शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

माणूस असा असतो?

दिनूकाका गेले. दिनूकाका म्हणजे दिनकरराव जोशी. भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. एकाच वेटाळात राहणारे, एकाच शाखेचे स्वयंसेवक, `national organisation of bank workers' (NOBW) या संघटनेत अन पर्यायाने भारतीय मजदूर संघात वडील अन ते दोघेही सक्रिय, दत्तोपंत ठेंगडी ही समान श्रद्धा; या कारणांमुळे दिनकरराव झालेत दिनुकाका. नागपूर शहर विस्तारू लागले आणि `महाल' या नागपुरच्या मूळ वस्तीतील लोक शहराच्या वेगवेगळ्या दिशांना नवीन वस्त्या वसवू लागले. दिनुकाका अन वडील दोघेही याच पद्धतीने `भगवाननगरात' आले. त्यावेळच्या भगवाननगराची आता फक्त कल्पनाच करायची. आजूबाजूला शेते पसरलेली, रस्ते नाहीत, वीज नाही, वाहने वगैरे तर कोणाकडेच नव्हती. वाहन म्हणजे सायकली. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच घरे. पलीकडच्या मानेवाडा गावाच्याही पलीकडे घोगली नदी, जंगल वगैरे. त्या जंगलातील कोल्हे वगैरे प्राणी वस्तीपर्यंत येत असत असे त्यावेळचे जाणकार सांगतात. अशा या वस्तीत स्वाभाविकच सगळ्यांचा सगळ्यांशी घरगुती परिचय. सणवार, हळदीकुंकू अशा निमित्तांनी घरोघरी प्रत्येकाचे जाणेयेणे. त्यातच काही संघाची मंडळी. त्यांनी स्वाभाविकच शाखा सुरु केली. परस्पर संपर्क, सहयोग, आधार आणि परिचय यांना त्याचाही हातभार लागला. गेल्या शतकातील ६० च्या दशकाच्या उत्तरार्धाचा हा काळ. दिनुकाकांना तेव्हापासून पाहिलेले.

सुरुवातीला संघाची भगवाननगर शाखा आजच्या भगवाननगर चौकाच्या शेजारी लागत असे. आजचे शाखेचे स्थान आणीबाणीनंतरचे. तेव्हाच्या शाखेचे मैदान दिनुकाकांच्या घराच्या जवळ. त्यामुळे शाखेसाठी रोज लागणारे ध्वज, ध्वजदंड इत्यादी सामान त्यांच्याच घरी ठेवत असत. त्यामुळे रोज सायंशाखा आटोपल्यावर सगळेजण ते सामान परत ठेवण्याच्या निमित्ताने त्यांच्या घरी जात. तिथे पाणी वगैरे पिऊन मग घरी परतायचे. तासभर खेळ वगैरे झाल्याने तहान लागत असेच. इकडे आम्ही बच्चे कंपनी पाणी पीत असताना तिकडे गोठ्यातल्या गायींना ठेवलेली पाण्याची बादली उचलून ठेवून दिनुकाका सायकलने बाहेर पडत असत, भगवाननगरातून सीताबर्डीवरील NOBW च्या कार्यालयात जायला. हा त्यांचा रोजचा शिरस्ताच होता. सकाळी उठल्यावर प्रभात शाखा, नंतर चार घरी संपर्क करून आंघोळ- पूजा- जेवण करून सायकलने रिझर्व्ह बँकेत नोकरीसाठी जाणे, बँक आटोपल्यावर घरी परतताना घरच्या गायींसाठी कॅरियरवर बांधून चारा घेऊन येणे. घरी आल्यावर हातपाय धुवून गायींना चारापाणी करणे, दूध काढणे, जेवणे, तयार होऊन NOBW च्या कार्यालयात जाणे. रात्री १०-११ वाजता घरी परतणे.

कित्येक वर्षे हा क्रम होता. हळूहळू यात काही बदल झाले. सायकलची प्रथम व्हिकी झाली, मग बजाजची स्कूटर झाली, मग स्कुटी, मग अॅक्तिव्हा; असे बदल झाले. घरच्या गायीही कमी झाल्या, मग संपल्या. दिनुकाका हे त्यांच्या काकांजवळ राहिले. त्यांना सगळे रामभाऊ काका म्हणत. ते नवयुग विद्यालयात शिक्षक होते. त्यांना मुलगा नसल्याने दिनुकाका त्यांच्याजवळ राहिले. दिनुकाका हे रामभाऊ काकांच्या भावाचा मुलगा. रामभाऊ काकांना सात मुली. अन दिनुकाका त्यांचा एकुलता एक भाऊ. मात्र या कौटुंबिक वास्तवाचा कोणाला थांगपत्ताही लागू नये, असा सगळ्यांचा व्यवहार. अकृत्रिम, सहज, आतून आलेला. सगळ्या बहिणींची शिक्षणं, लग्न, संसार, काका-काकूंचा सांभाळ, तब्येती, त्यांचे स्वर्गवास असे सगळे इतक्या सहज, निर्व्याज, हसतमुख पद्धतीने की विचारता सोय नाही.

आणीबाणीच्या काळात रामभाऊ काका नागपूर कारागृहात होते. त्यामुळे पोलिसांची वक्रदृष्टी घरावर होतीच. दिनुकाका संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे त्यांच्यावर पण जबाबदारी होतीच. भूमिगत पत्रकांचे वितरण, कारागृहातील स्वयंसेवकांच्या कुटुंबांची जबाबदारी, त्या कुटुंबांची आर्थिक मदत- त्यांना धीर देणे- दुखणी- अडचणी- अशा अनेक गोष्टी; शिवाय बैठका वगैरे. हळूहळू दिनुकाकांचे घरचे व्याप आणि जबाबदाऱ्या कमी झाल्या, तशा बाहेरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. भारतीय मजदूर संघाच्या कामातील त्यांचा सहभाग आणि त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या. प्रथम विविध कामगार संघटना, नंतर भारतीय मजदूर संघाच्या विदर्भ प्रांताची जबाबदारी, मग क्षेत्राची जबाबदारी, मग अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य अशी ती चढती भाजणी होती. संघ आणि संघ परिवाराच्या रचनेनुसार वरचे पद म्हणजे मोठी जबाबदारी, अन मोठी जबाबदारी म्हणजे अधिक काम, अधिक वेळ देणे अन अधिक परिश्रम. त्यामुळेच दिनुकाकांचे वय वाढत होते तसेच परिश्रमसुद्धा. प्रवास, दौरे सतत सुरु असत. पण न थकता, न कुरकुरता, न तक्रार करता हे सगळे सुरु होते. अन हे सगळे करतानाच प्रभात शाखेत जाणेही थांबले नाही. भारतीय मजदूर संघाचे काम करतानाच संघातील सक्रियता भंगली नाही. त्यामुळेच संघ शिक्षा वर्गातही वर्ग कार्यवाह म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. संघाच्या शाखेत जाणे किंवा संघाचा गणवेश घालून घराबाहेर पडणे अतिशय कठीण असल्याच्या काळात अन नवीन, पूर्णत: प्रतिकूल असलेल्या वस्तीत पाय रोवून उभे राहणे सोम्यागोम्याचे काम नाही. संघाच्या सुरुवातीच्या काळात हजारो स्वयंसेवकांनी ते केले आहे. दिनुकाका त्यातीलच.

दिनुकाकांना मुलबाळ नव्हते. पण त्यांच्या व्यवहारात, विचारात, मानसिकतेत त्याचा कुठेही परिणाम जाणवला नाही. कधीही अन कोणालाही. तोंडाने आपल्या अभावांचा, त्रासाचा उच्चार करणे तर त्यांच्या स्वभावातच नव्हते. हा विलोप किती असावा? तर कालच्या त्यांच्या अंत्ययात्रेत डॉ. रामभाऊ तुपकरींनी मला हळूच विचारले- श्रीपाद, दिनूभाऊंना मुलबाळ काय? डॉ. रामभाऊ तुपकरींनी हे विचारणे याला खूप महत्व आहे. ज्याला रामभाऊ तुपकरी माहीत आहेत त्यालाच हे कळेल. संघातील एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, तरुण भारतचे प्रकाशन करणाऱ्या नरकेसरी प्रकाशनाचे व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम अर्बन बँकेचे संस्थापक संचालक, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रथम मेटॅलर्जी विभागाचे प्रमुख आणि नंतर अधिष्ठाता; असे रामभाऊ. संघ आणि परिवारातील अनेक वरिष्ठांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध. त्यात दिनुकाकाही आलेत. पण दिनुकाकांना मुलबाळ नाही हे त्यांनाही माहीत नव्हते. इतकी विलोपी वृत्ती. हे त्यांच्या व्यवहारातही दिसून येत असे. वयाच्या ८० पर्यंत सुद्धा घरची बिले भरणे आदी कामे ते स्वत: करत. घरातील हवेनको, भाजी-किराणा, औषधपाणी, दुरुस्ती-डागडुजी वगैरे सगळे. घरी येणाऱ्यांचा राबता तर होताच. काकू नेहमीच हसून स्वागत करीत. चहापाणी, खाणेपिणे करीत. पण काकूंचा चहा झाला की, स्वयंपाकघरात जाऊन तो बैठकीच्या खोलीत घेऊन येणे अन आलेल्याला देणे हे दिनुकाका करीत.

वृत्तीची ही सात्विकता नेहमीच अनुभवायला मिळत असे. दोन वर्षांपूर्वी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांचा एक कार्यक्रम भगवाननगरात झाला. कार्यक्रम अगदी घरगुती. नगराचे संघचालक डॉ. रमाकांत कापरे यांच्याकडे जेवण. त्यानिमित्ताने डॉ. कापरेंनी सगळ्या जुन्या, मोहनजींसोबत काम केलेल्या स्वयंसेवकांनाही भोजनाला बोलावले होते. सुरुवातीला एकत्र बसणे, गप्पा वगैरे अन मग भोजन असा कार्यक्रम. गप्पा वगैरे झाल्या. उपलब्ध जागेनुसार भोजनाची व्यवस्था दोन भागात झाली. सरसंघचालक, काही स्वयंसेवक, घरची मंडळी यांची पंगत डॉ. कापरेंकडे झाली, अन त्यांच्याच घरापुढील राचलवार यांच्या घरी बाकी लोकांची व्यवस्था. जेवणे वगैरे झाल्यावर सरसंघचालक थोडा वेळ डॉ. कापरे यांच्याकडे बसले. नंतर कार्यालयात परत गेले. दिनुकाका मात्र त्यावेळी समोरच्या घरी भोजन वगैरे आटोपल्यावर सरसंघचालकांना निरोप देण्यासाठी बाहेर उभे होते. आपण वयाने, अनुभवाने ज्येष्ठ आहोत, आत जाऊन बसलो तर कोण काय म्हणणार आहे? किंवा भोजन करून निघून गेलो तर काय होते? किंवा आपल्याला कोणी बसा वगैरेही म्हटले नाही; असे काहीही त्यांच्या मनाला शिवले सुद्धा नाही. लहान मोठ्या, मान अपमानाच्या कृतक कल्पना त्यांच्या जवळही फटकत नसत.

व्यक्तिगत अनुभवही असाच असायचा. वास्तविक मी म्हणजे त्यांच्यासमोर `पोर'. शेंबूड पुसता येत नव्हता तेव्हापासून त्यांनी मला पाहिलेले. पण मोठा झालो, पत्रकारितेत आलो, त्यामुळे थोडीबहुत ओळख निर्माण झाली, थोडे लिहू बोलू लागलो; त्यानंतर त्यांच्या वागण्यात बदल झाला. बोलताना एकेरी बोलत असले तरीही `पोर' म्हणून न वागता सन्मान राहत असे. आपल्यालाच ते बरं वाटत नसे. पण त्यांनी सहजपणे तो बदल केला. असा बदल करणे सोपे नसते. मनाचे उमदेपण आणि मोठेपण त्यासाठी हवे. एकदा स्व. दत्तोपंत ठेंगडी त्यांच्याकडे मुक्कामाला होते. त्यांनी मला भेटायला बोलावले. त्या भेटीच्या वेळीही त्यांचा हा विलोपीपणा पाहायला मिळाला. स्व. दत्तोपंत आणि मी जवळपास तीनेक तास बोलत होतो. काकूंच्या हातचा इडलीसांबार अन चहाचा आस्वाद घेत आमचे बोलणे सुरु होते. पण दिनुकाका तेथे येऊनही बसले नाहीत. ते माझ्यापेक्षा वयाने तर मोठे होतेच, भारतीय मजदूर संघात मोठे पदाधिकारी होते, त्यांचेच घर होते; ते आले असते, बसले असते, बोलले असते तर त्यात वावगे काहीच नव्हते. पण पंतांनी मला बोलावले होते अन आम्ही बोलत होतो, तेव्हा बाजूला राहण्यात त्यांना कसलाही अनमान वाटला नाही.

निरपेक्ष आत्मीयता हाही दिनुकाकांचा विशेष. त्यातून गोष्टीवेल्हाळ. जो दिसेल त्याच्याशी बोलणार, त्याची विचारपूस करणार, कोणी कधीही गेला तरी त्याला उपलब्ध असणार, त्याच्यासाठी वेळ देणार. म्हणूनच वस्तीत असो वा भारतीय मजदूर संघात त्यांचा लोकसंपर्क अन लोकसंग्रह अफाट होता. शाखेत येणारे स्वयंसेवक, त्यांचे घरचे लोक यांच्याशी तर त्यांचा संबंध होताच; पण शाखेत कधीही न येणाऱ्यांशीही त्यांचे जातायेता अनौपचारिक बोलणे, विचारपूस राहत असे. या लोकसंग्रहात उच्च जातींचे समजले जाणारे, खालच्या जातींचे समजले जाणारे, दलित, आदिवासी, मुसलमान, ख्रिश्चन, महिला असे सगळेच होते. अशा प्रकारच्या संबंधांचे अनेक हृद्य अनुभव त्यांच्या संग्रही होते. ते किस्से बरेचदा ऐकायलाही मिळत असत. गेली काही वर्षे त्यांच्या पायांनी त्यांच्याशी असहकार केला होता. दहापंधरा मिनिटे उभे राहणेही कठीण होत असे. पण फिरणे, गाडी चालवणे, प्रवास, संपर्क हे सारे सुरूच होते. कामाच्या निमित्ताने देशभर फिरून झाले होते. कामगार संघटनेचे काम केल्याने उद्योगपती, मालक, सरकार अशांशी देखील परिचय होता. विविध भाषा बोलत असत. सहज बोलताना मराठीवरून कधी हिंदीवर, तर कधी इंग्रजीवर जात असत. अन ते देखील धाराप्रवाही.

२३ ऑगस्टला त्यांनी घरी सत्यनारायण पूजा ठरवली होती. श्रावण मासानिमित्त. त्यासाठी सोवळे नेसून तयार असतानाच ते खाली पडले. लगेच दवाखान्यात भरती करण्यात आले. मेंदूतील रक्तस्रावाने ते कोसळले होते. त्याचेच रुपांतर अंग लुळे पडण्यात झाले. त्याउपरही उपचारांना प्रतिसाद देत होते. पण परवा, १ सप्टेंबरला संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला अन त्यांची प्राणज्योत मालवली. १२ ऑगस्ट रोजी त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली होती. एक कृतार्थ आणि सुदीर्घ आयुष्य जगून दिनुकाका गेले.

स्वत:साठी काही न मागता, कशासाठीही कुरकुर वा तक्रार न करता, अभावांचा वा कष्टाचा बाऊ न करता, आपला विचार कमी आणि बाकीच्यांचा विचार जास्त; असे जगता येते का? माणसे अशी जगतात का? असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे उत्तर `होय' असे आहे. दिनुकाका हे त्याचे उदाहरण आहे. त्यांच्यासारखी माणसे पाहायला, अनुभवायला मिळतात तेव्हा; साधेपणा, माणुसकी, आत्मविलोपी वृत्ती, कष्ट, निर्वैर या केवळ बोलण्याच्या गोष्टी नाहीत, जगण्याच्या गोष्टी आहेत यावर अविश्वास ठेवण्याचे कारण उरत नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३ सप्टेंबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा