रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

वर्तमान, अपुऱ्या मानवतावादाचे परिणाम

`साहित्यिकांची नाराजी' प्रकरण अजून सुरूच आहे. त्यातील राजकारण, पुरस्कार वगैरे परत करणाऱ्या साहित्यिकांचे हेतू, त्यांच्या मनातील आपपरभाव इत्यादी बाबी थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केला तरीही एक गोष्ट जाणवते की, त्यांच्या भूमिकेचा पूर्ण प्रामाणिकपणा मान्य करूनही त्यांची भूमिका चुकीची आहे. कारण आपल्या कृतीसाठी त्यांच्याकडून जी कारणे दिली जात आहेत, त्याची जी विश्लेषणे व स्पष्टीकरणे दिली जात आहेत त्यांच्यावरच प्रश्नचिन्ह लावले जाऊ शकेल. नव्हे ते तसे लावले जायला हवे. नाराज, निराश, राजीनामे देणारे साहित्यिक मानवतावादी आहेत. अन त्यांचं वैचारिक, भावनिक पोषण करणारा हा वर्तमान मानवतावाद मुळातच अपुरा, अर्धवट, चुकीचा आहे. त्याचा आधार, त्याची गृहितकं, त्याने जन्माला घातलेल्या कल्पना- संकल्पना, त्याने तयार केलेल्या मान्यता, त्याने रेखलेले चित्र; हे सारेच अपुरे व चुकीचे आहे.

सिग्मंड फ्रॉईडचे मानसशास्त्र हा त्याचा फार मोठा आधार आहे. एक तर मुळातच फ्रॉईडने त्याचे सगळे विचार, तर्क, सिद्धांत विकृत व्यक्तींच्या निरीक्षण, परीक्षणावरून काढलेले आहेत. त्यामुळेच ते एकांगी आहेत. त्याने केवळ जाणीवयुक्त बाह्य मन मान्य केले. नेणिवेतील अबोध मन फ्रॉईडला मान्यच नाही. त्यामुळेच तो माणसाची बहिर्मुखता फक्त मान्य करतो. केवळ बहिर्मुखता सत्य आहे अंतर्मुखता असत्य म्हणूनच त्याज्य आहे असे तो म्हणतो. शिवाय कामभावना या विश्वातील सगळ्या गोष्टींच्या मुळाशी असल्याचा त्याचा सिद्धांत किती तकलादू आहे हे वरवर विचार केला तरीही लक्षात येते. गेल्या वर्षी नेपाळमध्ये महाविनाशकारी भूकंप झाला. तेव्हा सगळ्या जगाने त्याला जो प्रतिसाद दिला त्याच्या मुळाशी कुठे कामभावना होती? अन अशा व्यक्तिगत अन सामूहिक घटना अपवादात्मक नसून नियमित घडत असतात. शिवाय कामभावना ही मूळ बाब मानली तरीही केवळ दोन शरीरांचे मिलन यापलीकडे फ्रॉईड जाऊ शकलेला नाही. अस्तित्वाच्या सूक्ष्म स्तरांवरील कामभावनेचा विकास त्याच्या आवाक्यात येऊ शकलेला नाही. भारतीय तंत्रविचारात सुद्धा या विश्वाच्या मुळाशी कामभावना मान्य केली आहे. त्यातूनच शिव-शक्ती वा पुरुष-प्रकृती कल्पना आल्या. पण या कल्पना म्हणजे दोन शरीरांचे स्थूल मिलन नाही. मन, बुद्धी आणि चेतन पातळीवरील कामभावनेचे संवेदन आणि प्रकटीकरण स्थूल शारीर जाणीवांपेक्षा निश्चितच निराळे राहील. पण बहिर्मुखी जाणीवाच अंतिम सत्य मानल्याने फ्रॉईड त्या भावनांचा विकास करूच शकला नाही.

फ्रॉईडला त्याचाच सहकारी असलेल्या कार्ल जंगने आव्हान दिले होते. खरे तर दोघेही मित्र. दोघांनी मिळून १९११ साली आंतरराष्ट्रीय मनोविश्लेषण समिती स्थापन केली होती. पण अबोधात्मक मन हाच दोघांच्या मतभेदांचा मुद्दा झाला. वर्षभरातच फ्रॉईडने स्वत: त्यास वेगळे होण्याची विनंती केली आणि जंगने वेगळे होऊन आपले काम सुरु ठेवले. नंतर त्याने आपले `विश्लेषणात्मक मानसशास्त्र' मांडले. जाणीवेपलीकडील जीवनशक्तीचा सिद्धांत त्याने मांडला. जीवनातील द्वंद्व आणि संघर्ष त्या जीवनशक्तीतून उत्पन्न होतात, असे त्याचे मत होते. एवढेच नव्हे तर उपनिषदातील या विश्वाची मूळ शक्ती आणि आपण प्रतिपादन करीत असलेली जीवनशक्ती यातील साम्यही जंगने दाखवले आहे. त्याविषयी मतांतरे आहेत. एवढेच नव्हे तर भारतीय चिंतनाने मनापलीकडील अस्तित्वाचे अनेक स्तरही सांगितले आहेत. हे स्तर अनुभवगम्य नसून अनुभूतीगम्य आहेत असे भारतीय चिंतन सांगते. मात्र, स्थूल इंद्रियगम्य बाह्य विश्व हेच एकमेव आणि अंतिम सत्य होय. तेच मानवाचे खरे रूप होय हा फ्रॉईडचा सिद्धांत मात्र भारतीय चिंतनाला आणि त्याचा सहकारी राहिलेल्या जंगलाही मान्य नाही.

दैनंदिन जीवनात सुद्धा फ्रॉईडच्या मान्यता अपुऱ्या असल्याचे प्रत्ययास येते. तरीही जगभर त्याच मान्यता उचलून धरण्यात आल्या. याची तीन कारणे असू शकतात- १) काळाचा महिमा, २) व्यापारी संस्कृतीचे/ जीवनपद्धतीचे हितसंबंध, ३) इंद्रियगम्य सुखाची मानवाची लालसा. परंतु कारण कोणतेही असले तरीही, केवळ बाह्य जगाच्या प्रेरणा माणसाचे व्यक्तिगत आणि सामूहिक जीवन सुखी, शांत, समाधानी बनवू शकत नाहीत. त्यातून केवळ तात्विक, वैचारिक, सैद्धांतिक, व्यावहारिक संघर्षच जन्माला येऊ शकतात. अन्यथा संभ्रम निर्माण होऊ शकतो. निराशा वाढू शकते. दुसरे काहीही नाही. आज जगभरात याचा प्रत्यय येऊ लागलेला आहे.

बहिर्मुखी इंद्रियगम्य विश्वच सत्य मानल्याने व्यक्ती वा समूहाच्या क्रिया अथवा विचार अथवा भावना यांचं मूल्यांकन दृश्य बाबींवरून केले जाते. तसेच त्यांच्या उगमाची, निर्मितीची चर्चा वगैरे करण्याची गरज उरत नाही. जसे प्रेम ही भावना समजून घ्यायची तर गोड आणि नाजूक वागणे-बोलणे हे त्याचे मापदंड. प्रेम हे एक जीवनमूल्य. त्यामुळे गोड-नाजूक वागणे-बोलणे आवश्यक. मग लहान मुलांना रागावणे किंवा शिस्त लावणे वगैरे मानवतावादात बसत नाही. त्यातून `दाग अच्छे है' ही भावना आकारास येते. अशा प्रकारच्या अयोग्य प्रतिमांचा मारा सुरु होतो. तो व्यावसायिक लाभ मिळवून देतो. त्यामुळे अशा प्रतिमा उचलून धरल्या जातात. दिसायलाही छान वाटतं. केवढं मानवतेचं दर्शन आहे, असं वाटतं. पण डाग पाडणे चुकीचे आहे, योग्य नाही; असे वळण लावायचे असेल तर थोडी कठोरता दाखवावी लागते. पण कठोरता म्हणजे प्रेमाचा अभाव, म्हणजे मानवतेच्या विरोधी. अशी ही शृंखला तयार होत जाते. मग बाह्य कठोरतेची उपयोगिता, आवश्यकता, अन त्यातील प्रेम आकलन करण्याची क्षमताच संपून जाते.

समस्यांच्या संदर्भातही हेच दिसते. हिंदू-मुस्लिम संबंधांचा विचार करायचा असेल तर गेल्या अनेक शतकांचा विचार आवश्यक ठरतो. पण तो करायचा म्हणजे काही कठोर गोष्टी बोलाव्या लागतील. कठोर विश्लेषण करावे लागेल. पण बाहेर दिसणाऱ्या कठोरतेचा अर्थ विरोध, दुष्टता, शत्रुता असा लावला गेल्याने; कठोर विश्लेषण होऊ शकत नाही. गोड गोड बोलणे हाच चांगुलपणाचा अन भलेपणाचा निकष ठरू लागल्याने समस्या जटील होत गेल्या. अगदी संयुक्त राष्ट्रसंघ देखील ठराव आणि निषेध यापलीकडे जगातील संघर्ष अन समस्या सोडवू शकलेले नाही. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे उदाहरण घेता येईल. मानवी संवेदना हा त्यांचा प्रांत. त्याचं चित्रण, वर्णन त्यांनी ताकदीने केलं. पण फाळणीच्या वेदना स्वत: भोगल्या असूनही फाळणीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी वा कमी करण्यासाठी ते काहीही करू शकले नाहीत. त्यासाठी काही कठोर गोष्टी कराव्या लागतील. पण कठोरता म्हणजे मानवतेला काळीमा अशी काहीशी धारणा झाल्याने त्यांचा नाईलाज असावा.

बाह्य गोष्टी प्रमाण मानल्याने, आत पाहण्याची, खोलात जाण्याची, कारणमीमांसा करण्याची गरज उरत नाही. अमुक घटना का घडली किंवा अमुक गोष्ट का करायची वा करायची नाही इत्यादीचा विचार अनावश्यक ठरतो. फक्त आपल्या कल्पनाचित्रानुसार गोष्टी घडाव्यात एवढे इच्छाचिंतन उरते. ते नियमित सुरुच राहते आणि समस्याही तशाच कायम राहतात. अमूर्त भावना आणि जाणिवांना दृश्य प्रतिकात बांधण्याचा प्रयत्न साहित्यिक अन कलाकार करतात. आपल्याला जाणवणाऱ्या जाणीवांचं नेमकं स्वरूप, तसेच त्या येतात कुठून याचा संभ्रम कायम राहतो आणि त्या संभ्रमित अवस्थेतच त्या त्या जाणीवांना एखाद्या आकारात, चौकटीत, प्रतिकात कोंबण्याचा प्रयत्न सुरु राहतो. त्या चौकटीत न बसणारी गोष्ट चुकीची ठरू लागते. सूत्ररुपात सांगायचे तर- बाह्य गोष्टी प्रमाण मानायच्या, त्याच्या व्यक्तीसापेक्ष चौकटी तयार करायच्या, सगळ्या घटना- विचार त्यात कोंबायचे, जे कोंबले जाऊ शकणार नाहीत ते चुकीचे अन त्याज्य ठरवायचे. हिंसा-अहिंसा, सुख-दु:ख, न्याय-अन्याय, खरे-खोटे, ज्ञान-अज्ञान, योग्य-अयोग्य, इष्ट-अनिष्ट, चांगले-वाईट, श्रेष्ठ-कनिष्ठ; या व अशा सगळ्या गोष्टींचे निकष म्हणजे चौकटी.

या जगातून दु:ख संपूर्ण नाहीसे होणे शक्य आहे का? या जगातून संघर्ष पूर्ण नाहीसा होणे शक्य आहे का? या जगातून विविधता नाहीशी होणे शक्य आहे का? मी आणि समूह यातील एकच या जगात राहील अशी स्थिती येऊ शकते का? स्वप्न आणि वास्तवाचा संबंध काय? सगळे गोडगोड, छानछान होऊ शकत नसेल तर कशासाठी धडपड करायची? अशा असंख्य प्रश्नांची मालिका उभी राहते, जिची उत्तरे बाह्य इंद्रिय अनुभवांनी मिळू शकत नाहीत. ती तशी मिळवण्याची साहित्यिकांची, कलाकारांची धडपड निष्फळ ठरते ती तेवढ्यासाठीच. केवळ बाह्य विश्वाच्या कसोट्या लावणे एकांगीच ठरणार. त्यातूनच चिंतनशीलतेचा अभाव निर्माण होतो आणि स्वप्नाळूपणाचा बुजबुजाट. साहित्यिकांचे राजीनामे आणि अन्य अशाच बाबी याच एकांगीपणाचा परिणाम आहेत. खरी समस्या हे राजीनामे वगैरे नसून, बाह्य आणि आंतरिक विश्वाचे संतुलन साधून या विश्व व्यापाराकडे पाहण्याची निकोप, सार्थ दृष्टी कशी विकसित करता येईल हा आहे. राजीनामे वगैरेसारख्या उठवळ समस्या त्याने आपोआपच नियंत्रित होतील. एकांगी असण्यापेक्षा एकात्म असणे, संतुलित असणे नेहमीच चांगले असते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २५ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा