बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

अखंड भारत म्हणजे...

ऑगस्ट महिना आला की, अखंड भारताचा विषय सहजच येतो. येत्या १५ ऑगस्टला ६९ वर्षे पूर्ण होतील. पण त्या जखमा अजून भरून आलेल्या नाहीत. खरे तर अखंड भारत हा विषय तेवढ्यापुरता नाहीच. तो फार मोठा आहे. या विषयाची चर्चाही भरपूर होते. अखंड भारताचे पक्षधर आणि त्यात अर्थ नाही अशा दोन्ही बाजू पुढे येत असतात. मात्र `अखंड भारत' म्हणजे नेमके काय याचा विचार दोन्ही बाजूंना फारसा केलेला दिसत नाही. अगदी शेषराव मोरे यांनी त्यांच्या पुस्तकात आणि त्यांच्या पुस्तकाचा प्रतिवाद या स्वरुपात प्रकाशित झालेल्या पुस्तकात सुद्धा अखंड भारताची चर्चा नाही. त्या कल्पनेची मांडणी देखील नाही. अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते आणि अखंड भारत म्हणताना काय अभिप्रेत असते; या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ही तफावतच पुष्कळशा वादविवादांना जन्म देते.
अखंड भारत म्हटल्यानंतर डोळ्यापुढे काय येते? भारत, पाकिस्तान, बांगलादेश यांचे एक राज्य, एक पंतप्रधान, एक मंत्रिमंडळ, एक राज्यघटना इत्यादी. शिवाय १९४७ च्या फाळणीमुळे जी पार्श्वभूमी लाभली आहे त्यामुळे, हिंदू-मुस्लिम संख्या आणि त्यांचे संबंध. अखंड भारत म्हटल्यावर साधारण याच्यापलीकडे चर्चा वा कल्पना जात नाही. मात्र अखंड भारत म्हणजे एवढेच अभिप्रेत नाही हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. `अखंड भारत' आमच्या राष्ट्रीयत्वाचा हुंकार आहे. ती आमच्या राष्ट्रीयत्वाची आकांक्षाही आहे. त्यासाठी राष्ट्र म्हणजे काय हेदेखील नीट समजून घ्यायला हवे. भारतीय राष्ट्रकल्पना आणि nation कल्पना एकच नाहीत हेही समजून घ्यायला हवे.
राष्ट्र म्हणजे काय? `आम्ही एक आहोत' ही जनसमूहातील भावना म्हणजे राष्ट्र. राज्य ही राष्ट्राला मजबूत करणारी आणि त्याचे संरक्षण करणारी एक व्यवस्था आहे. राष्ट्र आपल्याला हवी ती राज्यव्यवस्था निर्माण करतं किंवा नको असणारी राज्यव्यवस्था बदलून टाकतं. राष्ट्र ही मूळ आणि सर्वोपरी बाब आहे. पण ज्याला राष्ट्र म्हणतात अशी ही ऐक्यभावना असते तरी कशी? ती कशी निर्माण होते? कशी वाढते? त्याचा नेमका उगम आणि स्वरूप काय? याबाबत भरपूर गोंधळ आहे. निवासाचा भौगोलिक प्रदेश, भाषा, चालीरीती, परंपरा, प्राचीनता, जाती, पंथ, संप्रदाय, पूजापद्धती, इतिहास, मालकी इत्यादी आधारावर जनसमूहात ऐक्य निर्माण करण्याचे, ऐक्य टिकवण्याचे, एकत्व साधण्याचे अनेक प्रयत्न झाले अन आजही होत आहेत. हे सगळेच प्रयत्न फसलेले आहेत. अन भविष्यात होणारे असे प्रयत्न फसतील यातही शंका नाही. जगाचा प्राचीन अन अर्वाचीन इतिहास अशा उदाहरणांनी भरलेला आहे. कोट्यवधी शवांचे उसासे, लाखो मैल लांबीच्या रक्ताच्या नद्यांचे नि:श्वास, मानवतेच्या अपार हानीचे हिशेब या इतिहासात दबलेले आहेत. मग याचा अर्थ हा आहे का की, राष्ट्र ही चुकीची बाब आहे? राष्ट्रकल्पना टाकून द्यायला हवी का? असा काही निष्कर्ष काढण्याआधी भारताची राष्ट्रकल्पना समजून घ्यायला हवी.
अथर्ववेद सांगतात- व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासातून राष्ट्र उदयाला येतं. व्यक्तीच्या मनातील आत्मभावाच्या विकासाची ही पहिली पायरी नाही अन शेवटचीही पायरी नाही. पहिली पायरी आहे कुटुंब. त्यानंतर क्रमाने भवताल, गाव, ग्रामसमूह, असे करत करत `आत्मवत सर्वभूतेषु' इथवर प्रवास चालतो. राष्ट्र ही त्या प्रवासातील वैश्विकतेच्या अलीकडची पायरी आहे. भाषा, परंपरा, इतिहास, रीतीभाती इत्यादी गोष्टी राष्ट्र जन्माला घालत नाहीत, तर आत्मभावाच्या विकासाच्या मार्गावर चालणाऱ्या स्वाभाविक क्रियाप्रतिक्रियेतून त्यांचा विकास होतो. या आत्मभावाच्या विकासाला जे जे साहाय्यक ते ते त्यामुळे स्वीकार्य ठरते, राष्ट्रीय ठरते. त्यातूनच राष्ट्रीय स्वभाव, राष्ट्रीय मूल्य आकाराला येतात. ही दृष्टी अन त्यासाठीचे प्रयत्न यातूनच भारतीय राष्ट्र विकास पावले. त्याचा स्वभाव आणि चारित्र्य घडले. म्हणूनच ख्रिश्चन, मुस्लीम, ज्यू, पारशी या सगळ्यांना भारताने उदार आश्रय दिला. भारतभरातील भाषाभूषा ऐक्यभावनेच्या आड आल्या नाहीत. भारतीय ऋषीमुनींच्या आध्यात्मिक दर्शनातून, सगळे विश्वब्रम्हांड एकाच स्पंदनाचे आविष्कार आहेत या साक्षात्कारातून ही भारतीय दृष्टी विकसित झाली. म्हणूनच योगी अरविंद तर पुढे जाऊन म्हणतात- indian nationalism is nothing but sanatan dharma. त्यामुळेच भारतात एक सर्वसमावेशक, नित्य विस्तारशील राष्ट्र आकारास आलं.
परंतु प्रश्न तेव्हा निर्माण झाले जेव्हा भारतात आलेल्या काही शक्तींनी सर्वसमावेशक दृष्टी नाकारली. भारताने विकसित केलेली ही जीवनदृष्टी आणि जीवनशैली नाकारून एकांगी भूमिका ज्यावेळी भारतात मूळ धरू लागली अन धुडगूस घालू लागली, त्यावेळी स्वत:च्या विश्वकल्याणी दृष्टीचे, विचारांचे, तत्वांचे अन जीवनाचे रक्षण करण्याचा प्रयत्न या राष्ट्राने केला. म्हणूनच संघर्ष आणि रणवीरांचा इतिहास तुलनेने अलीकडचा आहे. वेद, उपनिषदांमध्ये रणसंघर्ष नाही. मात्र अलीकडील काळात रचलेल्या पुराणांमध्ये हा संघर्ष आहे. त्याचे कारणच संघर्षाचा विचार, त्यासाठीची सिद्धता आणि प्रत्यक्ष पराक्रम यांचा इतिहास या मूळ राष्ट्रावरील आक्रमणानंतरचा आहे. या संघर्षाचा मोठा आणि अलीकडचा परिणाम म्हणजे १९४७ ची भारताची फाळणी होय. या हजारेक वर्षांच्या संघर्षाचा परिणाम हा झाला की, या राष्ट्राच्या स्वाभाविक विकासाला खीळ बसली. याचा अर्थ आत्मभावाच्या विकासाला, एकत्वभावनेची अनुभूती अधिकाधिक लोकांना व्हावी यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसली. त्यासाठी करावयाच्या उदात्त अन प्रचंड उद्यमाऐवजी सर्वसमावेशकता नाकारणाऱ्या शक्तींशी संघर्षातच काळ, शक्ती, बुद्धिमत्ता, धन सगळे खर्ची पडले.
या पार्श्वभूमीवर अखंड भारताचा विचार महत्वाचा ठरतो. सगळ्यांना सामावून घेत, शांततापूर्ण सहजीवन हा जर भारतीय राष्ट्रकल्पनेचा व्यावहारिक आशय घेतला तर; अस्मिता भडकावून छोटे मोठे गट तयार करणे, त्याआधारे सत्ता आणि संपत्तीसाठी सतत संघर्ष करणे ही भारतेतर राष्ट्रकल्पना त्याज्यच ठरते. पाकिस्तानची निर्मिती आणि पाकिस्तानची समस्या याच `आम्ही तुम्हाला मानत नाही' या उद्दंडतेचा परिणाम आहेत. नव्हे जगभरातील अशांतता, उद्रेक, स्थलांतराचे प्रश्न, देशांचे घडणे अथवा मोडणे, युरोपीय युनियनसारखे प्रयोग फसणे, अण्वस्त्राचा धोका हे सगळे exclusivist सत्ताकांक्षी अस्मितेचे अन त्यालाच राष्ट्र समजण्याचे परिणाम आहेत. याच्या मुळाशी भारतेतर जीवनदर्शनांची अपूर्णता आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व जगात कोणीही नाकारीत नाही. मात्र ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वीही होत नाहीत. हे प्रयत्न जिथे अडतात किंवा अपयशी ठरतात तेथे जीवनदृष्टीचा, विचारांचा अपुरेपणा हेच कारण असल्याचे दिसून येते. एखादी गोष्ट का स्वीकारायची अथवा का नाकारायची, एखाद्या गोष्टीचा आग्रह का धरायचा अन एखादी गोष्ट का सोडून द्यायची अशासारखे प्रश्न जीवनदृष्टीच्या अपुरेपणाने निर्माण होतात. भारताने या समस्येवर मात करीत प्रदीर्घ काळ एकरस समाज येथे घडवला. एक सत्य, व्यापक, व्यावहारिक, सर्वसमावेशक, सगळ्यांचा आदर करणारे, पण लघुता- क्षुद्रता- अभद्रता- यांचा त्याग करीत `आम्ही एक आहोत' हा राष्ट्रभाव विकसित करणारे उत्तुंग जीवनदर्शन सगळ्यांपुढे ठेवून, तशा आदर्श जीवनाची आकांक्षा जागवून भारताने ते केले. संपूर्ण जगालाही शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी याशिवाय दुसरा मार्ग नाही. हा मार्ग कोण दाखवणार? जे त्या मार्गावरून चालले आहेत ते. भारत आणि या भारतातील हिंदू समाज यांच्यावरच ही नियतीदत्त जबाबदारी आहे. म्हणूनच ऋषींनी `वसुधैव कुटुंबकम' म्हटले, ज्ञानोबांनी `हे विश्वची माझे घर' म्हटले आणि आचार्य विनोबांनी `जय जगत' म्हटले. परंतु हे होईल कसे? हा जो प्रवास राहील त्याचा प्रारंभ म्हणजे `अखंड भारत'.
१९४७ साली भारत खंडित झाला. अपार जीवितहानी, वित्तहानी झाली. खूप कटुता निर्माण झाली. या साऱ्याची चर्चा होते त्यावेळी त्याची कारणे शोधून आरोप प्रत्यारोप होतात. रा. स्व. संघ, हिंदू महासभा यांनी भारत अखंड राहावा यासाठी काही केले नाही असा आक्षेप घेतला जातो. तर महात्मा गांधींनी आपल्या प्रेतावरून भारताचे विभाजन होईल असे म्हटल्याची अन त्यांनी काहीही केले नाही अशीही टीका होते. कॉंग्रेसने तर अधिकृतपणे विभाजनाला मान्यता दिलीच. कम्युनिस्टांना भारताचे अनेक तुकडे हवे होते त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरजच नाही. मात्र ही सगळी चर्चा विभाजन का स्वीकारले याची आहे. विभाजन का झाले याची नाही. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, रा. स्व. संघ, हिंदू महासभा, गांधीजी, कॉंग्रेस यापैकी कोणीही देश तोडण्याची मागणी वा भाषा केली नव्हती. देश अखंड राखण्यात कोणी अपयशी ठरले असेल, कोणी विभाजन मान्य केले असेल; मात्र तशी कोणाची मागणी नव्हती. दुसऱ्या शब्दात या सगळ्या संस्था, संघटना, पक्ष अन लोक हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाचे विरोधी नव्हते. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र राहू नये असे यापैकी कोणाचेही म्हणणे नव्हते. याचे मुख्य कारण हिंदूंची बहुसंख्या हेच होते. हिंदू कुठेही असला तरीही स्वभावतः सहअस्तित्ववादीच असतो. मग विभाजन कशामुळे झाले? विभाजन सहअस्तित्वाला नकार देण्याच्या मुस्लिम मानसिकतेमुळे झाले. आम्ही बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आम्हाला विशेष लाभ, विशेष दर्जा असला पाहिजे, अन्य लोक दुय्यम आहेत या मुस्लिम प्रवृत्तीतून भारत विभाजित झाला. ही मानसिकता नाकारणारी मुस्लिम संख्या थोडी होती, प्रभावहीन होती हे विभाजनाचे एकमेव कारण आहे. विभाजन घडवून आणणाऱ्या पाश्चात्य शक्तींनीही याच मानसिकतेचा आधार घेऊन, तिला खतपाणी घालून विभाजन प्रत्यक्षात घडवले. द्विराष्ट्रवाद कोणाची देणगी आहे यावरही चर्चा होत असते. त्यात स्वा. सावरकर यांचेही नाव येते. चर्चेपुरता हा दावा स्वीकारला तरीही, सावरकरांना दोन देश हवे होते असा त्याचा अर्थ होत नाही. एकाच देशात दोन राष्ट्रसमूह राहू शकतात. त्यामुळे द्विराष्ट्रवाद कोणीही प्रतिपादन केलेला असला तरीही ते भारत विभाजनाचे कारण नाही. भारत विभाजनाचे एकमेव कारण सहअस्तित्वाला नकार देणारी मुस्लिम मनोवृत्ती आणि त्या मनोवृत्तीचे पोषण करणारे त्यांचे तत्वज्ञान हेच आहे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत खंडित स्वरुपात स्वतंत्र झाल्यानंतर मात्र एक लक्षणीय बदल झाला. कॉंग्रेसने उराशी बाळगलेले अखंड भारताचे ध्येय सोडून दिले. गांधीजींनीही आपल्या अखंड भारताच्या स्वप्नाला तिलांजली दिली. परंतु रा. स्व. संघ, हिंदू महासभा, स्वा. सावरकर यांनी मात्र अखंड भारताच्या ध्येयाचा त्याग केला नाही. स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आलेला भारतीय जनसंघ या राजकीय पक्षानेही अखंड भारताचे ध्येय स्वीकारले होते. यातील हिंदू महासभा शक्तिहीन आणि निष्प्रभ झालेली आहे. सावरकरांचा वारसा सांगणारी कोणतीही संघटीत शक्ती अस्तित्वात नाही. अन भारतीय जनसंघाचा नवीन अवतार असलेल्या भारतीय जनता पक्षाने अखंड भारत हा विषय टाकून दिलेला आहे. रा. स्व. संघ मात्र अजूनही अखंड भारताचे स्वप्न बाळगून आहे. प्रसिद्ध समाजवादी डॉ. राममनोहर लोहिया यांनी जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यासह अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल या स्वरुपात एका confederation ची कल्पना मांडली होती. रा. स्व. संघातर्फे अजूनही अखंड भारताचे स्मरण केले जाते आणि त्याची ती आकांक्षाही आहे.
अखंड भारत ही वास्तविकता होऊ शकेल का? कशी असेल ही वास्तविकता? याचाही विचार अस्थानी ठरू नये. एक राज्य, एक सरकार, एक पंतप्रधान, एक सैन्यदल, एक कायदा असे त्याचे स्वरूप राहणार नाही हे निश्चित. असे स्वरूप राहणारच नाही असे नाही. पण त्याला प्रदीर्घ काळ लागेल. सुरुवातीला तसे चित्र नसेलच. यासोबतच हेही लक्षात घ्यायला हवे की, अखंड भारत म्हणजे केवळ भारत- पाकिस्तान- बांगलादेश- एवढेच नाही. अखंड भारत या कल्पनेत श्रीलंकेपासून अफगाणिस्तानपर्यंत आणि पूर्वेला नेपाळ, ब्रम्हदेश, भूतान पर्यंत सगळ्या लहानमोठ्या देशांचा समावेश असेल. ढोबळ मानाने आज ज्याला `सार्क' म्हणून ओळखले जाते तो प्रदेश. या प्रदेशात भारताशिवाय जे देश आहेत त्यांच्यात मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध व अन्य लोकही राहतात. त्यांच्यात खूप वितुष्ट वा शत्रुत्व नाही. पूजापद्धती, आचारव्यवहार इत्यादी मिळतेजुळते आहे. श्रीलंकेचे प्रमुख भारतातील मंदिरात दर्शनासाठी येतात. श्रीलंकेतील महिला साडी परिधान करतात. खूपसे साम्य आणि सौहार्द्र या देशांमध्ये आहे. `सार्क'च्या माध्यमातून विविध प्रकारची देवाणघेवाण यांच्यात होत असते. एक आर्थिक गट म्हणून पुढे येण्याचीही या देशांची आकांक्षा आहे. परस्परांच्या देशात जाण्यासाठी व्हिसा आदी लागू नये असेही प्रयत्न सुरु आहेत. हीच देवाणघेवाण अधिक व्यापक आणि मूलगामी करीत वैचारिक आणि भावनिक स्तरापर्यंत वाढवली तर अखंड भारताचा एक महत्वाचा टप्पा साध्य होईल. असे झाल्यास निर्माण होणारी शक्ती आजच्या `भारतीय उपमहाद्विपाचे' `भारत' होण्यासाठी मोठा आधार ठरेल. अखंड भारत प्रत्यक्षात येण्याची सुरुवात पाकिस्तानपासूनच व्हायला हवी असे कुठे आहे?
मुख्य अडचण पाकिस्तान व बांगलादेश यांची आहे. परंतु आजची परिस्थिती तशीच राहील असे नाही. वास्तविक हे दोन्ही देश आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने इतके खिळखिळे झाले आहेत की, त्यांचे अस्तित्व टिकेल का असा प्रश्न उघडपणे चर्चिला जातो. त्यांचे अस्तित्वच टिकणार नाही अशी साधार भीती अनेकांना वाटते. उद्या समजा हे देश विखुरले तर? जागतिक शक्ती त्यांचा अफगाणिस्तान करणार नाहीत याची शाश्वती देता येत नाही. आपल्या शेजारी दुसरा अफगाणिस्तान तयार होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे हे देश विखुरलेच तर त्यावेळी निर्णायक चाल खेळणे भारताला आवश्यक ठरेल. तशी चाल भारत खेळू शकला तर तेही अखंड भारताच्या दिशेने टाकलेले पाउल ठरेल. अनेकांना हे पटणार नाही, पण सध्याच्या स्थितीत पाकिस्तान आणि बांगलादेश विखरु नयेत असाच भारताचा प्रयत्न असायला हवा. हे दोन्ही देश एकसंघ राहावेत यासाठी भारताने प्रयत्न करायलाही हरकत नाही.
अखंड भारताचा सकारात्मक विचार करण्यासारखे काही बदल १५ ऑगस्ट १९४७ नंतर झाले आहेत का, याचाही विचार क्रमप्राप्त ठरतो. असे बदल झाले आहेत असे ठामपणे म्हणता येईल. कोणते आहेत हे बदल?
१) हिंदूंची वाढलेली शक्ती. हिंदूंचे संघटन, हिंदूंची आर्थिक, सामाजिक, राजकीय शक्ती वाढलेली आहे.
२) भारतातील मुसलमानांची मानसिकता १०० टक्के पाकिस्तानी राहिलेली नाही.
३) पाकिस्तानपेक्षाही अधिक मुस्लिम भारतात राहतात अन तेही हिंदूंबरोबर. भारतातील, पाकिस्तानातील अन जगभरातील मुस्लिमांना आता याची जाणीव होऊ लागली आहे.
४) भारताची एक देश म्हणून वाढलेली शक्ती अन त्याने जगात प्राप्त केलेले स्थान.
५) पाकिस्तान निर्मितीबद्दल झालेला पाकिस्तानी नागरिकांचाच भ्रमनिरास.
६) भारताशी शत्रुत्व करू नये असा विचार करणारी सध्या लहान असणारी पण पुढे वाढण्याची शक्यता असलेली पाकिस्तानातील शक्ती.
७) इस्लामअंतर्गत सुरु झालेले परिवर्तनाचे प्रयत्न.
८) इस्लामच्या नावाने सुरु असलेल्या दहशतवादाचे इस्लामच्याच अनुयायांना बसणारे तडाखे.
ही सगळीच कारणे भारतापासून दूर झालेल्या देशांना भारताच्या जवळ येण्यासाठी बाध्य करू शकतात, बळ पुरवू शकतात. परंतु एकीकरणाची ही प्रक्रिया केवळ सत्ता आणि संपत्तीच्या लाभहानीपुरती किंवा व्यावहारिक देवाणघेवाणीपुरती राहून चालणार नाही. तसे झाले तर त्यातून हितसंबंधांची गटबाजी निर्माण होईल, अखंड भारत नाही. अशा प्रकारची देवाणघेवाण, कला साहित्य क्रीडा यातील सहकार्य आणि सहयोग इत्यादीसोबत; कोणत्याही काळात आणि कोणत्याही लोकांसाठी, कोणत्याही परिस्थितीत आधारभूत ठरू शकणारे भारतीय जीवनदर्शन रुजवण्याला प्राधान्य द्यावे लागेल. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति', `सर्वेपि सुखिनः सन्तु', `सर्वं खल्विदं ब्रम्ह', `ईशावास्यमिदं सर्वम' ही आणि यासारखी जीवनदृष्टी घडवणारी तत्वे जगण्याचा एक भाग होतील हे पाहिले पाहिजे. यासाठी प्रथम आजच्या भारतात मोठे वैचारिक अन भावनिक परिवर्तन हवे. त्यातून आजच्या भारताची क्षमता वाढेल. ती वाढल्याशिवाय पुढे पाउल टाकताच येणार नाही. भारताची ही क्षमता केवळ तंत्रज्ञान, उद्योग, शेती, सेवा, पैसा, साधने, सुखसोयी यांची क्षमता नसावी. या सगळ्यासह विचारांची क्षमता हवी. विचारांची व्यापकता, कणखरता, मुळापर्यंत जाण्याची तयारी, त्यातून विकसित होणारी जीवनदृष्टी, त्या दृष्टीला अनुकूल व्यवहार; ही सगळी त्या क्षमतेची अंगे होत. यातून अखंड भारत साकार होईल. अन अखंड भारत साकार होणे optional नाही. जमले तर करू बुवा, नाही तर नाही; असे चालूच शकत नाही. अखंड भारत व्हावाच लागेल, त्याला पर्याय नाही. कारण त्याशिवाय संपूर्ण पृथ्वीवरील मानवी सहअस्तित्व सार्थक, शांततापूर्ण अन आनंददायी होऊच शकत नाही. अखंड भारताचा अंतिम टप्पा गाठेपर्यंत भूमिका आणि रणनीती म्हणून अनेक बाबी कराव्या लागतील. वरवर पाहता त्या अखंड भारताच्या स्वप्नाशी विसंगत वाटू शकतील. उदाहरणार्थ- अण्वस्त्रसज्जता. अखंड भारताच्या अंतिम चित्रात त्याला काहीही स्थान नाही. पण त्याची तात्कालिक अपरिहार्यता देखील नाकारता येत नाही. सिद्धांत, भूमिका आणि धोरण यांचा संतुलित विचारव्यवहार अन अशा विचारव्यवहाराची सार्वत्रिक समज या गोष्टी आवश्यक आहेत.
थोर तत्वचिंतक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अखंड भारत या संबंधाने व्यक्त केलेले विचार अखंड भारताच्या दिशेने करावयाची वाटचाल, त्याची तात्विक भूमिका आणि त्याचे व्यवहारिक मार्गदर्शन करणारे आहेत. आपल्या दीर्घ लेखात पंडितजी लिहितात- `अखंड भारत केवळ देशाच्या भौगोलिक एकतेचा परिचायक नाही, तर जीवनाच्या भारतीय दृष्टिकोनाचा द्योतक आहे. हा दृष्टीकोनच अनेकतेत एकतेचे दर्शन घडवीत आहे. म्हणूनच आमच्या बाबतीत अखंड भारत ही अशी एखादी राजकीय घोषणा नाही, की जी विशिष्ट परिस्थितीत लोकप्रिय होईल म्हणून आम्ही स्वीकारली आहे.अखंड भारताची धारणा हा आमच्या संपूर्ण जीवनदर्शनाचा मूलाधार आहे. जर आम्ही युगायुगातून वाहत आलेल्या आपल्या जीवनधारेच्या अंत:प्रवाहाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करू, तर आम्हाला असे आढळून येईल की, आमची राष्ट्रीय चेतना सदैव अखंडतेसाठी प्रयत्नशील राहिलेली आहे आणि त्या प्रयत्नात आम्ही पुष्कळ प्रमाणात सफलही झालो आहोत. १९४७ चा पराजय हा भारतीय एकत्वाच्या अनुभूतीचा पराजय नाही, तर राष्ट्रीय एकतेच्या नावावर केलेल्या भ्रांत प्रयत्नांचा पराजय आहे. जर भौगोलिक दृष्ट्या खंडित झालेल्या भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये एकत्वाची अनुभूती शक्य असेल, तर शेष भूभाग आपल्याशी एकजीव व्हायला वेळ लागणार नाही. एकतेच्या अनुभूतीच्या अभावाने जर देश खंडित झाला आहे, तर त्या अनुभूतीच्या अस्तित्वाने तो अखंड होईल. आम्ही त्याचसाठी प्रयत्न करायला हवा.'
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० ऑगस्ट २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा