२१ ऑगस्टला दुपारी १२ अन संध्याकाळी ७ वाजता पुन्हा एकदा झी वर नटसम्राट लागणार असल्याची जाहिरात पाहिली. साधारण महिनाभरात तिसऱ्यांदा झी वाले हा चित्रपट दाखवतायत बहुधा. साधारण महिनाभरापूर्वी श्रीदेवीने विचारले होते- तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? मी आत्ता पाहतेय. लिहा यावर. गेल्या रविवारी संध्याकाळी मातोश्री पाहत होत्या. अन आज पुन्हा ही जाहिरात. दाखवोत बापडे. आपलं काय जातंय? पण श्रीदेवी लिहा म्हणाली तेव्हा, त्यापूर्वीही अन नंतरही त्याबद्दल जे वाटत होतं अन वाटतंय ते सांगण्याचा मोह आजच्या जाहिरातीमुळे झाला.
सूत्ररूपाने सांगायचं झालं तर `माणूस मोठा होण्यास नकार देतो' तेव्हा त्याचा नटसम्राट होतो. ग्रेस म्हणत असत- people refuse to grow. असंख्य वेळा हे प्रत्ययाला येतं. `नटसम्राट'मध्येच आप्पासाहेब बेलवलकर यांचं एक स्वगत आहे. `या वादळाला कुणी घर देता का घर?' असं काहीसं. त्यात ते म्हणतात- हे वादळ थकलंय आता. मला नेहमी प्रश्न पडतो- असंच होणार, वादळाला थकावंच लागणार, थकावंच लागतं हे कळायला आप्पासाहेबांना इतका वेळ का लागावा? इतके भोग का भोगावे लागावे? अन उत्तर एकच मिळतं- माणसाचा महाप्रचंड अहंकार. युधिष्ठिराचं प्रसिद्ध उत्तर आठवतं- `रोज मृत्यू समोर दिसत असूनही माणूस स्वत:ला अमर्त्य समजून चालत असतो; हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे.' या उत्तरातील तत्व सगळ्या गोष्टींना लागू पडतं. आप्पासाहेब आपल्या `वादळ' असण्यावर इतकं प्रेम करतात की, आपण त्रिकालाबाधितपणे `वादळ'च राहणार ही समजूत ते घट्ट धरून ठेवतात. ती समजूत सोडण्याचा विचारही ते करत नाहीत. तसे प्रसंग येत नाहीत असे नाही. पण ते आपलं `वादळ'पण प्रचंड जोपासत असतात. शेवटी व्हायचं ते होतं. भूमिका आणि आपण एकच आहोत हा भ्रम टाकल्याविना मोठं होता येत नाही.
ही भूमिका फक्त एकट्या आप्पा बेलवलकर यांची नसते; प्रत्येक जण अशा भूमिका पार पाडत असतो. प्रसिद्ध सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्यावर जेव्हा म्हातारपणी हलाखीत राहण्याची पाळी आली तेव्हा हे तत्व वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाले. आपली लोकप्रियता, आपले वादन यात ते इतके गुंतले की, आपलं जीवन ही आपली नव्हे तर बाकीच्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे, ही अपेक्षा ते सोडू शकले नाहीत. आपल्या आवडीनिवडी, छंद, स्वभाव, लहरी, गरजा; एवढेच नव्हे तर नातीगोती, मैत्री, ईश्वर, देवधर्म, कुटुंब, समाज, कायदे; एकूण एक सगळ्या गोष्टींना काही मर्यादा असतात हेच आपल्याला मान्य होत नाही. त्यातील एक वा अनेक गोष्टी आपण इतक्या घट्ट धरून ठेवतो की, त्याबाहेर पडण्याचा विचारही करीत नाही. हे मर्यादांचा विचार न करणे म्हणजेच मोठं होण्याला, माणूस होण्याला नकार देणे. असा नकार देणे हे माणसाच्या रक्तात इतके भिनले असल्यानेच त्याला नटसम्राट आकर्षित करतात. त्यांचे भूमिकेतून बाहेर न पडणेही माणसाला आवडते अन त्यामुळे होणाऱ्या शोकांतिकेवर अश्रू ढाळणेही त्याला आवडते. भुमिकेबाहेर पडणे मात्र कष्टाचे वाटते.
या नटसम्राट नाटकातच एक आणखीन स्वगत आहे. आप्पासाहेब सरकारशी बोलताना म्हणतात- `आभाळ पाठीवर घेऊन जंगलातून फिरणाऱ्या हत्तींना विचारा, तेही सांगतील- कुणीही कुणाचं नसतं.' अतिशय हळवं होऊन आपण पाहतो, पण आपल्या मनात हा प्रश्न येत नाही की, असा सवाल करणारे आप्पासाहेब किती जणांचे झालेत? त्यांना आपलं `वादळ'पण टाकून देऊन किती जणांचं होता आलं? खरं तर हा अतिशय व्यवहाराचा, देवाणघेवाणीचा प्रश्न आहे. सर्वसाधारण माणूस या प्रश्नाच्या रोखाने बरेचदा वागत असतोही. मनाविरुद्ध दुसऱ्यांचा होण्याचा प्रयत्नही करतो. पण खरा प्रश्न आहे- असं कोणी कोणाचं असतं का? होऊ शकतं का? प्रतिभेचा, प्रज्ञेचा, अन प्रेरणेचा पैस जितका मोठा असेल तितकं हे कळतं की- असं कोणी कोणाचं होत वगैरे नाही, होऊ शकत नाही.
आप्पा बेलवलकर जेव्हा म्हणतात की, कोणीही कोणाचं नसतं, तेव्हा त्याचा अर्थ असतो- कोणी तरी कोणाचं तरी असायला हवं. मात्र, खलील जिब्रानचा Prophet जेव्हा गावकऱ्यांना सांगतो की- तुमची मुले तुमची नाहीत. ती तुमच्यातून आली आहेत; तेव्हा तो माणसाला मोठा करीत असतो. तरीही ती पूर्णता मात्र नसते. Prophet फक्त काय नाही ते सांगतो. आप्पा बेलवलकर फक्त अभावाबाबत बोलतात. Prophet त्या अभावाचं वास्तव रूप दाखवतो. अन आदि शंकराचार्य त्याला पूर्णता प्रदान करतात, जेव्हा ते निर्वाणषटक रचतात. मी म्हणजे शरीर, नातीगोती, कुटुंब, कुळकुळाचार, देवधर्म, माता पिता पुत्र बंधू सखा, गुरु शिष्य; काही म्हणजे काही म्हणजे काहीही नाही. मात्र त्याच वेळी ते सूत्र सोडून देत नाहीत. तर `मी'चं स्वरूप सांगतात- चिदानंदरूपः शिवोहम शिवोहम... मी चैतन्य आणि आनंदस्वरूप शिव आहे. ही आहे पूर्णता. हे आहे मोठं होणं.
हे काही एका दिवसाचं काम नाही. हे शिवत्व बाजारात मिळत नाही. वर्षानुवर्षांच्या, कदाचित अनेक जीवनांच्या वाटचालीनंतर ते शिवत्व गवसतं. मात्र या वाटचालीत असंख्य भूमिका सोडून द्याव्या लागतात. त्या भूमिका सोडण्याची वेळ आली की सोडून द्यायच्या, त्यांनी केलेल्या उपकारासाठी मनाच्या तळातून धन्यवाद देऊन. मोठं होण्याचा हाच मार्ग आहे. परंतु भूमिकेला घट्ट चिकटून राहण्याचा अट्टाहास केला की, घर मागत हिंडणारा नटसम्राट जन्माला येतो. या जगाच्या रंगभूमीवर अनेक भूमिका येतात वाट्याला- राजाची, रंकाची, नात्यागोत्याची, समाजसेवकाची, धर्माचार्याची, नटाची किंवा नटीची, रसिकाची किंवा प्रेक्षकाची, सज्जनाची किंवा दुर्जनाची, प्रेयसीची वा प्रियकराची, कलाकाराची, संशोधकाची... कोणाचीही अन कशाचीही. पण असतात मात्र साऱ्या भूमिकाच. वाट्याला आलेली भूमिका सोडून द्यायला खळखळ केली की जे भोगावं लागतं, त्यालाच म्हणतात शोकांतिका. जगाच्या फापटपसाऱ्यातील त्याचं चित्र फक्त वेगवेगळ दिसतं एवढंच. खरं तर फक्त आप्पासाहेब बेलवलकर नाही, तर तुम्ही आम्हीही नटसम्राटच असतो; मोठं व्हायला नकार देणारे. म्हणूनच आम्हाला हे नाटक अन हा सिनेमा आवडतो. नाही तर त्यात आवडण्यासारखं काही नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा