत असतात.

संघातील शारीरिक कार्यक्रमांची रचना व नियोजन यासाठी शारीरिक प्रमुखांची बैठक होते. जसे, विजयादशमीच्या उत्सवात कोणते शारीरिक कार्यक्रम करायचे हे निश्चित करण्यासाठी शारीरिक प्रमुखांची बैठक होते. व्यायाम योग करायचे असतील तर ते करून पाहिले जातात. शाखांमधील वा उत्सवातील गीत, अमृतवचन, बोधकथा, बौद्धिकचे विषय, बौद्धिक वर्गांचे नियोजन आदीसाठी बौद्धिक प्रमुखांच्या बैठकी होतात. असेच अन्य विषयांचे. प्रत्येक बैठकीला ज्या स्तराची बैठक असेल त्यापेक्षा वरील स्तराचा एखादा तरी कार्यकर्ता उपस्थित असतो. तोही त्या विचारविनिमयात सहभागी होतो. कधी कधी मार्गदर्शनही करतो. बौद्धिक प्रमुख शारीरिक वा व्यवस्था बैठकीत मार्गदर्शन करू शकतो किंवा शारीरिक प्रमुख बौद्धिक वर्गही घेऊ शकतो.

नियमितपणे होणाऱ्या स्थानिक पातळीवरील बैठकी एखाद्या स्वयंसेवकाच्या घरी होतात. हा स्वयंसेवक बैठकीसाठी अपेक्षित असेलच असे नाही. तो बैठकीत अपेक्षित असला तर सहभागी होतो, नसेल तर तो बैठकीत सहभागी होत नाही. त्याच्याकडे जागा उपलब्ध आहे म्हणून तेथे बैठक. अशा बैठकी रात्री सुद्धा असू शकतात. सगळ्यांची सोय असेल त्याप्रमाणे रात्री ८-९ वाजता ही बैठक होते. अशी बैठक मग स्वाभाविकच रात्री ११ वाजेपर्यंत वा त्यापेक्षा थोडी अधिकही चालू शकते. आपापली कामेधामे उरकून, थकलेले असले तरीही रात्री उशिरा स्वयंसेवक संघाचा, समाजाचा, देशाचा विचार करतात असे चित्रही पाहायला मिळते. या गोष्टीचाही न सांगता सकारात्मक परिणाम होतो. ज्या ठिकाणी ही बैठक होते त्या कुटुंबातील सदस्य, आजूबाजूचे यांच्याही मनात यामुळे नकळत संघाबद्दल सहानुभूती आणि प्रेम उत्पन्न होते. अशा बैठकी रात्रीच होतात किंवा एखाद्या स्वयंसेवकाच्या घरीच होतात असे नाही. या एखाद्या मंदिरात, शाळेत वा चक्क शाखेच्या मैदानावरही होऊ शकतात. तसेच या बैठकी दुपारी वा सकाळीही होऊ शकतात. स्थान, वेळ अशा गोष्टी उपलब्धता आणि सोय यानुसार ठरत असतात.

जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र या स्तराच्या कार्यकर्त्यांचे, अधिकाऱ्यांचे सतत प्रवास सुरू असतात. या प्रवासाच्या व भेटींच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या बैठकी होतात. त्यात परिचय, वृत्तकथन, चर्चा, मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे असे स्वरूप असते. प्रत्येक बैठकीत परिचय ही आवश्यक बाब असते. संघ, समाजाची स्थिती, विविध घटना, सामाजिक परिवर्तन, तात्विक बाबी अशा अनेक प्रकारच्या औपचारिक व अनौपचारिक चर्चा यातून होत असतात. अखिल भारतीय अधिकाऱ्यांचे प्रवास असतील तेव्हाही अशा बैठका होतात. अगदी सरसंघचालक वा सरकार्यवाह यांच्यासोबत मुख्य शिक्षक, कार्यवाह, गणशिक्षक, गटनायक किंवा सामान्य स्वयंसेवकांच्या बैठकीही होतात. हे सर्वोच्च अधिकारी या बैठकांना पूर्ण वेळ उपस्थित राहतात. सामान्य स्वयंसेवकांचाही परिचय करून घेतात. परिचय म्हणजे केवळ नाव, व्यवसाय सांगणे नसते. त्या स्वयंसेवकाबद्दल माहिती करून घेतली जाते. कुटुंबाबद्दलही विचारपूस होते. स्वयंसेवकांच्या वेळेची उपलब्धता आदी गोष्टींचीही चर्चा होते. प्रार्थना कशी म्हणावी, प्रणाम कसा करावा, सूर्य नमस्काराच्या योग्य स्थिती हे सुद्धा सर्वोच्च अधिकारी सांगतात, कधी करूनही दाखवतात. हास्य-विनोदही होतात. प्रमुख व्यक्तीने थोडा वेळ यायचे, गंभीर चेहऱ्याने मोठ्या विषयांवर मार्गदर्शन करायचे आणि निघून जायचे हे साधारणपणे अन्यत्र दिसणारे दृश्य संघात दिसत नाही. त्याच्या पूर्णपणे विपरीत सहज, अनौपचारिक, समानतेचे चित्र पाहायला मिळते. याचा अर्थ मोठ्या विषयांवर चर्चा वा मार्गदर्शन होत नाही असे नाही. तेही होतेच. पण या साऱ्याचा एक अनोखा मेळ संघात पाहायला मिळतो. सर्वोच्च अधिकारी, अन्य स्तरांवरील कार्यकर्ते, सामान्य स्वयंसेवक यांच्यात औपचारिक, अनौपचारिक संवाद या बैठकांच्या माध्यमातून सतत होत असतो.

विविध स्तरावरील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य वाढावे यासाठीही छोट्या वा दीर्घ बैठकांचे आयोजन होत असते. समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या वा सामान्य लोकांच्याही बैठका होत असतात. जसे- डॉक्टर, अभियंते, वकील, उद्योजक. स्वयंसेवक असलेले डॉक्टर, स्वयंसेवक असलेले अभियंते, स्वयंसेवक असलेले वकील, स्वयंसेवक असलेले उद्योजक यांच्या बैठकी होतात, तसेच स्वयंसेवक नसलेल्या अशा लोकांशी संवाद साधण्यासाठीही बैठका होतात. धार्मिक, कृषि, शिक्षण, विद्यार्थी अशाही बैठका होतच असतात. विषय अर्थातच संघ. म्हणजे संघाच्या कामातील सहभाग, संघाच्या विचारांना पोषक काम कसे करता येईल, समाजात चांगले वातावरण कसे निर्माण करता येईल हेच.

समन्वय बैठक हाही महत्वाचा भाग. संघाच्या प्रेरणेने आज देशात अनेक संस्था काम करीत आहेत. त्यांचे स्वरुपही अखिल भारतीय आहे. त्या सगळ्या कामांमध्ये संघासोबत आणि परस्परात समन्वय व सहयोग राहावा यासाठी त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा परिचय, संवाद, विचारांची देवाणघेवाण, कार्यक्रमांची माहिती आवश्यक असते. त्यासाठी या समन्वय बैठकी विविध स्तरांवर आयोजित केल्या जातात. याशिवाय विविध ठिकाणी, विविध क्षेत्रात, वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करीत असलो तरीही एका विचाराने, एका उद्देशासाठी काम करणारे आपण एकच आहोत. आपले काम हा संघाच्या कामाचाच एक भाग आहे; संघाच्या कामाशी, विचारांशी सुसंगत असे आपले काम राहिले पाहिजे असा भाव उत्पन्न करण्याचा प्रयत्नही या समन्वय बैठकांमधून होत असतो. अर्थात त्या त्या संस्थांचे व्यवहार, हिशेब, सदस्यता, कार्यपद्धती, पदाधिकारी, कार्यक्रम याविषयी संघ कधीही आदेश देत नाही. संबंधित संस्थाच त्याविषयी निर्णय घेत असतात. चर्चा स्वाभाविकच सगळ्यांशी सगळ्या गोष्टींवर होत असते. कामाचा वाढता व्याप लक्षात घेऊन आणीबाणीनंतर संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनी या समन्वय बैठकींची सुरुवात केली.

वर्षातून दोनदा अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक होते. देशभरातील उन्हाळी संघ शिक्षा वर्ग आटोपल्यानंतर एकदा आणि दिवाळीपूर्वी एकदा. देशभर विविध स्थानांवर या बैठका होतात. देशभरातील कामाची स्थिती, कार्यक्रम, अधिकाऱ्यांचे प्रवास, वर्तमान घडामोडी, संघटनात्मक विषय यावर या बैठकीत विचार होतो. ज्या स्थानी ही बैठक असेल त्या स्थानी स्थानिक स्वयंसेवकांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो. त्या एकत्रिकरणात कोणी तरी अखिल भारतीय अधिकारी मार्गदर्शन करतात. अशा एकत्रिकरणाला सरसंघचालक, सरकार्यवाह हेदेखील पूर्ण वेळ उपस्थित असतात. अन्य एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचा बौद्धिक वर्ग तेही ऐकतात. सर्वोच्च अधिकारी या कार्यक्रमात बोलतातच असे नाही. स्थानिक स्वयंसेवकांनाही अखिल भारतीय कार्यकर्त्यांना पाहण्याची, भेटण्याची, ऐकण्याची, चर्चा करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. त्या-त्या गावाला व शहरालाही या निमित्ताने संघाचे दर्शन घडते. विविध विषयांचे प्रस्तावही कधी कधी या बैठकीत पारित केले जातात.

संघाची सर्वोच्च संस्था म्हणजे अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. ही प्रतिनिधी सभेची बैठक मात्र वर्षातून एकदाच होते. दर तीन वर्षांनी संपूर्ण देशभरात प्रतिनिधी निवडले जातात. ज्यावर्षी प्रतिनिधी निवडले जातात त्याच वर्षी सरकार्यवाहांची देखील निवड होते. आवश्यक असेल तर अखिल भारतीय कार्यकारिणीतही याच वर्षी बदल केले जातात. दर तिसरे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असते. देशभरातील सर्व प्रतिनिधी, वेगवेगळ्या अखिल भारतीय संस्थांचे निवडक राष्ट्रीय पदाधिकारी, अखिल भारतीय कार्यकारी मंडळ आणि निमंत्रित सदस्य अशी ही पूर्ण प्रतिनिधि सभा असते. प्रदीर्घ काळपर्यंत प्रतिनिधी सभेची ही बैठक मार्च महिन्यात नागपूरलाच होत असे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही बैठक तीन वर्षातून एकदा, म्हणजे निवडणूक असेल त्यावर्षी नागपुरात होते. त्यानंतरची दोन वर्षे देशात अन्यत्र होते. विविध ठिकाणच्या स्वयंसेवकांना अखिल भारतीय बैठकीचे आयोजन करण्याचा अनुभव मिळावा, विविध ठिकाणच्या स्वयंसेवकांना अखिल भारतीय कामाचे एकत्रित दर्शन व्हावे आणि संघाच्या कामात स्थानभेद वा स्थानमहात्म्य नसून देशाचा कोणताही प्रांत वा स्थान सारखेच आहे हा एकरस भाव जागवणे हा यामागचा उद्देश. अर्थात संघाची स्थापना नागपुरात झाली. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांची स्मारके नागपुरात आहेत. त्यामुळे त्याला एक महत्त्व संघात नक्कीच आहे. स्वयंसेवकांना प्रेरक होईल याप्रकारे ते जपलेही जाते. परंतु त्याचे अवाजवी स्तोम माजू नये याचीही काळजी घेतली जाते. ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभा संघाच्या कामाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. याच बैठकीत देशभरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्रित होतात. त्यांच्यात माहितीची व विचारांची देवाणघेवाण होते. देशभरातील कामाचे प्रत्यक्ष चित्र काय आहे हे साऱ्यांना कळते. अनेक मोठ्या कार्यक्रमांची माहिती भारतभरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या माध्यमातून देशभरातील स्वयंसेवकांपर्यंतही! अनेक लहान पण प्रेरक, अनुकरणीय असे कार्यक्रम, प्रकल्प, घटना या माध्यमातून देशभर पोहोचतात. असे अनेक पथदर्शी प्रकल्प प्रथम या प्रतिनिधी सभेत सगळ्यांसमोर आले आणि नंतर त्याचे अनुकरण देशभरात झाले. अनेक प्रकारच्या वैचारिक, धोरणात्मक चर्चाही याच बैठकीत होत असतात. आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण, रामजन्मभूमी आंदोलन, काश्मीर समस्या, पंजाब समस्या, आसाम समस्या, नक्षलवादाची समस्या, सांस्कृतिक आक्रमण, आर्थिक समस्या, भ्रष्टाचार, मतांतरण, गणवेश वा अन्य संघटनात्मक बदल, एकात्मता स्तोत्रातील बदल या वा यासारख्या शेकडो विषयांवर या बैठकीत सखोल व विस्तृत चर्चा होते. अखेरीस सर्वसंमतीने एक भूमिका निश्चित केली जाते. ती संघाची अधिकृत भूमिका असते. विविध विषयांवर ठरावही पारित केले जातात.

संघाच्या आजवरच्या वाटचालीत संघाच्या चिंतन बैठकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. या चिंतन बैठकींचा निश्चित असा कालावधी नसतो. या बैठकींना कोण कोण उपस्थित राहणार याचा निर्णय त्या त्या वेळी घेण्यात येतो. या बैठकी प्रदीर्घ असतात आणि त्यात प्रत्यक्ष संघटनात्मक किंवा आंदोलनात्मक विषय न राहता तात्त्विक विषयांवर विस्ताराने व सखोल चर्चा होते. संघाचे संघटन आणि तत्त्वज्ञान यांना या बैठकांनीच आकार दिला आहे. अशा प्रकारची पहिली चिंतन बैठक डॉ. हेडगेवार यांच्याच काळात १९३९ साली नागपूर जवळच्या सिंदी या छोट्याशा गावी झाली. फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात झालेली ही बैठक १० दिवस चालली. सकाळी ८ ते ११, दुपारी ३ ते ६, रात्री ९ ते ११ अशी ८ तास रोज ही बैठक चालत असे. संघाचे काम बाल्यावस्थेत होते आणि हळूहळू देशभर त्याचा विस्तार होत होता. त्यात सुसूत्रता, एकसंधता राहावी यादृष्टीने या बैठकीत सखोल, विस्तृत, मनमोकळी चर्चा झाली. अनेकदा सहभागी कार्यकर्त्यांचा पारा आणि आवाजही चढत असे, असा उल्लेख डॉ. हेडगेवार यांच्या चरित्रात वाचायला मिळतो. परंतु अशी कितीही खडाजंगी झाली तरीही डॉ. हेडगेवार ते सारे शांतपणे ऐकून घेत असत आणि समन्वयात्मक समारोप करीत असत. त्यांनी निर्णय दिला की, सारे काही शांत होऊन बैठक पुढील विषयाकडे वळत असे. डॉ. हेडगेवार यांच्या अद्भुत, अलोकसामान्य व्यक्तित्वाचाच हा परिणाम म्हणावा लागेल. या बैठकीत संघाची घटना, प्रार्थना, आज्ञा, कार्यपद्धती, प्रतिज्ञा यावर सखोल चर्चा होउन ते सारे निश्चित झाले. आज सर्व देशभर म्हटली जाणारी संस्कृत प्रार्थना, संस्कृतमधील आज्ञा याच बैठकीत निश्चित झाल्या. डॉ. हेडगेवार यांच्यासोबत त्यांच्यानंतर सरसंघचालक झालेले गोळवलकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, आप्पाजी जोशी, तात्याजी तेलंग, विट्ठलराव पत्की, बाबाजी सालोडकर, नानासाहेब टालाटुले, कृष्णराव मोहरील ही मंडळी उपस्थित होती.

दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात झालेल्या तीन चिंतन बैठकी विशेष महत्वाच्या समजल्या जातात. १९४० साली गुरुजी सरसंघचालक झाले. त्यानंतर १९४७ पर्यंतचा काळ एकूणच धामधुमीचा गेला. त्यानंतर संघावरील बंदीचा काळ आला. तो संघर्षाचा काळ होता. बंदी उठल्यानंतरचा काळ झालेली पडझड सावरण्यात गेला. त्यामुळे संघाचे काम, संघाचे तत्त्वज्ञान याबद्दल चिंतन करायला अवकाशच मिळाला नाही. परंतु थोडे स्थिरस्थावर झाल्यावर १९५४ साली एक चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. ९ मार्च १९५४ ते १६ मार्च १९५४ या काळात झालेली ही चिंतन बैठक सिंदी या गावीच झाली होती. डॉ. हेडगेवार यांच्या काळातील आणि उपस्थितीतील संघाची पहिली चिंतन बैठक याच ठिकाणी झाली होती. १५ वर्षांनंतर अनेक महत्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि जीवनमरणाच्या संघर्षानंतर होणारी ही बैठक सिंदी येथेच व्हावी हे संघ कार्यातील सातत्य आणि भावप्रवाह या दृष्टीने लक्षणीय म्हणावे लागेल. ज्या स्थानी संघ संस्थापकांच्या मार्गदर्शनात संघाच्या कामाला विशिष्ट दिशा लाभली त्याच जागी ही चिंतन बैठक झाली. बंदीकाळात झालेली पडझड, आलेली निराशा, मरगळ या साऱ्यातून पुढे जाण्यासाठी, बैठकीतील चिंतनासोबतच त्या स्थानानेही नक्कीच योगदान दिलेले आहे. या बैठकीत जिल्हा वा त्याहून मोठ्या क्षेत्राची जबाबदारी असणारे ३०० प्रचारक सहभागी झाले होते. या बैठकीत गुरुजी पूर्ण वेळ उपस्थित होते आणि त्यांची पाच भाषणे झाली होती. ९ आणि १० मार्च १९५४ रोजी एकेक भाषण, १५ मार्च १९५४ रोजी दोन भाषणे आणि शेवटल्या दिवशी १६ मार्च १९५४ रोजी एक भाषण अशी एकूण पाच भाषणे झाली होती. संघकार्याची वैश्विक दिशा, धर्म म्हणजे काय, संघकार्याचे मूलभूत स्वरूप, संघाचे तत्त्वज्ञान, कार्यकर्त्यांचा व्यवहार, कार्याचे सातत्य, कार्याची प्रेरणा आणि या कामासाठी पूर्ण समर्पणाची किंमत मोजण्याची तयारी अशा विविध विषयांवर त्यांनी उपस्थित प्रचारकांना मार्गदर्शन केले होते.

१९६० च्या मार्च महिन्यात अशाच प्रकारची एक प्रदीर्घ चिंतन बैठक इंदोर येथे झाली. संघाचे विभागीय पातळीवरील आणि त्यावरील कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले होते. ५ मार्च १९६० ते १३ मार्च १९६० असे ९ दिवस ही बैठक चालली. सरसंघचालक गुरूजी देखील या बैठकीला पूर्ण वेळ उपस्थित होते. रोज दिवसभर होणारी चर्चा आणि विचारविनिमय याला अनुसरून गुरूजी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत असत. संघाला अभिप्रेत असलेले संघटन, संघाला अभिप्रेत असलेले हिन्दू राष्ट्राचे स्वरुप, संघकार्याचे जागतिक लक्ष्य, समाज व्यवस्था, व्यक्ती व समाजाचे संबंध, स्वयंसेवकांचे जीवन अशा विविध विषयांवर सखोल मंथन व मार्गदर्शन या बैठकीत झाले. त्यानंतर १२ वर्षांनी १९७२ साली मुंबई जवळील ठाणे येथे चिंतन बैठक झाली. गुरुजींची प्रकृती यावेळी ठीक नव्हती. १ जुलै १९७० रोजी त्यांच्यावर मुंबईच्या टाटा रुग्णालयात कर्करोगाची शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांचे प्रवास सुरूच होते. ठाण्याच्या या बैठकीलाही ते उपस्थित होते. परंतु त्यांचे भाषण मात्र बैठकीच्या समारोपाच्या वेळी ३ नोव्हेंबर रोजी झाले. पाश्चात्य आणि हिन्दू समाजरचनेतील मूलभूत फरक काय, याची त्यांनी या भाषणात विस्ताराने चर्चा केली. ५ जून १९७३ रोजी गुरूजींना देवाज्ञा झाली. परंतु त्यानंतरही साधारण दर १२ वर्षांनी संघाची चिंतन बैठक होत असते. अनेक प्रकारच्या वैचारिक, व्यावहारिक आणि संघटनात्मक विषयांवर यात सखोल विचार होतो आणि कार्यवाही संबंधीचे निर्णय घेतले जातात. प्राचीन काळी भारतातील ऋषीमुनी दर १२ वर्षांनी एकत्र येऊन देश, धर्म, समाज याबद्दल सखोल चिंतन करीत असत आणि त्या चिंतनाच्या आधारे समाजाचे मार्गदर्शन करीत असत. तीच पद्धत संघाने अवलंबिली आहे.

या औपचारिक बैठकांव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या अनौपचारिक बैठकांचेही योगदान संघाच्या कामात मोठे आहे. अगदी सुरुवातीपासून या अनौपचारिक बैठका होत आल्या आहेत. संघाची सुरुवात डॉ. हेडगेवार यांच्या घरीच झाली. नागपूरच्या जुनी शुक्रवारी भागात असलेल्या या घरातल्या वरच्या मजल्यावरील मोठ्या दालनात अशा अनेक बैठकी झाल्या आहेत. डॉ. हेडगेवार सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने आणि त्यांच्या लोकसंग्राहक स्वभावामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचा सतत राबता असे. डॉ. हेडगेवार यांनी देशकार्य हेच आपल्या जीवनातले एकमेव कार्य ठरवल्यामुळे ते लोकांना नेहमीच उपलब्ध असत. त्यामुळे त्यांच्या घरी गप्पांचा अड्डा नेहमीच रंगत असे. त्यात थट्टाविनोद, मस्करी यांच्यासह देश, समाज, आंदोलने, संघ यावरही सतत चर्चा, मंथन, माहितीची देवाणघेवाण होत असे. या सोबतच कामासाठी माणसेही मिळत असत. डॉ. हेडगेवार हे माणसांचे पारखी होते. प्रत्येकाचे गुण, अवगुण, क्षमता, आवडी-निवडी यावर त्यांचे बारीक़ लक्ष असे. त्यांच्या नजरेने सारे काही टिपले जात असे. शिवाय प्रत्येकाला प्रेरणा देण्याची त्यांची देवदत्त क्षमता होतीच. यातूनच ते सहज गप्पातून अनेक कामे करीत असत आणि प्रत्येक कामासाठी माणसे मिळवित असत.

संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची अनौपचारिक बैठक देखील उल्लेखनीयच म्हणायला हवी. सकाळ, संध्याकाळच्या शाखेनंतर होणारी गप्पांची अनौपचारिक बैठक. दुपारी पत्रलेखनाच्या वेळी जमून येणारी बैठक. दुपारच्या चहाच्या वेळी होणाऱ्या गप्पा हे सारे मोजमाप करण्याच्या पलीकडचे आहे. या बैठकीत साऱ्यांनाच मुक्तद्वार होते. लहान मुले, महिला, कार्यकर्ते, सामान्य स्वयंसेवक, अन्य क्षेत्रातले कार्यकर्ते, घरच्या कार्यक्रमांचे निमंत्रण द्यायला आलेले लोक असे सगळ्या प्रकारचे लोक असत. या बैठकींमधून कधी कधी सात मजली हास्याचे कारंजेही उसळत असे. तर कधी, अन्य काही कारणाने तेथे उपस्थित असलेल्यालाही सहजपणे वेदोपनिषदांबद्दल काही तरी ज्ञान मिळून जात असे. लोकप्रबोधन, चिंतन, लोकसंग्रह, कार्यकौशल्य अशा अनेक गोष्टी या अनौपचारिक बैठकीतून होउन जात असत.
तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा पिंड पहिल्या दोन सरसंघचालकांपेक्षा थोडा गंभीर वृत्तीचा होता. त्यामुळे सरसंघचालकांची अनौपचारिक बैठक थांबली. त्यातच १९९२ च्या अयोध्या प्रकरणापासून सुरक्षा आदी गोष्टी खूप वाढल्या. त्यातच संघ मुख्यालयावरील हल्ला हीदेखील महत्वाची बाब ठरली. त्यामुळे स्वयंसेवकांचे, लोकांचे कार्यालयात सहजपणे येणेजाणे थांबले. अन्य व्यापही खूप वाढले. त्यातील सरसंघचालकांची व्यस्तताही वाढली. त्यामुळे या अनौपचारिक बैठका संपल्या. सरसंघचालकांशिवाय अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते, कार्यालयातील निवासी कार्यकर्ते यांच्याही अशा गप्पा व चर्चा बैठकी ही संघाची खासियत म्हणता येईल.

अन्य अधिकारी व कार्यकर्त्यांच्या अनौपचारिक बैठकाही संघवाढीसाठी तेवढ्याच महत्वपूर्ण ठरल्या आहेत. संघ शिक्षा वर्गात अशा बैठका  पाहायला मिळतात. संघस्थानाच्या आधी वा नंतर, बौद्धिक वर्गाला जाता-येताना, भोजनाच्या वेळी अधिकारी वा कार्यकर्त्यांच्या जमून येणाऱ्या बैठका कार्यकर्ता घडणित मोलाची भूमिका बजावतात. शाखेला भेट दिल्यानंतर मैदानावरच जमून येणारी गप्पाष्टके अनेक विषयांची उकल करून जातात. एखाद्या लग्न- मुंजीत चार कार्यकर्ते एकत्र झाले की झाली बैठक. या अशा बैठकींसाठी कार्यकर्तेच असले पाहिजेत असे नाही. दृष्टी असणारा आणि डोक्यात व मनात संघ असणारा कार्यकर्ता कोठेही गेला तरी चार लोक जमवून संघ, समाज, धर्म असं सारं त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. परिचय, संपर्क, माहितीची देवाण- घेवाण, उपक्रम, व्यवस्था, विचार, समस्या अशा अनेक गोष्टी या अनौपचारिक बैठकांतून मार्गी लागतात. विद्यमान सरसंघचालक डॉ. भागवत यांच्याही अशा अनेक अनौपचारिक बैठका आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा