शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

राष्ट्रवाद - भारतीय अन अभारतीय


कालचा दिवस नि:संशय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांचा होता. त्याचा प्रभाव बराच काळ राहणार आहे. ते स्वाभाविक तर आहेच, पण त्यात अयोग्य देखील काहीही नाही. त्यांनी आपल्या भाषणात, लोकसभेत त्याआधी झालेल्या एका भाषणाचाही उल्लेख केला होता. तो होता, पश्चिम बंगालमधील जादवपूरचे तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुगत बसू यांचा. खा. बसू यांचे भाषण खरंच अप्रतिम होते. पण अपूर्ण व अप्रामाणिक होते. अपूर्ण एवढ्यासाठी की, राष्ट्रवादाचे जे मूलगामी विवेचन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याची सांगड ते वर्तमानाशी घालू शकले नाहीत. अन जी सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला ती तर्कदुष्ट आणि पूर्वग्रहदूषित होती. खा. बसू यांनी महर्षि अरविंद, रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, नेताजी बोस आदींचा उल्लेख केला. रवींद्रनाथांच्या nationlasim या ग्रंथाचाही उल्लेख केला. अन त्यांची टिप्पणी होती की, आज रवींद्रनाथ असते तर त्यांनाही राष्ट्रद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला असता. त्यांनी न उच्चारलेले पण अध्याहृत असलेले कारण हे की, रवींद्रनाथ आंतर्राष्ट्रवादी (वैश्विक) होते. खा. बसू यांचे वैश्विकता आणि राष्ट्रवाद याबद्दलचे आकलन तर तोकडे आहेच, पण राष्ट्रवादी विचारधारेवर त्यांनी केलेला आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहे.

वैश्विकता आणि राष्ट्रवाद या परस्परविरोधी बाबी आहेत, हा भारतेतर विचार आहे. भारतीय चिंतन परंपरा या दोन्हीत काहीही विरोध वा संघर्ष मान्य करीत नाही. राष्ट्रीयता आणि वैश्विकता या दोन वेगळ्या पायऱ्या आहेत एवढेच. राष्ट्रीयता हा अलीकडचा टप्पा आणि वैश्विकता हा पलीकडचा टप्पा. राष्ट्रवादी असल्याशिवाय कोणी विश्ववादी होऊ शकत नाही, अन राष्ट्रवादी होऊन कोणी तिथेच थांबू शकत नाही. मूलत: भारतीय चिंतन परंपरा पूर्णवादी आहे. ती या संपूर्ण अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहते. या अस्तित्वाकडे एक unit म्हणून पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा वेगळा नाही. तोही त्या unit चाच भाग आहे. अन व्यक्ती ते विश्व या त्याच्या जाणिवांच्या पातळ्या आहेत. राष्ट्र ही त्यातील एक पातळी. जाणिवांची ही साखळी `व्यक्ती'पासून सुरु होते आणि कुटुंब, परिसर, समाज, निसर्ग, राष्ट्र असे करत `विश्व' जाणिवेपर्यंत पोहोचते. मात्र भारतीय चिंतन परंपरा केवळ वैश्विक नाही, ती त्याच्याही पलीकडील चेतन स्तरापर्यंत जाणीवेच्या विकासाची मांडणी करते. या जाणीवा एकाच ठायी एकाच वेळी अस्तित्वात असतात. फक्त त्यांची अभिव्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत कमी अधिक होत असते इतकंच.

या देशातील सगळेच विचार, सगळेच महापुरुष, सगळेच चिंतन वैश्विकच आहे, पण त्याचा राष्ट्रीयतेशी संघर्ष नाही. रवींद्रनाथ टागोर हा काही अपवाद नाही. उपनिषदांपासून आजतागायत हाच प्रवाह चालत आला आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरदेखील विश्वात्मक देवाला, विश्वासाठी पसायदान मागतात किंवा आचार्य विनोबा भावे `जय जगत'चा नारा देतात. एखादी व्यक्ती रोजच्या खाण्यापिण्याचा, कपड्यालत्त्याचा विचार `व्यक्ती' स्तरावरच करते. पण नेपाळला विनाशकारी भूकंप झाला की, लगेच मदतीचा हात पुढे करते. `मी' आणि `विश्व' या दोन्ही जाणीवा तिच्या ठायी आहेतच. त्या विशिष्ट वेळी अभिव्यक्त होतात. या दोनच्या मधील परिवार, परिसर, समाज, राष्ट्र इत्यादीच्या बाबतीतही असेच आहे. चांगले, सुखी, आनंदी, अर्थपूर्ण, सार्थक जीवन जगताना आणि जगण्यासाठी आवश्यक अशा या पायऱ्या आहेत. `मी'चा संपूर्ण विलय होऊन `चेतन' सत्तेत सदासर्वदा अवस्थित व्यक्ती हे व्यक्तित्वाच्या विकासाचे भारतीय मापदंड आहेत. परंतु किती जणांच्या बाबतीत हे वास्तव आहे वा असू शकते? फार थोड्यांच्या बाबतीत, हे त्याचे उत्तर आहे. `मी'च्या मर्यादा आणि `वैश्विक'तेची ओढ आणि आवश्यकता लक्षात घेऊन व्यक्तीच्या उत्तरोत्तर जाणीव विकासाचा विचार आवश्यक ठरतो. तसा तो केला नाही तर त्यातून भांबावलेपण अन सर्वनाश ओढवतो. ज्यांच्या जाणिवांचा स्तर अधिक आहे, त्यांना त्याहून लहान स्तर चुकीचा वाटत असेल तर त्याच्या जाणिवांचा विकास झालेला नसून, त्याच्या बुद्धीला फक्त त्याची माहिती आहे; असा अर्थ काढावा लागेल. ज्याच्या जाणिवांचा खरेच विकास अन विस्तार झालेला आहे, त्याला धाकट्या जाणीवा नाकारण्याची गरज पडणार नाही, कारण त्यातूनच पुढे जायचे असते हे त्याला अनुभवाने माहिती असते. हाच आहे सनातन धर्म. म्हणूनच महर्षी अरविंद म्हणतात भारतीय राष्ट्रवाद = सनातन धर्म.

परंतु हा सगळा विचार करणारा अन त्याचा अनुभव घेणारा व्यक्ती वेगळा आहे. कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सगळ्या बाबी त्या व्यक्तीच्या सुख व आनंदासाठी आहेत. व्यक्तीच्या सुख व आनंदाला सहाय्यक ठरतील तोवर त्या योग्य अशी दृष्टी व भावना असेल तर मात्र प्रत्येक स्तरावर संघर्ष अपरिहार्य ठरतो. आज व्यक्ती आणि कुटुंब यांच्यातील संघर्ष हे त्याचेच रूप आहे. किंवा एखादी व्यक्ती वैश्विकता, मानवता इत्यादींचा धोशा लावतानाच आपले व्यक्तिगत सुख- सुविधा- साधने- मानसन्मान- पदप्रतिष्ठा- याबद्दल आत्यंतिक संवेदनशील, प्रसंगी असहिष्णू असल्याचे पाहायला मिळते. माझी पदोन्नती न होता दुसऱ्याची झाली तर ते त्याच्यासाठी असह्य ठरते. त्यावेळी त्याची मानवता कुठेतरी गुडूप होऊन जाते. हाच न्याय समूहालाही लावता येईल अन तसे होते तेव्हा राष्ट्र हे विशिष्ट समुहाचे सुख वा प्रभाव यांचे एक उपकरण ठरते अन ते संघर्षाचे कारणसुद्धा. भारताबाहेर झालेला राष्ट्रांचा विकास हा अशा प्रकारे समूहाच्या सुख व वर्चस्वाच्या भावनेतून झालेला आहे. भारतीय राष्ट्रविचार हा व्यक्तीच्या जाणीव विकासाच्या मार्गातील एक टप्पा या अंगाने जाणारा आहे. म्हणूनच सर्वच प्राचीन, अर्वाचीन संत, महापुरुष, ऋषीमुनी, दार्शनिक, चिंतक, विचारवंत हे एकाच वेळी व्यक्तिवादी, समूहवादी, राष्ट्रवादी, मानवतावादी, विश्ववादी अन संपूर्णतावादी होते व आहेत. वेगवेगळ्या वेळेला परिस्थिती नुसार त्यांनी त्याचे प्रतिपादन केले आहे. म्हणूनच मानवतावादी असलेले रवींद्रनाथ टागोर स्वातंत्र्य आंदोलनातदेखील सहभागी होते. अन विश्वात्मक विचार करतानाच राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणारे गांधीजी त्यांना चुकीचे वाटत नव्हते. उलट आपले आप्त वाटत होते.

एक व्यक्ती असो की संपूर्ण मानवजात; सगळ्यांचे कल्याण हेच उद्दिष्ट ठेवून; व्यवहार आणि विभिन्न मर्यादा लक्षात घेऊन, विकसित झालेल्या रचनेतील, विविध टप्प्यांपैकी एक टप्पा म्हणजे `राष्ट्र' ही दृष्टी असेल तर काहीही नाकारण्याचे कारण नाही, अन कुठला संघर्षही उरत नाही. याउलट आपल्या लहान वा मोठ्या `मी'चे स्वार्थसाधन म्हणून पाहिले तर प्रत्येकच गोष्ट नाकारावी लागते अन प्रत्येकच स्तरावर संघर्षाची पाळी येते. भारताचा अन रा.स्व. संघाचाही राष्ट्रवाद हा जाणीवविकासाच्या मार्गावरील राष्ट्रवाद आहे. अन अन्य लोकांचा राष्ट्रवाद स्वार्थसाधनेचा राष्ट्रवाद आहे. त्यामुळेच खा. सुगत बसू तोंडाने रवींद्रनाथ किंवा महर्षी अरविंद यांचा राष्ट्रवाद सांगत असले तरीही महिषासुरमर्दिनीचे भंजन करणे त्यांना नाकारावे वा दुर्लक्षित करावे लागते. कारण ते स्वार्थसाधनेत अडथळा आणते. याउलट रा.स्व. संघ `हिंदुराष्ट्र' म्हणत असताना सुद्धा राष्ट्रीय मुस्लिम मंच स्थापन करू शकतो. त्याला काहीही नाकारावे लागत नाही. संघाला आपला राष्ट्रवाद कोणावरही थोपवायचा नाही. कारण तो थोपवता येतच नाही. जाणीवेचा विकास ही थोपवण्याची बाबच नाही. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताबाहेर आपले काम `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या नावाने नव्हे, तर `हिंदू स्वयंसेवक संघ' या नावाने चालवले आहे. राष्ट्राचा परीघ कोणता याचे पूर्ण भान संघाला आहे. अन राष्ट्रच कशाला व्यक्ती ते ब्रम्हांड यांचे परीघ कोणते आणि का, याचे सखोल चिंतन ही भारतीय राष्ट्रवादाची विशेषता आहे. भारतेतर मापदंड लावून, अन सगळ्यात महत्वाचे म्हणजे `स्व'ला अवास्तव गोंजारुन भारतीय राष्ट्रवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हाती काही लागण्याची शक्यता नाही. `स्व' नाकारायचाही नाही अन त्याच्या परीघाकडे, सामर्थ्याकडे अन मर्यादेकडे दुर्लक्षही करायचे नाही, अशी भूमिका अन दृष्टी असेल तर भारतीय राष्ट्रवाद तर कळेलच, पण संघर्षही कमी करता येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा