शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

`प्रामाणिक पण अयोग्य' हिंदू वा भारतीय विचार विश्वापुढील आव्हान

पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कलाकारांवर अशी बंधने असू नयेत, असाही त्यातील एक सूर आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अनेकांना तसे प्रामाणिकपणे वाटते. कला, कलाकार, सादरीकरण यांचा आणि दहशतवाद, दोन देशातील संघर्ष- वाद यांचा काय संबंध असा त्यांचा प्रामाणिक प्रश्न असतो. याचा अर्थ त्यांचा युक्तिवाद बरोबर असतो असे नाही, पण त्यांचे वाटणे प्रामाणिक असते. या अयोग्य पण प्रामाणिक मताचा अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना वेगवेगळी आहे; हा सिद्धांत या विचारांच्या मुळाशी आहे. वर्तमानात ज्याला `वैज्ञानिक विचारपद्धती' म्हटले जाते ती हीच. या विश्वातील यच्चयावत प्रत्येक बाब सुटी सुटी आहे. हे सगळे सुटे भाग जोडून हे विश्व आकारास आलेलं आहे असा विचार हे लोक करतात. कधी काही समस्या आली तर संबंधित सुटा भाग काढून टाकायचा, त्याजागी दुसरा बसवायचा म्हणजे झाले. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना परस्परांशी जैविक पद्धतीने जोडल्या असून त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. त्या विलग करता येत नाहीत. खाणेपिणे, कपडेलत्ते, वागणेबोलणे, चालणेफिरणे यासारख्या मोजमाप करता येईल अशा गोष्टी; मन आणि त्याच्या चलनवलनावर परिणाम करतात हे त्यांना मान्य नसते. शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी, भावना वेगळ्या, विचार वेगळे, बाह्य घडामोडी वेगळ्या असा त्यांचा समज असतो. यातील काहीही वेगळं नसून त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकीवर परिणाम होतो हे त्यांना मान्य नसते. परिणामांचा हा आंतरिक फापटपसारा शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांसारखा म्हणता येईल. कुठून कुठे काय पोहोचवतं माहीत नाही. त्यासाठी बुद्धीची सूक्ष्मता हवी. अर्थात रक्तवाहिन्या हे फक्त उदाहरण आहे. त्या प्रत्यक्ष दिसू शकतात आणि भावभावना आणि बाह्य गोष्टी यांना जोडणाऱ्या वाहिन्या दिसत नाहीत हा त्यातील ठळक भेद होय. त्यामुळेच अनेकदा- `पुरावे काय?' या प्रश्नावर येऊन चक्रव्यूह सुरु होतो. परंतु पुरावे नसतानाही अनेक गोष्टी वास्तव असतात. एखाद्या गोष्टीचे पुरावे नाहीत म्हणजे ती गोष्टच नाही असे होत नाही आणि एखाद्या गोष्टीचे पुरावे आहेत म्हणजे ती आहेच असेही होत नाही. मन कोणीही दाखवू शकत नाही पण ते नाही असे नाही. अन पुरावे असून ती गोष्ट नसते याचे उदाहरण म्हणून मकरंद अनासपुरे यांचा `कायद्याचं बोला' चित्रपट पाहावा. `कळते पण वळत नाही' अशी माणसांची स्थिती का असते याला तुकड्यात विचार करणाऱ्यांकडे काहीही उत्तर नसते. अशा वेळी ते फक्त चिडचिड करतात. आधुनिक विज्ञान (relativity and quantum mechanics च्या आधीचे) आणि त्या आधारावर विकास पावलेली विचारपद्धती, त्यातून घडलेले प्रबोधनपर्व हे सगळे याच्या मुळाशी आहे.

relativity and quantum mechanics यांच्यानंतरचे विज्ञान मात्र वेगळे आहे. ते या विश्वाला सुटे भाग एकत्र करून assemble केलेले समजत नाही. हे संपूर्ण विश्व एक एकसंघ एकक आहे. आपण त्या विश्वाच्या अंतर्गत असल्याने त्याचे संपूर्ण आकलन करू शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे. हा विचार वेदांताकडे घेऊन जाणारा आहे. मात्र या आधुनिकोत्तर विज्ञानाच्या आधारावरील विचारपद्धती अजून विकसित झालेली नाही. त्यानुसार प्रबोधन ही त्याही पुढील पायरी. दुर्दैवाने या विश्वाच्या चुकीच्या धारणांवर आधारित विचार, कल्पना, संकल्पना, पद्धती, रचना, मान्यता, शब्दावली घेऊन आम्ही समस्यांची उत्तरे शोधीत आहोत. हिंदू वा भारतीय विचारविश्व हेदेखील या जंजाळात अडकले आहे. गेली तीन-चारशे वर्षे ज्या चुकीच्या रस्त्यावरून चालतो आहोत त्याच चुकीच्या रस्त्यावर आम्ही हवा असलेला पत्ता शोधत भटकतो आहोत. त्यामुळे आम्हाला पत्ता सापडणारच नाही. आम्ही मुक्कामावर पोहोचूच शकणार नाही. हिंदू अथवा भारतीय विचारविश्वापुढे हे खरे आव्हान आहे. आम्ही चालतो आहोत तो रस्ता, त्यावरील ओळखीच्या खाणाखुणा, त्याची दिशा हे सगळेच चुकलेले आहे हे समजावून देणे आणि योग्य रस्ता, दिशा आणि खाणाखुणा सांगणे; ही हिंदू अथवा भारतीय विचारविश्वाची पुढील दिशा असायला हवी. प्रथम त्यांनाच हे समजावून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रचंड मोठा सायास लागेल आणि धीट व्हावे लागेल. राजकारणापल्याड जाऊन `प्रामाणिक परंतु अयोग्य' असा हा विचारव्यूह भेदावा लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा